॥ अथ तैत्तिरीय उपनिषद् ॥


प्रथमा - शीक्षावल्ली


शीक्षाशास्त्रार्थसङ्‌ग्रहः -

ॐ श्री गुरुभ्यो नमः । हरिः ॐ । ॐ शं नो मित्रः शं वरुणः । शं नो भवत्वर्यमा । शं न इन्द्रो बृहस्पतिः । शं नो विष्णुरुरुक्रमः । नमो ब्रह्मणे । नमस्ते वायो । त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि । त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि । ऋतं वदिष्यामि । सत्यं वदिष्यामि । तन्मामवतु । तद्वक्तारमवतु । अवतु माम्‌ । अवतु वक्तारम् । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ १ ॥ इति शीक्षाध्याये प्रथमोऽनुवाकः ॥
मित्र व वरुण आम्हाला कल्याणकारक होवोत. सूर्य आम्हाला कल्याणकारक होवो. इंद्र व बृहस्पति आम्हाला कल्याणकारक होवोत. विस्तीर्णगति विष्णू आम्हाला कल्याणकारक होवो. ब्रह्माला नमस्कार असो. हे वायु, तुला नमस्कार असो. तूंच प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तुलाच मी प्रत्यक्ष असें ब्रह्म म्हणतों. मी यथाशास्त्र भाषण करीन. मी सत्य भाषण करीन. तें (वायुरूपी ब्रह्म) माझें रक्षण करो, वक्त्याचे रक्षण करो, माझें रक्षण करो, वक्त्याचे रक्षण करो. अनुवाक १.

शीक्षाशास्त्रार्थसंग्रहः -

ॐ शीक्षां व्याख्यास्यामः । वर्णः स्वरः । मात्रा बलम्‌ । साम सन्तानः । इत्युक्तः शीक्षाध्यायः ॥ २ ॥ इति शीक्षाध्याये द्वितीयोऽनुवाकः ॥
आतां शिक्षेची व्याख्या सांगतो. जिच्या योगाने वार्गादिकांचा उच्चार करतां येतो ती शिक्षा. वर्ण = अकारादि, स्वर = उदात्त आदि, मात्रा = ह्रस्व आदि, बल = उच्चारतांना करावा लागणारा प्रयत्न, साम = उच्चाराची समता आणि संतान = संहिता. यांचें अध्ययन करावयाचें. याप्रमाणे शिक्षाध्याय सांगितला. १. अनुवाक २.

संहितोपासनम् -

सह नौ यशः । सह नौ ब्रह्मवर्चसम्‌ । अथातः सँहिताया उपनिषदं व्याख्यास्यामः । पञ्चस्वधिकरणेषु । अधिलोकं अधिज्यौतिषं अधिविद्यं अधिप्रजं अध्यात्मम्‌ । ता महासँहिता इत्याचक्षते । अथाधिलोकम्‌ । पृथिवी पूर्वरूपम्‌ । द्यौरुत्तररूपम्‌ । आकाश-सन्धिः ॥ १ ॥
आम्हां दोघांना समान यश प्राप्त होवो. आमचे ब्रह्मचर्यतेज समान असो. आतां आम्ही संहिताविषय [ संहिता = वर्णांचा समुच्चय, हा ज्याचा विषय आहे ते ] दर्शन सांगतो. तें पांच विषयांनी सांगतो. लोकांसंबंधानें, ज्योतिषासंबंधाने, विद्येसंबंधानें, प्रजेसंबंधानें आणि आत्म्यासंबंधानें, असे उपनिषदांचे पांच विषय आहेत. यांना महासंहिता असें म्हणतात. आतां अधिलोकदर्शन सांगतो. पृथिवी हें पूर्वरूप, अंतरिक्षलोक हें उत्तररूप, आकाश हा संधि (मध्य). १.

वायुः सन्धानम्‌ । इत्यधिलोकम्‌ । अथाधिज्यौतिषम्‌ । अग्निः पूर्वरूपम्‌ । आदित्य उत्तररूपम्‌ । आपः सन्धिः । वैद्युतसन्धानम्‌ । इत्यधिज्यौतिषम्‌ । अथाधिविद्यम्‌ । आचार्यः पूर्वरूपम्‌ ॥ २ ॥
वायु हें संधान (जोडणारा). याप्रमाणे अधिलोकदर्शन झाले. आतां अधिष्यौतिष सांगतो अग्नि हें पूर्णरूप, आदित्य हें उत्तररूप, उदक हा संधि, विद्युत हे संधान. याप्रमाणे अधिज्यौतिष. आतां अधिविद्य - आचार्य हें पूर्वरूप. २.

अन्तेवास्युत्तररूपम्‌ । विद्या सन्धिः । प्रवचनँ सन्धानम्‌ । इत्यधिविद्यम्‌ । अथाधिप्रजम्‌ । माता पूर्वरूपम्‌ । पितोत्तररूपम्‌ । प्रजा सन्धिः । प्रजननँ सन्धानम्‌ । इत्यधिप्रजम्‌ ॥ ३ ॥
शिष्य हे उत्तररूप, विद्या हा संधि, प्रवचन हें संधान. याप्रमाणे अधिविद्य. आतां अधिप्रज - माता हें पूर्वरूप, पिता हे उत्तररूप, प्रजा हा संधि, प्रजनन हे संधान. याप्रमाणे अधिप्रज. ३.

अथाध्यात्मम्‌ । अधरा हनुः पूर्वरूपम्‌ । उत्तरा हनुरुत्तररूपम्‌ । वाक् सन्धिः । जिह्वा सन्धानम्‌ । इत्यध्यात्मम्‌ । इतीमामहासँहिताः । य एवमेता महासँहिता व्याख्याता वेद । सन्धीयते प्रजया पशुभिः । ब्रह्मवर्चसेनान्नाद्येन सुवर्ग्येण लोकेन ॥ ४ ॥ इति शीक्षाध्याये तृतीयोऽनुवाकः ॥
आतां अध्यात्म - खालची हनुवटी हे पूर्वरूप, वरची हनुवटी हें उत्तररूप, वाणी हा संधि, जिव्हा हें संधान. याप्रमाणे अध्यात्मदर्शन झाले. या महासंहिता होत. जो या महासंहिता या प्रकारे जाणतो तो प्रजा, पशु, ब्रह्मतेज, मुख्य अन्न [ तांदुळ इत्यादि ] आणि कर्माचे फल असा स्वर्गलोक यांनी युक्त होतो. ४. अनुवाक ३.

मेधादि-सिद्ध्यर्था आवहन्तीहोम-मन्त्राः -

यश्छन्दसा-मृषभो विश्वरूपः । छन्दोभ्योऽध्यमृतात्संबभूव । स मेन्द्रो मेधया स्पृणोतु । अमृतस्य देवधारणो भूयासम्‌ । शरीरं मे विचर्षणम्‌ । जिह्वा मे मधुमत्तमा । कर्णाभ्यां भूरिविश्रुवम्‌ । ब्रह्मणः कोशोऽसि मेधया पिहितः । श्रुतं मे गोपाय । आवहन्ती वितन्वाना । ॥ १ ॥
जो वेदांमध्ये प्रधान आहे, जो सर्वरूप आहे, जो वेदोरूपी अमृतापासून उत्पन्न झाला, असा (ॐकाररूपी) इंद्र मला ज्ञानानें समृद्ध करो. हे देवा, मला अमृताचा (अर्थात् अमृतसाधक ब्रह्मज्ञानाचा) धारणकर्ता होऊं दे. माझें शरीर योग्य होऊं दे. माझी जिव्हा अत्यंत मधुरभाषणी होऊं दे. कर्णांनी मला पुष्कळ श्रवण करूं दे. तूं परमात्म्याचें प्रतीक लौकिकज्ञानाने आच्छादित आहेस. लौकिक ज्ञानाला समजत नाहींस. माझें श्रवण (आत्मज्ञान वगैरे) रक्षण कर. १.

कुर्वाणा चीरमात्मनः । वासाँसि मम गावश्च । अन्नपाने च सर्वदा । ततो मे श्रियमावह । लोमशां पशुभिः सह स्वाहा । आमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा । विमाऽऽयन्तु ब्रह्मचारिणस्वाहा । प्रमाऽऽयन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा । दमायन्तु ब्रह्मचारिणः स्वाहा । शमायन्तु ब्रह्मचारिणस्वाहा ॥ २ ॥
ज्ञानप्राप्तीकरितां म्हणण्याचे हे मंत्र झाले. आतां श्रीच्या प्राप्तीकरिता म्हणण्याचे मंत्र सांगतात - आणणारी, विस्तार करणारी व अनेक कालपर्यंत माझी वस्त्रे, माझ्या गाई यांचें रक्षण करणारी, सर्वकाल अन्न व पाणी देणारी, अजा व इतर पशु देणारी अशी श्री ज्ञानप्राप्तीनंतर मला प्राप्त करून दे. (स्वाहा आहुति). माझ्याकडे ब्रह्मचारी शिष्य येवोत. [त्रिवार]. ते शिष्य दमाने युक्त होवोत. शमानें युक्त होवोत. २.

यशो जनेऽसानि स्वाहा । श्रेयान्‌ वस्यसोऽसानि स्वाहा । तं त्वा भग प्रविशानि स्वाहा । स मा भग प्रविश स्वाहा । तस्मिन् सहस्रशाखे । नि भगाऽहं त्वयि मृजे स्वाहा । यथाऽऽपः प्रवताऽऽयन्ति । यथा मास अहर्जरम्‌ । एवं मां ब्रह्मचारिणः । धातरायन्तु सर्वतः स्वाहा । प्रतिवेशोऽसि प्रमा पाहि प्रमापद्यस्व ॥ ३ ॥ इति शीक्षाध्याये चतुर्थोऽनुवाकः ॥
जनामध्यें मीं यशस्वी व्हावे, श्रीमानाहून देखील श्रीमान व्हावें. हे भगवन् - ॐकारा, मीं तुजमध्यें प्रवेश करावा. तूंही मजमध्यें प्रवेश कर. सहस्रावयवयुक्त अशा तुजमध्यें प्रवेश करून मी तुला शोधीन. ज्याप्रमाणें उदक निमग्न प्रदेशाच्या अनुरोधानें जातें, ज्याप्रमाणें महिने संवत्सराच्या अनुरोधानें जातात, तसे हे विधात्या, सर्व बाजूंनी माझ्याकडे शिष्य येवोत. तूं श्रमपरिहाराचे स्थान आहेस. मला आपलें स्वरूप प्रकट कर. मजप्रत ये, तूं व मी एकरूप व्हावे. ३. अनुवाक ४.

व्याहृत्युपासनम् -

भू-र्भुव-सुव-रिति वा एता-स्तिस्रो व्याहृतयः । तासा मुह स्मैतां चतुर्थीम्‌ । माहाचमस्यः प्रवेदयते । मह इति । तत्‌ब्रह्म । स आत्मा । अङ्गान्यन्या देवताः । भूरिति वा अयं लोकः । भुव इत्यन्तरिक्षम्‌ । सुव-रित्यसौ लोकः ॥ १ ॥
याप्रमाणे मेधा, श्री आदि इच्छिणाराकरितां मंत्र सांगितले. आतां व्याहृतिरूप ब्रह्माची अंतर-उपासना सांगतात - भू:, भ्व: आणि सुवः अशा तीन प्रकारच्या व्याहृति आहेत. त्यांची चवथी व्याहृति महः ही आहे. ही महाचमस ऋषीच्चा पुत्र माहाचमस्य याने सांगितली. हेच ब्रह्म होय. हाच आत्मा होय. इतर (आदित्यादि) देवता ही अंगे. भू: म्हणजे हा लोक, भुवः म्हणजे अंतरिक्ष लोक, सुवः म्हणजे स्वर्गलोक. १.

मह इत्यादित्यः । आदित्येन वाव सर्वे लोका महीयन्ते । भूरिति वा अग्निः । भुव इति वायुः । सुवरित्यादित्यः । मह इति चन्द्रमाः । चन्द्रमसा वाव सर्वाणि ज्योतीँषि महीयन्ते । भूरिति वा ऋचः । भुव इति सामानि । सुवरिति यजूँषि ॥ २ ॥
महः म्हणजे आदित्य [सूर्यमंडलरूपी जगाचा प्राण]. आदित्याचे योगाने सर्व लोक वृद्धि पावतात. भू: म्हणजे अग्नि, भुवः म्हणजे वायु, सुवः म्हणजे आदित्य, महः म्हणजे चंद्रमा. चंद्राचे योगाने सर्व ज्योतिर्मय पदार्थांची, नक्षत्रे इत्यादि, वृद्धिं होते. भूः म्हणजे ऋचा, भुवः म्हणजे साम. सुवः म्हणजे यजु. २

मह इति ब्रह्म । ब्रह्मणा वाव सर्वे वेदा महीयन्ते । भूरिति वै प्राणः । भुव इत्यपानः । सुवरिति व्यानः । मह इत्यन्नम्‌ । अन्नेन वाव सर्वे प्राणा महीयन्ते । ता वा एताश्चतस्रश्चतुर्धा । चतस्रश्चतस्रो व्याहृतयः । ता यो वेद । स वेद ब्रह्म । सर्वेऽस्मैदेवा बलिमावहन्ति ॥ ३ ॥ इति शीक्षाध्याये पञ्चमोऽनुवाकः ॥
महः म्हणजे ब्रह्म. ब्रह्माचे योगाने सर्व वेद महत्त्व पावतात. भू: म्हणजे प्राण, भुवः म्हणजे अपान, सुवः म्हणजे व्यान, मह म्हणजे अन्न. अन्नाने सर्व प्राणांची वृद्धि होते. याप्रमाणें या चार व्याहृतींचे चार प्रकार आहेत. यांचें ज्याला ज्ञान होतें त्याला ब्रह्माचे ज्ञान होतें. त्याला सर्व देव बलि आणतात, समृद्ध करतात. ३. अनुवाक ५

मनोमयत्वादि-गुणक-ब्रह्मोपासनया स्वाराज्य-सिद्धिः -

स य एषोऽन्त-र्हृदय आकाशः । तस्मिन्नयं पुरुषो मनोमयः । अमृतो हिरण्मयः । अन्तरेण तालुके । य एष स्तन इवावलम्बते । सेन्द्रयोनिः । यत्रासौ केशान्तो विवर्तते । व्यपोह्य शीर्षकपाले । भूरित्यग्नौ प्रतितिष्ठति । भुव इति वायौ ॥ १ ॥
हृदयाचे अंतर्भागी जें आकाश आहे त्यामध्ये हा मनोमय पुरुष [भू आदि लोकांना व्यापून रहाणारा तो पुरुष] आहे. तो मृत्युरहित आहे, प्रकाशस्वरूप आहे. तालूंच्या मध्ये [मुखाचे आंत जिभेच्या मूळाचे वर असलेले भाग यांना तालुका म्हणतात] स्तनांच्यासारखा जो भाग त्याचे मध्ये आहे. तेंच ब्रह्माचे (इंद्र) ज्ञान होण्याचे द्वार होय. (हें द्वार) ज्या ठिकाणी केस फुटतात (म्हणजे डोक्यापर्यंत) तेथपर्यंत हें पसरले आहे. ज्ञानी मनुष्य मस्तकाची कपालें फोडून त्या द्वारानें निघून, भूव्याहृतिरूप अग्नीचे स्वरूप पावतो. म्हणजे अग्निरूपानं हा लोक व्यापतो. भुवव्याहृतिरूप वायुचे स्वरूप पावतो. १.

सुवरित्यादित्ये । मह इति ब्रह्मणि । आप्नोति स्वाराज्यम्‌ । आप्नोति मनसस्पतिम्‌ । वाक्‌पतिश्चक्षुष्पतिः । श्रोत्रपतिर्विज्ञानपतिः । एतत्ततो भवति । आकाशशरीरं ब्रह्म । सत्यात्म प्राणारामं मन आनन्दम्‌ । शान्तिसमृद्धममृतम्‌ । इति प्राचीनयोग्योपास्स्व ॥ २ ॥ इति शीक्षाध्याये षष्ठोऽनुवाकः ॥
सुवव्याहृतिरूप आदित्याचे स्वरूप पावतो. महव्याहृतिरूप ब्रह्माचे स्वरूप पावतो. (त्यांमध्यें आत्मरूपानें स्थित होत्साता) आधिपत्य मिळवितो. मनाचे स्वामित्व मिळवितो. वाणी, चक्षु, श्रोत्र व विज्ञान या सर्वांचा स्वामी होतो. नंतर एतद्‌रूप ब्रह्मरूप होतो. आकाश हें ज्याचे शरीर, सत्य ज्याचा आत्मा, प्राणांचा आराम, मनाचा आनंद शांतीनें पूर्ण, मृत्युरहित, अशा त्या ब्रह्माची, हे पुरातन ऋषींची योग्यता इच्छिणाऱ्या शिष्या, उपासना कर. २. अनुवाक ६

पृथिव्याद्युपाधिक-पञ्च-ब्रह्मोपासनम् -

पृथिव्यन्तरिक्षं द्यौर्दिशोऽवान्तरदिशाः । अग्निर्वायुरादित्यश्चन्द्रमा नक्षत्राणि । आप ओषधयो वनस्पतय आकाश आत्मा । इत्यधिभूतम्‌ । अथाध्यात्मम्‌ । प्राणो व्यानोऽपान उदानसमानः । चक्षुः श्रोत्रं मनो वाक्‌ त्वक्‌ । चर्म माँसग्ग् स्नावाऽस्थि मज्जा । एतदधिविधाय ऋषि-रवोचत्‌ । पाङ्क्तं वा इदं सर्वम्‌ । पाङ्क्तेनैव पाङ्क्तग्ग् स्पृणोतीति ॥ १ ॥ इति शीक्षाध्याये सप्तमोऽनुवाकः ॥
ब्रह्माची पृथिव्यादि यज्ञस्वरूपानें उपासना सांगतात - पृथिवी, अंतरिक्ष, द्यौ, दिशा आणि अवांतर दिशा हें लोकपांक्तस्वरूप, (पांक्त=यज्ञ) अग्नि, वायू, आदित्य, चंद्र, नक्षत्रे हे देवतापांक्तस्वरूप, उदक, ओषधि, वनस्पति, आकाश, आत्मा हें भूतपांक्तस्वरूप. याप्रमाणें अधिभूतस्वरूप झालें. आतां अध्यात्मस्वरूप - प्राण, व्यान, अपान, उदान, समान हें वायुपांक्तस्वरूप, चक्षु, श्रोत्र, मन, वाणी, त्वचा हें इंद्रियपांक्तस्वरूप, चर्म, मांस, स्नायु, अस्थि, मज्जा हें धातुपांक्तस्वरूप. हें सांगून इषी म्हणाले, हें सर्व जगत् पांक्तच आहे. पांक्तानेंच पांक्ताची तुष्टि, अथवा पूर्तता होते. १. अनुवाक् ७

प्रणवोपासनम् -

ओमिति ब्रह्म । ओमितीदँ सर्वम्‌ । ओमित्येतदनुकृति ह स्म वा अप्यो श्रावयेत्याश्रावयन्ति । ओमिति सामानि गायन्ति । ॐ शोमिति शस्त्राणि शँसन्ति । ओमित्यध्वर्युः प्रतिगरं प्रतिगृणाति । ओमिति ब्रह्मा प्रसौति । ओमित्यग्निहोत्रमनुजानाति । ओमिति ब्राह्मणः प्रवक्ष्यन्नाह । ब्रह्मोपाप्नवानीति । ब्रह्मैवोपाप्नोति ॥ १ ॥ इति शीक्षाध्याये अष्टमोऽनुवाकः ॥
आतां ॐकाराचा उपासनाविधि सांगतात - ॐ हें ब्रह्म आहे. हे सर्व (विश्व) ॐ आहे. ॐ अनुकृति आहे : कांहीं सांगितले असतां ऐकणारा ॐ म्हणून त्याप्रमाणें करतो. म्हणजे अनुकृति हा अर्थ ॐ अक्षराचा झाला. म्हणजे लौकिक व्यवहाराला कारण ॐकार होतो. त्याचप्रमाणें वैदिक व्यवहाराला देखील होतो असें पुढें सांगतात - देवांना मंत्र ऐकव असें सांगितलें असतां ॐ म्हणून मंत्र म्हणतात. ॐ म्हणून सामांचे गायन करतात. ॐ शं असें असून शस्त्र (गानरहित स्तोत्रमंत्र) म्हणतात. ॐ असें म्हणून अध्वर्यु प्रतिगर कर्म करतो. ॐ असे म्हणून ब्रह्मा अनुज्ञा देतो. ॐ असें म्हणून अग्निहोत्राला अनुज्ञा देतो. ॐ असा अध्ययनाला आरंभ करणारा ब्राह्मण "मला ब्रह्माची प्राति होवो" असें म्हणतो. त्याप्रमाणे त्याला ब्रह्माची प्राप्ति होते. १ अनुवाक् ८

स्वाध्याय-प्रशंसा -

ऋतं च स्वाध्यायप्रवचने च । सत्यं च स्वाध्यायप्रवचने च । तपश्च स्वाध्यायप्रवचने च । दमश्च स्वाध्यायप्रवचने च । शमश्च स्वाध्यायप्रवचने च । अग्नयश्च स्वाध्यायप्रवचने च । अग्निहोत्रं च स्वाध्यायप्रवचने च । अतिथयश्च स्वाध्यायप्रवचने च । मानुषं च स्वाध्यायप्रवचने च । प्रजा च स्वाध्यायप्रवचने च । प्रजनश्च स्वाध्यायप्रवचने च । प्रजातिश्च स्वाध्यायप्रवचने च । सत्यमिति सत्यवचा राथीतरः । तप इति तपोनित्यः पौरुशिष्टिः । स्वाध्यायप्रवचने एवेति नाको मौद्‌गल्यः । तद्धि तपस्तद्धि तपः ॥ १ ॥ इति शीक्षाध्याये नवमोऽनुवाकः ॥
यथाशास्त्र भाषण (ऋतं), अध्ययन (स्वाध्याय) आणि अध्यापन (प्रवचन) यांचें अनुष्ठान (आचरण केलें पाहिजे). सत्य आणि स्वाध्यायप्रवचन, तप आणि स्वाध्यायप्रवचन, दम आणि स्वाध्यायप्रवचन, शम आणि स्वाध्यायप्रवचन, अग्न्याधान आणि स्वाध्यायप्रवचन, अग्निहोत्र अणि स्वाध्यायप्रवचन, आतिथ्य आणि स्वाध्यायप्रवचन, लौकिकव्यवहार आणि स्वाध्यायप्रवचन, प्रजोत्पत्ति आणि स्वाध्यायप्रवचन, ऋतुकाली गमन आणि स्वाध्यायप्रवचन, पौत्रोत्पत्ति आणि स्वाध्यायप्रवचन, यांचें अनुष्ठान केलें पाहिजे. सत्याचें अनुष्ठान केलें पाहिजे, असें रथीतर ऋषीचा सत्यवचा नामक पुत्र सांगतो. तपाचें अनुष्ठान केलें पाहिजे, असें पुरुशिष्टि ऋषीचा तपोनित्य नामक पुत्र सांगतो. स्वाध्याय व प्रवचन यांचेंच अनुष्ठान केलें पाहिजे, कारण तेंच तप होय, असें मुद्‌गल ऋषीचा नाक नामक पुत्र सांगतो. १ अनुवाक् ९

ब्रह्मज्ञान-प्रकाशक-मंत्रः -

अहं वृक्षस्य रेरिवा । कीर्तिः पृष्ठं गिरेरिव । ऊर्ध्वपवित्रो वाजिनीव स्वमृतमस्मि । द्रविणँ सवर्चसम्‌ । सुमेधा अमृतोक्षितः । इति त्रिशङ्कोर्वेदानुवचनम्‌ ॥ १ ॥ इति शीक्षाध्याये दशमोऽनुवाकः ॥
मी (संसाररूपी) वृक्षाचा अंतर्यामित्वाने प्रेरणा करणारा आहें. माझी कीर्ति पर्वतांच्या पृष्ठाप्रमाणे उंच आहे. पवित्र ब्रह्म (पवित्रं) ज्याचे कारण (ऊर्ध्वं) आहे असा मी आहें. सूर्याचे ठिकाणी (वाजिनि) ज्याप्रमाणें प्रकाशरूप अथवा शोभमान आत्मस्वरूप आहे त्याप्रमाणें माझे ठिकाणी आहे. दीसियुक्त असें द्रव्य मजपाशी आहे. उत्तम बुद्धीने युक्त, मरणरहित व क्षयरहित असा मी आहें. याप्रमाणें आत्मैकत्वज्ञानानें उत्पन्न झालेलें त्रिशंकु ऋषीचे वचन आहे. १. अनुवाक् १०

शिष्यानुशासनम् -

वेदमनूच्याऽऽचार्योऽन्तेवासिनमनुशास्ति । सत्यं वद । धर्मं चर । स्वाध्यायान्मा प्रमदः । आचार्याय प्रियं धनमाहृत्य प्रजातन्तुं मा व्यवच्छेत्सीः । सत्यान्न प्रमदितव्यम्‌ । धर्मान्न प्रमदितव्यम्‌ । कुशलान्न प्रमदितव्यम्‌ । भूत्यै न प्रमदितव्यम्‌ । स्वाध्यायप्रवचनाभ्यां न प्रमदितव्यम्‌ ॥ १ ॥
वेदांचे अध्यापन केल्यानंतर आचार्य शिष्याला उपदेश करतात - सत्य भाषण कर. धर्माचें अनुष्ठान कर. स्वाध्यायाविषयी प्रमाद करूं नको. आचार्याला धन प्रिय आहे असें समजून तें देऊन ज्ञानरूपी प्रजेचा वंश छेदूं नकोस [ म्हणजे गुरुदक्षिणा दिल्याने आपलें कर्तव्य संपले असें न समजता आचार्याकडून प्राप्त झालेलें ज्ञान इतरांना देऊन त्या ज्ञानाचा विस्तार कर]. सत्याविषयी प्रमाद करूं नको. (कर्तव्य) धर्मांविषयी प्रमाद करूं नको. आत्मसंरक्षणार्थ कर्माविषयी (कुशलात्) प्रमाद करूं नको. भूत्यर्थ मंगलकर्माविषयी प्रमाद करूं नको. स्वाध्याय व प्रवचन यांविषयी प्रमाद करूं नको. १.

देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम्‌ । मातृदेवो भव । पितृदेवो भव । आचार्यदेवो भव । अतिथिदेवो भव । यान्यनवद्यानि कर्माणि । तानि सेवितव्यानि । नो इतराणि । यान्यस्माकँ सुचरितानि । तानि त्वयोपास्यानि ॥ २ ॥
देवकार्य व पितृकार्य याविषयी प्रमाद करूं नको. मातूदेव (माता हाच ज्याचा देव आहे) असा हा. पितृदेव हो. आचायदेव हो. अतिथिदेव हो. जी अनिंद्य कर्मे आहेत त्यांचेंच आचरण करावे. इतर कर्मांचे आचरण करूं नये. आमची जी सत्कर्म असतील त्यांचेंच तूं आचरण करावेस. २.

नो इतराणि । ये के चास्मच्छ्रेयाँसो ब्राह्मणाः । तेषां त्वयाऽऽसनेन प्रश्वसितव्यम्‌ । श्रद्धया देयम्‌ । अश्रद्धयाऽदेयम्‌ । श्रिया देयम्‌ । ह्रिया देयम्‌ । भिया देयम्‌ । संविदा देयम्‌ । अथ यदि ते कर्मविचिकित्सा वा वृत्तविचिकित्सा वा स्यात्‌ ॥ ३ ॥
इतर कर्माचे आचरण करूं नयेस. आमच्याहून जे प्रशस्यतर ब्राह्मण असतील ते आले असतां त्यांना आसन वगैरे देऊन तूं त्यांच्या श्रमाचा परिहार करावास. जें कांहीं द्यावयाचे तें श्रद्धेने द्यावे, अश्रद्धेने देऊ नये. थोरपणानें द्यावे, आदरानें द्यावे, नम्रतापूर्वक द्यावे, मित्रत्वाची ओळख करून घेऊन (संविदा) द्यावे. जर कर्मासंबंधानें अथवा वर्तनासंबंधानें तुला शंका आली तर त्या ठिकाणी जे ब्राह्मण विचारशील, त्या कर्माचे व वर्तनाचे ठिकाणी युक्त, अत्यंत युक्त, क्रूरबुद्धिरहित, धर्मेच्छु, असे असतील ते त्यासंबंधानें जसे आचरण करीत असतील तसे आचरण तूं त्यासंबंधानें करीत जा. ३.

ये तत्र ब्राह्मणा संमर्शिनः । युक्ता आयुक्ताः । अलूक्षा धर्मकामा स्युः । यथा ते तत्र वर्तेरन्‌ । तथा तत्र वर्तेथाः । अथाभ्याख्यातेषु । ये तत्र ब्राह्मणा संमर्शिनः । युक्ता आयुक्ताः । अलूक्षा धर्मकामास्युः । यथा ते तेषु वर्तेरन्‌ । तथा तेषु वर्तेथाः । एष आदेशः । एष उपदेशः । एषा वेदोपनिषत्‌ । एतदनुशासनम्‌ । एवमुपासितव्यम्‌ । एवमुचैतदुपास्यम्‌ ॥ ४ ॥ इति शीक्षाध्याये एकादशऽनुवाकः ॥
(कांहीं) दोषाने युक्त -अशा कर्माचे अथवा आचरणाचे संबंधाने जे ब्राह्मण विचारशील, युक्त, अत्यंत युक्त, क्रूरबुद्धिरहित, धर्मेच्छु असे असतील ते त्यासंबंधानें जसे आचरण करीत असतील तसें आचरण तूं त्यासंबंधानें करीत जा. याप्रमाणे हा विधि (अथवा आज्ञा) आहे. हा (परंपरागत) उपदेश आहे. हे वेदांचे रहस्य आहे. हें प्रमाणभूत आचार्यांचे अनुशासन (आज्ञा) आहे. याप्रमाणे आचरण करावे, याप्रमाणे आचरण करावें. ४. अनुआक् ११

उत्तरशान्तिपाठः

शं नो मित्रः शं वरुणः । शं नो भवत्वर्यमा । शं न इन्द्रो बृहस्पतिः । शं नो विष्णुरुरुक्रमः । नमो ब्रह्मणे । नमस्ते वायो । त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि । त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्मावादिषम्‌ । ऋतमवादिषम्‌ । सत्यमवादिषम्‌ । तन्मामावीत्‌ । तद्वक्तारमावीत्‌ । आवीन्माम्‌ । आवीद्वक्तारम्‌ । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ १ ॥
इति शीक्षाध्याये द्वादशोऽनुवाकः ॥ इति शीक्षावल्ली समाप्ता ॥
मित्र व वरुण आम्हाला कल्याणकारक होवोत. सूर्य आम्हाला कल्याणकारक होवो. इंद्र व बृहस्पत्ति आम्हाला कल्याणकारक होवोत. विस्तीर्णगति विष्णू आम्हाला कल्याणकारक होवो. ब्रह्माला नमस्कार असो. हे वायु, तुला नमस्कार असो. तूंच प्रत्यक्ष ब्रह्म आहेस. तुलाच मी प्रत्यक्ष असें ब्रह्म म्हणतों. मी यथाशास्त्र भाषण केलें. मीं सत्य भाषण केलें. तें (ब्रह्म) माझें रक्षण करो. वक्त्याचे रक्षण करो. माझें रक्षण करो. वक्याचे रक्षण करो. १. अनुवाक् १२

द्वितीया ब्रह्मानन्दवल्ली


ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
आम्ही दोघांनी एकत्र रहावे, एकत्र सेवन करावे, एकत्र सामर्थ्य संपादन करावे. आमचे अध्ययन आम्हाला तेजस्वी करणारे असावे. आमच्याकडून एकमेकांचा द्वेष न घडो.

उपनिषत्सारसंग्रहः

ॐ ब्रह्मविदाप्नोति परम्‌ । तदेषाऽभुक्ता । सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म । यो वेद निहितं गुहायां परमे व्योमन्‌ । सोऽश्नुते सर्वान्‌कामान्त्सह । ब्रह्मणा विपश्चितेति ॥ तस्माद्वा एतस्मादात्मन आकाशः संभूतः । आकाशाद्वायुः । वायोरग्निः । अग्नेरापः । अद्‌भ्यः पृथिवी । पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽ न्नम्‌ । अन्नात्पुरुषः । स वा एष पुरुषोऽन्न्नरसमयः । तस्येदमेव शिरः । अयं दक्षिणः पक्षः । अयमुत्तरः पक्षः । अयमात्मा । इदं पुच्छं प्रतिष्ठा । तदप्येष श्लोको भवति ॥ १ ॥ इति प्रथमोऽनुवाकः ॥
जो ब्रह्म जाणतो त्याला ते पर (ज्याच्याहून श्रेष्ठ कांहीं नाहीं ) ब्रह्म प्राप्त होतें. याविषयीं पुढील ऋचा सांगितली आहे - ब्रह्म सत्य, ज्ञान आणि अनंत असे आहे. सूक्ष्म आकाशामध्ये (हृदयाकाशामध्यें) बुद्धीचे ठिकाणी तें स्थित आहे असें जो जाणतो तो सर्वज्ञस्वरूप ब्रह्माबरोबर [=ब्रह्मरूप होऊन] सर्व काम पावतो. त्या या आत्मस्वरूप ब्रह्मापासून आकाश उत्पन्न झालें. आकाशापासून वायु उत्पन्न झाला. वायूपासून अग्नि उत्पन्न झाला. अग्नीपासून उदक उत्पन्न झालें. उदकापासून पृथिवी उत्पन्न झाली. पूथिवीपासून ओषधि उत्पन्न झाल्या. ओषधीपासून अन्न उत्पन्न झालें. अन्नापासून पुरुष उत्पन्न झाला. म्हणून हा पुरुष अन्नाच्या रसाने पूर्ण आहे. त्याचें हें प्रत्यक्ष दिसणार मस्तक. ही (उजवा हात) दक्षिण बाजू. ही (डावा हात) उत्तर बाजू. हा देहाचा मध्यभाग. हें (कटीच्या खालचा भाग) शरीराला आधारभूत पुच्छ. पुढील मंत्रहि याच अर्थाचा आहे. १. अनुवाक् १

पंचकोशविवरणम्

अन्नाद्वै प्रजाः प्रजायन्ते । याः काश्च पृथिवीँ श्रिताः । अथो अन्नेनैव जीवन्ति । अथैनदपियन्त्यन्ततः । अन्नँ हि भूतानां ज्येष्ठम्‌ । तस्मात्सर्वौषधमुच्यते । सर्वं वै तेऽन्नमाप्नुवन्ति । येऽन्नं ब्रह्मोपासते । अन्नँ हि भूतानां ज्येष्ठम्‌ । तस्मात्‌सर्वौषधमुच्यते । अन्नाद्‌भूतानि जायन्ते । जातान्यन्नेन वर्धन्ते । अद्यतेऽत्ति च भूतानि । तस्मादन्नं तदुच्यत इति । तस्माद्वा एतस्मादन्नरसमयात्‌ । अन्योऽन्तर आत्मा प्राणमयः । तेनैष पूर्णः । स वा एष पुरुषविध एव । तस्य पुरुषविधताम्‌ । अन्वयं पुरुषविधः । तस्य प्राण एव शिरः । व्यानो दक्षिणः पक्षः । अपान उत्तरः पक्षः । आकाश आत्मा । पृथिवी पुच्छं प्रतिष्ठा । तदप्येष श्लोको भवति ॥ १ ॥ इति द्वितीयोऽनुवाकः ॥
ज्या म्हणून पृथिवीच्या आश्रयाने रहाणाऱ्या प्रजा आहेत त्या सर्व अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नानेच त्या जिवंत रहातात. शेवटी यामध्येंच (अन्नामध्येच) लय पावतात. प्राण्यांच्या अगोदर अन्न उत्पन्न झालें आणि त्याचे योगाने सर्व प्राण्यांची उस्पत्ति झाली. ससून तें सर्वाचे औषध असें म्हणतात. जे या अन्नरूप ब्रह्माची उपासना करतात त्यांना सर्व प्रकारचे अन्न प्राप्त होतें. सर्व प्राण्यांच्या पूर्वी अन्न उत्पन्न झालें. म्हणून तें सर्वांचे औषध असें म्हणतात. अन्नापासून प्राणी जन्म पावतात. जन्म पावल्यावर अन्नाने वृद्धि पावतात. प्राण्यांकडून भक्षण केलें जातें [अद्यते] आणि प्राण्यांना भक्षण करते (अत्ति) आणून याला 'अन्न' असें म्हणतात. या अन्नरसमय पिंडाहून वेगळा प्राणमय अंतरात्मा आहे. त्यानें [प्राणमय आत्म्याने] हा अन्नरसमय पिंड व्याप्त आहे. तो प्राणमय आत्मा या पुरुषाप्रमाणेच आहे. पुरुषाप्रमाणें म्हणजे असा - प्राण हें याचे शिर. व्यान हा दक्षिण पक्ष. अपान हा उत्तर पक्ष. आकाश हा आत्मा. पृथिवी हें आधारभूत पुच्छ पुढील मंत्रहि याच अर्थाचा आहे. अनुवाक् २

प्राणं देवा अनु प्राणन्ति । मनुष्याः पशवश्च ये । प्राणो हि भूतानामायुः । तस्मात्‌सर्वायुषमुच्यते । सर्वमेव त आयुर्यन्ति । ये प्राणं ब्रह्मोपासते । प्राणो हि भूतानामायुः । तस्मात्‌सर्वायुषमुच्यत इति । तस्यैष एव शारीर आत्मा । यः पूर्वस्य । तस्माद्वा एतस्मात्‌प्राणमयात्‌ । अन्योऽन्तर आत्मा मनोमयः । तेनैष पूर्णः । स वा एष पुरुषविध एव । तस्य पुरुषविधताम्‌ । अन्वयं पुरुषविधः । तस्य यजुरेव शिरः । ऋग्दक्षिणः पक्षः । सामोत्तरः पक्षः । आदेश आत्मा । अथर्वाङ‌गिरसः पुच्छं प्रतिष्ठा । तदप्येष श्लोको भवति ॥ १ ॥ इति तृतीयोऽनुवाकः ॥
अग्नि आदि देव (वाय्वात्मक) प्राणाचे अनुरोधानें प्राणनकर्म करतात. मनुष्य व पशु त्याचप्रमाणें प्राणाचे अनुरोधानें प्राणनकर्म करतात. कारण प्राण हा सर्व भूतांचे आयुष्य होय. म्हणून त्याला सर्वायुष, सर्वांचे आयुष्य, असें म्हणतात. जे प्राणरूप ब्रह्माची उपासना करतात ते सर्व आयुष्य पावतात, कारण प्राण हा भूतांचे आयुष्य आहे. म्हणून त्याला सर्वायुष म्हणसात. पहिल्या अन्नमय कोशाचा जो शारीर, शरीरामध्ये असणारा, आत्मा तोच या प्राणमय कोशाचा. या प्राणमयाहून वेगळा मनोमय आत्मा आहे. त्यानें (मनोमय आत्म्याने) हा प्राणमय आत्मा व्याप्त आहे. तो मनोमय आत्मा या पुरुषाप्रमाणेच आहे. पुरुषाप्रमाणे म्हणजे असा - यजु हें त्याचें शिर, ऋक् हा दक्षिण पक्ष, साम हा उत्तर पक्ष, आदेश (ब्राह्मणं) हा आत्मा. अथर्वांगिरस हें आधारभूत पुच्छ. पुढील मंत्रही याच अर्थाचा आहे. अनुवाक् ३

यतो वाचो निवर्तन्ते । अप्राप्य मनसा सह । आनन्दं ब्रह्मणो विद्वान्‌ । न बिभेति कदाचनेति । तस्यैष एव शारीर आत्मा । यः पूर्वस्य । तस्माद्वा एतस्मान्मनोमयात्‌ । अन्योऽन्तर आत्मा विज्ञानमयः । तेनैष पूर्णः । स वा एष पुरुषविध एव । तस्य पुरुषविधताम्‌ । अन्वयं पुरुषविधः । तस्य श्रद्धैव शिरः । ऋतं दक्षिणः पक्षः । सत्यमुत्तरः पक्षः । योग आत्मा । महः पुच्छं प्रतिष्ठा । तदप्येष श्लोको भवति ॥ १ ॥ इति चतुर्थोऽनुवाकः ॥
ज्याचा आनंद प्राप्त न होतां मनाप्रमाणेंच वाणी देखील ज्या ब्रह्मापासून निवृत्त होते त्या ब्रह्माचा साक्षात्काररूपी आनंद जो जाणतो त्याला कसलेंही भय रहात नाहीं. मागच्या (प्राणमय) कोशाचा जो शारीर, शरीरामध्यें असणारा आत्मा तोच या मनोमय कोशाचा. या मनोमयाहून वेगळा विज्ञानमय आत्मा आहे. त्यानें (विज्ञानमय आत्म्याने) हा मनोमय आत्मा व्याप्त आहे. तो विज्ञानमय आत्मा या पुरुषाप्रमाणेंच आहे. पुरुषाप्रमाणे म्हणजे असा- श्रद्धा हे त्याचें शिर. यथाशास्त्रत्व (ऋतं) हा दक्षिण पक्ष. सत्य हा उत्तर पक्ष. योग (समाधि=तदात्मकत्व) हा आत्मा. महत्तत्व (महत् = म्हणजे सृष्ट्यारंभी प्रथम उत्पन्न झालेले तत्त्व) हें आधारभूत पुच्छ. पुढील मंत्रहि याच अर्थीचा आहे. अनुवाक् ४

विज्ञानं यज्ञं तनुते । कर्माणि तनुतेऽपि च । विज्ञानं देवाः सर्वे । ब्रह्म ज्येष्ठमुपासते । विज्ञानं ब्रह्म चेद्वेद । तस्माच्चेन्न प्रमाद्यति । शरीरे पाप्मनो हित्वा । सर्वान्कामान् त्समश्नुत इति । तस्यैष एव शारीर आत्मा । यः पूर्वस्य । तस्माद्वा एतस्माद्विज्ञानमयात्‌ । अन्योऽन्तर आत्माऽऽनन्दमयः । तेनैष पूर्णः । स वा एष पुरुषविध एव । तस्य पुरुषविधताम्‌ । अन्वयं पुरुषविधः । तस्य प्रियमेव शिरः । मोदो दक्षिणः पक्षः । प्रमोद उत्तरः पक्षः । आनन्द आत्मा । ब्रह्म पुच्छं प्रतिष्ठा । तदप्येष श्लोको भवति ॥ १ ॥ इति पञ्चमोऽनुवाकः ॥
विज्ञानवान् (श्रद्धापूर्वक) यज्ञ करतो, कर्मे करतो. (इंद्रादि) सर्व देव त्यांच्या अगोदर असलेल्या विज्ञानरूपी ब्रह्माची उपासना करतात. हें विज्ञानरूपी ब्रह्म जो जाणतो व त्याचे सबंधाने प्रमादरहित असतो तो शरीरसंबंधी सर्व पापांचा त्याग करून विज्ञानब्रह्मरूप होत्साता, सर्व इच्छा पावतो. मागच्या (मनोमय) कोशाचा जो शारीर (शरीरामध्ये असणारा) आत्मा तोच या विज्ञानमय कोशाचा. या विज्ञानमयाहून वेगळा आनंदमय आत्मा आहे. त्यानें (आनंदमय आत्म्याने) हा विज्ञानमय आत्मा व्याप्त आहे. तो आनंदमय आत्मा या पुरुषाप्रमाणेच आहे. पुरुषाप्रमाणे म्हणजे असा - तृप्ति हें त्याचें शिर. मोद (इष्टप्राप्तीमुळें होणारा) हा दक्षिण पक्ष. प्रमोद (प्रकृष्ट मोद) हा उत्तर पक्ष. आनंद हा आत्मा. ब्रह्म हे आधारभूत पुच्छ. पुढील मंत्रही याच अर्थाचा आहे. अनुवाक् ५.

असन्नेव स भवति । असद्‌ब्रह्मेति वेद चेत्‌ । अस्ति ब्रह्मेति चेद्वेद । सन्तमेनं ततो विदुरिति । तस्यैष एव शारीर आत्मा । यः पूर्वस्य । अथातोऽनुप्रश्नाः । उताविद्वानमुं लोकं प्रेत्य । कश्चन गच्छती ३ आहो विद्वानमुं लोकं प्रेत्य कश्चित्समश्नुता ३ उ । सोऽकामयत । बहु स्यां प्रजायेयेति । स तपोऽतप्यत । स तपस्तप्त्वा । इदँ सर्वमसृजत । यदिदं किञ्च । तत्सृष्ट्वा । तदेवानुप्राविशत्‌ । तदनु प्रविश्य । सच्च त्यच्चाभवत्‌ । निरुक्तं चानिरुक्तं च । निलयनं चानिलयनं च । विज्ञानं चाविज्ञानं च । सत्यं चानृतं च सत्यमभवत्‌ । यदिदं किञ्च । तत्सत्यमित्याचक्षते । तदप्येष श्लोको भवति ॥ १ ॥ इति षष्ठोऽनुवाकः ॥
ब्रह्म असत् (अविद्यमान) आहे असें ज्याला वाटतें तो असत् असल्यासारखा होतो. ब्रह्म विद्यमान आहे असे जो जाणतो तो सत् आहे असें समजतात. मागच्या (विज्ञानमय) कोशाचा जो शारीर, शरीरामध्यें असणारा, आस्मा तोच या (आनंदमय) कोशाचा. आतां याविषयी शिष्याचे प्रश्न - ब्रह्म न जाणणारा त्या (पर) लोकाप्रत गेला असतां ब्रह्माप्रत जातो किंवा जात नाही ? जात नसेल तर विद्वान् तरी त्या (पर) लोकाप्रत गेला असतां ब्रह्म पावतो किंवा नाहीं ? आचार्यांचे उत्तर - त्या (जगत्‌कारण) आत्म्याला मीं पुष्कळ व्हावें, प्रजा उत्पन्न करावी, अशी इच्छा झाली. म्हणून त्यानें तप आचरण केलें. तप आचरण करून त्यानें हें जें जें कांहीं म्हणून अस्तित्वांत आहे तें सर्व निर्माण केलें. तें निर्माण करून त्यानें स्वतः त्यामध्ये प्रवेश केला. प्रवेश करून तो मूर्त (सत्) आणि अमूर्त (त्यत्) असा झाला; निरुक्त (देशकालादि विशिष्ट=मूर्त) आणि अनिरुक्त (अमूर्त) असा झाला; निलयन (स्थान=मूर्तधर्म) आणि अनिलयन (अस्थान) झाला; विज्ञान (चेतन) आणि अविज्ञान (अचेतन) झाला; व्यावहारिक सत्य आणि असत्य झाला. तो सत्य म्हणजे सत् व त्यत् रूपी आत्माच हे सर्व झाला. म्हणून त्या आत्म्याला सत्य असें म्हणतात. पुढील मंत्रही याच अर्थाचा आहे. अनुवाक् ६

अभयप्रतिष्ठाः

असद्वा इदमग्र आसीत्‌ । ततो वै सदजायत । तदात्मानँ स्वयमकुरुत । तस्मात् तत्सुकृतमुच्यत इति । यद्वै तत्‌सुकृतम्‌ । रसो वै सः । रसँ ह्येवायं लब्ध्वाऽऽनन्दी भवति । को ह्येवान्यात्कः प्राण्यात्‌ । यदेष आकाश आनन्दो न स्यात्‌ । एष ह्येवाऽऽनन्दयाति । यदा ह्येवैष एतस्मिन्नदृश्येऽनात्म्येऽनिरुक्तेऽनिलयनेऽभयं प्रतिष्ठां विन्दते । अथ सोऽभयं गतो भवति । यदा ह्येवैष एतस्मिन्नुदरमन्तरं कुरुते । अथ तस्य भयं भवति । तत्वेव भयं विदुषोऽमन्वानस्य । तदप्येष श्लोको भवति ॥ १ ॥ इति सप्तमोऽनुवाकः ॥
हें सर्व जगत् पूर्वी असत् म्ह० नामरूपादि वैशिष्टरहित होतें. त्यापासून सत् उत्पन्न झालें. त्यानें स्वतःच आपणाला उत्पन्न् केलें. म्हणून त्याला सुकृत असें म्हणतात. तें जें सुकृत तें रस होय. (मधुर, अम्ल इत्यादि) रस मिळाल्यानें (मनुष्य) आनंदी होतो. आकाशाप्रमाणें सर्वव्यापी असा हा आत्मा आनंदमय नसता तर अपानचेष्टा कोणी करविल्या असत्या (अन्यात्) ? प्राणचेष्टा कोणी करविल्या असत्या (प्राण्यात्) ? अर्थात हाच आत्मा जीवांना आनंद देतो. जेव्हां मनुष्य या अदृश्य, अशरीर, अविकार, अनिलयन अशा ब्रह्माचे ठिकाणी भयरहित रीतीनें स्थित होतो, आत्मभाव पावतो, तेव्हा तो अभयाप्रत गेला असें होतें. जेव्हां तो ब्रह्माचे ठिकाणी आपणांपासून अल्प जरी भेद पाहील तेव्हां त्याला भय आहेच असें समजावे. ('मी ब्रह्म आहें' असा अभेद) न जाणाऱ्या केवल कर्मविद्याविशारदाला देखील तेच भय आहे, पुढील मंत्रही याच अर्थाचा आहे. अनुवाक् ७

ब्रह्मानन्दमीमांसा

भीषाऽस्माद्वातः पवते । भीषोदेति सूर्यः । भीषाऽस्मादग्निश्चेन्द्रश्च । मृत्युर्धावति पञ्चम इति । सैषाऽऽनन्दस्य मीमाँसा भवति । युवा स्यात्साधुयुवाऽध्यायकः । आशिष्ठो दृढिष्ठो बलिष्ठः । तस्येयं पृथिवी सर्वा वित्तस्य पूर्णा स्यात्‌ । स एको मानुष आनन्दः । ते ये शतं मानुषा आनन्दाः ॥ १ ॥ स एको मनुष्यगन्धर्वाणामानन्दः । श्रोत्रियस्य चाकामहतस्य । ते ये शतं मनुष्यगन्धर्वाणामानन्दाः । स एको देवगन्धर्वाणामानन्दः । श्रोत्रियस्य चाकामहतस्य । ते ये शतं देवगन्धर्वाणामानन्दाः । स एकः पितृणां चिरलोकलोकानामानन्दः । श्रोत्रियस्य चाकामहतस्य । ते ये शतं पितृणां चिरलोकलोकानामानन्दाः । स एक आजानजानां देवानामानन्दः ॥ २ ॥ श्रोत्रियस्य चाकामहतस्य । ते ये शतं आजानजानां देवानामानन्दाः । स एकः कर्मदेवानां देवानामानन्दः । ये कर्मणा देवानपियन्ति । श्रोत्रियस्य चाकामहतस्य । ते ये शतं कर्मदेवानां देवानामानन्दाः । स एको देवानामानन्दः । श्रोत्रियस्य चाकामहतस्य । ते ये शतं देवानामानन्दाः । स एक इन्द्रस्याऽऽनन्दः ॥ ३ ॥ श्रोत्रियस्य चाकामहतस्य । ते ये शतमिन्द्रस्याऽऽनन्दाः । स एको बृहस्पतेरानन्दः । श्रोत्रियस्य चाकामहतस्य । ते ये शतं बृहस्पतेरानन्दाः । स एकः प्रजापतेरानन्दः । श्रोत्रियस्य चाकामहतस्य । ते ये शतं प्रजापतेरानन्दाः । स एको ब्रह्मण आनन्दः । श्रोत्रियस्य चाकामहतस्य ॥ ४ ॥ स यश्चायं पुरुषे । यश्चासावादित्ये । स एकः । स य एवंवित्‌ । अस्माल्लोकात्प्रेत्य । एतं अन्नमयमात्मानमुपसङ्क्रामति । एतं प्राणमयमात्मानमुपसङ्क्रामति । एतं मनोमयमात्मानमुपसङ्क्रामति । एतं विज्ञानमयमात्मानमुपसङ्क्रामति । एतमानन्दमयमात्मानमुपसङ्क्रामति । तदप्येष श्लोको भवति ॥ ५ ॥ इत्यष्टमोऽनुवाकः ॥
या ब्रह्मापासून भीति आहे म्हणून वायू वहातो, याच्या भीतीनें सूर्य उगवतो, याच्या भीतीनें अग्नि आणि इंद्र आपापली कामें करतात, आणि पांचवा मृत्यु येतो. (आनंदरूपी) ब्रह्माच्या आनंदाची मीमांसा अशी आहे - चांगला तरुण असा वेदाध्ययन केलेला, आशायुक्त, दृढस्वभावी व बलवान् अशाला ही सर्व पृथ्वी वित्तपूर्ण अशी मिळावी, म्हणजे पृथ्वीचे राज्य मिळावे, या योगाने त्याला जो आनंद होईल तो एक मानुष आनंद होय. असे शंभर मानुषानंद म्हणजे मनुष्यगधर्वाचा (मनुष्य असून कर्माचे योगाने गंधर्व झालेले) एक आनंद होय. आनंदरूप ब्रह्म जाणणाऱ्या निष्काम श्रोत्रियाला हा आनंद होतो. असे मनुष्यगधर्वांचे शंभर आनंद म्हणजे देवगंधर्वाचा एक आनंद होय. निष्काम श्रोत्रियाला हा आनंद होतो. असे देवगंधर्वांचे शंभर आनंद म्हणजे चिरलोकपितरांचा (ज्या लोकामधून पुन्हा भूलोकीं यावें लागत नाही त्या लोकांतील पितरांचा) एक आनंद होय. निष्काम श्रोत्रियाला हा आनंद होतो. असे चिरलोकपितरांचे शंभर आनंद म्हणजे (कल्पारंभी उत्पन्न झालेल्या) आजाननामक देवलोकांतील देवांचा एक आनंद होय. निष्काम श्रोत्रियाला हा आनंद होतो. असे आजानदेवांचे शंभर आनंद हाणजे जे कर्माचे योगानें देवत्व पावलेले असतात त्या कर्मदेवांचा एक आनंद होय. निष्काम श्रोत्रियाला हा आनंद होतो. असे कर्मदेवांचे शंभर आनंद म्हणजे देवांचा एक आनंद होय. निष्काम श्रोत्रियाला हा आनंद होतो. असे देवांचे शंभर आनंद म्हणजे इंद्राचा एक आनंद होय. निष्काम श्रोत्रियाला हा आनंद होतो. असे इंद्राचे शंभर आनंद म्हणजे बृहस्पतीचा एक आनंद होय. निष्काम श्रोत्रियाला हा आनंद होतो. असे बृहस्पतीचे शंभर आनंद म्हणजे प्रजापतीचा एक आनंद होय. निष्काम श्रोत्रियाला हा आनंद होतो. असे प्रजापतीचे शंभर आनंद म्हणजे ब्रह्माचा एक आनंद होय. आनंदरूप ब्रह्म जाणाऱ्या निष्काम श्रोत्रियाला हा आनंद होतो. हा आनंद म्हणजे जो (मागे सांगितलेल्या पंचकोशात्मक) पुरुषाचे ठिकाणी आहे, आदित्याचे ठिकाणी आहे. हा सर्व एकच आहे. सारांश, ज्याला ब्रह्माचे याप्रमाणे अभेदाने ज्ञान होतें, तो इहलोकांतून निघून गेला हाणजे या अन्नमय आत्म्याशी एकरूप होतो, या प्राणमय आत्म्याशी एकरूप होतो, या मनोमय आत्म्याशी एकरूप होतो, या विज्ञानमय आत्म्याशी एकरूप होतो, या आनंदमय आत्म्याशी एकरूप होतो. पुढील मंत्रही याच अर्थाचा आहे. अनुवाक् ८

यतो वाचो निवर्तन्ते । अप्राप्य मनसा सह । आनन्दं ब्रह्मणो विद्वान्‌ । न बिभेति कुतश्चनेति । एतँ ह वाव न तपति । किमहँ साधु नाकरवम्‌ । किमहं पापमकरवमिति । स य एवं विद्वानेते आत्मानँ स्पृणुते । उभे ह्येवैष एते आत्मानँ स्पृणुते । य एवं वेद । इत्युपनिषत्‌ ॥ १ ॥ इति नवमोऽनुवाकः ॥
॥ इति ब्रह्मानन्दवल्ली समाप्ता ॥
ज्याचा आनंद प्राप्त न होतां मनाप्रमाणेच वाणी देखील ज्या ब्रह्मापासून निवृत्त होते त्या ब्रह्माचा साक्षात्काररूपी आनंद जो जाणतो त्याला कसलेंही भय रहात नाहीं. कारण मीं चांगले कृत्य केलें नाहीं, मी पाप केलें, अशी शंका त्याला, ब्रह्मज्ञान्याला ताप देत नाही. कारण याप्रकारे जो ब्रह्म जाणतो तो पुण्य व पाप या दोहोंनी आत्म्यालाच तुष्ट करतो [हीं आत्मरूपच आहेत, यांना स्वतंत्र अस्तित्व नाहीं असें जाणतो]. याप्रमाणे ब्रह्म प्राप्त करून देणारी सर्वविद्यारहस्यरूपी विद्या सांगितली. अनुवाक् ९.

ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
आम्ही दोघांनी एकत्र रहावे, एकत्र सेवन करावे, एकत्र सामर्थ्य संपादन करावे. आमचे अध्ययन आम्हाला तेजस्वी करणारे असावे. आमच्याकडून एकमेकांचा द्वेष न घडो.

तृतीया भृगुवल्ली


ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
आम्ही दोघांनी एकत्र रहावे, एकत्र सेवन करावे, एकत्र सामर्थ्य संपादन करावे. आमचे अध्ययन आम्हाला तेजस्वी करणारे असावे. आमच्याकडून एकमेकांचा द्वेष न घडो.

ब्रह्मजीज्ञासा

भृगुर्वै वारुणिः । वरुणं पितरमुपससार । अधीहि भगवो ब्रह्मेति । तस्मा एतत्प्रोवाच । अन्नं प्राणं चक्षुः श्रोत्रं मनो वाचमिति । तँ होवाच । यतो वा इमानि भूतानि जायन्ते । येन जातानि जीवन्ति । यत्प्रयन्त्यभिसंविशन्ति । तद्विजिज्ञासस्व । तद्‌ब्रह्मेति । स तपोऽतप्यत । स तपस्तप्त्वा ॥ १ ॥ इति प्रथमोऽनुवाकः ॥
वरुणाचा पुत्र भृगु आपल्या वरुणनामक पित्याकडे गेला आणि म्हणाला, हे भगवन्, ब्रह्म म्हणजे काय तें मला सांगा. त्याला वरुणाने अन्न, प्राण, चक्षु, श्रोत्र, मन आणि वाणी हीच ब्रह्म होत असें अगोदर सांगितले. नंतर म्हणाला, ''ज्यापासून ही भूते (प्राणी) उत्पन्न होतात, उत्पन्न झाल्यावर ज्याचे योगाने जगतात, प्रयाणकाली ज्याप्रत जातात, ज्याच्यामध्ये लुप्त होतात तें ब्रह्म होय. असें ब्रह्म कोणतें तें आपण होऊन जाणण्याचा प्रयत्‍न कर.'' नंतर तो भृगु ब्रह्मज्ञानार्थ तप आचरण करिता झाला. अनुवाक् १.

पंचकोशान्तःस्थितः-ब्रहनिरूपणम्

अन्नं ब्रह्मेति व्यजानात्‌ । अन्नाद्‌ध्येव खल्विमानि भुतानि जायन्ते । अन्नेन जातानि जीवन्ति । अन्नं प्रयन्त्यभिसंविशन्तीति । तद्विज्ञाय । पुनरेव वरुणं पितरमुपससार । अधीहि भगवो ब्रह्मेति । तँ होवाच । तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व । तपो ब्रह्मेति । स तपोऽतप्यत । स तपस्तप्त्वा ॥ १ ॥ इति द्वितीयोऽनुवाकः ॥
तप आचरण केल्यावर 'अन्न हें ब्रह्म' असे त्याला ज्ञान झालें. कारण अन्नापासूनच हे सर्व प्राणी उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यावर अन्नाचे योगाने जगतात. मरणकाली अन्नाप्रत जातात, अन्नामध्ये लय पावतात. याप्रमाणे ज्ञान झालें तरी समाधान न झाल्यामुळे तो पुन्हा आपल्या वरुण पित्याकडे आला आणि म्हणाला, हे भगवन्, ब्रह्म म्हणजे काय तें मला सांगा. पिता त्याला म्हणाला, तपाचे योगाने तूं ब्रह्म जाण. तप हेंच ब्रह्माच साधन आहे. त्यानें पुन्हा अधिक तप आचरण केलें. तप आचरण केल्यावर 'प्राण हे ब्रह्म' असें त्याला ज्ञान झालें. अनुवाक् २.

प्राणो ब्रह्मेति व्यजानात्‌ । प्राणाद्‌ध्येव खल्विमानि भूतानि जायन्ते । प्राणेन जातानि जीवन्ति । प्राणं प्रयन्त्यभिसंविशन्तीति । तद्विज्ञाय । पुनरेव वरुणं पितरमुपससार । अधीहि भगवो ब्रह्मेति । तँ होवाच । तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व । तपो ब्रह्मेति । स तपोऽतप्यत । स तपस्तप्त्वा ॥ १ ॥ इति तृतीयोऽनुवाकः ॥
कारण प्राणापासूनच हे सर्व प्राणी उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यावर प्राणाचे योगाने जगतात. मरणकाली प्राणात जातात, प्राणामध्यें लय पावतात. याप्रमाणे ज्ञान झालें तरी समाधान न झाल्यामुळे तो पुन्हा वरुण पित्याकडे आला आणि म्हणाला, हे भगवन्, ब्रह्म म्हणजे काय तें मला सांगा. पिता त्याला म्हणाला, तपाचे योगानें तूं ब्रह्म जाण. तप हेंच ब्रह्माचे साधन आहे. त्यानें पुन्हा अधिक तप आचरण केलें. तप आचरण केल्यावर 'मन हे ब्रह्म' असें त्याला ज्ञान झालें. अनुवाक् ३.

मनो ब्रह्मेति व्यजानात्‌ । मनसो ह्येव खल्विमानि भूतानि जायन्ते । मनसा जातानि जीवन्ति । मनः प्रयन्त्यभिसंविशन्तीति । तद्विज्ञाय । पुनरेव वरुणं पितरमुपससार । अधीहि भगवो ब्रह्मेति । तँ होवाच । तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व । तपो ब्रह्मेति । स तपोऽतप्यत । स तपस्तप्त्वा ॥ १ ॥ इति चतुर्थोऽनुवाकः ॥
कारण मनापासूनच हे सर्व प्राणी उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यावर मनाचे योगाने जगतात. मरणकाली मनाप्रत जातात, मनामध्ये लय पावतात. याप्रमाणे ज्ञान झाले तरी समाधान न झाल्यामुळे तो पुन्हा वरुण पित्याकडे आला आणि म्हणाला, हे भगवन्, ब्रह्म म्हणजे काय तें मला सांगा. पिता त्याला म्हणाला, तपाचे योगाने तूं ब्रह्म जाण. तप हेंच ब्रह्माचे साधन आहे. त्यानें पुन्हा अधिक तप आचरण केलें. तप आचरण केल्यावर 'विज्ञान हें ब्रह्म' असें त्याला ज्ञान झालें. अनुवाक् ४.

विज्ञानं ब्रह्मेति व्यजानात्‌ । विज्ञानाद्‌ध्येव खल्विमानि भूतानि जायन्ते । विज्ञानेन जातानि जीवन्ति । विज्ञानं प्रयन्त्यभिसंविशन्तीति । तद्विज्ञाय । पुनरेव वरुणं पितरमुपससार । अधीहि भगवो ब्रह्मेति । तँ होवाच । तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व । तपो ब्रह्मेति । स तपोऽतप्यत । स तपस्तप्त्वा ॥ १ ॥ इति पञ्चमोऽनुवाकः ॥
कारण विज्ञानापासूनच हे सर्व प्राणी उत्पन्न् होतात. उत्पन्न झाल्यावर विज्ञानाचे योगाने जगतात. मरणकालीं विज्ञानाप्रत जातात, विज्ञानामध्यें लय पावतात. याप्रमाणे ज्ञान झालें तरी समाधान न झाल्यामुळे तो पुन्हा वरुण पित्याकडे आला आणि म्हनाला, हे भगवन्, ब्रह्म म्हणजे काय तें मला सांगा. पिता त्याला म्हणाला, तपाचे योगाने तूं ब्रह्म जाण. तप हेंच ब्रह्माचें साधन आहे. त्याने पुन्हा अधिक तप आचरण केलें. तप आचरण केल्यावर 'आनंद हें ब्रह्म' असें त्याला ज्ञान झाले. अनुवाक् ५.

आनन्दो ब्रह्मेति व्यजानात्‌ । आनन्दाद्ध्येव खल्विमानि भूतानि जायन्ते । आनन्देन जातानि जीवन्ति । आनन्दं प्रयन्त्यभिसंविशन्तीति । सैषा भार्गवी वारुणी विद्या । परमे व्योमन्प्रतिष्ठिता । स य एवं वेद प्रतितिष्ठति । अन्नवानन्नादो भवति । महान्भवति प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसेन । महान्‌कीर्त्या ॥ १ ॥ इति षष्ठोऽनुवाकः ॥
कारण आनंदापासूनच हे सर्व प्राणी उत्पन्न होतात. उत्पन्न झाल्यावर आनंदाचे योगाने जगतात. मरणकाली आनंदाप्रत जातात, आनंदामध्यें लय पावतात. याप्रमाणे तपाचे योगाने भृगूला हळू हळू आनंदरूप ब्रह्माचे ज्ञान झालें. अशी ही वरुणानें सांगितलेली व भृगूनें जाणलेली विद्या आहे. ही अत्यंत सूक्ष्म अशा हृदयाकाशामध्ये स्थित आहे म्हणजे अत्यंत गूढ आहे. जो कोणी याप्रमाणें तप आचरण करून ही विद्या स्वानुभवाने जाणतो तो ब्रह्माचे ठिकाणी स्थित होतो. अन्नाने समृद्ध होतो, पुष्कळ अन्न खाण्यास समर्थ होतो, प्रजा-पशु-ब्रह्मतेज यांचे योगाने श्रेष्ठ होतो, कीर्तीने श्रेष्ठ होतो. अनुवाक् ६

अन्नब्रह्मोपासनम्

अन्नं न निन्द्यात्‌ । तद्‌व्रतम्‌ । प्राणो वा अन्नम्‌ । शरीरमन्नादम्‌ । प्राणे शरीरं प्रतिष्ठितम्‌ । शरीरे प्राणः प्रतिष्ठितः । तदेतदन्नमन्ने प्रतिष्ठितम्‌ । स य एतदन्नमन्ने प्रतिष्ठितं वेद प्रतितिष्ठति । अन्नवानन्नादो भवति । महान्भवति प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसेन । महान्‌कीर्त्या ॥ इति सप्तमोऽनुवाकः ॥
अन्नाची निंदा करूं नये कारण अन्नाचे योगाने ब्रह्माचें ज्ञान होते. अन्नाची निंदा न करण्याचें व्रत धारण करावे. प्राण हें अन्न होय. कारण प्राण शरीरामध्यें आहे. शरीर हें अन्नाचे भक्षक आहे. प्राणामध्ये शरीर स्थित आहे, कारण प्राणामुळेच शरीर असते. शरीरामध्यें प्राण स्थित आहे. म्हणजे अन्नामध्यें अन्न स्थित आहे. प्राण व शरीर ही एकमेकांची अन्न व अन्नभक्षक आहेत. याप्रमाणे अन्नामध्ये अन्न स्थित आहे हें जो जाणतो तो प्रतिष्ठा पावतो. अन्नाने समृद्ध होतो, पुष्कळ अन्न खाण्यास समर्थ होतो, प्रजा-पशु-ब्रह्मतेज यांचे योगानें श्रेष्ठ होतो, कीर्तीनें श्रेष्ठ होतो. अनुवाक् ७

अन्नं न परिचक्षीत । तद्‌व्रतम्‌ । आपो वा अन्नम्‌ । ज्योतिरन्नादः । अप्सु ज्योतिः प्रतिष्ठितम्‌ । ज्योतिष्यापः प्रतिष्ठिताः । तदेतदन्नमन्ने प्रतिष्ठितम्‌ । स य एतदन्नमन्ने प्रतिष्ठितं वेद प्रतितिष्ठति । अन्नवानन्नादो भवति । महान्भवति प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसेन । महान्‌कीर्त्या ॥ इत्यष्टमोऽनुवाकः ॥
अन्नाचा त्याग करूं नये. अन्नाचा त्याग न करण्याचे व्रत धारण करावे. उदक हें अन्न होय. तेज हें अन्नाचे भक्षक आहे. उदकामध्ये तेज स्थित आहे. तेजामध्ये उदक स्थित आहे. म्हणजे अन्नामध्यें अन्न स्थित आहे. याप्रमाणे अन्नामध्यें अन्न स्थित आहे हें जो जाणतो तो प्रतिष्ठा पावतो. अन्नाने समृद्ध होतो, पुष्कळ अन्न खाण्यास समर्थ होतो. प्रजा-पशु-ब्रह्मतेज यांचे योगाने श्रेष्ठ होतो, कीर्तीनें श्रेष्ठ होतो. अनुवाक् ८.

अन्नं बहु कुर्वीत । तद्‌व्रतम्‌ । पृथिवी वा अन्नम्‌ । आकाशोऽन्नादः । पृथिव्यामाकाशः प्रतिष्ठितः । आकाशे पृथिवी प्रतिष्ठिता । तदेतदन्नमन्ने प्रतिष्ठितम्‌ । स य एतदन्नमन्ने प्रतिष्ठितं वेद प्रतितिष्ठति । अन्नवानन्नादो भवति । महान्भवति प्रजया पशुभिर्ब्रह्मवर्चसेन । महान्कीर्त्या ॥ इति नवमोऽनुवाकः ॥
अन्नाची वृद्धि करावी. अन्नाची वृद्धि करण्याचें व्रत धारण करावे पृथ्वी हें अन्न होय. आकाश हें अन्नाचे भक्षक आहे. पृथिवीमध्ये आकाश स्थित आहे. आकाशामध्यें पृथिवी स्थित आहे. म्हणजे अन्नामध्यें अन्न स्थित आहे. याप्रमाणें अन्नामध्यें अन्न स्थित आहे हें जो जाणतो तो प्रतिष्ठा पावतो. अन्नाने समृद्ध होतो, पुष्कळ अन्न खाण्यास समर्थ' होतो, प्रजा-पशु-ब्रह्मतेज यांचे योगाने श्रेष्ठ होतो, कीर्तीने श्रेष्ठ होतो. अनुवाक् ९.

सदाचारप्रदर्शनम् - ब्रह्मानन्दानुभवः

न कञ्चन वसतौ प्रत्याचक्षीत । तद्‌व्रतम्‌ । तस्माद्यया कया च विधया बह्वन्नं प्राप्नुयात्‌ । अराध्यस्मा अन्नमित्याचक्षते । एतद्वै मुखतोऽन्नँ राद्धम्‌ । मुखतोऽस्मा अन्नँ राध्यते । एतद्वै मध्यतोऽनँ राद्धम्‌ । मध्यतोऽस्मा अन्नँ राध्यते । एदद्वा अन्ततोऽन्नँ राद्धम्‌ । अन्ततोऽस्मा अन्नँ राध्यते ॥ १ ॥
आपल्या घरी वसतीकरितां आलेल्या कोणालाही हरकत करूं नये. हें व्रत पालन करावे याच्याकरितां (अतिथीकरिता) अन्न तयार आहे असें सज्जन बोलत असतात; म्हणून कोणत्याही प्रकाराने पुष्कळ अन्न मिळवीत असावें. याने उत्तम देश, काल व पात्र यांचे ठिकाणी अन्न तयार केले म्हणून उत्तम देश, काल व पात्र यांचे ठिकाणी त्याचेकरितां (अन्नदान्याकरिता) अन्न तयार होतें; मध्यम (देशकालादि) ठिकाणी अन्न तयार केलें म्हणून त्या मध्यम (देशकालादि) ठिकाणी त्याचेकरितां अन्न तयार होतें; अधम (देशकालादि) ठिकाणी अन्न तयार केलें म्हणून त्या अधम (देशकालादि) ठिकाणी त्याचेकरितां अन्न तयार होतें. सारांश, जसे अन्नदान केलें असेल तसें फळ मिळते. १

य एवं वेद । क्षेम इति वाचि । योगक्षेम इति प्राणापानयोः । कर्मेति हस्तयोः । गतिरिति पादयोः । विमुक्तिरिति पायौ । इति मानुषीः समाज्ञाः । अथ दैवीः । तृप्तिरिति वृष्टौ । बलमिति विद्युति ॥ २ ॥
जो हें जाणील त्याला अन्नादि समृद्धि, ब्रह्मतेज, कीर्ति इत्यादि पूर्वोक्त फळ प्राप्त होतें. ब्रह्म वाणीचे ठिकाणी क्षेमरूपानें स्थित आहे, योग व क्षेम या रूपाने प्राण व अपान यांचे ठिकाणी स्थित आहे. [योग = अप्राप्त वस्तूची प्राप्ति; क्षेम = प्राप्त वस्तूचें रक्षण], कर्मरूपानें हस्तांचे ठिकाणी स्थित आहे, गतिरूपानें पायांचे ठिकाणी स्थित आहे, (मलादि-) विमोचनरूपानें पापूचे ठिकाणी स्थित आहे. याप्रमाणे ब्रह्माच्या मानव उपासना (समाज्ञा) आहेत. आतां दैवी उपासना - तृप्तिरूपानें वृष्टीचे ठिकाणी स्थित आहे, बलरूपानें विजेचे ठिकाणी स्थित आहे. २

यश इति पशुषु । ज्योतिरिति नक्षत्रेषु । प्रजातिरमृतमानन्द इत्युपस्थे । सर्वमित्याकाशे । तत्प्रतिष्ठेत्युपासीत । प्रतिष्ठावान्‌ भवति । तन्मह इत्युपासीत । महान्भवति । तन्मन इत्युपासीत । मानवान्भवति ॥ ३ ॥
यशोरूपानें पशूंचे ठिकाणी स्थित आहे, ज्योतीरूपानें नक्षत्रांचे ठिकाणी स्थित आहे, प्रजोत्पत्ति आणि (तेणेंकरून) मोक्ष आणि आनंद यांचे रूपाने उपस्थाचे ठिकाणी स्थित आहे, सर्वरूपाने आकाशाचे ठिकाणी स्थित आहे, म्हणून या सर्वांची ब्रह्माचे स्थान म्हणून उपासना करावी. जो ज्या स्थानाची उपासना करील तो तें स्थान पावतो. महत्त्वरूपाने त्या ब्रह्माची उपासना करावी म्हणजे महान् होतो. मननरूपानें उपासना करावी म्हणजे मननयुक्त होतो. ३

तन्नम इत्युपासीत । नम्यन्तेऽस्मै कामाः । तद्‌ब्रह्मेत्युपासीत । ब्रह्मवान्भवति । तद्‌ब्रह्मणः परिमर इत्युपासीत । पर्येणं म्रियन्ते द्विषन्तः सपत्‍नाः । परि येऽप्रिया भ्रातृव्याः । स यश्चायं पुरुषे । यश्चासावादित्ये । स एकः ॥ ४ ॥
नमस्काररूपानें उपासना करावी म्हणजे त्याला सर्व मनोरथ नमन करतात [=प्राप्त होतात]. ब्रह्मरूपानें उपासना करावी म्हणजे ब्रह्मरूप होतो. सर्वविनाशक कालरूपानें (अथवा वायुरूपाने) उपासना करावी म्हणजे द्वेष करणारे शत्रु आणि अप्रिय दायाद नाश पावतात. हें ब्रह्म म्हणजे जें पंचकोशात्मक पुरुषाचे ठिकाणी आहे, अदित्याचे ठिकाणींआहे, हें सर्व एकच आहे. ४

स य एवंवित्‌ । अस्माल्लोकात्प्रेत्य । एतं अन्नमयमात्मानमुपसङ्क्रम्य । एतं प्राणमयमात्मानमुपसङ्क्रम्य । एतं मनोमयमात्मानमुपसङ्क्रम्य । एतं विज्ञानमयमात्मानमुपसङ्क्रम्य । एतमानन्दमयमात्मानमुपसङ्क्रम्य । इमाँल्लोकन्कामान्नी कामरूप्यनुसञ्चरन्‌ । एतत्‌साम गायन्नास्ते । हा ३ वु हा ३ वु हा ३ वु ॥ ५ ॥
सारांश, ज्याला ब्रह्माचें या प्रमाणें, अभेदानें ज्ञान होते तो इहलोकांतून निघून गेला म्हणजे या अन्नमय आत्म्याशी एकरूप होऊन, या प्राणमय आत्म्याशी एकरूप होऊन, या मनोमय आत्म्याशी एकरूप होऊन, या विज्ञानमय आत्म्याशी एकरूप होऊन, या आनंदमय आत्म्याशी एकरूप होऊन, इच्छेस येईल तें अन्न खाणारा व इच्छेस येईल तें रूप धारण करणारा होत्साता पुढील सामाचे गायन करीत या (भू, भुव इत्यादि) लोकांमध्यें संचार करतो. ५

अहमन्नं अहमन्नं अहमन्नम्‌ । अहमन्नादोऽ ३ हमन्नादोऽ ३ अहमन्नादः । अहँ श्लोककृद् अहँ श्लोककृद् अहँ श्लोककृत्‌ । अहमस्मि प्रथमजा ऋता३स्य । पूर्वं देवेभ्योऽमृतस्य ना३भायि । यो मा ददाति स इदेव मा ३ऽऽवाः । अहमन्नमन्नमदन्तमा ३ द्मि । अहं विश्वं भुवनमभ्यभवाम्‌ । सुवर्न ज्योतीः । य एवं वेद । इत्युपनिषत्‌ ॥ ६ ॥ इति दशमोऽनुवाकः ॥
॥ इति भृगुवल्ली समाप्ता ॥
"हा३ वु० अहमन्नं०" इत्यादि [ या सामाचा अर्थ - अहो ! मीच अन्न, मीच अन्नभक्षक; माझा महिमा मींच वर्णन केला. ऋताच्या अगोदरचा माझा जन्म आहे, देवांच्या अगोदरचा आहे. अमृतत्वाचे स्थान मीच आहें. जो मला याप्रमाणे अन्न देतो तो माझें रक्षण करतो. (कारण) मी अन्नच आहें. जो अन्न देत नाही त्याचा मी भक्षक आहें. मी हें सर्व विश्व व्यापून राहिलो आहें. माझें तेज आदित्याप्रमाणे सर्वव्यापी आहे. याप्रमाणे ब्रह्मज्ञान जो जाणतो त्याला समृद्धि, ब्रह्मतेज, कीर्ति इत्यादि फळ मिळतें. याप्रमाणे ब्रह्म प्राप्त करून देणारी सर्वविद्यारहस्यस्वरूपी विद्या सांगितली. अनुवाक् १०.

ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सह वीर्यं करवावहै । तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै । ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
आम्ही दोघांनी एकत्र रहावे, एकत्र सेवन करावे, एकत्र सामर्थ्य संपादन करावे. आमचे अध्ययन आम्हाला तेजस्वी करणारे असावे. आमच्याकडून एकमेकांचा द्वेष न घडो.

GO TOP