शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(३७६) विरक्त पुरुषाजवळ वैराग्य असतेच. त्याच्या जोडीने त्याला गुरुकडून आत्मोपदेशही हवा. तरच तो मुक्ती मिळवू शकतो -

वैराग्य-बोधौ पुरुषस्य पक्षिवत् पक्षी विजानीहि विचक्षण त्वम् ।
विमुक्ति-सौधाग्र-लताधिरोहणं ताभ्यां विना नान्यतरेण सिध्यति ॥ ३७६ ॥
हे विवेकी शिष्या, पक्ष्याचे जसे दोन पंख तसे वैराग्य आणि ज्ञान हे (मुमुक्ष) पुरुषाचे दोन पंख आहेत, असे तू नीट समजून घे. मुक्ती म्हणजे जणु उंच प्रासादाच्या गधीवरील-शिखरावरील - लतेवर चढणे होय, (म्हणून) त्या दोहोविना इतर कोणत्याही उपायाने (मोक्षाची प्राप्ती) सिद्ध होत नाही.


उंच प्रासादाच्या शिखरावरील इष्ट फळ लागलेल्या वेलीपर्यंत पोचण्यास पक्ष्याला दोन्ही पंखांचा वापर करून उडणे आवश्यक असते. त्याप्रमाणे मोक्ष-प्राप्तीसाठी मुमुक्षु पुरुषाने बैराग्य आणि गुरूचा उपदेश हे दोन वापरावयाचे आहेत.


(३७७) वैराग्य आणि ज्ञान यांनी असे होते -

अत्यंत-वैराग्यवतः समाधिः समाहितस्यैव दृढ-प्रबोधः ।
प्रबुद्ध-तत्त्वस्यहि बंध मुक्तिर्मुक्तात्मनो नित्य-सुखानुभूतिः ॥ ३७७ ॥
जो आत्यंतिक वैराग्याने युक्त आहे त्यालाच समाधी-मनाची एकाग्रता प्राप्त होते. ज्याचे मन एकाग्र झाले आहे, त्यालाच दृढ असे (आत्म -) ज्ञान प्राप्त होते. ज्याला (आत्म) तत्त्व निश्चितपणे कळले आहे, त्याचीच संसाराच्या बंधातून सुटका (मोक्ष) होते आणि ज्याचे मन (संसार-बंधातून) सुटले आहे, त्यालाच (आत्याचा साक्षात्कार होऊन आत्म्याच्या) नित्य सुखाची प्राप्ती होते.


(३७८) मुमुक्षूला अत्यंत वैराग्य हे आवश्यक आहे. त्यामुळेच पुढे आत्मज्ञान इत्यादी घडू शकते, वैराग्य आणि ज्ञान यांचे महत्त्व असे आहे -

वैराग्यान्न परं सुखस्य जनकं पश्यामि वश्यात्मन-
स्तचेच्छुद्धतरात्म-बोध-सहितं स्वाराज्य-साम्राज्य-धुक् ।
एतद्‍द्वारमजस्र-मुक्ति-युवतेर्यस्यात् त्वमस्मात् परं
सर्वत्रास्पृहया सदात्मनि सदा प्रज्ञां कुरु श्रेयसे ॥ ३७८ ॥
ज्याने मन वश करून घेतले आहे त्याला वैराग्यापेक्षा श्रेष्ठ असे अन्य काहीही सुख निर्माण करणारे नाही, असे मला दिसते (असे गुरू म्हणतो). हेच वैराग्य जर अत्यंत शुद्ध अशा आत्मज्ञानासहित असेल तर ते (आत्मानंदरूपी) स्वराज्याचे साम्राज्य निर्माण करते. हेच वैराग्य मुक्तिरूपी तरुण स्त्रीचे (प्राप्ती)साठी श्रेष्ठ (पर) द्वार म्हणजे साधन आहे, असे आहे म्हणून हे शिष्या, श्रेयसच्या प्राप्तीसाठी सर्व अनात्म वस्तूंच्या बाबतीत इच्छा न बाळगता, तू नेहमी सद्रूप आत्म्याचे ठिकाणी मन (प्रज्ञा) ठेव.


आत्यंतिक वैराग्य आणि आत्मसाक्षात्कार यांच्या योगे आत्मसुख मिळते, आत्मानंदरूपी स्वराज्याचे सार्वभौम राज्य प्राप्त होते. वैराग्यानेच मुक्तिरूपी तरुण स्त्री प्राप्त होते. पण त्यासाठी सर्व अनात्म पदार्थांचे बाबतीत निरिच्छ होणे आवश्यक आहे. श्रेयस म्हणजे परम कल्याण म्हणजेच मोक्ष. मोक्ष हेच मानवी जीवनात श्रेयस आहे.


(३७९) वैराग्य आणि आत्मज्ञान यांच्यामुळे जे ब्रह्म जीवरूपात आहे, त्या ब्रह्माचा साक्षात्कार होतो -

आशां छिंधि विषोपमेषु विषयेष्वेषैव मृत्योः कृति -
स्त्यक्त्वा जाति-कुलाश्रमेष्वभिमतिं मुंचातिदूरात् क्रियाः ।
देहादावसति त्यजात्मधिषणां प्रज्ञां कुरुष्वात्मनि
त्वं द्रष्टास्य मनोऽसि निर्दयपरं ब्रह्मासि यद् वस्तुतः ॥ ३७९ ॥
(हे शिष्या) विषाप्रमाणे घातक असणाऱ्या विषयांविषयीची आशा तोडून टाक. (कारण) ही (आशा) मृत्यूची कृती/आकृती आहे. जाती, कुल, आश्रम यांच्या बाबतीतील अभिमान टाकून देऊन, (सर्व) कर्म अतिदुरूनच (संपूर्णपणे) सोडून दे. देह इत्यादी असत् म्हणजे अनात्म वस्तू म्हणजे 'मी आत्मा' ही बुद्धी टाकून दे. आत्म्याचे ठिकाणी मन (प्रज्ञा) एकाग्र कर. (तू स्वत:) द्रष्टा आहेस, मन-रहित आहेस. (खरे म्हणजे) जे श्रेष्ठ (पर) आणि द्वैतरहित (निर्द्वय) ब्रह्म आहे तेच तू (वस्तुतः) आहेस.


आशा ही घातक, साक्षात् मृत्यूच आहे. अहंकार हाही घातक आहे. उच्च कुळात जन्म, उच्च कुळ असा स्वतःविषयीचा अभिमान सोड. अभिमानाने घडणाऱ्या कर्माचा त्याग कर. अनात्म अशा देह इत्यादींना आत्मा मानू नको. तूच साक्षी प्रत्यगात्मा आहेस, त्याचे ठिकाणी मन एकाग्र कर. जे अद्वितीय ब्रह्म आहे तेच प्रत्यगात्मरूप तू आहेस हे लक्षात घे. या एकाच श्लोकात गुरूने शिष्याला सर्व अध्यात्म सांगितले आहे.


(३८०) मन आत्म्यावर केंद्रित करून, आत्मरूप होऊन, आत्मानंद घ्यावयाचा आहे -

लक्ष्ये ब्रह्मणि मानसं दृढतरं संस्थाप्य बाह्येंद्रियं
स्वस्थाने विनिवेश्यं निश्चलतनुश्चोपेक्ष्य देहस्थितिम् ।
ब्रह्मात्मैक्यमुपेत्य तन्मयतया चाखंडवृत्त्यानिश
ब्रह्मानंत-रसं पिबात्मनि मुदा शून्यैः किमन्यैर्भृशम् ॥ ३८० ॥
(हे शिष्या, आसनावर) शरीर स्थिर करून, (मग) देहाच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून, बाह्य इंद्रियांना आपापल्या मूळ स्थानी आणून ठेवून, लक्ष्य अशा ब्रह्माच्या ठिकाणी मन अतिशय स्थिरपणाने स्थापन करून, ब्रह्माशी एकत्व पावून, ब्रह्ममय अशा अखंड (मनो-) वृत्तीने मनामध्येच (आत्मनि) (अथवा स्वतःमध्येच) आनंदाने ब्रह्मानंदाचा रस पी. (कारण) इतर निष्फळ (शून्य) साधनांनी काय मोठे (भृशं) फळ मिळणार आहे ?



(३८१)

अनात्म-चिंतनं त्यक्त्वा कश्मलं दुःख-कारणम् ।
चिंतयात्मानमानंद-रूपं यन्मुक्ति-कारणम् ॥ ३८१ ॥
(म्हणजेच असे कर). वाईट/पापरूप (कश्मल) आणि दुःखाचे कारण असणाऱ्या अनात्म पदार्थाचे चिंतन टाकून देऊन, जे मुक्तीचे कारण आहे अशा आनंदरूप (प्रत्यग्) आत्म्याचे, (हे शिष्या) तू चिंतन कर.


मुमुक्षू शिष्याने अनात्म पदार्थांचे चिंतन सोडून, मोक्ष देणारे आत्म-चिंतन करावयास हवे.


(३८२) आत्म-चिंतन असे करावयाचे आहे -

एष स्वयंज्योतिरदोष-साक्षी विज्ञान-कोशे विलसत्यजस्रम् ।
लक्ष्यं विधायैनमसद्-विलक्षणं अखंडवृत्त्यात्मतयानुभावय ॥ ३८२ ॥
हा (आत्मा) स्वयंप्रकाशी आणि सर्व-साक्षी असून तो विज्ञानमयकोशात सतत प्रकाशमान असतो. असत् (-अनात्म) पदार्थापेक्षा भिन्न असणाऱ्या या आत्म्याला लक्ष्य करून, (चैतन्याशी एकरूप झालेल्या) अखंड वृत्तीने 'हा आत्मा म्हणजे मी आहे, माझे स्वरूप आहे', अशी (हे शिष्या) भावना धर (अथवा असे चिंतन कर, असे जाणून घे).


विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी व ज्ञानेंद्रिये, बुद्धीमध्ये प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब पडलेले असते.


(३८३) श्लोक ३८२ चा भागच वेगळ्या शब्दांत असा सांगितला आहे -

एतमच्छिन्नया वृत्त्या प्रत्ययांतर-शून्यया ।
उल्लेखयन् विजानीयात् स्व-स्वरूपतया स्फुटम् ॥ ३८३ ॥
(अशाप्रकारे अनात्म वस्तूंच्या) प्रत्ययाने रहित आणि (आत्म्याच्या ठिकाणच्या) अखंड वृत्तीने चिंतन करीत (उल्लेखयन्), हा आत्मा (एतम्) हा स्वतःचेच रूप आहे, असे स्पष्टपणे जाणून घ्यावे.


(३८४)

अत्रात्मत्वं दृढीकुर्वतन्नहमादिषु संत्यजन् ।
उदासीनतया तेषु तिष्ठेत् स्फुट-घटादिवत् ॥ ३८४ ॥
या आत्म्याचे ठिकाणीचे (अत्र) स्वतःचे स्वरूप अथवा आत्मत्व दृढ करीत, अहंकार इत्यादींच्या ठिकाणची आत्मबुद्धी टाकून देऊन, स्पष्टपणे कळणाऱ्या घट इत्यादीवर असणाऱ्या उदासीन वृत्तीने त्या (दह, अहंकार इत्यादींचे) बाबतीत उदासीनपणाने रहावे.


घट इत्यादी म्हणजे मी नव्हे हे उघड आहे; त्यांच्या बाबतीत आपण उदासीन असतो. तशी उदासीन वृत्ती आपण देह इत्यादींच्या बाबतीत धारण करावयास हवी. कारण घट इत्यादी ज्याप्रमाणे आपले स्वत:चे स्वरूप (-आत्मा) नहे, त्याप्रमाणे अहंकार इत्यादी आपले स्वरूप/आत्मा नसून, प्रत्यगात्मा म्हणजे मी- आत्मा-आहे, अशी बुद्धी दृढ व्हावयास हवी.


(३८५) सर्व उपाधींनी रहित अशा प्रत्यगात्म्याला पहावे -

विशुद्धमंतःकरणं स्वरूपे निवेश्य साक्षिण्यबबोधमात्रे ।
शनैःशनैर्निश्चलतामुपानयन् पूर्णं स्वमेवानुविलोकयेत् ततः ॥ ३८५ ॥
अत्यंत शुद्ध झालेल्या अंतःकरणाला (आपले) स्वरूपभूत, साक्षी आणि केवळ ज्ञानमात्र अशा प्रत्यगात्म्यावर केन्द्रित करून हळहळू त्या अंतःकरणाला निश्चलतेप्रत नेणाऱ्या मुमुक्षूने नंतर पूर्ण अशा स्वतःला म्हणजे स्वतःच्या (सत्य) स्वरूपाला पाहावे.


प्रत्यगात्मा हेच आपले सत्य स्वरूप आहे आणि हा प्रत्यगात्मा केवळ ज्ञानरूप आणि साक्षी आहे.


(३८६)

देहेंद्रिय-प्राण-मनोऽहमादिभिः
स्वाज्ञान-क्‍ऌप्तेरखिलैरुपाधिभिः
विमुक्तमात्मानमखंड-रूपं
पूर्णं महाकाशमिवावलोकयेत् ॥ ३८६ ॥
स्वतःच्या अज्ञानाने कल्पिलेल्या देह, इंद्रिये, प्राण, मन, अहंकार इत्यादी उपाधींतून सुटलेल्या, अखंड स्वरूप असणाऱ्या, पूर्ण अशा (प्रत्यग) आत्म्याला महाकाशाप्रमाणे पहावे.


महाकाशाला घट, इत्यादी उपाधी आल्या की घटाकाश, मठाकाश, जलाकाश असे आपण म्हणतो. पण ते सोडून उपाधीपेक्षा वेगळे असणारे आकाश पहावयाचे असते. त्याप्रमाणे स्वतःच्या अज्ञानाने कल्पिलेल्या देह इत्यादी उपाधींनी रहित आत्मा आहे आणि तो पूर्ण आणि अखंड रूप आहे, असे जाणून घ्यावयाचे आहे.


(३८७) उपाधी दूर केल्या की उपाधिरहित शुद्ध ब्रह्म (= आत्मा) प्रत्ययाला येते -

घट-कलश-कुसूल-सूचि-मुख्यै-गंगनमुपाधि-शतैर्विमुक्तमेकम् ।
भवति न विविधं तथैव शुद्धं परमहमादि-विमुक्तमेकमेव ॥ ३८७ ॥
घट, कळशी, कणिंग/कणगी/कोठारखड्डा, सुई (चे भोक) इत्यादी शेकडो उपाधींतून सुटलेले आकाश एकच राहते, ते नाना प्रकारचे असत नाही. (त्याप्रमाणे) अहंकार इत्यादी उपाधीतून सुटले असता, शुद्ध असे पर (ब्रह्म) एकच राहते (ते नानाप्रकारचे असत नाही).


मुळात आकाश एकच आहे. त्याला घट इत्यादी उपाधी आल्या की ते घटाकाश इत्यादी भिन्न रूपात भासू लागते. त्या उपाधी बाजूला गेल्या की ते आकाश मुळाप्रमाणे एकच उरते. त्याप्रमाणे शुद्ध ब्रह्माला/आत्म्याला अहंकार इत्यादी उपाधी आल्या की त्या उपाधीनुसार ते भिन्न भासते. पण त्या उपाधी दूर झाल्या की ते एकच एक राहते.


(३८८) आत्म्याला/ब्रह्माला येणाऱ्या उपाधी मिथ्या आहेत. त्या दूर झाल्या की स्वतःचा आत्मा/प्रत्यगात्मा (= ब्रह्म) एकच एक राहतो.

ब्रह्मादि-स्तंब-पर्यंता मृषामात्रा उपाधयः ।
ततः पूर्णं स्वमात्मानं पश्येदेकात्मना स्थितः ॥ ३८८ ॥
ब्रह्मदेव इत्यादींच्या देहापासून ते गवताच्या काडीपर्यंत (आत्म्याला । ब्रह्माला) येणाऱ्या उपाधी या केवळ मिथ्या आहेत. म्हणून (त्या उपाधींकडे दुर्लक्ष करून) स्वतःचा पूर्ण एक आत्मा हा एकरूपाने (सर्वत्र) स्थित आहे, (असे मुमुक्षूने) पहावे/जाणावे.



(३८९) अध्यासाने/भ्रमाने ब्रह्म या अधिष्ठानावर विश्व भासते. ते भासमान विश्व ब्रह्मापेक्षा वेगळे नाही असे जाणावे.

यत्र भ्रांत्या कल्पितं तद् विवेके तत्तन्मात्रं नैव तस्माद् विभिन्नम् ।
भ्रांतेर्नाशे दृष्टाहितत्त्वं रज्जुस्तद्‌वद् विश्वमात्मस्वरूपम् ॥ ३८९ ॥
जेथे म्हणजे ज्या अधिष्ठानावर भ्रांतीने जे काही कल्पिले/मानले जाते, तेते सर्व (अधिष्ठान स्वरूप) असते, ते त्या (अधिष्ठाना) पेक्षा मुळीच वेगळे नसते, हे विवेक केला असता कळून येते. (जसे-) भ्रांतीचा नाश झाला असता (रज्जु-सर्प-दृष्टांतातील रज्ज्वर) दिसणारा (सर्प हा) पदार्थ हा रज्जू आहे (हे विवेक केल्यावर कळते); त्याप्रमाणे (आत्म्यावर भ्रमाने भासणारे) विश्व हे (भ्रम संपल्यावर) आत्मस्वरूपीच आहे (हे कळून येते).


एखाद्या अधिष्ठानावर अध्यासाने भ्रांतीने भासणारा पदार्थ हा त्या अधिष्ठानापेक्षा वेगळा असत नाही, हे विचार केल्यावर कळते. जसे - रज्जूवर भ्रांतीने दिसणारा सर्प हा रज्जूपेक्षा वेगळा नाही. त्याप्रमाणे ब्रह्मावर आत्म्यावर अध्यासाने भासणारे विश्व हे ब्रह्मापेक्षा/आत्म्यापेक्षा वेगळे नाही. अध्यस्तवस्तू अधिष्ठानरूप असते.


(३९०)

स्वयं ब्रह्मा स्वयं विष्णुः स्वयमिंद्रः स्वयंशिवः ।
स्वयं विश्वादिदं सर्वं स्वस्मादन्यन्न किंचन ॥ ३९० ॥
(आत्मा हा) स्वतःच ब्रह्मदेव, स्वतःच विष्णू, स्वतःच इंद्र, स्वतःच शिवशंकर आणि स्वतःच हे सर्व विश्व आहे. आत्म्यापेक्षा (स्वस्मात्) अन्य काहीही नाही.


येथे 'स्व' म्हणजे आत्मा असा अर्थ आहे. केवलाद्वैत वेदांतात अनेकदा 'स्व' हा शब्द 'आत्मा' या अर्थी वापरला जातो.


(३९१)

अंतः स्वयं चापि बहिः स्वयं च स्वयं पुरस्तात् स्वयमेव पश्चात् ।
स्वयं ह्यवाच्यां स्वयमप्युदीच्यां तथोपरिष्टात् स्वयमप्यधस्तात् ॥ ३९१ ॥
(आत्मा हा) स्वतः आत तसेच स्वतः बाहेर, स्वतःच पूर्वेला आणि स्वतःच पश्चिमेला, स्वतःच दक्षिणेस तसेच स्वतःच उत्तरेस, स्वतः वरती तसेच स्वतःच खालती आहे.


अवाची म्हणजे दक्षिण दिशा. सर्व दिशांत आत्मा स्वतःच आहे.


(३९२) (आत्मरूपी) चैतन्य सर्वत्र भरलेले आहे -

तरंग-फेन-भ्रम-बुद्‌बुदादि सर्वं स्वरूपेण जलं यथा तथा ।
चिदेव देहाद्यहमंतमेतत् सर्वं चिदेवैकरसं विशुद्धम् ॥ ३९२ ॥
लाटा, फेस, भोवरा, बुडबुडा इत्यादी सर्व काही स्वरूपतः पाणीच आहे, त्याप्रमाणे देहापासून ते अहंकारापर्यंत हे (आत्मचैतन्य) आहे; किंबहुना हे सर्व काही विशुद्ध आणि एकाच स्वरूपाचे चैतन्य आहे.


(३९३) सर्व विश्व हे सद्‌रूप ब्रह्मच आहे असे श्लोक ३९३ सांगतो -

सदेवेदं सर्वं जगदवगतं वाङ्मनसयोः
सतोऽन्यन्नास्त्येव प्रकृति-पर-सीम्नि स्थितवतः ।
पृथक् किं मृत् स्यात् कलश-घट-कुंभाधवगतं
वदत्येष भ्रांतस्त्वमहमिति माया-मदिरया ॥ ३९३ ॥
वाणी आणि मन यांच्याद्वारे कळून येणारे हे सर्व जग सत् (ब्रह्म)च आहे. प्रकृतीच्या शेवटच्या सीमेवर असणाऱ्या सत् (ब्रह्मा) पेक्षा वेगळे (अन्यत) असे काही नाहीच आहे. कळशी, घडा, कुंभ इत्यादी स्वरूपात कळून येणारे (मातीचे पदार्थ) हे काय मातीपेक्षा पृथक असतात ? (असे सर्वच आणि सर्वत्र ब्रह्म असताना) मायारूपी मदिरेने भ्रांत (चित्त) झालेला पुरुष 'तू' आणि 'मी' असे म्हणतो.


मातीच्या सर्व पदार्थात मातीच असते. त्याप्रमाणे ब्रह्मावर भासणारे जग हे ब्रह्मच आहे. यावर शंका अशी- असे जर असेल, तर 'सर्व जग ब्रह्म आहे' असे न म्हणता माणूस 'मी' आणि 'तू' असा भेदभाव कसा करतो ? या शंकेचे उत्तर असे – मायारूपी मद्याने माणूस धुंद झाला आहे. मायेच्या अध्यासाच्या प्रभावामुळे त्याला जग ब्रह्मरूप दिसत नाही. ब्रह्मावर भासणारे विश्व हे ब्रह्मापेक्षा स्वतंत्र आहे असे वाटून तो स्वतःला 'मी' म्हणतो आणि इतरांना 'तू' म्हणतो म्हणजे तो भेदभाव करतो. सत्य असे आहे की अधिष्ठानरूप ब्रह्म म्हणजे संपूर्ण अध्यस्त विश्व आहे.

प्रकृति-पर-सीम्नि - प्रकृति म्हणजे माया (श्लोक ११७). माया ही ब्रह्माची उपाधी आहे. त्या उपाधीच्या पलीकडे, उपाधीपेक्षा वेगळे असे सत् ब्रह्म आहे.


(३९४) सर्वकाही ब्रह्म/आत्मा आहे या म्हणण्याला श्रुतीचा आधार आहे -

क्रिया-समभिहारेण यत्र नान्यदिति श्रुतिः ।
ब्रवीति द्वैत-राहित्यं मिथ्याध्यास-निवृत्तये ॥ ३९४ ॥
(माणसाला ब्रह्मावर होणाऱ्या) खोट्या अध्यासाच्या निवृत्तीसाठी, (भिन्न भिन्न) क्रियापदांचा वापर करून (क्रिया-समभिहारेण) श्रुती ही 'यत्र न अन्यद् अस्ति' (जेथे दुसरे काही नाही) असे सांगून (ब्रह्माचे अद्वैतत्व (द्वैत-राहित्य) श्रुतीच सांगते.


अध्यासामुळे ब्रह्मावर विश्व भासते, ते खरे वाटून माणूस जग वेगळे आणि ब्रह्म वेगळे असे मानू लागतो. तो अध्यास दूर करण्यास श्रुती ब्रह्माचे अद्वैत सांगते, ते असे -- 'यत्र नान्यत् पश्यति नान्यत् शृणोति नान्यद् विजानाति स भूमा । (छांदोग्य उपनिषद्, ७-२४-१) आणि श्रुती हे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे.


(३९५) तेव्हा विश्व हे ब्रह्मापेक्षा वेगळे असे जाणावयाचे नसून, विश्व म्हणजे ब्रह्म असेच जाणावयाचे आहे -

आकाशवन्निर्मल-निर्विकल्प-निःसीम-निष्पंदन-निर्विकारम् ।
अंतर्बहिः शून्यमनन्यमद्वयं स्वयं परं ब्रह्म किमस्ति बोध्यम् ॥ ३९५ ॥
आकाशाप्रमाणे निर्मळ, विकल्प-रहित, मर्यादा-रहित, निष्क्रिय । निश्चल, निर्विकार असे ब्रह्म आहे; त्याच्या आत आणि बाहेर अन्य काही नाही, ते अद्वय आहे. ते परब्रह्म (म्हणजेच मी जीव असल्याने) जाणून घेण्यास योग्य असे दुसरे काय आहे.


ब्रह्माला आतबाहेर वेगळे काही नाही; कारण ते चिद्-धन आहे. हे ब्रह्म म्हणजेच जीव आहे (श्लोक ३९६). अशा स्थितीत शेय म्हणून ब्रह्माखेरीज अन्य काय बरे असू शकेल ?


(३९६) सर्व काही ब्रह्मच असल्याने जीवाने ब्रह्मरूपच होऊन जावयाचे आहे -

वक्तव्यं किमु विद्यतेऽत्र बहुधा ब्रह्मैव जीवः स्वयं
ब्रह्मतज्जगदाततं तु सकलं ब्रह्माद्वितीयं श्रुतिः ।
ब्रह्मैवाहमिति प्रबुद्ध-मतयः संत्यक्त-बाह्याः स्फुटं
ब्रह्मीभूय वसंति संततचिदानंदात्मनैतद् ध्रुवम् ॥ ३९६ ॥
या संदर्भात (अत्र) आणखी पुष्कळ सांगण्यासारखे काय आहे ? जीव हा स्वतःच ब्रह्म आहे आणि हे विस्तृत संपूर्ण जगसुद्धा ब्रह्मच आहे. 'ब्रह्म हे दोन-रहित म्हणजे एकमेव एक आहे', असे श्रुती सांगते. (अशाप्रकारे) 'मी ब्रह्मच आहे', असे ज्यांच्या बुद्धीत स्पष्ट ज्ञान झाले आहे आणि ज्यांनी बाह्य (विषयां) चा त्याग केला आहे असे पुरुष ब्रह्मरूप होऊन (ब्रह्मीभूय) ते निरंतर चिदानंदरूपाने राहतात, हे (एतद्) मात्र नक्की आहे.


या श्लोकातील दुसऱ्या चरणात "ब्रह्मेतज्जगदापराणु" असा पाठभेद आहे. त्याचा अर्थ - परमाणूपर्यंतचे हे जग ब्रह्म आहे.

बाह्य विषयांतील आसक्ती आणि अहंकार टाकून, ब्रह्मरूप होऊन, सदा चिदानंदात राहणारे पुरुष हे जीवन्मुक्त होत.


(३९७) ब्रह्मरूप होण्यास काय काय करावे लागते ते पुढील श्लोक ३९७ मध्ये सांगितलेले आहे.

जहि मल-मय-कोशेऽहं-धियोत्थापिताशां
प्रसभमनिल-कल्पे लिंग-देहेऽपि पश्चात् ।
निगम-गदित-कीर्तिं नित्यमानंद-मूर्तिं
स्वयमिति परिचीय ब्रह्मरूपेण तिष्ठ ॥ ३९७ ॥
(हे शिष्या) मळाने युक्त अशा (स्थूलदेहावरील म्हणजेच अन्नमय) कोशावरील अहं-दुद्धीमुळे निर्माण झालेली आशा टाकून दे. त्यानंतर वायूप्रमाणे (तरल विरळ) असणाऱ्या लिंग-देहावरील आशासुद्धा बळजबरीने नष्ट कर. वेदांनी ज्याची कीर्ती गायली आहे आणि जो नित्य आनंदस्वरूपाचा आहे, असा स्वतःचा आत्मा (स्वयं) (हा ब्रह्म आहे) असे पक्के समजून (परिचीय), त ब्रह्मरूपाने राहा.


ब्रह्मरूप होण्यासाठी स्थूलदेह म्हणजे अन्नमय कोश म्हणजे मी' तसेच 'लिंग सूक्ष्म देह म्हणजे मी' ही बुद्धी/अहंकार सोडून द्यावयास हवा. नंतर 'ब्रह्म म्हणजे मी', असा निदिध्यास केला, तर मुमुक्ष -शिष्य ब्रह्मरूप होईल असे गुरू शिष्याला सांगतो.

या श्लोकाच्या तिसऱ्या चरणात "कीर्ति" आणि "मूर्ति" असे पाठभेद असल्यास ते शब्द-ब्रह्माचे विशेषण होतील.


(३९८) 'स्थूल देह म्हणजे मी', अशी बुद्धी असेपर्यंत 'ब्रह्म म्हणजे मी' अशी भावना उत्पन्न होऊन, मनुष्य मुक्त होत नाही.

शवाकारं यावद् भजति मनुजस्तावदशुचिः
परेभ्यः स्यात् क्लेशो जनन-मरण-व्याधि-निलयः ।
यदात्मानं शुद्धं कलयति शिवाकारमचलं
तदा तेभ्यो मुक्तो भवति हि तदाह श्रुतिरपि ॥ ३९८ ॥
जोपर्यंत माणूस हा प्रेताप्रमाणे असणाऱ्या (स्थूल) देहाचा आश्रय घेऊन राहतो म्हणजे स्थूलदेहाला मी-आत्मा-असे मानतो, तोपर्यंत तो अमंगल/अपवित्र असतो, तोपर्यंत त्याला दुसऱ्या व्यक्तीपासून क्लेश / ब्रास होतात आणि तोपर्यंत तो जन्म, मरण आणि रोग यांचा अधार होऊन राहतो. पण (तोच) मनुष्य जेव्हा शुद्ध, कल्याणरूप आणि निश्चल आत्म्याला जाणतो, तेव्हा तो त्या (क्लेश इत्यादींपासून) सुटतो. हे श्रुतीनेसुद्धा सांगितले आहे.


स्थूल इत्यादी शरीरांना आत्मा मानल्याने माणूस जन्म, मरण, इत्यादी कटकटीत सापडतो. याउलट जर त्याने आल्याला जाणले तर तो ऐहिक त्रासातून मुक्त होतो.

येथे कोणती श्रुती अभिप्रेत आहे हे कळत नाही. बहुधा पुढील वचने अभिप्रेत असावीत - “मघवन् मयं वा इदं शरीरं आत्तं मृत्युना ..... नवै सशरीरस्य सतः प्रियाप्रिययोः अपहतिः अस्ति । (छांदोग्य, ८.१२.१); तरति शोकं आत्मवित् ।


(३९९)

स्वात्मन्यारोपिताशेषाभास-वस्तु-निरासनः ।
स्वयमेव परब्रह्म पूर्णमद्वयमक्रियम् ॥ ३९९ ॥
स्वत:च्या (प्रत्यग) आत्म्यावर आरोपित केलेल्या आभासात्मक वस्तूंचा निरास केल्याने आपण स्वतः अद्वितीय, निष्क्रिय आणि पूर्ण परब्रह्म होऊन जातो.


प्रत्यग आत्मा हा ब्रह्मरूपच आहे. हे लक्षात असावे.


(४००) परमात्म्यावर मन एकाग्र झाले असता अध्यास/आभास राहत नाही -

समाहितायां सति चित्त-वृत्तौ परात्मनि ब्रह्मणि निर्विकल्पे ।
न दृश्यते कश्चिदयं विकल्पः प्रजल्प-मात्रः परिशिष्यते ततः ॥ ४०० ॥
परमात्मरूप निर्विकल्प ब्रह्माचे ठायी चित्ताची वृत्ती एकाग्र झाली असता (समाहित), हा (संसाररूप/विश्वरूप) (अयं) विकल्प भासत नाही, तर (विश्व म्हणजे) केवळ बोलण्याची गोष्ट म्हणून शिल्लक राहते.




GO TOP