|
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध ९ वा - अध्याय ३ रा
महर्षी च्यवन आणि सुकन्येचे चरित्र व शर्यातीचा वंश - [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] श्रीशुकाचार्य म्हणतात - मनुपुत्र राजा शर्याती वेदपारंगत होता. त्याने अंगिरा ऋषींच्या यज्ञामध्ये दुसर्या दिवसाचे कर्म सांगितले होते. त्याची एक कमललोचना सुकन्या नावाची कन्या होती. एके दिवशी शर्याती आपल्या कन्येसह वनातून जाता जाता च्यवन ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहोचला. सुकन्या आपल्या मैत्रिणींसह वनात फिरत फिरत झाडांचे सौंदर्य पाहात होती. तिने एके ठिकाणी वारुळाच्या छिद्रांमधून काजव्याप्रमाणे चमकणार्या दोन ज्योती पाहिल्या. दैवगतीमुळे सुकन्येने बालसुलभ स्वभावानुसार एका काट्याने त्या ज्योतींना टोचले. त्यामुळे त्यातून भळभळा रक्त वाहू लागले. त्याचवेळी राजा शर्यातीच्या सैनिकांचे मल-मूत्र थांबले. हे पाहून शर्यातीला आश्चर्य वाटले. तो आपल्या सैनिकांना म्हणाला, "अरे ! तुम्ही महर्षी च्यवनांच्या बाबतीत काही अनुचित व्यवहार तर केला नाही ना ? आमच्यापैकी कोणीतरी त्यांच्या आश्रमामध्ये काहीतरी दुष्कृत्य केले असावे." तेव्हा घाबरत घाबरत सुकन्या पित्याला म्हणाली, "माझ्याकडूनच काही चूक घडली आहे. अजाणतेपणाने मी दोन ज्योतींना काट्याने टोचले आहे." आपल्या कन्येचे हे बोलणे ऐकून शर्याती घाबरला. त्याने स्तुती करून वारुळात असलेल्या च्यवन-मुनींना कसेबसे शांत केले. त्यानंतर च्यवनमुनींचे मनोगत जाणून त्याने आपली कन्या त्यांना अर्पण केली आणि या संकटातून सुटून प्रसन्न चित्ताने त्यांची संमती घेऊन तो राजधानीकडे परत आला. (१-९) इकडे सुकन्या अतिशय रागीट च्यवनमुनींना पती म्हणून स्वीकारून अत्यंत सावधपणे त्यांचे मनोगत जाणून व त्याप्रमाणेच वागून त्यांची सेवा करीत त्यांना प्रसन्न करू लागली. काही काळ गेल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये दोन्ही अश्विनीकुमार आले. च्यवन मुनींनी त्यांचे यथोचित स्वागत करून म्हटले, "आपण दोघेजण समर्थ आहात; म्हणून मला तारुण्यावस्था प्रदान करा. तरुण स्त्रियांना आवडणारे रूप आणि वय मला द्या. आपण सोमपान करण्याचे अधिकारी नाहीत, हे मी जाणतो. तरीसुद्धा यज्ञामध्ये मी आपल्याला सोमपानरसाचा अधिकार मिळवून देईन." वैद्यशिरोमणी अश्विनीकुमारांनी महर्षी च्यवनांना धन्यवाद देऊन म्हटले, "ठीक आहे." आणि त्यांना सांगितले की ’हे सिद्धांनी बनविलेले कुंड आहे. आपण याच्यामध्ये स्नान करावे. च्यवन मुनींचे शरीर म्हातारपणाने व्यापले होते. सर्व अंगावर शिरा दिसत होत्या. सुरकुत्या पडल्या होत्या आणि केसही पिकल्यामुळे ते अगदी कुरूप दिसत होते. आपल्याबरोबर त्यांना घेऊन अश्विनीकुमारांनी त्या कुंडात प्रवेश केला. नंतर त्या कुंडातून तीन पुरुष बाहेर आले. त्या तिघांच्याही गळ्य़ात कमळांच्या माळा, कानांत कुंडले होती. त्यांनी सुंदर वस्त्रे परिधान केली होती. तिघेही एकसारखे दिसत होते. ते अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटतील असे होते. साध्वी सुंदरी सुकन्येने जेव्हा तिघेही एकसारखेच आणि सूर्यासारखे तेजस्वी आहेत, असे पाहिले, तेव्हा त्यांतून आपल्या पतीला ओळखू न शकल्याने ती अश्विनीकुमारांना शरण गेली. तिचे पातिव्रत्य पाहून अश्विनीकुमार संतुष्ठ झाले. त्यांनी तिला तिचा पती दाखविला आणि नंतर च्यवन मुनींची आज्ञा घेऊन विमानातून ते स्वर्गाकडे गेले. (१०-१७) एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्याकरिता शर्याती च्यवन मुनींच्या