॥ आदिमहाराष्ट्रकवि व महासाधु श्रीमुकुंदरायकृत ॥

॥ विवेकसिंधु ॥

पूर्वार्ध

॥ प्रकरण १ ले ॥

॥ ब्रह्मस्वरूपसमावेश ॥

॥ श्रीगणेशाय नम: ॥






श्रीहरं जगदाधारमरविंदाक्षमक्षरं ॥
अभिवंद्यात्मविज्ञानोपदेशविधिरुच्यते ॥
जयजयाजी चंद्रमौळी ॥ मातें कृपादृष्टीं न्याहाळी ॥
मग पावेन न्याहाळी ॥ ब्रह्मसुखाची ॥ १ ॥
श्रीगणेशायनमः जगताला आधारभूत, कमलनयन, त्रिकालबाध्य व षड्‌गुणैश्वर्यसंपन्न असा हर जो त्यातें वंदन करून आत्मज्ञानोपदेशाचा विधि सांगतो. हे चंद्रमौले ! शंकरा ! आपला जयजयकार असो. प्रभो ! आपण मजकडे कृपादृष्टीने अवलोकन करा. म्हणजे मला ब्रह्मसुखाच्या अपूर्वाईचा लाभ होईल. १
तू निर्गुण निर्विकार ॥ निःसंगु निराकार ॥
तुझीया स्वरूपाचा पार ॥ नेणती ब्रह्मादिक ॥ २ ॥
महाराज ! आपण निर्गुण म्हणजे गुणरहित व निर्विकार म्हणजे षड्‌विकारांवेगळे आहांत. आपणांस कोणताच रंग आकार नाही; आणि आपल्या स्वरूपाचा तर बह्मादिकांना सुद्धा अंत नाही. २
तूं ब्रह्मरसाचा पुतळा ॥ कीं विश्वाचा जिव्हाळा ॥
जी सुखाच्या सुकाळा ॥ परमपुरुषा ॥ ३ ॥
हे परमपुरुषा ! तूं ब्रह्मरसाचा पुतळा, व विश्वाचा जिव्हाळा होय. महाराज ! आपण सुखाची लयलूट आहां. ३
तूं सच्चिदानंदतनू ॥ षड्भावविकारविहीनू ॥
स्वप्रकाशें प्रकाशमानू ॥ स्वसंवेद्यु ॥ ४ ॥
सत्, चित्, आनंद हेच आपले शरीर; व ते षड्भाव ( म्हणजे जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते व नश्यति,) हे सहा भाव आणि षड्‌विकार ( काम क्रोध मद मत्सरादि सहा मनोविकार) रहित आहे. आपण स्वयंतेजानेंच ( आत्मानुभवानेच) प्रकाशमान होणारे व आपणच आपणांस जाणणारे आहां ४
तुझा अनुग्रहो घडे ॥ तरीच मातें ज्ञान होय रोकडे ॥
स्वस्वरूप अनुभविजे फुडें ॥ स्वानुभवें ॥ ५ ॥
आपला कृपाप्रसाद झाला तरच मला रोखठोक ज्ञान प्राप्त होईल; खरे खरे स्वस्वरूप समजेल; व आत्मानुभव घडेल. ५
तरी माझें हृदयी बसावे ॥ प्रत्यक्ष वाचेतें चेतवावे ॥
जी स्वरूप बोलवावे ॥ मजकरवीं ॥ ६ ॥
तर महाराज ! आतां माझ्या हृदयांत वास करावा; प्रत्यक्ष वाणीला प्रेरणा द्यावी; आणि प्रभो ! मजकडून स्वस्वरूपाचे वर्णन करवावे. ६
तूं चतुर्विध वाचेतें ॥ प्रसवलासी निरुतें ॥
ऐसें जाणोनि जी तुमतें ॥ प्रार्थित असे ॥ ७ ॥
खरोखरी परा, पश्यंति, मध्यमा, व वैखरी ह्या चारी वाणींना आपण प्रसवलां आहां, आणि म्हणूनच मी आपल्यास ही प्रार्थना करीत आहें. ७
तुझेनि स्वरूपानुभवें ॥ म्यां कां निवांत बसावें ॥
परोपकारार्थ बोलावें ॥ हे तुझी इच्छा ॥ ८ ॥
प्रभो ! आपल्या स्वरूपाचा अनुभव घडल्यावर मग मीं तरी काय म्हणून स्वस्थ बसावे ? तर मीं परोपकारासाठी बोलावे, ही आपलीच इच्छा होय. ८
धालेपणाचे ढेंकर ॥ जेवीं देती जेवणार ॥
तैसे तुझिया स्वरूपाचे उद्गार ॥ बोलविसी मजकरवीं ॥ ९ ॥
तृप्तीचे चिन्ह म्हणून जेवणारे ढेंकर देतात, त्याचप्रमाणे हे आपल्या स्वरूपाचे बोलणे आपण मजकडून बोलवीत आहां. ९
या बोबडिया बोला ॥ श्रीचंद्रचूड संतोषला ॥
मग सौरसु पैं दिधला ॥ ग्रंथनिर्माणीं ॥ १० ॥
हे बोबडे भाषण ऐकून चंद्रचूड ( श्रीशंकर) प्रसन्न झाले व त्यांनीं ग्रंथ तयार करण्यासाठी प्रसाद दिला. १०
वेदशास्त्राचा मथितार्थू ॥ मराठिया होय फलितार्थू ॥
तरी चतुरीं परमार्थू ॥ कां न घ्यावा ॥ ११ ॥
वेदशास्त्राचा मथितार्थ जर मराठीत फलद्रूप होऊं लागला तर सुज्ञांनी त्या परमार्थाचा लाभ कां बरे न घ्यावा ? ११
चाड चातुर्यातें जिणें ॥ ऐसें बोलती शाहाणे ॥
तरी येथींचिये परमार्थखुणे ॥ ग्राहिक कां न व्हावें ॥ १२ ॥
शाहणे लोक 'अंगी पुष्कळसें चातुर्य असले तरच ते जिणें' असे म्हणतात. तर मग येथल्या परमार्थाच्या खुणेला गिर्‍हाईक कां बरे मिळू नये ? १२
जरी रुईचे झाडीं ॥ भरती मधाचिया कावडी ॥
तरी हिंडावयाची आवडी ॥ कां पडों द्यावी ॥ १३ ॥
अहो ! रुईच्या झाडालाच जर मधाच्या कावडीच्या कावडी भरता येऊं लागल्या तर मग ( उगाच) हिंडावयाची हौस तरी कशाला पाहिजे; १३
जरी हे अरुष पोल ॥ तरी रोकडे ब्रह्मज्ञान हें नवल ॥
तरी अवज्ञा कोण करील ॥ येथीवषयीं ॥ १४ ॥
तसेच, हे जरी आर्षपणाचें बोलणे आहे, तरी आश्चर्य हे की, हे प्रत्यक्ष ब्रह्मज्ञान आहे. मग याचा अनादर कोण बरे करील ? १४
ऊंस कीर दिसे काळा ॥ परी घे पैं रसाचा गळाळा ॥
तैसे अरुष बोल परी झळाळा ॥ दिसे विवेकाचा ॥ १५ ॥
ऊंस दिसण्यांत खरोखरी काळा दिसततो, पण त्यांत रस जसा डबडबलेला असतो, त्याचप्रमाणे माझे हे भाषण जरी आर्षपणाचे आहे तरी त्यांत विवेकाची झळाळ आहे. १५
नवरसांची उपलवण ॥ ते उघड वाचेसी नागवण ॥
म्हणोनि न प्रवर्तती शाहाणे ॥ तेथींच्याविषयीं ॥ १६ ॥
नवरसांचा विस्तार ही वाणीची उघड उघड फसवणूकच होय. म्हणून जे ज्ञाते आहेत ते त्यात प्रवृत्त होत नाहीत. १६
होय वक्ता नवरसांचा ॥ जरी चतुर अपाडाचा ॥
तथापि लाभ परमार्थाचा ॥ दया दुर्लभ कीं ॥ १७ ॥
नऊ रस ज्याच्या वाणीत घोळत आहेत, असा जरी अप्रतिम चतुर वक्ता असला तरी त्यास देखील परमार्थाचा लाभ म्हणून जो आहे तो दूरच ! १७
तैसी मायीक रसवृत्ती ॥ बोलतां अंगासी न ये महंती ॥
आणि परमार्थ संविती ॥ ते दूरि दुरावे ॥ १८॥
मायिक रस आणून बोलू लागल्याने कांहीं अंगांत साधुत्व बाणत नाही. आणि परमार्थज्ञान म्हणून जे आहे तेही पण त्यास दुरावते. १८
श्वपचाचिया घरींचा पाकु ॥ झाला आपाडें रसिकु ॥
तथापि सदाचार लोकू ॥ तया नातळती कीं ॥ १९ ॥
शूद्राच्या घरचा स्वयंपाक कितीही जरी उत्कृष्ट आणि स्वादिष्ट झाला तरी शिष्टसंभावित जे आहेत ते त्यास स्पर्श सुद्धां करीत नाहीत. १९
तैसे संसारिक बोलणें ॥ जैं न स्वीकारती शाहाणे ॥
तया अखंड अनुभवणें ॥ परमतत्त्व ॥ २० ॥
त्याप्रमाणे संसारिक बोलणे शहाणे लोक मनास आणीत नाहीत म्हणून त्यांस अखंड परमतत्त्वाचाच अनुभव पाहिजे असतो. २०
जेथें ब्रह्मरसाचीगोडी ॥ अखंड अनुभविजे फुडी ॥
त्या बोलाची आवडी ॥ साधुजनासी ॥ २१ ॥
जेथे खरोखरी ब्रह्मरसाचीच गोडी अखंड चाखावयास मिळते, अशा भाषणाचीच साधुजनांना आवड असते. २१
म्हणोनि विवेकसिंधुनांवें ॥ ग्रंथु कीजेल शुद्धभावें ॥
तया अवधान करावें ॥ म्हणे मुकुंदराजु ॥ २२ ॥
म्हणून विवेकसिंधु ह्या नांवाचा ग्रंथ अत्यंत शुद्धभावानें करण्यांत येईल. मुकुंदराज म्हणतात, तिकडे अवधान असावे. २२
गुरुशिष्याचेनि संवादें ॥ जैं बोलिजेल विनोदें ॥
तैं आईक आनंदे ॥ महानुरभाव ॥ २३ ॥
गुरुशिष्यांची संवादरूपाने जेव्हां विनोदपर भाषणे होतील तेव्हा हे महानुभाव ! ( जयत्‌पाळ राजाचे विशेषण) ती तूं मोठ्या आनंदाने श्रवण कर. २३
कल्पतरूचेनि पाडें ॥ जरी फळती घरची झाडें ॥
तरी तियें आवडीचेनि कोडें ॥ न लावावी कां ॥ २४ ॥
कल्पतरूच्या बरोबरीने जर घरची झाडे फलद्रूप होऊं लागली तर ती अगदी जि.वाच्या हौसेने लावूं नयेत काय ? २४
देशी हो का मराठी ॥ परी उपनिषदाचीच राहटी ॥
तरी हा अर्थू जिवाचिया गांठीं ॥ कां न बांधावा ॥ २५ ॥
तसेच देशी असो की मराठी असो, परंतु त्यात जर उपनिषदांचाच क्रम आहे, तर हा अर्थ जिवाच्या गांठीस कां बरें बांधू नये ? २५
आइते शिष्याचे आक्षेप ॥ सिद्धचि गुरुवाक्यदीप ॥
जेणें संशयतमाचे विक्षेप ॥ फिटती श्रोतियांचे ॥ २६ ॥
सहजच शिष्यांच्या शंका आणि त्यावर गुरुवाक्याचा दीप सिद्धच आहे. तेणेकरून श्रोत्यांस जे संशयरूप निबिड अंधकाराचे मध्येच खो येतात, ते नाश पावतील. २६
हा ग्रंथू विचारितां ॥ नाही ज्ञानाची दुर्लभता ॥
आणि मुक्तिसायुज्यता ॥ बोधेंचि ओळंघे ॥ २७ ॥
ह्या ग्रंथाचें मनन केलें तर ज्ञान अगदीं सहज मिळते; आणि नुसत्या बोधानेच सायुज्यमुक्ति चालत येते. २७
याच देहीं आपुले डोळा ॥ जंव न भोगिजे मुक्तीचा सोहळा ॥
तरी वैराग्याच्या तातवेळा ॥ कां शिणावें ॥ २८ ॥
ह्याच देहामध्ये (जन्मामध्ये) आपल्या डोळ्यांनी जर मुक्तीचा सोहळा पाहिला नाही तर वैराग्याच्या कडकडीतपणानें रिकामा शीण तरी कां करून यावा ? २८
देहपातानंतरें ॥ मुक्ती पाविजेल ये उत्तरें ॥
साप मानावीं चतुरें ॥ काय म्हणोनी ॥ २९ ॥
देह पडल्यानंतर म्हणे मुक्ति मिळेल. शहाणे जे आहेत, त्यांना हे उत्तर काय म्हणून खरे मानावे ? २९
मरणानंतरें मुक्ती ॥ येथविषयीं कवण उपपत्ती ॥
ऐसा आक्षेपीं पाय सेविती ॥ निजगुरूचे ॥ ३० ॥
मेल्यामागे मुक्ति मिळेल, ह्याला पुरावा काय ? अशी शंका काढून श्रीगुरूंच्या पायांची सेवा करूं लागतात. ३०
स्थूळदेह निमेल ॥ मागुतीं मनुष्यदेह पाविजेल ॥
या वाक्या विश्वासल ॥ ऐसा कवण असे ॥ ३१ ॥
हा जडदेह पडेल व फिरून मनुष्यदेह प्राप्त होईल, ह्या बोलण्यावर भरंवसा ठेवील, असा कोण बरे मिळेल ? ३१
खंडज्ञान उपदेशिती ॥ मोक्ष उधारें बोलती ॥
त्याच्या युक्ती झकविती ॥ ते हीन विवेकी ॥ ३२ ॥
नाशिवंत ज्ञानाचा उपदेश करतात, मोक्षाचें तर उधारीने वर्णन करितात. अशांच्या कल्पनांनीं चकून जातात ते हीन व अविवेकी होत. ३२
ऐशियांचेनि उपदेशें ॥ कैसेनि संसार निरसे ॥
म्हणोनि वायांचि वायवसे ॥ नाना मतें ॥ ३३ ॥
अशांच्या उपदेशाने संसारनिरास तो काय होणार ? म्हणून निरनिराळ्या प्रकारची मते हे निव्वळ वायचाळे होत. ३३
आपुलिया ज्ञानदृष्टी ॥ अपरोक्ष वस्तूसी नाहीं भेटी ॥
त्या वेडियाच्या गोठी ॥ काय काज ॥ ३४ ॥
ज्याच्या स्वतःच्याच ज्ञानदृष्टीला अपरोक्ष वस्तूची (ब्रह्माची) भेट झाली नाही, त्या खुळ्याच्या गोष्टी काय बरे कामाच्या ? ३४
म्हणोनि सद्‌गुरूचीं पाउलें ॥ जिहीं साचारपणे धरिलें ॥
तेचि पैलपार पावले ॥ भवसागराच्या ॥ ३५ ॥
म्हणून ज्यांनीं अगदी मनोभावाने सद्‌गुरूचीं पाउले धरिलीं, तेच वा संसारसमुद्राच्या पैलथडीला जाऊन पोचले. ३५
सद्‌गुरूचीं लक्षणे ॥ बोलती वेद शास्त्रें पुराणें ॥
तीं जाणोनियां शाहाणे ॥ अनुसरती ॥ ३६ ॥
वेदांत, शास्त्रांत, व पुराणांत सद्‌गुरूचीं लक्षणे सांगितलेली आहेत, ती समजून घेऊन सहाणे लोक त्यांसच अनुसरतात. ३६
जे संसारासी वेगळे ॥ ज्ञानवैराग्यें आगळे ॥
ब्रह्मरसस्वादा आनंदले ॥ ते सद्‌गरु जाणावे ॥ ३७ ॥
जे संसारापासून अलिप्त, ज्ञान व वैराग्य यांनी अलंकृत, आणि ब्रह्मरसाच्या गोडींतच जे रंगून गेलेले, ते सद्‌गुरु होत. ३७
कामक्रोधाचेनि विटाळें ॥ जयांचे चित्त नामळे ॥
त्या निरंतर सोहळे ॥ ब्रह्मसुखाचे ॥ ३८ ॥
कामक्रोधांच्या विटाळाने ज्यांच्या मनास विटाळ झालेला नाही; ज्यांस सदान्‌कदा बससुखाचेच सोहळे पहावयास मिळतात. ३८
विषयसुखाचे डोहळे ॥ मनीं नुपजती कवणे वेळे ॥
जयांचें चित्त नुचंबळे ॥ हर्षविषादीं ॥ ३५ ॥
ज्यांच्या मनास विषयसुखाचे डोहाळे खणून कदाकाळीही शिवत नाहीत; आनंदाना प्रसंग येतो, की दुःखाचा मसंग येतो, तरी ज्यांच्या चित्तावर एकही लहर उठत नाही. ३९
ब्रह्मादि पिपीलिकांतीं ॥ सकल भूतजातीं ॥
जयांची चित्तवृत्ति ॥ न धरी विषय भावातें ॥ ४० ॥
मुंगीपासून तो ब्रह्मादिकांपर्यंत सर्व भूतजातांच्या ठिकाणी ज्यांची चितवृत्ति अगदी सारखी; ४०
आपपरू हे कडसणी ॥ आणीक नाहीं खोडी कवणी ॥
प्रपंचाचिया विणावणी ॥ नांदे परमार्थुचि ॥ ४१ ॥
हा आपला व हा दुसरा हा जेथे भेदभाव नाही; किंवा ज्यांच्या मनाला दुसरी कसलीही खोडी नाही; जेथे प्रपंचाच्या यातायातीत सुद्धां परमार्थच नांदत आहे, ४१
जे ब्रह्मानंदें डुल्लती ॥ करून कांहींच न करिती ॥
जे दुराग्रही नव्हती ॥ कवणेविषयीं ॥ ४२ ॥
जे ब्रह्मानंदांतच डुलत राहिलेले. सर्व कांही करून जे कांहींच करीत नाहीत. ज्यांस कसलाही दुराग्रह नाही; ४२
करिती सत्कर्में कोडें ॥ परी स्वस्वरूपस्थिति न मोडे ॥
जया स्वानंद ओसंडे ॥ सर्व इंद्रियद्वारें ॥ ४३ ॥
सत्कमें तर हौसेनें आचरण करितात, परंतु ज्यांची स्वस्वरूपस्थिति कायमची कायमच; स्वानंद हा ज्यांच्या सर्व इंद्रियांतून ओतप्रोत भरून चाललेला असतो. ४३
विधिनिषेधांतें करिती ॥ परी विधिनिषेधें न लिंपती ॥
असुळविसुळ न होती ॥ ब्रह्मसंविती स्फुरे म्हणोनी ॥ ४४ ॥
विधिनिषेधाचें आचरण करितात, पण त्यांनीं लिप्त मात्र होत नाहीत; अंतरांत ब्रह्मज्ञानाचे स्फुरण असतें, म्हणून जे अस्ताव्यस्त नसतात. ४४
त्यजित असतां नाही त्यागू ॥ भोगित असतां नाहीं भोगू ॥
नवल हा ज्ञानयोगू ॥ जेथे नांदतसे ॥ ४५ ॥
त्याग करीत असतां अत्याग व भोग भोगीत असतां अभोग होतो. हा ज्ञानयोग जेथे नांदत असतो, तेथे हे एक आश्चर्यच आहे. ४५
निपजती इंद्रियांचे व्यापारु ॥ परी अकर्तृत्वीं चतुरू ॥
ब्रह्मविद्या देतां उदारू ॥ जे अतिपाडाचे ॥ ४६ ॥
इंद्रियांचे व्यापार अर्थात् कर्तृत्व सुरू असतात पण इतके असूनही जे अकर्तृत्वांत चतुर; आणि ब्रह्मविद्या देऊं लागले म्हणजे तर उदार एवढे की त्यांस अगदी सीमा नाही. ४६
जे अवस्थात्रयीं अगाध ॥ जयासी अखंड स्वरूपावोध ॥
ते अमूर्त परमानंद ॥ येणें आकारें ॥ ४७ ॥
जे तिन्ही अवस्थांमध्ये अगाध; ज्यांस सदोदित स्वरूपाचा वेध लागलेला; ते ह्या आकाराने अर्थात् मनुष्य देहाने अमूर्त अर्थात् निराकार परमानंदच होत. ४७
निमिषोन्मेषाचा व्यापारू ॥ ज्यांसी करितां शिण थोरू ॥
ते योगींद्र जाणावे सद्‌गुरू ॥ कैवल्यदानी ॥ ४८ ॥
निमिषउन्मेषाचे व्यापार अर्थात् कर्मे करतांना ज्यांना अत्यंत शीण वाटतो, तेच मोक्षदाते योगिराज सद्‌गुरु होत. ४८
जे अंतरींच निवाले ॥ आठवितांही भागले ॥
विसराही विसरले ॥ स्वस्वरूप जे ॥ ४९ ॥
जे अंतःकरणांतच समाधान पावलेले, आठवणीचाही ज्यांस शीण होतो; जे विसरालाही विसरलेले, जे मूर्तिमंत स्वस्वरूपच; ४९
इहीं लक्षणीं अलंकृत ॥ जे देखिजेती महंत ॥
तेचि सद्‌गुरू जाणावे निश्चित ॥ ईश्वरी अवतार ॥ ५० ॥
अशा अशा लक्षणांनी भूषणभूत झालेले ज कोणी महंत आढळून येतील तेच निश्वयेंकरून सद्‌गुरू ईश्वरी अवतार समजावे. ५०
सांगितले विशेपगुण॥ हें सदगुरूचें लक्षण ॥
आतां शिष्याचें परीक्षण ॥ निपजेल ॥ ५१ ॥
वर सांगितलेले विशेष गुण हेंच सद्‌गुरूचें लक्षण होय. आतां, शिष्यांची परीक्षा कशी होईल तें सांगण्यांत येईल. ५१
न व्हावा आळसी निष्ठुर ॥ आणि स्वकार्यतत्पर ॥
गुरुदास्याविषयीं कातर ॥ तो शिष्य न करावा ॥ ५२
तो आळशी व निष्ठूर नसावा. तसेंच स्वार्थपरायण, गुरुसेवेला अंग चोरणारा असा शिष्य करूं नये. ५२
जारणमारणविध्वंसन ॥ स्तंभन मोहन वशीकरण ॥
उचाटण हे सप्तविध लक्षण ॥ करिती ते शिष्य त्यजावे ॥ ५३ ॥
जारण, मारण, विध्वंसन, स्थंभन, मोहन, वशीकरण, व उच्चारण ही सात लक्षणे ज्यांच्या कडून होतात ते शिष्य सोडून द्यावे. ५३
जे विषयरसीं आसक्त ॥ अथवा अहंकारें गर्वित ॥
ज्यांसी पाषांडाची संगत ॥ ते शिष्य न करावे ॥ ५४ ॥
जे विषयरसाला आसक्त, मीपणाने फुगलेले व ज्यांस पाखांडाची संगत लागलेली आहे, असे शिष्य करूं नयेत. ५४
जो निंदकू नास्तिकू ॥ ज्ञानचोर चुंबकू ॥
विना काजेंवीण वादकू ॥ तोही शिष्य वर्जिजे ॥ ५५ ॥
जो निंदक, नास्तिक, ज्ञान चोरणारा व कृपण, विनाकारण वाद घालणारा, असा शिष्यही वर्ज्य करावा. ५५
प्रगटावया आपुली महंती ॥ सभेमाजी गुरूतें आक्षेपिती ॥
युक्ती खुंटलीया बळासि येती ॥ तेही शिष्य त्यजावे ॥ ५६ ॥
आपला मोठेपणा लोकांस दिसावा म्हणून भरसभेत गुरूच्या भाषणावर आक्षेप काढावयाचे, आणि कांहीं सुचेनासें झालें म्हणजे मग हमरीतुमरीवर यावयाचे. असल्या शिष्यांचाही त्याग करावा. ५६
ज देखती प्राकृतदृष्टी ॥ गुरूसी करिती तोंडपिटी ॥
ब्रह्मविद्येची गोष्टी ॥ त्यांसी कायसी ॥ ५७ ॥
जे गुरूला प्राकृतदृष्टीनें पाहतात - अर्थात, साधारण लेखतात, व त्यांशी तोंडपिटी करीत बसतात, त्यांस ब्रह्मविद्येच्या गोष्टी काय होत ५७
न होतां अंतःकरणशुद्धी ॥ जरी मयोजिजे आत्मबुद्धी ॥
तरी तयासी नाहीं ज्ञानसिदी ॥ अपरोक्ष जे ॥ ५८ ॥
चित शुद्ध झालें नसतांना जर आत्मबुद्धीचा योग करूं लागले तर अपरोक्ष ज्ञान म्हणून जें आहे. त्याची सिद्धी होणार नाही. ५८
जें संसाराचे निराळे ॥ ज्ञानवैराग्याचेनि बळें ॥
सर्वदोषांसी वेगळे ॥ ते सच्छिष्य जाणारे ॥ ५९ ॥
जे संसारास न चिकटलेले आणि ज्ञान व वैराग्य ह्यांच्या योगाने सकल दोषांपासून मुक्त झालेले, तेच सच्छिष्य म्हणून समजावे. ५९
जे शुद्ध अंतःकरणीं विरक्त ॥ सत्यवादी दृढव्रत ॥
निस्सीम गुरुभक्त ॥ अनन्यभावीं ॥ ६० ॥
जे शुद्ध अंतःकरणाचे, विरक्त, सत्यवादी, दृढनिश्चयी, अनन्यभावेंकरून निस्सीम गुरुभक्त झालेले; ६०
जे वित्तशाठ्य न करिती ॥ आपणातेंही न वंचिती ॥
आणीक परदैवत नेणती ॥ श्रीगुरुवांचुनी ॥ ६१ ॥
जे द्रव्याचा अपहार करीत नाहीत, व आत्मघातही करून घेत नाहीत, व ज्यांना सद्‌गुरुवांचून श्रेष्ठ दैवतच माहीत नाही; ६१
जे उदार मनाचे ॥ साचार भावाचे ॥
वांटेकर मुक्तीचे ॥ ते सच्छिष्य जाणावे ॥ ६२ ॥
जे मनाचे उदार; खर्‍याखु‍र्‍या भक्तीचे; व मुक्तीचे वाटेकरी - अर्थात् मुमुक्षु असतील तेच सच्छिष्य होत; ६२
या सानुरागा शिष्यातें ॥ स्वीकारावे श्रीगुरुनाथें ॥
ज्ञान उपदेशाचें निरुतें ॥ पात्रभूता ॥ ६३ ॥
अशा शिष्याला श्रीगुरुनाथांनीं मोठ्या प्रेमाने पदरी घ्यावे. आणि असा सत्पात्रास खरे खरे ज्ञान सांगावे. ६३
ते ब्रह्मरसाची मूस ॥ ज्ञानरत्‍नांची मांदुस ॥
गुरुसी उपजे भडस ॥ उपदशाविषयीं ॥ ६४ ॥
असा शिष्य म्हणजे ब्रह्मरसाची मूस किंवा ज्ञानरूप रत्‍नांची पेटीच होय. त्यास पाहतांच गुरूच्या पोटांत उपदेशाचा उमाळाच येऊ लागतो. ६४
परिसाचे सन्निधाने ॥ अष्टधातू होय सोनें ॥
तैसें शिष्यांसी ब्रह्म होणें ॥ तत्क्षणीं ॥ ६५ ॥
परिसाच्या सान्निध्यानें ज्याप्रमाणे अष्टधातूचे सोने होते, त्याप्रमाणे शिष्य तात्काळ ब्रह्मस्वरूप होतो. ६५
तेथें गुरूसी नलगे सायासु ॥ करितां ज्ञानउपदेशू ॥
आत्मा स्वयंप्रकाशु ॥ तया तत्क्षणेंची ॥ ६६ ॥
तेथे ज्ञानोपदेश करितांना गुरूला कांहींच श्रम पडत नाही. तेथें तात्काळ आत्मा स्वयंप्रकाशमान होतो. ६६
असंत शिष्य बोलिले ॥ तेही जर मुमुक्षु झाले ॥
तरी तेही म्हणावे आपुले ॥ श्रीगुरुनाथें ॥ ६७ ॥
असंत शिष्य म्हटले तरी ते जर मुमुक्षु झाले तर त्यांस देखील श्रीगुरुनाथांनी आपलेसे म्हटले पाहिजे. ६७
मंत्रादि साधनें उपदेशें ॥ अष्टांगयोगयोगाभ्यासें ॥
चित्त निर्मळ होय आपैसें ॥ तयांचेंही ॥ ६८ ॥
मंत्रादि साधनांनी, लपदेशासाने, अष्टांगयोगाच्या अभ्यासाने, तशांचेंही मन आपोआप पवित्र होते. ६८
नातरी गुरुदास करितां ॥ जळती चित्तमैल सर्वथा ॥
होय ज्ञानप्राप्ति त्वरिता ॥ श्रीगुरूचेनि प्रसादें ॥ ६९ ॥
किंवा गुरुसेवा करतां करतां मनाचे खळमळ निःशेष जळून जातात. आणि श्रीगुरूंच्या कृपाप्रसादाने ताबडतोब ज्ञानप्राति होते. ६९
अष्टधातू परिसीं लागले ॥ ते तत्क्षणीं कनक झाले ॥
अवघातु म्हणोनि सांडिले ॥ पाषाणजात ॥ ७० ॥
तेही जरी चूर्ण कीजे ॥ अग्निसंगें लोह निपजे ॥
तेणेंही सुवर्ण होइजे ॥ परिससन्निधीं ॥ ७१ ॥
अष्टधातु परिसास लागले तर त्यांचे तात्काळ सोने होते. पाषाणजात व अवधातु म्हणून टाकून दिले तरी देखील त्यांचें चूर्ण करावे. म्हणजे विस्तवाच्या योगाने त्यांतून लोह उत्पन्न होते. तेंही परिसाच्या योगाने सोने बनते. ७०,७१
तैसे वैराग्यवन्ही तापले ॥ ज्ञानाधिकारा पातले ॥
अवधातुही ब्रह्म जाहले ॥ गुरुचरणप्रसादे ॥ ७२ ॥
त्याचप्रमाणे जे वैराग्याच्या अग्नींत तावून निघाले व ज्ञानाधिकारास पात्र झाले, त्यांचे गुरूच्या पायांच्या प्रसादाने अष्टधातुही ब्रह्मस्वरूपच होऊन जातात. ७२
गुरूचें पहातां महिमान ॥ परिस दिसे ठेंगण ॥
तो लोहातें करी सुवर्ण ॥ परी तो परिस नव्हे ॥ ७३ ॥
गुरूचा महिमा पाहूं गेलें तर परीसही त्याच्या पुढे फिका पडतो ! तो लोखंडाचे सोने करतो खरा; पण ते कांही परीस होत नाही. ७३
पीरसासन्निध वेधलें ॥ लोह सुवर्ण होवोनि राहिलें ॥
तेथें अन्य लोह लागले ॥ तें कनक नव्हे ॥ ७४ ॥
बरे दुसरी गोष्ट, जे परिसालाच चिकटलेले असते तेवढ्याच लोखंडाचे सोने बनून राहते. पण तेथें जर दुसरे लोखंड आणून ठेवलें तर त्याचे कांहीं सोने होत नाही. ७४
तैसा नव्हे गुरुकृपेचा बोधू ॥ जो सद्य: स्वरूपावबोधू ॥
शिष्यचि ब्रह्म होय हा विनोदू ॥ नवल तेथिचा ॥ ॥ ७५ ॥
सद्‌गुरुकृपेच्या बोधाची तशी गोष्ट नाही. तो तात्काळ स्वरूपाचेच ज्ञान, अनुभव - करून देतो. इतकेच नव्हे, तर तेथची अशी कांहीं विलक्षण मौज आहे की, तो शिष्यच तात्काळ ब्रह्म होऊन बसतो. ७५
कल्पतरूची उपमा द्यावी ॥ तो कल्पिलिया अर्थातें पुरवी ॥
कल्पनातीत भेटवी ॥ श्रीगुरुनाथ ॥ ७६ ॥
सद्‌गुरूला कल्पवृक्षाची उपमा द्यावी तर तो मनांत जो अर्थ कल्पावा तोच अर्थ पुरविणारा. पण श्रीसद्‌गुरुनाथ कल्पनातीत कल्पनेच्या बाहेरचीही वस्तु पुरवितात. ७६
जननी आणि जनकें ॥ तिये संसारदायिकें ॥
परी नव्हेति भववंध छेदके ॥ श्रीगुरूवांचोनी ॥ ७७ ॥
आईबाप ही नुसती संसार मागे लावून देणारी असतात. परंतु ती कांहीं संसारबंधन तोडणरि नव्हेत. असे श्रीगुरुवांचून दुसरे कोण आहे ? ७७
कामधेनु आणि चिंतामणी ॥ हींही पुरवूं न सकती ऐणी ॥
चिंतिलिया अर्थाचीं दानी ॥ म्हणोनियां ॥ ७८॥
आतां चिंतामणी आणि कामधनु घेऊं. तर ती देखील जो अर्थ चिंतावा तेवढेच देणारी. पण ब्रह्माची आर्ति कांहीं त्यांच्याने पुरविणे होणार नाही. ७८
जें चिंतनासी अचिंत्य ॥ सकळ कल्पनेविरहीत ॥
ते ब्रह्म निजानंदभरित ॥ हे देता श्रीगुरुनाथ ॥ ७९ ॥
तर जें चिंतनास सुद्धां अचिंत्य, सर्व कल्पनारहित, तें निजानंदानें परिपूर्ण असें ब्रह्म प्राप्त करून देणारा एक श्रीगुरुनाथच होय. ७९
म्हणोनि श्रीगुरूसी उपमा ॥ द्यावी ऐसी कवणासी असे महिमा ॥
प्रपंच होय परब्रह्मा ॥ प्रसादे जयाचेनी ॥ ८० ॥
म्हणून श्रीगुरूला उपमा द्यावी, अशी थोरवी कशामध्ये आहे ? ज्यांच्या प्रसादाने प्रपंचच परब्रह्मस्वरूप होतो. ८०
परोपकाराचेनि संतोषें ॥ पात्र कुपात्र ऐसें नोळखें ॥
गुरुमेघ सर्वत्र वरुखे ॥ उदारपणे ॥ ८१ ॥
परोपकाराचा आनंद इतका की, तेथे पात्र व अपात्र हा प्रश्नच नाही. हा सद्‌गुरु मेघ सर्वांवर सारखाच उदारपणानें वर्षाव करितो. ( येथे मेघाची उपमा फारच समर्पक आहे.) ८१
तथापि पात्रताविज्ञेषें ॥ स्थिर होय सखोल भूमिके ॥
थेंबु न राहे उटंके ॥ जाय निरसोनि ॥ ८२ ॥
तथापि पात्रताविशेषाप्रमाणें खोल जमीन असली म्हणजे तवे जल स्थिर व्हावयाचे, आणि उथळ जमिनीवर एक थेंब सुद्धां रहावयाचा नाही. ८२
तैसें पात्रतेवीण ॥ स्थिरूं न शके ब्रह्मज्ञान ॥
येथें जो दृष्टांत सांगेन ॥ तो अवधारिजे ॥ ८३ ॥
त्याचप्रमाणे पात्रतेशिवाय ब्रह्मज्ञानही स्थिरावत नाहीं. ह्यावर एक दृष्टांत सांगतो, तो ऐकावा. ८३
जैसे पुत्र विटाळले ॥ ते पितृधनासी मुकले ॥
शुद झालिया भाग पावले ॥ जयापरी ॥ ८४ ॥
ज्याप्रमाणे विटाळलेले, अष्ट झालेले ( रीतीप्रमाणे लग्नसंबंध न होतां झालेले) जे पुत्र असतात, ते पितधनास (वारसदारीच्या धनास) अंतरतात (त्यांस वारसाचा हक्कच पोचत नाही ), आणि तेच शुद्ध (विवाहित स्त्रीच्या पोटचे) असले तर त्यांस पितधनाचा वांटा मिळतो (हक्कानेच मिळतो.) ८४
तैसे निजजनक ईश्वराचे ॥ त्यासी ब्रह्मचि धन साचें ॥
शुद्ध जीव विभागी येथींचे ॥ तदैव म्हणोनी ॥ ८५ ॥
त्याप्रमाणेंच आपणा सर्वीचा पिता जो ईश्वर त्याचे ब्रह्म हेच खरोखरी धन आहे. शुद्ध जीव जे आहेत, ते त्याचेच अंश होत. म्हणून तेच त्या धनाचे वाटेकरी होतात. ८५
जननीजनकें ॥ तियें संसारदायकें ॥
नव्हेति बंधविच्छेदकें ॥ श्रीगुरुवांचोनी ॥ ८६ ॥
मातापितरे बिचारी काय देणार तर संसार ! ती बंधनें कां नाहीसे करतील ? छे ! असा (संसारबंधन सोडणारा) एक श्रीसद्‌गुरूच. ८६
चित्तासी पडे विषयसंगू ॥ तंव जीवासी कैचा ज्ञानधनभागू ॥
म्हणोनि आम्ही हा प्रसंगु ॥ आदरिला ॥ ८७ ॥
चित्ताला जीवत्‌लपर्यंत विषयाचा संग आहे, तावत्- कालपर्यंत ब्रह्मज्ञानधनाचा वाटा जिवास मिळण्याचे नांव कशाला ? म्हणूनच हा प्रसंग (भाषणाचा ओघ) आम्ही आ- णला आहे. ८७
शिष्याचे गुणदोष लक्षण ॥ संक्षेपे केले कथन ॥
आतां कीजेल अनुसंधान ॥ पुढलिया कथेचे ॥ ८८ ॥
शिष्याचे गुणदोष कसे असतात ते येथपर्यंत थोडक्यांत सांगितले. आतां पुढील कथेचे अनुसंधान करण्यांत येईल. ८८
शिष्य तापत्रयीं संतप्त ॥ शमदमादि साधनसंयुक्त ॥
गुरूतें शरणागत ॥ विनवीतसे ॥ ८९ ॥
शिष्य त्रिविध तापाने तापून जाऊन, शमदमनादि साधनांनी युक्त होत्साता गुरूस शरण गेला व विनवण्या करूं लागला. ८९
जी मी संसारसागरीं बुडालों ॥ तापत्रय वडवाग्नीनें पोळलों ॥
क्रोधादि जळचरीं विसंचलों ॥ जालों मी अति अशौच ॥ ९० ॥
महाराज ! मी ह्या संसारसमुद्रांत बुडालो, त्रिविधतापांच्या वडवाग्नीने होरपळललो, क्रोधादिक जलचरांनी माझी पाठ पुरविली, मी अगदीं हीन केवळ पतित होऊन बसलों. ९०
तरी ज्ञानाच्या तारुवीं बैसउनी ॥ कृपेचा सुवायु पेलूनी ॥
देवेंचि तारक हो‍उनी ॥ तारावें मातें ॥ ९१ ॥
तर महाराज, ज्ञानाच्या जहाजावर घेऊन कृपेचा अनुकूल वारा सोडून, गुरुदेवांनीच तारक--नावाडी--होम माझा उद्धार करावा. ९१
भवरोग मध्यान्हतातवेळे ॥ तापलों तापत्रय दावानळें ॥
जी कृपाजळधरा ज्ञानजळें ॥ निववावें माते ॥ ९२ ॥
भवरोगरूपी भर दोन प्रहरच्या रखरखीत उन्हांत, तापत्रयाच्या वणव्याने पोळून गेलो. तर महाराज, हे दयेच्या मेघा (सद्‌गुरो) ज्ञानजलाचा वर्षाव करून माझा दाह शांत करावा. ९२
संसाराचिया बंदिशाळें ॥ बांधलों अज्ञान शृंखले ॥
ते बंधन तोडावे स्वामि सळें ॥ ज्ञानशस्त्रें करूनी ॥ ९३ ॥
संसाराच्या कैदखान्यांत, अज्ञानरूप साखळदंडानें जखडून गेलो ! तर महाराज ! स्वामींनी हा माझा खोडा ज्ञानरूप शस्त्राने सत्वर तोडून टाकावा. ९३
पैसी कृपा उपजउनी ॥ विनवी शिष्यशिरोमणी ॥
मस्तक श्रीगुरूच्या चरणीं ॥ न्यासिता झाला ॥ ९४ ॥
त्याप्रमाणें करुणा भाकून, शिष्य शिरोमणी प्रार्थना करूं लागला, आणि त्यानें श्रीगुरुचरणीं मस्तक ठेवले. ९४
तंव बोलिला श्रीगुरुराजा ॥ बारे तूं शिणलासी कवण काजा ॥
कैसें बंधन तोडिजेल वोजा ॥ पाहें पां रोकडेंची ॥ ९५ ॥
तेव्हां श्रीगुरुराज म्हणाले - बरें तूं इतका कशासाठी कष्टी झाला आहेस ? बाबारे ! आतांच्या आतां तुझे बंधन कसे तोडून टाकतो ते प्रत्यक्षच पहा म्हणजे झाले. ९५
ऐसी प्रतिज्ञा स्वीकारुनी ॥ शिष्यातें सन्मुख बैसउनी ॥
आज्ञासमावेश करुनी ॥ गुरुसंप्रदायकमे ॥ ९६ ॥
अशी प्रतिज्ञा करून शिष्याला सन्मुख बसवून गुरुसांप्रदायाच्या पद्धतीप्रमाणे आज्ञासमावेश अनुग्रह करून गुरुआज्ञेचा समावेश मंत्रदीक्षा केली ( ?) ९६
तेथें ज्ञानशक्तीचा प्रवेशु ॥ अज्ञानशक्तीचा निरासु ॥
बोध उठिला स्वयंप्रकाशु ॥ शिष्यचैतन्यीं ॥ ९७ ॥
तो तेथें ज्ञानशक्तीचा शिरकाव होऊन अज्ञानकशक्ति अस्तास गेली; आणि शिष्याच्या चैतन्यांत स्वयंप्रकाश स्वरूपानुभव एकदम प्रगट झाला. ९७
ते वेळीं कंपस्वेदादिक ॥ उठिले भाव सात्विक ॥
जैसे साम्राज्यातें पावे रंक ॥ तसे वर्ततें जाहले ॥ ॥ ९८ ॥
त्यावेळी कशी अवस्था झाली म्हणून सांगावी ? कंप, स्वेद (घाम) आदिकरून आठही सात्विक भाव एकदम उठावले आणि एखाद्या दरिद्याला एकदम सार्वभौम राज्य प्राप्त व्हावें, तशी अवस्था झाली. ९८
या नांव शक्तिपात बोलिजे ॥ स्वानुभवें अनुभविजे ॥
तेथें निःशेष विसरिजे ॥ संसारस्मरणादिक हें ॥ ९९ ॥
ह्यालाच 'शक्तिपात' असे नांव आहे. तो स्वानुभवानें जाणला पाहिजे. तेथे संसाराचे स्मरण वगैरेंचे पार नांव नाहीसं होतें ! ९९
तंव आनंदाचा पुरु ॥ आला शिष्यसरितेसि थोरु ॥
तेथे अविवेक पव्हणारु ॥ बुडोनि जाय ॥ १०० ॥
तेव्हां शिष्यरूप नदीला आनंदाचा अपरंपार पूर लोटला. तेथे पोहणारा विचारशील नसेल तर तात्काळ बुडूनच जावयाचा ! १००
अहंकारद्रुम उन्मळिला ॥ तृष्णापक्षिणीचा कुरठा मोडिला ॥
इंद्रियग्राम बुडाला ॥ तिय आनंदजळीं ॥ १०१ ॥
त्या पुराच्या सपाट्यांत) अहंकाररूप वृक्ष उन्मळून पडला; तृष्णा वासनारूप पक्षिणीचे घरटे उध्द्धस्त झालें; आणि ते जे आनंदाचे अपरंपार पाणी आले त्यांत इंद्रियांच्या गांवाला तर जलसमाधीच मिळाली. १०१
ऐशिया सुखाचे शेजारीं ॥ तेथे स्वानुभुती अंतुरी ॥
तिया आलिंगिला सुंदरी ॥ तो योगिराज ॥ १०२ ॥
अशा प्रकारच्या सुखाच्या शय्येवर, तेथें स्वानुभूतिरूप स्त्री होती - त्या सुंदरीने त्या योगिष्रेष्ठाशाला आलिंगन दिले. १०२
तियेचेनि अंगमेळें ॥ तुटती विषयांचे डोहळे ॥
तेथें असिजे केवळें ॥ स्वस्वरूपीं ॥ १०३ ॥
तिच्या अंगसंगानें विषयाचे डोहाळे होतच नाहीत. तेथे केवळ स्वरूपांतच निमग्न असावे. १०३
स्वरूपसुखाचेनि भरे ॥ जेथें कांहीच न स्मरे ॥
ते योगनिद्रा न संचरे ॥ तया योगिराजासी ॥ १०४ ॥
त्या स्वरूपसुखाच्या भरांत जेथे सर्वच गोष्टींचा विसर पडतो, अशी जी योगनिद्रा, ती त्या योगिश्रेष्ठावर अंमल बसवूं शकत नाही. १०४
तेथें नेणीव ना जाणीव ॥ सरले भावाभाव ॥
तेथें एकछत्री राणीव ॥ राजयोगाची ॥ १०५ ॥
तेथे नेणीवाचेंही नांव नाही, व जाणीवाचेंही नांव नाहीं; भाव व अभाव ह्या दोहोचेंही बोलणे खुंटलें; केवळ राजयोगाचें एकछत्री राज्य होऊन राहिलें. १०५
सर्व सुखांची कुरोंडी ॥ जयासी वोंवाळूनि सांडिजे फुडी ॥
तया ब्रह्मसुखाचीगोडी ॥ केवीं बोलावी ॥ १०६ ॥
खरोखर ज्यावरून सर्व सुखाची कुरवंडी करून ती आवोळून टाकावी, त्या ब्रह्मसुखाची गोडी काय सांगावी ? १०६
जेथें मनाचे जाणणें ॥ खुंटले वाचेचे बोलणें ॥
हे ज्याचें तोचि जाणे ॥ येरा टकमकचि ॥ १०७ ॥
जेथे मनाचें जाणणे आणि वाणीने बोलणें ही दोन्हीही कुंडली. हे ज्याचे त्यानेंच अनुभवावे. इतरांना नुसती टकमकच. १०७
तैसें परमात्मयाचेनि आधारें ॥ इंद्रियग्राम व्यापारे ॥
परी त्याचेनि वेव्हारें ॥ न लिंपिजे तो ॥ १०८ ॥
त्याचप्रमाणे परमात्म्याचा आधार असल्यामुळे जरी इंद्रियसमुदायाचा व्यापार चाललेलाच असतो तरी त्या व्यवहारानें त्याला काही दोष लागत नाही. १०८
ऐसा राजयोगसंकेतु ॥ पातला तो अवधूतू ॥
यावरील वृत्तांतु ॥ तो अवधारिजे ॥ १०९ ॥
त्याप्रमाणे राजयोगाची खूण अवधूतास, पवित्र झालेल्या शिप्यास पटली. आतां यापुढील गोष्ट श्रवण करा. १०९
जें मना वाचे अगोचरु ॥ ते बोलतां सांकडे थोरू ॥
तथापि ऐकें तूंतं चतुरू ॥ श्रीमुकुंद म्हणे ॥ ११० ॥
जे मनाला आणि वाणीलाही कळू न येणारे ते सांगावयाचे सणजे महा कठिण काम ! श्रीमुकुंद म्हणतात - तथापि हे चतुर पुरुषा ! तूं ऐक. ११०
इति श्रीमद्‌विवेकसिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्यसंवादे
स्वरूपसमावेशो नामप्रथमप्रकरणं ॥
॥ श्रीमत्सद्‌गुरुचरणारविंदाभ्यांनमः ॥

GO TOP