ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

विस्तारः स्थावरस्थाणुः प्रमाणं बीजमव्ययम् ।
अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः ॥४६॥


४२६. विस्तार
विस्तार म्हणजे विश्वविस्तार. हा विस्तार परमात्मस्वरूपच आहे. परमात्म-सत्तेहून तो भिन्न नाहीं. बीजच वृक्षाकार धारण करतें, अर्थात् तें बीजाहून भिन्न नव्हे तद्वत्. तत्त्वतः तें अभिन्न आहे, पण कार्यतः तर तें भिन्नच म्हटले पाहिजे. मुळाहून कांहींच वेगळेपणा नसेल तर त्याला विस्तार कसें म्हणतां येईल ? बीज 'अणोर् अणीयान्' आहे तर कार्यरूप वृक्ष 'महतो महीयान्' आहे. म्हणून परमात्मा हा विश्वरूपाने विस्तार म्हणावयाचा. पण वरील दोहोंत, कार्य-कारणांत , दिसून येणारे हे अंतर, आभासिक म्हटले तरी नाकारता येत नाही. आणि त्यामुळेंच विस्तार पदाला अवकाश झाला आहे. जर आभासिकहि अन्तर नसेल तर मग तें स्वरूप केवल एकत्व म्हणावें लागेल. पण तसे केवलत्व मानल्यास कार्यकारणरूप वा कसलाच संबंध संभवणार नाही. म्हणून वेदान्त अद्वैततत्त्व प्रतिपादितो, एकत्व वा केवलत्व नव्हे. हे जग दिसायला जग, असायला ब्रह्म आहे. जगत् आणि ब्रह्म यांचा हा संबंध अद्वैतरूप आहे. यालाच विवर्त म्हटले आहे. हा विवर्त रज्जूसर्पवत् म्हणावा की सुवर्णकंकणवत् ? रज्जूसर्पवत् म्हटल्यास सर्प भ्रांति ठरतो आणि सुवर्णकंकणवत् म्हटल्यास कंकण भ्रांति नसून वस्तु आहे असे भासतें. वस्तुतः तीहि भ्रांतिच आहे. रज्जूवत् सुवर्णच सत्य आहे. सर्पवत् कंकणाकार मिथ्या आहे, भ्रांति आहे. ही साधार भ्रांतिच विस्तार होय. हा भ्रांतिमय विस्तार वस्तुतः तदाधारभूत अक्षर वस्तूहून अभिन्न असल्यामुळे परमात्मा हा विस्तार म्हटला आहे. तसा या विस्तारानें तो पूर्ण परमात्मा घटत नाहीं वा वाढत नाही. म्हणूनहि तो विगतस्तार विस्तार म्हणावयाचा.

४२७. स्थावर ( स्थाणु)
स्थावरश्च असौ स्थाणुश्च स्थावरस्थाणुः । स्थावरस्थाणु हे एक नाम आहे. आधीं स्थाणु स्थावर म्हणजे अचल. जंगमाचा, चलाचा, हा विपर्यास होय, या परिवर्तनशील जगांत स्थिर, स्थावर काय आहे ? खरोखर एका परमात्म्यावांचून कांहीं सुद्धां स्थिर नाहीं, स्थावर नाही. म्हणून जें स्थावर तोच परमात्मा होय. नद्या प्रवाह-नित्य आहेत आणि पर्वत कूटस्थनित्य आहेत. आणि म्हणून चिरस्थायी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. रामायणाबद्दल म्हटले आहे "यावत् स्थास्यन्ति गिरयः सरितश्च महीतले । तावद् रामायण, कथा लोकेषु प्रचरिष्यति' अर्थात् जशी गंगा, जसा हिमालय चिरस्थायी आहेत तशी रामायणी कथा चिरस्थायी आहे. पर्वताच्या स्थावरतेबद्दल उत्तर रामचरितांत म्हटले आहे -
पुरा यत्र स्रोतः पुलिनमधुना तत्र सरितां
विपर्यासं यातो घनविरलभावः क्षितिरुहाम् ।
बहोर् दृष्टं कालाद् अपरमिव मन्ये वनमिदं
निवासः शैलानां तदिदमिति बुद्धिं द्रढयति ॥

अर्थात् सर्व काही बदललें आहे, पण पर्वताच्या टेकड्या जिथल्या तिथे उभ्या आहेत त्यामुळे खात्री पटते आहे की तीच ही पंचवटी, तोच हा परिसर ! म्हणजे या पृथ्वीवर सर्वांत स्थिर स्थावर काहीं असेल तर त्या डोंगरांच्या टेकड्या होत. आणि ह्यालाच अनुलक्षून गीतेंत म्हटले आहे 'स्थावराणां हिमालयः" जगांत डोंगर स्थावर आहेत आणि त्या स्थावरांत मोठा आहे हिमालय. म्हणून तो भगवद्-विभूति म्हटला. भगवंताच्या अनंत गुणगौरवाचा जो जो अंशभाक् तो तो भगवद्-विभूति होय. परमेश्वराहून स्थावर, चिरस्थायी दुसरें कांहींच नाही, म्हणून खरोखर तो एक परमात्माच स्थावर म्हणावयाचा. 'तस्मिन् स्थावर इत्यनन्यविषयः शब्दो यथार्थाक्षरः ।' परंतु जगांत त्याचा जो उत्तम प्रतिनिधि तोहि गौरवानें भगवद्-विभूति म्हटला गेला इतकेंच. वस्तुतः तर सशैलवनकानना ही पृथ्वी आणि जी तिचा एक अंश आहे ती ही अनंतपार सृष्टि कल्पान्ती नाहींशीच होणारी आहे आणि प्रतिक्षणीहि परिवर्तन पावणारी आहे.

४२७. (स्थावर) स्थाणु
स्थावर आणि स्थाणु दोन्ही पदें स्थाधातूपासूनच आलेली आहेत. स्थावर म्हणजे अचल, तर स्थाणु म्हणजे अविक्रिय, स्थावर पदाने बाह्यतः तो कांहीं हालचाल करीत नाहीं, जागचा हलत नाहीं असें सुचविलें, तर स्थाणु पदानें अभ्यन्तरतःहि त्याच्यांत कांहीं चलन होत नाही, कसली क्रिया होत नाही असें सुचविले आहे. वृक्ष जागचा हलत नाहीं, पण त्याच्यांत 'जायते अस्ति वर्धते विपरिणमते अपक्षीयते म्रियते' ह्या षड् विक्रिया दिसून येतात. परंतु परमात्मा हा अक्रिय तसा अविक्रियहि आहे. तो कसलीहि हालचाल करीत नाही आणि त्याच्यांतहि कसली हालचाल होत नाहीं, परिवर्तन होत नाही. म्हणून तो स्थाणु म्हणावयाचा. स्थाणु म्हणजे खुंट. खूंटाला, लाकडाच्या दांडक्याला मुळे फुटत नाहीत किंवा फळें जुटत नाहीत. तो आपला जसाचा तसा असतो-अक्रिय अविक्रिय. परमात्म्याची ही अविक्रियता लक्षून तो शालग्राम वा लिंग म्हणून पाषाण-प्रतीकांत कल्पिला व पूजिला जातो. पण तो परमात्मा कुठे आणि कुठे तो पाषाण, दोहोंचा काय पाड ? ज्ञानदेवानें म्हटल्याप्रमाणे 'तो निर्शून्य निरुपम निरंजन निर्वाण | ते दशा पाषाण केवीं पावती ?' तो खरोखर निरुपम आहे. पण त्याचे उत्प्रेक्षण असल्या उपमांनी मानव करीत असतो. वस्तुतः तो परमात्मा निर्गुण निराकार सर्वव्यापक. त्याचीमूर्ति कल्पिणें अर्थात त्याला देश काल नाम रूप लिंग गुण कर्म चिकटविणेंच चूक. पण उपासक उपासनेसाठी तसे करतो आणि जनतेच्या भ्रमाला तें कारण होतें. गीतेत भगवंतानें स्पष्टच म्हटले आहे :
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते ॥ गीता ५ - १४
नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ गीता ५ - १५
अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मां अबुद्धयः ।
परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ गीता ७ - २४

सारांश, परमात्मा हा जन्मत नाहीं वा जन्माला घालत नाहीं. तो करीत नाहीं वा करवीत नाही. तो अक्रिय आणि अविक्रिय आहे. त्याचेच नांव स्थाणु.

४२८. प्रमाण
वस्तूचे यथार्थ ज्ञान म्हणजे प्रमा. तें करून देणारें जें साधन त्याचे नांव प्रमाण होय. अशी प्रमाणे म्हणजे प्रत्यक्ष, अनुमान शब्द इत्यादि होत. पण ही सर्व आत्मप्रत्यय-पर्यवसायीच होत. सर्व प्रवाह जसे शेवटी समुद्रालाच मिळायचे तशी सर्व प्रमाणे शेवटी आत्म्याच्या ठाईंच पर्यवसित व्हावयाची. सर्वांचा म्हणजे सर्व ज्ञानांचा आणि क्रियांचा आधार स्वात्मा आहे. त्याला सोडून कुठलेंच ज्ञान वा कर्म होऊं शकत नाही. म्हणून एकमात्र प्रमाण तो सर्वान्तर्यामी निजात्माच होय. म्हणूनच ज्ञानदेवाने म्हटले आहेः "ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान" हा सर्वाधार आत्माच ज्ञानदेवाला प्रमाण आहे आणि पाणिनीय शिक्षेत वाक्प्रवर्तन कसे होते याचे विवरण करतांना म्हटले आहे
"आत्मा बुध्द्या समेत्यर्थान् मनो युङ्क्ते विवक्षया ।
मनः कायाग्निमाहन्ति स प्रेरयति मारुतम् ॥
मारुतस् तुरसि चरन् मन्द्रं जनयति स्वरम् । "

अर्थात् जीवात्मा बुद्धीच्या द्वारा विषयांपर्यंत पोंचून त्यांच्या विषयी बोलायची इच्छा मनाच्या ठाई उत्पन्न करतो. आणि पुढे मन कायाग्नि चेतवून तद्वारा वायूला प्रेरणा देतें आणि तद्द्वारा वैखरी प्रकटते. या सर्व प्रकियेत आत्माच स्वतंत्र आहे. इतर बुद्धि मन इन्द्रियें वाक् सर्व पराधीन आहेत. साधनीभूत आहेत. आणि म्हणून या संपूर्ण प्रक्रियेचा कर्ता जसा आत्मा आहे तसा आणि त्याहि आधीं तो ज्ञाता आहे. म्हणूनच गीतेंत म्हटले आहे
ज्ञानं ज्ञेयं परिज्ञाता त्रिविधा कर्मचोदना ।
करणं कर्म कर्तेति त्रिविधः कर्म -संग्रहः । गीता १८ - १८

आधी कर्मचोदना आणि मग कर्म-संग्रह. आणि या दोहोंचाहि आधार आहे तो आत्मा, म्हणून तोच प्रमाण होय. तोच एक स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे, तो कोणावर अवलंबून नाही, पण सर्व त्याच्यावर अवलंबून आहेत अर्थात् खरे प्रमाण तोच म्हटला पाहिजे. त्याच्या वांचून कोणतेंहि प्रमेय सिद्ध होऊं शकत नाही, कोणतेहि प्रमाण होऊं शकत नाहीं. तोच एक प्रमेय आहे आणि तोच प्रमाण. कारण तो स्वतःच प्रमास्वरूप आहे संवि‌द्‌रूप आहे. ही संविद्च विज्ञाता आहे, विज्ञेय आहे, विज्ञान आहे.

४२९. (अव्यय) बीज
अव्यय बीज हे एक नाम आहे. सविशेषण विशेष्य. परमात्मा हा या विश्व-कदंबाचें अव्यय बीज आहे. त्या अव्यक्त बीजापासून हा व्यक्त वृक्षाकार संभूत झाला आहे.'यद् दृष्टं तद् नष्टम्' या न्यायानें हा शेवटी केव्हांतरी म्हणजे कल्पांती नाहींसा होणारच. पण तेव्हांहि अव्यक्त हे कायमच राहील म्हणून परमात्मा हा अव्यय बीज म्हणावयाचा. गीतेंत म्हटलेच आहेः "अव्यक्तादीनि भूतानि, व्यक्त-मध्यानि भारत । "
अव्यक्त-निधनानि = अव्यक्तापासून निघून हे व्यक्त विश्व परत अव्यक्तांत लीन होते. मध्यंतरीं तें कांहीं काळ भासमान होत राहतें इतकेंच, व्यक्त येते आणि जातें. परंतु अव्यक्त ना येत ना जात. म्हणून तें अव्यय होय. तसेंच हा विश्वकदंब त्याच्याच पासून आलेला म्हणून त्याला बीज म्हणावयाचें. एरव्हीं तो ना बीज, ना फळ. तो केवलस्वरूप आहे. त्याच्या विषयी सर्व विधानें जी केली जातात ती असताच्या अपेक्षेनेंच होत. तुलनेनें तोच आहे म्हणावयाचे. तेंहि कांहीं नाहींसें होतें त्या असताच्या अपेक्षेनेंच होय. एरव्हीं त्याला आहे तरी कसें म्हणणार. वृक्षाच्या अपेक्षेनें त्याला बीज म्हणावयाचे तसेंच व्ययीच्या, नाशवंताच्या, अपेक्षेनें त्याला अव्यय म्हणावयाचें. एरव्हीं तो ना बीज, ना अव्यय. तो आपला निरपेक्ष केवलस्वरूप आहे. अव्यय बीज म्हणण्यांत आणखी एक हेतु आहे. बीजाचा अंकुर होऊन तो वाढतो आणि बीज नाहींसें होते. म्हणजे हें बीज जेव्हां व्यय पावतें तेव्हां त्याच्या बदल्यांत उद्‌भिज्ज मिळतें. बीजाचा व्यय झाला नाहीं तर उद्‌भिज्जाचा आय होणार नाही. एकच लाडू खायचाहि आणि हाती ठेवायचाहि, जमायचे नाहीं. परंतु परमात्मा हा तसा आहे.

४२९. अव्यय (बीज)
तो एकाच वेळी बीज आणि वृक्ष आहे. व्यय न पावतां, विकृत न होतां, वृक्षाकार धारण करणारें बीज आहे तो. भागवतकार म्हणतात, "जातेऽङ्‌कुरे कथमु होपलभेत बीजम् " अंकुराकार प्रकटल्यावर बीज कुठून सांपडणार ? हा विश्वाकार प्रकटला मग तें ब्रह्मबीज कुठून दिसणार ? परंतु वेदान्त म्हणतो, हे ब्रह्म तसें नाहीं. ते एकाच वेळी अव्यक्त आणि व्यक्त आहे. व्यक्ताच्या उत्पत्तिस्थितिलयांच्या योगें अव्यक्ताच्या अव्यक्तत्वाचे कांहींहि बिघडत नाही. तें अविकृत जसेंचे तसेंच राहते. ज्ञानदेवानें म्हटल्याप्रमाणें " तो एकवट एकला, रचला ना वेंचला । आदि-अंती संचला " आहे. रज्जूवर सर्पाचा आभास झाल्याने, राहिल्यानें वा मिटल्यानें रज्जूचें रज्जूपण कांहीं घटते वाढते का ? त्या आभासाचा त्यावर काहीं एक परिणाम होत नाही. परमात्मा हा तसा अव्यय अविक्रिय असून या विश्वाकाराचे बीज म्हणजे आधारभूत सत्तत्त्व आहे. वृक्षबीजरूपकांत आणखीहि एक भाव भरला आहे. कणीस हाती आल्यावर धांडा कापूनच फेकायचा असतो. संग्राह्य असतें बीजच. त्या प्रमाणें या विश्वकदंबाचे बीज जें परमात्मतत्त्व तेंच घ्यावयाचे आणि हा सारा पसारा फेंकून द्यावयाचा, शेतकरी जो सगळा उदीम करतो तो बीजासाठी, बीज-संग्रहासाठी. बीज-संग्रह झाल्यावर तो इतर साऱ्या पसाऱ्याची विल्हेवाट लावतो. तत्त्वज्ञहि तसाच उदीम करतो. तो ब्रह्मबीज घेऊन विश्वाचे भूस उपणून टाकतो. म्हणूनच परमात्मा हा अव्यय बीज म्हणावयाचा.

४३०. अर्थ
अर्थ म्हणजे पदार्थ, द्रव्य. पदकोशांत पदे म्हणजे शब्द दिलेले असतात आणि त्यांचे पर्याय वा प्रतिशब्द दिलेले असतात, परंतु त्यांचे अर्थ म्हणजे पदार्थ वा द्रव्ये ही असतात जगांत, कोशांत नव्हे. कोशांत म्हणजे त्या पुस्तकांत तुम्हाला ते ज्या द्रव्यांचे बनलें आहे ती द्रव्ये म्हणजे कागद, शाई आणि धागा तेवढीं मिळतील. दुसरा कोणताहि अर्थ तुम्हांला तिथे सांपडणार नाही. तद्वत् या विश्वामध्ये या अनंतपार आणि वैचित्र्यपूर्ण विश्वामध्ये तुम्हांला फक्त एकच पदार्थ दिसेल, आणि तो म्हणजे ब्रह्म, तो म्हणजे आत्मा. बाकी सारी त्याची नामें आणि रूपें म्हणजे निव्वळ पर्याय होत. कुंभाराच्या आव्यांत गाडगीं मडकीं हांडकी अनेकानेक असतात, पण तिथें पदार्थ म्हणाल तर एकच असतो-माती. कुंभाराचे विश्व मृण्मय असते. तसे हे परमेश्वराचे विश्व चिन्मय आहे. इथे चिद् वस्तूवेगळे विश्व दुसरें कांहीं नाहीं. ती चिद्वस्तुच तेवढा अर्थ असून बाकी सर्व अनर्थ होय. अर्थ म्हणजे अर्थनीय, प्रार्थनीय वस्तु. हा अर्थपदाचा दुसरा अर्थ होय. पहिला अर्थ म्हणजे सद्वस्तु, दुसरा अर्थ अर्थनीय, अभिलषणीय वस्तु, तिसरा अर्थ द्रव्य. सुवर्णरजतादि मूल्यवान् वस्तु सत्ता, प्रेमास्पदता आणि बहुमूल्यता तिन्ही जिथें पर्याय होतात तिथें म्हणजे त्या परमात्म्याच्या ठाईं उघडच अर्थघनता आहे. म्हणून तो परमात्मा कोणत्याहि अर्थानें घ्या अर्थच आहे. परम अर्थ आहे, तो पुमर्थ आहे. तो सर्वार्थ आहे, तो स्वार्थ आहे.

४३१. अनर्थ
परमात्मा हा परमार्थतः अर्थ आहे, पण लौकिक अर्थानें तो अनर्थच आहे. परमेश्वराची भक्ति केल्यानें, त्याला प्रसन्न करून घेतल्यानें, तुम्हांला का पैसा मिळणार आहे, का बायको मिळणार आहे. का स्वर्ग मिळणार आहे ? तुकाराम आपला अनुभव सांगतो : ' देवाची ते खूण आला ज्याच्या घरा । त्याच्या पडे चिरा संसारासी '. त्याची सावकारी गेली, धंदा बसला, घरांतली चीजवस्त गेली, बायको मेली, पोरें मेली. स्वर्ग मिळणें दूर, हा लोकहि पारखा झाला. घरी सदा ददात. नामदेवानेहि हेच म्हटलें आहेः
"वैष्णवा घरीं सर्व काळ । सदा झणझणती टाळ ।
कण्या भाकरीचे खाणें । गांठी रामनाम नाणें ।
बैसावयासी कांबळा । द्वारी तुळसी रंगमाळा"

म्हणजे काय की दारिद्रय ही त्यांची मिरास आहे. ते त्यांचे नित्यविशेषण आहे, जसें श्रीयुक्त हें नारायणाचें. तो नित्य श्रीयुक्तच असावयाचा. नारायण म्हणजे लक्ष्मीनारायणच. तसा त्याचा भक्त म्हणजे ददातनारायण. सगळ्या अर्थाचा तिथे अभाव असावयाचा. देह, गेह, धन, जन, मान सगळे त्याला सोडून जाणार. उरणार त्याच्याजवळ एक निजात्मा. आणि तोच परमात्मा होय. अशा ह्या परमात्म्याला अनर्थ नाही तर काय म्हणावयाचें ? ह्याच्या नादी लागला तो इह लोक परलोक दोहोंनाहि मुकला. त्याची पुत्रैषणा वित्तैषणा लोकैषणा संपली. त्याला भिक्षाचर्य आणि ब्रह्मचर्य म्हणजे वनवासच सुचायचा रुचायचा आणि अशाचें पारमार्थिक सूत्र म्हणजे "अर्थमनर्थं भावय नित्यम्". उलट लोकायतिकांचें सूत्र असतें : यावत् जीवेत् सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ॥ अशा प्रकारें परमात्मा हा पारमार्थिकांच्या दृष्टीनें अर्थ तर लोकायतिकांच्या दृष्टीनें अनर्थ आहे. आणि म्हणूनच गीतोपनिषदादि आरण्यक ग्रंथ का भरल्या घरांत बसून वाचायचे ? ते तर आरण्यांतच जाऊन वाचले जातील. अंधार आणि उजेड एकत्र कसे नांदणार ? भक्तीच्या उजेडांत धनजनमान देहगेह हा अंधार राहू शकत नाही. तिथे बैसावयासी कांबळा आणि कण्याभाकरीचे खाणेंच असावयाचे. जो स्वतःच अर्थरूप आहे म्हणून ज्याला दुसरें कांहीं अर्थ, अर्थनीय नाहीं, तो अनर्थ.

४३२. महाकोश
मन्त्र, कोश, दुर्ग, सेना, प्रजा आणि चार हे राज्याचे षडंग बल होय. सुगुप्त मन्त्र म्हणजे मसलत बुद्धिमान् आणि एकनिष्ठ मंत्रिमंडलावर अवलंबून असते. कोश म्हणजे राज्याचा खजिना. तो राज्यांतील कृषि व उद्योग धंदे आणि व्यापार यांच्यावर अवलंबून असतो. दुर्ग म्हणजे किल्ले. हे परचक्राच्या वेळी आश्रयाचें स्थान होय. सेना म्हणजे फौज. ती उघडच परचक्रापासून बचाव करते. प्रजा म्हणजे संतुष्ट आणि स्वाभिमानी एकात्म लोक आणि चार म्हणजे हेर. आपला भेद दुसऱ्या राष्ट्राला द्यायचा नाही. पण दुसऱ्यांचा काढायचा. त्यासाठी चार-संस्था. ही षडंगें ज्या राज्याची भक्कम असतात तें राज्य टिकतें. भामाशाह यानें प्रताप राण्याला कोश उपलब्ध करून दिला म्हणून तो मोगलांशी टक्कर घेऊ शकला. मराठ्यांचे कोशबळ तोकडें होतें . म्हणून त्यांचे राज्य स्थिर होऊं शकले नाही. अशा प्रकारे कोश एक महान् बळ आहे. राज्य काय, कुटुंब काय, कोशाची उपेक्षा केल्यानें नीट चालत नाही. आज भारताचें कोशबल क्षीण आहे. त्यामुळे तो परचक्राला आणि स्वचक्राला म्हणजे दुर्भिक्षादि संकटाला समर्थपणे तोंड देऊ शकत नाही. बुद्धिपूर्वक मानवशक्तीचा सम्यक् उपयोग सर्व संपत्तीचें मूळ आहे. एका शब्दांत बोलायचे तर बुद्धिच सर्व संपत्तीचे मूळ आहे. कारण द्रव्य, पशु, मानव या सर्वांची नियामक ती बुद्धिच आहे. आणि तिचाहि नियामक अन्तर्यामी आत्मा आहे. आणि म्हणून परमात्मा हा महाकोश म्हणावयाचा. तो सर्वांचे मूळ आहे. सर्व संपत्ति त्याच्याच सत्तेनें त्याच्याच कृपेनें लाभत असते. सकाळी उठल्याबरोबर करदर्शन करण्याची प्रथा आहे. तें करतांना मंत्र म्हणतात - "कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती । करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।' त्याचाहि आशय हाच, आत्मसत्तेच्या आश्रयानें सर्व संपत्ति राहते. म्हणून सकाळी करदर्शन करावें. अर्थात् त्यांत पहावें की परमात्मा हाच गोविंद आहे. तो गो म्हणजे बुद्धि, गो म्हणजे वाणी आणि गो म्हणजे देहेंद्रियें अर्थात् सर्व संपत्तीच्या स्रोतांचा स्वामी आहे. म्हणून तो महाकोश म्हणावयाचा.

४३३. महाभोग
ज्या विहिरीला जिवंत झरे नाहींत ती कितीहि मोठी असली आणि तिच्यांत कितीहि पाणी असलें तरी तिला अल्पच म्हणावे लागेल. कारण तिचा जलाचा सांठा अक्षय नव्हे. तो जलाचा महाकोश म्हणता यावयाचा नाही. जो परभृत नाही, पण स्वतःच संपत्तीचा अजस्र स्रोत आहे तोच महाकोश म्हणावयाचा. जो समुद्राप्रमाणें सगळीकडचें पाणी गोळा करतो तो नव्हे, तर जो समुद्राप्रमाणें, (मानस) सरोवराप्रमाणें आपल्या अनावर जलोद्रेकांनी दिगंत परितृप्त करून गंगासागर आणि सिंधुसागर निर्माण करतो तोच महाकोश होय. अदाता सागर कृपण होय. दाता झरा उदार होय आणि तोच महाकोश. त्याचप्रमाणे महाभाग. ज्याच्या अधीन भोगाची सामग्री नाहीं तो पराधीन पुरुष महाभोग असूं शकत नाही. सत्राजिताकडे स्यमंतक मणि होता. तो प्रत्यह त्याला सुवर्ण देई. त्यामुळे त्याचा भोग सहजच इतरांहून आगळा होता. इतर मितंपचच होते त्याच्यापुढे. कारण त्यांचा आय पराधीन असल्यामुळे मोजका होता. आणि ह्याचा आय होता अमित. कांकी तो होता स्वाधीन. त्याप्रमाणे ज्याच्या भोगाचे साधन स्वाधीन आहे तोच महाभोग म्हणावयाचा, ज्याचे भोग-साधन पराधीन आहे. तो केवढाहि मोठा पगारदार असला तरी तो अल्पभोगच म्हणावयाचा. म्हणूनच जुनी म्हण आहे "उत्तम शेती, मध्यम व्यापार, अधम नोकरी" शेती उत्तम कां ? कारण ती स्वायत्त आहे. मेहनत करा आणि खा. व्यापार मध्यम, कारण त्यांत कांही अंशी पराधीनता आहे. माल मिळाला पाहिजे, तेव्हां व्यापार होणार. नोकरी चाकरी अधम, कारण तींत तुम्ही सर्वस्वी पराधीन असतां, मालक देईल तेव्हां आणि तितका तुमचा तुकडा, म्हणून म्हणतात "पुस्तकी विद्या आणि परस्वाधीन जिणें नाहीं कामाचें, नाहीं कामाचे." परमात्मा हा सर्वस्वी आत्म-निष्ठ असल्यामुळे तो महाभोग होय.
"आत्मन्येवात्मना तुष्टो महाभोगः स उच्यते"

४३४. महाधन
ज्याच्या योगें आपलें ऐहिक जीवन चालतें त्या द्रव्याला म्हणतात धन, याचे महत्त्व माणसाला किती वाटतें तें सांगायला नको. माणूस शतदरिद्र असला तरी तो आपल्या मुलामुलींची नांवें हीरालाल, मोतीलाल, सोनाबाई, पुतळीबाई अशी ठेवतो. मी दरिद्र असलो तरी माझी मुलें मिळवितील संपत्ति, अशी तो आशा करीत असतो. त्या आशेवर तो जगत असतो. धन आणि धनाची आशा त्याला जगवीत असते. कारण त्या धनानेंच ऐहिक जीवनांतील सर्व सुखें माणसाला मिळविता येतात अशी त्याची श्रद्धा असते. आणि म्हणून शंकराचार्यांनी कितीहि सांगितले की "अर्थमनर्थं भावय नित्यम्" तरी त्याचा तो आपल्या श्रद्धेप्रमाणे नेमका विरुद्ध अर्थच घेत असतो. अर्थ हाच अर्थ आहे, इतर सारा अनर्थ आहे अशी तो मनोमन खूणगांठ बांधून असतो. आणि या श्रद्धेला अनुरूप असेंच त्याचे जीवन असते आणि व्यावहारिक सत्य आणि पारमार्थिक सत्य अशी दोन जगें मानिली म्हणजे दोहोंची व्यवस्था लागते. एका क्षणाला मनुष्य एकाच जगांत जगूं शकतो. ती निवड त्याला करावयाची असते. ऐहिक पुरुष व्यावहारिक सत्य मानून जगत असतो. पारमार्थिक पुरुष पारमार्थिक सत्य लक्षून चालत असतो. त्याचे सूत्र असतें "ब्रह्म सत्यं, जगत् मिथ्या । जीवो ब्रह्मैव नापरः" आणि ही श्रद्धा, हा बोध आणि तदनुसार जीवनाची सरणी ही असते त्याचें धन. त्यालाच महाधन म्हणावयाचे. कारण ऐहिक धन अशाश्वत आहे, तर हे धन शाश्वत जीवनाची पुंजी आहे. या पुंजीवर परमार्थाचा उदीम होत असतो. ऐहिक धनानें मनुष्याच्या मुखाला काळोखी फासली जाऊं शकते, अर्थात् तें अधन म्हणावयाचे. परंतु पारमार्थिक धनानें मनुष्याचे मुख उज्जवल होतें, जीवन धन्य होते. म्हणून तेच खरें धन म्हणावयाचे. आणि जें खरें तेंच महान्. परमात्मा हा तसा महाधन आहे. महाकोश, महाभोग, महाधन ही तिन्ही पदें बहुव्रीहि आहेत.


अनिर्विण्णः स्थविष्ठोऽभूर्धर्मयूपो महामखः ।
नक्षत्रनेमीर्नक्षत्री क्षमः क्षामः समीहनः ॥४७॥


४३५. अनिर्विण्ण
"ब्राह्मणो निर्वेदं आयात्, नास्ति अकृतः कृतेन" असें उपनिषद्वचन आहे. कर्माच्या योगें अकृत म्हणजे अकृत्रिम आत्मभाव लाभत नसतो हे ओळखून "ब्राह्मणानें म्हणजे विज्ञानी पुरुषानें निर्वेदास जावें म्हणजे वेदोक्त काम्य कर्माच्या पार व्हावें, कर्मोत्साह सोडावा." इथे निर्वेद शब्द श्लिष्ट आहे. तो वेदोक्त कर्मकाण्डाचा निषेध करतो आणि त्याच बरोबर उपनिषदुक्त योगाचा विधि सांगतो. हा योग, त्याला तुम्ही कोणतेहि नांव द्या, निर्वेदमूलक आहे. म्हणून तो निर्वेद या पदानेंच व्यक्त केला जातो. उपनिषदांप्रमाणेच गीतेनेंहि हा निर्वेद शब्द साभिप्राय आणि श्लिष्ट वापरला आहे. त्याचा अनुवाद होऊं शकेल, भाषांतर होऊं शकणार नाही. गीताईंत "आलें येईल जें कानीं तेव्हां जिरविशील तू" म्हणून जे "तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च' याचे मराठी केलें आहे तें मुळांतील खुबी, श्लेष, व्यक्त न करणारे आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायांतील सांख्यबुद्धि आणि योगबुद्धि या दोहींना गुंडाळणारा असा हा निर्वेद शब्द आहे. उपनिषदांच्या निर्वेद शब्दाप्रमाणेच ब्राह्मण शब्दहि गीतेनें विज्ञानी या विशिष्ट अर्थानें वेदवादीच्या विरुद्ध अर्थानें वापरला आहे. बुद्धिशरण तो ब्राह्मण, फलशरण तो कृपण. गीतेच्या दुसऱ्या अध्यायांतील ४०-५३ हे श्लोक वेदवाद विरुद्ध उपनिषद्‌विचार थोडक्यांत पण सामग्र्यानें व्यक्त करणारे आहेत. या प्रकरणांत उपनिषदांतील अनेक शब्द गीतेनें जसेचे तसे वापरले आहेत.
पण हे तर सर्व निर्वेदाचे विवरण झालें. परमात्म्याला इथे तर अनिर्विण्ण म्हटले आहे. परमात्म्याला कर्म-निर्वेद नाहीं. वीट नाहीं. तो उत्साहानें अनन्त कर्में करीत आहे. पण हा उत्साह फलासक्ति नसल्यामुळेंच आहे. अहंता ममता फलासक्ति रागद्वेष इत्यादि भाव कर्मशक्ति क्षीण करणारे आहेत. अज्ञानामुळे जीव त्यांना कर्मप्रेरक समजतो. ईश्वर सर्वज्ञ. तो त्यांतून सहजच मुक्त आहे. आणि म्हणून तो अनिर्विण्ण म्हटला आहे. त्याची कर्मस्फूर्ति अजस्र आहे. पण त्या कर्माचा त्याला यत्किंचित्‌हि भार नाही. कारण, ते कर्म अकर्म झालेलें असतें.

४३६. स्थविष्ठ
स्थविष्ठ म्हणजे अत्यंत स्थूल. हा जो व्यक्त विश्वाकार दिसतो आहे तोच स्थविष्ठ परमात्मा होय. ध्रुवतारका आणि सूर्यचन्द्र ग्रह नक्षत्रें, मेघ आणि विद्युद्, वृष्टि आणि वारे, डोंगर, टेकड्या, नद्या-नाले, ताल-तलाव आणि सागरोपसागर व महासागर ह्या उत्तम, मध्यम आणि अधम लोकांतील, स्वर् भुवर् आणि भूर् लोकांतील, मुख्य मुख्य घटकांनी नजरेंत भरणारा जो परमात्मा तोच स्थविष्ठ होय. हा समस्त व्यक्त विश्वाकार म्हणजे स्थविष्ठ परमात्मा म्हटल्यानंतर कवींनी त्रिभुवनें सप्त भुवनें वा चतुर्दश भुवनें घेऊन त्याच्या अवयवांची आपआपल्या रुचीप्रमाणे कल्पना केली आहे. ह्या स्थूल नि स्थविष्ठ परमात्म्याचें स्वर्ग मस्तक आहे. चंद्रसूर्य डोळे आहेत. अग्नि मुख आहे. आकाश शरीर आहे. दिशा हस्त आहेत. काल चरण आहे आणि ही पृथ्वी पादपीठ आहे असें स्थूल मानानें म्हणतां येईल. या विश्वरूपाला पाहून अर्जुन भ्याला. त्याला विश्वरूपाच्या प्रवृत्तीचा कांहीं बोधच होईना. देशतः आणि कालतः या अनंताचा या विश्वाच्या भूगोलाचा आणि इतिहासाचा काय बोध आहे ? हा बोध देशकालोपाधिक बुद्धि पेलूं शकत नाही. त्याचा विचार करतांनाहि घाबरी होते. त्यासाठी निरुपाधिक भूमिकेवर चढावे लागते. जगद्गुरु भगवान् कृष्ण त्या भूमिकेवरून अर्जुनाला तो आत्मबोध देत आहे. कोणता आहे तो बोध ?
"ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति ।
भ्रामयन् सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ गीता १८ - ६१
तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत ।
तत्प्रसादात् परां शान्तिं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम् ।"गीता १८ - ६२

परोक्षतेनें दिलेला हाच बोध सरते शेवटी भगवान् अपरोक्षत्वें देत आहेत.
"सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः" गीता १८ -६६

दिक्कालाद्यतीत चिन्मात्र होऊन राहिल्या खेरीज या विश्वांत कुठेहि क्षेम नाही. इतर सारें क्षयी आहे. आणि सारी प्रवृत्ति, सारी विश्वप्रक्रिया संहाराची आहे. हाच तो परमार्थबोध होय. भगवान् म्हणून म्हणतात "ऋतेऽपि त्वा न भविष्यन्ति सर्वे । "

४३७. अभू
भवति इति भूः । न भूः अभूः । जो होतो तो भू होय. जो भू नव्हे तो अभू म्हणावयाचा. सर्व व्यक्त सृष्टि भू आहे. होणारी आहे, जन्मणारी आहे. परंतु परमात्मा हा अभू आहे, न होणारा, न जन्मणारा आहे. जें होतें त्याच्या पाठीमागें षड्विक्रिया लागतात- जन्मणें, असणें, वाढणें, बदलणें, झिजणें, मरणें. परंतु जो मुळी जन्मतच नाही त्याच्या मागे उघडच कोणतीहि विक्रिया लागू शकत नाही. परमात्मा हा तसा अविक्रिय होय. म्हणून तो अभू म्हणावयाचा. परमात्मा हा वस्तुतः सर्व-विलक्षण आहे. जगांतील कोणत्याहि वस्तूनें त्याचे वर्णन व्हावयाचे नाही म्हणून ह्या सर्वांचा निषेध करावा लागतो. त्याचे वर्णन करतांना अभूः हा नञ्‌समांसहि तसाच आहे. नेति नेति हाच त्याचा आशय. आत्मतत्त्व जन्मत नाहीं मरत नाही, असत नाहीं नसत नाहीं, वाढत नाहीं घटत नाही. तें केवलस्वरूप आहे. अनिर्वचनीय आहे. आहें म्हटले तर तें विक्रियेत पडते. असणें ही षड्विक्रियेपैकीं एक आहे. दोन स्थित्यंतरांमधील स्थिति म्हणजे असणें होय. म्हणून त्याला आहे म्हणतां येत नाही. नाही म्हटले तरी तें विक्रियेंत सांपडते. आणि जी वस्तु सद् आहे तिला नाहीं कसें म्हणावयाचें ? म्हणून त्याला नाहींहि म्हणतां येत नाही. जी वस्तु पूर्वी नव्हती ती नंतर आली म्हणजे तिला झाली म्हणतात. पण जें निरन्तर आहेच आहे त्याच्या बाबतींत होणें या क्रियेला वावच कुठे आहे ? म्हणून ते होत नाहीं, जन्मत नाही. तें शाश्वत असल्यामुळे मरणेंहि त्याला लागू पडत नाही. वाढणें म्हणजे आधींच्याहून मोठे होणे आणि घटणें म्हणजे आधींच्याहून लहान होणें. पण जिथे आधीं मागाहून असा कालविभाग संभवत नाहीं त्याच प्रमाणें जिथे नवीन कांहीं जोडतां येत नाही किंवा मुळांतून कांहीं खोडतां येत नाही तिथे वाढघट कशी व्हावयाची ? त्यामुळे याहि विक्रिया त्याच्या ठाई संभवत नाहीत. हे समस्त विचित्र विश्व षड्विक्रियांचा खेळ आहे. पण त्यांत तो परमात्मा कुठेच सांपडत नाहीं. तद्-विलक्षणता हेच त्याचे लक्षण. अभू त्याचाच द्योतक वाचक होय.

४३८. धर्मयूप
धर्मरूप यूप तो धर्मयूप होय. यूप ही यज्ञीय परिभाषा आहे. यूप म्हणूजे यज्ञीय पशु बांधावयाची मेढ वा खांब. आमचे जीवन हा यज्ञीय पशु आहे. यज्ञात त्याचा बळि द्यावयाचा आहे. अर्थात् आमचे संपूर्ण जीवन धर्ममय म्हणजे यज्ञमय झाले पाहिजे. यज्ञांत खपलें पाहिजे. असें जेव्हां होईल तेव्हांच यज्ञ संपन्न होईल. हा सामान्य यज्ञ नव्हे. सामान्य यज्ञ स्थूल असतो. भौतिक असतो. मर्यादित कालाचा असा असतो. परंतु हा जीवन-यज्ञ आजीवन चालावयाचा आहे आणि ह्यांतील यजमान, यजमान-पत्नी, यज्ञवेदी, यज्ञाग्नि, यूप, पशु, आज्य, समिधा इत्यादि सर्व यज्ञसामग्री जीवनरूप असते. हा आध्यात्मिक यज्ञ होय. ज्ञानी पुरुष हा असा यज्ञ करीत असतो. "सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते" सर्व कामांची परिणति अखेर ज्ञानांतच व्हायची आहे. यज्ञ, योग, पूजा इत्यादि विधि अखेर आध्यात्मिकतेंत परिणत होतात. त्रिसुपर्णांतील पुढील वचनाचा हाच आशय आहे."ॐ तस्यैवंविदुषो यज्ञस्य, आत्मा यजमानः, श्रद्धा पत्नी, शरीरं इध्मं, उरो वेदिः, लोमानि बर्हिः, वेदः शिखा, हृदयं यूपः, काम आज्यं, मन्युः पशुः, तपः अग्निः, दमः शमयिता, दक्षिणा वाक् होता, प्राणः उद्गाता, चक्षुः अध्वर्युः, मनः ब्रह्मा, श्रोत्रं अग्नीत् ॥ सर्ववेदसं वै एतत् सत्रम् । " धर्म वेगळा जीवन वेगळें असें द्वैत राहता कामा नये. धर्म हेंच जीवन असे झाले पाहिजे. आमची आदर्श काव्य रामायण महाभारत आहेत. त्यांचे नायक राम आणि धर्मराज युधिष्ठिर होत. दोघेहि धर्मपुरुष आहेत. रामराज्य आणि धर्मराज्य हे पर्यायच आहेत. राम म्हणतोः "नाहं अर्थपरो देवि लोकं आवस्तुमुत्सहे । विद्धि मां ऋषिभिस्तुल्यं केवलं धर्ममाश्रितम् ।" धर्मराज म्हणतो-धर्म फल-लोभानें आचरावयाचा नसतो. मी धर्माचा वाणी नाही. इकबाल म्हणतो "कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी", ती कुछ बात हा धर्माचा आदर्श, हा धर्माचा आग्रह आहे.
"ज्यांत आपलें संपूर्ण जीवन होमायचें तो धर्म हाच यज्ञ होय आणि त्यांत ज्याला आपला हा जीवपशु बांधला आहे तो यूप म्हणजे परमात्मा होय, आमचे जीवन त्याच्या हाती आहे.

४३९. महामख
ज्याचा मख मोठा तो महामख परमात्मा होय. क्षुद्रदेवतांचे क्षुद्र मख होतात. परमात्मा हा महादेव म्हणून त्याचा होणारा जो मख तो महामख म्हणावयाचा. एखादा यज्ञ लहान किंवा मोठा कशावरून म्हणावयाचा ? जितका सोहळा मोठा तितका तो मोठा यज्ञ म्हटल्यास महत्त्व देवतेला न दिलें जातां बाह्य आडंबराला दिलें जातें म्हणून हे लक्षण अन्वर्थक नव्हे. तर जिथे महादेवाची, परमात्म्याची, आराधना होते तोच महामख म्हटला पाहिजे. पण एखाद्या यज्ञांत परमात्मा यजिला पूजिला भजला जातो की अन्य कोणी देवता हे कसें ठरवावयाचें ? त्याची सोपी खूण आहे. जिथे कुठल्या कामनेनें यज्ञ होतो तिथे तो अन्यदेवताराधन आहे असें समजावें. जिथे अशा कुठल्याहि कामनेनें आराधन होत नाहीं तो आत्मयज्ञ समजावा, आणि असा निष्काम आत्मयज्ञच महामख होय.
ज्या यज्ञाचा सोहळा दीर्घकाल चालतो आणि ज्यांत असंख्य लोक भाग घेतात तो उघडच महामख म्हणावयाचा. पण हा असा मख कोणाचा होतो ? एक परमात्म्याचाच, म्हणून तो महामख, कामनेनें ज्या देवतांचे यज्ञ होतात ते यज्ञ कामना करणारेच करणार आणि कामना-पूर्ति होईपर्यंतच करणार. म्हणून हे असले या अल्प वा क्षुद्रच म्हटले पाहिजेत. परमात्म्याच्या यज्ञाला निमित्त नाही म्हणून तो निरवधि चालणार आणि सर्वच त्यांत भाग घेणार. म्हणून तो सर्वान्तर्यामी परमात्माच महामख होय. सर्व जीव निजान्तर्यामीवर अनिमित्त आणि निरवधि प्रेम करीत असतात. अशा प्रकारे निरपवाद सर्व जीव ज्यावर प्रेम करतात आणि नित्यनिरन्तर करतात त्याहून मोठा मख, मोठा सोहळा, कोणाचा म्हणावा ?
सारांश, कोणत्याहि दृष्टीनें पहा, मोठी देवता म्हणून पहा वा मोठा सोहळा म्हणून पहा, परमात्माच महामख होय.

४४०. नक्षत्रनेमि
सूर्य-चन्द्रादि ग्रह-गोल ज्या क्रान्तिवृत्तांतून फिरत आहेत ते क्रांतिवृत्त बारा राशींत आणि सत्तावीस नक्षत्रांत विभागलेले आहे. अशी ज्याची नक्षत्रमय नेमि म्हणजे वाट आहे तो नक्षत्रनेमि म्हणावयाचा. नक्षत्र म्हणजे वाटेवरचा तळ, सर्व तेज परमात्म्याचेच असल्यामुळे चंद्रसूर्यादि तेजोराशि हे भगवद्विभूति होत. आणि म्हणून त्यांच्या अनुषंगानें परमात्मा हा नक्षत्रनेमि म्हटला आहे.
शंकराचार्यांनी नेमि म्हणजे नाभि वा मध्य वा केन्द्र अशासारखा अर्थ घेतला आहे. हें जें तारकामय ज्योतिश्चक्र आहे त्याला शिशुमार संज्ञा आहे. त्या शिशुमार संज्ञक ज्योतिश्चक्राचा नाभि, बुधला ध्रुव होय. त्या ध्रुवाच्या ठाई हें समस्त ज्योतिश्चक्र केन्द्रित असून त्याच्याच प्रेरणेनें प्रेरित होत आहे. अशा प्रकारें ध्रुवसंज्ञक परमात्मा हा ज्योतिश्चक्राचा अन्तर्यामी नियन्ता म्हणून नक्षत्रनेमि म्हणावयाचा.
रथचक्राची मुख्य अंगें नाभि म्हणजे बुधला, अर वा शंकु म्हणजे आरे, प्रधि म्हणजे पाठे आणि नेमि म्हणजे वाट वा धाव होत. ह्या परिभाषेंत नेमिशब्द चक्रकेंद्र-वाचक नाहीं तर चक्रपरिधि-वाचक आहे हे उघड आहे. "नीचैर् गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण" "आ मनोर्वर्त्मनः परं न व्यतीयुः प्रजास्तस्य नियन्तुर्नेमिवृत्तयः" इत्यादि उदाहरणांत नेमि शब्द परिधि- वाचकच आहे. नाभि या अर्थान तो कुठेंच आलेला नाही. मग शंकराचार्यांनी तो त्या अर्थी कसा घेतला ? बहुतकरून तसा अर्थ "ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति । भ्रामयन् सर्व भूतानि यन्त्रारूढानि मायया । " या वचनाकडे दृष्टि देऊन केला असावा. स्वाध्याय-ब्राह्मणग्रंथांत शिशुमारचक्राच्या वर्णनांत "विष्णुर् हृदयम्" असें वचन आलें असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तथापि नेमिशब्दाचा नाभि असा अर्थ अपरिहार्य नाहींच. पुढेंहि 'गभस्तिनेमि आले आहे तिथेहि त्यांनी" गभस्तिचक्रस्य मध्यें सूर्यात्मना स्थितः असे म्हटले आहे नेमिशब्दाचा अर्थ मध्य नाहींच. तथापि नक्षत्रनेमि गभस्तिनेमि हे बहुव्रीहि समास कल्पिले म्हणजे नक्षत्रें आहेत नेमि म्हणजे परिधि ज्याचा, गर्भस्ति म्हणजे किरण आहेत नेमि ज्याचा तो. केन्द्रस्थानीय परमात्मा असा अर्थ निष्पन्न होतो आणि शंकराचार्यांचाहि आशय तोच.

४४१. नक्षत्री
उपकरणार्थीं त्र प्रत्यय लागून वक्त्र श्रोत्र नेत्र गात्र पात्र इत्यादि शब्द साधले आहेत. तसाच नक्षत्र हा शब्द नक्ष् म्हणजे जाणें, प्रवास करणें त्याला उपयोगी जें विश्रामस्थान तें नक्षत्र होय. चंद्रसूर्यादिकांची आपल्या नित्य प्रवासांतील अशी ही घरें सत्तावीस वा अठ्ठावीस मानिली आहेत. अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी इत्यादि त्यांची नांवे होत. या नक्षत्रांच्या नांवातील बरीचशीं पदें स्त्रीलिंगी आहेत असे दिसून येतें. कारण 'गृहिणी गृहमुच्यते.' गृहिणी शिवाय घर वसत नाही. अर्थात् ही सत्तावीस अठ्ठावीस घरें म्हणजे चंद्राच्या तितक्या पत्नी आणि त्यांची ती वेगवेगळी भवनें होत. खलाशी हे नित्य प्रवासी असतात. त्यामुळे त्यांची देशोदेशीं बंदराबंदरावर घरें असतात. चंद्र सूर्य हेहि तसेंच आकाश-समुद्रांतील दर्यावर्दी होत. त्यांची सफर सारखी चालली असते. म्हणून त्यांची ही इतकी घरें आणि गृहिणी.
सर्व तेज परमात्म्याचे आहे आणि चंद्र-सूर्य ह्या त्या तेजाच्या ठळक विभूति आहेत. म्हणून त्या विभूतींना अनुलक्षून परमात्मा हा नक्षत्री म्हणावयाचा. पण त्याच बरोबर तो परमात्मा आत्मतेजोरूपानें प्रत्येक जीवाच्या किंबहुना भूताच्या ठाईं ज्या अर्थीं विसावला आहे, वसला आहे, त्या अर्थींहि तो नक्षत्री होय, आवासी होय. त्याचे असे हे आवास सत्तावीस वा अठ्ठावीस नाहींत तर अगणित आहेत. तो जगन्निवास आहे. सर्व त्याचेच निवास आहेत. अगणित आहेत. तो "ईशावास्यं इदं सर्वं यत्‌किंच जगत्यां जग‍त्" या जगतामध्ये म्हणजे चतुर्दशहि भुवनांमध्ये जें कांहीं जगत् म्हणजे येणारे जाणारे आहे तें सारें ईश्वराचे आवास्य आहे, आवासस्थान आहे. त्या प्रत्येकाच्या ठाईं ईश्वराची वसति आहे. ओसाड असें या जगांत कांहींच नाही. सर्वत्र ईश्वराची वसति आहे. तो वासुदेव वसला आहे. जन तेवढी वसति आणि विजन म्हणजे ओसाड असें नाहीं. तें रितें नाहीं, पूर्ण आहे. परमात्म्यानें परिपूर्ण आहे.

४४२. क्षम
क्षम म्हणजे समर्थ, क्षम म्हणजे क्षमावान्. जो समर्थ असतो तोच क्षमा करू शकतो. उंदीर मांजराला क्षमा करूं शकत नाही. कुत्रा मांजराला क्षमा करूं शकतो. उंदराच्या ठाई मांजराचे पारिपत्य करण्याचे सामर्थ्य नाहीं कुत्र्याच्या ठाईं तें आहे. अहिंसा ही क्षमा आहे, तो सामर्थ्याभाव नव्हे. अक्षमाचीं, असमर्थाची, अहिंसा ही अहिंसा नसून तो हिंसासामर्थ्याभाव आहे, दुबळेपणा आहे. मनानें द्वेष करूं शकत असतां जो आपल्यावर अन्याय वा जुलूम करणाऱ्याचा द्वेष करीत नाही, वाणीनें निंदा करीत नाहीं, कृतीनें अपाय करीत नाही तर त्या विषयीं आदर प्रेम बाळगतो, त्याचे गुण घेतो, त्याला आत्मीयतेनें उपकरतो, पण त्याच्या अन्यायाला वश होत नाहीं तो अहिंसकच क्षम होय. तोच आपल्या सर्वदुःखसहनशीलतेनें आणि परानुकंपेनें प्रह्लादवत् सत्याग्रही क्षम होय, क्षमावान् होय. परमात्मा हा सर्वसमर्थ असतां तो अज्ञान जीवांचे अनाचार आणि अत्याचार आशावन्त राहून सहन करीत आहे. क्षमा करीत आहे. अज्ञान आणि अतएव दुर्वृत्त मुलगा शहाणा होईल, नीट वागेल अशी आशा बाप सदैव बाळगून असतो आणि मुलाविषयींचे वात्सल्य कमी होऊं देत नाही, त्याचा तिरस्कार करीत नाहीं, उपचार करतो, उपकार करतो. परमात्मा हा तसा निग्रह-समर्थ असून आशा बाळगून अनुग्रहच करीत आहे. क्षमा करीत आहे. म्हणून तो क्षम दयानंदांनी महादेवाच्या पिंडीवर उंदरांना उड्या मारतांना पाहिलें आणि हा असा कसा देव जो आपल्या प्रजेला दंगामस्ती करूं देतो ? त्यांना आवरतांहि येत नाही त्याला ? अशा विचारानें त्यांनी मूर्तिपूजा निषिद्ध ठरविली आणि आर्यसमाजाची स्थापना केली. पण ह्या पंडिताला असें कां सुचलें नाहीं की महादेव किती क्षमाशील आहे ! तो आपल्या प्रजेचा अविनय पोटांत घालीत आहे ? आईच्या अंगावर मुलें बागडणार नाहींत तर काय भुताच्या अंगावर बागडणार ? परमात्मा बापासारखा समर्थ आणि आईसारखा क्षमाशील आहे. म्हणून तो क्षम.

४४३. क्षाम
जो क्षम आहे, ज्याच्या ठाई क्षमेची क्षमता आहे, तो धष्टपुष्ट राहत नाही. सतत सहनच करीत राहिल्यामुळे तो शाम म्हणजे कृश होतो. म्हणून "क्षम" बरोबर "क्षाम" पद आले आहे. तपस्वी हा क्षामच असावयाचा, कृशच असावयाचा. गोरखनाथ गुरूची ओळखण सांगत आहेत. "ज्याचे हात पाय लट्ठ आहेत, डोळे ज्याचे तांबडे आहेत असा कोणी गोसावी भेटला म्हणजे ओळखावें की हा कांहीं गुरु नव्हे. पण ज्याचे हातपाय कृश आहेत, डोळे ज्याचे निर्मळ आहेत असा सत्पुरुष भेटला म्हणजे समजावें की गुरु भेटला" योगी पुरुष हा पिंडपोषक असूं शकत नाही. मग तो पीन म्हणजे धष्टपुष्ट कसा असणार ? तो क्षामच राहील. तो व्यसनीहि असूं शकत नाही. गांजा, भांग तो पिऊं शकत नाही. म्हणून त्याचे नेत्र निर्मल असतील, व्यसन तसे विकारहि त्याच्या ठाई नसणार. म्हणूनहि त्याचें नेत्र निर्मल असतील. त्यांत बाह्य व्यसनें किंवा आभ्यंतर क्रोधादि विकार यांचे प्रतिबिंब पडलेलें दिसणार नाही. म्हणून गोरखनाथ म्हणतात :
दुबरे गाता निर्मल नेता । भई रे पूता गुरुसों भेंट
गोरखनाथांच्या या मार्मिक वचनांत वैराग्य आणि ज्ञान हींच गुरूची लक्षणे होत म्हणून म्हटले आहे. परमात्मा हा तर गुरूणां गुरुः त्याच्या ठाईं यांचा परमोत्कर्षच असणार. कृशतेचा परमोत्कर्ष म्हणजे विदेहता होय आणि निर्मलनेत्रत्वाचा परमोत्कर्ष म्हणजे केवल ज्ञप्ति मात्रत्व होय. परमात्मा हा अशा प्रकारें क्षाम आहे. तिथे सगळे देह गळून पडले आहेत, क्षीण झाले आहेत, उरलें आहे केवळ एक चित्. त्याहून अधिक रोड दुसरे काय असू शकेल ? म्हणून त्याला म्हणावयाचें क्षाम. सर्व अनात्म गळून देह गेह -स्नेह जळून उरलेला जो निखळ आत्मा तो क्षाम.

४४४. समीहन
सम्यक् ईहते इति समीहनः| जो सम्यक् ईहा म्हणजे क्रिया करतो तो समीहन म्हणावयाचा. सम्यक् क्रिया कोणती म्हणावयाची ? जिचा संकल्प ठीक आहे, जिचे क्रियासंपादन ठीक आहे आणि जिचे फलहि ठीक आहे ती क्रिया ठीक म्हणावयाची. जिचा संकल्प अनाशक आहे, जिचे स्वरूप अनाशक आहे, जिचे फल अनाशक आहे ती क्रिया समीहा म्हणावयाची, सम्यक् क्रिया म्हणावयाची. जीवाच्या सर्व क्रिया अविद्या-मूलक कामप्रधान आणि अतएव बंधक होत असल्यामुळे त्यांना समीहा म्हणतां येत नाही. त्यांच्या योगें आदिमध्यावसानी हिंसा होते म्हणून त्या जीवक्रियाहिंसक होत, नाशक होत. परमात्मा आत्मभिन्न कांहीं पहात नसल्यामूळे आणि निष्काम असल्यामुळे त्याचे क्रियाजात अहिंसक होय, आणि म्हणून तो समीहन म्हणावयाचा. गीतेच्या पुढील श्लोकांत समीहेचे वर्णन आहे.
यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर् यस्य न लिप्यते ।
हत्वापि स इमाल्लोकान् न हन्ति न निबध्यते । गीता १८-१७

" ज्याच्या कृतींत अहंकार नाही अर्थात् जो कोणत्याहि जन्माचा वा वर्णाश्रमादींचा अभिमान बाळगीत नाही, ज्याला फलकामनेचा चिकटा, संपर्क नाही, त्यानें जरी विश्वसंहार केला तरी तोहिंसा करीत नाही आणि बांधला जात नाही. अर्थात् आत्मज्ञानमूलक आणि फलेच्छारहित कर्म हेच सम्यक् होय, आणि तसें जो करतो तोच समीहन म्हणावयाचा. असा पुरुष हा ईश्वरच होय. ईश्वर म्हणून कोणी वेगळी व्यक्ति नाही. जीवाला फलसिद्धीसाठी संकल्प कल्प आणि अनुग्रह या प्रक्रियेतून या प्रकल्पांतून जावे लागते. ईश्वराचा संकल्पच सर्व काही आहे. त्याच्या संकल्पानें च हें विश्व निर्माण झाले आहे. म्हणून तो समीहन म्हणजे संकल्पन होय. सं संपूर्ण सम्यक् च ईहति कल्पते इति समीहनः ।


यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतुः सत्रं सतां गतिः ।
सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् ॥४८॥


४४५. यज्ञ
"यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतुः सत्रं सतां गतिः" या श्लोकार्धात प्रायः यज्ञप्रकरण आले आहे. यज्ञ, ऋतु आणि सत्र हे यज्ञाचे विविध प्रकार आहेत, तर सामान्य यजनीय म्हणून आणि परम यजनीय म्हणून इज्य आणि महेज्य पदें आली आहेत. सर्व यजन-विधि परमात्मस्वरूपच आहेत, कारण ते सर्व शेवटी परमात्म्यालाच सरळ वा पर्यायानें पोंचवितात. त्याच प्रमाणें कोणतेहि इज्य म्हणजे दैवत हेहि परमात्मस्वरूपच आहे. कारण तें परमात्म्याच्याच कोणत्या ना कोणत्या गुणाचे प्रतीक होय आणि परमात्म्याचे आकलन करायला उपयोगी होय. अशा प्रकारे सर्व पूज्य पूजक आणि पूजा ग्राह्यच होत. त्यांच्यात विविधता आहे. पण विरोध नाही.
इज्यते असौ इदं अनेन वा इति यज्ञः । जें यजिलें जातें तें दैवत, तें हविर्द्रव्य अथवा जेणें यजन होतें तें कर्म यज्ञ म्हणावयाचें. श्रद्धापूर्वक ज्याचें यजन होतें तो परमात्मा, तें परम दैवत, यज्ञ होय. ज्या हविर् द्रव्यानें त्याचे यजन होतें ती सगळी यज्ञसामग्री यज्ञ होय. ज्या विधीनें यज्ञ संपन्न होतो तो सगळा यजनविधि यज्ञ होय. यजमान या यज्ञाच्या योगें शेवटी यज्ञस्वरूप होतो, देवतास्वरूप होतो. याच स्थितीला वा गतीला स्वर्ग म्हणावयाचे. या स्वर्गांत देव म्हणजे पूर्वीचे साध्योपासक, यज्ञकर्ते, वसतात. या स्वर्गालाच प्रस्तुत श्लोकार्धात 'सतांगतिः' म्हटले आहे. सज्जन सत्कनि सतांगतीला पोचत असतात. सज्जन यज्ञकर्ते, सत्कर्में नानाविध यज्ञ आणि सतांगति म्हणजे परमात्मा म्हणावयाचा.

४४६. इज्य
इज्य म्हणजे यजनीय. प्रत्येक श्रद्धावान् आपल्या श्रद्धेप्रमाणें एका दैवताची एका महनीय आदर्शाची कल्पना करीत असतो आणि त्याच्या प्राप्तीचा प्रयत्न करीत असतो. तो आदर्श त्याला आपल्या स्थितीपासून गति देऊन प्रगत करीत असतो, उन्नत करीत असतो. सतत चालना देऊन जीवाला स्वरूपस्थितीकडे प्रगत करणारा प्रत्येक आदर्श हा परमात्मस्वरूपच होय, म्हणून प्रत्येक इज्य, प्रत्येक दैवत, प्रत्येक ध्येय हे परमात्मस्वरूपच म्हणावयाचें. बालजीव बालपणीं शंख शिंपले गोळा करतो. पुढे ते फेकून देऊन मोठेपणी तो सोनें नाणे गोळा करूं लागतो. पुढे त्याचीहि खैरात करून तो नांवलौकिकाच्या मागे लागतो. पुढें नांवलौकिकहि तुच्छ मानून तो अंतर्मुख होतो, आणि शेवटीं अंतरतर परमात्म्याला ओळखून स्वस्थ होतो, शांत होतो. या प्रत्येक अवस्थेत जे त्याला मोलाचे वाटतें तें दुसऱ्या अवस्थेत त्याला फोल वाटते. म्हणून ते टाकून तें नवें मूल्य शोधून त्याच्या प्राप्तीचा प्रयास करूं लागतो. अशा प्रकारे करता करता तो शेवटीं परम मूल्य, परम अर्थ जो सर्वात्मा स्वात्मा त्याला गांठतो. अशा प्रकारें तो परम अर्थ असलेला परमात्माच अर्थनीयतेच्या तद्रूपानें पायरी पायरीनें जीवाला प्रचोदना देत असतो, आपल्याकडे ओढीत असतो, आत्मसात् करीत असतो. म्हणून अल्पहि मूल्य तुच्छ म्हणतां कामा नये. कांकीं तें कांहीं झालें तरी मूल्य आहे. तसेंच अत्युच्चहि मूल्य, तें कितीहि महान् असले तरी, मूल्यच आहे, मूल्याहून अधिक कांहीं नाही. म्हणून त्याचाहि फार बडेजाव करण्याचे कारण नाही.
दधि मधुरं मधु मधुरं द्राक्षा मधुरा सितापि मधुरैव ।
तस्य तदेवहि मधुरं यस्य मनो यत्र संलग्नम् ॥

बालकाला शिंपल्याची जेवढी किंमत तेवढीच पालकाला मोत्याची. कोणी कोणाला हीन लेखायला नको. कोणी आपल्याला आगळे लेखायला नको. का की "निर्विशेषो विशेषः". लहान ही मूल्यच, मोठेहि मूल्यच.

४४७. महेज्य
अर्थमात्र तत्त्वतः परमार्थच आहे. पर्वत आणि परमाणु दोन्ही पृथ्वीतत्त्वच, मात्रेचा फरक असो, तत्त्वतः ती दोन्ही एकच. हे जरी खरे असले तरी पर्वत तो पर्वतच. मेरूची तुलना मोहरीशी करता येणार नाही. त्याप्रमाणें इज्य आणि महेज्य एक म्हणता येणार नाही. ताकवणी आणि अमृत यांची तुलना होऊं शकत नाही. "बहुनां जन्मनां अन्ते ज्ञानवान् मां प्रपद्यते । वासुदेवः सर्वमिति स महात्मा सुदुरलभः । " अनेक जन्मांच्या पुण्याईनेच ज्याला महात्मे प्राप्त करून घेतात तो परमात्मा हा महेज्य होय. महात्मेच त्याला भजतात. इतर पामर जीव क्षुद्र देवतांच्या भजनीं लागतात, कारण त्यांच्या भक्तीनें त्यांच्या कामना पूर्ण होत असतात-- "क्षिप्रंहि मानुषे लोके सिद्धिर्‌ भवति कर्मजा." कर्मसिद्धि त्वरित होते. राज्य मिळवायचे आहे. तें मिळविण्याचे मार्ग आहेत. ते मार्ग अंगीकारले साम, दाम, दंड, भेद की राज्य मिळते. परंतु ही कर्मसिद्धि त्वरित मिळते याचा अर्थ असा नव्हे की प्रयत्न केल्यावांचून च ती मिळते अथवा तीसाठी आवश्यक कालावधि लागत नाही. त्वरित याचा अर्थ इतकाच की ज्ञानसिद्धीच्या मानानें अतिच सुलभ आहे ती. ज्ञानसिद्धि कर्मसिद्धीच्या मानानें अत्यंत दुर्लभ आहे. सुळावरची पोळी आहे ती. ज्ञानदेवानें तिचे अद्‌भुत वर्णन केलें आहे-"शीत वेढावें । उष्ण पांघुरावें । वृष्टीचिया असावें । घरा आंतु ॥ " इत्यादि. अहंता अस्मिता अविद्या यांच्या कचाट्यांतून आपली सुटका करून घेणे सोपें नाहीं. एक वेळ ज्ञानदेवांनी वर्णिलेलें अशक्य कर्म होईल, पण ज्ञानसिद्धि कोणा विरळाच भाग्यवंताला वरावयाची. "गत-संगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ तबुद्धयस् तदात्मानस् तन्निष्ठास् तत्परायणाः । गच्छन्त्यपुनरावृत्तिं ज्ञाननिधूतकल्पषाः" असे नित्ययुक्त ज्याची उपासना करतात तो परमात्माच महेज्य होय. तदितर सर्व इज्य अन्यदेवता होत.

४४८. क्रतु
यज्ञ, मेध, क्रतु, सत्र इत्यादि अनेक शब्द समानार्थक आहेत, परंतु ते एकार्थक नव्हेत.यजनरूप तो यज्ञ, पावनरूप तो मेध. संकल्परूप तो क्रतु. सदनरूप तें सत्र. असे विशिष्ट भाव लक्षुन हे यज्ञवाचक शब्द प्रचलित झाले आहेत. यज्ञ आणि क्रतु दोन्ही एकच असतील तर दोन शब्द झालेच कां ? परमात्मा हा यज्ञ आहे आणि तो ऋतुहि आहे. ज्या यज्ञांत यूप असतो तो क्रतु होय असें शंकराचार्यांनी विवरिलें आहे. आज आम्हांला यज्ञ लाक्षणिक माहीत आहे. प्रत्यक्ष यज्ञ केव्हांचाच लोपला आहे. त्याची गरज उरली नसल्यामुळेच तो अव्यक्तलीन झाला आहे असें म्हणायला हरकत नसावी ! कित्येक वेदाभिमानी शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार कधी कधीं करतांना आढळतात. पण गेलेला क्षण जसा परत कधी आणतां येत नाही त्याप्रमाणें यज्ञधर्महि पुनः आणता येणार नाही. जो ओढून ताणून आणला जाईल तो अस्सल असणार नाही. तो नक्कलच असणार. तो सहज वा स्वभाव-नियत नसल्यामुळे तो रुजणार नाहीं, टिकणार नाहीं. दयानन्दांचा तो प्रयत्न दयाजनकच आहे. गीतेच्या काळीच तो संपुष्टांत आल्यासारखा झाला होता. म्हणून गीतेंत "एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान् विद्धि तान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे । " असें म्हणून समारोपिलें आहे. सर्व यज्ञांत ज्ञान-यज्ञ च श्रेयस्कर, म्हटला आहे-"श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञाज् ज्ञानयज्ञः परंतप" "यज्ञानां जपयज्ञोऽस्मि"असें आणखी पुढे म्हटले आहे.
सारांश, यज्ञाची सारखी पुनर्व्याख्या नि व्यवस्था होत आली आहे. सर्वांचा सार हा की (१) श्रद्धामूलक (२) मनोयोगपूर्वक (३) मन्त्रोच्चारसहित (४) हस्तद्वारा केलेलें (५) भगवदर्पण (६) कर्म म्हणजे यज्ञ होय. या षडंगांपैकी एकहि न्यून राहिल्यास तो यज्ञ हीन होतो. क्रतु हा असा कर्मज यज्ञ आहे आणि तद्द्वारा साधक साध्यदेव बनतो. म्हणून परिणतीच्या दृष्टीनें परमात्मा हा क्रतु म्हटला आहे.

४४९. सत्र
दीर्घकाल चालणाऱ्या यज्ञाला सत्र म्हणतात. यज्ञाची दीक्षा घेणाऱ्या यजमानाला यज्ञ संपेपर्यंत व्रतस्थ रहावे लागते. जो आजीवन व्रतस्थ राहिला त्याहून मोठा सत्री कोण म्हणावा ? सहस्रसम सत्र चालल्याचे पुराणांतरी वाचतों. ह्या सत्रांत दीक्षित कोण ? तो सहन समा वाचायला पाहिजे ना ? असली सत्रे ही सामाजिकच म्हणावी लागतील. म्हणजे एक यजमान यज्ञसात् झाला की दुसरा त्याची जागा घेतो आहे आणि सत्र अखंड चालतें आहे. राज्य हे असेंच एक सत्र आहे. राज्याचा एक राजा वा प्रधान पडला तरी दुसरा त्याच्या जागी येतो आणि तो राज्य चालवतो. त्यांत कधी खंड पडावयाचा नाही. परचक आले, पराभव झाला, तरच त्यांत खंड पड़ावयाचा. तसा होईपर्यंत तो पडूं न देणे हे राजाचे कर्तव्य होय, सत्र सुफल संपूर्ण होईपर्यंत दीक्षित यजमान आणि अध्वर्यु प्रभृति याज्ञिक स्वकर्मक्षम राहिले पाहिजेत. जीवन हे एक सत्रच आहे. त्याची तीन सवनेंः प्रातःसवन गायत्र, माध्यंदिन-सवन त्रैष्टुभ, सायंसवन जागत. गायत्र सवन चोवीस वर्षांचें, त्रैष्ट्रभ सवन चव्वेचाळीस वर्षाचे आणि जागत सवन छप्पन्न वर्षांचें. एकूण एकशें चोवीस वर्षांचे हे आयुःसत्र होते. दीक्षित होऊन जो हे असें सत्र करील तो सत्री सत्ररूप परमात्म्याला पोचेल यांत काय नवल ? यज्ञाची षडंगें मागील चिंतनांत ग्रथित केलीच आहेत. परंतु यज्ञाची दीक्षा ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. दीक्षिताला यज्ञ संपेपर्यंत व्रतस्थ रहावे लागतें असें वर म्हटलें च आहे आणि ही व्रतस्थताच यज्ञसाफल्याची किल्ली आहे. मौन, ब्रह्मचर्य, अहिंसा, सत्यवचन इत्यादि ह्या सत्राची दीक्षा होय. दीक्षेचा भंग झाल्यास यज्ञ सफल न होतां विफल होतो. इतकेच नव्हे तर तो यज्ञकर्त्यावर उलटतो सुद्धां, तो अभिचरतो. उदाहरणार्थ टेंभा जर नीट धरला नाही, उलटा धरला, तर त्याच्या ज्वालांनीं तो धरणाऱ्याचाच हात भाजेल, या प्रमाणें. म्हणून यज्ञाइतकीच किंबहुना त्याहून अधिक दीक्षा महत्त्वाची ठरते.

४५०. सतां गति
गति म्हणजे मरणोत्तर स्थिति. आगति म्हणजे इहलोकस्थिति. अर्थात् सतांगति म्हणजे सज्जन मरणोत्तर ज्या स्थितीला पोंचतात ती स्थिति. मरणोत्तर जीवाची काय स्थिति होते ते कोण सांगणार ? गेलेला परत येऊन सांगत नाही. तेव्हां तो केवळ श्रद्धेचा आणि अनुमानाचा विषय राहतो. चांगल्या कर्माचे चांगले फळ, वाईटाचे वाईट अशी श्रद्धा बाळगून लोक सत्कर्माच्या गतीला स्वर्ग, दुष्कर्माच्या गतीला नरक म्हणतात. या दोहोंहून स्वतंत्र आणि कर्मफल-मुक्त स्थितीला मोक्ष म्हणतात. सज्जन नरकाला जात नाहीत. ते जाणार म्हणजे स्वर्गाला वा मोक्षालाच. स्वर्गाला सज्जन सत्कर्मानें जातो तर तोच ज्ञानाच्या योगें मोक्षाला जातो. अर्थात् परम सत्कर्म म्हणजे ज्ञानच होय. कारण त्यायोगें गति आणि आगति यांचे हेलपाटे चुकतात आणि म्हणूनच वैदिक सकाम यज्ञकर्माच्या योगें क्षणिक स्वर्ग मिळविण्याचा विचार गौण होय. औषनिषदिक निष्काम उपासनेच्या योगें आत्मज्ञान मिळवून अनंत मोक्ष मिळविण्याचा आदर्शच मानवोचित होय असा आचार्यांचा निष्कर्ष आहे. पण त्यांत सकाम कर्मयोगाला गौणत्व दिले असले तरी त्याचा निषेध, नाहीं, निषेध फक्त दुष्कर्माचा आहे. निर्मल आत्मज्ञान एकाएकी होत नाही. त्यासाठी सत्कर्मयोग आचरीत हळूहळू ज्ञाननिष्ठायोग्यता मिळवीत राहिले पाहिजे. यथाकाळी ती लाभून जीव ज्ञानवान् होतो आणि ब्रह्मज्ञ नव्हे तर ब्रह्मच बनतो. या परम गतीला गांठीपर्यंत तिच्या सकट ज्या साऱ्या गति यथाकर्न आणि यथावत या सत्कर्मयोग्याला लाभतात त्या सर्व सांगति होत, परमात्म्याचेच ते सर्व आविर्भाव होत. परमात्मचंद्राच्याच त्या सर्व कला होत प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंतच्या.

४५१. सर्वदर्शी
'यज्ञ इज्यो-सांगतिः' या श्लोकांर्धात मुख्यतः यज्ञ आणि यज्ञफळ, यांचा विचार आला आहे तर 'सर्वदर्शी-ज्ञानमुत्तमम्' या त्याच्या पुढील श्लोकार्धात ज्ञान आणि ज्ञानफल यांचा विचार आला आहे. कर्म आणि ज्ञान यांच्या विषम फलांबद्दल फार जुन्या काळापासून मीमांसा होत आली आहे. कर्म-मीमांसेला पूर्व मीमांसा, तर ज्ञान मीमांसेला उत्तर मीमांसा संबोधिले जाते. पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा दोन्ही वेदार्थाचा निर्णय करतात. "'आम्नायस्य क्रियार्थत्वात् आनर्थक्यं अतदर्थानाम्' असा पूर्व मीमांसेचा निर्णय आहे तर उत्तर मीमांसा तें सूत्र 'आम्नायस्य दर्शनार्थत्वात् आनर्थक्यं अतदर्थानाम् 'असें वाचतें. अर्थात् उत्तरमीमांसेच्या मते ज्ञाननिष्ठासाधन कर्मच कर्तव्य आहे आणि तोंवरच कर्तव्य आहे जोंवर ज्ञाननिष्ठा उत्पन्न झालेली नाही. ती उत्पन्न झाल्यावर कर्म निरर्थकच होय. 'न यावज्जीवं कर्तव्यप्राप्तिः कस्यचिदपि कर्मणः' असा तिचा निर्णय आहे. पूर्व मीमांसा अचरम आहे, हे तिला दिलेल्या पूर्व ह्या विशेषणावरून सूचित होते. तसेंच उत्तर मीमांसा ही चरम आहे. हे तिला दिलेल्या उत्तर ह्या विशेषणानें सूचित होत आहे. प्रस्तुत श्लोकांतहि त्या प्रमाणेंच प्रथम यज्ञादि कर्मकांड आणि अनंतर ज्ञानकांड आलेले आहे. उपासना ह्या दोहोंचा सांधा आहे. ती कर्मप्राय पण ज्ञानप्राण असते. तींत कर्म असते पण तें सकाम असत नाहीं, तींत ज्ञान असतें पण तें अक्रिय असत नाही. कर्मकांडांतील सकामता ज्ञान सहन करू शकत नाही. ज्ञानकांडांतील निष्क्रियता कर्मकांड सहन करू शकत नाही. उपासना त्या दोहोंचे दोष वगळून गुण घेते आणि दोहोंचा समन्वय करते. ही ज्ञानार्थक निष्कामकर्मयोगरूप उपासना यावज्जीव चालू शकते. जोवर देह आहे तोवर ती कर्तव्यच आहे.
चित्सत्तेवांचून कशाचीहि उपलब्धि होत नसल्यामुळे परमात्मा हा सर्वदर्शी म्हणावयाचा. त्याची लब्धि म्हणजे सर्वोपलब्धिच होय. 'वेद अनंत बोलिला| अर्थ इतुका चि साधिला, विठोबासी शरण जावें, निजनिष्ठे नाम गावें ।

४५२. विमुक्तात्मा
परमात्मा आणि त्याचा परम भक्त सर्वदर्शी होय. तो सर्वकाहीं पहातो, पण लिप्त कुठेच होत नाही. "यथा पुष्करपत्रे आपो न श्लिष्यन्ते एवं वै तत्" कमलदलाला जल-स्पर्श होत नाही, तसें त्याला कोणतेंहि दृश्य चिकटत नाही. त्याची सदैव विविक्तदृष्टि असते. त्याला कुठलेंहि कर्म वा त्या कर्माचे फळ केव्हां,हि स्पर्शत नाही. सूर्य जगाचे सर्व व्यवहार पाहतो, पण तो ते व्यवहार करत नाहीं. करायला सांगत नाहीं वा त्यांच्या सुखदुःखांनी हर्षशोक पावत नाही. तें कांहीएक त्याच्या गांवीं असत नाही. तसा परमात्मा हा विमुक्तात्मा आहे. त्याच्या द्रष्टुत्वाला कर्तृत्व भोक्तृत्व दु:खहि शिवत नाहींः
न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः ।
न कर्मफल-संयोगं स्वभावस् तु प्रवर्तते । गीता ५- १५
नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः ।
अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः ॥ गीता ५ -१६

विमुक्तात्मा या सामासिक पदांत विमुक्त आणि आत्मा दोन शब्द आहेत. विमुक्त कुणाला म्हणायचे ? विमुक्तीचे स्वरूप काय ? विमुक्ति म्हणजे प्रकृतीच्या गुणधर्माचा आपल्या ठाईं अविद्येमुळे करून घेतलेल्या अध्यासाचे निरसन होणे. ज्याचा आत्मा म्हणजे बुद्धि अविद्याध्यारोपित अध्यासांतून मुक्त झाली तो विमुक्तात्मा होय. वस्तुतः तर आत्मा हा सदैव मुक्तच आहे. तो बंधनांत पडला आणि मग मुक्त झाला अशी स्थिति नाही. तो तर नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभाव आहे. "न वा बद्धो न वा मुक्तो, इत्येषा परमार्थता" चंद्राला ग्रहण लागत नाही किंवा त्याचा त्यांतून मोक्षहि होत नाही. ग्रहण होत असतें तें आमच्या दृष्टीला, आणि मोक्षहि होत असतो तिचाच. एकाच वेळी काहींना ग्रहण आणि काहींना अग्रहण हा अनुभव नित्याचाच आहे. ज्याच्या दृष्टीआड छाया आली त्यालाच ग्रहण आहे, ज्याच्या दृष्टीआड छाया आलेली नाही त्याला अग्रहणच आहे. परमात्मा हा असा चंद्रवत् नित्यच विमुक्त आहे, आणि त्याच्या दृष्टीवर केव्हांहि छायापटल येत नसल्यामुळे तो विमुक्तात्माहि आहे..

४५३. सर्वज्ञ
सर्वदर्शी आणि सर्वज्ञ वस्तुतः दोन्ही एकच. तथापि धात्वर्थानें त्यांत फरक केला आहे. दर्शन म्हणजे पाहणे आणि ज्ञान म्हणजे जाणणे. साखर पाहतां येते. ती आपण पाहतो. पण नुसत्या पाहण्यानें तिचे ज्ञान होत नाही. ती चाखावी लागते, ती चाखतो तेव्हांच तिचें ज्ञान होते. पण आपण म्हणतों, पहा बरं सरबतांत साखर बेताची झाली की कशी ? या प्रयोगांत दर्शन हे केवळ दर्शनवाचक नाहीं तें लक्षणेनें ज्ञानवाचक आहे. दर्शन, श्रवण, रसन स्पर्शन घ्राण ही सर्व ज्ञानेंद्रियेच होत ना ? इंद्रियांत दर्शन प्रधान असल्यामुळे तें ज्ञानवाचक, सर्वविषयग्रहण-वाचक झाले आहे. आणि त्यामुळेच सर्वदर्शी आणि सर्वज्ञ एकच होत असे वाटते. पण वस्तुतः दोन्ही भिन्नार्थक आहेत. पंच बाह्य ज्ञानेन्द्रिये आणि पंचधा आभ्यंतर अंतःकरण यांच्यायोगे आणि यांच्या वियोगें म्हणजे यांच्या वांचूनहि जो जाणतो तो जाणणाराच सर्वज्ञ म्हणावयाचा. निरिंद्रियांपासून सर्वेन्द्रियांपर्यंत असंख्य जीवयोनि आहेत. त्या सर्व योनीतील जीवांना होणारें ज्ञान हे सगळे एका क्षेत्रज्ञालाच होत असते, आणि म्हणून सर्वांचा स्वात्मा तो परमात्मा हा सर्वज्ञ म्हणावयाचा.
जागरित वैश्वानर, स्वप्नस्थ तैजस, सुषुप्त प्राज्ञ ही ज्याची त्रिरूपे आहेत तो तुरीयच जागृति-स्वज-सुषुप्तिरूप तिन्ही जगें जाणत असल्यामुळे सर्वज्ञ म्हणावयाचा. तुरीयेतर वैश्वानर तैजस आणि प्राज्ञ हे केवळ एकएकच जग जाणणारे म्हणून असर्वज्ञ होत.
तुरीय हा केवळस्वरूप असल्यामुळे तिथे ज्ञेयज्ञातृ-ज्ञान ही त्रिपुटी, हा प्रपंच संभवत नाही. म्हणून त्याला सर्वज्ञ म्हणणे नीट नाही. त्यामुळे सुषुप्त प्राज्ञ हाच सर्वज्ञ पदवीस पात्र म्हणावयाचा. कारण सुषुप्तींत त्याच्या ठाईं सारें विश्व एकीभूत असतें आणि त्याला तो आनंद म्हणून अनुभवीत असतो. म्हणूनच 'प्राज्ञ ला उद्देशून मांडुक्यांत म्हटले आहे "एष सर्वेश्वरः । एष सर्वज्ञः । एषोऽन्तर्यामी । एष योनिः सर्वस्य प्रभवाप्ययौहि भूतानाम् । " .

४५४. (उत्तम) ज्ञान
उत्तम ज्ञान हे सविशेषण एक नाम आहे. ज्ञानांत तर-तम-भाव कसा करायचा ? वस्तुतः ज्ञानांत अधम मध्यम उत्तम असा काही फरक नाही. ज्ञान हे ज्ञान आहे. तें लहान-मोठे, हलकें-भारी, अधम उत्तम असें कांहीं नाहीं. तथापि उपाधिवशात् तें अधमोत्तम भासते. अग्नि सधूम असतो, विद्युत् निधूम परंतु चंचल असते. सूर्य निधूम आणि स्थिरप्रभ असतो. हें त्रिलोकांतील त्रिविध तेज आहे. प्रकाशक आहे. पहिल्याचा प्रकाश धूमिल धूसर, तर दुसऱ्याचा क्षणिक असतो. परंतु तिसऱ्याचा ना अंधुक ना क्षणिक असा स्वच्छ आणि सतत असतो. आणि म्हणून तो उत्तम म्हणावयाचा. तसें जें ज्ञान निःसंदेह आणि शाश्वत आहे तें उत्तम म्हणावयाचे. जीवाला आत्मभिन्न जें ज्ञान होतें तें स्वायत्त नसते. तें शेयाधीन राहते त्यामुळे तें संदेहास्पद आणि अशाश्वत असतें. बाह्य पदार्थांचे यथार्थ ज्ञान होत नाही आणि तो पदार्थ बाह्य असल्यामुळे तो बदलतो आणि नाहींसाहि होतो. त्याची स्मृतिहि जीवाला भाररूप असल्यामुळे ती तो विसरतो. परंतु आत्मज्ञान हे असें नाही. त्यांत ज्ञातज्ञेय अभिन्न असतात. आणि त्याची विस्मृति कधीहि होत नाही. त्यामुळे तें स्वायत्त निःसंदेह आणि शाश्वत होय. आणि म्हणून त्याला उत्तम म्हणावयाचे. "यज्ज्ञात्वा नेह भूयोऽन्यज् ज्ञातव्यं अवशिष्यते" "जें जाणूनि पुढे येथे जाणावेंसें न राहतें" असें जें ज्ञान तें हें आत्मज्ञान होय. आणि तेंच उत्तम. ज्ञातृज्ञेय-भेदानें होणाऱ्या विषयज्ञानाला ज्ञान आणि ज्ञातृ-ज्ञेय-ज्ञान-विभागरहित एकरस ज्ञानाला अनुभव अथवा विज्ञान अशी परिभाषा आहे. इथे 'उत्तम ज्ञान' पदानें त्या अनुभवाचा वा विज्ञानाचा निर्देश केला आहे. "अनुभव रहणीविण कायसें श्रवण ? गर्भअंध नेणे रत्न-किरण" "ब्राह्मणस्य विजानतः' इत्यादि वचनांत ही परिभाषा आली आहे. .

४५४. उत्तम (ज्ञान)
उत्तम हे स्वतंत्र पद नाहीं तें ज्ञानाचे विशेषण म्हणून आले आहे. म्हणून त्याचा स्वतंत्र विचार करण्याचे कारण नाही. तथापि त्याचा थोडा अधिक विचार करू या. व्याकरणांत प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष अशा संज्ञा येतात. प्रथम पुरुष म्हणजे परोक्ष वा दूरचा हा अर्थ. द्वितीय पुरुष म्हणजे ज्याच्याशी आपण साक्षात् बोलतों तो प्रत्यक्ष अर्थ आणि उत्तम पुरुष म्हणजे अंतरतर स्वतः बोलणारा स्वतंत्र पुरुष हा अर्थ, म्हणजे वक्त्याचा निजात्मा. या परिभाषेच्या मुळाशी जो जितका निकटचा तो तितका वरचा अशी कल्पना आहे. आणि निकटतम तर प्रत्येकास त्याचा निजात्माच होय. आणि म्हणून तो उत्तम म्हटला. स्वात्म्याहून निकटतर दुसरे काय आहे ? तसेंच जो दुसऱ्यावर अवलंबून नाही पण ज्यावर दुसरें अवलंबून आहे, तोच ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ आणि उत्तम म्हणावयाचा. म्हणून आत्मज्ञान हेच उत्तम. आपल्याला उपलब्ध होणाऱ्या सर्व ज्ञानांचा आधार आत्मज्ञान आहे. म्हणून ते उत्तम होय. तें दुसऱ्या कशावरहि अवलंबून नाही, पण त्यावर मात्र सर्व ज्ञानें अवलंबून आहेत. कोणतीहि उपलब्धि आत्म्यालाच होते. म्हणून सर्वोपलब्धीचा हा मूलाधार उत्तम म्हटला आहे. उत् या उपसर्गाला तरतम प्रत्यय लागून उत्तर आणि उत्तम शब्द झाले आहेत. एका मंत्रांत हे तिन्ही एकत्र आढळतात. तो मंत्र असाः
उद् वयं तमसस् परि । ज्योतिः पश्यन्त उत्तरम् ।
देवं देवत्रा सूर्यम् । अगन्म ज्योतिर् उत्तमम् ॥

सकाळी सूर्योदयाला नैश तमाच्या माथ्यावर पाय देऊन वर आलेलें तेज उत्तर म्हणजे वरवर चढत असलेलें ध्यात मध्याह्नीं तळपणाऱ्या, सर्व देवांत थोर देव असलेल्या सूर्याला, त्या सर्वोत्तम तेजाला पोचूं या. अर्थात् साधनेच्या आरंभी अज्ञान भेदून प्रकाशमान झालेल्या चढत्या तेजाचा मागोवा घेत, त्याचे अनुसंधान करीत, आम्ही त्या देदीप्यमान आत्मसूर्याला, आत्मतेजानें विश्व प्रकाशमान करणाऱ्याला, गांठू. आत्मभिन्न कांहीं उरून देणाऱ्या त्या तेजाला, त्या उत्तमाला गांठू या.


सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखद सुहृत् ।
मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः ॥४९॥


४५५. सुव्रत
"सुव्रतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत्' हा सुकाराचा श्लोकार्ध आहे. एक सूक्ष्म पद सोडलें तर बाकीची सर्व सु" पूर्व आहेत. सर्वांचे तात्पर्य, तो परमात्मा सुरूप आहे, सर्वतोभद्र आहे, हे आहे.
स्वेच्छेनें वरण केलेला आणि प्राणपणानें पाळावयाचा नियम म्हणजे व्रत होय. कोणीं कांहींहि मागितलें तरी त्याला नाही म्हणावयाचे नाही हे कर्णाचे व्रत होते. काही झाले तरी सत्यच बोलायचे हे युधिष्ठिराचें व्रत होते. "द्विः शरं नाभिसंधत्ते रामो द्विर् नाभिभाषते" असें रामाचे व्रत होते. अशी हीं नाना व्रतें आहेत. आणि ती आचरणारे सगळे सुव्रत होत. या सर्व व्रतांच्या मुळाशी आत्मनिष्ठा दिसून येते. म्हणून आत्मनिष्ठता हेच एक सुव्रत होय. आणि तें जो पाळतो तो सुव्रत म्हणावयाचा. आत्मा आत्मनिष्ठ नाहीं राहणार तर काय राहील ? तो आत्मनिष्ठेहून वेगळे काही करूच शकत नाही. म्हणून परमात्मा हा सुव्रत होय. सुव्रत म्हणजे स्वव्रत. स्वहून म्हणजे आत्म्याहून अधिक सुरूप दुसरें कांहीं नाहींच. तो आत्मा निर्दोष आणि सर्वमंगल-निधि आहे. तन्निष्ठता हेच एक व्रत आहे. इतर सगळी व्रतें त्याचे अंश होत. आत्मपरायण पुरुषच वृजिनार्णव तरून जातातः
तबुद्धयस् तदात्मानस् तनिष्ठास तत्परायणाः ।
गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञाननिधूत-कल्पषाः ॥ गीता ५ - १७

गीतेंत भगवान् शेवटी हीच एक निष्ठा उपदेशितात. सर्व-धर्मान् परित्यज्य मां एकं शरणं व्रज ।
अहं त्वा सर्व-पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः ॥ गीता १८- ६६

जो आत्मनिष्ठ झाला त्याला दुसरे किरकोळ धर्मविधि लागू नाहींत. भागवतांत म्हणूनच म्हटलें आहेः
तो देवता पितर वा ऋषि आप्त भूतें यांचा न सेवक नृपा ! न ऋणी असे तो । सर्वात्मना शरण जो चरणांस गेला सांडूनि सर्व शरणप्रद श्रीहरीच्या ॥

४५६. सुमुख
सु म्हणजे शोभन मुख आहे ज्याचें तो सुमुख होय. मुखाची शोभनता त्याच्या वर्णाकृतींवर अवलंबून नाही. तर तदर्शनानें होणाऱ्या लाभावर "परिणामावर अवलंबून आहे. ज्याच्या मुखावलोकनानें सर्व अमंगल टळतें नि सर्व मंगल वळतें तो सुमुख म्हणावयाचा. ॐकारस्वरूप, गणपति हा सुमुख म्हटला आहे "सुमुखश्चैकदन्तश्च” इत्यादि. सर्व अमंगलांचे निरसन व सर्व मंगलांचे संपादन ज्ञानामुळे होते. म्हणून ज्ञानस्वरूप गणपति, सर्व अक्षर-गणाचा मुख्य ॐकार, सुमुख म्हटला आहे. आणि परमात्मा हा केवळ ज्ञानस्वरूप असल्यामुळे ॐकारस्वरूप गणपति हे त्याचेच नामरूप होय. ॐकारस्वरूप गणपति हा परमात्म्याचा अक्षरावतार आहे. पुरुषावतारांत प्रभु रामचंद्र सुमुख होत. ते सर्व प्रजाजनांना चंद्रवत् प्रियदर्शन होतेच. पण त्या शिवाय त्यांची सुमुखता म्हणजे स्थितप्रज्ञता होय. सुख-दुःखांनी त्यांच्या मुखावर, मुद्रेवर, विकारदर्शन होत नसे. ते कोणत्याहि प्रसंगी आत्मनिष्ठ राहत. स्थितप्रज्ञाची लक्षणे गीतेत दिली आहेत. पण त्याचे चरित्र म्हणजे रामायण होय. अर्जुनानें विचारलेंः
स्थिरावला समाधींत स्थितप्रज्ञ कसा असे ।
कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा ॥

भगवान् म्हणाले
कामना अंतरांतील सर्व सोडूनि जो स्वयें ।
आत्म्यांत चि असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला ॥
नसे दुःखांत उद्वेग सुखाची लालसा नसे ।
नसे तृष्णा भय क्रोध तो स्थितप्रज्ञ संयमी ॥

संयमी स्थितप्रज्ञाचें चरित्र म्हणजे रामायण. तुलसीदासांच्या एकश्लोकी रामायणांत तें असें गाईलें आहेः
प्रहृष्टतां या न गताभिषेकतस् तथा न मम्मे वनवास-दुःखतः ।
मुखाम्बुजश्री रघुनंदस्य मे सदास्तु सा मंजुलमंगल-प्रदा ॥


४५७. सूक्ष्म (सुक्ष्म )
परमात्मा हा प्रथम सुव्रत म्हणजे सुशील म्हटला. त्यानंतर तो सुमुख म्हणजे प्रसन्नवदन म्हटला. आता त्याला सूक्ष्म म्हटले आहे. हे पद सुमुख आणि सुघोष यांच्या मध्ये आले आहे. तेव्हां त्याचा अर्थ सूक्ष्मदृष्टि असा दिसतो. त्याचे दर्शन सूक्ष्म, तेव्हा त्याचा अर्थ सूक्ष्मदृष्टि असा दिसतो. त्याचे दर्शन सूक्ष्म आहे. शुभ आहे. तो तत्त्वदर्शी आहे. म्हणून तो सूक्ष्म, सूक्ष्म पाहतो तोच उत्तम पाहतो. त्यालाच परमलाभ होतो. "विशालाभ्यां आभ्यां किमिह नयनाभ्यां खलु फलं, न याभ्यां आलीढा परमरमणीया तव तनूः" ज्या नेत्रांना भगवदर्शन, तत्त्वदर्शन, आत्मदर्शन झाले नाही त्यांना सूक्ष्मेक्षण वा सुलोचन कसें म्हणता येईल ? पण कोणी आक्षेप घेतील, की इथे सुहि नाहीं आणि ईक्षणहि नाही. तुम्ही सूक्ष्म म्हणजे स्वीक्षण असा कसा अर्थ करतां ? त्यावर उत्तर हेच की हा श्लोकार्ध सुच्या पाढ्याचा आहे आणि त्यांत हे पद आले आहे, सुव्रताचे हे विवरण आहे. सुव्रत म्हणजे सुशील कसा ? तर त्याचे दर्शन भलें आहे, त्याची दृष्टि भली आहे, त्याची वाणी भली आहे, त्याची प्रत्येक कृति भली आहे. त्याचे हे सारें बाह्य भलें आहे कारण त्याचे अंतर भलें आहे. तो सुहृद् आहे. अर्थात् तो अंतर्-बाह्य सुरूप आहे. या सुप्रवाहांत "सूक्ष्म" स्वीक्षणवत् झाल्यास नवल नाही.
अथवा "सूक्ष्म" पद हें "सुक्ष्म" समजावें. "सु शोभना क्ष्मा येन सः सुक्ष्मः" ज्याच्या योगें ही क्ष्मा म्हणजे पृथ्वी शोभन झाली आहे तो परमात्मा 'सुक्ष्म' म्हणावयाचा. परमात्मा हा या पृथ्वीचा, या सृष्टीचा पति आहे आणि म्हणून ती सौभाग्यवती आहे. सृष्टीची नश्वरताहि सुंदर आहे कारण तिला शाश्वताचा आधार आहे. ह्या जात्या जगांत कांहींच राहतें नसेल तर मग सारेच मुसळ केरांत म्हणावें लागेल. पण तसे नाही. एका परमात्म-सत्तेचा बळकट आधार आहे या सर्वाला. म्हणून तो परमात्मा "सुक्ष्म' होय. सु म्हणजे भक्कम आणि क्ष्मा म्हणजे आधार आहे जो तो सुक्ष्म म्हणावयाचा. अविज्ञेय असल्यामुळे परमात्मा हा सूक्ष्म म्हटला जातो. हा अर्थ तर प्रकटच आहे. "सूक्ष्मत्वात् तद् अविज्ञेयम्" हे गीतेचे वचन प्रसिद्धच आहे.

४५८. सुघोष
"शोभनः घोषः यस्य सः सुघोषः" ज्याचा घोष शोभन आहे तो तो सुघोष म्हणावयाचा. वेदोनारायणाचा घोष शोभन होय म्हणून तो वेदस्वरूप परमात्मा सुघोष म्हटला आहे. या सूघोषतेचे कारण ज्ञानदेवानें असें दिले आहेः अहितापासौनि काढिती । हित देऔनि वाढविती । नाहीं गा श्रुतीपरौंती । माउली जगा । "
आध्यात्मिक ज्ञानस्वरूप असलेले वेद मानवाचा परम पुरुषार्थ मानवाला कंठरवानें सांगत आहेत. म्हणून ते उघडच सुघोष होत. इथे सु म्हणजे हिततम आणि सु म्हणजे सुनिश्चित दोन्ही अर्थ एकवटले आहेत. "प्रज्ञानं ब्रह्म । अयं आत्मा ब्रह्म । तत् त्वं असि । अहं ब्रह्मास्मि । " हा जो चतुरमुखानें चौफेर केलेला उपदेश त्यामुळे परमात्मा हा सुघोष म्हटला आहे.
नकुलाचा शंखहि "सुघोष" होता. शंख सुघोष कां ? तर त्यांतून निघणारा घोष हा ॐ कार स्वरूप आहे म्हणून. हा एकाक्षर ब्रह्म म्हणजे वेद होय. शंखासुरानें समुद्रतळाशी चोरून नेलेला वेद तो हाच. मत्स्यावतारांत भगवंतानें प्रलय-पयोधींतून शंखोद्धार करून ज्या वेदाचे रक्षण केलें तो हाच. मत्स्यावतार ज्यामुळे अवतार म्हटला गेला ती महनीय घटना हीच.हिलाच अनुलक्षून जयदेवानें गाइलें आहे -
"प्रलय-पयोधि-जले धृतवान् असि वेदं ।
विहित-वहिवचरित्रमखेदम् ॥ "

पत्राची किंमत त्याच्या मजकुरावरून होते. मजकूर तुच्छ असेल तर पत्र तुच्छ आणि उच्च असेल तर उच्च म्हटले जाईल. तसाच कोणताहि मंत्र त्याच्या अर्थावरून, अभिप्रायावरून उच्चावच ठरत असतो. हा एकाक्षर मंत्र संपूर्ण वेदार्थाचा वाचक असल्यामुळे तो एकाक्षर ब्रह्म म्हटला गेला आहे. ब्रह्म शब्द वेद आणि वेदार्थ दोहोंचाहि वाचक आहे. त्यामुळे एकाक्षर ब्रह्म म्हणण्यांत विशेष स्वारस्य आहे. अक्षरब्रह्म हा श्लिष्ट प्रयोग आहे. त्यांतील दोन्ही पदें अक्षर आणि ब्रह्म श्लिष्ट म्हणजे व्यर्थ आहेत. चिरका, चिडका नसलेला गंभीर घोष सुघोष होय. असा ब्रह्म घोष हा उघडच सुघोष म्हणावयाचा. परमात्म्याचेच तें एकरूप होय.

४५९. सुखद
ज्याचे शील शोभन आहे, ज्याचे दर्शन शोभन आहे, ज्याचे प्रेक्षण शोभन आहे, ज्याची वाणी शोभन आहे तो सुखद नाही तर काय असेल ? तो परमात्मा आपल्या नाम, रूप, गुण, शील या सर्वांच्या योगें सर्वांना सुख देणारा आहे. नामानें, कीर्तनें तो श्रवणांना सुखावह होतो, रूपानें तो नेत्रांना सुखावह होतो, गुणानें तो अंतराला सुखावह होतो, शीलानें तो शत्रु मित्र उदासीन आणि मध्यस्थ या चतुरविध समाजाला सुखावह होतो. शत्रु म्हणजे प्रतिकूल लोक. त्यांच्या अज्ञानजन्य प्रतिकूलतेचाच विरोध करून आणि एरव्ही त्यांच्या विषयीं आत्मौपम्य बाळगून तो शत्रूंना सुखावह होतो. राम "मरणान्तानि वैराणि" म्हणून रावणाचें और्दैहिक यथासांग करवतो. मित्र म्हणजे अनुकूल लोक. राम सुग्रीवासारख्या मित्राला राज्य व पत्नी मिळवून देतो. उदासीन म्हणजे कोणाला च शत्रु वा मित्र न मानतां तटस्थ राहणारा यति-वर्ग. आजहि आपण पाहतों की तटस्थतेची नीति चालवणारी राष्ट्रे आहेत. आणि त्यांना विरोधी राष्ट्र चाहत आहेत. त्यांच्या तटस्थतेच्या नीतीची कदर करीत आहेत. त्याच प्रमाणें समाजांतील द्वंद्वापासून पूर्ण अलिप्त असणारे जे यति त्यांचेहि समाजांत महत्त्वाचे स्थान आहे. त्यांचे रक्षण झालें पाहिजे. रामानें अशा उदासीन ऋषींचे रक्षण केलें. या तिन्ही वर्गाहून भिन्न आणखी एक वर्ग आढळून येतो. तो उदासीन नाही, पण दोन्ही परस्पर-विरोधी असलेल्या आपल्या शत्रूत आणि मित्रांत सलोखा व्हावा यासाठी मनापासून झटत असतो. हा मध्यस्थवर्ग होय. रामायणांत मध्यस्थ नाही आणि भारतांतहि मध्यस्थ नाही. हुडकूनच काढावयाचे म्हटल्यास बलरामाला उदासीन व विदुराला मध्यस्थ म्हणतां येईल. पण आधुनिक भारतात गांधी-इंग्रज ह्यांच्यांतील लढयांत जयकर सपू हे मध्यस्थ म्हणून होते. आणि त्यांना सहायक तो मध्यस्थ वर्ग म्हणावयाचा. या सर्वांना परमात्मा प्रत्यागात्मरूपानें सानुकूल असल्यामुळे सुखद होय. सुखद हा निरूपपदप्रयोग आहे म्हणून त्याचा अर्थ सर्व-सुखद होतो. तो अमक्याला सुखद असें नाहीं.

४६०. सुहृत्
परमात्मा हा सुहृद् आहे. सर्वांविषयीं निरपेक्ष निरतिशय आणि निरन्तर सद्‌भावच त्याच्या ठाई वसत आहे. जगांत माता ही आपल्या अपत्याविषयी प्रेमपूर्ण असते असे मानले जाते. म्हणूनच म्हणतात "कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति". कुपुत्र असूं शकतो पण कुमाता मात्र कुठेहि आढळावयाची नाही. आपल्या अपत्या विषयी अत्यंत वात्सल्य असलेल्या मातेचे प्रेमहि निरपेक्ष म्हणता येत नाही. "हा आपले पांग फेडील, आपल्याला सद्गति देईल, आपलें नांव जगांत चालवील' अशी अपेक्षा तिची असतेच.पुत्राहून अधिक प्रेम ती आपल्यावरच करीत असते. पुत्रावरहि ती तो आपला पोटचा गोळा, आपला जीवाचा जीव म्हणूनच प्रेम करीत असते. "आत्मा वै पुत्र नामासि' म्हणून प्रेम करीत असते. आणि हे प्रेम पुष्कळदां खंडित होतें, आजीवनहि चालत नाही आणि मरणोत्तर वा जन्मपूर्व त्याचा विसर पडतो, अभाव असतो. परंतु परमात्मा हा सर्वांचा निजात्मा आहे आणि म्हणून त्याचे प्रेम हे निरपेक्ष निरतिशय आणि निरंतर आहे आणि तें सार्वत्रिक आहे, विश्वव्यापक आहे. त्याला हा आपला परका असला भेदच ठाऊक नाही असे त्याचे वात्सल्य महोदार आहे. त्याच्यासारखें हृदय, त्याच्या सारखें वात्सल्य, त्याचेच. म्हणून तो सुहृद्.
सुव्रत पासून सुरू झालेला सुकार इथे सुहृत् मध्ये संपला आहे. कोणतेंहि व्रतहि असेंच कायावाचा मनें त्रिशुद्धी आचरावयाचे आहे. इथे सुहृत् पदानें त्यांतील मनःपूर्वकता श्रद्धापूर्वकता अभिप्रेत आहे. सुघोषपदानें समंत्रता सुचविली आहे. आणि सुव्रतादि पदांनी सुतंत्रता उल्लेखिली आहे. जीवनाची ही अशी त्रिपथगा आहे. या श्लोकार्धात ती समग्र आली आहे.

४६१. मनोहर
"मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः" या श्लोकार्धात धीरोदात्त नायकाचे वर्णन आले आहे. परमात्मा हा पुरुषोत्तम आहे. आदर्श पुरुष आहे. त्याचे नाम-रूप मनोहर आहे. नाम श्रुतिहर, रूप नेत्रहर आणि तद्‌द्वारा तो मनोहर, रामाचें नाम श्रुतिसुभग, तसें रामाचे रूप नयनरम्य आहे. आणि या बरोबरच त्याचे शीलहि तसेंच मधुर आहे. तो जितक्रोध आहे. नाम रूप गुण शील सर्वच सुखद असल्याखेरीज त्याला मनोहर म्हणतां यावयाचें नाहीं. पण खरोखर एखादा पुरुष मनोहर आणि जितक्रोध म्हणजे गोरा गोमटा आणि गोड स्वभावाचा असला तर तेवढ्यानें का तो प्रिय आणि पूज्य होईल ? नाही. तिथे पराक्रमाचीहि अपेक्षा आहे. गोरीगोमटी आणि गोड स्वभावाची एखादी अबलाहि असू शकेल. म्हणून जितक्रोधाला जोडून वीरबाहु पद आले आहे. तो पराक्रमी असेल. दुर्वृत्तांचें शासन आणि धर्मनिष्ठांचें पालन करणारे त्याचे भुज असतील. आपल्या प्रजेंतील, समाजांतील दुर्जन-सज्जनांचे निग्रहानुग्रह करण्याचे सामर्थ्य हवेंच, पण तेवढ्यानें संपलें नाहीं परचक्र परतवून लावण्याचे, आक्रमण मोडून काढण्याचे, आक्रामक शक्ति फोडून टाकण्याचे आंतरराष्ट्रीय विदारक सामर्थ्य नि बळहि त्याला हवें. तरच तो पुरुषोत्तम ठरावयाचा. रामाच्या ठाईं हे समस्त होते. त्यानें आपल्या मधुर नामरूपगुणशीलानें स्वजनांना सुखविलें, भुजबळानें दुर्जनांना नमविलें आणि पराक्रमानें रावणासारख्या दुष्टांना नेस्तनाबूद केलें. आधुनिक काळांत गांधींनीहि असेंच केले आणि पुढेहि तो परमात्मा असेंच करीत राहणार. कारण त्याच्या अवताराचे हेच प्रयोजन आहे. तो जर असा सर्वोत्तम नसता तर सर्वांचे मन कसा हरण करूं शकला असता ? परमात्मा हा मनोहर आहे. कारण कोणत्याहि दृष्टीनें पहा त्यांत कोठलेंहि वैगुण्य आढळावयाचे नाही. त्याच्यांत सर्व सद्गुण एकवटले असून त्यांचें तो निधान आहे. नको तें अणुमात्र नाही, हवें तें परिपूर्ण आहे. म्हणून मनोहर.

४६२. जितक्रोध
क्रोध म्हणजे काय ? नुसतें रागावणे म्हणजे क्रोध नव्हे. क्रोध हा सर्व विकारांचा मूल विकार होय. विकार म्हणजे, चलन, स्वरूपापासून जे चळणे त्याचंच नांव क्रोध, त्याचंच नांव विकार. क्रोध शब्दापेक्षा कोपशब्द हा या अर्थाला अधिक जवळचा आहे. कुम् म्हणजे चळणे. वेदांत कुप् धातु चळणे या अर्थानें येतो. तिथे "चुकोप' म्हणजे चळला, ढळला, हलला असा अर्थ होतो, रागावला असा नव्हे. परंतु रागांत मनुष्य ताळ्यावर राहत नाही असे पाहून रागावण्यास कोप क्रोध हे शब्द रूढ झाले आहेत. तेव्हां जितक्रोध या शब्दाचा अर्थ होईल जो स्थितप्रज्ञ आहे, ज्याची आत्मनिष्ठा डगमगत नाही, असा निष्कंप आत्मबुद्धीचा पुरुष, असा पुरुष आपले सर्व व्यवहार विकारवश न होतां स्वाधीनपणे करतो आणि म्हणून तो अमोघवीर्य असतो. त्याचे वचन कधी वितथ व्हायचे नाही. त्यानें उचलेलें पाऊल कधी मागे हटायचे नाही. त्याचा मनोरथ मुक्कामाला पोचणारच. त्याचा क्रोध हा क्रोध नसतो तर तो त्याचा निश्चय असतो आणि म्हणून त्याला देवहि धाबरतात. 'कस्य बिभ्यति देवाश्च जात-रोषस्य संयुगे ?' 'नक्रः स्वस्थानमासाद्य गजेन्द्रमपि कर्षति' स्वस्थानाच्या आश्रयानें मगर हत्तीलाहि मात देतो. तसा जितक्रोध पुरुष आपल्या भूमिकेवर दृढ राहून, स्वस्थ राहून, जगाला जेर करतो. तो आपली आत्मनिष्ठा कधी सोडीत नाही. त्यामुळे तो ध्रुव असतो आणि जगाला त्याच्या भोवती फिरणे भाग पडते. सरळाला सरळ करता येत नाही. जें वांकडे असेल तेंच सरळ होणार.
परमात्मा हा नित्यशुद्ध-बुद्ध-मुक्त-स्वभाव असल्यामुळे सदैव जितक्रोधच आहे. जे त्याची उपासना करतात तेहि तसेच होतातः
न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभा मतिः ।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां पुरुषोत्तमे ॥


४६३. वीरबाहु
वीरौ पराक्रम-शालिनौ बाहू यस्य सः वीरबाहुः । ज्याचे भुजदंड पराक्रमशाली आहेत तो वीरबाहु होय.
वीर कोण ? जो 'घरच्यांवरी खाय दाढा, बाहेरी दीन बापुडा' तो ? नाही. जें जियें उचित तेंच जो करतो तो वीर होय. राम सीता-वियोगानें विह्वल होतो. कौटुम्बिक जीवनांत तो असा कुसुम-कोमल आहे परंतु रणांत ? रणांत तो शिलासंघात-कर्कश आहे. अर्थात् जिथे कोमलता हवी तिथे तो कमालीचा कोमल आहे आणि जिथे कठोरता हवी तिथे तो कमालीचा कठोर आहे. न्यायसभेत तो न्यायनिष्ठुर आहे. तिथे सीता त्याला पत्नी नाहीं, ती एक सर्व सामान्य प्रजाजन आहे, युरोपियन न्यायदेवता आंधळी आहे (कविसमया प्रमाणें) ती तोंड पाहून न्याय देत नाही. ती व्यक्ति-निरपेक्ष न्याय देते. पण भारतीय कविसमय असा नाही. भारतीय न्यायदेवता आंधळी नाहीं ती डोळसच आहे. पण ती समदृक् आहे. न्यायासनासमोर राजारंक सर्व सारखे. सर्व स्वकर्मफलभाक् आहेत. जसें कर्म तसें फळ. न्यायासन हे पाहत नाही की कर्म कोणी केलें. ते फक्त कर्म पाहते आणि कर्मानुसार फळ देतें. परमेश्वरी सत्ता आणि त्या सत्तेचे प्रतिनिधि राजे धर्मलंडांचा निग्रह आणि धर्मनिष्ठांचा अनुग्रह, करतात, म्हणून परमात्म्याला वीरबाहु म्हणावयाचे.
'बाहू राजन्यः कृतः' असें जें पुरुष-सूक्तांत आले आहे त्याचाहि आशय हाच. निग्रहानुग्रहाचे कार्य क्षत्रिय करतात. म्हणून ते परमात्म्याचे भुज होत. ब्राह्मण त्याचे मुख होत. कारण ते परमेश्वरी आज्ञा, वेद, बोलतात. वैश्य त्याचे उदर होत. कारण परमेश्वरी दयेचा ते संग्रह आणि विस्तार करतात. सर्वाना धनधान्य पुरवितात. शूद्र त्याचे पाद होत. कारण विश्वरूपाचे ते पाईक आहेत. जिथे सेवेची गरज तिथे ती ते पुरवीतच असतात. अशा प्रकारें परमात्माच चतुर्वर्णरूपानें अवतरला आहे. आणि म्हणून वीर म्हणजे क्षत्रिय आहेत बाहु ज्याचे तो परमात्मा वीरबाहु म्हणावयाचा.

४६४. विदारण
विदारयति इति विदारणः । जो कोंडी फोडून जातो तो विदारण म्हणजे कोंडीफोड्या होय. परमात्मतत्त्व हे अत्यंत स्वतंत्र वृत्तीचे तत्त्व आहे. ते कुठेहि गिरफदार होत नाहीं, कैद होत नाही. त्याला जिथे जिथे कोंडून पकडावें तिथून तिथून ते निसटलेंच म्हणून समजा. असें तें हातावर तुरी देणारे आहे. देहेन्द्रियमनोबुद्धि या कोणाच्याच पकडींत ते येत नाही. म्हणजे पकडीत न येणे हेच त्याचे लक्षण.
यस्यामतं तस्य मतं मतं यस्य न वेद सः ।
अविज्ञातं विजानतां विज्ञातमविजानताम् ॥

असें तें विलक्षण आहे. अत्यन्त सूक्ष्म वस्तु पकडतां येत नाही. तशी अत्यन्त विशाल वस्तुहि पकडतां येत नाही. परमात्म-तत्त्व हे तसेंच सुसूक्ष्म आहे तसेंच असीम आहे. ज्ञानदेवानें त्याची सुसूक्ष्मता आहे आणि असीमता उपमा-दृष्टांतांनी अशी वर्णिली आहेः
"मोतियाचे पाणी । भरूं न ये वो रांजणीं ।
गगनासी गवसणी । घालितां न ये ॥

पाणीदार मोत्याचे पाणी रांजणांत भरून ठेवतां येत नाही किंवा आकाश थैलीत भरून घेऊन जातां येत नाही. त्याची मोट बांधता येत नाही. सर्व कोंड्या फोडून पार होणारे तें अति पटाईत तत्त्व आहे. म्हणून त्याला विदारण- म्हणावयाचे.
विदारणाचा अवतार, प्रतिनिधि, त्याचा भक्तहि कोणाच्या कचाट्यांत सांपडत नाही. तो संस्था संघ संघटनें यांच्या जाळ्यांत सांपडत नाही. आपल्या आत्मबुद्धींत भक्कम तो कोणत्याहि प्रपंचांत पडत नाही. कोणाच्याहि भूलथात येत नाही. आपल्या आत्मबुद्धीच्या योगें सर्व कोंड्यांतून तो सही सलामत बाहेर पडतो. आदर्शभूत पुरुषोत्तम शत्रूच्या कोंड्या फोडून आणि जाळी तोडून पार होतो आणि आपल्या राष्ट्राचा, समाजाचा आणि मानवतेचा उद्धार करतो. तो मनोहर म्हणजे रूपवान्, जितक्रोध म्हणजे धीर बुद्धिमान्, वीरबाहू म्हणजे बलवान् आणि विदारण म्हणजे सर्व संकटांवर मात करणारा पराक्रमी परम पुरुषार्थवान् असतो.


स्वापनः स्ववशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् ।
वत्सरो वत्सलो वत्सी रत्‍नगर्भो धनेश्वरः ॥५०॥


४६५. स्वापन
स्वापन म्हणजे स्वाप वा झोप आणणारा. सर्व जीव जिच्या अधीन होऊन रोजच्या रोज श्रान्ति-परिहार पावून ताजे तवानें होतात त्या निद्रेला, ती तमोगुण कार्य असली तरी, वाईट कसें म्हणायचे ? ती सर्व जीवांना आपल्या अंकावर झोपविणारी जननीच होय. श्रम चिंता भय सर्व विसरून जीव तिथे विश्रान्त होतात आणि सुखावतात.
"यदग्रे चानुबन्धे च सुखं मोहनमात्मनः ।निद्रालस्यप्रमादोत्थं" म्हटले आहे खरे, पण त्याशिवाय जीवाचे चालणारे नाही. माणसाला एक दिवस जरी जागरण झाले तरी तो अस्वस्थ होतो. निद्रानाश हा रोग आहे, विकृति आहे. ज्याला रोज सुखानें झोपायला मिळतें त्याच्या सारखा भाग्यवान् तोच. तो आलस्य म्हणजे कर्मस्फूर्तीचा अभाव आणि प्रमाद म्हणजे जागृतीचा स्मृतीचा दक्षतेचा अभाव. पण हे दोष निद्रा नीट न झाल्यामुळे होतात, निद्रेमुळे नव्हे. म्हणून निद्रा हे मोठे वरदानच होय. तें दिव्य औषध आहे, अद्‌भुत रसायन आहे. जणूं सर्वेन्द्रियांना तिथून संजीवनच मिळते. हे संजीवन पुरविणारा जो परमात्मा तो म्हणूनच स्वापन म्हटला आहे. आलस्य आणि प्रमाद हे दोष आहेत तशी निद्रा नाहीं. निद्रा ही गरज आहे. ती पूर्ण झाल्यानंतर लगेच शय्यात्याग करून उत्साहानें कामाला न लागणे हा आळस आहे. कामाला लागल्यानंतर त्यांत यत्किंचित् अनवधान हा प्रमाद आहे. आळस आणि प्रमाद यांचा त्यागच विहित आहे. निद्रेचें यावदर्थ मित सेवन अनिषिद्ध आहे. झोप भूक तहान मैथुनेच्छा इत्यादि जन्ममृत्युजराव्याधींप्रमाणें देहस्थितीची अंगे आहेत. समूळ देहाचे निराकरण झाल्याखेरीज त्यांचे निराकरण होऊं शकत नाही. त्यांचे नियंत्रण नियमन तेवढे शक्य आहे आणि तें युक्तिपूर्वक करणेच इष्ट, ही युक्तिच पुढील स्ववशपदानें सुचविली आहे.

४६६. स्ववश
"कामात्मता न प्रशस्ता न चैवेहास्त्यकामता" कामात्मता इष्ट नाही आणि जीवाला अकामता जमत नाही. हे आहे जीवनाचे कोडें. आत्मा हा निरुपाधि असल्यामुळे आमचा आदर्श तो आहे. आदर्श देहनिरपेक्षच असायला पाहिजे. कारण तेंच परम सत्य आहे. परंतु जीवन तर देहसापेक्षच आहे. म्हणून देहाची उपेक्षाहि करता येत नाही. या दोहोंचा समन्वय धर्म करतो. तो आत्म्याचे आत्म्याला आणि देहाचे देहाला द्यायला सांगतो. आत्मा साध्य आहे. देह साधन आहे. 'या देहाचेनि साधनें सच्चिदानंद पदवी घेणे हे आपले कर्तव्य आहे, असें धर्म शिकवितो. देहधारणा तो पर्यंत आवश्यकच आहे, जोंवर चरम देहानें सगळे मागील पुढील जन्म छेदले नाहीत, सगळे देह समूळ काटले नाहीत, तोंवर देह हे साधन सांभाळले पाहिजे. त्यासाठी त्याची झोंप भूक तहान पाहिली पाहिजे. पण गरज भागवणे निराळे नि चोचले पुरविणे निराळे. पहिल्या प्रकाराला प्राणवृत्ति व दुसऱ्याला इंद्रिय-वृत्ति म्हणतात. धर्म प्राणवृत्तीनें जगायला सांगतो. इंद्रियवृत्तीचा निषेध करतो. "भुकेला कोंडा, निजेला धोंडा' ही म्हण प्राणवृत्तीची आहे. "भोजनी न युक्त त्याग किंवा राग । युक्त ती निःसंग कार्यदृष्टि' ही जीवनाच्या कोड्याची सोडवणूक आहे. स्ववशपदानें हेंच अभिप्रेत आहे. स्ववश कोण ? जो इंद्रियाधीन न होतां स्वाधीनपणे त्यांना राबवून घेतो तो स्ववश होय. गीतेच्या पुढील श्लोकांत त्याचेच वर्णन आले आहे.
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयान् इन्द्रियैश्चरन् ।
आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसाद अधिगच्छति ॥ गीता २ - ६४
यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्यारभतेऽर्जुन ।
कर्मेंन्द्रियैः कर्मयोगं असक्तः स विशिष्यते ॥ गीता ३ -७

हा जो विधेयात्मा, हा जो अनासक्त कर्मयोगी, तोच स्ववश होय. आणि गीतोक्त योग तो हाच. विदेह परमात्मा सहजच स्ववश आहे. परंतु त्याचा उपासक देहधारी असल्यामुळे त्याला तारेवरची कसरत करावी लागते. आत्मदर्शनासाठी जिजीविषा बाळगून जगायचे तर आहार घेणे भाग आहे. आहार घ्यावा तर त्यांत रागद्वेष शिरकाव करतात. तेव्हां रागद्वेषांच्या आहारी न जातां आहार घेणे हीच साधकाची युक्ति. ही युक्ति करीत असतां आत्मदर्शनाच्या उद्दिष्टाचा विसर पडू न देणे हीच त्याची भक्ति आणि युक्ति. भक्तीच्या संगतीची परिणति म्हणजे मुक्ति होय.-
"नाही देवापाशी मुक्तीचें गांठोडें । आणुनी निराळे द्यावें हातीं ।"

४६७. व्यापी
कार्याला कारण व्यापून असते म्हणून कारण हे व्यापी म्हणावयाचें. परमात्मा हा जगत्कारण असल्यामुळे तो जगद्व्यापी अथवा विश्वव्यापक म्हणावयाचा.
मया ततमिदं सर्वं जगद् अव्यक्तमूर्तिना । गीता ९- ४.१
न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् ॥ गीता ९ -५.१

कारणानें सगळी कार्ये व्यापून टाकलेली आहेत. म्हणून कार्य कारणांत भरली आहेत म्हणावयाचे. पण कारण कार्यांत भरले आहे. असे नाही म्हणतां यावयाचे. कारण, कारण हे कार्याहून मोठे असून कार्यापूर्वी आणि कार्यानंतरहि अस्तित्वांत असतें. त्या स्थितींत तें स्वस्थच असतें. परस्थ असू शकत नाही, कार्यस्थ असू शकत नाही. कारण, त्याचा तर अभावच असतो. यापुढे जाऊन म्हटले आहे, कार्ये,हि कारणस्थ नाहीत, कारण त्यांना कारणाहून मुळी वेगळे अस्तित्वच नाही. ज्यांना स्वतंत्र अस्तित्वच नाहीं तीं कार्य कारणांत असतात म्हणण्यांत काय अर्थ ? सताच्या ठाईं असत् भरलें आहे असें कसें म्हणता येईल ? 'एक सत् हेच पूर्ण वचन आहे. जें एकमेवाद्वितीय आहे ते दुसऱ्याच्या ठाईं व्यापून आहे अथवा दुसरें त्याच्या ठाईं भरलें आहे असे म्हणणे म्हणजे दुसऱ्याचे अस्तित्व मान्य करणेच होय. तें दुसऱ्याच्या ठाईं नाही हे म्हणणेहि तेच होय. सारांश, दुसऱ्याचा संपर्क, दुसऱ्याची छाया, दुसऱ्याचे नांवहि त्या परमात्म्याला सहन होणारे नाही. असा तो असहिष्णु आहे. एकमेवाद्वितीय. परंतु तारतम्यानें बोलावयाचे झाल्यास कारण म्हणून तो व्यापी म्हटला आहे. गीतेच्या वरील त्रिपदींतील हेच ते पहिले पद होय. (१) मी सर्व भूतांना गुंडाळून बसलों आहे. (२) भूते मला गुंडाळून बसलेली नाहीत (३) मीहि भूतांन गुंडाळून बसलेलों नाही. पहिली दोन पदें कार्यभाव मान्य करून तारतम्यवाचक आहेत. शेवटलें तिसरे पद कार्यकारण, भावाचे द्वैत अमान्य करून केवलत्व-वाचक आहे.

४६८. नैकात्मा
नैकात्मा म्हणजे नैकस्वरूप. परमात्मा केवलस्वरूप म्हटला म्हणजे मग जें हें विचित्र जग दिसतें तें काय आहे म्हणून म्हणावयाचें ? तेहि परमात्मस्वरूपच जर आहे, तर उघडच तो परमात्मा नैकात्मा झाला. मागील व्यापी पदानें तो कारण-स्वरूप असल्याचे म्हटलें तर इथे नैकात्मा पदानें तो कार्यरूपहि आहे असें म्हटले आहे. कारण एक असते, कार्ये अनेक असतात, कार्य आणि कारण दोन्ही मिळून तो परमात्मा नैकात्मा होतो. घट आणि मृत्तिका दोन्ही एकच आहे म्हणाल तर आमचा घट देऊन टाका आणि आपली मृत्तिका घेऊन जा भरा पाणी ! पण तें शक्य नाही म्हणून नैकात्मता मानणे भागच आहे.
ब्रह्मा म्हणून तो सृष्टीची उत्पत्ति करतो, विष्णु म्हणून तो तिचे पालन करतो, महेश म्हणून तो तिचा लय करतो आणि गुणातीत होऊन स्वस्थ होतो. आणि म्हणून तो म्हणावयाचा नैकात्मा.
सृष्टीच्या वैविध्यामुळे आणि तदतीततेमुळे स्रष्टा नैकात्मा झाला तसा हा समाज-पुरुषहि कार्थभेदानें नैकात्मा झाला आहे. ज्ञानोपासनेसाठी तो ब्राह्मण, प्रजापालनासाठी क्षत्रिय, धनोपार्जनासाठी वैश्य आणि सेवाचाकरीसाठी तो शूद्र झाला आहे. समाजपुरुषाप्रमाणें व्यक्तिहि विकासावस्थाभेदानें नैकात्मा आहे. ती विद्याध्ययनासाठी ब्रह्मचारी, प्रजोत्पादनासाठी गृहस्थ, तपस्येसाठी वनस्थ आणि देहाभिमानमुक्तीसाठी संन्यासी होत असल्यामुळे नैकात्मा आहे.
जीवात्मा पूतात्मा परमात्मा अशीहि आत्म्याची नैकात्मता उघडच आहे. देहाद्यभिमानी जीव जीवात्मा होय, अनहंवादी वा सोऽहंवादी जीव पूतात्या होय आणि नित्य शुद्ध बुद्ध मुक्त-स्वभाव निरुपाधिक आत्मा परमात्मा होय. नामदेवानें 'जीव विठ्ठल आत्मा विठ्ठल परमात्मा विठ्ठल विठ्ठल' या अभंगात ही नैकात्मता च उल्लेखिली आहे. अशा प्रकारें नैकधा नैकात्मता दिसून येते.

४६९. नैककर्मकृत्
परमात्मा हा सर्वात्मक असल्यामुळे तो सर्वविध कर्म करणारा आहे. एकच वा एकविधच कर्म तो करीत नाही. म्हणून तो नैककर्मकृत् म्हटला आहे. नैककर्मकृत् म्हणजे सर्व-कर्म-कृत् समजावयाचे. सर्व कर्म गुणानुसार त्रिधा-विभागले जाते. राजस सात्त्विक तामस.रजसुपाधिक चेतना कडून होणाऱ्या कर्ममात्राला विश्वोत्पति, सत्त्वोपाधिक चेतनाकडून होणाऱ्या कर्ममात्राला विश्वपालन आणि तमसुपाधिक चेतना कडून होणाऱ्या कर्ममात्राला विश्वसंहार अशा वैश्विक संज्ञा आहेत आणि तत्तद्गुणोपाधिक चेतनाला ब्रह्मा विष्णु महेश. गुणोपाधि घेऊन नैकात्मा झालेला तो चेतन नैककर्में करतो. तोच त्रिगुणातीत चेतन प्रपंचोपशम शान्त शिव अद्वैत चतुर्थ म्हटला जातो आणि चतुर्मूर्ति म्हणून त्याचे वर्णन होतेंः
बहलरजसे विश्वोत्पतौ भवाय नमोनमः
प्रबलतमसे तत्संहारे हराय नमोनमः ।
जनसुखकृते सत्त्वोद्रिक्तौ मृडाय नमोनमः ।
प्रमहसि पदे निस्वैगुण्ये शिवाय नमोनमः ॥

परमात्मा हा असा नैकात्मा आणि नैककर्मकृत् असल्यामुळे विश्वात्मभावानें तो म्हणू शकतो "बहूनि मे अकृता कृतानि "तस्य मे तत्र न लोम च नामीयत । " कौषीतिक ३.१ करूं न नयेत अशाहि बहुत गोष्टी मी केल्या आहेत पण माझा बालहि वांकडा होत नाही. सर्वकर्तृत्व आणि वस्तुतः तदतीतत्व दोन्ही त्यांत एकसाथ प्रतिपादिले आहे. परमात्म्याची सर्वाधारता आणि निरुपाधिक केवलता लक्षून असें परस्पर विरुद्ध प्रतिपादन व्यवस्थितच होय. परमात्म्याला तुम्ही एकात्मा म्हणा की नैकात्मा म्हणा, तो एकदेशी होऊं शकत नाही. आणि म्हणून तो नैकात्मा नैककर्मकृत् इत्यादि म्हटला आहे.
'स्वापनः स्ववशो व्यापी' हा चरण स्वतंत्र आहे 'नैकात्मा नैककर्म कृत् हा स्वतंत्र. कुठे चरण, कुठे श्लोकार्ध, कुठे श्लोक, कुठे युग्मक, कुठे कुलक अशी हस्वदीर्घ संगति वा सूत्र विवक्षेनुसार आढळून येतें. जिथे अशी संगति नसेल तिथे, प्रत्येक पद स्वतंत्र आहेच. संगतिसूत्रांतहि प्रत्येक पदाचें स्वातंत्र्य अबाधित आहेच 'सूत्रे मुक्तामणेरिव.'

४७०. वत्सर (१) वत्स-र, (२) वत्-सर
"वत्सरो वत्सलो वत्सी" हा चरण वत्स-केन्द्रित आहे. क्रमशः र, ल आणि इन् प्रत्यय लागून वत्सर वत्सल आणि वत्सी हे शब्द बनले आहेत, आणि त्याप्रकारे ते समानार्थक दिसतात. तथापि रूढार्थानें ते भिन्न आहेत. वत्सर म्हणजे वर्ष, वत्सल म्हणजे अपत्य-सदय आणि वत्सी म्हणजे वत्सवान्, वत्सप. ' वत्सर हा शब्द वत्स+र असा अथवा वत्+सर असाहि लावता येईल. प्रतिवर्ष नवें पीक घरांत गोठ्यांत शेतांत रानांत येत असते, त्यामुळे वर्ष हे 'वत्सान् राति ददाति इति वत्सरः' अशा व्युत्पत्तीनें वत्सर म्हटले गेल्यास काय नवल ? काल-स्वरूप परमात्मा च प्रतिवर्ष पाऊस पीक प्रजा देत असतो. त्यामुळे तो वत्स-र होय. प्रत्येक जीवाच्या दृष्टीनें त्याचा वंश हा सर्वांत महत्त्वाचा विषय आहे. वंशकर पुत्र नसेल तर त्याची तारी धनदौलत राज्यवैभव त्याला निरर्थक वाटते. तें सारें लावारिश होणार. म्हणून आमचे सर्वस्व पुत्र आहे. तद्द्वारा आम्ही संतत राहतो आणि या समस्त मिळकतीचे मालक होतो. असें हे सर्वस्वरूप संतान देणारा परमात्मा म्हणून वत्सर होय. वत्सर म्हणजे वर्ष हे यथावत् सरत असते म्हणून तें वत्सर म्हणावयाचें. आधीं पावसाळा येतो, मग येतो हिवाळा, नंतर उन्हाळा येतो आणि परत पुनः पावसाळा,हिवाळा, उन्हाळा. हे कालचक्र असेंच वर्षानुवर्षे युगानुयुगें सतत चालत राहते म्हणून तो कालात्मा परमात्मा वत्सर होय. वत्सर हे सामान्य वर्ष होय. संवत्सर आणि परिवत्सर ही विशिष्ट वर्षे होत. चांद्र बारा मास अथवा ३६० दिवसांचें वर्ष म्हणजे वत्सर, सौर बारा मास अथवा ३६५ दिवसांचें वर्ष म्हणजे संवत्सर आणि नाक्षत्र बारा मास उर्फ तीनशें सहासष्ट दिवसांचें वर्ष म्हणजे परिवत्सर होय.

४७१. वत्सल
वत्स घरी असते आणि गाय रानांत चरायला जाते. वत्साला भरपूर दूध पाजायला यावे म्हणून ती कोंवळे लुसलुशीत गवत आणि अग्रअग्रे खात असते. जातांना खातांना म्हणजे दोन्ही अर्थांनी चरतांना तिला सतत वत्साचें ध्यान असते. तिच्या दृष्टीसमोर सतत तें वत्स असते. त्याच्या स्मरणानें सायंकाळी ती घरी परततांना धांवत असते आणि तिला आपला पान्हा आवरत नाही. तिच्या स्तनांतून दूध गळू लागते. त्याची धार लागते. धावत हंबरत येऊन जेव्हां ती वत्साला चाटते त्याला पाजते तेव्हांच तिला चैन पडते. अशा अपत्यप्रेमाला म्हणतात वत्सलता. परमात्मा हा असा वत्सल आहे. 'वत्सं लाति आददाति इति वत्सलः । ' वत्साला अपत्याला घेतो कुरवाळतो म्हणून वत्सल. प्रत्येकाला आपल्या विषयी जे प्रेम वाटते तसे ते दुसऱ्या कोणाला वाटू शकत नाही. असें उकारण अनिवार प्रत्येकावर प्रेम करणारा सर्वांचा प्रत्यगात्मभूत परमात्मा हा वत्सल नाहीं म्हणायचा तर काय म्हणायचा ? त्याच्याहून अधिक वत्सल कोण आहे ? सर्व नाती प्रेमाची असली तरी ती अकारण नाहींत. तुम्ही माझे कोणी असाल तर तुमच्या विषयी मला प्रेम वाटेल. सर्व प्रेमाच्या नात्यांत मायलेकरांचे प्रेम सर्वोपरि मानिले जाते. तिथे प्रेमाला दुसरें कांहीं कारण लागत नाही. हा माझा पुत्र आहे, ही माझी आई आहे एवढेच कारण त्या प्रेमाला पुरेसे आहे. नाम रूप गुण कर्म कशाचीहि अपेक्षा तिथे नाही. इतर नात्यांत तसे नाही. म्हणून ती नाती कनिष्ठ होत. परंतु मायलेकरांच्या नात्याहूनहि परमात्म्याचे नातें आगळे आहे. तिथे जन्माचा, रक्ताचाहि संबंध नाही. परमात्मा तुमची माता नाहीं, परमात्मा तुमचा पुत्र नाही, तर तो तुमचा निजात्मा आहे. तोच तुम्ही आहां, 'तत् त्वं असि'. त्याहूनहि अधिक निकट, अंतरतर दुसरे काहीं असूं शकत नाही. दुसरें अधिक प्रिय आणि प्रेमळ असू शकत नाही. म्हणून परमात्मा हा निरतिशय वत्सल होय. त्याला वत्सल म्हणणेहि गौणच. पण गाईच्या वत्सलतेहून अधिक वत्सलता आम्हांला आढळत नाही. म्हणून आम्ही परमात्म्याला वत्सल म्हणून संबोधितों इतकेंच.

४७२. वत्सी
वत्सी म्हणजे वत्सवान्, ज्याला संतान आहे तो. जगांत सर्व वस्तूंचे निःसंतान होईल पण परमात्म्याचे कधी व्हायचे नाही. तो सनातन आहे, त्याची संतति आत्मरूपानें कधीच कुंठित होत नाही. म्हणून त्याला वत्सी म्हणावयाचे.
दुसऱ्याहि अर्थानें तो वत्सी आहेच. धर्मरूप तो वृष असून या गोरूपधारी पृथ्वीचा तो पति आहे. अर्थात् पृथ्वीवर जे सारे जीव आहेत, आणि मुख्यतः मानव, ते' सर्व त्याची प्रजा म्हणजे वत्सच होत.
कृष्णावतारांत भगवान् वत्सप होता, बालपणीं वासरांचा कळपच तो राखीत असे म्हणूनहि तो वत्सी म्हणावयाचा.
भगवान् विष्णु श्रीवत्स-लाञ्छन म्हणून प्रसिद्धच आहे. तेव्हां त्याहि अर्थानं तो वत्सी म्हटला जाईल
"नहि वंध्या विजानाति गुर्वी प्रसववेदनाम्" या न्यायानें ज्याला वत्स नाहीं, अपत्य नाहीं तो वात्सल्य काय जाणणार ? पण परमात्मा हा तसा नाही. त्याला असंख्य वत्स आहेत आणि त्या सर्वांवर त्याची समान माया आहे. आणि म्हणून तो वत्सी होय, प्रजावान् होय. श्रुतीनें म्हटले आहे. "मातृमान् पितृमान् आचार्यवान् वेद" ज्याला आई आहे, बाप आहे, गुरु आहे त्यालाच संस्कार लाभत असतात आणि अशा संस्कृत जीवालाच ज्ञान लाभत असते. निगुन्याला नव्हे. परंतु वत्सी शब्द असे सांगत आहे की ज्याला पुत्र पुत्री आहेत छात्र छात्रा आहेत त्यालाच वात्सल्य काय आहे हे कळत असते आणि अशा वात्सल्यवान् पुरुषालाच कृतार्थता लाभत असते. वत्सी अपत्यवान् पुरुषांनाच प्रजामृतत्व लाभत असते. निपुत्रिकांना तें अमृतत्व लाभत नाही. ते अलब्ध-पिंडोदक अकीर्तिमान् जणूं देहाबरोबरच भस्मीभूत होतात. त्यांचे नांवनिशाण राहत नाही. परमात्म्याची सृष्टि जीवजगत् आहे तोवर परमात्म्याचे नाम प्रत्यहीं घेतले जाणार. म्हणून तो वत्सी.

४७३. रत्नगर्भ
प्रस्तुत श्लोकांत प्रत्येक चरण स्वतंत्र सूत्राचा आला आहे. 'स्वापनः स्ववशो व्यापी । नैकात्मा नैककर्मकृत् । वत्सरो वत्सलो वत्सी । ' हे तीन चरण आपण पाहिले. आतां चौथा चरण पहावयाचा आहे. 'रत्नगर्भो धनेश्वरः । ' या चरणांत रत्न आणि धन हे शब्द समानार्थकच समजावयाचे आहेत. आणि त्यामुळे ही दोन्ही पदें परस्पर-पूरक झाली आहेत. मुक्ता प्रवाळ कौस्तुभा सारखी रत्नें समुद्रांतून निघाली आहेत. सुवर्ण रजतहिरे माणकें डोंगर खाणींतून आली आहेत. म्हणजे कांहीं जलज कांहीं भूमिज अशी ही रले आहेत. आकाश वायु अग्नि यांच्यातून आम्हांला अशी रत्नें मिळत नाहींत. ती फक्त जल आणि भूमि या दोनच महाभूतांतून मिळतात. रत्नगर्भ पदानें रत्नाकर समुद्राचा आणि धनेश्वर पदानें मुख्यतः हेमगिरि मेरूचा संकेत केला आहे. दोन्ही भगवद्-विभूतिच आहेत. 'सरसां अस्मि सागरः । ' 'मेरुः शिखरिणां अहम् । ' असा गीतेत त्यांचा निर्देश आला आहे. धान्य पशु यांची पैदास माणूस करतो. परंतु सोनें रुपें हिरे माणके यांची पैदास माणसाला करता येत नाही. ती ईश्वरी सृष्टि आहे. म्हणून परमात्मा हा रत्नगर्भ म्हणावयाचा. रत्नादि त्याचे गर्भ होत. त्याच्यापासूनच त्यांची पैदास होते. रत्‍नें ही मौल्यवान् आहेत, कारण ती दुर्मिळ आहेत, अविनाशी आहेत. इतर वस्तु कुजतात, नाश पावतात, परंतु हिरा हा लक्षावधि वर्षे जसाचा तसा राहतो.. अच्छेद्योऽयं अदाह्योऽयं अक्लेद्योऽशोष्य एवच ।
नित्यः सर्वगतः स्थाणुः अचलोऽयं सनातनः ॥ गीता २- २४

ही आत्म-लक्षणे त्याला काही अंशी लागू पडतात.

४७४. धनेश्वर
"भौमं दिव्यं चान्तरिक्षं वित्तं अच्युतनिर्मितम्" जें सगळे धन आहे भूमिगत अन्तरिक्षगत वा आकाशगत ते सगळे ईश्वरनिर्मित आहे. आणि म्हणून परमात्मा हा धनेश्वर होय. धनाची काय व्याख्या आहे ? जें जीवनोपकारक तें धन, या व्याख्येप्रमाणें ज्याला सामान्यतः धन म्हणतात ते बहुमूल्य पाषाणखंड आणि कृमिनिष्ठीवनरूप प्रवालमुक्तादि जलज द्रव्य आणि हेमरजतादि चकचकीत मृत्पिड खरोखर धन नसून निधन होत आणि यांनाच अनुलक्षून शंकराचार्य "अर्थमनर्थं भावय नित्यम्" म्हणून उपदेशितात. हा उपदेश इतर कोणी ऐको वा न ऐको, इसापाचा कोंबडा मात्र बरोबर ऐकतो. तो उकिरड्यावर पडलेल्या रत्नाला लाथाडतो आणि धान्याचा कण तेवढा टिपून घेतो. शंकराचार्य कूकूटमंत्रच मानवाला. समजावून सांगत आहेत. रत्नादिकांच्या नि सोन्याचांदीच्या मागे लागून मानवानें जीवन विकृत व क्षीण करून टाकले आहे.हिरकणी खाऊन जीव जातो तर दाण्याची कणी खाऊन जीव जगतो. त्यामुळे अगदी अक्षरार्थानेहि अर्थ हा अनर्थ कसा आहे तें लक्षांत यावें. सूर्यप्रकाशहि दिव्य धन होय, वर्षा हे आन्तरिक्ष धन होय आणि सर्वविध अन्न हे भौम धन होय. आणि या सगळ्या धनाचा स्वामी तो परमात्मा आहे. कारण सर्व जीवन आणि जीवनोपकारक सर्व त्याच्याच पासून उत्पन्न झालेले असून तोच त्यांचा स्वामी आहे.
वित्तेशो यक्षरक्षसाम्' म्हणून कुबेर हा भगवद्विभूति मानला आहे. कोषाध्यक्ष आहे तो. सर्व नव निधि त्याच्या अधीन आहेत. पण धनसंग्रहामुळे त्याचेहि जीवन विकृत झाले आहे. तो कु-बेर बनला आहे. ' कु कुत्सितं बेरं शरीरं यस्य सः कुबेरः ' अशी आहे कुबेराची व्युत्पत्ति. हे असलें सर्व धन कुबेराला समर्पण करून मानवानें यक्षराक्षसांच्या धन-तृष्णा आणि भोगासक्ति यांच्या तावडीतून आपली सुटका करून घ्यावी.




॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP