श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय ५ वा

विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रमवर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणाले - हरिद्वाराला राहाणार्‍या परमज्ञानी मैत्रेयांकडे भगवद्‌भक्तीने अंतःकरण शुद्ध झालेला विदुर गेला आणि त्यांच्या सौजन्याने मन प्रेमाने भरून येऊन त्याने त्यांना विचारले. (१)

विदुर म्हणाला - भगवन, सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात; परंतु त्यांना सुख मिळत नाही आणि त्यांचे दुःखही दूर होत नाही. उलट कर्मामुळे त्यांच्या दुःखात वाढच होते. म्हणून याविषयी योग्य काय व अयोग्य काय, ते आपण कृपा करून मला सांगावे. आपल्या दुर्भाग्यामुळे जे लोक भगवान श्रीकृष्णांपासून दूर असतात, अधर्माचे आचरण करतात आणि अत्यंत दुःखी आहेत, अशांच्यावर कृपा करण्यासाठीच आपल्यासारखे भाग्यवान भगवद्‌भक्त पृथ्वीवर संचार करतात. साधुशिरोमणि ! आपण मला शांती देणार्‍या अशा साधनाचा उपदेश करा की, ज्यानुसार आराधना केल्याने भगवान भक्तांच्या भक्तीने पवित्र हृदयात विराजमान होतात आणि आपल्या स्वरूपाचा प्रत्यक्ष अनुभव करून देणार्‍या सनातन ज्ञानाचा उपदेश करतात. त्रैलोक्याचे नियंते आणि पूर्णपणे स्वतंत्र असे भगवान श्रीहरी अवतार घेऊन ज्या ज्या लीला करतात, ज्या पद्धतीने अकर्ता असूनही त्यांनी कल्पाच्या आरंभी या सृष्टीची रचना केली, ती स्थिर केली आणि जगातील जीवांच्या उपजीविकेची तरतूद केली आणि पुन्हा या सृष्टीला आपल्या हृदयाकाशात लीन करून घेऊन, वृत्तिशून्य हो‌ऊन योगमायेच्या आश्रयाने जे निद्रिस्त होतात, ते योगेश्वरेश्वर प्रभू एकच असूनही या ब्रह्मांडात अंतर्यामीरूपाने प्रवेश करून अनेक रूपांत कसे प्रगट होतात ? तसेच ब्राह्मण, गायी आणि देवता यांचे कल्याण करण्यासाठी जे त्या त्या अवताराप्रमाणे लीलेने कर्मे करतात, ते पण आम्हांस सांगावे. सर्व यशस्वी पुरुषांचे मुकुटमणी असलेल्या श्रीहरींच्या लीलामृताचे कितीही पान केले तरी आमचे मन तृप्त होत नाही. (२-७)

सर्व लोकपतींचे स्वामी असणार्‍या श्रीहरींनी कोणत्या तत्त्वांनी हे लोक, लोकपाल आणि लोकालोक पर्वताच्या बाहेरच्या भागांची, ज्यामध्ये या सर्व प्रकारच्या प्राण्यांमध्ये अधिकारानुसार वेगवेगळा भेद जाणवतो, त्यांची रचना केली आहे ? ब्राह्मणश्रेष्ठ ! त्या विश्वकर्त्या स्वयंभू श्रीनारायणांनी आपल्या प्रजेचा स्वभाव, कर्म, रूप आणि नामभेद यांची कोणत्या प्रकारे रचना केली ? भगवन, उच्च-नीच वर्णांचे धर्म मी श्रीव्यासांच्या मुखातून अनेक वेळा ऐकले आहेत. परंतु श्रीकृष्णकथामृताच्या प्रवाहाशिवाय इतर तुच्छ सुख देणारे धर्म ऐकण्याची इच्छा आता मला उरली नाही. त्या तीर्थरूप श्रीहरींचे गुण ऐकून कुणाची तृप्ती होईल ? नारदांसारखे महात्मे आपल्यासारख्या साधूंच्या समाजात त्यांचे गुण गातात आणि ते गुणगान जेव्हा मनुष्याच्या कर्णरंध्रात प्रवेश करते, तेव्हा त्यांची संसारचक्रात गुरफटून टाकणारी गृहस्थ-धर्माची आसक्ती नाहीशी होते. भगवन, आपले परम मित्र मुनिवर व्यासांनीसुद्धा भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याच्या इच्छेनेच महाभारताची रचना केली. त्यात त्यांनी विषयसुखांचा उल्लेख करीत मनुष्यांची बुद्धी भगवंतांच्या कथेकडे आकर्षित केली आहे. ही भगवत्कथेची गोडी श्रद्धाळू पुरुषाच्या हृदयात जेव्हा वाढू लागते, तेव्हा ती त्याला अन्य विषयांपासून विरक्त करते. तो भगवच्चरणांच्या अखंड चिंतनाने आनंदित होत जातो आणि त्या पुरुषाच्या सर्व दुःखांचा तत्काळ नाश होतो. जे आपल्या पूर्वजन्मीच्या पापांमुळे भगवत्कथेविषयी विन्मुख असतात, अशा शोचनीय पुरुषांनाही शोचनीय अशा अज्ञानी लोकांबद्दल मला नेहमी खेद होतो. आणि निरर्थक संभाषण, कामे आणि चिंतनात काळ घालवितात, त्यांचे अमूल्य जीवन काळपुरुष हिरावून घेतो. मैत्रेय मुनी, आपण दीनांच्यावर कृपा करणारे आहात. भुंगा जसा फुलांतील मध काढून घेतो, त्याचप्रमाणे या लौकिक कथांमधून सारभूत असलेल्या परम कल्याणकारी पवित्रकीर्ती श्रीहरींच्या निवडक कथा आमच्या कल्याणासाठी आम्हांला सांगा. त्या सर्वेश्वर भगवंतांनी संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करण्यासाठी आपल्या मायाशक्तीचा स्वीकार करून राम-कृष्णादी अवतारांच्याद्वारा ज्या अनेक अलौकिक लीला केल्या, त्या सर्व मला सांगाव्यात. (८-१६)

श्रीशुकदेव म्हणतात - जीवांचे कल्याण होण्याच्या हेतूने विदुराने जेव्हा अशी प्रार्थना केली, तेव्हा मुनिश्रेष्ठ भगवान मैत्रेयांनी त्याची प्रशंसा करीत म्हटले. (१७)

मैत्रेय म्हणाले - साधुस्वभाव विदुरा ! सर्व जीवांवर अनुग्रह करण्यासाठी आपण ही फार चांगली गोष्ट मला विचारली. तुझे चित्त नेहमी भगवच्चरणीच लागलेले असते. यामुळेच तुझी कीर्ती सर्वत्र पसरली आहे. तू श्रीव्यासांचा औरस पुत्र असल्याने अनन्यभावाने सर्वेश्वर श्रीहरीचा आश्रय केलास, यात काही आश्चर्य नाही. तू प्रजेला शासन करणारा भगवान यमच आहेस. मांडव्य ऋषींच्या शापामुळे श्रीव्यासांचा भाऊ विचित्रवीर्य याच्या दासीच्या गर्भातून श्रीव्यासांपासून तुझा जन्म झाला आहे. श्रीभगवंत आणि त्यांचे भक्त यांना तू नेहमीच प्रिय आहेस. म्हणूनच निजधामाला जातेवेळी भगवंतांनी तुला ज्ञानोपदेश करण्याची मला आज्ञा केली आहे. म्हणून मी आता जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यासाठी भगवंतांनी योगमायेच्या साह्याने केलेल्या वेगवेगळ्या लीलांचे क्रमशः वर्णन करतो. (१८-२२)

सृष्टिरचनेच्या पूर्वी हे विश्व म्हणजे आत्म्यांचे आत्मा आणि त्याचे स्वामी एकमेव परमात्माच होते. माया आवरण्याची त्यांना इच्छा झाली असता सृष्टीमध्ये अनेक वृत्तींच्या भेदामुळे जी अनेकता दृष्टीस पडते, तीही नाहीशी हो‌ऊन ते एकटेच उरतात. ते द्रष्टा हो‌ऊन पाहू लागले, परंतु त्यांना काहीच दिसले नाही. कारण त्यावेळी ते स्वतःच्याच अद्वितीय रूपाने प्रकाशित होत होते. अशा अवस्थेत ते स्वतःला नसल्याप्रमाणे समजू लागले. खरे पाहता ते असत् नव्हते; तर त्यांच्या शक्ती निद्रिस्त होत्या. पण त्यांच्या ज्ञानाचा लोप झाला नव्हता. द्रष्टा आणि दृश्य यांना एकत्र आणणारी शक्ती म्हणजे कार्यकारणरूप माया होय. महाभाग विदुरा, या मायेच्या द्वाराच भगवंतांनी हे विश्व निर्माण केले आहे. काळाच्या शक्तीने जेव्हा या त्रिगुणात्मक मायेचा क्षोभ झाला, तेव्हा त्या इंद्रियातीत चिन्मय परमात्म्याने आपला अंश असलेल्या पुरुषरूपाने तीत चिदाभासरूप बीजाची स्थापना केली. तेव्हा काळाच्या प्रेरणेने त्या अव्यक्त मायेपासून महत्तत्त्व प्रगट झाले. ते खोटया अज्ञानाचा नाश करणारे असल्याने विज्ञानस्वरूप आणि आपल्यातच सूक्ष्मरूपाने असलेल्या विश्वाचे प्रगटीकरण करणारे होते. नंतर चिदाभास, गुण आणि कालाच्या अधीन असणार्‍या महत्तत्त्वावर भगवंतांची दृष्टी पडल्यावर त्यांनी विश्वाच्या रचनेसाठी स्वतःस रुपांतरित केले. महत्तत्त्व विकृत झाल्यावर त्यातून अहंकाराची उत्पत्ती झाली. हा अहंकार कार्य, कारण आणि कर्ता यांच्या रूपात असल्याने तोच भूतमात्र, इंद्रिये आणि मनाला कारणीभूत आहे. तो अहंकार सात्त्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा आहे. म्हणून अहंतत्त्वामध्ये विकार उत्पन्न झाल्यावर सात्त्विक अहंकारापासून मन आणि ज्यामुळे विषयांचे ज्ञान होते, त्या इंद्रियांच्या अधिष्ठात्या देवता उत्पन्न झाल्या. राजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये निर्माण झाली. तामस अहंकारापासून सूक्ष्म भूतांचे कारण शब्दतन्मात्र निर्माण झाले आणि त्यापासून दृष्टांतरूपाने आत्म्याचा बोध करून देणारे आकाश निर्माण झाले. भगवंतांची दृष्टी जेव्हा आकाशावर पडली, तेव्हा आकाशापासून काल, माया आणि चिदाभासाच्या योगाने स्पर्शतन्मात्र निर्माण झाले आणि त्याच्या विकृत होण्याने वायूची उत्पत्ती झाली. अत्यंत बलवान अशा वायूने आकाशासह विकृत हो‌ऊन ‘रूप-तन्मात्रा’ची रचना केली आणि त्यापासून विश्वाचे प्रकाशक असे तेज उत्पन्न झाले. पुन्हा परमात्म्याची दृष्टी पडल्यावर वायुयुक्त तेजाने काल, माया आणि चिदंशाच्या योगाने विकृत हो‌ऊन रस-तन्मात्र आणि या तत्त्वाचे कार्य जल निर्माण केले. नंतर परमात्म्याची तेजाने युक्त असलेल्या जलावर जेव्हा दृष्टी गेली, तेव्हा त्याने काल, माया आणि चिदंशाच्या योगाने गंधगुण असलेल्या पृथ्वीला उत्पन्न केले. विदुरा, या आकाशादी भूतांमध्ये जी भूते नंतर उत्पन्न झाली, त्यांच्यामध्ये क्रमाने आधीच्या भूतांचे गुण आहेत, असे समजले पाहिजे. हे महतत्त्वादिकांचे अभिमानी आणि विकार, विक्षेप आणि चेतना यांनी युक्त असणारे देव हे सर्व श्रीभगवंतांचेच अंश होते. परंतु वेगवेगळे राहिल्याने विश्वरचनेच्या कार्यात यशस्वी झाले नाहीत. तेव्हा ते हात जोडून भगवंतांस म्हणू लागले. (२३-३७)

देव म्हणाले - देवाधिदेव, आम्ही आपल्या चरणकमलांना वंदन करीत आहोत, जी आपल्याला शरण आलेल्या जीवांचे ताप दूर करण्यासाठी छत्राप्रमाणे आहेत. तसेच यांचा आश्रय घेतल्यानेच संन्यासी लोक या संसारातील अनंत दुःखांना सहजासहजी दूर फेकून देतात. हे जगत्कर्त्या जगदीश्वरा, या संसारात तापत्रयाने व्याकूळ झाल्याने जीवांना थोडीसुद्धा शांती मिळत नाही. म्हणून भगवंता, आम्ही आपल्या चरणांच्या ज्ञानमय छायेचा आश्रय घेत आहोत. मुनिजन एकांत स्थळी राहून आपल्या मुखकमलाचा आश्रय घेणार्‍या वेदमंत्ररूप पक्ष्यांच्या द्वारा ज्यांच्या अनुसंधानात रहातात आणि जे संपूर्ण पापांचा नाश करणार्‍या नद्यांतील श्रेष्ठ अशा श्रीगंगानदीचे उगमस्थान आहेत, त्या आपल्या परम पवित्र चरणकमलांचा आम्ही आश्रय घेत आहोत. तुमचे भक्तजन तुमच्या ज्या चरणकमलांना, श्रद्धा आणि श्रवण-कीर्तन रूप भक्ती करून, शुद्ध केलेल्या अंतःकरणात धारण करतात आणि वैराग्याने पुष्ट झालेल्या ज्ञानाने परम ज्ञानी होतात, त्या चरणकमल ठेवण्याच्या आसनाचा आम्ही आश्रय घेत आहोत. ईश्वरा, आपण संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि संहार यासाठीच अवतार घेता. ज्या आपल्या चरणकमलांचे स्मरण करणार्‍या भक्तजनांना आपण अभय देता, त्या चरणकमलांना आम्ही सर्वजण शरण आलो आहोत. हे भगवन, ज्या पुरुषांमध्ये देह, घर आणि त्याच्याशी संबंध ठेवणार्‍या इतर तुच्छ पदार्थांच्या बाबतीत अहंकार आणि ममतेचा दृढ दुराग्रह आहे, त्यांच्या शरीरात आपण अंतर्यामीरूपाने राहात असूनही त्यांच्यापासून पुष्कळ लांब आहेत, त्या आपल्या चरणांचे आम्ही भजन करतो. हे परमयशस्वी परमेश्वरा, इंद्रिये विषयांकडे ओढली गेल्याने ज्यांचे मन नेहमी बाहेर भटकत राहाते, ते पामर, तुमच्या विलासयुक्त पदन्यासाची शोभा जाणणार्‍या भक्तांचे दर्शन घेऊ शकत नाहीत (आणि म्हणूनच ते तुमच्या चरणकमलांपासून दूर राहातात.) हे देवा, आपल्या कथामृताचे पान केल्याने उचंबळून आलेल्या भक्तीमुळे ज्यांचे अंतःकरण निर्मळ झाले आहे, तेच वैराग्य हेच ज्याचे सार आहे, असे आत्मज्ञान प्राप्त करून घेऊन अनायासेच आपल्या वैकुंठधामाला जातात. दुसरे काही धीर पुरुष चित्ताचा निरोध करून समाधीच्या बळावर तुमच्या बलाढय मायेला जिंकून तुमच्यातच लीन हो‌ऊन जातात; पण त्यांना फार कष्ट पडतात. आपल्या भक्तिमार्गात मात्र काहीच कष्ट नाहीत. (३८-४६)

हे आदिदेवा, सृष्टिरचनेच्या इच्छेने आपण आम्हांस त्रिगुणयुक्त केलेले असल्याने आम्ही भिन्न स्वभावाचे आहोत आणि म्हणूनच आम्ही आपापसात एक होऊ शकत नाही. म्हणून आपल्या क्रीडेचे साधन असणारे ब्रह्मांड रचून ते आपणास समर्पित करण्यास आम्ही असमर्थ आहोत. हे जन्म नसलेल्या ईश्वरा, ज्यामुळे आम्ही ब्रह्मांडाची रचना करून आपल्याला सर्व प्रकारचे भोग वेळेवर समर्पण करू शकू आणि जेथे स्थिर हो‍ऊन आम्हीसुद्धा प्रत्येकाच्या योग्यतेनुसार अन्न ग्रहण करू शकू, तसेच हे सर्व जीव सर्व प्रकारच्या विघ्नांपासून दूर राहून तुमच्यासह आम्हांला भोग अर्पण करून आपापले अन्न भक्षण करू शकतील असा उपाय करा. कार्यरूप सृष्टी आणि आम्ही देवता यांचे आपण निर्विकार पुराणपुरुषच आदिकारण आहात. कारण हे देवा, प्रथम अजन्मा अशा आपणच सत्त्वादी गुण आणि जन्मादी कर्मांच्या कारणरूप अशा मायाशक्तीत आपले चिदाभासरूप वीर्य स्थापन केले होते. हे परमात्म्या, महत्तत्त्व इत्यादी रूपांनी युक्त असे आम्ही देवगण, ज्या कार्यासाठी उत्पन्न झालो आहोत, त्या संबंधी आम्ही काय करावे ? देवा ! आपणच आमच्यावर अनुग्रह करणारे आहात. म्हणून ब्रह्मांडाच्या रचनेसाठी आपण आम्हांला क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती प्रदान करावी. (४७-५०)

स्कंध तिसरा - अध्याय पाचवा समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP