|
शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’(१०२) हे सूक्ष्म शरीर परमात्म्याला / प्रत्यगात्म्याला करणाप्रमाणे/साधनाप्रमाणे आहे.
सर्व- व्यापृति-करणं लिंगमिदं सच्चिदात्मनः पुंसः ।
वास्यादिकमिव तक्ष्णस्तेनैवात्मा भवत्यसंगोऽयम् ॥ १०२ ॥
सुताराला ज्याप्रमाणे वाकस इत्यादी क्रियेची साधने असतात, त्याप्रमाणे चैतन्यस्वरूपी आत्म्याला (पुंसः) हे लिंगशरीर हे सर्व क्रिया करण्याचे साधन आहे. म्हणूनच (तेनैव) हा (आत्मा) असंग आहे.
लिंगशरीरात अंत:करण आहे. ते मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार या चार वृत्तींनी कार्य करते (श्लोक ९५) , ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आणि पाच प्राण हे सर्व सूक्ष्म शरीरात असतात आणि त्यांच्यामार्फत सर्व क्रिया घडत असतात. स्वप्नात साक्षीरूपाने प्रत्यगात्मा असतोच. त्याला लिंगशरीर हे करण/साधन बनते. करण आणि कर्ता हे वेगळे असतात. म्हणून लिंगशरीर या करणद्वारा झालेल्या कोणत्याही क्रियेत आत्मा गुंतत नाही, तो अलिप्त राहतो. यासाठी येथे सुतार व त्याची हत्यारे हे उदाहरण दिले आहे. येथे आत्मा हा 'जणू' कर्ता आहे असे समजावयास हवे. कारण तो मूलतः कर्ता नाही.
(१०३) सूक्ष्म शरीरातील इंद्रियांचे कोणतेही गुण प्रत्यगात्म्याला चिकटत नाहीत.
अंधत्व-मंदत्व-पटुत्व-धर्माः सौगुण्य-वैगुण्य-वशाद् हि चक्षुषः ।
बाधिर्य-मूकत्व-मुखास्तथैव श्रोत्रादि-धर्मा न तु वेत्तुरात्मनः ॥ १०३ ॥
डोळ्याच्या बरेवाईटपणामुळे अंधपणा, मंद दृष्टी, तीक्ष्ण दृष्टी (पटुत्व) हे डोळ्यांचे गुणधर्म आहेत. त्याप्रमाणेच बहिरेपणा, मुकेपणा इत्यादी मुख धर्म हे कान इत्यादींचे गुणधर्म आहेत; ते जाणणाऱ्या आत्म्याचे गुणधर्म नाहीत.
ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ही सूक्ष्म शरीरात असतात. सूक्ष्म शरीरातच द्रष्टा / साक्षी / ज्ञाता आत्मा असतो. (श्लोक १०१) . पण इंद्रियांचे कोणतेही बरेवाईट गुणधर्म आत्म्यात येत नाहीत; कारण तो असंग आहे (श्लोक १०१) .
(१०४) पाच प्रकारांनी कार्य करणाऱ्या, सूक्ष्म शरीरातील प्राणाचे कार्य असे आहे -
उच्छवास-निःश्वास-विजृंभण-क्षुत्-प्रस्पंदनायुक्रमणादिकाः क्रियाः ।
प्राणादि-कर्माणि बदंति तज्ज्ञाः प्राणस्य धर्मावशना-पिपासे ॥ १०४ ॥
उच्छ्वास, निश्वास, जांभई, भूक, हलणे/उडी मारणे (प्रस्पंदन) इत्यादी तसेच वर जाणे इत्यादी क्रिया या प्राण इत्यादींची कर्मे आहेत; भूक आणि तहान हे प्राणाचे गुणधर्म आहेत; असे तज्ज्ञ लोक म्हणतात.
प्राण, अपान, इत्यादी पाच प्रकारांनी प्राण शरीरातील श्वासोच्छवास इत्यादी कर्मे करीत असतो. तहान व भूक हे 'प्राणाचे गुणधर्म' आहेत, याचा अर्थ प्राणामुळे जिवंत प्राण्याला तहान व भूक लागते.
(१०५) सूक्ष्म शरीरातील अहंकारामुळे शरीर आणि इंद्रिये म्हणजे मी असा अभिमान येतो.
अंतःकरणमेतेषु चक्षुरादिषु वर्ष्मणि ।
अहमित्यभिमानेन तिष्ठत्याभास-तेजसा ॥ १०५ ॥
या डोळा इत्यादी इंद्रियांचे ठिकाणी तसेच शरीराचे ठिकाणी 'मी' असा अभिमान धरून अंतःकरण हे (चित्च्या) आभासाच्या तेजाने राहते.
अंतःकरण हे आपल्या वृत्तीनुसार मन इत्यादी होते. (श्लोक ९५) . त्यातील अहंकारामुळे शरीर म्हणजे मी, इंद्रिये म्हणजे मी असा अभिमान अंतःकरण मानू लागते. खरे म्हणजे अंतःकरण हे मूलतः अचेतन जड आहे. पण त्यावर चिदाभासाचा प्रकाश पडला की ते चेतनाप्रमाणे भासू लागते आणि चेतनाप्रमाणे कार्य करू लागते. उदा., आरशावर सूर्याचा प्रकाश पडला की आरसा प्रकाशमान होतो आणि तो प्रकाशाचे परावर्तन करून प्रकाश देण्याचे कार्य करतो. केवलाद्वैत वेदांताच्या मते अंतःकरणातील बुद्धीत चैतन्याचे/ प्रत्यगात्म्याचे प्रतिबिंब पडते, त्यालाच चिदाभास म्हणतात. चिदाभास पडताच अहंकार कार्य करू लागतो. पुढील श्लोकात या अहंकाराचे स्वरूप सांगितले आहे.
(१०६)
अहंकारः स विज्ञेयः कर्ता भोक्ताभिमान्ययम् ।
सत्त्वादि-गुण-योगेन चावस्था-त्रयमश्नुते ॥ १०६ ॥
(मी) कर्ता, (मी) भोक्ता असा अभिमान बाळगणारा हा जो आहे, तोच अहंकार आहे असे जाणावे. सत्त्व इत्यादी गुणांच्या योगाने तो तीन अवस्थाप्रत जातो.
मी कर्मे करणारा कर्ता आहे आणि कर्माची फळे भोगणारा भोक्ता आहे, असा अभिमान अहंकार धारण करतो. मूळ अज्ञानाजवळ (प्रस्तावनेतील अध्यारोप पहा) सत्त्व, रज आणि तम हे जे तीन गुण आहेत ते अहंकारात उतरतात. त्या गुणांच्या प्रकर्षानुसार तो सात्त्विक, राजस आणि तामस असा तीन प्रकारचा होतो. सात्त्विक व राजस अहंकार हा माणसाच्या जागृती व स्वप्नावस्थेत असतो तर निद्रावस्थेत तामस अहंकार असतो असे म्हणता येते.
(१०७) माणसाला सुखदुःख अहंकारामुळे होते; म्हणून ते त्याचे गुणधर्म मानले जातात.
विषयाणामानुकूल्ये सुखी दुःखी विपर्यये ।
सुखं च दुःखं च तद्धर्मः सदानंदस्य नात्मनः ॥ १०७ ॥
विषय अनुकूल असल्यास तो (अहंकार) सुखी होतो आणि ते उलट असल्यास (विपर्यय) तो दुःखी होतो. सुख आणि दुःख हे अहंकाराचे गुणधर्म आहेत, सदा आनंदरूप असणाऱ्या आत्म्याचे नव्हेत.
येथे विषय म्हणजे बाह्य विषय, परिस्थिती, मानसिक स्थिती असा व्यापक अर्थ अपेक्षित आहे. विषय अनुकूल असतील तर सुख होते आणि उलट असतील म्हणजे प्रतिकूल असतील तर दुःख होते. खरे म्हणजे सुख, दुःख मनाला होते. पण मन म्हणजे मी असा अभिमान धरून अहंकार सुखी/दुःखी होतो असे येथे म्हटले आहे. म्हणून ते अहंकाराचे गुणधर्म असे येथे म्हटले आहे. सदानंद शब्दाचे दोन अर्थ होतात – (१) नेहमी आनंद स्वरूप असणारा (सदा+आनंद) (२) सत् स्वरूप आणि आनंद स्वरूप असणारा (सत्+आनंद) आत्मा सदानंद आहे. (१०८) प्रिय गोष्ट माणसाला सुख देते. पण विषय हे मात्र स्वतः प्रिय नाहीत.
आत्मार्थत्वेन हि प्रेयान् विषयो न स्वतः प्रियः ।
स्वतः एव हि सर्वेषामात्मा प्रियतमो मनः ॥ १०८ ॥
विषय हे स्वत:मध्ये, स्वतः होऊनमाणसाला प्रिय असतात असे नाही. ते आत्म्यासाठी असल्याने ते प्रिय होतात. कारण आत्मा हाच स्वतः सर्व माणसांना सर्वांत जास्त प्रिय असतो.
माणसाला विषय प्रिय असतात म्हणून ते माणसाला आनंद देतात. पण विषय हे स्वतःच प्रिय अगर अप्रिय नसतात, ते माणसाच्या मनाला प्रिय अथवा अप्रिय वाटत असतात, म्हणून त्याला सुखदुःख देतात. कारण एकच विषय भिन्नकाळी प्रिय-अप्रिय बनून सुखदुःख देऊ शकतो. उदा., उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात थंडगार पाणी. पण माणसाला मूलभूतपणे प्रिय असा आत्मा आहे. आपण स्वतः आपल्याला जास्तीतजास्त प्रिय असतो. आपण स्वतः म्हणजे आपला अंतरात्मा हा आपणास सर्वांत प्रिय असतो. 'आत्मार्थत्येन' शब्दात 'आत्मा' म्हणजे मन वा अहंकार (श्लोक १०७) आणि दुसऱ्या ओळीतील आत्मा म्हणजे अंतरात्मा/प्रत्यगात्मा असा अर्थ आहे. (१०९) आत्मा हा स्वतःच प्रियतम असल्याने तो सतत स्वतःच आनंदरूप आहे.
तत आत्मा सदानंदो नास्य दुःखं कदाचन ।
यत् सुषुप्तौ निर्विषय आत्मानंदोऽनुभूयते । श्रुतिः प्रत्यक्षमैतिह्यमनुमानं च जाग्रति ॥ १०९ ॥
(आत्मा स्वतःच प्रियतम आहे) म्हणून आत्मा सदानंद आहे; त्याला कधीही दुःख होत नाही. कारण सुषुप्तीमध्ये विषयरहित असा आत्मानंद अनुभवला जात असतो. आणि जागृति अवस्थेत (त्यासाठी) श्रुति, प्रत्यक्ष, ऐतिह्य आणि अनुमान (अशी चार प्रमाणे) आहेत.
विषय जर मनाला प्रिय-अप्रिय असेल तर तो सुखदुःख देतो. आता, आत्मा हा स्वतःच प्रियतम असल्याने तो स्वतःच सदाचा आनंदरूप आहे. आणखी असे - आत्म्याचा आनंद हा कोणत्याही विषयाशी संबंधित नाही. असे म्हणण्याचे कारण असे की निद्रा अवस्थेत विषयही नसतात आणि मन / अहंकार हेही कार्यप्रवण नसतात. त्यामुळे त्यांचे प्रिय-अप्रिय आणि सुखदुःख झोपेत नसते. तथापि, निद्रा अवस्थेत आनंद असतो. म्हणून आपण म्हणतो, "मी आनंदाने झोपलो होतो." कोणताही विषय नसताना झोपेत आनंद असतो. झोपेत आत्मा द्रष्टा असतो, त्याचा आनंद प्रगट होतो आणि तो विषयरहित असतो. आणि तो माणसाकडून अनुभवला जातो.
आता झोपेत निर्विषय आत्मानंद असतो, हे जागृती अवस्थेत चार प्रमाणांनी सिद्ध करता येते ते असे - (१) श्रुति - निद्रेत आत्मा आनंदरूपाने प्रगट होतो असे श्रुति सांगते (यतत्रैतत् पुरुषः स्वपिति नाम सता सोम्य तदा संपन्नो भवति । छांदोग्य उपनि. ६.८.१) . (२) प्रत्यक्ष - झोपेत आनंदाचा अनुभव प्रत्यक्ष घेतलेला असतो. (३) ऐतित्य - म्हणजे परंपरा, रूढी, लोकांचे वचन, झोपेत आनंद झाला असे सर्वच जण सांगतात. (४) अनुमान - झोपेतून जागे झाल्यावर झोपेतील आनंदाची स्मृती येण्यास पूर्वीचा अनुभव अथवा ज्ञान आवश्यक असते. तेव्हा ज्याअर्थी झोपेतील सुखाची स्मृती येते त्याअर्थी झोपेत सुख झालेले होते. झोपेत बाह्य आणि आंतर-विषय नसतात आणि मन अहंकार कार्यप्रवण नसतात तरी झोपेत आनंद होतो, याचा अर्थच असा की निद्रावस्थेत प्रियतम अशा आत्म्याचा निर्विषय आनंद असतो. (११०) या जगात देह, विषय इत्यादी आहेत. पण हे जग आभासरूप आहे, असे सांगण्यास आता प्रारंभ होतो.
अव्यक्त-नाम्नी परमेश-शक्तिरनाद्यविद्या त्रिगुणात्मिका परा ।
कार्यानुमेया सुधियैव माया यया जगत् सर्वमिदं प्रसूयते ॥ ११० ॥
अनादी, अविद्या हे स्वरूप असणारी, त्रिगुणात्मक, श्रेष्ठ आणि अव्यक्त हे नाव असणारी माया ही परमेश्वराची शक्ती आहे. हे सर्व जग ती (मायाच) प्रसवली आहे. (जग या) कार्यावरून या मायेच्या अस्तित्वाचे अनुमान बुद्धिमान माणसाने करावे.
केवलाद्वैत वेदांतात सच्चिदानंद ब्रह्म हे एकमेव एक सत्यतत्त्व आहे. ते क्रियारहित आहे. त्यामुळे ते जगाचे कारण होत नाही. त्या ब्रह्माला अविद्या/माया ही उपाधी आली की ते निर्गुण ब्रह्म ईश्वर/परमेश्वर या स्वरूपात सगुण होते आणि अविद्या/माया ही त्याची शक्ती मानली जाते. तिला अव्यक्त असेही नाव दिले जाते आणि शुद्ध चैतन्याच्या/ब्रह्माच्या अधिष्ठानावर मायेकडून हे जग निर्मिले जाते असे मानले जाते. ही माया अनादी आहे. तिला कोणतेही कारण नाही आणि ती केव्हापासून आहे हे कुणालाच सांगता येत नाही. म्हणून ती अनादी आहे. ही माया अविद्यात्मक म्हणजे अज्ञानात्मक आहे; म्हणजे मायेमुळे ब्रह्माचे ज्ञान होत नाही. ही माया / अविद्या इंद्रियगम्य नाही; म्हणून तिला अव्यक्त असेही नाव दिले जाते. ही माया त्रिगुणात्मक आहे म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त आहे. माया ही शक्ती सर्वश्रेष्ठ आहे, ती अघटित घटना-पटू आहे. तीच हे जग निर्माण करते. ही माया अव्यक्त आहे, ती प्रत्यक्ष प्रमाणाने कळणारी नाही, तर तिचे अस्तित्व हे अनुमान प्रमाणाने जाणावयाचे आहे. हे अनुमान असे- प्रत्येक कार्याला कारण असते. जग हे एक कार्य आहे. त्याला कारण असले पाहिजे आणि ते कारण म्हणजे माया आहे; किंवा आणखी एक अनुमान असे - जग हे सुख, दुःख व मोह यांनी युक्त आहे. त्याचे कारण हे तीन निर्माण करणाऱ्या सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी युक्त हवे. हे कारण म्हणजे त्रिगुणात्मक माया. (१११) या मायेचे स्वरूप असे आहे: -
सन्नाप्यसन्नाप्युभयात्मिका नो भिन्नाप्यभिन्नाप्युभयात्मिका नो ।
सांगाप्यनंगा ह्युभयात्मिका नो महाद्भुतानिर्वचनीय-रूपा ॥ १११ ॥
ही माया अविद्या सत् नाही, असत्सुद्धा नाही तसेच सत् आणि असत् अशी दोन्ही प्रकारची नाही. ती ब्रह्मापेक्षा भिन्न, ब्रह्माशी अभिन्न अथवा भिन्न आणि अभिन्न अशी दोन्ही प्रकारची नाही. ती अंगासह तसेच अंगाविना नाही तसेच त्या दोनही प्रकारची नाही. ती महा अद्भुत आहे. ती अनिर्वचनीय स्वरूपाची आहे.
ही माया/अविद्या अनिर्वचनीय स्वरूपाची आहे, म्हणजे तिचे स्वरूप शब्दाद्वारे सांगता येत नाही, ते असे- ब्रह्माप्रमाणे माया सत्/नित्य नाही, तसेच सशाच्या शिंगाप्रमाणे ती असत्ही नाही. कारण तिच्यापासून जग हे कार्य उत्पन्न होते; आणि असत्पासून काही निर्माण होत नाही. ती सत्-असत् अशी दोन्हीही नाही; कारण एकाच मायेत/अविद्येत सत् आणि असत् हे परस्परविरोधी गुण असू शकत नाहीत. एवं माया ही सत् आणि असत् या शब्दांनी वर्णिता येत नाही. माया ही ब्रह्माला उपाधी म्हणून येते. ती ब्रह्मापेक्षा भिन्न ब्रह्माशी अभिन्न अथवा भिन्न-अभिन्न अशीही नाही. म्हणजे असे – "अहं बहु स्यां" हा ब्रह्माचा संकल्प म्हणजे माया असे म्हटले जाते. आता संकल्प म्हणजे ब्रह्म नव्हे, तरी तो संकल्प ब्रह्मापेक्षा भिन्न आहे असेही म्हणता येत नाही. तसेच भिन्न आणि अभिन्न हे परस्परविरोधी गुण एकाच मायेत असू शकत नसल्याने माया ही ब्रह्मापेक्षा भिन्न, ब्रह्माशी अभिन्न असू शकत नाही. म्हणून भिन्न आणि अभिन्न या शब्दांनी मायेचे वर्णन करता येत नाही. माया ही सांग (स+अंग) आहे. अंग म्हणजे अवयव, सांग म्हणजे अवयवाने युक्त. काया ही त्रिगुणात्मिका आहे (श्लोक ११०, ११२) , हे तीन गुण म्हणजे सत्त्व, रज आणि तम. या तीन गुणांनी युक्त असल्याने माया ही सांग आहे. तसेच हे तीन गुण स्वतंत्रपणे कार्य करू शकत असल्यामुळे, ते मायेचे अवयव मानता येतात. पण माया ही निरंग निरवयव/अवयवरहित आहे असेही म्हणता येते; कारण ती या तीन गुणांशी एकरूप असल्याने, ते तिचे अवयव ठरत नाहीत. आणखी असे - सांग आणि निरंग हे परस्परविरोधी गुण एकाच मायेत असू शकत असल्यामुळे ती सांग व निरंग दोन्ही आहे असेही म्हणता येत नाही. संक्षेपाने, मायेचे स्वरूप लौकिक शब्दांनी सांगता येण्यासारखे नसल्याने ती अनिर्वचनीय स्वरूपाची ठरते, माया ही महान् अद्भुत/आश्चर्य आहे. ती शब्दांनी सांगता येत नाही हेच अद्भुत/नवल आहे. आणखी असे की तिच्यामुळे अफाट विश्वाचा आभास निर्माण होतो हेही मोठे आश्चर्य आहे. (११२) ही त्रिगुणात्मिका माया ब्रह्मज्ञानाने नष्ट होऊन जाते.
शुद्धाद्वय-ब्रह्म विबोध-नाश्या सर्प-भ्रमो रज्जु-विवेकतो यथा ।
रजस्तमःसत्त्वमितिप्रसिद्धा गुणास्तदीयाः प्रथितैः स्वकार्यः ॥ ११२ ॥
रज्जूचे ज्ञान झाल्यावर ज्याप्रमाणे रज्जूवर भासणाऱ्या सर्पाच्या भ्रमाचा नाश होतो, त्याप्रमाणे शुद्ध आणि अद्वय अशा ब्रह्माच्या ज्ञानाने ही माया / अविद्या नष्ट होते (श. नष्ट होण्यास योग्य आहे) . मायेच्या स्वत:च्या प्रसिद्ध कार्यावरून तिचे सत्त्व, रज आणि तम हे जे तीन गुण आहेत ते प्रसिद्ध आहेत.
अंधूक प्रकाशात जमिनीवर पडलेल्या रजूवर सर्प भासला, पण रज्जू कळताच तो सर्पाचा भ्रम नष्ट होऊन जातो. त्याप्रमाणे ब्रह्माचे ज्ञान झाले की माया / अविद्या नष्ट होते, संपून जाते. श्लोक ११० मध्ये माया ही त्रिगुणात्मक आहे असे म्हटले होते. हे तीन गुण कोणते व ते कसे जाणून घ्यावयाचे ते आता सांगितले आहे. सत्त्व, रज आणि तम हे तीन गुण मायेचे आहेत आणि ते अनुमानाने जाणून घ्यावयाचे आहेत. ते असे - कार्याच्या गुणांवरून कारणाचे गुण कळतात. तसे तीन गुणांच्या कार्यांवरून हे तीन गुण कळून येतात. या तीन गुणांची कार्ये पुढे श्लोक ११३-१२१ या श्लोकांत दिलेली आहेत. त्या गुणांच्या कार्यांवरून हे गुण मायेत असले पाहिजेत असे अनुमान करावयाचे आहे.
(११३) रजोगुणाची कार्ये श्लोक ११३-११४ मध्ये दिलेली आहेत.
विक्षेप-शक्तिः रजसः क्रियात्मिका यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ।
रागादयोऽस्याः प्रभवंति नित्यं दुःखादयो ये मनसो विकाराः ॥ ११३ ॥
क्रिया या स्वरूपाची या मायेची/ अविद्येची विक्षेपशक्ती आहे; ती रजोगुणापासून आहे. त्या विक्षेपशक्ती पासून पुरातन अशी संसाराची प्रवृत्ती चालू राहते. राग / आसक्ती इत्यादी तसेच दुःख इत्यादी हे जे मनाचे विकार आहेत, ते नेहमी रजोगुणाच्या या विक्षेपशक्तीमुळे (अस्याः) उत्पन्न होतात.
रजोगुण चंचल आहे. तो काहीतरी क्रिया करीत असतो. या क्रियात्मक शक्तीला रजोगुणाची विक्षेपशक्ती जबाबदार आहे. ही विक्षेपशक्ती ब्रह्मांडात तसेच पिंडात -मानवी शरीरात- कार्य करीत असते. विक्षेपशक्तीमुळे प्राचीन काळापासून अफाट विश्वाचा उत्पाद झाला आहे (प्रस्तावनेतील अध्यारोप पहा.) या शक्तीमुळेच मानवी मन चंचल होते आणि मनात राग / आसक्ती, क्रोध, द्वेष इत्यादी विकार निर्माण होतात आणि त्या विकाराअंतीच दुःख, त्रास इत्यादी मनाला होतात.
(११४)
कामः क्रोधो लोभ-दंभावसूयाहंकारेर्ष्या-मत्सरायास्तु घोराः ।
धर्मा एते राजसाः पुंप्रवृत्तिर्यस्मादेषा तद्रजो बंध-हेतुः ॥ ११४ ॥
काम, क्रोध, लोभ, दंभ इत्यादी, असूया, अहंकार, ईर्ष्या, मत्सर इत्यादी भयंकर विकार आहेत. ते राजस -रजोगुणाचे धर्म आहेत. त्यांच्यामुळे माणसाची वाईट क्रियेकडे प्रवृत्ती होते; आणि त्यामुळे रजोगुण माणसाच्या बंधनाचे कारण ठरतो.
रजोगुणामुळे माणसाच्या मनात निर्माण होणारे घोर म्हणजे त्रासदायक विकार येथे दिले आहेत. काम म्हणजे इच्छा, राग, आसक्ती, दंभ म्हणजे ढोंगीपणा. असूया म्हणजे दुसऱ्याचे बरे सहन न होणे, मत्सर म्हणजे इतरांच्या चांगल्याचा हेवा वाटणे, ईर्ष्या म्हणजे इतरांपेक्षा वरचढ होण्याची प्रवृत्ती, या विकाराअंती माणूस बरीवाईट कर्मे करण्यास प्रवृत्त होतो. आणि त्या कर्मामुळे माणूसच जन्ममरणात सापडतो. जन्ममरणचक्र म्हणजेच संसार. या विकाराअंती रजोगुण हाच माणसाच्या संसारबंधनाचे कारण बनतो.
(११५) श्लोक ११५-११८ हे तमोगुणाबद्दल सांगतात.
एषावृतिर्नाम तमोगुणस्य शक्तिर्यया वस्त्ववभासतेऽन्यथा ।
सैषा निदानं पुरुषस्य संसृतेर्विक्षेपशक्तेः प्रवणस्य हेतुः ॥ ११५ ॥
ज्या शक्तीमुळे एखादी वस्तू वेगळी- दुसऱ्या वस्तूप्रमाणे भासते, ती ही आवरण नावाची शक्ती तमोगुणाची आहे. तीच शक्ती ही विक्षेपशक्तीला कार्यप्रवण करण्याचे कारण तसेच माणसाच्या संसाराचे कारण आहे.
तमोगुणाजवळ आवरण-शक्ती आहे. ही शक्ती ब्रह्मांडात तसेच पिंडातही कार्य करते, आवरणशक्ती एखाद्या वस्तूवर आवरण घालते, तिचे ज्ञान होऊ देत नाही त्यामुळे त्या वस्तूच्या अज्ञानाने त्या वस्तूवर वेगळीच वस्तू भासू लागते. वस्तू वेगळी वाटणे हे विक्षेपशक्तीमुळे घडते. म्हणून आवरणशक्ती ही विक्षेपशक्तीचे कारण बनते असे येथे म्हटले आहे. उदा., रज्जूवर अज्ञानाने आवरण पडले की तेथे विक्षेपशक्तीने रज्ज्जूऐवजी सर्प भासू लागतो. तमोगुणाच्या आवरणशक्तीमुळे ब्रह्माचे ज्ञान होत नाही; त्यामुळे विक्षेपशक्तीने ब्रह्मावर जगाचा आभास होऊ लागतो. या आभासात्मक जगात माणसाला अंतरात्मा कळत नाही. मग तो बरीवाईट कर्मे करून जन्ममरणाच्या चक्रात म्हणजे संसाराच्या बंधात सापडतो. अशाप्रकारे ही आवरणशक्ती पर्यायाने माणसाच्या संसाराचे कारण बनते. अशाप्रकारे रजोगुण (श्लोक ११४) आणि तमोगुण (श्लोक ११५) हे दोघेही माणसाच्या संसार बंधाचे कारण ठरतात.
(११६) तमोगुणाची ही आवरणशक्ती भल्याभल्यांनाही शिरजोर ठरते.
प्रज्ञावानपि पंडितोऽपि चतुरोऽप्यत्यंत-सूक्ष्मात्मदृग्
व्यालीढस्तमसा न वेत्ति बहुधा संबोधितोऽपि स्फुटम् । भ्रांत्यारोपितमेव साधु कलयत्यालंबते तद्गुणान् हंतासौ प्रबला दुरंत-तमसः शक्तिर्महत्यावृत्तिः ॥ ११६ ॥
या जगातील व्यवहारात एखादा पुरुष जरी बुद्धिमान असला, जरी पंडित असला, जरी चतुर असला, आणि जरी त्याची दृष्टि (आत्म-दृग्) अत्यंत सूक्ष्म गोष्टी पाहणारी असली, तरी तो (जेव्हा) तमोगुणाने झपाटलेला/पछाडलेला (व्यालीढ) होतो, तेव्हा त्याला पुष्कळ प्रकारांनी आणि स्पष्टपणाने कितीही समजावून सांगितले, तरी त्याला (खरी गोष्ट) कळत नाही (न वेत्ति) तमोगुणजन्य अज्ञानाने निर्माण झालेल्या भ्रांतीने (आवृत वस्तूवर) जे आरोपित केले आहे तेच त्याला योग्य/खरे (साधु) वाटते. आणि मग त्या आरोपित वस्तूच्या गुणांचा तो आश्रय घेतो. अरेरे (हंत) ! ज्याचा अंत/शेवट करणे अवघड आहे (दुरंत) अशा या तमोगुणाची ही अतिशय बलवान् (प्रबला) आवरणशक्ती ही महान्/शिरजोर आहे.
एखाद्या वस्तूवर आवरण पडले की ती वस्तू कळत नाही; या अज्ञानाअंती तेथे विक्षेपशक्तीमुळे दुसरीच वस्तू भासू लागते. ही भासमान वस्तू खरी नसते. जसे - रज्जूच्या अज्ञानाने रज्जूवर भासणारा सर्प खरा नसतो. तरी त्या विक्षेपजन्य आभासात्मक वस्तूला तथाकथित शहाणी, चतुर माणसेसुद्धा बळी पडतात. त्यांना समजावून सांगितले तरी ते त्यांना पटत नाही. उलट आवरणाने कितीही झाकलेल्या वस्तूवर विक्षेपाने भासणारी वस्तू सत्य आहे अशी त्यांची खात्री असते. म्हणून ते त्या आरोपित आभासात्मक वस्तूचे गुणधर्म खरे मानून त्यांचा आश्रय घेतात आणि तदनुरूप वागू लागतात. जसे - रज्जूवर भासणारा सर्प खरा आहे या खात्रीने हा साप चावेल या भीतीने माणूस पळू लागला. शहाणी माणसेसुद्धा आभासाला खरे मानून वागतात. हे पाहून शंकराचार्यांना वाईट वाटते आणि ते म्हणतात, "अहो ! तमोगुणाची ही आवरणशक्ती किती बलवान्, किती शिरजोर आहे हो !"
(११७)
अभावना वा विपरीत-भावना संभावना विप्रतिपत्तिरस्याः ।
संसर्ग-युक्तं न विमुंचति ध्रुवं विक्षेपशक्तिः क्षपयत्यजस्रम् ॥ ११७ ॥
या आवरण शक्तीच्या (अस्याः) संसर्गाने युक्त असा जो माणूस आहे, त्याला ज्ञानाचा अभाव (अभावना) , चुकीचे ज्ञान (विपरीत भावना) , वेगळे ज्ञान (संभावना) आणि विरोधी ज्ञान (विप्रतिपत्ति) हे मुळीच सोडत नाहीत. त्यानंतर विक्षेपशक्ती ही त्या माणसाला सतत त्रास देत राहते (क्षपयति).
येथील शब्दांचे अर्थ असेः - अभावना = ज्ञानाचा अभावः अयोग्य तर्क, विपरीत भावना चुकीचा तर्क, संभावना - अविश्वास, काल्पनिक ज्ञान, विप्रतिपत्ति = संशय; विरुद्ध ज्ञान, अभावना इत्यादींना माणूस आवरणशक्तीने बळी पडतो. त्यानंतर विक्षेपशक्तीमुळे मूळ वस्तूपेक्षा काहीतरी भलतेच तेथे आहे असे वाटते. अशाप्रकारे आवरण आणि विक्षेप या शक्तीमुळे माणसाला कोणतीही वस्तू आहे तशी कळत नाही; तेथे दुसरीच भासते.
(११८) तमोगुणाची आणखी काही वैशिष्ट्ये अशी --
अज्ञानमालस्यजडत्व-निद्रा-प्रमाद-मूढत्व-मुखास्तमोगुणाः ।
एतैः प्रयुक्तो न हि वेत्ति किंचित् निद्रालुवत् स्तंभवदेव तिष्ठति ॥ ११८ ॥
अज्ञान, आळशीपणा, जडत्व, झोप, प्रमाद, मूर्खपणा इत्यादी (मुखाः) तमाचे गुण आहेत. या गुणांनी प्रेरित झालेला माणूस काहीच जाणत नाही. झोपाळू माणसाप्रमाणे अथवा एखाद्या खांबाप्रमाणे तो (स्तब्ध, क्रियारहित) राहतो.
तमोगुणाच्या अज्ञान इत्यादी धर्मांनी भारलेला माणूस अडाणी होतो; त्याला काही कळेनासे होते. तो स्तब्ध, क्रियारहित होतो.
(११९) रज आणि तम या गुणांनी मिश्रित असा सत्त्वगुण आणि त्यांचा प्रभाव नसणारा शुद्धसत्त्वगुण यांचा विचार श्लोक ११९-१२१ मध्ये आहे.
सत्त्वं विशुद्ध जलवत् तथापि ताभ्यां मिलित्वा शरणाय कल्पते ।
यत्रात्म-बिंबःप्रतिबिंबितः सत् प्रकाशयत्यर्क इवाखिलं जडम् ॥ ११९ ॥
मुळात सत्व हा गुण शुद्ध पाण्याप्रमाणे अगदी शुद्ध आहे. परंतु तो त्या रज, तम या दोन गुणांत मिसळल्यावर तो त्यांना शरण जातो. त्या सत्त्वगुणात प्रतिबिंबित झालेले आत्म्याचे बिंब हे सूर्याप्रमाणे सर्व जड/अचेतन पदार्थांना प्रकाशित करते.
अविद्येमध्ये/अज्ञानामध्ये सत्त्वगुण आहे. तो मुळातच अत्यंत स्वच्छ आहे. स्वच्छ आरशात ज्याप्रमाणे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे त्या शुद्ध सत्त्वगुणात आत्म्याचे प्रतिबिंब पडते आणि ते प्रतिबिंब सर्व अचेतन पदार्थांना उजळून टाकते. पण जेव्हा तो सत्त्वगुण त्या रज आणि तम या गुणांच्या संपर्कात/प्रभावाखाली येतो, तेव्हा तो त्यांना शरण जातो म्हणजे तो शुद्ध राहत नाही, तर तो मिश्र अथवा अशुद्ध सत्त्व गुण होतो. येथे "शरणाय" या शब्दाचे स्थानी “सरणाय" असा पाठभेद आहे. सरणाय म्हणजे संसरणाय म्हणजे जन्ममरण यांना अनुकूल होतो आणि तो माणसाला बंधनात पाडतो. भगवद्गीता १४.६ पहा : सत्त्वं ... सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ" (१२०)
मिश्रस्य सत्त्वस्य भवंति धर्मास्त्वमानिताद्या नियमा यमाद्याः ।
श्रद्धा च भक्तिश्च मुमुक्षुता च देवी च संपत्तिरसन्निवृत्तिः ॥ १२० ॥
रज आणि तम या गुणांशी मिश्रित झालेल्या सत्त्वाचे गुण असे होतात : - अभिमानाचा अभाव इत्यादी, नियम, यम इत्यादी, श्रद्धा, भक्ती, मुमुक्षुता, दैवी संपत्ती आणि वाईट/ अशाश्वत (असत्) गोष्टींपासून परावृत्ती.
माणसात जेव्हा मिश्र सत्त्वगुण प्रभावी असतो, तेव्हा त्याचे ठिकाणी पुढील गोष्टी प्रगटतात : - अमानिताद्याः - अभिमानाचा अभाव इत्यादी. आद्य शब्दाने दंभाचा अभाव इत्यादी; यम, नियम, श्रद्धा (श्लोक २६) , भक्ती : - गुरू आणि ईश्वर या विषयीचे निरपेक्ष प्रेम, मुमुक्षुता (श्लोक २८ पहा) दैवी संपत्ती - ही भगवद्गीतेने १६.१-३ मध्ये दिली आहे, असत्-निवृत्तिः - वाईट/अशाश्वत गोष्टी, विचार, क्रिया इत्यादींपासून निवृत्ती.
(१२१)
विशुद्धस्य सत्त्वस्य गुणाः प्रसादः स्वात्मानुभूतिः परमा प्रशांतिः ।
तृप्तिः प्रहर्षः परमात्म-निष्ठा यया सदानंद-रसं समृच्छति ॥ १२१ ॥
(मनाची) प्रसन्नता, स्वतःच्या आत्म्याचा अनुभव, (मनाची) अतिशय शांती, तृप्ती, अतिशय आनंद आणि जिच्या योगाने नेहमी आनंदाची चव (रस) प्राप्त होते, अशी परमात्म्यावरील निष्ठा असे हे शुद्धसत्त्वाचे गुण (= परिणाम, कार्ये) आहेत.
अशुद्ध सत्त्वगुण हा संसारात पाडणारा आहे (श्लोक ११९) . शुद्ध सत्त्व ज्याला नित्य सत्त्वगुण असेही म्हणतात, हा चौथा गुण आहे आणि तो परमात्म-निष्ठा आणि परमात्म्याचा अनुभव देणारा आहे. त्यामुळे माणसाला परमात्म्याच्या आनंदाची - ब्रह्मानंदाची-चव कळते. तसे झाल्यावर मन हे शांत, प्रसन्न, तृप्त आणि अतिशय आनंदित होते.
(१२२) स्थूल व सूक्ष्म शरीर ही आत्म्याची उपाधी बनतात. केवलाद्वैत वेदांतात "कारण" नावाने शरीर मानलेले आहे आणि तेही आत्म्याची उपाधी बनते.
अव्यक्तमेतत त्रिगणर्निरुक्तं तत कारणं नाम शरीरमात्मनः ।
सुषुप्तिरेतस्य विभक्त्यवस्था प्रलीन-सर्वेंद्रिय-बुद्धि-वृत्तिः ॥ १२२ ॥
हे अव्यक्त तीन गुणांनी बनलेले आहे असे म्हटले जाते; ते अव्यक्त हे आत्म्याचे कारण (नाव असणारे) शरीर आहे. या कारणशरीराची सुषुप्ती ही अवस्था (जागृती आणि स्वप्न यांपेक्षा) वेगळी आहे. सुषुप्ती अवस्थेत सर्व दहा इंद्रिये आणि बुद्धी (अंतःकरण) यांच्या वृत्ती (कार्य) थांबलेली असतात (प्रलीन) .
येथे ज्या अव्यक्ताचा उल्लेख आहे त्याचा निर्देश मागे श्लोक ११० मध्ये आहे. हे अव्यक्त म्हणजेच अविद्या त्रिगुणात्मक आहे असे तेथे म्हटलेले होते. ही जी अव्यक्त नावाची (अविद्या/अज्ञान) शक्ती आहे तीच अध्यस्त ब्रह्मांडात आणि पिंडात आत्म्याची उपाधी बनते. तिलाच कारणशरीर म्हणतात. (प्रस्तावनेतील अध्यारोप पहा.) पिंडात - मानवी शरीरात - हे कारणशरीर निद्रेमध्ये असते. निद्रा/सुषुप्ती ही अवस्था जागृती आणि स्वप्न या अवस्थांपेक्षा वेगळी आहे. जागृती अवस्थेत स्थूल देह, इंद्रिये आणि अंतःकरण हे सर्व कार्यप्रवण असतात. स्वप्नामध्ये फक्त अंतःकरण कार्यप्रवण असते. सुषुप्ती अवस्थेत स्थूल आणि सूक्ष्म देह कार्य करीत नाहीत. म्हणून सुषुप्ती अवस्थेत देह, इंद्रिये, बुद्धी (अंतःकरण) हे सर्व लीन होतात म्हणजे निष्क्रिय होतात. सुषुप्ती अवस्थेत अज्ञान असते, तेच आत्म्याचे कारण शरीर आहे. सुषुप्ती अवस्था पुढीलप्रमाणे असते. (१२३)
सर्व-प्रकार-प्रमिति-प्रशांति-बीजात्मनावस्थितिरेव बुद्धेः ।
सुषुप्तिरेतस्य किल प्रतीतिः किंचिन्न वेद्मिति जगत्-प्रसिद्धेः ॥ १२३ ॥
सर्व प्रकारच्या ज्ञानांचा (प्रमिति) लय (प्रशांती) आणि बुद्धीने स्वतःच्या रूपात (निजात्मना) बीजरूपाने राहणे म्हणजेच सुषुप्ती आहे. (या सुषुप्तीमध्ये) "मी काही जाणले नाही" या स्वरूपात या अज्ञानाची (एतस्य) प्रसिद्धी ही खरोखर (किल) जगात प्रसिद्ध आहे.
सुषुप्तीमध्ये देह, इंद्रिये आणि अंतःकरण हे सर्वच निष्क्रिय असल्यामुळे बाह्य जगातील तसेच स्वप्नातील पदार्थांचे कसलेही ज्ञान झोपेत नसते; तेथे 'अज्ञान' असते. 'मी झोपेत काही जाणले नाही, मला झोपेत काही कळले नाही' अशाप्रकारच्या माणसाच्या जागृतीतील उद्गारांवरून झोपेत अज्ञान होते हे कळते; झोपेतील अज्ञानाच्या ज्ञानाची स्मृती जागृती-अवस्थेत येते. येथे बुद्धी हा शब्द 'अंत:करण' या अर्थाने वापरला आहे. झोपेत अंतःकरण नष्ट होऊन जात नाही. तर ते सूक्ष्म बीजरूपात, निष्क्रिय स्वरूपात असतेच. जागृति अवस्था आली की ते पुनः कार्यप्रवण होते. (१२४) श्लोक ७४ पासून सुरू झालेल्या अनात्म पदार्थाच्या निरूपणाचा समारोप पुढील श्लोक १२४ मध्ये आहे.
देहेंद्रिय-प्राण-मनोऽहमादयः सर्वे विकारा विषयाः सुखादयः ।
ब्योमादि-भूतान्यखिलं च विश्वमव्यक्त-पर्यंतमिदं ह्यनात्मा ॥ १२४ ॥
तीनही देह, दहाही इंद्रिये, प्राण, मन, अहंकार इत्यादी, सर्व काम, क्रोध इत्यादी विकार, सर्व सुख इत्यादी, सर्व विषय, आकाश इत्यादी स्थूल आणि सूक्ष्म भूते, किंबहुना अव्यक्तापर्यंतचे (अविद्येपर्यंतचे) संपूर्ण विश्व हे खरोखर (हि) अनात्मा आहे.
आत्मा हा एकमेव एक, नित्य, निर्विकार, निराकार, निरवयव आहे, आत्मा नव्हे तो अनात्मा. आत्म्याखेरीज दुसरे असे जे काही दिसते / भासते / आहे असे वाटते ते सारे आत्मा नसल्याने ते अनात्मा आहे. उदा., तीन देह, इत्यादी. विषय म्हणजे शब्द, स्पर्श इत्यादी बाह्य विषय. सुखादयः म्हणजे सुख, दुःख इत्यादी मानसिक विकार, संक्षेपाने सांगायचे झाल्यास अव्यक्त/अविद्या/अज्ञान येथपासून ते सर्व गोष्टींसह संपूर्ण विश्व हे अनात्मा आहे.
(१२५) सर्व अनात्मा असत्, मिथ्या आहे.
माया माया-कार्यं सर्वं मददादि-देह-पर्यंतम् ।
असदिदमनात्मकं विद्धि मरु-मरीचिका-कल्पम् ॥ १२५ ॥
माया (अविद्या) आणि महत् इत्यादीपासून देहापर्यंतचे सर्व मायेचे कार्य हे अनात्मा या स्वरूपाचे असून, ते मृगजळाप्रमाणे असत्/मिथ्या आहे.
माया म्हणजे अव्यक्त, अविद्या (श्लोक ११०) अथवा अज्ञान. येथे सांख्यदर्शनाचे 'महत्' तत्व अभिप्रेत नाही, तर केवलाद्वैत वेदांतातील 'बुद्धी' हे तत्त्व. सर्व विश्व हे मायेचे कार्य आहे आणि ते अनात्म (श्लोक १२४) आहे. हे विश्व मायेमुळे / अविद्येमुळे आत्म्यावर आरोपित/अध्यस्त आहे (प्रस्तावना पहा). ते आत्मा नसल्याने ते अनात्मा आहे आणि ते आत्म्याप्रमाणे सत् नसल्याने ते असत् म्हणजे मिथ्या, अनित्य आहे. कारण आत्मा हा एकमेव सत् आहे.
|