श्रीमद् भागवत पुराण
सप्तमः स्कंधः
तृतीयोऽध्यायः

हिरण्यकशिपोस्तपसा तप्तानां देवानां प्रार्थनया ब्रह्मणा तस्मै वरदानम् -

हिरण्यकशिपूची तपश्चर्या आणि वरप्राप्ती -


संहिता - अन्वय - अर्थ
समश्लोकी - मराठी


नारद उवाच -
(अनुष्टुप्)
हिरण्यकशिपू राजन् अजेयमजरामरम् ।
आत्मानं अप्रतिद्वन्द्वं एकराजं व्यधित्सत ॥ १ ॥
श्रीनारद सांगतात -
(अनुष्टुप्‌)
हिरण्यकश्यपू याने आता चित्तात घेतले ।
अजरामर मी होतो सम्राट पृथिवीस या ॥१॥

राजन् - हे धर्मराजा - हिरण्यकशिपुः - हिरण्यकशिपु - आत्मानं - स्वतःला - अजेयं - जिंकण्याला अशक्य - अजरामरं - जरामरणरहित - अप्रतिद्वंद्वं - ज्याला कोणी प्रतिस्पर्धी नाही असा - एकराजं - सर्व जगाचा एकटाच राजा - व्यधित्सत - करण्याची इच्छा करिता झाला. ॥१॥
नारद म्हणाले – युधिष्ठिरा, हिरण्यकशिपूने असा विचार केला की, आपण अजिंक्य, अजर, अमर आणि जगाचा एकमेव सम्राट व्हावे. तसेच आपल्याला कोणी शत्रू असू नये. (१)


स तेपे मन्दरद्रोण्यां तपः परमदारुणम् ।
ऊर्ध्वबाहुर्नभोदृष्टिः पादाङ्गुष्ठाश्रितावनिः ॥ २ ॥
मंदराचलि त्या साठी गेला नी लागता तपा ।
तिथे हात उभारोनी एकांगुष्ठीच राहिला ॥२॥

सः - तो - मंदरद्रोण्यां - मंदराचलाच्या दरीत - ऊर्ध्वबाहुः - वर केले आहेत हात ज्याने असा - नभोदृष्टिः - आकाशाकडे लाविली आहे दृष्टि ज्याने असा - पादांगुष्ठाश्रितावनिः - पायाच्या अंगठयाने आश्रय केला आहे भूमीचा ज्याने असा - परमदारुणं - अतिशय भयंकर - तपः - तपश्चर्या - तेपे - करिता झाला. ॥२॥
यासाठी तो मंदराचलाच्या एका दरीत जाऊन अत्यंत तीव्र तपश्चर्या करू लागला. हात उंचावून आकाशाकडे पाहात तो पायाच्या अंगठ्यावर जमिनीवर उभा राहिला. (२)


जटादीधितिभी रेजे संवर्तार्क इवांशुभिः ।
तस्मिन् तपः तप्यमाने देवाः स्थानानि भेजिरे ॥ ३ ॥
जटा तळपल्या जैशा प्रलयंकर तेज ते ।
तपासी लागला तेंव्हा गेल्या स्वस्थानि देवता ॥३॥

अंशुभिः - किरणांनी - संवर्तार्कः इव - प्रलयकाळीचा सूर्य जसा तसा - जटादीघितिभिः - जटांच्या किरणांनी - रेजे - प्रकाशमान झाला - तस्मिन् तपः तप्यमाने - तो तप करीत असता - देवाः - देव - स्थानानि भेजिरे - आपापली स्थाने उपभोगिते झाले. ॥३॥
प्रलयकाळातील सूर्यकिरणांप्रमाणे त्याच्या जटा चमकत होत्या. अशा रीतीने जेव्हा तो तपश्चर्येमध्ये व्यग्र झाला, तेव्हा देव आपापल्या पदांवर पुन्हा आरूढ झाले. (३)


तस्य मूर्ध्नः समुद्‍भूतः सधूमोऽग्निस्तपोमयः ।
तीर्यग् ऊर्ध्वमधो लोकान् अतपत् विष्वगीरितः ॥ ४ ॥
तप ते जाहले थोर निघाला अग्नि मस्तकें ।
चौदिशां दाटल्या ज्वाळा लोकांना जाळु लागल्या ॥४॥

तस्य - त्याच्या - मुर्घ्नि - मस्तकापासून - समुद्‌भूतः - उत्पन्न झालेला - तपोमयः - तपश्चर्यास्वरूपी - सधूमः - धुरासहित - अग्निः - अग्नि - विष्वक् ईरितः - चोहोकडे पसरलेला असा - तिर्यगूर्ध्वमधोलोकान् - बाजूच्या, वरच्या व खालच्या अशा तिन्ही लोकांना - अतपत् - तापविता झाला. ॥४॥
पुष्कळ दिवस तपश्चर्या केल्यानंतर त्याच्या तपश्चर्येची आग धुरासह त्याच्या डोक्यातून बाहेर पडू लागली. ती चारी बाजूंना पसरली आणि खाली-वर तसेच आजूबाजूच्या लोकांना जाळू लागली. (४)


चुक्षुभुर्नद्युदन्वन्तः सद्वीपाद्रिश्चचाल भूः ।
निपेतुः सग्रहास्तारा जज्वलुश्च दिशो दश ॥ ५ ॥
खवळले नद्दा धी नी द्वीप पर्वत कंपले ।
तुटले ग्रह नी तारे धगल्या दाहिही दिशा ॥५॥

नद्युदन्वतः - नद्या व समुद्र - चक्षुभुः - खवळले - सद्धीपाद्रिः भूः - द्वीप व पर्वत यांसह पृथ्वी - चचाल - कापू लागली - सग्रहाः - ग्रहांसहित - ताराः - नक्षत्रे - निपेतुः - पडू लागली - च - आणि - दश दिशः - दाही दिशा - जज्वलुः - जळू लागल्या.॥५॥
आगीच्या ज्वाळांनी नद्या आणि समुद्र उकळू लागले. द्वीप आणि तारे तुटून पडू लागले आणि दाही दिशांना जणू आग लागली. (५)


तेन तप्ता दिवं त्यक्त्वा ब्रह्मलोकं ययुः सुराः ।
धात्रे विज्ञापयामासुः देवदेव जगत्पते ॥ ६ ॥
दैत्येन्द्रतपसा तप्ता दिवि स्थातुं न शक्नुमः ।
तस्य चोपशमं भूमन् विधेहि यदि मन्यसे ।
लोका न यावन् नङ्क्ष्यन्ति बलिहारास्तवाभिभूः ॥ ७ ॥
तपाची लागली आग स्वर्गीचे देव पेटले ।
भितीने ब्रह्मजीपासी गेले नी प्रार्थु लागले ॥६॥
दैत्याच्या त्या तपज्वाळे जळतो आम्हि सर्वही ।
न राहूं शकतो स्वर्गी अनंता आग थांबवा ॥७॥

तेन तपसा - त्या तपश्चर्येने - तप्ताः - तापलेले - सुराः - देव - दिवं - स्वर्गाला - त्यक्त्वा - सोडून - ब्रह्मलोकं - ब्रह्मलोकाला - ययुः - गेले - धात्रे (च) विज्ञापयामासुः - व ब्रह्मदेवाला विनंती करिते झाले - जगत्पते - हे जगाच्या पालका - देवदेव - हे देवाधिदेवा.॥६॥ दैत्येंद्रतपसा - हिरण्यकशिपुच्या तपश्चर्येने - तप्ताः - तापलेले आम्ही - दिवि - स्वर्गात - स्थातुं - राहण्याला - न शक्नुमः - समर्थ नाही - च - आणि - भूमन् - हे ब्रह्मदेवा - यदि - जर - मन्यसे - वाटत असेल तर - अभिभूः - हे सर्वव्यापी - यावत् - जोपर्यंत - तव - तुला - बलिहाराः - पूजा अर्पण करणारे - लोकाः - लोक - न नंक्ष्यंति - नाश पावले नाहीत - तस्य - त्याच्या - उपशमं - मरणाचा उपाय - विघेहि - कर. ॥७॥
आगीच्या लोळांनी स्वर्गातील देव पोळू लागले. ते स्वर्गातून ब्रह्मलोकात गेले आणि ब्रह्मदेवांना प्रार्थना करू लागले, "हे जगत्पती देवाधिदेवा, हिरण्यकशिपूच्या तपाच्या ज्वाळांनी आम्ही पोळू लागलो आहोत. आता आम्ही स्वर्गात राहू शकत नाही. हे अनंता, हे सर्वाध्यक्षा, आपणास योग्य वाटत असेल, तर आपली सेवा करणार्‍या जनतेचा नाश होण्याअगोदरच त्याला शांत करा. (६-७)


तस्यायं किल सङ्कल्पः चरतो दुश्चरं तपः ।
श्रूयतां किं न विदितः तव अथापि निवेदितः ॥ ८ ॥
सृष्ट्वा चराचरमिदं तपोयोगसमाधिना ।
अध्यास्ते सर्वधिष्ण्येभ्यः परमेष्ठी निजासनम् ॥ ९ ॥
तदहं वर्धमानेन तपोयोगसमाधिना ।
कालात्मनोश्च नित्यत्वात् साधयिष्ये तथाऽऽत्मनः ॥ १० ॥
सर्वज्ञ तुम्ही तो आहा तरी प्रस्ताव मांडितो ।
कोणता धरूनी हेतू दैत्याने तप मांडले ॥८॥
वाटते तुम्हि या लोकी जसे नित्य विराजता ।
तसेचि नित्य या स्थाना इच्छोनी करि तो तप ॥९॥
असीम काळ तो आहे नित्य आत्मा तसाचि तो ।
नसे एकाचि जन्मासि एक युगासि तो नसे ॥१०॥

दुश्चरं तपः - दुर्घट तपश्चर्या - चरतःतस्य - आचरण करणार्‍या त्याचा - अयं संकल्पः - हा संकल्प - किल - खरोखर - तव - तुला - न विदितःकिं - माहीत नाही काय - अथ अपि - तरीपण - निवेदितः - सांगितलेला तो संकल्प - श्रूयतां - श्रवण केला जावो. ॥८॥ परमेष्ठी - जसा ब्रह्मदेव - तपोयोगसमाधिना - तपश्चर्या व योग ह्यांच्या उत्तम आचरणाने - इदं - हे - चराचरं - स्थावरजंगमात्मक विश्व - सृष्ट्‌वा - उत्पन्न करून - सर्वधिष्ण्येभ्यः - सर्व स्थानांहून श्रेष्ठ अशा - निजासनं अध्यास्ते - आपल्या सत्यलोकरुपस्थानी राहतो.॥९॥ तत् - त्याचप्रमाणे - तथा - म्हणून - अहं - मी - आत्मानं - स्वतःचे कार्य - वर्धमानेन - वाढणार्‍या - तपोयोगसमाधिना - तप व योग यांच्या आचरणाने - च - आणि - कालात्मनोः - काळ व आत्मा यांच्या - नित्यत्वात् - नित्यत्वामुळे - साधयिष्ये - साधीन.॥१०॥
आपण सर्व काही जाणत आहात, तरीसुद्धा आम्ही आपल्याला निवेदन करीत आहोत. जो हेतु मनात ठेवून तो ही घोर तपश्चर्या करीत आहे, ते ऐका. त्याचा विचार असा आहे की, जसे ब्रह्मदेव तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने हे चराचर जग निर्माण करून सर्व लोकांच्या वर असलेल्या सत्यलोकात विराजमान झाले, त्याचप्रमाणे आपणसुद्धा उग्र तपश्चर्या आणि योगाच्या प्रभावाने तेच पद प्राप्त करून घ्यावे. कारण वेळ अमर्याद आहे आणि आत्मा नित्य आहे. (म्हणून एका जन्मात नाही तर अनेक जन्मांत व एका युगात नाही तर अनेक युगांत) (८-१०)


अन्यथेदं विधास्येऽहं अयथापूर्वमोजसा ।
किमन्यैः कालनिर्धूतैः कल्पान्ते वैष्णवादिभिः ॥ ११ ॥
न जाणो तप शक्तीने उलटे पारडे करी ।
वैष्णवादी पदांनाही अंती विलिन हो पडे ॥११॥

अहं - मी - ओजसा - तेजाने - इदं - हे जग - अन्यथा - निराळ्या स्वरूपाचे - अयथापूर्वं - पूर्वी कधीही नव्हते असे - विधास्ये - करीन - कल्पांते - कल्पाच्या अंती - अन्यैः - दुसर्‍या - कालनिर्धूतैः - काळाने नष्ट केलेल्या - वैष्णवादिभिः - विष्णु इत्यादिकांच्या ध्रुवादि स्थानांशी - किं - काय प्रयोजन.॥११॥
आपल्या तपश्चर्येच्या शक्तीने मी या जगाची वेगळीच रचना करीन. वैष्णव इत्यादी पदांमध्ये तरी अशी काय विशेषता आहे ? कारण कल्पाच्या शेवटी त्यांनासुद्धा काळाच्या गर्तेत जावे लागते. (११)


इति शुश्रुम निर्बन्धं तपः परममास्थितः ।
विधत्स्वानन्तरं युक्तं स्वयं त्रिभुवनेश्वर ॥ १२ ॥
हटयोग करोनीया जुळवी तप थोर हा ।
तुम्ही स्वामी त्रिलोकाचे सर्व जे योग्य ते करा ॥१२॥

त्रिभुवनेश्वर - हे त्रिभुवनाच्या स्वामीन् - इति - असा - निर्बंधं - निश्चय - शुश्रुम - आम्ही ऐकतो - अतः एव सः - म्हणूनच तो - परमं तपः आस्थितः - श्रेष्ठ तपश्चर्या करीत बसला आहे - अनंतरं - या उपर - युक्तं - योग्य असेल ते - स्वयं - स्वतः - विधत्स्व - कर.॥१२॥
अशा प्रकारचे त्याचे मनोगत आम्ही ऐकले आहे. असा हट्ट धरूनच तो घोर तपश्चर्या करीत आहे. आपण तिन्ही लोकांचे स्वामी आहात. आता आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे. (१२)


तवासनं द्विजगवां पारमेष्ठ्यं जगत्पते ।
भवाय श्रेयसे भूत्यै क्षेमाय विजयाय च ॥ १३ ॥
ब्रह्माजी ! हे परमेष्ठी ! सर्वश्रेष्ठ तुम्हा पद ।
वर्धना द्विज गायींच्या कल्याण विजयासही ॥१३॥

जगत्पते - हे जगाच्या ईशा - तव - तुझे - पारमेष्ठयं - परमेष्ठीसंबंधी - आसनं - स्थान - द्विजगवां - ब्राह्मण व गाई यांच्या - भवाय - उत्पत्तीकरिता - श्रेयसे - सुखाकरिता - भूत्यै - ऐश्वर्याकरिता - क्षेमाय - मिळविलेल्याच्या रक्षणाकरिता - च - आणि - विजयाय अस्ति - उत्कर्षाकरिता होय. ॥१३॥
हे जगत्पते, आपले हे परमेष्ठिपद ब्राह्मण आणि गाईंची वृद्धी, कल्याण, ऐश्वर्य, खुशाली आणि विजय यांसाठी आहे. (१३)


इति विज्ञापितो देवैः भगवान् आत्मभूर्नृप ।
परितो भृगुदक्षाद्यैः ययौ दैत्येश्वराश्रमम् ॥ १४ ॥
असे विज्ञापिता देवे ब्रह्म्याने ऐकिले नृपा ।
भृगु दक्ष सवे घेता पातले दैत्य आश्रमी ॥१४॥

नृप - हे धर्मराजा - इति - याप्रमाणे - देवैः - देवांनी - विज्ञापितः - प्रार्थना केलेला - भृगुदक्षाद्यैः - भृगु, दक्ष इत्यादिकांनी - परीतः - वेष्टिलेला - भगवान् आत्मभूः - भगवान ब्रह्मदेव - दैत्येश्वराश्रमं - हिरण्यकशिपुच्या आश्रमाला - ययौ - गेला. ॥१४॥
युधिष्ठिरा, देवांनी जेव्हा भगवान ब्रह्मदेवांना असे निवेदन केले, तेव्हा ते भृगू, दक्ष इत्यादी प्रजापतींसह हिरण्यकशिपूच्या आश्रमात गेले. (१४)


न ददर्श प्रतिच्छन्नं वल्मीकतृणकीचकैः ।
पिपीलिकाभिराचीर्ण मेदस्त्वङ्‌ मांसशोणितम् ॥ १५ ॥
तिथे जाता तयांना तो न दिसे दैत्य झाकला ।
वारूळ तृण वेलि नी मुंग्या अंगास लागल्या ॥१५॥

वल्मीकतृणकीचकैः - वारूळ, गवत आणि वेळू यांनी - प्रतिच्छन्नं - आच्छादिलेल्या - च पिपीलिकाभिः - आणि मुंग्यांनी भक्षण केली आहेत - आचीर्णमेदत्वङ्‌मांसशोणितं तं - मज्जा, त्वचा, मांस व रक्त ज्याची अशा हिरण्यकशिपुला - सः न ददर्श - तो पाहता झाला नाही.॥१५॥
तेथे ते प्रथम त्याला पाहू शकले नाहीत. कारण वारूळ, गवत आणि बांबूंच्या जाळ्या यांनी त्याचे शरीर झाकले गेले होते. मुंग्यांनी त्याची चरबी, त्वचा, मांस आणि रक्त चाटून खाल्ले होते. (१५)


तपन्तं तपसा लोकान् यथाभ्रापिहितं रविम् ।
विलक्ष्य विस्मितः प्राह प्रहसन् हंसवाहनः ॥ १६ ॥
ढगांनी झाकिला सूर्य तसा लोकांसि त्रासि तो ।
ब्रह्मयां विस्मयो झाला हासूनी बोलले तयां ॥१६॥

यथा - ज्याप्रमाणे - अभ्रापिहितं - मेघाने झाकलेल्या - रविं - सूर्याप्रमाणे - तपसा - तपश्चर्येने - लोकान् - लोकांना - तपंतं - ताप देणार्‍या हिरण्यकशिपुला - विलक्ष्य - पाहून - विस्मितः - आश्चर्ययुक्त झालेला - हंसवाहनः - हंसावर बसलेला ब्रह्मदेव - प्रहसन् - हंसतहंसत - प्राह - बोलला. ॥१६॥
तो आपल्या तपश्चर्येच्या तेजाने लोकांना, ढगांनी झाकोळलेल्या सूर्याप्रमाणे तापवीत होता. त्याला पाहून ब्रह्मदेवसुद्धा आश्चर्यचकित झाले. हसत हसत ते त्याला म्हणाले. (१६)


श्रीब्रह्मोवाच -
उत्तिष्ठोत्तिष्ठ भद्रं ते तपःसिद्धोऽसि काश्यप ।
वरदोऽहमनुप्राप्तो व्रियतां ईप्सितो वरः ॥ १७ ॥
श्रीब्रह्मदेव म्हणाले -
तुझे कल्याण हो पुत्रा ऊठ कश्यपनंदना ।
इच्छिसी माग ते सर्व तप पूर्णचि जाहले ॥१७॥

काश्यप - हे हिरण्यकशिपो - उत्तिष्ठ उत्तिष्ठ - ऊठ ऊठ - ते भद्रं - तुझे कल्याण - तपःसिद्धः - तपश्चर्येने सिद्ध - असि - झाला आहेस - अहं - मी - वरदः - वर देणारा - अनुप्राप्तः - प्राप्त झालो - ईप्सितः - इच्छित - वरःव्रियतां - वर मागितला जावा. ॥१७॥
ब्रह्मदेव म्हणाले, वत्सा, ऊठ, ऊठ. तुझे कल्याण असो. कश्यपनंदना, आता तुझी तपश्चर्या सिद्ध झाली आहे. मी तुला वर देण्यासाठी आलो आहे. तुला जे पाहिजे असेल ते नि:संकोचपणे मागून घे. (१७)


अद्राक्षमहमेतं ते हृत्सारं महदद्‍भुतम् ।
दंशभक्षितदेहस्य प्राणा ह्यस्थिषु शेरते ॥ १८ ॥
पाहिला निश्चयो मोठा डासांनी देह तोडिला ।
हाडांच्या त्या सहाय्याने टिकला देह हा तुझा ॥१८॥

अहं - मी - एतत् - हे - ते - तुझे - महत् - मोठे - अद्‌भुतं - चमत्कारिक - हृत्सारं - धैर्य - अद्राक्षं - पाहिले - हि - खरोखर - दंशभक्षितदेहस्य - कीटकांनी खाल्लेल्या तुझ्या देहाचे - प्राणाः - प्राण - अस्थिषु - हाडांत - शेरते - राहिले आहेत. ॥१८॥
मी तुझ्या हृदयाचे अद्‌भुत सामर्थ्य पाहिले. अरे, कीटकांनी तुझा देह खाऊन टाकला आहे. तरीसुद्धा तुझे प्राण हाडांच्या साहाय्याने टिकून आहेत. (१८)


नैतत्पूर्वर्षयश्चक्रुः न करिष्यन्ति चापरे ।
निरम्बुर्धारयेत्प्राणान् कौ वै दिव्यसमाः शतम् ॥ १९ ॥
घोर हे तप ते थोर न केले ऋषिंनी कधी ।
न करील पुढे कोणी देवताशतवर्ष ते ।
न पिता जळ ही थोडे वाचेल कोण तो असा ॥१९॥

एतत् - हे - पूर्वर्षयः - पूर्वीचे ऋषि - न चक्रुः - करिते झाले नाहीत - च - आणि - अपरे अपि - दुसरेही - न करिष्यंति - करणार नाहीत - कः वै - कोणता प्राणी खरोखर - निरंबुः - उदकाशिवाय - दिव्यसमाः शतं - देवांच्या शंभर वर्षेपर्यंत - प्राणान् - प्राणांना - धारयेत् - धारण करील.॥१९॥
अशी कठीण तपश्चर्या पूर्वीच्या कोणत्याही ऋषींनी केली नाही आणि यापुढेही कोणी करणार नाही. असा कोण आहे बरे की, जो शंभर वर्षे पाणी न पिता जिवंत राहू शकेल ? (१९)


व्यवसायेन तेऽनेन दुष्करेण मनस्विनाम् ।
तपोनिष्ठेन भवता जितोऽहं दितिनन्दन ॥ २० ॥
पुत्रा रे कार्य हे थोर धीरवंताहि ना जमे ।
प्रसन्न मज तू केले तपनिष्ठे मला अजीं ॥२०॥

दितिनंदन - हे हिरण्यकशिपो - ते - तुझ्या - अनेन - ह्या - मनस्विनां - दृढ मनाच्या लोकांनाही - दुष्करेण व्यवसायेन - अत्यंत अवघड अशा निश्चयाने - तपोनिष्ठेन भवता - तपश्चर्येत दंग झालेल्या तुझ्याकडून - अहं - मी - जितः - जिंकलो गेलो.॥२०॥
हे दितिनंदना, तू केलेले हे काम धीर पुरुषांनासुद्धा करणे अशक्य आहे. तू या तपश्चर्येने मलाही वश करून घेतले आहेस. (२०)


ततस्त आशिषः सर्वा ददामि असुरपुङ्गव ।
मर्तस्य ते अमर्तस्य दर्शनं नाफलं मम ॥ २१ ॥
मर्त्य तू नित्य मी आहे माग जे इच्छिसी मनीं ।
देईल सर्व ते कांही कृपा ही व्यर्थ जाय ना ॥२१॥

असुरपुंगव - हे दैत्यश्रेष्ठा - ततः - त्या कारणास्तव - ते - तुला - सर्वाः आशिषः - सगळे भोग - ददामि - मी देतो - मर्त्यस्य ते - मृत्यूलोकांत राहणार्‍या तुला - अमर्त्यस्य मम दर्शनं - मर्त्यभिन्न अशा माझे दर्शन - अफलं न (भवेत्) - फुकट जाणार नाही. ॥२१॥
हे दैत्यशिरोमणी, यामुळे प्रसन्न होऊन तू जे काही मागशील ते मी तुला देईन. तू मरणारा आहेस तर मी अमर आहे. म्हणून तुला माझे झालेले दर्शन निष्फळ होणार नाही. (२१)


नारद उवाच -
इत्युक्त्वाऽऽदिभवो देवो भक्षिताङ्गं पिपीलिकैः ।
कमण्डलुजलेनौक्षद् दिव्येनामोघराधसा ॥ २२ ॥
श्रीनारद सांगतात -
युधिष्ठिरा तये वेळी मुग्यांनी तोडिल्या तनीं ।
ब्रह्म्याने सिंचिले पाणी कमंडलु मधील ते ॥२२॥

आदिभवः - सर्वांच्या आधी उत्पन्न झालेला - देवः - ब्रह्मदेव - इति उक्त्वा - याप्रमाणे बोलून - पिपीलिकैः भक्षितांगं - मुंग्यांनी सर्व शरीर खाल्ले आहे अशा त्या हिरण्यकशिपुला - अमोघराधसा दिव्येन - ज्याची सिद्धी फुकट जात नाही अशा स्वर्गीय - कमंडलुजलेन - कमंडलूतील पाण्याने - औक्षत् - सिंचन करिता झाला.॥२२॥
नारद म्हणतात – असे म्हणून ब्रह्मदेवांनी मुंग्यांनी खाल्लेल्या त्याच्या शरीरावर आपल्या कमंडलूतील दिव्य आणि अमोघ प्रभावशाली पाणी शिंपडले. (२२)


स तत्कीचकवल्मीकात् सहओजोबलान्वितः ।
सर्वावयवसम्पन्नो वज्रसंहननो युवा ।
उत्थितः तप्तहेमाभो विभावसुः इव वैधसः ॥ २३ ॥
भडके अग्नी काष्ठात तसा तो वारूळातुनी ।
उठला बलवान्‌ झाला मनी चैतन्य पातले ।
वज्राच्या परि ते अंग सोन्या परि झळाळले ।
तरूणा परि तो झाला उठला राहिला उभा ॥२३॥

सः - तो - कीचकवल्मीकात् - वेळु व वारूळ यापासून - सहओजोबलान्वितः - वीर्यतेज व पराक्रम यांनी युक्त असा - सर्वावयवसंपन्नः - सर्व अवयवांनी पूर्ण असा - वज्रसंहननः - वज्राप्रमाणे बळकट - युवा - तरुण - तप्तहेमाभः - तापविलेल्या सुवर्णाप्रमाणे कांतिमान - एधसः विभावसुः इव - काष्ठातून अग्नि निघतो त्याप्रमाणे - उत्थितः - उठला.॥२३॥
लाकडातून जशी आग वर यावी, त्याप्रमाणे पाणी शिंपडताच तो बांबूजवळच्या वारुळातून उठून उभा राहिला. त्यावेळी त्याचे शरीर सर्व अवयवांनी परिपूर्ण आणि बलवान झाले होते. इंद्रियांमध्ये शक्ती आली होती. आणि मन सचेत झाले होते. सर्व अंग वज्राप्रमाणे कठोर आणि तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकदार झाले होते. तो नवयुवक होऊन उभा राहिला. (२३)


स निरीक्ष्याम्बरे देवं हंसवाहमवस्थितम् ।
ननाम शिरसा भूमौ तद्दर्शनमहोत्सवः ॥ २४ ॥
नभात पाहिले दैत्ये ब्रह्मजी हंसआरूढ ।
चित्ती आनंदला तैसे वंदिले शिर टेकुनी ॥२४॥

तद्दर्शनमहोत्सवः - ज्याच्या दर्शनाने मोठा आनंद झाला आहे ज्याला असा - सः - तो हिरण्यकशिपु - अंबरे - आकाशात - अवस्थितं - उभा राहिलेल्या - हंसवाहं देवं - हंसावर बसलेल्या ब्रह्मदेवाला - निरीक्ष्य - पाहून - शिरसा - मस्तकाने - भूमौ - भूमीवर - ननाम - नमस्कार करिता झाला.॥२४॥
आकाशात हंसावर बसलेले ब्रह्मदेव आहेत, असे त्याने पाहिले. त्यांना पाहून त्याला अतिशय आनंद झाला. त्याने त्यांना शिरसांष्टांग नमस्कार केला. (२४)


उत्थाय प्राञ्जलिः प्रह्व ईक्षमाणो दृशा विभुम् ।
हर्षाश्रुपुलकोद्‍भेदो गिरा गद्‍गदयागृणात् ॥ २५ ॥
अंजली जोडुनी नम्र गद्‌गद्‌ शब्देचि बोलला ।
हर्षाने ढळले अश्रू प्रसन्ने स्तुति गायिली ॥२५॥

दृशा - दृष्टीने - विभुं - ब्रह्मदेवाला - ईक्षमाणः - पाहणारा - प्रांजलिः - हात जोडलेला - प्रह्वः - नम्र झालेला - हर्षाश्रुपुलकोद्‌भेदः - हर्षाने डोळ्यात आनंदाश्रु व अंगावर रोमांच आले आहेत ज्याच्या असा तो हिरण्यकशिपु - उत्थाय - उठून - गग्ददया - गग्दद अशा - गिरा - वाणीने - अगृणात् - बोलला. ॥२५॥
नंतर हात जोडून नम्रतेने तो उभा राहिला आणि मोठ्या प्रेमाने, आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहात गद्‍गद्‍ वाणीने तो स्तुती करू लागला. त्यावेळी त्याच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते आणि सर्व शरीर आनंदाने पुलकित झाले होते. (२५)


हिरण्यकशिपुरुवाच -
कल्पान्ते कालसृष्टेन योऽन्धेन तमसाऽऽवृतम् ।
अभिव्यनग् जगदिदं स्वयंज्योतिः स्वरोचिषा ॥ २६ ॥
हिरण्यकश्यपु म्हणाला -
कल्पांत समयी जैसे तमास दाटती घन ।
प्रगटले तुम्ही तैसे स्वयं तेजे पुन्हा इथे ॥२६॥

यः - जो - स्वयंज्योतिः - स्वतः प्रकाशमान असा - स्वरोचिषा - स्वतःच्या तेजाने - कल्पान्ते - कल्पाच्या शेवटी - कालसृष्टेन - काळाने उत्पन्न केलेल्या - अंधेन तमसा वृतं - निबिड अशा अंधकाराने आच्छादित - इदं जगत् - हे जग - अभिव्यनक् - प्रगट करिता झाला.॥२६॥
हिरण्यकशिपू म्हणाला – कल्पाच्या शेवटी ही सारी सृष्टी कालनिर्मित घनदाट अंधाराने झाकून गेली होती. त्यावेळी स्वयंप्रकाशस्वरूप (असलेल्या) आपण आपल्या तेजाने पुन्हा हिला प्रगट केले. (२६)


आत्मना त्रिवृता चेदं सृजत्यवति लुम्पति ।
रजःसत्त्वतमोधाम्ने पराय महते नमः ॥ २७ ॥
रचिता मोडिता सृष्टी तुम्ही त्रय गुणाश्रय ।
परेश नी महान्‌ तुम्ही नमस्कार तुम्हा असो ॥२७॥

त्रिवृता - त्रिगुणात्मक अशा - आत्मना - आत्म्याने - इदं - हे जग - सृजति - उत्पन्न करितो - अवति - राखतो - लुंपति - लुप्त करितो - रजः सत्त्वतमोधाम्ने महते पराय - रज, सत्त्व व तम ह्यांना आश्रयीभूत अशा मोठया परमेश्वराला - नमः - नमस्कार असो. ॥२७॥
आपणच आपल्या त्रिगुणमय रूपाने हिची निर्मिती, रक्षण आणि संहार करता. आपण रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणाचे आश्रय आहात. आपणच सगळ्यांच्या पलीकडचे आणि श्रेष्ठ आहात. आपल्याला मी नमस्कार करतो. (२७)


नम आद्याय बीजाय ज्ञानविज्ञानमूर्तये ।
प्राणेन्द्रियमनोबुद्धि विकारैर्व्यक्तिमीयुषे ॥ २८ ॥
जगाचे बीज ते तुम्ही ज्ञान विज्ञान मूर्ति ही ।
प्राणेंद्रिय मने बुद्ध्ये स्वताच रूप घेतसा ॥२८॥

आद्याय - सर्वांचा आदिभूत अशा - बीजाय - कारणरूप अशा - ज्ञानविज्ञानमूर्तये - ब्रह्मज्ञान व विषयाकार ज्ञान ह्याची केवळ मूर्ति अशा - प्राणेंद्रियमनोबुद्धिविकारैः - प्राण, इंद्रिये, मन व बुद्धि यांच्या कार्यांनी - व्यक्तिं - स्पष्टपणाला - ईयुषे तुभ्यं - प्राप्त होणार्‍या अशा तुला - नमः - नमस्कार असो.॥२८॥
आपणच जगाचे मूळ कारण आहात. ज्ञान आणि विज्ञान आपली मूर्ती आहे. प्राण, इंद्रिये, मन आणि बुद्धी या कार्यरूपांत आपण स्वत:ला प्रगट केले आहे. (२८)


त्वमीशिषे जगतस्तस्थुषश्च
     प्राणेन मुख्येन पतिः प्रजानाम् ।
चित्तस्य चित्तैर्मन इन्द्रियाणां
     पतिर्महान् भूतगुणाशयेशः ॥ २९ ॥
(इंद्रवज्रा)
त्या प्राणसूत्रे नियता जगाला
    जगास सार्‍या तयि रक्षितात ।
चैतन्य चित्ता तुम्हि स्वामि आहा
    नी सर्व तत्वीं तव रूप आहे ॥२९॥

त्वं - तू - जगतः तस्थुषः च ईशिषे - जंगम व स्थावर याचे नियंत्रण करितोस - मुख्येन - मुख्य अशा - प्राणेन - प्राणाच्या योगे - प्रजानां - प्रजांचा - पतिः - स्वामी - चित्तस्य - चित्ताचा - चित्तेः - चैतन्याचा - मन‌इंद्रियाणां - मन व इंद्रिये यांचा - पतिः - स्वामी - भूतगुणाशयेशः - पंचमहाभूते, शब्दादि गुण व त्यांच्या वासना यांचा स्वामी असा - महान् - सर्वात श्रेष्ठ.॥२९॥
आपणच मुख्य प्राण सूत्रात्म्याच्या रूपाने चराचर जगाला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवता. आपणच प्रजेचे रक्षणकर्तेही आहात. चित्त, चेतना, मन आणि इंद्रियांचे स्वामी आपणच आहात. पंचमहाभूते, शब्दादी विषय आणि त्यांच्या संस्कारांचे निर्मातेसुद्धा महत्तत्त्चाच्या रूपाने आपणच आहात. (२९)


त्वं सप्ततन्तून् वितनोषि तन्वा
     त्रय्या चतुर्होत्रकविद्यया च ।
त्वमेक आत्माऽऽत्मवतामनादिः
     अनन्तपारः कविरन्तरात्मा ॥ ३० ॥
तुम्ही प्रतीपाद्द नि वेदअंग
    विस्तारिता सात यजास तुम्ही ।
सर्वात्मरूपा तुचि आदि अंती
    सर्वज्ञ सर्वांतर रूप ऐसे ॥३०॥

त्वं - तू - त्रय्या तन्वा - त्या वेदरूपी शरीराने - च - आणि - चातुर्होत्रकविद्यया - ज्यामध्ये चार जण हवन करणारे असतात अशा यज्ञविद्येने - सप्ततंतून् - अग्निष्टोम आदिकरून सात यज्ञ - तनोषि - विस्तारितोस - त्वं - तू - आत्मवतां - प्राणिमात्रांचा - एकः - अद्वितीय - आत्मा - अंतर्यामी - अनादिः - आदिरहित - अनंतपारः - अंत व पार ज्याला नाही असा - कविः - सर्वज्ञ - अंतरात्मा - अंतर्यामी.॥३०॥
जो वेद होता, अध्वर्यू, ब्रह्मा आणि उद्गाता या ऋत्विजांनी होणार्‍या यज्ञाचे प्रतिपादन करतो, ते आपलेच शरीर आहे. त्यांच्याच द्वारा अग्निष्टोम इत्यादी सात यज्ञांचा आपण विस्तार करता. आपणच सर्व प्राण्यांचे आत्मा आहात. कारण आपण अनादी, अनंत, अपार, सर्वज्ञ आणि अंतर्यामी आहात. (३०)


त्वमेव कालोऽनिमिषो जनानां
     आयुर्लवाद्यवयवैः क्षिणोषि ।
कूटस्थ आत्मा परमेष्ठ्यजो महान्
     त्वं जीवलोकस्य च जीव आत्मा ॥ ३१ ॥
तू काळरूपी लव क्षण योगे
    लोकांचि आयू हरिसी सदाची ।
ज्ञानस्वरूपी अन तू अजन्मा
    नी आंतरात्मा अन निर्विकार ॥३१॥

त्वम् एव - तूच - अनिमिषः - नित्य जागृत असता - कालः - काळ - जनानां - लोकांच्या - आयुः - आयुष्याला - लवाद्यावयवैः - लव आदिकरून काळाच्या अवयवांनी - क्षिणोषि - क्षीण करितोस - त्वं - तू - कूटस्थः - अविकारी - आत्मा - ज्ञानरूप - परमेष्ठी - परमेश्वर - अजः - जन्मादिरहित - महान् - श्रेष्ठ - च - आणि - जीवलोकस्य - सर्व प्राण्यांचा - जीवः - जीवनरूप - आत्मा - नियंता आहेस.॥३१॥
आपणच काल आहात. प्रत्येक क्षणी आपण सावध राहून आपल्या क्षण, लव, इत्यादी विभागांच्या द्वारा लोकांचे आयुष्य क्षीण करीत असता. असे असूनही आपण निर्विकार आहात. कारण आपण ज्ञानस्वरूप, परमेश्वर, अजन्मा, महान आणि सर्व जीवांना जीवन देणारे अंतरात्मा आहात. (३१)


त्वत्तः परं नापरमप्यनेजद्
     एजच्च किञ्चिद् व्यतिरिक्तमस्ति ।
विद्याः कलास्ते तनवश्च सर्वा
     हिरण्यगर्भोऽसि बृहत् त्रिपृष्ठः ॥ ३२ ॥
तुझ्या विना भिन्न नसेचि कांही
    चराचरासी अन कार्यभाव ।
कला नि विद्दा तव रूप सारे
    तू ब्रह्म ब्रह्मांडहि ब्रह्मदेवा ॥३२॥

त्वत्तः (अन्यत्) - तुझ्याहून भिन्न - परं - कारण - अपरं - कार्य - न - नाही - अपि - शिवाय - च - आणि - एजत् - जंगम - अनेजत् - स्थावर - किंचित् - काहीही - (त्वया) व्यतिरिक्तं - तुझ्याशिवाय दुसरे - न अस्ति - नाही - च - आणि - सर्वाः - संपूर्ण - विद्याः - वेदोपवेदादि विद्या - कलाः - चौसष्ट कला - ते - तुझी - तनवः (सन्ति) - अंगे आहेत - बृहत् - ब्रह्मरूप - त्रिपृष्ठः - त्रिगुणात्मक जे प्रधान तत्त्व त्याच्या पाठीवर आरूढ झालेला - हिरण्यगर्भः - हिरण्यरूप ब्रह्मांड ज्याच्या गर्भात आहे असा - असि - आहेस.॥३२॥
प्रभो, कार्य, कारण, चालती-फिरती किंवा स्थिर अशी कोणतीच वस्तू नाही जी आपल्याहून वेगळी आहे. सर्व विद्या आणि कला आपले शरीर आहेत. आपण त्रिगुण मायेच्या पलीकडील स्वत:च ब्रह्म आहात. हे सुवर्णमय ब्रह्मांड आपल्या उदरात आहे. आपण याला आपल्यातूनच प्रगट करता. (३२)


व्यक्तं विभो स्थूलमिदं शरीरं
     येनेन्द्रियप्राण मनोगुणांस्त्वम् ।
भुङ्क्षे स्थितो धामनि पारमेष्ठ्ये
     अव्यक्त आत्मा पुरुषः पुराणः ॥ ३३ ॥
ब्रह्मांड हे तो तव स्थूळ रूप
    त्या इंद्रिये तू विषयास भोक्ता ।
ऐश्वर्यरूपी स्थिर राहसी तू
    सूक्ष्मो स्थुळो ब्रह्मरूपा पुरूषा ॥३३॥

विभो - हे ब्रह्मदेवा - इदं - हे - व्यक्तं स्थूलं - व्यक्तरूपास आलेले स्थूल विश्व - तव शरीरं - तुझे शरीर - येन - ज्या शरीराने - अव्यक्तः - इंद्रियांना अगोचर - आत्मा - सर्वांचा अंतर्यामी - पुराणः - अनादि - पुरुषः - पुरुष असा - त्वं - तू - इंद्रियप्राणमनोगुणान् - इंद्रिये, प्राण, मन व विषय यांना - पारमेष्ठये धामनि - परमेश्वराच्या स्वरूपात - स्थितः - राहणारा - भुंक्षे - भोगतोस.॥३३॥
प्रभो, हे दिसत असलेले ब्रह्मांड आपले स्थूल शरीर आहे. यामार्फत आपण इंद्रिये, प्राण आणि मन यांच्या विषयांचा उपभोग घेता. परंतु त्यावेळीसुद्धा आपण आपले परम ऐश्वर्यमय असलेल्या स्वरूपातच स्थित राहाता. खरे पाहू जाता, आपण पुराणपुरुष, स्थूल-सूक्ष्माच्या पलीकडील ब्रह्मस्वरूपच आहात. (३३)


(अनुष्टुप्)
अनन्ताव्यक्तरूपेण येनेदं अखिलं ततम् ।
चिद् अचित् शक्तियुक्ताय तस्मै भगवते नमः ॥ ३४ ॥
(अनुष्टुप्‌)
अव्यक्तानंत रूपाने व्यापिले जग तू असे ।
सचेताचेतही तूची नमस्कार तुला प्रभो ॥३४॥

अनंत - हे अंतरहिता - अव्यक्तरूपेण येन - इंद्रियादिकांना अगोचर अशा - इदं अखिलं विश्वं ततं - हे संपूर्ण जग पसरिले आहेस - तस्मैचिदचिच्छक्तिरूपाय - त्या चैतन्यरूपी व मायाशक्तिरूपी अशा - भगवते नमः - भगवंताला नमस्कार असो.॥३४॥
आपण आपल्या अनंत आणि अव्यक्त स्वरूपाने सर्व जग व्यापले आहे. चेतन आणि अचेतन या दोन्हीही आपल्या शक्ती आहेत. भगवन, मी आपल्याला नमस्कार करीत आहे. (३४)


यदि दास्यस्यभिमतान् वरान्मे वरदोत्तम ।
भूतेभ्यस्त्वद् विसृष्टेभ्यो मृत्युर्मा भून्मम प्रभो ॥ ३५ ॥
नान्तर्बहिर्दिवा नक्तं अन्यस्मादपि चायुधैः ।
न भूमौ नाम्बरे मृत्युः न नरैर्न मृगैरपि ॥ ३६ ॥
व्यसुभिर्वासुमद्‌भिर्वा सुरासुरमहोरगैः ।
अप्रतिद्वन्द्वतां युद्धे ऐकपत्यं च देहिनाम् ॥ ३७ ॥
जरी तू वरदो श्रेष्ठ नी वरा देऊ इच्छिसी ।
तरी तो वर दे ऐसा मनुष्य देव दानव ॥३५॥
अथवा अन्य ते प्राणी न येवो मृत्यु यां करे ।
आत बाहेर रात्री ना दिनी ना शस्त्र अस्त्रने ॥३६॥
पृथ्वीवरी न आकाशी मजला मृत्यु दे असा ।
न कोणी लढण्या ठाको एक सम्राट मीच हो ॥३७॥

वरदोत्तम - वर देण्यात श्रेष्ठ अशा हे ब्रह्मदेवा - यदि - जर - मे अभिमतान् - मला इष्ट असे - वरान् - वर - दास्यसि - देणार असलास - प्रभो - हे समर्था - मम - मला - त्वद्विसृष्टेभ्यः - तू उत्पन्न केलेल्या - भूतेभ्यः - प्राण्यांपासून - मृत्यूः - मृत्यू - मा भूत् - येऊ नये. ॥३५॥ अन्यस्मात् अपि - दुसर्‍या कोणापासूनही - च - आणि - आयुधैः - आयुधांनी - अंतः - आत - बहिः - बाहेर - दिवा - दिवसा - नक्तं - रात्री - न - मृत्यू येऊ नये - भूमौ - पृथ्वीवर - न - येऊ नये - अंबरे - आकाशात - नरैः अपि मृगैःअपि च - मनुष्यांच्या हातूनही व पशूंकडूनही - मृत्यूः - मृत्यू - न (भवेत्) - येऊ नये. ॥३६॥ व्यसुभिः - निर्जीव वस्तूंपासून - वा - अथवा - असुमद्‌भिः - जिवंत प्राण्यांपासून - वा - तसेच - सुरासुरमहोरगैः - देव, दैत्य व मोठे सर्प इत्यादिकांकडून मृत्यू येऊ नये - च - आणि - युद्धे अप्रतिद्वंद्वता - माझ्य़ाशी बरोबरी करणारा कोणी असू नये - देहिनां ऐकपत्यं - सर्व प्राणिमात्रावर पूर्ण स्वामित्व.॥३७॥
प्रभो, वर देणार्‍यांमध्ये आपण सर्वश्रेष्ठ आहात. आपण जर मला इष्ट वर देणार असाल, तर तुम्ही उत्पन्न केलेल्या किंवा त्याहूनही इतर प्राण्यांपासून मला मृत्यू येऊ नये. मग ते मनुष्य असोत की पशू. देव, दानव किंवा मोठे नाग असोत, प्राणयुक्त असोत की प्राणरहित असोत. तसेच आत किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात कोणत्याही शस्त्रांनी मला मृत्यू येऊ नये. युद्धात माझ्याशी सामना करणारा कोणी नसावा. मी सर्व प्राण्यांचा अधिपती असावा. (३५-३७)


सर्वेषां लोकपालानां महिमानं यथाऽऽत्मनः ।
तपोयोगप्रभावाणां यन्न रिष्यति कर्हिचित् ॥ ३८ ॥
॥ इति श्रीमद्‌भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कन्धे हिरण्यकशिपोर्वरयाचनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
इंद्रादी लोकपालांची आपुली महिमा जसी ।
लाभावी मजला तैसी योगियां तपियां जसे ।
लाभते नित्य ऐश्वर्य ते द्दावे मजला तुम्ही ॥३८॥
। इति श्रीमद्‌भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
॥ विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसरा अध्याय हा ॥ ७ ॥ ३ ॥
हरिः ॐ तत्सत्‌ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

तपोयोगप्रभावाणां - तपश्चर्या व योग यांच्या योगाने ज्यांचा पराक्रम आहे अशा - सर्वेषां लोकपालाना - सर्व लोकपालांची - महिमानं - मोठी पदवी - यथा आत्मनः - जसे तुला स्वतःला आहे - यत् - आणि - कर्हिचित् - कधीही - न रिष्यति - नाश पावत नाही. ॥३८॥
इंद्रादी सर्व लोकपालांमध्ये जसा आपला महिमा आहे, तसाच माझाही असावा. तपस्वी आणि योगी लोकांना जे कायमचे ऐश्वर्य प्राप्त होते, तेच मलाही द्यावे. (३८)


स्कंध सातवा - अध्याय तिसरा समाप्त

GO TOP