॥ जाबालोपनिषत् ॥



जाबालोपनिषत्ख्यातं संज्ञासज्ञानगोचरम् ।
वस्तुतस्त्रैपदं ब्रह्म स्वमातमवशिष्यते ॥

ॐ भद्रं कर्णेभिरिति शान्तिः ॥



संन्यासधर्म उलगडून सांगणारे उपनिषद्. हे गद्यात्मक आहे. हे उपनिषद् अथर्ववेदाशी संबद्ध आहे. याचे सहा खंड आहेत. बृहस्पतीने याज्ञवल्क्याला विचारले, 'प्राणांचे स्थान कोणते ? इंद्रियांचे देवयजन म्हणजे काय ? समस्त भूतांचे ब्रह्मसदन काय आहे ?' याज्ञवल्क्य म्हणाला, 'अविमुक्त हेच प्राणांचे क्षेत्र, तेच इंद्रियांचे देवयजन स्वरूप आणि समस्त प्राण्यांचे ब्रह्मसदन आहे. जेव्हा प्राण्याचे प्राणोत्क्रमण होते, तेव्हा रुद्रदेवता त्याला तारक ब्रह्माचे स्वरूप समजावते आणि तो मुक्त होतो.' असे पहिल्या खंडात सांगितले आहे. दुसर्‍या खंडात याज्ञवल्क्याने अत्री ऋषीला सांगितले की, अनंत, अव्यक्त आत्म्याचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी अविमुक्ताची उपासना केली पाहिजे. याचे स्थान नाकाचे मूळ व भुवया यांचा जिथे संगम होतो तिथे आहे. (वरण आणि नासीचा मध्य) या ठिकाणी लक्ष केंद्रित करून ब्रह्मज्ञ पुरुष ध्यान करतात असे या खंडात सांगितले आहे. तिसर्‍या खंडामध्ये याज्ञवल्क्य सांगतो की, शतरुद्र मंत्राचा जप केल्याने अमृततत्त्वाची प्राप्ती होते. चौथ्या खंडात याज्ञवल्क्याने जनकाला संन्यासधर्माची महती सांगितली आहे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या तीनही आश्रमांचे पालन करून नंतर संन्यास घ्यावा. परंतु कुठल्याही अवस्थेत मनात जर खरेखुरे वैराग्य जागले तर तेव्हा लगेच संन्यास ग्रहण केला तरी चालतो. पाचव्या खंडात यज्ञोपवीत धारणाचे महत्त्व वर्णिले असून संन्याशाच्या बाबतीत आत्मा हेच यज्ञोपवीत असल्याचे सांगितले आहे. या श्रेष्ठ उपनिषदात ज्ञान व संन्यास यांचे महत्त्व सांगितले आहे. सहाव्या खंडात परमहंसाच्या जीवनक्रमाचे सविस्तर वर्णन केले आहे. सम्वर्तक, आरुणि, श्वेतकेतू, दुर्वास, जडभरत दत्तात्रेय हे परमहंस संन्यासी आहेत. हे उन्मनी अवस्थेत असतात आणि यांच्या दैनंदिन आचारांची काहीच माहिती नसते. सर्व गोष्टींचा त्याग करून (दण्ड, कमंडलू सुद्धा) ते केवळ आत्म्याच्या अनुसंधानात मग्न असतात. हे संन्यासी पूर्णपणे बंधनमुक्त असतात असे सांगितले आहे. या श्रेष्ठ उपनिषदात ज्ञान व संन्यास यांचे महत्त्व सांगितले आहे.



उपनिषद प्रारंभ


प्रथमः खण्डः



ॐ बृहस्पतिरुवाच याज्ञवल्क्यं यदनु कुरुक्षेत्रं देवानां देवयजनं सर्वेषां भूतानां ब्रह्मसदनम् । अविमुक्तं वै कुरुक्षेत्रं देवानां देवयजनं सर्वेषां भूतानां ब्रह्मसदनम् । तस्माद्यत्र क्वचन गच्छति तदेव मन्येत तदविमुक्तमेव । इदं वै कुरुक्षेत्रं देवानां देवयजनं सर्वेषां भूतानां ब्रह्मसदनम् । अत्र हि जन्तोः प्राणेषूत्क्रममाणेषु रुद्रस्तारकं ब्रह्म व्याचष्टे येनासौ अमृती भूत्वा मोक्षी भवति । तस्मादविमुक्तमेव निषेवेत अविमुक्तं न विमुञ्चेद् एवमेवैतद् याज्ञवल्क्यः ॥ १ ॥



अन्वयार्थ-[बृहस्पतिः याज्ञवल्क्यं उवाच-] देवेंद्राचा गुरु बृहस्पति याज्ञवल्क्यास म्हणाला- [यद् अनु कुरुक्षेत्र-] जें दुसर्‍या सर्वांहूनहि अधिक प्रसिद्ध असे पुण्यकर्मफलभूत कुरुक्षेत्र-कुरु म्ह ० पापकर्म, त्याच्या नाशाला कारण होणारे क्षेत्र ( क्षेपणात् क्षेत्रं) किंवा कु म्ह० पृथ्वी, तिच्यामध्ये 'रौति'- जो प्राण शब्द करतो त्याचे निवासस्थान म्हणून कुरुक्षेत्र [देवानां देवयजनं] इंद्रियांच्या स्वयंप्रकाश आत्म्याच्या पूजेचे अधिकरण. कारण या शरीररूप कुरुक्षेत्रांतच इंद्रिये विविध विषयरूप उपहारांनीं परमात्म्याची पूजा करतात. [सर्वेषां भूतानां ब्रह्मसदनं- इंद्रियांच्या अघिष्टातृ-भूतांचें किंवा प्रसिद्ध भूतांचें ब्रह्मसदन-सर्वपरिछेदशून्य ब्रह्माचे निवासस्थान (हें रूपक आहे. जसे प्रसिद्ध बाह्य कुरुक्षेत्र देवांच्या हबिर्भागप्राप्तीचें कारण, यज्ञाचे स्थान व सर्व भूतांच्या हष्टादृष्टप्राप्तीचें कारण आहे तसे आंतर कुरुक्षेत्र कोणते ? यावर याज्ञवल्क्याचें उत्तर-) [अविमुक्तं वै-] अविद्या-क्राम-क्रोधादिकांपासून विशेषतः मुक्त, असा चिदानंदरस आत्मा आहे, पण तोच अविद्यावस्थेंत अविमुक्त होतो. तत्स्वरूप अविमुक्त प्रसिद्ध आहे. म्ह० विविध धर्मांना स्वतःमध्ये मानणारे सोपाधिक ईश्वराचे रूपच अविमुक्त, असा याचा भावार्थ. [कुरुक्षेत्र देवानां देवयजनं०-] तेच कुरुक्षेत्र, देवांचे देवयजन, सर्व भूतांच्या ब्रह्माचें सदन आहे आणि ज्याअर्थी असे आहे [तस्मात् यत्र क्वचन गच्छति-] त्याअर्थी ज्या कोठेहि गंगा-प्रयागादि स्थानीं किंवा त्याहून भिन्नस्थानी मनुष्य गमन करील [तत् एव अविमुक्तं मन्येत-] तेच अविमुक्त आहे, असें त्यानें समजावे. [इति इदं वै कुरुक्षेत्रं देवानां०-) याप्रमाणें मला पाप्त झालेले हे स्थान अविमुक्तच आहे. इतकेंच नव्हे तर ते कुरुक्षेत्र देवांचे देवयजन व सर्व भूतांचें ब्रह्मसदन आहे. [अत्र हि जंतोः प्राणेषु उत्क्रममाणेषु रुद्रः तारकं ब्रह्म व्याचष्टे-] या कुरुक्षेत्रादिरूप कोणत्याहि अविमुक्त स्थानीं प्राण्याचे प्राण शरीर सोडून जाऊं लागले असतां दुःखनाशक रुद्र-सदाशिव किंवा वामन तारक ब्रह्माचा उपदेश करतो. संसारसमुद्रांतून तरून जाण्याचे साधन असे जें सत्यज्ञानादि लक्षण ब्रह्म तेच तारक ब्रह्म होय. [येन असौ अमृती भूत्वा मोक्षी भवति-] ज्या 'अहं ब्रह्मास्मि' या तारक ब्रह्मोपदेशाने हा जीव अमृत होऊन मुक्त होतो. अविद्यादशेत 'मी कर्ता भोक्ता आहे' इत्यादि अभिमानानें अमृती होऊन अविद्यादशेमध्यें बद्ध झालेला तो ब्रह्मज्ञानानें अविद्येची निवृत्ति झाल्यामुळे लागलाच मुक्त होतो. आपल्या स्वयंज्योतिःस्वरूप आनंदरूपानें अवस्थित होतो आणि ज्याअर्थी असे आहे [तस्मात् अविमुक्तं एव निशेवेत-] त्याअर्थी ब्रह्मज्ञानाचा उदय होण्यापूर्वी सोपाधिक अविमुक्ताचेंच निरंतर ध्यान करावे [अविमुक्तं न विमुंचेत्-] ब्रह्मज्ञान उत्पन्न होईपर्यंत आपले उपास्य असा जो सोपाधिक ईश्वर त्याला केव्हांहि सोडूं नये. बृहस्पति म्हणतो- [एवं एव-] होय, ते सोपाधिक रूपच अविमुक्त कुरुक्षेत्र उपास्य आहे. त्याचेंच यावज्जीव उपासन करावे ( श्रुति म्हणते-) [एतद् याज्ञवल्क्यः-] याज्ञवल्क्य बृहस्पतीला हें असे अविमुक्त कुरुक्षेत्र सांगता झाला ( १)



