शंकराचार्यकृत् ’विवेकचूडामणि’

(५१)

को नाम बंधः कथमेष आगतः कथं प्रतिष्ठास्य कथे विमोक्षः ।
कोऽसावनात्मा परमः स्व आत्मा तयोर्विवेकः कथमेतदुच्यताम् ॥ ५१ ॥
बंध म्हणजे काय आहे ? हा बंध कोठूना कसा आला आहे ? त्याची स्थिती/आधार काय आहे ? त्या बंधातून सुटका कशी होते ? हा अनात्मा कोण आहे ? जीवाचे स्वरूपभूत (स्वः) असा परमात्मा हा तरी कोण आहे ? त्या आत्मा आणि अनात्मा दोहोंतील विवेक कसा करावयाचा ? हे सर्व आपण सांगावे.


देह-बंध (श्लोक ४८) आणि अनात्म-बंध (श्लोक ४९) असे शब्द गुरूने वापरले होते. त्यांना अनुसरून बंध व अनात्मा यांच्याविषयी शिष्याचे प्रश्न आहेत. जीव - शिष्य हा परमात्मा असे गुरू म्हणाला होता (श्लोक ४९), त्याला अनुसरूनही शिष्याचा प्रश्न आहे. ''वेदांतार्थ-विचार'' (श्लोक ४७) याला धरून शिष्य विवेक शब्द वापरीत आहे.


(५२) बंधातून सुटण्याची शिष्याची इच्छा आहे हे जाणून गुरू प्रथम त्याची स्तुती करतो.

धन्योऽसि कृत-कृत्योऽसि पावितं ते कुलं त्वया ।
यदविद्या-बंध-मुक्त्या ब्रह्मीभवितुमिच्छसि ॥ ५२ ॥
(हे शिष्या) ज्याअर्थी अविद्येच्या/अज्ञानाच्या बंधनातून मुक्त होऊन, तू ब्रह्म होण्याची इच्छा करीत आहेस, त्याअर्थी तू धन्य आहेस आणि कृतकृत्य आहेस. तू तुझे कुळ पावन केले आहेस.


अविद्येच्या बंधनातून सुटलेला ब्रह्मच होतो. तसे होण्याची इच्छा शिष्याला झाल्याने गुरु शिष्याचे कौतुक करतो. अद्यापि शिष्य धन्य आणि कृतकृत्य झालेला नाही; पण पुढे तो ब्रह्मज्ञानाने तसा होणार आहे. आणि तो ब्रह्म झाल्यावर मगच त्याचे कुळ पावन होणार आहे. भविष्यातील या गोष्टी जणू आताच घडल्या असे मानून गुरू तसे म्हणत आहे. हे लक्षात घ्यावे.


(५३) अज्ञानाने जीवाने स्वतःला बंधनात पाडले आहे. साहजिकच बंधनातून सुटण्याचा प्रयत्‍न जीवाने स्वतःच करावयास हवा. ही गोष्ट दृष्टीपुढे ठेवून गुरू म्हणतो -

ऋण-मोचन-कर्तारः पितुः संति सुतादयः ।
बंध-मोचन-कर्ता तु स्वस्मादन्यो न कश्चन ॥ ५३ ॥
पुत्र इत्यादी आपल्या पित्याची ऋणातून सुटका करणारे असतात. याउलट बंधातून सुटका करण्याचे कार्य करणारा स्वतःखेरीज अन्य कोणी नाही.


धर्मशास्त्रे सांगतात की प्रत्येक माणूस काही ऋणे-ऋणांची बंधने घेऊन जन्माला येतो. उदा., देव-ऋण, पितृ-ऋण, इत्यादी. अपत्य निर्माण करून बापाला पितृ-ऋणातून सोडविण्याचे कार्य पुत्र करतो. समजा माणसाला सावकार इत्यादींचे ऋण असेल तर ते फेडण्याचे कार्य मुलगा वा इतर नातेवाईक करू शकतात. पण जर आपणच आपला बंध निर्माण केला असेल, तर तो आपणच सोडवावयास हवा. उदा., आपण आपले पाय बांधले असतील तर ते आपणच सोडवावयास हवेत. स्वतःच्या अज्ञानाने जीव संसाराच्या बंधात पडला आहे. तेव्हा त्यानेच आत्मज्ञान मिळवून ते अज्ञान आणि अज्ञान-जन्मबंध दूर करावयास हवा. म्हणूनच एका साधूने म्हटले आहे, 'आपुली आपण करा सोडवण' हा मुद्दा स्पष्ट करण्यास पुढील ५४-५५ श्लोकांत काही उदाहरणे दिली आहेत.


(५४)

मस्तक-न्यस्त-भारादेर्दुःख मन्यैर्निवार्यते ।
सुधादि-कृत-दुःखं तु विना स्वेन न केनचित् ॥ ५४ ॥
आपल्या मस्तकावर आपण वा अन्य कुणी ठेवलेला भार हा दुसऱ्याकडून दूर करता येतो, पण आपल्याला जर भूक इत्यादीमुळे दुःख होत असेल तर ते स्वतःखेरीज अन्य कुणाकडूनही दूर केले. जाऊ शकत नाही.


बाहेरचा दुःखभार हा दुसऱ्याकडून निवारला जाऊ शकतो. पण भुकेसारखा दुःखाचा आंतरभार हा आपणच दूर करवयास हवा. इतरांनी अन्नपाणी सेवन केल्याने आपली तहानभूक दूर होत नाही. तद्वत् आपल्या अविद्येने आलेला बंध हा आपणच अविद्या दूर सारून निवारावयास हवा.


(५५)

पथ्यमौषध-सेवा च क्रियते येन रोगिणा ।
आरोग्य-सिद्धिर्दृष्टास्य नान्यानुष्ठित-कर्मणा ॥ ५५ ॥
जो रोगी मनुष्य औषध घेऊन पथ्य करतो त्यालाच आरोग्य प्राप्त होते असे या जगात दिसून येते. दुसऱ्याने केलेल्या औषध व पथ्य यांच्या सेवन कर्मांनी त्याला आरोग्य प्राप्त होत नाही.


रोग्याने स्वतःच औषध घेऊन व पथ्य करून आपला रोग दूर करावयाचा असतो. त्याप्रमाणे आपल्या अविद्येने आलेला बंध आपणच अविद्या बाजूस सारून तोडावयाचा असतो.

आत्मवस्तूचा आपल्या अज्ञानाने आलेला बंध आपणच आत्मज्ञान मिळवून दूर करावयाचा आहे.


(५६)

वस्तु-स्वरूपं स्कूट-बोध-चक्षुषा स्वेनैव वेद्य न तु पंडितेन ।
चंद्र-स्वरूपं निज-चक्षुषैव ज्ञातव्यमन्यैरवगम्यते किम् ॥ ५६ ॥
आत्मवस्तू चे स्वरूप हे साक्षात्कारजन्य ज्ञानरूपी डोळ्याने आपणच स्पष्टपणे जाणून घ्यावयाचे आहे; ते अन्य कुणी पंडिताने जाणले तर त्याचा काही उपयोग नाही. जसे - चंद्राचे स्वरूप हे आपणच आपल्या डोळ्यांनी पहावयास हवे. इतर लोकांच्या डोळ्यांनी पाहिलेले चंद्राचे स्वरूप हे आपणाला कळेल काय ?(५७)

अविद्या-काम-कर्मादि-पाश-बंधं विमोचितुम् ।
कः शक्नुयात् विनात्मानं कल्प-कोटि-शतैरपि ॥ ५७ ॥
अविद्या, काम, कर्म इत्यादी पाशांचा बंध सोडविण्यास स्वतःच्या आत्माज्ञाना विना अन्य कोण बरे शेकडो कोट्यवधी कल्पांती तरी समर्थ होईल काय ?


आत्म्याचे अज्ञान/अविद्या, त्याअंती काम/इच्छा/आसक्ती त्यामुळे कर्मे इत्यादी अंती येणारा संसाराचा पाश-बंध हा आत्मज्ञानाविना तुटत नाही. शेकडो कोट्यवधी कल्पे आत्मज्ञानाविना गेलीतरी आत्मज्ञानाविना अविद्या इत्यादी नष्ट होऊन संसाराचा पाश तुटत नाही. कल्प हा फार प्रदीर्घ काळ आहे. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस हा काळ ४,३२, ००,००,००० इतकी मानवी वर्षे आहे असे म्हणतात.


(५८) संसारबंधाचा नाश म्हणजे मोक्ष हा केवलाद्वैताने सांगितलेल्या जीव आणि प्राण यांच्या ऐक्यज्ञानाविना प्राप्त होत नाही.

न योगेन न सांख्येन कर्मणा नो न विद्यया ।
ब्रह्मात्मैकत्व-बोधेन मोक्षः सिध्यति नान्यथा ॥ ५८ ॥
योग, सांख्य, नानाप्रकारची कर्मे, अनेक प्रकारच्या लौकिक विद्या यांच्यामुळे मोक्ष - संसारबंधातून सुटका प्राप्त होत नाही. तर केवलाद्वैतप्रणीत जीव-आत्मा आणि ब्रह्म यांच्या ऐक्यज्ञानानेच मोक्ष सिद्ध होतो, अन्य कशानेही नाही.


सांख्य म्हणजे सांख्यदर्शन. ते प्रकृती व पुरुष असे द्वैत मानते; जगाचा कर्ता ईश्वर मानीत नाही. त्याचेच अनुकरण पतंजलिप्रणीत योगदर्शन करते. या सांख्य व योग यांनी मोक्ष मिळत नाही. इष्टापूर्त सारख्या वैदिकी आणि लौकिकी कर्मांनी मोक्ष हा साध्य नाही. वास्तुविद्या इत्यादी लौकिकी विद्यांनीही मोक्ष मिळत नाही, तर केवलाद्वैत वेदांताने सांगितलेल्या जीव-आत्मा आणि ब्रह्म यांच्या ऐक्याच्या ज्ञानाने मोक्ष सिद्ध होतो. केवलाद्वैतवेदांताने जो भोग सांगितला आहे त्यासाठी सर्ववेदांत-सिद्धांत-सारसंग्रह मधील ८०७-८१६ श्लोक पहा.


(५९) कर्मे आणि विद्या यांनी मोक्ष मिळत नाही हे पुनः सांगितले आहे.

वीणाया रूप-सौंदर्यं तंत्री-वादन-सौष्ठवम् ।
प्रजा-रंजन-मात्रं तन्न साम्राज्याय कल्पते ॥ ५९ ॥
वीणेचे रूपसौंदर्य, तिच्या तारा छेडण्यातील कौशल्य, हे लोकांचे फक्त मनोरंजन करते. त्यामुळे साम्राज्याची प्राप्ती होत नाही. एखादा राजा आहे अथवा वादक आहे. तो सुंदर वीणा सुंदर वाजवितो. वीणावादन ऐकून दरबारी लोकांचे मनोरंजन होईल. परंतु त्यामुळे त्यांना साम्राज्य मिळणार नाही.(६०)

वाग्वैखरी शब्द-झरी शास्त्र-व्याख्यान-कौशलम् ।
वैदुष्यं विदुषां तद्‌वद् मुक्तये न तु मुक्तये ॥ ६० ॥
विद्वानांची वैखरी वाणी, शब्दांचा (अस्खलित) प्रवाह, शास्त्रीय विषय स्पष्ट करून सांगण्याचे कौशल्य आणि विद्वत्ता हे सर्व लौकिक भोगाला उपयोगी पडणारे आहेत, मुक्तीसाठी उपयोगी नाहीत. वैखरी आणि शब्दझरी हे शब्द विद्वानांशी न जोडता स्वतंत्रपणे घेता येतील. परा, पश्यंती, मध्यमा आणि चौथी वाणी वैखरी आहे. या सर्वांनी द्रव्य मिळून जगात भोग मिळतील पण मोक्ष मात्र मिळणार नाही.


शास्त्राध्ययन महत्त्वाचे नसून, परतत्त्वाचे ज्ञान महत्त्वाचे आहे.


(६१)

अविज्ञाते परे तत्त्वे शास्त्राधीतिस्तु निष्फला ।
विज्ञातेऽपि परे तत्त्वे शास्त्राधीतिस्तु निष्कला ॥ ६१ ॥
आत्मा/ब्रह्म हे पराश्रेष्ठ तत्त्व कळले नाही तर शास्त्राचे अध्ययन हे निष्कळ आहे. तसेच परतत्त्व जाणल्यावरही शास्त्राचा अभ्यास निष्कळ आहे.


आत्मा/ब्रह्म हे श्रेष्ठ तत्त्व कळले नसेल तर वेद, शास्त्रे इत्यादींचे नुसते शाब्दिक ज्ञान निरुपयोगी आहे. शास्त्राध्यनाची परिणती आत्म्याच्या साक्षात्कारात झाली तर ती सफळ ठरते. तसेच ब्रह्म हे परतत्त्व कळले तर शास्त्राध्ययन करण्याची जरुरी राहतच नाही; कारण शास्त्राध्ययनाने इष्ट तत्त्व साध्य झाले आहे. याचा अर्थ असा नव्हे की आत्मज्ञानापूर्वी शास्त्राध्ययन नको आहे. श्लोक २६ इत्यादीमध्ये अपेक्षित असल्याप्रमाणे ते आवश्यक आहे, पण त्याची परिणती आत्म-साक्षात्कारात व्हावयास हवी.


(६२) शास्त्रांच्या अध्ययनाने माणूस जर शब्दांच्या खेळात अडकला तर ते उपयोगी नाही. तसे केल्याने आत्मज्ञान होत नाही.

शब्द-जालं महारण्य चित्त-भ्रमण-कारणम् ।
अतः प्रयत्‍नाज्ज्ञानातव्य तत्त्वज्ञात् तत्त्वमात्मनः ॥ ६२ ॥
शब्दांचे जंजाळ हे मोठे अरण्य आहे. त्यात शिरणाऱ्या मनाला भांबावून सोडण्याचे ते कारण बनते. म्हणून आत्मतत्त्व जाणणाऱ्या माणसाकडून आत्म्याचे खरे स्वरूप (तत्त्व) प्रयत्‍नपूर्वक जाणून घ्यावयास हवे.


व्यवहारात काही माणसे शब्दांचा फुलोरा फुलवितात. शास्त्रांचे अध्ययन - अध्यापन करणारी माणसेही शब्दांचे जंजाळ निर्माण करतात. हे शब्द-जंजाळ घनदाट अरण्याप्रमाणे आहे. दाट अरण्यात वाट न सापडल्याने मनाचा गोंधळ होतो. तसे शब्दाच्या जंजाळात अडकल्यास मनाचा गोंधळ होतो आणि खरे काय ते कळेनासे होते. म्हणून शब्दांचे जंजाळ बाजूला सारून आपले साध्य जो आत्मा त्याचे खरे स्वरूप जाणून घेणे आवश्यक ठरते. हे ज्ञान आत्मतत्त्व जाणणाऱ्या माणसाकडून मिळवावे लागते आणि त्यासाठी प्रयत्‍नही करावा लागतो.


(६३)
अज्ञानामुळे बंध आहे (श्लोक ४८, ४९, ५०). या अज्ञानावर सापाचे रूपक करून त्या सर्प-विषाला उतारा कोणता ते आता सांगितले आहे.

अज्ञान-सर्प-दष्टस्य ब्रह्म-ज्ञानौषधं विना ।
किमु वेदैश्च शास्त्रैश्च किमु मंत्रैः किमोषधैः ॥ ६३ ॥
अज्ञानरूपी साप ज्याला चावला आहे, त्याला ब्रह्मज्ञानरूपी औषधाशिवाय वेद, शास्त्रे, मंत्र (अथवा अन्य) औषधे यांचा काय उपयोग होईल बरे ?


येथील अज्ञान हे ब्रह्मविषयक अज्ञान आहे. त्या अज्ञानावर सर्पाचे रूपक केले आहे. ब्रह्माचे अज्ञान नष्ट करण्यास ब्रह्माचे ज्ञानच उपयोगी आहे अन्य कशाचाही उपयोग होणार नाही. येथे वेद व शास्त्र यांचा अर्थ वेगळ्या प्रकाराने घ्यावयास हवा. कारण मागे, श्लोक ६, ४७, ४८ इत्यादीमध्ये सांगितल्याप्रमाणे ब्रह्मज्ञान हे उपनिषदे आणि केवलाद्वैत वेदांतशास्त्र यावरूनच होते. तेव्हा उपनिषदे सोडून वेदाचे कर्मकांड आणि केवलाद्वैतशास्त्र सोडून अन्य शास्त्रे असा अर्थ घेणे आवश्यक ठरते.


(६४)
ब्रह्माच्या केवळ शाब्दिक ज्ञानाने मोक्ष मिळत नाही.

न गच्छति विना पानं व्याधिरौषध-शब्दतः ।
विना परोक्षानुभवं ब्रह्म-शब्दैर्न मुच्यते ॥ ६४ ॥
औषधाचे सेवन केल्याशिवाय केवळ 'औषध' शब्दाच्या उच्चाराने रोग दूर होत नाही. (त्याप्रमाणे ब्रह्माचा) साक्षात् अनुभव आल्याशिवाय केवळ 'ब्रह्म' शब्दाच्या उच्चारांनी माणूस संसारातून सुटत नाही.


ब्रह्म हे अंतिम तत्त्व आहे. ब्रह्म आणि जीव यांच्या एकत्वाच्या ज्ञानाने मोक्ष मिळतो (श्लोक ५८). हे एकत्वाचे ज्ञान साक्षात् /प्रत्यक्ष अनुभवास यावयास हवे. केवळ 'ब्रह्म' शब्द अनेकदा उच्चारून अथवा 'मी ब्रह्म आहे', जीव ब्रह्म आहे असे तोंडाने म्हणून उपयोग नाही. ब्रह्माचा निदिध्यास होऊन तसा अनुभव आला तरच मोक्ष मिळणार आहे. हीच गोष्ट वेगळ्या शब्दांत श्लोक ६५ मध्ये सांगितली आहे.


(६५)

अकृत्वा दृश्य-बिलयमज्ञात्वा तत्त्वमात्मनः ।
बाह्य-शब्दैः कुतो मुक्तिरुक्तिमात्र-फलैर्वृणाम् ॥ ६५ ॥
दृश्य जगाचा निरास न करता आणि आत्म्याचे खरे स्वरूप न जाणता उच्चार एवढेच फळ असणाऱ्या बाह्य शब्दांनी मुक्ती कोठून मिळणार ?


दृश्याचा म्हणजे दृश्य जगाचा विलय म्हणजे निरास म्हणजेच दृश्यातील आसक्ती व अहंकार यांचा त्याग होय. आत्माचे/ब्रह्माचे खरे स्वरूप जाणून घेणे हेही महत्त्वाचे आहे. नुसते तोंडाने 'मी ब्रह्म आहे' असे उच्चारून मोक्ष मात्र मिळणारा नाही. यासाठी एक दृष्टांत पुढील श्लोकात दिला आहे.


(६६)

अकृत्वा शत्रु-सहारमगत्वाखिल-भू-श्रियम् ।
राजाहमिति शब्दानो राजा भवितुमर्हति ॥ ६६ ॥
शत्रूंचा संहार न करता आणि संपूर्ण पृथ्वीचे ऐश्वर्य प्राप्त करून न घेता, 'मी राजा आहे' या केवळ शब्दांनी माणूस राजा होत नाही. ज्याला राजा व्हावयाचे आहे त्याने शत्रूंचा संहार करणे आणि भूमि-संपादन करणे आवश्यक आहे. नुसते 'मी राजा आहे' म्हणून कोणी राजा होत नाही. तसे ''मी ब्रह्म आहे" असे केवळ म्हणून माणूस ब्रह्मरूप होत नाही.(६७)
ब्रह्माचा साक्षात्कार कसा करून घ्यावयाचा हे एक उदाहरण देऊन पुढील श्लोक ६७ मध्ये सांगितले आहे.

आप्नोक्ति खननं तथोपरि शिलाद्युत्कर्षणं स्वीकृतिं
निक्षेपः समपेक्षते नहि बहिः शब्दैस्तु निर्गच्छति ।
तद्‌वद् ब्रह्मविदोपदेश-मनन-ध्यानादिभिर्लभ्यते
माया-कार्य-तिरोहितं स्वममलं तत्त्वं न दुर्युक्तिभिः ॥ ६७ ॥
भूमीत पुरून ठेवलेले द्रव्य (निक्षेप) प्राप्त करून घेण्यास, विश्वसनीय/प्रामाणिक माणसाचे दिग्दर्शन/वचन, खड्डा खणणे, (निक्षेपावरील) दगड माती इत्यादी वर बाहेर काढणे (उत्कर्षण), मग ते द्रव्य ताब्यात घेणे या सर्वांची अपेक्षा असते. केवळ बाहेर ये इत्यादी शब्द उच्चारून तो निक्षेप जमिनीतून आपोआप बाहेर येत नाही. त्याप्रमाणे माया=अविद्या आणि तिच्या कार्यांनी दडवून ठेवलेले स्वतःचे शुद्ध आत्मस्वरूप हे ब्रह्मवेत्त्याने केलेला उपदेश, त्यानुसार केलेले मनन, निदिध्यासन इत्यादींनी प्राप्त होते, ते आत्मरूप चुकीचे तर्क करून प्राप्त होत नाही.


समजा, आपल्या पूर्वजांनी जमिनीत गाडून ठेवलेला द्रव्यसाठा आपणास प्राप्त करून घ्यावयाचा आहे. त्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक आहेत - तो साठा कुठे पुरला आहे हे विश्वसनीय माणसाकडून ऐकून जाणून घ्यावयासे हवे. मग तेथे खणून, द्रव्यसाठ्यावरील दगड, माती इत्यादी दूर करावयास हवेत. नंतर ते द्रव्य बाहेर काढून आपल्या ताब्यात घ्यावयास हवे. 'अरे द्रव्या, बाहेर ये' , असे म्हणून ते बाहेर येणार नाही. असाच प्रकार आत्मतत्त्वाचे बाबतीत आहे. तो असा - माया/अविद्या आणि तिचे कार्य यांनी आत्मतत्त्व दडवून ठेवले आहे. ही गोष्ट प्रथम ब्रह्मवेत्त्या माणसाकडून ऐकून जाणून घ्यावयास हवी श्रवण, नंतर मनन, निदिध्यासन इत्यादी उपायांनी ते आत्मतत्त्व प्राप्त करून घ्यावयास हवे. आत्माविषयी केवळ तर्क करून ते प्राप्त होणार नाही.


(६८)
म्हणून माणसाने स्वतःच प्रयत्‍न करून मोक्ष मिळवावयाचा आहे.

तस्मात् सर्वप्रयलेन भव-बंध-विमुक्तये ।
स्वैरेव यत्‍नः कर्तव्यो रोगादाविव पंडितै ॥ ६८ ॥
म्हणून संसाराच्या बंधनातून सुटण्यासाठी शहाण्या माणसांनी आपण स्वतःच (स्वै) सर्व प्रयत्‍नपूर्वक प्रयास (यत्‍न) करावयास हवा. जसे - रोग इत्यादी दूर करण्यास शहाण्या माणसांनी स्वतःच प्रयत्‍न करावयास हवा.


संसाराच्या बंधनातून सहजपणे सुटका होत नाही आणि त्यासाठी माणसाने स्वतःच खूप प्रयत्‍न करावयास हवेत. जसे - ब्रह्मसाक्षात्कारी गुरू शोधणे, त्याचा उपदेश घेणे, त्याच्या उपदेशाप्रमाणे श्रवण, मनन, इत्यादी करणे. उदा. रोग्याने योग्य वैद्य शोधणे, त्याने सांगितलेले औषध मिळविणे आणि पथ्यपाणी सांभाळून ते औषध स्वतःच घेणे. तर तो रोगातून सुटेल. ''सर्व-प्रयत्‍नेन'' म्हणजे 'सर्व प्रयत्‍नाने' असा अर्थ भाषांतरात घेतला आहे. हा शब्द ''सर्व-प्रयत्‍न-इन'' असा घेतला तर ते शिष्याचे संबोधन होऊन, 'सर्व प्रयत्‍नांचा स्वामी (इन)' असा अर्थ होऊन 'प्रयत्‍न' आणि 'यत्‍न' यांची द्विरुक्ती खटकणार नाही.


(६९) बंध (श्लोक ५५), मोक्ष (श्लोक ५८) आणि मोक्षासाठी प्रयत्‍न आवश्यक (श्लोक ६८) हे सांगून झाल्यावर, गुरू शिष्याच्या श्लोक ५१ मधील प्रश्नांची स्तुती पुढील श्लोक ६९ मध्ये करतो.

यस्त्वयाद्य कृतः प्रत्रो वरीयान् शास्त्रविन्मनः ।
सूत्र-प्रायो निगूढार्थो ज्ञातव्यश्च मुमुक्षुभिः ॥ ६९ ॥
हे शिष्या तू आता (अद्य) जो प्रश्न केला आहेस तो फारच चांगला आहे. (कारण) तो शास्त्र जाणणाऱ्या माणसांना मान्य, अगदी सूत्रासारखा, गूढ अर्थ असणारा, आणि मुमुक्षूंनी त्याचे उत्तर जाणून घेण्यास योग्य असा आहे.


श्लोक ५१ मध्ये शिष्याचा एकच प्रश्न नसून अनेक प्रश्न आहेत. हे सर्वच प्रश्न गुरूच्या मते चांगले आहेत. कारणे अशी - १) ते संसारदुःखनाशासाठी आणि संसारबंधनातून सुटण्याच्या हेतूने आहेत. २) वेदांतशास्त्र जाणाऱ्यांना असलेच प्रश्न आवडतात. ३) ते सूत्रासारखे आहेत. सूत्र हा एक वाङ्मयप्रकार आहे. त्यात कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त अर्थ सामावलेला असतो, ४) ते प्रश्न निगूढार्थ म्हणजे अर्थगर्भ, गूढार्थ अपेक्षित असणारे आहेत.


(७०) तुझ्या प्रश्नांची उत्तरे मी आता देतो. ती ऐकल्यावर तू संसार-बंधनातून सुटशील असे गुरू शिष्याला आश्वासन देतो.

शृणुष्वावहितो विद्वन् यन्मया समुदीर्यते ।
तदेतच्छ्रवणात् सत्यं भव-बंधाद् विमोक्ष्यसे ॥ ७० ॥
हे शहाण्या शिष्या, मी आता तुझ्या प्रश्नांची उत्तरे देतो. ती तू लक्षपूर्वक ऐक. ती ही उत्तरे ऐकल्यावर, तू तुझ्या संसार-बंधनातून मोकळा होशील.


गुरूची उत्तरे ऐकून तत्काळ जीवमुक्त होणारे शिष्य विरळ असतात. येथे उल्लेखिलेला शिष्य तसा आहे, हे याच ग्रंथात पुढे कळून येते.


(७१)
मोक्षासाठी आवश्यक गोष्टी गुरू प्रथम संक्षेपाने श्लोक ७१-७२ मध्ये सांगतो.

मोक्षस्य हेतुः प्रथमो निगद्यते वैराग्यमत्यंतमनित्य-वस्तुषु ।
ततः शमश्चापि दमस्तितिक्षा न्यासः प्रसक्ताखिल-कर्मणां भृशम् ॥ ७१ ॥
अनित्य वस्तूंच्या बाबतीत आत्यंतिक वैराग्य हे मोक्षाचे मुख्य (प्रथम) कारण आहे असे सांगितले जाते. त्यानंतर शम, दम, तितिक्षा आणि नंतर सर्व प्राप्त कर्मांचा अत्यंत/संपूर्ण (भृशं) त्याग, अशी ही मोक्षाची कारणे आहेत.


मोक्षप्राप्तीसाठी वैराग्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ते असेल तरच मुमुक्षा सिद्ध होईल. म्हणून वैराग्याला येथे मोक्षाचे पहिले मुख्य कारण म्हटले आहे. वैराग्य म्हणजे अनित्याअनात्म पदार्थ भोगण्याच्या इच्छेचा अभाव (श्लोक १९) त्यासाठी नित्यानित्य-वस्तु-विवेक अगोदर व्हावयास हवा. त्यानंतर शम, दम, इत्यादी सहा गोष्टी हव्यात (श्लोक २० पहा). आणखी असे - शास्त्राने विहित केलेली कर्मे करीत राहिल्यास मोक्षाकडे लक्ष देता येणार नाही. म्हणून धर्मशास्त्राने सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे विहित कर्मांचा विधिपूर्वक त्याग म्हणजे संन्यास हवा. विधिपूर्वक कर्मत्याग करण्याची पद्धत अशी आहे - प्राजापत्यं निरुप्येष्टिं सर्ववेदसदक्षिणाम् । आत्मन्यग्नीन् समारोप्य ब्राह्मणः प्रव्रजेद् गृहात् ॥ (मनुस्मृति) - सर्वस्वाची दक्षिणा असणारा प्राजापत्य नावाचा याग करून, स्वतःमध्येच अग्नीची स्थापना करून आणि मग घरातून बाहेर पडून संन्यास घ्यावा. केवलाद्वैत वेदांतात संन्यास-ग्रहण हे मोक्षासाठी एक आवश्यक अंग मानले जाते.


(७२) साधनचतुष्टय प्राप्त करून घेतल्यावर मुमुक्षूने गुरूकडे जावयाचे. मग शृतीचे वचन आणि गुरुवचन श्रवण करून, मनन व निदिध्यासन केल्यास मोक्ष मिळतो असे पुढील ७२ वा श्लोक सांगतो.

ततः शृतिस्तन्मननं स-तत्त्व-ध्यानं चिरं नित्यनिरंतरं मुनेः ।
ततोऽविकल्प परमेत्य विद्‌वानिहैव निर्वाण-सुख समृच्छति ॥ ७२ ॥
तदनंतर गुरुमुखातून श्रुतीने आणि केवलाद्वैत वेदांताने सांगितलेल्या वचनांचे श्रवण आणि त्या ऐकलेल्या गोष्टींचे चिंतन /मनन केल्यावर मग संयमी साधकांने (मुनि) नित्य निरंतर आणि पुष्कळ काळापर्यंत आत्मतत्त्वाचे ध्यान (= निदिध्यासन) करावयास हवे. त्यानंतर विकल्परहित अशा पर ब्रह्माची प्राप्ती झाल्यावर, शहाणा साधक-मुमुक्षू (विद्वान) येथेच - या जगातच - मोक्षाचे सुख प्राप्त करून घेतो. आत्मप्राप्तीसाठी, मोक्षासाठी श्रवण, मनन आणि निदिध्यासन आवश्यक आहेत.


पहाः - श्रवणात् मननाद् ध्यानाद् तात्पर्येण निरंतरम् ।
बुद्धेः सूक्ष्मत्वमायाति ततो वस्तूपलभ्यते ॥
मंद- प्रज्ञावतां तस्मात् करणीयं पुनः पुनः ।
श्रवणं मननं ध्यानं सम्यग् वस्तूपलभ्यये ॥ - सर्ववेदांतसिद्धांतसारसंग्रह ८०७-८०८.
सर्ववेदांतसिद्धांतसारसंग्रह याच ग्रंथात श्लोक ८०९-८११ मध्ये या श्रवण इत्यादींचा खुलासा असा केला आहे : -

श्रवण : - सर्व-वेदांत-वाक्यानां षड्भिर्लिंगैः सदद्वये ।
परे ब्रह्मणि तात्पर्य -निश्चयं श्रवणं विदुः ॥
मननः - श्रुतस्यैवाद्वितीयस्य वस्तुनः प्रत्यगात्मनः ।
वेदांत-वाक्यानुगुण-युक्तिभिस्तनुचिंतनम् ॥
ध्यान : - विजातीय-शरीरादि-प्रत्यय-त्यागपूर्वकम् ।
सजातीयात्मवृत्तीनां प्रवाह-करणं यथा ।
तैलधारावदच्छिन्न-वृत्या तदूध्यानमिष्यते ॥

(७३)
गुरूने येथपर्यंत सामान्यपणे मोक्षासाठी आवश्यक ते सांगितले. आता तो साधनचतुष्टयाचे वर्णन प्रथम करतो. आत्मानात्मविवेक/नित्यानित्यवस्तुविवेक हे पहिले साधन आहे. अनात्म्याचे वर्णन श्लोक ७३ - १२५ मध्ये आणि आत्म्याचे विवेचन हे श्लोक १२६-१३८ मध्ये येते.

यद् बोद्धव्यं तवेदानीमात्मानात्म-विवेचनम् ।
तदुच्यते मया सन्यक् श्रुत्वात्मन्यवधारय ॥ ७३ ॥
आता हे शिष्या जे जाणून घेणे तुला आवश्यक आहे, ते आत्मानात्म-विवेचन माझ्याकडून सांगितले जाईल. ते व्यवस्थितपणे ऐकून घेऊन, तुझे मनात (आत्मनि) नीट धारण. करून ठेव.


गुरूचे भाषण एका कानाने ऐकून दुसऱ्या कानातून सोडून द्यावयाचे नाही. ते मनात नीट धारण करून ठेवणे आवश्यक आहे.


(७४) - (७५अ) आत्मा हा एकमेव सत्य तत्त्व आहे. बाकी सर्व अनात्मा आहे. माणसाचा स्थूल देह हा अनात्मा आहे, असा प्रारंभ गुरू करतो.

मजास्थि-मेदः-पल-रक्त-चर्मत्वगाह्वयैर्धातुभिरेभिरन्वितम् ।
पादोरुवक्षोमुज-पृष्ठमस्तकैरंगैरुपांगैरुपयुक्तमेतत् ॥ ७४ ॥
अहं ममेति प्रथितं शरीरं मोहास्पदं स्थूलमितीर्यते बुधैः ॥ ७५अ ॥
मज्जा, हाडे, मेद, मांस(पल), रक्त, चर्म, आणि त्वचा या नावाच्या (सात) धातूंनी युक्त असणारे, पाय, मांड्या, छाती, हात, पाठ आणि मस्तक या मुख्य व गौण अवयवांनी युक्त उपयोगी पडणारे, मी आणि माझे या स्वरूपात प्रसिद्ध असणारे आणि जे मोहाचे स्थान आहे, त्याला शहाणी माणसे स्थूल शरीर असे म्हणतात.


माणसाचे स्थूल शरीर हे अनात्मा आहे. धातू म्हणजे घटकद्रव्य. आयुर्वेदाप्रमाणे मानवी स्थूल शरीर हे सात धातूंनी बनलेले आहे. हे सात धातू असे - रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र. कधी हे सात धातू असेही सांगितले जातात - वसा, रुधिर, मांस, मेद, मज्जा, अस्थी आणि स्नायू. शंकराचार्यांनी येथे दिलेले सात धातू वेगळे आहेत; त्यामध्ये चर्म आणि त्वचा ही द्विरुक्ती वाटते. तेव्हा 'चर्म -वसाह्वयैः' असा पाठभेद असण्याची शक्यता आहे.

डोळ्यांना दिसणारे माणसाचे स्थूल शरीर हे आकाश, वायु, तेज, जल आणि पृथ्वी या पाच महाभूतांच्या विशिष्ट मिश्रणाने बनलेले आहे. हात, बोटे, मान, पोट इत्यादी अन्य अवयव शरीरात आहेत. ''मी उंच आहे, मी लठ्ठ आहे'' असे माणूस म्हणतो. शरीर उंच व लठ्ठ असल्याने तो तसे म्हणतो. म्हणजे तो शरीराला मी म्हणतो. तसेच ''माझे शरीर'' असेही माणूस म्हणतो. म्हणून 'मी-माझे 'या स्वरूपात हे शरीर उल्लेखिले जाते. है स्थूल शरीर मोहाचे आश्रयस्थान आहे. शरीरालाच मी - माझे म्हटल्याने ते नीटनेटके ठेवण्याकडे माणसाचा कल असतो. सुंदर शरीराचा तर माणसाला मोहच पडतो. उदा., सुंदर स्त्री, पुरुष. असे हे स्थूल शरीर आत्मा नाही, ते अनात्मा आहे.


(७५ /ब) - (७६)

नभो-नभस्वद्-दहनांबु-भूमयः सूक्ष्माणि भूतानि भवति तानि ॥ ७५ब ॥
परस्परांशैर्मिलितानि भूत्वा स्थूलानि च स्थूल-शरीर-हेतवः ।
मात्रास्तदीया विषया भवंति शब्दादयः पंच सुखाय भोक्तुः ॥ ७६ ॥
आकाश, वायू, तेज (दहन), पाणी आणि पृथ्वी अशी ती पाच सूक्ष्म भूते आहेत. त्यांचे अंश (मात्रा) एकत्र येऊन, स्थूल भूते निर्माण होतात, आणि स्थूल महाभूतांमार्फतच ती स्थूल शरीराचे कारण होतात. त्या पाच भूतांच्या अंशांच्या परस्पर मिश्रणापासून होणारे शब्द इत्यादी विषय हे भोक्ता जीवाला सुख देणारे होतात.


(प्रस्तावनेतील अध्यारोप प्रक्रिया पहा) तमोगुण प्रधान असणाऱ्या अज्ञानातून/अविद्येतून आकाश, वायू, तेज, पाणी व पृथ्वी ही नावे असणारी मात्र सूक्ष्म भूते उत्पन्न होतात. या सूक्ष्म भूतांत पुढे पंचीकरण होऊन, तीच आकाश इत्यादी नावे असणारी पाच स्थूल महाभूते उत्पन्न होतात. पाच महाभूतांच्या परस्पर मिश्रणाने स्थूल दृश्य जगातील सर्व पदार्थ निर्माण होतात. या स्थूल पदार्थांत स्थूल भूतांचे शब्द, स्पर्श इत्यादी गुण असणारे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध असे पाच प्रकारचे भोग्य विषय निर्माण होतात. तसेच या पाच महाभूतांच्या मिश्रणाने स्थूल शरीरे उत्पन्न होतात. स्थूल देहाची उपाधी असणारा जीव या विषयांचा भोक्ता होतो.


GO TOP