श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध १ ला - अध्याय १९ वा

परीक्षिताचे अनशनव्रत आणि शुकदेवांचे आगमन -

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सूत म्हणाले - राजधानीला पोहोचल्यावर राजा परीक्षिताला आपल्या निंद्य कर्माबद्दल अतिशय पश्चात्ताप झाला. तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला, मी निरपराध तसेच आपले तेज झाकून ठेवलेल्या ब्राह्मणाबरोबर असभ्य पुरुषासारखा नीच व्यवहार केला, हे किती वाईट झाले. त्या महात्म्याचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर अवश्य येईल आणि ते खुशाल येवो. कारण त्यामुळे माझ्या पापाचे प्रायश्चित्त मला मिळेल आणि असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही. ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्य, सेना आणि समृद्ध खजिना जळून खाक होऊ दे. त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या दुष्टाची ब्राह्मण, देवता आणि गाय यांच्याबाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही. परीक्षित असा विचार करीत होता, एवढ्यात त्याला असे समजले की, ऋषिकुमाराच्या शापाने तक्षक त्याला दंश करणार आहे. त्यामुळे संसारात आसक्त असण्यार्‍या आपल्याला लवकरच वैराग्य प्राप्त करून देणारा तक्षकरूप मृत्यू त्याला चांगला वाटला. या जगातील आणि परलोकांतील भोगांना तो पहिल्यापासूनच तुच्छ आणि त्याज्य समजत होता. आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून आमरण उपोषण व्रत घेऊन तो गंगातीरावर बसला. तुळशीच्या सुगंधाने मिश्रित असलेले गंगाजल भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे पराग घेऊन प्रवाहित झाले आहे. म्हणून गंगामाता लोकपालांसहित स्वर्ग आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व लोकांना पवित्र करते. मग मरणासन्न असला कोण मनुष्य तिचे सेवन करणार नाही ? (१-६)

अशाप्रकारे आमरण उपोषणाचा निश्चय करून, गंगातटाकी बसून, त्याने सर्व आसक्तींचा त्याग केला आणि ऋषी-मुनी करीत असलेल्या व्रताचा स्वीकार करून अनन्यभावाने श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे तो ध्यान करू लागला. त्रैलोक्याला पवित्र करणारे महानुभाव मुनी आपल्या शिष्यांसह तेथे येऊन पोहोचले. तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरेतर संतजन त्या तीर्थक्षेत्रांनाच पवित्र करतात. त्यावेळी तेथे अत्री, वसिष्ठ, च्यवन, शरद्वान, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम, उतथ्य, इंद्रप्रमद, इध्मवाह, मेधातिथी, देवल, आर्ष्टिषेण, भारद्वाज, गौतम, पिप्पलाद, मैत्रेय, और्व, कवष, अगस्त्य, भगवान व्यास, नारद तसेच यांच्या व्यरितिक्त अनेक श्रेष्ठ देवर्षी, ब्रह्मर्षी आणि अरुणादी राजर्षींचे शुभागमन झाले. अशा प्रकारे विभिन्न गोत्रांच्या मुख्य मुख्य ऋषींना एकत्र आलेले पाहून राजाने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला आणि त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला. जेव्हा सर्व लोक स्वस्थपणे आपापल्या आसनावर बसले, तेव्हा महाराज परीक्षिताने त्यांना पुन्हा एकदा प्रणाम केला आणि त्यांच्यासमोरे उभे राहून शुद्ध हृदयाने हात जोडून त्याला जे काही करावयाचे होते, ते तो सांगू लागला. (७-१२)

परीक्षित म्हणाला - अहो ! समस्त राजांमध्ये आम्ही धन्यतम आहोत; कारण आमच्या शीलस्वभावामुळे आम्ही आपल्यासारख्या महान पुरुषांच्या कृपेला पात्र झालो आहोत. निंदित कर्म केल्यामुळे राजवंशातील बहुतेक लोक ब्राह्मणांची पाद्यपूजा करण्यापासूनही दूर जातात, ही किती खेदाची गोष्ट आहे ! मीही नेहमी घरदारात आसक्त राहिल्याकारणाने पापीच झालो आहे. म्हणूनच स्वतः भगवंतच ब्राह्मणाच्या शापाच्या रूपाने माझ्यावर कृपा करण्यासाठी आले आहेत. हा शाप वैराग्य उत्पन्न करणारा आहे; कारण अशा प्रकारच्या शापाने संसारात आसक्त झालेला पुरुष भयभीत झाल्यामुळे विरक्त होतो. ब्राह्मण हो ! मी माझे चित्त भगवच्चरणी समर्पित केले आहे. आपण आणि गंगामाता, शरण आलेल्या माझ्यावर अनुग्रह करा. ब्राह्मणकुमाराच्या शापाने प्रेरित दुसरा कोणीही कपटाने तक्षकाचे रूप घेऊन किंवा स्वतः तक्षक येऊन दंश करू दे, मला त्याची पर्वा नाही. आपण भगवंतांच्या रसमय लीलांचे गायन करा. आपणा ब्राह्मणांच्या चरणांना प्रणाम करून मी पुन्हा आपणांस हीच प्रार्थना करतो की, कर्मवश ज्या ज्या योनीत मला जन्म घ्यावा लागेल, त्या त्या योनीत भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवर माझी प्रीती असावी आणि त्यांच्या चरणाश्रित महात्म्यांचा संग घडावा. तसेच सर्व प्राणिमात्रांशी मैत्री असावी, असा आपण मला आशीर्वाद द्या. (१३-१६)

महाराज परीक्षित मोठा धैर्यवान होता, तो दृढ निश्चय करून गंगेच्या दक्षिण तीरावर पूर्वाभिमुख कुशाग्र असलेल्या आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसला. त्याने राज्यकारभार आपला पुत्र जनमेजयावर सोपवला होता. पृथ्वीवरील एकछत्री अंमल असणारा सम्राट परीक्षित याप्रमाणे जेव्हा आमरण उपोषणाचा निश्चय करून बसला तेव्हा आकाशातून देवसमुदाय आनंदाने त्याची प्रशंसा करीत पृथ्वीवर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वारंवार नगारे वाजवू लागले. तेथे असलेल्या महर्षींनी परीक्षिताच्या निश्चयाची प्रशंसा केली आणि ’उत्तम, उत्तम !’ म्हणून त्याला अनुमोदन दिले. ऋषींचा स्वभाव आणि शक्ती लोकांवर कृपा करण्यासाठी असते. त्यांनी परीक्षिताच्या उत्तम कीर्तिमान अशा गुणांना अनुरूप असे उद्‌गार काढले. हे राजर्षिशिरोमणी ! श्रीकृष्णांचे अनुयायी असणार्‍या आपणा पांडववंशीयांना ही काही आश्चर्याची गोष्ट नाही. कारण आपण सर्वांनी भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याच्या आकांक्षेने, ज्या सिंहासनाची सेवा करण्यासाठी राजे आपापले मुकुट तेथे टेकवीत, अशा राजसिंहासनाचा एका क्षणात त्याग केलात. जोपर्यंत हा भगवंतांचा परम भक्त परीक्षित आपले नश्वर शरीर सोडून मायेचा दोष आणि शोक यांनी रहित अशा भगवद्‌धामाला जात नाही, तोपर्यंत आम्ही सर्वजण येथेच राहू. (१७-२१)

ऋषींचे हे फारच मधुर, गंभीर, सत्य आणि समत्वभावाने युक्त असे वचन ऐकून राजा परीक्षिताने त्या योगी मुनींचे अभिनंदन केले आणि भगवंतांचे मनोहर चरित्र ऐकण्याच्या इच्छेने त्यांना प्रार्थना केली. हे महात्म्यांनो, आपण सर्व ठिकाणांहून येथे आलात. सत्यलोकात राहणार्‍या मूर्तिमान वेदांच्या समान आपण आहात. आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार अनुग्रह करणे याखेरीज या लोकात अगर परलोकात आपला अन्य कोणताच स्वार्थ नाही. हे विप्रांनो, आपणांवर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या कर्तव्यासंबंधी विचारण्यायोग्य प्रश्न मी आपणांस विचारतो. आपण सर्व विद्वानांनी आपापसात विचारविनिमय करून सांगावे की, "१) सर्वांच्यासाठी सर्व अवस्थांमध्ये आणि २) विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणार्‍या पुरुषांनी करण्यायोग्य विधुद्ध कर्म कोणते ?" (२२-२४)

पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे कोणापासून कोणतीच अपेक्षा न ठेवणारे, व्यासपुत्र भगवान श्रीशुकदेव त्यावेळी तेथे प्रगट झाले. त्यांच्या अंगावर वर्ण किंवा आश्रमाचे कोणतेही बाह्य चिन्ह नव्हते. ते आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते. लहान मुले त्यांच्या भोवती होती. त्यांचा वेष अवधूताचा होता. त्यांचे वय वर्षे सोळा. पाय, हात, मांड्या, बाहू, खांदे, गाल आणि इतर सर्व अवयव अत्यंत सुकुमार होते. नेत्र विशाल आणि मनोहर होते. नाक काहीसे उभार, कान सुडौल, सुंदर भुवया या सर्वांमुळे चेहरा अत्यंत शोभायमान दिसत होता. गळा तर जणू सुंदर शंखच होता. खांद्याची हाडे लपलेली, छाती रुंद आणि भरदार, भोवर्‍याप्रमाणे खोल नाभी आणि पोट तीन वळ्यांनी युक्त असे सुंदर. लांब हात, मुखावर कुरळे केस विखुरलेले. अशा प्रकारचे दिगंबर वेषात असलेले ते एखाद्या श्रेष्ठ देवाप्रमाणे तेजस्वी दिसत होते. सावळा वर्ण, चित्ताकर्षक तारुण्य, अंगकांती आणि मधुर स्मित यांमुळे ते स्त्रियांना मनोहर वाटणारे होते. त्यांनी जरी आपले तेज झाकून ठेवले होते, तरीसुद्धा त्यांची लक्षणे जाणणारे मुनी त्यांच्या सन्मानासाठी आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले. (२५-२८)

आलेल्या त्या अतिथींची परीक्षिताने मस्तक लववून आत्मनिवेदनरूप पूजा केली. त्यांचे खरे स्वरूप न जाणणार्‍या स्त्रिया आणि मुले तेथून निघून गेली. सर्वांनी केलेल्या स्वागताने सन्मानित झालेले श्रीशुकदेव श्रेष्ठ आसनावर विराजमान झाले. ग्रह, नक्षत्रे आणि तार्‍यांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे ब्रहर्षी, देवर्षी आणि राजर्षी यांच्या समूहात महात्म्यांनाही आदरणीय श्रीशुकदेव अत्यंत शोभिवंत दिसत होते. जेव्हा अत्यंत बुद्धिमान श्रीशुकदेव शांतपणे बसले होते, तेव्हा भगवंतांचे भक्त परीक्षित त्यांच्याजवळ आले व त्यांनी चरणांवर डोके टेकवून नमस्कार केला. पुन्हा उठून उभे राहून हात जोडून नमस्कार केला. पुन्हा उठून उभे राहून हात जोडून नमस्कार केला आणि मधुर वाणीने त्यांना विचारले. (२९-३१)

ब्रह्मस्वरूप भगवन, आम्ही अपराधी क्षत्रिय असूनही आज सत्संगाचे अधिकारी ठरलो, म्हणून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. अतिथीरूपाने येऊन कृपेने आपण आम्हांला तीर्थाप्रमाणे पवित्र केलेत. आपल्या सारख्या महात्म्यांच्या केवळ स्मरणानेच गृहस्थ लोकांचे घर ताबडतोब पवित्र होते; तर मग दर्शन, स्पर्श, पाद्यपूजा आणि आसनावर बसणे, अशी संधी मिळाल्यावर त्या घराचे भाग्य काय वर्णावे ! हे योगिवर ! ज्याप्रमाणे भगवन विष्णूंच्यासमोर दैत्य थांबत नाहीत, त्याप्रमाणे आपल्या सान्निध्यात मोठमोठीसुद्धा पापे ताबडतोब नाहीशी होतात. पांडवांचे सुहृद, भगवान श्रीकृष्ण निश्चितच माझ्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. म्हणूनच त्यांनी आपल्या आतेभावांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्याच कुळात उत्पन्न झालेल्या माझ्यापाशी सुद्धा आपलेपणाचा व्यवहार केला. भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली नसती तर आपल्यासारख्या एकांत वनवासात राहणार्‍या अव्यक्तगती परम सिद्ध पुरुषांनी स्वतः येऊन मृत्यूच्या वेळी, माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसे दर्शन दिले असते ? आपण योग्यांचेही परम गुरू आहात; म्हणून मी आपणांस आसन्नमरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल, हे विचारीत आहे. हे भगवन, त्याचबरोबर आपणे हेही सांगा की मनुष्यांनी काय ऐकावे ? कोणता जप करावा ? कोणते कर्म करावे ? तसेच कशाचा त्याग करावा ? हे मुनिवर, आपण गाईची धार काढण्यास जेवढा वेळ लागतो, तितकासुद्धा वेळ गृहस्थांच्या घरी थांबत नाही, म्हणून मी आपणांस हे आताच विचारत आहे. (३२-३९)

सूत म्हणाले - जेव्हा राजाने मोठ्या मधुर वाणीने अशाप्रकारे संभाषण केले आणि प्रश्न विचारले तेव्हा सर्व धर्मांचे मर्म जाणणारे व्यासपुत्र भगवान श्रीशुकदेव त्यांची उत्तरे देऊ लागले. (४०)

अध्याय एकोणिसावा समाप्त
॥ स्कन्ध पहिला समाप्त ॥
॥ हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP