॥ अथ मुण्डकोपनिषद् ॥


प्रथमः मुण्डके प्रथमः खण्डः


॥ ॐ ब्रह्मणे नमः ॥ ॐ भद्रं कर्णेभिः श्रुणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्‌गैस्तुष्टुवाँसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ।
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।
॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


ॐ ब्रह्मा देवानां प्रथमः संबभूव विश्वस्य कर्ता भुवनस्य गोप्ता । स ब्रह्मविद्यां सर्वविद्याप्रतिष्ठां अथर्वाय ज्येष्ठपुत्राय प्राह ॥ १ ॥
अथर्वणे यां प्रवदेत ब्रह्माऽथर्वा तां पुरोवाचाङ्‌गिरे ब्रह्मविद्याम् । स भारद्वाजाय सत्यवाहाय प्राह भारद्वाजोऽङ्‌गिरसे परावराम् ॥ २ ॥
शौनको ह वै महाशालोऽङ्‌गिरसं विधिवदुपसन्नः पप्रच्छ । कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवतीति ॥ ३ ॥
तस्मै स होवाच । द्वे विद्ये वेदितव्ये इति ह स्म यद्‌ब्रह्मविदो वदन्ति परा चैवापरा च ॥ ४ ॥
तत्रापरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदोऽथर्ववेदः शिक्षा कल्पो व्याकरणं निरुक्तं छन्दो ज्योतिषमिति । अथ परा यया तदक्षरमधिगम्यते ॥ ५ ॥
यत्तदद्रेश्यमग्राह्यमगोत्रमवर्णमचक्षुःश्रोत्रं तदपाणिपादम् । नित्यं विभुं सर्वगतं सुसूक्ष्मं तदव्ययं यद्‌भूतयोनिं परिपश्यन्ति धीराः ॥ ६ ॥

यथोर्णनाभिः सृजते गृह्णते च यथा पृथिव्यामोषधयः संभवन्ति । यथा सतः पुरुषात् केशलोमानि तथाऽक्षरात् संभवतीह विश्वम् ॥ ७ ॥
तपसा चीयते ब्रह्म ततोऽन्नमभिजायते । अन्नात् प्राणो मनः सत्यं लोकाः कर्मसु चामृतम् ॥ ८ ॥यः सर्वज्ञः सर्वविद्यस्य ज्ञानमयं तापः । तस्मादेतद्ब्रह्म नाम रूपमन्नं च जायते ॥ ९ ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि प्रथममुण्डके प्रथमः खण्डः ॥
इंद्रादि देवांपैकी प्रथम, विश्वाचा कर्ता व भुवनांचा पालयिता ब्रह्मदेव उत्पन्न झाला. सर्व विद्यांचे आश्रयस्थान अशी ब्रह्मविद्या त्यानें आपला ज्येष्ठ पुत्र अथर्वा याला सांगितली. १.

ब्रह्मदेवानें जी ब्रह्मविद्या अथर्वा याला सांगितली ती त्याने नंतर अंगिः याला सांगितली. त्यानें भरद्वाजगोत्रोत्पन्न सत्यवहाला सांगितली. अशी एकापासून दुसऱ्याला अशा क्रमाने आलेली ही विद्या सत्यवहानें अंगिरसाला सांगितली. २.
अत्यंत गृहस्थधर्मयुक्त शौनक विधिपूर्वक अंगिरस मुनीकडे येऊन विचारता झाला की, हे भगवन्, असें काय आहे की जें जाणले असतां हें सर्व ज्ञात होईल ? ३.
त्याला ते मुनि म्हणाले, परा विद्या आणि अपरा विद्या या दोन विद्या जाणण्याला योग्य आहेत असें ब्रह्मवेत्ते सांगतात. ४.
त्यांपैकी अपरा विद्या म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि त्यांचीं अंगें शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष ही होत. आतां परा विद्या म्हणजे जिच्या योगाने तें अविनाशी ब्रह्म प्राप्त होतें ती होय. ५
तें ब्रह्म म्हणजे जें ज्ञानेंद्रियांना पहाण्यास अशक्य, कर्मेंद्रियांना ग्रहण करण्यास अशक्य, मूलरहित, गुणरहित, चक्षु व श्रोत्र यांनी रहित, हस्त व पाद यांनी रहित, नित्य, सर्वविध (=विभु ब्रह्मदेवापासून स्थावरापर्यंत सर्व प्राण्यांच्या रूपाने सर्वविध असलेले), सर्वव्यापी, अत्यंत सूक्ष्म आणि क्षयरहित असें जैं सर्व प्राण्यांच्या उत्पत्तीला कारण आहे असें ज्ञाते जाणतात ते होय. ६
ज्याप्रमाणें कोळी स्वतःच तंतू उत्पन्न करतो व पुन्हा आंत घेतो, ज्याप्रमाणे पृथ्वीवर ओषधी उत्पन्न होतात, ज्याप्रमाणें जिवंत मनुष्यापासून मस्तकाचे केश आणि शरीरावरील लव उत्पन्न होतात त्याप्रमाणे त्या अविनाशी ब्रह्मापासून विश्व उत्पन्न होतें. ७.
सृष्टि निर्माण करण्याच्या ज्ञानरूप तपाने कार्यलक्षण हिरण्यगर्भनामक ब्रह्म वृद्धि पावते [मी अनेक रूपे धारण करीन असें ध्यान करते]; त्यापासून अन्न उत्पन्न होतें; अन्नापासून प्राण उत्पन्न होतो; प्राणापासून मन (संकल्प) उत्पन्न होते, मनापासून आकाशादि भूतपंचक (सत्य) उत्पन्न होते; पंचमहाभूतांपासून भू आदि सात लोक उत्पन्न होतात; लोकांपासून कर्म उत्पन्न होतें; आणि कर्माचे ठिकाणी कर्मफल (अमृतं) उत्पन्न होतें. ८.
जें सामान्यतः सर्व जाणणारे, विशेषत सर्वे जाणारं, ज्याचे तप ज्ञानमय आहे आयासमय नाही, अशा अ-क्षर ब्रह्मापासून हं कार्यलक्षाग हिरण्यगर्भ ब्रह्म उत्पन्न होतें. तशीच रूप, अन्न इत्यादि उत्पन्न हातोत.९.


॥ प्रथममुण्डके द्वितीयः खण्डः ॥


तदेतत् सत्यं मन्त्रेषु कर्माणि कवयो यान्यपश्यंस्तानि त्रेतायां बहुधा संततानि । तान्याचरथ नियतं सत्यकामा एष वः पन्थाः सुकृतस्य लोके ॥ १ ॥

यदा लेलायते ह्यर्चिः समिद्धे हव्यवाहने । तदाऽऽज्यभागावन्तरेणाऽऽहुतीः प्रतिपादयेत् ॥ २ ॥
यस्याग्निहोत्रं अदर्शं अपौर्णमासं अचातुर्मास्यं अनाग्रयणं अतिथिवर्जितं च । अहुतं अवैश्वदेवं अविधिना हुतमासप्तमांस्तस्य लोकान् हिनस्ति ॥ ३ ॥
काली कराली च मनोजवा च सुलोहिता या च सुधूम्रवर्णा । स्फुलिङ्‌गिनी विश्वरुची च देवी लेलायमाना इति सप्त जिह्वाः ॥ ४ ॥
एतेषु यश्चरते भ्राजमानेषु यथाकालं चाहुतयो ह्याददायन् । तं नयन्त्येताः सूर्यस्य रश्मयो यत्र देवानां पतिरेकोऽधिवासः ॥ ५ ॥
एह्येहीति तमाहुतयः सुवर्चसः सूर्यस्य रश्मिभिर्यजमानं वहन्ति । प्रियां वाचमभिवदन्त्योऽर्चयन्त्य एष वः पुण्यः सुकृतो ब्रह्मलोकः ॥ ६ ॥
प्लवा ह्येते अदृढा यज्ञरूपा अष्टादशोक्तमवरं येषु कर्म । एतच्छ्रेयो येऽभिनन्दन्ति मूढा जरामृत्युं ते पुनरेवापि यन्ति ॥ ७ ॥
अविद्यायामन्तरे वर्तमानाः स्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः । जङ्‌घन्यमानाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ॥ ८ ॥
अविद्यायां बहुधा वर्तमाना वयं कृतार्था इत्यभिमन्यन्ति बालाः । यत् कर्मिणो न प्रवेदयन्ति रागात् तेनातुराः क्षीणलोकाश्च्यवन्ते ॥ ९ ॥
इष्टापूर्तं मन्यमाना वरिष्ठं नान्यच्छ्रेयो वेदयन्ते प्रमूढाः । नाकस्य पृष्ठे ते सुकृतेऽनुभूत्वं इमं लोकं हीनतरं वा विशन्ति ॥ १० ॥
तपःश्रद्धे ये ह्युपवसन्त्यरण्ये शान्ता विद्वांसो भैक्ष्यचर्यां चरन्तः । सूर्यद्वारेण ते विरजाः प्रयान्ति यत्रामृतः स पुरुषो ह्यव्ययात्मा ॥ ११ ॥

परीक्ष्य लोकान् कर्मचितान् ब्राह्मणो निर्वेदमायान्नास्त्यकृतः कृतेन । तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम् ॥ १२ ॥
तस्मै स विद्वानुपसन्नाय सम्यक् प्रशान्तचित्ताय शमान्विताय । येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाच तां तत्त्वतो ब्रह्मविद्याम् ॥ १३ ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि प्रथममुण्डके द्वितीयः खण्डः ॥
दोन्ही विद्याचे सामान्य स्वरूप सांगून आतां विशेष स्वरूप सांगतात- ऋग्वेदादि मंत्रांचे ठिकाणी अग्रिहोत्रादि जी कर्मे वसिष्ठादि ऋषींनी अवलोकन केली तीं हौत्र, आध्वर्यव आणि औद्‌गात्र अशा तिहींनी युक्त बहुत प्रकारांनी प्रवृत्त असलेली सत्य आहेत. (पुरुषार्थ प्राप्त करून देणारी आहेत). हे कर्मफलेच्छुहो, त्यांचें नित्य आचरण करा. चांगल्या प्रकार आचरलेल्या कर्माचे फल तुम्हांला मिळण्याला (लोके) हा मार्ग आहे. १.
जेव्हां इंधनांनी सम्यक् पेटलेल्या अग्नीमध्ये ज्वाळा चलन पावत असते तेव्हां आज्यभागांचे मध्यंतरी आहुति द्याव्या २.
ज्याचे अग्निहोत्र दर्शकर्मवर्जित, पौर्णमासकर्मवर्जित, चातुर्मासकर्मवर्जित, आग्रयणकर्मवर्जित, अतिथिपूजनवर्जित, हवनवर्जित, वैश्वदेववर्जित, हवन असेल तर तें अविधिपूर्वक, असें असेल तर तेणेंकरून त्याला सातही लोक अप्राप्य होतात. म्हणजेच योग्य कर्म केलें असतां सात लोकांची प्राप्ति होते. ३.
काली, कराली, मनोजवा, सुलोहिता, सुधूम्रवर्णा, स्फुलिंगिनी आणि दिव्य विश्वरुची अशा चलन पावणाऱ्या सात अग्नीच्या जिव्हा आहेत. ४

या प्रदीप्त असतां यांचेमध्यें यथाकाल आहुति देऊन जो अग्निहोत्रादि कर्म करतो त्याला या सूर्यरश्मिरूप होऊन ज्या ठिकाणी देवेंद्र एकटा वास करतो त्या ठिकाणी नेतात. ५

दीप्तियुक्त (सुवर्चसः) अशा त्या आहुति 'इकडे ये' 'इकडे ये' असें म्हणतच की काय सूर्याच्या रश्मीचे द्वारे 'हा पुण्य ब्रह्मलोक म्ह० स्वर्ग तुझ्या कर्माचे फल होय' असें प्रिय भाषण उच्चारीत व पूजन करीत यजमानाला स्वर्गलोकी नेतात. ६
सोळा ऋत्विज्, यजमान आणि पत्नी असें अठरा जणांचे (ज्ञानरहित म्हणून) गौण कर्म ज्यां मध्यें सांगितलें आहेअशा या यज्ञरूपी नौका अस्थिर आहेत. हेंच श्रेयस्कर आहे असें समजून जे मूढ यांतच आनंद मानतात ते पुन्हा पुन्हा जरा व मृत्यू यांप्रत येतात. ७
अज्ञानामध्यें रहाणारे परंतु स्वतःला बुद्धिमान् व विद्वान् असें मानणारे हे मूढ जरारोगादिकांनी वारंवार पीडित होत्साते, अंध अधाने वाट दाखविली असतां जसे व्यर्थ भ्रमण पावतात त्याप्रमाणें भ्रमण पावतात. ८.

अनेक प्रकारांनी अविद्येमध्यें रहाणारे अज्ञानी जन आपण कृतार्थ आहोंत असा अभिमान बाळगतात. कर्माचे ठिकाणी असलेल्या प्रीतीमुळें आपल्या अधःपाताचे कारण कर्मठ जन जाणत नाहीत. त्यामुळें ते दुःखी होत्साते कर्मफलाचा क्षय झाला म्हणजे खाली पडतात. ९.
इष्ट म्ह० यागादि श्रौत आणि पूर्त म्ह० वापी-तडागादि स्मार्त कर्म हेंच अत्यंत श्रेष्ठ आहे असें मानणारे मूढ जन याहून श्रेयस्कर दुसरें कांहीं नाही असें समजतात. स्वर्गातील श्रेष्ठ कर्मफलोगस्थानी कर्मफलाचा उपभोग घेतल्यानंतर ते या मानुष लोकी अथवा याहून हीन अशा तिर्यक् इत्यादि लोकी प्रवेश करतात. १०.
परंतु याच्या उलट जे शमयुक्त विद्वान (वानप्रस्थ वा संन्यासी) अरण्यामध्यें भिक्षाचर्य आचरण करून तप म्ह० आश्रमविहित कर्म आणि श्रद्धा म्ह० रह्मविद्या यांचें सेवन करतात ते कर्मरहित (विरजाः) होऊन ज्या ठिकाणी तो मृत्युरहित व अव्ययस्वभाव परम पुरुष आहे त्या सत्यलोकादिकांचे ठिकाणी सूर्याचे मार्गाने जातात. ११.
कर्मापासून प्राप्त होणारे लोक नाशवंत आहेत असें जाणून ब्राह्मणानें वैराग्ययुक्त व्हावें. कर्माने नित्य (अकृतः) असें ब्रह्म प्राप्त होत नाही. त्याच्या ज्ञानाकरिता त्यानें हातामध्ये समिधा घेऊन श्रुतिसंपन्न व ब्रह्मनिष्ठ अशा गुरूकडेच जावे. १२.
याप्रकारे येणाऱ्या, सम्यक प्रशांतचित्त व शमानें युक्त अशा त्याला तो ज्ञानी गुरु, अ-क्षर व सत्य असा परम पुरुष जिच्या योगाने जाणला जातो ती ब्रह्मविद्या, योग्य प्रकारे सांगतो. १३.


॥ द्वितीय मुण्डके प्रथमः खण्डः ॥


तदेतत् सत्यं यथा सुदीप्तात् पावकाद्विस्फुलिङ्‌गाः सहस्रशः प्रभवन्ते सरूपाः तथाऽक्षराद्विविधाः सोम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैवापि यन्ति ॥ १ ॥
दिव्यो ह्यमूर्तः पुरुषः स बाह्याभ्यन्तरो ह्यजः ।
अप्राणो ह्यमनाः शुभ्रो ह्यक्षरात् परतः परः ॥ २ ॥
एतस्माज्जायते प्रणो मनः सर्वेन्द्रियाणि च ।
खं वायुर्ज्योतिरापः पृथिवी विश्वस्य धारिणी ॥ ३ ॥
अग्नीर्मूर्धा चक्षुषी चन्द्रसूर्यौ दिशः श्रोत्रे वाग् विवृताश्च वेदाः ।
वायुः प्रणो हृदयं विश्वमस्य पद्‌भ्यां पृथिवी ह्येष सर्वभूतान्तरात्मा ॥ ४ ॥
तस्मादग्निः समिधो यस्य सूर्यः सोमात् पर्जन्य ओषधयः पृथिव्याम् । पुमान् रेतः सिञ्चति योषितायां बह्वीः प्रजाः पुरुषात् संप्रसूताः ॥ ५ ॥


तस्माद् ऋचः साम यजूंषि दीक्षा यज्ञाश्च सर्वे क्रतवो दक्षिणाश्च । संवत्सरश्च यजमानश्च लोकाः सोमो यत्र पवते यत्र सूर्यः ॥ ६ ॥
तस्माच्च देवा बहुधा संप्रसूताः साध्या मनुष्याः पशवो वयांसि । प्राणापानौ व्रीहियवौ तपश्च श्रद्ध सत्यं ब्रह्मचर्यं विधिश्च ॥ ७ ॥
सप्त प्राणाः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषः समिधः सप्त होमाः । सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणा गुहाशया निहिताः सप्त सप्त ॥ ८ ॥

अतः समुद्रा गिरयश्च सर्वेऽस्मात् स्यन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः । अतश्च सर्वा ओषधयो रसश्च येनैष भूतैस्तिष्ठते ह्यन्तरात्मा ॥ ९ ॥
पुरुष एवेदं विश्वं कर्म तपो ब्रह्म परामृतम् । एतद्यो वेद निहितं गुहायां सोऽविद्याग्रन्थिं विकिरतीह सोम्य ॥ १० ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि द्वितीयमुण्डके प्रथमः खण्डः ॥
ही परा विद्या सत्य आहे. ज्याप्रमाणें चांगल्या पेटलेल्या अग्नीपासून तत्स्ववरूप हजारों ठिणग्या उत्पन्न होतात, त्याप्रमाणें हे बाळा, त्या अक्षर ब्रह्मापासून म्ह० पुरुषापासून नाना प्रकारचे जीव उत्पन्न होतात आणि त्याच्यामध्येच लय पावतात. १.
तो पुरूष दीसिमान्, अमूर्त, बाह्यवर्ती तसाच आन्तरवर्ती, जन्मरहित, प्राणरहित, मनोरहित (संकल्परहित), शुद्ध, दुसऱ्या (उपाधियुक्त) अक्षराहून श्रेष्ठ असा आहे. २
याच्यापासून प्राण, मन, सर्व इंद्रिये, आकाश, वायु, तेज, उदक आणि विश्वाला धारण करणारी पृथ्वी ही उत्पन्न होतात. ३.
याचे अग्नि हें मस्तक, चंद्र व सूर्य हे चक्षु, दिशा हें श्रोत्र, प्रसिद्ध वेद ही वाणी, वायु हा प्राण, आणि सर्व विश्व हें हृदय होय. पृथिवी त्याच्या पायांपासून उत्पन्न झाली. हा सर्व भूतांचा अंतरात्मा आहे. ४

त्या पुरुषापासून द्युलोक हा अग्नि उत्पन्न झाला, या अग्नीच्या समिधा सूर्य होय. (सूर्याचे द्युलोकाग्नीमध्ये हवन केल्याने चंद्र उत्पन्न झाला). चंद्राच्या हवनापासून (चंद्र हा समिधा अर्थात द्युलोक हाच अग्नि) पर्जन्य उत्पन्न झाला. पर्जन्याचे पृथिवीरूपी अग्नीचे ठिकाणी हवन केल्याने ओषधी उत्पन्न झाल्या. ओषधीचे पुरुषरूपी अग्नीमध्यें हवन केल्याने रेत उत्पन्न झालें. अशा प्रकारे त्या पुरुषापासूनच बहुत प्रजा उत्पन्न झाल्या. ५
ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, मौंजी आदि दीक्षा, अग्निहोत्रादि यूपरहित यज्ञ, सर्व यूपसहित यश =क्रतु, दक्षिणा, संवत्सर म्ह० कर्मांगकाल, यजमान, आणि जेथे चंद्र पावन करतो व जेथे सूर्य तपन पावतो ते कर्मफलरूपी लोक हे त्या पुरुषापासूनच उत्पन्न झाले. ६
त्यापासूनच वसु आदि नाना प्रकारचे देव, साध्य, मनुष्य, पशु, पक्षी, प्राण, अपान, हवीकरिता लागणारे व्रीहि व यव, तप, श्रद्धा, सत्य, ब्रह्मचर्य आणि विधि ही सर्व उत्पन्न झालीं. ७.

मस्तकांतले श्रोत्र, नेत्र, नासिका व मुख हे सात प्राण, सात ज्वाळा (इंद्रियांच्या विषयांचे प्रकाशन, सात समिधा (विषय), सात होम = विषयांचे ज्ञान, ज्यांमध्यें प्राण वावरतात असे सात लोक म्ह० इंद्रिये आणि हृदयामध्ये अथवा शरीरामधे (गुहायां) विधात्याने प्रतिप्राण्याचे ठिकाणी स्थापन केलेले प्राण ही सर्व त्या पुरुषापासूनच उत्पन्न झाली. ८.
सर्व समुद्र आणि पर्वत यापासून उत्पन्न झाले. नाना प्रकारची रूपें धारण करणाऱ्या नद्या यापासून प्रवाह पावतात. सर्व ओषधी आणि ज्या षड्विध रसाच्या योगाने हा अंतरात्मा स्थूल भूतांनी परिवेष्टित असा रहातो तो रस ही सर्व त्या पुरुषापासूनच उत्पन्न झालीं. ९.
पुरुषच हें सर्व विश्व, कर्म, तप, आणि श्रेष्ठ व मृत्युरहित असें ब्रह्म आहे. हें ब्रह्म आपल्या हृदयामध्यें स्थित आहे असें जो जाणतो तोच हे बाळा, जिवंतपणी अविद्यारूपी ग्रंथी तोडून टाकतो. १०


॥ द्वितीय मुण्डके द्वितीयः खण्डः ॥


आविः संनिहितं गुहाचरं नाम महत्पदमत्रैतत् समर्पितम् । एजत्प्राणन्निमिषच्च यदेतज्जानथ सदसद्वरेण्यं परं विज्ञानाद्यद्वरिष्ठं प्रजानाम् ॥ १ ॥


यदर्चिमद्यदणुभ्योऽणु च यस्मिन् लोका निहिता लोकिनश्च । तदेतदक्षरं ब्रह्म स प्राणस्तदु वाङ्‌मनः । तदेतत्सत्यं तदमृतं तद्वेद्धव्यं सोम्य विद्धि ॥ २ ॥
धनुर्गृहीत्वौपनिषदं महास्त्रं शरं ह्युपासा निशितं सन्धयीत । आयम्य तद्‌भावगतेन चेतसा लक्ष्यं तदेवाक्षरं सोम्य विद्धि ॥ ३ ॥
प्रणवो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्म तल्लक्ष्यमुच्यते । अप्रमत्तेन वेद्धव्यं शरवत् तन्मयो भवेत् ॥ ४ ॥
यस्मिन् द्यौः पृथिवी चान्तरिक्षं ओतं मनः सह प्राणैश्च सर्वैः । तमेवैकं जानथ आत्मानं अन्या वाचो विमुञ्चथामृतस्यैष सेतुः ॥ ५ ॥
अरा इव रथनाभौ संहता यत्र नाड्यः । स एषोऽन्तश्चरते बहुधा जायमानः । ओमित्येवं ध्यायथ आत्मानं स्वस्ति वः पाराय तमसः परस्तात् ॥ ६ ॥
यः सर्वज्ञः सर्वविद् यस्यैष महिमा भुवि । दिव्ये ब्रह्मपुरे ह्येष व्योम्न्यात्मा प्रतिष्ठितः । मनोमयः प्राणशरीरनेता प्रतिष्ठितोऽन्ने हृदयं सन्निधाय । तद् विज्ञानेन परिपश्यन्ति धीरा आनन्दरूपममृतं यद् विभाति ॥ ७ ॥


भिद्यते हृदयग्रन्थिः छिद्यन्ते सर्वसंशयाः । क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे ॥ ८ ॥

हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्म निष्कलम् । तच्छुभ्रं ज्योतिषं ज्योतिः तद् यद् आत्मविदो विदुः ॥ ९ ॥

न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः । तमेव भान्तमनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥ १० ॥
ब्रह्मैवेदममृतं पुरस्ताद् ब्रह्म पश्चाद् ब्रह्म दक्षिणतश्चोत्तरेण । अधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्म एव इदं विश्वमिदं वरिष्ठम् ॥ ११ ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि द्वितीयमुण्डके द्वितीयः खण्डः ॥
प्रकाशरूप (आविः), हृदयामध्ये सम्यक् स्थित (संनिहित), शरीरामध्यें संचार करणारें (गुहाचरं) अशी ज्याची प्रसिद्धि आहे, महत्त्वामुळें सर्व पदांच्या अर्थाचे म्हगजे पदार्थांचे स्थान, ज्यामध्यें चलन पावणारे पक्षी आदि आणि प्राणापानादिकांनीं युक्त मनुष्य पशु आदि निमेष व उन्मेष करणारे प्राणी असें सर्व वस्तुजात स्थित आहे, सदसत्स्वरूप म्ह० सद्‌रूप व असद्‌रूप सर्व वस्तु ज्यानें व्यापलेल्या आहेत, वरणीय, लौकिक ज्ञानाच्या पलीकडे असलेलें आणि सर्व वस्तूंमध्यें श्रेष्ठ अशा ब्रह्माचे, हे शिष्यहो, तुझी ज्ञान करून घ्या. १.
जें दीप्तिमान् आहे, जें सूक्ष्मामाहून देखील सूक्ष्म आहे, भू आदि लोक आणि त्या लोकांतील मनुष्यादि रहिवासी हे ज्याच्यामध्यें स्थित आहेत, तें हें अविनाशी ब्रह्म होय. तेंच प्राण, तेंच वाणी, तेंच मन होय. तें सत्य, मरणरहित आहे. तें मनाचें लक्ष्य झालें पाहिजे. बाळा, तूं त्याचें ज्ञान करून घे २.
महास्त्र जें उपनिषद्‌रूपी धनुष्य तें घेऊन त्याला सतत ध्यानानें बारीक केलला (उपासानिशित) शर लाव. ब्रह्माचे ठिकाणी ज्याची भावना गेली आहे अशा चित्ताने तें ओढून, हे बाळा, त्याच अ-क्षर ब्रह्मरूपी लक्ष्याचे छेदन कर. ३
ॐकार हें धनुष्य, आत्मा हा शर आणि ब्रह्म हें त्याचें लक्ष्य. एकाग्र चित्ताने नेम मारला असतां - ज्याप्रमाणें शर लक्ष्यमय होतो त्याप्रमाणें मारणारा ब्रह्ममय होतो. ४.
स्वर्ग, पृथिवी, अंतरिक्ष आणि सर्व इंद्रियांसह मन ही ज्याचे ठिकाण वेष्टिली आहेत ते एक ब्रह्म तुझीच आहां असें जाणा. इतर वाचा सोडून द्या. हें ज्ञान हाच मोक्षप्राप्तीचा सेतु आहे. ५.

ज्याप्रमाणें रथनाभीचे ठिकाणी अरा, त्याप्रमाणें शरीरांतील नाड्या ज्याचे ठिकाणी एक होतात तो कृद्ध, हर्षयुक्त इत्यादि नाना प्रकारांनी प्रकट होणारा आत्मा शरीरात वावरतो. त्या आत्म्याचे ॐकाररूपाने ध्यान करा. अविद्यारूपी तमाच्या पलीकडे जाऊं इच्छिणाऱ्या तुमचे पैलतीरीसुखानें गमन होवो. ६
जो सामन्यतः सर्व जाणणारा आहे, जो विशेषतः सर्व वस्तु जाणणारा आहे, पृथ्वीवर ज्याचा हा महिमा स्पष्ट दिसत आहे (सूर्य, चंद्र, पंचमहाभूतें वगैरे आपली कामे नियमानें करीत आहेत हा त्याचाच महिमा), दिव्य अशा ब्रह्मपुरांतील म्हगजे हृदयपुंडरीकांतील आकाशामध्यें हा आत्मा स्थित आहे. मनाचे द्वारे प्रकट होणारा, प्राण व शरीर यांचा नियंता असा हा आत्मा हृदयाचा आश्रय घेऊन अन्नाचे ठिकाणी स्थित आहे. आनंदरूपाने आणि अमृतरूपाने जें प्रकाशमान होत आहे असें हैं आत्मतत्त्व विशिष्ट अनुभवयुक्त ज्ञानानेंच ज्ञाते जाणतात. ७.
कारणरूप (पर) व कार्यरूप (अवर) अशा या आत्मतत्त्वाचें दर्शन अनुभवयुक्त ज्ञान झाले म्हणजेच हृदयाची अविद्यावासनारूप ग्रंथि तुटते, सर्व संशयांचा नाश होतो आणि जन्ममरणाला कारण अशा सर्व कर्मांचा क्षय होतो. ८.
ज्योतिर्मय अशा श्रेष्ठ [आत्मस्वरूपाची उपलब्धि येथें होते म्हणून श्रेष्ठ] कोशामध्ये असलेलें, मलरहित, अवयवरहित, शुद्ध, प्रकाशरूप पदार्थांचे देखील प्रकाशक असें तें ब्रह्म, जे आत्म्याला जाणारे असतात तेच जाणतात. ९.
त्या ब्रह्माला सूर्य प्रकाशित करीत नाही, चंद्र अथवा तारका प्रकाशित करीत नाहीत, या विजा प्रकाशित करीत नाहींत, मग अग्नि तो काय प्रकाशित करणार ? स्वतःप्रकाश अशा त्याच्याच प्रकाशाने सर्व प्रकाशरूप वस्तु प्रकाशित होतात. त्याच्याच प्रकाशाचे योगानें हें सर्व जगत् प्रकाश पावते. १०.
हें मरणरहित ब्रह्मच पुढें, मागें, उजवीकडे, डावीकडे, खालीं, वर सर्वत्र पसरले आहे. हें ब्रह्मच सर्व विश्व होय. हें सर्वामध्यें अत्यंत श्रेष्ठ आहे. ११.


॥ तृतीय मुण्डके प्रथमः खण्डः ॥


द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषस्वजाते ।
तयोरन्यः पिप्पलं स्वादु अत्ति अनश्नन्नन्यो अभिचाकशीति ॥ १ ॥
समाने वृक्षे पुरुषो निमग्नो अनिशया शोचति मुह्यमानः । जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशं अस्य महिमानमिति वीतशोकः ॥ २ ॥
यदा पश्यः पश्यते रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम् । तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति ॥ ३ ॥
प्रणो ह्येष यः सर्वभूतैर्विभाति विजानन् विद्वान् भवते नातिवादी । आत्मक्रीड आत्मरतिः क्रियावान् एष ब्रह्मविदां वरिष्ठः ॥ ४ ॥
सत्येन लभ्यस्तपसा ह्येष आत्मा सम्यग्ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम् । अन्तःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रो यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः ॥ ५ ॥
सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयानः । येनाऽऽक्रमन्त्यृषयो ह्याप्तकामा यत्र तत् सत्यस्य परमं निधानम् ॥ ६ ॥
बृहच्च तद् दिव्यमचिन्त्यरूपं सूक्ष्माच्च तत् सूक्ष्मतरं विभाति । दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यन्त्विहैव निहितं गुहायाम् ॥ ७ ॥
न चक्षुषा गृह्यते नापि वाचा नान्यैर्देवैस्तपसा कर्मण वा । ज्ञानप्रसादेन विशुद्धसत्त्वस्ततस्तु तं पश्यते निष्कलं ध्यायमानः ॥ ८ ॥
एषोऽणुरात्मा चेतसा वेदितव्यो यस्मिन् प्राणः पञ्चधा संविवेश । प्राणैश्चित्तं सर्वमोतं प्रजानां यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा ॥ ९ ॥
यं यं लोकं मनसा संविभाति विशुद्धसत्त्वः कामयते यांश्च कामान् । तं तं लोकं जयते तांश्च कामान् तस्मादात्मज्ञं ह्यर्चयेत् भूतिकामः ॥ १० ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके प्रथमः खण्डः ॥
सर्वदा एकत्र असणारे व एकमेकांचे मित्र असे दोन पक्षी, जीव व ईश्वर एकाच शरीररूपी वृक्षाला चिकटून राहिले आहेत. त्यांपैकीं एक (जीव) कर्मनिष्पन्न स्वादांनी युक्त असें फल भक्षण करतो व दुसरा कांहीं भक्षण न करितां केवळ पहात असतो. १.
दोघांनाही समान असणाऱ्या त्या शरीररूपी वृक्षाचे ठिकाणी चिकटलेला एक पुरुष जीव त्यावर आपलें स्वामित्व नाही अशा कल्पने वेडा होत्साता दुःख करतो. दुसरा पक्षी (ईश्वर) समाधानी व त्यामुळें वृक्षाचा स्वामी आहे असें जेव्हां हा जीव पहातो तेव्हां हा महिमा याचा आहे असें जाणून तो शोकरहित होतो. २
स्वयंज्योतिःस्वभाव, जगाचा कर्ता, स्वामी, ब्रह्म आणि ब्रह्माचे कारण हाच ईश्वर असें जेव्हां हा पहाणारा जीव प्रत्यक्ष पहातो तेव्हां हा ज्ञानी होऊन पुण्य आणि पाप यांचा नाश करून लेपरहित होत्साता त्या परब्रह्माबरोबर सर्वस्वी साम्य पावतो. ३
जो सर्व भूतांचे द्वारे प्रकाशित होत आहे तो प्राण (अथवा ईश्वर) हाच आहे म्ह० मीच आहे असें जाणारा विद्वान् फार (व्यर्थ) बोलत नाही. आत्म्याचे बरोबर क्रीडा करणारा व आत्म्यावर प्रीति करणारा, असा , होत्साता क्रिया करणारा हाच ब्रह्मवेत्त्यांमध्ये श्रेष्ठ होय. ४
सत्य, तप, योग्य ज्ञान आणि सतत ब्रह्मचर्य यांचे योगाने हा आत्मा (ईश्वर) प्राप्त होतो. ज्योतिर्मय व शुभ्र अशा याला ज्यांचे दोष नाश पावले आहेत असे यति आपल्याच शरीरामध्ये स्थित असा पहातात. ५.

सत्याचाच जय होतो, असत्याचा नाही. तृष्णारहित (आप्तकामाः) ऋषि जो मार्ग आक्रमण करतात व ज्या मार्गावर सत्याचे परम स्थान म्ह० ब्रह्म आहे असा देवयान मार्ग सत्याने भरलेला आहे. ६

तें ब्रह्म मोठे व प्रकाशरूप आहे, त्याच्या स्वरूपाची कल्पना करणें शक्य नाही, तें सूक्ष्माहून देखील सूक्ष्म आहे. दूराहून देखील दूर ठिकाणी तें आहे, समीप आहे, त्याला पहाणारांना (योगी, ज्ञानी वगैरेंना) तें येथेंच बुद्धिरूपी गुहेमध्ये स्थित आहे असे दिसते. ७.
चक्षूंनी त्याचें ग्रहण होत नाही, वाणीने होत नाहीं, इतर इंद्रियांनीं होत नाही, तप अथवा कर्म यानी होत नाही. ज्ञानप्रसादानें जेव्हां अंतःकरण शुद्ध होईल तेव्हांच त्या अवयवरहित ब्रह्माचें ध्यान केले असता तें दिसते. ८.

ज्यामध्यें प्राणापानादि पांच भेदांनी वास करीत आहे अशा शरीरामध्यें हा अणुस्वरूप आत्मा अंतःकरणाने जाणला पाहिजे. जनांचे अंत करण इंद्रियांसहवर्तमान प्राणांनी व्यापले आहे. हे अंतःकरण शुद्ध झालें म्हणजे हा आत्मा स्वतःप्रकाशमान होतो. ९.
ज्या ज्या (पितृलोक आदि) लोकाचा मनानें संकल्प करतो, विशुद्धान्तःकरण होत्साता ज्या ज्या भोगांची इच्छा करतो, तो तो लोक त्याला प्राप्त होतो आणि ते ते भोग प्राप्त होतात. म्हणून आपली आत्यंतिक उन्नति इच्छिणाऱ्या मनुष्याने आत्मज्ञानी मनुष्याची पूजा करावी व त्यापासून आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे. १०.


॥ तृतीयमुण्डके द्वितीयः खण्डः ॥


स वेदैतत् परमं ब्रह्म धाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम् ।
उपासते पुरुषं ये ह्यकामास्ते शुक्रमेतदतिवर्तन्ति धीराः ॥ १ ॥
कामान् यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र । पर्याप्तकामस्य कृतात्मनस्तु इहैव सर्वे प्रविलीयन्ति कामाः ॥ २ ॥
नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन । यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनूं स्वाम् ॥ ३ ॥
नायमात्मा बलहीनेन लभ्यो न च प्रमादात् तपसो वाप्यलिङ्‌गात् । एतैरुपायैर्यतते यस्तु विद्वान् तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधाम ॥ ४ ॥
संप्राप्यैनमृषयो ज्ञानतृप्ताः कृतात्मानो वीतरागाः प्रशान्ताः ते सर्वगं सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मानः सर्वमेवाविशन्ति ॥ ५ ॥
वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः संन्यासयोगाद् यतयः शुद्धसत्त्वाः । ते ब्रह्मलोकेषु परान्तकाले परामृताः परिमुच्यन्ति सर्वे ॥ ६ ॥
गताः कलाः पञ्चदश प्रतिष्ठा देवाश्च सर्वे प्रतिदेवतासु । कर्माणि विज्ञानमयश्च आत्मा परेऽव्यये सर्वे एकीभवन्ति ॥ ७ ॥
यथा नद्यः स्यन्दमानाः समुद्रे ऽस्तं गच्छन्ति नामरूपे विहाय । तथा विद्वान् नामरूपाद्विमुक्तः परात्परं पुरुषमुपैति दिव्यम् ॥ ८ ॥
स यो ह वै तत् परमं ब्रह्म वेद ब्रह्मैव भवति नास्याब्रह्मवित्कुले भवति । तरति शोकं तरति पाप्मानं गुहाग्रन्थिभ्यो विमुक्तोऽमृतो भवति ॥ ९ ॥
तदेतदृचाऽभ्युक्तम् । क्रियावन्तः श्रोत्रिया ब्रह्मनिष्ठाः स्वयं जुह्वत एकर्षिं श्रद्धयन्तः । तेषामेवैतां ब्रह्मविद्यां वदेत शिरोव्रतं विधिवद् यैस्तु चीर्णम् ॥ १० ॥
तदेतत् सत्यं ऋषिरङ्‌गिराः पुरोवाच नैतदचीर्णव्रतोऽधीते । नमः परमऋषिभ्यो नमः परमऋषिभ्यः ॥ ११ ॥
॥ इति मुण्डकोपनिषदि तृतीयमुण्डके द्वितीयः खण्डः ॥
कारण अत्यंत श्रेष्ठ अस स्थान, ज्याच्यामध्यें सर्व विश्व अर्पित आहे, आणि जे अत्यंत स्वच्छ प्रकाशाने युक्त आहे, असें ब्रह्म तो आत्मज्ञानी मनुष्य जाणतो. जे बुद्धिमान् मनुष्य तृष्णारहित होत्साते या ब्रह्माची उपासना करतात ते जन्ममरण ओलांडून पलीकडे जातात. १.
कामांचे चिंतन करीत जो ते प्राप्त होण्याची इच्छा करतो तो त्या त्या कामांचे योगाने त्या त्या कामांतीला निमित्त अशा ठिकाणी जन्म पावतो. परंतु ज्याचे सर्व काम आत्मप्राप्तिकामामुळें गेलेले आहेत व जो परमात्मरूप झाला आहे अशा मनुष्याचे सर्व काम या जन्मीच (इहैव) नाश पावतात. २.
हा आत्मा वेदशास्त्रादिकांच्या अध्ययनाने प्राप्त होत नाही, धारणाशक्तीने प्राप्त होत नाहीं, बहुत श्रवणाने प्राप्त होत नाहीं. तर ज्या आत्म्याची प्राप्ति होण्याची हा साधक इच्छा करतो त्या प्राप्तीच्या इच्छेनेच हा प्राप्त होतो. कारण अशा मनुष्यालाच हा आत्मा आपलें 'स्वरूप प्रकट करतो. ३
आत्मनिष्ठारूपी बल ज्याचेजवळ नाही, लौकिकक विषयासक्तिरूप प्रमादानें जो युक्त आहे, अथवा जो अहेतुपूर्वक तपश्चर्या करीत नाहीं, त्याला हा आत्मा प्राप्त होत नाहीं. जो विद्वान् बल, अप्रमाद आणि अहेतुक तप या उपायांनीं प्रयत्न करतो त्याचा आत्मा ब्रह्मस्थान पावतो. ४.
याची प्राप्ति झालेले ऋषि त्या ज्ञानाने तृप्त होतात, परमात्मरूप होतात, विषयप्रीतिरहित होतात आणि अत्यंत शांत होतात. ते बुद्धिमान व नित्यसमाधानस्वभावी (युक्तात्मानः) सर्वव्यापी ब्रह्म सर्वत्र प्राप्त होत्साते शरीरपातकाली सर्वांमध्यें म्हणजे ब्रह्मामध्ये प्रवेश करतात. ५.
वेदान्ताच्या योगाने उत्पन्न झालेल्या विज्ञानानें ज्यांनीं प्राप्तव्य म्ह० परमात्मा सुनिश्चित केलेला आहे, संन्यासयोगामुळें जे यमनयुक्त व शुद्ध अंतःकरणयुक्त झाले आहेत ते ब्रह्मस्वरूप होत्साते [परामृताः परं अमृतं ब्रह्म आत्मभूतं येषां ते) सर्व देहपरित्यागकाली ब्रह्मामध्ये (ब्रह्मलोके) मुक्त होतात. ६
त्या वेळी पंधरा कला आपापल्या कारणाप्रत (प्रतिष्ठाः) जातात. चक्षु आदि सर्व इंद्रिये आपापल्या देवतेप्रत जातात. कर्में व विज्ञानमय आत्मा ही सर्व अत्यंत श्रेष्ठ व अव्यय अशा ब्रह्माचे ठिकाणी एकरूप होतात. ७

ज्याप्रमाणें वहाणाऱ्या नद्या आपलें नांव व स्वरूप टाकून देऊन समुद्रामध्यें लय पावतात त्याप्रमाणें विद्वान् मनुष्य नांव व रूप यांपासून मुक्त होऊन श्रेष्ठाहून देखील श्रेष्ठ अशा दिव्य परपुरुषाप्रत जातो. ८.

हे परम ब्रह्म जो कोणी जाणतो तो ब्रह्मच होतो. त्याच्या कुळामध्ये ब्रह्म न जाणारा कोणी होत नाहीं. तो शोकाच्या पलीकडे जातो, पापाच्या पलीकडे जातो, हृदयस्थ अविद्यारूपी ग्रंथींतून मुक्त होऊन मृत्युरहित होतो. ९.
हा विद्यासंप्रदानविधि पुढील मंत्राने स्पष्ट करतात - जे योग्य कर्मांचे अनुष्ठान करणारे श्रुतिसंपन्न विद्वान् अपर ब्रह्माचे ठिकाणी निष्ठा असलेले श्रद्धापूर्वक स्वतः एकर्षिनामक अग्नीचें हवन करतात आणि ज्यांनीं (अथर्ववेदामध्ये सांगितलेले) शिरोव्रत विधिपूर्वक पाळले असेल त्यांनाच ही ब्रह्मविद्या सांगावी. १०.
तें हें परम पुरुषाचे यथार्थ ज्ञान पूर्वी अंगिरा मुनींनी सांगितलें. ज्यानें व्रत आचरण केलें नसेल तो याचे अध्ययन करूं शकत नाही, म्हणजे त्याला हें ज्ञान प्राप्त होत नाही. ही ब्रह्मविद्या परंपरेने प्राप्त करून देणाऱ्या थोर ऋषींना आदरपूर्वक नमस्कार असो. ११.॥ इत्यथर्ववेदीय मुण्डकोपनिषत्समाप्ता ॥
ॐ भद्रं कर्णेभिः श्रुणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरङ्‌गैस्तुष्टुवाँसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ।
स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।
स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ।
॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


GO TOP