द्वितीयः खण्डः



अथ हैनमत्रिः पप्रच्छ याज्ञवल्क्यं य एषोऽनन्तोऽव्यक्त आत्मा तं कथमहं विजानीयामिति । स होवाच याज्ञवल्क्यः सोऽविमुक्त उपास्यो य एषोऽनन्तोऽव्यक्त आत्मा सोऽविमुक्ते प्रतिष्ठित इति ॥ १ ॥ सोऽविमुक्तः कस्मिन् प्रतिष्ठित इति । वरणायां नास्यां च मध्ये प्रतिष्ठित इति । का वै वरणा का च नासीति । सर्वानिन्द्रियकृतान्दोषान्वारयतीति तेन वरणा भतीवति । सर्वानिन्द्रियकृतान्पापान् नाशयतीति तेन नासी भवतीति । कतमं चास्य स्थानं भवतीति । भ्रुवोर्घ्राणस्य च यः सन्धिः स एष द्यौर्लोकस्य परस्य च सन्धिर्भवतीति । एतद्वै सन्धिं सन्ध्यां ब्रह्मविद उपासत इति । सोऽविमुक्त उपास्य इति । सोऽविमुक्तं ज्ञानमाचष्टे । यो वैतदेवं वेदेति ॥ २ ॥



अन्वयार्थ- [अथ ह अत्रिः एनं याज्ञवल्क्यं पप्रच्छ-] त्यानंतर ब्रह्मपुत्र अत्रि या याज्ञवल्क्याला विचारूं लागला- (यः एषः अनन्तः अव्यक्तः आत्मा-] जो हा तारक ब्रह्म म्हणून सांगितलेला देशादिपरिरछेदशून्य, अव्यक्त-अमूर्त आत्मा- ' अहं-मी' या प्रत्ययाचा लक्ष्य अर्थ [तं अहं कथं विजानीयां इति-] त्याला मी कोणत्या प्रकारानें जाणूं शकेन, असा त्यानें प्रश्न केला. [सः हः याज्ञवल्क्यः उवाच-] तो याज्ञवल्क्य त्याला म्हणाला- [सः अविमुक्तः उपास्यः-] कुरुक्षेत्रादिरूपानें सांगितलेला जो अविमुक्त सोपाधिक आत्मा तो निर्गुण आत्मज्ञानासाठीं उपास्य-उपासना करण्यास व साक्षात् जाणण्यास योग्य आहे. कारण [यः एषः अनन्तः अव्यक्तः आत्मा-] जो हा अपीरछिन्न, अव्यक्त आत्मा [ सः अविमुके प्रतिष्ठितः इति-] तो-तूं विचारलेला निर्गुण आत्मा या सोपाधिक अविमुक्तामध्ये विविधशक्तियुक्त होऊन प्रतिष्ठित आहे. म्हणून ईश्वरामध्ये हाच साक्षात जाणण्यास योग्य आहे. ( पण तो सोपाधिक आत्माहि दुर्विज्ञेय असल्यामुळे अत्रि त्याच्या उपलब्धीचें स्थान विचारतो) [ सः अविमुक्तः कस्मिन् प्रतिष्ठितः इति-] निर्गुणस्वरूपाचा जणुंकाय आधारच असा तो सोपाधिक ईश्वर या देहाच्या कोणत्या अवयवामध्यें-उपलब्धिस्थानामध्यें प्रतिष्ठित-सर्वदा संनिहित आहे, असा अत्रीनें प्रश्न केला. याज्ञवल्क्य म्हणतात- [वरणायां नास्यां च मध्ये प्रतिष्ठितः इति- ] वरणा व नासिका यांच्या मध्यभागी म्ह० दोन भुवयांच्यामध्ये तो प्रतिष्ठित आहे. येथील व यापुढीलहि 'इति-'शब्द प्रश्र व उत्तरे यांच्या समाप्तीसाठीं आहेत, असे समजावे. अत्रि- [का वै वरणा का च नासी इति-] वरणा कोणती व नासी कोणती ? याज्ञवल्क्य- [ सर्वान् इंद्रियकृतान् दोषान् वारयति इति तेन वरणा भवति- ] इंद्रियांमुळे होणार्‍या सर्व दोषांचे निवारण करते म्हणून त्यामुळे ती वरणा होते [ सर्वान् इंद्रियकृतान् पापान् नाशयति इति तेन नासी भवति इति-) इंद्रियकृत सर्व पापांचा नाश करिते, त्यामुळे नासी होते. तो वरणा व नासा यांच्यामध्ये प्रतिष्ठित आहे, यावरून नासापुटांच्या मध्ये अवस्थित आहे, असें सामान्यतः प्रतीत होते. तथापि चार अंगुळें लांब असलेल्या नासिकेच्या कोणत्या विशेषस्थानीं तो रहातो. अशा आशयाने अत्रि म्हणतो- [ अस्य कतमत् च स्थानं भवति इति-] त्या नासिकेंत या अविमुक्ताचें स्थान- त्याच्य ध्यानाचे स्थान कोणते आहे ? याज्ञवल्क्य-(भ्रुवो घ्राणस्य च यः सधिः-) दोन भुंवया व घ्राण या तिहींचा जो संधि-मध्यवर्ती प्रदेश (सः एषः द्यौः लोकस्य परस्य च संधिः भवति इति-) तो हा मस्तक-कपालरूप स्वर्गलोकाचा व हनुवटीपर्यंत भूलोकाचा संधि आहे. [ एतद् वै संधिः-] हे अविमुक्तच संधि आहे. कारण सर्व यांत जोडले- उत्तम प्रकारे ठेवले जाते, म्हणून संधि-ब्रह्म-स्वभाव. [ संध्यां ब्रह्मविदः उपासते इति-] भुंवया व घ्राण यांच्या या संधीमध्ये ब्रह्मज्ञानकुशल ज्याअर्थी त्या अविमुक्ताला साक्षात् जाणतात त्याअर्थी [ सः अविमुक्तः उपास्यः इति-] त्या अविमुक्ताची उपासना करावी. ही पुनरुक्ति उपसंहारासाठी आहे. 'इति' वाक्याच्या समाप्तीसाठी आहे. याचे फल सांगतात- [ वः वै एतत् एवं वेद-] जो कोणी उपासक ते निर्गुण आत्मस्वरूप हे अविमुक्त स्वरूपच आहे, त्याहून भिन्न नाही, असे उक्त स्थानादिकांसह जाणतो-त्याचें चिंतन-ध्यान करतो त्याला [ सः अविमुक्तं ज्ञानं आचष्टे-] तो अविमुक्त अविमुक्ताचें-वस्तुसाक्षात्काराचे साधनभूत ज्ञान अन्तकाली उपदेशितो. २.



तृतीयः खण्डः



अथ हैनं ब्रह्मचारिण ऊचुः किं जाप्येनामृतत्वं ब्रूहीति । स होवाच याज्ञवल्क्यः । शतरुद्रीयेण इत्येतान्येव ह वा अमृतनामधेयानि । एतैर्ह वा अमृतो भवतीति । एवमेवैतद्याज्ञवल्क्यः ॥ ३ ॥



अन्वयार्थ- [अथ ह एनं ब्रह्मचारिणः ऊचुः-] त्यानंतर यज्ञवल्क्याला अविमुक्तामध्यें मन स्थिर ठेवण्यास असमर्थ असलेले शिष्य म्हणाले-! [किं जाप्येन अमृतत्वं ब्रूहि इति-] कशाचा जप केल्याने मोक्ष प्राप्त होते ते सांग.

[सः ह याज्ञवल्क्य उवाच-] तेव्हां तो याज्ञवल्क्य आचार्य त्यांस म्हणाला- [शतरुद्रीयेण इति-] 'नमस्ते रुद्र मन्यवे ०' या रुद्राध्यायाच्या जपाने मोक्ष पाप्त होतो. [एतानि एव ह मै अमृतनामधेयानि-] हीच रुद्राध्यायांतील नांवे मोक्षरूप रुद्राचीच नावे आहेत. [एतैः ह वै अमृतः भवति इति-] नित्य जप केल्या जाणार्‍या या अतिप्रसिद्ध रुद्राच्या नांवांनीं मुमुक्षु मोक्षाला पात्र होतो. श्रुति म्हणते- [याज्ञवल्क्य एवं एव एतद्-] याज्ञवल्क्याने जे सांगितले ते तसेंच- अगदी खरे आहे.



चतुर्थः खण्डः



अथ हैनं जनको ह वैदेहो याज्ञवल्क्यमुपसमेत्योवाच भगवन् संन्यासमनुब्रूहीति । स होवाच याज्ञवल्क्यः । ब्रह्मचर्यं परिसमाप्य गृही भवेत् । गृही भूत्वा वनी भवेत् । वनी भूत्वा प्रव्रजेत् । यदि वेतरथा ब्रह्मचर्यादेव प्रव्रजेद् गृहाद्वा वनाद्वा । अथ पुनरव्रती वा व्रती वा स्नातको वाऽस्नातको वा उत्सन्नाग्निरनग्निको वा यदहरेव विरजेत्तदहरेव प्रव्रजेत् ॥ १ ॥



अन्वयार्थ-( अथ ह-) ब्रक्षचार्‍यांच्या प्रश्नानंतर ( वैदेहः ह जनकः याज्ञवल्क्यं उपसमेत्य उवाच-) विदेहदेशाचा अधिपति जनक याज्ञवल्क्यापाशीं येऊन म्हणाला- [भगवन् संन्यासं अनुब्रूहि इति-] हे पूज्य मुने, संन्यासाचे विधान- तो कोणी, केव्हा, कसा करावा ? ते मला सांग. तेव्हां अविरक्ताला कालप्राप्त संन्यास सांगण्यासाठीं आश्रमव्यवस्था-( सः ह याज्ञवल्क्य उवाच-) तो याज्ञवल्क्यं सांगू लागला. [ब्रह्मचर्यं समाप्य-) विरक्तिशून्य पुरुषाने ब्रह्मचर्य या प्रथम आश्रयाला संपवून स्नातक व्हावे. पण त्या ब्रह्यचर्याश्रमांतच जर प्रेम असेल तर मरेपर्यंत त्याच आश्रयांत नैष्ठिक ब्रह्मचारी होऊन गुरुकुलांत गुरु-अग्नि- शुश्रूषापरायण होऊन रहावे. पण त्यांत प्रेम नसेल तर आठव्या वर्षी वेदग्रहणाच्या अंगभूत संस्काररूप ब्रह्मचर्य स्वीकारून एक-दोन-तीन किंवा सर्व वेद म्हणावे, किंवा षडंगांसह आपली शाखाच यथाशास्त्र गुरुशुश्रूषापर्वूक म्हणून समावर्तन विधीने त्या आश्रमाची समाप्ति करून यौवनकाल प्राप्त झाला असतां (गृही भवेत्-) स्त्रीपरिग्रहरूप, श्रौत-स्मार्त सर्व कर्मानुष्ठानसंपादक, धर्म, अर्थ व काम या तीन पुरुषार्थाचे कारण, अशा गार्हस्थ्याचा स्वीकार करून गृही-गृहवान् व्हावे. पण त्याचीहि इच्छा निवृत्त झाल्यास (गृहात् वनी भूत्वा प्रवजेत्-) त्या आश्रमापासून वनी व्हावें. म्ह० कंदमूल-फलादि आहाराने, अग्निहोत्रासह किंवा अग्निहोत्राला सोडून, वन हेंच ज्याचें निवासस्थान आहे, असें व्हावें. पण वनी होऊन कांही कालाने त्याचीहि इच्छा नाहीशी झाल्यास चतुर्थाश्रमांत जावे. हा चार आश्रमांचा अनुक्रम झाला. पण ज्याला दुसऱ्या आश्रमांत जाण्याची इच्छा नसेल त्यानें एकेकाच आश्रमांत यावज्जीव रहावे. संन्यासाला सोडून बाकीच्या तीन आश्रमांचा अनुक्रमही नियत आहे. यालाच आश्रमसमुच्चयपक्ष म्हणतात. यांचा प्रतिलोम म्ह० उलट क्रम केव्हांहि शक्य नाही. म्हणजे संन्यासापासून वन, वनांतून गृह, गृहस्थ होऊन ब्रह्मचारी, असा प्रतिलोम क्रम शास्त्रविहित नाहीं. पण आतां वैराग्य असल्यास संन्यासाचा विशेष सांगतात- (यदि वा-) किंवा दुसऱ्या विकल्पपक्षीं ( इतरथा-) याहून निराळ्या प्रकारे, संसाराची इच्छा नसल्यास ज्यानें वेदातासह स्वशाखेचें अध्ययन केलें आहे किंवा सर्व वेदान्ताचें-उपनिषदांचे अध्ययन केलें आहे अशा विरक्ताने थोडा वेळ आचरिलेल्या ब्रह्मचर्याश्रमापासूनच संन्यास करावा. परमहंस व्हावें. 'प्रव्रजेत्' या साधारण श्रुतीवरून कुटीचक, बहूदक व हंस या तीन संन्यास प्रकारांचीहि प्राप्ति होते. पण पूर्ण वैराग्य ही सामग्री असतांना संन्यासाचा संकोच करणें अयोग्य असल्यामुळें 'परमहंस' हा श्रेष्ठ संन्यासप्रकार स्वीकारणेच उचित आहे. 'ब्रह्मचर्यात्' असें पद असल्यामुळें ज्याचें उपनयन झालेलें नाहीं त्याला संन्यासाचा अधिकार नाहीं, असे सिद्ध होते. आतां ज्याने जन्मांतरी सांग वेदाध्ययन केलेले असून या जन्मी त्याचा अर्थ आपोआप आठवत आहे त्याला उपनयनाचा कांहीं उपयोग नाहीं, हें खरे; पण त्या दृष्टीने पाहिल्यास त्याला विधिप्राप्त परमहंसत्वाचाहि कांहीं उपयोग नाही, कारण त्याच्यामध्ये तें स्वतःसिद्धच असते. असो; (गृहात् वा-) किंवा गृहाश्रमांतून-मग धर्मादि तीन पुरुषार्थ सिद्ध झाले असोत कीं नसोत ( वनात वा-) किंवा वनाश्रमांतून-त्याला विहित असलेल्या धर्माचें अनुष्ठान झालेले नसलें तरी प्रव्रजन-संन्यास करावा. 'वा-' शब्दावरून ब्रह्मचर्याश्रमापुढील दोन्ही किंवा एका आश्रमाचा स्वीकार केल्यावांचूनहि वैराग्य असल्यास संन्यासाधिकार आहे, असे सिद्ध होते. (अथ पुनः-) आतां एखाद्या विधुरासारख्या अनाश्रमी पुरुषास पूर्ण वैराग्य प्राप्त झाल्यास तो (व्रती वा अव्रती वा-) मासोपवास, जप इत्यादि व्रतांनी युक्त असो की नसो -अव्रती असो, त्यानेंहि वैराग्यबलावर संन्यास करावा. त्याचप्रमाणे (स्नातकः या अस्नातकः वा-) सर्व वेदांचे सांग अध्ययन करून स्नानकर्म केलेला स्नातक असो कीं केवल स्वशाखेचें अध्ययन करून स्नान केलेला अस्नातक असो, त्यानेंही वैराग्य प्राप्त होतांच संन्यास करावा. (उत्सन्नाग्निः अनग्निकः वा-) गृहस्थांमध्येहि कांहीं अग्निस्वीकार केलेले असतात, कांहीं भार्यामरणादि निमित्ताने उत्सन्नाग्नि-नष्टाग्नि झालेले असतात व कित्येक भार्या असतांनाहि अग्नीचा परिग्रह न केलेले असतात, त्यांतील शेवटच्या दोन कल्पांप्रमाणें एखादा उत्सन्नाग्नि असो कीं अनग्निक असो, त्यानें वैराग्याच्या बलावर संन्यास करावा. (याप्रमाणे आश्रमी व अनाश्रमी पुरुषांच्या संन्यासाचे विधान करून संन्यासाला कालाचाहि विशेष नियम नाहीं, असें सांगतात-) (यत् अहर् एव विरजेत् तद् अहर् एव प्रव्रजेत्- ज्या दिवशीं विरक्ति येईल त्याच दिवशीं संन्यास करावा. आतां संन्यास करणाऱ्या साग्निक गृहस्थाला एका इष्टीचे विधान करतात--



तद्धैके प्राजापत्यामेवेष्टिं कुर्वन्ति । तदु तथा न कुर्यादाग्नेयीमेव कुर्यात् । अग्निर्ह वै प्राणः प्राणमेवैतया करोति । पश्चात्त्रैधातवीयामेव कुर्यात् । एतयैव त्रयो धातवो यदुत सत्त्वं रजस्तम इति । अयं ते योनिर्ऋत्वियो यतो जातो अरोचथाः । तं जानन्नग्न आरोहाथा नो वर्धया रयिम् । इत्यनेन मन्त्रेणाग्निमाजिघ्रेत् । एष वा अग्नेर्योनिर्यः प्राणः प्राणं गच्छ स्वाहेत्येवमेवैतदाह ॥



अन्वयार्थ- ( तत ह-) त्याविषयी खरोखर ( एके-) कांहीं आचार्य (प्राजापत्यां एव इष्टिं कुर्वन्ति-) प्रजापति जिची देवता आहे अशी प्राजापत्य इष्टिच करतात. (तत् उ तथा न कुर्यात्-) पण त्यांनीं जरी तसे करावयात सांगितले आहे तरी तें करूं नये. तर ५ (आग्नेयीं एव कुर्यात्-) अग्निदेवताक दृष्टिच करावी. ( [त्याविषयी उपपत्ति]- ( अग्निः ह वै प्राणः-) हा प्रसिद्ध साधनरूप अग्निच प्राण-सूत्रात्मा किंवा परमात्मा आहे. कारण तोच देवांमध्ये पहिला असून त्याचेंच परमात्मत्व 'अग्निरग्रे प्रथमो देवतानां' इत्यादि श्रुतींत सांगितले आहे. यास्तव तोच स्वरूपाला पोंचवितो. म्हणून (प्राण एव एतया करोति-) त्या पूर्वोक्त प्राणालाच या आग्नेयी इष्टीने करतो. ( जेथे प्राण तेथें मन, जेथें मन तेथेंच सर्वेन्द्रिये व जेथे सर्व इंद्रिये तेथेंच विषय असतात. त्या आग्नेयी इष्टीने प्राणसिद्धीच्या द्वारा सर्व सिद्ध होतें.) ( पश्चात् त्रैधातवीयां एव कुर्यात्-) त्यानंतर ' यः कामयेतान्नादःस्यामिति तस्मात् एतं त्रिधातुं निर्वपेत्' या वाक्याने विहित असलेली राजा-अधिराज-सुराजगुणयुक्त इंद्रदेवताक इष्टिच करावी. [त्याविषयी उपपत्ति-] ( एतया एव त्रयः धातवः-) या त्रैधातवी इष्टीनेच तीन धातु वृद्धि पावतात. ( ते धातु कोणते ? उत्तर-) ( यत् उत सत्त्वं रजः तमः इति-) जें अग्नीचे सत्त्व-शुक्ल, रज-लोहित व तम-कृष्णरूप तेच तीन धातू वाढतात. ( याप्रमाणे यथाशास्त्र दृष्टि करून-) 'अयं ते योनिः०' या मंत्रानें अग्नीचे आघ्राण करावे (त्या मंत्राचा अर्थ-) [अयं ते योनिः ऋत्वियः] हा प्राण तुझें कारण आहे. प्राण कसा ? ऋतुसंबंधी किंवा ऋत्विक्-संबंधी किंवा ऋतूंनी कल्पिलेला प्राण तुझें कारण आहे. ( यतः जातः अरोचथाः-) ज्याच्यापासून उत्पन्न झालेला तूं दीप्त झाला आहेस. [अग्ने तं जानन् आरोह-] हे अग्ने, त्या आत्मजनक प्राणाला जाणणारा तूं त्यावर आरोहण कर. तूं प्राणमात्र हो. (अथा नः रयिंय वर्धया इति-) त्यानंतर आमचे घन वाढव. येथें धन म्ह० सम्यक् अर्थबोध. लौकिक सुवर्ण नव्हे. 'इति-' शब्द मंत्रसमाप्तीसाठीं आहे. 'अथा' व ' वर्धया ' हे दीर्घपाठ संहितापाठासाठी आहेत. ( अनेन मंत्रेण अग्निं आजिघ्रेत्-) या मंत्रानें अग्नीचें आघ्राण करावे ( हा पूर्वोक्त मंत्रार्थ स्वतः श्रुति सांगते-) [यः प्राणः एषः वै अग्नेः योनिः-) जो प्राण तोच अग्नीची योनि कारण आहे. ( प्राणं गच्छ स्वाहा इति-) प्राणाला प्राप्त हो. ती तुझी वाक् मी आहे, असें ज्याअर्थी वाक् म्हणते त्याअर्थी स्वाहा. (या विषयीं तैत्तिरीयक अग्निब्राह्मणांत 'तं वाक् अभ्यवदत् जुहुधि इति । सोऽब्रवीत्कस्त्वमसीति । स्वैव ते वागित्यब्रवीत् । सोऽजुहोत्स्वाहेति । तत्स्वाहाकारस्य जन्म०' इत्यादि प्रमाण आहे. '' त्या अग्नीला वाक् 'होम कर' असे म्हणाली. अग्नि म्हणाला-'तूं कोण आहेस ?' 'मी तुझीच आहे' असें वाक् म्हणाली. तेव्हां त्यानें 'स्वाहा ' असें म्हणून होम केला. तोच स्वाहाकाराचा जन्म आहे.' असा त्याचा अर्थ आहे.) 'इति ' हा शब्द मंत्राच्या समाप्तीसाठी आहे. (एवं एव एतत् आह-) असेंच हे हा मंत्र म्हणाला- आतां निरग्नींचा संन्यास-



ग्रामादग्निमाहृत्य पूर्ववदग्निमाघ्रापयेत् । यद्यग्निं न विन्देदप्सु जुहुयात् । आपो वै सर्वा देवताः । ॐसर्वाभ्यो देवताभ्यो जुहोमि स्वाहेति हुत्वा समुद्धृत्य प्राश्नीयात्साज्यं हविरनामयं मोक्षमन्त्रस्त्रय्ये वं विन्देत्तद्‌ब्रह्मैतदुपासितव्यम् । एवमेवैतद्‌भगवन्निति वै याज्ञवल्क्यः ॥ ४ ॥



अन्वयार्थ- (ग्रामात अग्निं आहृत्य-) गावांतून-श्रोत्रियादिकांच्या घरातून अग्नि आणून अन्वाधान करून (पूर्ववत् अग्निं आघ्रापयेत्-) पूर्वीप्रमाणेंच 'अयं ते योनिः०' इत्यादि मंत्राने अध्वर्यूनें संन्याश्याकडून अग्नीचे आघ्राण करवावें (यदि अग्निं न विन्देत-) पण जर अग्नि न मिळाला तर ( अप्सु जुहुयात्-) तडागादिकांच्या जलामध्यें होम करावा. कारण (आपः वै सर्वाः देवताः-) आप्‌च सर्व देवता आहेत. ( त्यातील विशेष मंत्र-) 'ॐ सर्वाभ्यः देवताभ्यः स्वाहा' इति हुत्वा- पूर्णाहुतीच्या वेळी उदकस्थली 'ॐ सर्वाभ्य०' या मंत्राने होम करून ( समुद्धृत्य प्राश्नीयात्-) हुतशेष वर उचलून खावा. (साज्यं हविः अनामयं-) आज्ययुक्त-घृतयुक्त हवि हुतशेष असल्यामुळें रोगदोषशून्य आहे. (आतां संन्याश्याला जप करण्यास योग्य असलेला मंत्र सांगतात-) ( मोक्षमंत्रः त्रयी-) मोक्षाला कारण होणारा मंत्र प्रणव हा आहे. कारण तो वेदत्रयीरूप आहे. (एवं विन्देत्-) पुढें सांगितलेल्या प्रकारानें त्याला जाणावे. ( तत् ब्रह्म-) तो प्रणवच सत्यज्ञानादिलक्षण ब्रह्म आहे. (एतत् उपासितव्यं-) त्या ओंकाररूपाचेच उपासन करावे. जनक म्हणतो- ( एवं एव एतत् भगवन्-) तूं सांगितलेला हा संन्यासविधि असाच आहे.
हे पण मुने, तूं सांगितलेला हा संन्यास असाच आहे. शृति म्हणते- (इति वै याज्ञवल्क्यः-) याज्ञवल्क्यानें असे सांगितले. ( ४)



पञ्चमः खण्डः



अथ हैनमत्रिः पप्रच्छ याज्ञवल्क्यम् । पृच्छामि त्वा याज्ञवल्क्य अयज्ञोपवीती कथं ब्राह्मण इति । स होवाच याज्ञाल्क्यः । इदमेवास्य तद्यज्ञोपवीतं य आत्मा प्राश्याचम्यायं विधिः परिव्राजकानाम् । वीराध्वाने वा अनाशके वाऽपां प्रवेशे वाऽग्निप्रवेशे वा महाप्रस्थाने वा । अथ परिव्राड्‌विवर्णवासा मुण्डोऽपरिप्रहः शुचिरद्रोही भैक्षणो ब्रह्मभूयाय भवति । यद्यातुरः स्थान्मनसा वाचा वा संन्यसत् । एष पन्था ब्रह्मणा हानुवित्तस्तेनैति संन्यासी ब्रह्मविदित्येवमेवैष भगवन्निति वै याज्ञवल्क्यः ॥ ५ ॥



अन्वथार्थ-- (अथ ह अत्रिः एन याज्ञवल्क्यं पपच्छ-) त्यानंतर अत्रि त्या याज्ञवल्क्याला असें विचारू लागला- (याज्ञवल्क्य पृच्छामि त्वा-) हे याज्ञवल्क्या ! मी तुला विचारतो (अयज्ञोपदीती कथं ब्राह्मणः इति-) लौकिक ब्राह्मण स्नान-आचमनादि क्रियांगभूत यज्ञोपवीताने युक्त असतो. पण हा संन्यासी यज्ञोपवीतरहित असतो. तेव्हां तो ब्राह्मण कसा ? 'इति' प्रश्नसमाप्त्यर्थ आहे. (सः ह उवाच याज्ञवल्क्यः-) तेव्हां तो याज्ञवल्क्य त्याला म्हणाला- (यः आत्मा इदं एव अस्य तत् यज्ञोपवीतं-) जो स्वयंप्रकाशसच्चिदानंद आत्मा तेंच या परमहंसाचे यज्ञोपवीत आहे. [तप, योग, स्वाध्याय, ज्ञान इत्यादि नानाप्रकारच्या श्रौत-स्मार्त यज्ञांच्या सामीप्यानें विशेषतः-नित्यसंयोगाने जें प्राप्त असतें तें (यज्ञ-उप-वि-इतं-) यज्ञोपवीत होय. 'अहं-मी' या प्रत्ययाचा साक्षी आत्मा सर्व यज्ञांमध्ये बाह्य सूत्रमय लौकिक यज्ञोपवीताहून नित्य संनिहित-सामीप्याने प्राप्त आहे. यास्तव परमहंसाचे तेंच यज्ञोपवीत आहे. (प्राश्य आचम्य अयं परिव्राजकानां विधिः-) प्राश्य आचम्य, इत्यादि वाक्याने परिव्राजकांचा संन्यासविधि सांगितला जातो. ( प्राश्य येथील श-कार छान्दस आहे. प्रास्य म्हणजे टाकून किंवा ' प्राश्य ' असाच पाठ घेतल्यास यज्ञोपवीताला दोन्ही हातांनी व्याप्त करून किंवा हें व्याप्त आहे, असें मानून असा अर्थ करावा.) (प्रास्य-) प्रैषोच्चारणानंतर 'समुद्रं गच्छ स्वाहा ' या मंत्राने शिखेसह यज्ञोपवीताचा प्राप्त उदकांत त्याग करून, तीन वेळ आचमन करून, परमहंसाचा 'आत्मा यज्ञोपवीतं' हाच उपनिषदांत सांगितलेला कर्तव्यताप्रकार आहे. क्षत्रिय व वैश्य यांना परमहंसलिंगधारण विहित नाहीं. यास्तव अशा अनधिकाऱ्यांनीं किंवा कांहीं कारणानें आश्रमापासून भ्रष्ट झालेल्या, प्रायश्चित्त न केलेल्या, शिष्टांकडून व्यवहार न केल्या जाणाऱ्या किंवा असाध्य रोगाने ग्रस्त झालेल्या किंबहुना श्रवणादि करण्यास असमर्थ असलेल्या संन्याश्यांनी अशा प्रकारे मरावे. (वीराध्वाने-) संग्रामांतून परत न फिरता, गो-ब्राह्मण-बाल-स्त्री यांच्यासाठी, कांटे, विंचु, सर्प, सिंह, व्याघ्र यांना न भिणाऱ्या वीरांच्या मार्गामध्यें शरीराचा त्याग करावा. (अनाशके वा-) किंवा अन्नोदकांचा त्याग करून, (अपां प्रवेशे वा-) किंवा गंगा-प्रयागादि पुण्यस्थानी प्रवेश करून, (अग्निप्रवेशे वा-) प्रदीप्त अग्नीत प्रवेश करून, ( महाप्रस्थाने वा-) किंवा महत्- म्ह० आवृत्तिशून्य-परत न फिरता सर्प-व्याघ्र-सिंहादिकांनीं युक्त असलेल्या विषमभूमीचा त्याग न करितां शरीरपात होईतों गमन करणें, या महाप्रस्थानानें, यांतील कोणत्याहि प्रकाराने शरीराचा त्याग करावा. आतां अशा अनधिकाऱ्यांहून अगदी उलट असलेल्या अधिकारी परमहंसाने काय करावे ते सांगतात- परिव्राट् विवर्णवासाः मुण्डः अपरिग्रहः शुचिः अद्रोही भैक्षाणः ब्रह्मभूयाय भवति-) परमहंस काषायस्त्रे परिधान करणारा, शिखारहित, कन्था- कौपीन-अंगवस्त्र यांवाचून दुसऱ्या कशाचाहि परिग्रह न करणारा, बाह्य-मृत्तिका-जलादिकांनी व आंतर मनःशुद्धीने शुचि-पवित्र, शरीराने, मनाने किंवा वाणीने भूतांचा द्रोह न करणारा, प्राणधारणासाठी यथाशास्त्र माधुकरादि भिक्षाचर्य करणारा, असा परमहंस ब्रह्मसाक्षात्काराने ब्रह्म होतो. ( यदि आतुरः स्यात् मनसा वाचा वा संन्यसेत्-) जर रोगादिकांनी किंवा चोरादिकांनी पीडित झाला असेल व संन्यासाश्रम करण्यास असमर्थ असेल तर त्याने मनासह वाणीने प्रैषोच्चार करावा. पण तो बोलण्यासही असमर्थ असेल तर नुसत्या मनानेंच-संकल्पाने संन्यास करावा.. एषः पन्थाः ब्रह्मणा ह अनुवित्तः-) ब्रह्मप्राप्तीचे साधन असा हा संन्यासमार्ग ब्रह्माधिकारी पुरुषाकडून प्राप्त केला गेला आहे. किंवा वेदांत प्रसिद्ध आहे. तो वेदांत उपलब्ध होतो. वेदाने त्याला अनुज्ञा दिली आहे. ( तेन संन्यासी एति ब्रह्मविद् भवति-) त्या मार्गाने एषणात्रयशून्य सर्वसंगपरित्यागी परमहंस जातो व ब्रह्मसाक्षात्कारवान होतो. म्ह० संन्यासाने ब्रह्मज्ञान होतें व ब्रह्मज्ञानाने कैवल्य प्राप्त होते. अत्रि म्हणतो- (इति एवं एव एषः भगवन्-) हे भगवन्, हा संन्यासमार्ग आपण सांगता तसाच आहे. श्रुति म्हणते- (इति वै याज्ञवल्क्य-) असें याज्ञवल्क्य सांगता झाला.

आता याज्ञवल्क्य श्रोत्यांची श्रद्धा उत्पन्न करण्यासाठीं या आश्रमाचे मोठमोठ्या ज्ञानी पुरुषांनी अनुष्ठान केलें आहे, असें सांगतात-



षष्ठः खण्डः



तत्र परमहंसा नाम संवर्तकारुणिश्वेतकेतुदुर्वास-ऋभुनिदाघ-जडभरत- दत्तात्रेयरैवतकप्रमृतयोऽव्यक्तलिङ्गाअव्यक्ताचाराअनुन्मत्ता उन्मत्तवदाचरन्तस्त्रिदण्डं कमण्डलुं शिक्यं पात्रं जलपवित्रं शिखां यज्ञोपवीतं चेत्येतत्सर्वं भूः स्वाहेत्यप्सु परित्यज्यात्मानमन्विच्छेत् । यथाजातरूपधरो निर्द्वन्दो निष्परिग्रहस्तत्त्वब्रह्ममार्गे सम्यक्संपन्नः शुद्धमानसः प्राणसंधारणार्थ यथोक्तकाले विमुक्तो भैक्षमाचरन्नुदरपात्रेण लाभालामौ समौ भूत्वा शून्यागारदेवगृहतृणकूटवल्मीक-वृक्षमूलकुलालशालाग्निहोत्र गृहनदीपुलिनगिरिकुहरकन्दरकोटरनिर्झरस्थण्डिलेषु तेष्वनिकेतवास्यप्रयत्नो निर्ममः शुक्लध्यानपरायणो अध्यात्मनिष्ठोऽशुभकर्मनिर्मूलनपरः संन्यासेन देहत्यागं करोति स परमहंसो नाम स परमहंसो नामेति॥ ६ ॥ 'भद्रं कर्णेभिः०' इति शन्तिः ॥



अन्वयार्थ - (तत्र परमहंसाः नाम-) असे हे पुढें सांगितलेले परमहंस परिव्राजक-चतुर्थाश्रमाच्या आचाराचे अनुष्ठान करणारे प्रसिद्ध आहेत.
(संवर्तक-आरुणि-श्वेतकेतु-दुर्वास-ऋभु-निदाघ-जडभर तदत्तात्रेय, रैवतक-प्रभृतयः-) अग्नीचा अवतार संवर्त प्रजापति, उद्दालक, त्याचा पुत्र श्वेतकेतु, ब्रह्मपुत्र ऋभु, त्याचा शिष्य निदाघ, ऋषभपुत्र राजाभरत, विष्णूचा अंश दत्तात्रि-त्याचा पुत्र दत्तात्रेय, प्रसिद्ध रैवतक, व 'प्रभृति' शब्दाने सौभरि वगैरे दुसरेहि अनेक परमहंस (अव्यक्तलिंगाः अव्यक्ताचाराः अनुन्मत्तः उन्मत्तवत् आचरन्तः -) ज्यांची कपालावरील पंचमुद्रादि लिंगे अव्यक्त आहेत, ज्यांचे सदसद्‌रूप कर्म लोकांना समजत नाही, जे लोकद्वयविचारशून्य, विद्यादिमदवान् ते मत्त, जे तसे मत्त नसतात ते अनुन्मत्त, पण उन्मत्ताप्रमाणे-वेड्यांप्रमाणे आचरण करणारे, लोकांसमक्ष, आपल्या ठिकाणी त्यांची श्रद्धा बसूं नये, म्हणून बुद्धिपूर्वक नानाप्रकारें चेष्टा करणारे, असे ते असतात. (याप्रमाणे परमहंसत्व सांगून आतां संन्यासाश्रमाच्या कुटीचकादि अवशिष्ट तीन भेदांचे उपलक्षणन्यायानें परमहंसत्व सांगतात- (त्रिदंडं, कमंडलुं, शिक्यं, पात्रं, जलपवित्रं -) वेळूचे तीन दंड, भोपळ्याचा किंवा लाकडी कमंडलु, दर्भ, मुंजातृण इत्यादिकांच्या दोरीने केलेले भिक्षापात्राधारभूत शिंके, भोपळ्याचे किंवा काष्ठाचे दृढ भिक्षापात्र, सर्वदा आचमनादि प्रसंगी पाणी गाळण्यासाठी वीतभर लाबी-रुंदीचे चौकोनी त्रिदंडाला बांधलेले वस्त्र, त्रिदंडी संन्याश्यांच्या अशा या त्रिदंडादि पांच मात्रा आहेत. त्यांतील एखादीही मात्रा कमी झाल्यास त्रिदंडी संन्याश्यांना प्रायश्चित्त करावे लागते. ( शिखा यज्ञोपवीतं च इति एतत् सर्वं अपि भूः स्वाहा अप्सु परित्यज्य आत्मानं अन्विच्छेत्-) पूर्वकर्मांगभूत शिखा व यज्ञोपवीत आणि पूर्वीच्या त्रिदंडादि पांच मात्रा हें सर्वही-अर्थात् गायत्र्यादिकही -भूः स्वाहा- हे सर्व सत्तामात्र चिदानंदरस आहे, या मंत्राने त्यावेळी जें प्राप्त असेल त्या उदकांत टाकून सद्गुरूच्या चरणाशी येऊन श्रवण-मननादिकांच्या योगाने स्वयं ज्योतिश्चैतन्यात्म्याला साक्षात् जाणावे. ( शास्त्रीय आत्मज्ञानाने शिखासूत्रादिकांचा त्याग केल्यावर उत्तरमार्गांतील गमनप्रकार सांगतात-) ( यथाजातरूपधरः -) जशा प्रकारच्या रूपाने उत्पन्न झाला होता तशा रूपाला धारण करणारा-दिगंबर होऊन उत्तर मार्गांत जावे. त्यानंतर संन्यासदीक्षा देणाऱ्या अध्वर्यूनें ज्याचे निवारण केले आहें अशा त्याने श्रवणादिकांच्या सिद्धीसाठीं व लोकानुग्रहार्थ असे व्हावे. (निर्द्वंद्वः निष्प्रतिग्रहः तत्त्वब्रह्ममार्गे सम्यक् संपन्न, शुद्धमानसः-) शीतोष्ण-सुखदुःखादि द्वंद्वांना सहन करणारा, किंवा ' निर्ग्रंथः' असा येथें पाठ आहे. त्याचा अर्थ-उपनिषत्संबंधरहित शास्त्रांशी संबंध न ठेवणारा, कन्था, कौपीन व अध्यात्म पुस्तकादि यांवाचून कोणताहि प्रतिग्रह न करणारा, अबाधित रूप जें अखंड ब्रह्म त्याच्या मार्गांत म्हणजे ज्ञानांत संशय-विपर्ययशून्य होऊन संपन्न-ज्ञाननिष्ठ झालेला, ज्याचे मन काम-क्रोध-संकल्पादि मलरहित झाले आहे, असा होत्साता ( प्राणसंधारणार्थं यथोक्तकाले विमुक्तः भैक्षं आचरन्-) प्राणाच्या रक्षणार्थ, मैत्रायणी श्रुतींत सांगितलेल्या कालीं-मध्यान्हानंतर सायंकाळपर्यंत गृहस्थांच्या घरांतून धूर येईनासा झाला असतां शास्त्रोक्त प्रकाराने सर्व बंधनशून्य होऊन, माधुकरादिरूप भिक्षाचर्य करणारा, असे व्हावें. भिक्षाचर्य करावे, हा नियमविधि होय. ( भिक्षापात्र सांगतात-) (उदरपात्रेण लाभालाभौ समौ भूत्वा-) उदर हेंच पात्र त्यानें म्ह० भिक्षा आणली असतां तोंड उघडावे. भिक्षा मिळाली किंवा न मिळाली तरी क्रमानें हर्ष व विषाद करूं नये. अर्थात दोन्ही प्रसंगीं त्या लाभालाभांना सम मानून भिक्षाचर्य आचरावे. ( आतां परमहंसाची स्थाने सांगतात-) (शून्यागारं देवगृहं वृक्षमूलं कुलालशाला अग्निहोत्रं नदीपुलिनं गिरिकुहरं कन्दरं कोटरं निर्झरः स्थण्डिलं-) शून्य-ओसाड गृह, शिव-विष्णु इत्यादि देवालय, वट-अश्वत्थादि वृक्षाचे मूळ, कुंभाराची भांडी ठेवण्याचे स्थान, अग्निगृह, महानदीच्या तीराजवळचा प्रदेश, पर्वतावरील गहन प्रदेश, गिरिगुहादि स्थल, वृक्षाची ढोल, जलस्रावस्थान=झरा, अतिशय शुद्ध आवरणशून्य भूप्रदेश, ( श्रुतींत हे सर्व शब्द द्वंद्वसमासयुक्त सांगितले आहेत. पण आम्ही त्याची पदे तोडून व्याख्यान केले आहे.) (शून्यागारादिस्थंडिलान्तेषु अनिकेनवासी अप्रयत्नः निर्ममः शुक्लध्यानपरायणः अध्यात्मनिष्ठः अशुभकर्मनिर्मूलनपरः संन्यासेन देहत्याग करोति-) या शून्यागारापासून स्थंडिलापर्यंत सांगितलेल्या प्रदेशांतील कोठेही नियतस्थान न करतां राहणारा, त्यातही नानाप्रकारचीं सुखोपकरणें संपादन करण्यासाठीं प्रयत्न न करणारा, कोणत्याहि वस्तूवर ममत्व-'ही माझी' असा ममभाव न ठेवणारा, प्रणव किंवा सर्वदोषशून्य स्वयंप्रकाश आनंदात्मा, त्याचें निरंतर ध्यान हेंच एक ज्याचे परम साधन आहे असा, आत्मनिष्ठ-अन्तर्मुख, अनेक जन्मार्जित पापांचे निर्मलून करण्यात तत्पर झालेला असा जो, दीर्घकाल किंवा स्वल्प काल केलेल्या संन्यासाने शरीराचा त्याग करितो ( सः नाम परमहंसः-) तोच प्रसिद्ध परमहंस होय. 'सः परमहंसो नाम' या वाक्याची द्विरुक्ति व ' इति-शब्द उपनिषद समाप्तीसाठी आहे. ६.

इति जाबालोपनिषत् समाप्त झाले.



जाबालोपनिषदाचें सिंहावलोकन.

अथर्ववेदाच्या जाबालशाखेचे हे उपनिषद् आहे. त्याचे सहा खंड आहेत. पहिल्या खंडांत देवगुरु बृहस्पतीने याज्ञवल्क्याला 'देवांचें देवयजन व सर्व भूतांचे ब्रझसदन असें कुरुक्षेत्र काय आहे ?' असा प्रश्न केला तेव्हां याज्ञवल्क्यानें 'अविमुक्त-सोपाधिक ईश्वराचे स्वरूपच तें कुरुक्षेत्र आहे. यास्तव अविमुक्तोपासकाने कोणत्याहि स्थानी त्याचेंच चिंतन करावे अशा अविमुक्तोपासकाचे प्राण शरीर सोडून जाऊं लागले असतां रुद्र त्याला तारक ब्रह्माचा उपदेश करतो. त्यामुळें तो अमरणधर्मवान् व मुक्त होतो. यास्तव मरेपर्यंत त्या अविमुक्ताचेंच निरंतर ध्यान करावे,' असे सांगितले. (१)

अत्रि म्हणाला-''अव्यक्त अनन्त आत्म्याचे ज्ञान मला कसें होईल ?'' याज्ञवक्य-''पूर्वोक्त अविमुक्ताचीच उपासना करावी. तो अनन्त अव्यक्त आत्मा अविमुक्तांत प्रतिष्ठित आहे. अविमुक्त वरणा नासीमध्ये प्रतिष्ठित आहे. जी इंद्रियकृत सर्व दोषांचें निवारण करते ती वरणा व जी इंद्रियकृत सर्व पापांचा नाश करते ती नासी. दोन भुवया व नासिका यांचा जो संधि तोच मस्तककपालरूप स्वर्ग व हनुवटीपर्यंत भूलोक यांचा संधि आहे. या संधींतच ब्रह्मज्ञानकुशल ब्रह्मस्वरूपाला साक्षात् पाहतात. यास्तव अविमुक्ताची उपासना करावी. उपासकाला तो सोपाधिक ईश्वरच ज्ञानोपदेश करतो".(२)

नंतर अविमुक्तोपासना करण्यास असमर्थ असलेले शिष्य म्हणाले-'' ज्या जप करण्यास योग्य असलेल्या अध्यायाच्या जपानें मोक्ष मिळतो तो अध्याय सांगा.'' याज्ञवल्क्य-''नमस्ते रुद्र मन्यवे० इत्यादि रुद्राध्यायाच्या जपाने मोक्ष मिळतो. रुद्राध्यायांत सांगितलेली रुद्राची नावे ही अमृताचीच-मोक्षाचीच नावे आहेत. त्यामुळे त्यांच्या जपानें मुमुक्षु मुक्त होतो." (३)

जनक म्हणाला-भगवन्, मला संन्यासाचा प्रकार सांगा. तो कोणी, केव्हा कसा करावा ? '' याज्ञवल्क्य-''ब्रह्मचर्य संपवून कर्मानुष्ठानाची इच्छा असल्यास गृहस्थ व्हावे. किंवा मरेपर्यंत नैष्ठिक ब्रह्मचारीच रहावे. गृहस्थाश्रम स्वीकारून कांहीं काल कर्मानुष्ठानादि करून त्याविषयी अरुचि झाल्यास वानप्रस्थ व्हावे. पुढें त्याचीहि विरक्ति आल्यास चतुर्थाश्रम स्वीकारावा. किंवा गृहस्थाश्रमादि इतर आश्रमांची इच्छा नसल्यास ब्रह्मचर्यापासूनच संन्यास करावा. ब्रह्मचर्यादि इतर आश्रमांतील व्रती-अव्रती, स्नातक-अस्त्नातक, साग्नि, निरग्नि, विधुर इत्यादि जे अवांतर भेद आहेत, त्यांतील ज्या कोणालाही ज्या दिवशी वैराग्य येईल त्याच दिवशीं त्याने संन्यास करावा.'' असें सांगून याज्ञवल्क्यांनी त्याचें सर्व विधान सांगितले आहे. तें मुळावरूनच स्पष्टपणे कळण्यासारखे आहे. (४.)

अत्रि म्हणतो-'' भगवन्, यज्ञोपवीतरहित असलेला संन्यासी ब्राह्मण कसा ?'' याज्ञवल्क्य- ''आत्माच त्याचें यज्ञोपवीत आहे. परिव्राजकांनीं शिखेसह यज्ञोपवीताचा उदकांत त्याग करून आचमन करावे. त्यांच्यासाठी हा विधि आहे.'' नंतर संन्यासाचे अनधिकारी क्षत्रियादि व इतर भ्रष्ट, रोगी वगैरे यांनी शरीरत्याग कसा करावा ते सांगून ''परमहंसाने काषायवस्त्रें, मुण्डन, अपरिग्रह, शुचि, अद्रोही होऊन भिक्षाचर्य करावे,'' असें सांगितले आहे ''असा परमहंस मुक्त होतो. व्याधि, चोर इत्यादिकांनीं पीडलेल्या विरक्ताने मानसिक किंवा वाचिक संन्यास करावा. हा ब्रह्मज्ञानप्राप्तीचा मार्ग आहे.'' (५)

सहाव्या खंडांत याज्ञवल्क्याने श्रोत्यांच्या मनांत श्रद्धा उत्पन्न करण्यासाठीं प्राचीन परमहंसांचा उल्लेख करून, त्यांचा आचार व संन्यासविधि सांगितला आहे. तो मुळावरूनच सहज कळण्यासारखा आहे. संन्यास आश्रमाची योग्यता, परमहंसाचे सर्वोत्तम धर्म व त्याला येथेंच प्राप्त होणारे जीवनमुक्तिरूप फल यांचे उपनिषदांत वर्णन आहे. गीतेतील ज्ञाननिष्ठेचे स्वरूपही यावरून अधिक स्पष्ट होते. याचा ब्रह्ममीमांसेतही विचार केला आहे. संन्यासाचा अधिकार नसलेल्या गृहस्थांना मोक्षासाठी रुद्राध्यायाचा जप सांगितला आहे. त्यामुळे हें उपनिषद् सर्वोपकारक आहे. (६.)

इति अथर्ववेदीय जाबालोपनिषत्समाप्ता ॥