श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध २ रा - अध्याय १ ला

ध्यानविधी आणि भगवंतांच्या विराट स्वरूपाचे वर्णन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीशुकदेव म्हणाले - राजा, लोकहितासाठी म्हणून विचारलेला हा प्रश्न फारच चांगला आहे. कारण मनुष्यासाठी ऐकणे इत्यादींबाबत श्रेष्ठ काय असे तू विचारलेस. आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नाचा मोठाच आदर करतात. राजेंद्रा ! जे गृहस्थ संसारातील कामधंद्यात गढून गेले आहेत, आपल्या स्वरूपाला जे जाणत नाहीत, त्यांच्यासाठी ऐकण्यासारख्या, सांगण्यासारख्या इत्यादी हजारो गोष्टी आहेत. हे राजा ! त्यांचे सर्व आयुष्य रात्री झोपेत किंवा स्त्री-सहवासात आणि दिवसा संपत्तीची हाव किंवा कुटुंबाचे पालनपोषण यातच संपून जाते. संसारामध्ये ज्यांना तो आपले अत्यंत घनिष्ठ संबंधी समजतो, ते शरीर, पुत्र, पत्‍नी इत्यादी सारे मिथ्या आहेत. परंतु जीव त्यांच्या मोहात असा अडकून जातो की, रात्रंदिवस आपण मृत्यूच्या दाढेत आहोत, हे पाहूनही तो सावध होत नाही. म्हणून परीक्षिता, जो अभयप्रद प्राप्त करून घेऊ इच्छितो, त्याने सर्वांचा आत्मा असणार्‍या, सर्वशक्तिमान, भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचेच श्रवण, कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे. मनुष्यजन्माचा हाच श्रेष्ठ लाभ आहे की, ज्ञानाने, भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे की, मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण अवश्य व्हावे. हे राजा, निर्गुण स्वरूपात रमलेले म्हणून विधि-निषेधाच्या मर्याला ओलांडलेले मुनीसुद्धा प्रामुख्याने भगवंतांच्या गुणांच्या वर्णनातच रमून जातात. द्वापरयुगाच्या शेवटी या वेदतुल्य श्रीमद्‌भागवत नावाच्या महापुराणाचे मी माझे वडील श्री व्यास यांचेकडून अध्ययन केले होते. हे राजर्षे, निर्गुण परमात्म्यामध्ये पूर्ण निष्ठा असूनही भगवान श्रीकृष्णांच्या लीलांनी माझे हृदय आकृष्ट केल्यामुळे मी या पुराणाचा अभ्यास केला. तू भगवंतांचा परम भक्त आहेस, म्हणून मी तुला हे सांगतो. जो याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याची शुद्ध चित्तवृत्ती ताबडतोब श्रीकृष्णांच्या चरणी स्थिर होते. जे लोक लौकिक अगर पारलौकिक कोणत्याही वस्तूची इच्छा करतात किंवा याउलट संसारातील दुःखांचा अनुभव घेऊन त्यापासून विरक्त झाले आहेत आणि निर्भय अशा मोक्षाची इच्छा करतात, अशा साधकांसाठी आणि ज्ञानी पुरुषांसाठी सुद्धा भगवंतांच्या नामांचे संकीर्तन करणे, हाच मार्ग सर्व शास्त्रांनी निश्चयपूर्वक सांगितला आहे. आपले कल्याण साधण्यात तत्पर नसणार्‍यांच्या व्यर्थ जाणार्‍या दीर्घ आयुष्याचा काय फायदा ? सावध राहून ज्ञानासाठी उपयोगात आणलेल्या एक दोन घटिकाही श्रेष्ठ आहेत. कारण त्या आपल्या कल्याणाकरिता उपयोगात आणल्या जातात. राजर्षी खट्वाङ्‌गाने आपले आयुष्य संपत आले आहे असे जाणून दोन घटकांमध्येच सर्वस्वाचा त्याग करून भगवंतांचे अभयपद प्राप्त करून घेतले. परीक्षिता, तुझ्या जीविताचे अजून सात दिवस शिल्लक आहेत. या कालावधीमध्ये आपल्या पारलौकिक कल्याणासाठी तुला जे काही करता येईल, ते सर्व तू कर. (१-१४)

मृत्यूचा समय आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये. त्याने वैराग्याच्या शस्त्राने शरीर आणि त्याच्याशी संबंध असणार्‍या विषयीची ममता तोडून टाकावी. मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलात स्नान करावे आणि पवित्र तसेच एकांत स्थानी विधिपूर्वक आसन घालून बसावे. त्यानंतर परम-पवित्र अशा, "अ-उ-म" या तीन मात्रांनी युक्त असलेल्या अक्षर परब्रह्माचा (ॐ काराचा) मनःपूर्वक जप करावा. प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा व प्रणवाचे विस्मरण होऊ देऊ नये. बुद्धीच्या साहाय्याने, मनाच्या द्वारा, इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परावृत्त करावे आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनाला विचारांनी काबूत ठेवून ते भगवंतांच्या मंगलमय रूपाकडे लावावे. स्थिर चित्ताने भगवंतांच्या मूर्तीमधील कोणत्याही एका अवयवाचे ध्यान करावे. अशा प्रकारे एकेका अंगाचे ध्यान करता करता विषयवासनारहित झालेल्या मनाला पूर्णरूपाने भगवंतांमध्ये असे तल्लीन करावे की, ते पुन्हा दुसर्‍या कोणत्याही विषयांचे चिंतन करणार नाही. जे प्राप्त झाल्यानंतर मन भगवत्प्रेमाच्या आनंदाने भरून जाते, ते भगवान विष्णूंचे परमपद आहे. मन रजोगुणामुळे चंचल किंवा तमोगुणामुळे मूढ झाले तरी धैर्याने, योगधारणेच्या द्वारा त्याला वश करून घ्यावे. कारण अशी धारणाच वरील दोन गुणांचे दोष नाहीशी करते. धारणा स्थिर झाल्यावर ध्यानामध्ये जेव्हा योगी आपला परम मंगलमय आश्रय जो भगवान त्यांना पाहतो, तेव्हा त्याला लगेच भक्तियोगाची प्राप्ती होते (१५-२१)

परीक्षिताने विचारले ब्रह्मन्, जी धारणा मनुष्याच्या मनातील मल तत्काळ काढून टाकते, ती धारणा कोणत्या वस्तूमध्ये, कोणत्या प्रकारे केली जाते आणि तिचे स्वरूप काय ? (२२)

