|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ४ था
नाभाग आणि अंबरीषाची कथा - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुक म्हणतात - नभगाचा पुत्र नाभाग दीर्घकालपर्यंत ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून जेव्हा परत आला, तेव्हा त्याच्या मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला. त्याने आपल्या भावांना विचारले, "बंधूंनो ! आपण मला संपत्तीपैकी काय दिले आहे ?" तेव्हा त्यांनी उत्तर दिले की, "आम्ही तुझ्या हिश्श्यापोटी वडीलच तुला देत आहोत." तो आपल्या वडिलांना जाऊन म्हणाला - "तात ! माझ्या मोठ्या भावांनी संपत्तीचा वाटा म्हणून मला आपल्यालाच दिले आहे. वडील म्हणाले, "मुला ! तू त्यांचे म्हणणे ऐकू नकोस. अंगिरस-गोत्राचे हे मोठे बुद्धिमान ब्राह्मण यावेळी एक मोठा यज्ञ करीत आहेत. परंतु माझ्या विद्वान पुत्रा ! त्यांना प्रत्येक सहाव्या दिवशीच्या कर्माच्या वेळी मंत्र आठवत नाहीत. तू त्या महात्म्यांच्याकडे जाऊन त्यांना दोन वैश्वदेवसूक्ते सांग. ते जेव्हा स्वर्गात जाऊ लागतील, तेव्हा यज्ञातून उरलेले आपले सारे धन तुला देऊन टाकतील. म्हणून आता तू त्यांच्याकडे जा." आपल्या पित्याच्या आज्ञेवरून त्याने तसे केले. त्या अंगिरस गोत्राच्या ब्राह्मणांनीसुद्धा यज्ञातील उरलेले धन त्याला दिले आणि ते स्वर्गात निघून गेले. (१-५) नाभाग ते धन घेऊ लागला, तेव्हा उत्तर दिशेकडून एक काळ्या रंगाचा पुरुष आला. तो म्हणाला - "यज्ञभूमीत जे काही शिल्लक राहिले आहे, ते सर्व धन माझे आहे." (६) नाभाग म्हणाला, "ऋषींनी हे धन मला दिले आहे; म्हणून माझेच आहे." यावर तो पुरुष म्हणाला, "आपल्या वादाबद्दल तुझ्या वडिलांनाच विचारलेले बरे !" तेव्हा नाभागाने जाऊन वडिलांना ते विचारले. वडील म्हणाले, "दक्ष प्रजापतीच्या यज्ञात एकदा ऋषींनी हा निर्णय केला आहे की, यज्ञभूमीमध्ये जे काही शिल्लक राहील, तो सर्व रुद्रदेवाचा भाग असेल. म्हणून ते धन महादेवांनाच मिळाले पाहिजे." (७-८) नाभागाने परत जाऊन त्यांना प्रणाम करून म्हटले, "प्रभो ! यज्ञभूमीतील सर्व वस्तू आपल्याच आहेत, असे माझा वडिलांनी सांगितले. ब्रह्मन् ! मी मस्तक लववून आपली क्षमा मागतो." तेव्हा भगवान रुद्र म्हणाले, "तुझ्या वडिलांनी धर्माप्रमाणे निर्णय दिला आणि तू सुद्धा खरे बोललास. तू वेदांचा अर्थ जाणतोसच. आता मी तुला सनातन ब्रह्मतत्त्वाचे ज्ञान देतो. येथे यज्ञात उरलेला माझा जो भाग आहे, हे धनसुद्धा मी तुला देतो. त्याचा तू स्वीकार कर." एवढे बोलून सत्यप्रेमी भगवान रुद्र अंतर्धान पावले. जो मनुष्य सकाळी आणि संध्याकाळी एकाग्रचित्ताने या आख्यानाचे स्मरण करतो, तो प्रतिभावंत, वेदांचा अर्थ जाणणारा होऊन आपल्या स्वरूपालासुद्धा जाणणारा होतो. नाभागाला अंबरीष नावाचा पुत्र झाला. तो भगवंताचा मोठा भक्त आणि पुण्यवान होता. सर्वत्र अकुंठित असा ब्रह्मशापसुद्धा अंबरीषाला स्पर्श करू शकला नाही. (९-१३) राजाने विचारले - भगवन् ! परमज्ञानी राजर्षी अंबरीषाचे चरित्र मी ऐकू इच्छितो. ब्राह्मणाने रागावून त्याला अटळ असा शाप दिला होता, परंतु त्या शापाने त्याचे काहीही अनिष्ट का झाले नाही ? (१४) श्रीशुक म्हणाले - भाग्यवान अंबरीषाला सप्तद्वीपयुक्त पृथ्वी, न संपणारी संपत्ती आणि अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले होते. मनुष्यांना या सर्व गोष्टी जरी अत्यंत दुर्लभ असल्या, तरी तो त्यांना स्वप्नाप्रमाणे मानीत असे. कारण हे वैभव नाशवंत असून त्यामुळे मनुष्य घोर नरकात जातो, हे तो जाणत होता. भगवान श्रीकृष्णांवर आणि त्यांच्या भक्तांवर त्याचे अतिशय प्रेम होते, ते प्रेम प्राप्त झाल्यानंतर हे सर्व विश्व मातीच्या ढिगाप्रमाणे (तुच्छ) वाटू लागते. त्याने आपले मन श्रीकृष्णांच्या चरणारविंदांमध्ये, वाणी भगवत् गुणानुवर्णनामध्ये, हात हरिमंदिराच्या सेवाकार्यांमध्ये आणि कान-अच्युतांच्या कथाश्रवणामध्ये गुंतवून ठेवले होते. त्याने नेत्र मुकुंदमूर्ती तसेच मंदिरांच्या दर्शनाकडे, अंगप्रत्यंग भगवद्भक्तांच्या शरीरस्पर्शामध्ये, नाक त्यांच्या चरणकमलांवर अर्पिलेल्या दिव्य तुळशीच्या गंधामध्ये आणि जिभेला भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसाद सेवनात संलग्न केले होते. त्याचे पाय भगवंतांची तीर्थक्षेत्रे इत्यादींची पायी यात्रा करण्यात आणि मस्तक श्रीकृष्णांच्या चरणकमलांना वंदन करण्यात मग्न असे. अंबरीषाने पुष्पमाळा, चंदन इत्यादी भोगसामग्री भगवंतांच्या भक्तांमध्येच आढळणारे प्रेम स्वतःमध्ये निर्माण व्हावे म्हणून. अशा प्रकारे, भगवंतांना सर्वात्मा तसेच सर्वस्वरूप समजून, त्याने आपली सर्व कर्मे त्या यज्ञपुरुष, इंद्रियातीत भगवंतांना समर्पित केली होती आणि भगवद्भक्त ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार तो या पृथ्वीचे पालन करीत होता. त्याने ’धन्व’ नावाच्या मरुभूमीमध्ये सरस्वती नदीच्या प्रवाहासमोरे वसिष्ठ, असित, गौतम इत्यादि आचार्यांकडून मोठ्या ऐश्वर्याला अनुरूप सर्व अंगांसह दक्षिणा देऊन अनेक अश्वमेध यज्ञ करून यज्ञाधिपती भगवंतांची आराधना केली होती. त्याच्या यज्ञांमध्ये देवांसह जेव्हा सदस्य आणि ऋत्विज बसत असत, तेव्हा त्यांच्या पापण्यांची उघडझाप होत नसे. त्यामुळे सुंदर वस्त्रे आणि तशीच रूपे असल्याने ते देवांसारखे दिसत असत. त्याची प्रजा महात्म्यांनी गायिलेल्या भगवंतांच्या उत्तम चरित्रांचे मोठ्या प्रेमाने कधी श्रवण करी तर कधी त्यांचे गायन करी. त्यापुढे ती प्रिय अशा स्वर्गाची सुद्धा इच्छा करीत नसे. श्रीहरींचे नेहमी आपल्या हृदयात दर्शन घेणार्या त्या प्रजेला सिद्धांनासुद्धा दुर्लभ अशी भोगसामग्री आनंदित करू शकत नव्हती. तिला होणार्या आत्मानंदापुढे त्या वस्तू अत्यंत तुच्छ होत्या. अशा प्रकारे तो राजा तपश्चर्येने युक्त असा भक्तियोग आणि प्रजापालनरूप स्वधर्म यांनी भगवंतांना प्रसन्न करू लागला आणि हळू हळू त्याने सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग केला. घर, स्त्री, पुत्र, बांधव, मोठमोठे हत्ती, रथ, गोडे तसेच पायदळ, अक्षय रत्ने, अलंकार, आयुधे इत्यादि वस्तू आणि न संपणारे खजिने हे सर्व नाशिवंत आहे, असा निश्चय झाला होता. त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवद्भक्तांचे रक्षण करणारे सुदर्शनचक्र दिले होते. (१५-२८) एकदा त्याने आपल्यासारख्याच असणार्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी एक वर्षपर्यंत द्वादशीव्रत करण्याचा नियम केला. व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यात त्याने तीन रात्री उपवास केला आणि एक दिवस यमुना नदीत स्नान करून मधुवनामध्ये भगवान श्रीकृष्णांची पूजा केली. त्याने महाभिषेकाच्या विधीने सर्व प्रकारची सामग्री घेऊन अभिषेक केला आणि अंतःकरणापासून तन्मय होऊन वस्त्रे, अलंकार, चंदन, पुष्पमाला, अर्घ्य इत्यादींनी त्यांचे पूजन केले. नंतर श्रेष्ठ ब्राह्मण पूर्णकाम असल्याने त्यांना पूजीची इच्छा नव्हती, तरी सुद्धा राजाने भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना प्रथम स्वादिष्ठ आणि अत्यंत उत्तम भोजन देऊन त्यांच्या घरी साठ कोटी गाई पाठविल्या. त्या गाईंची शिंगे सोन्याने आणि खूर चांदीने मढविलेले होते. त्यांना सुंदर वस्त्रे घातली होती. त्या गाई गरीब, तरुण, दिसावयास सुंदर, वासरे असलेल्या आणि पुष्कळ दूध देणार्या होत्या. ब्राह्मणांना सर्व देऊन झाल्यावर राजाने त्यांची आज्ञा घेऊन व्रताचे पारणे करण्याची तयारी केली. त्याचवेळी शापानुग्रहसमर्थ दुर्वासमुनी त्याच्याकडे अतिथी म्हणून आले. (२९-३५) त्यांना पाहताच राजा उठून उभा राहिला. नंतर त्यांना आसन देऊन त्याने त्यांची पूजा केली. तसेच त्यांच्या चरणांना वंदन करून त्यांना भोजन करण्याची प्रार्थना केली. दुर्वासमुनींनी अंबरीषाच्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्यानंतर आवश्यक कर्मे करण्यासाठी ते नदीवर गेले. ते परब्रह्माचे ध्यान करीत यमुनेच्या पवित्र जलात स्नान करू लागले. इकडे द्वादशी फक्त अर्धी घटका शिल्लक राहिली. धर्मज्ञ अंबरीषाने धर्मसंकटात पडल्याकारणाने ब्राह्मणांबरोबर पारण्यासंबंधी विचार-विनिमय केला. तो म्हणाला, "ब्रह्मणाने भोजन केल्याखेरीज आपण भोजन करणे आणि द्वादशी असेपर्यंत पारणे न करणे हे दोन्हीही दोष आहेत. म्हणून जे केल्याने माझे कल्याण होईल आणि मला पापही लागणार नाही, असे मला केले पाहिजे. पाणी पिणे म्हणजे भोजन करणे आणि न करणेही होय. म्हणून ब्राह्मण हो ! फक्त पाणी पिऊनच मी व्रताची पारणा करतो." असा निश्चय करून मनोमन भगवंतांचे चिंतन करीत अंबरीष पाणी प्याला आणि हे परीक्षिता ! तो दुर्वासमुनींच्या येण्याची वाट पाहात राहिला. आवश्यक नित्यकर्मे पार पाडून दुर्वासमुनी यमुनेवरून परत आले. राजाने पुढे होऊन त्यांचे स्वागत केले, तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने राजाने पारणे केले आहे, हे ओळखले. त्यावेळी दुर्वासमुनींना भूक लागली होती. रागाने ते थरथर कापू लागले. त्यांनी भुवया चढवल्या. तोंड वेडेवाकडे करीत हात जोडून उभे असलेल्या राजाला दरडावून ते म्हणाले. "राज्यमदाने उन्मत्त होऊन स्वतःला सत्ताधारी मानून धर्म सोडून वागणार्या याचा नीचपणा तर पाहा ! हा कसला विष्णुभक्त ! मी याचा अतिथी म्हणून आलो. याने मला भोजनाचे निमंत्रणही दिले, परंतु मला न वाढताच हा जेवला ! तत्काळ मी तुला त्याचे फळ दाखवितो !" असे म्हणत म्हणतच क्रोधाने भडकून त्यांनी आपली एक जटा उपटली आणि अंबरीषांना मारण्यासाठी तिच्यातून एक कृत्या उत्पन्न केली. ती प्रलयकाळच्या अग्नीप्रमाणे धगधगत होती. आगीप्रमाणे धगधगणारी ती हातात तलवार घेऊन राजावर तुटून पडली. त्यावेळी तिच्या पायांच्या आदळआपटीने पृथ्वी कापत होती. परंतु अंबरीष मात्र तिला पाहून एक केसभरही ढळला नाही. परमात्म्याने सेवकाच्या रक्षणासाठी पहिल्यापासूनच नेमलेल्या सुदर्शनचक्राने क्रोधाने फूत्कारणार्या सापाला आग जशी जाळून टाकते, त्याचप्रमाणे त्या कृत्येला जाळून टाकले. दुर्वासांनी आपला प्रयत्न फुकट गेला असून ते चक्र आपल्याकडे येत आहे, असे पाहिले, तेव्हा ते भयभीत होऊन प्राण वाचविण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले. उंचच उंच भडकणार्या ज्वाळा असणार्या वणाव्याने जसा सापाचा पाठलाग करावा, त्याचप्रमाणे भगवंतांचे चक्र त्यांच्याकडे लागले. ते चक्र आपल्या पाठोपाठ येत आहे असे जेव्हा दुर्वासांनी पाहिले, तेव्हा मेरुपर्वताच्या गुहेत दडण्यासाठी ते तिकडे धावू लागले. दुर्वासमुनी दिशा, आकाश, पृथ्वी, सप्त पाताळे, समुद्र, लोकपालांनी सुरक्षित केलेले लोक, इतकेच काय स्वर्गापर्यंत गेले. परंतु जेथे जेथे ते गेले, तेथे तेथे ते असह्य सुदर्शन चक्र आपला पाठलाग करीत असल्याचे त्यांना दिसले. जेव्हा स्वतःचे रक्षण करणारा कोणीच त्यांना मिळाला नाही, तेव्हा तर ते अधिकच घाबरले. आपला त्राता शोधत ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, हे स्वयंभू ब्रह्मदेवा, भगवंतांच्या या तेजोमय चक्रापासून माझे रक्षण करा. (३६-५२) ब्रह्मदेव म्हणाले - दोन परार्धांच्या कालखंडानंतर कालस्वरूप भगवान आपली ही सृष्टीलीला संपवतील आणि तेव्हाच हे विश्व जाळून टाकण्याची इच्छा करतील, त्यावेळी त्यांच्या भुवयांच्या इशार्यानेच सार्या विश्वासह माझा हा लोक नाहीसा होऊन जाईल. (५३) मी, भगवान शंकर, दक्ष, भृगू इत्यादी प्रजापती, भूतेश्वर, देवेश्वर इत्यादी सर्वजण आम्ही त्यांनी बनविलेल्या नियमांनी बद्ध आहोत. तसेच त्यांची आज्ञा शिरोधार्थ मानून आम्ही जगाचे हित करतो. (त्यांच्या भक्ताचा द्रोह करणार्याला वाचविण्यास आम्ही असमर्थ आहोत.) ब्रह्मदेवांनी जेव्हा दुर्वासांना अशा प्रकारे निराश केले, तेव्हा भगवंतांच्या चक्राने त्रस्त होऊन ते कैलासनिवासी भगवान शंकरांना शरण गेले. (५४-५५) श्रीमहादेव म्हणाले - ज्या अनंत परमेश्वरामध्ये ब्रह्मदेवासारखे जीव आणि त्यांचे उपाधिभूत कोश तसेच या ब्रह्मांडाप्रमाणेच अनेक ब्रह्मांडे, योग्य वेळी निर्माण होतात आणि वेळ आल्यावर नाहीशी होतात. ज्यांच्यामध्ये आमच्यासारखे हजारो गोते खात राहतात, त्या प्रभूंच्या संबंधात काहीही करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये नाही. (५६) मी, सनत्कुमार, नारद, भगवान ब्रह्मदेव, कपिलदेव, अपांतरतम, देवल, धर्म, आसुरी तसेच मरीची इत्यादि अन्य सर्वज्ञ सिद्धेश्वर - असे आम्ही सर्वजण भगवंतांची माया जाणू शकत नाही. कारण आम्ही त्याच मायेच्या चक्रात सापडलो आहोत. हे चक्र त्या विश्वेश्वराचे शस्त्र आहे. आम्हांला याचा प्रतिकार करता येणार नाही. आपण त्यांनाच शरण जावे. ते भगवंतच तुमचे कल्याण करतील. तेथून सुद्धा निराश होऊन दुर्वास भगवंतांच्या परमधाम वैकुंठात गेले, जेथे लक्ष्मीपती भगवान लक्ष्मीसह निवास करतात. भगवंतांच्या चरणांवर पडले. ते म्हणाले, "हे अच्युता ! हे अनंता ! संतांना प्रिय असणार्या प्रभो ! विश्वाचे जीवनदाता ! मी अपराधी आहे. आपण माझे रक्षण करावे. आपला परम प्रभाव न जाणल्या कारणानेच मी आपल्या प्रिय भक्ताचा अपराध केला आहे. प्रभो ! आपण मला त्यापासून वाचवा ! आपल्या नावाचा उच्चार करण्याने नरकातील जीवसुद्धा मुक्त होतो. (५७-६२) श्रीभगवंत म्हणाले - हे ब्राह्मणा, मी सर्वथैव भक्तांच्या अधीन आहे. मला जराही स्वतंत्रता आही. माझ्या सज्जन भक्तांनी माझे हृदय आपल्या ताब्यात ठेवले आहे. मला भक्तच प्रिय आहेत. ब्रह्मन् ! माझ्या भक्तांचा एकमेव आश्रय मीच आहे. म्हणून माझ्या साधुस्वभावी भक्तांना सोडून मी मला स्वतःलाही इच्छित नाही की माझ्या अर्धांगिनी लक्ष्मीलाही इच्छित नाहीत. जे भक्त स्त्री, पुत्र, गृह, आप्तेष्ट, प्राण, धन, इहलोक आणि परलोक, हे सर्व सोडून फक्त मलाच शरण आले आहेत, त्यांना सोडण्याचा विचार तरी मी कसा करू ? ज्यप्रमाणे पतिव्रता स्त्री आपल्या पातिव्रत्याने सदाचारी पतीला वश करून घेते, त्याचप्रमाणे माझ्याकडे आपले मन गुंतवलेले समदर्शी साधू भक्तीने मला वश करून घेतात. माझे अनन्य भक्त माझ्या सेवेनेच स्वतःला कृत्याकृत्य मानतात. माझ्या सेवेच्या फलस्वरूप जेव्हा त्यांना सालोक्य-सारूप्य इत्यादी मुक्ती प्राप्त होतात, तेव्हा ते त्यांचासुद्धा स्वीकार करू इच्छित नाहीत. तर मग कालगतीनुसार नष्ट होणार्या वस्तूंची काय किंमत ? भक्त हे माझे हृदय आहेत आणि त्या भक्तांचे हृदय मी आहे. ते माझ्या व्यतिरिक्त काहीच जाणत नाहीत आणि मी त्यांच्याव्यतिरिक्त काहीच जाणत नाही. दुर्वासा, ऐक. मी तुला एक उपाय सांगतो. ज्याचे अनिष्ट केल्याने तुझ्यावर हे संकट आले आहे, त्याच्याकडेच तू जा. निरपराध साधूंचे अनिष्ट करण्याच्या प्रयत्नामुळे अनिष्ट करणार्याचेच अमंगल होते. (६३-६९) तपश्चर्या आणि विद्या ही ब्राह्मणांचे कल्याण करणारी साधने आहेत. परंतु जर ब्राह्मण उद्दाम आणि अन्यायी झाला तर तीच दोन्ही साधने उलटे फळ देऊ लागतात. ब्राह्मणा ! तुझे कल्याण असो. नाभागनंदन परम भाग्यशाली राजा अंबरीषाकडे जा आणि त्यांची क्षमा माग, तरच तुला शांती मिळेल. (७०-७१) अध्याय चौथा समाप्त |