माण्डुक्योनिषद -


१. प्रारंभिक

प्रमुख दहा उपनिषदांपैकी मांडुक्य हे एक उपनिषद् आहे. इतर सर्व उपनिषदांच्या मानाने हे उपनिषद् सर्वात लहान आहे. या उपनिषदात केवळ बारा मंत्र असून ते सर्व गद्यमय आहेत. हे उपनिषद् अथर्ववेदीय आहे. या उपनिषदाचा विषय ॐ कार हा आहे. इतर उपनिषदांमध्ये प्रसंगोपात ॐ काराचे वैभव अगर रहस्य सांगण्यात आले आहे परंतु ह्या उपनिषदामध्ये केवळ ॐ काराचेच महत्त्व, वर्णन, वैभव वगैरेंचे अत्यंत सूक्ष्म ज्ञान प्रतिपादन केलेले आहे. ब्रह्मजिज्ञासू लोकांना या उपनिषदाची महती नेहमीच वाटते. काही विद्वानांचे तर असे म्हणणे आहे की, सर्व उपनिषदांचे सारसर्वस्व केवळ या एकाच उपनिषदांत सांगण्यात आले आहे. ब्रह्मविद्या ही महान् अनुभूती आहे, हे स्पष्ट करण्यासाठी गौडपादाचार्यांनी या लहानशा उपनिषदाच्या स्पष्टीकरणासाठी स्वतंत्र कारिका लिहिल्या आहेत. इतर उपनिषदांवर ज्याप्रमाणे आचार्यांचे विस्तृत भाष्य आहे त्याप्रमाणे केवळ ह्या उपनिषदाच्या मंत्रावर त्यांचे भाष्य आहे, असे नसून गौडपादाचार्यांच्या कारिका ह्या उपनिषदांतील जणू मंत्रच आहेत असे मानून त्या कारिकांवरसुद्धा आचायांनी भाष्य लिहिले असून उपनिषदांतील प्रतिपाद्य विषय अधिक स्पष्टपणे समजण्यासाठी हे भाष्य अत्यंत उपयुक्त आहे. गौडपादाचार्य यांनी चार विभागांत मिळून एकूण २१५ कारिका लिहिल्या आहेत. यांत द्विरुक्त ९ कारिका आहेत.

क्र. प्रकरणाचे नाव कारिका
१ आगम २९
२ वैतथ्य ३८
३ अद्वैत ४८
४ अलातशान्ति १००
एकूण २१५
२. गौडपादाचार्य सामान्य वाचकांना पू. पा. गौडपादाचार्यांचा फारसा परिचय नाही. परंतु तो असणे आवश्यक आहे. श्रीमत् आद्य शंकराचार्यांची गुरुशिष्यपरंपरा विशद करणारा एक श्लोक आहे. तो खालीलप्रमाणे :

ॐ नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च ।
व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगिन्द्रमथास्य शिष्यम् ॥
श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् ।
तं तोटकं वार्तिककारमन्यानस्मद्गुरून् सन्ततमानतोऽस्मि ॥

नारायण (भगवान विष्णू), ब्रह्मदेव, वसिष्ठ, शक्ति, पराशर, व्यास, शुक, गौडपाद, गोविन्द, श्रीमत् शंकराचार्य - यांचे शिष्य पद्मपाद, हस्तामलक, तोटकाचार्य आणि सुरेश्वराचार्य अशी ही गुरुपरंपरा आहे. यांमध्ये नारायणापासून शुकाचार्यापर्यंत गुरुपरंपरेबरोबरच वंश किंवा पितृपरंपरा आहे. तिथून पुढे शुकाचार्यापासून पितृपरंपरा खंडित झाली. शुकाचार्य ब्रह्मचारी, वैराग्यसंपत्र आणि संन्यस्त वृत्तीचे होते. त्यांचे शिष्य गौडपादाचार्य. तिथून पुढील सर्व परंपरा ब्रह्मचर्यसंपन्न, वैराग्य आणि संन्यस्त वृत्तीचे आदर्श म्हणून गणली जाते. गौडपाद शुकाचार्यांचे शिष्य म्हटले म्हणजे त्यांचा काळ इ.स. पूर्व ३००० वर्षांच्या जवळपास जातो. कारण भारतीय युद्धाचा काळ सामान्यपणे इ.स. पूर्व ३००० वर्षांच्या मागे जातो. त्या काळी मानवाचे आयुष्य देखील भरपूर असल्याने शुकांच्या काळातच गौडपादांना गुरुप्राप्ती झाली हे निश्चित. त्या दृष्टीने विचार करता गौडपादाचार्यांचा काळ साधारणपणेइ. स. ३००० वर्षांच्या जवळपास आहे. त्यानंतर त्यांचे शिष्य गोविंदपाद आणि त्यानंतर आद्य शंकराचार्य. यामुळे आचार्यांचा काळ देखील खिस्तपूर्व आहे. आजच्या इतिहासकारांच्या मते तो इ.स. ७८८ आहे हे तितकेसे रुचत नाही. तसे पाहिले तर गौडपादाचार्यांबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु असे म्हटले जाते की, गौडपादाचार्यांनी व्याकरण-महाभाष्यकार पतंजली यांच्याकडून व्याकरणाची दीक्षा घेतली होती. ते स्वतः सांख्यतत्त्वज्ञानाचे महान आचार्य होते. ईश्वरकृष्णांच्या सांख्यकारिकांवरील भाष्य गौडपादाचार्यांचे आहे असे मानले जाते. गौडपाद स्वतः आत्मसाक्षात्कारी पुरुष होते, शास्त्रज्ञ आणि विद्वान होते. त्यांच्या ह्या सर्व गुणांचा ठसा त्यांच्या कारिकांमध्ये स्पष्टपणे उमटलेला दिसतो. त्यांनी ज्या कारिका लिहिल्या त्या चार प्रकरणांमध्ये लिहिल्या. या चार प्रकरणांमध्ये साधारणपणे कोणता विषय प्रतिपादन केला आहे याचे स्थूल स्वरूप मुद्दाम खाली स्पष्ट करण्यात येत आहे.

प्रकरण पहिले : या प्रकरणाचे नाव आहे 'आगम'. हे प्रकरण ॐ काराचा केवळ निर्णय करण्यासाठी आहे. ॐ काराचे ज्ञान म्हणजेच आत्म्याचे ज्ञान होय. ह्या ज्ञानाची व्यावहारिक आणि प्रापंचिक व्याप्ती कशी आहे याचा समग्र विचार या प्रकरणामध्ये करण्यात आला आहे.

प्रकरण दुसरे : या प्रकरणाचे नाव 'वैतथ्य' असे आहे. वैतथ्य म्हणजे विपरीत ज्ञान. समोर पडलेल्या दोरीवर सर्पाचा भास होणे आणि त्याप्रमाणे जाणिवेमध्ये बदल होणे हे विपरीत ज्ञान होय. ज्या वेळी दोरीला ज्याला सर्प म्हणून समजण्यात आले त्या दोरीचे यथार्थ ज्ञान झाल्यावर सर्पाचे भय नाहीसे झाले. त्याप्रमाणे द्वैतमय खरा वाटणाऱ्या प्रपंचाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर प्रपंच असत्य आहे, याचे ज्ञान होते. 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' या वाक्याचा अनुभव या प्रकरणात विशद करण्यात आला आहे.

प्रकरण तिसरे : या प्रकरणाचे नाव 'अद्वैत' असे आहे. वस्तूवर दुसऱ्या वस्तूचा होणारा भास पूर्णपणे नाहीसा झाल्यावर मूळ स्वरूपाचे ज्ञान होते. उपाधी भेदाने अनुभवाला येणारी प्रापंचिक विविधता पूर्णपणे लोप पावते. एकच एक स्वरूप शिल्लक राहाते. तेच साक्षात ब्रह्म होय. त्यालाच सत्यत्व आणि अविनाशित्व आहे याचे समर्पक विश्लेषण या प्रकरणामध्ये आहे.

प्रकरण चवथे : या प्रकरणाचे नाव आहे 'अलातशान्ति'. ज्ञानदेवांनी लिहिल्याप्रमाणे -

भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली ।
तैसी वेगातिशयो भुली । होतु जाय ॥ किंवा
आंधारे भोवडितां कोलती । ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥ ज्ञाने १५-१३६

अतिशय वेगाने फिरणारी भिंगरी भूमीला जखडून उभी आहे, असा तिच्या अतीव वेगामुळे भ्रम निर्माण होतो किंवा प्रज्वलित केलेली उदबत्ती अंधारात गोल फिरविली तर तेजाचे वलय निर्माण झालेले दिसते. हा आभास पूर्णपणे नाहीसा झाला तर मिथ्या प्रमाणांचे निराकरण होईल. थोडक्यात, ज्ञानाच्या विरोधात असणारे मिथ्या द्वैतवादाचे निराकरण करण्यासाठी या प्रकरणाचा प्रपंच गौडपादाचार्यांनी केला आहे. ही सर्वच प्रकरणे अतिशय सूक्ष्म आहेत. त्यांचे स्पष्टीकरण पुढे करण्यात येणारच आहे. या ठिकाणी त्यांचा केवळ मथितार्थ दिला आहे.


ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः ॥


प्रत्येक उपनिषदाच्या प्रारंभी शान्तिमंत्र असतो. त्याप्रमाणे या उपनिषदाच्या प्रारंभी हा मंत्र म्हणण्याचा शिष्टसांप्रदाय आहे. मूलतः ही ऋचा ऋग्वेदातील पहिल्या मंडळात आहे. (ऋग्वेद १.८९.८) त्याचप्रमाणे सामवेदामध्ये (१८७४) देखील आहे. या शान्तिमंत्राचा उद्देश गुरु, शिष्य या उभयतांबरोबर अन्य जनांचेही कल्याण व्हावे म्हणून ईश्वराची केलेली ही प्रार्थना आहे.

हे देवांनो, आम्हाला सदैव चांगले आणि शुभकर बोलच ऐकायला मिळोत. डोळ्यांना देखील चांगले तेच पाहावयास मिळो. आमच्या स्थिर झालेल्या अवयवांनी- मनापासून तुमची स्तुती करणारे व्हावे. आम्हाला दीर्घायुष्य लाभो. आमचे मन शुभ गोष्टींकडे आकर्षित केले जाईल अशी प्रेरणा द्या.

भद्रं नो अपि वातय मनः । ऋग्वेद १०.२०.१

आमच्या आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक तापांचे निराकरण होवो.

कोणत्याही विषयाचा अभ्यास करावयाचा म्हणजे त्यासाठी मनाची एकाग्रता लागते. अर्थात सर्व इंद्रियांचे बाह्य व्यापार आवरते घेतले म्हणजे मनाची शक्ती वाढते. मन समर्थ झाले म्हणजे त्याचा ज्ञानाच्या अत्यंत सूक्ष्म पातळीपर्यंत प्रवेश होऊ शकतो. त्याला हे आकलन होते. अर्थात त्यामुळे मनाला ईशत्वाचा स्पर्श होतो. हा स्पर्श झाला म्हणजे संपूर्ण विश्वाबद्दल प्रेम निर्माण होते. प्रत्येकाचे भले चिंतण्याची इच्छा आपोआप होते. त्याबरोबरच सर्वांकडून आपण भले तेच ऐकावे आणि सर्वत्र भले तेच पाहावे असा स्वभाव आपोआप निर्माण होतो. त्यामुळे चित्ताची चंचलता कमी होते. ज्ञानप्राप्तीसाठी ही अवस्था आवश्यक आहे. संपूर्ण आयुष्य विद्यार्थी म्हणून जगावे आणि अखेर ज्ञानवान म्हणून समाधान प्राप्त व्हावे ही खऱ्या शिष्याची इच्छा आणि त्याप्रमाणे आचार असतो. यामुळे मनात आणि बाहेरही शांतीचे साम्राज्य नांदावे, असा या प्रार्थनेचा प्रमुख आशय आहे.

माण्डुक्य उपनिषदावर भाष्य करण्याची इच्छा ज्याप्रमाणे आचार्यांना झाली त्याचप्रमाणे पूज्यपाद गौडपादाचार्यांच्या कारिकांवरसुद्धा भाष्य करण्याची त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे पूज्यपाद गोविंदाचार्यांची आज्ञाही त्यांना प्राप्त झाली. आपले भाष्य कोणतीही अडचण निर्माण न होता पूर्णत्वास जावे म्हणून आचार्यांनी या ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण केले आहे. हे मंगलाचरण करताना आचायांनी आदरपूर्वक वन्दन केले. त्याचप्रमाणे या उपनिषदाच्या निमित्ताने विषयांचे प्रयोजन वगैरेचाही मोहक उल्लेख ते करतात.

प्रज्ञानांशुप्रतानैः स्थिरचरनिकरव्यापिभिर्व्याप्य लोकान् ।
भुक्त्वा भोगान् स्थविष्ठान्पुनरपि धिषणोद् भासितान्कामजन्यान् ॥
पीत्वा सर्वान्विशेषान् स्वपिति मधुरभुङ् मायया भोजयन्तो ।
मायासंख्यातुरीयं परममृतमजं ब्रह्म यत्रन्नतो ऽ स्मि ॥ १ ॥
यो विश्वात्मा विधिजविषयान्प्राश्य भोगान् स्थविष्ठान् ।
पश्चाच्चान्यान्स्वमतिविभवाञ्ज्योतिषा स्वेन सूक्ष्मान् ॥
सर्वानेतान्पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा ॥
हित्वा सर्वान्विशेषान्विगतगुणगणः पात्वसौ नस्तुरीयः ॥ २ ॥


मंत्र- ॐ ओमित्येतदक्षरमिदं सर्वं तस्योपव्याख्यानम् ।
भूतं भवत् भविष्यदिती सर्वमोंकार एव ।
यच्चान्यत् त्रिकालातीतं तदप्योंकार एव ॥ १ ॥

br>

अर्थ- ॐ हे एक अक्षर आहे. ॐ म्हणजे सर्व काही होय. त्याचे विवेचन या ठिकाणी करण्यात आले आहे. भूत, वर्तमान आणि भविष्य काळी जे आहे ते सर्व ॐ कारच होय. याशिवाय त्रिकालातीत असणारे सर्व लोकदेखील ॐ कारच होय.

ॐ हा या विश्वातील पहिला नाद, पहिला आकार, पहिला प्रकाश आणि पहिले ईश्वराचे प्रतीक आहे. या ॐ काराबद्दल सर्व काही सांगावे हा या उपनिषदाचा उद्देश आहे. ह्या पहिल्या मंत्रात ॐ काराचे सामान्य वर्णन आहे, परंतु व्याख्या नाही. तसे पाहिले तर कोणत्याच उपनिषदाने सामान्यांना सहजपणे कळेल अशी सोपी व्याख्या केलेली नाही. ॐकाराचे वर्णन, त्याचा प्रभाव आणि व्याप्ती यांचे वर्णन मात्र निरनिराळ्या उपनिषदांनी निरनिराळ्या प्रकारे दिले आहे. या सर्वच वर्णनाचा आढावा या ठिकाणी घेणे तितकेसे उचित होणार नाही. कारण त्यामुळे अकारण द्विरुक्ती आणि विस्तार होण्याचाच संभव अधिक आहे. उपनिषदांमध्ये जरी अशी सोपी व्याख्या नसली तरी ज्ञानेश्वरांनी मात्र ही व्याख्या दिली आहे. ते म्हणतात की, प्रापंचिक जीवनातील कष्ट, दुःख, शीण यामुळे संसारी जीव भगवंताला कळकळीने हाकारतात आणि हे कष्ट, शीण आणि दुःख सुसह्य व्हावे किंवा त्यांचा समूळ नाश व्हावा म्हणून प्रार्थना करतात. त्यांच्या या प्रार्थनला भगवंतांनी प्रतिसाद दिला नाही तर संसारी जीव व्याकूळ होतील. त्यांना हा भवसागर तरून जाण्याचे सामर्थ्य आणि उमेद राहणार नाही. हे जाणूनच भगवंत अशा जीवांच्या हाकेला धावून जातात. त्यापूर्वी ते संसारी जीवांच्या हाकेला ओ देतात. ती ओ नसून तो ॐ आहे. याशिवाय जे व्युत्पन्न पंडित आहेत त्यांना ते त्यांच्या शब्दांत ॐ म्हणजे काय ते अगदी थोडक्यात सांगतात. परमेश्वराला ओळखता यावे या उद्देशाने श्रुतींनी दाखवून दिलेली खूण म्हणजे ॐ कार होय.

हे किर अनाम अजाती । परि अविद्यावर्गाचिये राती ।
माजी ओळखावया श्रुती । खूण केली ॥
कष्टले संसारशिणें । जे देवो येती गाऱ्हाणें ।
तया ओ दे नावे जेणें । तो संकेतु हा ॥ ज्ञाने. १७.३२९.३०]

ह्या त्यांच्या व्याख्येचा संबंध वरील मंत्राशी येतो. या व्याख्येवरून परमेश्वर आणि सामान्य जीव यांचा संबंध कसा जोडला जातो हे त्वरित लक्षात येईल.

हा संबंध फार पुरातन म्हणजे सृष्टीची उत्पत्ती झाली त्याच वेळी प्रस्थापित झालेला आहे. इतकेच नव्हे तर हा संबंध अतूट आहे. जे काही दृश्यमान अगर भासमान आहे ते सर्व ॐ काराने व्याप्त आहे. इतकेच नव्हे तर सर्व ॐ कारच असल्याचा निर्वाळा उपरोक्त मंत्रात आहे. या ठिकाणी कदाचित अशी शंका येईल की हा ॐ काराचा प्रस्थापित झालेला संबंध निर्माण झाला तो टिकतो किती काळपर्यंत, की तो काही काळातच संपतो ? त्या शंकेचे उत्तर 'एतद् अक्षरमिदम् । ' या पदाने दिले आहे. क्षर म्हणजे हळू लयास जाणारे, झिजणारे, झिजून नाहीसे होणारे. परंतु ॐ काराच्या बाबतीत हे वर्णन लागू पडत नाही. म्हणून अक्षर या विशेषणाने ॐ काराचे नित्यपण या ठिकाणी दाखविले आहे. परमेश्वर नित्य आहे, त्याप्रमाणे त्याचे प्रतीक देखील तसेच नित्य असले पाहिजे, या न्यायाने ॐ हा अक्षर आहे, असे सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सामान्य माणसाच्या मनात असे येते की, हा ॐ कार आहे कोठे ? आपणापासून किती दूर आहे ? कारण आपणापासून तो जर दूर असेल तर मानवाला आकलन करणे अवघड आहे. त्याचप्रमाणे ज्या परमेश्वराचे अस्तित्व उपनिषदांतून व्यक्त करावयाचे आहे तो परमेश्वर आणि ॐ कार यांमध्ये किंचितही फरक नसल्याने ॐ काराचे अस्तित्व समजले म्हणजे परमेश्वराचे अस्तित्व समजू शकेल किंवा परमेश्वराच्या अस्तित्वामुळे ॐ काराचे अस्तित्व लक्षात येईल. अशा अवस्थेत सामान्य माणसाची विचारणा अशी, की हा ॐ कार आहे कोठे ? या प्रश्नाचे उत्तर अत्यंत सूक्ष्मपणे देण्यात आले आहे. उपरोक्त मंत्रांत 'इदम्' हे पद या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. इदम् हे पद जवळच्या वस्तूचा निर्देश करण्यासाठी उपयोगात आणले जाते. ॐ कार अतिशय जवळ आहे, असे या पदाने सुचवायचे आहे. ॐ काराला शोधण्यासाठी लांब जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक वस्तुमात्र ॐ कारमय आहे. या वस्तुमात्रामध्ये मनुष्याची गणना आहे. मनुष्याच्या अंतःकरणातच केवळ ॐ आहे असे नसून तो संपूर्ण शरीरात भरून राहिला आहे. ॐ हा इथे आहे असा अभिप्राय व्यक्त करण्यासाठी हे पद या ठिकाणी योजण्यात आले आहे.

असे म्हणतात, की ब्रह्मदेवाला भगवान विष्णूंनी वेद दिले आणि याप्रमाणे सृष्टी निर्माण करण्यासाठी आज्ञा दिली परंतु ब्रह्मदेव संभ्रमात पडला. त्याला काय करावे ते समजेना. तेव्हा भगवंतांनी त्याला ॐ चा जप करून बारा वर्षे तपस्या करण्यास सांगितले.

[पैं सृष्टीचिया उपक्रमा । पूर्वीं गा वीरोत्तमा ।
वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ॥ ३६ ॥
मज ईश्वरातें नोळखे । ना सृष्टिही करूं न शके ।
तो थोरु केला एकें । नामें जेणें ॥ ३७ ॥
जयाचा अर्थु जीवीं ध्यातां । जें वर्णत्रयचि जपतां ।
विश्वसृजनयोग्यता । आली तया ॥ ज्ञाने १७-३३८ ॥ ]

त्यानंतर त्याने सृष्टीतील विविध पदार्थ निर्माण केले पण त्याचे समाधान होईना. अखेर त्याने प्रत्येक वस्तूतील चांगल्या भागाचे मंथन करून त्याचा सर्वोत्तम अंश घेतला आणि त्याची एक मूर्ती निर्माण केली. हे सृजन कार्य चालू असताना त्याच्या मुखातून सतत ॐ चा नाद चालू होता. त्यामुळे प्रत्येक वस्तूला ॐ चा स्पर्श झाला. इतकेच नव्हे, तर सर्व वस्तूंच्या सर्वोत्तम अंशाने त्याने जी मूर्ती निर्माण केली त्या मूर्तीवर देखील ॐ चा फार मोठा परिणाम झाला होता. ही मूर्ती अंतर्बाह्य ॐने भरून गेली. त्या मूर्तीवर ब्रह्मदेव खूष झाला आणि या मूर्तीलाच मानव असे म्हणण्यात आले. त्यामुळे स्वाभाविकच ॐ मानवाच्या अत्यंत जवळ असल्याचे अनुभवास येते. या कारणामुळेच 'इदम्' ह्या पदाने ॐ काराची जवळीक सूचित करण्यात आली आहे. ॐ मानवी देहातच असल्याने त्याची जवळीक सर्वात श्रेष्ठ आहे.

असे या ॐ काराचे हे सर्व स्पष्टीकरण करण्यात येत आहे. ॐ ह्याला काळाच्या मर्यादा नाहीत. तो सृष्टीच्या पूर्वी होता, प्रस्तुत काळात आहे आणि भविष्यातही तो राहणार आहे. थोडक्यात, तो त्रिकालातीत आहे. याचे कारण एकच की, काळ हा ॐ काराच्या उदरात असल्याने काळाला ॐ काराचे आकलन करता येत नाही.

त्यामुळेच त्याला त्रिकालातीत असे संबोधण्यात आले आहे. देश, काळ, अवस्था यांच्या पलीकडे ॐ असल्याने त्याचे व्याख्यान कितीही केले तरी ते अतिशय अल्पच ठरेल. यासाठी श्रुतीने सर्व काही ॐ कार आहे. ॐ काराशिवाय अन्य काही राहात नाही किंवा असू शकत नाही, असेच सूचित केले आहे. अर्थात सृष्ट्य पदार्थांच्या बाबतीत सांगताना श्रुतीने हे विधान केले आहे. यामुळे अशी शंका येईल की सृष्टीच्या पलीकडे शाश्वत आणि सत्य म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो अशा वस्तूचा आणि ॐ काराचा काही संबंध आहे काय आणि असल्यास तो कोणत्या प्रकारचा. या शंकेचे निरसन पुढील मंत्रात करण्यात आले आहे.


मंत्र- सर्वं ह्येतद् ब्रह्मायमात्मा ब्रह्म । सोऽयमात्मा चतुष्पाद् ॥ २ ॥


अर्थ- हे सर्व ब्रह्म आहे. हा आत्मा ब्रह्म आहे. तो आत्मा चार पादांचा आहे.

जे दिसते ते सर्व ब्रह्म आहे. भासमान होणारे सर्व ब्रह्मच आहे. हा आत्मा हा ब्रह्म आहे. ब्रह्म आणि आत्म्याची एकरूपता आहे. ॐ कार हा ब्रह्माचे किंवा परमेश्वराचे प्रतीक आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे त्याप्रमाणे ॐ कारही सर्वव्यापी आहे. ॐ कार म्हणजेच ब्रह्म, आत्मा, परमेश्वर- सर्व काही. हा ॐ कार चतुष्पाद आहे. हे चार पाद - चरण, एकाच वस्तूचे असलेले समभाग आहेत. एक रुपयाचे पंचवीस पैसे हा भाग आहे. पन्नास पैशांत त्याचा समावेश होतो. पंचाहत्तर पैशांत पंचवीस आणि पत्रास पैसे यांचा समावेश होतो आणि एक रुपयात सर्वांचाच समावेश होतो. यांपैकी प्रत्येक भागाला स्वतंत्र अस्तित्व असले तरी मूळ रुपयाचा त्याचा संबंध नाहीसा होत नाही. याप्रमाणे मूळ ॐ काराचा संबंध जराही न दुरावता तो अबाधित राहतो. गायीला देखील चार पाय असतात. त्या पादांप्रमाणे या पादांचे स्वरूप नाही. गायीचा एक पाय दुसऱ्या पायात एकरूप होऊ शकत नाही. ते पूर्ण अलग आहेत. त्यांचा गाईच्या शरीराशी संबंध असला तरी एक-मेक पायांशी मात्र संबंध नाही. या चार पादांचे वर्णन क्रमशः करण्यात येणार आहे. सामान्य माणसाला ॐ मध्ये समाविष्ट असलेले चार भाग माहीत आहेत. यामध्ये अ, उ, म् आणि अनुस्वार यांचा समावेश होतो. यांनाही पाद अशीच संज्ञा आहे. परंतु ॐ काराचा प्रत्येक पाद अत्यंत सूक्ष्म आहे. त्याची ओळख पुढील मंत्रापासून करून देण्यात आली आहे. खरे पाहता अक्षरब्रह्माला पाद असणे संभवनीय नाही. अर्थात ॐ काराचे सूक्ष्म आणि स्थूल स्वरूप समजावे म्हणूनच केवळ हे चार पाद मानण्यात आले आहेत. ज्ञानेश्वरमहाराजांनी मांडलेल्या सिद्धान्ताप्रमाणे शून्य दाखवावयाचे झाले म्हणजे एक वर्तुळ काढून असे सांगण्यात येते की, याप्रमाणे ज्याला मर्यादांच्या बंधनात बद्ध करता येत नाही त्याला शून्य असे मानावे - (पैं शून्य दावावे जाहलें । तरी बिंदुले पाहिजे एक केलें ॥ ज्ञाने-१३-८८७) वास्तविक शून्य दाखविता येत नाही. परंतु शून्याची ओळख करून देता यावी म्हणून या प्रमेयाचा उपयोग करावा लागतो.


मंत्र- जागरितस्थानो बहिः प्रज्ञः सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः स्थूलभुक् वैश्वानरः प्रथमः पादः ॥ ३ ॥


अर्थ- जागृती हे त्याचे स्थान असून बाह्य विषयांकडे ज्याची ओढ आहे, सप्तांग, एकोणीस मुखे, स्थूल विषयांचा उपभोग घेणारा वैश्वानर नावाचा हा प्रथम पाद होय.

जागृती ही प्राणिमात्रांची एक महत्त्वाची अवस्था आहे. अर्थात प्रथम पादामध्ये ज्या जागृतीचा उल्लेख करण्यात आला आहे ती सांसारिक जागृती होय. सांसारिक आणि पारमार्थिक जागृती असे जागृतीचे दोन प्रकार आहेत. पैकी सांसारिक जागृतीमध्ये मनुष्य नेहमी स्वतःखेरीज अन्य सर्व गोष्टींसाठी सदैव जागृत असतो. स्वतःविषयी मात्र त्यास पूर्णपणे झोप लागलेली असते. म्हणजेच स्वतःचे- मी म्हणजे कोण, कोठून आलो, माझे कार्य काय याबद्दल त्याला पूर्णपणे अज्ञान असते. परंतु बाह्य विषयांच्या बाबतीत मात्र तो सदैव जागृत असतो. माझे काय आहे, ते कोठे आहे त्याचा आणि माझा संबंध कसा प्रस्थापित करता येईल, वगैरे. मी म्हणजे हा देह आणि या देहाच्या सुविधा शोधण्यात ज्याचा काळ खर्च होतो तो सांसारिक जागृतीमध्ये आहे असे मानले जाते. ॐ काराच्या पहिल्या पादामध्ये या जागृतीचा समावेश आहे. बहिःप्रज्ञ - म्हणजेच आत्म्याव्यतिरिक्त ज्याची बुद्धी चिंतन-मनन करीत असते अशी अवस्था म्हणजे बहिःप्रज्ञ अवस्था होय. जागृति आणि बहिःप्रज्ञ या अवस्था कशा असतात, त्यांचे व्यापकत्व कशा स्वरूपाचे आहे हे सांगण्यासाठी मंत्रातील पुढील पदांचा विचार प्रामुख्याने करावा लागतो. यांतील पहिले पद सप्तांग असे आहे.

सप्तांगे - मस्तक, दोन नेत्र, प्राण, हृदयाकाश, मलमूत्रविसर्जनस्थान, हात आणि पाय.

१ मस्तक- सर्व प्रकारचे विचार आणि त्यांपासून निर्माण होणारे विकार यांचे केंद्रस्थान मस्तक हे आहे. मेंदूची कार्यकक्षा आणि त्याचे परिणाम स्पष्ट करण्यासाठी हा भाग स्पष्ट केला आहे. २ नेत्र- नेत्र दोन आहेत. विषयांचे आकलन करून विचाराला चालना देणारे हे अवयव आहेत. या ठिकाणी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, आपण जे पाहिले नाही त्याचे चिंतन करता येत नाही. आपण कानांनी गाणे ऐकतो परंतु त्यापेक्षा गायकाचे दर्शन आणि गाण्याचे श्रवण अधिक उचित वाटते. म्हणून नेत्रांना या ठिकाणी सर्व ज्ञानेंद्रियांसाठी प्रातिनिधिक स्थान देण्यात आले आहे.
३ प्राण- सर्व इंद्रियांना शक्ति प्रदान करण्याचे कार्य प्राणांमुळे होते.
४ हृदयाकाश- शरीर ताजे ठेवण्यासाठी रक्ताचा पुरवठा हृदयातून केला जातो. त्याचे स्पंदन सतत चालू असणे आवश्यक असते. हे रक्तवाहिन्यांचे प्रमुख केंद्रस्थान.
५ विसर्जनस्थाने- मल आणि मूत्र विसर्जन करणारी ही स्थाने.
६ हात- कर्मेंद्रियांमध्ये प्रमुख स्थान. कार्य करणे हा यांचा स्वभाव आहे.
७ पाय- गती, जाणे-येणे या क्रिया करणारा अवयव.

श्रीमत् शंकराचार्यांनी ही सर्व अंगे त्या विराट रूपाची आहेत असे प्रतिपादन केले असून वैश्वानर हा त्याचा स्वामी आहे असे म्हटले आहे. याबाबत खालील श्रुती प्रमाण म्हणून मानण्यात येते.

तस्य ह वा एतस्यात्मनो वैश्वानरस्य मूर्धेव सुतेजाचक्षर्विश्वरूपः प्राणः पृथग्वर्त्मात्मा सन्देहो बहुलो बस्तिरेव रयिः पृथिव्येव पादावुर एव वेदिर्लोमानि बर्हिर्हृदयं गार्हपत्यो मनोऽन्वाहार्यपचन आस्यमाहवनीयः ॥ (छान्दोग्य ५.१८.२)

ह्या वैश्वानर रूपाने गोचर होणाऱ्या विराट रूपाचे लोक हे मस्तक आहे. नेत्र विश्वाला व्यापून टाकणारे आदित्य आहेत, प्राण विविध रूपांनी गोचर होणारा वायू आहे. देहमध्य हे आकाश, बस्ती ही रायि, पृथ्वी हे पाय, ऊर ही वेदी, छातीवरील केस हे त्या वेदीवर पसरलेले दर्भ, गार्हपत्य नामन अग्नि हे मन, आहवनीय अग्नि अन्वाहार्यपचन अग्नि हे मुख होय.

वैश्वानर कसा सर्वव्याप्त आहे हे सांगण्याचा उद्देश या ठिकाणी आहे. उपरोक्त सात अंगे ही बहिर्मुख असल्याने त्यांची धाव नेहमी बाहेर असते. त्या अंगाचे चलनवलन सदैव गोचर होणारे आणि त्यामुळे प्राप्त होणारे परिणाम दर्शविणारे आहेत. याप्रमाणेच या प्रणवाच्या पहिल्या पादामध्ये एकोणीस मुखांचा समावेश असल्याचे म्हटले आहे.

पाच ज्ञानेंद्रिये- नाक, कान, नेत्र, जिव्हा- रसना, त्वचा.
पाच कर्मेंद्रिये - हात, पाय, जिव्हा-बोलणे, गुदद्वार मूत्रविसर्जक.
अंतःकरणचतुष्टय- मन, चित्त, बुद्धी, अहंकार.
पंचप्राण- प्राण, अपान, व्यान, उदान, समान,
मिळून एकोणीस मुखे आहेत.

स्थूलभुक् - सर्व इंद्रिये मूलतः स्थूल आहेत. त्याचप्रमाणे विश्वातील सर्व वस्तू आणि त्यांचा भोग या सर्वच गोष्टी स्थूल म्हणून गणल्या जातात. या सर्व विषयांचा भोग ही इंद्रिये घेतात. सर्व इंद्रियांची दृष्टी बाहेर असल्याने त्यांना बहिर्मुख म्हणतात. बाहेर जे विषय आहेत याच विषयांचा उपभोग या इंद्रियांना घेता येतो, म्हणून यांना स्थूलभुक् अशी संज्ञा आहे.

वैश्वानर हे पद या ठिकाणी योजून श्रुतीने सर्व वस्तूंच्या समावेशाचा निर्देश केला आहे.

मंत्र- स्वप्नस्थानोऽन्तः प्रज्ञः । सप्ताङ्ग एकोनविंशतिमुखः । प्रविविक्तभुक्तैजसो द्वितीयः पादः ॥ ४ ॥


अर्थ- स्वप्न हे वसतिस्थान असलेला, अंतःस्थिती पाहणारा, सात अंगे आणि एकोणीस मुखांनी युक्त विषयांच्या केवळ कल्पनेचा उपभोग घेणारा तैजस् ही द्वितीय अवस्था अथवा द्वितीय पाद होय.

स्वप्न ही अवस्था द्वितीय पादाची आहे. जागृतीमध्ये सर्व इंद्रिये आपापले व्यापार मनाच्या प्रेरणेने करीत असतात; परंतु स्वप्न या अवस्थेमध्ये इंद्रियांचे सर्व व्यापार स्तब्ध होतात. मन तेवढे जागे असते. वासनेच्या प्रबलतेमुळे पूर्वी जे पाहिले असेल, ऐकले असेल अथवा विविध ठिकाणी जागृतीमध्ये जे अनुभविले असेल ते पुन्हा स्वप्नामध्ये पाहिले जाते. प्रश्नोपनिषदामध्ये सौर्यायणी याने विचारलेल्या प्रश्नाला पिप्पलादमुनी उत्तर देताना म्हणतात -

तत्सर्वं परे देवे मनस्येकीभवति । स्वपितीत्याचक्षते ॥ ४.२.

सर्व इंद्रिये मनामध्ये एकत्र येतात. यालाच तो पुरुष झोपला असे मानतात.

देशदिगन्तरैश्च प्रत्यनुभूतं पुनः पुनः प्रत्यनुभवति ।
दृष्टं चादृष्टमनुपश्यति । श्रुतं श्रुतमेवार्थमनुश्रृणोति । सर्वः पश्यति ॥ ४-५

जे पाहिले तेच स्वप्नामध्ये पुन्हा पाहतो, ऐकलेले पुन्हा ऐकतो, नाना स्थळी जे अनुभविले असेल तेच पुन्हा अनुभवितो, ते सर्व पाहतो.

स्वप्नामध्ये इतर इंद्रिये झोपलेली असली तरी संस्कारित मन मात्र जागृत असते. हे मन सूक्ष्म आहे. मनाचे सर्व व्यापार स्वप्नात चालू असतात. त्यामुळे स्वप्न ही अवस्था द्वितीय पादामध्ये मानण्यात आलेली आहे.

याबरोबरच सात अंगांचा उल्लेख या ठिकाणी आहे. ह्या अंगांचा उल्लेख मागे केला आहे. ह्या सर्व इंद्रियांना आतील आणि बाहेरील अशी दोन रूपे आहेत. ह्या इंद्रियांचे बाह्य व्यापार थांबले तरी अंतर्रुपाचे व्यापार चालू असतात. आपण एखादी वस्तू अगर देखावा पाहतो त्या वेळी आपले नेत्र उघडे असतात. त्या ठिकाणी निर्माण होणारा नाद, दरवळणारा गंध वगैरे आपण समक्ष अनुभवीत असतो. ते ठिकाण सोडून आपण आपल्या घरी आलो, डोळे मिटले आणि पाहू लागलो तर मिटल्या डोळ्यांनी ते दृश्य दिसते, तोच नाद आपले कान श्रवण करतात, नाक गंधाचा अनुभव घेते. या वेळी प्रत्यक्ष देखावा नसतो. इंद्रियांच्या अंतर्भागाने हे काम केले जाते. या वेळी आपण जागृतीत असतो. मनावर ह्या दृश्याचा जो ठसा उमटला आहे तो स्वप्न अवस्थेमध्ये इंद्रियांचे व्यापार शून्यमय झाले तरी तो तसाच राहतो. तो ठसा केवळ याच जन्मी राहतो असे नव्हे तर जन्मांतरीदेखील राहतो. या दृश्याच्या भोवती ज्या वासना वेष्टित असतात त्यामुळे स्वप्नामध्ये या दृश्याचा अनुभव घेतला जातो. जे पूर्वी अनुभविले नाही ते स्वप्नात अनुभविता येत नाही. यामुळेच सात अंगे आणि एकोणीस मुखांचा उल्लेख करून त्यांचे सूक्ष्म रूप कार्यरत असते असे या ठिकाणी सूचित करण्यात आले आहे.

या सर्व क्रिया आत चालू असतात आणि आतील कार्याचे ज्ञानही होत असते. या प्रक्रियेला अंतःप्रज्ञ असे म्हणण्यात आले आहे. स्वप्नातील वस्तू किंवा देखावा प्रत्यक्षात पाहात नसतो परंतु तो प्रत्यक्ष पाहात असल्यासारखे मात्र वाटते. बाहेरच्या वस्तू पाहण्यासाठी बाहेरच्या प्रकाशावर अवलंबून राहावे लागते, परंतु स्वप्नातील वस्तूला प्रकाशित करण्याचे कार्य आत्म्यामुळे होते. या आत्म्याच्या अस्तित्वामुळे निर्माण होणाऱ्या अवस्थेला तेजस् असे नामाभिधान आहे. हा तेजस् कल्पिताला प्रकाशात आणतो. अर्थात तो प्रकाश ज्याच्या-त्याच्या पुरता मर्यादित असतो.

प्रविविक्तभुक् या पदाने हे मन सूक्ष्मपणे स्वप्नात उपभोग घेते, असे श्रुतीला सूचित करावयाचे आहे. तसे पाहिले तर प्रत्यक्ष वस्तू किंवा एखादा देखावा आपल्या इंद्रियांच्या मानाने कितीतरी स्थूल आणि विस्तारित असतो. परंतु मनामध्ये मात्र त्याचा संकोच होतो आणि मनामध्येच साठविला जातो. अतिलहान चित्रपट्टीमध्ये (Micro Film) मोठा देखावा ज्याप्रमाणे सूक्ष्म करून सामाविला जातो आणि आपल्या इच्छेप्रमाणे तो आपणांस अनुभविता येतो त्याप्रमाणे स्वकेंद्रित सूक्ष्म चित्रपट्टी ह्या मनाच्या कोठारात साठविली जाते. मनाला वाटेल तेव्हा ते सूक्ष्मपणे त्याचा उपभोग घेऊ शकते. ह्या सूक्ष्म उपभोगाचा निर्देश ह्या पदाने केला आहे.

थोडक्यात, ॐ काराच्या पादांपैकी हा द्वितीय पाद प्रथमपादापेक्षा सूक्ष्माचे अवलंबन करणारा, सूक्ष्माचा उपभोग घेणारा आणि सूक्ष्म आहे.


मंत्र- यत्र सुप्तो न कंचन कामं कामयते न कंचन स्वप्नं पश्यति तत्सुषुप्तम्‌ ।
सुषुप्तस्थान एकीभूतः प्रज्ञानघन एवानन्दमयः ।
ह्यानन्दभुक् चेतोमुखः प्राज्ञः । तृतीयः पादः ॥ ५ ॥


अर्थ- ज्या प्रकारे झोपला असता त्याला कोणत्याही प्रकारची इच्छा होत नाही, तो कोणत्याही प्रकारचे स्वप्न पाहात नाही त्याला सुषुप्ति अवस्था असे म्हणतात. या सुषुप्तीमध्ये पूर्वीच्या दोन्ही अवस्था (जागृती व स्वप्न) एकरूप होतात. अशा अवस्थेत तो आनंदमय होऊन आनंदाचाच भोग घेतो. चैतन्य हे ज्याचे मुख आहे असा प्राज्ञ नावाचा हा तिसरा पाद होय.

सुषुप्ति हा ॐ काराचा तृतीय पाद होय. सुषुप्तीचे वर्णन या मंत्राच्या प्रारंभी आलेले आहे. सर्व इंद्रियांसमवेत मनही व्यापारशून्य होते. त्या वेळी या शरीरात या शरीराला जिवंत ठेवणारा आणि सुषुप्तीचा आनंद घेणारा कोण असतो अशी शंका येते. याचे उत्तर एकच, की या वेळी प्राण जागृत असतो आणि आत्म्याच्या साक्षीने राहाणारा जीव आनंदाचा उपभोग घेत असतो.

हीच शंका प्रश्नोपनिषदामध्ये सौर्यायणीने पिप्पलादमुनींना विचारली आहे. त्याचे विस्तृत विवेचन करताना पिप्पलादांनी सांगितले की,
प्राणाग्नय एवैतस्मिन्पुरे जाग्रति ॥ प्रश्न ४-३.

या शरीरामध्ये प्राणरूपी अग्नि मात्र जागृत असतो. त्याचप्रमाणे
एष हि द्रष्टा स्प्रष्टा श्रोता घ्राता रसयिता मन्ता बोद्धा कर्ता विज्ञानात्मा पुरूषः
हाच उपाधिशून्य पाहणारा, स्पर्श करणारा, ऐकणारा, वास घेणारा, चव घेणारा, चिंतन करणारा, ज्ञानवान, कर्ता आणि विज्ञानमय आत्मा हाच पुरुष होय.

स परेऽक्षर आत्मनि संप्रतिष्ठते ॥ प्रश्न ४-९ = हाच पुरुष अविनाशी आत्म्यामध्ये स्थिरपणे असतो.

अशा या सुषुप्तीमध्ये कोणत्याही प्रकारच्या इच्छेला या ठिकाणी थारा नसतो. कोणतेही रूप अगर देखावा पाहिला जात नाही, म्हणूनच याला सुषुप्ति असे म्हणतात. या स्थितीमध्ये मनासहित सर्व इंद्रिये एकत्र येऊन व्यापारशून्य होतात. त्यामुळे एकुलता एक जीव त्या ठिकाणी असतो. जीवाजवळ असलेल्या वासनांची शिदोरी तशीच राहाते. ती उलगडत नाही. कारण त्या वासनांना साथ देणारी इंद्रिये पूर्णतः झोपी गेलेली असतात. जागृत किंवा स्वप्न अवस्थेमध्ये होणारे मिथ्याज्ञान या काळात होत नाही. ज्या ठिकाणी अज्ञान अथवा मिथ्यत्व नसते त्या ठिकाणी ज्ञान आणि सत्यता वास करते. ज्ञान आनंदघन असल्याने जीव केवळ आनंदाचाच उपभोग घेत असतो. ज्यावेळी तो जागा होतो तेव्हा त्या आनंदाचा परिणाम त्याच्या सर्व इंद्रियांवर झालेला असतो. तो म्हणतो, मी किती सुखरूप होतो. मला कोणतेही ज्ञान नव्हते. मी केवळ आनंदरूप होतो. म्हणूनच वरील मंत्रात आनंदभुक् असे पद वापरण्यात आले आहे. या आनंदघन अवस्थेत प्रवेश करणे किंवा या आनंदातून जागृतीत प्रवेश करणे ह्या क्रियांस चेतना-प्राण कारणीभूत आहे. चेतना हे या स्थितीचे प्रमुख द्वार आहे. म्हणून 'चेतोमुख' असे म्हटले आहे. अशा अवस्थेत जीवसुद्धा स्वस्थ होतो. परंतु त्याला भूतकाळातील, भविष्यातील आणि वर्तमान स्थितीचे ज्ञान असते. म्हणून प्राज्ञ शब्दाने हा आशय या ठिकाणी सूचित केला आहे. जीवांच्या या तीन प्रकारच्या अवस्था एकापेक्षा एक सूक्ष्म होत जातात. खालील तक्त्यावरून एका दृष्टीत या सर्वांचा स्थूलपणे परिचय होईल.


सांसारिक अवस्थेचा विचार करता जागृती उत्तम (ज्ञानमय), स्वप्न मध्यम आणि सुषुप्ति- अज्ञानमय आहे; परंतु पारमार्थिक अवस्थेमध्ये मात्र ही स्थिती अगदी उलट आहे. कारण जी जागृती उत्तम समजली जाते ती विषयग्राहक आणि देहावर प्रेम करायला लावणारी आहे. त्यामुळे देवत्वाचा अनुभव या अवस्थेपासून दूर आहे. स्वप्नामध्ये बाह्यविषयग्रहण नसते पण मनाने या विषयांच्या परिसरातच जीवाचे भ्रमण चालू असते. निद्रेमध्ये बाह्य विषयांचा विसर असतो. इतकेच नव्हे, तर स्वप्न अवस्थेमध्ये भोगल्या जाणाऱ्या दृश्यांचा आणि विषयांचाही अभाव असतो. त्या ठिकाणी केवळ ज्ञानमय आणि आनंदमय अवस्था असते. विषय पूर्णपणे निवृत्त होतात. या दृष्टीने विचार करता पारमार्थिक अवस्थेमध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति या अवस्था अनुक्रमे सूक्ष्म, सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम आहेत आणि यांचा अनुभवही स्पष्ट आहे.


मंत्र- एष सर्वेश्वर एष सर्वज्ञ एषोऽन्तर्याम्येषयोनिः । सर्वस्य प्रभावाप्ययौ हि भूतानाम् ॥ ६ ॥


अर्थ- हा (आत्मा) सर्वांचा स्वामी, सर्वज्ञ, अंतर्यामी आणि सर्वांच्या उत्पत्तीचे आदिकारण आहे. कारण सर्वांची उत्पत्ती आणि लय याच ठिकाणहून होतात.

हा आत्मा सर्वांचा अधिपति आहे. सर्व स्थावर-जंगमावर याची संपूर्ण आणि अमर्याद सत्ता आहे. या विश्वातील प्रत्येक वस्तूच्या भूत, वर्तमान आणि भविष्याचे ज्ञान याला आहे. इतकेच काय, विश्व त्याच्याचपासून उत्पन्न होत असल्याने तो सर्वांच्या, अंतर्यामी भरून राहिला आहे. या परमेश्वराच्या ऐश्वर्याचा गौरव करताना ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात -

तरी मीचि एक सर्वां । या जगा जन्म पांडवा ।
आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा ॥ ज्ञाने. ९-११२
तो विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा पांडुसुता ।
मी गोसावी समस्ता । त्रैलोक्याचा ॥ २८०
आकाशे सर्वत्र वसावें । वायूनें नावभरी उगें नसावें ।
पावकें दाहावें । वैर्षावें जळे ॥ ८१
पर्वतीं बैसका न संडावी । समुद्री रेखा नोलांडावी ।
पृथ्वीया भूतें वहावी । हे आज्ञा माझी ॥ ८२
म्यां बोलविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले ।
म्यां हालवलिया प्राणु हाले । जो जगातें चाळिता ॥ ८३
ऐसा जो समर्थु । तो मी जगाचा नाथु ।
आणि गगनाऐसा साक्षीभूतु । तोहि मीचि ॥ ज्ञाने-९-२८४
एऱ्हवीं सर्वांच्या हृदयदेशी । मी अमुका आहे ऐशी ।
जे बुद्धि स्फुरे अहर्निशी । ते वस्तू गा मी ॥ १५-४२१

अशा महान ऐश्वर्यसंपन्न ईश्वराचे प्रातिनिधिक नाव ॐ आहे. अशा ह्या ॐ चे वैभव देखील हेच आहे. पिंडी ते ब्रह्माण्डी या न्यायाने भगवंताचे जे ऐश्वर्य आहे याच ऐश्वर्याचा अत्यंत सूक्ष्म भाग त्याच्यापासून निर्माण झालेल्या विश्वांत आहे. या निर्माण होणाऱ्या वस्तूंचे कार्य आणि आयुष्य ज्या वेळी संपते तेव्हा पुन्हा त्या सर्व वस्तू ॐ कारामध्ये म्हणजेच पर्यायाने ईश्वराच्या ऐश्वर्यामध्ये लीन होतात. ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात त्याप्रमाणे -

कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळीं चि पैं गा ।
आणि तयां जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ ॥ ११३
ऐसे आघवांचि ठायीं । तया जळचि जेवीं पाही ।
तैसा मी वाचूनि नाहीं । विश्वी इये ॥ ज्ञाने.१०.११४
भगवंतच सर्वांचे उत्पत्तिस्थान, जीवन, लय, ऐश्वर्य, सत्ता, स्वामी आणि अंतर्बाह्य संस्थिती होय. हेच ॐ काराचे वैभव आहे हे सांगण्याचा या ठिकाणी प्रमुख आशय आहे.


गौडपादचार्यकृत् कारिका

प्रकरण पहिले

आगम

येथून पुढे पूज्यपाद गौडपादाचार्याच्या कारिका आहेत. पहिल्या नऊ कारिकांनंतर मुख्य उपनिषदाचा सातवा मंत्र येतो. त्यानंतर नऊ कारिका, त्यानंतर ८, ९, १०, ११ हे चार मंत्र, नंतर पाच कारिका. त्यानंतर बारावा आणि अखेरचा मंत्र आणि त्यानंतर शेवटच्या सहा कारिका आहेत. ह्या कारिकांमुळे या उपनिषदातील विषय आणखी स्पष्ट झाला आहे. या कारिकांवर श्रीमत् शंकराचार्यांचे भाष्य आहे. त्या भाष्याचा मागोवा घेतच ह्या सर्व कारिकांचा उचित असा विस्तार करण्यात आला आहे. ह्या पहिल्या प्रकरणामध्ये एकूण २९ कारिका असून या प्रकरणाचे नाव 'आगम' असे आहे.


श्लोक- बहिष्प्रज्ञो विभुर्विश्वो ह्यन्तःप्रज्ञस्तु तैजसः ।
घनप्रज्ञस्तथा प्राज्ञ एक एव त्रिधा स्मृतः ॥ १ ॥


अर्थ- परमेश्वर एकरूप असूनही तो दोन प्रकारांनी अनुभवाला येतो, असे स्मृतिग्रथांचे म्हणणे आहे. ज्या वेळी तो बाहेरील विषयांचा ज्ञाता असतो तेव्हा त्याला विश्व म्हणून ओळखतात. तोच वासनादिकांचा ज्ञाता असतो तेव्हा त्याला तेजस् असे म्हणतात आणि ज्या वेळी बाहेरील अगर आतील विषयांचे ज्ञान नसते तेव्हा तोच प्राज्ञ नावाने संबोधित होतो.

वस्तुतः आत्मा एकच आहे, परंतु त्याला ज्या उपाधी प्राप्त होतात त्याप्रमाणे त्या आत्म्यावर त्या उपाधीसहित नावाचा आरोप केला जातो. आत्म्याला ज्या वेळी देहाची उपाधी प्राप्त होते तेव्हा त्याला देहात्मा, जीवाची उपाधी प्राप्त होते तेव्हा जीवात्मा, परमतत्त्वाची उपाधी प्राप्त होते तेव्हा परमात्मा असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे स्थूल, सूक्ष्म आणि ह्या दोन्ही अवस्थांच्या पलीकडे अशी जी स्थिती पाहावयास मिळते त्याप्रमाणे त्या आत्म्याचे नाव घेतले जाते. मागील मंत्रांवर विचार करताना जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति या तीन अवस्थांचा विचार केला. त्या वेळी आत्म्याचाही विचार केला. या तीन अवस्थांमध्ये ज्या क्रिया घडतात त्या आत्म्याच्या साक्षीत्वाने घडतात. सर्व क्रियांचा साक्षी वस्तुतः एकच आहे. परंतु या क्रियांच्या जवळिकीमुळे त्याला तीन प्रकारचा असल्याप्रमाणे मानले जाते. एखाद्या खोलीत दिवा जळत आहे. त्या खोलीच्या दरवाज्यातून, गोल खिडकीतून अगर कौलाच्या झरोक्यांतून येणाऱ्या प्रकाशाचे आकार व रूप भिन्न असल्याचे जाणवते. परंतु या सर्व रूपांचा अगर आकाराचा परिणाम आतल्या दिव्यावर काहीच होत नाही. तो साक्षीपणाने त्या ठिकाणी असतो. त्याप्रमाणे आत्म्याच्या साक्षीत्वाने ज्या क्रिया घडतात त्यांचा कर्ता आणि भोक्ता हा आत्माच आहे, अशा कल्पनेने विश्व, तेजस् आणि प्राज्ञ अशी नावे त्याला प्रदान करण्यात येतात.


श्लोक- दक्षिणाक्षिमुखे विश्वो मनस्यन्तस्तु तैजसः ।
आकाशे च हृदि प्राज्ञस्त्रिधा देहे व्यवस्थितः ॥ २ ॥


अर्थ - उजव्या नेत्रामध्ये वास करणारा तो विश्व, मनाच्या आत असणारा तेजस् आणि हृदयाकाशात राहणारा तो प्राज्ञ होय. याप्रमाणे हा एकच आत्मा या देहामध्ये तीन प्रकारांनी राहात असतो.

जागृतीमध्ये नेत्र उघडलेले असतात. जोपर्यंत डोळ्यांत ओलावा आहे तोपर्यंत नेत्र विषय ग्रहण करू शकतो. मृत्यूच्या वेळी प्रथम डाव्या आणि नंतर उजव्या डोळ्यातील पाणी नाहीसे होते. डोळ्यांमध्ये प्राण अधिक काळ राहतो, याला इन्ध असे नाव आहे. [इन्धो ह वै नामैष योऽयं दक्षिणेऽक्षन्पुरुषः (बृहदारण्यक - ४.२.२) नेत्र हे विषयग्रहणाचे प्रमुख द्वार अगर मुख आहे. म्हणून श्रुतीने त्याचा योग्य तो उल्लेख या ठिकाणी केला आहे. मनामध्ये तेजसाची वस्ती आहे आणि हृदयात प्राज्ञाचे ठिकाण आहे. नेत्र, मन आणि हृदय-तीनही या मानवी शरीराचेच भाग असून त्यांच्यामुळे विश्व, तेजस् आणि प्राज्ञ या अवस्था देखील या शरीरातच आहेत. हा अभिप्राय श्रुतीने स्पष्ट केला आहे.


श्लोक- विश्वोहि स्थूलभुङ्‌नित्यं तैजसः प्रविविक्तभुक् ।
आनन्दभुक्तथा प्राज्ञस्त्रिधा भोग निबोधत ॥ ३ ॥


अर्थ - विश्व हा नित्य स्थूल विषयांचा भोक्ता आहे, तेजस् हा सूक्ष्म विषयांचा भोग घेतो तर प्राज्ञ हा केवळ आनंदच उपभोगतो. याप्रमाणे या तीन अवस्थांमध्ये तीन प्रकारचे भोगविषय आहेत.

बाह्य इंद्रिये विविध विषय ग्रहण करतात आणि जीव त्यांचा उपभोग घेतो. इंद्रिये स्थूल असल्यामुळे त्यांना केवळ स्थूल विषयांचेच ग्रहण करता येते. सूक्ष्म विषयामध्ये त्यांना मुळीच गती नाही. ह्या बाह्येद्रियांपेक्षा मन सूक्ष्म आहे. मन हे देखील एक इंद्रियच असल्याने इंद्रियांचे जे गुण आहेत ते या मनालाही आहेत. इंद्रिये ज्याप्रमाणे विषय ग्रहण करतात त्याप्रमाणे मन हेदेखील विषय ग्रहण करते. मात्र हे विषय मनाच्या सूक्ष्मतेमुळे सूक्ष्म असतात. मनाने उपभोगावयाचे विषय बाहेरील इंद्रियांचे कार्य शून्यवत झाले किंवा ती इंद्रिये झोपी गेली म्हणजे चालू होते. याच अवस्थेला स्वप्न असे श्रुतीने नाव दिले आहे. स्वप्नामध्ये ज्या विषयांचा भोग घेतला जातो तो त्या व्यक्तीपुरता मर्यादित आणि गुप्त असतो. एकाला जे स्वप्न पडते त्या स्वप्नात जो मनुष्य पाहिला जातो त्या मनुष्याला विचारले तर या स्वप्नभेटीचा अनुभव त्याच्याजवळ नसतो. स्वप्नात नदी, पर्वत, अरण्य वगैरे पाहतो. तसे पाहिले तर हे सर्व पदार्थ शरीरापेक्षा महान आणि विस्तृत आहेत. पण मन त्यांचा सूक्ष्मपणाने स्वीकार करते आणि त्या त्या वस्तूंचा उपभोग घेते. विश्वाची स्थूलता आणि तेजसाची सूक्ष्मता या दोन्ही अवस्था एकीभूत होऊन अस्तित्वशून्य होतात. यांच्या अभावामुळे निर्माण होणाऱ्या अवस्थेला प्राज्ञ असे म्हणतात. प्राज्ञ म्हणजे निर्भेळ आनंद. या आनंदाचा जीव निष्पंदपणे उपभोग घेतो. अशा प्रकारे या कारिकेत तीन प्रकारच्या भोगांचे वर्णन करण्यात आले आहे ते जाणून घेणे आवश्यक आहे.


श्लोक- स्थूलं तर्पंयते विश्वं प्रविविक्तं तु तैजसम् ।
आनन्दश्च तथा प्राज्ञं त्रिधा तृप्तिं निबोधत ॥ ४ ॥


अर्थ- स्थूल विषय विश्वाला तृप्ती देतात, सूक्ष्म विषय मनाला संतोष देतात तर प्राज्ञाला आनंद तृप्त करतो. तृप्तीची ही तीन प्रकारची अवस्था आहे.

मागील श्लोकात भोक्त्याचा विचार करण्यात आला. या कारिकेत भोगांच्या दृष्टीने कोणावर कोणत्या प्रकारचा परिणाम होतो, याचे वर्णन करण्यात आले आहे. तीन प्रकारचे विषय आणि तीन प्रकारचे भोक्ते या शरीरातच असतात हा या श्लोकाचा प्रमुख आशय आहे.


श्लोक-त्रिषु धामसु यद्‌भोज्यं भोक्ता यश्च प्रकीर्तितः ।
वेदैतदुभयं यस्तु स भुञ्जानो न लिप्यते ॥ ५ ॥


अर्थ- तीन अवस्थांमध्ये तीन निरनिराळ्या भोज्य वस्तू सांगितल्या. त्यांचे तीन प्रकारचे भोक्तेही सांगितले. या भोज्य आणि भोक्ते याचे यथार्थ ज्ञान ज्याला झाले तो भोग भोगीत असतानासुद्धा त्या भोगाने किंवा भोक्तृत्वाने कधीही लिप्त होत नाही.

जागृती, स्वप्न, सुषुप्ति या तीन अवस्था आणि विश्व, तेजस् आणि प्राज्ञ हे त्यांचे भोक्ते आहेत. हे भोग,स् थूल इंद्रिये, मन आणि हृदयाकाश यांच्या साह्याने उपभोगले जातात. याचे वर्णन यापूर्वीच आलेले आहे. भोग्य वस्तू आणि भोक्ता हे द्वैत केवळ उपाधीमुळे निर्माण झालेले आहे. अन्यथा दोन्ही एकच होय. ही द्वैतवृत्ती संपली म्हणजे एकरूपतेचा अनुभव येतो. उदाहरणार्थ- काष्ठ जाळणे हा अग्नीचा विषय आहे. काष्ठादी पदार्थ मिळाले किंवा न मिळाले म्हणून अग्नीच्या मूळ रूपात कोणताच फरक पडत नाही. त्या अग्नीला जाळावयास काही मिळाले नाही तर अग्नीचे दाहन कर्म कदाचित होणार नाही म्हणून अग्नीचे मूळचे रूप म्हणजे दाहकता कदापि कमी होत नाही अगर वाढतही नाही. त्याप्रमाणे भोज्य आणि भोक्तेपण याच्या उपाधीचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे उपभोगाचा परिणाम भोक्त्यावर होत नाही. अशा पुरुषाला ज्ञानवान असे म्हणतात.


श्लोक- प्रभवः सर्वभावानां सतामिति विनिश्चयः ।
सर्वं जनयति प्राणश्चेतोंशून् पुरुषः पृथक् ॥ ६ ॥


अर्थ- सर्व सत्य वस्तूंचे उत्पत्तिस्थान प्राण असून तोच सर्वांना निर्माण करतो. तोच प्राणपुरुष चराचर सृष्टी आकारानुसार आपल्या ज्ञानांशांनी-ज्ञानरूपी किरणांनी निर्माण करतो.

प्राण हा सर्व वस्तूंचे उत्पत्तिस्थान आहे. तोच सर्वाना निर्माण करतो. पाऊस पडून गेल्यावर पाणी निरनिराळ्या लहान-मोठ्या डबक्यांत साचते. सूर्यकिरण त्या पाण्यावर पडले म्हणजे अनेक सूर्य आहेत, असे वाटते.
[येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हेचि साऊली ।
वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रीचि आहे ॥ ज्ञाने. ८-१३८ ]]

वस्तुतः सूर्य एकच परंतु पाण्याच्या उपाधीमुळे आणि अज्ञानामुळे तो विविध प्रकारचा असल्यासारखे वाटते. त्याप्रमाणे ब्रह्म पूर्वी एकच होते [[ ब्रह्मैवेदं (मुण्डक-२-२-११) ]] किंवा आत्माच फक्त पूर्वी होता [[ आत्मा वा इदमेक एवान आसीत् । ऐत. १-१ ]] अशी श्रुतिवाक्ये आपल्या परिचयाची आहेत. या आत्म्यापासून किंवा ब्रह्मापासूनच ही चराचर सृष्टी निर्माण झाली. सूर्य एकच असून त्याचे प्रतिबिंब ज्या डबक्यात पडलेले आहे त्या प्रत्येक डबक्याचा आकार आणि रूप भिन्न आहे. ही डबकी काही गोल, काही लंबगोल तर काही वेडीवाकडी आहेत. असे असूनही त्यात पडणारे आणि दिसणारे सूर्यबिंब एकाच प्रकारचे आहे. अग्नीच्या ज्वाळेतून अग्नीच्या ठिणग्या निर्माण होतात, परंतु त्यामुळे अग्नीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. आग्नीचे स्वरूप अग्नीच्या ठिणगीमध्ये आहे आणि त्याच ठिणगीमध्ये अग्नीचा गुण-दाहकता सूक्ष्म रूपाने राहातो. [[ यथाग्नेः क्षुद्रा विस्फुल्लिङ्गा व्युचरन्ति, आत्मनः सर्वे प्राणाः सर्वे लोकाः व्युच्चरन्ति । सत्यमिति प्राणाः सत्यम् तेषाम् ॥ बृ. २-१-२० ]] त्याप्रमाणे प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वराचा गुण आहे. [[ ममैवांशो जीवलोकः ॥ भ. गी. १५-७ ]] हे सर्व सत्य आहे.


श्लोक- विभूतिं प्रसवं त्वन्ये मन्यन्ते सृष्टिचिन्तकाः ।
स्वप्नमायासरूपेति सृष्टिन्यैर्विकल्पिता ॥ ७ ॥


अर्थ- सृष्टीचे चिंतन करणारा असे मानतो की, सृष्टी ही परमेश्वराच्या मूळ ऐश्वर्याचाच विस्तार आहे. परंतु हे कल्पिलेले सत्य मायेच्या रूपाप्रमाणे असत्य आहे. सृष्टी ही मायावी पुरुषांनी निर्माण केलेल्या गंधर्वनगरीप्रमाणे काल्पनिक आणि मिथ्या आहे, असेही एक मत आहे.

या श्लोकामध्ये दोन प्रकारच्या लोकांच्या विचारांचा मागोवा घेतला आहे. त्यांपैकी पहिले सृष्टिचिंतक आणि दुसरे परमार्थचिंतक, सृष्टिचिंतक हे संसारी जीव आहेत. त्यांना स्वाभाविकपणे आपली इंद्रिये ज्या देहात आहेत तो देह म्हणजे मी अशी भावना असते. या देहाच्या सौख्याचा विचार त्यांच्या ठिकाणी प्रामुख्याने असतो. त्यामुळे परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली ती केवळ आपल्या उपभोगांसाठी, आनंदासाठीच आहे, या सृष्टीतील सर्व पदार्थ म्हणजे भगवंताच्या ऐश्वर्याचा हा महान विस्तार आहे, अशी त्यांची दृढ श्रद्धा असते. त्याप्रमाणे त्यांचा विचार आणि आचारही असतो.

जे अन्य लोक आहेत ते सृष्टीचा विचार करताना ती परमेश्वराची माया आहे, असे म्हणून तिच्याकडे बघतात. त्यामुळे स्वाभाविकच परमार्थी लोकांना या सृष्टीबद्दल तेवढासा आदर वाटत नाही. कारण त्यांना नेहमी असे वाटते की, परमेश्वर आणि परमेश्वराची प्राप्ती व्हावी म्हणून सतत प्रयत्न करणाऱ्या साधकांमध्ये निर्माण झालेली ही दरी आहे. फार मोठे अंतर आहे. त्यामुळे भगवंताच्या भेटीच्या मार्गात हे फार मोठे विलोभन आहे, याबद्दल त्यांची खात्री झाली आहे. या अडथळ्याचा स्वामी इंद्र [[ इन्द्रो मायाभिः पुरुरूप ईयते । बृ. २.५.१९ ]] असून तो विविध रूपे धारण करून पारमार्थिक लोकांच्या पुढे मायाजालच निर्माण करतो, असे त्यांचे म्हणणे आहे.

एखादा गारुडी दोरीचा प्रयोग करतो. तो दोरी आकाशात उंच फेकतो आणि हातांत आयुधे घेऊन तो त्या दोरीवर चढतो. काही वेळाने तो दिसेनासा होतो. त्या ठिकाणी त्याचे राक्षसांशी युद्ध होते आणि या युद्धात त्याच्या शरीराचे तुकडे होऊन तो खाली पडतो आणि काही वेळाने जिवंत होऊन सर्वांसमोर येतो. काहींना ही कृती खरी वाटते तर काहींना ती माया वाटते. एकाच दृश्यामध्ये वृत्तीप्रमाणे दोन स्वतंत्र विचार ऐकावयास येतात. त्याप्रमाणे परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीसंबंधी विचार करणारे दोन प्रकारचे लोक असून त्यांच्या विचारधारा कशा भिन्न असतात हे या ठिकाणी स्पष्ट केले आहे.

याप्रमाणे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति या ज्या तीन अवस्थांचा विचार करण्यात आला, त्या केवळ मायावी आहेत. या सर्वांचा साक्षी असणारा आत्मा मात्र नित्य आणि सत्य आहे. तो मायावी नाही. म्हणून परमार्थचिंतन करणारे जे साधक आहेत ते या तीन अवस्थांचा विचार करीत नाहीत असे नाही, परंतु या अवस्थाच असत्य किंवा मायावी असल्याने त्या त्याज्य आहेत, असा निर्णय घेऊन ते परमार्थचिंतनात मग्न होतात. त्यामुळे परमेश्वरनिर्मित ही सृष्टी मायावी आहे, असे त्यांचे ठाम मत असते. 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्यः । ' हा यातील महत्त्वाचा निर्णय होय.


श्लोक- इच्छामात्रं प्रभोः सृष्टिरिति सृष्टौ विनिश्चिताः ।
कालात्प्रसूतिं भूतानां मन्यन्ते कालचिन्तकाः ॥ ८ ॥


अर्थ- केवळ परमेश्वराला इच्छा झाली त्यामुळे केवळ संकल्पाने ही सृष्टी निर्माण झाली असाही सृष्टिचिंतकांनी सिद्धान्त केला आहे. कालाचे चिंतन करणारे म्हणतात, की ही सृष्टी कालापासून निर्माण झाली आहे.

परमेश्वराला एकोऽहं बहूस्याम् । मी पुष्कळरूपाने नटावे, विस्तृत व्हावे अशी इच्छा झाली हा संकल्प आहे. या संकल्पाप्रमाणे परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली असे काही लोकांना वाटते. परंतु ह्या सृष्टीतील सर्वपदार्थ हे कालाच्या मयदित आहेत. त्यामुळे ही सृष्टी कालापासून निर्माण झाली. कालामध्येच वावरते. कालान्तराने ती कालातच लयाला जाते. या कालाच्या बंधनामुळे सृष्टी परमेश्वराच्या संकल्पाने निर्माण झालेली नसून ती कालाने निर्माण केली आहे, असा कालचिंतकांचा विश्वास आहे.


श्लोक- भोगार्थं सृष्टिरित्यन्ये क्रीडार्थमिति चापरे ।
देवस्यैष स्वभावोऽयमाप्तकामस्य का स्पृहा ॥ ९ ॥


अर्थ- काही लोकांचे म्हणणे असे आहे, की ही सृष्टी मानवांच्या भोगासाठी मात्र निर्माण झाली आहे, तर दुसरे लोक म्हणतात, की ही सृष्टी क्रीडा करण्यासाठी आहे. परंतु सत्यबुद्धीने पाहाता सृष्टीनिर्मिती हा परमेश्वराचा स्वभाव आहे. जो पूर्णकाम आहे त्याला इच्छा तरी कशाची असणार ?

भगवंताने निर्माण केलेल्या या सृष्टीतील प्रत्येक पदार्थ हा भोगमय आहे. या पदार्थांचा मानवाने यथेच्छ उपभोग घ्यावा असा भगवंताचा संकल्प होता. म्हणूनच त्याने विविध पदार्थाची निर्मिती करून सृष्टी भरून टाकली आणि मानवांना उपभोगासाठी, आनंदासाठी प्रदान केली, असा काही लोकांचा समज आहे.

काही लोकांना वाटते की, सृष्टी निर्माण करणे हा भगवंताचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे त्याने ही सृष्टी निर्माण केली. त्यासाठी संकल्प, इच्छा वगैरे गोष्टी खऱ्या नाहीत.

या दोन्ही किंवा मागच्या श्लोकांत निर्माण केलेल्या विविध तकांना या श्लोकात उत्तर देण्यात आले आहे. गौडपादाचार्यांना असे म्हणावयाचे आहे की, आप्तकाम म्हणून ज्या परमेश्वराची बिरुदावली आहे त्याला इच्छा तरी कशी निर्माण होईल ? इच्छा नाही म्हणजे संकल्प नाही आणि संकल्प नाही म्हणजे त्याप्रमाणे सृष्टीची निर्मिती नाही. समुद्रकाठी वाळूत पडलेल्या शिंपल्यावर किरण पडले म्हणजे पाहणाऱ्याला ते चमकणारे रूपे, चांदी असल्याचा भास होतो आणि त्या लाभाच्या इच्छेने त्याला आनंद वाटतो. अर्थात शिंपल्यावर सूर्यकिरणांमुळे निर्माण झालेला हा आभास आहे. वस्तुतः ती सत्यस्थिती नाही. यालाच भ्रांती अशा शब्दाने संबोधिले जाते. फार मोठी भ्रांती म्हणजे माया. या मायेच्या आश्रयामुळे जागृति, स्वप्न, सुषुप्ति ह्या अवस्था निर्माण होतात. त्याच मायेमुळे सृष्टीची उत्पत्ती भोगासाठी, क्रीडेसाठी परमेश्वराच्या संकल्पाने, इच्छेने निर्माण झाली असे भ्रममूलक विधान केले जाते. सत्य निराळे आहे.


मंत्र- नान्तःप्रज्ञं न बहिष्प्रज्ञं नोभयतः प्रज्ञं न प्रज्ञानघनं न प्रज्ञं नाप्रज्ञम् ।
अदृष्टमव्यहार्यमग्राह्यमलक्षणमचिन्त्यमव्यपेदशमेकात्मप्रत्ययसारम् ।
प्रपञ्चोपशमं शान्तं शिवमद्वैतम् चतुर्थं मन्यन्ते स आत्मा स विज्ञेयः ॥ ७ ॥


जो अन्तअन्तःप्रज्ञ बहिष्प्रज्ञ अगर उभयप्रकारे प्रज्ञ नाही, प्रज्ञानघन नाही, प्रज्ञ नाही, अप्रज्ञ नाही, जो अदृष्ट, अव्यवहार्य, अग्राह्य, लक्षणशून्य, अचिन्त्य, ज्याला कोणत्याही नावाने हाकारता येत नाही जो एकरूपतेचे साक्षात दर्शन, प्रपंचाचा निरास करणारा, शान्त, मंगलमय, अद्वितीय असा हा ॐकाराचा चवथा पाद आहे असे प्रज्ञावन्त मानतात. तोच आत्मा असून त्याचे ज्ञान करून घेण्यास तोच योग्य होय.

येथून पुढे ॐकाराच्या तुरीय किंवा चतुर्थ पादाचे विश्लेषण करण्यात येत आहे. या मंत्रामध्ये असलेले प्रत्येक पद अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ते आत्म्याचे वर्णन आहे किंवा ॐकाराच्या तुरीय म्हणून मानलेल्या अत्यंत सूक्ष्म आणि महत्त्वाच्या पादाचे ते वर्णन आहे. हा पाद अमुक एक प्रकारचा आहे म्हणून त्याचे वर्णन करता येत नाही. कारण हा पाद ही सत्य अवस्था आहे. परंतु इतर सर्व स्थिती मिथ्या आहेत. ज्या वेळी शुक्तीवर पडलेल्या सूर्यकिरणांमुळे रजताचे दर्शन होते त्या वेळी शुक्ती सत्य आहे परंतु रजत मात्र मिथ्या आहे. ज्या वेळी शुक्तीच्या सत्यत्वाचे ज्ञान होईल तेव्हा रजताचे असत्यत्व प्रत्ययाला येईल. यामध्ये शुक्तीमुळे रजत भासमान झाले. त्याप्रमाणे या चतुर्थ पादामुळे सर्व विश्वाची अवस्था गोचर होते. ती अवस्था असत्य असली तरी चतुर्थ पाद मात्र पूर्णपणे सत्य आहे. सृष्टीच्या मुळाशी या चतुर्थ पादाच्या सत्याचा आधार आहे. याप्रमाणे मागे ज्या ज्या अवस्था वर्णन केल्या त्या मिथ्या असल्या तरी त्याचा आधार हा चतुर्थ पाद आहे. ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात त्याप्रमाणे -

पैं शून्य जैं दावावें जाहलें । तें बिंदुले पाहिजे एक केले ।
तैसें अद्वैत सांगावें बोलें । तैं द्वैत कीजे ॥ ज्ञाने. १३-८८७.

शून्य म्हणजे काय हे सांगण्यासाठी एक लहानसे वर्तुळ काढून दाखवावे लागते. या वर्तुळाच्या मर्यादा ज्या ठिकाणी नसतात त्याला शून्य असे म्हणतात. अद्वैताचे व्याख्यान करताना द्वैताचा आश्रय करावा लागतो. त्याप्रमाणे या ठिकाणी अमुक नाही असे दर्शविताना ज्या पदांचा वापर करण्यात आला आहे तो अत्यंत जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. ब्रह्म दाखविता येत नाही तरी ब्रह्म आहे हे सांगण्यासाठी सर्वनामांचा उपयोग करून श्रुतीने ब्रह्माचे वर्णन केले आहे. उदाहरणार्थ -

तत्त्वमसि । छां. ६.८.७. ते ब्रह्म तू आहेस.
अयमात्मा ब्रह्म । बृ. २.५.१९ हा आत्मा ब्रह्म आहे.
तत् सत्यं स आत्मा । छां. ६.८.७. ते सत्य तोच आत्मा-ब्रह्म आहे.
आत्मैवेदं सर्वम् । छां. ७.२५.२. आत्माच हे सर्व आहे.
सबाह्याभ्यन्तरो ह्यजः । मुं. २.१.२. तो आत-बाहेर भरून राहिलेला अजन्मा-ब्रह्म होय.

सर्व उपनिषदे ब्रह्माचे या प्रकारे प्रतिपादन करतात. याप्रमाणे ब्रह्म, आत्मा परमार्थरूप असल्याचे सांगण्यासाठी या मंत्राचा विचार करण्यात आला आहे. विश्व, तेजस्, आनंद इत्यादिकांच्या आश्रयामुळे आत्मा उपाधीमय झाला आहे, असे मानण्यात येते. ह्या अवस्था केवळ आत्म्याच्या अस्तित्वामुळे दृश्य होतात. परंतु या सर्व उपाधी आहेत. आत्म्याला त्याचा स्पर्श होत नाही, हे निर्विवाद सत्य आहे. यामुळेच अन्तःप्रज्ञ, बहिष्प्रज्ञ, उभयप्रज्ञ, प्रज्ञानघन, प्रज्ञ, अप्रज्ञ ही विशेषणे या ठिकाणी केवळ निर्देशासाठी उपयोगात आणलेली आहे. प्राज्ञ याचे सविस्तर वर्णन मागे आलेले आहे त्यामुळे या विशेषणांचा बोध आपोआपच होईल.

आत्म्याकडे निश्चितपणे अंगुलिनिर्देश करता येत नाही. हवा सर्वत्र आहे, परंतु त्या हवेकडे बोट दाखवून काही सांगता येत नाही. त्याप्रमाणे आत्मा अदृष्ट आहे, तो अव्यवहार्य आहे, असे श्रुतीचे पुढील प्रतिपादन आहे. ज्याची हालचाल प्रत्ययाला येत नाही असा गुण असलेल्या या आत्म्याला अव्यवहार्य असे म्हटले आहे. तो हाती लागत नाही म्हणून अग्राह्य आहे. तो लहानमोठा, वेडावाकडा, काळा-निळा वगैरे वर्णांनी युक्त, कुरूप-सुंदर वगैरे रूपांनी समृद्ध, तो रुचिर किंवा अरुचिर आहे, त्याला गंध-दुर्गंध आहे, तो स्पशनि मृदु अगर कठीण आहे वगैरे जी विविध वस्तूंची लक्षणे आहेत त्यांपैकी एकाही लक्षणाने हा आत्मा दाखविता येत नाही. हा अचिन्त्य आहे. जी वस्तू पाहिली नाही तिचे चिंतन कदापि करता येत नाही. आत्मा अदृष्ट असल्याने किंवा इतर वस्तूंप्रमाणे अनुभवाला येत नसल्याने त्याचे अमुक प्रकारे चिंतन करावे हे संभवत नाही. हा एकमेव आहे. त्याच्यासारखी दुसरी वस्तू या विश्वाच्या पसाऱ्यात नाही, म्हणून एकीभूत एकमेव असा शब्दप्रयोग केवळ ह्या आत्म्यासाठीच होऊ शकतो. आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजे आत्म्याशिवाय असणाऱ्या सर्व वस्तू मिथ्या असल्याचे ज्ञान आपोआपच होते. थोडक्यात प्रापंचिक वस्तूंचे अनित्यत्व प्रत्ययास आल्याने प्रपंचाचा अन्त होतो. अशा प्रकारच्या निषेध शब्दांनी किंवा नकारार्थी शब्दांनी आत्म्याचा परिचय या ठिकाणी करून दिल्यावर त्याच्या गुणांचा साधकाला जो प्रत्यय येतो किंवा साधकावर जो परिणाम होतो ते सांगण्यासाठी काही विशेषणांचा विनियोग या ठिकाणी करण्यात आला आहे. या ठिकाणी श्रुती म्हणते की, आत्मा हा शान्त आहे. एखाद्या माणसाला भरपूर तहान लागली की, तो पाण्यासाठी नदी अगर विहिरीवर जाण्यासाठी किंवा पाण्याचे ठिकाण शोधून काढण्यासाठी धडपड करतो. ज्या वेळी त्याला पाणी मिळते तेव्हा त्याची ही धडपड नाहीशी होते आणि तो शांत होतो. त्याप्रमाणे प्रपंचात सुख आहे, असे म्हणून प्रत्येक वस्तूचा आश्रय प्रापंचिक करतो, परंतु सुख मात्र त्याच्या हाती लागत नाही. परंतु आत्मबोधाने ज्या वेळी प्रपंच असत्य असल्याचा प्रत्यय त्याला येतो तेव्हा मात्र तो शांत होतो. हा गुण आत्म्याचा आहे. पाण्याचा अगर वायूचा स्पर्श होताच माणसाला शीततेचा अनुभव येतो. कारण पाणी अगर वायू हे शीत आहेत; किंबहुना शीत असणे हा त्यांचा स्वभाव असल्याने ते अन्यांनाही शीतमय करतात. याप्रमाणे शांत हा आत्म्याचा स्वभाव असल्याने आत्मा शांत असल्याचे प्रतिपादन केले आहे. याबरोबरच तो मंगलकारी आहे. मंगल म्हणून ज्याला म्हणता येईल अशी वस्तू या विश्वात केवळ एकच आहे आणि ती म्हणजे जन्म आणि मृत्यू हा जो प्रवास आहे तो पूर्णपणे नाहीसा होणे. जन्म घेणे आणि मृत्यू येणे ह्या सर्वात अमंगल आणि दुःखमय अवस्था होत. ज्ञानेश्वरमहाराजांच्या अभिप्रायाप्रमाणे -

मातेचिया उदरकुहरी । पचूनि विष्ठेच्या दाथरी ।
उकडोनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥ ज्ञाने.-९-३३१

हे दुःख केवळ आत्मानुभवामुळे किंवा आत्मदर्शनामुळे घडते. म्हणून आत्म्याला मंगलकारी अशा शब्दाने गौरविले आहे. असा आत्मा ज्ञात करून घ्यावा म्हणून श्रुतीचा आग्रह आहे.

या उपनिषद मंत्रावरील १० ते १८ पर्यंतच्या कारिका ह्या मंत्राचे अधिक स्पष्टीकरण करतात.


मंत्र- निवृत्तेः सर्वदुःखानामीशानः प्रभुरव्ययः ।
अद्वैतः सर्वभावानां देवस्तुयों विभुः स्मृतः ॥ १० ॥


अर्थ- सर्व दुःखांच्या निवृत्तीचा प्रमुख सत्ताधीश तोच प्रभू नित्य, अव्यय, एकरूपी आहे. तो सर्व व्यावहारिक स्थावर-जंगम वस्तूंना एकरूप करणारा असून स्वयंप्रकाशी, सर्वव्यापी आणि तुरीय आहे.

विश्वाच्या पसाऱ्यातील सर्वांत मोठे दुःख म्हणजे पुन्हा पुन्हा जन्मास येणे आणि पुन्हा पुन्हा मरणे. हा निरंतरचा प्रवास म्हणजे सर्व दुःखांचे आगर होय. मनुष्य जन्मासच आला नाही तर त्याला दुःखाला तोंड द्यावे लागणार नाही. ज्ञानेश्वरांच्या 'उपजे ते नाशे' या सिद्धांताप्रमाणे ज्याला जन्म आहे. त्याला मृत्यू अटळ आहे. हा जन्म मानवी जन्मात निर्माण होणाऱ्या विविध वासनांच्यामुळे येतो. 'जन्म घेणे लागे वासनेच्या संगे' या तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे वासना हे जन्माचे मूळ आहे आणि जन्म घेणे हे सर्व दुःखाचे मूळ आहे. या वासना ईश्वरार्पण केल्या म्हणजे पुढील जन्माला लागणारी सामग्री संपुष्टात येऊ लागते. ह्या क्रियेचा आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या फळाचा स्वामी परमेश्वर आहे. तोच सर्व सत्ताधीश, नित्य आणि एकुलता एक आहे. सर्व स्थावर आणि जंगम वस्तूला तो सारखाच न्याय देतो. कारण तो सर्वव्यापी आणि स्वयंप्रकाशी आहे. याला जाणण्यासाठी त्या परमेशाशी एकरूपता साधणे आवश्यक आहे. परंतु तो इतका सूक्ष्म आहे की, त्याचे वर्णन शब्दांच्या परिमित कक्षेत बसणारे नाही. म्हणूनच त्याला तुरीय असे संबोधण्यात आले आहे.


मंत्र- कार्यकारणबद्धौ ताविष्येते विश्वतैजसौ ।
प्राज्ञः कारणबद्धस्तु द्वौ तौ तुर्ये न सिध्यतः ॥ ११ ॥


अर्थ- विश्व आणि तेजस्, दोन्ही (अवस्था किंवा) पाद कार्ये आणि कारण यायोगे बद्ध झालेल्या आहेत. प्राज्ञ मात्र कारणबद्ध आहे. कार्यकारणाने बद्ध झालेले विश्व आणि तेजस् आणि कारणबद्ध झालेला प्राज्ञ या तुरीयामध्ये समाविष्ट होत नाहीत.

तुरीय अवस्थेची किंवा तुरीय पादाची स्पष्टता व्हावी हा या कारिकेचा हेत् आहे. यामध्ये दोन पारिभाषिक शब्दांचे स्पष्टीकरण आवश्यक आहे.

कार्य- जे उत्पन्न होते किंवा केले जाते ते कार्य होय.
कारण- ज्यामुळे कार्य केले जाते किंवा ज्यायोगे फलसिद्धता होते त्याला कारण किंवा कार्यबीज असे म्हणतात.

आपण म्हणजेच देह असे मानणे अज्ञान किंवा अविद्या आहे. अविद्येने ज्ञान झाकले जाते, कारण ज्ञान सूक्ष्म आहे तर अविद्या स्थूल आहे. 'अज्ञानेनावृतं ज्ञानं' हा गीतेचा अभिप्राय स्पष्ट आहे. देह म्हणजे मी असे विपरीत ज्ञान हे अज्ञानामुळे झाले. या ठिकाणी अविद्या हे कारण असून विपरीत ज्ञान हे कार्य होय. या सिद्धांताप्रमाणे विश्व व तेजस् हे कार्यकारणबद्ध आहेत तर प्राज्ञ मात्र केवळ कारणबद्ध आहे. अर्थात हे सर्व अविद्येचे संतान असल्याने त्यांना तुरीय नामक अनिर्बंध स्थितीमध्ये स्थान नाही. विश्व व तेजस् हे जागृति आणि स्वप्न आणि त्याबाबतचे विपरीत ज्ञान यांनी स्पर्शित आहेत. त्यामुळे सदोष आहेत. प्राज्ञ सुषुप्तिद्रष्टा आहे. तो अज्ञान-कारणाने बद्ध असतो. अर्थात ही अवस्था 'तुरीय' पादामध्ये नाही. या ठिकाणी विपरीत ज्ञान नाही. आहे ते केवळ ज्ञान.


श्लोक- नात्मानं न परांश्चैव न सत्यं नापि चानृतम् ।
प्राज्ञः किंचन संवेत्ति तुर्यं तत्सर्वदृक्सदा ॥ १२ ॥


अर्थ- प्राज्ञाला स्वतःचे ज्ञान नसते त्याप्रमाणे अन्य गोष्टींचेही ज्ञान नसते. त्याला सत्य किंवा असत्य कळत नाही. त्याला काहीही कळत नाही. परंतु तुरीय मात्र सर्व पाहाणारा आहे.

विश्व आणि तेजस् यांना बाह्य विषयांचे ज्ञान होते, परंतु प्राज्ञाला मात्र त्याप्रमाणे ज्ञान होत नाही. जरा अधिक स्पष्ट करायचे म्हणजे प्राज्ञाला असे ज्ञान करून घेण्याचे सामर्थ्य नसते. यामुळे तो अज्ञानमय असतो. तसे पाहिले तर ज्ञान आणि अज्ञान सापेक्ष आहेत, असे वाटते. परंतु तसे नाही. अज्ञान हे ज्ञानाचे कारण आहे. तुरीयाच्या ठिकाणी ते नाही. त्यामुळे तुरीय बद्ध होत नाही. इतकेच काय, अज्ञानामुळे निर्माण झालेल्या विपरीत ज्ञानालादेखील तिथे वाव नाही. सूर्याला ज्याप्रमाणे अंधाराचे ज्ञान नाही, त्याप्रमाणे तुरीयाला अज्ञान किंवा विपरीतज्ञान यांना त्या ठिकाणी वाव नाही.

न हि द्रष्टुर्दृष्टेविपरिलोपो विद्यते । बृ. ४.३.२३
द्रष्ट्याच्या दृष्टीचा लोप कधीही होत नाही, असे श्रुतीचे वचन आहे. सर्व भूतांच्या अंतर्यामी राहणारा तुरीय जागृतादी अवस्थांचा द्रष्टा असतो, इतकेच नव्हे, तर सर्व वस्तुज्ञानाचा आभास या तुरीयामध्ये असतो म्हणूनच त्याला द्रष्टा असे म्हटले जाते. कारण यापेक्षा अन्य द्रष्टा संभवत नाही. नान्यदतोऽस्ति दृष्ट । बृ. ३.८.११ असे प्रमाण आहे.


श्लोक- द्वैतस्याग्रहणं तुल्यमुभयोः प्राज्ञतुर्ययोः ।
बीजनिद्रायुतः प्राज्ञः सा च तुर्ये न विद्यते ॥ १३ ॥


अर्थ- प्राज्ञ आणि तुरीय द्वैताचे ग्रहण करता येत नाही हे उभयतांचे सारखेपण आहे. प्राज्ञ हा बीजनिद्रेने व्याप्त असतो परंतु ती निद्रा तुरीयाच्या ठिकाणी नाही.

तत्त्वाचा बोध करून देणारी निद्रा प्राज्ञामध्ये आहे. या निद्रेला बीजनिद्रा असे म्हटले आहे. कारण ही निद्राच विपरीतज्ञानाची जननी आहे. त्यामुळे प्राज्ञ या निद्रेने बद्ध आहे. तुरीयाच्या ठिकाणी ही बद्धता नाही. तुरीय स्वतंत्र आणि एकरस आहे. याला कोणत्याही उपाधींचा स्पर्शसुद्धा नाही.


श्लोक- स्वप्ननिद्रायुतावाद्यौ प्राज्ञस्त्वस्वप्ननिद्रया ।
न निद्रां नैव च स्वप्नं तुर्ये पश्यन्ति निश्चिताः ॥ १४ ॥


अर्थ : तेजस् आणि विश्व, दोन्हीही स्वप्न आणि निद्रा यांनी व्याप्त असतात. प्राज्ञ मात्र स्वप्नशून्य निद्रेने व्याप्त असतो. ज्यांना आत्मज्ञान झाले आहे ते या तुरीय स्थितीत निद्रा किंवा स्वप्न पाहात नाहीत.

यथार्थ ज्ञान नसणारी किंवा अज्ञानमय असणारी असे निद्रेचे वर्णन आहे. स्वप्न आणि निद्रा यांच्या योगे विश्व आणि तेजस बद्ध आहेत. त्यामुळे त्यांना कार्यकारण बद्ध असे म्हटले आहे. याची चर्चा मागे झाली आहे. प्राज्ञ मात्र शुद्ध निद्रेने युक्त असतो म्हणून तो कारणबद्ध आहे. ज्या लोकांना आत्मज्ञान झाले आहे त्यांच्याजवळ अज्ञान अगर विपरीतज्ञान यांना जागा नसते. त्यामुळे तो कार्यकारणबद्ध नसतो.


श्लोक- अन्यथा गृह्णतः स्वप्नो निद्रातत्त्वमजानतः ।
विपर्यासे तयोः क्षीणे तुरीयं पदमश्नुते ॥ १५ ॥


अर्थ- ग्रहण करणे हे स्वप्न होय. हा एक विपर्यास तर तत्त्वाचे सर्वथैव अज्ञान असणे याला निद्रा म्हणतात, हा दुसरा विपर्यास होय. जेव्हा हे दोन्ही विपर्यास क्षीण होतात किंवा पूर्णतः नाहीसे होतात तेव्हा तुरीयाचे स्थान प्राप्त होते.

दोरीवर सापाचा भास होणे याला विपरीतज्ञान किंवा अन्यथाज्ञान असे म्हणतात. हे अन्यथाज्ञान स्वप्न आणि जागृति या दोन्ही अवस्थांमध्ये होते. जागृति आणि स्वप्न त्या दोन्ही अवस्थांमध्ये निद्रेचा प्रभाव असतो. प्राज्ञामध्ये पूर्ण निद्रेचा प्रभाव असतो. परमार्थतत्त्वाचे ज्याला ज्ञान झाले आहे त्या तुरियामध्ये कार्यकारणात्मक बन्ध असत नाहीत. या तुरीयाचे स्वरूप शुद्ध असल्यास अनुभव ब्रह्मवेत्त्यांना होता आणि आहे.


श्लोक- अनादिमायया सुप्तो यदा जीवः प्रबुध्यते ।
अजमनिद्रमस्वप्नमद्वैतं बुध्यते तदा ॥ १६ ॥


अर्थ- अनादि मायेमुळे निद्रिस्त झालेला जीव जेव्हा जागा होतो तेव्हा निद्रा न घेणारे अगर स्वप्न न पाहणारे अद्वैतपण त्याच्या अनुभवाला येते.

मी म्हणजे देह आणि या देहाचा पसारा म्हणजे माझे घर, पत्नी, मुलेबाळे वगैरे इतकेच नव्हे तर या सर्वांच्यामुळे मी सुखी अगर दुःखी आहे असे वाटणे ही माया होय. या मायेचा प्रवेश जागृती आणि स्वप्न या दोन्हींमध्ये आहे. या मायेमुळे मनुष्य बाह्यतः निद्रिस्त असतो. एखाद्या सत्पुरुषामुळे मायेने निद्रिस्त झालेला मनुष्य जागा होऊ शकतो. अशी जाग जेव्हा त्याला येते तेव्हा त्याला स्वतःच्या पसाऱ्याचे खरे स्वरूप ज्ञात होते. ज्याला मी माझा देह म्हणून म्हणत होतो तोदेखील माझा नाही. इतकेच काय पण, तो कोणाचा आहे याबद्द्ल देखील निश्चित असे काही सांगता येत नाही. ज्ञानेश्वरमहाराजांनी या स्थितीवर व्यक्त केलेला अभिप्राय अभ्यसनीय आहे.

देह तंव पांचाचें जालें । हे कर्माच्या गुणी गुंथले ।
भंवतसे चाकी सूदले । जन्ममृत्यूचा ॥ २ ॥
हे काळानळाच्या कुंडी । घातली लोणियाची उंडी ।
माशी पांखु पाखडी । तंव हे सरे ॥ ३ ॥
हे विपायें आगी पडे । तरी भस्म होऊनि उडे ।
जाहलें श्वाना वरपडें । तरी ते विष्टा ॥ ४ ॥
या चुके दोनी काजा । तरी होय कृमीचा पुंजा ।
हा परिणामु कपिध्वजा । कश्मलु गा ॥ ५ ॥
या देहाची हे दिशा । आणि आत्मा तो येथ ऐसा ।
नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणे ॥ ज्ञाने १३-११०६

हा देह पंच महाभूतांचा आहे आणि तो कर्माच्या दोराने गुंफलेला असून जन्ममृत्यूच्या चक्रावर फिरत आहे. कालरूपी अग्नीच्या तोंडात तो लोण्याचा गोळा घातलेला आहे. माशीला आपला पंख फडफडविण्यास जेवढा वेळ लागतो तेवढ्यात हा नाश पावतो. हा अग्नीत पडला तर त्याचे भस्म होऊन तो उडून जातो. कुत्र्याच्या तावडीत सापडला तर त्याची विष्ठा होते आणि या दोहोंतून तो वाचला तर त्यात किड्यांची रास होते. अशी या देहाची अवस्था आहे. त्यामध्ये असणारा आत्मा मात्र अनादी, नित्य, सिद्ध आणि निरंतर आहे.

अशा देहाचे ममत्व वाटून आत्म्याला विसरणे किंवा आत्म्याचे ज्ञान नसणे ही माया होय. माया या शब्दाचा अर्थ अंतर, अडथळा असा केला तर तो वावगा होणार नाही. कारण भगवंत आणि भक्त यांच्यामध्ये विविध असत्य वस्तूंचा अडथळा निर्माण करून दोघांमधील अंतर वाढविणारी अवस्था म्हणजे माया आहे. ही अवस्था अनादी आहे. यामध्ये स्वप्न तेजस् आणि प्राज्ञ या सर्वांचा समावेश आहे. म्हणून त्याला अविद्या माया असे म्हटले आहे. तुरीय ही अवस्था मात्र या सर्वांच्या पलीकडची असून तिला मायेच्या स्पशनि बद्ध केलेले नाही, याचे ज्ञान साधकाला केवळ गुरुकृपेनेच होते.


श्लोक- प्रपंचो यदि विद्येत निवर्तेत न संशयः ।
मायामात्रमिदं द्वैतमद्वैतं परमार्थतः ॥ १७ ॥


अर्थ - संसार खरोखर असेलच तर तो नाहीसा होईल यात शंका नाही. कारण हे सर्व द्वैत मायाच आहे. परमार्थात सर्व अद्वैतच आहे.

दोरीवर सर्पाचा भास होणे यामध्ये सर्प वस्तुतः त्या ठिकाणी नाही. आहे ती दोरी आहे. सर्प आहे असा भ्रम नाहीसा होणे म्हणजे सर्प नाहीसा होणे असे नव्हे. सर्प अज्ञान आणि कल्पनेतून झालेला आहे. त्याप्रमाणे प्रपंच मुळातच नाही. ती एक भ्रांती आहे. दोरीच्या ठिकाणी कल्पनेतून निर्माण केलेला सर्प विवेकाने नाहीसा होतो असे म्हणता येत नाही. सर्पाचे अस्तित्व ज्याप्रमाणे असत्य आहे त्याप्रमाणे त्याची निवृत्ती होणे हे देखील असत्यच आहे. त्याप्रमाणे मुळातच प्रपंच असता तर त्याची निवृत्ती ही सत्य क्रिया झाली असती. सर्वत्र अद्वैताचे साम्राज्य असता प्रपंच आणि परमार्थाचे द्वैत निर्माणच कसे होईल ? अद्वैतच सर्व काळी नित्य स्वरूपात नांदते असा या श्लोकाचा अभिप्राय आहे.


श्लोक- विकल्पो विनिवर्तेत कल्पितो यदि केनचित् ।
उपदेशादयं वादो ज्ञाते द्वैतं न विद्यते ॥ १८ ॥


अर्थ- विकल्प मनात आणला असेल तर तो नाहीसा झाला पाहिजे. केवळ ज्ञानासाठी हा वाद निर्माण करण्यात आला आहे. ज्ञान झाल्यावर द्वैताचे अस्तित्व राहत नाही.

कोणत्यातरी कल्पनेने मनात निर्माण होणारा विकल्प हे नाहीसा होतो. अर्थात केवळ वादासाठी किंवा ज्ञानासाठी निर्माण केलेली ही स्थिती आहे. गुरु, शिष्य, उपदेश वगैरे भेद निर्माण केले असतील तर त्यांचा शेवट होतो. अर्थात ज्ञानाने कोणतेही भेद उरत नाहीत. एका दिव्याने दुसरा दीप लावावा की, त्यांचे तेज एकच होते. त्यामध्ये द्वैताचा भाग शिल्लक राहत नाही. या उक्तीप्रमाणे या श्लोकात एक पारमार्थिक सुभाषित आहे. ज्ञाते द्वैतं न विद्यते । ज्ञान झाले असता भेदाभेद नाहीसे होतात.


मंत्र- सोऽयमात्माऽध्यक्षरमोंकारोऽधिमात्रं पादा मात्राः ।
मात्राश्च पादा अकार उकारो मकार इति ॥ ८ ॥


अर्थ- हा आत्मा अक्षर किंवा अविनाशी वस्तूंवर सत्ता चालविणारा आहे. ॐ कार हा न मापता येणारा असून मापन करण्यायोग्य सर्व वस्तूंचा तो नियामक आहे. या आत्म्याचे पाद म्हणजेच ॐ काराच्या मात्रा आणि ॐ काराच्या मात्रा म्हणजेच आत्म्याचे पाद होत. अ, उ आणि म्‌ या ॐ काराच्या मात्रा होत.

ॐ काराचे विश्व, तेजस्, प्राज्ञ असे तीन आणि चवथा तुरीया नावाचा अत्यंत महत्त्वाचा पाद यांचे वर्णन झाले. हे पाद तसे पाहिले तर पारमार्थिक अवस्थांचे एक अत्यंत सुन्दर आणि अनुभवजन्य असे दर्शन आहे. परंतु ज्या वेळी एक अक्षर म्हणून त्याचा विचार केला जातो तेव्हा त्याच्या पादांची प्रापंचिक किंवा सामान्यांना ज्ञात होईल अशी अवस्था कोणती याचे उत्तर या मंत्रात आहे. ॐ कार आणि आत्मा यांची एकरूपता दर्शविण्यासाठी ह्या मंत्राचा अवतार आहे. ॐ काराच्या अ, उ आणि म् अशा तीन मात्रा आहेत याचा उल्लेख उपरोक्त मंत्रांत आहे. हा ॐ कार सर्व वस्तूंवर नियंत्रण ठेवतो. त्याचे व्यावहारिक मापन करता येते. कारण ते अज्ञानजन्य आहे. परंतु पारमार्थिक मापन मात्र अतीव सूक्ष्म आहे. ह्या सूक्ष्माचे स्थान प्रत्येक वस्तूमध्ये असल्याने वस्तूचे मापन करता येते पण ॐ काराचे मापन मात्र करता येत नाही. कारण आत्म्याप्रमाणे तो देखील अमर्याद आहे.


मंत्र- जागरितस्थानो वैश्वानरोऽकारः प्रथमा मात्राऽऽप्तेरदिमत्त्वाद्वा ऽ आप्नोति
ह वै सर्वान्कामानादिश्च भवति य एवं वेद ॥ ९ ॥


अर्थ - जागरित स्थानी वास्तव्य करणारा वैश्वानर विश्व किंवा 'अ' ही ॐ काराची पहिली मात्रा होय. विश्वाप्रमाणे 'अ'हा सर्वव्यापक आहे. त्यामुळे विश्वाचे दर्शन सर्वप्रथम होते. तसेच 'अ' हे पहिले अक्षर आहे. विश्व 'अ' कार समजावा. ज्याला विश्व आणि 'अ' हे दोन्ही एकच आहेत असे ज्ञान होते त्याच्या सर्व मनकामना पूर्ण होऊन तो सर्वश्रेष्ठ होतो.

आत्म्याचे पाद आणि ॐ काराच्या मात्रा यांचा अतूट संबंध दर्शविण्यासाठी या मंत्राचा उपयोग करण्यात आला आहे. खालील तक्त्यावरून याची चांगली कल्पना येऊ शकेल.


'अ' ही ॐकाराची मात्रा वाणीव्याप्त आहे. "अकारो वै सर्वा वाक् । " ऐ. आ. २.३.१९ असा ऐतरेय आरण्यकाचा स्पष्ट अभिप्राय आहे. भगवंतांनी आपल्या विभूती सांगताना देखील अक्षरणाम् अकरोऽ स्मि । भ. गी. १०-३३ असे म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर भगवंतापासून जी वाणी प्रकट झाली ती 'अ' या मात्रेनेच प्रारंभ होणारी आहे. उदा.

अग्निमीडे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम् । होतारं रत्नधातमम् ॥ ऋग्वेद-१-१-१
अग्न आ याहि वीतये गृणानो हव्यदातये । नि होता सत्सि बर्हिषि ॥ साम-१-१-१
अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ॥ भ. गी. २-११.

'उ' ही ॐ काराची दुसरी मात्रा आहे तर म् ही तिसरी मात्रा आहे. याशिवाय ॐकारामध्ये अशी अर्धमात्रा म्हणून दर्शविली जाते. या मात्रेचा संबंध आत्म्याचा चतुर्थ पाद 'तुरीय' याच्याशी लावला जातो. ॐ काराच्या पहिल्या तीन मात्रा त्या मानाने स्थूल असून अर्धमात्रा मात्र सर्वाथनि पूर्ण व सूक्ष्म आहे. 'तुरीया'चा जो आविष्कार तोच या मात्रेचा आहे. ह्या मात्रा आणि आत्म्याचे पाद यांची एकरुपता कशी साधली आहे याचे हे विवेचन आहे. हाच विषय किंवा वरील कोष्टकात दिलेल्या गोष्टी यांचे स्पष्टीकरण पुढील मंत्रामध्ये करण्यांत आलेले आहे.


मंत्र- स्वप्नस्थानस्तैजस उकारो द्वितीया मात्रा । उत्कर्षादुभयत्वाद्वोत्कर्षति ह ।
वै ज्ञानसंततिं समानश्च भवति । नास्यब्रह्मवित्कुले भवति य एवं वेद ॥ १० ॥


अर्थ - स्वप्नस्थानामध्ये राहणारा तैजस् हा आत्म्याचा पाद म्हणजे ॐ काराची द्वितीय मात्रा 'उ-कार' होय. उत्कृष्ट आणि उभयात्मक असे एकात्मक ज्ञान ज्याला होते तो ज्ञानविस्तार करतो, समान वृत्तीने राहतो आणि त्याच्या कुलात ब्रह्मवेत्ता नाही असा पुरुष जन्म घेत नाही.

स्वप्न हा आत्म्याचा द्वितीय पाद आहे. तैजसाचे ते प्रमुख स्थान. हा तैजस् म्हणजेच ॐ काराची द्वितीय मात्रा होय. 'उ' ही ॐ काराची द्वितीय मात्रा अ या मात्रेपेक्षा श्रेष्ठ मानली जाते. तैजस् हा विश्वापेक्षा श्रेष्ठ आहे. अ आणि म् या दोघांच्या मध्ये 'उ' ही मात्रा आहे. त्यामुळे असे अनुभवास येते की, उ या मात्रेमुळे अ या मात्रेला प्रेरणा प्राप्त होते तर म् या मात्रेला तो साथ न करता तिच्या स्थानाचा उपभोग पूर्णतः घेण्यास उपयुक्त होतो. म्हणजेच म् या मात्रेपासून तो दूर राहतो. या मात्रांचे सूक्ष्म ज्ञान जो पुरुष करून घेतो तो ज्ञानवान झाल्यामुळे त्याच्याकडून आपोआप ज्ञानाचा प्रसार होतो. ज्याला ज्ञान झाले तो नेहमी समबुद्धीने वागतो.

शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः । भ. गी. ५.१८

हा श्रीमत् भगवद्गीतेचा सिद्धान्त या ठिकाणीही स्पष्ट करण्यात आला आहे. ज्याला अशा समबुद्धीचे लेणे लाभले तो स्वतः तर ब्रह्मविद् होतोच, इतकेच नव्हे, तर त्याच्यामुळे त्याच्या जन्मवंश आणि विद्यावंश यांमध्ये निर्माण होणाऱ्या संततीवर जे संस्कार होतात ते त्या संततीच्या पूर्णत्वाला अगर ब्रह्मपदवीला कारण होतात. अशा पुरुषाचे कुल ब्रह्मविदच होते, असा या ठिकाणी श्रुतीने आपला मानस स्पष्ट केला आहे.


मंत्र- सुषुप्तस्थानः प्राज्ञो मकारस्तृतीया मात्रा ।
मितेरपीतेर्वा मिनोति ह वा इदँ सर्वम् ।
अपीतिश्च भवति य एवं वेद ॥ ११ ॥


अर्थ - सुषुप्तिस्थानी असणारा प्राज्ञ म्हणजेच ॐ काराची तृतीय मात्रा म् होय. तो मापन आणि एकत्व करणारा असतो. हे ज्ञान ज्याला होते तो विश्वातील सर्वांचा ज्ञाता होतो आणि सर्वकर्ता म्हणून प्रसिद्ध पावतो.

सुषुप्तस्थानी असणारा आत्म्याचा पाद प्राज्ञ आणि ॐ काराची तृतीय मात्रा म् ही एकरूप होत. विश्व आणि तैजस् यांचे मूल्यमापन करण्याचा प्राज्ञाचा स्वभाव आहे. त्याप्रमाणे मकाराचे स्वरूप आहे. अ आणि उ या मात्रांना एकीभूत करून ॐ काराचे स्वरूप स्पष्ट करण्याचे किंवा ॐ काराच्या प्रापंचिक मर्यादा दाखविण्याचे कार्य म् ही मात्रा करते. या मात्रेचे ज्याला यथार्थ ज्ञान होते त्याला विश्वाच्या पसाऱ्यात असणाऱ्या सर्व वस्तूंची उत्पत्ती, स्थिती आणि लय याबरोबर त्यांचा विनियोग आणि परिणाम यांचेही ज्ञान होते. साधकाच्या दृष्टीने ॐ काराचे ध्यान करून पूर्णत्व कसे प्राप्त करता येते याचे विश्लेषण या मंत्रात आहे.

आठ ते अकरा अशा चार मूळ मंत्रांचे स्पष्टीकरण पू. पा. गौडपादाचार्य यांनी पुढील कारिकांमधून केले आहे.


श्लोक- विश्वस्यात्वविवक्षायामादिसामान्यमुत्कटम् ।
मात्रासंप्रतिपत्तौ स्यादाप्तिसामान्यमेव च ॥ १९ ॥


अर्थ- या मात्रांचे स्वरूप स्वीकारल्यानंतर विश्व हा अकारमात्रात्मक आहे असे म्हणावयाचे असले म्हणजे दोघांमध्ये आदित्व आणि व्यापकत्व हे दोन गुण सामान्य आहेत, दोन्ही ठिकाणी हे गुण आहेत असे अधिक स्पष्टपणे अनुभवास येते. ध्यान हा उपासनेचा एक मार्ग आहे. आत्म्याचे ध्यान करणे अशक्य असल्याने त्या आत्म्याचे प्रतीक म्हणून ॐ काराचे ध्यान करावे असा श्रेष्ठांचा प्रघात आहे. आत्म्यावर ॐ काराचे रूपक केले म्हणजे सर्वप्रथम असणारे विश्व आणि ॐ कारातील पहिली मात्रा 'अ' यांमधील सारखेपणा स्पष्ट होतो. विशेषतः आदित्व आणि व्यापकत्व हे उभयतांचे विशेष गुण लक्षात येतात.


श्लोक- तैजसस्योत्वविज्ञान उत्कर्षो दृश्यते स्फुटम् ।
मात्रासंप्रतिपत्तौ स्यादुभयत्वं तथाविधम् ॥ २० ॥


अर्थ - तैजस् हा ॐ काराची दुसरी म्हणजे 'उ' ही मात्रा आहे. त्या दोघांचे एकीपण आहे. या मात्रांवर कल्पना करून त्या आत्मपाद आहेत असे मानले जाते तेव्हा दोघांची सर्वोत्तमता आणि मध्यस्थ म्हणून असणारा संबंध स्पष्टपणे नजरेस येतो.

तैजस हा द्वितीय आत्मपाद म्हणजेच ॐ काराची 'उ' ही द्वितीय मात्रा होय. कल्पनेच्या द्वारा यांचे ज्ञान करून घेतले म्हणजे दोघांचेही मोठेपण आणि उ या मात्रेचा अ आणि म् या मात्रेशी असलेला माध्यमिक संबंध आणि तेजसाचा विश्व आणि प्राज्ञ यांच्याशी असलेला संबंध समान असल्याचे जाणवते. उपासनेच्या क्षेत्रात 'उ' या मात्रेने तैजसाची उपासना केली असता उत्कर्ष आणि ज्ञान या दोघांचीही प्राप्ती होते.


श्लोक- मकारभावे प्राज्ञस्य मानसामान्यमुत्कटम् ।
मात्रासंप्रतिपत्तौ तु लयसामान्यमेव च ॥ २१ ॥


अर्थ- प्राज्ञाचे मकार कल्पनेने ज्ञान करून घेतले, प्राज्ञ आणि ॐ कारातील तृतीय मात्रा म् ही दोन्ही एकरूपच असल्याचे ज्ञान करून घेतले म्हणजे त्याचे सामान्यत्व आणि लयत्व यांचा प्रकर्षाने अनुभव येतो.

प्राज्ञ ही ॐ काराची तृतीय मात्रा 'म' होय. याप्रमाणे ज्ञानपूर्वक प्राज्ञावर मकाराची प्रस्थापना केली म्हणजे दोन अनुभव येतात. पैकी एक प्रमाण समानत्व आणि दुसरे लयत्व यांचा प्रकर्षाने अनुभव येतो. थोडक्यात म् किंवा प्राज्ञाची उपासना म्हणजे सर्वांच्या अंतर्यामी स्थित असलेल्या आनंदाची जवळीक होय.


श्लोक -त्रिषु धामसु यत्तुल्यं सामान्यं वेत्ति निश्चितः ।
स पूज्यः सर्वभूतानां वन्द्यश्चैव महामुनिः ॥ २२ ॥


अर्थ- तीनही स्थितीत ॐ काराच्या मात्रांच्या क्रमाचे तौलनीय परंतु निश्चित ज्ञान ज्याला होते तो महामुनी होऊन सर्व प्राणिमात्रांना पूज्य आणि वन्दनीय होतो.

आत्म्याची तीन पादस्थाने म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ति आणि ॐ काराच्या अ, उ आणि म् या तीन मात्रा यांमध्ये अनुक्रमे समान गुण आणि समान सामर्थ्य असल्याचे स्पष्ट आहे. याप्रमाणे ज्याला ज्ञान होते तो महान होतो. ध्यानाच्या योगे असा साधक महामुनी पदावर विराजतो. त्याला झालेल्या साक्षात्कारामुळे तो ब्रह्मज्ञ होतो. लोक त्याचा आदर करतात आणि त्याला पूज्य मानून वन्दन करतात.


श्लोक- अकारो नयते विश्वमुकारश्चापि तैजसम् ।
मकारश्च पुनः प्राज्ञं नामान्ने विद्यते गतिः ॥ २३ ॥


अर्थ 'अ' कार हा विश्वाची प्राप्ती होईल अशा मागनि नेतो. उकार तैजसाची प्राप्ती करून देतो आणि मकार प्राज्ञाची प्राप्ती करून देतो. तुरीय अवस्थेमध्ये या मात्रांची गती थांबते.

तीन मात्रांचे फळ वरील श्लोकात एकत्रित करून सांगण्यात आले आहे. मागेही याचा विचार आलेला आहे. मात्राशून्यत्व म्हणून ज्या अवस्थेचा उल्लेख केला जातो त्याला तुरीय असे म्हणतात. प्रत्येक व्यक्तीची इच्छा आणि त्या इच्छेच्या पूर्तीसाठी होणारी धडपड इच्छित फळाची प्राप्ती होताच थांबते. याचाच अर्थ 'न विद्यते गतिः । ' हाच अभिप्राय वरील श्लोकात स्पष्ट करण्यात आला आहे.


मंत्र- अमात्रश्चतुर्थो ऽ व्यवहार्यः प्रपञ्चोपशमः ।
शिवो द्वैत एवमोंकार आत्मैव संविशति ।
आत्मनात्मानं य एवं वेद ॥ १२ ॥


मात्राशून्यता हा ॐ काराचा चवथा पाद आहे. हा इंद्रियगोचर नाही. हा पाद प्रपंच किंवा संसाराची गतिमानता नाहीशी करणारा आहे. म्हणूनच शिवरूप, अद्वैत आहे. याप्रमाणे आत्मा ॐ कारमय आहे असे ज्ञान ज्याला होते तो ॐ काररूप आत्म्यामध्ये प्रवेश करतो.

ह्या उपनिषदातील हा शेवटचा मंत्र आहे. ॐ काराच्या तीन मात्रा किंवा आत्म्याच्या तीन पादांचे स्वरूप स्पष्ट केल्यावर चतुर्थ पादाचे यथार्थ वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. मागील तीन पाद गोचर आहेत. विश्व, तेजस् आणि प्राज्ञ हे एकापेक्षा एक सूक्ष्मतर आहेत. परंतु आत्म्याचा चतुर्थ पाद सूक्ष्मतिसूक्ष्म आहे. अर्थातच तो इंद्रियगोचर नाही. अन्य पाद गोचर असल्याचे अनुभवसिद्ध आहे. हा गोचर भाग पूर्णपणे विरून गेला तरच आत्म्याच्या चतुर्थ पादापर्यंत जाता येते. त्यानंतर त्या ठिकाणी मिळणारा अक्षय आनंद हे न सांगता येणारे सत्य आहे. अशा आनंदामध्ये द्वैताचा अभाव निर्माण होतो. सर्वत्र आपलेपण आकाराला येते. ज्ञानेशांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे -

हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण पैं जाहला ॥ ज्ञाने. १२-२१३.

हा अतिशय महान अनुभव आहे. ह्याच अवस्थेला तुरीय, सर्वोत्तम अथवा शिव असे संबोधण्यात येते. शिव म्हणजे कल्याणमय अवस्था. ह्या अवस्थेपेक्षा अन्य कोणत्याही अवस्थेला शिव ही संज्ञा नाही. ज्या ठिकाणी सर्व सुखाचा अंतर्भाव होतो, दुखा:चा लवलेशही राहात नाही अशा अवस्थेला कल्याणमय अवस्था म्हणतात. ही अवस्था प्राप्त होणे म्हणजे आत्मरूपाचा अनुभव घेणे. ॐ कारामध्ये एकरूप होणे किंवा आत्मानुभवामुळे अद्वैत आनंदामध्ये लीन होणे होय. आत्मा ॐ कारमय आहे किंवा ॐ म्हणजेच आत्मा याचे ज्ञान होणे हीच या उपनिषदाची सर्वोत्तम स्थिती आहे म्हणून संबोधण्यात येते. ज्ञानेशांच्या, 'जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोपी । ' ज्ञाने ६.८२ ह्या अभिप्रायामध्ये या उपनिषदाचे सारसर्वस्व आहे.


श्लोक- ओंकारं पादशो विद्यात्पादा मात्रा न संशयः ।
ओंकारं पादशो ज्ञात्वा न किंचिदपि चिन्तयेत् ॥ २४ ॥


अर्थ- आत्म्याचा प्रत्येक पाद आणि ॐ काराचा प्रत्येक चरण घेऊन ॐ काराचे ज्ञान करून घ्यावे. आत्म्याचे पाद ह्याच ॐ काराच्या मात्रा होत यात संशय नाही. ॐ काराचे आत्मपादात्मक ज्ञान झाल्यावर अन्य कोणत्याही चिंतनाची आवश्यकता नाही.

आत्म्याचे पाद आणि ॐ काराच्या मात्रा यांचे साधर्म्य आहे त्यांचे विवेचन मागे आलेच आहे. ॐ कार हा आत्मा आहे आणि आत्मा हा ॐ कार आहे याचे सम्यक ज्ञान झाले म्हणजे ॐ काराखेरीज अन्य चिंतनाला विषयच राहू शकत नाही. अर्थात या ज्ञानाने परिपूर्ण झालेल्या माणसाला अन्य गोष्टींचे प्रयोजन नसते. त्यामुळे स्वाभाविकपणे अन्य विषय त्याच्या चिंतनाच्या कक्षेत येत नाहीत.


श्लोक- युञ्जीत प्रणवे चेतः प्रणवो ब्रह्म निर्भयम् ।
प्रणवे नित्ययुक्तस्य न भयं विद्यते क्वचित् ॥ २५ ॥


अर्थ - ॐ कारामध्ये अंतःकरणाची एकरूपता करावी. कारण ॐ कार हे निर्भय ब्रह्म होय. म्हणून प्रणवाशी जो एकरूप झाला त्याला कोणत्याही गोष्टीचे केव्हाही भय राहत नाही.

ॐ काराच्या साहाय्याने साधना कशी करावी त्याचा बोध ज्याप्रमाणे या श्लोकात आहे त्याप्रमाणे त्या साधनेचे फळही या ठिकाणी सांगितलेले आहे. ॐ काराचे ध्यान करताना प्रथम ॐ कार मिटल्या डोळ्यांनी हृदयाच्या ठिकाणी पाहावा आणि त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावे. असे लक्ष केंद्रित झाले असता अन्य सर्व इंद्रियांचे व्यापार या एकाच ठिकाणी केंद्रित होतात. त्यामुळे बाह्येंद्रियांच्या बरोबर अंतरिंद्रियांचीही धाव थांबते. या अवस्थेलाच प्रणव समाधी असे म्हणतात. ॐ कार हा निर्भय आहे. भय नाहीसा करणारा आहे. निद्रा हीसुध्दा एक प्रकारची समाधीच आहे. गाढ निद्रेच्या अधीन असता जवळ सापासारखी भयप्रद वस्तू असली तरी ज्याप्रमाणे त्याचा झोपलेल्या माणसावर परिणाम होत नाही त्याप्रमाणे प्रणव समाधीमध्ये संसारासारख्या द्वैत स्थितीचे भय कदापि होत नाही. म्हणून म्हटले जाते की, विद्वान्नबिभेति कतश्चन ॥


श्लोक- प्रणवो ह्यपरं ब्रह्म प्रणवश्च परः स्मृतः ॥
अपूर्वोऽनन्तरो ऽ बाह्योऽनपरः प्रणवोऽव्ययः ॥ २६ ॥


अर्थ- प्रणव हा अपर किंवा परमात्मा आहे असे म्हटले जाते. कारण हा प्रणव कारणशून्य, कार्यशून्य, भेदशून्य, अद्वितीय, एकरस आणि अव्यय आहे.

प्रणव हा पर आणि अपर ब्रह्म आहे. ज्याला त्याला त्याच्या ज्ञानाप्रमाणे ॐ कार गोचर होतो किंवा त्याचे रूप काय आहे ते समजते. परंतु ज्या पुरुषाला आत्मज्ञान झाले आहे त्याचे ॐ काराच्या मात्रादिकांचे किंवा आत्म्याच्या पादादिकांचे ज्ञान पूर्ण नाहीसे होऊन ते केवळ आत्मसाक्षात्कारामध्ये समाविष्ट होते. या आत्म्याला निर्माण होण्यास कोणतेही कारण नाही आणि त्यामुळे हा कारणशून्य आणि कार्यशून्य आहे. ॐ कार हा साक्षी आहे. लोहचुंबकामुळे लोहाला गती प्राप्त होऊन लोह कार्यमग्न झालेले दिसते. वस्तुतः लोहचुंबकामुळे किंवा साक्षीमुळे हे झाले. त्याप्रमाणे ॐ कारामुळे गतिमानता किंवा कार्यतत्परता अशांमध्ये प्रस्थापित झालेली दिसते. ॐ कार हा भेदशून्य, एकमेव, अद्वितीय आणि अव्यय असल्याचे श्रुतीचे म्हणणे आहे. या ॐ काराचा एकाला जो अनुभव प्राप्त होतो तोच अनुभव त्याच अवस्थेत अन्यांनाही मिळतो म्हणून त्यास एकरस अशी संज्ञा आहे.


श्लोक- सर्वस्य प्रणवो ह्यादिर्मध्यमन्तस्तथैव च ॥
एवं हि प्रणवं ज्ञात्वा व्यश्नुते तदनन्तरम् ॥ २७ ॥


अर्थ- प्रणव हा सर्वांचा आदी, मध्य आणि अन्त आहे. याप्रमाणे ॐ काराचे ज्ञान झालेला पुरुष साधननिरपेक्ष होऊन ब्रह्मरूपांत प्रवेश करतो.

दृश्य, अदृश्य आणि भासमान होणाऱ्या विश्वाच्या जन्माच्या पूर्वी हा ॐ कार होता. मध्यम अवस्थेत तो आहे आणि अंती देखील आहेच. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही ह्या ॐ काराच्या अधीन आहेत. त्याच्याच सत्तेने या विश्वाची घडामोड होते. सूर्याच्या अस्तित्वामुळे मृगजळ दिसते त्याप्रमाणे ॐ कारामुळे ही स्थिती प्राप्त होते, असे ॐ काराबद्दल यथार्थ ज्ञान प्राप्त झाले म्हणजे आभासात्मक विश्वाची ओळख पटते. स्वाभाविकच असा ज्ञानी पुरुष साधनाच्या पलीकडे गेलेला असतो. साधनाच्या पलीकडे केवळ ब्रह्म असल्याने अशा ज्ञानी पुरुषाला या ब्रह्मामध्येच प्रवेश करावा लागतो.


श्लोक- प्रणवं हीश्वरं विद्यात्सर्वस्य हृदि संस्थितम् ।
सर्वव्यापिनमोंकारं मत्वा धीरो न शोचति ॥ २८ ॥


अर्थ- ॐ कारच ईश्वर आहे असे समजावे. तो सर्वांच्या अंतर्यामी आहे. तो सर्वांना व्यापून राहिलेला आहे. असे ज्ञान झालेला मनुष्य शोकशून्य होतो.

ब्रह्मदेवापासून अत्यंत सूक्ष्म जंतूपर्यंत जे जीव आहेत या सर्वांच्या अंतर्यामी जी सत्ता आहे तिला ईश्वर म्हणतात. हा ईश्वर म्हणजेच हा ॐ कार होय. प्रत्येक प्राणिमात्राला जन्मतःच काही सत्तांचा लाभ झालेला असतो. पाहणे, ऐकणे, बोलणे वगैरे सर्व क्रिया विशिष्ट सत्तेचा विलास आहे. ज्याप्रमाणे ही सत्ता प्राणिमात्राच्या अंतर्भागात आहे त्याप्रमाणे बाहेरही ह्या सत्तेचे विस्तृत स्वरूप आहे. श्वसन ही क्रिया ज्या सत्तेने घडते त्याच क्रियेचे महान स्वरूप आकाश आहे. थोडक्यात, अतिसूक्ष्म किंवा अतिविशाल ही सर्व रूपे एकाच सत्तेची किंवा ईश्वराची आहेत. अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त झालेला पुरुष नेहमी आनंदी असतो. त्याच्याजवळ दुःख, शोक वगैरेंना मुळीच थारा नसतो. 'तरति शोकात्मविद् ॥ ' असे श्रुतीचे वचन आहे.
>

श्लोक- अमात्रोऽनन्तमात्रश्च द्वैतस्योपशमः शिवः ।
ओंकारो विदितो येन स मुनिर्नेतरो जनः ॥ २९ ॥


अर्थ- ॐ कार हा मात्राशून्य आहे. ज्याचे मापन करता येणार नाही असा आहे. तो द्वैताचा निरास करणारा आणि कल्याणकारक आहे. ज्याला ॐ काराचे यथार्थ ज्ञान झाले तोच मुनी होय. इतर मात्र मुनी या संज्ञेस पात्र नाहीत.

ॐ काराचा तुरीयपाद हा मात्राशून्य आहे. म्हणजे त्या ठिकाणी अ, उ, म् या मात्रा नाहीत. त्याचप्रमाणे विश्वाचे स्थूलत्व, तैजसाचे सूक्ष्मत्व आणि प्राज्ञाचे अतिसूक्ष्मत्व याचे अस्तित्व नाही. इतकेच काय, प्राण हा सुद्धा या ठिकाणी लय पावतो. त्याचाही परिणाम शून्य होतो. ज्या ठिकाणी या मात्रा आहेत त्या ठिकाणी विविधता आहे. त्या मात्रांच्या परिणामाचे मापन करता येते. तो परिणाम लहान, मोठा, सूक्ष्म, सूक्ष्मतर अगर सूक्ष्मतम असल्याचे अनुभवाला येते. अर्थात त्यामुळे सुख अगर दुःख याचे स्वरूप या ठिकाणी गोचर होते. श्रीमत् भगवद्गीतेतील

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्णसुखदुःखदा ।
आगमापायिनो ऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ २-१४ ॥

या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केले आहे ते या संबंधात विचारात घेण्याजोगे आहे.
जया विषयांच्या ठायी । एकनिष्ठता कहीं नाहीं ।
तेथ दुःख आणि काही । सुखही दिसे ॥ १३ ॥
देखे शब्दाची व्याप्ती । निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजती । श्रवणद्वारें ॥ १४ ॥
मृदु आणि कठिण । हे स्पर्शाचे दोन्ही गुण ।
जे वपूचेनि संगे कारण । संतोषखेदां ॥ १५ ॥
भ्यासुर आणि सुरेख । हे रूपाचे स्वरूप देख ।
जें उपजवी सुखदुःख । नेत्रद्वारें ॥ १६ ॥
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।
जो घ्राणसंगें विषादु । तोषु देता ॥ ज्ञाने. २-११७
ज्ञानेश्वरांनी मात्रांचे केलेले मूल्यमापन अत्यंत प्रबोधक आहे. अर्थात ॐ काराच्या चतुर्थ मात्रेला ती नसल्याने किंवा ती केवळ मानल्याने यांचा स्पर्शच होत नाही. त्यामुळे या मात्रेला अमात्र असे संबोधण्यात आले आहे. ज्या ठिकाणी या मात्रांचा प्रभाव नाही त्या ठिकाणी केवळ मंगलत्व, अद्वैत आणि आनंद यांशिवाय अन्य काहीही असू शकणार नाही. ज्याला या सर्व गोष्टींचा अनुभव प्राप्त झाला तो मुनी होय असे श्रुतीचे प्रतिपादन आहे.

याप्रमाणे पू. पा. गौडपादाचार्यांनी लिहिलेल्या 'आगम' नामक प्रकरणाचे हे स्पष्टीकरण करण्यात आले आहे. ॐ कार ध्यानगम्य अवस्थेतून गोचर होतो आणि त्याच ध्यानगम्य अवस्थेचे रूपांतर ॐकारमय होऊन ध्यानसमाधी अवस्थेमध्ये लीन होऊन सर्वत्र शून्याचा अनुभव प्राप्त होतो, हे या प्रकरणाचे थोडक्यात सारसर्वस्व आहे.
प्रकरण दुसरें


वैतथ्य


एखाद्या गोष्टींचे पूर्ण ज्ञान झाले की, त्या वस्तूबद्दल असणारा भ्रम नाहीसा होतो. या भ्रमामुळे मूळची वस्तू एक असता तिचे विपरीत रूप किंवा विपरीत अवस्था अनुभवाला येतात. परंतु ते सर्व खरे नसते, भ्रममूलक असते. वितथ म्हणजे खोटे. वितथभाव म्हणजे वैतथ्य-मिथ्यात्व. हे मिथ्यात्व कसे प्रत्ययाला येते, याचे समग्र वर्णन या प्रकरणात आहे. या प्रकरणात सदतीस कारिका आहेत.


श्लोक-वैतथ्यं सर्वभावानां स्वप्न आहुर्मनीषिणः ।
अन्तःस्थानात्तु भावानां संवृतत्वेन हेतुना ॥ १ ॥


अर्थ- स्वप्नामध्ये सर्व पदार्थांना खोटेपण प्राप्त होते, असे अनुभवी विद्वानांचे म्हणणे आहे. कारण स्वप्नाच्या वेळी सर्व पदार्थ अंतःकरणात गूढपणे झाकलेले असतात.

'ज्ञाते द्वैतं न विद्यते । '(१-१८) ह्या प्रतिपादनाच्या दुसऱ्या बाजू कशा असतात यांचा विचार या श्लोकात स्पष्ट करण्यात आला आहे. अज्ञानम् यदथो न्यथा । जे ज्ञान नव्हे ते अज्ञान. ज्ञानाने संशयनिवृत्ति होते तर अज्ञानात संशयाचे प्राबल्य असते. ज्या गोष्टी असत्य आहेत त्या अज्ञानाने सत्य आहेत, असे भासते आणि त्याप्रमाणे आचारही केला जातो. ह्या व्यर्थपणाची चर्चा या श्लोकापासून पू. पा. गौडपादाचार्यांनी केली आहे.

मनुष्याला स्वप्ने पडतात. त्यामध्ये तो विविध दृश्ये पाहतो. परंतु स्वप्नांतील हे पदार्थ पूर्णपणे असत्य असतात. एखादा राजा कंगाल अवस्थेत भीक मागतो किंवा एखादा कंगाल गृहस्थ राजा झाल्याचे पाहतो. परंतु जाग येताच हे सर्व नष्ट होते. त्याचप्रमाणे पर्वत, अरण्य, समुद्र यांसारख्या गोष्टी स्वप्नात पाहिल्या जातात. खरे पाहिले तर मानवी देहात या गोष्टी सामावणे सर्वथा अशक्य आहे. त्यामुळे त्या शरीरात नाहीत हे स्पष्ट होते. यावरून स्वप्ने व्यर्थ आहेत. त्यामध्ये सत्याचा अंशही नाही. ज्ञानी लोकांचा हा अनुभव आहे. स्वप्नात जी दृश्ये पाहिली जातात त्या दृश्यांचे ग्रहण मन करते. ते अत्यंत सूक्ष्मपणे अंतरात साठविते आणि तेच दृश्य अन्य सर्व इंद्रियांचे व्यापार थांबले म्हणजे मन साकारते (जाग्रदर्शनानिवृत्तस्य जाग्रद्वदन्तःशरीरे यद्दर्शनम् स्वप्नो नाम । शंकराचार्य प्रश्नोपनिषद् ४-१ भाष्य) अर्थातच हे अस्तित्व असत्य असल्याचे नंतर लक्षात येते.

[[ तस्य वा एतस्य पुरुषस्य दे एव स्थाने भवतः । इदं च परलोकं च । सन्ध्यं तृतीयं स्वप्नस्थानं । तस्मिन् सन्ध्ये स्थाने तिष्ठनेते उभे स्थाने पश्यति ॥ इदं च परलोकस्थानं च ॥ बृह. ४.३.९.

या पुरुषाची दोन स्थाने आहेत. एक हा लोक आणि दुसरा परलोक. या दोघांच्या संधिस्थानाला स्वप्नस्थान असे म्हणतात. या संधिस्थानी उभा राहून हा पुरुष दोन्ही स्थाने पाहतो. ]]


श्लोक-अदीर्घत्वाच्च कालस्य गत्वा देशान्न पश्यति ।
प्रतिबुद्धश्च वै सर्वस्तस्मिन्देशे न विद्यते ॥ २ ॥


अर्थ- अत्यंत थोड्या वेळात लांब असलेल्या देशात जाऊन तेथील पदार्थ पाहणे अशक्य असते. जागा झाल्यावर तो ज्या देशात गेला होता त्या ठिकाणी असत नाही. स्वप्नातील पदार्थ संकुचित होऊन शरीराच्या नाडीप्रदेशात वास्तव्य करतात. अतिशय मोठे पदार्थ अतिशय सूक्ष्म जागेत मावणे अशक्य आहे. एखाद्या निजलेल्या पुरुषाला आपण परदेशात कोठेतरी असून तेथील सुखाचा अनुभव घेत असतो असे स्वप्न पडते. परंतु स्वप्नातून ज्या वेळी तो जागा होतो तेव्हा तो त्या प्रदेशात नसतो तर आपल्या शय्येवरच असतो. जर तो खरोखरीच अन्य देशात गेला असता तर जागा झाल्यावर देखील तो त्याच ठिकाणी असता. यामुळे असे दिसून येईल की, परदेशात जाणे, तेथील भोग घेणे वगैरे स्वप्नातील सर्व क्रिया व्यर्थ आहेत. त्यांना सत्यत्व नाही. कारण स्वप्नस्थ पुरुष किंवा स्वप्नद्रष्टा कोठे जातही नाही आणि येतही नाही हे सत्य आहे.


श्लोक-अभावश्च रथादीनां श्रूयते न्यायपूर्वकम् ।
वैतथ्यं तेन हि प्राप्तं स्वप्न आहुः प्रकाशितम् ॥ ३ ॥


अर्थ- स्वप्नातील रथादि वस्तूंचा खरे पाहिले तर अभाव असतो असे श्रुतीने न्यायबुद्धीने सिद्ध केले आहे. शरीरात असणाऱ्या वासनादिकांच्या कल्पनेने स्वप्नस्थ पदार्थांना प्राप्त झालेले खोटेपण श्रुतीनेही प्रकाशित केलेले आहे असे ज्ञाते लोक म्हणतात.

बृहदारण्यकामध्ये आलेल्या वचनांचा आधार घेऊन श्रुतीने देखील स्वप्नांतील मिथ्यत्व सिद्ध केले आहे.

न तत्र रथा न रथयोगा न पन्थानो भवन्ति ।
अथ रथानस्थयोगान्यथः सृजते न तत्रानन्दा मुदः प्रमुदो भवन्ति ।
अथानन्दान् मुदः प्रमुदः सृजते ।

त्या ठिकाणी रथ, रथाला जोडावयाचे अश्व अथवा रथमार्ग असत नाही. पण हा रथ अश्व आणि मार्ग निर्माण करतो. तिथे आनंद, हर्ष, प्रहर्ष नाहीत, पण हा निर्माण करतो.

न तत्र वेशान्ताः पुष्करिण्यः स्त्रवन्त्यो भवन्ति ।
अथ वेशान्तान् पुष्करिणी: स्त्रवन्तीः सृजते । स हि कर्ता ॥ बृ. ४.३.१०.

त्या ठिकाणी विहिरी, तलाव अथवा नद्या नसतात, पण हा पुरुष ते निर्माण करतो. हाच कर्ता होय.

थोडक्यात, अत्यंत मोठ्या वस्तू अत्यंत सूक्ष्म वासनांमध्ये असणे सर्वथा अशक्य आहे हे उपरोक्त प्रमाणाने सिद्ध झालेले आहे. स्वप्नगत पदाथांना प्रकाशित करणारा आत्मा आहे. तो स्वयंप्रकाशी आहे. म्हणून स्वप्नस्थ पदार्थ असत्य आहेत असे श्रुतीचे म्हणणे आहे.


श्लोक-अन्तःस्थानात्तु भेदानां तस्माज्जागरिते स्मृतम् ।
यथा तत्र तथा स्वप्ने संवृतत्वेन भिद्यते ॥ ४ ॥


अर्थ- जागृतीत दिसणारे सर्व पदार्थ दृश्य असल्याने मिथ्या आहेत. जे दिसते ते सर्व असत्य असते. अंतःशरीरात गुप्तपणे व राहणारे दृश्य होणारे सर्व पदार्थ असत्य आहेत.

आचार्यांच्या सिद्धान्ताप्रमाणे संपूर्ण जगत् मिथ्या आहे. अर्थातच त्या जगातात असणारे आणि दिसणारे पदार्थ देखील मिथ्या आहेत हे ओघानेच आले. हेच पदार्थ जागृतीमध्ये पाहिले जातात आणि त्याच पदार्थाचे दर्शन स्वप्नात होते. जो पदार्थ पाहिला नाही अगर ज्या पदार्थाला चिंतनाच्या योगे शरीरात आश्रय दिला नाही तो पदार्थ स्वप्नामध्ये गोचर होत नाही. स्वप्न हे अंत:करणाने कपिललेल्या वस्तूंचे भांडार आहे. म्हणून त्या ठिकाणी असा मुद्दाम उल्लेख केला आहे की, जागृतीत दृश्य असलेले पदार्थ सर्वथा मिथ्या आहेत. स्वप्नाची व्याप्ती किती मोठी आहे याचे स्पष्टीकरण मागे आलेले आहे. त्यामुळे असे म्हणता येईल- स्वप्नाने व्यापलेले सर्व पदार्थ हे असत्य आहेत.


श्लोक- स्वप्नजागरितस्थाने होकमाहुर्मनीषिणः ।
भेदानां हि समत्वेन प्रसिद्धेनैव हेतना ॥ ५ ॥


अर्थ- स्वप्नस्थान आणि जागरितस्थान ही दोन्ही वेगळी आहेत असे विद्वान लोक म्हणतात, परंतु भेदांचे मनः कल्पित स्वरूप एकच आहे. त्याप्रमाणे, ही दोन्ही स्थाने एकच आहेत.

जागृतीत ज्या पदार्थांचे ज्ञान होते किंवा स्वप्नामध्ये ज्या पदार्थांचे ज्ञान होते ते ज्ञान केवळ इंद्रियांच्या अस्तित्वामुळे होते. वस्तुतः उपाधिमय जीव त्यांचा ग्राहक असतो. दोघांच्याही बाबतीत तो ग्राहक समान आहे. म्हणून स्वप्नस्थान आणि जागरितस्थान ही भिन्न नाहीत. ती तत्त्वतः गुणने एकरूपद आहेत.


श्लोक-आदावन्ते च यन्नास्ति वर्तमानाय तथा ।
वितथैः सदृशाः सन्तो वितथा इव लक्षिताः ॥ ६ ॥


अर्थ- जे प्रारंभी नसते आणि शेवटीही नसते, जे जन्मते आणि मरते, जे उत्पन्न होते आणि नाहीसे होते ते वतीश काळीसुद्धा नसते.

जागृतीत ज्या विविध पदार्थाचा अनुभव येता ले सर्व मिथ्या आहेत, हे सांगण्यासाठीच केवळ या कारिकेचा प्रस्ताव आहे. ज्यांना आदि- अंत नाही, उत्पत्ति-लय नाही, जे पदार्थ जन्म घेतात आणि नाहीसे होतात हे सर्व पदार्थ मिथ्या आहेत. ज्ञानेश्वरमहाराजांनी हा सिद्धान्त अत्यंत समर्पकपणे मांडला आहे.

अर्जुना ऐसेनि पाही । आद्यन्तु ययासी नाहीं ।
माजी स्थिती आभासे काही । परी टवाळ ते गा ॥ ३७ ॥
ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रीही करि न रिगे ।
तरी माजी दिसे वाउगे । मृगांबु जैसे ॥ ३८ ॥
तैसा आद्यंती कोर नाही । आणि साचही नोहे कहीं ।
परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा ॥ ३९ ॥
स्वप्नीही मानिले लटिकें । तरी निर्वाहो का एकासारिखे ।
तेवी आभासु हा क्षणिके । रीतीचा गा ॥ ज्ञाने. १५-२४३

ह्याला आदी आणि अंत नाही. मध्ये मात्र तो असल्यासारखा भासतो, पण त्याचे ते भासणे मिथ्या आहे. पर्वतापासून उगम पावलेले नाही आणि समुद्रात मिळालेलेही नाही. तरीही मध्येच दिसणारे मृगजळ मिथ्या नाही का ? आरंभी आणि अंती खरोखरीच नाही. परंतु मध्ये मात्र खोटेपणाची नवलाई अशी आहे की, मूळचा नसताना तो आहे असे भासते. त्याप्रमाणे स्वप्नांतील खोटे पदार्थ वस्तुतः नाहीत तरीही ते खरे मानले तरी ते फार काळ टिकतात का ?

याप्रमाणे या स्वप्नाची स्थिती आहे. जाग आली म्हणजे त्या स्वप्नांतील पदार्थाचे अशाश्वत स्वरूप आणि खोटेपणा लक्षात येतो. ज्ञानेश्वरमहाराजांनी हाच सिद्धान्त पंधराव्या अध्यायातील संसारवृक्षाच्या अवस्थेचे वर्णन करताना मुद्दाम मांडला आहे. या संसारवृक्षाचे अनित्यत्व ज्याप्रमाणे ज्ञानी लोकांच्या प्रत्ययाला येते त्याप्रमाणे या विश्वाची स्थिती आहे असे श्रृती मुद्दाम सांगत आहे. पाण्यावर लाटा उत्पन्न होतात, त्या काही काळ माणसाला पाहता येतात. लाटा म्हणजेच पाणी, असा त्यांचा समज होतो तोच त्या लाटा पाण्यातच लय पावतात आणि पाहणाऱ्याच्या हे लक्षात येते की, लाटा म्हणजे पाणी आहे. लाटा हा पाण्यावर होणारा आभास आहे.


श्लोक-सप्रयोजनता तेषां स्वप्ने विप्रतिपद्यते ।
तस्मादाद्यन्तवत्त्वेन मिथ्यैव खलु ते स्मृताः ॥ ७ ॥


अर्थ- जागृतीमधील सर्व दृश्यांचा साध्य, हेतू स्वप्नस्थितीत विरुद्ध दिशेला जातो. त्यामध्ये फरक होतो. उत्पत्ती आणि लय ह्या स्वाभाविक अवस्था असणारे हे दृश्य निश्चितपणे मिथ्या आहे असे समजावे.

भोजन केल्याचे अगर तहान भागविण्यासाठी काही पेय प्याल्याचे आपण स्वप्नात पाहतो. परंतु जागे होताच मला भूक लागली आहे, तहान लागली आहे असे म्हणतो. याचा अर्थ असा की, ज्या गोष्टी जागृतीमध्ये घडतात त्या स्वप्नामध्ये विपरीत परिणामकारक होतात तर स्वप्नामध्ये पाहिलेल्या अगर अनुभवलेल्या क्रिया आणि त्यांचे परिणाम जागृतीत विफल ठरतात. यामुळे या दोन्ही अवस्थामध्ये घडणाऱ्या क्रिया मिथ्या आहेत. पूर्वसूरींचा हा अनुभव असल्याचे ठामपणे सांगितले आहे हे जरी खरे असले तरी प्रस्तुतच्या काळात सामान्य माणसाला सुद्धा हाच अनुभव येतो. त्यामुळे असे निदान करण्यात आले आहे की, जागृती आणि स्वप्न यांच्यामधील क्रिया केवळ विपरीत आहेत. त्यामुळे त्यांचे मिथ्यापण निश्चित आहे.


श्लोक- अपूर्व स्थानिधर्मो हि यथा स्वर्गनिवासिनाम् ।
तानयं प्रेक्षते गत्वा यथैवेह सुशिक्षितः ॥ ८ ॥


अर्थ- स्थानिधर्माचा प्रभाव दिसतो त्याप्रमाणे स्वर्गस्थ लोकांचे स्थानिधर्म अपूर्व असतात. ज्याप्रमाणे सुशिक्षित पुरुष जागृतीत चमत्कार पाहतो त्याप्रमाणे स्वप्नातील पुरुष स्वप्नस्थितीमधील चमत्कार पाहतो.

स्वप्न आणि जागृती या दोन्ही अवस्थांमध्ये दिसणारे पदार्थ समस्वभावी आहेत. स्वप्नांतील भाव ज्याप्रमाणे आहेत त्याप्रमाणे जागृतीमधील भावदेखील असत्य आहेत. जागृतीत जे पदार्थ आपण पाहतो तेच आपण स्वप्नात पाहतो असे नाही. कित्येक वेळी आपणास चार हात आहेत, क्षीरसागरात विष्णूच्या जवळ आपण आहोत असे पाहतो. अर्थात हे सर्व अपूर्व आणि चमत्कारिक आहे. अशी अनेक दृश्ये स्वप्नात दिसतात. परंतु जागृत अवस्थेत असा चमत्कार कधी घडत नाही. म्हणून दोन्ही स्थिती समभावी आहेत असे वाटत नाही अशी शंका येण्याची शक्यता आहे. परंतु स्वप्नामध्ये जे पाहिले जाते ते स्वयंभू कधीच नसते. स्वप्नस्थ पुरुषाच्या द्रष्टत्वाचा हा परिणाम आहे. परंतु हे दृश्य मूलभूत नाही. एखादे ठिकाणी एखाद्याला माहीत असेल तर स्वप्नामध्ये तो त्या ठिकाण जातो आणि तेथील अपूर्वता पाहतो. ही स्थिती अपूर्व असली तरी असत्य आहे.


श्लोक-स्वप्नवृत्तावपि त्वन्तश्चेतसा कल्पितं त्वसत्
बहिश्चेतोगृहीतं सद्वृष्टं वैतथ्यमेतयोः ॥ ९ ॥


अर्थ- स्वप्नामध्ये दिसणारे दृश्य अंत:करणाने केलेल्या कल्पनेचा परिणाम आहे. अर्थात ते असत्य आहे. बायेंद्रियांच्या मदतीने चित्ताने ग्रहण केलेल्या दृश्यास सत् असे म्हणतात. परंतु दोन्हीही गोष्टींमध्ये असत्यत्वच आहे.

स्वप्नस्थानामध्ये पाहिलेल्या दृश्यांचे अपूर्वत्व मनुष्याने आपल्या विचाराने निर्माण केलेले असते. म्हणून ती दृश्ये असत्य आहेत. कारण संकल्पाबरोबर ते दृश्य आपणास तसेच स्वप्नात अगदी क्षणार्धात दिसेल असे मुळीच संभवत नाही. आपली ज्ञानेंद्रिये बाह्य वस्तूंचे ग्रहण करतात. ही बाह्य दृश्ये स्वप्नात सत्य असल्यासारखी भासतात. परंतु ते अंतःकरणातून उत्पन्न झालेले असल्याने असत् हा त्यांचा स्थायीभाव आहे. थोडक्यात, स्वप्नांतील दृश्य बाह्य असो किंवा अंतर्गत असो- ते अंतःकरणाच्या संकल्पसामर्थ्यावरच अवलंबून असते. ते स्वयंभू कधीच नसते. म्हणून ते असत्य आहे असा श्रुतींचा अभिप्राय आहे.


श्लोक-जाग्रदवृत्तावपि त्वन्तश्चेतसा कल्पितं त्वसत्
बहिश्चेतो गृहीतं सद्युक्तं वैतथ्यमेतयोः ॥ १० ॥


अर्थ - जागृतीत असताना सुद्धा केवळ अंत:करणाने कल्पिलेले असत् आणि बहिर्मनाने ग्रहण केलेले ते सत्, असा आपण निष्कर्ष काढतो. परंतु ही दोन्हीही ग्रहणे मिथ्या आहेत हेच खरे.

व्यावहारिक जगात ज्याला आपण केवळ कल्पना असे म्हणतो ती निराधार असते. त्यामधून जो व्यवहार कल्पिलेला जातो त्याला आपण सत्य-व्यवहार असे कधीच मानत नाही. मूळशून्य मनाच्या व्यापारांना कल्पना असे म्हणतात.


श्लोक-उभयोरपि वैतथ्यं भेदानां स्थानयोर्यदि ।
क एतान्बुध्यते भेदान्को वै तेषां विकल्पकः ॥ ११ ॥


अर्थ - दोन्ही अवस्थामध्ये दिसणाऱ्या दृश्यांना जर मिथ्यात्व प्राप्त होते किंवा दोन्ही स्थितीतील पदार्थ मिथ्या आहेत असे जर मानले तर अशी शंका येते की, हे पदार्थांचे भेद कोणाला समजतात ? ते कल्पित आहेत असे म्हटले तर त्यांचा निर्माणकर्ता कोण ?

या श्लोकामध्ये पू. गौडपादाचार्यांनी एक मूलभूत शंका निर्माण केली आहे. जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्थांतील पदार्थ मिथ्या आहेत असे मानले, किंवा त्याबरोबर इंद्रिये किंवा अंतःकरणदेखील असत्य आहे असे समजले तर हे स्पष्ट करणे आवश्यक आहे, की असत् पदार्थसुद्धा कोणीतरी निर्माण केले आहेत आणि त्या पदार्थांचा जाणकार देखील आहे. प्रगाढ निद्रेमध्ये विषयज्ञान नसते. केवळ एवढ्याच कारणासाठी हे विषयच नाहीत किंवा विषयज्ञान मिथ्या आहे असा मुद्दा निर्माण होत नाही. भेदात्मक पदार्थ कल्पित, पदार्थज्ञानही कल्पित असेल तर सर्व ज्ञान आणि श्रेयदेखील कल्पितच होय. म्हणजेच मिथ्या आहे. या शंकेचे उत्तर पुढे देण्यात आलेले आहे.


श्लोक-कल्पयत्यात्मनाssत्मानमात्मा देवः स्वमायया ।
स एव बुध्यते भेदानिति वेदान्तनिश्चयः ॥ १२ ॥


अर्थ- स्वयंप्रकाशी आत्मा आपल्याच मायेने स्वतःचे भिन्न प्रकारे स्वरूप निर्माण करतो. आत्म्याला या सर्व भेदांचे ज्ञान आहे, असे वेदान्ताचे निश्चित सांगणे आहे.

दोरीवर सपाचा आरोप केला जातो तो केवळ कल्पनेतून निर्माण झालेला असतो. त्याप्रमाणे परमेश्वर स्वतःच्या मायेने आपल्या स्वरूपाच्या कल्पनांतून विविध वस्तू निर्माण करतो. हे सर्व भेद मानवाला जाणता येत नाहीत. कारण ते अनंत आहेत. परंतु ज्या परमेश्वराने हे भेद निर्माण केले तो मात्र त्यांचा खरा ज्ञाता आहे. वेदान्ताने ह्याबाबत निश्चितपणे सांगितले आहे.


श्लोक-विकरोत्यपरान्भावान्तश्चित्ते व्यवस्थितान्
नियतांश्च बहिश्चित्त एवं कल्पयते प्रभुः ॥ १३ ॥


अर्थ- वासनारूपाने अंतःकरणांत वास करणाऱ्या सर्व व्यावहारिक पदार्थांना अनेक रूपे देणारा एकमेव परमेश्वर आहे. याप्रमाणेच बाहेरच्या चित्ताला गोचर होणारे सर्व पदार्थ तोच होतो. या प्रकारे त्या परमेश्वराचे हे कल्पनेतून निर्माण झालेले कार्य आहे.

परमेश्वर संकल्पाने या सृष्टीची उत्पत्ती करतो. शब्दादी विषय आणि पापपुण्यात्मक शास्त्रीय फळे परमेश्वराच्या संकल्पाचे दृश्य रूप आहे. परमेश्वराच्या अंत:करणात हे सर्व पदार्थ सूक्ष्म रूपाने राहातात. संकल्पाच्या साह्याने तो त्यांना बाहेरच्या जगात आणतो. एकोहं बहुस्याम । ' हा भगवंताचा संकल्प आहे. त्याप्रमाणे बाह्य पदार्थांचे व्यवस्थापन आणि त्यानंतर त्यांच्या साह्याने प्राप्त होणारी पाप-पुण्यादी फळे तोच निर्माण करतो. असे तो का करतो याचे उत्तर वेदान्त देतो. ते असे की, एकाकी न रमते । ' या क्रियेलाच ईश्वरेच्छा असे म्हणतात.


श्लोक-चित्तकाला हि ये न्तस्तु द्वयकालाश्च ये बहिः ।
कल्पिता एव ते सर्वे विशेषो नान्यहेतुकः ॥ १४ ॥


अर्थ- अंत:करणात संकल्पिलेले पदार्थ चित्तकालाने मर्यादित झालेले असतात. तर बाहेरील पदार्थ दोन भिन्न कालांनी बद्ध झालेले असतात. हे बाह्य कल्पित आणि अंतःकल्पित पदार्थ असतात. त्यामध्ये जो कालभेद आहे त्याचा अन्य कोणताही हेतू नाही.

संकल्प अंतःकरणात होतो. या संकल्पातून निर्माण होणाऱ्या पदार्थाची कालमर्यादा देखील संकल्पानेच मर्यादित केलेली असते, त्यामुळे तो असत्य असण्याचा संभव आहे. परंतु बाह्य पदार्थांची स्थिती तशी नाही. त्यांची कालमर्यादा एकमेकांवर अवलंबून असते, अशी एक शंका या ठिकाणी येते. या शंकेचे निरसन करण्याच्या निमित्ताने गौडपादाचार्य असे स्पष्ट करतात की, संकल्पाची कालमर्यादा संकल्पाने बद्ध असो किंवा बाह्य पदार्थाची कालमर्यादा बाहेरच्या पदार्थांच्या सानीध्यावर अवलंबून असो, ह्या दोन्ही क्रिया अन्तःकरणाशिवाय होऊ शकत नाहीत. अंत:करण नसेल तर या कालकल्पना किंवा संकल्प संभवत नाही. कारण ही कार्ये अंतःकरणाची आहेत. थोक्याडत, स्वप्नातील वस्तूंच्या कालमर्यादा ज्याप्रमाणे मिथ्या आहेत, त्याप्रमाणे जागृतीतील कालमर्यादा देखील अंतःकरण कल्पित असल्याने मिथ्या आहेत. हे सर्व भेद प्रापंचिक आहेत. परमार्थामध्ये या भेदांना जागा नाही. उदाहरणार्थ - दुःखाने व्याप्त झालेल्या माणसाला प्रत्येक क्षण फार मोठा वाटतो तर त्याच्या उलट स्थिती अंतःकरण सुखमय असताना होते. सुखामध्ये वर्षांचा काळ सुध्दा क्षणासारखा वाटतो. हीच स्थिती स्थालाबाबत आहे. थोडक्यात, हे सर्व भेद अंतःकरणसंकल्पित असून असत्य आहे.


श्लोक-अव्यक्ता एव ये न्तस्तु स्फुटा एव च ये बहिः ॥
कल्पिता एव ते सर्वे विशेषस्त्विन्द्रियान्तरे ॥ १५ ॥


अर्थ- अंत:करणाने कल्पिलेले पदार्थ अस्पष्ट किंवा असत्य असतात तर बाह्य विश्वात असणारे पदार्थ स्पष्टपणे गोचर होणारे असतात. हे दोन्ही प्रकारचे पदार्थ कल्पित आहेत. यामध्ये दिसणारा भेद केवळ इंद्रियामुळे होतो. कारण बाह्य पदार्थाचे ज्ञान इंद्रियामार्फत होते.

अंतःकरणामध्ये असणाऱ्या वस्तू मनामध्ये असलेल्या वासनेच्या स्वभावामुळे निर्माण झालेल्या असल्यामुळे त्या अगोचर असतात. परंतु इंद्रियांच्या अस्तित्वामुळे निर्माण झालेल्या वस्तू स्पष्टपणे गोचर होतात. ह्या स्थितीमुळे यांमध्ये भिन्नत्व दिसते. हा भेद मनाने कल्पिलेला असतो. अव्यक्त हा पदार्थाचा धर्म असला तरी त्यामुळे पदार्थांना सत्यत्व मात्र प्राप्त होत नाही. प्रपंचामध्ये हे भेद स्पष्ट होतात. आचार्यांनी यालाच माया असे म्हटले आहे. परमार्थात मायेचा अंश नाही त्याप्रमाणे मायेचा विलासही नाही. आपण जोपर्यंत स्वप्नस्थितीत असतो तोपर्यंत स्वप्नातील पदार्थ किंवा दृश्ये आपणास सत्य वाटतात. व्यवहारात सुद्धा ज्ञान आणि कर्म यामुळे व्यवहार जागृतीत सत्य वाटतात. स्वप्नातून जागृतीत आल्यावर ज्याप्रमाणे स्वप्नातील सर्व दृश्ये असत्य असल्याचे प्रत्ययाला येते त्याचप्रमाणे प्रापंचिक व्यवहार पारमार्थिक अवस्थेमध्ये असत्य ठरतात. थोडक्यात, दोन्ही प्रकारचे व्यवहार कालबद्ध, कल्पित आणि असत्य आहेत.


श्लोक-जीवं कल्पयते पूर्वं ततो भावान्पृथग्विधान् ।
बाह्यानाध्यात्मिकांश्चैव यथाविद्यस्तथास्मृतिः ॥ १६ ॥


अर्थ- सर्वात प्रथम जीवांचे कल्पित अस्तित्व परमात्मा निर्माण करतो आणि त्यानंतर बाह्य अगर अंतर्वस्तूंची किंवा अशाच अन्य वस्तूंची तो निर्मिती करतो. ज्याप्रमाणे जीवाला ज्ञान असते त्याप्रमाणे त्यांची स्मृती असते.

बाह्य आणि आंतर अगर आध्यात्मिक वस्तूंमध्ये कार्यकारणभावाचा संबंध कल्पनेनेच निश्चित केलेला असतो. याचे स्पष्टीकरण या श्लोकात करण्यात आले आहे. सर्वप्रथम ईश्वर जीवाच्या स्वरूपाची कल्पना करतो. हेतू आणि फलाची आशा हे जीवाचे स्वरूप आहे. मी आणि माझे हे जीवाचे स्वरूप आहे. कारण कोणत्याही हेतूने फलासाठी कर्माचा आचार करणे हे जीवाचे ज्ञानरूप होय. ईश्वराचे स्वरूप हेतुरूप आणि फलात्मक नाही. अशा शुद्ध रूपावर जीवरूपाची कल्पना निर्माण होते. शुद्ध आणि भय न वाटणाऱ्या दोरीवर, अशुद्ध आणि भयप्रद सर्पाची भावना ही मनोनिर्मित आहे. त्याप्रमाणे परमेश्वराने कल्पनेने जीवाचे स्वरूप सिद्ध केले. या कल्पनेला हेतू तरी काय, असे पाहू गेले म्हणजे असे दिसून येते की, कल्पनेतून साकारलेला जीव सर्व प्रकारच्या कल्पनांवर आपले वर्चस्व निर्माण करतो. ज्याप्रमाणे ज्याच्या जवळ ज्ञान असेल त्याप्रमाणे जीवाची स्मरणशक्ती सिद्ध होते. थोडक्यात असे की, ईश्वराच्या शुद्धसत्त्व स्वरूपावर जीवाच्या कल्पनेचा आरोप करून आपणास बाहेरून काही साध्य करावयाचे आहे त्यासाठी आपणास कर्म करण्याची आवश्यकता आहे, असे या जीवाचे कल्पित स्वरूप तयार होते. कल्पित फळाच्या प्राप्तीसाठी जीव आपल्याच ठिकाणी कर्माची कल्पना करतो. ही कल्पना ज्याला जसा अनुभव असेल त्याप्रमाणे स्मृतीच्या साहाय्याने स्पष्ट होते. मी दुःखी आहे, अज्ञानी आहे या मूळच्या कल्पनेला आणखी फाटे फुटतात आणि स्मृतीच्या साहाय्याने या कल्पना विविध स्वरूपाच्या होतात. त्यातच विशिष्ट कर्म मी केले पाहिजे असे स्वामित्व या ठिकाणी निर्माण होते.


श्लोक- अनिश्चिता यथा रज्जुरन्धकारे विकल्पिता ।
सर्पधारादिभिर्भावस्तद्वदात्मा विकल्पितः ॥ १७ ।


अर्थ - अंधःकार असल्यामुळे निश्चित स्वरूप नसलेल्या दोरीवर सापाचा आरोप आपण मनाने करतो. त्याप्रमाणे आत्मस्वरूपावर अनेक प्रकारे आरोप अज्ञानी जीव करीत असतो.

किंचित अंधार आहे. अशा वेळी समोर पडलेल्या दोरीवर आपण विविध आरोप करतो. ती वेडीवाकडी पडली असेल तर पाण्याचा प्रवाह आहे असा भास होतो. ती सरळ रेषेत असेल तर काठीचा भास होतो आणि नागमोडी पडली असेल तर सर्पाचा भास होतो. परंतु हा अंधःकार नसेल अगर दूर झाला तर आपण दोरीवर केलेले आरोप सर्वथा मिथ्या असल्याचा अनुभव आपणास येतो. त्याप्रमाणे शुद्ध स्वरूप परमात्म्यावर केवळ अज्ञानाने मात्र आपण हा जीव आहे, प्राण आहे, मन आहे, स्थूल शरीरी आहे असे अनेक आरोप करतो. परंतु आत्मस्वरूपाचा निश्चय झालेला असेल तर अज्ञानातून निर्माण केलेले आरोप मिथ्या असल्याचे आपल्या प्रत्ययाला येते. हा श्रुतिनिर्णय आहे.


श्लोक- निश्चितायां यथा रज्ज्वां विकल्पो विनिवर्तते ।
रज्जुरेवेति चाद्वैतं तद्वदात्मविनिश्चयः ॥ १८ ॥


अर्थ- ही दोरीच आहे असें निश्चित समजले म्हणजे दोरीवर सर्व आरोप खोटे असल्याचे जाणवते. ते आरोप संपतात. त्याप्रमाणे आत्मा सत्य आहे किंवा ब्रह्म सत्य आहे असा सत्य निश्चय झाला म्हणजे आत्म्यावर केले जाणारे सर्व खोटे आरोप नाहीसे होतात.

या श्लोकाचा अर्थ वरील श्लोकाच्या अर्थानुसार आहे. आत्मस्वरूपाचा निश्चय झाला म्हणजे केवळ कल्पनेने केलेले सर्व आरोप आपोआपच निवृत्त होतात.आत्मा ज्ञानरूप, अनादि- अनंत आहे, कार्य अगर कारणाचा स्पर्श त्याला होत नाही असे श्रुतीने प्रतिपादन केलेले ज्ञान सत्य असल्याचे जाणवते.

[[ स आत्माजरो मरो मतो भयो । बृ. ४.४.२५ - आत्मैवेदं सर्वमिति ॥ छां.७.२५.२ ]]


श्लोक- प्राणादिभिरनन्तैश्च भावैरेतैर्विकल्पितः ।
मायैषा तस्य देवस्य यया संमोहितः स्वयम् ॥ १९ ॥


अर्थ- प्राणादी अनेक वस्तूंचे आरोप या आत्म्यावर होत असतात. ही त्या ज्ञानमय परमेश्वाची माया आहे. या मायेने स्वतः आत्माही मोहित होतो.

आत्म्यावर केले जाणारे आरोप ही परमात्म्याचीच लीला आहे. एखादा जादूगार स्वतःच विविध दृश्ये निर्माण करून मूळ स्थिती झाकून टाकतो. समोर दिसणारी स्थिती सत्यच आहे असे मानून आपण स्वतः मोहात पडतो. श्रीमत् भगवद्गीतेत भगवंत म्हणतात त्याप्रमाणे - मम माया दुरत्यया ॥ भ.गी.७-१४ = माझी माया तरून जाणे अवघड आहे. भगवंतच ही माया निर्माण करतो आणि त्या ठिकाणी अज्ञानाचे साम्राज्य पसरतो.


श्लोक-प्राण इति प्राणविदो भूतानीति च तद्विदः ।
गुणा इति गुणविदस्तत्त्वानीति च तद्विदः ॥ २० ॥


अर्थ- प्राणाचे ज्ञान असणारे आत्मा हा प्राण आहे असे म्हणतात. पंचमहाभूतांचे ज्ञान असणारे या आत्म्यावर पंचमहाभूतांचा आरोप करतात. सत्त्व, रज, तम या त्रिगुणांचे ज्ञान असणारे तो आत्मा गुणात्मक आहे असा आरोप करतात, तर तत्ववेत्ते तो तत्त्वमय असल्याचे म्हणतात.


श्लोक- पादा इति पादविदो विषया इति तद्विदः ।
लोका इति लोकविदो देवा इति च तद्विदः ॥ २१ ॥


अर्थ - ॐ काराच्या पादांचे ज्ञान असणारे आत्मा विविध अंशांचा आहे असे म्हणतात. विषयज्ञ लोक तो विषयरूप आहे असे म्हणतात, त्रैलोक्याचे ज्ञान असणारे आत्मा त्रैलोक्यरूप आहे असे म्हणतात तर देवतांचे ज्ञान असणारे तो देव आहे असे म्हणतात.


श्लोक- वेदा इति वेदविदो यज्ञा इति च तद्विदः ।
भोक्तेति च भोक्तविदो भोज्यमिति च तद्विदः ॥ २२ ॥


अर्थ - वेद जाणणारे लोक म्हणतात, तो आत्मा म्हणजे वेद आहे. यज्ञनिपुण लोक म्हणतात, तो यज्ञ आहे. भोक्ते लोक म्हणतात, तो भोक्ता आहे. भोजननिष्णात लोक म्हणतात, तो भोज्य आहे.


श्लोक-सूक्ष्म इति सूक्ष्मविदः स्थूल इति च तद्विदः ।
मूर्त इति मूर्तविदो मूर्त इति च तद्विदः ॥ २३ ॥


अर्थ- अणु-परमाणूचे ज्ञाते आत्मा हा अणप्रमाण आहे असे मानतात तर वेद न मानणारे काही नास्तिक आत्मा स्थूल असल्याचे प्रतिपादन करतात. आकाराचे ज्ञान असणारे (मूर्तिपूजक) तो चक्रधारी भगवान विष्णु किंवा त्रिशूलधारी शिव आहे म्हणतात. शून्यवादी तो आत्मा म्हणजे सर्व शून्याकार आहे असे मानतात.


श्लोक-काल इति कालविदो दिश इति च तद्विदः ।
वादा इति वादविदो भुवनानीति तद्विदः ॥ २४ ॥


अर्थ- कालवेत्ते- ज्योतिषी आत्मा हा काल आहे असे मानतात. दिग्ज्ञान असणारे त्या आत्म्याला दिश - म्हणजे दिशा आहे असे समजतात. वादविवादनिपुण लोक आत्म्याला वाद म्हणून संबोधितात, तर चवदाही भुवनांचे* ज्ञान असणारे आत्म्याला 'भुवन' म्हणतात.
[[* चवदा भुवने - भू भुवः सुव महः जनः तपः सत्यम् हे सप्तस्वर्ग आणि अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल, असे सप्त पाताळ मिळून चवदा भुवनें होतात. ]]


श्लोक- मन इति मनोविदो बुद्धिरिति च तद्विदः ।
चित्तमिति चित्तविदो धर्माधर्मों च तद्विदः ॥ २५ ॥


अर्थ- मनोवैज्ञानिक मन म्हणजेच आत्मा असे समजतात. काही बुद्धिवादी बुद्धी हाच आत्मा असे मानतात. काही चित्तविद् चित्त हाच आत्मा आहे म्हणून सांगतात, तर धर्मविद् धर्म आणि अधर्म हा आत्माच आहे असे प्रतिपादन करतात.


श्लोक- पञ्चविंशक इत्येके षड्विश इति चापरे ।
एकत्रिंशक इत्याहुरनन्त इति चापरे ॥ २६ ॥


अर्थ- ही सृष्टी पंचवीस तत्त्वांची* आहे असे मानून सव्विसावे तत्त्व परमेश्वर आहे असे समजतात. ती एकतीस तत्त्वांची आहे असे काहींचे मत आहे तर सृष्टी ही अनंत तत्त्वांची आहे असेही काही लोक म्हणतात.
[[*१. सांख्य · पंचमहाभूते, पाच ज्ञानेंद्रिये, पाच कौंद्रिये, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य, मन ही पंचवीस तत्त्वे, ]]


श्लोक-लोकॉंल्लोकविदः प्राहुराश्रमा इति तद्विदः ।
स्त्रीपुंनपुंसक लैङ्गाः परापरमथापरे ॥ २७ ॥


अर्थ- लोकांना संतोष देणारे लोकविद - लौकिक म्हणून हाकारतात, आश्रमधर्माचे पालन करणारे आश्रमधर्म हाच परमार्थ असे मानतात, तर व्याकरणकोविद म्हणतात, ही सृष्टी पुल्लिग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशा तीन लिगांनी बद्ध झालेल्या पदार्थांची आहे, म्हणून लिंगविचार हाच परमविचार आहे असे सांगतात. काही श्रेष्ठ आणि कनिष्ठ, अशी दोन ब्रह्मे असून ती ज्ञात करून घेतली पाहिजेत असे म्हणतात.


श्लोक-सृष्टिरिति सृष्टिविदो लय इति च तद्विदः ।
स्थितिरिति स्थितिविदः सर्वे चेह तु सर्वदा ॥ २८ ॥


अर्थ- सृष्टीच्या उत्पत्तीचे ज्ञान असलेले लोक उत्पत्ती हेच मूळ स्वरूप आहे असे म्हणतात तर प्रलयाचे ज्ञान असणारे प्रलय हे सत्यस्वरूप आहे असे म्हणतात तर स्थितीचा अभ्यास करणारे स्थिती हाच परमविचार आहे असे मानतात.. सर्वजण आपल्या कल्पनेने आत्म्यावर विविध आरोप करतात. प्राण हा बीजभूत आहे येथपासून(श्लोक २०) तो उपरोक्त श्लोकापर्यंत (श्लोक २८) जे ज्ञानी आहेत ते आपापल्या कल्पनाप्रमाणे चिंतन करून परमात्म्यावर अनेक प्रकारचे आरोप कसे करतात त्याचे स्पष्टीकरण येथे करण्यात आले आहे. यामध्ये काही पारमार्थिक विचारांचे आरोप तर काही लौकिक किंवा प्रापंचिक विचारातून केलेले आरोप आहेत. अर्थात हे सर्व आरोप मिथ्या आहेत. अंधारात दिसलेल्या दोरीवर ज्याप्रमाणे विविध आरोप केले जातात त्याप्रमाणे अज्ञान तिमिरान्धस्य असे हे आरोप आहेत यांत शंकाच नाही. कारण मूलतः आत्मा कल्पनाशून्य असल्याने कल्पनेने त्या ठिकाणी प्रवेश करता येणार नाही. या श्लोकांतील विषय केवळ शब्दाथनि ध्यानी येणारा असल्याने त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही. या आरोपमालिकेचे कारण काय याचा विचार पुढच्या श्लोकात करण्यात आला आहे.


श्लोक-यं भावं दर्शयेद्यस्य तं भावं स तु पश्यति ।
तं चावति स भूत्वा सौ तद्ग्रहः सुमपैति तम् ॥ २९ ॥


अर्थ- ज्यांनी जे तत्त्व अनुभविले ते तत्त्व आत्मरूपच आहे असे त्यांना निश्चितपणे वाटते. याप्रमाणे विशिष्ट तत्त्वचिंतकांचे संरक्षण ते तत्त्वच करते. त्या तत्वाचा निश्चय असल्याने ते तत्त्व म्हणजेच आत्मरूप असे म्हणून त्याच तत्त्वाकडे तो ओढ घेतो.

आपल्या आचार्यांनी ज्याप्रमाणे तत्त्वबोध केला असेल त्याप्रमाणे त्या तत्त्वाचा अभ्यास आणि चिंतन चालू असते. आचार्यांच्या उपदेशावर विश्वास असल्याने हे तत्त्व म्हणजेच परमतत्त्व किंवा आत्मरूप असा निश्चय होतो. ते तत्व म्हणजे आत्मा आणि आत्मा म्हणजेच मी, असा दृढ विश्वास निर्माण होतो. या ठिकाणी गौडपादाचार्य एक महान अनुभव सांगतात. ज्या तत्त्वाशी जो निगडित झाला ते तत्त्व त्याचे सर्व प्रकारचे संरक्षण करते. असे म्हणण्याचे कारण असे की, असा तत्त्वचिंतक स्वतःच्या निश्चयामुळे अन्य कोणत्याही चांगल्या अगर वाईट मार्गाचा अवलंब करीत नाही. ते तत्त्व म्हणजेच आत्मा या आनंदात तो सदैव मग्न असतो.


श्लोक- एतैरेषो पृथग्भावैः पृथगेवेति लक्षितः ।
एवं यो वेद तत्त्वेन कल्पयेत्सो विशङ्कितः ॥ ३० ॥


अर्थ पूर्वी वर्णन केलेल्या पदार्थापासून आत्मतत्त्व सर्वथा भिन्न आहे असे ज्ञान झाले म्हणजे त्याने निःशंकपणे कोणतीही कल्पना करावी.

पूर्वी (श्लोक २० ते २८) सांगितलेले सर्व पदार्थ आणि तत्त्वे मुळातच आत्म्याहून भिन्न नाहीत. तरीही अज्ञानाने आम्ही आमच्या संकुचित वृत्तीमुळे त्या विस्तृत आत्मतत्त्वालासुद्धा संकुचित बनवतो आणि या संकुचित वृत्तीने त्या तत्त्वाचा आरोप आम्ही आत्म्यावर करतो. आत्म्याची सत्ता न समजल्याने तो भिन्न स्वरूपाचा असल्याचे बोलले जाते. वस्तुतः ते तसे नाही.

इदं सर्वं यदयमात्मा । बृ. २.४.६ - हे श्रुतिवचन अनुभवसिद्ध आहे. याप्रमाणे अनुभव प्राप्त झाला म्हणजे भित्रत्या पूर्णपणे विराम पावते. निभ्रान्त अंत:करणाने वेदप्रणीत तत्त्वांचा अभ्यास केला असता सामान्य साधकालासुद्धा असाच अनुभव येईल.


श्लोक-स्वप्नमाये यथा दृष्टे गन्धर्वनगरं यथा ।
तथा विश्वमिदं दृष्टं वेदान्तेषु विचक्षणैः ॥ ३१ ॥


अर्थ- जादूगाराने निर्माण केलेले नगर पाहून ज्ञानी माणसाला ज्याप्रमाणे ते असत्य असल्याची जाणीव होते त्याप्रमाणे स्वप्न आणि मायेच्या आधाराने पाहिल्यास सर्व वस्तू अज्ञानी माणसास सत्य स्वरूपात आणि ज्ञानी माणसास असत् रूपाने दिसतात. त्याप्रमाणे वेदान्तनिपुणांनासुद्धा हे सर्व दृश्य असत् असल्याचे ज्ञान होते.

ब्रह्म सत्य असून द्वैत असत्य असल्याचे प्रतिपादन केल्यानंतर द्वैताचे पिध्यापण वेदान्ताप्रमाणे सिद्ध करण्यात येत आहे. उपरोक्त श्लोकात सांगितल्याप्रमाणे स्वप्न असो अगर माया असो, दोन्ही असत्यच असताना स्वप्न अथवा माया सत्य आहे असे म्हणणारे अज्ञानी लोक आहेत. परंतु ज्ञानवान पुरुष मात्र असे म्हणत नाहीत. जादूगाराने निर्माण केलेले आणि विविध व्यवहारांनी गजबजलेले शहर पाहाता पाहाता नाहीसे होते. त्याप्रमाणे स्वप्न आणि माया यांचे स्वरूप आहे. खालील काही वचने या दृष्टीने अभ्यसनीय आहेत.

नेह नानास्ति किंचन । कठ- २.१ . ११ आत्म्यात विविधता नाही.
इन्द्रो मायाभिः । बृ. २.५.१९ इंद्र आपल्यापरी बहुरूपधारी होतो.
आत्मैवेदमग्र आसीत् । ऐ. १.१.१ सर्व प्रथम आत्माच मात्र होता.
ब्रह्मैवेदमग्र आसीत् । बृ. १.४.१० पूर्वी हे सर्व ब्रह्मच होते.
द्वितीयाद्वै भयं भवति । बृ. १.४.२ द्वैतामध्ये भीती असते.
न तु तद् द्वितीयमस्ति । बृ. ४.३.२३ परंतु द्वैत असे नाही.
यत्र त्वस्य सर्वमात्मैवाभूत् ॥ बृ. ४.५.१५ त्याला सर्वत्र आत्म्याचाच अनुभव आला.


श्लोक-न निरोधो न चोत्पत्तिर्न बद्धो न च साधकः ।
न मुमुक्षुर्न वै मुक्त इत्येषा परमार्थता ॥ ३२ ॥


अर्थ- निरोध नाही, उत्पत्ती नाही, बद्ध नाही, साधक नाही, मुमुक्षु नाही, मुक्त नाही अशी मनःस्थिती असणे ही सर्वोत्तम परमार्थ अवस्था होय.

द्वैतभाव हा मिथ्या आहे. परमार्थतः आत्मा एकच आहे असा निश्चय झाला म्हणजे आणखी एका गोष्टीचा निश्चय होतो तो हा की, सर्व लौकिक आणि अलौकिक व्यवहार अविद्येच्या पोटी निर्माण होतात. असे झाले म्हणजे द्वैताचे कारणच राहत नाही. या श्लोकातील काही पदांचे अर्थ स्पष्ट करणे आवश्यक आहे.
निरोध- प्रलय- सर्वांचे अस्तित्व संपविणे.
उत्पत्ती - जन्म
बद्ध - ज्यांना पुन्हा पुन्हा जन्म आणि पुन्हा पुन्हा मृत्यु या अवस्था सोडत नाहीत असे सर्व संसारी जीव.
साधक - सर्वैक सत्याच्या लाभासाठी सतत प्रयत्न करणारा.
मुमुक्षु - मोक्षाची इच्छा करून त्याप्रमाणे आचार करणारा.
मुक्त- ज्याची वर उल्लेख केल्याप्रमाणे बद्धावस्था संपली त्याला मुक्त म्हणतात.

ज्याला उत्पत्ती आणि प्रलय या अवस्था नाहीत. त्याला साधकादी इतर अवस्थाही नाहीत. आत्मा एकमेव वस्तु असून तिला वरील अवस्था नाहीत. त्या आत्म्याच्या शिवाय सर्व वस्तु म्हणजे द्वैत होय. म्हणूनच असे म्हटले आहे की, द्वैत हे सर्वथा मिथ्या होय. ती एक कल्पना मात्र आहे.

या ठिकाणी द्वैताचा अभाव मान्य केला, सर्वच अद्वैतच आहे असे मानले तर सर्व व्यवहार थांबतील. तसे झाले तर शास्त्रांचा, शास्त्रांचे प्रबोधन करणारा आणि शास्त्र ऐकणारा यांची आवश्यकताच काय, असा प्रश्न निर्माण होईल. यावर असे उत्तर आहे की दोरीवर सर्पाचा भास उत्पन्न होण्यासाठी या ठिकाणी दोरी हे अधिष्ठान असते. परंतु तसे पाहिले तर दोरी हीसुद्धा कल्पित म्हणजे असत्य आहे. परंतु आत्म्याचे तसे नाही. आत्मा सत्य, अकल्पित असल्याने सत्याच्या अधिष्ठानावर असणाऱ्या किंवा दिसणाऱ्या वस्तु असत्य आहेत. आत्म्यावर असत्यत्वाचा आरोप करता येत नाही. केवळ अज्ञानाने आत्म्यावर कसे आरोप केले जातात हे मागील श्लोकामध्ये आलेले आहे. त्याचप्रमाणे मी सुखी आहे, दुःखी आहे वगैरे आरोप आत्म्यावर केले जातात. या आरोपांचे निराकरण करणे हे शास्त्रांचे कार्य आहे. शास्त्रे नकारात्मक प्रतिपादन करून आत्म्याचे अस्तित्व निरंतर कसे आहे ते सांगतात. हे ब्रह्म नव्हे, ते ब्रह्म नव्हे असे सांगता सांगता ब्रह्माच्या ठिकाणी कोणताही धर्म नाही ते गुणशून्य आहे हे सिद्ध करतात. यामुळेच प्रत्येक ठिकाणी शास्त्र प्रमाण म्हणून शास्त्राची स्तुती केली जाते ती केवळ आत्म्याचे नित्यत्व सिद्ध करण्यासाठी.


श्लोक- भावैरसद्‌भिरेवायमद्वयेन च कल्पितः ।
भावा अप्यद्वयेनैव तस्मादद्वयता शिवा ॥ ३३ ॥


अर्थ- परमात्मा अद्वैत असताना तो स्वतःस कल्पित पदार्थांनी वेढून घेतो. हे कल्पित पदार्थ केवळ अद्वयाने कल्पित असतात. म्हणून अद्वैत अवस्था मंगलकारक आहे.

अंधारामुळे दोरीवर सर्पाचा आरोप केला जातो. वस्तुतः ही असत्य गोष्ट आहे. त्याप्रमाणे आत्मरूपावर प्राणादिकांचे केलेले आरोप सर्वथा असत्य, काल्पनिक आहेत. ज्या वेळी मन शान्त, स्थिर, निर्विषय असेल तेव्हा कल्पनांची उत्पत्ती होऊ शकत नाही. आत्मा ही वस्तू निर्विकार आणि स्थिर आहे. अशा या आत्म्यावर कल्पनेने केलेले आरोप वास्तविक सत्य नसताना अज्ञानाने ते सत्य असल्याचे मानले जाते. चंचल मनाच्या अवस्थेत ही असत्यता निर्माण होते. परंतु खरे पाहिले तर, अद्वय आत्माच या सर्व असत्य पदार्थांचेसुद्धा अधिष्ठान आहे. म्हणून असे म्हटले जाते की, कल्पना असत्य असल्या तरी ज्या अधिष्ठानामुळे त्या निर्माण होतात ते अधिष्ठान सर्वाचे मंगल करणारे असल्याने श्रुतीने या अधिष्ठानाला 'शिव' असे म्हटले आहे. दोरीवर सर्पाची कल्पना केली म्हणजे ती ज्याप्रमाणे भयप्रद होते, दुःखाला कारणीभूत होते त्याप्रमाणे आत्म्यावर कल्पनेने केलेले सर्व आरोप दुःखाला कारणीभूत होतात. द्वैतात भय आहे तर अद्वैत भयशून्य आहे.


श्लोक-नात्मभावेन नानेदं न स्वेनापि कथंचन ।
न पृथङ्नापृथक्किचिदिति तत्त्वविदो विदुः ॥ ३४ ॥


अर्थ- आत्मभावामुळे हे दृश्य विश्व विविध रूपमय नाही त्याप्रमाणे ते स्वतः देखील विविधरूपी नाही. ते निराळे नाही आणि अपृथक देखील नाही, असे आत्मविद लोक म्हणतात. कारण त्यांस आत्मरूपाचे ज्ञान झालेले असते.

वस्तु विविध असल्या म्हणजे एका वस्तूचा परिणाम दुसरीवर होतो. थोडक्यात अमंगलत्व निर्माण होते. परंतु आत्मा एकमेव असल्याने त्या ठिकाणी अमंगलत्व निर्माण होणे शक्य नाही. आत्म्याचे यथार्थ ज्ञान झाले म्हणजे विश्वातील विविधता लोप पावते आणि सर्वत्र आत्मरूपाचा अनुभव येतो.


श्लोक- वीतरागभयनोधैर्मुनिभिर्वेदपारगैः ।
निर्विकल्पो ह्ययं दृष्टः प्रपञ्चोपशमो द्वयः ॥ ३५ ॥


अर्थ- प्रेम, भय, क्रोध हे ज्यांनी नाहीसं केले, वेदज्ञानामध्ये जे प्रवीण झाले त्या मुनींनी निर्विकल्प आणि संसार नाहीसा करणारा अद्वय आत्मा पाहिला आहे.

या श्लोकामध्ये आत्मज्ञानी पुरुषाचे लक्षण सांगितले आहे. त्याप्रमाणे आत्मज्ञानाची इच्छा असलेल्या पुरूषाने काय केले पाहिजे याचेही मार्गदर्शन या श्लोकात करण्यात आले आहे. या श्लोकातील प्रत्येक पद साधकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. राग, भय, क्रोध ह्या तीन महान शत्रूच्या पाठीमागे 'वीत' असे पद ठेवून या सर्वांचा परामर्ष घेण्यात आला आहे. वीत म्हणजे विगत. विगत म्हणजे विशेषरूपाने गेलेले, असा अर्थ आहे. पुन्हा न येण्यासाठी जाणे हा विगत याचा अर्थ आहे.'रागभयक्रोधैः असे जरी पद असले तरी केवळ हे तीनच शत्रू नाहीसे व्हावेत हा यामागे उद्देश नसून कामादी सहाही शत्रूचे निर्मूलन व्हावे असा उद्देश आहे. या बाबतीत

वीतरागभयक्रोध: मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्‌भावमागताः ॥ भ.गी. ४.१०

ह्या श्लोकावरील पू. पा. शंकराचार्यांचे भाष्य आणि ज्ञानेश्वरमहाराजांचे व्याख्यान फारच उद्बोधक आहे. ज्ञानेश्वरांनी जणूकाही पू.पा. गौडपादांच्या श्लोकावरच भाष्य केले आहे की काय, असे वाटते.

एर्‍हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती ।
वाटा के वेळी न वचती । क्रोधाचिया ॥ ६० ॥
ते मद्‌भावा सहजे आले । मी तेचि ते होऊन ठेले ।
जे मज तयां उरले । पदर नाहीं ॥ ६३ ॥
सांगे पितळेची गंधिकाळिक । जै फिटली होय निःशेष ।
तै सुवर्ण काई आणिक । जोडूं जाईजे ॥ ज्ञाने. ४.६४

जे आपल्याबद्दल अगर परक्याबद्दल शोक करीत नाहीत, ज्यांच्या सर्व इच्छावासना पूर्णपणे नाहीशा झाल्या आहेत आणि जे क्रोधाच्या वाटेला कधीही जात नाहीत ते माझ्या आत्मरूपाला येऊन एकरूप होतात. त्यामुळे त्यांना मी आणि ते यांच्यामध्ये कोणताही आडपडदा उरत नाही. ते मीच होतात. पितळेमध्ये असलेली अशुद्धता नाहीशी केल्यावर सोने काय त्यापेक्षा निराळे असते ?

अशा भावाने जे मंडित होतात त्यांना मुनी अशी संज्ञा प्राप्त होते. 'मुनी' या पदावर भाष्य करताना पू.पा. शंकराचार्यानी मननशील, विवेकी असे म्हटले आहे. या श्लोकात त्यांच्यासाठी आणखी एका विशेषणचा उल्लेख आहे- 'वेदपारगैः !' वेदपारग याचा सामान्य अर्थ वेदांचा सखोल अभ्यास करून ज्ञानवान झालेला, असा केला जातो. परतु हा मर्यादित अर्थ या श्लोकामध्ये अभिप्रेत नाही. या ठिकाणी वेदांचा केवळ अभ्यास अभिप्रेत नसून वेदांच्या गर्भित अर्थाप्रमाणे ज्यांचे आचरण आहे त्यांना वेदपरायण किंवा वेदपारग असे म्हणतात. मुनी या संज्ञेला पात्र झालेले लोक वेदाचारनिपुण असतात. आत्मरूपाचे ज्ञान होण्यासाठी या सर्व गुणांची आवश्यकता असल्याचे पू. पा. गौडपादाचार्यांनी मद्दाम कथन केले आहे. यामळे चित्ताचे सर्व दोष निर्मूल होऊन ते शुद्ध होते. अशा श्रेष्ठांना काय अवस्था प्राप्त होते किंवा त्यांचा विश्वाशी कसा व्यवहार असतो याचे उत्कृष्ट दर्शन ज्ञानेशांच्या खालील ओवीमध्ये घडते.

म्हणोनि सर्वत्र सदा सम । तें आपणाचि अद्वय ब्रह्म ।
हे संपूर्ण जाणे वर्म । समसृष्टीचें ॥ ज्ञाने. ५.९६

म्हणून सर्व ठिकाणी आणि सर्व काळी सारखे असणारे अद्वय ब्रह्म ते आपण स्वतःच आहोत असे समसृष्टीचे तत्वरूप तो स्वतःच जाणतो.

ज्याची दृष्टी उपरोक्त ओवीमध्ये सांगितल्याप्रमाणे आहे त्याला 'निर्विकल्प' असे म्हणतात. या निर्विकल्प अवस्थेमुळे प्रपंच आपोआपच नाहीसा होतो. या ठिकाणी प्रपंच याचा अर्थ द्वैत असा केला जातो किंवा ज्ञानेशांच्या वचनाप्रमाणे -

मातेचिया उदरकुहरौं । पचूनि विष्टेच्या दाथरौं ।
उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥ ज्ञाने.९.३३१

पुन्हा पुन्हा जन्म घेणे आणि मरणे हा प्रवास पूर्णपणे थांबणे म्हणजेच प्रपंचउपशम होय. या प्रपंच उपशमाने वर म्हटल्याप्रमाणे द्वैताची झाडणी होऊन अद्वैताचा अनुभव प्राप्त होतो. त्या अनुभवासाठी काय करावे याचे मार्गदर्शन उपरोक्त श्लोकात करून पू.पा. गौडपादाचार्यांनी साधकांवर महत् उपकारच केले आहेत यात शंका नाही.


श्लोक- तस्मादेवं विदित्वैनमद्वैते योजयेत्स्मृतिम् ।
अद्वैतं समनुप्राप्य जडवल्लोकमाचरेत् ॥ ३६ ॥


अर्थ- मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करून अद्वैत वृत्तीने आपल्या अखण्ड चिंतनाचा विनियोग करावा. अद्वैताची प्राप्ती झाली की, उदासीनपणे व्यवहार करावा.

अनर्थांचा नाश आणि परम कल्याण करणारे अद्वय ब्रह्म आहे. त्याच्या स्वरूपाचे ज्ञान करून घेवून साधकाने आपले चित्त चिंतनात एकाग्र करून चित्ताचा उपयोग करावा. ब्रह्मज्ञान झाल्यावर मीच ब्रह्म आहे असा अनुभव येण्यासाठी अशा एकाग्रतेची आवश्यकता आहे. ब्रह्म सर्व व्यवहाराच्या पलीकडचे आहे याचे ज्ञान झाले म्हणजे असा ज्ञानी मनुष्य नेहमीच्या व्यवहारात उदास वृत्तीने वागतो. इतकेच नव्हे, तर त्याचा तो स्वभाव बनतो. ही अवस्था खालील श्लोकामध्ये स्पष्ट केलेली आहे.
सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयो भ.गी. २.३८*
[[* तुकाराम महाराजांचा अभंग पाहावा.
जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारें वेच करी ॥
उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीवखाणी ॥ ]]


श्लोक- निस्तुतिर्निर्नमस्कारो निःस्वधाकार एव च ।
चलाचलनिकेतश्च यतिर्यादृच्छिको भवेत् ॥ ३७ ॥


अर्थ- मुनीने स्तुतीची किंवा नमस्काराची अपेक्षा करू नये. स्वधाकारामध्ये गुंतू नये. चल आणि अचल स्थितीचा त्याग करावा आणि त्या ईश्वराच्या इच्छेने जे होईल ते आत्मरूपच आहे असे समजून वागावे.

यतीचा आचार कसा असावा याचे उत्कृष्ट विवेचन या श्लोकात आहे. ज्ञानी पुरुषाची लक्षणे प्रतिपादन करताना ज्ञानेश्वरांनी अत्यंत सूक्ष्मपणे या वृत्तीचे वर्णन केले आहे.

तरी कवणेहि विषयींचे । साम्य होणें न रुचे ।
संभावितपणाचें । ओझें जया ॥ १८४ ॥
पार्था तेणें पाडें । सन्माने जो सांकडे ।
गरिमेतें आंगाकडे । येवोचि नेदी ॥ ७८ ॥
पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ति कानीं नायकावी ।
हा अमुका आहे ऐसी नोहावी । सेचि लोकां ॥ ८८ ॥
तेथ सत्काराची गोठी । कें आदरा येईल भेटीं ।
मरणेसी साटीं । नमस्कारितां ॥ ८९ ॥
वाचस्पतीचेनि पाडे । सर्वज्ञता तरी जोडे ।
परि वेडिवेमाजी दडे । महिमे भेणें ॥ ज्ञाने. १३.१९०

ज्ञानी पुरुष कोणाच्या स्तुतीची अगर नमस्काराची अपेक्षा करीत नाही, किंवा स्वत:च्या व्यावहारिक स्वार्थासाठी कोणापुढे लोटांगण घालीत नाही. कीतींची किंवा प्रसिद्धीची त्याला किंचितदेखील इच्छा राहिलेली असते. यामध्ये असलेली अनित्यता त्याला ज्ञात झालेली असते. त्यामुळे तो त्यांना कधीच महत्त्व देत नाही. ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगावयाचे तर -

जो अमृतासी ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी ।
तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ २.३६४ ॥
पार्था नवल हे पाही । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाहीं ।
तेथ ऋद्धिसिध्दी कायी । प्राकृता होती ॥ ज्ञाने. २.३६५

जो अमृताला नाव ठेवतो तो काय पेजेला चांगले म्हणणार आहे ? त्याप्रमाणे ज्याला आत्मसुखाचा अनुभव प्राप्त झाला तो ऋद्धिसिद्धींच्यामुळे प्राप्त झालेल्या वैभवाला काय आपले म्हणेल ? ज्या ठिकाणी स्वर्गसुख क:पदार्थ म्हणून गणले जाते अशा ठिकाणी नाहीशा होणाऱ्या या ठिकाणच्या समृद्धतेला काय मान दिला जाईल !

केवळ परमात्म्यावर एकचित्त करून निर्विकार मनाने जो राहातो त्या श्रेष्ठाला मुनी अशी संज्ञा आहे.


श्लोक-तत्त्वमाध्यात्मिकं दृष्ट्वा तत्त्वं दृष्ट्वा तु बाह्यतः ।
तत्त्वीभूतस्तदारामस्तत्त्वादप्रच्युतो भवेत् ॥ ३८ ॥


अर्थ- आपली सर्व इंद्रिये मिळून बनलेला हा देह परमात्मा आहे, पंचमहाभूतात्मक विश्वही तत्त्वतः परमात्मरूप आहे असा ज्याचा निश्चय होऊन जो स्वतःच आत्मरूप झाला त्याचे सर्व व्यवहारही आत्मरूप झाले. त्याने आत्मरूपापासून कधीही ढळू नये.

ज्या साधकाला परमात्मरूपाचा सर्वत्र साक्षात्कार झाला त्याला अन्य काही मिळवावयाचे राहिले नाही. अर्थात अशी स्थिती निर्माण होण्यासाठी काय करावयला पाहिजे याचाही निर्णय याच श्लोकात करण्यात आला आहे. सद्गुरूंनी ज्ञात करून दिल्याप्रमाणे अभ्यास केला म्हणजे शास्त्राच्या सत्यतेची प्रचीती येते. आपणास प्राप्त झालेले ज्ञान आणि आपल्या अभ्यासाप्रमाणे प्राप्त झालेला अनुभव एकच असल्याचे लक्षात आले म्हणजे मनाचा ठामपणे निश्चय होतो. या निश्चयानंतरच आपली सर्व इंद्रिये ईशमुख करून त्याची कालक्रमणा चालते. प्रत्येक इंद्रिय ईशमय होते. असे झाले म्हणजे आपपर भाव पूर्णपणे नाहीसा होतो. प्रत्येक वस्तु परमार्थरूप असल्याचे जाणवते. प्रत्येक वस्तूचे नाते आपल्याशी आहे, त्यामुळे प्रत्येक वस्तु आपली आहे. ज्याला एकदा आपण आपला म्हटले त्या वस्तूबद्दल रागद्वेषादी क्रिया घडत नाहीत. त्याच्या वृत्तीत हा फरक घडून येतो.

आपणचि विश्व जाहला । तरी भेदभावो सहजचि गेला ॥ १९१ ॥
हे विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण पै जाहला ॥ ज्ञाने. १२.२१३

ज्ञानेश्वरांनी प्रकट केलेला हा अनुभव या बाबतीत अगदी बोलका आहे. ज्याला हा अनुभव आला त्याला या सर्वोच्च पदापासून पदच्यूत होण्याची पाळी येत नाही. परंतु पूर्वसंस्काराप्रमाणे देहभाव जागृत झालाच तर साधकाने सावध असावे याकरिता गौडपादाचार्यांनी जणू काही ही धोक्याची सूचनाच देऊन ठेविली आहे.
प्रकरण तिसरें


अद्वैत


माण्डुक्य उपनिषदावरील पू. पा. गौडपादाचार्य यांच्या कारिकांतील हे तिसरे प्रकरण आहे. या प्रकरणात ४८ श्लोक किंवा कारिका आहेत. या प्रकरणात सगुणब्रह्म आणि निर्गुणब्रह्म असे जे भेद केले जातात त्यांचे ऐक्य प्रतिपादन करण्यात आले आहे. 'ज्ञाते द्वैतं न विद्यते । ' हा सिद्धान्त या ठिकाणी स्पष्ट करण्यासाठी या कारिकांचा प्रपंच करण्यात आला आहे.


श्लोक-ॐ उपासनाश्रितो धर्मो जाते ब्रह्मणि वर्तते ।
प्रागुत्पत्तेरजं सर्वं तेनासौ कृपणः स्मृतः ॥ १ ॥


अर्थ- उपासनेचा आश्रय करून राहणारा धर्म-जीव आहे. तो कल्पनेचा आश्रय केलेल्या ब्रह्मामध्ये स्थिर असतो. ते ब्रह्म उत्पत्तीपूर्वी जन्मशून्य असते म्हणून काही तज्ज्ञ लोक त्याला कृपण म्हणतात.

उपासना म्हटली की जो उपासना करतो तो उपासक, ज्याची उपासना करावयाची ते उपास्य आणि जी क्रिया करावयाची त्याला उपासना असे म्हणतात. सर्वश्रेष्ठ ब्रह्म हा उपासनेचा प्रमुख आधार आहे. त्या आधाराने किंवा उपासनेचा आश्रय करून उपासक उपासना करतो. ज्याची उपासना करावयाची ते उपास्य साकार असल्याशिवाय उपासना करता येत नाही. या ठिकाणी ब्रह्म उपास्य आहे. उपासकाच्या समोर ते साकार ब्रह्म आहे. हे ब्रह्म असे साकार होण्यापूर्वी जन्मशून्य होते. परंतु ब्रह्म साकार झाले, मी त्याची उपासना करतो असे जीव म्हणतो. साकार ब्रह्माचा विचार हा संकुचित मनाचा आविष्कार आहे. उपरोक्त कारिकेमध्ये त्याला कृपण अशी संज्ञा दिली आहे.

मी स्वतः निर्गुण निराकार अविकृत असताना उपासक मात्र मला माझ्या महान स्थितीतून खाली आणून उपासना करतात. यावर ज्ञानेश्वरमहाराजांनी फार मोठे भाष्य केले आहे. ते म्हणतातः

म्हणोनि मोहिलेनि मनोधर्मे । हेंचि मी मानुनी संभ्रमें ।
मग येथीचि जिथे जन्मकर्में । तिये मजचि म्हणती ॥ १५५ ॥
मज आकारशून्या आकारु । निरूपाधिका उपचारु ।
मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥ १५७ ॥
जंव आकारु एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावे भजती ।
मग तोचि विघडलीया टाकिती । नाही म्हणोनि ॥ ज्ञाने. ९.१७०*
[[* ज्ञाने. १. अवजानन्ति मां मूढा (गी ९.११) या श्लोकावर ज्ञानेश्वरमहाराजांनी विस्तृत भाष्य केले आहे. या बत्तीस ओव्या अभ्यासकांनी मुद्दाम पाहाव्यात. ]]

मनाला निर्माण झालेल्या मोहामुळे सर्व दिसते ते मी आहे असे मानून या ठिकाणी जन्म-मरणादिकांसहित सर्व कर्मे मला चिकटवितात. खरा मी आकारशून्य असताना मला साकार करतात. मला जन्ममरणाच्या कोणत्याही उपाधी नसतांना मला उपाधी आहेत असे समजून माझ्या जयंत्याही साजऱ्या करतात. सर्व विधींच्या पलीकडे असणाऱ्या मला, मी अमुक प्रकारे आचरण करतो असे म्हणतात. इतकेच काय, एखाद्या देवतेचा आकार देऊन माझी उपासना करतात. परंतु त्या आकाराला तडा गेला की, त्यातले देवत्व संपले म्हणून मला फेकून देतात. असा उपासकांचा भ्रममूलक आचार चालू असतो. हा आचार म्हणजे उपासकांचे कृपणत्व होय.

अशी एक कथा आहे. रुख्मिणीचा विवाह झाल्यावर कृष्ण आणि रुख्मिणीला जवळ बसवून घेऊन वसुदेव-देवकीने त्यांना साखर भरवली. त्या ठिकाणी जमलेल्या अन्य स्त्रिया रुख्मिणीला नाव घेण्याचा आग्रह करू लागल्या. बराच वेळ आग्रह होऊनसुद्धा रुख्मिणी नाव घेत नाही हे पाहून श्रीकृष्णांनी तिला नाव घेण्यास सांगितले. तेव्हा ती त्यांच्याकडे मुख करून, डोळे मिटून स्वस्थ बसली. हे पाहून कृष्णानी तिला पुन्हा नाव घेण्यास सांगितले. तेव्हा भानावर येऊन रुख्मिणी भगवंताना म्हणाली, 'घेतलंना नांव.' ते ऐकून आश्चर्यचकित होऊन भगवंतांनी तिला विचारले, 'ते कसे काय ? मुंगीच्या पायाचा आवाजसुद्धा मला ऐकू येतो, तर तू घेतलेले नाव मला ऐकू येणार नाही का ?' यावर स्पष्टीकरण करताना रुख्मिणी म्हणते 'आपण-अनाम, अजाती असे असता कोणत्यातरी नावात बद्ध करून तुमच्या वैभवाला कमीपणा आणणे मला कसे रुचेल, म्हणून मौन ठेवले.' मौन गा तुझे राशीनाम ( ज्ञा. १७-१५) ब्रह्माला संकुचित करणे ही दीनावस्था आहे.

या एका गोष्टीमध्ये या श्लोकाचा सर्व मतितार्थ साठविलेला आहे. वाणीने ब्रह्माचे वर्णन करता येत नाही.

यद्वाचानभ्युदितं येन वागभ्युद्यते ।
तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदमुपासते ॥ केन १.५

जे वाणीला उच्चारता येत नाही पण ज्याच्या सत्तेने वाणी व्यवहार्य होते ते ब्रह्म होय, असे तू समज. ज्या ब्रह्माची लोक उपासना करतात ते खरे ब्रह्म नव्हे.

केनोपनिषदाने दिलेले हे स्पष्टीकरण अत्यंत रुचिर असून वस्तूच्या विषयावर चांगला प्रकाश टाकणारे आहे. या ठिकाणी जीव स्वतः असे म्हणतो की ब्रह्माप्रमाणे मी देखील उत्पन्न झालो आहे. ब्रह्माची उपासना करणे आणि अशा ब्रह्माच्या प्राप्तीची अभिलाषा धरणे हे संकुचित चित्ताचे लक्षण आहे. मूळचा धनिक असून दीनत्वाने आचार करणाऱ्या माणसाला कृपण असे म्हणतात. त्याप्रमाणे जीव अथवा ब्रह्म वस्तुतः जन्मशून्य असता आपण जन्म घेणारे आहोत, असे म्हणून त्याप्रमाणे आचार करणाऱ्या पुरुषाला पारमार्थिक कृपण असे म्हणतात.

श्लोक-अतो वक्ष्याम्यकार्पण्यमजाति समतां गतम् ।
यथा न जायते किंचिज्जायमानं समन्ततः ॥ २ ॥


अर्थ- म्हणून मी म्हणतो, की ब्रह्म कृपण नाही. त्याला जन्म नाही. ते सर्व ठिकाणी सारखे आहे. उत्पन्न होण्याचा भास निर्माण करणारे ब्रह्म कधीच उत्पन्न होत नाही.

ब्रह्माला जन्मादी विकार नाहीत. इतकेच नव्हे तर जन्म आणि मरण ज्या वस्तूंना आहे त्या वस्तु जन्ममरणयुक्त असल्याचे भासते. खरे पाहिले तर कोणतीही वस्तु उत्पन्न होत नाही व नष्टही होत नाही. याला अजातवाद असे म्हणतात. अंतर्बाह्य ब्रह्म ही एकच वस्तू आहे असे ज्ञान करून घेण्यास असमर्थ असलेला जीव स्वतःला असमर्थ, परावलंबी, उत्पन्न झालेला, मरणारा, असा असताना नित्य आणि जन्मशून्य ब्रह्माची उपासना मला कशी करता येईल असे मनाशी ठरवून स्वतःच संकुचित होतो.

या ठिकाणी असा प्रश्न निर्माण होतो की, मग एक वस्तु आहे, ती पाहतो, तिचे व्यवहार चालतात वगैरे गोष्टी समोर दिसत असता त्यांना असत्य मानावे आणि असे मानणाऱ्याला कृपण समजावे हे कसे ? याचे उत्तर देताना 'वाचारम्भणं विकारो नामधेयम् । ' छां.४.१-४ वाणीच्या योगे अस्तित्वात आलेले किंवा नामरूपाला आलेले पदार्थ म्हणजे केवळ वाचेचा विलास किंवा वाचेचा विकार आहे असे समजावे. थोडक्यात ब्रह्म कृपण नाही अगर ते विकारही पावत नाही. अज्ञानामुळे आपण दोरीवर सर्प निर्माण करतो आणि प्रकाश निर्माण होताच तो सर्प नाहीसा होतो. होणे आणि जाणे या क्रिया या ठिकाणी ज्याप्रमाणे अज्ञानजन्य आहेत त्याप्रमाणे ब्रह्माच्या आश्रयाने दिसणाऱ्या वस्तूचे उत्पत्ती आणि लय हे विकार अज्ञानमय आहेत हे निश्चित.

श्लोक- आत्मा ह्याकाशवज्जीवैर्घटाकाशैरिवोदितः ।
घटादिवच्च संघातैर्जातावेतन्निदर्शनम् ॥ ३ ॥


अर्थ - विस्तृत आकाश घटाच्या आकाराप्रमाणे होते त्याप्रमाणे आत्मा जीवरूपाने उत्पन्न होतो. घटाच्या उपाधीने ज्याप्रमाणे घटाकाश निर्माण होते, त्याप्रमाणे शरीर, कार्य आणि कारण इत्यादिकांच्या एकत्रितपणामुळे जीव उत्पन्न होतो. जाती, जन्म व मरण याचे हे दर्शन आहे.

तसे पाहिले तर आकाश अत्यंत विस्तृत आहे. एका घटामध्ये असलेल्या पोकळीला घटाकाश आणि एखाद्या घराच्या आत असलेल्या पोकळीला गृहाकाश (मठाकाश) असे संबोधण्यात येते. घट किंवा घर यांच्या उपाधीमुळे घटाकाश आणि मठाकाश निर्माण झाले. घट फुटला किंवा घर मोडले म्हणजे आतील पोकळी आकाश नामक विस्तृत पोकळीत मिळून जाते. त्याप्रमाणे आत्मा अत्यंत विस्तृत आहे. देह आणि त्याबरोबर इंद्रिये, त्यांचे व्यापार आणि व्यापाराचे कारण या उपाधीमुळे तोच आत्मा जीव म्हणून निर्माण होतो. तसे सूक्ष्मपणे पाहिले तर घटाकाश किंवा मठाकाश निर्माणही होत नाही आणि लयही पावत नाही. परंतु अज्ञानामुळे आपण या घटामध्ये पोकळी निर्माण झाली असून ती त्या घटाच्या आकाराची आहे असे म्हणतो. वस्तुतः ती सत्य स्थिती नव्हे. घटाकाश ज्याप्रमाणे निर्माण होत नाही किंवा लयासही जात नाही, त्याप्रमाणे जीव निर्माणही होत नाही किंवा मृत्यूही पावत नाही.

श्लोक- घटादिषु प्रलीनेषु घटाकाशादयो यथा ।
आकाशे संप्रलीयन्ते तद्वज्जीवा इहाऽऽत्मनि ॥ ४ ॥


अर्थ- घटादी पदार्थ नष्ट झाले म्हणजे घटाकाश आकाशमध्ये ज्याप्रमाणे लीन होते त्याप्रमाणे शरीरादी संघात नष्ट झाले म्हणजे आत्मरूपात जीवाचा लय होतो.

मागील श्लोकात स्पष्ट केल्याप्रमाणे घटादिकांच्या नाशाबरोबर घटाकाश आकाशात लीन होते, त्याप्रमाणे शरीरादी संघात नष्ट झाले म्हणजे जो जीव शरीरात असतो तो शरीर सोडून आत्म्यामध्ये एकरूप होतो, असे म्हटले जाते. जीव येतही नाही आणि जातही नाही. या ठिकाणी अशी एक शंका निर्माण होईल की, जीव येत नाही आणि जातही नाही तो आत्माच आहे तर विविध जीवांना विविध पापपुण्याची फळे प्राप्त होतात ते कसे ?

याचे उत्तर असे की, वस्तुतःआकाश एकच, परंतु घटांच्या आकाराप्रमाणे त्याचे स्वरूप बदलते. ज्ञानेश्वरमहाराजांनी हा विषय किंचित सोप्या शब्दांत मांडला आहे. पाऊस पडून गेला म्हणजे निरनिराळ्या खळग्यांत पाणी साचते. त्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब पडते. डबक्याचा आकार लहान-मोठा, कसाही असला तरी त्यामध्ये पडणारे चन्द्राचे प्रतिबिंब मात्र एकाच आकाराचे आणि एकाच तेजाने असते. डबक्याचा आकार आणि खोली ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्यात कमी अगर अधिक पाणी साठेल. डबक्याच्या भोवती जी माती असेल त्याप्रमाणे पाण्याचा रंग बदलेल. ज्यामध्ये जास्त पाणी आहे ते डबके सूर्याच्या उन्हात कमी पाणी असलेल्या डबक्यापेक्षा अधिक काळ अस्तित्वात राहील. या डबक्याच्या आकाराच्या, आतील पाण्याच्या आणि भोवतालच्या परिस्थितीप्रमाणे त्या डबक्याचे आयुष्य आणि स्थिती राहील. त्याच्या आणि वर आकाशात असलेल्या चंद्राचा काहीही संबंध नाही.

येरी शरीराचिया सलिली । असतेपण हेचि साऊली ।
वाचूनि चंद्रिका ते ठेली । चन्द्रींची आहे ॥ ज्ञाने. ८-१३८

त्याप्रमाणे मनुष्याचे शरीर आणि त्याचा परिसर ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे शरीराकडून क्रिया घडतात. त्यांचा संबंध पापपुण्याशी निगडित असला तरी आत्म्याशी मात्र त्याचा संबंध नाही. हे लक्षात येईल की, पापपुण्याचा संबंध आत्म्याशी नसून शरीराशी, जीवाशी आहे. त्यामुळे प्रत्येकाचे पापपुण्य भिन्न आहे. ते एक असू शकत नाही.

श्लोक- यथैकस्मिन्घटाकाशे रजोधूनादिभिर्युते ।
न सर्वे संप्रयुज्यन्ते तद्वज्जीवाः सुखादिभिः ॥ ५ ॥


अर्थ- एखादे घटाकाश धूलीने किंवा धूमाने मलीन झाले म्हणून सर्वच घटाकाशे मलिन होत नाहीत. त्याप्रमाणे एका जीवाला सुखाचा अनुभव आला तर अन्य जीवही सुखी होतात असे नाही आणि एक दुःखी झाला म्हणून अन्य सर्व दुःखी होतात असेही नाही.

वर चंद्राचे उदाहरण घेऊन हा विषय स्पष्ट केला आहे. या श्लोकात गौडपादाचार्य म्हणतात की, निरनिराळे घट असतील तर त्याप्रमाणे त्यांतील आकाश देखील भिन्न असेल. एखाद्या घटामध्ये माती पडून तो मलिन झाला म्हणून त्याचा परिणाम इतर घटांवर होत नाही. इतर घट आपापल्या परीने शुद्ध-अशुद्ध होतात. असे असले तरी त्यांत असणारे आकाश मात्र एकच. निर्मळ असेच आहे. त्याप्रमाणे शरीररूपी भांड्यात आत्म्याचे असणारे बिंब नेहमीच शुद्ध असते. शरीर मलिन झाले म्हणून त्याचा परिणाम आत्म्यावर होत नाही. तो अस्पर्श, शुद्ध आणि नित्य आहे.


श्लोक-रूपकार्यसमाख्याश्च भिद्यन्ते तत्र तत्र वै ।
आकाशस्य न भेदोऽस्ति तद्वज्जीवेषु निर्णयः ॥ ६ ॥


अर्थ- निरनिराळ्या ठिकाणी नाम, रूप आणि कार्य विविध प्रकारची असतात, परंतु महदाकाशात मात्र भेद असत नाही. त्याप्रमाणे जीवा-जीवात भेद नाही हे खरे आहे.

व्यवहाराची संगती लागावी म्हणून मी ,तू, हा वगैरे नामरूपात्मक भेद निर्माण झालेले आहेत. परमार्थतः आकाश ज्याप्रमाणे एकच आहे त्याप्रमाणे आत्मा एकच असून त्याच्या उपाधीमुळे भिन्नता जाणवते. परंतु ज्या महात्म्यांनी वेदाने कथन केल्याप्रमाणे अभ्यास करून अनुभव घेतला आहे ते लोक असाच निर्णय करतील, की आत्मा एकमेव आहे. परंतु उपाधिभेदाने तो अनेक असल्यासारखा भासतो. भास सत्यत्वात कधीच प्रवेश करीत नाही.


श्लोक-नाकाशस्य घटाकाशो विकारावयवौ यथा ।
नैवात्मनः सदा जीवो विकारावयवौ तथा ॥ ७ ॥


अर्थ- महान आकाशाचा घटाकाश हा विकार नाही किंवा अवयव देखील नाही. त्याप्रमाणे नित्य एकरूपात्मक असणारा जीवात्मा हा आत्म्याचा विकार किंवा अवयव नाही.

सोने हा मूळ धातू आहे. त्यापासून तयार केलेले अंगठी, पाटल्या, बांगड्या वगैरे दागिने हा सोन्याचा विकार आहे. किंवा फेन, बुडबुडा, वाफ वगैरे पाण्याचे विकार आहेत. सोन्याला विकार होऊन त्याचे दागिन्यांत रूपांतर होते त्याप्रमाणे महदाकाशाचा घटाकाश किंवा मठाकाश हा विकार नाही किंवा तो अवयवदेखील नाही. कारण घट बाजूला गेला म्हणजे आकाशात फेरफार घडत नाहीत. आत्मा एकमेव आहे. जीवात्मा, देहात्मा, परमात्मा वगैरे आत्म्याचे अवयव नाहीत. कारण आत्मा अविकारी आहे. केवळ उपाधिभेदामुळे ही नावे आणि रूपे व्यवहारगम्य झाली आहेत. उपाधी ह्या सत्य नाहीत. म्हणूनच उपाधीतून जन्मास आलेला व्यवहारदेखील सत्य नव्हे.


श्लोक- यथा भवति बालानां गगनं मलिनं मलैः ।
तथा भवत्यबुद्धानामात्माऽपि मलिनो मलैः ॥ ८ ॥


अर्थ- लहान मुले आकाश मलिन झाले असे म्हणतात त्याप्रमाणे जे अविवेकी आहेत ते म्हणतात, की आत्मा पापपुण्याच्या योगे मलिन होतो.

वालुकामय प्रदेशातून प्रवास करणारा मनुष्य सूर्याच्या किरणांनी निर्माण झाल्याप्रमाणे त्या प्रदेशावर पाण्याचा किंवा पाण्याच्या लहरींचा आरोप करतो. वस्तुतः तो केवळ आरोपच असतो. सत्य काहीही नसते. त्याप्रमाणे आत्म्याला कर्माचा स्पर्श होणे मुळीच शक्य नाही. परंतु अज्ञानी लोक मात्र त्याच्या आत्म्याला क्लेश झाले, आत्मा शान्त झाला असे केवळ अज्ञानामुळे म्हणतात.


श्लोक- मरणे सम्भवे चैव गत्यागमनयोरपि ।
स्थितौ सर्वशरीरेषु चाकाशेनाविलक्षणः ॥ ९ ॥


अर्थ- मरण, उत्पत्ती, येणे-जाणे किंवा विशिष्ट स्थितीत राहाणे असो- सर्व शरीरात असणाऱ्या आकाशाप्रमाणे आत्मा निर्विकार असतो.

एके ठिकाणी ठेवलेला घट अन्यत्र नेला, फोडून टाकला किंवा नवीन घट घेतला या एवढ्याच कारणाने आकाश एका ठिकाणाहून अन्यत्र नेले, मृत झाले किंवा जन्म पावले असे होत नाही. त्याप्रमाणे आत्मा जन्म घेत नाही. क्लेश अगर सुखाचा तो भोक्ता नाही. तो कोठे जात नाही आणि येतही नाही. तो सर्वथा निर्विकार आहे.


श्लोक-संघाताः स्वप्नवत्सर्व आत्ममायाविसर्जिताः ।
आधिक्ये सर्वसाम्ये वा नोपपत्तिर्हि विद्यते ॥ १० ॥


अर्थ- शरीरादी सांघात स्वप्नवत असून परमेश्वराच्या मायेमुळे भासमान होतात. कारण या सांघातांना कमी-अधिकपणा, समस्थिती यांची उत्पत्ती कधीही होत नाही.

हे देहादी सांघात एखाद्या जादूगाराने निर्माण केलेल्या शरीराप्रमाणे किंवा वस्तूप्रमाणे मिथ्या आहेत. परमात्म्याच्या मायेमुळे या सर्वांची उत्पत्ती झाली असे भासते, परंतु त्या वस्तूस पारमार्थिक अस्तित्वच नाही. म्हणून ही माया देखील असत्य आहे.


श्लोक-रसादयो हि ये कोशा व्याख्यातास्तैत्तिरीयके ।
तेषामात्मा परो जीवः खं यथा संप्रकाशितः ॥ ११ ॥


अर्थ- तैत्तिरीय उपनिषदांमध्ये जे रसादी पाच कोश सांगितले आहेत त्या सर्वकोशांचा सर्वात मोठा आधार, परमजीव म्हणून आत्माच आहे. आकाशादी दृष्टान्तांनी आत्म्याचे एकत्व येथे सिद्ध झाले आहे.

श्रुतिवचनांचा आधार घेऊन अद्वैत सिद्धान्त या ठिकाणी स्पष्ट करण्यात आला आहे. तैत्तिरीय उपनिषदामध्ये आत्मा आणि पाच कोश यांचा संबंध काय, याचे स्पष्टीकरण आहे. अन्न, प्राण, मन, विज्ञान आणि आनन्द असे पाच कोश आहेत. कोश याचा अर्थ साठविण्याची जागा. आनन्दमय कोश हा सर्वात सूक्ष्म आहे. त्याच्या भोवती विज्ञानमय कोशाचे, विज्ञानमय कोशाच्या भोवती मनोमय कोशाचे, मनोमय कोशाच्या भोवती प्राणमय कोशाचे आणि प्राणमय कोशाच्या भोवती अन्नमय कोशाचे आवरण आहे. अन्नमय कोश हा सर्वात स्थूल कोश आहे. आनन्दमय ह्या अत्यंत सूक्ष्मकोशाच्या अंतर्भागात आत्म्याचे अस्तित्व मानले जाते. त्यामुळे असे म्हणता येईल- हे सर्व कोश म्हणजे आत्म्याची आवरणेच आहेत. *
[[*टीप- तस्माद्वा एतस्मादन्नरसमयात् । तेत्ति. २-२
तस्माद्वा एतस्मात् प्राणमयात् ॥ तैत्ति. २-३
तस्माद्वा एतस्मात् मनोमयात् ॥ तैत्ति. २-४
तस्माद्वा एतस्मात् विज्ञानमयात् ॥ तेत्ति. २-५
अन्यन्तर आत्मा आनन्दमयः । तेनेषपूर्णः ॥ २-५
तस्यैष एव शारीर आत्मा ॥ २-६ ]]

हे कोश म्हणजे मायेचा विलास आहे. आत्मा हा एकमेव, अद्वय आणि अविकारी आहे.


श्लोक- द्वयोर्द्वयोर्मधुज्ञाने परं ब्रह्म प्रकाशितम् ।
पृथिव्यामुदरे चैव यथाऽऽकाशः प्रकाशितः ॥ १२ ॥


अर्थ- मधुब्राह्मणामध्ये जीवात्मा आणि परमात्मा यांचे स्पष्टरूप सांगितले आहे. व्यवहारात पृथ्वी आणि तिच्या उदरात असणारे आकाश एकच आहे.

पंचकोशांमध्ये सतत असलेल्या आत्म्याचे वर्णन बृहदारण्योकपनिषदात आहे. त्याला मधुज्ञान किंवा मधुब्राह्मण असे म्हणतात. तो मंत्र खालीलप्रमाणे आहे:

इयं पृथिवी सर्वेषां भूतानां मध्वस्यै पृथिव्यै सर्वाणि भूतानि मधु ।
यश्चायमस्यां पृथिव्यां तेजोमयो मृतमयः पुरूषो ।
यश्चायमध्यात्मं शारीरस्तेजोमयो मृतमयः अयमेव स ।
यो यमात्मेदममृतमिदं ब्रह्मेदं सर्वम् ॥ बृ. २.५.१.

ही पृथ्वी सर्व भूतांचा मध होय. त्याप्रमाणे सर्व भूतेदेखील या पृथ्वीचा मध होय. या पृथ्वीमध्ये जो तेजोमय आणि अमृतमय पुरुष (पार्थिवत्व) आहे तो या शरीराचा स्वामी म्हणून राहतो. हे सर्व मध म्हणजे आत्माच होय. हेच अमृतत्व किंवा हेच ब्रह्म होय.

याप्रमाणे द्वैताचा नाश होईपर्यंत ब्रह्माचे वर्णन करण्यात आले आहे.


श्लोक-जीवात्मनोरनन्यत्वमभेदेन प्रशस्यते ।
नानात्वं निन्द्यते यच्च तदेवं हि समञ्जसम् ॥ १३ ॥


अर्थ- जीवात्म्याचे एकत्व अभेदरूपाने गौरविले आहे तर जीवात्मभेद मात्र निषिद्ध मानला आहे. हा न्याय सिद्धान्त आहे.

जीवात्मा आणि परमात्मा एकच आहेत असे शास्त्रांचे सांगणे आहे. त्यांची स्तुती केली जाते तर ह्या दोघांच्या भेदाची निन्दा केली जाते. द्वैताचा निषेध करून शास्त्रे आत्म्याचे एकत्व प्रतिपादन करतात. उदा.
न तु तद्वितीयमस्ति । अन्य वस्तु नाही. बृ. ४. ३. २३.
द्वितीयाद्वै भयं भवति । द्वैतामध्ये भय आहे. बृ. १.४.२.
इदं सर्वं यदयमात्मा । हे सर्व आत्मा आहे. बृ. २.४.६.
मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति । जो अनेकत्व पाहतो तो जन्ममरणाच्या चक्रामध्ये सापडतो कठ २.१.१०.

इतर काही शास्त्रांनी वेदबाह्य कल्पना निर्माण केल्या आहेत. अर्थात त्या न्याय्य मात्र नाहीत.


श्लोक-जीवात्मनोः पृथक्त्वं यत्प्रागुत्पत्तेः प्रकीर्तितम् ।
भविष्यद्‌वृत्त्या गौणं तन्मुख्यत्वं हि न युज्यते ॥ १४ ॥


अर्थ- जीवात्म्याच्या व्युत्पत्तीचे- भिन्नत्वाचे वर्णन प्रथमतः कर्मकाण्डात आले आहे ते गौण आहे. कारण ते मुख्य किंवा यथार्थ नव्हे.

जीवात्मा आणि परमात्मा यांचे स्वरूप भिन्न आहे असे जे सांगितले जाते ते सर्वथा गौण होय. कारण जीव आणि ब्रह्म एकच आहेत असे श्रुतीचे म्हणणे आहे. काही ठिकाणी असे वर्णन करण्यात आलेले आहे -
१) यतो वा इमानि भूतानि जायन्ते । तैत्ति. ३. १.
ज्याच्यापासून ही सर्व भूते निर्माण होतात.
२) हिरण्यगर्भः समवर्तताग्रे । ऋ. १०.१२१.१.

ही सर्व भूते आत्म्यापासून निर्माण झाली किंवा आत्म्यापासूनच आकाशाची उत्पत्ती झाली. परमात्म्याने विचार केला-वगैरे वचने पाहिली म्हणजे शास्त्रे द्वैताचा आश्रय करतात. परंतु या वाक्यांचा अर्थ तसाच किंवा सत्यत्वाने घ्यावयाचा नसून केवळ लक्षणेने त्याचा अर्थ करावयाचा असतो. मी भात शिजवतो असे म्हणताना तांदूळ शिजवले जात असतात. या वाक्याचा यथार्थ अर्थ घेतला तर विपरीत अर्थ होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे या वाक्यांचा अर्थ सरळ न घेताना त्यामध्ये लपलेला अर्थ घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांना यथार्थ ज्ञान व्हावे म्हणून केवळ त्यांच्या बुद्धीला उचित अशा वाक्यांचा उपयोग करण्यात आलेला आहे. अद्वैताचे वर्णन करण्यासाठी द्वैताचा आश्रय करावा लागतो.

पैं शून्य जैं दावावें जाहले । तें बिन्दुले पाहिजे एक केलें ।
तैसें अद्वैत सांगावें बोलें । तें द्वैत कीजे ॥ ज्ञाने. १३-८८७

शून्य म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी एक वर्तुळ काढून सांगावे लागते की, या वर्तुळाच्या मर्यादा ज्या ठिकाणी नाहीत त्याला शून्य असे म्हणतात. त्याप्रमाणे अद्वैत स्पष्ट करताना द्वैताचा आश्रय करावा लागतो असा ज्ञानेश्वरांचा अभिप्राय आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी कर्मप्रवृत्त वचनांचा अर्थ द्वैतपर न लावता अद्वैत दर्शविणारा आहे.


श्लोक- मृल्लोहविस्फुलिङ्‌गाद्यैः सृष्टिर्या चोदिता‍ऽन्यथा ।
उपायः सोऽवताराय नास्ति भेदः कथंचन ॥ १५ ॥


अर्थ- माती, लोखंड किंवा अग्निकण वगैरे दृष्टान्तांनी सृष्टीचे निरनिराळ्या प्रकारचे जे वर्णन केले आहे ते एकत्व सिद्ध करण्याचा एक भाग आहे. या ठिकाणी भेद सिद्ध होत नाही.

मातीपासून घट तयार होतो किंवा अग्नीपासून ठिणग्या निर्माण होतात वगैरे उत्पत्तीची उदाहरणे देऊन सृष्टीच्या निर्मितीचे वर्णन करण्यात आले आहे, परंतु या ठिकाणी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, मातीचा घट आहे असे म्हणताना घट हा मातीचा विकार आहे, परंतु हा विकार केवळ नामरूपादी वचनांनी स्पष्ट झालेला आहे. सत्यत्वाने पाहिले तर घट हा देखील मातीच आहे. त्याप्रमाणे सृष्टी हा आत्म्याचा विकार नाही. सृष्टीची उत्पत्ती हा मायेचा विलास आहे.


श्लोक- आश्रमास्त्रिविधा हीनमध्यमोत्कृष्टदृष्टयः ।
उपासनोपदिष्टेयं तदर्थमनुकम्पया ॥ १६ ॥


अर्थ- हीन, मध्यम आणि उत्तम असे तीन प्रकारचे आश्रम आहेत. त्या आश्रमांवर कृपा करण्यासाठी उपासना सांगण्यात आली आहे.

या ठिकाणी पू. पा. गौडपादाचार्यांना असे म्हणायचे आहे की, या जगात तीन प्रकारच्या क्रिया केल्या जातात. त्यांमध्ये काही क्रिया अगदी हीन, काही मध्यम तर काही उत्तम प्रकारच्या असतात. अशा माणसांचे गट पाडण्यात आले आहेत. या प्रत्येक गटाला आश्रम असे संबोधण्यात येते. या सर्वांना ब्रह्माच्या प्राप्तीची इच्छा असते. त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे आणि सामर्थ्याप्रमाणे त्यांना कर्मप्रधान उपासनेचा मार्ग दाखविण्यात आला आहे. यामुळे त्या साधकाची शुद्धि होत जाते. ज्ञानेश्वरमहाराजांनी या कर्मप्रधान उपासनेच्या संबंधी एक अभिप्राय व्यक्त केला आहे.

तीर्थे बाहमळु क्षाळे । कर्में अभ्यंतरे उजळे ।
एवं तीर्थे जाण निर्मळें । सत्कर्मेचि ॥ ज्ञाने १८-१६०.

याप्रमाणे ज्याची शुद्धी होते तो ज्ञानाचा अधिकारी होतो. कर्माने ब्रह्माकडे जातांना कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते याचे स्पष्टीकरण आचार्यांनी केले आहे. त्याप्रमाणे प्रत्येक साधकाने खालील श्रुतिवाक्यांवर श्रद्धा ठेवून कर्म करावे.

आत्मा वा रे द्रष्टव्यः । आत्मा प्रत्येकाने पाहण्यास योग्य आहे (बृ. २. ४.५)
य आत्मापहतपाप्मा । आत्मा हा पापशून्य आहे. (छां. ८.७.१)
आत्मेत्येवोपासीत । आत्म्याची आत्मा म्हणूनच उपासना करावी. (बृ. १.४.७.)
हे सर्व उपासनाकाण्ड वेदोक्त आहे. त्याप्रमाणे ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे त्याने उपासना करावी, असा परमेश्वरानेच साधकांना उपदेश केला आहे. परंतु आत्मा एकमेव सत्यवस्तू आहे असा निश्चय होणे ही सर्वोत्तम साधकावस्था होय. त्यांच्यासाठी कर्माचा पसारा करावा लागत नाही. कारण योग्य प्रकारच्या चिंतनाने हा निश्चय झालेला असतो. त्यामुळे त्याला असे निश्चितपणे माहीत असते की -
यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतम् ॥
तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपासते ॥ केन. १-६

जे मनाने चिंतन करता येत नाही परंतु मनाला चिंतन करण्याचे सामर्थ्य ज्याच्यामुळे प्राप्त होते ते ब्रह्म होय. ब्रह्म म्हणून ज्याची उपासना करतात ते ब्रह्म नव्हे. अर्थात उपासना म्हणजे चित्शुद्धीचा मार्ग आहे. त्याचा आणि आत्मैक्य प्रतिपादन करणाऱ्या श्रुतींचा भेद नाही.


श्लोक- स्वसिद्धान्तव्यवस्थासु द्वैतिनो निश्चिता दृढम् ।
परस्पर विरुध्यन्ते तैरयं न विरुध्यते ॥ १७ ॥


अर्थ- काही लोक आपणच केलेल्या द्वैतवादी सिद्धान्तामध्ये दृढ असतात. ते इतके की, द्वैतवाद्यांशी भेद करतात पण अद्वैताशी ते विरोध करीत नाहीत.

आत्मैक्यदर्शन हे खरे दर्शन आहे असा मुख्य सिध्दांत आहे. त्यामुळे त्याच्या विरोधात असणारी सर्व दर्शने द्वैत-भेद कथन करणारी आहेत. अर्थात आपलेच म्हणणे सत्य म्हणून ही सर्व दर्शने एकमेकांशी विरोध करतात. सांख्य, चार्वाक, बुद्ध, जैन ही दर्शने द्वैताचा पाठपुरावा करणारी असून त्यांच्या अनुयायांना आपलेच तत्त्व खरे असा अभिमान असल्याने भेद निर्माण होतो. परंतु या सर्वांना अद्वैत सिद्धान्ताशी विरोध करता येत नाही.


श्लोक- अद्वैतं परमार्थो हि द्वैतं तद्‌भेद उच्यते ।
तेषामुभयथा द्वैतं तेनायं न विरुध्यते ॥ १८ ॥


अर्थ- अद्वैत हा सर्वश्रेष्ठ सिद्धान्त आहे. द्वैत हे अद्वैतापासून निर्माण झालेले भिन्न रूपात्मक कार्य होय. या द्वैती लोकांचे सिध्दांत अर्थातच असत्य होत.

द्वैत मिथ्या आहे त्यामुळे पारमार्थिक अद्वैताबरोबर भेदरूपाने राहाण्याचे सामर्थ्य त्याला नाही. अद्वैत हाच सर्वश्रेष्ठ अर्थ आहे, त्यामुळे ते सत्य आहे.
एकमेवाद्वितीयम् । आत्मा एकमेव आहे. (छां. ६. १२. २.) किंवा
न तु तद्वितीयमस्ति । परमार्थतः दुसरे काही नाही. (बृ. ४. ३. २३.)
असे श्रुतीने सांगितले आहे. द्वैत असत्य आहे याचा प्रापंचिक अनुभव आपण नेहमी घेतो. चित्त ज्या वेळी विचारशून्य किंवा स्पन्दनशून्य असते तेव्हा चित्ताची एकाग्रता होते. समाधी लागते. चित्त व्यापारशून्य होते. थोडक्यात, द्वैतशून्य होते. द्वैताचे नानात्व त्या ठिकाणी नसते. परंतु चित्ताचे व्यवहार सुरू झाले की द्वैताचा अनुभव येऊ लागतो. एकच आत्मा परंतु अज्ञानामुळे त्याची विभिन्नता भासते. परमार्थतः द्वैत आणि अद्वैत असा भेद या ठिकाणी नाही.


श्लोक-मायया भिद्यते ह्येतन्नान्यथाऽजं कथंचन ।
तत्त्वतो भिद्यमाने हि मर्त्यताममृतं व्रजेत् ॥ १९ ॥


अर्थ- मायेमुळे केवळ भिन्नत्व दिसते. दुसऱ्या कशानेही नाही. तत्त्वतः भिन्नत्व आहे असे म्हटले तर अमर्त्य वस्तु मृत झाली असे म्हणावे लागेल.

अद्वैत हे चिरंतन आहे. त्याच्यामध्ये अनुभवाला येणारा भेद केवळ मायेमुळे होतो. हा भेद सर्वथा असत्य आहे. डोळ्याच्या दोषामुळे दोन चन्द्र दिसतात; परंतु चन्द्र दोन असत नाहीत. त्याप्रमाणे अद्वैताचा भेद होणे अशक्य आहे. आत्मा मूलतः निरवयव आहे. त्याचा भेद केवळ मायेमुळे भासतो. अमृताला मरण आले असे म्हणणे ज्याप्रमाणे मिथ्या आहे त्याप्रमाणे आत्म्याच्या भेदाचा अनुभव येतो हे म्हणणे मिथ्या आहे. थोडक्यात, द्वैत मिथ्या असून अद्वैत सत्य आहे. त्यामध्ये कोणत्याही कारणाने भेद संभवत नाही.


श्लोक- अजातस्यैव भावस्य जातिमिच्छन्ति वादिनः ।
अजातो ह्यमृतो भावो मर्त्यतां कथमेष्यति ॥ २० ॥


अर्थ- वादपटू प्रज्ञावंत लोक जन्म नसलेल्या आत्म्याला जन्म आहे असे गृहीत धरतात. परंतु जो आत्मा स्वरूपतः जन्मशून्य आणि अमर आहे तो मर्त्य भावाचा अंगीकार कसा करील ?

विविध शास्त्रांचे अध्ययन केलेले पंडित जन्मशून्य आत्म्याला विकारी, जन्ममरणादी धर्मयुक्त आहे असे मानतात. परंतु ही गोष्ट सर्वथा मिथ्या आहे. 'उपजे ते नाशे' या ज्ञानेशांच्या वचनाप्रमाणे आत्म्यावर येतो-जातो वगैरे आरोप केले जातात. या विवादपटू पंडितांच्या अज्ञानाची कीव करताना ज्ञानेश्वरमहाराजांनी अध्यात्मशास्त्राशिवाय अन्य सर्व शास्त्रे आंधळी असल्याचे प्रतिपादन केले आहे. चार आंधळ्यांनी हत्तीचे स्वरूपवर्णन केलेले ऐकून ज्याप्रमाणे ते अज्ञानी आहेत हे पटते त्याप्रमाणे या सर्व पंडितांची किंवा अन्य शास्त्रांची स्थिती आहे.

मोराचां अंगी असोसे । पिसे असती डोळसें ।
परी एकली दिठी नसे । तैसें तें गा ॥ ८३५
तैसें शास्त्राजात जाण । आघवेंचि अप्रमाण ।
अध्यात्मज्ञानेवीण । एकलेनि ॥ ८३८
आणि अध्यात्म-ज्ञान कहीं । जेणे मानिलेचि नाहीं ।
तो ज्ञानार्थु न देखें कांहीं । हे बोलावें असों ॥ ८४२
ऐलीचि थडी न पवतां । पळे जो माघौता ।
तया पैल द्वीपीची वार्ता । काय होय ॥ ज्ञाने. १३. ८४३

मोराच्या पिसाऱ्यावर अनेक डोळे असतात, परंतु त्यांना डोळसपणा नसतो. त्यांना ज्याप्रमाणे दृष्टी नसते त्याप्रमाणे या पंडितांचे ज्ञान आहे. (मोराच्या दोन डोळ्यांनाच फक्त दृष्टी असते.) हे विविध शास्त्रांतून निर्माण झालेले आत्माविषयक ज्ञान अप्रमाण किंवा मिथ्या आहे. परंतु केवळ अधात्मज्ञान तेवढेच सत्य आहे. ज्याने अधात्मज्ञान स्वाधीन केले नाही, त्याचा गौरव केला नाही त्याला ज्ञान गोचर होणार नाही, हे काय सांगावयाला पाहिजे ? अलीकडील तीरावरूनच जो मागे फिरला त्याला पैलतीरी वसलेल्या गावांची माहिती काय असणार ? याप्रमाणे अध्यात्मशास्त्राशिवाय अन्य शास्त्रांचा अभ्यास करून आपण ज्ञानवान असल्याचा आणि आपलेच म्हणणे खरे करण्याच्या उद्देशाने वादविवादात दुसऱ्याला पराभूत करून स्वतःचा टेंभा मिरविणाऱ्या तथाकथित पंडितांना कोण ज्ञानी म्हणेल ? कारण अध्यात्मशास्त्राचा अनुभव त्यांच्याजवळ नसतो. म्हणून ज्ञानेशांनी या पंडितांच्या अवस्थेचे वर्णन शेवटच्या ओवीत फारच मार्मिकपणे केले आहे.

म्हणून जो जन्म पावत नाही त्यामुळे तो मरतही नाही. असा अजरामर आत्मा मर्त्य अवस्थेला कसा येईल ? तो येणार नाही हा अध्यात्मशास्त्राचा महान अनुभव आहे परंतु या पंडितांना तो अनुभव नसल्याने ते आत्म्याबद्दल विपरीत विधाने करतात. या पंडितांचे वाद सर्वथा सत्यशून्य आणि सत्याशी प्रतारणा करणारे असतात. त्यावर विश्वास ठेवू नये.


श्लोक-न भवत्यमृतं मर्त्यं न मर्त्यममृतं तथा ।
प्रकृतेरन्यथाभावो न कथंचिद् भविष्यति ॥ २१ ॥


अर्थ- अमृत मरणधर्मी नसते. त्याप्रमाणे मर्त्य कधी अमर होऊ शकत नाही. स्वभाव केव्हाही बदलत नाही किंवा त्याचा विपरीत परिणाम होत नाही.

'स्वभावो दुरतिक्रमः ।' असे एक श्रेष्ठवचन आहे, त्याप्रमाणे निरंतर असणे हा आत्म्याचा स्वभाव आहे. त्यामध्ये कधीही बदल होत नाही. सृष्टी ही मर्त्य आहे. ती कदापि अमर होणार नाही. कारण मरण हा पृथ्वीचा स्वभाव आहे. म्हणून जन्मतः ज्याचा जो स्वभाव आहे तो कधीही बदलत नाही, असे व्यवहारातसुद्धा म्हणतात.


श्लोक-स्वभावेनामृतो यस्य भावो गच्छति मर्त्यताम् ।
कृतकेनामृतस्तस्य कथं स्थास्यति निश्चलः ॥ २२ ॥


अर्थ- स्वभावतः जो अमर आहे तो जन्ममरणादी धर्मांनी व्याप्त होतो असे काही पंडित म्हणतात. कर्म आणि उपासना यांच्या योगे निर्माण केलेले अमृतत्व निरंतर आणि अनंत कालपर्यंत टिकणारे कसे होईल ?

स्वभावतः अमर अमृतमय असणारा आत्मा मर्त्य आहे अशी धारणा करून वेदोक्त कर्में करून किंवा उपासना करून त्याला अमरत्व प्रदान करण्याचा प्रयत्न केला तर ते तरी कसे टिकेल ? कारण 'उपजे ते नाशे' हा सृष्टीचा धर्म आहे. ज्ञानेशांनी एका निराळ्याच प्रकारे हा विषय स्पष्ट केला आहे. देव आणि दानवांनी क्षीरसागराचे मंथन करून अमृत निर्माण केले. ते देवांना प्राशन करावयास मिळाले म्हणून त्यांना अमर असे म्हणतात. त्या अमरत्व प्रदान करणाऱ्या अमृताची अवस्था आणि परिणाम सांगताना ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात -

जें कालकूटाचे सहादेर । जे मृत्युभेणे प्याले अमर ।
तरी दिहाचे पुरंदर । चौदा जाती ॥ १९२
ऐसा कवण एकु क्षीराब्धीचा रसु । जया वायांचि अमृतपणाचा आभासु ।
तयाचाहि मिठांशु । जे पुरे म्हणो नेदी ॥ ज्ञाने. १०-१९३.

ज्या क्षीरसागरातून कालकूट नावाचे विष निर्माण झाले त्याच सागरातून अमृत निर्माण झाले म्हणून अमृत हा कालकूटाचा भाऊ होय. तसे पाहिले तर क्षीरसागराच्या एका रसाला अमृत हे नाव ठेविले आहे. ते प्राशन करताना पुरे म्हणवत नाही. असे हे अमृत देव प्याले आणि अमर झाले. या देवांचा राजा इंद्र. तो या देवांच्यापेक्षा मोठा. तो तरी अमर असावा ! तो देखील नाही. कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात तो चौदा वेळा जन्म घेतो आणि चौदा वेळा मरतो.

याप्रमाणे या क्षीराब्धीच्या रसाला जरी अमृत हे नाव ठेवून त्याला अमर्त्याचे गुण बहाल केले, तरीही त्याचा परिणाम काही अमरत्व देत नाही. कारण अमृत हे निर्माण झालेले आहे, त्यामुळे त्याला मरणधर्म आहे. आपल्या स्वभावाप्रमाणे ते इतरांवर परिणाम करते. या निर्माण केलेल्या क्षीररसाला कर्म आणि उपासनेच्या योगाने पंडितांनी अमरत्व प्राप्त करून दिले म्हणून ते आपला गुण आणि अवस्था भारीच सोडणार आहे ? त्याप्रमाणे जो अजन्मा आहे त्याला जन्माला आणण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्या मूळच्या स्वभावात मुळीच फरक होणार नाही.


श्लोक-भूततोऽभूततो वाऽपि सृज्यमाने समाश्रुतिः ।
निश्चितं युक्तियुक्तं च यत्तद्‌भवति नेतरत् ॥ २३ ॥


अर्थ- या सृष्टीची उत्पत्ती भूतजन्य आहे असे काही म्हणतात तर काही अभूतजन्य आहे म्हणतात, असे श्रुतीचे वचन आहे. हे कथन एकाच तात्पर्याचे आहे. श्रुतीला न्याय्य वाटणारे तेच तत्त्व कथन केले आहे. तेच खरे आहे. याशिवाय इतर तत्त्व नाही.

उपरोक्त श्लोकात एक शंका निर्माण करण्यात आली आहे. सृष्टीची उत्पत्ती झाली असे सांगणारी श्रुती आहे तर सृष्टीची उत्पत्ती नाही अशीही श्रुती आहे. यांपैकी खरे काय ? सृष्टीच्या उत्पत्तीसंबंधाने आरंभवाद, परिणामवाद आणि विवर्तवाद अशा प्रकारचे तीन वाद पंडितांमध्ये आहेत. या तीन वादांचे सामान्य स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
१) आरंभवाद- कोणतीही जड वस्तू निर्माण होते. काही काळ ती राहाते. त्या काळात काही तिच्या संबंधात व्यवहार घडतात आणि त्यानंतर ती वस्तू नाश पावते.
२) परिणामवाद - जी गोष्ट निर्माण झाली तिला काहीतरी कारण आहे आणि या कारणाचा परिपाक म्हणजे दृश्य वस्तूची निर्मिती. कारण आणि कार्य यांचा निश्चितपणे संबध असतो. तसा तो नसेल तर कार्य घडणार नाही.
३) विवर्तवाद - अर्धवट प्रकाशात पडलेल्या दोरीवर पाहणाऱ्याला त्या दोरीच्या ऐवजी निराळेच दिसते. ती दोरी सरळ असेल तर ती काठी आहे असे वाटेल. वेडीवाकडी असेल तर पाण्याचा ओघ असल्यासारखे दिसेल तर ती नागमोडी असेल तर ती सर्पासारखी दिसेल. दोरीवर होणारा हा भास म्हणजे विवर्तवाद होय.

हे किंवा अन्य सर्व वाद अज्ञानजन्य आहेत. त्यामुळे सृष्टी उत्पन्न झाली किंवा केली असे म्हटले जाते. वस्तुतः ही चर्चा आत्म्याचे अजत्व स्पष्ट करण्यासाठी आहे.

श्लोक-नेह नानेति चाऽम्नायादिन्द्रो मायाभिरित्यपि ।
अजायमानो बहुधा मायया जायते तु सः ॥ २४ ॥


अर्थ- या ठिकाणी नानात्व नाही. इन्द्र मायेच्या योगे निरनिराळी रूपे धारण करतो. अजन्मा आत्मा मायेच्या रूपाने अनेकरूपी होते. हा सर्व मायेचा खेळ आहे.

खरोखर ईश्वराने सृष्टी निर्माण केली असे म्हटले जाते. अर्थात असणे आणि म्हणणे यामध्ये फार मोठे अंतर आहे. असणे ही सत्य अवस्था असून म्हणणे ही सत्य अवस्था असतेच असे नाही. ज्याला लांबी अगर रुंदी ही मोजमापे नाहीत तो बिन्दु किंवा शून्य होय. परंतु खडूने फळ्यावर काढलेल्या बिन्दूला मोजमाप आहे. तो बिन्दू नसतानासुद्धा आपण त्याला बिन्दू म्हणतो. त्यामुळे सत्य आगळे आहे. ह्या सत्याची जाणीव इंद्रियांना व्हावी म्हणून इंद्रियांच्या नानात्वामुळे नानात्व प्रत्ययाला येते. वस्तुतः नानात्व हा कल्पनेचा आसरा आहे. उपरोक्त कारिकेत 'इंद्रो मायाभिः ।' ह्या श्रुतिवचनाचा निराळ्या प्रकारे उपयोग करून इंद्रजाल म्हणजे सत्यत्व नव्हे याचा प्रत्यय आणून देण्यात आला आहे. इंद्रजालामुळे भय, आनन्द, आश्चर्यादी विकार उद्‌भवतात. परंतु इंद्रजाल हे सत्य नाही याची ज्याला खात्री झाली त्याच्या ठिकाणी या विकारांना थारा मिळत नाही. सृष्टी हा मायेचा खेळ आहे. ती सत्य असती तर श्रुतीने ते नाकारले नसते. उलट श्रुती या विविधतेचा निषेधच करते. ती अभूता म्हणजे न जन्मलेलीच आहे, असा श्रुतीचा अभिप्राय आहे. आत्मा जन्मशून्य आहे. तरी देखील तो जन्माला आला असा अभिप्राय व्यक्त केला जातो. ('अजायमानो बहुधा विजायते ।') अजत्व आणि जन्म ह्या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी संभवत नाहीत, त्याप्रमाणे आत्मभेद केवळ मायिक आहे. वस्तुतः तो नाही. ज्याला हे सत्य प्रत्ययाला येते तो शाब्दिक सुख-दुःखाच्या भोवऱ्यात सापडत नाही.
तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥ ईशावास्य. ७
एकत्वामध्ये सुखता आहे, परंतु नानात्वभावामध्ये शोक-मोहादिकांचा पगड़ा पडतो.


श्लोक-संभूतेरपवादाच्च संभवः प्रतिषिध्यते ।
को न्वेनं जनयेदिति कारणं प्रतिषिध्यते ॥ २५ ॥


अर्थ - उत्पन्नत्वाचे तत्त्व मान्य नसल्याने श्रृतीने संभूतीचा निषेध केला आहे. या आत्म्याला कोण उत्पन्न करणार म्हणून निषेध केला आहे.

ईशावास्योपनिषदात 'अन्धं तमः प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ।' असे म्हटले आहे. ज्याचा जन्मच संभवत नाही त्याला असंभूती आणि ज्याला जन्म आहे असे मानले जाते त्याला संभूती असे म्हणतात. उपरोक्त श्लोकात जी गोष्ट जन्म पावलीच नाही ती जन्म पावली असे समजून तिची उपासना करणारे अंधःकाराच्या दिशेने मार्गक्रमण करतात, अज्ञानाकडे जातात असा या श्रुतीचा स्पष्ट अभिप्राय आहे. म्हणूनच प्रस्तुतच्या श्लोकांत असा विचार करण्यात आला आहे की, जे मूलतः नाही ते आहे असे मानणाऱ्या विचाराचा निषेध केला आहे. थोडक्यात, खंडन केले आहे. जो जीव नित्य आहे त्याला जन्माला घालणारा कोण ? दोरीवर सर्पाचा आरोप केला जातो तो पूर्णतः अज्ञानजन्य आहे. हे अज्ञान नष्ट झाले म्हणजे दोरी सर्प नसून दोरी ही दोरीच आहे याची संपूर्ण जाणीव होते. सर्पाचा जन्म अज्ञानातून झाला. या प्रक्रियेचा या ठिकाणी निषेध केला आहे.


श्लोक- स एष नेति नेतीति व्याख्यातं निह्णुते यतः ।
सर्वमग्राह्यभावेन हेतुनाऽजं प्रकाशते ॥ २६ ॥


अर्थ- परमात्मा असा नाही, "नेति नेति" असे म्हणून परमात्मविस्ताराचे श्रुती खंडन करते. याचाच अर्थ असा की, वाणी वगैरे इंद्रियांस आत्मा न समजणारा आहे.

श्रुतीने परमात्मरूपाचे वर्णन केलेले आहे. अर्थात ते वर्णन पारमार्थिक आहे असे वाटते; परंतु तसे ते नाही. ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचे तर -
पैं शून्य जैं दावावें जाहलें । तरी बिंदुले पाहिजे एक केलें ।
तैसें अद्वैत सांगावें बोलें । तें द्वैत कीजे ॥ ज्ञाने.१३-८८७
शून्य समजावून देण्यासाठी एक वर्तुळ काढून असे सांगावे लागते की, या परिघाच्या रूपाने ज्या मर्यादा दाखविल्या आहेत या मर्यादा ज्या ठिकाणी संपतात त्याला शून्य असे म्हणतात. त्याप्रमाणे श्रुतीने केलेले परमात्म्याचे वर्णन हे केवळ प्राकृतिक आहे. असे नाही, असे नाही असे सांगत श्रुतीने वर्णन केलेले आहे. वस्तुतः ते सांगता येण्यासारखे नाही म्हणूनच नकारात्मक वर्णनाचा आशय श्रुतीला करावा लागला. वाणी वगैरे इंद्रियांना तेथपर्यंत पोहोचताच येत नाही. ज्ञानेश्वरांनी याबाबत आपले मत स्पष्ट करताना एक रम्य दृष्टान्त दिला आहे.
ऐलीच थडी न पवतां । पळे जो माघौता ।
तया पैलद्वीपीची वार्ता । काय होय ॥ ज्ञाने.१३-८४३
अलीकडील तीरावर न पोहोचताच मधूनच जो परत फिरला त्याला नदीच्या पलीकडे काय आहे हे कसे ज्ञात होईल ? त्याप्रमाणे जो आत्मा इंद्रियांना अगोचर आहे त्या इंद्रियांना तो कसा आहे हे विचारण्यात काय अर्थ आहे ? ते त्यांच्या मर्यादेच्या बाहेर आहे. आत्मवस्तू दाखविण्यासाठी निरनिराळ्या वस्तूंचा निर्देश केला आहे. त्याचे मुख्य कारण, जीवाने त्या वस्तूंच्या मार्फत आत्मरूपाचा शोध घ्यावा. आत्मबोध झाला म्हणजे ह्या सर्व वस्तू आपोआपच बाजूस पडतात. त्याची दखल आत्मज्ञानी घेत नाहीत. हा आशय स्पष्ट करण्यासाठी श्रुतीने निषेधात्मक विधान केले आहे.


श्लोक-सतो हि मायया जन्म युज्यते न तु तत्त्वतः ॥
तत्त्वतो जायते यस्य जातं तस्य हि जायते ॥ २७ ॥


अर्थ- सत् वस्तूला जन्म आहे असे म्हटले तर तो जन्म मायेमुळेच झालेला आहे. तत्त्वतः तो जन्म नाही. सत वस्तुचा जन्म होतो असे म्हटले तर सिद्ध वस्तूच जन्माला आली असे होईल.

आत्मा अजन्मा आहे. तो नित्य आहे. आत्मा जन्म पावला असे म्हणणे तत्त्वतः खरे नसते. आत्मा जन्माला येतो असे काही लोक समजतात परंतु ते खरे नव्हे. नित्य सत्य असणाऱ्या परमात्म्याने हे जगत् निर्माण केले असे जेव्हा म्हटले जाते तेव्हा अज्ञानी लोकांच्या भ्रांतीचा तो विलास आहे असे समजावे. एकमेव असलेला आत्मा विकृत कसा होईल, जगाची उत्पत्ती कशी करील किंवा जगाचा लय कसा करील ? हे संभवत नाही. हा सर्व मायेचा खेळ आहे, सर्व मायेचे प्रकार आहेत.


श्लोक-असतो मायया जन्म तत्त्वतो नैव युज्यते ।
वन्ध्यापुत्रो न तत्त्वेन मायया वाऽपि जायते ॥ २८ ॥


अर्थ- जी सत्य वस्तू आहे तिचा जन्म मायेने कधीही होत नाही. तत्त्वतः तर हा जन्मच होत नाही. वंध्यापुत्र तत्त्वतः कधी जन्माला येत नाही, परंतु मायेने मात्र येऊ शकतो.

तत्त्वतः जी वस्तू नाही तिच्यापासून दुसरी वस्तू जन्म पावली, किंवा जे मुळातच नाही त्यापासून एखाद्या गोष्टीचा उद्‌भव झाला असे म्हणणे तत्त्वतः ज्याप्रमाणे अर्थशून्य आहे त्याप्रमाणे आत्म्याला जन्म आहे किंवा आत्म्यापासून जन्म झाला असे म्हणणे निरर्थक आहे. वंध्या स्त्री अपत्याला जन्म देऊ शकेल का ? कदापि नाही. मायेमुळे वंध्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली असे म्हटले तर ते ज्याप्रमाणे सत्यालाप करणारे आहे त्याचप्रमाणे अविकारी आत्मा नावाच्या वस्तूपासून विकारी सृष्टी निर्माण झाली हे म्हणणे सत्यालाप करणारे आहे.


श्लोक-यथा स्वप्ने द्वयाभासं स्पन्दते मायया मनः ।
तथा जाग्रद्‌द्वयाभासं स्पन्दते मायया मनः ॥ २९ ॥


अर्थ- स्वप्नामध्ये मायाबलाने मन द्वैताचा आश्रय करते, द्वैत निर्माण करते. त्याचप्रमाणे जागृत अवस्थेतसुद्धा मन द्वैताचा भास निर्माण करते.

गाढ झोप लागण्यापूर्वी आपली नेत्रादी सर्व इंद्रिये विश्रांती पावतात, त्यामुळे बाहेरचे सर्व विश्व इंद्रियांना अदृश्य होते. अशा वेळी मन मात्र जागृत असते. हे मनच आपले विश्व निर्माण करते.

आपणच द्रष्टा होऊन त्याकडे पाहते. यामुळे द्रष्टा दृश्य हा व्यवहार घडतो. अर्थात मनाच्या चंचल स्वभावामुळे तो घडतो. जे स्वप्नात घडते तेच जागृतीतही मनाकडूनच घडते. स्वप्न आणि जागृती या दोन्ही अवस्थांमध्ये मन स्वतःच्या व्यापारामुळे द्वैत निर्माण करते. सर्व इंद्रिये जागृत असता द्वैत निर्माण करण्याचे कार्य मायाबद्ध मनाचे असते. इंद्रिये व्यापार करीत आहेत, परंतु मन मात्र त्या व्यापाराच्या मागे नाही, अशी स्थिती असेल तर द्वैत निर्माण होत नाही. परंतु इंद्रिये व्यापारमग्न असता मन द्वैताचा भास निर्माण करते, याचाच अर्थ असा की, मन द्वैताचा आश्रय करते. मन हे अज्ञानाचे कार्य असून चंचलत्वामुळे ते आपले अज्ञान कायम ठेवते. आभास निर्माण करणे हे द्वैत आहे. आभास हा मायेमुळे निर्माण होतो. थोडक्यात, 'मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयोः ।' मनच मनुष्याच्या संसार आणि मोक्षाला कारणीभूत होते. मायाविलास निर्माण करून तो पाहणे आणि त्यात रममाण होणे हा या मनाचा स्वभाव आहे.


श्लोक-अद्वयं च द्वयाभासं मनः स्वप्ने न संशयः ।
अद्वयं च द्वयाभासं तथा जाग्रन्न संशयः ॥ ३० ॥


अर्थ- स्तुतः अद्वय असणारे मन स्वप्नामध्ये द्वैताभासाने भासते यात शंका नाही, त्याप्रमाणे जागृतीतही मन एकटे असता द्वैतमय भासते यात संशय नाही.

मन हे आत्म्याचे प्रतिबिंब असल्याने त्यामध्ये द्वैताभासाचा संबंध येत नाही. तरीही केवळ मायेच्या आवरणामुळे जो आभास निर्माण होतो त्यामुळे मने दोन प्रकारची आहेत असे संबोधले जाते. स्वप्नामध्ये ते दोन रूपांनी भासमान होते. स्वप्नात पाहिलेले दृश्य वस्तुतः आत असते काय ? मात्र ते दृश्य स्वप्नामध्ये असल्याप्रमाणे सत्यपणाने भासमान होते. स्वप्न विज्ञानमय आहे. विज्ञानमय म्हणजे ज्ञानरूपता व अस्तित्वरुपता होय. थोडक्यात, पारमार्थिक अस्तित्व एक असता त्याच्या दोन अवस्था प्रत्ययाला येतात. याचे मुख्य कारण असे की, आत्माधिष्ठानावर मायेच्या योगाने निर्माण केलेली स्पंदने होय, जागृत अवस्थेत देखील हा द्वैताभास प्रत्ययाला येतो. अनेक लहान खड्ड्यांत साठलेल्या पाण्यात चंद्राची भिन्न प्रतिबिंबे दिसतात; परंतु सूक्ष्मत्वाने पाहिले असता हे प्रतिबिंब ज्या चन्द्राचे आहे तो चन्द्र एकच आहे. त्याप्रमाणे मायाकल्पित मन द्वैताभास निर्माण करते. वस्तुतः हा द्वैताभास असत्य आहे.


श्लोक- मनोदृश्यमिदं द्वैतं यत्किंचित्सचराचरम् ।
मनसो ह्यमनीभावे द्वैतं नैवोपलभ्यते ॥ ३१ ॥


अर्थ- दिसणारे स्थावर-जंगमात्मक जगत् हे मनःकल्पित आहे. या मनाचा व्यापार विवेकाने स्थिर झाला म्हणजे हे द्वैत भासत नाही.

जगामध्ये स्थावर-जंगमात्मक जे दृश्य दिसते ते मनाच्या संकल्प आणि विकल्प नावाच्या स्पंदनामुळे दिसते. मूळचे स्थिरभाव असणारे मन या स्पंदनांनी द्वैतभावी बनते. परंतु विवेकाने मनाची ही स्पंदने नाहीशी करता येतात. अशा प्रमाणे मनाची स्पंदने संपली म्हणजे मन स्थिर होते. ह्याच अवस्थेला श्लोकात अमनीभाव असे म्हटले आहे. ज्ञानेश्वरांनी हा विचार मांडताना साधकांना उत्तम मार्गदर्शन केले आहे आणि सिद्धांतही स्पष्ट केला आहे.
मनें मन घालुनी मागे । विश्रांती जाहलिया अंगे ।
ते देही देहाजोगे । होतीचि ना ॥ ज्ञाने. १४.५० ॥
मनाने मनाचा लय केला म्हणजे मन, देह असे द्वैत उरत नाही. मन एकच आहे याचा प्रत्यय येतो.


श्लोक-आत्मसत्यानुबोधेन न संकल्पयते यदा ।
अमनस्तां तदा याति ग्राह्यभावे तदग्रहम् ॥ ३२ ॥


अर्थ- आत्मा सत्य असून त्याबद्दलचे द्वैत हे मिथ्या आहे, असे ज्ञान होते तेव्हा मनाला संकल्प करता येत नाही. कारण मनाचा मनोभाव नाहीसा झाल्याने त्याला विषय ग्रहण करता येत नाहीत.

आत्मा एकमेव आहे. मन हे आत्म्याचे प्रतिबिंब असल्याने तेही एकमेव आहे. अग्नीचा उष्णताधर्म नाहीसा होत नाही. अग्नि आणि त्याची उष्णता भिन्न नाही. अग्नि नाहीसा झाला तर त्याची उष्णता देखील नाहीशी होते. अग्नि आणि उष्णता ज्याप्रमाणे एकच आहे त्याप्रमाणे आत्मा आणि मन एकच आहे. आत्मा म्हणजेच ब्रह्म, आनंद, सत्य सर्व काही एकच आहे.
सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म । विज्ञानानन्दम् ब्रह्म ।
ही श्रुतिवाक्येदेखील ह्या एकरूपाचाच घोष करतात. थोडक्यात, आत्म्याचे ज्ञान झाले म्हणजे द्वैताभास राहत नाही.


श्लोक- अकल्पकमजं ज्ञानं ज्ञेयाभिन्न प्रचक्षते ।
ब्रह्मज्ञेयमजं नित्यमजेनाजं विबुध्यते ॥ ३३ ॥


अर्थ- कल्पनाशून्य, जन्मरहित आणि ज्ञानमय आत्मा ज्ञेय ब्रह्मापेक्षा निराळा नाही, असे ब्रह्मज्ञानी सांगतात. ब्रह्म हे जन्मरहित, नित्य आणि जाणून घेण्यास योग्य असेच आहे. म्हणून अज ब्रह्म आणि अज आत्मा ज्ञानमय होत.

ब्रह्म कल्पनेने जाणता येत नाही त्याप्रमाणे आत्मादेखील कल्पनेने जाणता येत नाही. ब्रह्म आणि आत्मा, दोन्ही एकच आहेत. दोन्ही जन्मरहित आहेत. त्याप्रमाणे त्यांच्यामध्ये कोणताही बदल घडत नाही. हा बदल कोणत्याही काळी संभवत नाही. या कारणानेच ब्रह्माला नित्य म्हणतात. या विश्वाच्या पसाऱ्यात ज्याचे ज्ञान करून घ्यावे अशी आत्मा किंवा ब्रह्म ही एकमेव वस्तू आहे. म्हणून ब्रह्माचे ज्ञान करून घ्यावे असे ज्ञाते लोक म्हणतात.


श्लोक-निगृहीतस्य मनसो निर्विकल्पस्य धीमतः ।
प्रचारः स तु विज्ञेयः सुषुप्तेऽन्यो न तत्समः ॥ ३४ ॥


अर्थ - संयमित केलेल्या संकल्पशून्य आणि विवेकी मनाची अवस्था साधकांनी ज्ञात करून घ्यावी. ही अवस्था झोपेतील लय नामक अवस्थेसारखी नसून त्याच्यापेक्षा ती भिन्न आहे.

आत्मा ही नित्यवस्तु असल्याचे ज्ञान झाल्यामुळे, केवळ संकल्पामुळे निर्माण झालेले बाह्य विषयदेखील नष्ट होतात. अर्थात या स्थितीमुळे मन संयमित आणि संकल्पशून्य बनते. इंधन मिळाले नाही म्हणजे अग्नि ज्याप्रमाणे शान्त होतो त्याप्रमाणे संकल्पाच्या अस्तित्वामुळे प्राप्त होणारे विषय मनाला स्पर्श करीत नाहीत. त्यामुळे मन संकल्पशून्य आणि शान्त होते. विविध विषयांच्या सान्निध्यामुळे झोपलेले मनसुद्धा बंदिस्त असते परंतु विषयशून्य मन मात्र नेहमी स्वतंत्र असते. विषयांचा ध्यास घेणारे संसारी मन नेहमी चंचल असते, तळमळत असते, तर विषयांपासून अलिप्त असलेले मन नेहमी शान्त आणि स्वतंत्र असते. ज्या मनावर संकल्प-विकल्पनात्मक स्पंद निर्माण होत नाहीत असेच मन स्पंदनशून्य, नित्य, शाश्वत अशा ब्रह्माचा ध्यास घेऊ शकते.


श्लोक-लीयते हि सुषुप्तौ तन्निगृहीतं न लीयते ।
तदेव निर्भयं ब्रह्म ज्ञानलोकं समन्ततः ॥ ३५ ॥


अर्थ- झोपेमध्ये मन लीन होते, नष्ट होत नाही. परंतु विवेकी ब्रह्मज्ञ मन मात्र लीन न होता आत्म्यामध्ये एकरूप होते. अशा निग्रहित मनाची अवस्था निर्भय आणि ज्ञानमय होते.

निद्रा आणि उन्मनी या दोन अवस्थांमध्ये असणारे भेद या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहेत. 'सुषुप्तौ लीयते मनः ।' झोपेमध्ये मन केवळ लीन होते. त्या मनासमावेत वासना, विकार, विचार यांची सामग्री असते. ती सामग्री लीन झालेल्या मनामध्ये समाविष्ट असल्याने मन अमन अवस्थेत कधीही येत नाही. बीजरूपाने हे सर्व विकार लीन झालेल्या मनात बीजरूपाने कायम स्वरूपात असतात. ते त्यांना संधी प्राप्त होताच पुन्हा मन ग्रासून टाकतात. याला आचार्यांनी एक समर्पक दृष्टान्त दिला आहे. उन्हाळ्यात गवत काढून टाकले की शेत स्वच्छ होते; परंतु त्या स्वच्छ शेतावर पावसाचे पाणी पडताच तेच शेत गवतमय होऊन जाते. कारण गवत नाहीसे केले तरी त्या गवताचे बी नाहीसे केलेले नाही. त्यामुळे त्या बीजाला पाण्याचा आसरा मिळताच ते उगवते. त्याप्रमाणे झोपेमध्ये मन लीन पावते. त्याचे व्यापार काही काळ थांबतात. ते पूर्णपणे नाहीसे होत नाहीत. ते मन जागृतीत आले म्हणजे पुन्हा विषयविचार चालू होतात. परंतु संकल्प आणि विकल्प पूर्णतः नाहीसे झाले म्हणजे सांसारिक विषय आणि विकार यांचे बीजच जळून जाते. त्यामुळे अशा मनाचा मनुष्य प्रापंचिक पसाऱ्यात असला तरी या विषयांचा उदय होत नाही. मनाच्या ह्या अवस्थेस अमनी, उन्मनी अवस्था म्हटले जाते. ही उन्मनी अवस्था विवेकाने प्राप्त होते. ब्रह्मज्ञ अवस्थेमध्ये या अवस्थेला विषेश महत्त्व आहे. म्हणूनच या स्थितीचा विचार या ठिकाणी मुद्दाम करण्यात आला आहे.


श्लोक-अजमनिद्रमस्वप्नमनामकमरूपकम् ।
सकृद्विभातं सर्वज्ञं नोपचारः कथंचन ॥ ३६ ॥


अर्थ- ब्रह्म हे जन्मशून्य, अज्ञानशून्य (ज्ञानमय), स्वप्नशून्य, नामरूपरहित, नित्यप्रकाशी आणि सदैव ज्ञानरूप आहे. याचे ज्ञान झाल्यावर अन्य कोणत्याही उपचारांची आवश्यकता नाही.

या श्लोकातील वर्णन ब्रह्माचे आहे. खरे पाहिले असता 'यतो वाचो निवर्तन्ते' या वचनाप्रमाणे ब्रह्माचे वर्णन करणे अशक्य असतानासुद्धा श्लोकातील विशेषणांनी त्याचे वर्णन करण्यात आले आहे. याचा खरा आशय असा आहे की, साधकांनी परब्रह्माचा अनुभव घ्यावा. केवळ त्याचे वर्णन करून ते ब्रह्म अनुभवाला येईल असे नाही. सूर्याला ज्याप्रमाणे रात्र-दिवस, उगवणे-मावळणे, उजेड-अंधार माहीत नाहीत त्याप्रमाणे ब्रह्मालादेखील या विशेषणांनी मर्यादित करता येत नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त न झालेल्या लोकांसाठी हे मार्गदर्शन आहे. अज्ञानी लोक कोणत्याही प्रकारच्या भासाला साक्षात्कार म्हणतात आणि त्या भासाचा अनुभव घेऊन कृतार्थ झाल्याचे मानतात. तसे होऊ नये. साक्षात्कार ही अगदी निराळी अवस्था आहे. त्याप्रमाणे ब्रह्म ही देखील एक निराळी अवस्था आहे. याची जाणीव साधकांना व्हावी हा या श्लोकाचा उद्देश आहे.

या श्लोकात 'अनिद्रम्' असे एक पद आहे. या पदाचा शब्दशः अर्थ निद्राशून्य असा आहे. अर्थात गौडपादाचार्यांना सांसारिक निद्रा या ठिकाणी अपेक्षित नाही. निद्रा म्हणजे अज्ञान होय. श्रीमत् भगवद्‌गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील ६९ व्या श्लोकावर व्याख्यान करतांना ज्ञानेश्वरांनी जो अभिप्राय व्यक्त केला आहे तो या ठिकाणी विचारात घेणे आवश्यक आहे.

देखे भूतजात निदेले । तेथेचि जया पाहलें ।
आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रितु जो ॥ ज्ञाने २.३५५.
ज्या आत्मस्वरूपाच्या बाबतीत सामान्य माणसे निद्राधीन झालेली असतात त्या ठिकाणी ब्रह्मविद लोक झोपेच्या अधीन झालेले असतात. ज्ञानानेच केवळ ब्रह्म जाणता येते. सूर्यानेच सूर्य जाणता येतो. त्याप्रमाणे ज्ञानानेच ब्रह्म जाणता येते. ब्रह्म हे ज्ञानरूप आहे. अज्ञानाने ते जाणता येत नाही. म्हणून 'अनिद्रम्' या पदाने विशेष खुलासा करण्यात आला आहे.


श्लोक- सर्वाभिलापविगतः सर्वचिन्तासमुत्थितः ॥
सुप्रशान्तः सकृज्ज्योतिः समाधिरचलो भयः ॥ ३७ ॥


अर्थ- ज्या ठिकाणी वाणीचे काम थांबते. चित्ताच्या अभावामुळे चिंतेचा ज्या ठिकाणी संभव नाही, ज्या ठिकाणी सर्वथैव शान्तताच आहे, ज्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा प्रकाश असतो ते निर्भय, निर्विकार ब्रह्म होय. या अवस्थेलाच समाधी असेही म्हणतात.
ज्या ठिकाणी मन, बुद्धी, चित्त, अहंकार पूर्णपणे नष्ट होतात तो आत्मा अत्यंत शुद्ध आहे. या ठिकाणी वाणीने वर्णन करता येण्यासारखी स्थिती नाही. चित्त या ठिकाणी पोहोचत नाही. नव्हे, त्याचा अभावच निर्माण होतो. त्यामुळे चंचलता नसते. केवळ ज्ञानमय अशी एकमेव अवस्था असते ती समाधी होय. तीव्र प्रकाशामध्ये अन्य वस्तूंचे तेज ज्याप्रमाणे लोप पावते त्याप्रमाणे ज्ञानमय अवस्थेत अन्य कोणत्याही अवस्थेचे वर्णन नसते. यालाच ब्राह्मी अवस्था असेही म्हणतात.


श्लोक-ग्रहो न तत्र नोत्सर्गश्चिन्ता यत्र न विद्यते ।
आत्मसंस्थं तदा ज्ञानमजाति समतां गतम् ॥ ३८ ॥


अर्थ- ज्या ठिकाणी निश्चिंतता असते, कोणत्याही वस्तूचा स्वीकार अगर त्याग संभवत नाही तेव्हा आत्मविषयक ज्ञान, जन्मशून्य आणि सर्वत्र समदर्शक होते.

ब्रह्म अचल आहे. त्यामुळे त्या ब्रह्माच्या ठिकाणी व्यवहार संभवत नाही. ते अविकारी असल्याने देणे-घेणे हा विकार तिथे संभवत नाही. ब्रह्माने कशाचा स्वीकार करावयाचा आणि कशाचा त्याग करावयाचा, ही स्थिती या ठिकाणी संभवत नाही. म्हणून अशा आत्मस्वरूपाचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे. हे ज्ञान ज्याला करून घेण्याची इच्छा नाही किंवा जो करून घेत नाही तो कृपण होय, असा अभिप्राय महर्षी याज्ञवल्क्यांनी व्यक्त केला आहे. आपली पत्नी गार्गी हिला ब्रह्माचे वैभव सांगताना हा विचार त्यांनी स्पष्ट केला आहे.*
[[* १. यो वा एतदक्षरं गायविदित्वास्माल्लोकात् प्रैति स कृपणः ॥
आत्मज्ञानी कृतकृत्य असतो, जीवनमुक्त असतो असा अभिप्राय. ]]


श्लोक- अस्पर्शयोगो वै नाम दुर्दर्शः सर्वयोगिभिः ।
योगिनो बिभ्यति ह्यस्मादभये भयदर्शिनः ॥ ३९ ॥


अर्थ- योगी लोकांना अत्यंत दुर्लभ असणाऱ्या योगाला अस्पर्शयोग असे म्हणतात. अशा अभयस्थानी भीती वाटणाऱ्या योगी लोकांना या अस्पर्शयोगाचेसुद्धा भय वाटते.

आत्मज्ञान होणे किंवा मोक्ष लाभणे हा अस्पर्शयोग होय. ह्या अस्पर्शयोगाचे ज्ञान करून घेणे हे साधकाचे खरे जीवितकार्य होय. अर्थात हा योग अत्यंत कष्टसाध्य असल्याने सामान्य मनुष्य या योगापासून दूर राहातो. इतकेच नव्हे, तर अशा योगाचा आश्रय करणे म्हणजे प्रापंचिक सुखाला मुकणे होय. प्रपंच हेच सर्वोत्तम सुख आहे, याच जाणिवेने या योगाचे त्यांना भय वाटते. या योगाने आपला नाश होईल अशी विपरीत भावना सामान्यांची बनते. अशा लोकांना अस्पर्शयोग साध्य होत नाही. त्यांना श्रुतीने अविवेकी असे म्हटले आहे.


श्लोक-मनसो निग्रहायत्तमभयं सर्वयोगिनाम् ।
दुःखक्षयः प्रबोधश्चाप्यक्षया शान्तिरेव च ॥ ४० ॥


अर्थ- मनाच्या निग्रहामुळे योगी लोकांना अभय प्राप्त होते. त्यांच्या दुःखाचा नाश होतो, त्यांना चिरंतन शान्ती प्राप्त होते. हे त्यांच्या मनोनिग्रहाचे फळ आहे.

ब्रह्म सत्यम् असा निश्चय झालेल्या लोकांना इंद्रियजन्य वस्तू आणि त्यांच्यापासून मिळणारे भोग केवळ कल्पित आहेत. त्यांना अस्तित्वच नाही, असे निश्चित स्वरूपाचे ज्ञान होते. अशा जाणिवेने ब्रह्मरूप झालेल्या लोकांना हा अस्पर्शयोग सहज साध्य होतो. या लाभामुळे ते स्वतः भयशून्य आणि शान्त होतात. अर्थात त्यामुळे प्रापंचिक अवस्थेमध्ये राहूनसुद्धा त्यांना कोणताही त्रास होत नाही. किंवा अशा सर्व प्रकारच्या त्रासांपासून त्यांना मुक्ती प्राप्त होते. आत्मजिज्ञासूंना निष्काम कर्माने चित्तशुद्धी करता येते. ज्याची चित्तशुद्धी झाली आहे तोच या अस्पर्शयोगाचा अधिकारी होय. मनोनिग्रह करून चित्तशुद्धीचा हे लोक अखण्ड प्रयत्न करतात. त्यामुळे उत्तरोत्तर त्यांना शान्तीचा लाभ होत जातो आणि अखेर ते स्वतः निर्भय, शान्त आणि दुःखशून्य होऊन आत्मज्ञानी होतात. यालाच मोक्ष अशीही संज्ञा आहे.


श्लोक- उत्सेक उदधेर्यद्वत्कुशाग्रेणैकबिन्दुना ।
मनसो निग्रहस्तद्वद्‌भवेदपरिखेदतः ॥ ४१ ॥


अर्थ- दर्भाच्या टोकावर राहील अशा जलबिंदूने सागरही आटविता येतो, त्याप्रमाणे खेद-दुःखाचा विचारही न करता केलेल्या श्रमाने मन निग्रही बनते.

एका दर्भाच्या टोकावर राहील असे समुद्रातील पाणी काढण्याचा प्रयत्न केला तर सागरसुद्धा आटविता येईल. या उदाहरणाच्या मागे आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी लागणारे निग्रही मन तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या कष्टाचे, प्रयत्नाचे आणि हे कष्ट किती काळ करावे लागतील याचे मार्मिक मार्गदर्शन या श्लोकात पु. पा. गौडपादाचार्यांनी केले आहे. दर्भाच्या टोकावर केवळ एक लहानसाच पाण्याचा थेंब राहू शकेल. या थेंबाच्या मापाने समुद्रातले सर्व पाणी उपसणे किती कष्टाचे आणि अशक्यप्राय काम आहे ! परंतु हे कामदेखील अशक्य नाही असा अर्थ ध्वनित करून ब्रह्माची प्राप्ती कशी अवघड आहे ते दर्शविले आहे. भगवान श्रीकृष्णांनी 'बहूनाम् जन्मनामन्ते' या गीतेतील आपल्या अभिप्रायाचे हेच चित्र उभे केले आहे. यामध्ये एक मोठा दिलासा आहे; आणि तो म्हणजे हे सर्व प्रयत्न निष्फळ होणारे नव्हेत, ध्यानासाठी डोळे मिटले तर अंधःकाराशिवाय काहीही मिळत नाही. तेच डोळे उघडे ठेवले तर सर्व प्रापंचिक वस्तू आपले लक्ष वेधून घेतात. असे असताना मिटल्या डोळ्यांना अंधार न दिसता प्रकाश दिसेल आणि प्रापंचिक वस्तूमध्ये वस्तूच्या नाम-वर्ण-आकाराशिवाय वस्तूचा अनुभव येईल, असा अविश्रांत प्रयत्न करणे जरूर आहे. याप्रमाणे निश्चय करून प्रयत्न केल्यास निग्रही मन तयार होते.


श्लोक- उपायेन निगृह्णीयाद्विक्षिप्तं कामभोगयोः ।
सुप्रसन्नं लये चैव यथा कामो लयस्तथा ॥ ४२ ॥


अर्थ- काम आणि भोग यांमध्ये लिप्त झालेले मन ओढून बाहेर काढावे किंवा झोपेमध्ये सुखाचा आस्वाद घेणारे मनही बाहेर आणावे लागते. कारण काम हा जसा मोक्षाविरुद्ध आहे तसेच मनाने झोपेत सुख भोगणेदेखील मोक्षविघातक आहे.

ज्या मनाला संयम नाही ते मन डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींचा विचार करते. त्या वस्तूंशी ते इतके एकरूप झालेले असते की, त्या मनाला तिथून बाहेर काढणे फारच त्रासाचे काम आहे. ज्ञानेश्वरमहाराजांनी अशा या मनाला सोकावलेले मन असे म्हटले आहे. सोकावणे ह्या शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. मांजर हळू पायांनी स्वयंपाक-घरात प्रवेशते आणि दूध पिते. अशा मांजराला पुन्हा पुन्हा शिक्षा केली तरी ते आपला चोरून दूध पिण्याचा स्वभाव सोडीत नाही. अशा मांजराला आपण हे मांजर सोकावले आहे असे म्हणतो. याप्रमाणे या मनाला अमूक एक गोष्ट करू नको म्हणून बजावले की ते मन तेवढेच विसरते आणि करू नये ते मुद्दाम करते. अशा या सोकावलेल्या मनाला ओढून बाजूला करण्यासारखा अन्य उपाय नसतो. याचा विचार उपरोक्त श्लोकात आहे. मनाने भगवंताकडे जावे असे ठरविले. त्याप्रमाणे प्रयत्नही सुरू केला. परंतु हे सोकावलेले मन केवळ जागृतीतच नव्हे तर स्वप्नातसुद्धा भगवंताचा विचार करीत नाही. ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे ह्या मनाला अभ्यासाने एखाद्या गोष्टीची गोडी लावावी लागते. त्या मनाशी मस्ती करून चालत नाही. अत्यंत खट्याळ असणाऱ्या या मनाच्या बाबतीत बोलताना त्याच्याजवळ असलेल्या एका गुणाची ज्ञानेश्वर प्रशंसा करतात आणि त्याचा उपयोग करून मनाला ईशगामी करावें असे सांगतात.

परि यया मनाचे एक निकें । जे हे देखिलिया गोडीचिया ठाया सके ।
म्हणोनि अनुभवसुखाची कवतिकें । दावीत जाईजे ॥ ज्ञाने. ६.४२०

ज्या गोष्टींची मनाला गोडी लावावी त्या ठिकाणी ते पुन्हा पुन्हा येते, म्हणून त्या मनाला ईश्वराच्या प्रेमाची गोडी लावीत जावे. काही दिवसांत त्याला प्रपंचाचा कंटाळा येईल आणि ते मन परमार्थात रममाण होईल. अशा प्रकारे मनाला एका अवस्थेतून कल्याणमय अवस्थेत आणणे अत्यंत आवश्यक आहे.


श्लोक-दुःखं सर्वमनुस्मृत्य कामभोगानिवर्तयेत् ।
अजं सर्वमनुस्मृत्य जातं नैव तु पश्यति ॥ ४३ ॥


अर्थ- काम आणि भोग दुःखमय आहेत ते जाणून मनाला त्यांच्यापासून निवृत्त करावे. हे सर्व जन्मरहित आहे असा मनाने ध्यास घेतला म्हणजे जन्म-मरणरूपी क्रिया देखील आपणास दिसणार नाहीत.

मनाला ईशमार्गी करण्यासाठी कोणता उपाय करावा याचे विश्लेषण या श्लोकात आहे. मनाला असे शिकवावे की, हे सर्व भोग दुःखमय आहेत. त्या भोगांपासून तू निवृत्त हो. त्याचप्रमाणे सर्व जन्मरहित आहे. याचे त्याला सतत चिंतन करावयाला शिकवावे. या सतत चिंतनाचा परिणाम पुढे पुढे असा घडतो की, जन्ममरण वगैरे सुद्धा स्थिती नाहीत याचा अनुभव प्राप्त होतो.


श्लोक-लये संबोधयेच्चित्तं विक्षिप्तं शमयेत्पुनः ।
सकषायं विजानीयात्समप्राप्तं न चालयेत् ॥ ४४ ॥


अर्थ- झोपेत लीन झालेल्या चित्ताला जागृत करावे. सतत विषयांकडे धाव घेणाऱ्या मनालादेखील शान्त करावे. मन मलिन आहे. आत्मज्ञान होईपर्यंत ते शुद्ध होत नाही.

चित्त हा मनाचा पहिला तरंग आहे. अंत:करणचतुष्ट्यांत ज्या चार तरंगांचा विचार शास्त्राने केला आहे त्यामध्ये मनाचा चिंतन हा पहिला तरंग. त्यापासून निर्माण होणाऱ्या क्रियेला चिंतन असे म्हणतात. या चित्ताला जागृत करावयाचे तर ज्या इंद्रियांच्या द्वारा मन विषयांना स्पर्श करते त्या इंद्रियांना त्या त्या विषयातील क्षणिकता आणि दुःख यांचा स्पर्श होतो. त्या स्पर्शाची जाणीव मनाने घेऊन त्यांच्यापासून पूर्णतः परंतु सावधपणे बाजूला होणे म्हणजेच मनाची किंवा चित्ताची जागृती होय. मनाला एखाद्या विषयामधील दुःख आणि त्याचे परिणाम समजले म्हणजे मन त्या विषयांच्या वाटेला जाणार नाही. मनातून विषयांचे बीज समूळ नाहीसे होईल. हे विषयबीज नष्ट झाले म्हणजे तेच आपल्या स्वभावाप्रमाणे चिरंतन सुखद अशा विषयाकडे धाव घेईल आणि त्याच ठिकाणी खिळून राहील. ब्रह्म, आत्मज्ञान, ईश हे मनाचे अंतिम ध्येय ठरते आणि त्याप्रमाणे त्या शुद्ध चित्ताचे मार्गक्रमण चालू होते.


श्लोक - नाऽऽस्वादयेत्सुखं तत्र निःसङ्‍गः प्रज्ञया भवेत् ।
निश्चलं निश्चरच्चित्तमेकीकुर्यात्प्रयत्नतः ॥ ४५ ॥


अर्थ - चित्त निर्मल झालेल्या स्थितीत सुद्धा उपभोग घेऊ नये. आपले मन सामधिस्थ ठेवून निःसंग असावे. याप्रमाणे निश्चल परंतु विषयभ्रष्ट होणारे मन आत्मरूपमय एकरूप होईल असे करावे.

अभ्यासाने मनाची समाधानी अवस्था प्राप्त होते. त्या ठिकाणी लाभणारे सुख साधकाला तिथेच गुंतवून ठेवू शकते. म्हणून साधकाने अशा सुखाकडे लक्ष देऊ नये, त्या ठिकाणी रमू नये, अशा सुखापासूनसुद्धा मनाला अलग करावे. अर्थात मनाला किंचित जरी संधी प्राप्त झाली तरी ते मन विषयाचा ध्यास घेणारे आहे, हे विसरू नये. समाधिसुखाचा अनुभव घेणाऱ्या विश्वामित्राच्या मनाला मेनकेच्या विषयाने क्षणांत भ्रष्ट केल्याचे उदाहरण परिचित आहे. हे लक्षात घेऊनच मनाचे नियंत्रण करून आत्मरूपात ते कायमचे विलीन होईल असा अभ्यास करावा.


श्लोक - यदा न लीयते चित्तं न च विक्षिप्यते पुनः ।
अनिङ्‌गनमनाभासं निष्पन्नं ब्रह्म तत्तदा ॥ ४६ ॥


अर्थ- चित्त जेव्हा लीन होत नाही, पुन्हा विक्षेपयुक्त होत नाही तेव्हा ते निष्कंप आणि विषयशून्य असते. असे चित्त ब्रह्मरूप झाले असे समजतात.

विशेष प्रकारच्या प्रयत्नांनी जागृती, स्वप्न आणि निद्रा अशा तीनही अवस्थांमध्ये मन विषयांपासून परावृत्त झाले म्हणजे निर्वात प्रदेशातील नीरांजनाप्रमाणे ते निष्पंद होते. असे झाले म्हणजे ते मन जिज्ञासू झाले असे समजावे. या मनाच्या साहाय्याने साधक ब्रह्ममय होतो.*
[[* १. ज्ञानेश्वरमहाराजांच्या खालील ओव्या ह्या दृष्टीने चिंतनीय आहेत.
युक्ति योगाचे अंग पावे । ऐसे प्रयाग होय जे बरवें ।
तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ॥ ३५७
तयातें योगयुक्त म्हण । हेंही प्रसंगें जाण ।
ते दीपाचें उपलक्षण । निर्वातीचिया ॥ ३५८
एन्हवी तरी येणे योगे । इंद्रियां विन्दाण लागे ।
ते चित्त भेटो रिगे । आपणपेयां ॥ ३६५
परतोनि पाठिमोरे ठाके । आणि आपणियातें आपण देखे ।
देखतखेवों वोळखे । म्हणे तत्त्व तें मी ॥ ३६६
तिचे ओळखीचिसरिसे । सखाचियां साम्राज्यीं बैसे ।
चित्तपण समरसें । विरोनि जाय ॥ ज्ञाने ६-३६७ ]]

ज्ञानेशांनी दिलेला हा अनुभव अत्यंत मौलिक आहे. उपरोक्त श्लोकांचा मथितार्थ ह्या ओव्यांमध्ये स्पष्ट झाला आहे.


श्लोक -स्वस्थं शान्तं सनिर्वाणमकथ्यं सुखमुत्तमम् ।
अजमजेन ज्ञेयेन सर्वज्ञ परिचक्षते ॥ ४७ ॥


अर्थ- स्वतःच्या रूपाशी एकरूप, निश्चल, अवर्णनीय, कैवल्यमय, अज, सर्वज्ञ, सर्वत्र सम आणि सर्वोत्तम हे ब्रह्मसुखाचे लक्षण आहे असे ब्रह्मज्ञ म्हणतात.

या श्लोकात वर्णन केलेली सर्व लक्षणे खरे पाहिले तर ब्रह्माची आहेत. ज्याला ब्रह्मज्ञान झाले तोच हे वर्णन करतो. अन्य कुणालाही ते अशक्य आहे. ब्रह्मापासून मिळणारे सुख हे ब्रह्माप्रमाणेच असते, हा या श्लोकाचा अभिप्राय आहे.


श्लोक - न कश्चिज्जायते जीवः संभवोऽस्य न विद्यते ।
एतत्तदुत्तमं सत्यं यत्र किंचिन्न जायते ॥ ४८ ॥


अर्थ- कोणताही जीव उत्पन्न होत नाही. त्याला उत्पन्न करणाराही कोणी नाही हे ते सर्वोत्तम सत्य होय की, या ठिकाणी काही उत्पन्न होत नाही.

मनोनिग्रहासाठी कथन केलेल्या गोष्टी कोणत्या प्रकारचे फल देतात आणि अगदी अखेर कोणत्या प्रकारचा अनुभव प्राप्त होतो, साधकाची धारणा कशी होते याचे वर्णन तात्पर्यस्वरूपात या श्लोकात ग्रथित केले आहे. 'न जायते म्रियते वा कदाचित्' हा महान सिद्धान्तच या ठिकाणी गौडपादाचार्यांनी या प्रकरणात स्पष्ट केला आहे.
प्रकरण चवथे


अलातशान्ति


या कारिकांमधील हे चवथे प्रकरण आहे. यापूर्वीच्या तीन प्रकरणांचा आढावा आचार्यांनी आपल्या भाष्यात केला आहे. या प्रकणामध्ये गौडपादाचार्यांनी द्वैतवाद्यांचे द्वैत किती फोल आहे याचा उत्तम परामर्ष घेतला आहे.


श्लोक- ज्ञानेनाकाशकल्पेन धर्मान्यो गगनोपमान् ।
ज्ञेयाभिन्नेन संबुद्धस्तं वन्दे द्विपदां वरम् ॥ १ ॥


अर्थ- आकाशाप्रमाणे अत्यंत व्यापक आणि आत्मतत्त्वाशी एकरूप असलेल्या आणि ज्याला आकाशाचीच उपमा आहे अशा आत्मतत्त्वाला जाणणाऱ्या पुरुषश्रेष्ठांना मी वन्दन करतो.

या श्लोकामध्ये आचार्यांनी आपल्या गुरूंना वंदन केले आहे. यामध्ये गुरु असे पद नसले तरी तो भाव दर्शविणारे 'द्विपदां' असे पद गौडपादाचार्यांनी मुद्दाम योजिले आहे. ग्रंथाच्या आरंभी किंवा प्रकरणापूर्वी गुरुजनांना वंदन करण्याची प्राचीन श्रेष्ठसम्मत परंपरा आहे. त्या परंपरेला अनुसरूनच हे वन्दन आहे. या श्लोकातील प्रत्येक पदाला एक विशिष्ट अर्थ आहे.

आकाशतुल्य असलेल्या आत्म्यांशी - अभिन्न सद्गुरूंना मी वन्दन करतो. आकाश हे गुरुतत्त्वाची मर्यादा स्पष्ट करण्यासाठी वापरलेले पद आहे. आकाशात ज्याप्रमाणे अन्य भूतांचा लय होतो त्याप्रमाणे गुरुतत्त्वामध्ये देखील अन्य सर्व लीन होते. आकाशाचा धर्म असा आहे की, ते भासमान होते परंतु त्याला स्पर्श करता येत नाही. त्याप्रमाणे गुरुतत्त्वाचा अनुभव घेता येतो. हे गुरुतत्त्व व आत्मा एकच होय, जाणणारे पुरुषश्रेष्ठ असे गुरुवर्य, त्यांना गौडपादाचार्य वन्दन करतात.

या श्लोकामध्ये अद्वैतज्ञान म्हणजे परब्रह्म होय. या सिद्धान्तची ही प्रस्तावना आहे. अग्नि आणि उष्णता, चंद्र आणि चंद्रिका, सूर्य आणि प्रकाश नेहमी एकरूपाने असतात. त्याप्रमाणे ज्याचे ज्ञान करून घ्यावयाचे ते ब्रह्म आणि त्या ब्रह्मत्त्वाशी एकत्त्वाने नांदणारे ज्ञान ब्रह्मस्वरूपच आहेत. या श्लोकात जे नमन केले आहे ते अशा अद्वैताचा अनुभव स्पष्ट करणारे आहे.


श्लोक- अस्पर्शयोगो वै नाम सर्वसत्त्वसुखो हितः ।
अविवादोऽविरुद्धश्च देशितस्तं नमाम्यहम् ॥ २ ॥


अर्थ- सर्व जीवांना सुख प्रदान करणारा, जीवांचे अंतिम कल्याण करणारा, ज्यामध्ये वादाला जागा नाही किंवा ज्या ठिकाणी विरोधाचा पूर्ण अभाव आहे असा अस्पर्शयोग्य ज्याच्या साहाय्याने कळतो त्या शास्त्राला मी नमस्कार करतो.

पहिल्या श्लोकांत आपल्या गुरुपरंपरेला वन्दन केल्यावर ज्या गुरूंच्या सान्निध्याने आणि कृपेने ब्रह्माचे स्वरूप कळते हे शास्त्रदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याने त्या शास्त्राला देखील गौडपादाचार्यांनी वन्दन केले आहे. ह्या शास्त्राला गौडपादाचार्यांनी अस्पर्शयोग असे म्हटले आहे. असे वन्दन करताना शास्त्र आणि गुरु यांचे वैभव गौडपादाचार्य मुमुक्षूंसाठी मुद्दाम स्पष्ट करतात. ह्या अस्पर्शयोगाचा उल्लेख मागील प्रकरणात आला आहे. किंचित पुनरावृत्ती करून असे म्हणता येईल की, ब्रह्म केवळ एकमेव आहे. दुसरी वस्तु नाही. परंतु भ्रांतीने विविध वस्तू असल्याचे भासते. हा स्पर्शयोग होय. ज्या वेळी ही भ्रांति पूर्णतः नाहीशी होऊन फक्त ब्रह्म असल्याचा अनुभव येईल तेव्हा या अवस्थेला अस्पर्शयोग असे म्हणतात. स्थूल मानाने हे विवरण केले आहे.

या ठिकाणी अस्पर्शयोग असा शब्दप्रयोग आहे. ज्याचा कोणत्याही कारणाने कोणत्याही वस्तूशी केव्हाही संबंध नाही त्या ठिकाणी 'योग' असे पद उपयोगात आणणे रुचणार नाही. याचे स्पष्टीकरण देताना एवढेच म्हणता येईल की, योग याचा अर्थ संबंध असला तरी केवळ समजुतीपुरता तो शब्द वापरण्यात आला आहे. शिवाय, ही अवस्था जीवाचे अंतीम कल्याण करणारी आहे. असे असूनसुद्धा ही अवस्था निर्विकार आहे. आत्मा एकमेव आहे. परमात्मा हे त्यांचे रूपांतर नव्हे किंवा जीवात्मा हे देखील रूपांतर नव्हे. एकाच आत्म्याच्या संबोधनासाठी, परिस्थितीप्रमाणे ही नावे योजिली आहेत त्याप्रमाणे अस्पर्शयोग हे एक नाव आहे.

या ठिकाणी सद्गुरूंनी केलेल्या ज्ञानमय प्रक्रियेची स्तुती आहे. याच प्रक्रियेला गौडपादाचार्य शास्त्र असे म्हणतात. कधीही कोठेही जे बदलत नाही ते शास्त्र होय. या शास्त्राची महती गाताना ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात -
शास्त्र म्हणेल ते सांडावें । ते राज्यही तृण मानावें ।
जें घेववी तें न म्हणावें । विषही विरु ॥ ज्ञाने. १६.४६०
तर 'तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते । ' असा श्रीमत् भगवद्‌गीतेचा उद्घोष आहे. म्हणून जे शास्त्र आहे ते विश्ववंद्य आहे. हा विश्वाचा अलिखित नियम आहे. याच नियमाप्रमाणे पू. पा. गौडपादाचार्यांनी शास्त्राचा गौरव कायम ठेवण्यासाठी परंपरेला साजेल असे शास्त्रवन्दन या ठिकाणी केले आहे.


श्लोक- भूतस्य जातिमिच्छन्ति वादिनः केचिदेव हि ।
अभूतस्यापरे धीरा विवदन्तः परस्परम् ॥ ३ ॥


अर्थ- कित्येक पंडित भूत म्हणजे विद्यमान वस्तू असून ती वस्तू उत्पन्न होते असा आग्रह धरतात, तर दुसरे वादी विद्वान म्हणतात की, जे अविद्यमान आहे त्यापासून उत्पत्ती होते, त्यामुळे वादविवाद निर्माण होतात.

वादविवाद कसे निर्माण होतात त्याचे हे उत्कृष्ट प्रतिपादन आहे. सांख्य आणि नैय्यायिक यांचा हवाला देऊन असे म्हणता येईल की, पुरुष आणि प्रकृती या दोन सत्य वस्तू आहेत. याच वस्तू विकार पावतात- उत्पन्न होतात असे सांख्य तत्त्वज्ञ म्हणतात, तर सत्य म्हणजे उत्पत्तिविनाशरहित असा वैदिक सत्य या पदाचा अर्थ आहे. ज्या वस्तू विद्यमान आहेत त्या उत्पन्न झाल्या असल्याच पाहिजेत असे सांख्य मानतात. आज जे विद्यमान नाही तेच उत्पन्न होते असा नैय्यायिकांचा आग्रह आहे. या मतभिन्नतेमुळे वादाला जागा निर्माण होते. तसे पाहिले असता अज्ञानात वादाला जागा असते, परंतु ज्ञानाच्या पूर्णावस्थेत वादाला जागा राहात नाही. सत्य ही एकच अवस्था किंवा ब्रह्म ही एकच वस्तू आहे. ब्रह्माचा अनुभव प्राप्त होईपर्यंत शंका, वादविवाद किंवा तर्क यांना अवसर मिळतो. परंतु ज्याने ब्रह्माचा यथार्थ अनुभव घेतला आहे त्याची वादाची अवस्था संपते. ह्या मूलभूत तत्त्वाप्रमाणे पाहिले असता असे दिसून येईल की, सर्व संत एकच बोलतात. पू. पा. गौडपादाचार्य पुढील श्लोकापासून ज्यामध्ये वादविवादाला जागा नाही असे प्रत्यक्ष ज्ञान सांगण्यास प्रारंभ करतात.


श्लोक- भूतं न जायते किंचिदभूतं नैव जायते ।
विवदन्तोऽद्वया ह्येवमजातिं ख्यापयन्ति ते ॥ ४ ॥


अर्थ - जी वस्तू आहे ती केव्हाही जन्माला येत नाही. जी वस्तू नाही ती उत्पन्न होणे शक्य नाही. यामुळे वाद करणारे पंडित अद्वैतवादीच होतात आणि ते अजातिवादाचेच प्रतिपादन करतात.

आत्मा ही वस्तू नित्य असल्याने तिला जन्म संभवत नाही, तर जी वस्तू अस्तित्वातच नाही तिला जन्म उद्‌भव नाही. सशाला शिंगे नाहीत ही वस्तुस्थिती आहे, म्हणून ती शिंगे निर्माण होत नाहीत. कारण मूळची वस्तू अस्तित्वातच नाही. याचाच अर्थ असा की, सताला जन्म नाही आणि असतालाही जन्म नाही. यामुळे सर्व विवादी अजातवादाशी सहमत आहेत हे सिद्ध होते.


श्लोक-ख्याप्यमानामजातिं तैरनुमोदामहे वयम् ।
विवदामो न तैः सार्धमविवादं निबोधत ॥ ५ ॥


अर्थ- या दोघांनीही सिद्ध केलेल्या अजातवादाशी आम्ही सहमत आहोत. त्यामुळे त्याच्याबरोबर वादविवाद करण्याचे कारणच नाही. अद्वैत हे वादातीत आहे असे समजा.

परस्परभिन्न मते प्रदर्शित करणाऱ्या, परंतु एका तत्त्वाशी सहमत असलेल्या दोन द्वैतवादी, विवादी पंडितांचा या ठिकाणी गौडपादाचार्यांनी गौरवच केला आहे. अजातिवाद वादातीत असला तरी द्वैती पंडितांमध्ये मात्र वाद होतच राहतील असा निष्कर्ष या ठिकाणी काढण्यात आला आहे. 'मी, काळा आहे की, गोरा आहे' याबद्दल विवाद होईल. पाश्चिमात्य लोक (भारतीयांना) मला काळा म्हणतील तर निग्रो गोरा म्हणतील. या वादाला मर्यादा राहाणार नाहीत. तरीही 'मी' बद्दल मात्र वाद होण्याचे कारण नाही. अद्वैताचा पाया 'मी' या उपरोक्त उदाहरणाप्रमाणे आहे. या ठिकाणी वादी लोकांना वादाला जागा नसते.


श्लोक- अजातस्यैव धर्मस्य जातिमिच्छन्ति वादिनः ।
अजातो ह्यमृतो धमों मर्त्यतां कथमेष्यति ॥ ६ ॥


अर्थ - अजात हा धर्म आहे. विवादी लोक त्याला जन्म असे म्हणतात. परंतु जो अजात आहे त्याला जन्म कसा प्राप्त होणार ? तो अमर आहे. अर्थात अजाताला जात म्हणणे सयुक्तिक नव्हे.

धर्म म्हणजे स्वभाव. जीव हा अमर आहे. किंबहुना अजात हा जीवाचा धर्म आहे, स्वभाव आहे. जीव नावाचा पदार्थ त्यामुळे उत्पन्न होत नाही आणि नष्टही होत नाही, हा सिद्धान्त मान्य झालेला आहे.*
[[* १. प्रकरण ३ श्लोक २० यामध्ये धर्म या शब्दाऐवजी भाव असा शब्द आलेला आहे. त्या
श्लोकाचे विवरण लक्षात घेतले म्हणजे त्यापेक्षा या श्लोकाचे अधिक विवरण करण्याची अपेक्षा नाही. ]]


श्लोक - न भवत्यमृतं मयं न मर्त्यममृतं तथा ।
प्रकृतेरन्यथाभावो न कथंचिद् भविष्यति ॥ ७ ॥


अर्थ- जी गोष्ट अमर आहे ती केव्हा, नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे मर्त्य वस्तू कधीही अमर होत नाही. मूळ प्रकृतीचे नित्यरूप केव्हाही निराळे होत नाही.

व्यवहारामध्ये काल नित्य आहे. आकाश नित्य आहे. ज्याच्याजोगे काळाची गणना करता येते ते परिमाण म्हणजे वर्ष. मागचे वर्ष गेले, पुढचे येईल, त्याच्या पुढेही येईल. म्हणजे एक वर्ष निर्माण झाले, ते संपले. दुसऱ्याची अवस्था तीच झाली. वर्ष ही मर्त्य, नष्ट होणारी वस्तु आहे. ती कधीही अमर होणारी नाही. परंतु कालाच्या व्यवहारात नित्यत्व आहे. तो नाहीसा होणार नाही. याप्रमाणे नित्य हा ब्रह्माचा धर्म आहे. ते कधीही अनित्य होणार नाही.

या ठिकाणी गौडपादाचार्यांनी मर्त्य अमर होत नाही आणि अमर मर्त्य होत नाही हा अबाधित सिद्धान्त सांगितला आहे. ('स्वभावो दुरतिक्रमः । ') याच सिद्धान्तावर आधारित साधकांच्या उपासना क्षेत्रांतील एक अनुभव ते पुढील श्लोकांत प्रकट करतात.


श्लोक-स्वभावेनामृतो यस्य धर्मों गच्छति मर्त्यताम् ।
कृतकेनामृतस्तस्य कथं स्थास्यति निश्चलः ॥ ८ ॥


अर्थ- अमृतत्व हा ज्याचा स्वभाव आहे तो मर्त्य अवस्थेला प्राप्त होतो, असे म्हणणाऱ्याकडून केलेल्या उपासनादी कर्माने निष्पन्न झालेले अमरत्व तरी नित्य आणि स्थिर कसे राहील ?

ब्रह्म अमर आहे. हा त्याचा स्थायीभाव आहे. ते ब्रह्म मर्त्य अवस्थेला प्राप्त होईल का ? मुळीच होणार नाही. व्यवहारात पिता आपल्या पुत्राला चिरंजीव म्हणून संबोधतो. ही त्या पित्याची स्वतःची कृती आहे. केवळ चिरंजीव म्हणून पुत्र अमर होणे शक्य नाही. त्याप्रमाणे साधक उपासनेमध्ये केलेल्या कर्मामुळे मिळालेले फळ हे नित्य आहे असे म्हणतो, परंतु त्या फळाचा मूळचा पायाच अस्थिर असल्याने त्याला नित्यत्व आणि स्थिरत्व प्राप्त होणार नाही. हा कृतीचा प्रकृतिधर्म होय.*
[[* १. या श्लोकाच्या अधिक स्पष्टतेसाठी प्रकरण ३ श्लोक ११ पाहावा. ]]


श्लोक-सांसिद्धिकी स्वाभाविकी सहजा अकृता च या ।
प्रकृतिः सेति विज्ञेया स्वभावं नं जहाति या ॥ ९ ॥


अर्थ- जी नित्यसिद्ध आहे, जी स्वभावसिद्ध आहे, जी आपला स्वभाव केव्हाही सोडीत नाही तिला प्रकृती असे म्हणतात.

या श्लोकांत 'प्रकृति' या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. व्यवहारात दिसणारे पदार्थ आपल्या धर्माचे किंवा स्वभावाचे उल्लंघन करीत नाहीत. ज्ञानेश्वरांनी या बाबतीत स्पष्टता केली आहे.

आकाशे सर्वत्र वसावें । वायूनें नावभरी उगे नसावें ।
पावकें दहावें । वर्षावें जळे ॥ ८१ ॥
पर्वतीं बैसका न संडावी । समुद्री रेखा नोलांडावी ॥ ज्ञाने.९.२८२

हा प्रत्येकाचा स्वभावधर्म आहे. या व्यतिरिक्त काही करू म्हणावे तर ते सर्वथा अशक्य आहे.

कां साळीचा कणु म्हणे । मी नुगवे साळीपणें ।
तरी आहे आन करणे । स्वभावासी ? ॥ ज्ञाने. १८-१२८७

साळीचा दाणा पेरला तर त्यापासून साळच निर्माण होईल. त्याने म्हटले की, मी साळ म्हणून उगवणार नाही तर दुसरे त्याला काहीतरी करणे शक्य आहे का ?

याचे उत्तर नाही असे आहे. कारण साळीने साळच निर्माण करावयाची ही साळीची प्रकृती आहे. योगाभ्यासाने साधकाला प्राप्त झालेली सिद्धी साधकाला सोडून केव्हाही जात नाही किंवा विपरीत अवस्थापण धारण करीत नाही. परिसाच्या संगतीने लोहाचे सोने झाले. ते सुवर्णत्व नष्ट होत नाही. याला व्यावहारिक सिद्धी किंवा प्रकृती म्हणतात. उष्णता हा अग्नीचा स्वभाव आहे. तो रूपांतरित होत नाही हे सिद्ध आहे.

यालाच प्रकृतिधर्म असे म्हणतात. तो संसिद्ध, स्वाभाविक, सहज आणि अविकृत आहे. या ठिकाणी दिलेले सर्व प्रकृतिधर्म केवळ व्यावहारिक आहेत. त्याचप्रमाणे पारमार्थिक सत्य पदार्थ आपला स्वभाव कधीही सोडत नाहीत. किंवा ते विकार पावत नाहीत. ते सिद्धच आहेत.


श्लोक-जरामरणनिर्मुक्ताः सर्वे धर्माः स्वभावतः ।
जरामरणमिच्छन्तश्च्यवन्ते तन्मनीषया ॥ १० ॥


अर्थ- स्वभावतः सर्व जीव जरामरणादी विकारांपासून मुक्त आहेत पण भ्रांतीमुळे ते जरामरणाची भीती धारण करू लागले तर ते मूळ स्वभावापासून विकृत होतात. ही भ्रांति होय.

जीवात्मे जरामरणादी विकारांपासून मुक्त असतात. परंतु काही तत्त्वज्ञ आम्ही जरामरणादी विकृतियुक्त आहोत असे भ्रांतीने म्हणतात. दोरीला सापाच्या रूपात पाहणारा मनुष्य सापाच्या भीतीने कंपित होतो त्याप्रमाणे हे तत्त्ववादी आपण मरणाधीन आहोत अशा चिंतनामुळे स्वभावापासून भ्रष्ट होतात. थोडक्यात, आपण ज्या विषयाचे चिंतन करतो तो विषय आपणच होतो. असा एक सिद्धान्त आहे. त्याप्रमाणे विपरीत चिंतनामुळे लोक मरणाधीन आहोत असे मानतात. खरे पाहाता प्रकृति रूपांतरित होत नाही. भ्रांतीमुळे रूपांतरित झाल्यासारखी वाटते.


श्लोक-कारणं यस्य वै कार्य कारणं तस्य जायते ।
जायमानं कथमजं भिन्नं नित्यं कथं च तत् ॥ ११ ॥


अर्थ- कारण हेच कार्य होते असे मानल्याने कारणच जन्म पावते असे होईल. जे अज आहेत ते जन्म कसे पावतील ? त्याप्रमाणे जे विकार पावते, रूपांतरित होते ते नित्य एकरूप कसे राहील ?

या श्लोकात विशेष करून वैशेषिक तत्त्वज्ञांचे मत प्रतिपादन केले आहे असे वाटते. विशेषतः सांख्य तत्त्वज्ञानाशी त्यांचा वाद आहे. सांख्यांच्या मताप्रमाणे कारणाचे कार्यात रूपांतर होते. म्हणजे कारणच कार्यरूपाने विकार पावते. मृत्तिकेचा घट होणे म्हणजेच कारणाचे कार्यात रूपांतर होणे. मृतिका हे कारण आहे तर घट हे कार्य आहे. कार्य उत्पन्न होते. कारण अज आहे असे सांख्यांचे मत आहे.


श्लोक-कारणाद्यद्यनन्यत्वमतः कार्यमजं तव ॥
जायमानाद्धि वै कार्यात्कारणं ते कथं ध्रुवम् ॥ १२ ॥


अर्थ- जर कार्य आणि कारण एकरूप आहेत तर कार्यदेखील अज होईल. कारण तुमचे कारण अज आहे. कार्याला जर जन्ममरणादी विकार होतात तर कारण तरी नित्य कसे असेल ?

सांख्य मताचे खण्डन करताना त्यांना असा प्रश्न करण्यात आला आहे की, तुम्ही कार्य आणि कारण एकच आहेत असे म्हणता तर माती आणि रूपांतरित घट, दोन्ही एकच अजन्म कशी ? कारण अजन्म आहे हे तुमचेच प्रतिपादन आहे. परंतु कार्य आणि अजत्व एकमेकांच्या विरुद्ध आहेत. कोंबडीच्या एका भागाचा उपयोग अन्नासाठी करायचा आणि अर्ध्या भागाकडून अंडी मिळविण्याची अपेक्षा करावयाची, असाच हा प्रकार आहे. या दोन्ही गोष्टी असंभव आहेत. त्याप्रमाणे तुमचे म्हणणे असंबद्ध आहे.


श्लोक-अजाद्वै जायते यस्य दृष्टान्तस्तस्य नास्ति वै ॥
जाताच्च जायमानस्य न व्यवस्था प्रसज्यते ॥ १३ ॥


अर्थ- ज्या ठिकाणी उत्पन्न न होणाऱ्या वस्तूपासून कार्य उत्पन्न होते त्याच्या सिद्धीसाठी दृष्टान्त देता येत नाही. उत्पादित वस्तूपासून कार्याची उत्पत्ती होते असे मानल्यास अनवस्था स्थिती निर्माण होते.

ज्याला जन्म नाही त्यापासून कार्याची उत्पत्ती होते असे सिद्ध करण्यासाठी उदाहरण देता येत नाही. सांख्यांचे प्रधान हे अज आहे. त्यापासून महत्तत्त्वांची उत्पत्ती होते, हे सांख्यांना पटवून देता येत नाही. ज्या वेळी दृष्टान्त देता येत नाही त्या ठिकाणी प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणांची चर्चाच करता येणार नाही. प्रधान अजात आहे असे मानले तरी ते दुसऱ्या कारणापासून, ते कारण अन्य कारणापासून उत्पन्न झाल्याचे प्रत्ययाला येते. ह्या अविरत जन्मकारणामुळे विसंगतीच निर्माण होते.


श्लोक - हेतोरादिः फलं येषामादिर्हेतुः फलस्य च ।
हेतोः फलस्य चानादिः कथं तैरुपवर्यते ॥ १४ ॥


अर्थ- हेतूचे कारण फल आहे आणि फलाचे कारण हेतू आहे असे म्हणणारे हेतू आणि फल यांचे अजत्व कसे प्रतिपादन करतात ? कारण हेतूच्या पूर्वी फल आणि फलाच्या पूर्वी हेतू आहे.

धर्म किंवा अधर्माचरण हा जन्ममरणाचा हेतू आहे. जन्ममरण हे फल आहे. परंतु या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, जन्ममरणाचा परिणाम देह असल्याशिवाय होत नाही. म्हणून असे म्हटले जाते की, संसार अनादी आहे. परंतु संसार देहादिकांच्या अस्तित्वामुळे होत नाही. ४ ह्या आकड्याने एक मर्यादा दाखविली जाते. त्याप्रमाणे ५ ह्या आकड्याने देखील मर्यादा दाखविली जाते. म्हणजेच हे अंक सान्त आहेत यांचा गुणाकार वीस होतो. तोही सान्तच आहे. दोन असत् वस्तूंपासून एक सद्वस्तू निर्माण कशी होईल ? म्हणून संसाराला अनादिअनंत म्हणणे उचित नव्हे. तो मिथ्या आहे. हे श्रुतीचे तात्पर्य आहे.


श्लोक- हेतोरादिः फलं येषामादिहेतुः फलस्य च ।
तथा जन्म भवेत्तेषां पुत्राज्जन्म पितुर्यथा ॥ १५ ॥


अर्थ- हेतूचे कारण फल आणि फलाचे कारण हेतू आहे; असे असेल तर पुत्रापासून पित्याचा जन्म होतो हे म्हणणे जसे असंबद्ध आहे. त्याचप्रमाणे हेतूपासून निर्माण झालेल्या फळापासून हेतू निर्माण होतो हे म्हणणे सुद्धा विपरीत आहे.

ज्याने पुत्राला जन्म दिला तो पिता पुत्रापासून जन्म पावतो असे म्हणणे किती विसंगत आहे, त्याप्रमाणे हेतूपासून निर्माण होणारा फळरूपी देह हाच त्या हेतूचे जन्मस्थान कसे असेल ? कर्माप्रमाणे देहाची प्राप्ती होते आणि देहाप्रमाणे कर्म घडते हे सामान्य बुद्धीला न पटणारे आहे. या प्रकारचा अनुभव नाही. म्हणूनच श्रौतसिद्धान्त पुढे करून द्वैताचा आग्रह धरणारे पंडित विपरीत अवस्थेत सापडतात.


श्लोक- संभवे हेतुफलयोरेषितव्यः क्रमस्त्वया ।
युगपत्संभवे यस्मादसंबन्धो विषाणवत् ॥ १६ ॥


अर्थ- हेतू आणि फल यांचा जन्म होतो असे मानले तर त्यांचा क्रम कोणता ? क्रम नाही असे म्हटले तर एकाच वेळी बरोबर वाढणाऱ्या बैलाच्या शिंगांत जसा कार्य-कारण संबंध नाही तसाच फल व हेतू यांमध्येही नाही.

बीपासून वृक्ष निर्माण होतो असे म्हटले तर बी प्रथम निर्माण होते. परंतु झाडाशिवाय बी तरी कसे निर्माण होणार ? म्हणून झाडाचा जन्म अगोदर आहे असे म्हणावे लागेल. त्याप्रमाणे कारण कार्याच्या पूर्वी अस्तित्वात असले पाहिजे. परंतु तसे नाही. उत्पत्तीसंबंधी या दोघांमध्ये असा संबंध प्रस्थापित करता येणार नाही. बैलाची शिंगे एकाच वेळी उत्पन्न होतात. त्या दोघांमध्ये कार्य-कारण भावाचा उद्‌गम आहे काय ? मुळीच नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या संबंधाची स्थिती आहे.


श्लोक- फलादुत्पद्यमानः सन्न ते हेतुः प्रसिध्यति ॥
, अप्रसिद्धः कथं हेतुः फलमुत्पादयिष्यति ॥ १७ ॥


अर्थ- फळापासून हेतू उत्पन्न होतो म्हणून त्या हेतूची सिद्धी होणे अशक्य आहे. हेतूच सिद्ध झाला नाही तर त्याच्यापासून फल तरी कसे निष्पन्न होणार ?

फलाच्या जन्मानंतर हेतूचा जन्म आणि हेतूच्या जन्मानंतर फलाचा जन्म अशा परस्परविरोधी क्रियांचा संबंध, सशाचे शिंग निर्माण होते असे म्हणण्याप्रमाणे मिथ्या आहे. त्याप्रमाणे कार्य-कारणाचा संबंध जुळवू पाहणे म्हणजे वाळूतून तेल काढण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे. थोडक्यात, कार्य आणि कारण यांचे संबंध जुळवता येत नाहीत. हेतूच्या नंतर उत्पन्न होणारे फल हेतूला जन्म कसा देईल ? देहावर धर्माधर्माचे अस्तित्व अवलंबून आहे. तो धर्म किंवा अधर्म देहादी संघाताला कसे निर्माण करील ? थोडक्यात, फलापासून उत्पन्न होणाऱ्या हेतूला फलाचे कारण होता येत नाही.


श्लोक- यदि हेतोः फलात्सिद्धिः फलसिद्धिश्च हेतुतः ।
कतरत्पूर्वनिष्पन्नं यस्य सिद्धिरपेक्षया ॥ १८ ॥


अर्थ- फलावरून हेतूची सिद्धी आणि हेतूच्या योगाने फलाची सिद्धी होते, असे असेल तर हेतू आणि फल यांपैकी प्रथम कोण ?

हेतू आणि फल यांचा कालक्रम किंवा कालएकत्व असा कोणताही संबंध प्रस्थापित करता येत नाही. हेतू आणि फल अन्योन्यसिद्ध आहेत असे मानले तरी व्यवस्था लागत नाही. गळा असल्याशिवाय गाता येत नाही. आणि गाण्याशिवाय गळा तयार होत नाही. गळा आणि गाणे यांचा परस्परसंबंध आहे. त्याप्रमाणे पुण्यकर्माशिवाय पुण्यवन्त देह प्राप्त होत नाही आणि पुण्यवंत देह असल्याशिवाय पुण्यकर्म घडत नाही. पुण्यकर्म आणि देह यांचा हा अन्योन्यसंबंध आहे. असे असले तरी कारण कोणते आणि कार्य कोणते हा सन्देह नाहीसा होत नाही. याउलट असे म्हटले की, हेतू व फलापैकी हेतूची सिद्धी प्रथम होते. हेतू फलोत्पादक आहे. या निवेदनात फलसिद्धीशिवाय हेतुसिद्धी नाही आणि हेतुसिद्धीशिवाय फलसिद्धी नाही, हे म्हणणे सापेक्ष आहे. असे म्हटले असले तरी प्रथम सिद्धी कोणाची आणि नंतर सिद्धी कोणाची हा मूल प्रश्न या ठिकाणीही निर्माण होतो. द्वैतवादी पंडित या प्रश्नाला समाधानकारक उत्तर देऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्या विचारप्रक्रियेत निर्माण होणारे दोष पुढील श्लोकात दाखविण्यात आले आहेत.


श्लोक- अशक्तिरपरिज्ञानं क्रमकोपोऽथ वा पुनः ।
एवं हि सर्वथा बुद्धरजातिः परिदीपिता ॥ १९ ॥


अर्थ- या मुद्द्यावर उत्तर देता आले नाही तर या सिद्धान्ताच्या बाबतीत समाधानकारक उत्तर न देता येणे, अज्ञान आणि क्रमाचा विपर्यास हे दोष निर्माण होतात. त्यामुळेच ज्ञानी लोकांनी हा अजातवाद मान्य केला आहे.

अजातवादापासून सृष्टी उत्पन्न होते असे सिद्ध होत नाही. जातापासून सृष्टी निर्माण झाली असे म्हटले तर प्रथम कोण आणि नंतर कोण जन्मले याचा निर्णय करता येत नाही. यासाठी तत्त्वज्ञ श्रुतीचा आश्रय करतात आणि अजातवादाचा अंगिकार करतात. निरनिराळी दर्शन एकमेकांचे दोष दाखवीत असतात. परंतु त्यांचा स्वतःचा निर्णय न झाल्याने त्यांनादेखील अजातवादालाच अनुमोदन द्यावे लागते.


श्लोक-बीजाङ्‌कुराख्यो दृष्टान्तः सदा साध्यसमो हि सः ।
न हि साध्यसमो हेतुः सिद्धो साध्यस्य युज्यते ॥ २० ॥


अर्थ- बीजांकुराचा दृष्टान्त प्रस्तुतच्या साध्यासारखा आहे. साध्याची सिद्धी करण्यासाठी साध्य हेतू गृहीत धरून साध्यसिद्धी करणे उचित नाही.

हेतू व फल यांमध्ये कार्यकारणभाव आहे. बीज आणि त्यापासून निर्माण होणारा अंकुर असा अनादिक्रम आहे, असे यावरून सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. बीजांकुरभाव अनादि नाही. बीज आणि अंकुर यांचा अंत आहे. तो संबंध कालातीत नसतो. या ठिकाणी बीजांकुराच्या उदाहरणात बीज अकुंराचे आदिस्थान आहे. म्हणजेच कारण आहे. अशा वेळी निर्माण झालेला अंकुर बीजाने आदिमान झालेला आहे. प्रत्येक बीजाच्या नंतर अंकुर असतो आणि प्रत्येक अंकुराच्या पूर्वी बीज असते. सारांश, या दृष्टान्ताच्या योगे कार्यकारणभाव सिद्ध होतो असे मानले तर हाच दृष्टान्त जी वस्तू सिद्ध करावयाची आहे तिचाच आधार घेतो. म्हणून इष्ट वस्तूची साध्यता अशक्यच आहे.


श्लोक- पूर्वापरापरिज्ञानमजातेः परिदीपकम् ।
जायमानाद्धि वै धर्मात्कथंपूर्वं न गृह्यते ॥ २१ ॥


अर्थ- पूर्वी कोण उत्पन्न झाले आणि नंतर कोण उत्पन्न झाले याचे ज्ञान केव्हाही आणि कोणालाही होणे अशक्य आहे. अशी स्थिती अजातिरूपानेच स्पष्ट होते. उत्पन्न धर्माचे प्रत्यक्ष दर्शन घडत असता त्याच्या पूर्वीच्या कारणाचा बोध कसा होत नाही ?

हेतू आणि फल यांतील प्रथम कोणते आणि नंतर कोणते हे सांगता न आल्याने पूर्व-उत्तर उत्पत्तीचे ज्ञान अशक्यप्राय झाले. म्हणजेच अज्ञान निर्माण झाले. म्हणून या जागी अजाताचाच स्वीकार करावा लागतो. जायमान धर्म अजातिवाद प्रतिषिद्ध करतो असे म्हटले तर कार्य समक्ष आहे, परंतु त्याच्या पूर्वी असणाऱ्या कारणाचे ज्ञान मात्र होत नाही.


श्लोक- स्वतो वा परतो वापि न किंचिद्वस्तु जायते ।
सदसत्सदसद्वापि न किंचिद्वस्तु जायते ॥ २२ ॥


अर्थ- कोणतीही वस्तु स्वतः स्वतःला निर्माण करीत नाही, किंवा दुसऱ्या वस्तूपासूनही ती निर्माण होत नाही. सत्य, मिथ्या किंवा सत्यासत्य स्वरूपात वस्तु केव्हाही उत्पन्न होत नाही.

ज्या वस्तूला जायमान- उत्पन्न होणारी अशी संज्ञा आहे ती स्वतः, दुसऱ्याच्या साहाय्याने दोघांच्या साहाय्याने किंवा सर्वांच्या अभावाने उत्पन्न होणे अशक्यप्राय आहे. मग ती वस्तु सत्य, असत्य किंवा सत्यासत्य- कशीही असो- तिला जन्माला घालण्याचे सामर्थ्य कोणालाही नाही. एका वस्त्रापासून दुसरे वस्त्र किंवा एका भांड्यापासून दुसरे भांडे निर्माण होत नाही. त्याप्रमाणे एका कार्यापासून दुसरे कार्य निर्माण होत नाही. एखादे घर बांधले म्हणजेच ते उत्पन्न केले. त्याची उत्पत्ती झाली ती एका घरापासून झालेली नाही. तसे म्हणताही येत नाही. घराच्या सामग्रीपासून घर निर्माण झाले. त्यामुळे घराची सामग्री निराळी, घर निराळे. इतकेच नव्हे, तर घराचा तयार केलेला आराखडा आणि त्यापूर्वी घराची केलेली कल्पना हे सर्व एक आहे असे म्हणता येत नाही. इतकेच काय, पण कल्पनेची उत्पत्तीदेखील अन्य ठिकाणाहून झालेली आहे. या सर्वांचा आशय एवढाच आहे की, कोणतीही वस्तू असो, ती आपल्यापासून तशीच वस्तू निर्माण करीत नाही. वस्तू आणि अनिर्देश्य वस्तू यांच्या संयोगाने तरी वस्तू निर्माण होते असे म्हटले तर तेही उचित नाही. परमार्थात ही सत्यता आहे तर व्यवहारात तो आभास आहे.


श्लोक- हेतुर्न जायतेऽनादेः फलं चापि स्वभावतः ।
आदिर्न विद्यते यस्य तस्य ह्यादिर्न विद्यते ॥ २३ ॥


अर्थ- अनादी फलापासून हेतू उत्पन्न होत नाही आणि अनादी फलापासून हेतू उत्पन्न होत नाही. निमित्ताच्या अभावाने हेतू आणि फल स्वाभाविकपणे निर्माण होत नाहीत. ज्याला अनादी म्हणतात त्याला कारण नसते.

काही शास्त्रे असे म्हणतात की, हेतू आणि फल अनादी आहेत. परंतु त्यांच्याच म्हणण्याचा मागोवा घेऊन असे निश्चित केले आहे की, हेतू आणि फल जन्ममूलक आहेत. ती जन्मशून्य नाहीत. हेतू आणि फल ही अनादी असतील तर कार्यकारणभावाने सुद्धा हेतू किंवा फलाची उत्पत्ती होणे शक्य नाही. निमित्ताशिवाय हेतू किंवा फल निर्माणच होणार नाहीत. सारांश, जे अनादी आहे ते कारणशून्य असते. कारण कार्याच्या प्रारंभी असते. अनादीमध्ये तत्पूर्वी अगर नंतर या पदांनी दर्शित करण्यासारखे काहीही असत नाही. अनादीपासून अनादी उत्पन्न होत नाही, त्याचप्रमाणे उत्पन्न करणे किंवा जन्माला घालणे हा अनादीचा स्वभाव नाही किंवा स्वतःही उत्पन्न होण्याचा स्वभाव नाही.


श्लोक-प्रज्ञप्तेः सनिमित्तत्वमन्यथा द्वयनाशतः ।
संक्लेशस्योपलब्धेश्च परतन्त्रास्तिता मता ॥ २४ ॥


अर्थ- विषयाचे ज्ञान विषयनिमित्ताने होते. विषयशून्य असे ज्ञान आहे असे म्हटले तर ज्ञानाच्या विविधतेचा नाश झाला पाहिजे. परंतु तसे होत नाही. ज्ञान एकच असते तर सुख विरह किंवा दुःखाचा त्रास झाला नसता. पण तो होतो. विषय आहेत परंतु शास्त्रज्ञांनी पदार्थांचे जे अस्तित्व मानले आहे ते सत्य आहे.

ज्ञान एकच आहे याबाबत या ठिकाणी मुद्दाम विवेचन केले आहे. जीवाचे ज्ञान हे सत्य आहे असे म्हटले जाते. त्यावर असा आक्षेप घेण्यात येतो की, ज्ञान एकमेव असेल तर ते विषयनिष्ठ कसे होते. घराचे, शेतीचे, सागराचे असा ज्ञानाचा भेद झाला नसता. हा ज्ञानभेद सामान्यांच्या अनुभवातला आहे. परंतु ज्ञानच विविधतेने अनुभवास येते असे म्हटले तर त्याला मात्र प्रमाणे देऊन सिद्ध करता येत नाही. द्रव्य अगर पुत्रप्राप्तीने आनंद होतो तर त्याचा अभाव निर्माण झाला तर दुःख प्राप्त होते. म्हणून एकमेव ज्ञानाने अशी विविधता प्रत्ययाला येत नाही. परंतु हे महत्त्वाचे आहे की, ज्याचे ज्ञान होते ती वस्तू ज्ञानापेक्षा निराळी आहे. म्हणून विषय हे ज्ञानाचे कारण आहे असे म्हणता येणार नाही. ज्ञान निराळे आहे. विषय निराळे, ज्ञान निराळे हे दोन्ही भेद प्रत्ययाला येतात.


श्लोक- प्रज्ञप्तेः सनिमित्तत्वमिष्यते युक्तिदर्शनात् ।
निमित्तस्यानिमित्तत्वमिष्यते भूतदर्शनात् ॥ २५ ॥


अर्थ- ज्ञान हे निमित्ताने होते असे म्हटले जाते, परंतु यथार्थ वस्तुदर्शन झाले असता ज्ञानाचे निमित्तच नाहीसे होते.

माठ, परळ, मडके वगैरे वस्तू मातीच्या आहेत. या प्रत्येक वस्तूबद्दल असणारे ज्ञान भिन्न आहे, असे प्रत्ययाला येते. आकार आणि वर्णवैचित्र्यामुळे ज्ञानाची विविधता आहे असे म्हटले जाते. परंतु हे सर्व आकार आणि वर्ण बाजूला केले तर केवळ मातीचे ज्ञान मात्र शिल्लक राहील. माती हे घटादिकांचे कारण आहे. मातीचे ज्ञानसुद्धा वैचित्र्यामध्ये जमा होते. मातीचे कण, अणू, परमाणू, परमाणूचे कारण, त्याचे कारण अशा मालिकेचा विचार करीत गेले तर निमित्त आणि कारण एकरूप होतात. शब्द हा फक्त ज्ञानमापनाचा फुलोरा राहतो. यावरून असे लक्षात येते की, बाह्य विषय हे ज्ञानाचे कारण नव्हे. बाह्य पदार्थ अनिमित आहेत. भ्रांत पुरुषाला दोरीवर भासणारा सर्प हा वस्तुतः सर्प नसतो. दोरीवर सर्प आपले अस्तित्व प्रस्थापित करू शकत नाही. अर्थात बाह्य विषय भ्रांतिनिर्मित आहेत. भ्रांति संपली म्हणजे बाह्य विषयही संपतात. तसे पाहिले तर बाह्य विषय आहेत असे मानले तर निद्रेतसुद्धा विषयांच्या विविधतेचा अनुभव आला असता. परंतु तसे होत नाही. सारांश, द्वैतामध्ये सुखदुःखादिकांचा अनुभव येतो, म्हणून विषय बाह्य आहेत असे म्हटले जाते. परंतु अद्वैतामध्ये बाह्य विषयांना आणि त्यांच्या वैचित्र्याला मुळीच जागा नाही.


श्लोक-चित्तं न संस्पृशत्यर्थं नार्थाभासं तथैव च ।
अभूतो हि यतश्चार्थो नार्थाभासस्ततः पृथक ॥ २६ ॥


अर्थ- ज्ञानशक्ति विषय किंवा विषयांचा आभास यांना स्पर्श करीत नाही. कारण बाह्य विषय किंवा बाह्य विषयभास अभावरूप आहे.

बाह्य विषय किंवा बाह्य विषयांचा आभासही नाही त्या अर्थी बाह्य कारण अगर निमित्त नाही. ज्ञानाची विविधता नाही. त्यामुळे ज्ञान आणि विषय यांचा एकमेकांना स्पर्शही होत नाही. स्वप्नातील वस्तू चित्तच स्वतः बनते, यावरून त्या वस्तू आणि चित्त यांची भेट होते हे म्हणणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे जागृतीत सुद्धा आपले चित्त वस्तुस्पर्शरहित असते. एखादे गुलाबाचे फूल पाहिले म्हणजे गुलाबी रंग असल्याचा बोध होतो. कार्यकारणसंबंधाने मला गुलाबी रंगाचे ज्ञान झाले असे आपण म्हणतो. वर वर पाहता व्यावहारिक दृष्टीला हे सर्व सत्य असल्याची जाणीव होते. परंतु विज्ञाननिष्ठ दृष्टीतून विचार केला असता असे प्रत्ययाला येते की, गुलाबी वर्ण काय किंवा अन्य वर्ण काय, प्रकाशकिरणांमध्ये अस्तित्वात असलेल्या अणूंचाच विलास आहे. प्रकाश नसता किंवा अंधःकार असता तर आपणास वर्णाचे ज्ञान झाले असते का ? तसे होणार नाही. इतकेच नव्हे, प्रकाश असताना चांदीच्या तुकड्यावर तांबड्या अगर निळ्या रंगाची काच ठेवली तर चांदी तांबडी किंवा निळी आहे असे दिसू लागेल. चांदीचा वर्ण भिन्न आहे ही गोष्ट व्यवहारात असत्य आहे. वर्णाप्रमाणे रूपाचे ज्ञानदेखील अंधारात होत नाही. यावरून असा सारांश काढण्यात आला आहे की, पदार्थ, ज्ञानबाह्य पदार्थ हे रूपज्ञानाचे निमित्त नव्हे तर त्याला ज्ञानच निमित्त आहे. ज्ञानविलास त्याला कारण आहे.


श्लोक-निमित्तं न सदा चित्तं संस्पृश्यत्यध्वसु त्रिषु ।
अनिमित्तो विपर्यासः कथं तस्य भविष्यति ॥ २७ ॥


अर्थ- चित्ताला केव्हाही विषयांचा स्पर्श होत नाही. असे असता त्याला निमित्ताभावाने विपर्यास कसा संभवेल ? (भ्रांति होण्याचे कारण नाही.)

बाह्य पदार्थ नसतानासुद्धा चित्ताला भ्रांति होते आभास निर्माण होतो. निमित्त नसतानासुद्धा चित्त का भ्रान्त होते ? निमित्त आणि चित्त यांचा संयोग होण्याचा प्रसंग कधीही येत नाही. तसेच विषय आणि चित्त यांची भेट होते असाही प्रसंग येत नाही. तसा संयोग प्रसंग अनुभवाला आलाच तर तो शुद्ध भ्रम आहे हेच खरे. अर्थात विषय मुळातच नाहीत, त्यामुळे नसलेल्या वस्तूची चित्ताशी गाठ पडण्याचे प्रयोजनच नाही. विज्ञानवादी मात्र असा दावा करतात की, वस्तू नसताना वस्तूचा आभास होणे हा चित्ताचा स्वभाव आहे. या ठिकाणी भ्रांति वगैरे काही नाही. उताराकडे धाव घेणे हा जसा पाण्याचा स्वभाव आहे त्याप्रमाणे पदार्थाच्या भासरूपाशी संबंध साधणे हा चित्ताचा स्वभाव आहे. या ठिकाणी अशी एक शंका येते- कोणतेही निमित्त नसाताना चित्ताला भ्रांति निर्माण होते याचे कारण काय ? याचा खुलासा पुढील श्लोकांत करण्यात आला आहे.


श्लोक- तस्मान्न जायते चित्तं चित्तदृश्यं न जायते ।
तस्य पश्यन्ति ये जाति खे वै पश्यन्ति ते पदम् ॥ २८ ॥


अर्थ- चित्ताला जन्म नाही. चित्ताला पाहण्यास योग्य असे जे विषय, त्यांनाही जन्म नाही. चित्ताला जन्म आहे असे जे लोक म्हणतात ते आकाशात उडणाऱ्या पक्ष्याचे पाय मी पाहतो असे म्हणतात, असे मानावे.

घट नसताना चित्त घटासारखे बनते हा विज्ञानवादी लोकांचा सिद्धांत आहे, हे केवळ व्यावहारिक अवस्थेत ठीक आहे. परमार्थदृष्टीने पाहाता घटादी पदार्थ मुळातच नाहीत. त्याप्रमाणे जन्म नसलेल्या चित्तालासुद्धा उत्पत्तीचा आभासच होतो. चित्त केव्हाही उत्पन्न होत नाही, त्याप्रमाणे चित्ताला आकर्षित करणारे विषयसुद्धा कदापि निर्माण होत नाहीत. हे सर्व मिथ्या कसे आहे हे स्पष्ट करण्यासाठी श्लोकात एक दृष्टान्त देण्यात आला आहे. पक्षी ज्या वेळी आकाशात उडत असतो तेव्हा त्याचे पाय तो आपल्या पोटाशी घट्ट आवळून धरतो. विमानाची चाके विमान आकाशात झेपावले म्हणजे आत ओढून घेते. ती चाके दिसत नाहीत. परंतु उडत्या पक्ष्याचे पाय तो किंवा आकाशात झेपावलेल्या विमानाची चाके मला दिसतात असे म्हणणारे ज्ञानी किती खरे बोलतात ? त्याप्रमाणे चित्ताने स्वतःची उत्पत्ती पाहणे असंभव आहे. पुत्राने कधी पित्याचा जन्म पाहिला आहे का ? हे जसे न पटणारे आहे त्याप्रमाणे विषय आणि चित्त यांच्या नात्याचा फोलपणा या ठिकाणी स्पष्ट केला आहे.


श्लोक-अजातं जायते यस्मादजातिः प्रकृतिस्ततः ।
प्रकृतेरन्यथाभावो न कथंचिद्‌भविष्यति ॥ २९ ॥


अर्थ- ज्याला जन्म नाही असे चित्त जन्माला येते असे म्हणतात. या चित्ताची प्रकृति-मूलरूप जन्मशून्य असली पाहिजे. प्रकृति आपले मूलरूप सोडून अन्य रूपाचा केव्हाही आश्रय करीत नाही.

या सर्व चर्चेमधून ब्रह्म तेवढेच अज आहे हे निश्चित झाले आहे. ज्ञानस्फुरण आता सांगितल्याप्रमाणे जन्मशून्य आहे, परंतु ते ब्रह नाही. द्वैती मतप्रणालीप्रमाणे जन्म मानला आहे. परंतु जन्म केवळ मायिक आहे. जन्मशून्य असूनही जे जन्म झाल्याप्रमाणे दिसते. ती केवळ भ्रांति आहे. एकादे कारंजे तयार करून त्याला पाण्याची नळी जोडली. त्यातून पाणी वाहू लागताच कारंजातून विविध धाराच्या रूपाने पाणी उडते, आपण व्यवहारांत हे पाहतो. ही आकृती म्हणजे पापाची मूळ प्रकृति आहे का ? तसे मुळीच नाही. कारण नित्यरूप पाण्याला आकार नाही किंवा गतीदेखील नाही. त्याप्रमाणे आपल्या अज्ञानामुळे ज्यांना आदि-अंत आहेत असे विषय अनुभवास येतात. ही उत्पति आणि नाश केवळ भास आहे किंवा चित्ताच्या भ्रांत अवस्थेचे स्वरूप आहे. थोडक्यात, प्रकृति आपला मूळ स्वभाव कधीही विसरत नाही, याचा विचार केल्यावर असे म्हणावे लागते की, ब्रह्म केव्हाही उत्पन्न होत नाही आणि ते उत्पन्न होत नाही म्हणूनच नष्टही होत नाही.


श्लोक- अनादेरन्तवत्त्वं च संसारस्य न सेत्स्यति ।
अनन्तता चादिपतो मोक्षस्य न भविष्यति ॥ ३० ॥


अर्थ- संसार अनादी असेल तर त्यास अंत असणे शक्य नाही. त्याचप्रमाणे उत्पन्न होणारा मोक्ष कदापि अनंतकालपर्यंत राहणार नाही.

ज्याला जन्म नाही त्याला अंत नाही आणि ज्याला जन्म आहे त्याला अन्त निश्चितपणे आहे. काही लोक असे म्हणतात की, आत्म्याला संसाराची प्राप्ती होते. तो त्या संसारात राहतो आणि संसारातून मुक्त होतो. या तत्त्वचिंतकांना या श्लोकामध्ये उत्तर देण्यात आले आहे. कारण संसार अनादी आहे हे एकाही शास्त्राला ठामपणे सांगता आलेले नाही. इतकेच काय, त्याला जन्म आहे परंतु अन्त नाही अशी एकही वस्तू या विश्वाच्या पसाऱ्यांत नाही. हीच गोष्ट मोक्षासारख्या परमार्थातील महान अवस्थेचीही आहे. साधकाच्या उपासनेप्रमाणे त्याला मोक्ष प्राप्त होतो. परंतु ही स्थिती अनादी नव्हे. ही सत्य स्थिती आहे.

'उपजे तें नाशे । नाशिले पुनरपि दिसे । ' ज्ञाने. २.१५९
हा ज्ञानेश्वरांचा ज्ञानेश्वरीतील अभिप्राय अगदी स्पष्ट आहे. त्याप्रमाणे संसाराची स्थिती आहे हे ज्ञानेश्वर चांगल्या प्रकारे स्पष्ट करतात.

हे असो झडती । आंधारें भोवंडितां कोलती ।
ते दिसे जैसी आयती । चक्राकार ॥ १३७
हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा ।
न देखोनि लोक पिसा । अव्ययो मानी ॥ ज्ञाने १५-१३८
अंधारात एक कोलीत गोल फिरविले तर त्या ठिकाणी अग्नीचे चाक निर्माण झाल्यासारखे भासते. त्याप्रमाणे हा संसारूपी वृक्ष जन्मतो, नाहीसा होतो. ते न जाणता वेडे लोक त्याला नित्य आहे असे म्हणतात. यापुढे या संसाराचे स्वरूप स्पष्ट करतांना ते पुढे म्हणतात -

ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रीही कीर न रिगे ।
तरी माजी दिसे वाउगें । मृगांबु जैसे ॥ २३८ ॥
तैसा आद्यंती कीर नाहीं । आणि साचचि नोहे कहीं ।
परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा । ज्ञाने. १५-२३९

ब्रह्मगिरीहून उगम पावत नाही आणि समुद्रालाही मिळते असे दिसत नाही परंतु मध्येच मृगजळ दिसते. ते सर्वथा मिथ्या आहे. त्याप्रमाणे संसाररूपी वृक्षाला आदि-अंत खरोखरच नाहीत. परंतु खोटेपणाच्या नवलाईमुळे तो आहे असे भासतो. त्याप्रमाणे संसार अनादी तर नाहीच पण त्याला आदी आणि अन्तसुद्धा नाहीत. तो मिथ्या आहे.


श्लोक- आदावन्ते च यन्नास्ति वर्तमानेऽपि तत्तथा ।
तथैः सदृशाः सन्तोऽवितथा इव लक्षिताः ॥ ३१ ॥


अर्थ- आरंभी आणि अंती जे नसते ते वर्तमानकाळीसुद्धा अस्तित्वात नसते. हे असत्य असताही ते सत्य आहे असे काही लोक म्हणतात.

ज्याला आदी नाही, अन्तही नाही त्याप्रमाणे जे अनादी आहे, ते अनन्त आहे ते अनन्त असते. ज्याला आदि-अंत नाहीत ती वस्तू मधल्या काळामध्येदेखील असत नाही. जी वस्तू जन्मापूर्वी आणि मृत्यूनंतर असत् आहे ती मधल्या काळामध्येसुद्धा अस्तित्वात असत नाही. मागे ज्ञानेश्वरमहाराजांचा मृगजळाचा एक दृष्टान्त दिला आहे. मृगजळ कोठून उगमही पावत नाही आणि समुद्रातही मिळत नाही. मध्ये दिसते तो केवळ भास आहे.*
[[* वैतध्य प्रकरण क्र. २, श्लोक ६वा पाहावा. ]]


श्लोक-सप्रयोजनता तेषां स्वप्ने विप्रतिपद्यते ।
तस्मादाद्यन्तवत्वेन मिथ्यैव खलु ते स्मृताः ॥ ३२ ॥


अर्थ- या सर्व जागृत दृश्यांचा साध्यहेतू स्वप्नात विफल होतो. म्हणून उत्पत्ति आणि लय करणारे दृश्य सर्वथा मिथ्या आहे.

स्वप्न आणि जागृतीत दिसणारे पदार्थ सर्वथा मिथ्या आहेत. एखादा मनुष्य भोजन करून झोपला असता त्यांस स्वप्नात आपण बुभुक्षित आहोत असे वाटते. प्रत्यक्षात मात्र ते खोटे असते. त्याचप्रमाणे एखादा मनुष्य स्वप्नात गंगेत स्नान करून आपले दान-कर्म करीत आहे असे पाहातो परंतु ज्या वेळी तो जागा होतो तेव्हा आपल्या अंथरुणावरच असतो. म्हणून जागृति आणि स्वप्न या दोन्ही दशांमधील सर्वभाव पूर्णपणे मिथ्या आहेत.*
[[* वैतथ्य प्रकरण क्र. २, श्लोक ७वा पाहावा. हे दोन्ही श्लोक या प्रकरणात पुन्हा आले आहेत. ]]


श्लोक- सर्व धर्मा मृषा स्वप्ने कायस्यान्तर्निदर्शनात् ।
संवृतेऽस्मिन्प्रदेशे वै भूतानां दर्शनं कुतः ॥ ३३ ॥


अर्थ- स्वप्नामध्ये शरीराच्या आत दिसणारे सर्व धर्म-भाव मिथ्या आहेत. कारण शरीराच्या आतील भागात विविध विषयधर्माचे दर्शन कसे होणार ? कारण ते तिथे नसतात.

स्वप्नामध्ये अथांग सागर अगर उत्तुंग गिरिशिखरे पाहिली. जागृतपणी हे कळले तर असा प्रश्न आपोआपच निर्माण होतो की, शरीराचा आकार लक्षात घेता पर्वत किंवा सागर या शरीरात असण्याची मुळीच शक्यता नाही. त्यामुळे ते पदार्थ आणि त्यांबरोबर त्यांचा धर्म, दोन्हीही मिथ्या आहेत. या ठिकाणी ते पदार्थ असल्याचा केवळ आभास निर्माण होतो. सत्यत्वापासून हे दृश्य सर्वदूर आहे.


श्लोक-न युक्तं दर्शनं गत्वा कालस्यानियमाद्‌गतौ ॥
प्रतिबुद्धश्च वै सर्वस्तस्मिन्देशे न विद्यते ॥ ३४ ॥


अर्थ- देशान्तराला जाण्यास जो काळ लागतो तो लागत नाही आणि त्या ठिकाणी न जाता त्या ठिकाणी असलेल्या पदार्थांचे होणारे दर्शन सर्वथा मिथ्या आहे. जागा झालेला मनुष्य आपण स्वप्नातील प्रदेशात आपण नाही आणि तो पदार्थही नाही असे अनुभवतो. म्हणून स्वप्नदर्शनांती जागा आणि पदार्थ मिथ्या आहेत.

पुण्याहून मुंबईला जाण्यास चार तास लागतात; परंतु झोपेच्या वेळी पडणाऱ्या स्वप्नाचा संपूर्ण काळ काही क्षणांचा असतो. जागृतीमध्ये या क्षणांच्या कालावधीत कोणत्याही वाहनाने मुंबईस पोहोचणे अशक्य आहे. त्या ठिकाणी मंत्रालयात आपण एका मंत्र्याला भेटलो असे स्वप्नदर्शन होते. परंतु जागृतींत ते मंत्रालय आणि मंत्री, दोन्हीही दिसत नाहीत. याचा अर्थ असा की, आपण मुंबईला गेलो, मंत्रालयात मंत्र्याला भेटलो, बोललो वगैरे. सर्वच स्वप्नदृश्य खोटे आहे, याचा अनुभव जागृतीत येतो. स्वप्न पूर्णतः मिथ्या आहे. मग त्यातील दर्शन आणि त्याचा अनुभव खरा कसा मानता येईल ? या प्रकारचा मिथ्याभाव प्रकट करताना ज्ञानदेवांनी स्पष्ट केलेला अभिप्राय या तत्त्वविचारावर प्रकाश टाकणारा आहे.

काय कीजती चेइलेंपणीं । स्वप्नीची तिथे बोलणी ।
तैसी जाण ते कहाणी । दुगळीची ते ॥ २१८
मृगजळाची गा तळी । तिये दिठी दुरूनीचि न्याहाळी ।
वांचूनि तेणें पाणीये साळी केळी । लाविसी काई ॥ ज्ञाने. १५-२२२
जागृतपणी स्वप्नातील चर्चा काय उपयोगी ? त्याप्रमाणे ही सर्व कथा फोल आहे असे समज. मृगजळाचे तलाव केवळ दुरूनच पाहावे. त्यातील पाण्याने भातशेत अगर केळीच्या बागा करता येणार नाहीत. त्याप्रमाणे स्वप्न, स्वप्नदृश्य आणि स्वप्नांतील क्रिया सर्व फोल आहेत.


श्लोक-मित्राद्यैः सह संमन्त्र्य संबुद्धो न प्रपद्यते ।
गृहीतं चापि यत्किचित्प्रतिबुद्धो न पश्यति ॥ ३५ ॥


अर्थ- स्वप्नामध्ये केलेली मित्रांबरोबरची चर्चा जागृतकाळी अनुभवाला येत नाही. स्वप्नामध्ये जे मिळवले ते जागृतीत हाती नसते.

स्वप्न आणि जागृती यांमध्ये विरोधाभास आहे हे या श्लोकात अधिक स्पष्ट केले आहे. स्वप्नामध्ये आपण काशीस गेलो, तेथील पंडितांना भेटलो, त्यांच्याजवळ काही चर्चा केली असे दिसते. स्वप्नातून जागृतीत आल्यावर आपण अंथरुणावर आहोत हे स्पष्टपणे जाणवते. इतकेच नव्हे, काही दिवसांनी काशीस गेलो, त्या पंडितांना समक्ष भेटलो आणि स्वप्नामध्ये आपण ज्या विषयाची चर्चा केली ती चर्चाही त्यांना सांगितली तर ते पंडित ही चर्चा झाली नसल्याचे स्पष्टपणे सांगतील. यावरून स्वप्नाची असत्यता प्रत्ययाला येते.


श्लोक-स्वप्ने चावस्तुकः कायः पृथगन्यस्य दर्शनात् ।
यथा कायस्तथा सर्वं चित्तदृश्यमवस्तुकम् ॥ ३६ ॥


अर्थ- निजलेल्या पुरुषाचा देह आणि स्वप्नातील पुरुषाचा देह निराळा असतो काय ? मनाने पाहिलेले स्वप्नातील शरीर आणि जागृत मनाने पाहिलेले शरीर मिथ्या आहे.

अंथरुणावर झोपलेला देह दिसतो त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये व्यवहार करणारा देहदेखील दिसतो. अर्थात हे पाहाणे केवळ मनाने केले जाते. स्वप्नात मनाने पाहिलेला देह ज्याप्रमाणे मिथ्या आहे त्याप्रमाणे जागृतीमधील सर्व वस्तूदेखील मिथ्याच आहेत.

स्वप्नीहि मानिले लटिके । तरी निर्वाहो कां एकसारिखें ।
तेवीं आभास हा क्षणिके । रीतीचा गा ॥ ज्ञाने. १५-२४३

स्वप्नांतील खोटे पदार्थ मूलतः नाहीत, तरीही ते आहेत असे मानले तरी ते एकसारखे टिकतात का ? तो क्षणिक आभास आहे. एक जीव दोन स्थूल देह धारण करीत नाही. या देहांत असणारे चित्त जागृतीमध्ये जे विषय आकलन करते ते स्वप्नामध्ये पाहता ते मिथ्या असल्याचे ज्ञान सर्वांना आहे. कारण स्वप्नातील सर्व विषय मनाने निर्माण केलेले असतात. अर्थात चित्तदृश्य वस्तू मिथ्या आहेत हा सिद्धान्त आहे. तो या ठिकाणीदेखील बाधित होत नाही.


श्लोक- ग्रहणाज्जागरितवत्तद्धेतः स्वप्न इष्यते ।
तद्धेतुत्वात्तु तस्यैव सज्जागरितमिष्यते ॥ ३७ ॥


अर्थ - जागृत अवस्थेत जसे विषयांचे आकलन केले जाते तसे स्वप्नांतही विषय ग्रहण केले जातात; त्यामुळे स्वप्न जागृतीचे कार्य आहे असे म्हटले जाते. जागृतीमधील विषयांचे आकलन हे स्वप्न अवस्थेतील विषयदर्शनाचे कारण आहे.

जागृतीमध्ये आपले मन विविध विषयांचे ग्रहण करते, त्याप्रमाणे स्वप्नातसुद्धा हे मन विषयांचे ग्रहण करते. या दोन्हींचा द्रष्टा एकच आहे. या पाहिलेल्या सर्व विषयांबद्दल सत्यता वाटते, परंतु ते खरे नव्हे. जागृतीमध्ये जीव हा ग्राहक असून वस्तू ग्राह्य असते त्याप्रमाणे स्वप्नामध्येसुद्धा जीव द्रष्टा असून विषय ग्राह्य असतात. जागृतीमध्ये ग्रहण केलेले विषय हे स्वप्नाचे कारण आहे. कारण जागृतीत जे पदार्थ ज्या गुण आणि आकारांनी ग्रहण केले जातात त्याच पद्धतीने स्वप्नांतही आकलन केले जातात. त्यामुळे जागृतीतील विषयग्रहण हे स्वप्नग्रहणाचे कारण होय. या सर्व विषयांचे मिथ्यापण स्वप्नातून जागृतीत आल्यावर अनुभवास येते. त्याप्रमाणे जागृतीत सत्य भासणाऱ्या विषयांचे मिथ्यापण ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर होते.


श्लोक-उत्पादस्याप्रसिद्धत्वादजं सर्वमुदाहृतम् ।
न च भूतादभूतस्य संभवोऽस्ति कथंचन ॥ ३८ ॥


अर्थ- पदार्थ कसा उत्पन्न झाला ते सिद्ध करता येणे अशक्य आहे. म्हणून सर्व पदार्थ अजन्म आहेत असे काही लोक म्हणतात. परंतु अज असलेल्या ब्रह्मापासून असत् वस्तूची निर्मिती होणे शक्य नाही.

सत्यासत्याचा ज्यांना अनुभव आहे त्यांना पदार्थाच्या उत्पत्ती आणि अन्य विकार यांचे समर्थन करता येत नाही. उत्पत्ती मुळातच नाही. दिसते ते सर्व असत् आहे. आत्मा सत् आहे. आत्म्यासारख्या सत् वस्तूला असत् वस्तूला जन्म देता येत नाही. हा महत्त्वाचा सिद्धान्त आहे. म्हणून सत् किंवा असत् यांना जन्म नाही. त्याचप्रमाणे एकमेक एकमेकाला जन्म देऊ शकत नाहीत. अर्थात स्वप्नातील मिथ्या विषयाला जागृतीतील मिथ्या विषयांचा अनुभव हे कारण आहे. स्वप्न हे जागृतीचे कार्य होय. अर्थात कारण मिथ्या म्हणून कार्य देखील मिथ्या आहे, असा या ठिकाणी सारांश आहे.


श्लोक- असज्जागरिते दृष्ट्‍वा स्वप्ने पश्यति तन्मयः ।
असत्स्वप्नेऽपि दृष्ट्‍वा च प्रतिबुद्धो न पश्यति ॥ ३९ ॥


अर्थ - जागृत अवस्थेमध्ये मिथ्या वस्तू अत्यंत तन्मयतेने पाहणारा द्रष्टा स्वप्नातदेखील त्याच मिथ्या वस्तू पाहतो. त्याचप्रमाणे स्वप्नात पाहिलेल्या मिथ्या वस्तू जागृत अवस्थेत अनुभवाला येत नाहीत.

अज्ञानामुळे जागृत अवस्थेत दोरीवर सर्प दिसतो. त्या परिणामामुळे जागृतीमधील द्रष्टा स्वप्नामध्ये ते दृश्य तसेच पाहतो. स्वप्नातील द्रष्ट्याला जागृतीत सत्यत्वाचा प्रत्यय येत नाही. जागृतीतील भ्रांति स्वप्नातील भ्रांतीला कारणीभूत आहे असा काहीचा अभिप्राय आहे, परंतु तो तितकासा बरोबर आहे असे वाटत नाही.


श्लोक-नास्त्यसद्धेतुकमसत्सदसद्धेतुकं तथा ।
सच्च सद्धेतुकं नास्ति सद्धेतुकमसत्कुतः ॥ ४० ॥


अर्थ- मिथ्यात्व हे दुसऱ्या मिथ्यत्वाचे कारण होत नाही. त्याचप्रमाणे सत् हे देखील असताचे कार्य होत नाही. सतापासून असताची उत्पत्ती होत नाही. असे असता असत् हे सताचे कार्य कसे होऊ शकेल ? (होणार नाही)

पारमार्थिक दृष्टीने विचार केला तर कार्य आणि कारण असा भेदभाव निर्माणच होत नाही. एखादी वस्तू एखाद्या वस्तूचे कार्य अगर कारण आहे असे पारमार्थिक स्थितीमध्ये अनुभवास येत नाही. यावरून चार प्रमुख गोष्टी लक्षात येतात.
१) सशाचे शिंग हे अन्य असद् वस्तूचे- आकाशपुष्पाचे कारण होऊ शकत नाही.
२) घटादी व्यावहारिक सत्य वस्तू सशाच्या शिंगासारख्या असद् वस्तूंचे कारण होऊ शकणार नाही.
३) अस्तित्वात असलेल्या वृक्ष, पाषाणादी वस्तू अन्य वृक्ष, पाषाणादी वस्तूंचे कार्य अगर कारण होऊ शकणार नाही.
४) सतापासून असताची उत्पत्ती होणे केव्हाही शक्य नाही.
या सर्वांचा विचार ज्ञानी पुरुषांनी केला असल्यामुळे अशा प्रकारचा कार्यकारण संबंध निर्माण करणे किंवा आहे असे म्हणणे सर्वथैव अनुचित आहे.


श्लोक- विपर्यासाद्यथा जाग्रदचिन्त्यान्भूतवत् स्पृशेत् ।
तथा स्वप्ने विपर्यासाद्धर्मास्तत्रैव पश्यति ॥ ४१ ॥


अर्थ - जागृतीत असलेल्या मनुष्याला भ्रांती निर्माण झाली म्हणजे तो ज्याची कल्पना देखील करता येणार नाही त्या वस्तू सत्यपणाने असल्याचे मानतो. त्याप्रमाणे स्वप्नातील पुरुष आपल्या चिंतनातून निर्माण केलेल्या अतर्क्य वस्तू स्वप्नात पाहातो.

जागृतीमध्ये आपली इंद्रिये ज्याप्रमाणे विचार करतात आणि विषय ग्रहण करतात त्याप्रमाणे त्या त्या विषयांचे दर्शन मनुष्याला स्वप्नात घडते. जागृतीत ज्या वासना त्या वस्तूशी एकरूप होतात त्याच वासना स्वप्नात आकार घेऊन दिसू लागतात. त्याप्रमाणेच ज्या वस्तूंचे चिंतन कधीही केलेले नाही अशा वस्तूसुद्धा स्वप्नामध्ये पाहिल्या जातात. जागृतीत पाहिलेल्या आणि स्वप्नात पाहिलेल्या वस्तूंचा काहीही संबंध नसतो. याचाच अर्थ असा की, जागृतीमधील वस्तू आणि स्वप्नातील वस्तु यांचा कार्यकारणभाव निर्माण होऊ शकत नाही.


श्लोक- उपलम्भात् समाचारदस्तिवस्तुत्ववादिनाम् ।
जातिस्तु देशिता बुद्धैरजातेस्त्रसतां सदा ॥ ४२ ॥


अर्थ- वस्तू प्राप्त होतात, शिष्टसंमत आचारामुळे स्वर्गादिकांची प्राप्ती होते, त्यामुळे अजाताची कल्पना सदैव भयप्रद वाटते. यासाठी श्रद्धायुक्त आणि भयग्रस्त लोकांसाठी सूज्ञ आणि दयार्द्र लोकांनी उत्पत्तीची अवस्था श्रुति स्मृति वगैरे ग्रंथांत विषद केली आहे.

श्लोकांतील जाति या पदाचा अर्थ उत्पत्ती असा आहे. व्यवहारामध्ये आपणास विविध वस्तूंची प्राप्ती होते. त्यांचा कार्यकारण संबंध लावला जातो. या वस्तूपलब्धतेमुळे विविध विनियोग नियम प्रचारात आले. त्यांनाच धर्म असे संबोधले गेले. या सर्व गोष्टींचा विनियोग कसा करावा, केव्हा आणि कोणी करावा या बाबतच्या विविध नियमांमुळे वर्ण आणि आश्रम यांचा उदय झाला. स्मृति म्हणजे या प्रकारच्या सर्व नियमांचे एकत्रीकरण. त्याप्रमाणे आचार आणि वस्तूचा विनियोग केला असता लहान अगर मोठी फले प्राप्त होतात असे सांगण्यात आले आहे. यामुळे द्वैताला जागा मिळते. यातूनच वस्तूला जन्म आहे असा निश्चय झालेले द्वैताचा आश्रय करतात. परंतु यांना वेदान्त मन्दबुद्धी असे म्हणतो. यामधील संबंध स्पष्ट व्हावा म्हणून श्रद्धावन्त सूत्रकार सृष्टी आणि ब्रह्म यांचा कार्यकारण भाव स्पष्ट करताना विविध पदार्थाची निर्मिती झाली असे म्हणतात. सृष्टीची उत्पत्ती हा अद्वैताकडे येण्यासाठी जे अनेक मार्ग आहेत त्यांपैकी एक आहे असे समजावे. अर्थात या ठिकाणी हे स्पष्ट करणे जरूर आहे की, हे मार्ग म्हणजे साधन आहे, साध्य नव्हे. त्याचप्रमाणे व्यावहारिक सत्य वाटले तरी ते पारमार्थिक सत्य कदापि होत नाही. काही वैदिक विद्वान अशा प्रकारे उत्पत्तिवादाचा उपदेश करतात. परंतु ज्यांचे चित वेदाभ्यासाने शुद्ध झाले आहे अशा लोकांना मात्र आत्मा या विषयाचा अनुभवप्रसाद असल्याने ते लोक हा विषय परमार्थप्रेरणेतून निर्माण झाला किंवा पारमार्थिक आहे असे केव्हाही म्हणणार नाहीत. सामान्यांना वेदांचा आणि त्यांतील गूढार्थाचा परिचय नसतो. तसा त्यांना अधिकारही प्राप्त झालेला नसतो. अशा लोकांना कोणत्याही वस्तूला जन्म नाही असे प्रतिपादन केले तर ते लोक नाराज आणि भयभीत होतील. त्यामुळे त्यांचे मन नास्तिकपणाचा आश्रय करील आणि त्यामुळे समाजात अधर्मता निर्माण होईल. केवळ अशा लोकांसाठी हा उपाय किंवा साधन म्हणून सांगण्यात आले आहे.


श्लोक- अजातेस्त्रसतां तेषामुपलम्भाद्वियन्ति ये ।
जातिदोषा न सेत्स्यन्ति दोषोऽप्यल्पो भविष्यति ॥ ४३ ॥


अर्थ- उत्पत्तीचा प्रत्यक्ष अनुभव येतो म्हणून द्वैताचा अवलंब करणारे जे लोक आहेत त्यांना उत्पत्तिदोषाचा अवैदिक वाद मान्य केला म्हणून निर्माण होणाऱ्या दोषांचा स्पर्श होत नाही. (त्यांपासून निर्माण होणारे अनिष्ट त्यांस त्रास देत नाही.) दोष अत्यल्प असतात.

विविध वस्तू निर्माण होतात त्याप्रमाणे आत्मा नावाची वस्तू देखील निर्माण होते असे म्हणणारे काही लोक आहेत. हे लोक वर्णाश्रमधर्मनियम द्वैतमूलक आहेत म्हणून त्यांचा भीतियुक्त स्वीकार करतात. थोडक्यात, द्वैताचा स्वीकार करतात. तरीही या लोकांमध्ये आत्म्याबद्दल श्रद्धा असते. उत्पत्तिवादाचा जरी त्यांनी स्वीकार केला असला तरी अशा लोकांना या विचारसरणीचा त्रास संभवत नाही. या अज्ञानजन्य प्रवृत्तीमुळे अद्वैताशी विरोध असल्यामुळे हा जातिवाद त्यांच्याकडून स्वीकारला गेल्याने त्यांना गर्भवासादी दोषांचा स्पर्श होईल यात शंका नाही. परंतु श्रीमत् भगवद्‌गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे -
बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते । (भ. गी. ७-१९)
अनेक गर्भवासांनंतर त्यांच्याजवळ अद्वैताबद्दल श्रद्धा असल्याने ज्ञानप्राप्ती होऊन त्यांना अजातवादाचे वैभव कळेल. त्यांना ब्रह्मपदवीपर्यंत जाता येईल. यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की, अज्ञानाने परंतु श्रद्धेने केलेली क्रिया ज्ञानाकडे नेणारी ठरते. अर्थात त्याला काळाचे कोणतेही बंधन नाही. त्यामुळे सामान्य साधकानेसुद्धा यथार्थ ज्ञानी पुरुषाचे दर्शन आणि मार्गदर्शन लाभेपर्यंत श्रद्धामय असलेल्या आपल्या मार्गाचा त्याग करू नये.


श्लोक-उपलम्भात्समाचारान्मायाहस्ती यथोच्यते ।
उपलम्भात्समाचारादस्ति वस्तु तथोच्यते ॥ ४४ ॥


अर्थ- मायेने उत्पन्न केलेला (इंद्रजालादी क्रियांनी) हत्ती आपणास पाहाता येतो. त्याच्याबरोबर तो अस्तित्वात असल्याप्रमाणे व्यवहार केला जातो, परंतु प्रत्यक्षात मात्र तो नसतो. त्याप्रमाणे मायेने उत्पन्न झालेल्या वस्तू आपण समक्ष पाहतो. त्यांच्याबरोबर व्यवहार करतो परंतु परमार्थतः त्या वस्तू नसतात.

एखादा जादुगार काही वस्तु निर्माण करतो आणि त्या सर्व वस्तू व्यवहारतः अस्तित्वात आहेत असे समजून आपण व्यवहार करतो. परंतु सूक्ष्मपणे विचार करता जादुगाराने निर्माण केलेल्या वस्तू म्हणजे केवळ मायाजाळ किंवा भास आहे हे लक्षात येते, परंतु किंचित उशिरा. ज्ञानदेवांनी या बाबतीत एक मार्मिक दृष्टान्त देऊन हा विषय अधिक स्पष्ट केला आहे. आपण भिंगरी फिरवितो. तिला भरपूर वेग दिला म्हणजे ती फिरत असूनसुद्धा फिरत नसल्यासारखी भासते. इतकेच नव्हे, तर भूमीवर ती स्तब्धपणे उभी राहिल्याचेही जाणवते. परंतु अत्यंत सूक्ष्मपणे विचार केला तर ही भिंगरी भूमीवर स्तब्धपणे उभी राहिलेली नाही हे लक्षात येते.

पैं भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसि जैसी जडली ।
तैसा वेगातिशयो भुली । होतु जाय ॥ ज्ञाने. १५-१३६

आजच्या चित्रपटांच्या जगात आपणास हा अनुभव येतो की, एखाद्या चित्रपटामध्ये एखादी भयंकर आग लागली आहे. असे पाहाताच आपणास भीती वाटते. वस्तुतः ही आग खरी नसताना देखील ती खरी आहे असे मानून आपले त्याबाबतचे व्यवहार होतात. हे आपल्या अनुभवातले आहे. त्याप्रमाणे या विश्वाच्या पसाऱ्यात विश्वासहित सर्व वस्तू उत्पन्न झाल्याप्रमाणे मानून त्याप्रमाणे आपण त्या वस्तूंबरोबर आपले सर्व व्यवहार जणू त्या सर्व वस्तू सत्य असल्याप्रमाणे चाललेले असतात. हा सर्व व्यवहार अज्ञानाचा आविष्कार आहे. ज्ञानामुळे या आचारांत बदल होतो.


श्लोक-जात्याभासं चलाभासं वस्त्वाभासं तथैव च ।
अजाचलमवस्तुत्वं विज्ञानं शान्तमद्वयम् ॥ ४५ ॥


अर्थ - निर्माण झाले आहे त्याचे व्यवहार घडत आहेत. गुण आणि अन्य धर्मांनी ते युक्त आहे असे भासमान होणारे विज्ञानमय आत्मतत्त्व हे निर्माण न होणारे, अचल, निर्गुण, धर्मशून्य, शान्त आणि अद्वय असे आहे.

दोरीवर सर्पाचा आभास होतो. सर्प आभासात्मक आहे. अर्थात हा आभास दोरीच्या अधिष्ठानावर झालेला आहे. दोरी नसती तर हा आभास झाला नसता. त्याप्रमाणे संपूर्ण विश्व आभासात्मक आहे असे म्हणताना कोणाच्या तरी अधिष्ठानावर हा आभास होतो हे निश्चित आहे. हे अधिष्ठान कोणते आणि त्याचे वैभव काय आहे असा प्रश्न सामान्यांपुढे येईल. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठीच हा श्लोक आहे. ज्या अधिष्ठानावर हे विश्व भासते त्या अधिष्ठानाचे वर्णन करताना पू. पा. गौडपादाचार्य म्हणतात की, ज्याला उत्पत्ती नाही, कोणत्याही गुणांनी ते लिप्त होत नाही, कोणताही धर्म त्याला नाही असे जे आत्मतत्त्व ते या आभासाचे अधिष्ठान आहे. या अधिष्ठानावरच व्यवहार घडत आहेत असे वाटते. इतकेच नव्हे, तर ज्याला उत्पत्ती नाही, कोणतेही गुणधर्म नाहीत त्याला उत्पत्ती, स्थिती, लय या अवस्था आणि सर्व प्रकारचे गुण आहेत असे समजून त्या आत्मतत्त्वाशी विविध व्यवहार केले जातात. श्रीमत् भगवद्‌गीते मधील -
अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाश्रितम् ।
परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ भ.गी. ९-११
या श्लोकावर ज्ञानेशांनी जे व्याख्यान केले आहे ते सर्व व्याख्यान म्हणजे जणु काही गौडपादाचार्यांच्या या श्लोकावरीलच भाष्य आहे असे वाटते. या श्लोकावर एकूण बत्तीस ओव्या आहेत. अर्थात सर्व जरी मननीय असल्या तरी सर्वच्या सर्व या ठिकाणी देता येणार नाहीत. जिज्ञासूंनी त्या मुळातून पाहाव्यात. भगवंत म्हणजे खरे तर वरील श्लोकात नमूद केल्याप्रमाणे अविनाशी आणि अविकारी असलेले आत्मतत्त्व होय. 'अवजानन्ति मां मूढा' हे पद स्पष्ट करताना ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात -

म्हणोनि मोहिलेनि मनोधर्मे । हेंचि मी मानूनि संभ्रमे ।
मग येथीची जियें जन्मकर्मे । तिये मजचि म्हणती ॥ १५५ ॥
येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासी कर्म ।
विदेहासी देहधर्म । आरोपिती ॥ १५६ ॥
मज आकारशन्या आकारु । निरुपाधिका उपचारु ।
मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक ॥ १५७ ॥
मज सहजातें करिती । स्वयंभातें प्रतिष्ठिती ।
निरंतरातें आव्हानिती । विसर्जती गा ॥ १६३ ॥
मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेक सुखांचा कामु ।
आघवाचि मी असे समु । की म्हणती एकदेशी ॥ ज्ञाने. ९-१६७

भ्रममय झालेल्या मनोवृत्तीने हे स्थूलदृश्य मीच आहे असे मानतात आणि त्याला जन्ममरणादी कर्मे आहेत म्हणून मानतात. त्यामुळे नाव नसलेल्या मला नाव ठेवतात. वस्तुतः मी क्रियाशून्य आहे. पण मी क्रिया करतो असे म्हणतात. देहाच्या मर्यादा नसलेल्या मला सर्व देहधर्म आहेत असे समजतात. मी निराकार असता मला आकार आहे असे म्हणतात. मला निरनिराळे उपचार करतात आणि शास्त्रबंधन नसलेल्या मला व्यवहारात बंदिस्त करतात. मी नित्य आहे. परंतु मला आकाराला आणतात. नित्यसिद्ध असलेल्या माझी प्राणप्रतिष्ठा करतात. मला आवाहन करतात आणि माझे विसर्जन देखील करतात. मी स्वतःच्या आनंदात रमणारा आहे, परंतु मला अनेक सुखांची इच्छा आहे असे मानतात. मी सर्व व्यापून राहिलो असतानाही मी एकाच ठिकाणी आहे असे मानतात.

या विवेचनात व्यावहारिक आणि पारमार्थिक अवस्थांचे तौलनिक चित्र रेखाटण्यात आलेले आहे. व्यावहारिक क्रिया ह्या अविकृत पारमार्थिक अधिष्ठानावर आधारलेल्या असतात. त्या व्यावहारिक क्रिया आपण सत्य मानून चालतो. वस्तुतः त्या सर्व क्रिया आभासात्मक आहेत हे सांगण्यासाठी हा श्लोक आहे.


श्लोक- एवं न जायते चित्तमेवं धर्मा अजाः स्मृताः ।
एवमेव विजानन्तो न पतन्ति विपर्यये ॥ ४६ ॥


अर्थ- याप्रमाणे ज्ञानमय चित्ताला जन्म नाही आणि त्याचे सर्व धर्मही अजआहेत : अशा प्रकारचे ज्ञान ज्यांस झाले ते द्वैताच्या मोहात कधीही सापडत नाहीत.

या सर्व विवेचनाचा सारांश एवढाच आहे की, आत्मा एकमेव असून तो अज आहे. आपण जे समजतो आणि वागतो त्या सर्व आरोपांचे अधिष्ठान तो आत्माच आहे. या ठिकाणी चित्त या पदाचा अर्थ चैतन्यमय वस्तु असा आहे. स्वयमेव चैतन्यमय असणारी वस्तू केवळ आत्मा आहे. आत्म्याचे धर्म देखील आत्म्याप्रमाणे अज आहेत. व्यवहारात विविध देह असतात. परंतु त्या सर्वामध्ये नांदणारा आत्मा मात्र विविध नसून एकच आहे. ज्यांनी विविध एषणांचा विचारपूर्वक त्याग केला असल्याने जे विवेकी झाले, त्याच आधारावर ज्यांना आत्मतत्त्वाचे ज्ञान झाले ते या विविधतेचाही त्याग करतात. केवळ आत्मतत्त्व एकमेव असल्याने त्या तत्त्वाशी ते समरस होतात. असे एकत्व प्राप्त झाल्यावर त्या ठिकाणी दुःख आणि मोहाला जागाच उरत नाही. ईशावास्योपनिषदांत अशा प्रकारचा एक सर्वोत्तम अनुभव सांगताना म्हटले आहे -
तत्र को मोहः कः शोकः एकत्वमनुपश्यतः ।
ज्या एकमेव असणाऱ्या आत्मतत्त्वाचा अनुभव प्राप्त झाल्याने ज्याची दृष्टी सर्वत्र आत्म्याचेच अवलोकन करते त्याला कुठला शोक आणि कुठला मोह ? शोकादी विकार त्याच्या वाट्यालाही जाणार नाहीत.


श्लोक-ऋजुवक्रादिकाभासमलातस्पन्दितं यथा ।
ग्रहणग्राहकाभासं विज्ञानस्पन्दितं तथा ॥ ४७ ॥


अर्थ- पेटलेली मशाल सरळ, वेडीवाकडी किंवा गोल फिरविली तर फिरण्याच्या गतीप्रमाणे ती रेषायुक्त दिसते. त्याप्रमाणे विज्ञानाचे स्पंदन ग्रहण, ग्राह्य आणि ग्राहकत्वाचा आभास निर्माण करीत असतात.

एखादी पेटलेली उदबत्ती किंवा चूड हातात धरून सरळ रेषेत वाटोळी किंवा वेडीवाकडी फिरविली तर त्याप्रमाणे अग्निरेखा असल्याचे जाणवते. तसे पाहिले तर या पेटलेल्या चुडीला किंवा उदबत्तीला कोणताही आकार नाही, परंतु आपण ज्याप्रमाणे त्याला गती देऊ त्याप्रमाणे अग्नीचा आकार भासमान होतो. त्याप्रमाणे या ठिकाणी देखील विषय आणि विषयांचा ग्राहक यांचा जो सत्यपणा जाणवतो तो सत्य नसून आभासात्मक आहे. ब्रह्म अचल आहे परंतु अज्ञानवशात ते विविध रूपाने नटले आहे असे वाटते. हा केवळ आभास आहे. स्वरूपाच्या बाबतीत अज्ञानजन्य स्फुरण होऊ लागले म्हणजे विविधता अनुभवाला येते. एकच स्त्री, पण ती पतीची पत्नी, मुलाची माता, भावाची बहीण, पुतण्याची चुलती, भाच्याची मामी, सासूची सून म्हणून विविध रूपाने नटते. त्याप्रमाणे एकच ज्ञानमय ब्रह्म व्यवहारी झाल्याचा आभास होतो. अनेकत्व ही भ्रांती आहे तर एकत्व हे विज्ञान आहे.


श्लोक-अस्पन्दमानमलातमनाभासमजं यथा ।
अस्पन्दमानं विज्ञानमनाभासमजं तथा ॥ ४८ ॥


अर्थ - स्थिर असलेली प्रदीप्त चूड किंवा उदबत्ती काही उत्पन्न करणारी नाही आणि ती आभासही उत्पन्न करीत नाही. त्याप्रमाणे स्पंद न पावणारे विज्ञान आभासशून्य आणि अज असते.

अग्नि स्वतःच्या स्वरूपात असला म्हणजे तो नित्य निराकार असतो. प्रज्वलित आणि गतिमान झालेली उदबत्ती गतिशून्य झाली म्हणजे तिने प्रदर्शित केलेला आकार देखील त्याबरोबर लयाला जातो. याच नियमाने अज्ञानामुळे निर्माण झालेली स्पंदने विविध आकार आणि वर्णांचे प्रदर्शन करतात. परंतु ज्यामुळे ही स्पंदने निर्माण झाली ते अज्ञान नाहीसे झाले, त्याची जागा ज्ञानाने घेतली म्हणजे विविध आकार आणि वर्ण यांची जागा एकत्व घेते. या एकत्वाच्या अनुभवामुळे विषय आणि विषयी इत्यादी भेद अज्ञानामुळे निर्माण झाले याची जाणीव होते. ज्ञान म्हणजे आत्मरूप ते अज, अचल आणि एकमेव आहे याचा अनुभव प्राप्त होतो. अशा प्रकारचे ज्ञान प्राप्त होणे यालाच महात्मे ज्ञानाचा किंवा ब्रह्माचा साक्षात्कार असे म्हणतात. ज्ञानेश्वरमहाराजांनी हा अनुभव अत्यंत चांगल्या शब्दांत व्यक्त केला आहे.

किंबहुना पांडवा । जें आघवेचि असे आघवा ।
जेथ नाही रिगावा । द्वैतभावासी ॥ ९३४ ॥
जे देखिलियाचिसवें । दृश्य द्रष्टा हे आघवें ।
एकवाट कालवे । सामरस्यें ॥ ३५ ॥
मग तेंचि होय ज्ञान । ज्ञाता ज्ञेय हन ।
ज्ञानें गमिजे स्थान । तेंही तेंचि ॥ ज्ञाने १३.९३६

जे सर्व सर्वपणाने असल्याने ज्या ठिकाणी द्वैताचा शिरकावदेखील होत नाही. किंवा जे अनुभविता दृश्य आणि पाहणारा एकरूप होऊन जातात तेच ब्रह्म, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय यांचे एकरूपस्थान होते.


श्लोक- अलाते स्पन्दमाने वै नाभासा अन्यतोभुवः ।
न ततोऽन्यत्र निस्पन्दान्नालातं प्रविशन्ति ते ॥ ४९ ॥


अर्थ- पेटवलेली चूड, फिरत असताना होणारा आभास अन्य कारणामुळे होत नाही हे खरे आहे. त्याप्रमाणेच तो आभास स्थिर चूडेकडून होत नाही आणि तो आभास चूडेमध्येदेखील प्रवेश करीत नाही.

होणारा आभास अन्य कोणत्याही कारणाने निर्माण होत नाही. अन्यत्र तो भासत नाही आणि ज्या ठिकाणाहून हा आभास निर्माण होतो त्या बिंदूमध्येही तो प्रवेश करीत नाही. याचाच अर्थ असा की, ह्या आभासाला अन्य कोणतेही कारण नाही. पेटवलेली मशाल जर फिरविली तरच आभास निर्माण होतो. परंतु ती स्थिर असेल तर मात्र असा आभास होण्याचे कारण नाही. या सर्वांचा सारांश इतकाच की, आभास मिथ्या आहे.


श्लोक-न निर्गता अलातात्ते द्रव्यत्वाभावयोगतः ।
विज्ञानेऽपि तथैव स्युराभासस्याविशेषतः ॥ ५० ॥


अर्थ- द्रव्याचा अभाव असल्याने आभास कोलितापासून निघून बाहेर गेला असे नव्हे. आभास द्रव्यशून्य असल्याने मिथ्या आहे.

द्रव्य याचा अर्थ गृहादी वस्तू. वस्तूचा अभाव असल्याने आभासाला वस्तुत्व प्राप्त होत नाही. वस्तू असेल तर येणे आणि जाणे या क्रिया संभवतात; परंतु आभास ही वस्तू नसल्याने तिला गती आहे असे म्हणणे चुकीचे आहे. थोडक्यात, वस्तुत्वशून्य आभास कोलिताच्या बाहेर जात नाही अगर कोलितामध्येही मिसळत नाही. कारण तो पूर्णतया मिथ्या आहे.


श्लोक-विज्ञाने स्पन्दमाने वै नाभासा अन्यतोभुवः ।
न ततोऽन्यत्र निस्पन्दान्न विज्ञानं विशन्ति ते ॥ ५१ ॥


अर्थ- विज्ञानाच्या स्पंदामुळे निर्माण होणारे आभास अन्यत्र उत्पन्न होत नाहीत. ज्ञान प्राप्त झाले म्हणजे आभास अन्यत्र जात नाहीत आणि विज्ञानामध्ये देखील प्रवेशत नाहीत.

अलात (कोलिताचे फिरणे) आणि विज्ञान- म्हणजेच त्या फिरणाऱ्या कोलिताबद्दल असलेले ज्ञान, दोन्हीही मिथ्या आहेत. आभासाची कुठेही उत्पत्ती करता येत नाही किंवा निश्चिती देखील करता येत नाही. त्यामुळे उत्पन्न होणारे ज्ञान हे मिथ्या आहे. विज्ञान अचल आहे या अधिष्ठानावर झालेला भास किंवा आभास नेहमीच मिथ्या आहे याचे ज्ञान होणे आवश्यक आहे.


श्लोक-न निर्गतास्ते विज्ञानाद् द्रव्यत्वाभावयोगतः ।
कार्यकारणताभावाद्यतो चिन्त्याः सदैव ते ॥ ५२ ॥


अर्थ- द्रव्यत्वाचा अभाव असल्यामुळे आभास विज्ञानाला सोडून जात नाही म्हणून कार्यकारण भाव या ठिकाणी उत्पन्न होत नाही. ते सर्व आभास अचिंत्य आहेत.

निश्चल असलेल्या विज्ञानातून आभासात्मक दर्शन होणे अशक्यप्राय आहे. त्याप्रमाणे त्यातून जड वस्तूची निर्मिती होणेही शक्य नाही. आभास स्वतः होऊन उत्पन्न होत नाही, तरीही आभास जाणवतो ही स्थिती आहे. अर्थात हा केवळ भ्रांत मनाचा खेळ आहे, मिथ्या आहे, असेच याचे निदान होते.


श्लोक- द्रव्यं द्रव्यस्य हेतुः स्यादन्यदन्यस्य चैव हि ।
द्रव्यत्वमन्यभावो वा धर्माणां नोपपद्यते ॥ ५३ ॥


अर्थ - व्यवहारात एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचे उत्पत्तिकारण असते. म्हणजेच द्रव्य आपल्या स्वतःच्या उत्पत्तीचे कारण होऊ शकत नाही. आत्मतत्त्वाच्या बाबतीत असे म्हणता येत नाही की, आत्मा द्रव्य, अद्रव्य आणि गुणकर्मांनी लिप्त आहे.

काही पंडितांचे असे म्हणणे आहे की, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचे कारण असते. या विश्वामध्ये अशा प्रकारचा कार्यकारणभाव सर्वत्र आढळतो. तेव्हा या आत्मैक प्रक्रियेतसुद्धा कार्यकारणभाव अस्तित्वात असला पाहिजे. परंतु वस्तुतः तसे नाही. कोणतेही द्रव्य स्वतःचे कारण असू शकत नाही. त्याप्रमाणे द्रव्याचे कारण एखादे अद्रव्य असण्याची देखील शक्यता नाही. आत्मा ही एकमेव अज अशी वस्तू आहे. त्याला कोणतेही गुणधर्म नाहीत. म्हणून असा निर्णय करता येतो की, आत्मा कार्यकारणभावातीत आणि कोणत्याही गुणधर्माशिवाय आहे.


श्लोक- एवं न चित्तजा धर्माश्चित्तं वापि न धर्मजम् ।
एवं हेतुफलाजातिं प्रविशन्ति मनीषिणः ॥ ५४ ॥


अर्थ- ज्ञानमय चित्तापासून कोणतेही बाह्य धर्म निर्माण होत नाहीत. त्याचप्रमाणे बाह्य धर्मापासून ज्ञानही उत्पन्न होत नाही. या विचारानेच हेतुफलांचे अजत्व विद्वान लोक निश्चित करीत असतात.

या ठिकाणी चित्त म्हणजे आत्मैकरूप होय. तेच शुद्ध गुणरहित ज्ञान म्हणूनही ओळखले जाते. वस्तूच्या उत्पत्तीला कारण असणारे पदार्थ आणि त्यांचे धर्म हे जड आहेत. जड असल्याने ते ज्ञानमय चित्ताचे कार्य होऊ शकत नाही आणि कारणही होऊ शकत नाही. पारमार्थिक विवेकी असे म्हणतात की, दिसणारा आकारादी धर्म हाआत्म्यावरील आभास आहे. आभास केव्हाही खरा नसतो तेव्हा आत्म्याला उत्पत्ती अथवा लय आहे, असे कसे म्हणता येईल ? थोडक्यात, आत्म्यामध्ये हेतू आणि फल यांचा अभाव आहे.


श्लोक-यावद्धेतुफलावेशस्तावद्धे तुफलोद्‌भवः ।
क्षीणे हेतुफलावेशे नास्ति हेतुफलोद्‌भवः ॥ ५५ ॥


अर्थ- जोपर्यंत फल व हेतू याबद्दल अभिनिवेश शिल्लक असतो तोपर्यंतच त्यांचा उद्‌भव होतो. तो अभिनिवेश क्षीण झाला म्हणजे फलहेतूचा उद्‌भव होत नाही.

प्रत्यक्ष व्यवहारात असे दिसते की, धर्म किंवा अधर्म फलाचे कारण होतें. मी कर्ता आहे. माझे आचरण धर्मशास्त्राप्रमाणे आहे, असा अभिमान ज्याच्याजवळ असतो त्याच्याजवळ फळ आणि हेतू यांची उत्पत्ती असते. त्याप्रमाणे जन्ममरणादी फलांचा उपभोग त्याला घ्यावा लागतो. त्यासाठी त्याला जन्म घ्यावा लागतो आणि कर्माची बरी-वाईट फळे भोगून संपवावी लागतात. जन्म का घ्यावा लागतो याचे कारण देताना ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात -
अगा कर्में जै उरावें । तें सुखदुःखीं फळावें ।
तयातें भोगावया यावें । देहा एका ॥ ज्ञाने. ९.४०३

याप्रमाणे फल आणि हेतू यांबाबत जोपर्यंत अभिमान आहे तोपर्यंत या फलहेतूचा उद्‌भव होतो. ज्या वेळी अशा अहंकाराला जागा न देता ईश्वरार्पण बुद्धीने आचार घडतात तेव्हा फलहेतूंचे कारणच नष्ट झाल्याने पुढील दुःखाचे कारण संपते. हेतूपासून फल आणि फलापासून हेतू हे चक्र संपते. अशा तर्‍हेचा फलहेतुयुक्त अभिमान हे अज्ञान आहे. या अज्ञानाचा नाश झाला की, त्याबरोबर फलहेतूचाही नाश आपोआप होतो.


श्लोक-यावद्धेतुफलावेशः संसारस्तावदायतः ।
क्षीणे हेतुफलावेशे संसारं न प्रपद्यते ॥ ५६ ॥


अर्थ- फल आणि हेतू यांबद्दल जितका अभिनिवेश दीर्घ काल असेल तितका संसार लांबतो, परंतु फलहेतूंचा आग्रह क्षीण झाला की, संसाराची समाप्ती होते.

मागील श्लोकाच्या विवेचनात उद्धृत केलेल्या ज्ञानेशांच्या अभिप्रायाप्रमाणे हेतू अंत:करणात आहे तोपर्यंत कर्म होत राहाणार आणि त्याचे बरे-वाईट फल संचित होत राहाणार. त्याचा भोग घेण्यासाठी जन्म घ्यावा लागेल. त्या जन्मात आणखी काही फल संचित होऊन पुढील जन्म, याप्रमाणे ही जन्ममरणाची मालिका किती काळ चालू राहील हे सांगण्यासाठी ह्या श्लोकाचा प्रस्ताव आहे. जोपर्यंत फल आणि हेतू यांना अन्तःकरणात जागा आहे तोपर्यंत या मालिकेचा अंत होणार नाही. ज्या वेळी परमेश्वराच्या प्रसादाने निष्काम कर्माचार घडेल त्या वेळी हळूहळू हेतू आणि फल क्षीण होत जातील, जेव्हा हेतू पूर्णत्वाने संपेल तेव्हा या जन्ममरणाची मालिकादेखील संपेल. पुन्हा पुन्हा जन्माला येणे आणि मृत्यू पावणे या प्रवासाला संसार असे म्हणतात.
पुनरपि जननं पुनरपि मरणं ।
पुनरपि जननीजठरे शयनम् । इह संसारे- ॥ - शंकराचार्य
किंवा -
मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेच्या दाथरीं ।
उकडूनि नवमासवरी । जन्म जन्मोनि मरती ॥ ज्ञाने. ९.३३१ ॥
जन्ममरणाचा प्रवास संपणे म्हणजे संसाराचा अंत होणे होय.


श्लोक-संवृत्या जायते सर्व शाश्वतं नास्ति तेन वै ।
सद्‌भावेन ह्यजं सर्वमुच्छेदस्तेन नास्ति वै ॥ ५७ ॥


अर्थ- हे सर्व दृश्य अज्ञानजन्य विषयात्मक आहे. अविद्येमुळे ते उत्पन्न झाल्याने त्यामध्ये शाश्वती नसते. सत् मात्र अजन्म आहे. त्याचा विनाश कधीही होत नाही.

अविद्येमुळे अनेक विषय निर्माण होतात आणि त्यांचा आश्रय करणे यालाच लौकिक आचार किंवा प्रपंच असे म्हणतात. या अविद्येमुळेच हेतू, फल आणि विषय उत्पन्न होतात आणि विनाशही पावतात. हे सर्व दृश्य कल्पित आहे. कल्पनागम्य दृश्य नेहमी अनित्य असते. या तत्त्वाप्रमाणे संसाराचे स्वरूपदेखील उत्पत्तिविनाशात्मक आहे. परंतु जोपर्यंत अज्ञानाचे प्राबल्य आहे तोपर्यंत हा संसार कधीही संपणार नाही, असे वाटते. त्याप्रमाणे संसार सत्य असल्याचे निश्चित मत बनते. आत्मा अज असून या दृश्याचे अधिष्ठान आहे. अर्थात आत्मा निर्माण होत नाही म्हणून त्याचा नाशही होत नाही.

'उपजे ते नाशे । नाशिले पुनरपि दिसे । ' ज्ञाने. २.१५९

हा ज्ञानेशांचा एक महत्त्वाचा सिद्धान्त या श्लोकातील आशयाचे स्पष्टीकरण करणारा आहे. जो मनुष्य ज्ञानी आहे त्याला दोरीवर सर्पाचा भास कदापि होणे शक्य नाही. म्हणजे अशा ज्ञानी माणसाच्या दृष्टीने दोरीवर सर्पाचा आभास ज्याप्रमाणे उत्पन्न होत नाही त्याप्रमाणे तो विनाशही पावत नाही. त्यामुळे भ्रांती, भय वगैरे व्यावहारिक विकारही उत्पन्न होत नाहीत. भय आणि भ्रांती अज्ञानजन्य आहेत. ते अज्ञानच नसल्याने पुढची विकृती अस्तित्वातच येऊ शकत नाही.


श्लोक-धर्मा य इति जायन्ते जायन्ते ते न तत्त्वतः ।
जन्म मायोपमं तेषां सा च माया न विद्यते ॥ ५८


अर्थ- जे धर्म उत्पन्न होतात असे वाटते ते मूलतः उत्पन्नच होत नाहीत. त्यांचा जन्म केवळ कल्पनेपोटी होतो. ती कल्पना किंवा अविद्या केव्हाही सत्य रूपात असत नाहीत.

आत्मा आणि त्याभोवती असणाऱ्या वस्तूचे अनेक धर्म असतात, असे म्हटले जाते. परंतु हे म्हणणे अवास्तव आहे. कारण हे धर्म मायिक आहेत. या सर्वांचा जन्म मायेमुळे होतो. वस्तुतः मायाच असत्य असल्याने त्यापासून निर्माण होणारे धर्मसुद्धा असत्यच आहेत.


श्लोक-यथा मायामयाबीजाज्जायते तन्मयोऽङ्‌कुरः ।
नासौ नित्यो न चोच्छेदी तद्वद्धर्मेषु योजना ॥ ५९ ॥


अर्थ- मायेने उत्पन्न केलेल्या बीजापासून मायामय अंकुर निर्माण होतो. त्याप्रमाणेच आत्मधर्मदेखील मायेमुळेच उत्पन्न होतात. त्यापासूनच मायिक संसाराची उत्पत्ती होते. ह्या बीजांकुराला नित्यत्व नाही त्याप्रमाणे विनाशही नाही. त्याप्रमाणेच आत्मधर्माचे स्वरूप आहे.

एखादा जादूगार ज्याप्रमाणे आंब्याच्या कोयीपासून आंब्याचा अंकुर आणि मोठे झाड मायेने निर्माण करते. ते झाड किंवा तो अंकर उत्पन्न झाल्यासारखे जरी दिसत असले तरी तसे ते नसते. त्यांना ज्याप्रमाणे नित्यत्व नसते त्याप्रमाणे त्यांना विनाशही नसतो. कारण आंब्याची कोय, अंकुर किंवा झाड ही मुळातच नसतात हे सामान्यांना देखील ज्ञात आहे. हाच व्यावहारिक न्याय आत्मधर्माच्या बाबतीतही तसाच लागू होतो. थोडक्यात, उत्पत्ती आणि विनाश हे विकार भ्रांतिमूलक आहेत.


श्लोक-नाजेषु सर्वधर्मेषु शाश्वताशाश्वताभिधा ।
यत्र वर्णा न वर्तन्ते विवेकस्तत्र नोच्यते ॥ ६० ॥


अर्थ- उत्पन्न न होणाऱ्या सर्वच धर्मांना शाश्वत किंवा अशाश्वतही म्हणता येत नाही. ज्या ठिकाणी शब्दाची प्रवृत्ति नाही त्या ठिकाणी धर्माचा विवेक करता येत नाही.

आत्मा उत्पन्नही होत नाही आणि त्याचा नाशही होत नाही. यामुळे त्यास नित्य किंवा अनित्य अशा दोन्ही प्रकारच्या उपाधींनी संबोधता येत नाही. अशा अजाचे वर्णन करणे अशक्य आहे. त्या ठिकाणी शब्द काम करू शकत नाहीत. त्यामुळे आत्म्याच्या बाबतीत शब्दप्रवृत्ती नसल्याने शब्दाने आत्म्याचे स्वरूप प्रकट करता येत नाही. त्यामुळे शब्दांच्या राज्यात आत्मा नित्य आहे अगर अनित्य आहे असे म्हणता येत नाही. 'यतो वाचा निवर्तन्ते । ' ज्या ठिकाणाहून वाणी परत फिरते त्या ठिकाणी श्रुती प्रमाण मानण्यात येते. या ठिकाणी आत्म्याचे वर्णन शब्दांनी करता येत नाही, असा याचा मथितार्थ.


श्लोक-यथा स्वप्ने द्वयाभासं चित्तं चलति मायया ।
तथा जाग्रद्‌द्वयाभासं चित्तं चलति मायया ॥ ६१ ॥


अर्थ- द्वैताचा भ्रम निर्माण करणारे चित्त स्वप्नात मायेच्या योगाने प्रेरित होते. त्याप्रमाणे जागृतीमध्येसुद्धा द्वैताचा आभास निर्माण करणारे चित्त देखील मायेनेच प्रेरित झालेले असते.

मायेमुळे द्वैताचा आभास निर्माण होतो. सामान्य माणसांचा अनुभव असा आहे को, वस्तू एक प्रकारची असूनही तिचे विपरीत रूप प्रत्ययाला येते. चित्ताचा हा स्वभाव केवळ मायेच्या प्रेरणेने अनुभवास येतो. स्वप्न आणि जागृती या दोन्ही अवस्थांमध्ये मायामय चित्तच काम करीत असते असा एक अभिप्राय या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे.


श्लोक-अद्वयं च द्वयाभासं चित्तं स्वप्ने न संशयः ।
अद्वयं च द्वयाभासं तथा जाग्रन्न संशयः ॥ ६२ ॥


अर्थ- द्वैत नसताना द्वैताचा आभास दाखविणारे स्वप्नातील चित हे संशयातीत आहे, त्याप्रमाणे जागृतीत सुद्धा हेच चित द्वैत नसताना सुद्धा द्वैताचा आभास निर्माण करते.

केवळ मायेच्या प्रभावामुळे दोरीवर सर्पाचा भास होतो. माया याचाच अर्थ अज्ञान असे मानण्यात आले आहे. मनाच्या अस्तित्वामुळे मायेचा प्रभाव स्वप्न आणि जागृतीत दिसतो. आत्मा हे मूळ अधिष्ठान आहे. मायेमुळे त्याचे विविधत्व प्रत्ययाला येते असे म्हटले जाते.*
[[* १. प्रकरण ३, श्लोक २९ व ३० पाहावेत. ]]


श्लोक-स्वप्नदृक्प्रचरन्स्वप्ने दिक्ष वै दशसु स्थितान् ।
अण्डजान्स्वेदजान्वापि जीवान्पश्यति यान्सदा ॥ ६३ ॥


अर्थ- स्वप्नामध्ये संचार करणारा द्रष्टा दाही दिशांमध्ये अंडज, स्वेदज वगैरे प्रकारच्या जीवांना नित्य पाहातो.

जो स्वप्नात पाहाण्याची क्रिया करतो त्याला स्वप्नद्रष्टा असे म्हणतात. हाच द्रष्टा स्वप्नामध्ये सर्वत्र भ्रमण करतो आणि सर्व दिशांमध्ये असलेले सर्व प्रकारचे जीव पाहतो. या श्लोकात फक्त दोनच प्रकारच्या जीवांचा उल्लेख आलेला आहे. परंतु तो सर्व प्रकारच्या जीवांचे प्रतिनिधित्व करतो.**
[[** १)अंडज- पक्षी वगैरे अंड्यांतून निर्माण होणारे जीव. २) स्वेदज-स्वेद म्हणजे घाम. घामापासून निर्माण झालेले जीव- ढेकूण वगैरे. ३) उद्‌भिज-जमिनीतून जन्म पावलेले जीव- वृक्ष, वेली वगैरे. ४) जारज- सर्व अवयवासह निर्माण होणारे प्राणि-मनुष्य वगैरे. ]]


श्लोक-स्वप्नदृक चित्तदृश्यास्ते न विद्यन्ते ततः पृथक् ।
तथा तद्‍दृश्यमेवेदं स्वप्नदृक्चित्तमिष्यते ॥ ६४ ॥


अर्थ- स्वप्नद्रष्टा स्वतःच्या चित्ताने जे पदार्थ स्वप्नात अवलोकन करतो ते त्यापेक्षा निराळे भासत नाहीत. त्याप्रमाणे चित्तसुद्धा सर्व दृश्य पाहाणाऱ्या द्रष्ट्याचे चित्त आहे, असेच समजले पाहिजे.

स्वप्नामध्ये आपण सर्व दिशांमध्ये व्यवहार करणारे जीव पाहतो. अर्थात ते सत्य असतात का, असे विचारले तर त्याचे उत्तर नकाराथींच द्यावे लागेल. कारण स्वप्नात पाहिले जाणारे पदार्थ स्वप्नद्रष्टयाखेरीज अन्य कोणालाही प्रत्ययाला येत नाहीत. याचाच अर्थ असा की, या सर्व पदार्थांचे अस्तित्व स्वप्नद्रष्ट्याच्या चित्तातच असते. स्वप्नद्रष्ट्याला स्वप्नाशिवाय अन्यत्र अस्तित्व नाही. थोडक्यात, स्वप्नामध्ये दिसणारे सर्वच पदार्थ हे अनित्य आणि भ्रांतिमय, भ्रांतिजन्य असतात. तो मनाचा एक भ्रांतविलास आहे.


श्लोक-चरञ्जागरिते जाग्रद्दिक्षु वै दशसु स्थितान् ।
अण्डजान्स्वेदजान्वापि जीवान्पश्यति यान्सदा ॥ ६५ ॥


अर्थ- जागृत स्थानामध्ये असणारा जागृत द्रष्टा स्वतःचे व्यवहार करतो तेव्हा दशदिशांमध्ये भ्रमण करणारे चतुर्विध जीव त्याला नेहमी गोचर होतात.

जागृत अवस्थेत निरनिराळ्या विषयांचा अनुभव घेणारा द्रष्टा यालाच या ठिकाणी जाग्रतद्रष्टा असे संबोधण्यात आलेले आहे. या द्रष्ट्याचा संचार चित्ताच्या माध्यमातून सर्वत्र होत असतो. या चित्ताला जागृत अवस्थेतील जीवांचे दर्शन घडते. अर्थात चित्ताच्या कल्पनेमधूनच या सर्व दृश्याचा उद्‌गम असतो. म्हणून हे सर्व दृश्य कल्पित आहे, असा अभिप्राय.


श्लोक-जाग्रच्चित्तेक्षणीयास्ते न विद्यन्ते ततः पृथक ।
तथा तद्‌दृश्यमेवेदं जाग्रतश्चित्तमिष्यते ॥ ६६ ॥


अर्थ- अंडजादी चतुर्विध जीव जागृत चित्ताने कल्पनेने पाहिलेले असतात. त्यामुळे चित्ताहून ते निराळे नसतात. असे त्यांचे चित्त जाग्रत द्रष्टा आहे, असे मानण्यात येते.

स्वप्नामध्ये बाहेरच्या पदार्थांचे अस्तित्व नसतानासुद्धा आपण त्या वस्तू स्वप्नात पाहतो. याचा द्रष्टा म्हणजे स्वप्नातील चित्त होय. स्वप्नावस्थेत जागृत अवस्थेतील ज्ञान आणि स्वप्नस्थितीतील ज्ञान यामध्ये वस्तुज्ञानाच्या किंवा पदार्थदर्शनाचा विचार करता भेद नाही. चित्तामुळे वस्तुज्ञान होते परंतु चित्ताने निर्माण केलेल्या वस्तू म्हणजे भ्रममय अवस्था होय.


श्लोक- उभे ह्यन्योन्यदृश्ये ते किं तदस्तीति चोच्यते ।
लक्षणाशून्यमुभयं तन्मतेनैव गृह्यते ॥ ६७ ॥


अर्थ- जीव आणि चित्तही यांचे ज्ञान एकमेकांवर अवलंबून आहे. त्यामुळे त्यांतील सत्य कोणते याची निश्चिती करता येत नाही. कारण प्रमाणांच्या साहाय्याने या दोघांचीही सिद्धी होत नाही. दोघांचेही ज्ञान त्या त्या मतानुरूप होते.

जीव आणि चित्तही एकमेकांवर अवलंबून असल्याने त्यांचे दृश्यादी व्यापारही एकमेकांवर अवलंबून आहेत. जीवाच्यामुळे चित्ताला चैतन्य प्राप्त होते. जीव नसेल तर चित्ताला चिंतनशीलता प्राप्त होणार नाही. चिंतन असेल तरच जीव अनुभवाला येईल आणि जीव असेल तरच चित्ताचे व्यापार होऊ शकतील. यामुळे उभयतांना स्वतंत्र अस्तित्व नाही. चित्त आणि चित्तदृश्य यांची सिद्धी कोणत्याही उदाहरणाने होऊ शकत नाही. चित्त आणि चैतन्य यांपैकी प्रमाण कोणते आणि प्रमेय कोणते हे स्पष्ट करता येत नाही. इतकेच नव्हे, तर केवळ कल्पनेने सुद्धा याची सिद्धी होत नाही.


श्लोक- यथा स्वप्नमयो जीवो जायते प्रियतेऽपि वा ।
तथा जीवा अमी सर्वे भवन्ति न भवन्ति च ॥ ६८ ॥


अर्थ- स्वप्नमय असणारा जीव ज्याप्रमाणे जन्म पावतो त्याप्रमाणे तो मृतही होतो. त्याचप्रमाणे हे सर्व जीव उत्पत्ती आणि विनाशमय आहेत.

'उपजे ते नाशे' हा ज्ञानदेवांचा सिद्धान्त आहे. स्वप्नामध्ये आपण स्वतः जन्म पावल्याचे अगर आपले निधन झाल्याचे आपण पाहतो परंतु जागृतीमध्ये मात्र या घटना असत्य असल्याचे जाणवते. यावरून असा सिद्धान्त मांडण्यात आलेला आहे की स्वप्न ज्याप्रमाणे असत्य आहे त्याप्रमाणे त्यांतील व्यवहारही असत्यच आहेत. त्याचप्रमाणे ज्याला ईशज्ञान झाले त्याच्या बुद्धीने जन्म आणि मरण या अवस्था असत्य आहेत.


श्लोक-यथा मायामयो जीवो जायते प्रियतेऽपि च ।
तथा जीवा अमी सर्वे भवन्ति न भवन्ति च ॥ ६९ ॥


अर्थ- मायेच्या प्रभावामुळे ज्याप्रमाणे जीव जन्म घेतो आणि मरतो त्याप्रमाणे सर्व जीव उत्पन्न होतात आणि मरण पावतात.

मायेच्या प्रभावामुळे सामान्य माणसाला येणारा अनुभव या श्लोकात ग्रथित केला आहे आणि पुढच्या श्लोकार्धात ज्ञानी माणसाचा अनुभव स्पष्ट केला आहे. मायेमुळे जीवाला जन्ममरण असल्याचे दिसते, परंतु मायेचा पदर बाजूला केल्यास त्याची व्यर्थता समजते.*
[[ *जैसे स्वप्नामाजि देखिजे । ते स्वप्नीचि साच आपजे ।
मग चेऊनियां पाहिजे । तंव काही नाही ॥ ज्ञाने, २-१३९ ]]


श्लोक- यथा निर्मितको जीवो जायते प्रियतेऽपि वा ।
तथा जीवा अमी सर्वे भवन्ति न भवन्ति च ॥ ७० ॥


अर्थ- निर्माण केलेला जीव मृत्यू पावतो, त्याप्रमाणे हे सर्व जीव जन्म आणि मृत्यु अनुभवतात.

सर्व जीव मुळातच असत्य असल्याने त्यांचा जन्म आणि मरण हेदेखील असत्यच आहे. परंतु सामान्य माणसावर असलेल्या मायेच्या प्रभावामुळे ते सत्य वाटते. ज्ञानी मनुष्यासमोर हा मायेचा अडसर नसतो. अशा ज्ञानी माणसाचे हे बोल आणि अनुभव उपरोक्त तीन श्लोकांत सांगण्यात आले आहेत.


श्लोक-न कश्चिज्जायते जीवः संभवोऽस्य न विद्यते ।
एतत्तदुत्तमं सत्यं यत्र किंचिन्न जायते ॥ ७१ ॥


अर्थ- कोणताही जीव उत्पन्न होत नाही. कारण त्याला उत्पत्तिकारण असणे अशक्य आहे. ज्या ठिकाणी काही उत्पन्न होत नाही असे म्हटले आहे ते सर्वोत्तम वचन होय.

आपण स्वतः सत्य आहोत असे मानले तरच जीवांना जन्मादी विकार संभवतील, परंतु स्वप्नातील दृश्याप्रमाणे आपणच ज्या ठिकाणी असत्य आहोत त्या ठिकाणी जन्ममृत्यूच्या कल्पनादेखील असत्यच आहेत. व्यवहारात आपण स्वप्न खोटे म्हणतो, स्वप्नातील दृश्येही त्यामुळे खोटी ठरतात. हे जागृतीत ज्याप्रमाणे समजते त्याप्रमाणे जन्ममृत्यू ह्या कल्पनासुद्धा असत्य आहेत, असे ज्ञानजागृतीने प्रत्ययाला येते.


श्लोक-चित्तस्पन्दितमेवेदं ग्राह्यग्राहकवद्वयम् ।
चित्तं निर्विषयं नित्यमसङ्‌गं तेन कीर्तितम् ॥ ७२ ॥


अर्थ - ग्राह्यत्व आणि ग्राहकत्व, विषय आणि विषयी अशा प्रकारचे द्वैत हे चित्ताचे स्फुरण आहे. चित विषयशून्य असल्याने त्याला नित्य आणि संगशून्य म्हटले जाते.

विषय आणि विषयांचा ग्राहक असे जे द्वैत दिसते ते केवळ चित्ताचे स्पंदन किंवा स्फुरण आहे. मूलतः स्पंदनशून्य चित्त आत्मरूप असते. स्पंदनशून्य चित्त विषयग्राहक नाही, त्यामुळे अशा चित्तात विषयाचे अस्तित्व नसते. या बाबतीत -
असंगो ह्ययं पुरुषः । बृह, ४.३.१५ असे वचन आहे.
हा पुरुष किंवा आत्मा हा असंग आहे असे श्रुतीने प्रतिपादन केले आहे. चित्ताचे स्फुरण होणे याचा अर्थ चित्ताची अनित्यता निर्माण होणे. अर्थात ही अनित्यता म्हणजे ब्रह्म नव्हे. * [[* अवघे ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव । पाषाण तो देव कैंसा नोहें ॥ तुकाराम ]]


श्लोक- योऽस्ति कल्पितसंवृत्या परमार्थेन नास्त्यसौ ।
परतन्त्राभिसंवृत्या स्यान्नास्ति परमार्थतः ॥ ७३ ॥


अर्थ- केवळ कल्पनेच्या आवरणामुळे जे अस्तित्वात आले असे दिसते ते वस्तुतः असत नाही. परमार्थाने ती सद्वस्तू नव्हे. परतंत्र वृत्तीने तो पदार्थ अस्तित्वात असेल परंतु त्याला पारमार्थिक सत्ता मात्र नाही. एखादा जादूगार इंद्रजाल करून पदार्थ निर्माण करतो परंतु त्या पदार्थाला व्यावहारिक सत्ता नसते. त्याप्रमाणे आपण आपल्या कल्पनेने निर्माण केलेल्या पदार्थांना अस्तित्व असल्यासारखे जरी भासले तरी त्यांना पारमार्थिक सत्ता मात्र कदापि नसते. ज्ञानेश्वरमहाराजांनी हा सिद्धान्त आणखी स्पष्ट केला आहे.
तैसी इये निर्मळें माझ्या स्वरूपीं । जो भूतभावना आरोपी ।
तयासी तयाच्या संकल्पीं । भूताभासु असे ॥ ९-७९
हे असो आंगी भरलिया भवंडी । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी ।
तैसी आपुलिया कल्पना अखंडी । गमती भूतें ॥ ज्ञाने. ९-८१
माझ्या शुद्ध निर्मळ स्वरूपावर जो भूतांच्या कल्पनेचा आभास निर्माण करतो त्याला त्याच्या कल्पनेप्रमाणे भूतांचे अस्तित्व जाणवते. आपल्या भोवती गरगर फिरले आणि आपणास भोवळ आल्यासारखे झाल्यामुळे आपण खाली बसतो तेव्हा आपल्या भोवती असलेले पदार्थ आपल्या भोवती फिरत असल्याचे जाणवते. वस्तुतः या पदार्थांना फिरण्याचे सामर्थ्य किंवा सत्ता आहे का ? केवळ आपल्या कल्पनेमुळे त्यांना गतीची सत्ता प्राप्त झाल्यासारखे दिसते. मूलतः तो आभास आहे, सत्य नव्हे. यानंतर ज्ञानेश्वरमहाराज उपरोक्त सिद्धान्ताचे प्रात्यक्षिक स्वरूप- अनुभव सांगताना म्हणतात -
तेचि कल्पना सांडूनि पाही । तरी मी भूतीं भूतें माझिया ठायीं ।
हे स्वप्नीही परी नाहीं । कल्पावयाजोगें ॥ ज्ञाने. ९-८२
ही कल्पना बाजूला सारून जर पाहिले तर ही सर्व भूते माझ्यामध्ये आणि मी सर्व भूतमात्रांमध्ये आहे हे स्वप्नातसुद्धा कल्पना करण्याजोगे नाही.

या सिद्धान्ताप्रमाणे परतंत्रपणे अस्तित्वात असणारा पदार्थ आत्मदृष्टीने पाहू लागलो तर त्याचे अस्तित्वच शून्य असल्याचे जाणवते, हा एक महत्त्वाचा अभिप्राय उपरोक्त श्लोकामध्ये ग्रथित केलेला आहे.


श्लोक- अजः कल्पितसंवृत्या परमार्थेन नाप्यजः ।
परतन्त्राभिनिष्पत्त्या संवृत्या जायते तु सः ॥ ७४ ॥


अर्थ- सर्व व्यवहार कल्पनोत्पत्र आहेत म्हणून अजत्व असलेला आत्मादेखील कल्पित आहे. परमार्थतः तो अज नाही. अन्य शास्त्रांच्या दृष्टीने जो पदार्थ सत्य, अज वाटतो तो तसा असत नाही.

विविध शास्त्रे आत्म्याला अजत्व प्रदान करतात. ते अजत्व कल्पनोद्‌भव आहे. परमार्थतः शास्त्रादिकांना सत्ता आहे किंवा नाही अशी शंका आहे. म्हणून परमार्थतः ते सत्य नव्हे.


श्लोक- अभूताभिनिवेशोऽस्ति द्वयं तत्र न विद्यते ।
द्वयाभावं स बुद्ध्वैव निर्निमित्तो न जायते ॥ ७५ ॥


अर्थ- अज ही कल्पना सापेक्ष आहे. वास्तविक अज नाही. ती एक कल्पना आहे. परिणामवादाप्रमाणे मायेनेच आत्म्याचे अस्तित्व मानले जाते.

द्वैत मिथ्या असल्याने त्याचे विषयही मिथ्याच आहेत. विषयाचा पगडा आपल्या मनावर मोठा असतो. या कारणामुळे द्वैताला किंवा द्वैतातून निर्माण होणाऱ्या विषयांना सत्यत्व आहे असे म्हणता येत नाही.


श्लोक- यदा न लभते हेतूनुत्तमाधममध्यमान् ।
तदा न जायते चित्तं हेत्वभावे फलं कुतः ॥ ७६ ॥


अर्थ- ज्या वेळी उत्तम, मध्यम आणि निकृष्ट असे धर्म प्राप्त होत नाहीत तोपर्यंत चित्ताची उत्पत्ती होत नाही, असा त्रिवृत्ती हेतू नसेल तर फलाची निष्पत्ती कशी होणार ?

प्रत्येक पदार्थाला उत्तम, मध्यम आणि अधम असे गुण चिकटलेले असतात. पदार्थांच्या या गुणानुरूप फलाची प्राप्ती होते. ज्याप्रमाणे हेतू असेल त्याप्रमाणे त्याचे फळ मिळते. हा हेतू या पदार्थांच्या संगतीने स्पष्ट होतो आणि त्याप्रमाणे क्रिया घडतात. देवत्वाची प्राप्ती हे उत्तम फळ, मनुष्यत्व मध्यम, पशु-पक्षादी अधम धर्माचे फळ आहे. अर्थात ह्या सर्व हेतू, कल्पना आणि फल अविद्यामय आहे. वासना अगर हेतू नसतील तर फलाची निष्पत्ती नाही. बीजच पेरले नाही तर ज्याप्रमाणे धान्याची उत्पत्ती होणार नाही त्याप्रमाणे वासनेचे बीजच जळून गेले म्हणजे हेतू आणि फल यांची वाट पाहण्याचे कारण नाही. चित्ताला धर्माचे साहाय्य मिळाले नाही म्हणजे ते निष्पंद राहाते आणि त्यामधून जन्माचे कारण संभवत नाही.


श्लोक- अनिमित्तस्य चित्तस्य यानुत्पत्तिः समाद्वया ।
अजातस्यैव सर्वस्य चित्तदृश्य हि तद्यतः ॥ ७७ ॥


अर्थ- निमित्तशून्य चित्त असले म्हणजे ते उत्पत्तिशून्य आणि सम असते. परंतु सर्व द्वैत चित्तदृश्य आहे. यापूर्वीची चित्ताची स्वयंभू अवस्था सम आणि विषयशून्य असते.

ज्या ठिकाणी हेतू नाही त्या ठिकाणी चित्त उत्पत्तिक्षम नसते. पारमार्थिक अवस्थेत सत्याचा अनुभव प्राप्त झाल्यामुळे ज्यामुळे उत्पत्ती होते ते धर्माधर्माचे कारण नाहीसे होते. अशा प्रकारे निमित्तशून्य झालेले चित्त उत्पन्नशून्य होते. ज्या ठिकाणी निमित्त नाही असे चित्त भ्रांतिशून्य असते. अशा चित्ताला सम अवस्थेतील चित्त असे म्हणतात. याप्रमाणे उपाधीपूर्वी, उपाधीमध्ये आणि उपाधीनंतर चित्त सर्वकाळ समरूप असते.


श्लोक-बुद्ध्वा निमित्ततां सत्यां हेतुं पृथगनाप्नुवन् ।
वीतशोकं तथा काममभयं पदमश्नुते ॥ ७८ ॥


अर्थ- चित्त निमित्तशून्य असल्याने धर्माधर्मादी कारणे अन्य ठिकाणाहून उत्पन्न होत नाहीत. अशा प्रकारचे ज्ञान झालेल्या पुरुषाला शोकशून्य, काम आणि भय यांविरहित असलेले अभयपद प्राप्त होते.

द्वैतामुळे जन्माला निमित्त प्राप्त होते. ते द्वैत संपल्यामुळे जन्माचे कारणच संपले. चित्ताची सर्व स्पंदने त्यामुळे शून्य झाली. अशा चित्ताला आत्मरूप म्हणतात. अशा या आत्म्याचे ज्ञान झाल्याने सर्व प्रकारचे व्यावहारिक विकार संपुष्टात येतात. जन्माबद्दल आनंद आणि मृत्यूबद्दल शोक या दोन टोकांमध्ये समाविष्ट असलेल्या अन्य सुखद कृतींचा परिणाम ज्ञानवान पुरुषाला जाणवत नाही.
यस्मिन्सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानतः ।
तत्र को मोहः कः शोक एकत्वमनुपश्यतः ॥ ईशा. ७
ज्याला सर्वत्र आत्मा आणि त्याचीच प्रचीती प्राप्त होते त्या ठिकाणी शोकमोहादिकांना स्थान राहत नाही, ही ईशावास्योपनिषदाची उक्ती अत्यंत मननीय आहे. असे ज्ञान ज्याला झाले त्याला मोक्ष प्राप्त झाला असे म्हटले जाते.


श्लोक- अभूताभिनिवेशाद्धि सदृशे तत्प्रवर्तते ॥
वस्त्वभावं स बुद्ध्वैव निसःङ्‌गं विनिवर्तते ॥ ७९ ॥


अर्थ- असद् वस्तूचा अभिनिवेश असला म्हणजे असद् वस्तू जीवाला वश करून घेतात. परंतु सर्व दृश्य वस्तू मुळातच नाहीत हे जाणून जीव निःसंग होऊन निवृत्त होतो.

या विश्वातील सर्व व्यवहार अनात्म वस्तूवर विश्वास ठेवल्याने निर्माण होणारी चित्ताची स्पंदने आणि यामुळे निर्माण होणाऱ्या वासनेमुळे होतात. याची जाणीव ज्ञानवान पुरुषाला असते. वासना बलवान झाल्याने अज्ञानी माणसाला त्या आपल्याप्रमाणे आचरण करावयास भाग पाडतात. मात्र ज्ञानी माणसाला हे माहीत असते की, वासनांकडे विशेष लक्ष दिल्यामुळे किंवा वासनांचा आदर केल्याने त्या सामान्य माणसाला आत्मरूपापासून दूर करतात. या वासनांच्या अस्तित्वामुळे मोक्षाची वाट बाजूला होते. त्यामुळे वासनादिकांचा त्याग करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्याला अशा वासनांचा त्याग करता आला त्यालाच मोक्षाचा लाभ होतो. मोक्षलाभामुळे मनुष्य संगरहित होतो आणि सर्व प्रकारच्या भोगातून निवृत्त होतो.


श्लोक- निवृत्तस्याप्रवृत्तस्य निश्चला हि तदा स्थितिः ।
विषयः स हि बुद्धानां तत्साम्यमजमद्वयम् ॥ ८० ॥


अर्थ- भोगनिवृत्त झालेल्या पुरुषाचे चित्त निश्चल, स्पंदनशून्य आणि विकारशून्य असते. ही ज्ञानी लोकांची स्थिती आहे.

द्वैतापासून परावृत्त झालेले परंतु आत्मैक विषयांचा अनुभव घेतलेले ज्ञानी पुरुष निवृत्त असतात. सर्व विषय आत्म्याशिवाय आहेत याचे ज्ञान त्यांना झाल्याने त्यांच्या चित्ताची स्पंदने शून्यवत होतात. चित्ताचे व्यापार संपतात. अशा वेळी ज्ञानी पुरुषाची स्थिती ब्रह्मरूप असते. श्रीमद्‌भगवद् गीतेमध्ये स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगताना ज्ञानदेवांनी जो अभिप्राय व्यक्त केला आहे तो या ठिकाणी विचारात घेण्याजोगा आहे.
हे ब्रह्मस्थिती निःसीम । जे अनुभवितां निष्काम ।
पातले परब्रह्म । अनायासे ॥ ३६८
जे चिद्‌रूपी मिळतां । देहांतीची व्याकूळता ।
आड ठाको न शके चित्ता । प्राज्ञा जया ॥ ज्ञाने. २-३६९
सर्व भोगनिवृत्त झाल्याने प्राप्त झालेले ज्ञान माणसाला जन्म-मरणादि व्याकुळ करणाऱ्या अवस्थेत आणीत नाही‌त. अशा पुरुषाचे चित्त अज आणि अद्वय असते, असा पारमार्थिक सिद्धांत आहे.


श्लोक-अजमनिद्रमस्वप्न प्रभातं भवति स्वयम् ।
सकृद्विभातो ह्येवैष धर्मो धातुस्वभावतः ॥ ८१ ॥


अर्थ- आत्मविषय जन्ममृत्युरहित, निद्रा-स्वप्न यांपासून दूर आणि स्वयंप्रकाशी आहे. कारण वस्तुस्वभावाचा विचार करता आत्मविषय नित्य प्रकाशमय असतो.

ज्ञानवान पुरुषांना गोचर होणारा पदार्थ, जन्मशून्य, अनिद्र, स्वप्नरहित, स्वयं प्रकाशरूप असतो. इतर पदार्थास सूर्यादी देवता प्रकाशित करतात. त्यामुळे ज्ञानी पुरुषांना गोचर होणाऱ्या पदार्थांना उत्पत्ती अगर नाश नसतो. आत्मा ही वस्तू स्वयंप्रकाशी, स्वतंत्र आणि नित्य आहे. यावरून हे लक्षात येईल की, त्या आत्मवस्तूला स्थित्यंतरे अगर अन्य वस्तूंना असणारे विकार नाहीत.


श्लोक- सुखमाव्रियते नित्यं दुःखं विव्रियते सदा ।
यस्य कस्य च धर्मस्य ग्रहेण भगवानसौ ॥ ८२ ॥


अर्थ - आत्मवस्तूशिवाय अन्य वस्तूंचा अभिमान धरला म्हणजे आत्मस्वरूपाचे नेहमी आच्छादन होते. त्यामुळे दुःख प्रकट होते. या कारणाने वैभववान आत्म्याची प्रचीती सामान्य माणसाला येत नाही.

ग्रहणाच्या वेळी सूर्य राहुग्रस्त होतो आणि सर्वत्र अंधार निर्माण होतो. किंवा काही वेळा मेघ सूर्याला आच्छादून टाकतात त्या वेळी देखील अंधःकार जाणवतो. अशा वेळी सूर्याला मेघाने किंवा राहूने कसे आच्छादित केले असा सामान्यांचा प्रश्न असतो. परंतु ज्या मेघाने सूर्य झाकून टाकला त्या मेघाच्या पलीकडे आपण गेलो तर सूर्य तसाच प्रकाशमान असल्याचे प्रत्ययाला येईल. केवळ अज्ञानामुळे सूर्यप्रकाश नाहीसा झाला असे म्हटले जाते. सूर्याचा प्रकाश कधीच बाधित होत नाही. सूर्यामध्ये स्थित्यंतरे नाहीत हा सिद्धान्त समोर ठेवला म्हणजे उपरोक्त श्लोकाचे तात्पर्य लक्षत येईल. आत्मा हा विषयांमुळे झाकला गेला आहे, असे वाटते. अर्थात तो अज्ञानाचा परिणाम आहे. या विषयांचे अस्तित्व बाजूला केले किंवा विषयातीत झालो म्हणजे आत्मा विषयांनी झाकला जात नाही. त्याचा प्रभावही कमी होत नाही, असे लक्षात येते. यालाच ज्ञान अशी संज्ञा आहे. ज्याच्याजवळ अशा ज्ञानामुळे अनुभवाचे पाथेय असते तो मुक्त म्हणून समजला जातो. अज्ञानी पुरुषांचे मत कसे असते याचे उत्तम चित्र पुढील श्लोकात वर्णन केलेले आहे.


श्लोक- अस्ति नास्त्यस्ति नास्तीति नास्ति नास्तीति वा पुनः ।
चलस्थिरोभयाभावैरावृणोत्येव बालिशः ॥ ८३ ॥


अर्थ- आत्मा आहे, आत्मा नाही, तो मुळीच नाही, असणे शक्य नाही- याप्रमाणे चल, स्थिर, चलस्थिर अशा असद् गुणांनी अज्ञानी पुरुष आत्म्यावर आवरण घालीत असतात.

निरनिराळे शास्त्रपंडित आत्म्याबद्दल निरनिराळे तर्क करून आपले मत प्रतिपादन करताना जे म्हणतात ते चार प्रकारचे असल्याचे मानले जाते. ते चार प्रकार असे आहेत:
वेदान्ती-देहाशिवाय आत्मा म्हणून ज्ञानवान वस्तू आहे.
बौद्ध-ज्ञानवान आत्मा असा पदार्थच मुळात नाही.
जैन-आत्मा आहेही आणि आत्मा नाही देखील.
बृहस्पती-आत्मा असणेच शक्य नाही.

या पंडितांचे विचार याच मर्यादेने संपत नाहीत, तर कणादी विद्वान यापुढे जाऊन असे म्हणतात की, आत्मा सुखदुःखादी विकारांनी विकृत होतो. तो अस्थिर आहे. आत्मा ही वस्तूच नाही असे ते प्रतिपादन करतात. आत्मा काही वेळ स्थिर आणि काही वेळ चलत असतो असे जैनमुनी म्हणतात, तर आत्मा, विश्व वगैरे काहीही नसून सर्व शून्य आहे असे चार्वाकादिकांचे म्हणणे आहे. अशा भिन्न भिन्न अभ्यासकांचे विचार गोंधळात टाकतात. यामुळेच ज्ञानेश्वरादी आत्मानुभवी संत ही सर्व शास्त्रे आणि पंडित यांच्याबद्दल स्वतंत्र अभिप्राय व्यक्त करतात -

तैसा आत्मदर्शनी आडळु । असे अविद्येचा जो मळु ।
तो शास्त्र नाशी येरु निर्मळू । मी प्रकाशें स्वये ॥ १२३२
म्हणोनि आघवीचि शास्त्रे । अविद्याविनाशाची पात्रें ।
वांचोनि न होती स्वतंत्रे । आत्मबोधी ॥ ज्ञाने. १८-१२३३

आत्मदर्शनामध्ये अविद्येचा मळ आडवा येतो. हा मळ नाहीसा करण्याचे काम शास्त्रे करतात. इतकेच शास्त्राचे महत्त्व आहे. परमेश्वर स्वयंसिद्ध आहे, निर्मळ आहे आणि स्वयंप्रकाशी आहे. खरे पाहिले तर ही सर्वच शास्त्रे अज्ञानाचा नाश करणारी साधने आहेत. त्यांना आत्मदर्शनाचे सामर्थ्य कदापि प्राप्त होत नाही. यावरून असा निर्णय निघतो की, वेदान्ताने प्रतिपादन केलेल्या तत्त्वांचा मागोवा घेऊन, गुरुकृपेच्या प्रभावाने श्रद्धावान बनलेल्या पुरुषाला आत्मदर्शनाचा अनुभव प्राप्त होतो. श्रुती आत्मरूपाचा मार्ग दाखविण्यास समर्थ आहे.


श्लोक-कोट्यश्चतस्र एतास्तु ग्रहार्यासां सदावृतः ।
भगवानाभिरस्पृष्टो येन दृष्टः स सर्वदृक् ॥ ८४ ॥


अर्थ- या चार प्रकारच्या मतांनी आत्मरूप झाकले जाते. या चारही कोट्या (प्रकार) ज्या स्वरूपाला स्पर्श करू शकत नाहीत असा आत्मा ज्याने प्रत्यक्ष अनुभवला आहे, त्याला सर्वद्रष्टा असे म्हणतात.

उपरोक्त विवरणात चार प्रकारांनी आत्मरूपाचे कसे विवरण केले जाते ते सांगितले आहे. ही सर्व शास्त्रे एकदेशी आहेत, असे म्हटले जाते. ह्या शास्त्रांमुळे आत्मा झाकला जातो. म्हणजेच आत्म्याचे खरे स्वरूप ही शास्त्रे प्रकट करीत नाहीत. आत्मा आणि ही सर्व शास्त्रे यांमध्ये अनुभवाची फार मोठी दरी आहे. ती नाहीशी करण्याचे सामर्थ्य या शास्त्रांमध्ये नाही. त्यामुळे या शास्त्रांना आत्मानुभव नाही. या शास्त्रांचा मागोवा घेत, अज्ञान बाजूला करीत, आत्म्यावर नितांत श्रद्धा ठेवून धैर्याने वाटचाल करणाऱ्या साधकाचे प्रथम अज्ञान नाहीसे होते आणि त्यानंतर त्याला आत्मानुभूती प्राप्त होते. ज्याला आत्मानुभूती प्राप्त झाली त्याला सर्वद्रष्टा असे म्हणतात. तोच सर्वज्ञ होय.


श्लोक-प्राप्य सर्वज्ञतां कृत्स्नां ब्राह्मण्यं पदमद्वयम् ।
अनापन्नादिमध्यान्तं किमतः परमीहते ॥ ८५ ॥


अर्थ- सर्वज्ञता प्राप्त झाली, आदी- मध्य- अन्त अशा स्थितीविरहित ब्रह्मपदाची किंवा आत्मरूपाची प्राप्ती झाली म्हणजे या ब्रह्मप्राप्तीनंतर जीव अन्य कोणत्या वस्तूची आशा करील ?

ज्याला आत्मसाक्षात्कार झाला त्याला सर्वज्ञ असे म्हणतात. असा मनुष्य सर्वस्वाचा स्वामी बनतो. त्यामुळे काही मिळावे किंवा मिळवावे असे स्पंदपूर्ण चित्त त्याच्याजवळ नसते. ज्ञानेश्वरमहाराजांनी या संबंधात केलेले भाष्य रोचक आहे.

तृप्ति जालिया जैसी । साधनें सरती आपैसी ।
देखे आत्मतुष्टी तैसी । कर्में नाहीं ॥ १४८
जंवतरी अर्जुना । तो बोध भेटेना मना ।
तवचि यया साधना । भजावे लागे ॥ ज्ञाने. ३-१४९

एखाद्या मनुष्याला भरपूर तहान लागली आहे. लांबवर विहीर दिसत आहे. त्या ठिकाणी पाणी मिळेल याची खात्री आहे. अशा वेळी पाणी काढण्यासाठी घागर आणि दोरी या साधनांसाठी तो मनुष्य धडपड करील, धावत विहिरीवर जाईल. पाणी काढून तृषा शान्त करील. तो तृप्त झाला की, मग त्याला पूर्वी धडपडीने प्राप्त केलेल्या साधनांची आवश्यकता नसते. त्याप्रमाणे जोपर्यंत आत्मानुभव प्राप्त झाला नाही तोपर्यंत साधनांची आणि साधनेची काळजी घ्यावी लागते. आत्मरूपाचे दर्शन झाले म्हणजे साधनांचे कार्य संपते. साधनाही संपते. अशा आत्मसंतुष्ट माणसाला कोणती वस्तू मिळवावी असे वाटेल ? कोणतीच नाही. तो निःसंग, निवृत्त, सर्वज्ञ आणि सर्वलभ्य होतो. उपरोक्त श्लोकात एक सूचक पद मुद्दाम योजण्यात आलेले आहे. ज्याला या प्रकारे सर्वज्ञता प्राप्त झाली त्याला ब्राह्मण अशी संज्ञा प्राप्त होते. ब्राह्मण या शब्दाचा अर्थच या श्लोकाच्या पहिल्या चरणात स्पष्ट केला आहे.

'कृत्स्नां सर्वज्ञतां ब्राह्मण्यम् पदमद्वयम् । '

सर्व प्रकारचे ज्ञान संपादन करण्यामुळे अद्वितीय असे ब्राह्मण नामक पद प्राप्त होते. सर्वज्ञता याचा अर्थ ब्रह्माचेच ज्ञान. ज्याला ब्रह्म समजले तोच ब्राह्मण होय. याच विचाराने बृहदारण्यक उपनिषदामध्ये -
'एष नित्यो महिमा ब्राह्मणस्य । ' असे वचन प्रकट करण्यात आले आहे.


श्लोक- विप्राणां विनयो ह्येष शमः प्राकृत उच्यते ।
दमःप्रकृतिदान्तत्वादेवं विद्वाञ्शमं व्रजेत् ॥ ८६ ॥


अर्थ- हाच ब्राह्मणांचा विनय आणि शम होय. ब्राह्मणांचे इंद्रियदमन स्वाभाविक असते.

याप्रमाणे ब्राह्मण शांतीचा उपभोग घेतात. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, या नियमाप्रमाणे ब्राह्मणाचे दर्शन कसे घडते याचे चित्र या श्लोकात रंगविले आहे. असे लोक विनम्र, शमपूर्ण असून त्यांची इंद्रिये नेहमी त्यांच्या ताब्यात असतात. हा त्यांचा स्वभाव बनतो. अशा ब्रह्मज्ञ पुरुषाबद्दल आपला अनुभव व्यक्त करताना ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात -

कां फळलिया तरूची शाखा । सहजे भूमीसी उतरे देखा ।
तैसे जीवमात्रां अशेखां । खालावती ते ॥ २२५
अखण्ड अगर्वता होऊनि असती । तयांतें विनयो हेचि संपत्ती ।
जे जय जय मंत्र अर्पिती । माझ्याचि ठायीं ॥ ज्ञाने. ९-२२६

वृक्षावर भरपूर फळे आली म्हणजे वृक्षाची फांदी आपोआप जमिनीकडे झुकते, त्याप्रमाणे सर्व जीवमात्रांपुढे तो नम्र होतो. अगर्वता प्राप्त झाल्याने विनय हीच अशा पुरुषांची संपत्ती असते आणि ती संपत्ती असे पुरुष नेहमी मला अर्पण करीत असतात. याप्रमाणे ज्याला आत्मदर्शनाचा अनुभव प्राप्त झाला आहे तो मनुष्य अत्यंत नम्र असतो. सामान्य माणसे मनाच्या आदेशाप्रमाणे वागतात; परंतु ह्या मनुष्याचे मन त्याच्या आदेशाप्रमाणे वागते. त्यामुळे सर्व इंद्रिये त्याच्या स्वाधीन असतात. त्याची धाव ब्रह्माखेरीज अन्य वस्तूंकडे जात नाही. त्यामुळे अर्थातच त्याच्या चित्तामध्ये तळमळ, काळजी यांना ठाव नसतो. शांतीचे साम्राज्य असते. आत्मज्ञ पुरुष या शान्तीच्या साम्राज्याचा सदैव उपभोग घेत स्वस्थ असतो.


श्लोक-सवस्तु सोपलम्भं च द्वयं लौकिकमिष्यते ।
अवस्तु सोपलम्भं च शुद्धं लौकिकमिष्यते ॥ ८७ ॥


अर्थ- वस्तूंच्या उपलब्धतेमुळे निर्माण होणाऱ्या द्वैताला शास्त्रे लौकिक असे म्हणतात. वस्तूशिवाय प्राप्त होणाऱ्या अवस्थेला शुद्ध लौकिक असे म्हटले जाते.

निरनिराळी शास्त्रे आपले म्हणणे खरे असल्याचे प्रतिपादन करताना इतर शास्त्रांचा द्वेष आणि मत्सर करतात. त्यामुळे संसाराची आपोआप निर्मिती होते. यामुळेच या शास्त्रांना आत्मरूपविरोधी असे म्हटले जाते. अज्ञानामुळे द्वैताला जागा मिळते. वस्तूला वस्तुपण प्राप्त होते आणि ते इंद्रियगोचर होते. आत्मरूपाचा बोध होत नाही.


श्लोक-अवस्त्वनुपलम्भं च लोकोत्तरमिति स्मृतम् ।
ज्ञान ज्ञेयं च विज्ञेयं सदा बुद्धैः प्रकीर्तितम् ॥ ८८ ॥


अर्थ- वस्तु किंवा वस्तुदर्शनशून्य द्वैत हे व्यावहारिक द्वैत आहे. ज्ञान, ज्ञेय आणि विज्ञेय यांचे स्वरूप वेदवेत्त्यांनी उत्तम प्रकारे वर्णन केले आहे.

प्रगाढ निद्रेमध्ये वस्तू अस्तित्वात असते परंतु वस्तूचे दर्शन मात्र होत नाही, याला लोकोत्तर असे म्हणतात. लौकिक अवस्थेमध्ये जागृती असते, वस्तू असतात आणि वस्तूचे दर्शनही असते. स्वप्नस्थितीमध्ये वस्तू आणि तिचे दर्शन असते पण ते असत्य असते, थोडक्यात, लौकिक म्हणजे जागृतीमधील वस्तुदर्शन, शुद्धलौकिक म्हणजे स्वप्नस्थितीतील वस्तुदर्शन आणि लोकोत्तर म्हणजे गाढ निद्रेतील वस्तुदर्शन होय.


श्लोक-ज्ञाने च त्रिविधे ज्ञेये क्रमेण विदिते स्वयम् ।
सर्वज्ञता हि सर्वत्र भवतीह महाधियः ॥ ८९ ॥


अर्थ- तीन प्रकारची ज्ञाने आणि तीन प्रकारची ज्ञेये समजल्यावर ज्ञान प्राप्त होते. ज्ञानाचे स्वरूप विवेकीपणाने समजून घेतले म्हणजे सर्वज्ञता आपोआप प्राप्त होते आणि ब्रह्माज्ञ पुरुष इहलोकीच सर्वज्ञ होतो.

तीन प्रकारचे ज्ञान आणि तीन प्रकारचे ज्ञेय आहे ते असेः
१. लौकिक ज्ञान- स्थूलविषयाचे ज्ञान. ज्ञान व वस्तू, दोन्ही स्थूल आहेत.
२. शुद्ध लौकिक ज्ञान- या ठिकाणी स्थूल वस्तूचा अभाव असतो.
३. लोकोत्तर ज्ञान- या ठिकाणी वस्तू कार्यरूपाने असत नाहीत- कारणरूपाने असतात.

जागृतीत स्थूल विषय आणि त्यांचे स्थूल ज्ञान असते. स्वप्नामध्ये सूक्ष्म विषय आणि त्याचे तसेच ज्ञान आणि प्रगाढ निद्रावस्थेमध्ये स्थूलसूक्ष्मविषयरहित वस्तू आणि त्याचे ज्ञान असते. जागृतीमध्ये असलेल्या स्थूलत्वाचा स्वप्नात अभाव असतो. त्या ठिकाणी दिसणाऱ्या वस्तू आपले मनच निर्माण करते. यामुळे या वस्तूंना शुद्ध लौकिक असे म्हणतात. लौकिक आणि शुद्ध लौकिक या दोन्ही गोष्टी प्रगाढ निद्रेमध्ये नसतात, म्हणून त्या अवस्थेला किंवा ज्ञानाला लोकोत्तर असे म्हणतात. या तीन अवस्थांमध्ये असलेल्या वस्तू आणि ज्ञान यांच्या शून्यत्वामुळे शुद्ध ज्ञान निर्माण होते. यालाच परमतत्त्व, अद्वय, अज, तुरीय असे म्हटले जाते. या ज्ञानाची प्राप्ती हा या विश्वाच्या पसाऱ्यातील सर्वात मोठा लाभ आहे. यामुळे ब्रह्मज्ञ पुरुष याच लोकी सर्वज्ञ होतो.


श्लोक- हेयज्ञेयाप्यवाक्यानि विज्ञेयान्यग्रयाणतः ।
तेषामन्यत्र विज्ञेयादुपलम्भस्त्रिषु स्मृतः ॥ ९० ॥


अर्थ- हेय आणि ज्ञेय यांची प्राप्ती करून ते पचविणे आवश्यक आहे असे मोक्षाची इच्छा करणाऱ्या साधकाने समजावे. कारण ती ज्ञाने आत्मज्ञानापेक्षा निराळी आणि कल्पनात्मक आहेत.

हेय- टाकून देण्यास योग्य, ज्ञेय- जाणण्यास योग्य. या ज्ञानाला हेयज्ञेय ज्ञान असे म्हणतात. हेय काय ते समजल्याशिवाय टाकता येत नाही. आंब्याच्या फळाचे संपूर्ण ज्ञान करून घेतले तरच त्यातील ग्राह्य काय आणि अग्राह्य काय ते समजू शकेल. म्हणून संपूर्ण वस्तूचे ज्ञान करून घेणे आणि त्याप्रमाणे अनुभव घेणे आवश्यक आहे. असा अनुभव घेणे म्हणजेच ज्ञान पचविणे होय. या श्लोकाच्या निमित्ताने असे समजले पाहिजे- लौकिक ज्ञान म्हणजे जागृतीमधील ज्ञान, शुद्ध लौकिक म्हणजे स्वप्नस्थ ज्ञान आणि लोकोत्तर म्हणजे प्रगाढ निद्रेतील ज्ञान. ह्या तीनही ज्ञानांचा आत्मज्ञानामध्ये पूर्णतः अभाव असतो. आत्मस्वरूप हे ज्ञेय आहे, असे समजले म्हणजे उपरोक्त तीनही प्रकारची अज्ञाने त्याज्य आहेत हे निराळे सांगावयास नको. ज्याला मोक्षाची इच्छा आहे त्याने सर्व एषणांचा (दारैषणा, पुत्रैषणा, लोकैषणा) विवेकपूर्वक त्याग केला पाहिजे. म्हणजे पारमार्थिक सत्याचा, ज्ञानाचा अनुभव प्राप्त होतो.


श्लोक-प्रकृत्याकाशवज्ज्ञेयाः सर्वे धर्मा अनादयः ।
विद्यते न हि नानात्वं तेषां क्वचन किंचन ॥ ९१ ॥


अर्थ- सर्व ज्ञेयधर्म आकाशाप्रमाणे अनादी आहेत असे समजून घ्यावे. कारण त्या धर्माची अनेकता कोणत्याही प्रकारे सिद्ध झालेली नाही.

पारमार्थिक अवस्थेतून विचार करता आत्म्याचे सर्व स्वभावधर्म अनादी आहेत. मुमुक्षूने हे अनादिपण ज्ञात करून घेतले पाहिजे. आकाश सूक्ष्म, निरवयव आणि एकरूप आहे; परंतु या विश्वाच्या पसाऱ्यात दिसणारे अनेक जीव हे एक आहेत असे लक्षात येत नाही. मूर्ती तितक्या प्रकृती हा नियम सर्वमान्य आहे. परंतु अद्वैतामध्ये हे सर्व असत्य असल्याचे सांगितले जाते. परमार्थतः पाहिले असता जीव हा एकरस असल्याने त्याची तुलना आकाशाबरोबर करण्यात आली आहे. जीव नित्य आहे असे प्रतिपादन आहे. या बाबतीत ज्ञानेश्वर महाराजांचे खालील विवरण मुद्दाम पाहावे.

मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विजु ।
पैल इतरु हा आत्मजु । हे उरेल कें ॥ ९३ ॥
नातरी हे धनु हे श्वान । एक गुरु एक हीन ।
हे असो कैंचें स्वप्न । जागतया ॥ ९४ ॥
म्हणोनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म ।
हे संपूर्ण जाणे वर्म । समदृष्टीचें ॥ ज्ञाने ५-९६

हे चिलट आहे, हा हत्ती आहे, हा चांडाळ आहे, हा ब्राह्मण आहे, हा परका आणि हा आपला मुलगा, ही गाय, हे कुत्रे, एक महान, एक क्षुल्लक असे ज्ञानवान माणसाला प्रत्ययाला कसे येईल ? यासाठी सर्व ठिकाणी, सर्वकाळ सारखे असणारे अद्वय ब्रह्म आपणच आहोत असा समदृष्टीचा अनुभव तो मनुष्य घेतो. बाह्यतः आकार, वर्ण निराळे दिसत असले तरी या सर्वांच्या ठिकाणी नांदणारा जीव मात्र एकच आहे. त्याचे आकार-वर्णाप्रमाणे विभाजन होत नाही. म्हणून सर्वांच्या मुळाशी एकमेव ब्रह्म आहे. अन्य काही नाही.


श्लोक- आदिबद्धाः प्रकृत्यैव सर्वे धर्माः सुनिश्चिताः ।
यस्यैवं भवति क्षान्तिः सोऽमृतत्वाय कल्पते ॥ ९२ ॥


अर्थ- स्वभावतः सर्व जीव अगदी प्रारंभापासून ज्ञानरूप आहेत. ते आदिबुद्ध होत. असे ज्ञान ज्याला होते तो पुरुष मुक्त होऊन अमर होतो.

जीव मूलतः ज्ञानमय आहे. तो कृतार्थ आणि सन्देहशून्य आहे, हे ज्ञान होय. परंतु जोपर्यंत मी अज्ञानी आहे तोपर्यंत हा भ्रांतिमय संसार मी माझा म्हणतो आणि त्यातच आनंद मानतो असा मी अज्ञानामुळे बद्ध होतो. धर्म-जीव ज्ञेय आहे असे आम्ही मानतो ते केवळ व्यावहारिक दृष्टीमुळे. श्लोकातील 'धर्म' या पदाचा अर्थ आत्मा असा केला म्हणजे या निवेदनाची संगती लागते. आत्मा अमुक एक प्रकारचा आहे असे म्हणण्याला या ठिकाणी वाव नसतो. आत्म्याबद्दल दृढता असते. त्यामुळे मुमुक्षूला ज्ञान होण्यास मदत होते. सर्वधर्म एकरूप असून आपणही एकरूप आहोत असे ज्ञान ज्याला प्राप्त होते त्याला आत्मरूपाची प्राप्ती होते. त्याला अन्य ज्ञानाची अपेक्षा नसते.


श्लोक- आदिशान्ता ह्यनुत्पन्नाः प्रकृत्यैव सुनिर्वृताः ।
सर्वे धर्माः समाभिन्ना अजं साम्यं विशारदम् ॥ ९३ ॥


अर्थ- ब्रह्म किंवा आत्मतत्त्व हे उत्पन्न झालेले नाही. सर्वार्थाने ते परिशुद्ध आहे. म्हणून सर्व धर्म- जीव हे मूलतः शान्त, अनुत्पन्न, समाधानी आणि निर्विशेष आहेत.

ब्रह्म ज्याप्रमाणे शुद्ध चैतन्यच आहे त्याप्रमाणे जीवदेखील शुद्ध चैतन्यमय आहेत. ते आत्मरूप आहेत. म्हणूनच शांत, सुखरूप आणि भेदशून्य आहेत. म्हणून ज्याला आत्मज्ञान झाले आहे त्याला कोणतीही धडपड करावी लागत नाही.


श्लोक-वैशारद्यं तु वै नास्ति भेदे विचरतां सदा ।
भेदनिम्नाः पृथग्वादास्तस्मात्ते कृपणाः स्मृताः ॥ ९४ ॥


अर्थ- भेदभावाने वागणाऱ्या पुरुषांना निर्मळतेचा लाभ कधीही मिळत नाही. ते भेदाचे अनुयायी होतात आणि द्वैताचा स्वीकार करून त्याचा अभिमान धरतात. म्हणून ते कृपण आहेत असे म्हटले जाते.

या विश्वाच्या पसाऱ्यात समभाव कोठेही नाही. सर्व विश्व भेदानेच भरलेले आहे असे म्हणणारे संसारी जीव आहेत. त्यांना मी, माझी पत्नी, माझा पुत्र, माझे घर, माझे धन असा भेद सतत जाणवत असतो. अशा भेदमय अंतःकरणाच्या पुरुषाला ब्रह्मासारखे विशाल आणि भेदशून्य रूप पाहावयास त्रास वाटतो. तो ते नाकारतो. आपलेच म्हणणे सत्य म्हणून चालतो. अशा माणसाचे मन कोते असते. संकुचित मनात प्रबुद्ध आणि विशाल विचारांना तर जागाच नसते. त्यामुळे त्यांना कृपण या विशेषणाने संबोधिले आहे. ही भेदावस्था नाहीशी होणे म्हणजे परमार्थ होय. म्हणून प्रत्येकाने भेदशून्य होऊन विशालतेचा अनुभव घ्यावा असे महात्मे म्हणतात.


श्लोक- अजे साम्ये तु ये केचिद्‌भविष्यन्ति सुनिश्चिताः ।
ते हि लोके महाज्ञानास्तच्च लोको न गाहते ॥ ९५ ॥


अर्थ- जे कोणी अज आणि सम अशा ब्रह्मरूपाच्या बाबतीत निश्चित असतात ते व्यवहारातसुद्धा ज्ञानवान होतात. अज आणि सम ब्रह्माचा मार्ग हा सामान्यांचा विषय नाही.

ब्रह्म हा विषय कोणाचा याबद्दल या श्लोकांत निवेदन करण्यात आले आहे. ब्रह्म हा विषय सामान्य बुद्धीच्या लोकांचा नाही. कारण ब्रह्म समजण्यासाठी अत्यंत तीव्र बुद्धी असावी लागते. त्याबरोबरच ती निर्लेपही असली पाहिजे. तरच त्या बुद्धीला ब्रह्माचे आकलन होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे, तर ब्रह्माबद्दल श्रद्धा आणि निश्चय असला तरच त्या माणसाची ब्रह्माकडे जाण्याची तयारी होते. हे काम सामान्य माणसाचे नव्हे. 'चणे खावे लोखंडाचे । तेव्हा ब्रह्मपदीं नाचे ।' ही तुकाराम महाराजांची अनुभवपूर्ण उक्ती आहे. विषयाच्या विचाराने मलिन झालेल्या चित्ताला ब्रह्म समजणार नाही. संसारी पुरुषाला ब्रह्म समजणे अशक्य आहे. कारण असे स्मृतिवचन आहे की -

सर्व भूतात्मभूतस्य सर्वभूतहितस्य च ।
देवा अपि मार्गे मुह्यन्त्यपदस्य पदैषिणः ॥
शकुनीनामिवाकाशे गतिनैवोपलभ्यते ॥

ज्याने सर्व भूतमात्र आत्मरूप केली आहेत तो सर्व भूतामात्रांचे कल्याण करण्यास जो नेहमी सिद्ध असतो. कोणत्याही कारणाने चलन-वलन न करणाऱ्या आत्मरूपाचे चलनत्व शोधून काढण्याचा प्रयत्न करणारे देवसुद्धा मोहवश होतात. आकाशात उडणाऱ्या पक्षाचे पाय कोणाला दिसतील का ? मुळीच दिसणार नाहीत. तात्पर्य, ब्रह्मदर्शन हा मार्ग सोपा नाही. अत्यंत कठीण आहे.


श्लोक- अजेष्वजमसंक्रान्तं धर्मेषु ज्ञानमिष्यते ।
यतो न क्रमते ज्ञानमसंगं तेन कीर्तितम् ॥ ९६ ॥


अर्थ- जो जीव अज आहे त्याचे ज्ञानसुद्धा अनुत्पन्न आणि निश्चित असते. हे समजून घेणे इष्ट असते. ज्ञानाला चंचलता नाही. ते निर्लेप आहे असे म्हटले जाते.

सूर्याची उष्णता आणि प्रकाश सूर्याप्रमाणे अचल आणि सर्वव्यापी आहे. ते ज्ञान संक्रमण करीत नाही. ते आकाशाप्रमाणे असंग आणि शुद्ध आहे. ज्याला ते उत्तम रीतीने समजले त्याला ज्ञानवान पुरुष म्हणतात.


श्लोक- अणुमात्रेऽपि वैधर्म्यें जायमाने विपश्चितः ।
असङ्‌गता सदा नास्ति किमुतावरणच्युतिः ॥ ९७ ॥


अर्थ - ब्रह्मामध्ये किंचितशी जरी चंचलता निर्माण झाली तरी ब्रह्मचिंतन करणारा पुरुष अज्ञानाचा भेद निर्माण करणाऱ्या विषयांचा आश्रय करतो. त्यामुळे त्याचे असंगत्व नष्ट होते. त्याच्या मायिक आवरणाचा नाश होत नाही. तो मुक्त होत नाही.

ब्रह्म निःसंग आहे, या निश्चयामध्ये ब्रह्मजिज्ञासु माणसाचा निश्चय किंचित जरी ढळला तरी त्याचे चित्त द्वैताचा किंवा विषयाचा आश्रय करते. त्यामुळे त्यास ब्रह्माचा लाभ कदापि होत नाही. म्हणजेच जन्ममरणात्मक अज्ञानजन्य बंध नाहीसा करण्याचे सामर्थ्य त्याच्याजवळ नसते.


श्लोक- अलब्धावरणाः सर्वे धर्माः प्रकृतिनिर्मलाः ।
आदौ बुद्धास्तथा मुक्ता बुध्यन्त इति नायकाः ॥ ९८ ॥


अर्थ- सर्व जीव स्वभावतःच बंधनशून्य आणि शुद्ध असतात. ते नित्यबुद्ध आणि नित्यमुक्त असतात.

द्वैताचा आश्रय करणाऱ्या लोकांना बंधनमुक्त होता येत नाही. परमार्थतः अशा द्वैतावर अद्वैताचे आवरण असले तरी ते नाहीसे झाल्यास द्वैतच प्रत्ययाला येते. परंतु अद्वैतावर द्वैताचे आवरण असले तर ते नाहीसे केल्यावर अद्वैतच राहील. तात्पर्य, जीव मूळचा मुक्त आहे. त्यावरील आवरणामुळे त्याचे विविध रूप प्रत्ययाला येते. यालाच मलिनता म्हणतात. ती दूर करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रयत्नामुळे निर्मल जीवाचे दर्शन घडते. भ्रांती पूर्णपणे नाहीशी होते.


श्लोक-क्रमते न हि बुद्धस्य ज्ञानं धर्मेषु तापि नः ।
सर्वे धर्मास्तथा ज्ञानं नैतद्‌बुद्धेन भाषितम् ॥ ९९ ॥


अर्थ- एकनिष्ठ ब्रह्मवेत्त्याचे ज्ञान ब्रह्माशिवाय अन्य विषयामध्ये प्रवेश करीत नाही. त्याचप्रमाणे आत्म्याशिवाय अन्य विषय या ज्ञानमध्ये प्रवेश करीत नाहीत.

ज्याला ब्रह्माचे ज्ञान झाले आहे त्याला विषयांमध्ये रस नसतो. त्याची बुद्धी किंवा त्याचे ज्ञान विषयांचा आश्रय करीत नाही. त्याचप्रमाणे हे विषयदेखील ब्रह्मज्ञ माणसाच्या बुद्धीला स्पर्श करू शकत नाहीत. सामान्य लोकांना विषयामध्ये रस असल्याने त्यांची बुद्धी विषयाचाच ध्यास घेते. अशा लोकांना ब्रह्मज्ञानामध्ये प्रवेश करता येत नाही. त्याचप्रमाणे आत्मज्ञ माणसाला विषय कधीही स्पर्श करू शकत नाहीत.


श्लोक- दुर्दशमतिगम्भीरमजं साम्यं विशारदम् ।
बुद्ध्वा पदमनानात्वं नमस्कुर्मो यथाबलम् ॥ १०० ॥


अर्थ- समजण्यास अत्यंत कठीण, अतिशय गंभीर अनुत्पन्न, मलशून्य आणि अद्वितीय आत्मपद जाणून घेऊन मी त्याला वन्दन करतो.

सर्वश्रेष्ठ ब्रह्म अनुभवास येणे अत्यंत कठीण आहे. ते प्राप्त करण्यासही कठीण आहे. कारण ते जन्माला आलेले नाही. त्याला कशाचाही स्पर्श नसल्याने ते अद्वितीय आहे. सद्‌गुरूंच्या कृपेने मला ते समजले आहे. त्याला नमस्कार करताना त्याला आकाराला आणूनच मला वन्दन करावे लागत आहे. कारण सामान्य लोकांनी आचार कसा करावा हे सांगण्यासाठी पू. पा. गौडपादाचार्यांनी असा नमस्कार केला आहे. वास्तविक गौडपादाचार्यांना ब्रह्ममय झाल्याने असे करण्याची आवश्यकता नव्हती; परंतु ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात त्याप्रमाणे -

जे आचरता आपणपेयां । देखी लागेल लोकां यया ।
तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेचि ॥ १५४
देखे प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले ।
तयांही कर्तव्य असे उरलें । लोकांलांगी ॥ ज्ञाने. ३-१५५
आपण आचरण केले असता अन्य लोकांना तो आदर्श ठरेल आणि त्या लोकांची होणारी हानी नाहीशी होईल. जे मिळवायचे ते सर्व प्राप्त झाले, आता काहीही मिळवायचे न राहिल्याने ज्याला काही करावयाचे शिल्लक राहिले नाही, त्यामुळे जो सदैव तृप्त असतो अशा माणसालासुद्धा लोकांना आदर्श व्हावा, वळण लागावे म्हणून सर्व व्यवहार करावे लागतात.
या ज्ञानेशांच्या उक्तीप्रमाणे गौडपादाचार्यांचे हे वन्दन म्हणजे आमच्यासारख्या सामान्य जीवांना कर्तव्याचा आदर्श होय.

पूज्यपाद श्रीमत् आद्य शंकाराचार्यांनी या ग्रंथाच्या शेवटी मंगलचिंतनार्थ तीन श्लोक लिहिले आहेत.

अजमपि जनियोगं प्रापदैश्वर्ययोगा-
दगति च गतिमत्तां प्रापदेकं ह्यनेकम् ।
विविधविषयधर्मग्राहिमुग्धेक्षणानां
प्रणतभयविहन्त ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि ॥ १ ॥

वस्तुतः जे अज आहे परंतु स्वमायेच्या ऐश्वर्याने जे जन्म घेते, जे स्थिर असून गतिमान असल्याने जाणवते, जे एकमेव असून विविध असल्याचे दिसते, त्रिविध विषयगुणांचे ग्रहण केल्याने ज्यांची बुद्धी विवेकशून्य होते त्यांस हे ब्रह्म जन्ममय, गतिमान आणि अनेक रूपांनी नटलेले दिसते, हा ह्या मायेचा प्रभाव होय. ब्रह्माला जो शरण आला त्याचे भय नाहीसे होते. त्या ब्रह्माला मी नमस्कार करतो.

प्रज्ञावैशाखवेधक्षुभितजलनिधेर्वेनाम्नोऽन्तरस्थ
भूतान्यालोक्य मग्नान्यविरतजननग्राहघोरे समुद्रे ।
कारुण्यादुद्दधारामृतमिदममरैर्दुर्लभं भूतहेतो-
र्यस्तं पूज्याभिपूज्यै परमगुरुममुं पादपातैर्नतोऽस्मि ॥ २ ॥

जन्ममरणरूपी मगर संचार करीत असल्यामुळे, महाभयंकर भवसमुद्रात बुडणारे जीव पाहून त्यांच्यावर कृपा करण्याच्या प्रेरणेने प्रज्ञारूपी रवीने घुसळल्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या वेदसागराच्या अंतर्यामी, देवदुर्लभ असणारे अमृत ज्यांनी मंथून प्रकट केले त्या पूज्य परमगुरूंच्या पायाला मी साष्टांग प्रणिपात करतो.

यत्प्रज्ञालोकभासा प्रतिहतिमगमत्स्वान्तमोहान्धकारो
मज्जोन्मज्जच्च घोरे ह्यसकृदुपजनोदन्वति त्रासनें मे ।
यत्पादावाश्रितानां श्रुतिशमविनयप्राप्तिरग्ऱ्या ह्यमोघा
तत्पादौ पावनीयौ भवभवयविनुदौ सर्वभावैर्नमस्ये ॥ ३ ॥

माझ्या अन्तःकरणांत व्याकुलता आणि व्यग्रता निर्माण करणारा मोह म्हणजेच अज्ञानरूपी कारण, भयंकर त्रास देणाऱ्या आणि जन्ममरणरूपी सागरात गटांगळ्या खाणे हे भ्रांतिरूपी अज्ञानकार्य आहे. कारण आणि कार्य ही दोन्ही ज्या महापुरुषाच्या प्रज्ञारूपी सूर्याच्या तेजाने कायमची नाहीशी झाली आणि ज्यांच्या पायाच्या आश्रयाने विनियोगक्षम श्रुतिलाभ, विनम्रता आणि इंद्रियदमन होते त्या महात्म्याच्या संसारसागराचे भय नाहीसे करणाऱ्या अतिशय पवित्र अशा चरणांस अष्टविध भावांसह मी नमस्कार करतो.

यांतील पहिला श्लोक परब्रह्माला वन्दन करण्यासाठी, दुसरा श्लोक परमगुरूंना- पू. पा. गौडपादाचार्यांना नमस्कार करण्यासाठी आणि तिसरा श्लोक आपले गुरू पू. पा. गोविन्दपादाचार्य यांना वंदन करण्यासाठी आहे.

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्रा ।
स्थिरैरंगैस्तुष्टु वांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः ॥

माण्डुक्योपनिषद् समाप्त.


GO TOP