|
ईशावास्य उपनिषद् -
अकरा प्रमुख उपनिषदांपैकी एक. माण्डूक्योपनिषदाचा अपवाद वगळता आकाराने सर्वात लहान, पण अत्यंत आशयगर्भ व आशयघन असे हे उपनिषद आहे. शुक्त यजुर्वेदाच्या वाजसनेयी संहितेचा चाळीसावा अध्याय म्हणजेच हे उपनिषद असून, हे ईशोपनिषद, मंत्रोपनिषद, संहितोपनिषद, वाजसनेयी उपनिषद अशा विविध नावाने ओळखले जाते. या उपनिषदात केवळ अठराच मंत्र आले आहेत. ब्रह्मविद्या आणि त्याद्वारे आत्मज्ञान हा सर्व उपनिषदांचा प्रमुख विषय आहे. हे उपनिषद त्याला अर्थातच अपवाद नाही. या उपनिषदाच्या पहिल्या मंत्रानेच सर्व आत्मविवेकी मानवांना मुग्ध केले आहे. तत्त्वज्ञान आणि आशय या दोन्ही दृष्टीने हा मंत्र अलौकिक आहे - उपनिषद प्रारंभ
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते ।
शांतीचा अर्थ - [पूर्णं अदः] - तें परब्रह्म पूर्ण आहे. [पूर्णं इदं] - हे सोपाधिक ब्रह्महि स्वरूपानें पूर्ण आहे. [पूर्णं पूर्णात् उदच्यते] - ते हे कार्यात्मक ब्रह्म पूर्ण म्हणजे कारणात्मक ब्रह्मापासून उद्भवते. पण ते त्याच्यापासून जरी निराळें होत असलें तरी आपले पूर्णत्व सोडीत नाहीं. तर ते पूर्णच उद्भवते. [पूर्णस्य पूर्णं आदाय] - कार्यरूप ब्रह्माचे पूर्णत्व घेऊन [पूर्ण एव अवशिष्यते] - पूर्णच-केवल ब्रह्म-अवशिष्ट राहतें. म्हणजे सृष्टीच्या पूर्वीं जें अखंड एकरस सर्वव्यापी ब्रह्म होतें तेंच हे सृष्टीनंतरचें नामरूपोपाधियुक्त कार्यब्रह्म आहे. पण तेहि पूर्ण आहे. त्या कारणरूप पूर्णापासून हें कार्यरूप ब्रह्म पृथक् आहे, असें भासू लागते. प्रलयसमयीं त्या द्वैतरूप कार्यब्रह्मांतील पूर्णत्व तेवढें घेऊन म्हणजे पूर्णत्व हा आपला धर्म त्यांतून काढून घेऊन तें पहिलें कारणरूप ब्रह्मच अवशिष्ट राहते. त्रिविध तापांची शांति होवो.
ॐ ईशा वास्यमिदँ सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् ।
जगत्याम् यत् किं च जगत् इदम् सर्वम् ईश आवास्यम् - अखिल ब्रह्मांडामध्ये जे काही जड व चेतनस्वरुप जगत आहे ते सर्व ईश्वराने व्याप्त आहे - तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधः - त्या ईश्वराचे सतत स्मरण ठेऊन (कारण सर्व त्याचे आहे) ह्या जगताचा त्यागपूर्वक भोग घ्यावा. त्यांत आसक्त होऊं नये. कारण, - धनम् कस्य स्वित् - हे धन, हे भोग पदार्थ कुणाचे आहेत ? अर्थात कुणाच्याच मालकीचे नव्हेत. जगांतील कुठलाही पदार्थ अगदी अंशमात्राने सुद्धां परमेश्वर-रहित नाही. मनुष्य (चुकीने) ह्या सर्व पदार्थांशी ममता व आसक्ती करतो. ते सर्व परमेश्वराचे आहेत आणि त्यांचा उपयोग फक्त परमेश्वरासाठींच केला गेला पाहिजे. ॥ १ ॥
कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः ।
कर्माणि कुर्वन् एव इह शतम् समाः जिजीविषेत् - ह्या जगात् (इह) ईश्वरपूजनार्थ भाव ठेऊनच शास्त्रनियत कर्मांचे आचरण करीत शंभर वर्षे आयुष्य कंठीत करण्याची इच्छा केली पाहिजे - एवम् कर्म त्वयि नरे न लिप्यते - हे मनुष्या, अशा प्रकारे त्यागपूर्वक ईश्वरासाठी केलेल्या कर्माने तूं लिप्त होणार नाहीस - इतः अन्यथा न आस्ति - मुक्तिसाठी ह्याप्रमाणे कर्म करीत राहाणे हा एकमेव मार्ग आहे. कर्मबंधनातून मुक्त होण्याचा आणखी कुठलाच मार्ग नाही. ॥ २ ॥
असुर्या नाम ते लोका अन्धेन तमसाऽऽवृताः । असुर्याः नाम लोकाः ते अन्धेन तमसा आवृता - असुरांचे जे नरकरूपी प्रसिद्ध लोक आहेत ते सर्व अज्ञान व दुखःरुप महान अंधकाराने आच्छादित आहेत - ये के च आत्महनः जनाः - जे कोणी आत्म-विरोधी आचरण करणारी माणसे असतात - ते प्रेत्य तान् अभिगच्छति - ते मेल्यावर त्या भयंकर अशा नरकांत जातात. -- मानव शरीर इतर शरीरांपेक्षा श्रेष्ठ व दुर्लभ आहे. ईश्वर कृपेने असे शरीर केवळ मुक्ति मिळवण्याच्या उद्देशाने दिले गेलेले असते. दुसर्या मंत्रात केलेल्या उपदेशानुसार आचरण करणे म्हणजे आत्महीत साधणे होय. ह्या उलट ईश्वर समर्पण भाव न ठेवता, विषयांचा केवळ यथेच्छ भोग घेत राहाणे म्हणजे आत्मघात करण्यासारखेच आहे. कारण अशाने केवळ जन्म व्यर्थ गेला एव्हढेच नव्हे तर आपल्याला अधिकाधिक कर्मबंधनात जखडून घेतल्यासारखे होईल. अधिकाधिक पतन झाल्यास क्षुद्र योनिंमध्ये जन्म मिळून नरकातच भटकत राहावे लागेल. ॥ ३ ॥ पुढील दोन मंत्रात परमेश्वराच्या स्वरूपाचे वर्णन -
अनेजदेकं मनसो जवीयो नैनद्देवा आप्नुवन्पूर्वमर्षत् । अनेजत् एकं मनसः जवीयः - परमेश्वर अचल, एकरूप, मनापेक्षाही अधिक तीव्र गतिमान आहे - पूर्वम् अर्षत् - सर्वांचा आदि आणि ज्ञानस्वरूप (सर्वांचे ज्ञान ज्याला आहे असा) - एनत् देवाः न आप्नुवन् - ह्या परमेश्वराला इन्द्रादि देव देखील जाणूं शकत नाहीत. - तत् अन्यान् धावतः तिष्ठत् अत्येति - अन्य कोणी कितीही वेगाने धावले तरी स्वताः एके ठिकाणी स्थीर (जागेवरून न हालतां) राहूनही ते त्या सर्व धावणार्यांचे अतिक्रमण करणारे आहेत - तस्मिन् मातरीश्वा अपः दधाति - त्यांच्या सत्तेनेंच वायु जल वगैरे (सर्वमहाभूतांना) सामर्थ्य प्राप्त होते. ॥ ४ ॥
तदेजति तन्नैजति तद्दूरे तद्वन्तिके ।
तत् एजति तत् न एजति - तो चालतोही आणि चालत नाहीही (सगुण रूपानें भक्तांसाठी कुठेही प्रकट होणे म्हणजे चालणे, आणि निर्गुण रूपाने सर्वथा अचल स्थितीत राहणे म्हणजे न चालणे. परस्पर विरोधी गुण व क्रिया करणे हे फक्त परमेश्वरालाच शक्य आहे). - तत् दूरे तत् अन्तिके - ते अति दूर आहेत (श्रद्धा, प्रेमरहित मनुष्यांसाठी त्यांचे दर्शन दुर्लभ आहे), तसेच अत्यन्त निकटही आहेत (भक्तांच्या ह्रुदयांत ?) - तत् अस्य सर्वस्य अंतः - जगतांतील प्रत्येक वस्तूत - तत् सर्वस्य उ बाह्यतः - आणि जगताच्या पलिकडेही. [ह्या सर्व अचिंत्य शक्त्या परमेश्वरी शक्तिचा एक अंशमात्र समजले जाते. थोडक्यात त्याचे स्वरूप व सामर्थ्य हे कल्पनातीत आहे] ॥ ५ ॥ पुढील दोन श्लोकांत ज्ञानी महात्म्याच्या स्थितीचें वर्णन -
यस्तु सर्वाणि भूतान्यात्मन्येवानुपश्यति । तु यः सर्वणि भूतानि आत्मनि एव अनुपश्यति - परंतु जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांना परमेश्वराचे ठिकाणी पाहातो - च सर्वभूतेषु आत्मानम् - तसेंच सर्व प्राणीमात्रांमध्ये परमेश्वराला (तेथे त्याचे अस्तित्व आहे अशा भावनेने) पाहातो - ततः न विजुगुप्सते - तो कुणाचाही द्वेष करीत नाही. ॥ ६ ॥
यस्मिन्सर्वाणि भूतान्यात्मैवाभूद्विजानतः ।
यस्मिन् विजानतः - अशा प्रकारे ज्याची मति झाली आहे - सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत - त्याला सर्व प्राणी एकमात्र परमात्मरूपच होतात - तत्र एकत्वम् अनुपश्यतः - असें सर्व प्राणीमात्रांस एकत्व (समभाव) रूपाने पाहाणार्या माहात्म्याला - कः मोहः कः शोकः - मग कशाचा मोह आणि कशाचे (कुणापासून) दुःख ? सर्वच आप्त, मग जें काही घडेल ती सर्व परमेश्वरी लीलाच. ॥ ७ ॥ अशा ज्ञानी माणसाला मग कसले फळ मिळते ? स पर्यगाच्छुक्रमकायमव्रणं अस्नाविरँ शुद्धमपापविद्धम् । सः शुक्रम् अकायम् अव्रणम् अस्नाविरम् शुद्धम् अपापविद्धम् पर्यगात् - तो महापुरुष परम तेजोमय, शरीररहित, क्षत रहित (कशाचाही परिणाम होत नाही असा), सच्चिदानंदस्वरूप (शुद्ध), शुभ-अशुभ परिणाम रहित अशा परमेश्वराला प्राप्त होतो - कविः मनिषीः परिभूः स्वयंभूः - जे सर्वद्रष्टा, सर्वज्ञ, सर्वनियंता स्वताःच्या इच्छेनें कुठेही केव्हांही प्रकट होऊं शकणारे आहेत, आणि - शाश्वतीभ्यः समाभ्यः यथातथ्यतः अर्थान् व्यदधात् - अनादि कालापासून सर्व प्राणीमात्रांच्या कर्मानुसार सर्व पदार्थांची उत्पत्ती करत आलेले आहेत (ईश्वर बहुतेक अशा महात्म्यांना प्रजापति म्हणून नेमत असेल) ॥ ८ ॥ पुढील तीन मंत्रात ’विद्या व अविद्या’ चें तत्त्व-वर्णन - पण आधी त्याची व्याख्या करणे आवश्यक आहे - परमेश्वर प्राप्ती हेतूनें केलेला शास्त्राभ्यास वा निष्काम कर्म म्हणजे ’विद्या’ आणि भोगांच्या प्राप्तिसाठी केलेला अभ्यास व काम्यकर्मे म्हणजे ’अविद्या’
अन्धं तमः प्रविशन्ति येऽविद्यामुपासते ।
ये अविद्याम् उपासते ते अन्धम् तमः प्रविशन्ति - जे लोक अविद्येची (भोगांच्या प्राप्तीसाठी साधनरूप कर्मांचे अनुष्ठान) उपासना करतात त्यांचा शेवटीं अज्ञानस्वरूप घोर अन्धकारांत प्रवेश होतो - ये विद्यायाम् रताः ते ततः उ भूयः इव तमः - आणि जे नुसत्या शास्त्रांचे पठण करून मिथ्याभिमानाने मत्त होऊन ’आमच्यासाठी काही कर्तव्य उरलेले नाही’ अशा अविर्भावात कर्तव्यकर्म न करतां, शास्त्र विपरीत कर्मात रत होतात, तेंही घोर नरकाला प्राप्त होतात. ॥ ९ ॥
अन्यदेवाहुर्विद्ययाऽन्यदाहुरविद्यया । धीराणाम् शुश्रूम ये नः तत् विचचक्षिरे - ज्या बुद्धिमान माहात्म्यांनी आम्हाला ह्याविषयी नीट व्याख्या करून सांगितले ते म्हणतात - विद्यया अन्यत् एव आहुः अविद्यया अन्यत् आहुः इति - की ज्ञानाच्या यथार्थ अनुष्ठानाने तसेच कर्माच्या यथार्थ अनुष्ठानाने (मागील मंत्रात सांगितलेल्या फळापेक्षा) वेगळे फळ सांगितले गेले आहे. ॥ १० ॥
विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयँ सह । यः तत् उभयम् विद्याम् च अविद्याम् च वेद - जो मनुष्य ज्ञानतत्त्व व अज्ञान-कर्म तत्त्व ह्या दोन्हींना यथार्थपणे जाणतो - अविद्यया मृत्युम् तीर्त्वा विद्यया अमृतम् अश्नुते - तो कर्तव्यकर्माचे अनुष्ठानाने मृत्युला पार करून ज्ञानाच्या अनुष्ठानाने अमृताची (परमेश्वराची) प्राप्ती करतो. [कर्म - अकर्म - विकर्म - नैष्कर्म्य - त्यांत आणि संचितकर्म व प्रारब्ध प्रभाव हें सर्व सोपे तर नाहीच, पण गोंधळ उडविणारे आहेत , तरीपण जाणून घेणे आवश्यक आहे. अतिशय सावधानता आणि विवेक गरजेचे आहे] ॥ ११ ॥ पुढील तीन श्लोक मागील तीन श्लोकांप्रमाणेच आहेत. विद्या-अविद्याच्या ऐवजी इथें सम्भूति-असम्भूति म्हटलेले आहे. सम्भूतिच्या अर्थाबद्दल बराच वाद आहे. इथें संभूति म्हणजे निर्विवाद, अमर्याद सत्ता असलेला (परमेश्वर, परब्रह्म इ.), आणि असंभूतिम् म्हणजे मर्यादित सामर्थ्याचे (इंद्र, वायु, क्षुद्र देवता वगैरे) असा घेतला आहे.
अन्धं तमः प्रविशन्ति येऽसम्भूतिमुपासते । ये सम्भूतिम् उपासते (ते) अन्धम् तमः प्रविशन्ति - मान, किर्ति, अधिकार, धन तसेच भोग्य वस्तूंच्या वृद्धीसाठी पितर, क्षुद्र देवता, व मनुष्यांची (नेता वगैरे) उपासना करणारे घोर नरकात जातात - ये सम्भूत्याम् रताः ते ततः उ भुयः एव तमः (प्रविशन्ति) - आणि जे इतर देव-देवींच्या उपासनेंत व्यग्र आहेत तेही अज्ञानरूपी घोर नरकांतच जातात. ॥ १२ ॥
अन्यदेवाहुः सम्भवात् अन्यदाहुरसम्भवात् । धीराणाम् शुश्रूम ये नः तत् विचचक्षिरे - ज्या बुद्धिमान माहात्म्यांनी आम्हाला ह्याविष्यी नीट व्याख्या करून सांगितले ते म्हणतात - सम्भवात् अन्यत् एव आहुः असम्भवात् अन्यत् आहुः इति - की ज्यांच्यासाठी पितर, देवता इत्यादींच्या उपासनेचे स्वरूप व हेतु ब्रह्मोपासना आहे त्यांच्यासाठी (मागील मंत्रांतील फळापेक्षा) वेगळे फळ सांगितले गेले आहे. ॥ १३ ॥
सम्भूतिं च विनाशं च यस्तद्वेदोभयँ सह । यः तत् उभयम् सम्भूतिम् च विनाशम् च सह वेद - जो मनुष्य अविनाशी परमेश्वर आणि विनाशशील क्षुद्र देवदेवता यांना यथार्थपणे जाणतो - विनाशेन मृत्युम् तीर्त्वा सम्भूत्याम् अमृतम् अश्नुते - तो विनाशशील देवादिंच्या उपासनेने मृत्युला पार करून अविनाशी परब्रह्माच्या उपासनेने अमृततत्त्वाची प्राप्ती करून घेतो (परमपद पावतो). ॥ १४ ॥
हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखम् । पूषन् सत्यस्य मुखम् - अखिल ब्रह्माण्डाचे पोषण करणाऱ्या सत्यस्वरूप परमेश्वरा तुझे मुख तर - हिरण्मयेन पात्रेण अपिहितम् - सुर्यमण्डळाच्या डोळे दिपवून टाकणाऱ्या तेजस्वी पात्राने झाकलेले आहे - सत्यधर्माय दृष्टये तत् त्वम् अपावृणु - मी तुझ्या सत् धर्माची भक्तिभावाने उपासना करतो आणि तुझ्या दर्शनासाठी आतूर आहे. तुं माझ्यासाठी त्यांत बाधा आणणारी सर्व प्रकारची आवरणें काढून टाक. ॥ १५ ॥
पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजः ।
पूषन् एकर्षे प्राजापत्य सूर्य - एकट्यानेंच सर्व भक्तांचे पोषण करणाऱ्या हे प्रजापति सूर्या, - रश्मिन् व्यूह तेजः समूहः - (तुझ्या किरणांचे तेज आमचे डोळे दिपवून टाकत असल्यामुळे) तुझ्या ह्या किरणांना एकत्र करून ते तेजस्वी किरण थोडा वेळ आवरून घे - यत् ते कल्याणतमम् रूपम् तत् ते पश्यामि - ज्या योगे तुझे जे अतिशय कल्याणमय दिव्य स्वरूप आहे ते मी आपल्या कृपेने पाहूं शकेन - यः असौ असौ पुरुषः अहम् सः अस्मि - (ज्ञानदृष्टी झाल्यावर भक्त म्हणतो) अरे हा जो सुर्याचा आत्मा आहे तो तर परम पुरुष परमात्माच आहे आणि तो तर मी स्वताःच असल्यासारखा भासतोय. ॥ १६ ॥
वायुरनिलममृतमथेदं भस्मांतँ शरीरम् । अथ वायुः अमृतम् अनिलम् - आतां हा प्राण आणि इन्द्रिये वायु तत्त्वात प्रवेश करोत - इदम् शरीरम् भस्मांतम् - हे स्थूल शरीर अग्निमध्ये भस्म होऊन जावो - ॐ क्रतो स्मर कृतम् स्मर - हे यज्ञमय परमेश्वरा, तुला माझे स्मरण राहो, तसेच मझ्याकडून घडलेल्या सत् कर्मांचे स्मरण राहो - ॐ क्रतो स्मर कृतम् स्मर - हे यज्ञमय परमेश्वरा, तुला माझे स्मरण राहो, तसेच मझ्याकडून घडलेल्या सत् कर्मांचे स्मरण राहो. ॥ १७ ॥
अग्ने नय सुपथा राये अस्मान्
अग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे आहात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो । १८ ॥ अग्ने अस्मान् राये सुपथा नय - हे अग्निच्या अधिष्ठातृ देवा, आम्हाला परमेश्वर धामाकडे जाण्यास सन्मार्गाने घेऊन चल - देव विश्वानि वयुनानि विद्वान् - हे देवा, तुम्ही आमच्या सर्व कर्मांना जाणणारे आहात - अस्मत् जुहुराणम् एनः युयोधि - आमच्या मार्गात येणारी कांही विघ्ने असतील तर ती त्वरीत दूर करा - ते भूयिष्ठाम् नम उक्तिम् विधेम - आपल्याला आमचा वारंवार नमस्कार असो । १८ ॥ ॥ इति ईशोपनिषत् ॥ |