श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ७ वा - अध्याय १२ वा - अन्वयार्थ

ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम -

ब्रह्मचारी - वेद शिकणार्‍याने - गुरोः कुले - गुरूच्या घरी - वसन् - राहत - दांतः (भूत्वा) - इंद्रियनिग्रही होऊन - दासवत् - चाकराप्रमाणे - गुरोः हितं आचरन् - गुरूचे हित करीत - नीचः - नम्रतेने वागत - गुरौसुदृढसौहृदः (स्यात्) - गुरूच्या ठिकाणी अत्यंत दृढ आहे प्रेम ज्याचे असे असावे. ॥ १ ॥

सायंप्रातः - सांजसकाळ - गुर्वग्न्यर्कसुरोत्तमान् उपासीता - गुरु, अग्नि, सूर्य व श्रेष्ठतर देव यांची उपासना करावी - समाहितः (भूत्वा) - आणि एकाग्रचित्त होऊन - ब्रह्म जपन् - गायत्रीचा जप करीत - उभै संध्ये यतवाक् (स्यात्) - दोन्ही संध्यांच्या समयी मौन धारण करावे. ॥ २ ॥

गुरोः आहूतः चेत् - गुरुंनी बोलाविले म्हणजे - सुयंत्रितः - व्यवस्थित रीतीने - छंदांसि अधीयीत - वेदाध्ययन करावे - उपक्रमे अवसाने च - आणि प्रारंभी व शेवटी - (गुरोः) चरणौ शिरसा नमेत् - गुरुंच्या चरणावर मस्तक ठेऊन वंदन करावे. ॥ ३ ॥

दर्भपाणिः - ज्याच्या हातात दर्भ आहे अशा त्याने - मेखलाजिनवासांसि - कटिसूत्र, मृगचर्मे व वस्त्रे - जटादंडकमंडलून् - जटा, दंड व कमंडलु - यथोदितं उपवीतं च - आणि शास्त्रांत सांगितल्याप्रमाणे यज्ञोपवीत - बिभृयात् - धारण करावे. ॥ ४ ॥

सायंप्रातः भैक्षं चरेत् - सांजसकाळ भिक्षा मागावी - तत् गुरवे निवेदयेत् - ती गुरूला अर्पण करावी - यदि अनुज्ञातः (तर्हि तां) भुञ्जीत - जर गुरुजीने आज्ञा दिली तर ती भक्षण करावी - नो चेत् - नाही तर - क्वचित् उपवसेत् - कधी उपाशी राहावे. ॥ ५ ॥

सुशीलः - सुस्वभावी - मितभुक् दक्षः - अल्पाहारी व दक्ष - श्रद्दधानः जितेंद्रियः (सन्) - श्रद्धा ठेवणारा आणि इंद्रियनिग्रह करणारा होत्साता - स्त्रीषु स्त्रीनिर्जितेषु च - स्त्रिया आणि स्त्रियांनी वश केलेले लोक यांच्याशी - यावदर्थं व्यवहरेत् - कामापुरता व्यवहार ठेवावा. ॥ ६ ॥

बृहदव्रतः अगृहस्थः - गृहस्थ नाही अशा नैष्ठिक ब्रह्मचर्यव्रत पालन करणार्‍याने - प्रमदागाथां वर्जयेत् - स्त्रियांच्या गोष्टी वर्ज्य कराव्या - प्रमाथीनि इंद्रियाणि - अनावर इंद्रिये - यतेः अपि - संन्याशाचेही - मनः हरंति - मन हरण करितात. ॥ ७ ॥

युवा - तरुण पुरुषाने - आत्मनः केशप्रसाधनोन्मर्दस्नपनाभ्यंजनाजदिकं - आपले केश विंचरणे, अंग रगडणे, स्नान व उटी लावणे इत्यादि - युवतिभिः गुरुस्त्रीभिः - गुरूच्या तरुण स्त्रियांकडून - न कारयेत् - करवून घेऊ नये. ॥ ८ ॥

ननु प्रमदा नाम अग्निः (अस्ति) - खरोखर स्त्री म्हणजे अग्नि होय - पुमान् च घृतकुंभसमः (अस्ति) - आणि पुरुष तुपाच्या घडयासारखा होय - सुतां अपि - कन्येलाही - रहः जह्यात् - एकांती टाळावे - अन्यदा यावदर्थकृत् (भवेत्) - इतर वेळीही कामापुरता व्यवहार ठेवणारा असावे. ॥ ९ ॥

आत्मना इदं - आत्मज्ञानाने हे सगळे - आभासं कल्पयित्वा - केवळ भ्रममूलक आहे असे समजून घेऊन - यावत् ईश्वरः न भवेत् - जोपर्यंत पुरुष स्वतंत्र होणार नाही - तावत् द्वैतं न विरमेत् - तोपर्यंत द्वैतबुद्धि थांबणार नाही - तत् हि - आणि त्या द्वैतापासून खरोखर - अस्य विपर्ययः (भवति) - ह्या जीवाला उलट बुद्धि होते. ॥ १० ॥

एतत् सर्वं समाम्नातं - हे सर्व सांगितलेले - गृहस्थस्य यतेः अपि (युक्तं स्यात्) - गृहस्थाला व यतीलाही लागू आहे - ऋतुगामिनः गृहस्थस्य - ऋतुकाळी स्त्रीशी गमन करणार्‍या गृहस्थाला मात्र - गुरुवृत्तिः विकल्पेन (भवति) - गुरुची सेवा करणे हे विकल्पाचे आहे. ॥ ११ ॥

ये धृतव्रताः (ते) - ज्यानी ब्रह्मचर्यव्रत धारण केले आहे त्यांनी - अञ्जनाभञ्जनोन्मर्दस्‌त्र्यवलेखामिषं - अंगाला व डोक्याला तेल लावणे, रगडणे, स्त्रीचे चित्र पाहणे, मांस - मधु स्रग्गंन्धलेपालंकारान् - मद्य, माळा, उटी व अलंकार ही - त्यजेयुः - वर्ज्य करावी. ॥ १२ ॥

एवं गुरुकुले उषित्वा - याप्रमाणे गुरुच्या घरी राहून - द्विजः - ब्राह्मणाने - यावदर्थं यथाबलं - आपल्या अधिकारानुसार यथाशक्ति - सांगोपनिषदं त्रयीं - अंगे व उपनिषदे ह्यांसह तीन्ही वेद - अधीत्य च अवबुध्य - पठण करून व समजावून घेऊन. ॥ १३ ॥

यदि ईश्वरः (स्यात्) - जर समर्थ असेल तर - गुरोः कामं वरं दत्त्वा - गुरूला इच्छित देणगी देऊन - (तेन) अनुज्ञातः - त्याने आज्ञा दिलेला असा - गृहं वा वनं प्रविशेत् - गृहस्थाश्रमांत शिरावे किंवा वनांत प्रवेश करावा - प्रव्रजेत् - अथवा संन्यास घ्यावा नाही - वा तत्र वसेत् - तर त्या ब्रह्मचर्याश्रमांत नैष्ठिक होऊन राहावे. ॥ १४ ॥

अग्नौ गुरौ आत्मनि सर्वभूतेषु च - अग्नि, गुरु, आत्मा व सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी - स्वधामभिः भूतैः - आपल्या आश्रित जीवांसह - अप्रविष्टं अधोक्षजं - वस्तुतः प्रविष्ट नसलेल्या इंद्रियांना अगोचर अशा प्रभूला - प्रविष्टवत् पश्येत् - प्रविष्ट झाल्याप्रमाणे पाहावे. ॥ १५ ॥

एवंविधः चरन् - याप्रमाणे आचरण करणारा - ब्रह्मचारी गृही वानप्रस्थः यतिः (वा) - ब्रह्मचारी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थ अथवा संन्यासी - विदितविज्ञानः - आनुभविक ज्ञानाने संपन्न असा - परं ब्रह्म - परब्रह्मरूपाला - अघिगच्छति - प्राप्त होतो. ॥ १६ ॥

वानप्रस्थस्य - वानप्रस्थाच्या - मुनिसंमतान् नियमान् - मुनींना मान्य अशा नियमांना - वक्ष्यमि - मी सांगतो - यान् अतिष्ठन् मुनिः - जे आचरणारा मुनि - इह - या लोकी - अञ्जसा - अनायासे - ऋषिलोकं गच्छेत् - ऋषिलोकाला जातो. ॥ १७ ॥

कृष्टपच्यं - नांगरलेल्या भूमीत पिकणारे - अकृष्टं च अपि अकालतः - आणि न नांगरलेल्या भूमीत पिकणारेही अयोग्य काळी - न अश्नीयात् - खाऊ नये - उत अग्नीपक्वं - तर एक अग्नीने पक्व झालेले - अथ आमं - अथवा कच्चे - वा अर्कपक्वं - अथवा उन्हाने पिकलेले - आहरेत् - भक्षण करावे. ॥ १८ ॥

वन्यैः - वनातील धान्यांनी - कालचोदितान् चरुपुरोडाशान् - ज्या ज्या काळी जे विहित असतील ते चरुपुरोडाश - निर्वपेत् - हवन करावे - नवे नवे अन्नाद्ये लब्धे - नवीन नवीन अन्नादिक मिळाली असता - पुराणं तु परित्यजेत् - मग जुने टाकावे. ॥ १९ ॥

स्वयं हिम वाय्वग्निवर्षार्कातपषाट् - स्वतः थंडी, वारा, अग्नि, पाऊस, ऊन्ह सोसणारा होत्साता - अग्न्यर्थं एव - अग्निसंरक्षणाकरिताच - शरणं उटजं वा अग्निकंदरां - घर, झोपडी अथवा पर्वताची गुहा - श्रयेत - स्वीकारावी. ॥ २० ॥

केशरोमनखश्मश्रुमलानि - मस्तकावरील व इतर ठिकाणचे केस, नखे, दाढी, मिशा व मळ - कमंडल्वजिने - कमंडलु व मृगचर्म - दंडवल्कलाग्निपरिच्छदान् - दंड, वल्कले व अग्निसाहित्य - दधत् जटिलः - धारण करणार्‍या जटाधारी ॥ २१ ॥

मुनिः - मुनीने - वने द्वादश अब्दान् - अरण्यात बारा वर्षे - अष्टौ वा चतुरः - आठ किंवा चार - द्वौ वा एकं - दोन किंवा एक वर्ष - यथा - जेणेकरून - बुद्धिः कच्छ्रतः न विपद्येत (तथा) - तपश्चर्येच्या कष्टानी बुद्धि नष्ट होणार नाही तसे - चरेत् - राहावे. ॥ २२ ॥

यदा - जेव्हा - व्याधिभिः अथवा जरया - रोगाने किंवा वृद्धपणामुळे - स्वक्रियायां - स्वकर्म करण्याविषयी - आन्वीक्षिक्यां विद्यायां वा - किंवा ज्ञानाभ्यास करण्याविषयी - अकल्पः (स्यात्) - असमर्थ होईल - अनशनादिकं कुर्यात् - उपोषणादिक करावे. ॥ २३ ॥

आत्मनि अग्नीन् समारोप्य - आमच्या ठिकाणी अग्नीचा समारोप करून - अहंममात्मतां संन्यस्य - मी व माझे ह्या अहंकाराला सोडून - संघातं तु - देहरूपी संघाताला तर - कारणेषु यथार्हतः सम्यक् न्यसेत् - कारणांच्या ठिकाणी योग्य रीतीने नीटपणे ठेवावे. ॥ २४ ॥

आत्मवान् - ज्ञानी पुरुषाने - खानि खे - इंद्रियांची छीद्रे आकाशात - निःश्वासान् वायौ - श्वास वायूत - उष्माणं तेजसि - उष्णता तेजात - असृक्श्लेष्मपूयानि अप्सु - रक्त, कफ व पू उदकात - शेषं यथोद्भवं क्षितौ (न्यसेत्) - इतर राहिलेले जेथून उत्पन्न झाले त्या पृथ्वीत मिळवावे. ॥ २५ ॥

सवक्तव्यां वाचं अग्नौ - बोलण्याच्या विषयांसह वाणीला अग्नीमध्ये - गत्या पदानि वयसि - गतिसह पायांना विष्णुदेवतेत - रत्या उपस्थं प्रजापतौ (न्यसेत्) - रतीसह उपस्थ इंद्रियाला प्रजापतिदेवतेत लीन करावे. ॥ २६ ॥

पायुं विसर्गं च मृत्यौ - गुदेंद्रिय आणि मलविसर्ग ह्यांना मृत्यूदेवतेत - सनादेन श्रोत्रं दिक्षु - नादविषयांसह श्रोत्रेंद्रिय दिशांमध्ये - त्वचं स्पर्शं च अध्यात्मनि - आणि त्वचा व स्पर्श वायूंत - (एवं) - याप्रमाणे - यथास्थानं विनिर्दिशेत् - ज्याचा त्याचा ज्याच्या त्याच्या मूळ कारणात लय करावा. ॥ २७ ॥

राजन् - हे राजा - चक्षुषा रूपाणि ज्योतिषि - नेत्रासह रूपे तेजात - अभिनिवेशयेत् - प्रविष्ट करावी - प्रचेतसा जिह्वां अप्सु (न्यसेत्) - वरुणासह जिह्वेला उदकात लीन करावे - घ्रेयैः घ्राणं क्षितौ न्यसेत् - गंधांसह घ्राणेंद्रिय पृथ्वीत लीन करावे. ॥ २८ ॥

मनोरथैः मनः चंद्रे - मनोरथांसह मनाला चंद्रांत - बोध्यैः बुद्धिं - ज्ञेयविषयांसह बुद्धीला - परे कवौ - श्रेष्ठ कवि जो ब्रह्मदेव त्यामध्ये - यत् अहं ममता क्रिया - ज्यापासून अहंता ममता चालतात अशी - अध्यात्मना कर्माणि रुद्र - अहंकारासह कर्मे रुद्रदेवतेत मिळवावी - सत्त्वेन चित्तं क्षेत्रज्ञे - चेतनेसुद्धा चित्तक्षेत्रात - गुणैः वैकारिकं परे (न्यसेत्) - गुणांसह अहंकाराला परब्रह्मात लीन करावे. ॥ २९ ॥

क्षितिं अप्सु - पृथ्वीला उदकात - अपः ज्योतिषि - उदकाला तेजात - अदः वायौ - तेजाला वायूंत - अमुं नभसि - ह्या वायूला आकाशात - तत् कूटस्थे - त्या आकाशाला अहंकारात - तत् च अक्षरे (न्यसेत्) - आणि त्या प्रकृतीला अक्षर अशा परब्रह्मरूपी लीन करावे. ॥ ३० ॥

इति - याप्रमाणे - अवशेषितं चिन्मात्रं आत्मानं - उरलेल्या चैतन्यस्वरूप आत्म्याला - अक्षरतया ज्ञात्वा - नाश न पावणारा असे समजून - अथ - नंतर - अद्वयः सन् - दुजाभाव नसलेला असा होत्साता - दग्धयोनिः अनिलः इव - उत्पत्तिस्थान अशी काष्टे जळून गेलेल्या अग्नीप्रमाणे - विरमेत् - शांत व्हावे. ॥ ३१ ॥

सप्तमः स्कन्धः - अध्याय बारावा समाप्त

GO TOP