आश्रमात आला. तेथे त्याने पाहिले की, आपल्या सुकन्येजवळ एक सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलेला आहे. सुकन्येने त्याच्या चरणांना वंदन केले. शर्यातीने तिला आशिर्वाद दिला नाहीच आणि काहीसे नाराज होऊन म्हटले - "कुलटे ! हे तू काय केलेस ? सर्वांना वंदनीय अशा च्यवन मुनींना तू फसवलेस ! तू त्यांना म्हातारा आणि नावडता समजून सोडून दिलेस आणि एका वाटेने निघालेल्या जार पुरुषाबरोबर राहू लागलीस. तुझा जन्म तर फार मोठ्या कुळात झाला होता. ही उलटी बुद्धी तुला कशी सुचली ? तुझे हे वागणे कुलाला कलंक लावणारे आहे. तू निर्लज्जपणे जाराची सेवा करू लागलीस आणि अशा रीतीने आपल्या पित्याच्या व पतीच्या वंशांना घोर नरकाकडे घेऊन चालली आहेस !" राजा शर्यातीने असे म्हटल्यानंतर पवित्र हास्य करणार्या सुकन्येने स्मित हास्य करीत म्हटले, "बाबा ! हे आपले जावई भृगुनंदन महर्षी च्यवनच आहेत." यानंतर तिने आपल्या पित्याला महर्षी च्यवनांच्या तारुण्य आणि सौंदर्याच्या प्राप्तीचा सर्व वृत्तांत सांगितला. तो ऐकून शर्याती आश्चर्यचकित झाला. त्याने मोठ्या प्रेमाने आपल्या कन्येला जवळ घेतले. (१८-२३) महर्षी च्यवनांनी वीर शर्यातीकडून सोमयज्ञाचे अनुष्ठान करविले आणि सोमपानाचा अधिकार नसूनसुद्धा आपल्या प्रभावाने अश्विनीकुमारांना सोमपान करविले. शीघ्रकोपी इंद्राने हे सहन न होऊन शर्यातीला मारण्यासाठी वज्र उचलले. महर्षी च्यवनांनी वज्र घेतलेला त्याचा हात तेथेच थांबवला. तेव्हा सर्व देवांनी अश्विनीकुमारांना सोमाचा भाग देण्याचे मान्य केले. वैद्य असल्याकारणाने त्यांनी अगोदर अश्विनीकुमारांना सोमपानापासून बहिष्कृत केले होते. (२४-२६) परीक्षिता ! शर्यातीला उत्तानबर्ही, आनर्त आणि भूरिषेण असे तीन पुत्र होते. आनर्तापासून रेवत झाला. महाराज ! रेवताने समुद्राच्या आत कुशस्थळी नावाची एक नगरी वसविली होती. तेथेच राहून तो आनर्त इत्यादि देशांवर राज्य करीत होता. त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र होते. त्यांपैकी सर्वांत थोरला ककुद्मी होता. ककुद्मी आपली कन्या घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेवाकडे रजतमरहित ब्रह्मलोकात गेला. ब्रह्मलोकामध्ये गाणे चालू असल्याने विचारण्यासाठी संधी न मिळाल्याने तो काही वेळ तेथेच थांबला. त्यानंतर ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्मदेव त्याला हसून म्हणाले, (२७-३१) राजा ! तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास, ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आता त्यांचे मुलगे, नातू, पणतू इतकेच काय गोत्रांची नावेसुद्धा शिल्लक राहिली नाहीत. मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युगांचा काळ निघून गेला आहे. म्हणून तू परत जा. यावेळी भगवान नारायणांचे अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत. राजा ! त्याच नररत्नाला हे कन्यारत्न तू समर्पित कर. ज्यांचे नाम, लीला इत्यादिंचे श्रवण कीर्तन अतिशय पवित्र आहे, तेच प्राण्यांचे जीवनसर्वस्व भगवान पृथ्वीवरील भार उतरविण्यासाठी आपल्या अंशाने अवतीर्ण झाले आहेत. ककुद्मीने ब्रह्मदेवांची ही आज्ञा घेऊन त्यांच्या चरणांना वंदन केले आणि तो आपल्या नगरीला निघून गेला. यक्षांच्या भितीने त्यांच्या वंशजांनी ती नगरी सोडली होती आणि ते इकडे तिकडे कुठेतरी निवास करीत होते. ककुद्मीने आपली सर्वांगसुंदर कन्या बलशाली बलरामाला देऊन तो तपश्चर्या करण्यासाठी श्रीनारायणांच्या बदरिकाश्रमाकडे निघून गेला. (३२-३६) अध्याय तिसरा समाप्त |