श्रीशुक म्हणाले, परीक्षिता, आसन, श्वास, आसक्ती आणि इंद्रियांवर विजय मिळवून नंतर बुद्धीने मनाला भगवंतांच्या स्थूल रूपामध्ये स्थिर करावे. हे कार्यरूप संपूर्ण विश्व, जे काही कधी होते, आहे अगर असेल असे संपूर्ण विश्व ज्यामध्ये दिसते, तेच भगवंतांचे स्थूलातिस्थूल आणि विराट शरीर आहे. जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महत्तत्त्व आणि प्रकृती या सात आवरणांनी वेढलेल्या या ब्रह्मांडरूपी शरीरात जो विराट पुरुष आहे तोच धारणेचे आश्रय भगवान आहेत. तत्त्वज्ञ पुरुष त्या विराट पुरुषाचे वर्णन असे करतात - विराट पुरुषाचे तळवे हे पाताळ, टाचा आणि पंजे हे सुतळ, दोन्ही मांड्या हे वितळ आणि अतळ आणि कंबर भूतळ आहे. हे परीक्षिता, त्यांच्या नाभिरूप सरोवरालाच आकाश म्हणतात. आदिपुरुष परमात्म्याच्या छातीला स्वर्गलोक, गळ्याला महर्लोक, वदनाला जनोलोक आणि कपाळाला तपोलोक म्हणतात. त्या सहस्रशीर्ष असलेल्या भगवंतांचा मस्तकसमूह म्हणजेच सत्यलोक होय. इंद्रादी देवता त्यांचे हात आहेत. दिशा, कान आणि शब्द श्रवणेंद्रिये आहेत. दोन्ही अश्विनीकुमार त्यांच्या नाकाची छिद्रे आहेत, गंध हे घ्राणेंद्रिय आहे आणि धगधगणारी आग त्यांचे मुख आहे. भगवान विष्णूंचे नेत्र अंतरिक्ष आहेत, त्यांची पाहण्याची शक्ती सूर्य आहे, दोन्ही पापण्या रात्र आणि दिवस आहेत, त्यांचा भ्रूविलास ब्रह्मलोक आहे. टाळू पाणी आहे आणि जीभ रस आहे. वेदांना भगवंतांचे ब्रह्मरंध्र म्हणतात आणि यमाला दाढा. सर्व प्रकारचे प्रेम दात आहेत आणि जगाला मोहून टाकणारी त्यांची माया हेच त्यांचे हास्य म्हटले जाते. ही अनंत सृष्टी हा त्यांच्या मायेचा कटाक्ष-विक्षेप आहे. वरचा ओठ लज्जा तर खालचा ओठ लोभ आहे. धर्म स्तन तर अधर्म पाठ आहे. जननेंद्रिय हा प्रजापती तर अंडकोश मित्रावरूण आहेत. समुद्र पोट आहे तर मोठमोठे पर्वत त्यांची हाडे आहेत. हे राजन् ! विश्वमूर्ति विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे नद्या होत. वृक्ष रोम आहेत. अतिशय प्रभावी वायू हा श्वास आहे. काल हे त्याचे चालणे तर गुणांचे चक्र फिरते ठेवणे ये त्याचे कर्म आहे. परीक्षिता ढगांना त्याचे केस मानले आहे. संध्या (समय) त्या अनंतांचे वस्त्र आहे. महात्मा लोकांनी अव्यक्त अशा मूल प्रकृतीला त्यांचे हृदय म्हटले आहे आणि सर्व विकारांचा खजिना असलेले मन चंद्र म्हटले गेले आहे. सर्वात्मा भगवंतांचे चित्त म्हणजेच महत्तत्त्व आणि रुद्र म्हणजे त्यांचा अहंकार म्हटले आहे. घोडे, खेचर, उंट आणि हत्ती त्यांची नखे आहेत. वनात राहणारे सर्व मृग आणि पशू त्यांच्या कटिप्रदेशात आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पक्षी हे त्यांचे अद्‌भुत रचनाकौशल्य आहे. स्वायंभुव मनू त्यांची बुद्धी आणि मनूचे संतान मनुष्य त्यांचे निवासस्थान आहे. गंधर्व, विद्याधर, चारण आणि अप्सरा, हे षड्ज आदि संगीतातील स्वरांची आठवण आहे. दैत्यसेना त्यांचे वीर्य आहे. ब्राह्मण मुख, क्षत्रिय भुजा, वैश्य मांड्या आणि शूद्र विराट पुरुषाचे चरण आहेत. विविध देवतांच्या नावाने जे द्रव्यमय यज्ञ केले जातात, ते त्यांचे कर्म होय. परीक्षिता, विराट भगवंतांच्या स्थूल शरीराचे हेच स्वरूप आहे. ते मी तुला सांगितले. मुमुक्षू पुरुष यातच बुद्धीच्या द्वारे मनाला स्थिर करतात. कारण यापेक्षा वेगळी कोणतीच वस्तू नाही. स्वप्न पाहणारा जसे स्वप्नावस्थेत आपल्यालाच विविध पदार्थांच्या स्वरूपात पाहतो, त्याचप्रमाणे सर्वांच्या बुद्धि-वृत्तींच्या द्वारे सर्व गोष्टींचा अनुभव घेणारा सर्वांतर्यामी परमात्माही एकच आहे. त्या सत्यस्वरूप आनंदनिधी भगवंतांचेच भजन केले पाहिजे. अन्य कशातच आसक्ति असता कामा नये. कारण त्यामुळे जीवाचा अधःपात होतो. (२३-३९)

स्कंध दुसरा - अध्याय पहिला समाप्त
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP