शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(४५१)

स्वमसंगमुदासीनं परिज्ञाय नभो यथा ।
न श्लिष्यति च यत् किंचित् कदाचित् भावि-कर्मभिः ॥ ४५१ ॥
आकाशाप्रमाणे आपण (स्वम्) म्हणजे आपला आत्मा असंग आणि उदासीन आहे, हे संपूर्णपणे कळल्यावर भावी म्हणजे भविष्यकालीन कर्मांनी जीवन्मुक्त लिप्त होत नाही.


ब्रह्मज्ञानाने माणूस जीवन्मुक्त झाला आहे. तो जिवंत असल्यामुळे कर्मे करीत आहेच. ही त्याची ब्रह्मज्ञानानंतर होणारी भावी कर्मे होत. यांनाच अनेकदा क्रियमाण कर्म म्हणतात. ब्रह्मज्ञानाने आपण असंग, उदासीन आहोत हे जीवन्मुक्ताला कळले असल्याने, त्या भूमिकेतून होणारी त्याची भावी/ज्ञानोत्तर/क्रियमाण कर्मे त्याला चिकटून ती त्याला पुनः संसाराच्या बंधनात पाडू शकत नाहीत.


(४५२)

न नभो घट-योगेन सुरा-गंधेन लिप्यते ।
तथात्मोपाधि-योगेन तद्-धर्मेर्नैव लिप्यते ॥ ४५२ ॥
मद्याने भरलेल्या घटाचा संबंध आला असता, आकाश हे काही मद्याच्या वासाने लिप्त होत नाही. त्याप्रमाणे देह इत्यादी उपाधींशी योग आला असता अथवा त्या उपाधींच्या गुणधर्माशी संबंध आला असता, आत्मा काही लिप्त होत नाही.


देह इत्यादींच्या उपाधीत सापडलेला आत्मा, त्या उपाधी व त्यांचे धर्म यांनी लिप्त होत नाही; कारण तो असंग आहे.


(४५३) जीवन्मुक्ताच्या बाबतीत फक्त प्रारब्ध-कर्म कार्य करते -

ज्ञानोदयात् पुरारब्धं कर्म ज्ञानान्न नश्यति ।
अदत्वा स्व-फलं लक्ष्यमुद्दिश्योत्सृष्ट-बाणवत् ॥ ४५३ ॥
लक्ष्याला उद्देशून सोडलेला बाण ज्याप्रमाणे आपले फळ दिल्यावाचून राहत नाही, त्याप्रमाणे आत्म-ज्ञानाचा उदय होण्यापूर्वी सुख झालेले (प्रारब्ध) कर्म हे आपले फळ दिल्यावाचून ज्ञानाने नष्ट होत नाही.


एकदा सोडलेला बाण परत येत नाही अथवा परत घेता येत नाही; तो लक्ष्य वेधतोच. आत्मज्ञान होण्यापूर्वी प्रारब्धाचा फळ देण्याचा प्रभाव सुरू झालेला होता; तो सुख इत्यादी देणारच. त्याचा नाश ज्ञानाने होत नाही.


(४५४)

व्याघ्र-बुद्धया विनिर्मुक्तो बाणः पश्चात्तु गो-मतौ ।
न तिष्ठति छिनत्त्येव लक्ष्यं वेगेन निर्भरम् ॥ ४५४ ॥
(गाईला वाघ समजून) वाघ या बुद्धीने सोडलेला बाण, पुढे ती गाय आहे हे बाण सोडणाराला समजले तरी, थांबत नाही, तर तो निश्चितपणे (निर्भर) वेगाने लक्ष्याला तोडून टाकतो.


लक्ष्याला उद्देशून सोडलेला बाण परत घेता येत नाही अथवा अन्यत्र वळविता येत नाही. तो वाटेत न थांबता लक्ष्याचा भेद करतो. त्याप्रमाणे कर्मफळ देण्यास सुरू झालेले प्रारब्ध-कर्म थांबत नाही आणि ते थांबविताही येत नाही आणि ते परतही जात नाही अथवा अन्यत्र वळविता येत नाही.


(४५५) म्हणून आत्मज्ञानी माणसाला प्रारब्धाचे फळ भोगावे लागतेच -

प्रारब्धं बलवत्तरं खलु विदां भोगेन तस्य क्षयः
सम्यग्-ज्ञान-हुताशनेन विलयः प्राक्-संचितागामिनाम् ।
ब्रह्मात्मैक्यमवेक्ष्य तन्मयतया ये सर्वदा संस्थिता -
स्तेषां तत् त्रितयं नहि क्वचिदपि ब्रह्मैव ते निर्गुणम् ॥ ४५५ ॥
आत्मज्ञानी माणसांचे (विदां) प्रारब्ध कर्म खरोखर बलवत्तर असते. भोगानेच त्याचा नाश होतो. अपरोक्ष (सम्यक्) ज्ञानरूपी अग्नीने पूर्वीच्या संचित कर्मांचा आणि भावी म्हणजे क्रियमाण कर्मांचा नाश होतो. जे (जीवन्मुक्त) ब्रह्म आणि (जीव) आत्मा यांचे ऐक्य जाणून सर्वदा तन्मय (= ब्रह्ममय) होऊन राहिलेले असतात, त्यांना ती संचित, प्रारब्ध व क्रियमाण ही तीनही कर्मे (त्रितय) कधीही त्रासदायक असत नाहीत; कारण ते निर्गुण ब्रह्मरूपच झालेले असतात.(४५६) जीवन्मुक्ताच्या प्रारब्धाचा नाश भोगून होतो, हे म्हणणेही लौकिक दृष्टीनेच आहे. कारण ब्रह्माशी एकरूप झालेल्या जीवन्मुक्ताच्या संदर्भात कर्मच असत नाही.

उपाधि-तादात्म्य-विहीन-केवल-ब्रह्मात्मनैवात्मनि तिष्ठतो मुनेः ।
प्रारब्ध-सद्‌भाव-कथा न युक्ता स्वप्नार्थ-संबंध-कथेव जाग्रतः ॥ ४५६ ॥
देह इत्यादी उपाधीशी तादात्म्याने रहित आणि केवळ ब्रह्मस्वरूपाने स्वतःच्या रूपात (आत्मनि) राहणाऱ्या मुनीच्या बाबतीत प्रारब्ध असते असे म्हणणे ही गोष्टसुद्धा योग्य नाही. जसे- जागृतीतील पुरुषाला स्वप्नातील गोष्टींचा संबंध असतो, हे म्हणणे योग्य नव्हे.


जीवन्मुक्त मुनीवर प्रारब्धाचा प्रभाव/परिणाम पडत नसल्याने, त्याला प्रारब्ध आहे, हे म्हणणे योग्य ठरत नाही.


(४५७) या श्लोकातील दृष्टांताचा अधिक खुलासा असा -

न हि प्रबुद्धः प्रतिभास-देहे देहोपयोगिन्यपि च प्रपंचे ।
करोत्यहंतां ममतामिदंतां किंतु स्वयं तिष्ठति जागरेण ॥ ४५७ ॥
झोपेतून जागा झालेला मनुष्य स्वप्नातील भासमान देहावर तसेच देहाला उपयोगी पडणाऱ्या स्त्री, पुत्र इत्यादी प्रापंचिक गोष्टींवर अहंता, ममता आणि इदंता ठेवीत नाही, तर तो स्वतः जागृत अवस्थेतच राहतो.


स्वप्नातील देह व देहधारणेला उपयोगी पडणारे पदार्थ इत्यादींवर जागे झालेल्या माणसाची अहंता आणि ममता नसते. 'हे घर, ही माझी पत्नी', अशा वचनांना इदंता असे म्हटले आहे.


(४५८)

न तस्य मिथ्यार्थ-समर्थनेच्छा न संग्रहस्तज्जगतोऽपि दृष्टः ।
तत्रानुवृत्तिर्यदि चेन्मृषार्थे न निद्रया मुक्त इतीष्यते ध्रुवम् ॥ ४५८ ॥
स्वप्नातून जागे झालेल्या त्या माणसाला स्वप्नातील मिथ्या पदार्थांचे समर्थन (सत्यत्व, इत्यादी) सिद्ध करण्याची इच्छा तसेच आणि स्वप्नात पाहिलेल्या जगाचा (= जगातील वस्तूंचा) संग्रह त्याने केला असेही या जगात दिसून येत नाही. त्या बाबतीत (स्वप्नातील मिथ्या पदार्थांच्या बाबतीत) त्याची अनुवृत्ती/संबंध असेल, तर त्या माणसाला निद्रेने सोडले नाही, असे नक्कीच समजावे.


स्वप्नातील पदार्थांचे सत्यत्व आणि संग्रह जागा झालेला माणूस करीत नाही. जर कुणी तसे करीत असेल तर त्याचे स्वप्न अद्यापि संपले नाही, तो स्वप्नातच आहे, असाच अर्थ होतो.


(४५९)

तद्वत् परे ब्रह्मणि वर्तमानः सदात्मना तिष्ठति नान्यदीक्षते
स्मृतिर्यया स्वप-विलोकितार्थे तथा विदः प्राशन-मोचनादौ ॥ ४५९ ॥
वर उल्लेखिलेल्या जागृतीतील पुरुषा प्रमाणे, परब्रह्माच्या ठिकाणी लीन होऊन राहिलेला पुरुष हा नेहमी त्याच स्वरूपात (सदात्मना) राहतो; त्याला अन्य काही दिसत नाही. स्वप्नात पाहिलेल्या पदार्थांची स्मृती ज्याप्रमाणे जागे झालेल्या पुरुषाला असते. त्याप्रमाणे ब्रह्मवेत्त्या माणसाला भोजन (प्राशन) आणि मलोत्सर्ग (मोचन) इत्यादींचे नुसते स्मरण असते.


स्वप्नातील पदार्थांची स्मृती जागे झालेल्या माणसाला असू शकते, तद्वत् भोजन इत्यादींची स्मृती ब्रह्मरूप आलेल्या माणसाला असते. त्या क्रिया त्याचे हातून यांत्रिकपणे घडत असतात.


(४६०)

कर्मणा निर्मितो देहः प्रारब्धं तस्य कल्प्यताम् ।
नाना देहात्मनो युक्तं नैवात्मा कर्म-निमित्तः ॥ ४६० ॥
देह हा कर्मामुळे उत्पन्न झालेला आहे; म्हणून प्रारब्धकर्म देहाला आहे असे समजावे. अनादी असणाऱ्या आत्म्याला प्रारब्ध आहे असे मानणे योग्य नव्हे; कारण आत्मा हा कर्माने उत्पन्न झालेला नाही.


जीवन्मुक्ताच्या बाबतीत प्रारब्ध मानावयाचेच असेल तर ते त्याच्या देहाला लागू पडते असे मानावे; कारण त्याचा देह पूर्व कर्मानेच निर्माण झालेला आहे. कर्म व आत्मा यांचा काहीच संबंध नाही. म्हणून आत्म्याच्या बाबतीत प्रारब्ध-कर्म मानणे योग्य ठरत नाही.


(४६१) आत्मज्ञानी जीवन्मुक्ताला प्रारब्ध नाही याचे आणखी एक कारण असे -

अजो नित्यः शाश्वत इति ब्रूते श्रुतिरमोघ-वाक् ।
तदात्मना तिष्ठतोऽस्य कुतः प्रारब्ध-कल्पना ॥ ४६१ ॥
'आत्मा हा जन्मरहित, नित्य आणि शाश्वत आहे', असे सत्य सांगणारी श्रुती सांगते. मग त्या आत्म-स्वरूपातच असणाऱ्या जीवन्मुक्ताच्या बाबतीत प्रारब्धाची कल्पना कशी करता येईल ?


आत्म्याचा कर्माशी काडीइतकाही संबंध नाही. कठोपनिषद् ही श्रुती म्हणते, 'अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे' (१.२.१८) साहजिकच आत्मरूप झालेल्या जीवन्मुक्ताला 'प्रारब्ध आहे' असे कसे म्हणता येईल ?


(४६२)

प्रारब्धं सिध्यति तदा यदा देहात्मना स्थितः ।
देहात्म-भावो नैवेष्टः प्रारब्धं त्यज्यतामतः ॥ ४६२ ॥
जेव्हा माणूस देहाला आत्मा मानून राहत असेल तेव्हा (त्यांचे बाबतीत) प्रारब्ध सिद्ध होईल. जीवन्मुक्ताच्या बाबतीत देह म्हणजे मी म्हणजे आत्मा अशी स्थिती आम्हाला मान्य/इष्ट नाही म्हणून त्याच्या बाबतीत प्रारब्धाची कल्पना टाकून द्यावी.


कर्मजन्य देहाला प्रारब्ध लागू पडते. त्या देहाला जो काणी आत्मा मानतो त्याला प्रारब्ध लागू पडते. जीवन्मुक्त माणूस देहाला आत्मा मानीत नाही, म्हणून प्रारब्ध त्याला लागू पडत नाही.


(४६३) देहाला प्रारब्ध असते हे म्हणणेसुद्धा अध्यासामुळे आहे -

शरीरस्यापि प्रारब्ध-कल्पना भ्रांतिरेव हि ।
अध्यासस्य कुतः सत्त्वमसत्यस्य कुतो जनिः ॥ ४६३ ॥
शरीराला प्रारब्ध आहे ही कल्पनासुद्धा भ्रांतीच आहे. कारण अध्यस्त पदार्थाला अस्तित्व कोठून असणार ? आणि जो पदार्थ सत्य नाही त्याचा जन्म तरी कोठून होणार ?


तात्त्विकदृष्टीने पाहिल्यास देहाला प्रारब्ध आहे असेसुद्धा म्हणता येत नाही. कारण अध्यस्त जगातील देह हा अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थाला स्वतंत्र अस्तित्व नसते. असा अस्तित्व नसणारा असत्य पदार्थ कुठून निर्माण होणार ? तेव्हा असत्य/अध्यस्त देहाला प्रारब्ध आहे असे कसे म्हणता येईल ?


(४६४)

अजातस्य कुतोनाशः प्रारब्धमसतः कुतः ।
ज्ञानेनाज्ञान-कार्यस्य समूलस्य लयो यदि ॥ ४६४ ॥
जर आत्मज्ञानाने अज्ञान व त्याचे कार्य हे मुळासकट नष्ट झाले असेल तर जो जन्मालाच आला नाही त्याचा नाश कोठून होणार ? मग असत् देहाला प्रारब्ध कुठून असणार ?(४६५)

तिष्ठत्ययं कथं देह इति शंकावतो जडान् ।
समाधातुं बाह्यदृष्ट्या प्रारब्धं वदति श्रुतिः ।
न तु देहादि-सत्यत्व-बोधनाय विपश्चिताम् ॥ ४६५ ॥
जीवन्मुक्ताचा देह कसा टिकून राहतो; अशी शंका काढण्याऱ्या अडाणी माणसांचे समाधान करण्यास लौकिक (बाह्य) दृष्टीने श्रुती सांगते की देहाला प्रारब्ध आहे. परंतु विद्वान लोकांना देह इत्यादी सत्य आहेत', असे सांगण्यास श्रुती देहाला प्रारब्ध आहे' असे म्हणत नाही.


देह हे अज्ञानजन्य अध्यासाचे कार्य आहे. आत्मज्ञानाने अज्ञान व त्याचे कार्य नष्ट झाले, मग अज्ञानजन्य देह उत्पन्नच झाला नाही; मग त्याचा नाश कसा होणार ? म्हणून देहालाही प्रारब्ध नाही. परंतु जीवन्मुक्ताचा देह तर दिसत असतो. हे कसे काय ? या प्रश्नाला श्रुती सांगते - लौकिकदृष्टीने देहाला प्रारब्ध आहे, असे श्रुतीचे म्हणणे आहे. याचा अर्थ श्रुतीच्या दृष्टीने देह इत्यादी सत्य आहेत, असा श्रुतीचा अभिप्राय नाही. संक्षेपाने सांगायचे झाल्यास - देह, देहाला प्रारब्ध इत्यादी कल्पना अज्ञानजन्य परिस्थितीत शक्य आहेत.

अज्ञान संपल्यावर पारमार्थिकदृष्ट्या देह, प्रारब्ध इत्यादी काही नाही. मग परमार्थदृष्ट्या खरे काय आहे, ते पुढील ४६६-४७२ श्लोकांत सांगितले आहे.


(४६६)

परिपूर्णमनाद्यंतमप्रमेयमविक्रियम् ।
एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ॥ ४६६ ॥
परिपूर्ण, अनादी, अनंत, प्रमाणाने न कळणारे (मोजता न येणारे), विकाररहित असे अद्वितीय एकमेव एक ब्रह्म आहे. येथे वेगळेवेगळे (अनेक) काही नाही.(४६७)

सद्-घनं चिद्-घनं नित्यमानंद-घनमक्रियम् ।
एकमेवाद्वयं ब्रह्मनेह नानास्ति किंचन ॥ ४६७ ॥
सद्-घन, चिद्-घन, आनंदघन, नित्य, क्रियारहित असे अद्वितीय एकमेव एक ब्रह्म आहे. येथे वेगवेगळे (अनेक) काही नाही.(४६८)

प्रत्यगेक-रसं पूर्णमनंतं सर्वतो-मुखम् ।
एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ॥ ४६८ ॥
प्रत्यग् (अंतर्यामी), एकरस (एकस्वरूपाचे), पूर्ण, अनंत, सगळीकडे मुखे असणारे म्हणजे सर्वव्यापक, अद्वितीय एकमेव एक ब्रह्म आहे. येथे वेगळेवेगळे (अनेक) काही नाही.(४६९)

अहेयमनुपादेयमनाधेयमनाश्रयम् ।
एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ॥ ४६९ ॥
टाकण्यास अयोग्य, घेण्यास अयोग्य, अनाधेय, आश्रयरहित, अद्वितीय एकमेव एक ब्रह्म आहे. येथे वेगळे वेगळे (अनेक) काही नाही.


त्याज्य अथवा ग्राह्य ब्रह्म नाही, ते कुठेही ठेवण्यास योग्य नाही. ते इंद्रियांना अग्राह्य आहे.


(४७०)

निर्गुणं निष्कलं सूक्ष्मं निर्विकल्पं निरंजनम् ।
एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ॥ ४७० ॥
निर्गुण, कलारहित/अवयवरहित, सूक्ष्म, निर्विकल्प, निरंजन, अद्वितीय एकमेव एक ब्रह्म आहे. येथे वेगळेवेगळे (अनेक) काही नाही.(४७१)

अनिरूप्य-स्वरूपं यन्मनोवाचामगोचरम् ।
एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ॥ ४७१ ॥
ज्याचे स्वरूप सांगता येत नाही, जे मन आणि वाचा यांना अगोचर आहे, असे अद्वितीय एकमेव एक ब्रह्म आहे. येथे वेगळेवेगळे (अनेक) काही नाही.(४७२)

सत् समृद्धं स्वतः सिद्धं शुद्धं बुद्धमनीदृशम् ।
एकमेवाद्वयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन ॥ ४७२ ॥
सत्/सत्य/त्रिकालांत असणारे, समृद्ध/ऐश्वर्ययुक्त/परिपूर्ण, तसेच स्वतः सिद्ध, शुद्ध, बुद्ध (ज्ञानस्वरूप), 'असे असे आहे' असे सांगता येण्यासारखे नसणारे, असे अद्वितीय एकमेव एक ब्रह्म आहे. येथे वेगळेवेगळे (अनेक) काही नाही.

विश्व हे असत्य/मिथ्या आहे. ब्रह्म हे एकमेव एक सत्य आहे हे श्लोक ४६६-४७२ यांमध्ये सांगितले आहे. 'एकमेवाद्वयं ... किंचन' हा ध्रुवपदवजा चरण या श्लोकांत आहे. सत्, नित्य, पूर्ण अशा भावात्मक शब्दांनी तसेच निर्गुण इत्यादी अनेक अभावात्मक शब्दांनी ब्रह्माचे वर्णन केलेले आहे.

असे हे ब्रह्म जे कोणी जाणतात, ते कसे असतात/होतात हे पुढील श्लोक ४७३ मध्ये सांगितले आहे.


(४७३)

निरस्त-रागा विनिरस्त-भोगाः शांताः सुदांता यतयो महांतः ।
विज्ञाय तत्त्वं परमेतदंते प्राप्ताः परां निर्वृतिमात्मयोगात् ॥ ४७३ ॥
ज्या कुणी आसक्ती (राग) दूर सारली आहे, ज्यांनी भोगांना दूर सारले आहे, जे मनाने शांत (शम-युक्त) आहेत, जे चांगले इंद्रियसंयमी आहेत, जे महान संयमी (यति) आहेत; ते लोक या (ब्रह्म) श्रेष्ठ तत्त्वाला जाणून, आत्म्याशी म्हणजेच ब्रह्माशी एकरूप होऊन, ते शेवटी श्रेष्ठ आनंदाप्रत जातात.


शमादि-षटकाने युक्त असणारे मुमुक्ष या ब्रह्म आत्मतत्त्वाला जाणू शकतात, त्याच्याशी एकरूप होतात. ब्रह्मानंद हा सर्वांत श्रेष्ठ आनंद आहे. तो आनंद त्या मुमुक्षूंना प्राप्त होतो.


(४७४) यानंतर गुरू शिष्याला सांगतो -

भवानमीदं परतत्त्वमात्मनः स्वरूपमानंद-घनं विचार्य ।
विधूय मोहं स्व-मनः-प्रकल्पितं मुक्तः कृतार्थो भवतु प्रबुद्धः ॥ ४७४ ॥
हे शिष्या परमतत्त्वरूप अशा आपल्या आनंदघन स्वरूपाचा विचार करून (= साक्षात्कार करून घेऊन) आणि स्वतःच्या मनाने कल्पिलेला मोह झटकून टाकून, तूसुद्धा जाणता (प्रबुद्ध), मुक्त आणि कृतार्थ हो.


संसारातून मुक्त होणे हीच कृतार्थता आहे.


(४७५)

समाधिना साधु विनिश्चलात्मना पश्यात्म-तत्त्वं स्फुट-बोध-चक्षुषा ।
निःसंशयं सम्यगवेक्षितश्चेत् श्रुतः पदार्थो न पुनर्विकल्पते ॥ ४७५ ॥
समाधीमध्ये उत्कृष्टपणे अतिशय स्थिर झालेल्या मनाने (आत्मना) आणि स्पष्ट अशा ज्ञानरूपी चक्षूंनी हे शिष्या तू या आत्मतत्त्वास पहा. ऐकलेला पदार्थ जर निःसंशयपणाने पाहण्यात आला, तर त्याविषयी पुनः विकल्प/संशय येत नाही.


समाधी-अवस्थेत निश्चल झालेल्या मनाला जे ज्ञान होते, तेच आत्मतत्त्वाला पाहण्याचा डोळा बनते. आत्म्याविषयी उपनिषदे आणि गुरू यांच्याकडून खूप ऐकले होते. तो आत्मा प्रत्यक्ष पाहिल्यावर मग संशय उरत नाही.


GO TOP