|
॥ अथ कठोपनिषद् ॥ ॐ सह नाववतु । सह नौ भुनक्तु । सहवीर्यं करवावहै । प्रथमोऽध्यायः - प्रथमः वल्ली ॐ उशन् ह वै वाजश्रवसः सर्ववेदसं ददौ । तस्य ह नचिकेता नाम पुत्र आस ॥ १ ॥ अशी आख्यायिका आहे कीं, वाजश्रवस् याचा पुत्र वाजश्रवस याने विश्वजित नामक यज्ञ करून त्या यज्ञामध्ये सर्व धन दान केले. त्याला नचिकेतस् नांवाचा पुत्र होता. १. तं ह कुमारं सन्तं दक्षिणासु नीयमानासु श्रद्धाविवेश सोऽमन्यत ॥ २ ॥ पीतोदका जग्धतृणा दुग्धदोहा निरिन्द्रियाः । अनन्दा नाम ते लोकाः तान् स गच्छति ता ददत् ॥ ३ ॥ ऋत्विजांना दक्षिणा म्हणून देण्याकरितां आणीत असलेल्या गाई तो पहात असतां, त्या अल्पवयस्क मुलाच्या मनांत श्रद्धा उत्पन्न झाली. तो विचार करूं लागला, कीं ज्यांच्यामध्ये पाणी पिण्याची अथवा तृण खाण्याची देखील आतां शक्ति राहिलेली नाहीं, ज्यांच्या दुधाचे दोहन होऊन गेले आहे, ज्यांची इंद्रिये जीर्ण झाली आहेत, अशा गाई दान देणारा यजमान अनंद (म्हणजे सुखविरहित) लोकांप्रतच जाणार २-३. स होवाच पितरं तत कस्मै मां दास्यसीति । द्वितीयं तृतीयं तान् होवाच मृत्यवे त्वा ददामीति ॥ ४ ॥ याप्रमाणे खेद पावून नचिकेता आपल्या पित्याला हाणाला, ''हे तात, कोणत्या ऋत्विजाला आपण माझें दान करणार ?" पित्यानें उत्तर दिलें नाही म्हणून त्यानें दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हाच प्रश्न केला. (तेव्हा क्रुद्ध होऊन) पिता म्हणाला, "मी तुला मृत्यूला देणार आहे." ४. बहूनामेमि प्रथमो बहूनामेमि मध्यमः । किं स्विद्यमस्य कर्तव्यं यन्मयाऽद्य करिष्यति ॥ ५ ॥ हें ऐकून नचिकेता आपल्या मनाशी विचार करूं लागला. पुष्कळांपेक्षां चांगल्या प्रकारानें (म्हणजे शिष्यरूपानें) मी मृत्यूकडे जात आहें; निदान पुष्कळांच्या मानाने मध्यम प्रकारानें तरी मी मृत्यूकडे जात आहे; अधम प्रकारानें म्हणजे पापकर्माची फळें भोगण्याकरितां मी जात नाहीं; मी गेल्यावर यम आतां माझ्याकडून काय बरें करवील ! ५. अनुपश्य यथा पूर्वे प्रतिपश्य तथाऽपरे । सस्यमिव मर्त्यः पच्यते सस्यमिवाजायते पुनः ॥ ६ ॥ नचिकेता आपल्या पित्याला म्हणतो, पूर्वी होऊन गेले लोक पहा किंवा सांप्रतचे लोक पहा; मनुष्य तृणाप्रमाणे नाश पावतो आणि तृणाप्रमाणेच पुन्हा उत्पन्न होतो. म्हणून यमाकडे मी आनंदानें जातो. ६. वैश्वानरः प्रविशति अतिथिर्ब्राह्मणो गृहान् । तस्यैतां शान्तिं कुर्वन्ति हर वैवस्वतोदकम् ॥ ७ ॥ नचिकेता यमाकडे गेला. यम यमलोकी नव्हता, तो तीन दिवसांनीं आला. तोपर्यंत नचिकेताला यमाचे द्वारी थांबावे लागलें. यम आल्यावर त्याला नचिकेता म्हणाला- ब्राह्मण अतिथि गृहामध्ये वैश्वानराप्रमाणे, म्हणजे जणूं काय ग्रह दहन करीत प्रवेश करतो. याकरिता लोक पाद्य आसनादि देऊन या अतिथीची शान्ति करतात. म्हणून हे वैवस्वता, मजकरितां उदक आण. ७. आशाप्रतीक्षे संगतं सूनृतां चेष्टापूर्ते पुत्रपशूंश्च सर्वान् । एतद्वृंक्ते पुरुषस्याल्पमेधसो यस्य अनश्नन् वसति ब्राह्मणो गृहे ॥ ८ ॥ ज्या अल्पबुद्धि पुरुषाच्या घरीं ब्राह्मण अतिथि उपाशी रहातो त्याच्या आशा [ कनकाचलादिकांसारखी अनिर्ज्ञेय वस्तु प्राप्त होण्याची इच्छा ] , प्रतीक्षा [ राज्यादिकांसारखी प्रत्यक्ष ज्ञात वस्तु प्राप्त होण्याची इच्छा ] , देवताध्यानाचे फल, सत्यभाषण, यज्ञादिकांपासून प्राप्त होणारे स्वर्गादि फल, आरामादि क्रियांपासून मिळणारे पितृलोकादि फल, पुत्र, पशु इत्यादि सर्व वस्तु नाश पावतात. ८. तिस्रो रात्रीर्यदवात्सीर्गृहे मेऽनश्नन् ब्रह्मन् अतिथिर्नमस्यः । नमस्तेऽस्तु ब्रह्मन् स्वस्ति मेऽस्तु तस्मात्प्रति त्रीन् वरान् वृणीष्व ॥ ९ ॥ यम नचिकेताला म्हणाला, हे ब्राह्मणा, ज्या अर्थी वंदन करण्याला योग्य असा तूं अतिथि तीन अहोरात्र माझ्या घरी उपाशी राहिलास, त्या अर्थीं हे ब्रह्मन् तुला मी नमस्कार करतो. माझें कल्याण असावें याकरितां प्रत्येक दिवसाबद्दल एक याप्रमाणे तीन वर माझ्यापाशी माग. ९. शान्तसंकल्पः सुमना यथा स्याद् वीतमन्युर्गौतमो माऽभि मृत्यो । त्वत्प्रसृष्टं माऽभिवदेत्प्रतीत एतत् त्रयाणां प्रथमं वरं वृणे ॥ १० ॥ नचिकेता संतुष्ट होऊन म्हणाला, हे मृत्यो, माझा पिता गौतम माझ्या सबंधाने शांतचित्त, प्रसन्नहृदयी व विगतक्रोध होवो; आणि तूं परत पाठविल्यावर माझी ओळख पटून तो मजबरोबर नीट भाषण करो. हा मी तीन वरांपैकी पहिला वर मागतो १०. यथा पुरस्ताद् भविता प्रतीत औद्दालकिरारुणिर्मत्प्रसृष्टः । सुखं रात्रीः शयिता वीतमन्युः त्वां ददृशिवान् मृत्युमुखात् प्रमुक्तम् ॥ ११ ॥ यम हणाला, तुझा पिता अरुणकुलोत्पन्न औद्दालकि माझ्या आज्ञेनें पूर्वी होतास तोच तूं असें तुला ओळखील. मृत्युमुखापासून मुक्त झालेल्या तुला पाहिल्यानंतरही भिती न वाटतां तो रात्री सुखाने झोप घेणारा व विगतक्रोध असा होईल. ११. स्वर्गे लोके न भयं किंचनास्ति न तत्र त्वं न जरया बिभेति । उभे तीर्त्वाऽशनायापिपासे शोकातिगो मोदते स्वर्गलोके ॥ १२ ॥ नचिकेता म्हणाला, स्वर्गलोकामध्ये कोणतेही भय नाहीं; तेथें तुझा प्रभाव नाही, म्हणून जरा प्राप्त झाली असतां इहलोकावर जसे लोक भय पावतात तसे स्वर्गामध्ये भय पावत नाहीत. क्षुधा आणि पिपासा या दोहोंच्या व शोकाच्याही पलीकडे गेल्यामुळे स्वर्गलोकामध्ये मनुष्य आनंद पावतात. १२. स त्वमग्निं स्वर्ग्यमध्येषि मृत्यो प्रब्रूहि त्वं श्रद्दधानाय मह्यम् । स्वर्गलोका अमृतत्वं भजन्त एतद् द्वितीयेन वृणे वरेण ॥ १३ ॥ हें मृत्यो, अशा स्वर्गाला नेणारा जो अग्नि त्याचें ज्ञान तुला आहे. स्वर्गाची इच्छा करणारा श्रद्धावंत जो मी त्या मला तूं अग्नीचे ज्ञान कथन कर. स्वर्गफलप्रासीची इच्छा करणारे यजमान अग्नीच्या यागाने देवत्व पावतात. हें अग्नीचे ज्ञान मी दुसऱ्या वराने मागतो १३. प्र ते ब्रवीमि तदु मे निबोध स्वर्ग्यमग्निं नचिकेतः प्रजानन् । अनन्तलोकाप्तिमथो प्रतिष्ठां विद्धि त्वमेतं निहितं गुहायाम् ॥ १४ ॥ यम म्हणाला, हे नचिकेता, स्वर्ग प्रास्प्त करून देणारा अग्नि जाणणारा मी तें अग्निज्ञान तुला सांगतो. एकाग्र होऊन ऐक. अग्नि अंतरहित अशा स्वर्गलोकाची प्राप्ति करून देणारा आहे, अग्नि (सर्व जगताचा) आधार आहे. अग्नीचे मी तुला जें ज्ञान सांगत आहें तें अति गूढ आहे. १४. लोकादिमग्निं तमुवाच तस्मै या इष्टका यावतीर्वा यथा वा । स चापि तत्प्रत्यवदद् यथोक्तं अथास्य मृत्युः पुनरेवाह तुष्टः ॥ १५ ॥ सर्व लोकांमध्यें प्रथम उत्पन्न झालेला जो अग्नि त्याबद्दल यमाने नचिकेताला सर्व ज्ञान सांगितलें. इष्टका कोणत्या आहेत, किती आहेत व त्यांनीं अग्नि कसा उत्पन्न करावयाचा इत्यादि ज्ञान सांगितलें. यमाने जसें सांगितलें तसा त्याचा नचिकेताने पुनरुच्चार करून दाखविला. तेव्हां यम संतुष्ट होऊन नचिकेताला पुन्हा पुढील भाषण बोलता झाला. १५. तमब्रवीत् प्रीयमाणो महात्मा वरं तवेहाद्य ददामि भूयः । तवैव नाम्ना भविताऽयमग्निः सृंकां चेमां अनेकरूपां गृहाण ॥ १६ ॥ नचिकेतावर संतुष्ट होत्साता तो महात्मा म्हणाला, मी तुला आतां आणखी एक वर देतो तो हा- हा अग्नि तुझ्या नांवानें यापुढें प्रसिद्ध होईल. म्हणजे या अग्रीला आतां नाचिकेत अग्नि असें म्हणतील. अनेक रूपांनी युक्त अशी ही शब्दवती रत्नमयी माला घे. १६. त्रिणाचिकेतस्त्रिभिरेत्य सन्धिं त्रिकर्मकृत् तरति जन्ममृत्यू । ब्रह्मजज्ञं देवमीड्यं विदित्वा निचाय्येमां शान्तिमत्यन्तमेति ॥ १७ ॥ माता, पिता व आचार्य या तिघांची सेवा करून ज्याने त्यांजकडून शिक्षण संपादन केले आहे, नाचिकेत अग्नीचे विज्ञान, अध्ययन व अनुष्ठान ज्याने केलें आहे, आणि इज्या, अध्ययन व दान ही तीन कर्मे ज्याने केली आहेत असा मनुष्य जन्ममृत्यु तरून जातो; आणि हिरण्यगर्भापासून उत्पन्न झालेल्या, ज्ञाता, प्रकाशमान् व पूज्य अशा या अग्नीचे त्याला ज्ञान होऊन आत्मरूपानें दर्शन झाले म्हणजे मग अत्यंत श्रेष्ठ अशी शान्ति त्याला प्राप्त होते. १७. त्रिणाचिकेतः त्रयमेतद्विदित्वा य एवं विद्वान् चिनुते नाचिकेतम् । स मृत्युपाशान् पुरतः प्रणोद्य शोकातिगो मोदते स्वर्गलोके ॥ १८ ॥ यज्ञाच्या इष्टकांचे ज्ञान होऊन जो हें जाणून तीन वेळां नाचिकेत अग्नीचे अनुष्ठान करतो तो जिवंतपणीच मृत्यूच्या पाशांचा नाश करून शोकरहित होत्साता स्वर्गलोकी आनंद पावतो. १८. एष तेऽग्निर्नचिकेतः स्वर्ग्यो यमवृणीथा द्वितीयेन वरेण । एतमग्निं तवैव प्रवक्ष्यन्ति जनासः तृतीयं वरं नचिकेतो वृणीष्व ॥ १९ ॥ हे नचिकेता, तूं दुसरा वर म्हणून जो मागितलास तो स्वर्गसाधनरूप असा अग्नि मीं तुला सांगितला. या अग्नीला आतां लोक तुझ्या नांवानें ओळखतील. नचिकेता, आतां तिसरा वर माग. १९. येयं प्रेते विचिकित्सा मनुष्येऽस्तीत्येके नायमस्तीति चैके । एतद्विद्यां अनुशिष्टस्त्वयाऽहं वराणां एष वरस्तृतीयः ॥ २० ॥ नचिकेता म्हणाला, मनुष्य मरण पावला म्हणजे शरीर, इंद्रिय, मन, बुद्धि यांहून व्यतिरिक्त व दुसऱ्या देहाशी संबंध जोडणारा असा आत्मा आहे असें कोणी म्हणतात, असा आत्मा नाहीं असेही कोणी म्हणतात. हा एक संशय आहे. तूं समजावून सांगितलेस झणजे मला याचे ज्ञान होईल. माझ्या वरांपैकी हा तिसरा वर आहे. २०. देवैरत्रापि विचिकित्सितं पुरा न हि सुविज्ञेयमणुरेष धर्मः । अन्यं वरं नचिकेतो वृणीष्व मा मोपरोत्सीरति मा सृजैनम् ॥ २१ ॥ यम म्हणाला, यासंबंधाचा संशय देवांना देखील पूर्वी आला होता. हा आत्मा नांवाचा धर्म [पदार्थ] सूक्ष्म आहे; याकरिता प्राकृत जनांना हा चांगल्या प्रकारे समजत नाही. हे नचिकेता, तूं दुसरा वर पसंत कर. हा वर देण्याचा मला तूं आग्रह करूं नकोस. मला हा वर सोडून दे. २१. देवैरत्रापि विचिकित्सितं किल त्वं च मृत्यो यन्न सुज्ञेयमात्थ वक्ता चास्य त्वादृगन्यो न लभ्यो नान्यो वरस्तुल्य एतस्य कश्चित् ॥ २२ ॥ नचिकेता म्हणाला, हे मृत्यो, ज्या अर्थी देवांना देखील याविषयी संशय पडला होता, अणि ज्या अर्थी हा चांगल्या प्रकारे समजत नाही असे तूं सांगतोस, त्या अर्थीं हा आत्मधर्म समजावून देणारा तुझ्यासारखा दुसरा कोणी मिळणे शक्य नाहीं आणि या वरासारखा दुसरा वरही नाहीं. २२. शतायुषः पुत्रपौत्रान्वृणीष्वा बहून्पशून् हस्तिहिरण्यमश्वान् । भूमेर्महदायतनं वृणीष्व स्वयं च जीव शरदो यावदिच्छसि ॥ २३ ॥ यम म्हणाला, शंभर वर्षें जगणारे पुत्र, पौत्र माग; हत्ती, घोडे वगैरे पुष्कळ पशु, पुष्कळ सुवर्ण माग; पृथ्वीवर विस्तीर्ण राज्य माग; आणि इच्छा असेल तितकी वर्षें तूं जग. २३. एतत्तुल्यं यदि मन्यसे वरं वृणीष्व वित्तं चिरजीविकां च । महाभूमौ नचिकेतस्त्वमेधि कामानां त्वा कामभाजं करोमि ॥ २४ ॥ यांसारखा दुसराही एखादा वर तुला वाटत असेल तर माग; संपत्ति माग; दीर्घायुष्य माग; हे नचिकेता, विस्तीर्ण अशा भूमीवर तू राजा हो. इच्छेनुसार सर्व इच्छा भोगणारा असा मी तुला करतों. २४. ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके सर्वान् कामां श्छन्दतः प्रार्थयस्व । इमा रामाः सरथाः सतूर्या न हीदृशा लम्भनीया मनुष्यैः । आभिर्मत्प्रत्ताभिः परिचारयस्व नचिकेतो मरणं माऽनुप्राक्षीः ॥ २५ ॥ जे जे मनोरथ मृत्युलोकामध्ये दुर्लभ असतील ते ते सर्व तुझ्या इच्छेप्रमाणे मजपाशी माग. या अशा नितंबवती आणि हातांमध्यें तूर्य वाद्य धारण करणाऱ्या दिव्य स्त्रिया आहेत. मनुष्यांना अशा मिळणे शक्य नाहीं. मी (मृत्युलोकी) यांना पाठवितो; तूं त्यांच्याकडून सेवा करून घे. हे नचिकेता, (पण) मरणासंबंधाचा प्रश्न विचारू नकोस. २५ श्वोभावा मर्त्यस्य यदन्तकैतत् सर्वेंद्रियाणां जरयंति तेजः । अपि सर्वं जीवितमल्पमेव तवैव वाहास्तव नृत्यगीते ॥ २६ ॥ नचिकेता म्हणाला, हे मनुष्यांचा अंत करणाऱ्या मृत्यो, हे सर्व भोग आज आहेत आणि उद्या नाहींत अशा प्रकारचे (क्षणिक) आहेत. हे भोग सर्व इंद्रियांचे तेज क्षीण करतात. मला तूं दीर्घायुष्य देणार म्हणतोस तर जेवढें म्हणून (प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचें देखील) आयुष्य तेवढे सर्व अल्प आहे. तुझ्या नितंबवती अप्सरा राहोत आणि यांची तीं नृत्यगीतेही तुजपाशीच राहोत. २६. न वित्तेन तर्पणीयो मनुष्यो लप्स्यामहे वित्तमद्राक्ष्म चेत्त्वा । जीविष्यामो यावदीशिष्यसि त्वं वरस्तु मे वरणीयः स एव ॥ २७ ॥ धनाने मनुष्याची तृप्ति होत नाही. तुझें दर्शन असलें म्हणजे मला (पाहिजे असेल तितके) धन मिळेल. जोपर्यंत तूं मरणाचा नियंता आहेस तोपर्यंत मला आयुष्यही मिळेल. (पण) मला तोच वर मागावयाचा आहे. २७ अजीर्यतां अमृतानामुपेत्य जीर्यन्मर्त्यः क्वधःस्थः प्रजानन् । अभिध्यायन् वर्णरतिप्रमोदान् अतिदीर्घे जीविते को रमेत ॥ २८ ॥ जरा व मरण यांनी युक्त असलेला, खालीं पृथ्वीवर रहाणारा, कोणता प्राणी गायन, वर्ण, रति व यांपासून होणारा आनंद ही सर्व (नाशयुक्त आहेत असें) जाणल्यावर, आणि अजर व अमर अशा देवांकडे जाऊन (यांहून उत्कृष्ट प्राप्तव्य आहे असें) ज्ञान प्राप्त झाल्यावर, अतिदीर्घ जीवितामध्ये, रममाण होईल. २८. यस्मिन्निदं विचिकित्सन्ति मृत्यो यत्साम्पराये महति ब्रूहि नस्तत् । योऽयं वरो गूढमनुप्रविष्टो नान्यं तस्मान्नचिकेता वृणीते ॥ २९ ॥ हे मृत्यो, ज्या आत्म्याविषयी शाश्वत आहे की अशाश्वत आहे अशा प्रकारें चिकित्सा करतात, त्या आत्म्याचे महत्त्वाच्या (महति) अशा परलोकासंबंधाचें (सांपराय) जें निर्णायक ज्ञान तें मला सांग. गहन विवेचनाचा विषय झालेला जो हा वर त्याहून दुसरा वर मी नचिकेता मागत नाहीं. २९. इति काठकोपनिषदि प्रथमाध्याये प्रथमा वल्ली ॥ इति काठकोपनिषदि प्रथमाध्याये प्रथमा वल्ली ॥ प्रथमोऽध्यायः - द्वितीया वल्ली अन्यच्छ्रेयोऽन्यदुतैव प्रेयः ते उभे नानार्थे पुरुषं सिनीतः । तयोः श्रेय आददानस्य साधु भवति हीयतेऽर्थाद्य उ प्रेयो वृणीते ॥ १ ॥ श्रेय = कल्याणप्राप्ति वेगळे आहे आणि प्रेय = प्रियप्राप्ति वेगळे आहे. ही दोन भिन्न अर्थ प्राप्त करून देणारी आहेत. या दोघांनी मनुष्य बद्ध आहे. या दोहोंपैकी श्रेयाचा स्वीकार करणाराचे कल्याण होते; जो प्रेयाचा स्वीकार करतो त्याला परमार्थप्राति होत नाहीं. १. श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः । श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्षेमाद्वृणीते ॥ २ ॥ श्रेय आणि प्रेय ही दोन मनुष्यापुढे प्राप्त झालेलीं आहेत. बुद्धिमान मनुष्य त्यांची योग्य परीक्षा करून त्यांचें पृथक्करण करतो. बुद्धिमान् मनुष्य प्रेयाहून श्रेय पसंत करतो; आणि मंद मनुष्य योगक्षेमाला साधन म्हणून प्रेय पसंत करतो. २. स त्वं प्रियान्प्रियरूपांश्च कामान् अभिध्यायन् नचिकेतोऽत्यस्राक्षीः । नैतां सृङ्कां वित्तमयीमवाप्तो यस्यां मज्जन्ति बहवो मनुष्याः ॥ ३ ॥ पण हे नचिकेता, प्रिय असलेल्या आणि प्रिय वाटणाऱ्या इच्छांचा तूं विचारपूर्वक त्याग करीत आहेस. अनेक मनुष्यांना बुडविणाऱ्या या वित्तरूपी मार्गाला (सृंकां) तूं गेला नाहीस. सारांश तूं मंद नसून बुद्धिमान आहेस. ३. दूरमेते विपरीते विषूची अविद्या या च विद्येति ज्ञाता । विद्याभीप्सिनं नचिकेतसं मन्ये न त्वा कामा बहवोऽलोलुपन्त ॥ ४ ॥ ही श्रेय आणि प्रेय ज्यांना अनुक्रमे विद्या व अविद्या म्हणतात ती एकमेकांपासून फार दूर, विरुद्ध प्रकारची आणि भिन्न फल देणारी [ विषूचि= भिन्न गति असलेली ] असलेली आहेत. हे नचिकेता, ज्या अर्थी नानाप्रकारचे काम तुला लुब्ध करूं शकले नाहींत त्या अर्थी तूं विद्येची, श्रेयाची म्ह० लोक्षसाधनाची इच्छा करणारा आहेस हें मी जाणलें. ४. अविद्यायामन्तरे वर्तमानाः स्वयं धीराः पण्डितं मन्यमानाः । दन्द्रम्यमाणाः परियन्ति मूढा अन्धेनैव नीयमाना यथान्धाः ॥ ५ ॥ अविद्येच्या मध्ये गुरफटून असलेले, स्वतःला बुद्धिमान् आणि शास्त्रकुशल समजणारे, नानाप्रकारच्या मार्गांनी जाणारे [दंद्रम्यमाणा:] मूढ लोक जन्ममरणादि अनेक दुःखांभोवती घिरट्या घालतात. आधळ्यांनींच आंधळ्यांना मार्ग दाखविला असतां त्यांची जशी स्थिति होते तद्वत्. ५. न साम्परायः प्रतिभाति बालं प्रमाद्यन्तं वित्तमोहेन मूढम् । अयं लोको नास्ति पर इति मानी पुनः पुनर्वशं आपद्यते मे ॥ ६ ॥ प्रमादशील आणि वित्तमोहानें मूढ झालेल्या विवेकहीन मनुष्याला [बालं] परलोकाच्या प्राप्तीचे साधन [सांपराय] दिसत नाही. हाच लोक आहे, दुसरा नाही, असें मानणारा तो मूढ पुन्हा पुन्हा माझ्या तावडीत सांपडतो. ६. श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्यः श्रृण्वन्तोऽपि बहवो यं न विद्युः । आश्चर्यो वक्ता कुशलोऽस्य लब्धा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्टः ॥ ७ ॥ कारण हा आत्मा व ज्याविषयी तूं मला विचारीत आहेस तें तद्विषयक ज्ञान पुष्कळांना श्रवण करण्यास देखील मिळत नाही; श्रवण करणारांपैकी पुष्कळांना याचे ज्ञान होत नाही. याचे ज्ञान सांगणारा एखादाच असतो; त्यांतून याचे चांगलें ज्ञान प्राप्त झालेला क्वचितच सांपडावयाचा. कारण याविषयी पूर्ण ज्ञान असलेल्या ज्ञात्यानें उपदिष्ट असा ज्ञाता एखादाच आढळतो. ७ न नरेणावरेण प्रोक्त एष सुविज्ञेयो बहुधा चिन्त्यमानः । अनन्यप्रोक्ते गतिरत्र नास्ति अणीयान् ह्यतर्क्यमणुप्रमाणात् ॥ ८ ॥ नानाप्रकारांनीं ज्याचा विचार करतात अशा या आत्म्याविषयी सामान्य बुद्धीचा मनुष्य जें कांहीं सांगतो त्याने याचे बरोबर ज्ञान होणें शक्य नाही. केवळ सामान्यच मनुष्याच्या विचारांना येथें वाव नाही; कारण हा अणूपेक्षाहि सूक्ष्म असल्यामुळें तर्कानें जाणणें शक्य नाहीं. ८. नैषा तर्केण मतिरापनेया प्रोक्तान्येनैव सुज्ञानाय प्रेष्ठ । यां त्वमापः सत्यधृतिर्बतासि त्वादृङ्नो भूयान्नचिकेतः प्रष्टा ॥ ९ ॥ आत्म्याविषयीचे हें ज्ञान तर्काने प्राप्त होणें शक्य नाहीं. हे प्रियतमा, तार्किकाहून इतर अशा ज्ञात्यानेंच हें ज्ञान सांगितलें असतां चांगलें समजते. हें ज्ञान तुला प्राप्त होत आहे. खरोखर तूं सत्यनिष्ठ आहेस. हे नचिकेता, तुझ्यासारखा विचारणारा शिष्य मला असावा. ९ जानाम्यहं शेवधिरित्यनित्यं न ह्यध्रुवैः प्राप्यते हि ध्रुवं तत् । ततो मया नाचिकेतश्चितोऽग्निः अनित्यैर्द्रव्यैः प्राप्तवानस्मि नित्यम् ॥ १० ॥ हे नचिकेता, कर्मफलरूपी निधि सर्व अनित्य हें आतां मला समजले. कारण तो नित्य निधि [परमात्मा] या अनित्य साधनांनी प्राप्त होत नाही. मी अनित्य द्रव्यांनी अग्नीचे हवन केलें म्हणून मला हे अनित्य पद कायमचें प्राप्त झालें. १०. कामस्याप्तिं जगतः प्रतिष्ठां क्रतोः अनन्त्यमभयस्य पारम् । स्तोममहदुरुगायं प्रतिष्ठां दृष्ट्वा धृत्या धीरो नचिकेतोऽत्यस्राक्षीः ॥ ११ ॥ हे नचिकेता, पण धैर्ययुक्त अशा तूं, सर्व इच्छांचा शेवट, जगताचा आश्रय, उपासनेचे फल, अभयाचे पैलतीर, स्तुत्य, मोठे आणि विस्तीर्ण गति असलेलें असे परमात्मपद हेंच आपलें अंतिम [प्रतिष्ठा] आहे असें जाणून [दृष्ट्वा] सर्व अनित्य फलांचा त्याग केलास ! तूं धन्य आहेस ! ११. तं दुर्दर्शं गूढमनुप्रविष्टं गुहाहितं गह्वरेष्ठं पुराणम् । अध्यात्मयोगाधिगमेन देवं मत्वा धीरो हर्षशोकौ जहाति ॥ १२ ॥ दिसण्यास कठिण, जणू काय अरण्यामध्यें शिरलेला, गुहेत लपलेला, गह्वरांत बसलेला व प्राचीन दिव्य पुरुष असा तो आत्मा अध्यात्मयोगाच्या प्राप्तीने ज्ञात झाल्यावर बुद्धिमान मनुष्य हर्ष व शोक या दोहोंचाही त्याग करतो. १२. एतत् श्रृत्वा सम्परिगृह्य मर्त्यः प्रवृह्य धर्म्यमणुमेतमाप्य । स मोदते मोदनीयं हि लब्ध्वा विवृतं सद्म नचिकेतसं मन्ये ॥ १३ ॥ हें आत्मज्ञान श्रवण करून, याचे योग्य ग्रहण म्ह० मनन करून, धर्मरूप व सूक्ष्म अशा याची वृद्धि म्ह० निदिध्यासन करून याची प्राप्ति म्हणजे साक्षात्कार झाल्यावर तो मनुष्य अत्यंत आनंददायक अशा वस्तूची प्राप्ति झाल्यामुळें आनंद पावतो. करितां, हे नचिकेता, तुझ्याकरितां ब्रह्मज्ञानरूपी ठिकाणाचें दारच उघडलें आहे असें मला वाटतें. १३. अन्यत्र धर्मादन्यत्राधर्मात् - अन्यत्रास्मात्कृत अकृतात् । अन्यत्र भूताच्च भव्याच्च यत्तत्पश्यसि तद्वद ॥ १४ ॥ नचिकता म्हणाला, धर्माच्या व अधर्माच्या पलीकडचे, कार्य व अकार्य यांच्या पलीकडचे, आणि भूत व भविष्य यांच्या पलीकडचे असें जे ब्रह्म तूं जाणतोस ते मला सांग. १४. सर्वे वेदा यत्पदमामनन्ति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति । यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदं संग्रहेण ब्रवीमि ओमित्येतत् ॥ १५ ॥ यम म्हणाला, सर्व वेद ज्या पदाचे प्रतिपादन करतात, सर्व तपें जें प्राप्तव्य आहे म्हणून सांगतात, ज्याच्या प्राप्तीच्या इच्छेने ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते पद, मी तुला थोडक्यांत सांगतो, ते म्हणजे ॐ हें आहे. १५. एतद् हि एव अक्षरं ब्रह्म एतद् हि एव अक्षरं परम् । एतद् एव अक्षरं ज्ञात्वा यो यद् इच्छति तस्य तत् ॥ १६ ॥ हेंच अक्षर ब्रह्म आहे, हेंच अक्षर परम होय. हेंच अ-क्षर (शाश्वत) ब्रह्म जाणले म्हणजे ज्याला ज्याची इच्छा होते ते त्याला प्राप्त होतें. १६. एतद् आलम्बनं श्रेष्ठं एतद् आलम्बनं परम् । एतद् आलम्बनं ज्ञात्वा ब्रह्मलोके महीयते ॥ १७ ॥ ब्रह्मप्राप्तीचा हा मार्ग सर्वांत श्रेष्ठ आहे, सर्वात उत्तम आहे. हा जाणल्यानें मनुष्य ब्रह्मप्राप्ति होत्साता महत्त्व पावतो. १७. न जायते म्रियते वा विपश्चिन् नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित् । अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ १८ ॥ हा ज्ञानस्वरूपी आत्मा जन्म पावत नाही अथवा मरण पावत नाहीं; हा स्वतःहून भिन्न अशा दुसऱ्या कोणापासून (तद्भिन्न) असा कोणी झालेला नाहीं. हां जन्मरहित, नित्य, क्षयरहित व वृद्धिरहित आहे. शरीराचा वध झाला असतां याचा वध होत नाही. १८. हन्ता चेन्मन्यते हन्तुं हतश्चेन्मन्यते हतम् । उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९ ॥ मारणारा मनुष्य जर समजेल की मी याला [आत्म्याला] मारेन, मेलेला मनुष्य जर समजेल कीं हा आत्मा मेला, तर त्या दोघांनाही कांहीं समजत नाहीं. मारणारा मारू शकत नाहीं आणि मेलेला मरत नाही. १९. अणोरणीयान्महतो महीयान् आत्माऽस्य जन्तोर्निहितो गुहायाम् । तमक्रतुः पश्यति वीतशोको धातुप्रसादात् महिमानमात्मनः ॥ २० ॥ या ब्रह्मदेवापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व प्राणिमात्रांचा, सूक्ष्माहून अधिक सूक्ष्म व स्थूलाहून अधिक स्प्थूल असा आत्मा हृदयरूपी गुहेमध्ये स्थित आहे. आत्म्याचा हा महिमा इंद्रियांच्या प्रसन्नतेमुळें (धातूप्रसादात्) निष्काम (अक्रतुः) मनुष्य जाणतात; व तेणेंकरून ते शोकरहित होतात. २०. आसीनो दूरं व्रजति शयानो याति सर्वतः । कस्तं मदामदं देवं मदन्यो ज्ञातुमर्हति ॥ २१ ॥ एरवी सकाम प्राकृत मनुष्यांना हा ज्ञेय नाही. कारण स्थित असतां तो दूर जातो, एके ठिकाणी असून तो सर्वत्र गमन करतो. हर्षयुक्त व हर्षरहित अशा विरुद्धगुणयुक्त त्या दिव्य आत्म्याला माझ्यावांचून इतर कोण जाणूं शकणार आहे ? २१ अशरीरं शरीरेषु अनवस्थेषु अवस्थितम् । महान्तं विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचति ॥ २२ ॥ स्वतः शरीररहित असून अनित्य (अनवस्थेषु) अशा शरीरांमध्यें रहाणाऱ्या त्या महान व सर्वव्यापी आत्म्याला तो मीच आहें असें जाणून बुद्धिमान् मनुष्य शोक करीत नाही. २२ नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुना श्रुतेन । यमेवैष वृणुते तेन लभ्यः तस्यैष आत्मा विवृणुते तनूं स्वाम् ॥ २३ ॥ हा आत्मा (आत्मज्ञानाव्यतिरिक्त) शास्त्रश्रवणानें प्राप्त होत नाही, बुद्धीने समजत नाही, पुष्कळ श्रवणाने प्राप्त हाते नाही. ज्या स्वतःच्या आत्म्याची (साधक) ज्ञान देण्याबद्दल प्रार्थना करतो त्याच आत्म्याच्या द्वारे हा आत्मा प्राप्त होतो. हा आत्मा त्याच साधकाला आपलें स्वरूप प्रकट करतो.२३. नाविरतो दुश्चरितान् नाशान्तो नासमाहितः । नाशान्तमानसो वाऽपि प्रज्ञानेनैनमाप्नुयात् ॥ २४ ॥ पापकर्मापासून परावृत्त न झालेला, इंद्रियभोगांपासून उपरत न झालेला, एकाग्रचित्त न झालेला अथवा शांतिरहित चित्त असलेला, अशा मनुष्याला ज्ञानाचे योगानें देखील आत्मप्राति होत नाहीं. २४. प्रथमोऽध्यायः - तृतीया वल्ली ऋतं पिबन्तौ सुकृतस्य लोके गुहां प्रविष्टौ परमे परार्धे । छायातपौ ब्रह्मविदो वदन्ति पञ्चाग्नयो ये च त्रिणाचिकेताः ॥ १ ॥ प्राप्ता व प्राप्य अशा आत्म्याच्या दोन प्रकाराचे वर्णन करतात- स्वतः केलेल्या कर्माच फल भोगणारे या शरीरामध्ये (लोके) ब्रह्माचे (परं) श्रेष्ठ (परमे) स्थान (अर्धे) अशा बुद्धीच्या (गुहां) ठिकाणी प्रवेश केलेले जीवात्मा व परमात्मा हे छाया व प्रकाश यांच्याप्रमाणे आहेत असें ब्रह्मज्ञ सांगतात. तीन वेळां नाचिकेत अग्नीचे हवन केले गृहस्थ (पंचाग्नय:) देखील असेंच सांगतात. १. यः सेतुरीजानानां अमक्षरं ब्रह्म यत् परम् । अभयं तितीर्षतां पारं नाचिकेतं शकेमहि ॥ २ ॥ यजन करणाऱ्या कर्मनिष्ठ लोकांना सेतूप्रमाणे वाटणारा जो नाचिकेत अग्नि तो आम्ही जाणतो आणि संसार तरूं इच्छिणारांचें भयरहित असें पैलतीर जें परब्रह्म तें देखील आम्ही जाणतो, तें ऐक. २ आत्मानं रथितं विद्धि शरीरं रथमेव तु । बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ॥ ३ ॥ आत्मा हा रथी आहे, शरीर हा रथ आहे, बुद्धि हा सारथि आहे आणि मन हा लगाम आहे असें जाण. ३. इन्द्रियाणि हयानाहुः विषयान् तेषु गोचरान् । आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः ॥ ४ ॥ इंद्रिये हे अश्व, विषय हे त्यांचे मार्ग आणि इंद्रिये व मन यांसह आल्या त्यांचा भोक्ता आहे असें विवेकी मनुष्य सांगतात. ४. यस्तु अविज्ञानवान् भवति अयुक्तेन मनसा सदा । तस्येन्द्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वा इव सारथेः ॥ ५ ॥ सर्वदा निग्रहहीन मनाचे योगाने ज्याचा बुद्धिरूपी सारथि अकुशल असतो त्याला - वाईट घोडे ज्याप्रमाणे अकुशल सारथ्याला वश नसतात त्याप्रमाणें - इंद्रिये यश नसतात. ५. यस्तु विज्ञानवान् भवति युक्तेन मनसा सदा । तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथेः ॥ ६ ॥ परंतु सर्वदा निग्रहयुक्त मनाचे योगाने ज्याचा बुद्धिरूपी सारथि कुशल असतो, त्याला - चांगले घोडे ज्याप्रमाणें कुशल सारथ्याला वश असतात त्याप्रमाणें - इंद्रिये वश असतात. ६. यस्तु अविज्ञानवान् भवति अमनस्कः सदाऽशुचिः । न स तत्पदमाप्नोति संसारं चाधिगच्छति ॥ ७ ॥ जो विज्ञानरूपी बुद्धीनें रहित असतो, ज्याचे मन ताब्यांत नसतें, जो सर्वदा अशुचि असतो, त्याला त परम पद प्राप्त होत नाही; त्याला जन्ममरणख्यप संसारच प्राप्त होतो. ७ यस्तु विज्ञानवान् भवति समनस्कः सदा शुचिः । स तु तत्पदमाप्नोति यस्माद्भूयो न जायते ॥ ८ ॥ परंतु जो विज्ञानरूपी बुद्धीने युक्त असतो, ज्याचे मन ताब्यांत असते, जो सर्वदा शुचिर्भूत असतो, त्याला तें परम पद प्राप्त होतें; तैं प्राप्त झाल्यानंतर तो पुन्हा जन्म व मरण पावत नाही. ८. विज्ञानसारथिर्यस्तु मनः प्रग्रहवान्नरः । सोऽध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम् ॥ ९ ॥ विज्ञानरूपी बुद्धि हा ज्याचा सारथि आहे व मनोरूपी लगाम ज्याने आवरून धरले आहेत तो मनुष्य या संसाररूपी मार्गाचे पैल तीर पावतो. तेंच विष्णूरूपी परब्रह्माचे श्रेष्ठ स्थान आहे. ९ इन्द्रियेभ्यः परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परं मनः । मनसस्तु परा बुद्धिः बुद्धेरात्मा महान्परः ॥ १० ॥ इंद्रियांहून इंद्रियांचे अर्थ श्रेष्ठ आहेत, इंद्रियांच्या अर्थांहून मन श्रेष्ठ आहे, मनाहून बुद्धि श्रेष्ठ आहे आणि बुद्धीहून महान् असा आत्मा [ महान् = जगतांत प्रथम अव्यक्तापासून उत्पन्न झालेलें हिरण्यगर्भरूप तत्त्व ] श्रेष्ठ आहे. १०. महतः परमव्यक्तं अव्यक्तात्पुरुषः परः । पुरुषान्न परं किंचित् सा काष्ठा सा परा गतिः ॥ ११ ॥ आत्म्याहून सर्व जगताचे बीजरूप जें अव्यक्त तें श्रेष्ठ आहे; अव्यक्ताहून सर्व कारणांचे आदिकारण असा पुरुष [परम आत्मा] श्रेष्ठ आहे. पुरुषाहून श्रेष्ठ असें कांहींही नाहीं. प्राणिमात्राची हीच शेवटची व उत्कृष्ट गति होय. ११. एष सर्वेषु भूतेषु गूढोऽऽत्मा न प्रकाशते । दृश्यते त्वग्र्यया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः ॥ १२ ॥ हा आत्मा सर्व भूतांचे ठिकाणी गूढरूपाने आहे; तो प्रकाशित नसतो. केवळ एकाग्रआणि सूक्ष्म अशा बुद्धीच्या योगाने सूक्ष्मदृष्टि मनुष्यांना याचे ज्ञान होतें. १२. यच्छेद् वाङ्मनसी प्राज्ञः तद् यच्छेज्ज्ञान आत्मनि । ज्ञानमात्मनि महति नियच्छेत् तद् यच्छेच्छान्त आत्मनि ॥ १३ ॥ तें ज्ञान होण्याचा उपाय सांगतात- विवेकी मनुष्याने वाणीचा म्हणजे सर्व इंद्रियांचा मनाचे ठिकाणी (मनसी=मनसि) लय करावा. मनाचा ज्ञानस्वरूप बुद्धिरूपी आत्म्याचे ठिकाणी (ज्ञाने आत्मनि) लय करावा. बुद्धीचा (ज्ञानं) महान् अशा [प्रथमज हिरण्यगर्भरूप] आत्म्याचे ठिकाणी लय करावा. त्या आत्म्याचा अविक्रिय अशा मुख्य आत्म्याचे ठिकाणी लय करावा. १३. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत । क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गं पथस्तत्कवयो वदन्ति ॥ १४ ॥ याप्रमाणे परम आत्म्याचे ठिकाणी सर्वाचा लय झाला म्हणजे मिथ्या ज्ञानाची निवृत्ति होते. म्हणून हे जीवहो, आत्मज्ञानप्राप्तिकरितां उठा, अज्ञाननिद्रेतून जागे व्हा, श्रेष्ठ अशा ज्ञानवान् आचार्यांकडे जाऊन हें आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. ज्याप्रमाणें वस्तऱ्याच्या तीष्ण केलेल्या धारेवर पाय ठेवून जाणें अशक्य असतें त्याप्रमाणे हा आत्मज्ञानाचा मार्ग चालण्यास अत्यंत कठिण आहे असें ज्ञानी लोक सांगतात. १४ अशब्दमस्पर्शमरूपमव्ययं तथाऽरसं नित्यमगन्धवच्च यत् । अनाद्यनन्तं महतः परं ध्रुवं निचाय्य तन्मृत्युमुखात् प्रमुच्यते ॥ १५ ॥ शब्दरहित, स्पर्शरहित, रूपरहित, क्षयरहित, रसरहित, नित्य (न बदलणारे), गंधरहित, आदिरहित, अंतरहित, महत्तत्त्वाहून श्रेष्ठ आणि शाश्वत असें जें ब्रह्म तें जाणल्यानें जन्म व मरण यांच्यापासून सुटका होते. १५. नाचिकेतमुपाख्यानं मृत्युप्रोक्तं सनातनम् । उक्त्वा श्रुत्वा च मेधावी ब्रह्मलोके महीयते ॥ १६॥ यमाने नचिकेतस् याला सांगितलेले हें सनातन उपाख्यान इतरांना सांगितल्यानें अथवा ज्ञात्यांपासून श्रवण केल्याने बुद्धिमान् मनुष्य ब्रह्मलोकामध्यें महत्त्व पावतो ब्रह्मरूप होतो]. १६. य इमं परमं गुह्यं श्रावयेद् ब्रह्मसंसदि । प्रयतः श्राद्धकाले वा तदानन्त्याय कल्पते । तदानन्त्याय कल्पत इति ॥ १७ ॥ हें अत्यंत गूढ आख्यान जो कोणी शुचिर्भूत होत्साता ब्राह्मणांच्या सभेला ऐकवील अथवा श्राद्धकाली भोजन करणारांना ऐकवील त्याचें तें कृत्य अनंतफलदायक होईल. १७. इति काठकोपनिषदि प्रथमाध्याये तृतीया वल्ली ॥ इति काठकोपनिषदि प्रथमाध्याये तृतीया वल्ली ॥ द्वितीयोऽध्यायः - चतुर्थी वल्ली पराञ्चि खानि व्यतृणत् स्वयम्भूः तस्मात्पराङ् पश्यति नान्तरात्मन् । कश्चिद्धीरः प्रत्यगात्मानमैक्षत् आवृत्तचक्षुः अमृतत्वमिच्छन् ॥ १ ॥ बहिर्मुख अशीं इंद्रिये फक्त परमेश्वराने मारून टाकली आहेत इतरांनी कोणी नाही.म्हणून मनुष्य बाहेर [विषयांकडे] पहातो, अंतरात्म्याकडे पहात नाहीं. एखादाच बुद्धिमान मनुष्य मोक्षाची इच्छा करणारा होत्साता व सर्व इंद्रिये अंतर्मुख केलेला इंद्रियांहून उलट गमन करणाऱ्या म्ह० अंतर्मुख आत्म्याला पहातो. १. पराचः कामान् अनुयन्ति बालाः ते मृत्योर्यन्ति विततस्य पाशम् । अथ धीरा अमृतत्वं विदित्वा ध्रुवं अध्रुवेष्विह न प्रार्थयन्ते ॥ २ ॥ अल्पबुद्धि मनुष्य बाह्यविषयांच्या मागें जातात म्हणून ते सर्वगामी मृत्यूच्या पाशाप्रत जातात. परंतु बुद्धिमान् मनुष्य प्रत्यगात्मस्वरूप अमृतत्व हेंच शाश्वत आहे असें जाणून या लोकी अनित्य विषयाची इच्छा करीत नाहींत. २. येन रूपं रसं गन्धं शब्दान् स्पर्शांश्च मैथुनान् । एतेनैव विजानाति किमत्र परिशिष्यते । एतद्वै तत् ॥ ३ ॥ जें जाणल्याने विवेकी इतर कशाची इच्छा करीत नाहीत तें कसें प्राप्त होतें तें सांगतात- ज्याच्या योगाने रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श आणि मैथुन हे देहादिलक्षणी विषय जाणतां येतात तो हा देहाहून भिन्न आत्माच आहे. आत्म्याला अविज्ञेय असें या लोकी कोणतेंहि ज्ञान नाही. नचिकेता, तूं विचारलेला आत्मा तो हा. ३. स्वप्नान्तं जागरितान्तं चोभौ येनानुपश्यति । महान्तं विभुमात्मानं मत्वा धीरो न शोचति ॥ ४ ॥ स्वप्रामध्यें आणि जागृतीमध्ये जाणले जाणारे सर्व विषय ज्या आत्म्याच्या योगाने मनुष्य जाणतो तो आत्मा महान् व सर्वव्यापी परमात्मा आहे असें ज्ञान झाल्यावर बुद्धिमान मनुष्य शोक करीत नाहीं. ४ य इमं मध्वदं वेद आत्मानं जीवमन्तिकात् । ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते, एतद्वै तत् ॥ ५ ॥ कर्मफलाचा भोक्ता (मध्वदं) हा जीव आत्म्याहून भिन्न नाही आणि हाच भूतभविष्याचा स्वामी आहे असें ज्याला ज्ञान होतें तो मग स्वतःच्या संरक्षणाची इच्छा करीत नाही म्ह० निर्भय होतो. तूं विचारलेला आत्मा तो हा. ५. यः पूर्वं तपसो जातं अद्भ्यः पूर्वमजायत । गुहां प्रविश्य तिष्ठन्तं यो भूतेभिर्व्यपश्यत, एतद्वै तत् ॥ ६ ॥ जो तपाच्या अगोदर उत्पन्न झाला, उदक इत्यादि पंचमहाभूतांच्या अगोदर उत्पन्न झाला, प्राणिमात्राच्या हृदयाकाशामध्यें (गुहां) प्रवेश करून पांच भूतांसहवर्तमान रहात असलेला असा जो आत्मा कोणी (मुमुक्षु) पहातो तोच ब्रह्म होय. तूं विचारलेला आत्मा तो हा. ६. या प्राणेन संभवति अदितिर्देवतामयी । गुहां प्रविश्य तिष्ठन्तीं या भूतेभिर्व्यजायत, एतद्वै तत् ॥ ७ ॥ शब्दादि विषय भक्षण करणारी (अदिति) देवतारूपी जी ब्रह्माबरोबर उत्पन्न झाली, प्राणिमात्राच्या हदयाकाशामध्ये प्रवेश करून रहाणारी व जी भूतांबरोबर उत्पन्न झाली, अशी जी हिरण्यगर्भरूपी देवता ती देखील हेंच ब्रह्म होय. ७ अरण्योर्निहितो जातवेदा गर्भ इव सुभृतो गर्भिणीभिः । दिवे दिवे ईड्यो जागृवद्भिः हर्हविष्मद्भिः मनुष्येभिरग्निः, एतद्वै तत् ॥ ८ ॥ गर्भिणी स्त्रियांनी काळजीपूर्वक रक्षण केलेल्या गर्भाप्रमाणे, जागरूक असे ऋत्विज ज्याचें दररोज रक्षण व स्तवन करतात असा दोन अरणींमध्यें असणारा जो जातवेद अग्नि तो देखील हेंच ब्रह्म होय. ८. यतश्चोदेति सूर्योऽस्तं यत्र च गच्छति । तं देवाः सर्वेऽर्पितास्तदु नात्येति कश्चन, एतद्वै तत् ॥ ९ ॥ ज्यापासून सूर्य उदय पावतो व ज्यामध्ये अस्त पावतो त्यामध्ये सर्व देव - चक्राच्या मध्यभागी सर्व अरा बसविलेल्या असतात त्याप्रमाणे - बसविलेले आहेत. त्याच्या बाहेर कोणीहि जाऊं शकत नाहीं. हेंच तें ब्रह्म होय. ९ यदेवेह तदमुत्र यदमुत्र तदन्विह । मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति ॥ १० ॥ या लोकी जें ब्रह्म आहे तेंच परलोकीं आहे. जें परलोकी आहे तेंच या लोकी आहे. या लोकी ज्याला नानात्व दिसते तो (एका) मरणामागून (दुसरें) मरण पावतो. म्ह्० जन्ममरणरूपी फेऱ्यांत सांपडतो. १०. मनसैवेदमाप्तव्यं नेह नानाऽस्ति किंचन । मृत्योः स मृत्युं गच्छति य इह नानेव पश्यति ॥ ११ ॥ या लोकी अनेक असें कांहीं नाहीं; ज्याला अनेकाप्रमाणें भास होतो तो मरणामागून मरण याप्रमाणे भ्रमण पावतो; हे आत्मैकत्वज्ञान मनानेच जाणावयाचें आहे. ११. अङ्गुष्ठमात्रः पुरुषो मध्य आत्मनि तिष्ठति । ईशानं भूतभव्यस्य न ततो विजुगुप्सते, एतद्वै तत् ॥ १२ ॥ अंगुष्ठप्रमाण पुरुष भूत व भविष्य यांच्यावर स्वामित्व चालवीत शरीरामध्ये रहातो. हें जो जाणतो तो भयरहित होतो. हेंच तें ब्रह्म होय. १२. अङ्गुष्ठमात्रः पुरुषो ज्योतिरिवाधूमकः । ईशानो भूतभव्यस्य स एवाद्य स उ श्वः, एतद्वै तत् ॥ १३ ॥ हा अंगुष्ठमात्र पुरुष प्रकाशस्वरूप आहे; धूमरहित आहे; भूत व भविष्य यांचा स्वामी आहे. हा आज आहे व उद्याहि आहे म्ह० नित्य आहे. हेंच ते ब्रह्म होय. १३. यथोदकं दुर्गे वृष्टं पर्वतेषु विधावति । एवं धर्मान् पृथक् पश्यन् तानेवानुविधावति ॥ १४ ॥ ज्याप्रमाणें उदक दुर्गम पर्वतांमध्ये पडलें असतां पसरून नाहीस होतें, त्याप्रमाणें प्रत्येक शरीराचे ठिकाणी आत्म्याला पृथक् धर्म आहेत असें मानणारा मनुष्य त्या पृथक् धर्मामध्येच नाहीसा होतो म्ह पुनः पुनः पृथक शरीरे धारण करतो. १४. यथोदकं शुद्धे शुद्धं आसिक्तं तादृगेव भवति । एवं मुनेर्विजानत आत्मा भवति गौतम ॥ १५॥ परंतु हे गौतमकुलोत्पन्ना, ज्याप्रमाणें शुद्ध उदक शुद्ध उदकामध्ये टाकले असतां तें तसेंच शुद्ध होतें, त्याप्रमाणें आत्म्याच्या एकत्त्वाचे ज्ञान झालेल्या मुनीचा आत्मा स्वस्वरूपच होतो. १५. इति काठकोपनिषदि द्वितीयाध्याये प्रथमा वल्ली ॥ इति काठकोपनिषदि द्वितीयाध्याये प्रथमा वल्ली ॥ द्वितीयोऽध्यायः - पञ्चमी वल्ली पुरमेकादशद्वारं अजस्यावक्रचेतसः । अनुष्ठाय न शोचति विमुक्तश्च विमुच्यते, एतद्वै तत् ॥ १ ॥ अकरा द्वारे असलेल्या शरीररूपी नगराचा अज (जन्मरहित) व अवक्रचेतस् (ज्याचें ज्ञान एकरूप आहे) आत्मा हा राजा आहे. या नगरात राहिला म्हणून याला शोक होत नाहीं; आणि हें त्याने सोडले तरी हा तर मुक्तच. हेंच त ब्रह्म होय. १. हंसः शुचिषद् वसुरन्तरिक्षसद् होता वेदिषद् अतिथिर्दुरोणसत् । नृषद् वरसद् ऋतसद् व्योमसद् अब्जा गोजा ऋतजा अद्रिजा ऋतं बृहत् ॥ २ ॥ हा आत्मा एकाच शरीरामध्ये रहाणारा नसून सर्व शरीरांमध्ये रहाणारा आहे असें सांगतात- हा आदित्यरुपानें [हंसः] आकाशामध्यें स्थित आहे, वायुरूपानें अंतरिक्षामध्यें स्थित आहे, अग्निरूपाने [होता] वेदीचे ठिकाणी स्थित आहे, अतिथिरूपानें गूहांमध्ये स्थित आहे अथवा सोमरूपानें कलशामध्ये स्थित आहे, मनुष्यांमध्ये, देवांमध्ये, यज्ञामध्यें (अथवा सत्यामध्ये) व आकाशामध्यें स्थित आहे. व उदकामध्ये (शंख मकर इत्यादि रूपाने) उत्पन्न होतो, पृथ्वीमध्ये धान्यादिरूपानी उत्पन्न होतो, यज्ञामध्ये यज्ञफलादिरूपानें उत्पन्न होतो, पर्वतांमध्यें नदी आदि रूपाने उत्पन्न होतो; हाच महान् सत्य होय. २ ऊर्ध्वं प्राणमुन्नयति अपानं प्रत्यगस्यति । मध्ये वामनमासीनं विश्वे देवा उपासते ॥ ३ ॥ जो हृदयापासून प्राणवायु वर नेतो आणि अपानवायु खालीं सोडतो त्या मध्यभागी हदयकमली स्थित व भक्ति करण्यास योग्य [वामनं] अशा आत्म्याची सर्व इंद्रिये उपासना करतात म्ह० त्याच्या आशेनें आपआपले व्यापार करतात. ३. अस्य विस्रंसमानस्य शरीरस्थस्य देहिनः । देहाद्विमुच्यमानस्य किमत्र परिशिष्यते, एतद्वै तत् ॥ ४ ॥ शरीरामध्यें रहाणारा हा आत्मा सुटला असतां म्हणजे देहामधून निघून गेला असतां देहामध्ये काय शिलक रहाते ? कांही नाही. अर्थात आत्मा शरीराहून भिन्न आहे. हेंच तें ब्रह्म होय. ४ न प्राणेन नापानेन मर्त्यो जीवति कश्चन । इतरेण तु जीवन्ति यस्मिन्नेतावुपाश्रितौ ॥ ५ ॥ केवळ प्राणवायूनें अथवा अपानवायूनें कोणीहि मनुष्य जिवंत राहू शकत नाही. हे वायु ज्याच्या आश्रयाने रहातात अशा त्याहून निराळा जो आत्मा त्याच्याच योगाने मनुष्य जिवंत राहू शकतात. ५ हन्त त इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनम् । यथा च मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम ॥ ६ ॥ हे गौतमकुलोत्पन्ना, आतां मी तुला गुह्य व सनातन असें ब्रह्म सांगतो; आणि देहाला मरण प्राप्त झालें असतां आत्म्याचे काय होतें हें सांगतो. ६ योनिमन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः । स्थाणुमन्येऽनुसंयन्ति यथाकर्म यथाश्रुतम् ॥ ७ ॥ (आत्मज्ञान न झालेले) कोणी मनुष्य पुन्हा शरीर धारण करण्यासाठी जननेंद्रियामध्यें प्रवेश करतात. दुसरे कोणी अत्यंत अधम मनुष्य वृक्षादि स्थावरभाव पावतात. सारांश, जसे कर्म केलें असेल आणि असें ज्ञान मिळविले असेल त्या मानानें सर्वांना अवस्था प्राप्त होते. ७ य एष सुप्तेषु जागर्ति कामं कामं पुरुषो निर्मिमाणः । तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते । तस्मिंल्लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन, एतद्वै तत् ॥ ८ ॥ हे प्राणादि वायु निद्रित असतांना, आपल्या इच्छेप्रमाणे अर्थ निर्माण करीत जो पुरुष जाज असतो तोच शुद्ध (शुक्रं) ब्रह्म होय, तेंच शाश्वत आहे असें सर्व शात्रांमध्ये सांगितलें आहे. पृथिव्यादि सर्व लोक त्याच्या आश्रयानं राहिले आहेत. त्याच्या बाहेर कोणीहि जाऊं शकत नाही. हेंच तें ब्रह्म होय. ८. अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बभूव । एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च ॥ ९ ॥ ज्याप्रमाणें एकच अग्नि या लोकामध्ये प्रविष्ट होत्साता प्रत्येक दाह्य वस्तूसंबंधानें निरनिराळे रूप धारण करतो, त्याप्रमाणें सर्व भूतांचा अंतरात्मा आकाशाप्रमाणे बाहेर (बहिः) एकच असून प्रत्येकाचे ठिकाणी निरनिराळे रूप धारण करतो. ९. वायुर्यथैको भुवनं प्रविष्टो रूपं रूपं प्रतिरूपो बभूव । एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा रूपं रूपं प्रतिरूपो बहिश्च ॥ १० ॥ ज्याप्रमाणें एकच वायु या लोकामध्ये प्रविष्ट होत्साता प्रत्येक वस्तूसबंधाने निरनिराळे रूप धारण करतो, त्याप्रमाणें सर्व भूतांचा अंतरात्मा आकाशाप्रमाणें बाहेर एकच असून प्रत्येकाचे ठिकाणी निरनिराळे रूप धारण करतो. १०. सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षुः न लिप्यते चाक्षुषैर्बाह्यदोषैः । एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्यः ॥ ११ ॥ सर्व वस्तु प्रकाशित करण्याला कारण म्हणून सर्व लोकांचा चक्षु असा जो सूर्य तो ज्याप्रमाणें अशुद्ध पदार्थांच्या दर्शनरूपी बाह्य दोषांनी लिप्त होत नाही, त्याप्रमाणें दुखःरूपी अध्यासाहून भिन्न (बाह्यः) असा सर्व भूतांच्या अंतर्यामी एकच असणारा आत्मा लोकांच्या जन्ममरणादिं दुःखांनी लिप्त होत नाही. ११. एको वशी सर्वभूतान्तरात्मा एकं रूपं बहुधा यः करोति । तमात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीराः तेषां सुखं शाश्वतं नेतरेषाम् ॥ १२ ॥ एक, ज्याच्यासारखा अथवा ज्याच्याहून अधिक दुसरा कोणी नाही, सर्व जगताचा स्वामी, सर्व भूतांचा अंतरात्मा आणि एकच स्वरूप जो अनेक प्रकारांनी दाखवितो अशा त्या परमेश्वरागेला आपल्या शरीरामध्यें स्थित असलेला, जे ज्ञानी मनुष्य साक्षात् पहातात त्यांनाच शाश्वत सुख प्राप्त होतें, इतरांना नाहीं. १२. नित्यो नित्यानां चेतनश्चेतनानाम् एको बहूनां यो विदधाति कामान् । तमात्मस्थं येऽनुपश्यन्ति धीराः तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम् ॥ १३ ॥ सर्व अनित्य वस्तूंमध्ये जो नित्य आहे, जगताला चेतना देणाऱ्यांना जो चेतना देणारा आहे, स्वतः एक असून जो अनेकांना कर्माची फले (कामान्) देतो त्याला स्वत: च्या ठिकाणीं स्थित असा जे ज्ञानी पहातात त्यांनाच शाश्वत शान्ति प्राप्त होते, इतरांना नाही. १३. तदेतदिति मन्यन्तेऽनिर्देश्यं परमं सुखम् । कथं नु तद्विजानीयां किमु भाति विभाति वा ॥ १४ ॥ नचिकेता म्हणाला तें आत्मज्ञानरूपी असाधारण मुख अनिर्देश्य अमुक प्रकारचे आहे असें सांगण्यास अशक्य असतांही ज्ञाते 'ते असें आहे' या प्रकारे प्रत्यक्ष अनुभवतात, त्या आत्मज्ञानरूपी सुखाचे मला कस बरें ज्ञान होईल ? तें स्वतःच प्रकाशित होतें काय ? अथवा आमच्या बुद्धीला तें स्पष्ट समजत काय ? १४. न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकं नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः । तमेव भान्तं अनुभाति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति ॥ १५ ॥ यम म्हणाला, त्या ब्रह्माला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र अथवा तारका प्रकाशित करूं शकत नाहींत. मग हा अग्नि तरी कसा प्रकाशित करणार ? तर तें ब्रह्म स्वत : प्रकाशरूपी आहे सम्हणून त्याच्याच प्रकाशाच्या आधाराने हें सर्व सूर्य चंद्र आदि प्रकाश पावतात. त्याच्याच तेजाने हे सर्व स्पष्ट प्रकाश पावते १५. इति काठकोपनिषदि द्वितीयोऽध्याये पञ्चमी वल्ली ॥ इति काठकोपनिषदि द्वितीयोऽध्याये पञ्चमी वल्ली ॥ द्वितीयोध्यायः - षष्ठी वल्ली ऊर्ध्वमूलोऽवाक् शाख एषोऽश्वत्थः सनातनः । तदेव शुक्रं तद्ब्रह्म तदेवामृतमुच्यते । तस्मिंल्लोकाः श्रिताः सर्वे तदु नात्येति कश्चन, एतद्वै तत् ॥ १ ॥ या संसाररूपी सनातन अश्वस्थवृक्षाचें मूळ वर ब्रह्माचे ठिकाणी आहे आणि स्वर्ग, नरक, तिर्यक् इत्यादि शाखा खालीं आहेत. या वृक्षाचे जें मूळ तेंच शुद्ध ब्रह्म होय. तेंच अविनाशी आहे असे ज्ञाते सांगतात. स्वर्ग, गंधर्व इत्यादि सर्व लोक त्याच्याच आश्रयाने आहेत. त्याहून वरचढ असें काही नाही. हेंच तें ब्रह्म होय. १. यदिदं किं च जगत् सर्वं प्राण एजति निःसृतम् । महद्भयं वज्रमुद्यतं य एतद्विदुरमृतास्ते भवन्ति ॥ २ ॥ ब्रह्म हें एक मोठे भय व आपल्यावर उगारलेले जणू काय वज्रच असें समजून हें सर्व सृष्ट जग ब्रह्माच्या ठिकाणी कंप पावते. हें ब्रह्म जे जाणतात ते जन्म व मृत्यु यांनीं रहित होतात. २. भयादस्याग्निस्तपति भयात्तपति सूर्यः । भयाद् इन्द्रश्च वायुश्च मृत्युर्धावति पञ्चमः ॥ ३ ॥ याच्या भयाने अग्नि तपन पावतो, याच्या भयाने सूर्य तपन पावतो; याच्या भयाने इंद्र व वायु आपआपली कामे करतात; तसाच पांचवा मृत्यु देखील याच्याच भयाने आपल्या उद्योगास प्रवृत्त होतो. ३ इह चेत् अशकद् बोद्धुं प्राक् शरीरस्य विस्रसः । ततः सर्गेषु लोकेषु शरीरत्वाय कल्पते ॥ ४ ॥ या लोकी शरीराचा नाश होण्यापूर्वी मनुष्य जर ब्रह्म जाणूं शकेल तर तो जन्ममृत्युरहित होतो नाहीतर पृथिव्यादि सृष्ट लोकांमध्यें पुन्हा शरीरत्वाप्रत पावतो. ४ यथाऽऽदर्शे तथाऽऽत्मनि यथा स्वप्ने तथा पितृलोके । यथाऽप्सु परीव ददृशे तथा गन्धर्वलोके च्छायातपयोरिव ब्रह्मलोके ॥ ५ ॥ ज्याप्रमाणें आरशामध्यें आपलें स्पष्ट दर्शन होतें त्याप्रमाणें आरशाप्रमाणें निर्मल झालेल्या स्वतःच्या बुद्धीमध्यें आत्म्याचे स्पष्ट दर्शन होते. ज्याप्रमाणे स्वप्नांत जागृतीच्या वासनांचे योगाने आपले अस्पष्ट दर्शन होतें त्याप्रमाणें कर्मफलभोगाच्या आसक्तीमुळे पितृलोकामध्ये आत्म्याचे अस्पष्ट दर्शन होतें. ज्याप्रमाणें उदकामध्ये आपले स्वरूप भ्रमण करणारे दिसते (परिदृष्यते इव) त्याप्रमाणें गंधर्वलोकामध्येंत्स्म्याचे दर्शन अस्पष्टच होतें. फक्त ब्रह्मलोकीं आत्म्याचे दर्शन छाया आणि प्रकाश यांच्याप्रमाणे स्पष्ट होतें. ५ इन्द्रियाणां पृथग्भावं उदयास्तमयौ च यत् । पृथग् उत्पद्यमानानां मत्वा धीरो न शोचति ॥ ६ ॥ आकाशादि आपापल्या कारणांपासून वेगळीं उत्पन्न झालेलीं इंद्रिये स्वयंभू आत्म्याहून निराळी आहेत आणि त्यांची उत्पत्ति व विनाश होतो अर्थात तीं आत्मा नव्हेत. हे जाणून बुद्धिमान् मनुष्य शोक करीत नाहीं. ६ इन्द्रियेभ्यः परं मनो मनसः सत्त्वमुत्तमम् । सत्त्वादधि महानात्मा महतोऽव्यक्तमुत्तमम् ॥ ७ ॥ इंद्रिये व त्यांचे अर्थ यांहून मन श्रेष्ठ आहे, मनाहून बुद्धि (सत्त्व) श्रेष्ठ आहे, सत्त्वाहून महान् आत्मा [जगतांत प्रथम उत्पन्न झालेलें तत्त्व] श्रेष्ठ आहे आणि त्या महताहून सर्व जगताचे बीजरूप जें अव्यक्त तें श्रेष्ठ आहे. ७ अव्यक्तात्तु परः पुरुषो व्यापकोऽलिङ्ग एव च । यं ज्ञात्वा मुच्यते जन्तुः अमृतत्वं च गच्छति ॥ ८ ॥ अव्यक्ताहून सर्वाचा व्यापक आणि अगम्य [अलिंग=कोणत्याही साधनाने जाणता येत नाहीं असा] असा पुरुष श्रेष्ठ आहे. त्याचें ज्ञान झालें असतां प्राणी जिवंतपणीच अविद्यादिकांपासून मुक्त होतो आणि शरीरत्यागानंतर अमृतत्वाप्रत जातो. म्ह० जन्ममरणापासून मुक्त होतो ८. न संदृशे तिष्ठति रूपमस्य न चक्षुषा पश्यति कश्चनैनम् । हृदा मनीषा मनसाऽभिक्लृप्तो य एतद्विदुरमृतास्ते भवन्ति ॥ ९ ॥ याचे रूप दृष्टीच्या विषयामधलें नाहीं, डोळ्यांनीं याला कोणी पाहूं शकत नाहीं अथवा इतर इंद्रियांनी जाणूं शकत नाहीं. मनाचे नियमन करणाऱ्या (हृदयस्थ) बुद्धीने (हृदा), मननाचे योगाने (मनसा) प्रकाशित झाल्यावर (अभिकॢप्त) हा आत्मा जाणत येतो. याप्रमाणे ज्यांना याचे ज्ञान होतें ते मृत्युरहित होतात. ९. यदा पञ्चावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह । बुद्धिश्च न विचेष्टते तामाहुः परमां गतिम् ॥ १० ॥ आपापल्या विषयांपासून निवृत्त होऊन जेव्हां मनासहित पांच ज्ञानेंद्रिये कुंठित होतात आणि बुद्धि गप्प बसते, तेव्हां त्या स्थितीला अत्यंत श्रेष्ठ गति असें म्हणतात. १०. तां योगमिति मन्यन्ते स्थिरामिन्द्रियधारणाम् । अप्रमत्तस्तदा भवति योगो हि प्रभवाप्ययौ ॥ ११ ॥ या स्थितीमध्ये इंद्रियांचा व इंद्रियव्यापारांचा जरी वियोग होतो तरी तिला योग असें म्हणतात. यानंतर जेव्हां इंद्रियांची स्थिर धारणा होईल तेव्हां मुमुक्षु प्रमादरहित होतो. नुसत्या निवृत्तीनें नाहीं. कारण नुसता योग उपाय व अपाय दोन्ही करणारा आहे. ११. नैव वाचा न मनसा प्राप्तुं शक्यो न चक्षुषा । अस्तीति ब्रुवतोऽन्यत्र कथं तदुपलभ्यते ॥ १२ ॥ ब्रह्म जर बुद्धीचा विषय असेल तर 'तें ब्रह्म असें' अशा प्रकारे तें बुद्धीला ग्रहण करतां येईल. पण बुद्धि आपल्या व्यापारापासून निवृत्त झाली म्हणजे 'ब्रह्म नाहीं' असें म्हणण्याचा प्रसंग प्राप्त होईल. अशा प्रसंगाचे निरसन करण्याकरितां सांगतात- केवळ वाणींनें, बुद्धीनें अथवा चक्षु आदि इंद्रियांनी याची प्राप्ति होणे शक्य नाहीं. इंद्रियांची स्थिर धारणा होईल तेव्हांच होईल. तथापि जगताला मूल कारण हेंच ब्रह्म असल्यामुळे ब्रह्माला अस्तित्व आहे, कारण कार्य दिसत आहे. म्हणून जगताला मूल कारण असें ब्रह्म 'आहे' असेच म्हटले पाहिजे. 'ब्रह्म आहे' असें म्हणणाऱ्याहून इतर (अस्तीति ब्रुवतः अन्यत्र) नास्तिक मनुष्याला ब्रह्म कसें समजणार ? अर्थात् समजणारच नाहीं. १२. अस्तीति एवोपलब्धव्यः तत्त्वभावेन चोभयोः । अस्तीत्येवोपलब्धस्य तत्त्वभावः प्रसीदति ॥ १३ ॥ म्हणून नास्तित्ववादी पक्ष सोडून जगद्रूपी कार्य आणि कारण ब्रह्म ही भिन्न नाहींत अशा दोघांच्या तत्त्वभावानें 'ब्रह्म आहे' हाच पक्ष मान्य केला पाहिजे. 'आहे' या प्रकारे मान्य केल्यावर सर्व उपाधिविरहित असा तत्त्वभाव प्रकट होतो. १३. यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य हृदि श्रिताः । अथ मर्त्योऽमृतो भवति अत्र ब्रह्म समश्नुते ॥ १४ ॥ ज्ञान होण्यापूर्वी मनुष्याच्या बुद्धीला ज्या ज्या इच्छा होत्या त्या सर्व जेव्हां नाश पावतात तेव्हां तो मृत्युरहित होतो; व याच देही ब्रह्मरूप पावतो. १४. यथा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयस्येह ग्रन्थयः । अथ मर्त्योऽमृतो भवति एतावद् हि अनुशासनम् ॥ १५ ॥ या देही जेव्हां बुद्धीची सर्व बंधने तुटतात तेव्हां मनुष्य मृत्युरहित होतो. हाच सर्व वेदांतवाक्याचा उपदेश आहे, याहून अधिक उपदेश कांहीं नाहीं. १५. शतं चैका च हृदयस्य नाड्यः तासां मूर्धानमभिनिःसृतैका । तयोर्ध्वमायन् अमृतत्वमेति विष्वङ् अन्या उत्क्रमणे भवन्ति ॥ १६ ॥ हृदयापासून निघणाऱ्या एकशेएक नाड्या आहेत, त्यांमध्यें मस्तकाला भेदून जाणारी एक (सुषुम्ना नामक) नाडी आहे. तिच्या द्वारे वर जाणारा (=प्राण सोडणारा) मृत्युरहितत्वाप्रत जातो, बाकीच्या नानाविध गति असणाऱ्या (विष्वङ्) नाडी पुन्हा संसारप्राप्ति आणतात. १६. अङ्गुष्ठमात्रः पुरुषोऽन्तरात्मा सदा जनानां हृदये संनिविष्टः । तं स्वाच्छरीरात् प्रवृहेन्मुञ्जादिवेषीकां धैर्येण । तं विद्याच्छुक्रममृतं तं विद्याच्छुक्रममृतमिति ॥ १७ ॥ अंगुष्ठप्रमाण अंतरात्मा पुरुष मनुष्यांच्या हृदयामध्ये नेहमीं स्थित आहे. त्याला धैर्याने आपल्या शरीरापासून पृथक् करावा. मुंज नामक तृणामधून त्यांतील काडी जशी वेगळी काढतात तद्वत्. तोच अंतरात्मा शुद्ध ब्रह्म असे जाणावे. १७. मृत्युप्रोक्तां नचिकेतोऽथ लब्ध्वा विद्यामेतां योगविधिं च कृत्स्नम् । ब्रह्मप्राप्तो विरजोऽभूद्विमृत्युः अन्योऽप्येवं यो विदध्यात्ममेव ॥ १८ ॥ याप्रमाणे यमाने सांगितले हें आत्मज्ञान आणि आत्मप्राप्तीचा संपूर्ण योगविधि नचिकेतानें प्राप्त करून घेतल्यावर त्याला ब्रह्मप्राति झाली, तो मुक्त झाला, तो धर्म व अधर्म यांविरहित झाला व मृत्युरहित झाला. याप्रकारे इतरही जो कोणी आत्मज्ञानी होईल तोही आत्मरूप, धर्माधर्मरहित व मृत्युरहित होईल. १८ इति काठकोपनिषदि द्वितीयोऽध्याये षष्ठी वल्ली ॥ इति काठकोपनिषदि द्वितीयोऽध्याये षष्ठी वल्ली ॥
इति काठकोपनिषदि द्वितीयाध्याये तृतीया वल्ली ॥ |