|
॥ ऐतरेय उपनिषद् ॥ अध्याय पहिला ॐ वाङ् मे मनसि प्रतिष्ठिता । मनो मे वाचि प्रतिष्ठितं । आविरावीर्म एधि । वेदस्य म आणीस्थः । श्रुतं मे मा प्रहासीः । अनेन अधीतेन अहोरात्रान् संदधामि । ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि । तन्मामवतु । तद्वक्तारमवतु अवतु मां अवतु वक्तारं अवतु वक्तारं ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ वाक् मे मनसि प्रतिष्ठिता - वाणी माझ्या मनांत प्रतिष्ठित आहे(असो) - मनः मे वाचि प्रतिष्टितं - माझे मन माझ्या वाणीत प्रतिष्ठित आहे (असो) - आविः मे आविः एधि - हे देवा तू मला प्रत्यक्ष हो - मे वेदस्य आणीस्थः - मला वेदाचे ज्ञान दे - मे श्रुतं मा प्रहासी - माझे ज्ञान मला कधीही पारखे न होवो - अनेना धीतेन अहोरात्रान् संदधामि - ह्या अध्ययनाने मी दिवस-रात्र एक करीन (सतत म्हणजे अहोरात्र माझ्याकडून अध्ययन घडो) - ऋतं वदिष्यामि - शास्त्रानुसार जे काही सत्य आहे तेच मी बोलेन (माझ्या वाणीतून फक्त तेवढेच बाहेर पडो) - सत्यं वदिष्यामि - मी सदा व्यवहारिक सत्यच बोलेन - तत् मां अवतु - ते सत्य माझे रक्षण करो - तत् वक्तारं अवतु - ते गुरूचे रक्षण करो - यापुढील द्विरुक्ति आदरार्थ आहे. वाणी माझ्या मनांत प्रतिष्ठित आहे आणि माझें मन वार्णीत प्रतिष्ठित आहे (हे देवा) मला प्रत्यक्ष हो. मला वेदाचें ज्ञान दे. माझें ज्ञान मला न सोडो. ह्या अध्ययनानें मी अहोरात्र जोडीन. (अहोरात्र सारखें अध्ययन करीन ) मी शास्त्रीय सत्य बोलेन. व्यवहारिक सत्य बोलेन. तें सत्य माझें रक्षण करो. तें गुरूचें रक्षण करो. द्विरुक्ति आदरार्थ आहे. शान्ति असो. ॐ आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत् । नान्यत् किंचन मिषत् । स ईक्षत लोकान्नु सृजा इति ॥ १ ॥ हें (सर्व जगत्) प्रथमतः (उत्पत्तीच्या पूर्वी) आत्माच होतें. दुसरें व्यापारवान् असें कांहीच नव्हतें. आपण (भूरादि) लोक निर्माण करावे अशी त्याला इच्छा झाली. स इमान् लोकान् असृजत । अम्भः मरीचीः मरं आपो अदः अम्भः परेण दिवं द्यौः प्रतिष्ठाऽन्तरिक्षं मरीचयः ॥ पृथिवी मरो या अधस्तात् ताः आपः ॥ २॥ तो आत्मा हे लोक (पुढें सांगितलेले) उत्पन्न करिता झाला. हें अंभ म्हण्जे अंभोलोक, मरीचिलोक, मरलोक आणि आपलोक. अंभः म्हणजे द्युलोकाच्या पलीकडील (दिव्य आप) लोक. द्युलोक हें त्यांचे आश्रयस्थान होय. अन्तरिक्ष म्हणजे वातावरण हा मरीचिलोक. पृथ्वी हा मरलोक आणि (पृथ्वीच्या) खालीं जें पाणी आहे तो आपलोक होय. स ईक्षतेमे नु लोका लोकपालान्नु सृजा इति ॥ सोऽद्भ्य एव पुरुषं समुद्धृत्य अमूर्छयत् ॥ ३॥ हे लोक तयार झाले, (आतां) आपण लोकपाल उत्पन्न करावे अशी त्याला इच्छा झाली. त्यानें दिव्य आपापासूनच पुरुषाला वर काढून बनविलें. तं अभ्यतपत् तस्य अभितप्तस्य मुखं निरभिद्यत यथाऽण्डं मुखाद् वाग् वाचो अग्निः नासिके निरभिद्येतां नासिकाभ्यां प्राणः प्राणात् वायुः अक्षिणी निरभिद्येतां अक्षीभ्यां चक्षुः चक्षुषः आदित्यः कर्णौ निरभिद्येतां कर्णाभ्यां श्रोत्रं श्रोत्रात् दिशः त्वङ् निरभिद्यत त्वचो लोमानि लोमभ्य ओषधिवनस्पतयः हृदयं निरभिद्यत हृदयान्मनो मनसश्चन्द्रमा नाभिः निरभिद्यत नाभ्या अपानः अपानात् मृत्युः शिश्नं निरभिद्यत शिश्नात् रेतो रेतस आपः ॥ ४॥ ॥ इति ऐतरेयोपनिषदि प्रथमाध्याये प्रथमः खण्डः ॥ लोकांची उत्पत्ति झाल्यानंतर लोकपाल उत्पन्न करावेत अशी आत्म्याला इच्छा. ही इच्छा क्रमप्राप्तच होती. कारण उत्पन्न केलेले लोक स्थिर व कार्यक्षम व्हावेत असा हेतु असणें स्वाभाविक आहे. म्हणून लोकपालांची गरज भासू लागली. लोकपाल उत्पन्न करावयाचे म्हणजे हा एक सृष्टीचा प्रकार वेगळाच होतो. येथेंच जीवसृष्टीस प्रारंभ होतो. नुसती भुवनें उत्पन्न करण्यानें सृष्टीचें काय पूर्ण होत नाही. त्याला जीवलोकाची अपेक्षा असते; म्हणजे जडसृष्टि व जीवसृष्टि मिळूनच सृष्टि होते. या दोहोंला अनुलक्षूनच रयि व प्राण यांचे मिथुन प्रजापतीनें उत्पन्न केलें असें प्रश्नोपनिषदांत म्हटलें आहे. (प्रश्न १-४) लोकपाल उत्पन्न करण्याकरितां त्या दिव्य अपांतूनच कांही अंश काढून घेऊन त्यानें एक पुरुष (पिंड) तयार केला. ज्या दिव्य आपांतून जड सृष्टि उत्पन्न केली. त्यांतूनच जीवसृष्टीचा प्रारंभ केला आहे, हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. दिव्य आपाचें धनीभवन होऊन हा पिंड तयार झाला आहे. पहिल्या खंडाचा सारांश या खंडांत चार मंत्र आले आहेत. त्यांत सृष्टीच्या उत्पत्तीचें वर्णन थोडेसे झाले. बाकीचे वर्णन पुढील खंडांतून यावयाचे आहे. प्रस्तुत प्रकरणांत सृष्टी उत्पन्न करण्याविषयीची ईश इच्छा, लोकांची म्हणजे (त्रैलोक्याची) उत्पत्ति, दिव्य-आपाचें (ईथरचें) घनीभवन, लोकपालांची उत्पत्ति हे मुख्य मुद्दे आले आहेत. परमेश्वराने तयार केलेला पिंड म्हणजे सूर्यमंडलच असावें असें अनुमान करण्यास हरकत नाही. कारण या सूर्याच्या निरनिराळ्या अंशांपासून निरनिराळे लोक व लोकपाल उत्पन्न झाले असा या वर्णनाचा अभिप्राय आहे. आधुनिक शास्त्रांत देखील सूर्यातून निरनिराळे तुकडे सुटून वेगळे झाले व त्याचेच भूगोलासारखे अनेक गोल तयार झाले, असें सांगितले आहे. भौतिक शास्त्राच्या या अनुमानांचा श्रुतीच्या वर्णनाशी मेळ घालता येण्याजोगा आहे. ब्रह्मांडांतूनच सृष्टीक्रमानें उत्पन्न झालेला प्राणी ब्रह्मांडाच्या रचनेचा एक लहानसा नमुना आहे असें श्रुतीनें येथे दर्शविले आहे. प्रथमाध्याये द्वितीयः खण्डः ता एता देवताः सृष्टा अस्मिन् महत्यर्णवे प्रापतन् । तं अशनाया पिपासाभ्यां अन्ववार्जत् । ता एनं अब्रुवन् आयतनं नः प्रजानीहि यस्मिन् प्रतिष्ठिता अन्नं अदाम इति ॥ १ ॥ ताभ्यो गां आनयत् ता अब्रुवन् न वै नो अयं अलं इति । ताभ्यो अश्वं आनयत् ता अब्रुवन् न वै नो अयं अलं इति ॥ २ ॥ ताभ्यः पुरुषं आनयत् ता अब्रुवन् सुकृतं बतेति पुरुषो वाव सुकृतं । ता अब्रवीत् यथा आयतनं प्रविशतेति ॥ ३ ॥ अग्निर्वाग्भूत्वा मुखं प्राविशत् वायुः प्राणो भूत्वा नासिके प्राविशत् आदित्य चक्षुः भूत्वा अक्षिणी प्राविशात् दिशः श्रोत्रं भूत्वा कर्णौ प्राविशन् ओषधिवनस्पतयो लोमानि भूत्वा त्वचं प्राविशन् चन्द्रमा मनो भूत्वा हृदयं प्राविशन् मृत्युः अपानो भूत्वा नाभिं प्राविशत् आपो रेतो भूत्वा शिश्नं प्राविशन् ॥ ४ ॥ तं अशनायापिपासे अब्रूतां आवाभ्यां अभिप्रजानीहि इति ते अब्रवीदेतासु एव वां देवतासु आभजाम्येतासु भागिन्न्यौ करोमि इति । तस्मात् यस्यै कस्यै च देवतायै हविगृह्यते भागिन्यौ एवास्यां अशनायापिपासे भवतः ॥ ५ ॥ ह्या सर्व उत्पन्न केलेल्या देवता ह्या महान (विश्वरूपी) समुद्रांत पडल्या म्हणजे समाविष्ट झाल्या. परमात्मा त्याला म्हणजे त्या प्रथमोत्पादित विराट पुरुषाला क्षुधा व तृषा ह्यांनी संयोजित करिता झाला. त्या देवता ह्या परमेश्वराला म्हणाल्या कीं, आम्हाला स्थान निर्दिष्ट कर. (दाखीव) ज्या स्थानीं राहिलेल्या आम्ही अन्न भक्षण करू. दुसर्या खंडाचा सारांश. या खंडात देवता व पिंडातील निरनिराळी स्थानें यांचें संघटन, नरदेहाचें श्रेष्ठत्व ,व पिंडांतील निरनिराळी स्थानें यांचे संघटन , नरदेहाचे श्रेष्ठत्व , व विकारांची अस्वतंत्रता हे विषय आले आहेत. ब्रह्मांडामध्ये ज्या मुख्य मुख्य देवता सृष्टीचे व्यापार करीत आहेत त्या देवतांच्या शक्तीनां नरदेहासारखें परिपूर्ण असें स्थान इतर कोणत्याहि शरीरात प्राप्त झालेलें नाही. म्हणजे नाना-विविध प्राण्यांच्या देहांत कांही थोड्या शक्ति प्रगट होतात. परंतु मानवी देहांमध्ये मात्र सर्व शक्तींना वाव मिळतो. हेंच मनुष्यदेहाच्या श्रेष्ठत्वाचें मुख्य कारण होय ; असा श्रुतीचा अभिप्राय आहे. उत्क्रांतीच्या नियमांत देखील असेंच मानलें जातें की, मनुष्य हेंच सर्व प्राण्यांचे उत्क्रांत स्वरूप होय. याबाबतीत आधुनिक शास्त्रांचे सिद्धांत अत्यंत सूक्ष्म व तपशीलदार मांडले गेले आहेत. तथापि श्रुतीच्या अर्थाशी त्यांचा स्थूल मानाचे मेळ घालता येतो. ही खरोखर आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. बैल व घोडा या दोहोंचाच येथें निर्देश केला आहे. त्यावरून त्यांच्या अवयवांचे अस्थि-रचनेचें मानवी शरीराशी विशेष सादृश्य आहे. असे वैदिक ऋषींना आढळून आले असावे; असें अनुमान करता येईल. प्रथमाध्याये तृतीयः खण्डः ॥ स ईक्षत इमे नु लोकाश्च लोकपालाश्च अन्नमेभ्यः सृजा इति ॥ १॥ तो (परमात्मा) विचार करिता झाला कीं, हे (भूरादि) लोक आणि लोकपाल (अग्न्यादिदेवता) उत्पन्न केल्या. ह्यांच्याकरितां अन्न उत्पन्न करावें. लोक व लोकपाल किंवा जडपदार्थ व शक्ति यांचा संयोग झाल्यानंतर क्रियेला सुरवात झाली. क्रियेला प्रारंभ झाला म्हणजे झीज सहजच सुरू होते; आणि तीमुळेंच अनुकूल परमाणूंच्या संग्रहाची म्हणजेच अन्नाची गरज उत्पन्न होते. मानवी जीवितांत देखील जी अंतर्बाह्य हालचाल चालू असते तीमुळेंच त्याच्या शरीरांतील कांही भाग झिजून नाहींसे होतात. आणि क्षुधा. तृषा, इत्यादि विकारांचा प्रादुर्भाव होतो मनुष्यानें योग्य अन्नपाण्याचें सेवन केलें म्हणजे अवश्य त्या सामग्रीची भरती झाल्यावर शरीराचे व्यापार सुरळीत चालूं लागतात. कांही थोड्याशा फरकानें जडपदार्थात देखील ही स्थिति आढळून येईल. ग्रहण व विसर्जण या क्रिया प्रमाणशीर चालतात, तोपर्यंतच मनुष्याचा देह कार्य क्षम असतो. या दोन क्रियांत वैषम्य उत्पन्न झालें असतां मानवी शरीराचा र्हास होऊन तें नष्ट होण्याच्या पंथाला लागते. यावरून प्राण्यांप्रमाणें इतर सर्व पदार्थाना देखील अन्नाची अपेक्षा सारखीच असते असें म्हणण्यास हरकत नाही. निरनिराळे गोल व देवता यांचा संयोग झाला व तदनुसार क्रियाही सुरू झाल्या, आणि साहजिकच अन्नाची गरज भासू लागली; म्हणून परमेश्वरानें अन्न उत्पन्न करण्याचा विचार केला असा या मंत्राचा अभिप्राय आहे. सोऽपोऽभ्यतपत् ताभ्योऽभितप्ताभ्यो मूर्तिः अजायत । या वै सा मूर्तिरजायत अन्नं वै तत् ॥ २ ॥ त्या परमात्म्यानें दिव्य आप तापविलें. त्या तापलेल्या आपापासून एक पिंड उत्पन्न झाला. जो हा पिंड उत्पन्न झाला तेंच अन्न होय. ज्याप्रमाणें लोकपाल उत्पन्न करण्याकरिता ईथरसारख्या दिव्य आपाचें घनीभवन करून परमेश्वरानें एक पिंड उत्पन्न केला. त्याप्रमाणेंच पुन्हां त्याच दिव्य आपांतून एक मूर्ति निर्माण केली हेंच अन्न होय. येथें मूर्तिशब्दाचा अभिप्राय असा दिसतो कीं, क्रियावान व क्रियाश्रय असें हें अन्नद्रव्य उत्पन्न केलें. म्हणजे प्राणि व वनस्पति ही जरी सजीव सृष्टि असली; तथापि तेंच पिंडब्रह्मांडाला अन्न म्हणून देण्यांत आले. तत् एनत् सृष्टं पराङ्त्यजिघांसत् तत् वाचा अजिघृक्षत् तत् न अशक्नोत् वाचा ग्रहीतुं । स यद् ही एनत् वाचा अग्रहैष्यत् अभिव्याहृत्य ह एव अन्नं अत्रप्स्यत् ॥ ३ ॥ तें हें उत्पन्न केलेलें अन्न मागें सरूं लागलें. त्याला हा (लोक लोकपालसमूहस्वरूप विराट पुरुष) वाणीनें ग्रहण करण्याची इच्छा करूं लागला. तें वाणीनें ग्रहण करूं शकला नाहीं. त्याने जर तें वाणीनें ग्रहण केलें असतें तर बोलण्यानेंच अन्नविषयक तृप्ति झाली असती. तत् प्राणेन अजिघृक्षत् तत् न अशक्नोत् प्राणेन ग्रहीतुं स यत् ह एनत् प्राणेन अग्रहैष्यत् अभिप्राण्य ह एव अन्नं अत्रप्स्यत् ॥ ४ ॥ त्यानें प्राणाच्या साह्यानें अन्न घेण्याची इच्छा केली; पण ती सफल झाली नाहीं. जर प्राणाच्या साह्यानें अन्न ग्रहण करतां आले असतें तर तो वास घेऊनच तृप्त झाला असता. तत् चक्षुषा अजिघृक्षत् तत् न अशक्नोत् चक्षुषा ग्रहीतुं स यत् ह एनत् चक्षुषा अग्रहैष्यत् दृष्ट्वा ह एव अन्नं अत्रप्स्यत् ॥ ५ ॥ त्यानें नेत्रांच्या साहाय्यानें अन्न घेण्याची इच्छा केली; पण ती सफल झाली नाही. जर त्याला चक्षूंच्या साहाय्यानें अन्नग्रहण करतां आलें असतें तर अन्न पाहून त्याची तृप्ति झाली असती. तत् श्रोत्रेण अजिघृक्षत् तत् न अशक्नोत् श्रोत्रेण ग्रहीतुं स यत् ह एव एनत् श्रोत्रेण अग्रहैष्यत् श्रुत्वा ह एव अन्नं अत्रप्स्यत् ॥ ६ ॥ त्यानें कर्णसाहाय्यानें अन्न घेण्याचा व्यर्थ प्रयत्न केला. जर तो सिद्धीस गेलाच असता, तर अन्नाचें श्रवण होऊन मात्र त्याची तृप्ति झाली असती. तत्त्वचा अजिघृक्षत् तत् न अशशक्नोत् त्वचा ग्रहीतुं स हत् ह एनत् त्वचा अग्रहैष्यत् स्पृष्ट्वा ह एव अन्नं अत्रप्स्यत् ॥ ७ ॥ त्यानें त्वचेच्या साहाय्याने अन्नग्रहणाचा अयशस्वी प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाला असता तर स्पर्शमात्रेंच त्याची तृप्ति झाली असती तत् मनसा अजिघृक्षत् तत् न अशक्नोत् मनसा ग्रहीतुं स यत् ह एनत् मनसा अग्रहैष्यत् ध्यात्वा ह एव अन्नं अत्रप्स्यत् ॥ ८ ॥ त्यानें मनानें अन्नग्रहणाचा अयशस्वी प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाला असता तर अन्नचिंतनानें मात्र त्याची तृप्ति झाली असती तत् शिश्नेन अजिघृक्षत् तत् न अशक्नोत् शिश्नेन ग्रहीतुं स यत् ह एनत् शिश्नेन अग्रहैष्यत् विसृज्य ए एव अन्नं अत्रप्स्यत् ॥ ९ ॥ त्यानें अन्न ग्रहण करण्याचा शिश्नाच्या साहाय्यानें व्यर्थ प्रयत्न केला. जर ह्या रितीनें त्याला अन्न ग्रहण करतां आलें असतें, तर अन्नाचें विसर्जन करूनही त्याची क्षुधा-शांति झाली असती. तत् अपानेन अजिघृक्षत् तत् आवयत् स एषो अन्नस्य ग्रहो यत् वायु अन्नायुः वा एष यद्वायुः ॥ १० ॥ तें अपानवायूनें ग्रहण करण्याची इच्छा करिता झाला. (तेव्हां) तें त्याच्या पोटांत गेलें. तो हा (अपानवायु) अन्नाचा ग्राहक आहे. जो हा वायु तोच अन्नजीवी वायु आहे. स ईक्षत कथं अनु इदं मदृते स्यादिति स ईक्षत कतरेण प्रपद्या इति । स ईक्षत यदि वाचा अभिव्याहृतं यदि प्राणेन अभिप्राणितं यदि चक्षुषा दृष्टं यदि श्रोत्रेण श्रुतं यदि त्वचा स्पृष्टं यदि मनसा ध्यातं यदि अपानेन अभ्यपानितं यदि शिश्नेन विसृष्टं अथ कोऽहमिति ॥ ११ ॥ नंतर त्या परमेश्वरानें विचार केला की, मी कोण असें जरी वाणीनें म्हटलें; प्राणानें श्वासोच्छ्वास केला; डोळ्यांनी पाहिलें; कानांनीं ऐकलें ; त्वचेनें स्पर्शिलें , मनानें ध्यान केलें; अपानानें गिळलें; शिश्नानें टाकलें तरी मी चालक असल्याशिवाय हें कसें होईल (ह्यांना ज्ञान कसें होईल). त्यानें विचार केला कीं कोणत्या द्वारानें प्रवेश करावा. स एतं एव सीमानं विदार्यैतया द्वारा प्रापद्यत । सा एषा विदृतिर्नाम द्वाः तत् एतद् नान्दनं । तस्य त्रय आवसथाः त्रयः स्वप्ना अयं आवसथः अयं आवसथः अयं आवसथ इति ॥ १२ ॥ देवतांचे व्यापार सुरू झाले, अन्न भक्षणासही प्रारंभ झाला, तथापि मनुष्याच्या वैयक्तिक जीविताचें स्वरूप अद्यापि निश्चित झालें नाहीं. कारण ,ज्ञान व कर्म यांचें सहकार्य झाल्याखेरीज तें निश्चित होणें अशक्य आहे. वाणी, प्राणी, चक्षु इत्यादि इंद्रियांचे यथायोग्य व्यापार सुरूं असले तरी तेवढ्यानें मनुष्यत्वाचा निश्चिय होत नाहीं, त्याला ज्ञानयुक्तकर्माची आवश्यकता असते; आणि , ज्ञानयुक्तकर्मास बुद्धीची गरज लागते, म्हणून ही बौद्धिक शक्ति प्रगट होण्याकरितां परमेश्वराला या देहांत अंशरूपानें प्रवेश करणें अवश्य आहे. असें दिसून आलें. कारण त्यावांचून अहंप्रत्ययाचीही पूर्णता होत नाहीं; परंतु या देहांत प्रवेश करावयाचा झाल्यास कोणत्या द्वारानें करावा या विषयीं तो परमेश्वर विचार करूं लागला. स जातो भूतानि अभिव्यैख्यत् किं इह अन्यं वावदिषदिति । स एतं एव पुरुषं ब्रह्म ततं अपश्यत् इदं अदमदर्शं इति ॥ १३ ॥ उत्पन्न झालेला तो जीवात्मा ह्या जगांत माझ्याशिवाय दुसरें काय (आहे असें) म्हणावें अशा दृष्टीनें सर्व सृष्टी पदार्थाचें निरीक्षण करिता झाला. (तेव्हां) विराट पुरुष हेंच व्यापक ब्रह्म असें दिसून आलें व हें दिसलें म्हणून त्याला आश्चर्य वाटलें. तस्माद् इदन्द्रो नाम इदन्द्रो ह वै नाम तं इदन्द्रं सन्तं इन्द्र इति आचक्षते परोक्षेण परोक्षप्रिया इव हि देवाः परोक्षप्रिया इव हि देवाः ॥ १४ ॥ म्हणून इदम् (हें) द्र (द्रष्टा) म्हणजे ह्या सर्व जगाचा द्रष्टा जो परमेश्वर त्यालाच अप्रत्यक्षपणें इन्द्र असें म्हणतात. कारण देवांना अप्रत्यक्षपणाच आवडतो (द्विरुंक्ति समाप्ति दर्शक) ह्या प्रमाणें ऐतरेयोपनिषदांतील तिसरें खण्ड व पहिला अध्याय समाप्त झाला. मानवी शरीरांत ईश्वरांश प्रगट झाला आणि मानवी बौद्धिक सामर्थ्य जागृत होऊन तो विकास पावण्यास पात्र झाला. या बुद्धीच्या साहाय्यानें मनुष्य ब्रह्मसाक्षात्कारास समर्थ झाला. हें दिव्य सामर्थ्य मानवी बुद्धीत ज्याच्यामुळे प्राप्त झालें तोच या मानवी देहाचा खरा स्वामी किंवा क्षेत्रज्ञ होय. त्यालाच प्रस्तुत मंत्रांत इंद्र असें म्हटलें आहे. इंद्रशब्दाची व्युत्पत्ति दर्शविण्याकरितां त्याचे इदं आणि द्र असे दोन भाग पाडले आहेत. पिंडब्रह्मांडाचा द्रष्टा म्हणजे अघ् असा त्याचा अर्थ केला आहे. पाणिनि महर्षीनें इंद्रशब्दाची व्युत्पत्ति वेग केली आहे. ती अशी-इंद्र शब्दांत इद हा घातु असून त्याचा परमैश्वर्य म्हणजे सत्ताधीश असा अर्थ दिला आहे. प्रकृतिप्रत्ययांचे बाबतींत पाणीनीचा श्रुतीशीं किर्ति मतभेद दिसला तरी. दोहोंच्या अर्थात फारसा फरक नाही. इंद्+र असे परिनीय विभाग असून इदं+द्र हे श्रौतविभाग आहेत. हा शब्दिक फरक आहे. कदाचित् ऐतरेयाला प्राचीन वैदिक वाड़्मयांत इंद्र शब्दाच्या ऐवजी इदंद्र शब्द आढळला असेल , त्याचा इंद्र रूढ शब्दाशी मेळ घालून दाखविला आहे. असा तर्क करण्यास हरकत नाही. इंद्र असा शब्दोच्चार केला तरी तो अप्रत्यक्षपणें इदंद्र या शब्दाचाच उच्चार होतो असें सांगून देव हे अप्रत्यक्ष व्यवहार चाहते असतात. म्हणून त्याचे समर्थन केले आहे. ’परीक्षप्रिया इव हि देवा ’ हा वैदिक वाड़्मयांतील वाक्यप्रचारच आहे असें दिसतें कारण ही शब्दयोजना वेदांत अनेक ठिकाणी आली आहे याप्रमाणें पिंडब्रह्मांडात्मक सृष्टीचें वर्णन करून श्रुतीने हे खंड समाप्त केलें आहे. ] तिसर्या खंडाचा सारांश या खंडाचे चौदा मंत्र आहेत. परमेश्वराने लोकपालांकरिता अन्न उत्पन्न करण्याचा संकल्प केला. या वाक्यापासून वाक्यास सुरवात होते. लोक व लोकपाल म्हणजे निरनिराळे गोल व शक्ति यांचा संयोग झाल्यावर. सृष्टिव्यापाराला प्रत्यक्ष सुरवात झाली. यानंतर क्षुधा , तृषादि विकारांची उत्पत्ति होणे क्रमप्राप्तच होते. गरज उत्पन्न झाली असें पाहून परमेश्वराने सृष्टीच्या मूलभूत विरल द्रव्यांपासून (दिव्य आपांची) एक मूर्ति बनविली. मागणी व पुरवठा हा नियम या निसर्गरचनेत देखील पूर्णपणे दिसून येतो. परमेश्वराला इच्छा झाली व त्याने अमुक केले, अशा अर्थाची शब्दयोजना श्रुतीमध्यें दिसून आली; तथापि तीवरून निसर्गरचनेतील शास्त्रीय कार्यकारणभावाला बाध येतो असे मानण्याचें कारण नाही. परमेश्वराने मूर्ति बनविली याचा अर्थ निसर्गातील भौतिकक्रियेने एक मूर्ति बनली किंवा या रीतीने तयार झालेल्या मूर्तीचा अन्न म्हणून मनुष्य उपयोग करूं लागला असा अर्थ केला, तरी श्रुतिप्रामाण्यास अगर ईश्वराच्या सृष्टीकर्त्रृत्वास कमीपणा येऊं शकत नाही. कारण ती एक प्राचीन वैदिक वाड़्मयांतील भाषापद्धति आहे. पाऊस पडतो याविषयीसुद्धां बोलतांना ईश्वरच पर्जन्यवृष्टी करतो असें पर्जन्यवृष्टीचा आधिभौतिक कार्यकारणभाव जाणणारा असून देखील वैदिक ऋषि म्हणेल. तेवढ्यावरून त्याला पर्जन्यवृष्टीचा शास्त्रीय कार्यकारणभाव माहीत नव्हता किंवा अमान्य नव्हता असें समजण्यास कारण नाही. जी गोष्ट मनुष्याचे हातून प्रत्यक्ष घडत नाही ती सृष्टिव्यावारानें घडते असें म्हणण्याची वैदिक ऋषींची रूढीच होती. या रूढीला अनुसरूनच या सृष्टीरचनेच्या वर्णनांत मनुष्याप्रमाणेंच ईश्वराचे कर्तृत्व वर्णन केले आहे. द्वितीयोऽध्यायश्चतुर्थः खण्डः । ॐ पुरुषे ह वा अयं आदितो गर्भो भवति यत् एतत् रेतः । तत् एतत् सर्वेभ्यो अंङ्गेभ्यः तेजः संभूतं आत्मनि एव आत्मानं बिभर्ति तत् यदा स्त्रियां सिञ्चति अथ एनत् जनयति तत् अस्य प्रथमं जन्म ॥ १ ॥ जें हे शुक्र तें पुरुषाच्या ठिकाणीं पहिला (गर्भ गर्भाची प्रथमावस्था). तें हें (शुक्र) सर्व अवयवांपासून झालेलें सारभूत तेज स्वतःला स्वतःच्याच ठिकाणीं धारण करितें. (स्वतःचे धारक असते) तें जेव्हां पुरुष स्त्रीच्या ठिकाणीं सिंचन करितो तेव्हां त्या शुक्राला तो जन्म देतो. हा त्याचा पहिला जन्म होय. तत्स्त्रिया आत्मभूयं गच्छति यथा स्वमङ्गं तथा तस्मात् एनां न हिनस्ति । सा अस्य एतं आत्मानं अत्र गतं भावयति ॥ २ ॥ तें (शुक्र) स्त्रीच्या इतर अंगांप्रमाणेंच आत्मस्वरूपाला प्रात्प होते. म्हणून तें तिला बाधा करीत नाही. ती त्याला (शुक्राला) त्याचा (पुरुषाचा) हा आत्मा येथें (आपल्या उदरांत) आहे असे समजून त्याचें रक्षण करिते. सा भावयित्री भावयितव्या भवति । तं स्त्री गर्भं बिभर्ति । सोऽग्र एव कुमारं जन्मनो अग्रे अधिभावयति । स यत्कुमारं जन्मनो अग्रे अधिभावयति आत्मानं एव तद्भावयति एषां लोकानां सन्तत्या । एवं सन्तता हि इमे लोकाः तत् अस्य द्वितीयं जन्म ॥ ३ ॥ शुक्र शोणितांचा संयोग होऊन बुद्बुद किंवा बिंदू तयार होतो. तो मातेच्या उदरांत वृद्धिंगत होत असतांना तिला मुळींच पीडा करीत नाही. कोणताही पदार्थ बाहेरून शरीरांत शिरल्यास तो जसा शरीराला त्रासदायक होतो, किंवा एकाद्या भागावर गळू उत्पन्न झाल्यास त्यापासून जशी पीडा होते. तशी या गर्भापासून मातेला पीडा उत्पन्न होत नाही. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणें हा गर्भ देखील मातेच्या शरीरांतील एका अवयवासारखाच बनतो. स्वतःच्या उदरांत उत्पन्न झालेला गर्भ आपल्या पतीचा आत्मा आहे असे समजून गर्भिणी स्त्री त्याची काळजी घेते. स्त्रियांची मनोरचना भावनाप्रधान असल्यामुळे समागमकाली स्त्रीच्या अंतःकरणांत पतीच्या प्रतिबिंबाचा कायमचा ठसा उमटतो व या संस्काराचा गर्भावर परिणाम होतो, असें तज्ज्ञ म्हणतात. मंत्राच्या दुसर्या वाक्यांत हाच अभिप्राय श्रुतीने ध्वनित केला आहे. कालिदासानें रघुवंशातील चौदाव्या सर्गीत सीतेच्या तोंडी अशाच अर्थाचे वाक्य घातले आहे. r>गर्भ संरक्षण करणारी ती (गर्भिणी स्त्री) संरक्षणीय असते (त्या योगें) ती स्त्री त्या गर्भाचें धारणपोषण करते. (धारणपोषण करण्यास समर्थ होते) तो पति अपत्यजन्माच्या पूर्वीच पुत्राचे संस्कार करतो (पुत्राची भावना ठेवतो) तो जो जन्माच्यापूर्वींच पुत्राचा संस्कार करतो. तो आत्म्याचाच संस्कार करतो अशारीतीनें या मनुष्यांच्या परंपरेनें हे लोक संतत म्हणजे अविच्छिन्न (असतात) तें (हें) त्याचे दुसरें जन्म होय. गर्भवती स्त्रीचे पतीने व कुटुंबातील इतर मनुष्यांनीही काळ्जीपूर्वक संरक्षण करावें अशी श्रुतीची स्पष्ट आज्ञा आहे. ती आधुनिक शास्त्रीय दृष्ट्या देखील अत्यंत महत्वाची आहे. भवभूतीनें उत्तररामचरित्राच्या पहिल्या अंकांत निरनिराळ्या भाषण प्रसंगांनी हा अभिप्राय चांगला प्रगट केला आहे. या गर्भधारणेच्या कालांत पतीने गर्भसंस्कार करावेत असा दुसर्या वाक्यांत अभिप्राय ध्वनित होतो. गृह्यसूत्रकारांनी जे गर्भसंस्कार सांगितले आहेत तेच येथें विवक्षित आहेत; असें निश्चयानें मानितां यावयाचे नाही. कारण सूत्रोक्त शाडेश संस्कार ऐतरेयाच्या कालांत जसेच्या तसेच सुरू होते की काय हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. तथापि संस्काराचे प्रयोग वेगळे असले तरी कोणते तरी गर्भसंस्कार सुरू होते, असे निश्चित समजण्यास हरकत नाही. पुंसवन या नांवाचा एक गर्भसंस्कार प्रसिद्ध आहे, तो मात्र प्रस्तुत मंत्रांत अभिप्रेत आहे; असें मंत्रांतील कुमार शब्दावरून दिसतें. गर्भरूपानें पतीचा आत्माच रूपांतर पावला असल्यामुळें पर्यायानें हे गर्भसंस्कार पतीच्या आत्म्याचेच होत असें श्रुतीनें म्हटले आहे. अनेक प्रकारचें संगोपन व संस्कार इत्यादिकांनी गर्भ पूर्णावस्थेस येऊन मनुष्याचा जन्म होतो. अशा रीतीने ही मानवी परंपरा अखंड राहाते. मानववंशाची ही परंपरा अखंड व शुद्ध राखणें हें प्रत्येक मनुष्याचें कर्तव्य होय. शास्त्रोक्त रीतीनें वंशपरंपरा अविच्छिन्न राखण्यानेंच पितरांचे ऋण फिटतें असा वैदिक धर्माचा सिद्धांत आहे. हा या जीवाचा दुसरा जन्म होय. सो अस्य अयं आत्मा पुण्येभ्यः कर्मभ्यः प्रतिधीयते । अथ अस्य अयं इतर आत्मा कृतकृत्यो वयोगतः प्रैति । स इतः प्रयन्नेव पुनर्जायते तत् अस्य तृतीयं जन्म ॥ ४ ॥ (जन्माला आलेला) तो हा त्याचा (पित्याचा) आत्मा पुण्यकारक कर्माकरतां प्रतिनिधी होतो. नंतर त्याचा हा (पितृरूप) आत्मा कृतकृत्य (होऊन) पूर्ण आयुष्य (असा होत्साता) मरण पावतो. तो या देहांतून मरण पावतांच पुन्हा जन्म घेतो तो याचा तिसरा जन्म होय. या मंत्राची अर्थयोजना बरीच गुंतागुंतीची बरीच गुंतागुंतीची आहे तिसरा जन्म समजावयाचा तो पिता व पुत्र या दोघांचा मिळून समजावयाचा किंवा पित्याचाच समजावयाचा हा प्रश्न आहे, ’इतरः’ या पदावरून मरण पावल्यानंतर पिता जो पुनर्जन्म घेतो तोच तिसरा जन्म होय असें मानल्यास पहिले दोन जन्म पुत्राचे व पित्याचा पुनर्जन्म हा तिसरा जन्म असें म्हणावें लागते. दोघांचे मिळून तीन जन्म ठरल्यास एकाच जीवात्म्याची तीन स्थित्यंतरें होतात. या पूर्वीच्या विधानास विरोध येतो. पिता व पुत्र हे एकरूप आहेत; असें मानलें तर या विरोधाचा परिहार करतां येतो. तथापि पहिल्या अध्यायाच्या तिसर्या खंडांतील बाराव्या मंत्राशी ही कल्पना सर्वांशी जुळत नाही. म्हणून गर्भावस्था व पुत्रजन्म हें पित्याचेच जन्म मानून पुनर्जन्म हा तिसरा जन्म समजावा. असे केल्यास पूर्वीच्या विधानाशी या मंत्रांतील अभिप्राय सुसंगत होतो. पुत्र हा पित्याच्या सत्कर्माचा प्रतिनिधी होय, असे श्रुतीने म्हटले आहे. त्याचें तात्पर्य असे की, केवळ पुत्रजन्माने पितरांचे ऋण फिटत नसून तो पुत्र पुण्यशील झाला म्हणजेच पितरांचे ऋण फिटते असा श्रुतीचा अभिप्राय आहे. पुत्र कर्तव्यपरायण झाला म्हणजेच पित्याला धन्यता वाटते. यावरून शास्त्रशुद्ध संतति निर्माण करणें व उत्पन्न झालेली संतति कर्तव्यपरायण करणे हा पित्याचा एक विशिष्ट धर्मच ठरतो व हा आपला धर्म यशस्वी झाला तर पित्याला धन्यता वाटणें साहजिक आहे. त्याविषयी ऋषीनें असे म्हटले आहे. ह्या देवांची (अग्न्यादि देवतांची) सर्व जन्में मी गर्भात असतानांच क्रमाने जाणिली. पूर्वी शेकडो लोखंडी म्हणजे दुर्भेद्य शरीरें माझें रक्षण करीत होती. बहिरी ससाण्याप्रमाणें मी ती वेगानें तोडून बाहेर पडलो असे वामदेव ऋषि गर्भात पडलेला असताना ह्याविषयीं म्हणाला. तत् उक्तं ऋषिणा गर्भे नु सन् अन्वेषां अवेदं अहं देवानां जनिमानि विश्वा शतं मा पुर आयसीः अरक्षन् अधः श्येनो जवसा निरदीयं इति । गर्भ एव एतत् शयानो वामदेव एवं उवाच ॥ ५ ॥ हा मंत्र फारच प्राचीन आहे. परंपरागत कथा सांगावी त्याप्रमाणें येथे वामदेवाची हकीकत सांगितली आहे. वामदेवाला गर्भात असतानांच देवांचे सर्व जन्म समजले मागील अध्यायात देवतांच्या उत्पत्तीचें वर्णन केले आहे. त्या अग्नि प्राण इत्यादि देवता कशा उत्पन्न झाल्या तें वामदेवास जन्माच्या पूर्वीच कळलें होते. या देवतांच्या उत्पत्तीचें ज्ञान होण्याला त्यांचे मूलकारण जें परमात्मतत्व त्याचेंही ज्ञान झालें असले पाहिजे हें उघड आहे. कारणाचें ज्ञान असल्यावांचून कार्याच्या उत्पत्तीचें ज्ञान होणें अशक्य आहे. त्यावरून परमात्मा व त्याने उत्पन्न केलेली देवतासृष्टि यांचे ज्ञान वामदेवास गर्भात असतांनांच झाले होते, असें पहिल्या वाक्याचें तात्पर्य आहे. या ज्ञानविज्ञानाच्या सामर्थ्यानें मनुष्यजन्माला येण्याचे पूर्वी जी मोठी व बळकट पश्र्वादिकांची शरीरें आपणाला प्राप्त झाली होती , त्यांतून मी मोठ्या जोरानें बाहेर पडलो, असें वामदेव म्हणतो. मनुष्यजन्म व मानवी देहांत असलेली ज्ञानविज्ञानसंपन्न अशी दिव्य बुद्धि यांचे महत्व या वामदेवाच्या वाक्यावरून दर्शविले आहे. ती दोनही वाक्ये वामदेवानें गर्भात असतानांच उच्चारली असे मंत्राच्या शेवटी म्हटले आहे. या सर्व विवेचनाचे तात्पर्य इतकेच की अमृतत्व संपादन करण्यास पात्र असलेल्या या नरदेहाचें महत्व वामदेवाला जन्माचे पूर्वीच कळले होतें. स एवं विद्वान् अस्मात् शरीरभेदात् ऊर्ध्व उत्क्रम्य अमुष्मिन् स्वर्गे लोके सर्वान् कामान् आप्त्वा अमृतः समभवत् समभवत् ॥ ६ ॥ त्याप्रमाणें ज्ञानसंपन्न झालेला तो (वामदेव ऋषि) ह्या शरीराचा पात झाल्यावर वर जाऊन त्या स्वर्गलोकांत सर्व इच्छा तृप्त होऊन अमृतरूप झाला.(द्विरुक्ति समाप्ति दर्शक.) ह्याप्रमाणें ऐतरेयोपनिषदांतील चौथा भाग व दुसरा अध्याय समाप्त झाला. वामदेव ऋषि हा जन्मसिद्ध ज्ञानी होता. त्याच्या ज्ञानाचे फल त्याला कसे प्राप्त झाले हें येथें सांगितले आहे. वामदेवाला अमृतत्व प्राप्त होण्याचे पूर्वी स्वर्गलोक प्राप्त झाला व तेथें त्याचे सर्व मनोरथ पूर्ण झाले. व मगच तो अमृतत्व पावला. असें मंत्राचे शेवटी सांगितले आहे. त्यावरून निःश्रेयसाच्या जोडीला अभ्युद्याचाही उल्लेख झाला आहे हें लक्षांत ठेविले पाहिजे. ’उत्कम्य’ या पदाचा अर्थ मरणोत्तर (असा न करतां ब्रह्मसाक्षात्कार झाल्यानंतर असा केल्यास हा अभ्युद्य ऐहिक स्वरूपाचा आहे असेंही म्हणता येईल. उर्ध्वशब्दाच्या सान्निध्यानें वर दिलेला अर्थ संभवनीय आहे. याप्रमाणें वामदेवाची हकीगत सांगून श्रुतीनें ज्ञानविज्ञानाचें महत्व दर्शविलें आहे, त्यावरून पिंडब्रह्मांडाचें ज्ञान व अध्यात्मज्ञान ही दोनही ज्ञाने मनुष्यानें अवश्य संपादन करावित असा त्याचा अभिप्राय आहे. द्वितीय खंडाचा सारांश या अध्यायांत एकच खंड असून त्याचे सहा मंत्र आहेत. यांत गर्भशास्त्राचें मुख्यत्वेंकरून विवेचन झाले आहे. सुप्रजाजननशास्त्राच्या दृष्टीने हे प्रकरण अत्यंत महत्वाचे आहे. स्त्री व पुरुष ही विवाहसंस्काराने सबंद्ध झाली तरच शुद्ध संतति उत्पन्न होते असे तिसर्या मंत्रांत दर्शविले आहे. गर्भधारणेस प्रारंभ झाल्यापासून गर्भीणीचें अत्यंत काळजीपूर्वक संरक्षण करावयास पाहिजे असा श्रृतीचा अभिप्राय आहे. तिची शारीरिक व मानसिक परिस्थिति उत्तम राखल्यास त्याचे गर्भावरही उत्तम संस्कार होतात. अशा रीतीने मूल जन्माला येण्याचे पूर्वीपासूनच जर मातापितरांनी काळजी घेतली तर प्रजा उत्कृष्ट निपजण्यास कोणताच प्रतिबंध यावयाचा नाही. गर्भ व गर्भिणी यांचे याप्रमाणें शास्त्रशुद्ध रीतीने संरक्षण करावयाचे म्हटलें तर गर्भवती मातेने व पित्याने आत्मसंयमपूर्वक अत्यंत शुद्ध आचरण ठेवणे फारच अगत्याचे आहे. मातापितरांनी अशी काळजी घेतली म्हणजेच संतति तेजस्वी होते. केवळ सुप्रजाजनन झाले तर तेवढ्याने पित्याने कर्तव्य संपत नाही. जन्माला आलेला मुलगा सुशिक्षित होऊन तो आपल्या धर्माचा प्रतिनिधी झाला तरच पित्याचे कर्तव्य होते. हीच त्याची कृतार्थता होय. सत्कर्माच्या योगानें आपल्या कुलाचे व समाजाचेसंरक्षण करण्यास पुत्र समर्थ झाला म्हणजेच पितृऋण फिटलें असे होते. ॥ अथ ऐतरोपनिषदि तृतीयोध्यायः ॥ ॐ को अयं आत्मा इति वयं उपास्महे कतरः स आत्मा । येन वा पश्यति येन वा शृणोति येन वा गंधान अजिघ्रति येन वा वाचं व्याकरोति येन वा स्वादु च आस्वादु च विजानाति ॥ १ ॥ आम्ही आत्मा म्हणून (ज्याची) उपासना करावी तो कोण ? (पिंड व ब्रह्मांड किंवा प्राण व बुद्धि यापैकी) तो आत्मा कोणता? (मनुष्य) ज्याच्या योगानें पाहातो, ज्याच्या योगानें ऐकतो, ज्याच्या योगानें वास घेतो, ज्याच्या योगानें भाषा बोलतो आणि ज्याच्या योगानें गोड किंवा कडू जाणतो. मागील अध्यायांत पिंड व ब्रह्मांड यांचे विवेचन झाले. या पिंडब्रह्मांडांची रचना आत्म्यानेंच केली आहे. असें पहिल्यापासूनच दर्शविले आहे. त्यावरून आत्मतत्व हें सर्वाहून श्रेष्ठ होय असें सिद्ध होतें. या आत्मतत्वाची उपासना सर्वानांच अवश्य ठरते. नामरूपात्मक दिसणार्या पिंडब्रह्मांडाशिवाय आत्मतत्वाचें स्वरूप कोणतें व ते समजून घेण्याचे साधन काय? असा प्रश्न साहजिकच उत्पन्न होतो. या प्रश्नाचे विवेचन करणे हा ह्या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे. पहिल्या मंत्राच्या पूर्वार्धात आत्म्याविषयी प्रश्न केला आहे. ज्या आत्म्याच्या नेतृत्वाखाली आम्ही आहोत किंवा असावे तो आत्मा कोणता ? असा पहिल्या प्रश्नाचा अभिप्राय आहे. कतर हा शब्द दोहोंपैकी एक अशा अर्थानेच येत असल्यामुळे पूर्वसंदर्भावरून पिंड आणि ब्रह्मांड किंवा प्राण व बुद्धि अशा कोणत्याही दोन वस्तु घेता येतील. मागील् अध्यायांत पिंडब्रह्मांडाच्या रचनेचे वर्णन झाले असल्यामुळे ते दोन पदार्थ येथे घेण्यास हरकत नाही. त्याचप्रमाणे मंत्राच्या उत्तरार्धात इंद्रियव्यापारांचा उल्लेख केला आहे. त्यावरून प्राण व बुद्धि हेही दोन पदार्थ घेता येतील, पूर्वसंदर्भापेक्षा मंत्रांतील उत्तरार्धात अर्थच अगदी जवळ असल्यामुळे प्राण व बुद्धि हे दोन पदार्थ तुलनेकरितां घेणे अधिक संयुक्तिक दिसते. येथे प्राणशब्दाने इंद्रिये व त्यांचे व्यापार विवक्षित आहेत. इंद्रियांत आत्मा समजून त्यांची उपासना करावी किंवा प्रत्यक्ष परमात्म्यानें ज्या बुद्धीमध्ये प्रवेश केला त्या चैतन्ययुक्त बुद्धीची आत्मदृष्टीने उपासना करावी. असा येथे श्रुतीने प्रश्न उपस्थित केला आहे. यत् एतत् हृदयं मनश्चैतत् । संज्ञानं आज्ञानं विज्ञानं प्रज्ञानं मेधा दृष्टि धृर्तिः मतिः मनीषा जूतिः स्मृतिः संकल्पः क्रतुः असुः कामो वश इति । सर्वाणि एवैतानि प्रज्ञानस्य नामधेयानि भवन्ति ॥ २ ॥ हें जें हृदय आहे तेंच मन होय. सजीवता (शुद्धि), सत्ता दुसर्यावर अंमल चालविण्याची वृत्ति विविधज्ञान, शहाणपणा धारणा, दृष्टि (इंद्रियद्वारां होणारें ज्ञान) धैर्य, विचार, वासना, पीडा, स्मृति, उद्देश, निश्चय, श्र्वासोच्छ्वास (प्राणवृत्तीचें ज्ञान) इच्छा, अभिलाष ही सर्वही प्रज्ञानाचींच नांवे (निरनिराळे धर्म दर्शविणारी रूपें) होत. हृदयापासून मन उत्पन्न झाले असे पूर्वा सांगितले आहे. (अ. १-१-४) हृदय व मन आणि त्यापुढे सांगितलेल्या सोळा वृत्ति , या सर्वाची अठरा ही संख्या भरते. हृदय म्हणजेच मन अशा अर्थाच्या दृष्टीनें हृदय व मन मिळून एक व पुढील सोळा वृत्ति अशीही संख्या धरण्यास हरकत नाही. या मंत्रांतील यादि उपलक्षणार्थ आहे. बुद्धिच्या वृत्ति कशा प्रगट होतात तें दाखविण्याचा मुख्य उद्देश आहे. बुद्धीच्या वृत्ति सोळाच असतात, तिचा निश्चय करण्याचें कारण नाही. या सर्व वृत्ति मिळूनच अंतःकरणाचे चार भेद मानण्यांत येतात हें प्रसिद्धच आहे. गीताशास्त्रांत बुद्धि व मन या दोहोंचा उल्लेख बर्याच ठिकाणी येतो. तेथें बुद्धीचे दोनच प्रकार विवक्षित आहेत असें दिसते. बुद्धीमध्यें अनेक वृत्ति प्रगट होतात. त्यांना निरनिराळी नांवेही दिली जातात. तरी ती सर्व एका बुद्धि-सामर्थ्याचीच नांवे होत. या बुद्धि-सामर्थ्यालाच येथे प्रज्ञान असें म्हटले आहे. मनुष्याची उन्नति किंवा अवनति या प्रज्ञानावरच अवलंबून असते. कर्तव्यचरण , ईश्वरोपासना व ज्ञानविज्ञान या साधनांनी या प्रज्ञानसामर्थ्याचा विकास घडवून आणल्यास नराचा नारायण करण्याचे लोकोत्तर सामर्थ्य या प्रज्ञानामध्ये असते. म्हणून मानवी जीविताच्या दृष्टीने या प्रज्ञानाची म्हणजे बुद्धीची श्रेष्ठता सर्वाहून अधिक आहे. असे येथे श्रुतीने स्पष्ट दर्शविले आहे. एष ब्रह्मा एष इन्द्र एष प्रजापतिः एते सर्वे देवा इमानि च पञ्चमहाभूतानि पृथिवी वायुराकाश आपो ज्योतींषी इत्येतानि इमानि च क्षुद्रमिश्राणीव । बीजाणि इतराणि च इतराणि च अण्डजानि च जारुजानि च स्वेदजानि च उद्भिजानि च अश्वा गावः पुरुषा हस्तिनो यत्किञ्च इदं प्राणि जंगमं च पतत्रि च यच्च स्थावरं सर्वं तत्प्रज्ञानेत्रं प्रज्ञाने प्रतिष्ठितं प्रज्ञानेत्रो लोकः प्रज्ञा प्रतिष्ठा प्रज्ञानं ब्रह्म ॥ ३ ॥ हा (आत्मा) च ब्रह्म होय, हाच इंद्र, हाच प्रजापति; हाच सर्व देवता, पृथ्वी, वायु, आकाश, पाणी, तेज; पंचभूतेही हाच क्षुद्र, मिश्र व दुसरीं अनेक बीजें, अंडज (पक्षि) जरायु (मनुष्यें, पशु इ.), स्वेदज (कृमि इ.), उद्भिज्ज (वृक्षवेली) घोडे, गाई, मनुष्यें, हत्ति आणि जें कांही हे सजीव चालणारे उडणारें आणि जें निश्वल आहे तें प्रज्ञानरूपी ब्रह्माच्या सत्तेने वागणारें आहे; व प्रज्ञानांतच राहिलें आहे. सर्व प्रज्ञानाच्या सत्तेने वागत आहे. प्रज्ञान हाच त्याला आधार आहे. प्रज्ञान हेंच ब्रह्म होय. या मंत्रांत बुद्धीचें महत्व फारच लोकोत्तर आहे असे दर्शविले आहे. त्या करतांच एक मोठी यादीही दिली आहे. तीवरून औपनिषिद्विद्या सर्वस्व बुद्धिप्रधान कशी आहे. तें सहज लक्षांत येण्याजोगें आहे. मुंगीपासून अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक जो परमेश्वर त्या परमेश्वरापर्यंत जी नानाविध सामर्थ्ये प्रगट होतात; त्या सर्वांचे बुद्धि हेंच उगमस्थान होय. मुंडक, प्रश्न, केन, कट, ईशावास्य या पांचही उपनिषदांमध्यें बुद्धिवादाचें स्वरूप, त्याची व्यापकता; आणि त्यांचे महत्व सविस्तर वर्णिले आहे. त्या त्या ठिकाणी टीका करतांना आम्ही देखील जें बुद्धिवादाचें स्पष्टीकरण केलें आहे. तें काल्पनिक किंवा भावनामूलक आहे अशी जर कोणास शंका आली तर त्यांनी प्रस्तुत मंत्राचा निर्विकार मनानें विचार करावा; म्हणजे त्यांची खात्री होईल की, श्रुतीनें बुद्धिवादाचा पुरस्कार करण्याची शिकस्त केली आहे. अशा रीतीने सर्वस्वी बुद्धिप्रधान अशा ब्रह्मविद्येचा उपदेश करणार्या श्रुतीला भ्रमरूपी मायावाद अभिप्रेत नाही, असें ठरलें तर त्यांत आ वाटण्याचे मुळीच कारण नाही. ब्रह्म, इंद्र व प्रजापति असा तिहीचा या मंत्रांत उल्लेख केलेला आहे त्यांत ब्रह्म म्हणजे सर्व सृष्टीच्या पूर्वी निर्गुण ब्रह्माचे बनते. सगुण ब्रह्म होय. इंद्र या शब्दानें सर्वसाक्षी व सर्वसत्ताधीश अशा परमेश्वराचाच निर्देश केला आहे. प्रजापति या शब्दानें या जगताचा चालक जो सूर्यनारायण त्याचा निर्देश केला असून पुढें सामान्यतः सर्व देव घेतले आहेत. व या सर्व दैवी सामर्थ्याचें उगमस्थान प्रज्ञान म्हणजे बुद्धि हेंच होय. असे या मंत्रांत अगदी उघड उघड सांगितले आहे. त्याप्रमाणेंच सर्व भौतिक सृष्टीच्या मुळाशी देखील हें बुद्धि सामर्थ्य असुन मनुष्यालासुद्धां सर्व प्राणी या बुद्धीच्याच प्रभुत्वाखाली वागत आहेत. सर्व सृष्टीचे आदिकारण आत्मतत्व असल्याचे प्रस्तुत उपनिषदाच्या पहिल्याच वाक्यांत दर्शविले आहे. त्या परमात्म्यानें सर्व सृष्टि निर्माण केली व तींत मनुष्यप्राणि निर्माण करून त्याच्या मस्तकांत त्या परमात्म्यानें बुद्धिरूपानें प्रवेश केला. असें जें पूर्वी वर्णन केले त्याचाच येथे पुन्हां स्पष्ट निर्देश केला आहे. यावरून श्रुतीचे हे विवेचन अर्थवादात्मक म्हणजे केवळ रुचि उत्पन्न करण्याकरतांच नसून तें सोपपत्तिक सिद्धांतरूपाचें आहे असे निर्विवाद सिद्ध होते. मायावादी संप्रदायाने बुद्धीकडे उपेक्षादृष्टीने पाहाण्याची हिंदू समाजाला सवयच जडली आहे. निदान अध्यात्मशास्त्रामध्ये तरी बुद्धीला फारसे महत्व देण्याचे कारण नाही अशी सुशिक्षित वर्गाची देखील समजून झाली आहे. ही समजूत श्रुतीच्या सिद्धांताशी कशी सर्वथैव विरूद्ध आहे ते आता निराळे सांगावयास नको. मनुष्याचाच नव्हे तर सर्व जगताचा आधार अशी जी बुद्धि तेंच ब्रह्म होय, असें सहजच ठरतें. या बुद्धिरूप ब्रह्माची मनुष्याने उपासना केली तरच त्याचा व्यवहार व परमार्थपूर्ण होऊन त्याला अमृतत्वाची प्राप्ति होईल. असा श्रुतीचा उपदेश आहे. स एतेन प्रज्ञेन आत्मना अस्मात् लोकात् उत्क्रम्य अमुष्मिन् स्वर्गे लोके सर्वान् कामान आप्त्वा अमृतः समभवत् समभवत् ॥ ४ ॥ तो (वामदेव ऋषि) त्या प्रज्ञानरूप बुद्धीच्या योगाने ह्या भूलोकांतून वर स्वर्गलोकी जाऊन सर्व इच्छा पूर्ण होऊन मुक्त झाला. (द्विरूक्ति समाप्ति दर्शक). प्राणिमात्राला जें ज्ञान होतें, तें सर्व बुद्धीच्या द्वारानेंच होते. किंबहुना ब्रह्मसाक्षात्कार संपादन करण्याचे देखील बुद्धि हेच साधन होय. जगच्चालक परमात्माचा अंशच या बुद्धीत प्रगट झाला असल्यामुळे त्याचे परमैश्वर्यादि गुण बुद्धीत प्रकट होणे स्वाभाविकच आहे. साधक; कर्मयोगी असो अथवा संन्यास मार्गी असो, बुद्धि हेंच त्याच्या परमार्थाचे मुख्य साधन होय. वामदेवऋषि संन्यासमार्गी होता असे प्राचीन ग्रंथकारांचे मत आहे. तें मान्य करून देखील असे स्पष्ट विधान करतां येते की, वामदेवाचा संन्यासमार्ग मायावादी नसून बुद्धिप्रधानच होता. याच अभिप्रायाने तो वामदेवऋषि देखील या वैदिक मार्गानेंच अमृतत्व संपादन करून कृतकृत्य झाला. असे प्रस्तुत मंत्रांत सांगितले आहे. अर्थात मनुष्याने या वैदिक मार्गाचे अवलंबन करून अभ्युद्यपूर्वक निःश्रेय संपादन करावें असा उपदेश करून श्रुतीने हा अध्याय व हे ऐतरेय उपनिषद् पुरे केले आहे. या तिसर्या अध्यायाचा सारांश स्वतंत्रपणे लिहण्याचें फारसे प्रयोजन दिसत नाही. कारण, यांत आत्मा कोणता व तो कसा ओळखावयाचा हा प्रश्न उपस्थित करून प्रज्ञान (बुद्धि) हाच आत्मा होय असे त्याचे उत्तर दिले आहे. मनुष्याला कर्म, उपासना व ज्ञान या साधनांनी पूर्ण विकसित झालेल्या बुद्धीतच चिद्रूपाचा साक्षात्कार होत असल्यामुळे बुद्धि हेंच चैतन्यरूप देवाचे देवगृह होय. असा यांतील अभिप्राय आहे. पूर्ण ज्ञान होऊन देहपातानंतर जीवात्म या बुद्धीसह वर्तमान ब्रह्माशीच एकरूप होतो. जिवंतपणी ज्ञानोत्तर कालांत ही बुद्धीच ब्रह्ममय होते. ब्रह्माचें प्रत्यक्ष ज्ञान होण्याचे मुख्य साधन बुद्धीच असून स्थिरसाक्षात्काराचे अवस्थेत ती ब्रह्माकार होते. या बुद्धीच्या साहाय्यानेंच महर्षि वामदेवाने अमृतत्व संपादन केले आहे. बुद्धीचे हे ब्रह्मासाक्षात्कारसाधनत्व कठोपनिषदांत देखील स्पष्ट सांगितले आहे. (कठ १-३-१२) तात्पर्य औपनिषद्ब्रह्माविद्येच्या अभ्यासकानें बुद्धिवादाची उपेक्षा करणे म्हणजे श्रुतीचा आज्ञाभंग करणे होय. असे ठरते. याप्रमाणे बुद्धिवादाचें महत्व वर्णन करून त्याला श्रुतीने वामदेवऋषिचे उदाहरणही दिले आहे. हाच या अध्यायाचा सारांश आहे. ऐतरेयोपनिषदाचा उपसंहार सृष्टि उत्पन्न होण्याचे पूर्वी एका आत्मतत्वावांचून दुसरें काहीच नव्हते. जे कांही होते, तें शुद्ध , सत्य, ज्ञानमय, किंवा आनंदमय असे एक जिनसी ब्रह्मतत्वच होते. त्या ब्रह्माला जगत् उत्पन्न करण्याची इच्छा झाली. या इच्छाविशिष्ट ब्रह्मालाच सगुण ब्रह्म किंवा परमेश्वर इत्यादि संज्ञा शास्त्रकारांनी दिल्या आहेत. परमेश्वरानें पृथ्वी वातावरण (अंतरिक्ष) व नक्षत्रलोक हे तीन लोक उत्पन्न केले. या त्रैलोक्याच्या खाली आणि वर दिव्य आप नावाचे एक अत्यंत विरल द्रव्य भरलेले होते. हे दिव्य आप देखील परमेश्वराने उत्पन्न केलेलें आहे. त्रैलोक्य उत्पन्न केलें तर त्यावर प्रभुत्व चालवून , त्याची व्यवस्था राखण्यास शक्ति किंवा देवतांची जरूर आहे, असे जाणून परमेश्वराने ईश्वर सारख्या त्या दिव्य आपाचा एक गोळा बनविला; आणि तो आपल्या सामर्थ्यानें चांगलाच तापविला. उबविलेले अंडे फुटावे त्याप्रमाणे त्या गोळ्यास मुख उत्पन्न झाले. मुखांतून वाणी व तीपासून अग्नि ही देवता उत्पन्न झाली. त्याचप्रमाणे त्या मुखाला दोन नाकपुड्या उत्पन्न होऊन त्यांतून प्राणशक्ति प्रगट झाली, व प्राणशक्तीपासून वायु उत्पन्न झाला. तसेच त्या मुखाला डोळे उत्पन्न झाल्यावर त्यापासून दर्शनशक्ति व तद्व्दारा आदित्य ही देवता उत्पन्न झाली. त्या मुखाला कान उत्पन्न झाले, त्यापासून श्रवणेंद्रिय व श्रवणेंद्रियापासून दिशा उत्पन्न झाल्या. याच रीतीने त्या पिंडावर त्वचा उत्पन्न झाली आणि त्या त्वचेमधून लव, व तीपासून औषधि वनस्पति उत्पन्न झाल्या. त्या पिंडात हृदय , हृदयापासून मन व त्यापासून चंद्र यांची उत्पत्ति झाली. नाभिस्थान उत्पन्न झाले. त्यांतून आपानवायु व त्यापासून मृत्यु ही देवता उत्पन्न झाली. त्याचप्रमाणे जननेंद्रिय, त्यापासून वीर्य आणि वीर्यापासून जल ही उत्पन्न झाली. या देवता व त्यांची स्थाने उत्पन्न झाल्यावर त्याच्या क्रिया सुरू होणें अपरिहार्यच होते. क्रियेच्या प्रारंभानंतर क्षुधा तृषा इत्यादि विकार सहजच उत्पन्न झाले. परमेश्वरी संकेताप्रमाणें हे सर्व अथवा लोकपाल आपापल्या स्थानांवरून पिंडब्रह्मांडाची कार्ये करूं लागले असतां, त्यांना एका विशिष्ट स्थानाची व अन्नाची अपेक्षा उत्पन्न झाली. त्याबरोबर परमेश्वराकडे त्यांनी तशी मागणी केली. तेव्हां परमेश्वराने त्यांना बैल, घोडा, व मनुष्य, यांचे देह दाखविले असता त्यांनी नरदेहच सर्वात पसंत केला. नंतर या नरदेहांत तुम्ही सर्वांनी योग्य स्थानी प्रवेश करावा, अशी आज्ञा केल्यावर ते सर्व देव यथाक्रमाने त्या नरदेहांत प्रविष्ट झाले. अग्नीनें वाणीचे रूप घेऊन मुखांत प्रवेश केला. वायु प्राणरूप होऊन नासिकेत प्रविष्ट झाला. दिशांनी श्रवणेंन्द्रियांच्या रूपाने कानांत प्रवेश केला. औषधि-वनस्पती केसांचे रूप घेऊन त्वचेंत शिरल्या. चंद्र मनोरूपानें हृदयांत प्रविष्ट झाला. मृत्युनें आपानवायूचे रूप घेऊन नाभिस्थानांत प्रवेश केला. आणि जल वीर्यरूपाने जननेंद्रियांत प्रविष्ट झाले. जागेची सोय झाली, तेव्हां आतां अन्नाची तजवीज करण्याकरितां परमेश्वराने स्वतःच्या सामर्थ्याने पूर्वीप्रमाणेच त्या दिव्य आपालाच उष्णतेची आंच दिली, तेव्हां त्यांतून एक मूर्ति निर्माण झाली. हेंच आपले अन्न आहे असे जाणून जेव्हा ते लोकपाल त्या मूर्तीकडे पाहूं लागले. तेव्हा तें मूर्तिरूप अन्न मागें मागें सरून पळून जाण्याचा प्रयत्न करूं लागलें. परंतु लोकपालांनी त्याला सोडले नाही हे अन्न कसे ग्रहण करावे (खावे) याविषयी ह्या सर्व देवतांना बरीच पंचायत पडली. त्यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. त्यांनी ते अन्न प्रथम वाणीने ग्रहण करण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. जर तसे झाले अस्ते तर नुसत्या भाषेनेंच पोट भरले असते. प्राणाचाही प्रयत्न फुकट गेला. तो जर सिद्धीला गेला असता तर श्र्वासोच्छ्वासावरच अन्न खाण्याचे काम भागले असते. चक्षु ह्या इंद्रियांचा प्रयत्न यशस्वी झाला असता तर अन्नाच्या दर्शनाने ढेकर आली असती, पण तोही प्रयत्न सिद्धीस गेला नाही. श्रवणेंद्रियांचा प्रयत्न देखील असाच वाया गेला. नाहीतर अन्नाचे एखादे स्तुतिस्तोत्र ऐकूनच माध्यान्ह काळाची निभावणूक करतां आली असती. मनाचा प्रयत्न साध्य झाला असता तर मानसिक फराळ करूनच काम भागले असते. हीच कथा जननेद्रियाची. सारांश एक अपानवायु खेरीज करून सर्वांचेच प्रयत्न निष्फळ झाले. अपानवायूने मात्र तें अन्न खाऊन पचविलेंही देखील. प्राणाचा अपानवायु हा एक प्रकार आहे. आकर्षण उत्सारण व विभागीकरण ही त्यांची कार्ये आहेत. या क्रियांच्या शक्तीलाच अपानवायु असें म्हटले आहे. या अपानवायुच्या क्रियेनेच जसे संवर्धन होते, तसाच क्षयही होतो. म्हणूनच मृत्यु ही त्याची देवता सांगितली आहे. याप्रमाणे सर्व शक्तींना योग्य स्थान मिळाले. त्यांच्या अन्नाचीही तजवीज झाली. व त्यांची सर्व कार्ये सुरळीत चालूं लागली. तरीपण परमेश्वराला आपल्या सृष्टीचे कार्य पूर्ण झाले असें वाटले नाही. मनुष्यप्राण्याचे सर्व व्यवहार सुरूं झाले तरी ते पाशवीवृत्तीच्या स्वरूपाचे होते. नरदेहाची रचना लोकोत्तर होती खरी, पण त्यात एकच उणीव राहिली होती. ती भरून काढण्याकरितां ईश्वरानें मनुष्याच्या मस्तकांत प्रवेश केला. तेव्हा त्याची बुद्धि विकसित होऊं लागली आणि सृष्टिकर्त्याला आपलें कार्य पूर्ण झाले असे दिसून आले. मानवी हृदय (बुद्धि) जेव्हा चैतन्ययुक्त झाले, जेव्हां त्या हृदयामध्यें परमात्म्याने वास केला तेव्हाच तें मानवी हृदय हेंच निरतिशयानंदाचे स्थान बनले. नरदेहातील या जीवात्म्याची तीन स्थित्यंतरे किंवा जन्म होतात. याप्रमाणे ज्याची बुद्धि ईश्वरांशयुक्त झाली आहे असा हा मनुष्य पिंडब्रह्मांडाचा अभ्यास करतो , तेव्हा विराट पुरुषाचें ज्ञान होऊन ब्रह्मसाक्षात्कारही होतो. म्हणूनच या जीवाला श्रुतीनें सर्व साक्षी किंवा सर्व सत्ताधीश असे म्हटले आहे. ब्रह्मापासून ज्या सृष्टीचा प्रारंभ झाला त्याच सृष्टीत निर्माण झालेला हा बुद्धिवान मानवी प्राणी जगताचे मूलतत्व जें परब्रह्म, त्याच्याशी एकरूप होण्यास पात्र झाला; असें पाहून विधात्याला आपलें कार्य पूर्ण झाले, म्हणून कृतार्थता वाटली तर त्यांत फारसे आश्चर्य नाही. गंगेचा कालवा काढून तो सर्व पृथ्वीवर फिरविला आणि तो शेवटी गंगेलाच मिळविला , तर हें कार्य करणार्या मुख्य कामगारास जशी कृतकृत्यता वाटते त्यांतलाच हा प्रकार आहे. याच अभिप्रायाचा निर्दशक असा श्रीमभ्दागवतांत पुढील श्र्लोक आढळतो - ’सृष्टा पुराणि विविधान्य- जयात्मशक्त्या वृक्षान् सरीसृपपशून् खगदंशमत्स्यान. तैस्तैरतुष्टहृदयः पुरुषं विधाय ब्रह्मावलोकीघषण मुदमाप देवः’ (आपल्या अनाद्यनंत अशा ईश्वरी सामर्थ्यानें असंख्य प्रकारचे वृक्ष, सरपटणारे प्राणी, पशु, पक्षी, कृमि कीटक व जलचर निर्माण करून देखील आपल्या त्याच्या कृतीने विधात्याचे मन संतुष्ट झाले नाही. म्हणजे मनुष्याखेरीज इतर सर्व प्राणी उत्पन्न केल्यावर देखील सृष्टिकर्त्याला आपल्र् सृष्टिकार्य अद्यापि अपुरेंच आहे असें वाटून त्याचे अंतःकरण असंतुष्टच राहिले. परंतु ज्याची बुद्धि मूळ परब्रह्माचें दर्शन घेण्यास समर्थ आहे, असा मनुष्य निर्माण केल्यावर मात्र विधात्याला आतां आपलें कार्य पूर्ण झाले असें वाटून परमानंद झाला.) सर्व प्राण्यांत मानवी प्राणी श्रेष्ठ त्या मानवी प्राण्याचे तीन जन्म किंवा स्थित्यंतरे कशी होतात त्याचा दुसर्या अध्यायांमध्यें थोडक्यांत विचार केला आहे. स्त्रीपुरुषसमागमानंतर मातेच्या उदरांत गर्भधारणा होते. ती गर्भावस्था हा मानवी जीवाचा पहिला जन्म होय. या गर्भावस्थेमध्ये गर्भिणीचे संरक्षण व गर्भाचे शास्त्रीय संस्कार करण्यास श्रुतीनें स्पष्ट सांगितलें आहे सुप्रजाजनन शास्त्राचे हे दोनच नियम येथें सांगितले आहेत. तरी ते फार महत्वाचे आहेत. गर्भिणीचे संरक्षण कोणत्या उपायांनी कसे करावे व गर्भासंबंधी शास्त्रीय संस्कार कोणते वगैरे विषयी तपशीलवार माहिती येथें सांगितली नाही. याविषयी भारतीय प्राचीन वैद्यशास्त्र व आधुनिक शरीरशास्त्र यांचा नीट विचार करून मनुष्यानें योग्य ती खबरदारी घेतल्यास श्रुतीचा आज्ञा पालन केल्याचें श्रेय त्यांच्या पदरांत पडल्यावांचून रहाणार नाही. हें श्रेय नुसतें अदृष्ट स्वरूपाचे नसून उत्तम संततीचा लाभ आणि तद्वारा स्वतःच्या राष्ट्राचें कल्याण हें त्या श्रेयाचें स्वरूप प्रत्यक्ष अनुभवास येण्याजोगें आहे यांत शंका नाही. चौर्यांशी लक्ष योनि फिरल्यानंतर हा मनुष्यदेह प्राप्त होतो असे म्हणतात. ही समजूत श्रुतीच्या अभिप्रायाशी बर्याच अंशानें जुळण्यासारखी आहे. हें दुसर्या अध्यायांतील वामदेवाच्या आख्यायिकेवरून चांगलेंच लक्षांत येईल. मला शेकडो देहांनी अडवून धरिले होते. त्यांतून मी मोठ्या वेगानें बाहेर पडलो; असें वामदेव ऋषि म्हणतो. त्यावरून आमच्या वरील म्हणण्याची सत्यता पटण्याजोगी आहे. याप्रमाणे हा सर्वश्रेष्ठ नरदेह प्राप्त झाल्यानंतर भक्तियुक्त अंतःकरणानें ज्ञानविज्ञानपूर्वक वर्णाश्रम विहित कर्तव्याचरणानें आपल्या राष्ट्राचा उद्धार करण्यास आपला पुत्र समर्थ झाला आहे. असें पाहून कृतकृत्य झालेला पिता पुन्हा जो श्रेष्ठ जन्म घेतो तो या जीवाचा तिसरा जन्म होय. पिंडब्रह्मांडाचा विचार करून सर्व सृष्टीचें ज्ञान परमात्मप्राप्तीकरतांच संपादन करावे असा श्रुतीचा या विवेचनांतील अभिप्राय आहे. परमात्मसाक्षात्कार संपादन करावयाचा झाल्यास योगयुक्त बुद्धिवांचून दुसरा मार्गच नाही. बुद्धीतच परमात्मा वास करीत आहे. हें ओळखून तिचा पूर्ण विकास करण्याविषयी कर्म, उपासना व ज्ञान या तीनही साधनांनी मनुष्यानें प्रयत्न करावा; म्हणजे त्याला अमृतत्वाचा खचित लाभ होईल; असा श्रुतीनें निश्चित उपदेश केला आहे. ऐतरेयोपनिषदाच्या पहिल्या अध्यायांत पिंडब्रह्मांडाच्या रचनेचे केलेले विवेचन सारांशरूपानें या उपसंहाराच्या प्रारंभी दिलेंच आहे. श्रुतीचें हें वर्णन कांहीसे अलंकारिक असल्यामुळें शास्त्रीय दृष्ट्या तें दुबोध किंवा अर्थशून्य आहे असें कित्येकांना वाटते; परंतु तें बरोबर नाही. आधुनिक भौतिक शास्त्राच्या दृष्टीनें ऐतरेयाच्या पहिल्या अध्यायाचें सूक्ष्म निरीक्षण केल्यास श्रुतीनें प्रतिपादन केलेले सृष्टिरचनेचे सिद्धांत भौतिक शास्त्राचे कसोटीस पूर्णपणें उतरतील यात शंका नाही. मात्र प्राचीन औपनिषद्वाङ्मयाची पद्धति , त्यातील विवेचनशैली, सिद्धांतरचनेचें स्वरूप व कार्यकारणभावाची प्रक्रिया इत्यादि विषयांचे चांगलेच ज्ञान असावयास पाहिजे. आणि त्याच्या जोडीला आधुनिक भौतिक शास्त्रांचेही उत्तम ज्ञान असणें अगत्याचें आहे. असा सव्यसाची विद्वान; वैदिक परंपरेच्या दृष्टीने जर ऐतरेयाच्या पहिल्या अध्यायांतील सिद्धांतांचे परीक्षण करील तर, हजारो वर्षाच्या पूर्वी वैदिक ऋषींनी आपल्या योगयुक्त बुद्धीने सृष्टीचें सूक्ष्मावलोकन करून या विश्र्वाचें कोडें उकलण्याकरितां सृष्टिशास्त्राचे सिद्धांत कसे बिनचुक मांडले आहेत तें जगाच्या चांगलेच निदर्शनास येईल. पण हें कार्य अत्य्ंत परिक्षमाचें व अतिशय खर्चाचे असल्यामुळें तें तूर्त भविष्यत्कालाच्या स्वाधीन करणें भाग आहे. सांप्रतकालच्या सुशिक्षितांनी ऐतरेयोनिषदाचा स्वतंत्र बुद्धीनें अभ्यास केल्यास हें कार्य घडून येण्यास फारसा विलंब लागणार नाही असा भरवसा वाटतो. दुसर्या अध्यायांतील गर्भशास्त्राविषयींचा विचार फारच महत्वाचा आहे. आधुनिक पाश्चात्य पंडितांनी या शस्त्रावर अतिशय परिश्रम केले आहेत. त्यांचा उपयोग करून आर्यसंस्कृतीच्या दृष्टीनें या बाबतीत योग्य ती प्रगति घडवून आणल्यास समाजाचा होत असलेला भयंकर र्हास थांबेल व पश्येम शरदः शतम् । जीवेम शरदः शतम् । मोदाम शरदः शतम् ।’ ह्या वैदिक ऋषीच्या प्रार्थनेंचे सार्थक होईल. दुसर्या अध्यायामध्यें गर्भशास्त्राचे विवेचन थोडें असलें तरी तें सुप्रजाजननाच्या दृष्टीनें अत्यंत स्फुर्तिदायक आहे. व्यक्ति व समाज यांच्या कल्याणालाच निःश्रेयस व अभ्युद्य असें म्हणतात. या दोहोंना मिळूनच श्रुतीत अमृतत्व या शब्दाचा प्रयोग येतो. समाजाच्या व व्यक्तीच्या कल्याणाची तेजस्वी बुद्धि ही गुरुकिल्ली होय. या बुद्धीलाच तिसर्या अध्यायांत प्रज्ञान असें म्हटलें आहे. प्रज्ञान हेंच ब्रह्म होय अशा अर्थाचें ’प्रज्ञान ब्रह्म ’ हें वाक्य याच अध्यायामध्ये आलाले आहे. जी प्रसिद्ध चार वाक्यें;महावाक्यें म्हणून उत्तरकालीन वेदांतशास्त्रानें मान्य केली आहेत, त्यापैकीच ’प्रज्ञानं ब्रह्म’ हें एक आहे. त्यावरून देखील बुद्धिवादाचें महत्व सिद्ध होते. या बुद्धिवादाचें महात्म या अध्यायांत श्रुतीनें फारच मुक्तकंठाने गायिले आहे. हिंदु समाजात विशेषतः सुशिक्षित वर्गात या शास्त्रीय बुद्धीचा हव्यास उत्पन्न झाला. तरच त्याच्या वैदिक धर्माभिमानाचें सार्थक झाले असे म्हणता येईल. नाही तर आचाराच्या दृष्टीने धर्माभिमानाची पराकाष्ठा करावयाची आणि शास्त्रीय विचाराच्या दृष्टीने शिकस्तीचा भाविकपणा स्वीकारून त्याच धर्माचा विरोध करावयाचा असें वर्तन न कळतपणें कां होईना, हिंदूसमाजांतील सुशिक्षितवर्गाकडून आजपर्यंत घडत आले आहे. यापुढें तरी आधिभौतिक शास्त्रांचे काळजीपूर्वक अध्ययन करून त्यांचा ब्रह्मविशेंतील मूलतत्वांशी मेळ घातला तरच जनतेला अभ्युद्यनिःश्रेयसप्राप्तीचा खरा मार्ग दाखवून दिला असें होईल; व अशा रीतीनें परा व अपरा विद्येचा मेळ घालण्याचा प्रयत्न केला नाही तर एककल्लीपणामुळें सुशिक्षित वर्गाला ब्रह्मवेत्या वैदिक ऋषींचे आपण अनुयायी आहोत असें म्हणण्याचा अधिकार पोचावयाचा नाही; म्हणून शास्त्रीय बुद्धीचा हव्यास उत्पन्न होऊन हिंदू समाज आधिभौतिक व अध्यात्मिक शास्त्राचा मेळ घालण्याचा तेजस्वी ब्रह्मविद्येचा खरा उपासक होवो, अशी सृष्टिकर्त्या परमेश्वराची प्रार्थना करून आणि ही ब्रह्मविद्या ज्यानें ऐतरेयोनिषदाच्या रूपानें प्रगट केली त्या महिदासऋषीला वंदन करून आम्ही हा उपसंहार पूर्ण करतो. ॐ वाङ् मे मनसि प्रतिष्ठिता । मनो मे वाचि प्रतिष्ठितं । आविरावीर्म एधि । वेदस्य म आणीस्थः । श्रुतं मे मा प्रहासीः । अनेन अधीतेन अहोरात्रान् संदधामि । ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि । तन्मामवतु । तद्वक्तारमवतु अवतु मां अवतु वक्तारं अवतु वक्तारं ॥ ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥ [प्रस्तुत अर्थ श्री सदाशिवशास्त्री भिडे यांच्या ऐतरेय उपनिषदाच्या भाष्यावरून घेतला आहे.] |