श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ६ वा

विराट शरीराची उत्पत्ती -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

मैत्रेय ऋषी म्हणाले - आपापसात मिळून न राहिल्याने माझ्या महत्तत्त्व इत्यादी शक्ती विश्वरचना करण्याच्या कार्यात असमर्थ आहेत, असे पाहून सर्वशक्तिमान भगवान कालशक्तीचा स्वीकार करून एकाच वेळी महत्तत्त्व, अहंकार, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, मन, पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये अशा तेवीस तत्वांच्या समुदायात प्रविष्ट झाले. त्या समुदायात प्रविष्ट हो‌ऊन त्यांनी जीवांच्या निद्रिस्त असलेल्या संचित कर्माला जागृत केले आणि एकमेकांपासून वेगळ्या असणार्‍या त्या तत्त्वसमूह घटकांना आपल्या क्रियाशक्तीच्या द्वारे आपापसात मिसळून टाकले. ज्याची क्रियाशक्ती जागृत केली आहे अशा त्या तेवीस तत्त्वांच्या समूहाने भगवंतांच्या प्रेरणेने आपल्या अंशांतून विराटाला उत्पन्न केले. जेव्हा भगवंतांनी अंशरूपाने आपल्या त्या शरीरात प्रवेश केला, तेव्हा विश्वरचना करणारा तो महत्तत्त्वादिकांचा समुदाय एक-दुसर्‍यात मिसळून जाऊन विराटरूपाने परिणाम पावला. त्यामध्येच हे चराचर राहिले आहे. पाण्यामध्ये जे अंड्याच्या रूपात आश्रयस्थान होते, तेथे सर्व जीवांना आपल्यात घेऊन तो सुवर्णमय विराट पुरुष एक हजार दिव्य वर्षांपर्यंत राहिला. तो विश्वरचना करणार्‍या तत्त्वांचे कार्य असणारा विराट ज्ञान, क्रिया आणि आत्मशक्तीने संपन्न हो‌ऊन या शक्तींपासून त्याने स्वतःचे क्रमशः एक(हृदयरूप) दहा(प्राणरूप) आणि त्रिविध (आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिकरूप असे) विभाग केले. हा विराट पुरुषच प्रथम जीव असल्याकारणाने सर्व जीवांचा आत्मा, जीवरूप असल्याने परमात्म्याचा अंश आणि प्रथमच उत्पन्न झाला असल्याने भगवंतांचा आद्य अवतार आहे. हा संपूर्ण भूतसमुदाय(चराचर सृष्टी) याच्यातच प्रकाशित होतो. हा विराट अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैवरूपाने तीन प्रकारचा, प्राणरूपाने दहा प्रकारचा आणि हृदयरूपाने एक प्रकारचा आहे. (१-९)

विश्वाची रचना करणार्‍या महत्तत्त्वादिकांचे अधिपती असणार्‍या श्रीभगवंतांनी त्यांच्या प्रार्थनेचे स्मरण करून त्यांच्या वृत्ती जागविण्यासाठी आपल्या चेतनरूप तेजाने त्या विराट पुरुषाला प्रकाशित केले, त्याला जागविले. तो जागृत होताच देवतांच्यासाठी किती ठिकाणे उत्पन्न झाली, हे मी सांगतो ऐका. विराट पुरुषाचे प्रथम मुख प्रगट झाले, त्यामध्ये लोकपाल अग्नी वाक् इंद्रियासह प्रगट झाला. त्यामुळेच हा जीव बोलतो. नंतर विराट पुरुषाची टाळू उत्पन्न झाली. तीत लोकपाल वरुण आपला अंश रसनेंद्रियासह राहिला. यामुळे जीव रस ग्रहण करतो. यानंतर त्या विराट पुरुषाला दोन नाकपुडया उत्पन्न झाल्या. त्यात दोन्ही अश्विनीकुमार आपला अंश घ्राणेंद्रियासहित प्रविष्ट झाले. यामुळे जीव वास ग्रहण करतो. अशाच प्रकारे जेव्हा विराटपुरुषाच्या शरीरात डोळे प्रगट झाले, तेव्हा लोकपाल सूर्याने आपला अंश नेत्रेंद्रियासह त्यात प्रवेश केला. त्या नेत्रेंद्रियामुळे पुरुषाला विविध रूपांचे ज्ञान होते. यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा उत्पन्न झाली. त्या त्वचेत वायू आपला अंश त्वग्‌इंद्रियासहित राहिला. याच त्वग्‌इंद्रियामुळे जीवाला स्पर्शाचा अनुभव येतो. जेव्हा याला कानाची छिद्रे उत्पन्न झाली, तेव्हा त्यात दिशांनी आपला अंश असलेले श्रवणेंद्रिय यासह प्रवेश केला. यामुळेच जीवाला शब्दाचे ज्ञान होते. मग विराट पुरुषाच्या शरीरात त्वचा उत्पन्न झाली. त्यामध्ये निरनिराळ्या औषधी आपला अंश असलेल्या रोमांसह राहिल्या. या रोमांतूनच जीव खाजवण्याचा अनुभव घेतो. आता त्याला लिंग उत्पन्न झाले. आपल्या या आश्रयात प्रजापतीने आपला अंश वीर्य यासह प्रवेश केला. त्यामुळे जीव आनंदाचा अनुभव घेतो. यानंतर विराट पुरुषाचे गुदद्वार निर्माण झाले. त्यात लोकपाल मित्राने आपला अंश पायूइंद्रिय यासह प्रवेश केला. याद्वारे जीव मलत्याग करतो. नंतर त्याचे हात प्रगट झाले. इंद्राने आपल्या देणे-घेणे या शक्तींसहित हातांत प्रवेश केला. त्यायोगे जीव आपली उपजीविका प्राप्त करतो. जेव्हा त्याचे पाय उत्पन्न झाले, तेव्हा लोकेश्वर विष्णूंनी त्यात आपली शक्ती गतीसह प्रवेश केला. या शक्तीमुळे जीव आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो. आता याची बुद्धी उत्पन्न झाली. तीत वाणीचा स्वामी ब्रह्मदेवाने आपलाच अंश असलेली बुद्धीशक्ती हिच्यासह प्रवेश केला. या बुद्धीशक्तीमुळे जीव जाणण्याजोगे विषय जाणतो. नंतर हृदय प्रगट झाले.चंद्राने आपला अंश मनासह त्यात प्रवेश केला. या मनामुळे संकल्प-विकल्प हे विकार निर्माण होतात. त्यानंतर विराट पुरुषात अहंकार उत्पन्न झाला. अभिमानाने आपला अंश असलेल्या क्रियाशक्तीसहित त्यात प्रवेश केला. यामुळे जीव कर्तव्य करतो. आता याच्यात चित्त प्रगट झाले. महत्तत्त्व(ब्रह्मा) हे चेतनेसह तेथे राहिले. याच चित्तशक्तीने जीव विज्ञान प्राप्त करून घेतो. या विराट पुरुषाच्या डोक्यापासून स्वर्गलोक, पायांपासून पृथ्वी आणि नाभीपासून आकाश (अंतरिक्ष) उत्पन्न झाले. याठिकाणी क्रमाने तिन्ही गुणांचे परिणामरूप देवादिक आढळतात. यामध्ये सत्त्वगुणांच्या आधिक्यामुळे देव स्वर्गलोकात, रजोगुणाच्या प्राधान्यामुळे मनुष्य व त्यांना उपयोगी पडणारे गायी इत्यादी जीव पृथ्वीवर आणि तमोगुणी स्वभावाचे असणारे रुद्राचे पार्षद(भूत, प्रेत) इत्यादी दोन्हींच्यामध्ये भगवंतांचे नाभिस्थान असलेल्या अंतरिक्ष लोकात राहातात. (१०-२९)

विदुरा, भगवंतांच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रगट झाले. मुखापासून प्रगट झाल्यामुळे ब्राह्मण सर्व वर्णांत श्रेष्ठ आणि सर्वांचे गुरु आहेत. त्यांच्या बाहूंपासून क्षत्रियवृत्ती आणि त्या वृत्तीचा अंगीकार करणारा क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला. हा वर्ण विराट भगवंतांचा अंश असल्यामुळे सर्व वर्णांचे चोर इत्यादींच्या उपद्रवापासून संरक्षण करतो. त्या भगवंतांच्या दोन मांडयापासून सर्व लोकांचा निर्वाह करणारे शेती इत्यादी व्यवसाय आणि तिच्यापासून वैश्यवर्णाचा प्रादुर्भाव झाला. आपल्या वृत्तीनुसार हा वर्ण जीवांची उपजीविका चालवितो. यानंतर सर्व धर्म व्यवस्थित चालण्यासाठी भगवंतांच्या चरणापासून सेवावृत्ती प्रगट झाली आणि तीपासून प्रथम ती वृत्ती धारण करणारा शूद्रवर्ण प्रगट झाला. या सेवावृत्तीनेच श्रीहरी प्रसन्न होतात. हे चारी वर्ण आपापल्या वृत्तींसहित ज्यांच्यापासून उत्पन्न झाले, त्या आपले गुरु श्रीहरींचे आपापल्या धर्माने चित्तशुद्धीसाठी, श्रद्धापूर्वक पूजन करतात. विदुरा, हा विराट पुरुष काल, कर्म आणि स्वभावशक्तीने युक्त असलेल्या भगवंतांच्या योगमायेच्या प्रभावाला प्रगट करणारा आहे. याच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन करण्याचे साहस कोण करू शकेल ? तरीही हे विदुरा, अन्य व्यावहारिक बोलल्याने अपवित्र झालेली माझी वाणी, पवित्र करण्यासाठी मी गुरुमुखातून जसे ऐकले आहे त्याप्रमाणे आणि माझ्या बुद्धीप्रमाणे श्रीहरीचे सुयश वर्णन करतो. महापुरुषांचे असेच मत आहे की, पुण्यश्लोकशिरोमणी श्रीहरींच्या गुणांचे वर्णन करणे हा मनुष्याला त्याच्या वाणीचा आणि विद्वानांच्या मुखातून भगवत्कथामृताचे पान करणे हाच त्याच्या कानांचा सर्वांत मोठा लाभ आहे. विदुरा, आम्हीच काय, पण आदिकवी ब्रह्मदेवांनी तरी एक हजार दिव्य वर्षांपर्यंत आपल्या योगसाधनेने परिपक्व झालेल्या बुद्धीने भगवंतांचा अपार महिमा जाणला का ? म्हणजेच भगवंतांची माया मायावी लोकांनाही मोहित करणारी आहे. भगवंतांनाही त्यांच्या मायेचा थांगपत्ता लागला नाही; तर अन्य कोणाचा तिथे काय पाड लागणार ? वाणी आणि मन जेथपर्यंत जाऊन माघारी फिरतात, तसेच अहंकाराचा अभिमानी रुद्र व इतर इंद्रियाधिष्ठात्या देवतांनासुद्धा ज्यांचा पार लागणे शक्य नाही, त्या श्रीभगवानांना नमस्कार असो.

स्कंध तिसरा - अध्याय सहावा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP