शुक्ल यजुर्वेद
प्रथमोऽध्यायःविनियोग - 'इषे त्वा' या मंत्राने पळसाची किंवा शमीची फांदी तोडावी. 'वायवः स्थ' या मंत्राने वत्साला फांदीचा स्पर्श करावा. गाईंपैकी एकीला वेगळी करून 'देवो वः' या मंत्राने शाखेचा स्पर्श करावा. ' यजमानस्य पशून्' या मंत्राने दोन अग्निगृहांपैकी एका अग्निगृहाच्या पुढें एक फांदी उभी रोंवावी.


ओ३म् इ॒षे त्वो॒ र्ज्जे त्वा॑ वा॒यव॑ स्थ दे॒वो वः॑ सवि॒ता प्रार्प॑यतु॒ श्रेष्ठ॑तमाय॒
कर्म॑ण॒ऽआप्या॑यध्वमघ्न्या॒ऽइन्द्रा॑य भा॒गं प्र॒जाव॑तीरनमी॒वाऽअ॑य॒क्ष्मा मा व॑स्ते॒नऽई॑शत॒
माघशँ॑सो ध्रु॒वाऽअ॒स्मिन् गोप॑तौ स्यात् ब॒ह्विर्यज॑मानस्य प॒शून्पा॑हि ॥ १ ॥


अर्थ - हे शाखे, धान्याच्या उत्पत्तिकरितां मी तुला तोडतो व वृष्टिरूपी रसाकरितां तुला सारखी (म्हणजे उंच नीच भाग तपासून काढणे) करतो. हे वत्सांनो, तुम्ही आयांपासून दूर जा. हे गाईंनो, प्रेरक व प्रकाशमान परमेश्वर तुम्हांला यज्ञकर्मांत उपयोगी पडण्याकरितां पुष्कळ गवत असलेल्या रानांत जाण्याची प्रेरणा करो. हे अवध्य गाईंनो, तुम्ही इंद्राच्या उद्देशानें पुष्कळ दूध वाढवावे. चोर व तुमची हिंसा करणारा वाघ तुम्हांस मारण्यास समर्थ न होवो. तुम्ही पुष्कळ संततियुक्त, व्याधिरहित आणि प्रबल रोगरहित व्हा आणि यजमानाच्या घरी पुष्कळ दिवसपर्यंत टिकून रहा व सन्ततीने वाढा. हे शाखे, तूं यजमानाच्या पशूंचे रक्षण कर. ॥ १ ॥


विनियोग - 'वसोः पवित्रमसि' या मंत्रानें फांदीला पवित्र बांधावे. 'द्यौरसि' या मंत्रानें स्थाली घेऊन 'मातरिश्वनः' या मंत्राने तीच स्थाली निखाऱ्यावर शिजण्यास ठेवावी.


वसोः॑ प॒वित्र॑मसि॒ द्यौर॑सि पृथि॒व्य॒सि मात॒रिश्व॑नो घ॒र्मो॒ऽसि
वि॒श्वधा॑ऽअसि प॒र॒मेण॒ धाम्ना॒ दृँह॑स्व॒ मा ह्वा॒र्मा ते॑ य॒ज्ञप॑तिह्वार्षीत् ॥ २ ॥


अर्थ - हे दर्भमय पवित्रा, इंद्राचें निवासस्थान जे दुग्ध त्याला तूं पवित्र करणारा आहेस. हे स्थालि, मृत्तिका व जल यांनी निर्माण झालेली अशी तूं वृष्टिदायी द्युलोकस्वरूपीं आहेस. पृथ्वीतून खणून काढलेल्या मातीनें बनलेली असल्यामुळें तूं पृथ्वीरूप आहेस. हे उखे, तूं वायूचा प्रदीपक जो अंतरिक्षलोक तद्‌रूपी आहेस. हे स्थलि, तूंहि द्युलोक, पृथ्विलोक व अंतरिक्षलोक यांचे धारण करणारी असल्यामुळें सर्व वारणसमर्थ आहेस, आणि हे उखे, उत्तम तेजानें (बहुदुग्धधारणरूपी तेजानें) तूं दृढ हो. तुझ्यांतील दुग्ध गळूं देऊं नकोस. आणि हे उखे, तूं कुटिल होऊं नकोस व त्यायोगें यजमानालाही कुटिलत्व म्हणजे याज्ञविघ्न न होवो. ॥ २ ॥


विनियोग - प्रागग्र अगर उदगग्र पवित्र 'वसोः पवित्रम्' या मंत्रानें स्थालीवर ठेवावे. दूध काढलें जात असतां 'देवस्त्वा' या मंत्राचा जप करावा. एका गाईचें दूध काढल्यावर अध्वर्यूनें 'तूं कोणत्या गाईचें दूध काढलेंस' असें दूध काढणाऱ्यास विचारावें.


वसोः॑ प॒वित्र॑मसि श॒तधा॑रं॒ वसोः॑ प॒वित्र॑मसि स॒हस्र॑धारम् ।
देवस्त्वा॑ सवि॒ता पु॑नातु॒ वसोः॑ प॒वित्रेण श॒तधा॑रेण सु॒प्वा काम॑धुक्षः ॥ ३ ॥


अर्थ - हे शाखापवित्रा, तूं इंद्रनिवासभूत जें दुग्ध , त्यास शुद्ध करणारे आहेस. (दूध गाळींत असतां त्या पवित्राच्या भोंकातून शेंकडों व हजारों धारा पडून दूध गाळले जातें). हे दुग्धा, सवितृदेव शंभर धारायुक्त अशा उत्तम संशोधक पवित्रानें तुला निर्दोश करो. (एका गाईचें दोहन झाल्यावर अध्वर्यु दोहन करणाऱ्याला विचारतो) - हे दोग्ध्या, ह्या गाईंपैकीं कोणत्या गाईचें तूं दूध काढलेस. ॥ ३ ॥


विनियोग - दूध काढणारानें ज्या गाईचें दूध काढलें असें म्हटल्यावर अध्वर्यूनें "सा विश्वायुः" असें म्हणावे. अशीच प्रश्नोत्तरें दुसऱ्या दोन गाईंबद्दलही समजावी. उकळलेलें दूध अग्नीवरून खालीं काढून तें थोडे निवल्यावर त्यांत सकाळच्या होमाचें राहिलेले दहिं विरजण म्हणून 'इंद्रस्य त्वा' ह्या मंत्रानें घालावे.


सा वि॒श्वायुः॒ सा वि॒श्वक॑र्मा॒ सा वि॒श्वधा॑याः ।
इन्द्र॑स्य त्वा भा॒ग सोमे॒ना त॑नच्मि॒ विष्णो॑ ह॒व्यँर॑क्ष ॥ ४ ॥


अर्थ - मी विचारलेली ती गाय 'विश्वायु' नांवाची आहे. त्याचप्रमाणे दुसरी गाय विश्वकर्मा नांवाची व तिसरी गाय विश्वधाया नांवाची आहे. (विश्वायु म्हणजे संपूर्ण आयुष्य देणरी, विश्वकर्मा म्हणजे संपूर्ण सामर्थ्य देणारी, विश्वधाया म्हणजे सर्व देवांचे पोषण करणारी). हे दुग्धा, तूं इंद्राचा भाग आहेस. सोमरसासारख्या दह्यानें मी तुझ्यांत विरजण घालतो. हे विष्णो, या माझ्या दुग्धरूपी हविर्द्रव्याचें रक्षण कर. ॥ ४ ॥


विनियोग - 'अग्ने व्रतपते' या मंत्रानें व्रतग्रहण करावें.


अग्ने॑ व्रतपते व्र॒तं च॑रिष्यामि॒ तच्छ॑केयं॒ तन्मे॑ राध्यताम् ।
इ॒दम॒हमनृ॑तात् स॒त्यमुपै॑मि ॥ ५ ॥


अर्थ - हे कर्मपालका अग्ने, तुझ्या आज्ञेनें मी कर्म करीन व तें करण्यास समर्थ होईन. तुझ्या प्रसादानें माझें तें कर्म सफल होवो. मी यजमान अनृतभाषणांतून दूर जाऊन सत्य भाषण करीन. (कर्मकालीं सत्य भाषण करावें म्हणजे कर्म सांग होतें). ॥ ५ ॥


विनियोग - 'कस्त्वा युनक्ति' या मंत्रानें अध्वर्यूनें प्रश्नोत्तररूपी वाक्यांनी आपलें कर्तृत्व दूर करून प्रजापतीचें कर्तृत्व प्रकट करावें 'कर्मणे वाम्' या मंत्रानें शूर्प व अग्निहोत्रहवणीपात्र यांचे ग्रहण करावें.


कस्त्वा॑ युनक्ति॒ स त्वा॑ युनक्ति॒ कस्मै॑ त्वा युनक्ति॒ तस्मै॑ त्वा युनक्ति ।
कर्म॑णे वां॒ वेषा॑य वाम् ॥ ६ ॥


अर्थ - हे जलधारक पात्रा, आहवनीयाच्या उत्तरभागीं तुझी स्थापना कोण करतो ? सर्व वेदप्रसिद्ध जो प्रजापति तो तुझी स्थापना करतो. तो कशाकरितां स्थापना करतो ? तो प्रजापतीच्य संतोषाकरितां स्थापना करतो. हे अग्निहोत्रवहणी व हे सूर्पा, कर्माकरितां व कर्मामध्यें गढून राहण्यांकरितां मी तुमचें ग्रहण करतो. ॥ ६ ॥


विनियोग - 'प्रतुष्टम्' आणि 'निष्टप्तम्' या मंत्रांनी अग्निहोत्रवहणी व शूर्प तापवावें. 'उर्वन्तरिक्षम्' या मंत्रानें गमन करावें.


प्रत्यु॑ष्टँ॒रक्षः॒ प्रत्यु॑ष्टा॒अरा॑तयो॒ निष्ट॑प्तँ॒ रक्षो॒ निष्ट॑प्ता॒ऽरा॑तयः ।
उ॒र्वन्तरि॑क्ष॒मन्वे॑मि ॥ ७ ॥


अर्थ - ही अग्निहोत्रवहणी व हे शूर्प तापविल्यानें ह्यांत असलेले राक्षस व सर्व प्रतिबंधक शत्रू जळाले. तसेंच ह्यांत गुप्त राहलेलें राक्षस व प्रतिबंधक शत्रू पूर्ण तऱ्हेनें जळालें. मी आतां विस्तीर्ण अशा स्थलांत गमन करतों. ॥ ७ ॥


विनियोग - 'धूरसि' या मंत्रनें गाडीच्या जोकडाला स्पर्श करावा. 'देवानाम्' या मंत्रानें दांड्याच्या शेवटीं असलेला जो गाडीचा खुंटा त्याला स्पर्श करावा.


धूर॑सि॒ धूर्व॒ धूर्व॑न्तं॒ धूर्व॒ तं योऽस्मान् धूर्व॑ति॒ तं धू॑र्व॒ यं व॒यं धूर्वा॑मः ।
दे॒वाना॑मसि॒ वह्नितमँ॒ सस्नि॑तमं॒ पप्रि॑तमं॒ जुष्ट॑तमं देव॒हूत॑मम् ॥ ८ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं हिंसक आहेस म्हणून हिंसा करणाऱ्या पापाचा नाश कर; आणि जे राक्षस वगैरे यज्ञविघ्न करून आमची हिंसा करावयाला उद्युक्त झाले त्यांचा नाश कर. आम्ही यज्ञ करणारे आलस्य वगैरे ज्या शत्रूंचा नाश करण्यास उद्युक्त झालों त्या शत्रूंचा तूं नाश कर. हे शकटा, तूं अग्नीचा हविर्भाग उत्तम तऱ्हेनें नेणारा आहेस व तूं दृढ असावास म्हणून तुझ्याभोंवती चर्म गुंडाळलें आहे. व्रीहि भरलेला असा तूं देवांना अतिशय आवडतोस व देवांना बोलाविणारा असा आहेस ( व्रीहीनें भरलेला शकट पाहून बोलाविल्याप्रमाणें देव धांवत येतात). ॥ ८ ॥


विनियोग - 'विष्णुस्त्वा' या मंत्रानें शकटावर आरोहण करावें. 'उरु वाताया' या मंत्रानें शकटाकडे पहावें. 'अपहतम्' या मंत्रानें गाडीवरील गवत वगैरे दूर करावे. 'यच्छन्ताम्' या मंत्रानें गाडींतील व्रीहींना स्पर्श करावा.


अह्रुत॑मसि हवि॒र्धानं॒ दृँह॑स्व॒ मा ह्वा॒र्मा ते॑ यज्ञप॑तिह्वार्षीत् ।
विष्णु॑स्त्वा क्रमतामु॒रु वाता॒याप॑हतँ॒ रक्षो॒ यच्छ॑न्तां॒ पञ्च॑ ॥ ९ ॥


अर्थ - हे शकटा, तूं अकुटिल असून व्रीहीरूपी हवीचें धारण करणारा आहेस म्हणून तूं दृढ हो, कुटिल होऊं नकोस व त्या योगें यजमानाला पाप लागूं नये. हे शकटा, व्यापक जो यज्ञ तो तुझ्यावर आरोहण करो. तसेंच तूं आपल्यावरील धान्यांत वायूचा संचार व्हावा म्हणून विस्तीर्ण हो. यज्ञविघातक तृणादिरूपी राक्षस दूर केलें. ह्या पांच अंगुली व्रीहीरूपी हवीला नियमित करोत. (पांचही बोटांनी धान्य ग्रहण करावें). ॥ ९ ॥


विनियोग - 'देवस्य त्वा' या मंत्रानें चार मुष्टी व्रीहीचें ग्रहण करावें.


देवस्य॑ त्वा सवि॒तुः प्रस॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पूष्णो हस्ता॑भ्याम् ।
अ॒ग्नये॒ जु॒ष्टं॑ गृह्णाम्य॒ग्नीषोमा॑भ्यां॒ जुष्टं॑ गृह्णामि ॥ १० ॥


अर्थ - हे हविर्द्रव्या, प्रेरक अशा सवितृदेवतेच्या प्रेरणेनें मी अग्निप्रिय अशा अग्नीषोमांना आवडणाऱ्या तुझें अश्विनीकुमारांच्या दोन बाहूंनी व पूषा देवतेच्या दोना हातांनी ग्रहण करतो. ॥ १० ॥


विनियोग - 'भूताय त्वा' या मंत्राने अवशिष्ट व्रीहीला स्पर्श करावा. 'स्वर्' या मंत्रानें पूर्वेकडे पहावें. 'दृँहन्ताम्' या मंत्रानें गाडीवरून खाली उतरावे. 'पृथिव्यास्त्वा' या मंत्रानें हविर्द्रव्य भूमीवर ठेवावे.


भू॒ताय॑ त्वा॒ नारा॑तये॒ स्व॒रभि॒विख्ये॑षं॒ दृँह॑न्तां॒ दुर्य्याः॑ पृथि॒व्यामु॒र्वन्तरि॑क्षमन्वे॑मि ।
पृथि॒व्यास्त्वा॒ नाभौ॑ सादया॒म्यदि॑त्याऽउ॒पस्थेऽग्ने ह॒व्यँ र॑क्ष ॥ ११ ॥


अर्थ - हे शकटातील अवशिष्ट व्रीहीभागा, तुला मी अन्य यागाकरितां व ब्राह्मण भोजनाकरितां शिल्लक ठेवतों. दान न देण्याकरितां नाही, तर दान देण्याकरितांच शिल्लक ठेवतो. मी यज्ञांना पाहीन. पृथ्वींत असलेली गृहें दृढ होवोते. विस्तीर्ण अशा आकाशाप्रत मी गमन करतो. हे हविर्द्रव्या, अदितीची जी मांडी म्हणजे पृथ्वीचा मध्यभाग त्यावर तुला मी स्थापन करतो. हे अग्ने, तुझ्याजवळ ठेवलेल्या या हविर्भागाचें तूं रक्षण कर. ॥ ११ ॥


विनियोग - 'पवित्रे स्थः' या मंत्रानें दोन कुशांना तीन कुशांनी तोडावे. 'सवितुर्वः' या मंत्रानें हविर्ग्रहणींत पाणी ओतून दोन दर्भांनी त्यांतील कचरा काढावा. डाव्या हातावर अग्निहोत्रहवणी घेऊन 'देवीरापः' ह्या मंत्र म्हणून उजव्या हातानें वर उचलावी.


प॒वित्रे॑ स्थो वैष्ण॒व्यौ॒ सवि॒तुर्वः॑ प्रस॒व उत्पु॑ना॒म्यच्छि॑द्रेण प॒वित्रे॑ण॒ सुर्य्य॑स्य र॒श्मिभिः॑ ।
देवी॑रापोऽअग्रेगुवोऽअग्रेपु॒वोऽग्र॑ऽइ॒मम॒द्य य॒ज्ञं न॑य॒ताग्रे॑ य॒ज्ञप॑तिँ सु॒धातुं॑ य॒ज्ञप॑तिं देव॒युव॑म् ॥ १२ ॥


अर्थ - हे दोन कुश पवित्रांनो, तुम्ही यज्ञसंबंधी आहांत. हे जलांनो, प्रेरक देवाच्या प्रेरणेंने छिद्ररहित पवित्रानें व सूर्यकिरणांनी तुमचें मी शोधन करतो. हे प्रकाशात्मक जलांनो, तुम्ही आरंभिलेल्या यज्ञांना निर्विघ्न रीतीनें संपवा. हे जलांनो, तुम्ही सखल जमीनीवर प्रवाह पावणारे व पहिल्यानें सर्वशोधक आहांत म्हणून या यजमानाला फलोपभागाची प्रेरणा करा. हा यजमान दक्षिणा देऊन यज्ञ वाढविणारा, यज्ञाचें पालन करणारा व देवांना यज्ञादि हविर्भाग देणारा आहे. ॥ १२ ॥


विनियोग - 'प्रोक्षिता स्थ' या मंत्रानें जलांचे प्रोक्षण करावें. 'अग्नये त्वा' इत्यादि मंत्रांनी त्या त्या देवतांच्या उद्देशानें ठेवलेल्या हविर्द्रव्याचें प्रोक्षण करावें. 'दैव्याय त्वा' या मंत्रानें पात्रप्रोक्षण करावें.


यु॒ष्माऽइन्द्रो॑वृणीत वृत्र॒तूर्य्ये॑ यू॒यमिन्द्र॑मवृणीध्वं वृत्र॒तूर्य्ये॒ प्रोक्षि॑ता स्थ ।
अ॒ग्नये॑ त्वा॒ जुष्टं॒ प्रोक्षा॑म्य॒ग्नीषोमा॑भ्यां त्वा॒ जुष्टं॒ प्रोक्षा॑मि ।
दैव्या॑य॒ कर्म॑णे शुन्धध्वं देवय॒ज्यायै॒ यद्वोऽशु॑द्धाः पराज॒घ्नुरिदं॒ व॒स्तच्छु॑न्धामि ॥ १३ ॥


अर्थ - हे जलांनो, इंद्रानें वृत्रवधाच्या निमित्तानें साहाय्याकरितां तुमची प्रार्थना केली व तुम्हीही साहायाकरितां वृत्रवधाच्या निमित्तानें इंद्राची प्रार्थना केली. हे जलांनो, तुम्ही सिंचित केलेलें आहांत. अग्निला व अग्निषोमांना आवडत्या अशा पात्रांचे मी प्रोक्षण करतो. हे यज्ञपात्रांनो, तुम्ही दार्शनिक अग्न्यादि देवसंबंधी जीं जीं कर्मे, त्याबद्दल शुद्ध व्हा. नीच जातीच्या सुतारांनी तयार करतांना तुमचे (यज्ञपात्रांचे) अंग हस्तस्पर्शानें अशुद्ध केलें आहे. तें मी जलप्रोक्षणानें शुद्ध करतों. ॥ १३ ॥


विनियोग - 'शर्मासि' या मंत्रानें कृष्णाजिन ग्रहण करावें. 'अवधूतम्' या मंत्रानें कृष्णाजिन झटकावें. 'आदित्यास्त्वक्' या मंत्रानें पश्चिमेकडे शिर येईल अशा पद्धतीनें अंथरावें. डाव्या हातानें कृष्णाजिनावर 'अद्रिरसि' अगर 'ग्रावासि' या मंत्रानें उलूखल स्थापन करावे.


शर्मा॒स्यव॑धूतँ॒ रक्षोऽव॑धूता॒ऽअरा॑त॒योऽदि॑त्या॒स्त्वग॑सि॒ प्रति॒ त्वादि॑तिर्वेत्तु ।
अद्रि॑रसि वानस्प॒त्यो ग्रावा॑सि पृ॒थु॒बु॑घ्नः॒ प्रति॒ त्वादि॑त्या॒स्त्वग्वे॑त्तु ॥ १४ ॥


अर्थ - हे कृष्णाजिना, तूं उखळ धारण करण्याकरितां सुखरूपी आहेस. ह्या कृष्णाजिनावर असलेला राक्षस दूर केला गेला. त्यावरील धूळ दूर केली. तसेंच प्रतिबंध शत्रूही जमिनीवर कंपित झाले. हे कृष्णाजिना, तूं भूमिदेवतेची त्वचा आहेस. भूमि तुला आपली त्वचा समजो. हे उखळा, तूं जरी लांकडाचें आहेस तथापि पाषाणासारखें आहेस. तुझें मूल (खालचा भाग) मोठा आहे. अशा तऱ्हेनें तूं पाषाणासारखा आहेस. पृथ्वीची त्वचा म्हणजे खाली असलेले मृगचर्म तुला आपलेपणानें ओळखो (हेंउलूखल माझा भाग आहे असें ते समजो) ॥ १४ ॥


विनियोग - 'अग्नेस्तनूः' ह्या मंत्रानें उखळांत हविर्द्रव्य वैरावें. 'बृहद्ग्रावा' या मंत्रानें मुसळ हातांत घ्यावें. 'स इदम्' या मंत्रानें त्याचें धारण करावें. 'हविष्कृदेहि' या मंत्रानें तीन वेळां कांडणाऱ्यांस बोलवावे.


अ॒ग्नेस्त॒नूर॑सि वा॒चो वि॒सर्ज॑नं दे॒ववी॑तये त्वा गृह्णामि बृहद्‍ग्रा॑वासि वानस्प॒त्यः
सऽइ॒दं दे॒वेभ्यो॑ ह॒विः श॑मीष्व सु॒शमि॑ शमीष्व । हवि॑ष्कृदेहि॒ हवि॑ष्कृदेहि॑ ॥ १५ ॥


अर्थ - हे हविर्द्रव्या, तूं आहवनीय अग्नीचें शीर आहेस व यजमानाच्या वाणीचें विसर्जनस्थान आहेस. म्हणजे हविर्दानाच्या वेळीं यजमानानें वाग्विसर्जन (मौन) धारण करावें. म्हणून देवांच्या संतोषाकरितां तुला मी वैरतो. हे मुसळा, तूं जरी लांकडाचा आहेस तथापि दृढत्वानें दगडासारखें आहेस व मोठें आहेस. अग्न्यादिक देवांवर उपकार करण्याकरितां तूं या हविर्द्रव्यांतील तुष वगैरे बाजूला कर. तें तुष अतिशय दूर होईल असें कर. हे हविर्द्रव्य करण्याऱ्या इकडे ये, हे हविर्द्रव्य करणाऱ्या इकडे ये. (असेंच तिसऱ्यांदा म्हणावें). ॥ १५ ॥


विनियोग - 'कुक्कुटोसि' या मंत्रानें पाट्यावर वरवंट्याचा अग्नीघ्रानें अघात करावा. 'वर्षवृद्धन्' ह्या मंत्रानें सूप हातांत घ्यावे. 'प्रति त्वा' या मंत्रानें सुपांत हवी ओतावें. 'परापूतम्' या मंत्रानें त्यांतील खडे पाखडावे. 'अपहतम्' या मंत्रानें तुष बाहेर टाकावेत. 'वायुर्वः' या मंत्रानें लहानमोठे कण वेगळे करावे. 'देवो वः' या मंत्रानें भांड्यांत तांदूळ ओतावे व त्यांचे अभिमंत्रण करावें.


कु॒क्कु॒टोऽसि॒ मधु॑जिह्व॒ऽइष॒मूर्ज॒माव॑द॒ त्वया॑ व॒यँ सं॑घातँ सं॑घातँ जेष्म व॒र्षवृ॑द्धमसि॒
प्रति॑ त्वा व॒र्षवृ॑द्धं वेत्तु॒ परा॑पूतँ॒ रक्षः॒ परा॑पूता॒ अरा॑त॒योऽप॑हतँ॒ रक्षो॑ वा॒युर्वो॒
विवि॑नक्तु दे॒वो वः॑ सवि॒ता हिर॑ण्यपाणिः॒ प्रति॑गृभ्णा॒त्वच्छि॑द्‍रेण पा॒णिना॑ ॥ १६ ॥


अर्थ - हे शम्यासंज्ञक यज्ञायुधा, तूं राक्षसांचा कुक्कुट आहेस. (असुरा क्व क्व - राक्षस कोठें आहेत, राक्षस कोठें आहेत असा शोध घेत त्यांना मारण्याकरितां जो सर्वत्र गमन करतो त्याला कुक्कुट असें म्हणावें) तसेंच तूं देवांचा मधुजिह्व नांवाचा भृत्य आहेस. (मधुर भाषण करणारी ज्याची जिह्वा आहे त्याला मधुजिह्व असें म्हणावें). अशा हें यज्ञपात्रा, तूं राक्षसांचा पराजय कर व असा शब्द कर कीं ज्यायोगें यजमानाला अन्न आणि रस प्राप्त होईल, नंतर तुझ्या साहाय्यानें आम्ही राक्षसाबरोबर युद्ध करून सर्व युद्धांत जय मिळवूं. हे शूर्पा, तूं वृष्टिजन्य जलानें वाढलेला आहेस. हे हवि, वृष्टिजन्य जलानें वाढलेल्या तुला शूर्प आपलेपणानें ओळखो. (व्रीहि व शूर्प दोन्हीही वृष्टिजलानें वाढले असल्यामुळें परस्परसंबंधी आहेत). सुपानें व्रीहि घोळल्यानंतर त्यांतील राक्षसरूपी व शत्रुरूपी हविप्रतिकूल भाग दूर केला गेला. सुपांतून लांब उडून पडलेले तुषरूपी राक्षस लांब उडून गेले. हे तांदुळांनो, सुपाचा वारा तुम्हाला सूक्ष्मपणापासून दूर करो. आणि सोन्याच्या आंगठ्या वगैरे दागिने घातलेला प्रेरक देव तुम्हांला छिद्ररहित हस्तानें म्हणजे बोटें जुळविलेल्या हातानें ग्रहण करो. (अशाकरितां कीं तांदूळ वैरतांना ते खालीं न पडोत). ॥ १६ ॥


विनियोग - पळसाच्या फांदीच्या मुळाशी तोडलेला जो काष्ठाचा भाग त्याला उपवेष म्हणतात. त्याचें 'धृष्टिरसि' या मंत्रानें ग्रहण करावें. 'अपाग्ने' या मंत्रानें पूर्वेकडील निखारे लांब सारावें. 'आदेवयजम्' या मंत्रानें अंगारांना जवळ घेऊन 'ध्रुवमसि' या मंत्रानें त्यावर कपाल पालथें घालावें.


धृष्टि॑र॒स्यपा॑ऽग्नेऽअ॒ग्निमा॒मादं॑ जहि॒ निष्क्र॒व्यादँ॑ से॒धा दे॑व॒यजं॑ वह ।
ध्रु॒वम॑सि पृथि॒वीं दृँ॑ह ब्रह्म॒वनि॑ त्वा क्षत्र॒वनि॑ सजात॒वन्युप॑दधामि॒ भ्रातृ॒व्यस्य व॒धाय॑ ॥ १७ ॥


अर्थ - हे उपवेषा तूं प्रगल्भ आहेस. आमात् (अपक्व पदार्थ भक्षण करणारा लौकिन अग्नि), क्रव्यात् (प्रेतमांस भक्षण करणारा चिताग्नि) व तिसरा यागयोग्य अग्नि असे अग्नीचे तीन भाग आहेत. हे गार्हपत्य अग्ने, तू आमात् अग्नीला टाक व क्रव्यात् अग्नीला दूर कर. आणि तिसरा जो यज्ञयोग्य अग्नि त्याला जवळ घे. हे कपाला, तूं स्थिर आहेस म्हणून पृथ्वीला स्थिर कर. ब्राह्मण क्षत्रिय व यजमान कुलांतले लोक पुरोडाशनिष्पत्तीकरितां ज्याचा स्वीकार करतात अशा हे कपाला, तुला मी अंगारावर ठेवतो. त्यायोगें माझ्या शत्रूचा वध होवो. ॥ १७ ॥


विनियोग - 'अग्ने ब्रह्म' या मंत्रानें शून्य जागीं निखारे ठेवावे. पूर्वी ठेवलेल्या कपालाच्या पश्चिमेकडे 'धरुणम्' या मंत्रानें दुसरें कपाल ठेवावें. 'धर्त्रम्' या मंत्रानें पूर्वेकडे तिसरे कपाल ठेवावें. 'विश्वाभ्यः' या मंत्रानें चवथें कपाल ठेवावें. 'चितस्थ' या मंत्रानें दोन दक्षिणेकडे व दोन उत्तरेकडे कपालें ठेवावीत. 'भृगूणाम्' या मंत्रानें कपालावर निखारे ठेवावेत.


अग्ने॒ ब्रह्म॑ गृभ्णीष्व ध॒रुण॑मस्य॒न्तरि॑क्षं दृँह ब्रह्म॒वनि॑ त्वा क्षत्र॒वनि॑ सजात॒वन्युप॑दधामि भ्रातृ॑व्यस्य व॒धाय॑ ।
ध॒र्त्रमसि॒ दिवं॑ दृँह ब्रह्म॒वनि॑ त्वा क्षत्र॒वनि॑ सजात॒वन्युप॑दधामि॒ भ्रातृ॑व्यस्य व॒धाय॑ ।
विश्वा॑भ्य॒स्त्वाशा॑भ्य॒ऽउप॑दधामि॒ चित॑ स्थोर्ध्व॒चितो॒ भृगू॑णा॒मङ्‌गि॑रसां॒ तप॑सा तप्यध्वम् ॥ १८ ॥


अर्थ - हे अग्ने,आम्ही केलेल्या उत्तम कर्मांचा तूं स्वीकार कर. हे द्वितीय कपाला, पुरोडाशाचा तूं धारक आहेस म्हणून अंतरिक्षाला दृढ कर. ब्राह्मण क्षत्रिय व यजमानकुलोत्पन्न पुरुष पुरोडाश उत्पन्न करण्याकरितां ज्याचा स्वीकार करतात अशा तुला मी शत्रुवधाकरितां अंगारावर ठेवतो. हे तृतीय कपाला, तूं धारण करणारे आहेस म्हणून द्युलोकाला दृढ कर. क्षत्रिय व यजमानकुलोत्पन्न पुरुष पुरोडाशाच्या उत्पत्तीकरितां ज्याचा स्वीकार करतात अशा तुला मी शत्रुवधाकरितां अंगारावर ठेवतो. हे चतुर्थ कपाला, सर्व दिशांच्या दार्ढ्याकरितां तुझें मी अंगारावर स्थापन करतों. हे कपालांनो, तुम्ही जवळ व ऊर्ध्वभागाकडून एकत्र केले गेलेले आहांत. तुम्ही भृगुसंज्ञक व आंगिरससंज्ञक देवऋषींच्या तपोरूपी अशा ह्या अग्नीनें तप्त व्हा. ॥ १८ ॥


विनियोग - पूर्वीप्रमाणें 'शर्मासि' या मंत्रानें कृष्णाजिनाचें ग्रहण करावें. त्यावर 'धिषणासि' या मंत्रानें शिला स्थापन करावी. नंतर 'दिवः' या मंत्रानें शिलेच्या पश्चात् भागीं शम्येचें स्थापन करावें. 'धिषणासि' या मंत्रानें पाट्यांवर वरवंटा ठेवावा.


शर्मा॒स्यव॑धूतँ॒ रक्षोऽव॑धूता॒ऽअरा॑त॒योऽदि॑त्या॒स्त्वगसि॒ प्रति॒ त्वादि॑तिर्वेत्तु ।
धि॒षणा॑सि पर्व॒ती प्रति॒ त्वादि॑त्या॒स्त्वग्वे॑त्तु दि॒वः स्क॑म्भ॒नीर॑सि धि॒ष्णा॑सि पार्वते॒यी प्रति॒ त्वा पर्व॒ती वे॑त्तु ॥ १९ ॥


अर्थ - हे कृष्णाजिना, तूं शिला (पाटा) धारण करण्याकरितां सुखरूपी आहेस. ह्या कृष्णाजिनावर असलेला राक्षस दूर केला गेला. तसेंच प्रतिबंधक शत्रूही जमिनीवर कंपित झाले. हे कृष्णाजिना, तूं भूमिदेवतेची त्वचा आहेस. तुला भूमि आपली त्वचा समजो. हे शिले, तूं पर्वतावर उत्पन्न झालेली व पर्वताप्रमाणें हे पेषणकर्म धारण करणारी आहेस व भूमीची कृष्णाजिनरूपी त्वचा तुला आपलेपणानें ओळखो. हे शम्ये, तूं द्युलोकाचें स्तंभन करणारी अहेस. व हे उपले (वरवंटा), तूं पेषणकर्माला धारण करणारी आहेस. तूं पाट्यापेक्षां लहान स्वरूपाची असल्यामुळें पाट्याची मुलगी शोभतेस. करितां पाट्याचा पाषाण तुला आपली कन्या म्हणून ओळखो. ॥ १९ ॥


विनियोग - 'धान्यमसि' या मंत्रानें तांदूळ वैरावे व 'प्राणाय त्वा' इत्यादि मंत्रानें पुनः पुनः कुटावेत. 'दीर्घाम्' या मंत्रानें कृष्णाजिनावर पीठ ठेवावें. 'चक्षुषे त्वा' या मंत्रानें त्याकडे पहावें. 'महीनाम्' या मंत्रानें त्यांत घृत ओतावें.


धा॒न्य॒मसि धिनु॒हि दे॒वान् प्रा॒णाय॑ त्वोदा॒नाय॑ त्वा व्या॒नाय॑ त्वा ।
दी॒र्घामनु॒ प्रसि॑ति॒मायु॑षे धां दे॒वो वः॑ सवि॒ता हिर॑ण्यपाणिः॒
प्रति॑गृभ्णा॒त्वच्छि॑द्‍रेण पा॒णीना॒ चक्षु॑षे त्वा म॒हीनां॒ पयो॑ऽसि ॥ २० ॥


अर्थ - हे हविर्द्रव्या, तूं धान्य म्हणजे संतोष करणारे आहेस. म्हणून देवांना संतुष्ट कर. हे तांदुळा, प्राण म्हणजे श्वसन वायु, उदान म्हणजे उत्क्रांति वायु व व्यान म्हणजे व्यापक वायु यांचे दान करण्याकरितां तुला मी वाटून पीठ करतो. हे हविर्द्रव्या, तुला मी आयुष्य वृद्धिकरितां दीर्घकर्म संततीच्या धोरणानें कृष्णाजिनावर स्थापन करतो. प्रेरक व सुवर्णाच्या आंगठ्या हातांत घालणारा देव ज्यांची बोटें छिद्ररहित आहेत अशा हातानें तुझे ग्रहण करो. हे हविर्द्रव्या, यजमानाच्या नेत्राची शक्ति वाढण्याकरितां मी तुजकडे पाहतो. हे आज्या, तूं गाईच्या दुधापासून उत्पन्न झालेलें असल्यामुळें दुग्धरूपी आहेस. ॥ २० ॥


विनियोग - 'देवस्य त्वा' या मंत्राने पात्रीमध्ये पिष्ट ओतावे. पिठांत ओतावयाचें पाणी अग्नीध्रानें आणावे व अध्वर्यूनें 'समापः' या मंत्रानें पवित्रांनी त्याचें ग्रहण करावे.


दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम् ।
सं व॑पा॒मि समाप॒ऽओष॑धीभिः॒ समोष॑धयो॒ रसे॑न ।
सँ रे॒वती॒र्जग॑तीभिः पृच्यन्ताँ॒ सं मधु॑मती॒र्मधु॑मतीभिः पृच्यन्ताम् ॥ २१ ॥


अर्थ - प्रेरक अशा देवाच्या प्रेरणेनें अश्विनीकुमारांच्या दोन बाहूंनी व पूषा देवतेच्या दोन हातांनी मी भांड्यामध्यें पीठ चांगले ठेवतो. उपसर्जनीरूपी जलें पिष्टरूप औषधीशीं युक्त होवोत व पिष्ठरूपी औषधी उपसर्जनीरूप जलानें युक्त होवोत. गोड असें ते उपसर्जनीरूप उदक मधुर अशा पिष्ठौषधीनें युक्त होवो म्हणजे जल व पिष्ट यांचा उत्तम संसर्ग होवो. ॥ २१ ॥


विनियोग - 'जनयत्यै त्वा' या मंत्रानें पीठ व पाणी एकत्र करावें. पाण्यांत मिसळलेल्या पिठाचे दोन गोळे करून 'इदमग्नेः' या मंत्राने पहिल्या गोळ्याला व 'इदमग्नीषोमयोः' या मंत्रानें दुसऱ्या गोळ्याला स्पर्श करावा. 'इषे त्वा' या मंत्रानें घृत पातळ करावें. 'घर्मोसि' या मंत्रानें पुरोडाश अग्नीवर शिजवावा. 'उरुप्रथा' या मंत्रानें पुरोडाश पसरावा. 'अग्निष्टे' या मंत्रानें त्यास जलाचा स्पर्श करावा. 'देवस्त्वा' या मंत्रानें पुरोडाश शिजवावा.


जन॑यत्यै त्वा॒ संयौ॑मी॒दम॒ग्नेरि॒दम॒ग्नीषोम॑योरि॒षे त्वा॑ घ॒र्मो॒ऽसि वि॒श्वायु॑रु॒रुप्र॑थाऽउ॒रु प्र॑थस्वो॒रु ।
ते॑ य॒ज्ञप॑तिः प्रथताम॒ग्निष्टे॒ त्वचं॒ मा हिँसीद्दे॒वस्त्वा॑ सवि॒ता श्र॑पयतु॒ वर्षि॒ष्ठेऽधि॒ नाके॑ ॥ २२ ॥


अर्थ - हे जलपिष्टरूपी दोन पदार्थांनो, यजमानाला संतति व्हावी म्हणून मी तुम्हाला संयुक्त करतों. (नंतर पाण्यांत मिसळलेल्या पिठांचे दोन पिंड वेगवेगळे ठेवावे व) हा अग्नीचा पिंड असें म्हणून पहिल्या पिंडाला स्पर्श करावा व हा अग्निषोमाचा पिंड असें म्हणून दुसऱ्या पिंडाला स्पर्श करावा. हे घृता, वृष्टीकरितां तुला मी अग्नीवर ठेवतो. हे पुरोडाशा, तूं दीप्यमान प्रवर्ग्यरूपी व संपूर्ण आयुष्य देणारा आहेस. हे पुरोडाशा, तूं स्वभावतःच पसरणारा आहेस म्हणून तूं विस्तृत हो. व हा यजमान-पुत्र-पशूंच्या योगानें प्रसिद्ध होवो. व हे पुरोडाशा, शिजविण्याच्या वेळीं अग्नि, तुझा त्वचेसारखा जो वरचा भाग, त्याला न जाळो. हे पुरोडाशा, सवितादेव अत्यंत वाढलेल्या द्युलोकांत राहणाऱ्या नाक नांवाच्या अग्नीमध्यें तुला परिपक्व करो. ॥ २२ ॥


विनियोग - 'मा भेः' या मंत्राने पुरोडाशाला स्पर्श करावा. नंतर तो शिजल्यावर 'अतमेरुः' या मंत्राने भस्माने, वेदानें (दर्भमुष्टि) व उपवेषानें तो झाकावा. 'त्रिताय त्वा' इत्यादि प्रत्येक मंत्रानें यागदेवतेच्या उद्देशानें पात्री विसललेल्या व अंगुलीच्या प्रक्षालनाचे उदकाचा त्याग करावा.


मा भे॒र्मा संवि॑क्था॒ऽअत॑मेरुर्य॒ज्ञोऽत॑मेरु॒र्यज॑मानस्य प्र॒जा
भू॑यात् त्रि॒ताय॑ त्वा द्वि॒ताय॑ त्वैक॒ताय॑ त्वा ॥ २३ ॥


अर्थ - हे पुरोडाशा, तूं भिऊं नकोस व ठकूं नकोस. यागहेतुभूत जो पुरोडाश तो ग्लानिरहित होवो व यजमानाची प्रजा ग्लानिरहित होवो. हे पाल्यंगुलिप्रक्षालनोदका, (पात्री विसळलेल्या अंगुली धुतलेल्या जला), त्रित नांवाच्या देवाकडे व द्वित आणि एकत नांवाच्या देवाकडे मी तुला नेतो. ॥ २३ ॥


विनियोग - 'देवस्य त्वा' या मंत्राने स्फ्य हातांत घ्यावा. व तो डाव्या हातांत घेऊन उजव्या हातानें त्याला स्पर्श करून 'इंद्रस्य बाहुः' या मंत्रानें जप करावा.


दे॒वस्य॑ त्वा सवि॒तुः प्र॑स॒वेऽश्विनो॑र्बा॒हुभ्यां॑ पू॒ष्णो हस्ता॑भ्याम् ।
आद॑देऽध्वर॒कृतं॑ दे॒वेभ्य॒ऽइन्द्र॑स्य बा॒हुर॑सि॒ दक्षि॑णः
स॒हस्र॑भृष्टिः श॒तते॑जा वा॒युर॑सि ति॒ग्मते॑जा द्विष॒तो व॒धः ॥ २४ ॥


अर्थ - हे स्फ्य, प्रेरक देवाच्या प्रेरणेनें अश्विनीकुमारांच्या बाहूंनी व पूषा देवतेच्या हातांनी मी, देवोपकाराकरितां (देवोपकारार्थ) यज्ञ करणाऱ्या अशा तुझें ग्रहण करतो. तूं इंद्राचा उजवा हात असून हजारों शत्रूंना मारणारा आहेस व अत्यंत प्रकाशमान असा तूं वायूसारखा आहेस म्हणून तीक्ष्ण तेज धारण करणारा आणि कर्मद्वेष्ट्या शत्रूंना मारणारा आहेस. ॥ २४ ॥


विनियोग - 'पृथिवी देवयजनि' या मंत्रानें तृण जमिनीवर ठेवून स्फ्यानें प्रहार करावा. तेथील माती 'व्रजं गच्छ' या मंत्रानें हातांत घ्यावी. 'वर्षतु ते' या मंत्रानें वेदीकडे पहावे. 'बधान' या मंत्रानें हातांत घेतलेली माती उत्करावर टाकावी.


पृथि॑वि देवयज॒न्योष॑ध्यास्ते॒ मूलं॒ मा हिँ॑सिषं व्रजं ग॑च्छ गो॒ष्ठानं॒ वर्ष॑तु ते॒ द्यौर्बधा॒न
दे॑व सवितः पर॒मस्यां॑ पृथि॒व्याँ श॒तेन॒ पाशै॒र्योऽस्मान्द्वेष्टि॒ यं च॑ व॒यं द्वि॒ष्मस्तमतो॒ मा मौ॑क् ॥ २५ ॥


अर्थ - हे देवयागसाधनभूते पृथ्वी, तुझी औषधी जे तृण त्याचें मूल मी नष्ट करणार नाही. हे पुरीष, (स्फ्य प्रहारानें निघालेली जी माती तिला पुरीष म्हणतात). तूं गाई राहतात अशा ठिकाणीं जा. हे वेदी, तुझ्याकरितां द्युलोकाभिमानी देव वृष्टि करोत. हे सवितृ देवा, जो आमचा द्वेष करतो व ज्याचा आम्ही द्वेष करतो त्या शत्रूला सीमेवरील पृथ्वीवर शंभर रज्जुपाशांनी बांध व अंधतामिस्र नरकापासून त्याला केव्हांही मुक्त होऊं देऊं नकोस. ॥ २५ ॥


विनियोग - अपाररुम्' या मंत्रानें दुस्ऱ्या वेळी स्फ्यचा प्रहार करावा. 'अररो दिवम्' या मंत्रानें अग्नीध्रानें मृत्तिका उत्करावर टाकावी. 'द्रप्सस्ते' या मंत्रानें तिसऱ्यांदा प्रहार करावा.


अपा॒ररुं॑ पृथि॒व्यै देव॒यज॑नाद्वध्यासं व्र॒जं ग॑च्छ गो॒ष्ठानं॒ वर्ष॑तु ते॒ द्यौर्ब॑धा॒न दे॑व सवितः
परमस्यां॑ पृथि॒व्याँ श॒तेन॒ पाशै॒र्योऽस्मान्द्वेष्टि॒ यं च॑ व॒यं द्विष्मस्तमतो॒ मा मौ॑क् ।
अर॑रो॒ दिवं॒ मा प॑प्तो द्र॑प्सस्ते॒ द्यां मा स्क॑न् व्र॒जं ग॑च्छ गो॒ष्ठानं॒ वर्ष॑तु ते॒ द्यौर्ब॑धा॒न दे॑व
सवितः पर॒मस्यां॑ पृथि॒व्याँ श॒तेन॒ पाशै॒र्योऽस्माद्वेष्टि॒ यं च॑ व॒यं द्वि॒ष्मस्तमतो॒ मा मौ॑क् ॥ २६ ॥


अर्थ - देवयागसाधनभूत पृथ्वीवरील म्हणजे वेदीवरील जें राक्षससंज्ञक अशुद्ध द्रव्य त्याला मी दूर करतो. हे अशुद्ध द्रव्या, तूं गाई बसतात अशा ठिकाणी जा. हे वेदी, तुझ्याकरितां द्युलोकभिमानी देव वृष्टि करो. हे सवितृ देवा, जो आमचा द्वेष करतो व ज्याचा आम्ही द्वेष करतो त्या शत्रूला सीमेवरील पृथ्वीवर शंभर रज्जुपाशांनी बांध व अंधतामिस्र नरकापासून त्याला केव्हांही मुक्त होऊं देऊं नकोस. हे असुर, (अशुद्ध द्रव्या), तूं यागफलरूपी द्युलोकांत जाऊं नकोस. हे पृथ्वी, हे वेदिदेवते, तुझा जो उपजीव्य रस आहे तो द्युलोकाला जाऊं नये. हे असुर, (अशुद्ध द्रव्या), तूं गाई बसतात त्या ठिकाणीं जा. हे वेदी, तुझ्याकरितां द्युलोकाभिमानी देव वृष्टि करो. हे सवितृ देवा, जो आमचा द्वेष करतो व ज्याचा आम्ही द्वेष करतो त्या शत्रूला सीमेवरील पृथ्वीवर शंभर रज्जुपाशांनी बांध, व अंधतामिस्र नरकापासून त्याला केव्हांही मुक्त होऊं देऊं नकोस. ॥ २६ ॥


विनियोग - 'गायत्रेण' इत्यादि प्रत्येक मंत्रानें वेदीची इयत्ता निश्चित करण्याकरितां दक्षिण, पश्चिम व उत्तर या तीन दिशेस स्फ्यानें रेखा ओढाव्यात. हा पूर्व परिगृह झाल्यावर 'सूक्ष्मा' इत्यादि तीन मंत्र्यांनी उत्तर परिग्रह करावा.


गा॒य॒त्रेण त्वा॒ छन्द॑सा॒ परि॑गृह्णामि॒ त्रैष्टु॑भेन त्वा॒ छन्द॑सा॒ परि॑गृह्णामि॒ जाग॑तेन त्वा॒ छन्द॑सा॒ परि॑गृह्णामि॒ ।
सु॒क्ष्मा चा॑सि शि॒वा चा॑सि स्यो॒ना चासि॑ सु॒षदा॑ चास्यू॑र्ज॑स्वती॒ चासि॒ पय॑स्वती च ॥ २७ ॥


अर्थ - हे विणो, गायत्र, त्रैष्टुभ् व जागत ह्या तीन छंदस् संस्कारांनी युक्त अशा स्फ्यच्या योगानें गायत्रानें दक्षिण दिशेला, त्रैष्टुभानें पश्चिम दिशेला व जागतानें उत्तर दिशेला मी तुझें ग्रहण करतो. हे वेदे, तुझी जमीन चांगली आहे म्हणजे खणून साफसूफ केली आहे. राक्षस घालवून दिल्यानें तूं शांत व सुखरूपी आहेस. तसेंच तूं बसण्याला योग्य आहेस, तुझें ठायी अन्न व दहीं वगैरे ठेवले आहे. ॥ २७ ॥


विनियोग - 'पुरा क्रूरस्य' या मंत्रानें अनुमार्जन (समीकरण-भूमी सारखी करणे) करावें. 'द्विषतो वधः' या मंत्रानें उत्तरेकडे स्फ्याचा प्रहार करावा.


पु॒रा क्रू॒रस्य॑ वि॒सृपो॑ विरप्शिन्नुदा॒दाय॑ पृथि॒वीं जी॒वदा॑नुम् ।
यामैर॑यँश्च॒न्द्रम॑सि स्व॒धाभि॒स्तामु॒ धीरा॑सोऽअनु॒दिश्य॑ यजन्ते ।
प्रोक्ष॑णी॒रासा॒॑दय द्विष॒तो व॒धो॒सि ॥ २८ ॥


अर्थ - हे वेदत्रयरूपी शब्द करणाऱ्या वेदिरूपी विष्णो, पृथ्वीवर मोठें युद्ध होणार होतें त्या वे भाग काढून वेदांसहवर्तमान देवांनीं तो भाग चंद्रामध्यें नेऊन ठेवला. त्याच भागावर बुद्धिमान् लोक याग करतात. तीच भूमि म्हणजे वेदी. हे अग्नीध्रा, तूं प्रोक्षणीजल वेदीवर ठेव. हे स्फ्य, तूं शत्रूंचा हिंसक आहेस. ॥ २८ ॥


विनियोग - शूर्प व अग्निहोत्र हवणीप्रमाणें स्रुव्याचेंही 'प्रत्युष्टम्' या मंत्रनें प्रतपन करावें. 'अनिशित' या मंत्रानें संमार्जन करावें. 'अनिशिता' या मंत्रानें जुहु, उपभृत्, ध्रुवा या तीन स्रुवांचे संमार्जन करून 'प्रत्युष्टम्' या मंत्रानें तापवून वेदीवर ठेवण्याकरितां स्रुवा अध्वर्यूला द्यावात.


प्रत्युष्टँ॒ रक्षः॒ प्रत्यु॑ष्टा॒ऽअरातयो॒ निष्ट॑प्तँ॒ रक्षो॒ निष्ट॑प्ता॒ऽअरा॑तयः ।
अनि॑शितोऽसि सपत्न॒क्षिद्वा॒जिनं॑ त्वा वाजे॒ध्यायै॒ सम्मा॑र्ज्मि ।
प्रत्यु॑ष्टँ॒ रक्षः॒ प्रत्यु॑ष्टा॒ऽअरा॑तयो॒ निष्ट॑प्तँ॒ रक्षो॒ निष्ट॑प्ता॒ऽअरा॑तयः ।
अनि॑शितासि॒ सपत्न॒क्षिद्वा॒जिनी॑ त्वा वाजे॒ध्यायै॒ सम्मा॑र्ज्मि ॥ २९ ॥


अर्थ - अग्नीवर स्रुव्याचें प्रतपन करावें. हा स्रुवा तापविल्यानें ह्यांत असलेले राक्षस व प्रतिबंधक सर्व शत्रू जळाले. तसेंच ह्यांत गुप्त असलेले राक्षस व प्रतिबंधक शत्रू पूर्ण तऱ्हेनें जळाले. हे स्रुव्या, तूं आमच्यावर अत्यंत तीक्षण होत नाहींस. तूं शत्रुनाशक आहेस म्हणून मी तुला धुवून शुद्ध करतो. तूं यज्ञद्वारां अन्नोत्पादक आहेस. यज्ञप्रकाशनाकरितां तुझी मी शुद्धी करतो. हा स्रुवा तापविल्यानें यांत असलेले राक्षस व प्रतिबंधक सर्व शत्रु जळाले. तसेंच ह्यांत गुप्त असलेले राक्षस व प्रतिबंधक शत्रु पूर्ण तऱ्हेनें जळाले. हे स्रुवे, आमच्यावर तीक्ष्ण होऊं नकोस. तूं शत्रूंची नाशक आहेस म्हणून मी तुला शुद्ध करतो. तूं यज्ञद्वारा अन्नोत्पादक आहेस म्हणून यज्ञप्रकाशनाकरितां तुझी मी शुद्धि करतो. ॥ २९ ॥


विनियोग - 'अदित्यै रास्ना' या मंत्रानें गार्हपत्याच्या नैऋत्येस असलेल्या यजमानपत्नीच्या कमरेला मोळाच्या तीन दोऱ्यांनी वळलेली रज्जु बांधावी. 'विष्णोर्वेष्पः' या मंत्रानें उजवीकडील दोरी डाव्या फाशांत घालावी, वर गांठ देऊं नये. 'ऊर्जे त्वा' या मंत्रानें तूप ओतावे. व 'अदग्धेन' या मंत्रानें तुपांतील काडीकचरा पहाण्यास यजमानपत्नीस सांगावें.


अदि॑त्यै॒ रास्ना॑सि॒ विष्णो॑र्वे॒ष्योऽस्यू॒र्जे त्वाऽद॑ऽब्धेन त्वा॒ चक्षु॒षाव॑पश्यामि ।
अ॒ग्नेर्जि॒ह्वासि॑ सु॒हूर्दे॒वेभ्यो॒ धाम्ने॑ धाम्ने मे भव॒ यजु॑षे यजुषे ॥ ३० ॥


अर्थ - हे योक्त्र, (यजमानपत्नीला मुंज गवतानें बनविलेल्या दोरीनें बंधन करतात त्या दोरीला योक्त्र म्हणतात), पृथ्वीचा तूं कंबरपट्टा आहेस. हे दक्षिणपाशा, तूं यज्ञाचा व्यापक आहेस. हे घृता, उत्तम रस प्राप्त होण्याकरितां तुला मी पातळ करतों. हे तुपा, मी उपद्रवरहित अशा डोळ्यांनी खाली मान घालून तुला पाहतें. तूं अग्नीची जीभ आहेस व देवांचा तूं हविर्भाग आहेस म्हणून माझ्या निरनिराळ्या यागस्थानी निरनिराळ्या यज्ञांच्या सिद्धीकरितांत तूं प्राप्त हो. ॥ ३० ॥


विनियोग - 'सवितुस्त्वा' या मंत्रानें आज्यांतील कचरा दूर करावा. पूर्वी प्रमाणें प्रोक्षणींचा संस्कार करावा. व 'तेजोसि' या मंत्रानें अध्वर्यूनें अगर यजमानानें घृताचें अवलोकन करावें. व स्रुव्यानें जुहुमध्यें 'धाम नाम' या मंत्रानें चार वेळां आज्यग्रहण करावें.

स॒वि॒तुस्त्वा॑ प्रस॒वऽउत्पु॑ना॒म्यच्छि॑द्रेण प॒वित्रेण॒ सूर्य्य॑स्य र॒श्मिभिः॑ ।
स॒वि॒तुर्वः॑ प्र॒स॒वऽउत्पु॑ना॒म्यच्छि॑द्रेण प॒वित्रेण॒ सूर्य्य॑स्य र॒श्मिभिः॑ ।
तेजो॑सि शु॒क्रम॑स्य॒मृत॑मसि॒ धाम॒ नामा॑सि प्रि॒यं दे॒वाना॒मना॑धृष्टं देव॒यज॑नमसि ॥ ३१ ॥


अर्थ - हे आज्य, प्रेरक अशा सूर्याच्या प्रेरणेनें मी तुला छिद्ररहित पवित्रानें व सूर्याच्या किरणांनी शुद्ध करतो. तसेंच हे प्रोक्षणी जलांनो, यज्ञनिवासस्थानभूत अशा सूर्याच्या किरणांनी व छिद्ररहित पवित्रानें प्रेरक देवाच्या प्रेरणेनें मी तुम्हांला शुद्ध करतो. हे आज्या, तूं शरीरकांतीला हेतुभूत असें तेज आहेस व प्रकाशक आहेस आणि विनाशरहित आहेस, त्याचप्रमाणें हे आज्या, तूं सर्व देवांचे स्थानभूत व सर्वांना नमविणारें आहेस. आणि देवांनी तुझा तिरस्कार केला नाहीं म्हणून तूं त्यांना प्रिय आहेस. तसेंच देवाच्या यागाचें तूं साधन आहेस. ह्याकरितां तुझें मी ग्रहण करतो. ॥ ३१ ॥

इति प्रथमोऽध्यायः ॥
ॐ तत् सत्


GO TOP