ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

अजो महार्हः स्वाभाव्यो जितामित्र प्रमोदनः ।
आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः ॥५६॥


५२१. अज
हे पद यापूर्वी दोनदां येऊन गेलें आहे. (पहा श्लोक ११, २२) याची व्युत्पत्ति (१) अजते कूर्दन् गच्छति इति अजः । (२) जायते इति जः, न जः अजः आणि (३) अः विष्णुः तस्मात् जातः अजः । अशी बहुधा लावता येते. पैकी तिसरी व्युत्पत्ति कृत्रिम आहे तथापि तीहि चिन्त्य आहे.
जीव स्वच्छंद जगत नाही. त्याला आपल्या वासनांना वश होऊन जगावे लागते. वासनानुकूल त्याची बुद्धि निर्णय करते, मन संकल्प करतें, वाणी बोलते आणि कर्मेंन्द्रियें कर्म करतात. त्यांत स्वच्छंदता वा स्वातन्त्र्य नाही. परमात्मा हा असा अवश नाहीं, तो वशी आहे. तो देहेन्द्रियप्राणमनोबुद्धींचा किंकर नाही, तर त्यांचा स्वामी आहे, आणि म्हणून तो 'अजते स्वच्छंदं विहरति इति अजः' म्हणावयाचा.
बोकड हा प्राणीहि स्वच्छंद नाचत बागडत असतो म्हणून त्यालाहि अज म्हटले जाते आणि तो "अति मात्रं जायतें" म्हणूनहि अज म्हणावयाचा. एका वेळी अनेक पिलें आणि वर्षातून अनेक वेतें तो देतो म्हणूनहि तो अज म्हणावयाचा. परमात्म्याच्या ठाई बोकडाचें हे दोन्ही गुण दिसून येतात. म्हणून त्याला अज म्हटलें आहे आणि वारंवार म्हटले आहे. अजपाल आर्यांना त्या अजपालनापासून यज्ञासाठी आज्य आणि आज्याहुति देऊन यज्ञ करता करतां हे अजनामरूप तत्त्वज्ञानाज्यहि लाभले आहे. आर्य आरंभी अजपालन आणि मागाहून गोपालन करू लागले. त्यामुळे त्यांनी परमात्म्याला व आपल्यांतील थोरांना मोठ्या प्रेमानें अज म्हणजे बोकड हे नांव दिले आहे. रघुपुत्र अज प्रसिद्धच आहे. गोपालन सुरू झालें तसें ऋषभ, गोत्तम, इत्यादि नामांना महत्त्व आले आणि अजनाम मागे पडलें. इति ऐतिह्य. तथापि पुढील उपनिषद्वचनांत अज अजा ही नामें अमर होऊन बसली आहेतः
अजां एका लोहित-शुक्ल-कृष्णां, बह्वीः प्रजाः सृजमानां सरूपाः ।
अजो ह्येको जुषमाणोऽनुशेते, जहात्येनां भुक्तभोगां अजोऽन्यः||

ह्या वचनांत अज पद जीव आणि शिव या दोहोंसाठीहि आलेलें आहे.
'अजः सर्वेश्वरः सिद्धः' या वचनांत अजपद परमात्मवाचक, अजो दुर्मषणः शास्ता या वचनांत ईश्वर-वाचक आणि प्रस्तुत "अजो महार्हः स्वाभाव्यः" या वचनांत तें जीव-वाचक आले आहे असे म्हणतां येईल. सर्व प्रतिबिंबें बिंबापासूनच उत्पन्न होतात म्हणून बिंबस्थानीय परमात्म्यापासून सर्व प्रतिबिंबस्थानीय जीव निर्माण झाले आहेत, असे म्हणतां येतें. म्हणून तिसरी व्युत्पत्ति 'आत् विष्णोः जायते इति अजः'हि इथे उपपन्न होते.

५२२. महार्ह
महं पूजा अर्हते इति महार्हः । मह म्हणजे पूजा, तिला अर्ह म्हणजे पात्र तो महार्ह म्हणावयाचा; अथवा "महान् अर्हः अर्घः यस्य सः महार्हः" ज्याचें अर्ह म्हणजे मोल मोठे तो महार्ह म्हणावयाचा; अथवा महद्‌भिरपि अर्ह्यः इति महार्हः" मोठमोठ्यांनीहि जो अर्हित होतो पूजित होतो तो महार्ह म्हणावयाचा. महार्ह हा शब्द दशार्ह सारखाच आहे. हा समास तत्पुरुष की बहुव्रीहि ? "महं अर्हते इति महार्हः "हा, उपपद तत्पुरुष झाला." महान् अर्हः यस्य सः महार्हः "हा बहुव्रीहि झाला. दोहोंचे तात्पर्य एकच आहे. जो बहुमूल्य असतो त्याचीच पूजा केली जाते, तुच्छाची नव्हे. परमात्मा परम मूल्य आहे म्हणून तो परम पूज्य.
परमात्म्याचे मोल दशार्ह शतार्ह पदानें प्रकट होऊं शकत नाही. त्याचा अर्ह म्हणजे मोल अगणित आहे. म्हणून तो महार्ह म्हणावयाचा. स्वात्म्याहून अधिक मोलाची वस्तु या जगांत दुसरी नाही. म्हणून तो सर्व भूतात्मभूतात्मा परमात्मा महार्ह होय.
परमात्म्याचा उत्कर्ष सर्वातिशायी असल्यामुळे तो उघडच महार्ह म्हणजे पूजार्ह होय. ज्याचा उत्कर्ष आपल्याहून अधिक त्याला आपण मान देतो. ज्याचा उत्कर्ष लोकोत्तर त्याची आपण पूजा करतो. ज्या परमात्म्याच्या अचिन्त्य वैभवाची बरोबरीहि कोणी करू शकत नाही त्याचा उत्कर्ष किती म्हणावा ? असा परमात्म्याचा महिमा असल्यामुळे सहजच तो पूजार्ह महार्ह होय.
तो परमात्माच एक स्तवार्ह आहे, पूजार्ह आहे, नमस्कारार्ह आहे. म्हणून म्हटले आहे "भव मद्‌भक्तो मद्याजी मां नमस्कुरु.”

५२३. स्वाभाव्य
स्वाभाव्य म्हणजे स्वाभाविक, जें कृत्रिम नव्हे तें. परमात्मतत्त्व हे सहज आहे. तें करावें मिळवावेसें नाहीं. शरीर जन्मतें मरतें, तें घटित होते. विघटित होतें तें मिळवावे लागते सोडावे लागते. सर्व व्यक्तींचें हेच भवितव्य आहे. सर्व पदार्थांची हीच गति आहे. या अवगतींतून मुक्त जर काहीं असेल तर तें आत्मतत्त्व होय. ते एखाद्या बाह्य पदार्थाप्रमाणें सोन्याप्रमाणें मिळवावे लागत नाही. तें आप्य नाही, संस्कार्य नाही किंवा कार्य नाही. तें आपलें आहे म्हणून तें स्वाभाव्य म्हणावयाचे. इतर सारें अस्वाभाविक कृत्रिम. आणि जे जे कृत्रिम तें तें सारें नश्वर आणि दुखद होय. म्हणून स्वाभाव्य भगवान् म्हणतात-"अनित्यं असुखं लोकं इमं प्राप्य भजस्व माम्" बाबा रे, हे सारे जग अनित्य आहे, असुख आहे. त्याच्या नादी लागू नको. मी जो नित्य आणि सुखरूप त्या मला भज. परंतु सम्यग् दृष्टीच्या अभावी लोक आडवाटेस लागतात आणि नाना यज्ञ तपें दानें करतात, शास्त्रे घोकतात. आणि त्यांच्या योगे कुठलें तरी कृत्रिम फळ घेऊन बसतात. सम्यग दर्शनानें जें लाभतें तें नाना भ्रान्त उद्योगांनी कसें लाभणार ? म्हणून भगवान् म्हणतातः
नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्य एवंविधो द्रष्टुं दृष्टवान् असि मां यथा ॥ गीता ११-५३
भक्त्या त्वनन्यया शक्य अहं एवंविधोऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ गीता ११-५४

आणि ही अनन्य भक्ति म्हणजे सम्यग्दर्शनच होय. शंकराचार्यांनी याच अभिप्रायानें म्हटले आहेः स्व-स्वरूपानुसंधानं भक्तिरित्यभिधीयते ।
आत्मतत्त्व हे असें अकृत्रिम आहे. स्वाभाविक आहे. म्हणूनच तें महार्ह म्हटले आहे. अज म्हटलें आहे. आत्मतत्त्वहिऱ्याप्रमाणें स्वाभाविक आहे, महार्ह आहे, अज आहे.
"हिरा ठेवितां ऐरणी, वांचे मारितां जो घणीं ।
तो तोचि मोल पावे खरा, करणीचा होय चुरा ॥ "


५२४. जितामित्र
जितानि अमित्राणि रिपवः येन सः जितामित्रः । ज्यानें शत्रूना जिंकून घेतलें आहे तो जितामित्र म्हणावयाचा. परमात्मा हा सदैव जेता आहे, विजयी आहे. कारण तो सदैव जितात्मा आहे, वशी आहे. ज्यानें आपल्या मनाला इंद्रियांना जिंकून घेतले आहे तो विधेयात्माच अजेय राहून इतरांवर मात करूं शकतो. म्हणूनच नीतिकार चाणक्यानें म्हटले आहे "श्रियो मूलं इन्द्रियजयः". जो आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो तो श्रीचे नि विजयश्रीचें भाजन बनतो. म्हणजे अध्यात्मविद्या ही केवळ आध्यात्मिक अनाधिभौतिक क्षेत्रापुरती उपयोगी आहे असे नव्हे, तर ती संपूर्ण जीवनाचेच शास्त्र आहे असें तो सुचवीत आहे. महात्मा गांधींनी आपल्या जीवनानें हे पुनः सिद्ध केले आहे. अर्थात् शत्रु हे मूलतः आध्यात्मिकच आहेत. त्यांचा ज्यानें पराजय केला तो सर्वत्र विजयीच आहे. म्हणून गीतेंत म्हटले आहे,षवी। "इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ । "गीता ३-३४

शब्द स्पर्श रूप रस गन्ध हे जे पंचेन्द्रियांचे पंच विषय त्यांच्या ठाई इंद्रियांची जी आवड-नावड, जो राग-द्वेष तेच ह्या जीवाचे खरे शत्रु होत. आत्मधन घेऊन निजधामास चाललेल्या मोक्षमार्गस्थाचे ते वाटमारे होत. त्या परिपन्थी राग-द्वेषांना जो दाद देत नाही, त्यांच्यावर जो मात करतो, तो जितामित्र होय. तो राज्यश्री मिळवितो. तो खरा राजमान्य राजश्री. या जितामित्र राजश्रींचे चरित्र म्हणजे अध्यात्मरामायण शंकराचार्य पुढील प्रमाणें वर्णितातः
तीर्त्वा मोहार्णवं, हत्वा रागद्वेषादि-राक्षसान् ।
योगी शान्ति-समायुक्त आत्मारामो विराजते ॥

खरोखर हे रामायण म्हणजे दैवी मानवाचा सनातन इतिहासच होय. आधिभौतिक तो इतिहास, आधिदैविक तें पुराण, आध्यात्मिक तो वेद वा वेदान्त होय, आणि मानव जीवनांत ही तिन्ही एकवटलीं आहेत. परमात्मा तिन्ही क्षेत्रांत जितामित्र आहे.

५२५. प्रमोदन
'परमात्मा हा सर्वान्तर्यामी सच्चिदानंदस्वरूप असल्यामुळे तो प्रमोदन म्हणजे प्रकृष्ट मोद देणारा म्हटला आहे. जो मोद क्षणिक आहे, अथवा जो दुःखशोकाभिभूत होतो तो प्रमोदपदवीस पात्र नाही. खरें म्हणजे त्याला मोदहि म्हणणें गैरच. जीवाला विषयेन्द्रियसंनिकर्षानें लाभणारा जो मोद तो सदैव पराधीन असतो. इन्द्रिये आणि विषय दोन्हींवर जीवाची सत्ता चालत नाही. इन्द्रिय भुकेली असतात तेव्हां विषय मिळत नाहीत, विषय मिळाले असतां इंद्रियें भुकेली असत नाहीत असेंच पुष्कळदां घडतें. जेव्हां इन्द्रिय भुकेली असतात आणि त्यांना त्यांचे विषय मिळतात तेव्हां कांहीं आस्वाद मिळतो खरा पण तो किती क्षणिक ? तो तृप्तिप्रद न होतां तृष्णाग्नि पेटविणाराच होतो. आणि लब्धप्रणाशाचा शोक व अलब्धाची तृष्णा यांच्या कचाट्यांत सांपड़न जीवाचे हाल हाल होत असतात. पण असे हाल चालले असतांनाच जीव अबुध्या वा बुध्या जेव्हां केव्हां स्वस्थ होतो तेव्हां त्याला अतीन्द्रिय आणि निर्विषय असें आत्मसुख मिळत असते. आणि त्यामुळेच खरोखर तो जगत असतो. पण हे त्याला कळत नाही. जें वैषयिक सुख त्याला मिळत असतें वास्तविक त्याचाहि आधार हे निर्विषय सुख म्हणजे स्वानुभूतिच असते हे त्याच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून तो वैषयिक सुखालाच सुख मानून त्यासाठी धडपडत असतो. पण ही त्याची धडपड फुकट असते. कारण इंद्रिय वा विषय दोहोंपैकी एकावरहि त्याची सत्ता असत नाही. आणि समुद्रांतील जहाजावरील पक्षी कोणत्याहि दिशेला उडाला आणि कितीहि त्यानें भराऱ्या मारल्या तरी अखेर कुठे आधार न मिळून जसें त्याला परत जहाजावरच यावे लागतें आणि विश्रमावे लागते त्याप्रमाणें सर्व जीवांना विषयेन्द्रियजनित सुखाच्या शोधांत हताश होऊन परतावे लागते आणि स्वस्थ व्हावे लागते. ही स्वस्थताच प्रमोद आहे. ती जो देतो तो प्रमोदन म्हणावयाचा.

५२६. आनन्द
'आनन्दो नन्दनो नन्दः' हा नन्दचा पाढा आहे. परमात्मा हा आदि-मध्य-अंती सर्वत्र नन्दस्वरूप आहे, असा त्याचा आशय. एक द्वि त्रि केल्याशिवाय आपलें कोणतेंहि काम पूर्ण होत नाही. पूर्णता आदि मध्य आणि अन्त मिळूनच व्हायची. म्हणून आपल्या धर्मांत संस्कृतींत व्यवहारांत, तीनचे मोठे महत्त्व आहे. तीन पुरुष, तीन लिंगे, तीन वचनें, तीन काळ, तीन लोक, तीन गुण, तीन देव इत्यादि त्रैत सर्वत्र दिसून येते. या सगळ्याचे कारण हेच की प्रत्येक वस्तु त्रिधा विभक्त होते. तिला आदि असतो, अन्त असतो आणि दोन्ही टोकांच्या दरम्यान मध्य असतो. त्यामुळे ती त्रिरूप म्हटली जाते. तिन्ही अंगें मिळून तिची पूर्णता आकळली जाते. प्रत्येक वस्तूची ही तीन पदें लक्षूनच आमचा परम मन्त्र जो गायत्री त्याचा छन्दहि त्रिपाद झाला आहे. जगांत समपाद प्राणी आढळतात. द्विपाद, चतुष्पाद, षट्पाद, अष्टपाद इत्यादि परंतु विषमपाद प्रायः आढळणार नाहीत. पण वेद गायत्री मंत्रांत तीन पायांनी चालतो आहे. सृष्टीची अलौकिकता प्रकट करण्यासाठी, सर्वत्र भरलेलें त्रैत प्रकट करण्यासाठी जणूं गायत्री सर्वत्र त्रिपदा झाली आहे. लौकिक छंद द्विपाद चतुष्पाद प्राण्याच्या अनुकरणानें द्विपद चतुष्पद झाले आहेत, पण गायत्री मंत्र लौकिक नाही त्याची दृष्टि दिव्य आहे. गायत्री मंत्र म्हणून सर्वत्र अव्यक्त रूपानें वसलेलें त्रैत पाहणारा तो त्रिपाद झाला आहे. व्यक्तमात्र त्रिपाद आहे. आदिमध्यान्त- मय आहे, त्रिगुणात्मक आहे, असें जणू तो सांगतो आहे. सृष्टि अशी त्रिरूप दिसली तरी तत्त्वतः ती एकरूप आहे. आनन्दरूपच आहे असें 'आनन्दो नन्दनो नन्दः' हा चरण सांगत आहे. जें आदौ जें अन्ती असतें तेंच त्याच्या मध्येहि असते. सृष्टीचा आदि सच्चिदानंद परमात्मा आहे त्याचा अन्तहि तोच आहे हे जर खरें तर त्याचा मध्यहि तोच म्हटला पाहिजे. घटाचा आदि मृत्तिका अन्तहि मृत्तिका आहे तर मध्यरूप जो घट तोहि मृण्मयच आहे किंबहुना मृत्तिकाच आहे. तद्वत् हें विश्व आदौ मध्ये अन्तीं आनन्दरूप आहे, सच्चिदानन्द परमात्म-स्वरूप आहे. "आनन्दो नन्दनो नन्दः" ही त्रिपदा गायत्री हेच गात आहे.

५२७. नन्दन (अनन्दन)
परमात्मा आनन्दस्वरूप आहे, आनन्दबीजरूप आहे. आणि जिथें बैजिक शक्ति असते तिथें स्वजातिनिर्माण क्षमता, स्वसंतति-निर्माणक्षमताहि असते. "एकोऽहं बहुः स्यां प्रजायेय' अशी प्रेरणा असते. ही प्रेरणा म्हणजे आत्म-दर्शनाची इच्छाच होय. ही इच्छा हा बीजाचा, जीवाचा स्वभावच असतो. जिथे अशी प्रेरणा नाहीं, क्षमता नाहीं तें मुळीं बीजच नव्हे.
परमात्मा ज्या अर्थी ह्या सर्व विश्वाचे बीज आहे त्या अर्थी त्याच्या ठाईं ही आत्मदर्शनाची अनिवार प्रेरणा आणि अक्षय क्षमता आहे हे उघडच आहे. अर्थात् तो आनंद करणारा, स्वानंदविहार करणारा आहे. म्हणून तो नन्दन म्हटला आहे. हे विश्व सारखें वाढतें आहे आणि त्याच्या ह्या वाढीमुळे च वर्तमान भूत आणि भविष्य हा काल-विभाग होत आहे असें महान् वैज्ञानिक जयंत नारळीकर प्रतिपादन करत आहेत. तें कसेंहि असो. विश्व हे नित्य विकासशील आहे. तें प्रस्तरीभूत चयापचय-रहित जड नाही, हे खास. तें जीवनस्वरूप आहे. ती एक जिवंत प्रक्रिया आहे. त्याचा अणुरेणु आनन्दबीज आहे आणि तो स्वभावतःच सतत रुजत अंकुरत फुलत आणि फळत चालला आहे. ही सगळी आनंदाचीच प्रक्रिया आहे,हिला अन्त नाही, कारण हा स्वभाव आहे. स्वभावाचा अन्त म्हणजे आत्महत्या. आणि असें सामर्थ्य कोणांतच नाही. कारण तें स्वभावाच्या विरुद्ध आहे. पाणी पाण्याला बुडवू शकत नाही, अग्नीनें अग्नीला जाळायला भडकणे म्हणजे शतगुणित होणे होय. तसें आनंदानें आनंदाला लोपवणे म्हणजे महानन्द होणे होय. तोच नन्दन. "पुत्राद् इच्छेत् पराजयम्' असे आपण म्हणतों. कारण पुत्र हे आमचे उत्तर रूप आहे. तें आम्हांला नन्दन म्हणजे आनंदविणारे आहे. परमात्मा तसा या विश्वाचे उत्तरोत्तर रूप आहे. म्हणून तो नन्दन होय. विश्वनन्दन होय.

५२८. नंद (अनन्द)
परमात्मा आनन्दाचें बीज आहे, आनन्दाचा वृक्ष आहे, आनन्दाचें फळ आहे. आणि सर्व मिळून तो आनन्द आहे. "आनन्दो नन्दनो नन्दः" या त्रिपदीचा हा आशय आहे. अर्थात् नन्द या पदानें इथे फलरूपता वर्णिली आहे. आनन्दाच्या वृक्षाचें फळ आनन्दाशिवाय दुसरें काय असणार ? म्हणून उपनिषद् म्हणतें - "आनन्दाद् ह्येव खलु इमानि भूतानि जायन्ते, आनन्देन जातानि जीवन्ति, आनन्दं प्रयन्ति अभिसंविशन्ति इति"
बीज शक्ति कीलक तिन्ही आनन्दच आहे. जीवाच्या ठाई कांहीं स्वाभाविक प्रेरणा असतात. त्या प्रेरणांना अनुसरून त्याची बुद्धि निश्चय करते, मन संकल्पविकल्प करतें कर्मेंद्रियें कर्म करतात. आणि ह्या सर्व उद्योगांचे अभीष्ट जीव मिळवीत असतो. ह्या मूल प्रेरणांचें तदुत्थ प्रवृत्तींचें, आणि तज्जनित फळाचे विश्लेषण केल्यास ती तिन्ही आनन्दात्मकच आहेत असे दिसून येते. कर्मजनित वा श्रुतज्ञानजनित ज्या गति जीवाला लाभतात त्यांचे तीन प्रकार होतातः (१) अनिष्ट (२) इष्टानिष्ट आणि (३) इष्ट. अनिष्ट गतीला नरक, इष्टानिष्ट गतीला स्वर्ग आणि केवळ इष्ट गतीला मोक्ष म्हणतात. परंतु ह्या तिन्ही गतींचे स्वरूप वस्तुतः आनंद-प्रेरितच नाही काय ? आणि जें आनंदजनित आहे तें आनंदात्मक नव्हे काय ? "जें कार्य तें धरिल की गुण कारणाचें । ” कार्यकारणांचा अभेदच म्हटला आहे. पापी म्हटलेला पाप करतो तें आनंदासाठीच करतो. पुण्यशील म्हटलेला पुण्याचरण करतो तेंहि आनंदासाठींच करतो. आणि पाप पुण्य-विनिर्मुक्त ज्ञानी जें करतो वा करीत नाहीं तें सारें तो निरतिशय आनंद मिळावा म्हणूनच होय. सारांश, जीवमात्राचे अभीष्ट आनंदच आहे. त्याच्या जीवनांत तुम्हांला भलें भेद दिसो, पण त्या सर्वांची प्रेरणा आणि फलित आनंदच आहे ह्यांत शंका नाही म्हणून परमात्मा हा नन्द म्हटला आहे. आनन्द हे बीज, नन्दन ही शक्ति आणि नन्द हें कीलक म्हणावयाचें.

५२९. सत्यधर्मा
सत्यधर्मा हा एक वैदिक शब्द आहे. तो सत्य-धर्मन् या दोन शब्दांचा समास असून हा समास बहुव्रीहि आहे. सत्यं धर्म यस्य सः सत्यधर्मा. सत्यच ज्याचा धर्म आहे तो सत्यधर्मा होय. परमात्मा हा उघडच सत्यधर्मा आहे. धर्म म्हणजे वस्तूचा धारक गुण. उदाहरणार्थ उष्णता हा अग्नीचा धारक गुण आहे. त्या शिवाय तो असूच शकत नाही. या धर्माला अनुसरून जें जीवन हे कर्म त्यांनाहि धर्म म्हटले जाते. वैदिक धर्म म्हणजे यज्ञ-याग प्रवृत्ति; उपनिषद्-धर्म म्हणजे विचार, निवृत्ति; बौद्ध धर्म म्हणजे सम्यगाचार; खिस्ती धर्म म्हणजे प्रेम; महंमदी धर्म म्हणजे इस्लाम वा ईश्वरशरणता. हे सगळे धर्म जीवनरूप आहेत. त्या धर्मजीवनांचें जें फलित त्यालाहि धर्म म्हटले जाते. 'नहि सत्यात् परो धर्मः' 'अहिंसा परमो धर्मः' इत्यादि वचनांत हा निष्ठारूप वा फलरूप धर्मच अभिप्रेत आहे. सारांश, धर्म पदानें मूल धारक नि प्रेरक तत्त्व, तदनुसार जीवन-प्रणाली आणि तद्द्वारा प्राप्त परम पद या तिहींचाहि बोध होतो. सत्यधर्मा पदानें मुख्यतः निष्ठारूपतेचा बोध होतो. परमात्मा हा सदैव स्वरूपावस्थित असतो. तो केव्हांहि स्वरूप-च्युत होत नाही. म्हणून तो सत्यधर्मा होय. पण 'हा गुण तर प्रत्येकाच्याच ठाईं आहे. अग्नि आपलें उष्णत्व, जल आपलें रसत्व कुठे सोडतात ? पण ह्या सर्वांचे हें स्वरूपनिष्ठत्व तेच सत्य होय आणि ते सत्यहि ज्या सर्वाधार सत्तेत प्रतिष्ठित आहे ती सर्वसामान्य सत्ता हाच ज्याचा धर्म होय तो परमात्मा सत्यधर्मा होय. त्याच्या सत्तेवांचून कांहीं एक असूं शकत नाही. हेच ईशन होय. एरव्हीं ईश्वर काहीं एखाद्या दंडधर राजाप्रमाणें शासन करीत नाहीं. परमात्म्याची ही जी सत्ता तीच एक सत्य आहे आणि बाकी सारें लटके आहे. 'ब्रह्म सत्यं जगत् मिथ्या' हा वेदान्त डिण्डिम हेच गर्जून सांगत आहे. मिथ्या वा लटके म्हणजे काय ? जे आपल्या बळावर उभे नाहीं त्याला लटके म्हणावयाचे. जग हे लटके वा मिथ्या आहे याचा अर्थ तें स्वाधार नाही, पराधार आहे इतकेंच. तें निराधार आहे असा अर्थ नव्हे. तो जो पर आधार तोच सत्य- धर्मा परमात्मा होय. तोच एक स्वाधार आहे. म्हणून तोच एक सत्य आहे म्हणावयाचे. इतर सारें मिथ्या वा लटकें.

५३०. त्रिविक्रम
परमात्मा हा अमित-विक्रम असून तो त्रिविक्रमहि म्हटला आहे. त्रि हे पद संख्यावाचक तसें सामग्र्य-वाचकहि म्हणता येईल. समग्रता आदि मध्य आणि अन्त मिळून होते. आमचे जीवन कायिक वाचिक मानसिक या तीन कर्मपथांनी संपूर्ण होतें. म्हणून त्रिशुद्धि म्हणजे संपूर्ण शुद्धि म्हणावयाची. तसें हें विश्व त्रिलोकात्मक आहे. तिन्ही लोकांना ज्यानें विक्रान्त केलें, पादाक्रान्त केलें तो त्रिविक्रम म्हणावयाचा. हे तीन लोक अधोमध्योर्ध्व लोक म्हणा वा भूत, भव्य, भवत् भुवनें म्हणा. अथवा देशकालवस्तुरूप त्रि परिमाणे हेच त्रिपदानें अभिप्रेत आहे असें म्हणा. अथवा जागृति, स्वप्न, सुषुप्ति या तीन दशाच त्रि होत. त्यांना तो परमात्मा उल्लंघून तुरीय म्हणून विक्रान्त असल्यामुळे तो त्रिविक्रम म्हणावयाचा. पूर्व क्षितिज-गत उदीयमान सूर्य हा वामन होय. भुईसपाट असल्यामुळे ठेंगणा होय. पण तोच जेव्हां क्षितिजावर चढून आणि अशा प्रकारें भलोक पादाक्रांत करून अन्तरिक्ष उल्लंघितो तेव्हां तो भुवर्लोक पादाक्रान्त करून आकाशाच्या माथ्यावर चढतो, स्वरलोक पादाक्रांत करतो. आणि अशा प्रकारें तो वामनच त्रिविक्रम म्हटला जातो. तो जेव्हां ख-स्वस्तिकी आरूढ होतो, पूर्ण तेजानें तळपत असतो, तेव्हां अंधकाररूप असुरराज बळि ज्यानें तिन्ही भुवनें व्यापून टाकली होती तो पाताळांत, भूगोलाच्या तळाला, दडपला जातो. तथापि सूर्य हा नेहमी सूर्यास्तसमयीं तमोद्वाराशी उभा असल्यामुळे तो बळीचा द्वारपाळ म्हटला जातो. हा जो तमःप्रकाशाचा संग्राम आहे तोच अधिभौतिक आधिदैविक आणि आध्यात्मिक क्षेत्रांत, इतिहासांत पुराणांत आणि वेदवेदान्त शास्त्रांत, परोपरीनें वर्णिला आहे. परमात्मा हा या तिन्ही क्षेत्रांत विक्रान्त असल्यामुळेहि खरोखर तो त्रिविक्रम म्हणावयाचा. परमात्मा हा सत्यधर्मा असल्यामुळेच तो त्रिविक्रम आहे, विश्वविक्रम आहे.


महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः ।
त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् ॥५७॥


५३१. महर्षि (कपिलाचार्य)
"महर्षिः कपिलाचार्यः" हे सविशेषण एक पद आहे तथापि ही दोन पदें घेणेहि शक्य आहे. कपिलांना आचार्य म्हटल्यानंतर पुनः महर्षि हे विशेषण जोडण्याची खास गरज नाहींच. शिवाय "महर्षीणां भृगुरहम्" आणि "सिद्धानां कपिलो मुनिः" असा गीतेंतील द्विविध उल्लेखहि चिन्त्य आहे. महर्षि वेगळे, सिद्ध वेगळे. ज्याला एखाद्या आध्यात्मिक सत्याचे दर्शन झालें तो ऋषि होय. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे' अशा सारखें सत्य ज्याला स्फुरलें तो ऋषि म्हणावयाचा. परंतु ज्याला ह्या विश्वाचे, ह्या जीवनाचे निःसंदेह आणि समग्र ज्ञान झाले आहे आणि त्या ज्ञानानुसार ज्याचे समग्र जीवन कायिक वाचिक मानसिक आणि भूत भवत् भविष्यत् गंगौघवत् चाललें आहे तो महर्षि म्हणावयाचा. "ब्रह्म सत्यं, जगत् स्फूर्तिः, जीवनं सत्यशोधनम्" चा द्रष्टा हा असा महर्षि होय. हा आजच्या काळचा झाला. गीतेच्या काळचा म्हणजे गीतेच्या स्मरणांतला असा महर्षि म्हणजे भृगू. उपनिषदांत आले आहे "भृगुर्वै वारुणिः, अधीहि भगवो ब्रह्मेति पितरं उपससार" वरुणाकडून भृगला जी ब्रह्मविद्या मिळाली आणि जी त्यानें आचरून संप्रदायांत प्रवर्तित केली तिच्या बळावर तो महर्षि झाला. अर्थात् महर्षि म्हणजे संप्रदाय-प्रवर्तक ऋषि होय. आणि ज्या अर्थी सर्व संप्रदाय-प्रवर्तकांचाहि गुरु परमात्मा आहे त्या अर्थी तो महर्षि होय, किंबहुना परमर्षि होय. जीवनसूत्र धर्म आणि तत्फलित सुख, ज्ञान आणि तत्फलित मोक्ष, प्रेम आणि तत्फलित ऐक्य, किंबहुना तो आणि हा यांचा आधार एक निजात्माच आहे. तो स्वाधार सर्वाधार निजात्मा ज्यानें साक्षात् केला प्रत्यक्ष केला तो ऋषि होय, महर्षि होय, परमर्षि होय. हे आत्मज्ञान ज्याला साधना करून मिळवावे लागतें तो साधक, ज्याला तें उपजतच असतें तो सिद्ध. जो साधकांचा नि सिद्धांचा उपास्य आहे
तो परमात्मा परम सिद्ध म्हणावयाचा. कपिलाचार्य हे असे सिद्ध होते. परम सिद्धाचे अवतार होते.
५३१. (महर्षि) कपिलाचार्य
ऋषि प्रसूतं कपिलं यस्तं अग्रे ज्ञानैर्बिभर्ति जायमानं च पश्यत् । इत्यादि श्रुति आहे. हा कपिल आणि सांख्याचार्य कपिल एकच का ? शंकराचार्य कपिल पदानें सांख्याचार्य समजत नाहीत. कपिल म्हणजे पहिला जीव ब्रह्मदेव असा त्यांचा अभिप्राय दिसतो. ब्रह्मदेवालाच अग्रे म्हणजे सृष्टीच्या प्रारंभी परमात्म्यानें ज्ञान भरविले होते. त्यामुळे श्रुतिवचनांतील कपिल हा सांख्याचार्य नव्हे.
पण मी तर म्हणेन की प्रत्येक जीवच कपिल आहे. त्याला जन्मतांच परमात्मा संवेदना देत असतो. आणि म्हणून कपिल म्हणजे जीवमात्र. तो जन्मतः कपिल असतो, कृष्णवर्ण असतो. वारेनें वेष्टिलेला आणि अज्ञानानेहि वेष्टिलेला म्हणून कपिल. गर्भोपनिषदांत ह्या कपिलाच्या दशेचे वर्णन आलेलें आहे.

परंतु आदि जीव ब्रह्मा अथवा जीवमात्र यांची कांहीं आचार्य म्हणून प्रसिद्धि नाही. ती प्रसिद्धि तर सांख्याचार्य कपिलाचीच आहे आणि म्हणून कपिलाचार्य म्हणजे कर्दम आणि देवहूति यांचा पुत्र आणि मनूचा दौहित्र च समजला पाहिजे. प्रकृति आणि पुरुष हा पहिला ज्ञानविभाग, पुरुष एकधा, प्रकृति अष्टधा विकृति अष्टाविंशतिधा इत्यादि त्याचा विस्तार पहिल्या प्रथम कपिलाचार्यांनी शास्त्रीय पद्धतीनें मांडला म्हणून ते आचार्य म्हणविले गेले. त्यानंतर त्याचा विकास त्यांच्या शिष्यांनी केला आणि सांख्यविचार आणि संप्रदाय जगांत मान्यता पावला. हे जें महनीय तत्त्वसंख्यान कपिलांनी केले त्यांत आजतागायत कोणी काही म्हणण्यासारखी भर घालूं शकले नाहीत. किंबहुना सर्व ज्ञानाचा तें आधार होऊन बसले आहे. त्यामुळे कपिल हेच एक आचार्य पदवीस पात्र आहेत. इतर सारे त्यांचे ऋणी शिष्य होत. आज आम्ही आचार्य पदवी वाटेल त्याला बहाल करून सवंग करून टाकली आहे. पण ती पदवी जैमिनि, बादरायण, कपिल, पतंजलि, गौतम, कणाद अशा मौलिक विचारकांनाच शोभते. या सर्वांत कपिल हे अग्रगण्य आहेत म्हणून ते परमात्म्याचा एक अवतार म्हटले गेले आहेत आणि हा अवतार ज्ञानावतार आहे.

५३२. कृतज्ञ [(१) कृत-ज्ञः (२) कृत+ज्ञ] .
"कृतं जानाति स्मरति इति कृतज्ञः । " अथवा "कृतश्च असौ ज्ञश्च इति कृतज्ञः" अशा दोन प्रकारें हे पद व्युत्पादितां येते. कृतज्ञ पदाचा रूढ अर्थ आहे आपल्यावर केलेला उपकार स्मरणारा. पण परमेश्वरावर कोण कसा उपकार करणार ? म्हणून मग दुसरी व्युत्पत्ति कल्पिली. पण कृत म्हणजे कर्म असा धात्वर्थ घेतल्यास जें जें केलें तें तें जाणणारा म्हणून परमात्मा हा कृतज्ञ म्हणतां येतो. शिवाय उपकार असाहि अर्थ कृत पदाचा घेतला तरी काही बिघडण्याचे कारण नाही. उपकार म्हणजे अनुकूल कर्म.जीव परमात्म्याला प्रिय असें जें जें करतो तें तें तो परमात्मा विशेषेकरून जाणतो, अनुमोदितो मग ते किती का तुच्छ असेना. म्हणून तो कृतज्ञ. गीतेत म्हटलेंच आहे -
पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति ।
तद् अहं भक्त्युपहृतं अश्नामि प्रयतात्मनः ॥ गीता ९-२६

निष्काम भक्ताचे पत्र पुष्प असो पण नुसतें प्रेमानें घेतलेलें नाम, केलेलें स्मित, मनोमन केलेलें स्मरण किंबहुना प्रेममय विस्मरणहि परमात्म्याला अत्यंत प्रिय आहे. तेहि तो ओळखतो म्हणून तो परमात्मा कृतज्ञ होय.
रामहिं केवल प्रेमपियारा ।
जानि लेहु जो जाननिहारा ॥

रामाला केवळ एक प्रेमच प्रिय आहे. कोणीहि हे केव्हांहि कुठेहि पडताळून घ्यावे. सर्वांनाच निरपवाद जर प्रेम प्रिय आहे, तर प्रेमाला वश न होणारा असा प्राणी कोणी असूच शकत नाही आणि म्हणून "प्रेमैव कार्यं प्रेमैव कार्यम्" प्रेमच कर्तव्य आणि निरपवाद कर्तव्य आहे. सत्याग्रहाचा हाच मूलाधार आहे. सूर्यापुढे जसा अंधकार आपलें तोंड काळे करतो, त्यापुढे येतच नाही तसा प्रेमापूढें शत्रु ठरतच नाहीं. त्याचे शत्रुत्व प्रेमानें केव्हांच ठार केलेले आहे.
कृतश्च असौ ज्ञश्च इति कृतज्ञः ही कृत्रिम व्युत्पत्ति आहे. तिचा अर्थ तो परमात्मा ज्ञेय आणि ज्ञाता दोन्ही आहे असा होईल.

५३३. मेदिनीपति
भूगर्भ ८, महीभर्ता २०, मेदिनीपति ५७, त्याच प्रमाणें धरणीधर २५, महीधर ३४, ४०, धराधर ८०, असे समानार्थक अनेक शब्द सहस्रांत आले आहेत. त्यांचा आशयहि समानच आहे. भू म्हणजे जन्मभू, मही म्हणजे थोर, पूजनीय, धरणी आणि धरा दोहोंचाहि अर्थ धारण करणारी, धारण करणारी म्हणजे जन्मापूर्वी गर्भरूपानें जन्मोत्तर अंकावर आणि मरणोत्तर पदराखाली झांकून धारण करणारी. अशी जी सर्वजीव-निकायाला धारण करणारी आणि आपल्या स्तन्यानें पोषून पुष्ट करणारी, मेदुर बनविणारी, तीच मेदिनीहि म्हटली गेली आहे. या अशा मेदिनीचा स्वामी, तिलाहि आपल्या अंकावर धारण करणारा तो मेदिनीपति भगवान् विष्णु होय, परमात्मा होय. इथे भूमि म्हणजे केवळ भूलोकच नव्हे तर लोकमात्र समजावयाचे आहे. जिथे जिथे जीवकला आलोकित झाली आहे, प्रकाशित झाली आहे, तो सर्वजीवनाधार लोकपदवीस पात्र होय. तोच इथे मेदिनी म्हटला आहे. चिंधीची कांहीं किंमत नाही, पण ती रत्न सांभाळून असते म्हणून तिची किंमत रत्नाइतकीच म्हणावी लागते. त्याप्रमाणें या विश्वाची किंमत कांहीं नाही. परंतु ज्या अर्थी तें ईशावास्य आहे, परमात्म्याचें निकेतन आहे त्याअर्थी त्याची किंमत अगणित आहे. तें ब्रह्म-संमित आहे. तिथे आत्मकला प्रकटली आहे, परमात्मसत्ता विनटली आहे. दिव्यांत भांडें, तेल, वात वगैरे अनेक वस्तु असल्या तरी त्यांची किंमत ज्योत असेल तरच. ती ज्योत तिथे प्रकटते म्हणून त्या समूहाला दिवा म्हणायचे. त्या प्रमाणें या लोकाला तो परमात्म्याचा आलोक धरतो म्हणूनच लोक म्हणायचे. तो परमात्मालोकच त्याचा पति आहे. असा हा परमात्मा मेदिनीपति म्हणावयाचा.

५३४. त्रिपद (त्रिपद् त्रिपदः)
उपनिषदांत आत्मा हा चतुष्कल वा चतुष्पाद म्हटला आहे. विश्व तैजस प्राज्ञ आणि तुरीय ही त्याची नामें आहेत. परंतु इथें तर तो परमात्मा त्रिपद म्हटला आहे. त्रिपद म्हणजे तीन पदें असलेला. कोणती ही तीन पदें ? पुरुष सूक्तांत म्हटलें आहे-"पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपाद् अस्यामृतं दिवि" या सृष्टींत जो व्यक्त झाला आहे तो त्या परमात्म्याचा एक पाद आहे, उरलेले तीन पाद ते अव्यक्त आहेत आणि म्हणून ते स्वर्गात आहेत असें म्हटले आहे. व्यक्तमात्र येतें जातें, परंतु अव्यक्त हे ना येत ना जात. तें सदैव एकरूप राहते. म्हणून तेंच अमृत. तेंच परमात्म्याचे खरे रूप म्हणावयाचें. त्यालाच अनुलक्षून परमात्मा इथे त्रिपद म्हटला आहे.
अथवा सत् चित् आणि आनन्द हा जो परमात्म्याचा त्रिविध निर्देश तोच त्रिपद पदानें अभिप्रेत आहे असे समजावें.. असतो मा सद् गमय । तमसो मा ज्योतिर् गमय । मृत्योर् मा अमृतं गमय ।
या उपनिषद्-वचनांत ह्या त्रिपद परमात्म्याचाच तिहेरी उल्लेख केलेला आहे. गायत्री या तीन पदांना अनुलक्षूनच तर त्रिपदा झाली नाही ना ? त्रिपद परमात्म्याचा मन्त्र म्हणून त्रिपदा. अथवा "त्रीणि पदा विचक्रमे' तो तीन पदें चालला म्हणून त्रिपद म्हणावयाचा. त्रिपद म्हणजे त्रिविक्रम. परमात्मा आदि मध्य आणि अन्त अशी तीन पदें टाकून हे विश्व निर्मितो पाळतो आणि संहरतो. म्हणूनहि तो त्रिपद. चौथे पद टाकण्याला काहीं उरतच नाहीं, जागाच नाही, म्हणून परमात्मा हा त्रिपद म्हटला आहे.
परमात्मा हा जसा त्रिपद आहे तसा हा विश्वाकारहि त्रिपदच आहे. आदिमध्यान्तमयच आहे. म्हणून त्रिपद म्हणजे अविश्व आणि विश्व दोन्ही समजावें वस्तु आणि वस्तुच्छाया अभिन्नच होत. वस्तु त्रिपद तर तिची छायाहि त्रिपद च म्हटली पाहिजे.

५३५. त्रिदशाध्यक्ष
[(१) त्रिदश+अध्यक्ष, (२) त्रिदशा+अध्यक्ष] त्रिदश म्हणजे त्रिंशत् देव त्यांचा जो अध्यक्ष तो त्रिदशाध्यक्ष म्हणावयाचा. पण हे त्रिंशत् देव कोणते ? दश दिशांचे पालक ते दिक्पालच त्रिभुवनानुसार त्रिदश देव होत. कोणत्याहि लोकांत दश दिशा असायच्याच. या विश्वाचे अधोमध्योर्ध्व लोक कल्पिले जातात. तदनुसार त्यांचे तीस दिक्पाल होणार. त्यांचा सर्वांचा जो एक अध्यक्ष तो परमात्माच त्रिदशाध्यक्ष म्हणावयाचा. सप्त वा चतुर्दश लोकांची कल्पना केली तरी ती या त्रिभुवन कल्पनेत समाविष्ट होते. अधोलोक आणि ऊर्ध्व लोक मिळून दोन झाले. उरलेले सर्व लोक मध्य लोकांत समाविष्ट होतील. मिळून लोक तीनच. अथवा त्रिदशा म्हणजे जाग्रत् स्वप्न सुषुप्ति या अवस्था, त्यांचा जो अध्यक्ष तुरीय तो परमात्मा त्रिदशाध्यक्ष म्हणावयाचा. प्रातःस्मरणांत शंकराचार्यांनी म्हटलेच आहे--"यत् स्वप्न-जागर- सुषुप्तमवैति नित्यं, तद् ब्रह्म निष्कलमहं, न च भूतसंघः । " तो अ+त्रि तुरीय परमात्माच त्रिमित दशांचा साक्षी आहे. तोच जाणतो की मी जागा आहे, मला स्वप्न पडत आहे वा पडलें होतें. अथवा मी गाढ झोपलों होतो. हा जो स्मृतिमान् तो त्या तिन्ही अवस्थाहून भिन्न असून तोच त्यांच्या गतागतांचा कूटस्थ नित्य साक्षी आहे. म्हणून तो तुरीय परमात्मा त्रिदशाध्यक्ष म्हटला आहे.
अथवा त्रिदशा म्हणजे प्रत्येक वस्तूची उत्पत्ति-पूर्व स्थिति, उत्पत्तिकालीन स्थिति आणि उत्पत्यनन्तरची लय स्थिति समजाव्या. या विश्वाच्या या तिन्ही अवस्थांचा साक्षी तो परमात्मा आहे. म्हणून तो परमात्मा त्रिदशाध्यक्ष म्हटला आहे. गीतेनें यालाच अनुलक्षून म्हटलें आहे "मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् । हेतुनानेन कौन्तेय जगद् विपरिवर्तते । "

५३६. महाशृंग
महत् शृंगं यस्य सः महाशृंगः, प्रलयपयोधिसंचारी मत्स्यावतारः । मोठे आहे ज्याचें शृंग तो महाशृंग, कल्पान्तैकार्णवसंचारी मत्स्यावतारी भगवान् विष्णु. कल्पान्ती जेव्हां सारे महासागर एक होतात तेव्हां सारें जग बुडालें तरी धर्म बुडत नाही. कारण तो या जगाचा धारक आहे आणि जो त्या धर्माला चिकटुन राहतो, किंबहुना धर्मरूपच होऊन राहतो, तो धर्मिष्ठहि बुडत नाही, त्याच्या रक्षणासाठी भगवान् अवतीर्ण होतात. ते त्याला धर्मासकट आपल्या उत्तुंग एकशृंगाला बांधलेल्या नौकेंत घेऊन प्रलयकाल संपेपर्यंत प्रलयपयोधि-पर्यटन करीत राहतात आणि जेव्हां नवीन कल्पारंभ होतो तेव्हां पाण्याच्या पृष्ठभागावर आलेल्या पृथ्वीच्या कडेला नाव लावून आपण निघून जातात. आणि मग तो धर्मिष्ठ मनु या पृथ्वीतलावर आपलें मन्वन्तर सुरू करतो. या - महाशृंग मत्स्यावताराचे चरित्र जयदेवानें आपल्या अष्टपदींत असें गाइलें आहे. "प्रलयपयोधिजले धृतवान् असि वेदम् । विहित-बहिचरित्रमखेदम् । केशव धृत-मीनशरीर, जय जगदीश हरे । " भगवंतानें मत्स्यावतार धारण करून वेद-रक्षण केले. काय, वेदाची पोथी त्यानें आपल्या पाठीवर वाहिली ? नव्हे, त्यानें धर्मिष्ठ म्हणजे वेदाज्ञापालक मनूला वाचवून वेद वाचवला. धार्मिकाच्या ठाईं धर्म प्रतिष्ठित असतो. धार्मिक वांचला तर धर्म वांचला म्हणावयाचा. आईच्या रूपानें वात्सल्य जगांत नांदत आहे. गुरूच्या रूपानें ज्ञान विराजत आहे. राजाच्या रूपानें धर्मशासन गाजत आहे. एरव्ही हे अव्यक्त धर्म तुम्हांला कुठे भेटणार ? धर्महि जगांत धर्मिष्ठाच्या रूपानेंच भेटावयाचा. असा एकहि धर्मिष्ठ या जगांत राहिला तरी त्याच्या रक्षणासाठी परमात्मा अवतार घेतो. तो संख्येचे रक्षण नाहीं करीत, धर्माचे करतो. जे सत्यरूप धर्माला आपण वाचावें म्हणून सोडतात, ते अखेर बुडतात. जो प्रलय झाला तरी धर्माला सोडीत नाहीं तोच वाचतो, त्याच्याचसाठी परमात्मा अवतीर्ण होतो.

५३७. कृतान्तकृत् [(१) कृत+अन्तकृत्, (२) कृतान्त कृत्]
कृतमात्रस्य अन्तं करोति इति कृतान्तकृत् । जो जें जें केलें आहे, घडले आहे, तें तें मोडतो, तो कृतान्तकृत् म्हणावयाचा. अर्थात् कृतान्तकृत् म्हणजे विश्वसंहारक, व्यक्तमात्र गिळून टाकणारा.परमात्मा हे विश्व घडतो घडवतो, राखतो आणि शेवटीं तें तो मोडतो. ह्या तिन्हीहि गोष्टी तो करीत असला तरी विश्वाची रचना आणि स्थिति ह्या अवस्था तात्कालिक आहेत, क्षणिक आहेत. नित्य आणि सहज स्थिति म्हणजे तो परमात्मा हे विश्व गिळून आहे. म्हणून तो परमात्मा शान्त शिव अद्वैत म्हटला जातो. वस्तुतः त्याच्या ठाई उत्पत्ति-स्थिति-लय संभवतच नाहींत. हा असंभवच इथे कृतान्तकृत् पदानें अभिप्रेत आहे. उत्पत्तिस्थितिकृत् हे तात्कालिक आहेत. कृतान्तकृत् हा शाश्वत आहे, ध्रुव आहे. म्हणून तो महादेव.
कृतान्त म्हणजे यम. त्याला जो करतो निर्मितो तोहि कृतान्त-कृत् म्हटला जाईल. यमाची सत्ता सर्वांवर चालते. पण विष्णु-भक्तांवर, परमेश्वराच्या भक्तांवर चालत नाही. परमात्म्याचे भक्त म्हणजे अनात्म देहाचा संग सोडून केवळ आत्माराम असलेले पुरुष होत. अशा आत्मभूत पुरुषांवर कृतान्ताची सत्ता कशी चालणार ? जें कृत आहे त्यावरच ना त्याची सत्ता चालायची ? आत्मवस्तु कृत नाहीं, ती स्वयंभू आहे. म्हणून ती आणि तद्प यांवर कृतान्ताची सत्ता चालत नाही, हे युक्त च आहे. पण अशा या कृतान्ताला परमात्मा निर्मितो तो का ? वस्तुतः तो कांहींच करीत नाही. तो सर्वाधार असल्यामुळे तो कृतान्तकृत् म्हटला आहे इतकेंच. पाण्यावर तरंग उठतात, खेळतात आणि निमतात. पण हें कांहीं त्या पाण्याचे कर्तृत्व नव्हे. वायुलहरीनें हे होत असते. तसे स्वभावतः जगदुत्पत्तिस्थितिलयादि घडत आहे. पण परमात्मा आधारभूमि असल्यामुळे., अधिष्ठान असल्यामुळे तो विश्व-कर्ता भर्ता हर्ता म्हटला जातो इतकेंच. परमात्मा प्रत्यक्ष कर्ता नाही, पण अधिष्ठान म्हणून करविता म्हटल्यास काय हरकत ? कृतान्तकृत् म्हणून परमात्म्याचे हेच सर्वकर्त अकर्तृत्व प्रकट केलें आहे.


महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी ।
गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः ॥५८॥


५३८. महावराह
सामान्य डुक्कर आपल्या तुण्डाग्रानें नासिकाग्रानें चिखल चिरतो, भुई उकरतो. त्याच्या सुळ्यावर चिखलाचा गोळा चिकटून येतो. मातीचे ढेकूळ चिकटून येते. ही पृथ्वीहि एक मातीचा गोळाच आहे. आम्ही त्याला भूगोल असें भव्य नांव देतों, पण आहे तो एक चिखलाचा गोळाच. हा चिखलाचा गोळा ज्यांत चौऱ्यांशी लक्ष योनि जीव-जीवाणु वळवळत आहेत, अव्यक्तार्णवाच्या तळाशी कुठें तरी होता. त्याला 'व्यक्ताच्या पृष्ठावर कोणी बरें आणलें ? अव्यक्तार्णवांत मुसंडी मारून "घ्राणेन पृथ्व्याः पदवीं विजिघ्रन्” हुंगहुंगून पृथ्वीचा शोध घेऊन कोणा महासत्त्वानें तिचा ठाव काढला आणि तिला आपल्या रदाग्रानें कंदुकवत् उचलून व्यक्त पृष्ठावर आणून ठेवलें ? तो जो महासत्त्व परमात्मा तोच महावराह होय. हा इतिहास विश्वोत्पत्तीच्या पुराणांत सांपडतो, आधुनिक मानवेतिहासांत तो सांपडणार नाही. इतिहासाचा विषय अतिच अर्वाचीन आहे. त्याचे स्थळ-काळ अतिच मर्यादित आहेत. पुराणांचा विषय झालेले स्थळ-काळ ब्रह्माण्डव्यापी आणि कल्पकल्पान्तर्गत आहेत. त्यांतील वर्ण्य विषयहि तसेच गंभीर आहेत. सृष्टि-दिक्-काल-स्रष्टे देव, ऋषि, मनु, वेद, यज्ञ, स्वर्ग, नरक, यक्ष, रक्ष, असुर, नाग किन्नर, गंधर्व, सिद्ध आणि परमात्म्याचे विविध अवतार आणि त्याच्या भक्तांची चरित्रे हा सगळा विषय अलौकिक आहे, दिव्य आहे, भव्य आहे, गुह्य आहे. महावराहाचे चरित्र त्यापैकीच. आज वराहाला तुच्छ जीव समजले जाते. ती एक शिवी होऊन बसली आहे.. पण ही भूल आहे. वराह हे सामान्य सत्त्व नव्हे. त्याची बुद्धि, त्याचे बळ, त्याची निर्भयता, त्याचा पराक्रम प्रशंसनीय आहे. तो प्रसंगी वाघाला आणि सिंहालाहि मात देतो. त्यांना तो भीत नाहींच. तो उपनिषदांत वर्णिल्याप्रमाणें 'अवाकी अनादरः' आहे. तो कोणाची पत्रास राखत नाही. हिरण्याक्षासारख्या धुडाला त्यानें खेळवलें आणि एका धडकेत लोळवले आणि पृथ्वीला सपत्र नलिनी प्रमाणें तो उचलून घेऊन आला.

५३९. गोविन्द
गोविन्द हे परमात्म्याचे नांव मोठे अर्थपूर्ण आहे. गो आणि विद् धातु यांच्यापासून ते बनले असून या दोहोंचे जितके काही अर्थ होतात ते सर्व त्यांत समाविष्ट होतात. गो म्हणजे पृथ्वी, गाय, इन्द्रिये, वाणी, ज्ञान आणि विद् म्हणजे जाणणे, मिळवणे इत्यादि, गो शब्द गम् धातुपासून व्युत्पादिला जातो. अर्थात् गो म्हणजे गमनशील प्राणी, चरणारा प्राणी. पृथ्वी सतत परिभ्रमते, गाय वनोपवनें हिंडते चरते.
इन्द्रिये आपल्या विषयांत फिरत चरत असतात, वाणी सर्वत्र वावरत असते, ज्ञान सर्वत्र संचरत असतें. त्याला अगोचर कांहींच नाही. अशा प्रकारें गोतत्त्व हे स्थूल सूक्ष्म सूक्ष्मतर आणि अति सूक्ष्म रूपानें सर्वत्र नांदतें आहे. या सूक्ष्मातिसूक्ष्म आणि स्थूलातिस्थूल गो-तत्त्वाला ज्यानें आकळलें आहे तो परमात्माच गोविंद म्हणावयाचा. सर्व विश्व जाणिवेच्या अधीन आहे. ज्या बाबत जाणीव नाहीं ती वस्तु आहे म्हणतां यावयाची नाही. चराचर सर्वांचे अस्तित्व चेतनाधीन आहे. चेतन नसेल तर अमुक एक वस्तु आहे हे कळणार कोणाला आणि ती मिळवणार तरी कोण ? जी वस्तु मुळी जाणवतच नाहीं ती मिळवलीहि जाऊं शकत नाही. म्हणून जाणणे आणि मिळवणे वस्तुतः अभिन्नच होत. परमात्मा हा चिद्रूप असल्यामुळे सर्व गोतत्त्व सूक्ष्मादि-स्थूलान्त तदधीनच आहे. तो मात्र कोणालाच आकळतां येत नाही. धरतां येत नाही. कारण तो केवळ विषयी आहे, विषय नाहीं. म्हणून ईशोपनिषद् म्हणते "अनेजत् एकं मनसो जवीयः नैनत् देवा आप्नुवन् पूर्वमर्षत् । तत्धावतोऽन्यान् अत्येति तिष्ठत् । तस्मिन् अपो मातरिश्वा दधाति ॥ परमात्मा हा असा गोविंद आहे. पृथ्वी, गाय, इन्द्रियें, वाणी, ज्ञान सर्व त्याच्या अधीन आहे. ज्ञान आध्यात्मिक, वाणी आधिदैविक आणि इन्द्रियादि आधिभौतिक होय. आणि या तिहींना त्यानें आकळलें आहे म्हणून तो गोविंद म्हटला आहे. अथवा इन्द्रिय त्याचे रूप पाहतात, वाणी त्याचे नाम गाते, चेतना तत्प्रविष्ट होऊन तदात्म होते म्हणूनहि तो गोविन्द म्हटला आहे. 'गोभिर् वित्तः इति गोविन्दः । वित्त विन्न विन्द ही तिन्ही विदचीं क्तान्त रूपें होत. विन्द हे रूप आर्ष होय, अथवा 'गोविं गव्यं ददाति इति गोविन्दः' जो गोसार देतो तो गोविंद. भगवान् कृष्णानें पृथ्वीचे सार ओषधि, ओषधींचें सार, दूध, आणि त्या दुधाचेहि सार नवनीत दिले आहे. तसेंच वाणीचे सार वेद, त्या वेदांचे सार उपनिषदें आणि त्यांचेहि सार गीता जगाला दिली आहे म्हणून तो गोविंद; लौकिक आणि अलौकिक दोन्ही अर्थांनीं तो गोविन्द आहे.

५४०. सुषेण
सु शोभना सेना यस्य सः सुषेणः । ज्याची सेना स्वकार्यक्षमतेमुळे शोभिवंत आहे तो सुषेण म्हणावयाचा. परमात्म्याची सेना कोणती ? संकल्प हीच परमात्म्याची सेना म्हणावयाची. परमात्म्याच्या संकल्पमात्र हे विश्व उदयास्त पावत असते. असें ज्याचे सामर्थ्य आहे तोच सुषेण, आपली यकिंचित् हानि न होऊं देतां जी प्रतिपक्षाला शमवते तीच सेना सु म्हणजे उत्तम म्हटली पाहिजे. अशी सेना एका परमात्म्यावांचून दुसऱ्या कोणाची दाखवता येईल. इतर कोणतीहि सेना कितीहि समर्थ असली तरी आपली मुळीच हानि न होऊं देणे तिला शक्य नाही. त्याच प्रमाणें आपल्या अंगीकृत कार्यात पूर्ण सफळ होणेहि तिच्या हातचे नाही. कारण सर्व कार्याच्या कारणांत दैव हे एक असें कारण आहे, आणि इतकें जबरदस्त कारण आहे, की त्यावर कोणाहि जीवांचा जराहि अधिकार पोचत नाही. तें खास देवाच्याच हातचे आहे. म्हणून तोच एक सुषेण म्हणावयाचा.
परमात्म्याप्रमाणें परमात्म्याचे अवतारहि सुषेणच म्हणावयाचे. परमेश्वरी संकल्पानेच ते प्रेरित असतात. त्यामुळे वानरसेनेच्या बळावरहि त्यांची मोहीम यशस्वी होते. वानर बलवान नखदन्तायुध तरी असतात. पण निर्बळ, नखदन्तहि अकिंचित्कर असलेले निःशस्त्र नर त्यांच्या सेनेच्या बळावरहि त्यांचा सत्याग्रह यशस्वी होतो. उलट महाबलवान् शस्त्रास्त्र-सुसज्ज चतुरंग सेना समन्वित रावण, जरासन्ध, हिटलर, टोजो सारखेहि परास्त होतात. कारण तिथे प्रेरणा परमात्म्याची नसते. तर अहंकाराची असते. "अहंकारं बलं दर्प कामं क्रोधं च संश्रिताः । मां आत्म-पर-देहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः" असे ते आसुरभावाविष्ट ईश्वराचा विरोध करीत असतात. परमात्म-संकल्प-शरणता हीच सुषेणता होय. ती जिथे आहे 'तत्र श्रीर् विजयो भूतिः' आहे. ती जिथे नाही, तद्विरोध जिथे आहे तिथे विनाश ठेवला आहे.

५४१. कनकाङ्गदी
कनकाङ्गदी म्हणजे सुवर्ण-केयूरवान्. सोन्याचे बाजूबंद ल्यालेला तो कनकाङ्गदी म्हणावयाचा. भगवान् गदी तसा कनकाङ्गदीहि आहे. तो जनार्दन गदा धरून वैऱ्यांना तर्जनच करीत नाही, तर कनकाङ्गद धारण करून भक्तांना सुखार्जनहि होतो. तो गदी होऊन अभक्तांना दुःखकर्ता आणि कनकाङ्गदी होऊन भक्तांना सुखकर्ता झालेला आहे. परमात्म्याचे विग्रह असंख्य शस्त्रास्त्रांनी तसेच असंख्य अलंकारांनी नटविलेले आपण पाहतों. भगवंताला, हा अलंकारांचा व शस्त्रास्त्रांचा इतका सोस का ? भगवंताला अलंकारांचा सोस नाहीं नि शस्त्रास्त्रांचाहि नाही. परंतु ती दोन्ही त्याची अंगभूत आहेत. परम सुंदर परमात्म्याची ही अंग-प्रत्यंगें अत्यंत आकर्षक अर्थात् नयनमनोहर आहेत. ही त्याची दिव्य शोभा, ही परमाह्लादकता सूचित करण्यासाठी त्याचे रूप नखशिखांत अलंकृत केले जाते. कनकाङ्गदी हे पद उपलक्षणात्मक आहे. तसेंच तो सर्वप्रहरणायुधहि वर्णिलेला आहे. कारण जे परमात्म्याला मानीत नाहीत, त्याचा विरोध करतात, त्याच्या प्रजेला व भक्तांना छळतात, त्यांना तो भयावह आहे. त्याची ही अभक्त-भयावहता प्रकट करण्यासाठी त्याच्या सर्वांगी शस्त्रास्त्रे विराजमान आहेत. अभक्तांना त्याची दृष्टि कालाग्नि समान दाहक आणि वाणी वज्रसमान विदारक आहे. त्याचे सर्वांग त्यांना भयावह आहे. म्हणून तो परमात्मा सर्वप्रहरणायुध वर्णिला जातो. सर्वत्र तो सर्वप्रहरणायुध वर्णिला वा रेखाटला जात नाही. कारण तसे करण्याची गरज नसते. त्याच्या हातांत एक छडीहि पुरे आणि एक मुद्रिकाहि बस आहे. ती छडी वा मुद्रिका उपलक्ष ण होय. तेवढ्यानें त्याचे परम भयावहत्व व परमाह्लादकत्व सूचित होते. परमात्मा हा केव्हांहि निरायुध आणि निरलंकार वर्णिला जात नाही याचे रहस्य हेच. परमात्मा हा सदैव निग्रहानुग्रहसमर्थ आहे. हे रहस्य ती भूषणायुधे सूचित करतात.

५४२. गुह्य
गुह्य म्हणजे अनाकलनीय रहस्यभूत वस्तु. गुह्य गोष्टी पुष्कळ असू शकतील, पण त्या सर्वांत मौन हे परम गुह्य समजले जाते. गीतेत म्हणूनच म्हटले आहे "मौनं चैवास्मि गुह्यानाम्" भगवान् म्हणतात, सर्व गुह्यांत मी मौन आहे. इथे गुह्य पदानें तेंच गृह्यतम अभिप्रेत आहे. उपनिषदांत गोष्ट आहे. एक अन्तेवासी आचार्याकडे गेला आणि मला ब्रह्म समजावून सांगा म्हणाला. आचार्य काहीच बोलले नाहीत. त्यानें पुनः तोच प्रश्न केला. तरी ते बोलले नाहीत. त्यानें आणखी तिसऱ्यांदा तो प्रश्न विचारला. आचार्य तरी बोलले नाहीत. क्षणभरानें पुढे ते त्याला म्हणाले, भल्या मुला ! तुला तीनतीनदां सांगितले की तो आत्मा शान्त आहे, मौन आहे, पण तूं लक्षांतच घेत नाहीस. तें ब्रह्म शब्दांनी सांगता येण्याजोगें नाहीं, खुणेनें दाखविता येण्याजोगें नाही. मनानें चिंतितां येण्याजोगें नाहीं. तें अनिर्वचनीय, अनिर्देश्य, अचिंत्य आहे. त्यामुळे तें परमगुह्य म्हणावयाचे. तें गुहेत दडलेलें आहे. अगदी अंतरतर आहे. तिथे कोणाचाच लाग लागत नाही. म्हणून ते गुह्य म्हणावयाचे. उपनिषद् म्हणतें "यद् वाचानभ्युदितं येन वाग् अभ्युद्यते । तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदं उपासते ॥ यन्मनसा न मनुते येनाहुर् मनो मतम् । तदेव ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदं उपासते ॥ जें जें म्हणून आपण पाहतों ऐकतों कल्पितों त्याहन ते वेगळे आहे, पार वेगळे आहे, अगदी मुलखावेगळं. त्यामुळे त्याला गृह्य म्हणावे लागते. तत्सम कांहीं नाहींच पण तत्तुल्यहि नाही. मग त्याचे आकलन कसे करावें ? साम्यवैषम्यानुराधानें आपण एखाद्या वस्तूची कल्पना करीत असतो. इथे तर साम्य नाहींच पण वैषम्याचाहि आश्रय घेऊन त्याची वैलक्षण्यानें कल्पना करतां येत नाहींः कारण त्यांत संबंध जोडला जातो आणि तो गुह्य परमात्मा तर केवलस्वरूप आहे. त्याचें वैलक्षण्य तरी कसे दाखविणे शक्य आहे ? म्हणून त्याला गुह्य म्हणावयाचे.

५४३. गभीर
"गुह्यो गभीरो गहनो गुप्तः' हे एक सूत्र आहे. सर्वांचे मिळून तात्पर्य हें की तो परमात्मा अगम्य आहे. "अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्‌भिर् अवाप्यते" "देहवंतास अव्यक्ती सुखें बोध घडेचि ना' गीतेच्या शब्दांत तेंच असें निरूपिलें आहे. तात्पर्य जरी एक असले तरी ते व्यक्त करणाऱ्या पदांच्या छटा वेगवेगळ्या आहेत. गुह्य म्हणजे गूढ, अव्यक्त. गभीर म्हणजे अथांग, खोलच खोल, अतल, गहन म्हणजे निबिड, घनदाट, अभेद्य. आणि गुप्त म्हणजे आवृत, योगमाया-समावृत, अन्तरित, अन्तर्हित.
नदी खोल आहे, डोह तीहून खोल आहे, सरोवर आणखीच खोल आहे, आणि समुद्र तर खोलच खोल आहे. पण यांच्या खोलीला इयत्ता आहे. आत्मतत्त्वाच्या खोलीला मुळी इयत्ताच नाही, मापच नाही. कारण, आत्मतत्त्व हें निरगुण आहे, निराकार आहे. आकाराला मोजमाप असतें, निराकाराला कुठचें ? जें निराकार, अव्यक्त, अचिन्त्य आहे त्या निर्गुणाची अगाधता किती वर्णावी ! त्या अगाधतेची, गंभीरतेची अनुभूति ज्ञानदेव अशी गातात "जाणोनियां नेणपण अंगी बाणलें । नेणोनियां जाणपण सहज नेणवलें वो माये ॥ आत्मज्ञानाची गति जाली निवांत । प्रबोधतत्त्व मी पावलें वो माये" तें आत्मतत्त्व, तो प्रबोध मुरलेल्या जाणिवेच्या स्वरूपाचा म्हणजे प्रगाढ निभृततेचा आहे. तीच गभीरता होय. तिथे जाणीव असून तिची खळबळ नाहीं, चळवळ नाहीं, वळवळ नाही. आहे केवळ निःस्संद निभृत गभीरता, प्रबोधाची सान्द्रता. या गंभीर परमात्म्याचेच वर्णन नासदीय "आनीद् अवातं स्वधया तदेकम्” असें करतें. उथळ पाण्याला खळखळाट फार, अशी म्हण आहे. पण आत्मतत्त्व त्याच्या अगदी विरुद्ध आहे. उथळ पाण्यांत तुम्ही आरपार पाहू शकता, पण खोल पाण्यांत कशाचाच थांग पत्ता लागत नाही. तसें आत्मतत्त्व अर्थांग आहे, गभीर आहे. अर्थात् अप्रतयं आहे. म्हणून परमात्मा गभीर म्हटला आहे.

५४४. गहन
परमात्मा हा गहन आहे. त्यांत कुणाचाच प्रवेश होत नाही. सर्व पदार्थात हिरा हा सर्वांत कठिण अभेद्य मानला जातो. पण त्यालाहि पैलू पाडले जातात. त्याचे तोल होते, त्याचे मोल होते. म्हणजे या प्रकारे त्यांत इंद्रियांचा मनाचा प्रवेश झालाच. जगांत अशी कोणतीहि वस्तु आढळत नाहीं की जीत इन्द्रियांचा आणि मनाचा प्रवेश होत नाही. प्रत्यक्ष वस्तूंत इंद्रियांचा प्रवेश होतो. त्यांचा शब्द स्पर्श रूप रस गन्ध इन्द्रियांकरवी जाणला जातो. रुपया घेतला तर त्याचा खणखण वा बद्द आवाज, त्याचा गुळगुळीत वा खरबरीत स्पर्श, त्याचा गोल आणि दन्तुर आकार त्याच प्रमाणें त्याचा पांढुरका रंग हें रूप, त्याची विशिष्ट चव म्हणजे रस आणि त्याचा तो तापवला असतां येणारा गन्ध श्रोत्र त्वक् नेत्र रसना आणि प्राण या इंद्रियांना गोचर होतो. परोक्ष वस्तुची कल्पना मन करते. त्या कल्पनेचा आधारहि विषयेन्द्रिय-संनिकर्षज पूर्वानुभवच असतो. अशा प्रकारे प्रत्यक्षाप्रत्यक्ष वस्तुमात्रांत प्रवेश होत असतो. परंतु जें अव्यक्त आहे, अतीन्द्रिय आहे, वाङ्मनाला अगोचर आहे, त्यांत कोणाचा प्रवेश होऊं शकेल ? आत्मतत्त्व हे असें आहे. तिथे इन्द्रियें वाणी मनं कोणाचीच पों, नाहा. मग त्यांत शिरकाव कुठला तें अतीन्द्रिय असले तरी बुद्धिग्राह्य म्हटले आहे. पण ही बुद्धि म्हणजे काय आहे ? काय ती अन्तःकरण पंचकापैकी एक आहे ? नाही. ही बुद्धि म्हणजे आत्म्याचा स्वभाव होय. आत्मा बाह्य कुठल्याहि करणांवाचून जो निजानुभव घेत असतो ती त्याची शक्ति इथे बुद्धि समजावयाची आहे आणि ती आत्म्याहून अभिन्न आहे. अर्थात् तो परमात्मा केवळ स्वसंवेद्य आहे, स्वेतरास अगोचर आहे. म्हणून तो गहन म्हणावयाचा.

५४५. गुप्त
परमात्मा गुप्त आहे. गुप्त म्हणजे अप्रकट, अदृश्य, अनिर्वचनीय, अचिन्त्य, ज्याचा थांगपत्ता लागत नाहीं त्याला गुप्त म्हणतात. तसा परमात्मा हा इदंतया न दाखविता येणारा तत्पदवाच्य म्हणून गुप्त म्हणावयाचा. वस्तुतः कोणतेहि दर्शक सर्वनाम त्याला लागू पडत नाही. त्याला हा म्हणावें तर तो चा निषेध होणार. बरें तो म्हणावें तर हा चा निषेध होणार, आणि तो तर आहे सर्वगत. परंतु सर्वगत असूनहि तो दिसत नाही. कारण तो सूक्ष्म, आहे. "सूक्ष्मत्वात् तद् अविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्' आकाशवत् तें आत्मतत्त्व दूर आणि जवळ सर्वत्र भरून आहे, पण सूक्ष्मत्वामुळे ते दिसत नाहीं, लक्षात येत नाही. अर्थात् तें अलक्ष्य असल्यामुळे त्याला गुप्त म्हटले जाते. पण वस्तुतः तें कशानें झांकले जाणारे नव्हे. जें झांकणार तें झांकावयाच्या वस्तूहून मोठे असते. पण असे मोठे त्याहून दुसरें नाहींच. म्हणून त्या आत्मतत्त्वालाच बृहत् म्हणून ब्रह्म संज्ञा दिली जाते. अर्थात् ब्रह्म म्हणजे न झांकलें जाणारें अति विशाल, सुबृहत्. पण असें हें बृहत् इथें गुप्त म्हटले आहे. कारण ते कोणा अतिसूक्ष्म बुद्धीच्या प्रज्ञावंतालाच उपलब्ध होते. 'दृश्यते त्वग्रया बुध्द्या' चर्मचक्षूच्या ढोबळ दृष्टीला तें दिसत नाही. चर्म-चक्षूनें जे दिसतें त्या इन्द्रियगोचर विषयांनी आमची बुद्धि पटलावृत झालेली आहे, त्यामुळे सर्वत्र गडगंज भरलेला परमात्मा आम्हांला दिसत नाही. तें पटल दृष्टीवरून दूर सारलें म्हणजे मग तें गुप्तच प्रकट होते आणि जें आजवर प्रकट होतें तें कायमचें लोपते. ज्याला भान झालें तो रज्जूच्या ठाई सर्पभ्रम पाहत नाही. त्याला रज्जू भेटते, सर्पिणी तुटते. तें सर्पभय कायमचे मिटते. ही निर्भयताच मुक्ति होय.

गुरुकृपेनें ज्याला ही दृष्टि लाभली त्या तत्त्वार्थाच्या पायाळूला मग तें गुप्तधन सर्वत्र दिसू लागते व तो गातो -"गुरुकृपांजन पायो मेरे भाई । रामबिना कुछ जानत नाहीं ॥ अंतर राम बाहर राम । जहां देखौ वहां राम ही राम जागत राम सोवत राम सपनें में देखौं राजाराम ।"

५४६. चक्रगदा-धर
राजा राजदण्ड कशासाठीं धारण करतो ? दुष्टांचें शासन आणि सज्जनांचे पालन करून धर्माची संस्थापना करण्यासाठी. भगवान्हि तसाच या विश्वाचें निग्रहानुग्रहरूप राज्य करण्यासाठी शस्त्र धारण करीत आहे. जो कोणी धर्मबाह्य वर्तन करील त्याला आपल्या अनिष्ट कर्माचें अनिष्ट फळ मिळाल्याशिवाय रहाणार नाही. तसेंच जो कोणी धर्मानुसार वागेल त्याला आपल्या इष्ट कर्माचे इष्ट फळहि मिळाल्याशिवाय रहावयाचें नाहीं. करावें तसें भरावें या न्यायाची अचूक अंमलबजावणी ईश्वरी राज्यांत होत असते. त्याची हमी भगवान् आपल्या चक्र-गदा-धारणानें जगाला देत आहे. चक्र भक्तसंकट-मोचन, तर गदा दुष्टदमन आहे. सुजनप्रतिपालन हे मुख्य आहे. दुर्जन-दमन हे तदंगभूत गौण आहे. म्हणून चक्र हे भगवन्मूर्तीच्या हातांत वर तर गदा खालीं धरलेली दाखविली आहे. राज्य म्हणजे राजकर्म. ते आहे धर्म-संस्थापन; प्रजापालन तदंगभूत होय. तसेंच ईश्वरी अवतार-कार्य धर्म-संस्थापन आहे. आणि त्याचे अंगभूत आहे प्रजापालन. त्या प्रजापालनाचे दोन विभाग म्हणजे सज्जनानुग्रह आणि दुर्जननिग्रह होत. आणि त्यांचे प्रतीक म्हणजे चक्र आणि गदा. आणि म्हणून भगवान् चक्रगदा-धर म्हटला आहे. मानवाची बुद्धि अल्प. ती न्यायाचें काय नि अन्यायाचे काय याचा निर्णय बिनचूक करू शकत नाही. पुष्कळदां तर न्यायाच्या नावाखाली अन्यायच होतो आणि चोर सुटून संन्यासीच सुळी जातो, असें आपण पाहतो. परंतु सर्वज्ञ आणि सर्वशक्ति परमात्म्याच्या न्यायदानांत अशी गफलत संभवत नाही. म्हणून तोच राजराजेश्वर होय. त्याच्याच शासनांत आपण रहावयाचे आहे. इतर कोणी राजा आणि त्याचे शासन हरिदासांना ठाऊक नाही. त्यांच्या दृष्टीसमोर सदैव चक्रगदाधर उभा असतो. त्यामुळे ते अगदी निर्भय असतात. त्यांना भगवंताच्या हातांतील चक्र म्हणजे सर्वतोभद्र सुदर्शन निःशंक शांति-सुखाची शाश्वती देत असतें. खरोखर तें चक्र म्हणजे स्वस्तिकच होय. त्याच्या हातांतील कौमोदकी गदा आपल्या नावाप्रमाणें जगांतील दुर्जनतेचा दुर्गंध दूर करून या पृथ्वीला आपल्या पराक्रमानें कुमुदवत् मुदित करीत असते. भक्तांना तिच्या दर्शनानें दुष्टतेचे पारिपत्य होईल याची हमी मिळते आणि ते दुर्जनांच्या दुर्जनतेला भीक न घालतां आपली सज्जनता कधी सोडीत नाहीत.


वेधाः स्वाङ्गोऽजितः कृष्णो दृढः संकर्षणोऽच्युतः ।
वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः ॥५९॥


५४७. वेधा
"विदधाति इति वेधाः" अशी व्युत्पत्ति दिली जाते या पदाची, तथापि ती नियमित नाही. 'पृषोदरादित्वात् साधुः' म्हणावे लागते. "यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मैं' असें उपनिषद्वचन आहे. त्याचा अर्थ असा की सृष्टीच्या प्रारंभी देवानें सृष्टिकर्ता प्रजापति निर्मिला आणि त्याला सृष्टिज्ञान-रूप वेदहि दिले. कोणताहि व्यापार करायचा झाला म्हणजे आधीं व्यापारी लागतो व त्याच्या जवळ व्यापारासाठी भांडवलहि लागते. ही दोन्ही जुळली म्हणजे मग व्यापार होतो. त्याप्रमाणें देवानें आधीं स्रष्टा ब्रह्मदेव पैदा केला आणि त्याला स्वकार्योपयोगी ज्ञानरूप भांडवल पुरविलें आणि सांगितले की कर आतां आपलें सृष्टिकर्म. हे सगळे विधान करणारा जो परमात्मा तोच इथे वेधा पदानें अभिप्रेत आहे. वेधा पदानें ब्रह्मदेवाचाहि उल्लेख केला जातो, पण तो अर्वाचीन आहे, गौण आहे. ब्रह्मदेवादि हे स्वतन्त्र नाहीत. ते नियुक्त आहेत आणि 'स्वतन्त्रः कर्ता' अशी कर्त्याची व्याख्या असल्यामुळे वेधाः म्हणजे विश्वकर्ता या पदानें परमात्माच अभिप्रेत आहे हे उघड आहे. विश् म्हणजे माणसें, जीव आणि त्यांनी युक्त तें विश्व म्हणावयाचे. असे हे जीवनिकाय विश्व जो करतो तो विश्वकर्मा होय, वेधा होय. परमात्म्याची ही विश्वनिर्मिति कशी होते ? "एकोऽहं बहुः स्याम् प्रजायेय' असा संकल्प जीवाच्या ठाई आधीं उठतो. हाच ब्रह्मदेव होय. तो मग जीवधानी कुलायरूप सृष्टि करतो, आणि तिथे प्रजा वाढवीत जातो. प्रत्येक जीवाच्या ठाई आढळणारी ही जी स्वाभाविक प्रेरणा तीच खरोखर सृष्टिकर्जी आहे. तीच वेधा या पदवीस पात्र आहे. ती प्रेरणा ईश्वरी असल्यामुळे तिचे कार्य में हें विश्व तेंहि ईश्वरी आहे आणि म्हणून शाश्वत आहे.

५४८. स्वाङ्ग
स्वयमेव कार्यस्य करणे अङ्गं सहकारि अस्य इति स्वाङ्गः । शंकराचार्य अशी व्युत्पत्ति देतात या पदाची. ईश्वरानें हे जग निर्मिले तेव्हां तें निर्मितांना त्यानें कोणते हात पाय वापरले ? जी जी म्हणून सावयव वस्तु आहे ती नाश पावते असे आपण जगांत पाहतों. सांग वा सावयव शरीरालाच "जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते' हे षड्भाव लागू होतात. मग तें शरीर 'अणोरणीयान् असो की 'महतो महीयान् असो. तें नाश हे पावणारच. परंतु जिथे आकार नाहीं, छाया नाही, अणु नाहीं, भार नाहीं, गुण नाहीं त्या निर्गुण आत्मतत्त्वाला षड्भाव नाहीत, अर्थात् नाशहि नाही. तें परमात्मतत्त्वच इथे स्वाङ्ग म्हटले आहे. त्याला वेगळे अंग नाही. सर्व वस्तूंत अंगांगिभाव असतो. परंतु परमात्मवस्तूंत तसा नाही. तें केवलस्वरूप आहे. त्याच्या ठाई में अंगी तेंच अंग म्हणावे लागते. म्हणून ते स्वाङ्ग म्हटले आहे.
स्वः आत्मा एव अङ्गं शरीरं यस्य सः स्वाङ्ग चंदनवत् । स्वङ्ग निराळे, स्वाङ्ग निराळे. ज्याची सर्व अंगोपागें सुंदर आहेत अव्यंग आहेत, तें स्वङ्ग म्हणावयाचे. परंतु स्वङ्ग झाले तरी तें षड्भाव-रहित नव्हेच. परंतु स्वाङ्ग हे षड्भाव-मुक्त आहे आणि म्हणून खरेपणानें तेच स्वङ्ग होय. जें जरदङ्ग वा गलदङ्ग आहे तें स्वङ्ग कसे म्हणावें ? जें नाशवंत आहे त्याला सुंदर म्हणतां येत नाही. सुळावर चाललेल्याला धन, जन, यौवन काय सुख देणार ? काय गोड वाटणार ? महमूद गजनवीने हिंदुस्थानांत अनेक स्वाऱ्या केल्या आणि अपार लूट केली. सोनें, रुपें, हिरे माणके यांनी कोठार भरून ठेवलें. पण मरतांना बिचारा त्यांच्याकडे पहात ही अगणित संपत्ति आपल्याला सोडून जावे लागत आहे म्हणून ढळढळां रडत मेला. त्याच्या बरोबर एक फुटकी कवडीहि गेली नाही. त्याचा खजिनाहि गेला नाही किंवा जनानखानाहि गेला नाही. जीवाबरोबर त्यानें आचरलेल्या धर्माहून वेगळे दुसरें कांहीं एक जात नाही. सगळे इथेच सोडून जावे लागते. धन, पशु, भार्या, जन, देह. म्हटलेंच आहे "धनानि भूमौ, पशवश्च गोष्ठे, भार्या गृहद्वारि, जनः श्मशानें । देहश् चितायां, परलोक-मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः ॥ " आणि म्हणून सन्त एक धर्मच धरून राहतात आणि देह-गेहस्नेह सोडून देतात. त्यांच्या समोर सदैव स्वाङ्ग परमात्मा उभा असतो आणि त्यावरून ते आपली सर्व अंगोपांगें म्हणजे देह आणि देहानुगत सर्व भोग ओवाळून टाकतात. केवल तत्परायण होऊन राहतात. "किमीहः किंकायः स खलु किमुपायस् त्रिभुवनं किमाधारो धाता सृजति ?" असा प्रश्न. त्याचे उत्तर 'स्वाङ्गः लुतावत् . त्यानें हे सर्व स्वतःच निर्मिले. त्याला बाह्य हात पाय उपाय वा उपादान कांही लागत नाही. आपल्या अचिंत्य सामर्थ्यानें हे जग तो स्वतःच निर्मितो म्हणून तो स्वाङ्ग

५४९. अजित
जो कोणीहि कधीहि जिंकला नाहीं तो अजित होय. परमात्मा हा एकमेवाद्वितीय असल्यामुळे त्याला कोण नि काय जिंकणार ? त्यामुळे तो अजित म्हटला आहे. त्याचे सगुण साकार ईश्वरी अवतार जरी घेतले तरी तेहि अजितच. त्या अवतारांनाहि कोणी कधीं जिंकू शकला नाहींच. आपल्या प्रतिपक्षावर त्यानें सदैव मातच केली आहे. ईश्वरी अवतार कोणत्याहि का रूपांत असे ना, त्याचा शब्द कधीं व्यर्थ जावयाचा नाही. वस्तुतः हीच अवताराची ओळखण आहे. ज्ञानदेवानें ठीक च म्हटले आहेः " तयासि ओळखावया हेचि खूण । जें जगें नमस्कारिजे तयाची आण" ईश्वरी सामर्थ्य आणि प्रभाव अचिंत्य आहे. त्या विरुद्ध जें कांहीं उठेल तें पडलेंच म्हणून समजा. राम आणि कृष्ण या अवतारांनी वानरां आणि गुराख्यांकडून अद्‌भुत पराक्रम करविला. त्या वानरांची नि गुराख्यांची काय बुद्धि, काय शक्ति ? परंतु तिथे भगवंताचे अधिष्ठान होते. "याति हीन मति हीन, कर्म हीन" पण भगवच्छक्त्यनुगृहीत असल्यामुळे त्या क्षुद्र नरावानरांनी अचाट शक्तीच्या राक्षसांना पछाडलें. ज्यांनी जगाला त्राहि भगवन् करून सोडले होते त्या दैत्य-दानवांना असुर-राक्षसांना त्यांनी नेस्तनाबूद केलें. असें ज्याच्या सेवकांचे सामर्थ्य त्या स्वामीच्या सामर्थ्याची कल्पनाच केलेली बरी. तो परमात्मा तर अजित आहेच आहे, पण त्याचे दासहि अजित आहेत. त्यांच्यावर जग कधीहि विजय मिळवू शकलें नाही. म्हणूनच गांधीजी म्हणत, सत्याग्रहाला पराजय ठाऊक नाही. तें सदैव विजयी तत्त्व आहे. सत्याग्रहाचा आधार तें अजित आत्मतत्त्व आहे. इतर कोणतेंहि अनात्मबल त्याचा आधार नाही. सत्याग्रही आत्मनिष्ठ असल्यामुळे त्यावर जगांतील कोणत्याहि बळाची मात्रा चालत नाही. प्रहलादादि सत्याग्रहींनी हे वारंवार दाखवून दिले आहे. हरिदासांची आत्मनिष्ठा अजित आहेच, तशी हरीची इच्छाहि अजित आहे. इथे अजित पदानें त्या हरीच्या इच्छेचे समातशायित्व प्रकट केले आहे. जित असा पाठ घेतल्यास जित म्हणजे स्वभक्त-जित म्हणावयाचे. बळीनें त्याला आपला द्वारपाळ बनविलें नाहीं काय ?
५५०. कृष्ण
आरंभी सातव्या श्लोकांत कृष्ण पद येऊन गेलें आहे. हे इथे एकोन साठाव्या श्लोकांत पुनः आले आहे. विष्णुसहस्रांतील नामें व्यक्तिवाचक नाहीत, गुणवाचक आहेत. त्यामुळे एक कृष्ण म्हणजे भगवान् गोपाळकृष्ण आणि दुसरा कृष्ण म्हणजे कृष्ण द्वैपायन व्यास असा अर्थ लावून व्यवस्था करता आली तरी तींत गुणवाचकत्व प्रकटत नाही. म्हणून कृष् धातूला कर्तरि आणि कर्मणि न प्रत्यय लागून कृष्ण म्हणजे कर्षण करणारा आणि कृष्ण म्हणजे कर्षिला गेलेला असे अर्थ लावतां येतील.
परमात्मा हा आपल्या अचिन्त्य गुणगौरवानें विश्वाला आकर्पून राहिला आहे. प्रत्येक जीवाच्या ठाई आत्मरूपानें राहून तो त्याचे परमप्रेमास्पद झाला आहे. त्यामुळे तो सहजच कृष्ण म्हटला गेला.
ह्या परमात्म्याचे अवतारहि असेच आकर्षक झाले आहेत. परंतु त्यांत देवकीपुत्र भगवान् कृष्ण विशेषतः कृष्ण म्हणजे आकर्षक झाला आहे. त्यानें आपल्या नाम-रूप-गुण-कर्मानी मोहून टाकलें होतें. त्याच्या मुरलीच्या मधुर रवानें गाई गरें वृक्ष लता जल व जलचरेंहि मुग्ध होऊन स्तब्ध होत. त्याच्या बोबड्या बोलांनीं आईबाप, मुरलीच्या बोलांनी संवगडी आणि गीतेच्या बोलांनी सारे विश्व मुग्ध झालेले आहे. त्याचे शैशव कौमार तारुण्य व प्रौढत्व सर्वच आकर्षक आहे म्हणून तो कृष्ण आकर्षक आहे तसा आकृष्टहि तोच आहे. परमात्म्याच्या ठाईं त्याला 'परम प्रेमास्पद निजात्मा जाणून आकृष्ट होणारा प्रत्येक जीवच कृष्ण आहे. परंतु व्यासासारखे परात्म्याचे अचिन्त्य माहात्म्य ओळखून "तबुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास् तत्परायणाः” होणारे भगवद्‌भक्त हे विशेषतः कृष्ण म्हणावयाचे. द्रौपदी अर्जुन आणि व्यास हे आर्त सखा आणि ज्ञानी भक्त कृष्ण पदवीस पात्र झाले होते. इथे कृष्ण पदानें शंकराचार्यांनी व्यास घेतले आहेत आणि ते योग्यच आहे. "मुनीनामप्यहं व्यासः" म्हणून व्यासांचें भगवद्विभूतित्व प्रसिद्धच आहे. व्यक्ति ही वस्तुतः अव्यक्ताचाच प्रकाश आहे. त्यामुळे परिणामतः व्यक्तिवाचकेंहि गुणवाचकेंच ठरतात-कर्ण म्हणजे औदार्य, व्यास म्हणजे ज्ञान, तद्वत्. .

५५१. दृढ
परमात्मा हा सदैव स्वरूपस्थित असल्यामुळे तो दृढ म्हटला आहे. "जें आपुलें साचें, तें कल्पान्तीहि न बचे" म्हणून त्यालाच धरून जो राहतो तो दृढ राहतो, भक्कम राहतो. उलट जें आपलें स्वरूप नाही, स्वभाव नाही, स्वधर्म नाही त्याचा जो आश्रय करतो तो अनात्मवश गौरव-च्युत होऊन भटकत भटकत राहतो. म्हणून सर्व वेद आणि संत म्हणतातः
"सुनु मन मूढ सिखावन मेरो । हरिपद-विमुख लह्यो न काहु सुख, सठ यह समुझ सबेरो । " बाबा रे, स्वधर्मनिष्ठ वर्तन स्वभावानुसंधानानें स्वरूप-स्थित हो. अन्यथा तुला कुठेहि सुखविश्राम लाभणार नाही, तुला सर्वत्र भ्रमत रहावे लागेल. 'नक्रः स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति’ मगर आपल्या मर्यादेत राहून मर्यादातिक्रम करणाऱ्या गजेंद्राला देखील खेंचून नेतो. तद्वत् स्व-स्य पुरुष अनाक्रान्त राहून जगाला जेर करूं शकतो. परमात्म्याहून अधिक स्व-स्थ दुसरा कोण असू शकेल ? म्हणून परमात्मा हा दृढ म्हटला आहे. त्यावर कोणाचीच कांहीं मात्रा चालत नाही. उलट त्याची मात्र सत्ता सर्वांवर चालते. परमात्म-केंद्र जगच्चक्राला स्वतः अविचल राहून, दृढ राहून, घुमवीत आहे. जे या दृढ केंद्राला धरून राहतात ते सुटतात. जे त्याच्यापासून भटकतात ते भरडले जातात. समर्थ म्हणतात, 'जो चंचला भजेल| तो सहजचि चळेल| जो निश्चला भजेल । तो निश्चल चि ॥ ' गीतेचा संदेश आणि आदेश हाच आहे "सर्वधर्मान् परित्यज्य मां एकं शरणं व्रज । अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः" जो दृढ परमात्म्याची उपासना करील तो दृढ होईल. त्यावर जगाच्या गतागताचा कांहीं एक परिणाम व्हावयाचा नाही. "जगें येवोत जावोत ते अभंग जसे तसे."

५५२. संकर्षण (अच्युत)
कल्पारंभी युगपत् विश्वतः विश्वसृष्टि होते, तर कल्पांतीं युगपत् विश्वतः विश्वसंहार होतो. त्या संहारकार्याचा कर्ता तो संकर्षण म्हणावयाचा. आपण सूर्योदयाला पाहतों युगपत् विश्व धवलूं लागते आणि प्रकटते. सूर्यास्ताला तेंच अंधारतें आणि लोप पावतें. लोप पावतें म्हणजे नाहीसे होते. पण नाहीसे होणे म्हणजे नष्ट होणे नव्हे, तर अगोचर होणे. ज्याचें मूळ शाश्वत आहे तें निःशेष नाहींसें कसे होणार ? या विश्वाचे मूळ तें शाश्वत ब्रह्म आहे. तें कल्पारंभी आपल्या अजम्न शक्तीनें हा विश्व-विस्तार करतें. आणि तेंच कल्पान्ती त्याचा समाहार करते. हे समाहार-कर्मच त्याला संकर्षण-पदवीस पात्र ठरवते. कालानुसार मूलगत अचिन्त्य शक्ति उत्स्फूर्त होऊन रसोत्कर्षवशात् पत्र-पुष्प-फलादि विविध सृष्टि करते आणि यथाकाल तीच समाहृत होऊन रसापकर्षवशात् सर्व पत्र पुष्प फल संभार विसृष्ट करून भूमिगत होऊन मूलस्थित होऊन राहते. या विश्ववल्लरीचाहि असाच प्रकार निरंतर चालू आहे. परमात्म्याची कालशक्ति जिच्यामुळे हे सृष्टिस्थितिसंहारचक्र अखंड परिवर्तमान आहे,. तिच्या एका आविर्भावाचे, संहारक आविर्भावाचे नाव आहे संकर्षण. या संकर्षणालाच शेष आणि अनन्त अशी नांवें दिली आहेत. सृष्टीचा संहार झाल्यानंतरहि तो अवशिष्ट राहतो म्हणून शेष. आणि सबंध सृष्टीचा अंत झाला तरी त्याचा होत नाही म्हणून तोच अनन्त. कल्पान्तीं होणाऱ्या संहाराहून वेगळा प्रतिक्षणीं होणारा जो संहार तोहि संकर्षण-शक्तीनेच होत असतो. परंतु तो एकसमयावच्छेदेकरून होणाऱ्या सृष्टिस्थितिसंहाररूप विश्वाचा एक अंश असल्यामुळे लक्षात येत नाही. तो अलक्ष्यगति आहे. शिवाय त्याचे स्वरूप अतळ आहे. नदीच्या प्रवाहानें एकीकडे भू भूधर खचत असतात तर त्याच वेळेला दुसरीकडे ते रचत असतात. ही क्रिया सुसूक्ष्म असल्यामुळे आमच्या लक्षात येत नाहीं आणि तिला सृष्टि म्हणावें वा संहार म्हणावें हे ठरत नाहीं वस्तुतः ही एक स्थिति च आहे "गतिरूप स्थिति" आणि जी गतिरूप आहे तिला स्थिति म्हणणे तुम्हांला विसंगत वाटत असेल तर म्हणा "स्थितिरूप गति." कारण गतीनें तत्त्व-संख्येत वा मात्रेत कांहींच फरक पडत नाही. आणि जिथें फरक होत नाही त्यालाच तर स्थिति म्हणतात ना ?

५५२. (संकर्षण) अच्युत
अच्युत म्हणजे आपल्या स्वत्वापासून न ढळणारा. परमात्मा हा सदैव स्वरूपी प्रतिष्ठित असल्यामुळे तो अच्युत म्हटला आहे. हे पद पूर्वीच दोन वेळां येऊन गेले आहे. परमात्म्याची ही अच्युतता सहज आहे. त्याला अनात्मधर्म स्पY शकत नसल्यामुळे तो अच्युत आहे, सर्वगत असल्यामुळे तो अच्युत आहे, सर्वशक्तिमान् असल्यामुळे तो अच्युत आहे. या सहज अच्युताचेच स्मरण करून साधकानेहि ती अच्युतता आपल्या अंगी बाणवली पाहिजे. परमार्थतः आपण अच्युतच आहोत. आणि दिसणारे सर्व विकार अनात्मधर्म आहेत हे ओळखून इष्टानिष्ट प्रसंगी हर्षामर्षरहित राहिले पाहिजे. आणि क्वचित् चित्तांत क्षोभ झाला तरी तो इन्द्रियद्वारा वाणीद्वारा प्रकट होणारा नाही, याची खबरदारी घेतली पाहिजे. या लक्ष्मण-रेखेचे उल्लंघन होणार नाही याचा निर्धार असला पाहिजे, निग्रह असला पाहिजे, अर्थात् बुद्धीत आत्मा हा अच्युत आहे, निर्विकार आहे हे तत्त्वतः ज्ञेयदर्शन झालेले असले पाहिजे, हा बोध ठसलेला असला पाहिजे. ही मूळ वस्तु आहे. त्यानंतर चित्तांत अक्षोभ्य शान्ति नांदली पाहिजे. चित्त आणि वाणी केव्हांहि विकारवश होता कामा नये, उत्तप्त होतां कामा नये. चित्तांत रागभयक्रोध यांचे तरंग उठता कामा नयेत. ही चित्तरक्षाच मुख्य कर्तव्य आहे. तथापि तें तितकेंसें सोपं नाही. तें ईश्वरी कृपेच्या अधीन आहे. म्हणून च गीतेत म्हटलें आहे "शक्नोतीहैव यः सोढुं प्राक् शरीरविमोक्षणात् । कामक्रोधोद्‌भवं वेगं स युक्तः स सुखी नरः" चित्तांत विकारांचे सूक्ष्म तरंग उठले तरी ते वाणींत आणि कृतींत उमटू न देतां जिरविणे ही युक्ति तरी साधकानें मरणापूर्वी साधून घ्यावी. ही धर्ममर्यादा आहे. हे व्यवहाराचे सूत्र आहे. ही मर्यादा, हे सूत्र ज्यानें सांभाळले आहे त्यानें आपले आद्य कर्तव्य पार पाडले. या इन्द्रिय- संयमाच्या पायावर मनःशांतीचे मंदिर आणि त्यावर आत्मज्ञानाचा कळस चढावयाचा आहे. गीतेनें जें आध्यात्मिक जीवनाचे महामंदिर रचिलें आहे, रेखाटलें आहे तें हें असें आहे. त्यांत जी परमात्म- देवता विराजमान आहे ती अच्युत आहे. संध्येत केशव नारायण अशी नाममाला आली आहे. पण तत्त्वज्ञ शंकराचार्य "अच्युतं केशवं रामनारायणम्" असें गातात. त्यांनी अच्युताला अग्रस्थान दिले आहे. त्याची अग्रपूजा केली आहे. स्तोत्रकार शंकराचार्यांच्या समोर केशव नारायण हीं संध्येतली नामें उघडच आहेत. पण त्यांत त्यांनी आरंभी अच्युताला ठेवून दिले आहे. हरीच्या आधी त्यांचा हा ॐ आहे. 'हरिः ॐ' मध्ये ॐ च्या आधी हरि उच्चारिला आहे. शंकराचार्य 'ॐ हरिः' म्हणत आहेत. ॐ म्हणजे निर्गुण परब्रह्म. हरि म्हणजे सगुण परमात्मा.

५५३. वरुण
वृणोति व्याप्नोति सर्वम् इति वरुणः परमात्मा हा जगत्-कारण असल्यामुळे कारणात्मना तो हे सर्व कार्यात्मक विश्व व्यापून आहे आणि कारण हे कार्यरूपाहून स्वतंत्रहि राहत असल्यामुळे तें कार्याला नुसतें व्यापूनच नाही तर वेढूनहि आहे. म्हणजे कार्यातिरिक्तहि आहे. म्हणजे परमात्मा या विश्वाला आंतून आणि बाहेरून व्यापून आहे. ईशावास्यांत आलेच आहे-“तद् अन्तर् अस्य सर्वस्य तद् उ सर्वस्यास्य बाह्यतः । ” पुरुषसूक्तानेंहि म्हटलेच आहे-"एतावान् अस्य महिमा अतो ज्यायांश्च पूरुषः" हे दृश्य कार्यरूप जगद्ब्रह्म म्हणजे त्या कारणात्मक परमात्म्याचा महिमा होय. पण तो कारणरूप परमात्मा ह्या महिन्याहून मोठा आहे. खूप खूप मोठा आहे. "पादोऽस्य विश्वा भूतानि, त्रिपाद् अस्यामृतं दिवि"हा दृश्य महिमा पादमात्र आहे. त्याचा अधिकतर भाग तर अदृश्य आहे, स्वर्गात आहे. हा सगळा व्यक्ताव्यक्त-महिमा वरुण पद प्रकट करतें.
"वरुणो यादसां अहम्' म्हणून जी भगवंताची जलचर विभूति प्रसिद्ध आहे ती येथील वरुण पदाहून वेगळी म्हटली पाहिजे. येथील वरुण पद परमात्मवाचक आहे, तद्विभूतिवाचक नाही. तथापि जल म्हणजे अव्यक्त आणि तद्गत म्हणून जलचर वरुण अशी कल्पना केल्यास विभूति आणि विभूतिमान् दोन्ही एक न म्हटले तरी अभिन्न झाले. वैदिक शब्द आध्यात्मिक स्वरूपाचे, पौराणिक आख्यायिका आधिदैविक स्वरूपाच्या आणि ऐतिहासिक घटना अधिभौतिक स्वरूपाच्या होत आणि तिन्ही एकमेकांचा निषेध वा विरोध न करतां बटमोगऱ्याच्या अनेकदली फुलाप्रमाणें एकत्र नांदत असतात. आम्ही हातांत पाणी घेऊन जेव्हा एखादा संकल्प सोडतों तेव्हां त्या जलगत वरुण देवतेच्या त्या अव्यक्त सर्वगत अक्षर परमात्म्याच्या साक्षीनें तो संकल्प सोडत असतो. आमच्या हातांत तर साधे भौतिक पाणी असते. परंतु तें पाशहस्त वरुण देवतेचे, त्या सर्वव्यापक परमात्म-सत्तेचे म्हणजेच वरुणाचे प्रतीक असते आणि त्याच्या साक्षीनें आमचा संकल्प आणि धर्मकर्म होत असतात. तो सर्वगत सर्वसाक्षी परमात्मा आमचे मनोगत, वचन आणि कर्म पहात आहे. त्याला आम्ही फसवू शकत नाही. म्हणून त्याच्या साक्षीनें जें करूं तें सत्यच करूं. त्यांत कपट असणार नाही. असा हातीं जल घेण्याचा अर्थ.

५५४. वारुण (वारुण वृक्ष)
या श्लोकांतील पूर्वार्धात आलेली "संकर्षणो ऽच्युतः" ही दोन पदें शंकराचार्यांनी सविशेषण एक नाम मानिले आहे. परंतु मी ती दोन पदेंच घेणे योग्य समजतों. कारण अच्युत हे संकर्षणाचे विशेष मानण्यांत कांहीं औचित्य नाही. उलट उत्तरार्धातील वारुणो वृक्षः हीं पदें जी शंकराचार्यांनी दोन वेगळी घेतली आहेत तींच सविशेषण एक नाम मानायला पाहिजेत. कारण वारुण म्हणून कोणी खास प्रसिद्ध नाही आणि परमात्म्याला केवळ वृक्ष म्हणण्यांतहि स्वारस्य नाही. पण 'वारुणो वृक्षः' म्हणण्यांत औचित्य आहे. परमात्मा हा वरुण म्हटला आहे. वरुण म्हणजे सर्वव्यापी अव्यक्त पुरुष, त्याचा वंशविस्तार म्हणजे हे अनन्तकोटिब्रह्माण्ड होय. तोच वारुण वृक्ष. बीज आणि वृक्ष दोन्ही एकरूपच होत. तद्वद् वरुण आणि वारुण वृक्ष एक परमात्माच होय. एक बीजरूप दुसरा वृक्षरूप. एक भूमिगत अव्यक्त, तर दुसरा विश्वव्यापी व्यक्त. हे व्यक्ताव्यक्त समस्त विश्व परमात्मस्वरूप आहे हे 'वरुणो वारुणो वृक्षः' या दोन पदांचे तात्पर्य होय.
वरुणस्य अपत्यं पुमान् वारुणः "वसिष्ठोऽत्रिर्वा' अशी वारुणाची व्युत्पत्ति आणि अर्थ दिला जातो आणि वारुण असें स्वतंत्र पद घ्यायचे तर असा अर्थ करणे भाग आहे. लोकांत वारुणी जशी प्रसिद्ध आहे तसा वारुण नाही. पण लोकांत नसला तरी तो वेदांत प्रसिद्ध आहे. ऋग्वेदांत वसिष्ठ-दृष्ट वरुण देवतेची चार दोन सूक्तेंच नाहींत, मंडलचे मंडल आले आहे. त्यामुळे वारुण म्हणजे वसिष्ठ हा अर्थ योग्यच आहे. हा पितृपुत्ररूप रक्तवंश की गुरुशिष्यरूप विद्या-वंश म्हणावा ? इथे तो उभयरूप दिसतो.'

वसिष्ठ विद्या आणि विनय यांनी संपन्न अशा ब्राह्मण्याचा म्हणजे ज्ञानविज्ञान-संपन्न परमोच्च व्यक्तित्वाचा आदर्श आहे. त्यांचे दर्शन आणि दैवी गुणसंपद् यांनी वेद-पुराणे भरून गेली आहेत. उघडच असें जीवन प्रातःस्मरणीय झालें. देवाचें प्रतिनाम झालें, प्रतिमान झाले.

५५५. वृक्ष
प्रत्येक भूत जर त्या परमात्म्याचाच आविर्भाव आहे तर वृक्षहि त्याचंच नांव आहे, यांत काय नवल ? "केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन् मया' या प्रश्नाचे उत्तर देतांना भगवान् आपल्या आत्मविभूति सांगतात त्यांत "अश्वत्यः सर्ववृक्षाणाम्' म्हणून वृक्ष-विभूतिहि आली आहे. पण तिथे अश्वत्थ ही विभूति आहे, वृक्ष नव्हे. वृक्ष ही साधी विभूति म्हणावयाची. इथे वृक्ष हीच विभूति आहे. प्रत्येक वृक्ष भगवद्-विभूति च आहे. लहान मोठा कोणताहि वृक्ष निरर्थक नाही. तो सर्वांगानें उपयोगी आहे म्हणजे अत्यन्त उपयोगी आहे. तो छाया पत्र पुष्प फल देतो. इन्धन देतो. अन्न आणि औषधी देतो. वस्त्र देतो, घर देतो. आणि केवळ द्विपादांनाच नव्हे तर चतुष्पादांनाहि. केवळ भूचरांनाच नव्हे तर खेचरांनाहि आणि जलचरांना सुद्धा. खरोखर चराचर सर्वच जीवांचा तो उपजीव्य आहे. परार्थ जीवनाचा तो आदर्शच आहे. जीवाची आद्येष्टि आणि अन्त्येष्टि त्याच्याच समिधांनी होते. त्याचा जीवनयज्ञहि त्याच्याच आहुतींनी संपन्न होत असतो. प्राण्यांच्या दुधावर आणि मांसावरहि जीव जगत असतो. पण तें दूध आणि तें मांसहि तृण-वीरुध आणि वृक्ष वनस्पति पचवूनच तयार झालेलें असतें. मासे शैवाल जातीय तृणवनस्पति खाऊन पुष्ट होतात. अजहरिणादिकहि तृणादिकांवरच पुष्ट होतात. आणि अशा शाकाहारी प्राण्यांचेच मांस मांसाहारी प्राण्यांना लागते. मांसाहारी प्राण्यांचे मांस कोणी पसंत करीत नाहींत. म्हणजे मूलतः सर्वांचे उपजीव्य वनस्पतिजगतच आहे. आणि याच दृष्टीनें शाकाहार हाच आहार आहे. वृक्षाचे विभूतित्व यांतच आहे. असा हा वृक्ष वृश्च् धातूवरून व्युत्पादिला जातो. आणि वृक्ष म्हणजे छेद्य असा अर्थ केला जातो. पण खरोखर वृक्ष उच्छेद्य नसून संवर्धनीय आहे. संगोपनीय आहे. वृक्षांचा नाश म्हणजे आपल्या मित्रांचा नाश होय. वृक्षांना मी आपले हिरवे मित्र म्हणतों. ते शाश्वत संपत्तीचे स्वामी आहेत, श्रीपति आहेत. श्री म्हणजे शोभा आणि श्री म्हणजे संपत्ति या दोन्ही अर्थांनी ते श्रीपति होत.

५५६. पुष्कराक्ष
पुष्कराक्ष पद पूर्वी पांचव्या श्लोकांत एकदां येऊन गेलें आहे. इथे एकोणसाठाव्या श्लोकांत ते पुन्हां आलें आहे. 'पुष्कराक्षो महास्वनः' आणि 'पुष्कराक्षो महामनाः' दोहोंत पुष्कळच साम्य आहे. विशेषतः ध्वनि-साम्य. शब्द (म्हणजे ध्वनि) आणि अर्थ यांत अक्षर तत्त्व ध्वनिच आहे आणि अर्थ तर बदलत जातो. देशकालनिमित्त-भेदानें त्याचे अर्थ बदलत जातात. संस्कृतांत अश्व म्हणजे घोडा. तोच इंग्रजीत अॅस म्हणजे गाढव होतो. केवढा झाला हा अर्थ-भेद ! पण शब्द तोच. तोच हा शब्द अशी प्रतीति त्यांच्या अक्षरावरून होते. भवभूति राममुखानें म्हणतो -

पुरा यत्र स्रोतः पुलिनमधुना तत्र सरितां विपर्यासं यातो घनविरलभावः क्षितिरुहाम्
बहोर्दृष्टं कालात् अपरमिवमन्ये वनमिदं निवासः शैलानां तदिदमिति बुद्धिं द्रढयति ॥


डोंगर स्थायी आहेत, नद्यांचे प्रवाह व वनें अस्थायी. तसें अक्षर स्थायी आहे, अर्थ अस्थायी आहे. म्हणून नित्यानित्यविवेकी नित्याचे वरण करून अनित्याविषयी वितृष्ण होतात.
पण ह्या प्रकारें तर पदांची पुनरावृत्ति होते ! खरें आहे. पण पुनरावृत्ति हा ग्रंथाचा दोषच नाहीं गुणहि आहे. तात्पर्य-निर्णयाचें तें एक लिंग म्हणजे गमक आहे. आणि ग्रंथकाराचे हृद्गत समजण्याला तें उपयोगी आहे.
पुनरुक्तीचा दोष-परिहार आनुपूर्वीभेदानें आणि अर्थभेदानें होतो हे पूर्वी दाखविलेच आहे. त्या विचारानुसार येथील आनुपूर्वी वेगळी आहेच आणि अर्थाच्या भेदाचाहि विचार होऊं शकतो. पूर्वी पुष्कराक्ष म्हणजे 'पुष्करे इव अक्षिणी यस्य सः पुष्कराक्षः' असा उपमित-बहुव्रीहीचा अर्थ घेतला आहे. इथें तो पुष्कराणि एव अक्षीणि यस्य सः पुष्कराक्षः असा अवधारण-बहुव्रीहीचा अर्थ घ्यावयाचा. ही पुष्करें कोणती ? आकाशांत सूर्यचंद्रतारका आणि भूमीवर कमलादि पुणेच पुष्करें होत.
शंकराचार्य हे पद "पुष्करं हृत्पुण्डलीकं अक्षति 'व्याप्नोति इति पुष्कराक्षः असें लावतात. म्हणजे जो निर्मल शुद्ध हृदयांत वसतो तो परमात्मा पुष्कराक्ष झाला.

५५७. महामना
महत् मनः यस्य सः महामनाः । मोठे आहे ज्याचें मन तो महामना म्हणावयाचा. पण मोठे म्हणजे काय ? आणि मन म्हणजे तरी काय ? "संकल्पविकल्पात्मकं मनः" अशी मनाची व्याख्या केली जाते. हत्तीचा कान जसा कधी निश्चळ असत नाहीं, सतत चळवळ करीत असतो तसे आपलें मन काही ना काही व्यापार करीत असते. झोपेतहि तें स्वस्थ बसत नाही. तिथे त्याचे व्यापार स्वप्नाकार धारण करीत असतात. सुषुप्तींत तें निःस्पंद होतें असें म्हणता येईल. पण तिथेहि तें नव्या जोमानें उसळी घेण्यासाठी जणूं दबा धरून असते. म्हणजे तें सक्रियच असते. एकूण काय की त्याला स्वस्थता म्हणून ठाऊक नाही. आतां हें जीवाचें मन लहान म्हणायचे की मोठे ? त्याचे संकल्प विकल्प क्षुद्र असतात म्हणून ते क्षुद्र म्हणजे लहान होय. पण ईश्वराचे संकल्प विकल्प विश्वाची घडामोड करणारे होत म्हणून त्याला महामना म्हणावयाचे. कुत्र्याचे मन हाडे नि कुत्री आणि माणसाचे मन पेढे नि स्त्री यांत गुंडाळलेलें असतें. दोहोंचें हि सार हें की जीवाला "अशनापिपासे एव अभिमते भवतः" त्याला खाणे पिणे नि मैथुनसुखच हवे हवेसे वाटते. त्याच्याबाहेर त्याच्या मनाची उडी नाही. परंतु परमात्म्याचे मन विलक्षण आहे. तें विश्वाची घडामोड करीत असते. त्याला जीवांच्या कामनांचा नि संकल्पांचा स्पर्श नसतो. या महापुरुषाचे जे सेवक ते भगवद्-भक्तहि असेच महान् असतात. 'अन्या जगद्धितमयी मनसः प्रवृत्तिः' असते त्यांची. त्यांना आपला स्वार्थ नसतो, भूतहिते रति असते, आणि करुणा-परवश होऊन ते वर्तत असतात. "महान्तस्ते समचित्ताः प्रशान्ता विमन्यवः सुहृदः साधवो ये" अशी आहे महन्ताची म्हणजेच महामनांची व्याख्या.


भगवान् भगहानन्दी वनमाली हलायुधः ।
आदित्यो ज्योतिरदित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः ॥६०॥


५५८. भगवान्
भगवान् हे पद केवळ एका परमात्म्यालाच लावलें जाते. त्याला दुसरा कोणीहि पात्र नाही. अलीकडे आणि पूर्वीहि भगवान् पद गौरवानें थोर पुरुषांना जोडले गेले आहे. पण तो केवळ अन्याय आहे. भगवान् श्रीधरस्वामी, भगवान् रमण महर्षि, भगवान् रामकृष्ण, भगवान् पाणिनि इत्यादि. या प्रयोगांत विवेक नाहीं, मर्यादा नाहीं, औद्धत्य आणि अहंकार आहे. जे खरे थोर असतात ते तर आपल्याला दास म्हणून घेतात. त्यांतच आपला गौरव समजतात. उलट त्या दासांच्या चरणरजाचीहि लायकी नसणारे आपल्याला स्वतःच भगवान् बिरुद लावून मिरवतात. अथवा दुसरे त्या पदानें आपल्याला गौरवितात हा अन्याय खुशाल चालू देतात. हिन्दु धर्मात गुरुवादानें विवेकहीनता आणि अमर्यादता बोकाळली आहे. या मूर्खतेला आणि अत्याचाराला गुरु शिष्य बळि पडले आहेत. मानवाची मूर्ति मंदिरांत स्थापणे आणि त्याची पूजा अर्चा करणे हे गर्दा आहे. पण हे असले चाळे रामकृष्ण मिशन सारखे संप्रदाय धर्माच्या नांवावर चालवीत आहेत. ब्राह्मसमाजानें ईश्वरी मूर्तीचाच निषेध केला तर रामकृष्ण संप्रदायानें गुरूचीच मूर्ति स्थापण्याचा अत्याचार मांडला आहे. खरा हिंदू धर्म या दोन्ही टोकांना टाळून मध्यस्थ मार्ग प्रतिपादितो. तो थोरांत थोर मानवालाहि देव बनवून त्याचे देव्हारे करणें अक्षम्य समजतो आणि अचिंत्य सामर्थ्याच्या अव्यक्त परमेश्वराची मूर्तिपूजा क्षम्य मानतो. ही क्षम्याक्षम्यता कशाच्या आधारे ठरविली ? भगवान् पदाच्या व्याख्येच्या आधारें, भग आणि भगवत् पदाची व्याख्या पुढील दोन श्लोकांत आली आहेः

ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशसः श्रियः ।
ज्ञानवैराग्ययोश्चैव षण्णां भग इतीरणा'
तथाच उत्पत्तिं प्रलयं चैव भूतानां आगति गतिम् ।
वेत्ति विद्यां अविद्यां च स वाच्यो भगवान् इति


या श्लोकांत वर्णिलेली योग्यता कोणत्याहि-देहधारी जीवाच्या ठाईं संभवत नसल्यामुळे भगवत् पदवीस तो पात्र होऊं शकत नाही. म्हणून भगवत्पदवांच्य तो एक अव्यक्त अक्षर परमात्माच होय.

५५९. भगहा
ऐश्वर्य आणि श्री, धर्म आणि यश, ज्ञान आणि वैराग्य या कार्यकारण भावानें निगडित असलेल्या जोड्या आहेत. जिथे ऐश्वर्य तिथेच श्री असावयाची. जिथें धर्म तिथेच यश असावयाचें. जिथे ज्ञान तिथेच वैराग्य अंसावयाचे. या षड्गुणांपैकी तीनच तुम्हांला मिळतील असें म्हटल्यास निवड करावयाची ती ऐश्वर्य, ज्ञान आणि धर्म यांचीच करावी लागेल. ते हस्तगत झाले म्हणजे उरलेले तीन गाई मागे वासरूं यावें तसे येतील. या तिहींची शास्त्रीय नांवें सत् चित् आनन्द अशी आहेत. परमात्मा सच्चिदानन्दविग्रह आहे. ईश्वर षड्गुणैश्वर्यसंपन्न भगवान् आहे. एक वेदान्त-परिभाषा आहे, दुसरी तदाधारें पौराणिक परिकल्पना आहे. सूर्याची जशी सौरी प्रभा चन्द्राची जशी कौमुदी त्याची नित्य अंगभूत असते तसे हे त्रिधर्म वा षड्गुण परमात्म्याचे अंगभूत होत. म्हणून तो सच्चिदानन्द-विग्रह म्हणावयांचा, भगवान् म्हणावयाचा. हे गुण त्याला आपल्या पासून केव्हांहि दूर करतां यावयाचे नाहीत म्हणून त्यांना विग्रह म्हणजे विशेषतः वेढून बसलेले अर्थात् शरीर म्हटलें आहे. शरीर शब्द शीर्ण होणारे म्हणजे फाटून गळून पडणारें या अर्थाचा आहे, तर विग्रह शब्द घट्ट चिकटून बसणारा या अर्थाचा आहे शरीर अनात्म, परधर्म आहे. विग्रह स्वरूप, आत्मधर्म आहे. जीवाला शरीर आहे, परमात्याला विग्रह आहे. तो भगवान् परमात्मा जीव ज्याला भग म्हणजे भाग्य समजून बसला आहे त्या अनात्म शरीराचे आणि तदनुगत भोगांचे कालरूपानें सतत हनन करीत असतो त्याला आत्मलाभ करून देण्यासाठी. म्हणून तो भगवान् परमात्माच भग-हा म्हणावयाचा. भं आकाशं गच्छति व्याप्नोति इति भगं तेजः । शून्यं विनाशं गच्छति इति भगं शरीरम् । या दोन प्रकारे मी भगपद व्युत्पादितों आणि तदनुसार भगवान् आणि भगहा पदें लावतों.

५६०. आनन्दी (अनन्दी-नन्दी)
परमात्म्याला दुःखाचा स्पर्शच होऊं शकत नसल्यामुळे तो सहजच आनन्दी म्हणावयाचा. आनन्द हा त्याचा स्वभावच आहे. आणि स्वभाव हा कधीहि दुरावत नसल्यामुळे तो आनन्दी, सदैव आनन्दी होय.
ज्यांचे सुख बाह्यावर अवलंबून असतें स्वभावगत नव्हे तर परभावगत असते ते कधीं सुखी तर कधी दुःखी होणार हे ठरूनच गेलें. जीवाचें सुख हे असें बाह्यावर परधर्मावर अनात्मधर्मावर, अवलंबून असल्यामुळे तो कधीहि आनन्दी म्हणतां यावयाचा नाही. त्याचा दिसणारा आनंद पाहता पाहतां नाहीसा होतो, इतकेच नव्हे तर दुःखरूप धारण करतो. अशा बेभरवंशाच्या आनन्दाला आनन्द कसे म्हणावें ? तो आनन्द म्हणजे तोतया होय. तो खरे म्हणजे दुःखच म्हटला पाहिजे. मायावी राक्षस कितीहि मोहक रूप घेऊन आले तरी ते मेले म्हणजे आपलें खरें राक्षसी. रूप धारण करीत. तिथे त्यांची माया टिकत नसे. तसेंच या नामधारी आनंदांचे आहे. ते निमाले म्हणजे त्यांची दुःखरूपता उघडी पडते. त्यांचे मायावीपण जे ओळखतात ते त्यांच्या योगें फसत नाहीत. जगाच्या मायावीपणाला अनुलक्षून भगवान् स्पष्टच गीतेत म्हणतातः
अनित्यं असुखं लोकं इमं प्राप्य भजस्व माम् । बाबा रे सगळे जग हे अनित्य आहे आणि तें असुखहि आहे. नित्यत्वाचा आणि सुखरूपत्वाचा त्यावर जो आरोप केला जातो तो भ्रान्ति आहे. त्या मृगजळाच्या मागें लागू नको तर मला भज. आत्मजीवन जग. तेंच तुला शाश्वत आनन्दलोकाला पोंचवील. जग हे अनित्य आहे म्हणून तेंदुःखरूप आहे असे नव्हे, दुःख हे अनित्यतामूलक आहे असे नव्हे, तर तें अनित्य तर आहेच पण स्वतंत्रपणे दुःखरूपहि आहे. अनित्य असो अगर नसो तेंदुःखरूपच आहे. जे अनित्यतेच्या कारणानें संसारापासून विरक्त होतात त्यांचे वैराग्य कच्चे. पण जे संसार हा समग्र दुःखच आहे याची खूणगाठ बांधून विरक्त होतात त्यांचे वैराग्य सच्चे, अशा सच्चा लोकांनाच आनन्दी परमात्म्याचे, परमात्म्याच्या आनंद-लोकाचे दर्शन होतें."बाह्यस्पर्शष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् । ब्रह्मयोग-युक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ॥ "

५६१. वनमाली
"वनमाली हलायुधः" ही जोडी आहे. कृष्ण बलराम यांची ती वाचक आहे. वयोनुक्रमानें ती रामकृष्ण अशी म्हणजे हलायुधो वनमाली अशी यायला पाहिजे होती. परंतु हा क्रम नायकोपनायक नामानें आला आहे. रामावतारांत राम नायक व लक्ष्मण सहायक झाला. आणि वयोनुक्रमहि तसाच होता. राम वडील, लक्ष्मण धाकटा. परंतु कृष्णावतारांत वडील बलराम आणि धाकटा आहे कृष्ण. तथापि नायक कृष्णच आहे आणि बलराम उपनायक अथवा सहकारी आहे. नरनारायणावतारांतहि तसेंच आहे. ज्यांची जीवनकार्ये अभिन्न होती आणि जे जुळे नसून जुळ्याप्रमाणें राहिले असे हे नरनारायण, रामलक्ष्मण, रामकृष्ण संयुक्त वा जोड अवतार होत.
'वनमाली हलायुधः' हा जोड अवतार दुसऱ्याहि प्रकारें जोडच आहे. वनमाळी म्हणजे गोपाल आणि हलायुध म्हणजे शेतकरी. गोपालन आणि कृषि हा एक जोड धंदा आहे. ते परस्पर पूरक आहेत. वनसंवर्धन गोपालन आणि कृषि हा एक संपूर्ण कार्यक्रम आहे आणि तोच विश्व-संजीवन आहे. त्याच्या विकासासाठी राजा. विश्व-संजीवनाच्या आड येणारे कंस जरासंध राजे जीवनद्रोही असुर म्हणून कृष्णानें त्यांचा हस्ते परहस्तें कांटा काढला, आणि जगाचे जीवन निष्कंटक केलें. हे धर्मसंस्थापन होय, त्यासाठींच परमात्मा वारंवार अवतार घेतो.
"वनानां माला वनमाला तद्वान् असौ वनमाली" असा या पदाचा विग्रह आणि व्युत्पत्ति. परंतु कोणाहि व्यक्तीला अशी वनांची माला अंगावर लेणे शक्य नाही. म्हणून वन म्हणजे वन्य पुष्प असा अर्थ केला जातो आणि वन्य पुष्पांची माला घालणारा भगवान् कृष्ण वनमाली म्हटला जातो. परंतु हा वस्तुतः विश्वाकार परमात्मा आपल्या अंगावर वनांच्या माळा मिरवत नाही काय ? आणि म्हणूनच परमात्मा हा वनमाली होय. केवळ वन्य पुष्पांच्या माळा घालतो म्हणून नव्हे.

५६२. हलायुध
हल म्हणजे नांगर ज्याचे आयुध आहे तो हलायुध बलराम होय. आयुध शब्दापासून आउत शब्द आला आहे. आउतें निराळी, हत्यारें निराळी अशी कल्पना कित्येक करतात. आणि म्हणतात, आयुधे म्हणजे आउतें ही शेतीची औजारें, विधायक उपकरणें होत आणि हत्यारें म्हणजे युद्धाची औजारें, हत्येची विनाशक साधनें होत. पण धात्वर्थानें पाहिले तर आयुध म्हणजे आउत हे युद्धाचे साधन ठरतें आणि हतियार हे हस्तकार म्हणजे हस्तोपकरण ठरतें जसें हतोडा. हत्या शब्दाशी अर्थाअर्थी त्याचा काही संबंध नाही. आतां या आयुधांनी लढायचे कुणाशी आहे ? हलानें शेतीशी शेतीतील अडचणींशी झगडायचे आहे. म्हणजे हली मुसली हा शेतकरी आहे. तो नांगरून शेती पिकवतो व पीक निघालें कीं तें मुसळानें कांडून व सुपानें पाखडून चोख दाणा कणगीत भरून ठेवतो.
'इस समस्या का हल’ असा प्रयोग हिंदीत होतो. तिथे हल म्हणजे सोडवणूक. शेतीच्या कठिण प्रश्नांची सोडवणुक हल म्हणजे नांगर करतो म्हणून तो सर्व सोडवणूकीचे साधन झाला आहे. आणि खरोखर अन्न समस्येचा हल हलावाचून दुसरा नाही आणि म्हणून समस्यांची समस्या जी अन्नसमस्या, अन्नसंकट त्याचे निवारण हलच आहे. तें ज्याचें आयुध तो जीवनोपयोगी परिश्रम करणारा शेतकरी हाच हलायुध होय. तो परमात्मा होय. हा हली परमात्मा दूर कुठे दडलेला नाही. तो तुमच्या भोवतीं शेतांतून उन्हांत राबत घाम गाळत आहे, पावसांत भिजत आहे,हिवांत कुडकुडत आहे. फाटक्या कपड्यांत उपाशा पोटी तुमच्यासाठी कापूस आणि हापूस, ज्वारी आणि बाजरी, डाळी आणि साळी, गहूं आणि बहु पिकवीत आहे. तो कमरेवर हात देऊन नुसता उभा नाही.

५६३. आदित्य
'अदितेः अपत्यं पुमान् आदित्यः" अदितींचा पुत्र तो आदित्य म्हणावयाचा. भगवान् वामन, अदिति आणि कश्यप महर्षि यांचा पुत्र, इथे आदित्य पदानें विशेषतः अभिप्रेत आहे, असे म्हणता येईल. अथवा आदित्य म्हणजे अदितिपुत्र देवमात्र घेता येतील. जो जो अदितिपुत्र आदित्य तो तो परमात्मस्वरूपच होय.
प्राची दिशा म्हणजे अदिति होय. तिच्यांतून उगवणारा प्रत्येक तारा आदित्य होय, देव होय. परंतु त्यांत सर्वांत तेजस्वी जो सूर्य तो विशेषतः आदित्य म्हटला जावा हे स्वाभाविकच आहे. त्यालाच पुढच्या पदांत ज्योतिरादित्य म्हटले आहे. अर्थात् तद्विरुद्ध इथलें आदित्य पद देवांतील आदित्य जो वामनावतार विष्णु तद्वाचकच समजावयाचे.
"आदित्यानां अहं विष्णुः" या वचनाच्या आधारें देवांमध्ये श्रेष्ठ देव जो विष्णु तोच इथे आदित्य पदानें अभिप्रेत आहे असे म्हणावें. हा विष्णु आणि वामन दोन नव्हेत. वामनच त्रिविक्रम होऊन त्रिलोकांत व्याप्त झाला म्हणून त्याला विष्णु पदवी प्राप्त झाली आहे. अदितीच्या सर्व पूत्रांत धाकटा म्हणून तो वामन म्हष्टला गेला आणि त्रिविक्रमशाली म्हणून विष्णु, व्यापनशील. सूर्यास्तानंतर पूर्व क्षितिजावर उगवणारे सर्व चंद्र तारे येऊन गेल्या नंतर शेवटीं सूर्य उगवतो आणि तो उगवल्यानंतर, कोणी उगवतांना दिसत नाहीं. म्हणून तो सर्वांत. धाकटा. "आदित्यो ज्योतिरादित्यः' ही पदें आणि गीतेंतील "आदित्यानां अहं विष्णुः ज्योतिषां रविरंशुमान्" ही वचनें क्रम आणि तात्पर्य यांत समान आहेत. गीता व विष्णु सहस्र यांचे ग्रंथ-कर्तृत्व एकाच व्यक्तीचे आहे असे यावरून सूचित होते असे म्हणतां येईल.
आदित्य आणि ज्योतिरादित्य दोन्ही वस्तुतः अभिन्न आहेत. एक आधिदैविक तर दुसरा आधिभौतिक आहे. पण दोहोंचाहि द्वादशसंख्येशी संबंध नाही. इथले आदित्य असंख्यच आहेत.

५६४. ज्योतिरादित्य
मूल आध्यात्मिक तेजच आदित्य वा देव या पदवीस पात्र होय. त्यावर उपासनेसाठी पुरुषत्वाचा जो आरोप तो आधिदैविक आदित्य विष्णु म्हणावयाचा. आणि प्रत्यक्षांत जो सर्व-लोक-नमस्कृत तेजोराशि सूर्य तोच आधिभौतिक ज्योतिरादित्य होय. सर्व प्रकाश त्या एका अव्यक्त अक्षर परमात्म्याचाच आहे. म्हणून आम्ही एखाद्या अति स्थूल भौतिक पदार्थाचा सूर्याचा, यज्ञीय अग्नीचा वा सायं दीपाचा पूजादि उपचार करतो तेव्हां तो अनाठाई नसतो. तो यथास्थानच असतो. कारण तो उपचार त्या अव्यक्त अक्षर पुरुषाचाच असतो. आम्ही सूर्याची उपासना करीत नाही, तर सूर्यनारायणाची करतो. सूर्य-बिम्बाच्या रूपानें प्रकटलेल्या त्या नारायाणाचीच करीत असतो. सबंध हिंदु धर्माच्या आचार विधीचा हा मूलाधार आहे. हिन्दुधर्मात काय काय विचित्र आचार आहेत ! दगडाची पूजा, झाडाची पूजा, पशूची पूजा, पक्ष्यांची पूजा, सर्पाची पूजा, जलचराची पूजा, लिंग आणि मूर्ति, अश्वत्थ आणि तुलसी, गाय आणि नंदी, गरुड आणि कावळा, नाग आणि साप, कासव आणि कालव-एक ना दोन सहस्रावधि पूज्य देवता आहेत. त्या सर्व त्या अव्यक्त परमात्म्याच्या गुणमूर्ति होत, विभूति होत. त्यांची पूजा ही त्यांची नसून त्या परमात्म्याची असते. पण हेहिन्दु धर्मातील रहस्य बाहेरच्या लोकांना कळत नाही आणि केव्हां केव्हां हिन्दु म्हणवणाऱ्या लोकांनाहि आकळत नाहीं. त्यामुळे ते त्याचा निषेध करतात वा उपेक्षा करतात.
गांधीजींनीहि अशाच मुळे आपल्या प्रातःस्मरणांतून सूर्याला बाद केलें आहे. त्या स्मरणांत भूदेवता आहे, सरस्वती आहे, गुरु आहे, विष्णु आहे, महादेव आहे पण सूर्य नाही. कारण सूर्य म्हणजे अगदी स्थूल भौतिक वस्तु ! किटसन बत्तीचा मोठा प्रकार ! त्याचे काय स्मरण करायचे ? अशी तुच्छ भावना. पण यांत हिन्दु धर्माच्या तत्त्वांच्या आणि शंकराचार्यानी लावून दिलेल्या पंचायतनपूजा व्यवहाराचाहि अनादरच दिसून येतो. पण मानवाचे अज्ञान क्षम्यच आहे. आणि त्यामुळेच तो परमात्मा सहिष्णु झाला आहे.

५६५. सहिष्णु (१ सहन करणारा २ जिंकणारा)
शिव शक्ति गणपति सूर्य आणि विष्णु या पांच देवतांची उपासना करावी अशी पंचायतन व्यवस्था शंकराचार्यांनी लावून दिली. या पांचांत सूर्य आणि विष्णु एक गट आहे, शिव शक्ति गणपति हा दुसरा गट आहे. दोन गटांचे प्रमुख अर्थात् शिव आणि विष्णु होत. "एको देवः केशवो वा शिवो वा" या कविवचनांतहि या विचारालाच पुष्टि देण्यात आली आहे. तथापि नीट पाहिल्यास सूर्य हीच मुख्य देवता असून तीच लोके वेदे च प्रथित आहे. सर्व वेदांचे सार गायत्री मंत्र या सवितृदेवाच्याच तेजाचे ध्यान करायला सांगत आहे. त्याची मूर्ति स्वयंभू आहे. ती घडवावी लागत नाहीं, स्थापावी लागत नाही. तिचे आवाहन नाहीं, विसर्जन नाही, तिचा पूजा प्रकारहि अत्यंत साधा आहे. नम्रतेनें दोन हात जोडले की झालें काम ! सूर्योदयाला सर्व लोक त्याला नमस्कार करतात. सूर्यास्तालाहि परत करतात. वैदिक धर्माप्रमाणें प्राचीन पारशी धर्महि सूर्योपासकच आहे. अशा या सूर्य देवतेची उपेक्षा कशी होऊं शकेल ? तथापि उपेक्षकांनाहि तो सहस्राक्ष परमात्मा क्षमाच करतो. तो जीवांच्या अज्ञानाची कीव करतो. त्यानें न्याय करावयाचा म्हटल्यास कोण वाचू शकेल ? सर्व दण्डित होतील. पण तो परमात्मा सहिष्णु आहे. तो सर्व सहन करतो आणि आशा बाळगतो की हे जीव आपलें अज्ञान उमगतील आणि आपल्याला भजतील.
सह धातूला स्नु प्रत्यय लागून जयिष्णु स्थास्तु इत्यादींप्रमाणें हा शब्द बनला आहे. सह् धातु वैदिक आहे. आणि त्याचा अर्थ जिंकणे, मात देणे असा आहे. म्हणजे सहिष्णु आणि जयिष्णु हे एकार्थक झाले. सहिष्णु मध्ये कसोटीला उतरून जिंकणे असा भाव आहे. निघर्षण-च्छेदन-ताप-ताडणांनी कनककसोटी होते. त्यांत तें उतरलें म्हणजे तें जिंकलें. परमात्मा हा तसा सर्व संकटांना पुरून उरतो म्हणून तो सहिष्णु म्हणावयाचा. "हिरा ठेवितां ऐरणीं वांचे मारितां जो घणीं । तोचि मोल पावे खरा| करणीचा होय चुरा । " परमात्मा खरा हिरा आहे. तो सर्व आघात सहन करून त्यांवर विजय मिळवितो. म्हणून तो सहिष्णु.

५६६. गतिसत्तम
गति म्हणजे मरणोत्तर जीवाचें गन्तव्य स्थान, अशी स्थानें किती आहेत आणि कोणकोणती आहेत ? त्यांचे नियामक तत्त्व कोणतें ? या प्रश्नांचे उत्तर थोडक्यांत हेंच की जसें कर्म तशी गति. आणि कर्म हे प्रतिजीव वेगवेगळे असल्यामुळे गतींना मिति नाही. पण स्थूलमानानें पापपुण्याच्या न्यूनाधिक्यानुसार त्या दोन गतींच्या मध्ये पुण्यबहुल आणि पापबहुल असंख्य गतींची स्थिति कल्पिली जाईल. ह्या सर्व गति अथवा लोक कर्म-चित म्हटले आहेत. कर्मचित म्हणजे कर्माने संपादिलेले. परंतु ह्या सर्व लोकांची, पुण्य लोकांची व पाप लोकांची, अवांतर हेयोपादेयता कांहींहि असो हे सर्व क्षयिष्णु लोक आहेत, काल-हत लोक आहेत. पुण्य वा पाप संपलें म्हणजे त्या लोकांतून तुम्हाला प्रस्थान करावे लागते. ते लोक शाश्वत नाहीत. पाप लोक शाश्वत नाहीत हे तर वरदानच म्हटले पाहिजे.
पण पुण्यलोकहि नश्वर असणें हें दुःखद आहे. आणि म्हणून असल्या पुण्यगति की ज्या अनिच्छेनें सोडाव्या लागतात कोण पतकरणार ? मनुष्य तर असेंच इच्छील की असा आनंद-लोक आम्हांला मिळावा की जिथून पुनरावर्तन नाही असा जो लोक, जी गति तीच सत्तम म्हणजे उत्तम, चिरंतन गति म्हणावयाची. ही गति कोणत्याहि कर्माने, पुण्य कर्मानेहि, हस्तगत होऊं शकत नाही. कारण कर्मानें संपादिलेले सर्व नश्वर असते असा सिद्धांत आहे. मग शाश्वत आनंदलोक कसा संपादावयाचा ? वेदान्त म्हणतो आत्मज्ञानानें. आत्मज्ञानानें जी गति लाभते तीच शाश्वत असते. म्हणून तीच सत् म्हणजे नित्य आणि सुखरूप होय. तिच्याहून अधिक नित्य आणि सुखरूप दुसरें कांहीं नसल्यामुळे तिलाच सत्तम म्हटले आहे. अशी ही गति म्हणजे आत्मगति होय. म्हणून परमात्मा हा गतिसत्तम म्हटला आहे. “गतिश्चासौ सत्तमश्च गति सत्तमः ।” अशी या पदाची फोड केली जाते. तात्पर्य अभिन्नच आहे.




॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP