ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

अप्रमेयो हृषीकेशः पद्मनाभोऽमरप्रभुः ।
विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठः स्थविरो ध्रुवः ॥६॥


४६. अप्रमेय
ज्ञान होणे म्हणजे ज्ञेय विषयाचे माप होणेच होय. माप होणे म्हणजे सीमित होणे, परिमित होणे. जें सीमित आणि परिमित असतें तें सादि आणि सांत असते. परमात्मा हा असा नाही. तो अप्रमेय आहे. ज्ञान-विषय म्हणून त्याचे ज्ञान होऊ शकत नाही. कारण तो ज्ञाता आहे. आपल्याला जें ज्ञान होतें तें दिककाल आणि निमित्त यांनी बद्ध अशा विषयांचेंच आणि त्याच मर्यादांच्या रूपांत होते. वस्तु-स्वरूपाचें ज्ञान आपल्याला होत नाही. कारण ती वस्तु स्वतः ज्ञाताच असतो आणि म्हणून तो अप्रमेय म्हटला आहे.

परमात्मा अप्रमेय म्हगजे लौकिक प्रमाणांनी मापला न जाणारा आहे, एवढाच अर्थ घ्यावयाचा. तो जर खरोखरच अज्ञेय असता तर, तो आहे असें तरी कसे म्हणतां आलें असतें ? आणि ज्याअर्थी, तो आहे असें म्हटले जाते, त्याअर्थी तो अज्ञेय कसा ? तेव्हां अज्ञेय वा अप्रमेय याचा अर्थ एवढाच की तो स्वानुभूतीलाच ज्ञेय आहे. अन्य प्रमाणांनी ज्ञेय नाहीं, प्रमेय नाहीं. तो केवल स्वसंवेद्य आहे. स्वानुभव हेच एकमेव त्याचे प्रमाण होय.

ज्ञान हें ज्ञातृ-ज्ञेयविभागात्मक आहे. अनुभव हा विगलित-वेद्यान्तर ज्ञप्तिरूप आहे. ज्ञान ही विभक्ति आहे, अनुभव ही भक्ति आहे. म्हणूनच म्हटलें आहे गीतेत:

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन |
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ॥ गीता ११- ५४

४७. हृषीकेश
हृषीक म्हणजे इंद्रियें. इंद्रियांत मन हे आभ्यंतर इंद्रिय आणि बाह्य पंचेंद्रिये असा विभाग होतो. इष्ट विषयांच्या संनिकर्षाने इंद्रिये आणि मन हर्षित होतात. त्यामुळे त्यांना हृषीक म्हटले आहे, पण जो हर्ष पावतो, तो खेदहि पावतोच. हा इंद्रियांचा स्वभावच आहे. म्हणूनच गीतेत म्हटले आहे :

इन्द्रियस्येन्द्रियस्यायें रागद्वेषौ व्यवस्थितौ ।
तयोर्न वशमागच्छेत्तौ ह्यस्य परिपन्थिनौ ॥ गीता ३ - ३४

अशा या इन्द्रियांवर जो स्वामित्व, प्रभुत्व करतो, तो हृषीकेश होय, या जगांत खरोखर हृषीकेश कोण आहे ? कोण आपल्या इन्द्रियांवर व मनावर पूर्ण स्वामित्व मिळवू शकला आहे ? कोणाची इन्द्रिये आणि मन पूर्ण स्वाधीन आहेत ? सर्व देहधारी जीव इन्द्रियांच्या आणि मनाच्या अधीन होऊन जगत आहेत. एक परमात्माच इन्द्रियांचा व मनाचा स्वामी आहे. म्हणून तोच एकमेव हषीकेश आहे. गीतेंत स्थितप्रज्ञाच्या लक्षणांत "वशे हि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता" हा मुद्दा वारंवार आला आहे. घोळून घोळून प्रतिपादिला आहे. हृषीकेशच स्थितप्रज्ञ होऊ शकतो. म्हणून हृषीकेश हें भगवंताचें आगळे आणि आवडतें नांव आहे. गुडाकेश बाणि हृषीकेश ही दोन आगळी नामें गीतेंत आणि अन्यत्रहि आली आहेत. पैकी गुडाकेश म्हणजे जित-निंद्र आणि हृषीकेश म्हणजे जितेन्द्रिय, दोन्ही मिळून रजस्तमांचा पगडा आपल्यावर बसूं न देणारा नित्य-जागृत आत्मवान् पुरुष असा अर्थ निष्पन्न होतो.

४८. पद्मनाभ
आगचे पूर्वज ऋषि-मुनि कवि म्हणजे क्रान्तदर्शी होते. त्यांनी तें आपलें क्रांतदर्शन आपल्या शब्दांत व कृतींत सूचित केलें आहे, ग्रथित केले आहे. ज्ञानदेवांनी - " वाचे बरखें कवित्व | कवित्वीं बरवें रसिकत्व । रसिकत्वी परतत्त्व | स्पर्श जैसा ||" ह्या ओवीत ज्या परतत्त्वाचा उल्लेख केला आहे ते परतत्त्व त्यांच्या जीवनांत भरून राहिले होते आणि म्हणून त्याचा स्पर्श, त्याचा ठसा ते जे चिंतीत, बोलत वा करीत त्यावर उमटे. ' पद्मनाभ ' सारखे शब्द त्याचे उदाहरण होत.

कमलकंद हा जलाशयाच्या तळाशी अदृश्य असतो, त्यांतून कमलनाल उगवून वर येते आणि त्यावर कमल फुलते. त्याप्रमाणे अव्यक्ताच्या तळाशी तदाधारभूत सुगुप्त अक्षर परमात्म्यापासून हे व्यक्त लोकपद्म उत्पन्न झाले आहे. म्हणून त्या परमात्म्याला पद्मनाभ म्हटलें आहे. ह्या लोकपद्मातून जो त्यावर विराजमान तो पद्मसंभव (ब्रह्मा) म्हणून प्रसिद्ध आहे. तोच या व्यक्त विश्वाचा अधिष्ठाता होय. त्यांच्याचपासून ही सारी चराचर सृष्टि निर्माण झाली. म्हणून या सर्गाला ब्राह्म सर्ग असे म्हणतात. ह्या सगाँत स्वतः ब्रह्मदेवाचा समावेश होत नाही, म्हणून तो स्वयंभू म्हटला गेला आहे. पद्मनाभ, पद्म, पद्मसंभव आणि पाद्म सर्ग इत्यादि प्रयोग हे एका तत्त्वदर्शनाचें निदर्शन होय. अशा तत्त्वदर्शी कवींनाच " पदवी " म्हणून वेदांनी गौरविलें आहे. त्यांनीच देवाची नाना ध्याने तत्त्वार्थ लक्षुन कल्पिली आहेत.

४९.अमरप्रभु
अमर म्हणजे मृत्युरहित असे देव. देवांना मृत्यु का नाही ? कारण ते सद्रूप आहेत. सन्-निष्ठ आहेत. जो सद्रूप झाला, सनिष्ठ झाला, तो मृत्यूंतून सुटला. अंधार हा अभावरूप आहे, असद्प आहे. अंधार म्हणून कांहीं वस्तु नाही. तो एक वस्तुशून्य विकल्प आहे. अंधार म्हणजे अप्रकाश. प्रकाशाची अल्पता वा शून्यता म्हणजेच अंधार. जी वस्तु नाही ती कशी प्रकाशणार, प्रकटणार ? देव प्रकाशमान आहेत. कारण ते सद्रूप आहेत. असुर मायावी आणि अदृश्य आहेत. कारण ते असद्प आहेत.

सत्य हे परमेश्वर होय, त्याचे नाना आविष्कार म्हणजे अंश, देव होत, अंशांचा स्वामी तो अंशी. ज्याअर्थी परमेश्वर हा अंशी आहे त्याअर्थी तो अंशरूप सर्व देवांचा-सर्व विभूतींचा आणि अवतारांचा प्रभु म्हटला आहे. जो प्रभु असतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या अधीनांकडून हवे तसे काम घेतो. परमेश्वरहि त्याप्रमाणे आपल्या किरणांना केव्हां पसरतो, केव्हां गुंडाळून घेतो. तो आपले किरण पसरतो तेव्हां सर्ग होतो. किरण गुंडाळून घेतो तेव्हां प्रलय होतो. ईश्वराचे हे प्रभुत्व जे ओळखतात ते भक्त "सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलये न व्यथन्ति च" "जगें येवोत जावोत ते अभंग जसे तसे |" अर्थात् अमरप्रभुची-सद्रूपाची जे भक्ति करतात तेच अमर होतात.

५०. विश्वकर्मा
मनुष्याची ओळख त्याचें नाम, रूप, गुण आणि कर्म ह्यांवरून होत असते. परमेश्वराचीहि ओळख आम्हांला त्याच्या नाम-रूप-गुण-कर्मावरूनच होणार. परमेश्वराचे कर्म कोणते ? कर्मातच त्याचे गुणहि प्रकट होत असतात. त्यावरूनच आपल्याला त्याचा परिचय हावयाचा. परमेश्वराचे कर्म लहान सहान नसणारच, हे सारे विश्व, ज्याचा थांगपत्ता अद्याप कोणाला लागलेला नाही असें हें आश्चर्यमय विश्व, परमेश्वराची कृति आहे. त्यावरूनच त्याचे जात, त्याचे सामर्थ्य आणि त्याचे असंगत्व इत्यादि गुण आपण ओळखायला लागतो. त्याच्या त्या कर्मावरुन आणि त्यांत प्रकटलेल्या त्याच्या गुणाधिगुणांवरून आपण त्याचे नामकरण करतो आणि त्याच्या रूपाचीहि कल्पना करतो आणि विनम्र होऊन म्हणतों

नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये
सहस्रपादाक्षिशिरोरुवाहवे ।
सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते
सहस्रकोटीयुगधारिणे नमः ॥

आणि असे म्हणून परत विनम्र होतो.
विश्वकर्मा म्हणजे हे सारे विश्व ज्याचे कर्म आहे तो, त्याच प्रमाणे विश्व म्हणजे सर्व कांहीं ज्यांचे कर्म आहे तो असाहि अर्थ घ्यावयाचा, पा विश्वांत आणि याच्या बाहेर जे काही होते तें सारे तोच करतो. कारण, तोच एक कर्ता आहे आणि बाकीचे सारे कार्य आहे.

५१. मनु
मनु म्हणजे मनन करणारा. आपण निर्माण केलेलें हे चराचर विश्व पाहून त्याचे जीवन कृतार्थ कसें होईल, याचे मनन चिंतन करणारा तो मनु. लोककल्याणाचे मनन करून लोकांना त्याने आदेश दिला : "मा विजानीहि । एतदेव अहं मनुष्याय हिततमं मन्ये । " हाच वेद, यांतूनच सारे विधिनिषेध निर्माण झाले. सारी शास्त्रे आणि वर्णाधमादि धर्म यांतूनच निर्माण झाले. हे फार फार प्राचीन काळी होऊन गेले. त्याची जी स्मृति उरली आणि प्रमादशील मानवाने ती जी आपल्या मोडक्या तोडक्या भाषेत ग्रपित केली, तीच आज़ उपलब्ध असलेली मनुस्मृति म्हणावयाची.

ब्रह्मा, प्रजापति, मनु इत्यादि जे पदाधिकारी आहेत, ते सारे आपण वेगवेगळे मानतो. परंतु ही सारी पावणे आणि भगवत्नामेच होत. भगवंतच विश्वरूप कर्माच्या संपादनासाठी विविध अहंकार, विविध उपकरणे, विविध क्रिया होऊन आपली कर्मसिद्धि आणि समृदि संपादित आहे. हाच त्याचा विभूतियोग होय.

५२. त्वष्टा
त्वष्टा म्हणजे तासणारा. सुतार तासून तासून नाना बाहुल्या बनवतो. एकीला राजा, एकीला रंक, एकीला विद्वान्, एकीला मूर्ख, एकीला स्त्री, एकीला पुरुष अशी विविध रूपे आणि नामें तो देतो. त्या प्रमाणे परमेश्वराने हे वैचित्र्यपूर्ण विश्व रचिलें आहे, या वैचित्र्यपूर्ण विश्वांत वैचित्र्य वस्तुतः नामरूपांचेच आहे. सर्वांचें उपादान आणि निमित्त कारण एकच आहे, परमात्माच आहे. एकाच शिलोच्चयांतून शिल्पकार ज्याप्रमाणे नाना आकार टाकीच्या योगें निर्माण करतो त्याप्रमाणे परमेश्वराने हें विश्व निर्माण केले आहे. संकल्प ही त्याची टाकी आहे आणि नामरूपात्मक हें जगत् त्याची अद्भुत शिल्पाकृति आहे.

कलाकार आपली कलाकृति चिरंतन हावी म्हणून कलेचे माध्यम स्थायी स्वरूपाचे निवडतो. कागद, लाकूड, माती, दगड, धातु ही उत्तरोत्तर स्थायी अशी माध्यमें आहेत. त्यांतून तयार केलेल्या कलाकृति या न्यूनाधिक स्थायी स्वरूपाच्या होतात. परंतू परमेश्वराने हे विश्व ज्या माध्यमांत तयार केले आहे

तें माध्यम स्वतः ईश्वरच असल्यामुळे ही ईश्वरी कलाकति सनातन झाली आहे. परमेश्वराच्या ज्ञानाला, कलेला, सामर्थ्याला तुलना नसल्यामुळे त्याची कलाकृतिहि तशीच अनुपम उतरली आहे. अनन्वयासकाराचे तें भव्य दिव्य उदाहरणच होय,

५३. स्थविष्ठ स्थविष्ठ म्हणजे अत्यन्त स्थूल. परमेश्वराहून अधिक विशाल, लांब, रुंद, उंच दुसरे काय आहे ? हे सर्वाश्चर्यमय विश्व, ज्याचा थांगपत्ता अद्याप कोणाला लागलेला नाही, तेच ज्याचे रूप आहे, देह आहे, त्याच्या स्थूलतेशी दुसऱ्या कशाची तुलना करता येईल ? "महतो महीयान् "मोठमोठ्यांहूनहि ते मोठे आहे. आकाश सर्वांत मोठे दिसते, पण अशा आकाशाचा विस्तार ज्याच्या एका कोपऱ्यांत बसतो ते किती मोठे म्हणावें ? विश्वाहून स्थूल दुसरे काय म्हणता येईल ?
स्थविष्ठ पदानें विश्वाची दिग्रुप विशालता दाखविली. खाली वर, आजूबाजूस कुठेहि पहा, त्याचा विस्तार अनंत आहे. खोल पाहूं लागला तर त्याहि दिशेने त्याची अनंतता आश्चर्यमय बाहे असे दिसून येईल.

५४-अ. स्थविर (स्थविर ध्रुव)
परमेश्वराचे हे विश्वरूप देशतः बनत आहे, तसेच तें कालतः हि अनंत आहे. वर्तमान क्षणाच्या मागे पुढे पाहू लागल्यास भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा विस्तार अनंतच आढळून येतो. या कालौघाचा आदि आणि अंत लागत नाही म्हणून परमेश्वराला स्थविर म्हणजे अत्यंत वृद्ध म्हटले आहे. परमेश्वराहून अधिक पुरातन कोण आहे ? ज्या ग्रह-गोलांच्या गतीवरून आपण कालगणना करतो ते ग्रह-गोल ज्याने निर्माण केले आहेत, त्याच्या आयुष्याची गणना कोण कशी करणार ? ज्या चंद्र-सूर्यांच्या गर्तीवरून आम्ही वर्ष-मास गणना करतो, ते.चंद्र-सूर्य किती वेळां उत्पन्न झाले आणि निमाले त्याची गणति नाही. प्रत्येक कल्याच्या आरंभी परमेश्वर चंद्र-सूर्य पूर्ववत निर्माण करतो असें वेदांनी म्हटले आहे "सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् । ”

परमेश्वराचे विश्वरूप हे अशा प्रकारें स्थविष्ठ आणि स्थविर आहे. देशतः आणि कालतः ते अनंतच आहे. अनंताचें सारेच अनंत ! ही अनंत अनंतता सर्वांशी दाखविणे अशक्यच. म्हणून स्थविष्ठ आणि स्थविर या दोन पानी ती केवळ दिग्दर्शित केली आहे.

५४-ब. ध्रुव (स्थविर ध्रुव)
ध्रुव म्हणजे स्थिर, अचल. प्रतिक्षणी बदलणाऱ्या, परिवर्तन पावणाऱ्या इथे या विश्वांत सारें अस्थिर आणि चंचलच दिसून येते. ज्याला धुव म्हणतात तो ध्रुवमत्स्याच्या पुच्छांतील ताराहि अभिजित् नक्षत्राकडे चळत आहे, असें ज्योतिर्विद् म्हणतात. तात्पर्य, ज्यांतील धुवहि अधुव आहे असे हे अध्रुव विश्व आहे. पण चंचल आणि अस्थिर हैं, जें तसें नाही, त्या स्थिर आणि अचलप्रतिष्ठ वस्तूची सूचना करून नाश पावत असते. ती सूचना मात्र आपण घेतली पाहिजे. स्थलाची वा कालाची सर्व गति कुठल्यातरी स्थिर तत्त्वाच्या आधारेंच होऊ शकते.. तें जें सर्व गतीचे आधारभूत निरपेक्ष स्थिर तत्त्व तेच ध्रुव होय.

स्थविष्ठ, स्थविर आणि धूव या नामश्रयाने परमेश्वर हा सर्वविग्व्यापी, सर्वकालव्यापी परंतु त्या दिक्कालांनीं अपरिच्छिन्न असा सर्वाधारभूत कूटस्थस्वरूप आहे हे सुचविलें.

अग्राह्यः शाश्वतः कृष्णः लोहिताक्षः प्रतर्दनः ।
प्रभूतस्त्रिककुब्धाम पवित्रं मङ्गलं परम् ॥७॥


५५. अग्राह्य
' अग्राह्य म्हणजे इन्द्रियादिकांनी ज्याचे ग्रहण होऊ शकत नाही असा परमात्मा अतीन्द्रिय असला तरी तो बुद्धिग्राह्य आहे. बुद्धिग्राह्य जर तो नसेल तर त्याचे भान आणि ज्ञान माणसाला कसे होईल ? म्हणून गीतेने स्पष्टच म्हटले आहे "बुद्धिग्राह्यम् अतीन्द्रियम्" ऐरणीत घुसून बसलेला हिरा हिरकणीने च काढावा लागतो, त्याप्रमाणे आत्मतत्त्वाचे आकलनहि आत्मबुद्धीनेच होऊ शकते. याचा अर्थ असा झाला की 'स्व' चे ज्ञान स्वतःच होऊ शकते, परतः नव्हे; आणि म्हणून अग्राह्य म्हणजे 'स्व' तः ग्राह्य, 'पर' तः अग्राह्य असा अर्थ समजावयाचा.

सारें ज्ञान ज्ञातृक्षेम विभागानेच होत असल्यामुळे आणि ज्ञाता स्वतःच ज्ञेय असल्यामुळे त्याचे ज्ञान कसे व्हावयाचे ? त्याचे ग्रहण कसे व्हावयाचें ? अविभाज्य तत्त्वाचे विभाजन कसे व्हावयाचें ? आणि ज्याअर्थी विभाजन होऊ शकत नाही त्याअर्थी त्याचे ग्रहणहि होऊ शकत नाही असेंच म्हटले पाहिजे. म्हणून परमात्मा हा खरोखर अग्राह्यच म्हणावा लागतो. ह्याच दृष्टीने उपनिषदांनी " हेतुमत् आणि सुनिश्चित' पदांनी वारंवार प्रतिपादिले आहे

" विज्ञातारं अरे केन विजानीयात् । "

५६. शाश्वत
जें काल होते, तें आज आहे, उद्यां राहणार आहे आणि केवळ उद्यांच नव्हे तर उद्यांच्याहि उद्या राहणार आहे, तें शाश्वत होय. परमात्मा हा तसा आहे. अठ्ठावीस युगे लोटली तरी तो आपला उभाच आहे. वर्तमान क्षण आम्हांला प्रत्यक्ष आहे. त्याचे एक टोंक म्हणजे भूतकाळ आणि दुसरे टोंक म्हणजे भविष्यकाळ होय. जो वर्तमानाला गमावतो तो भूत आणि भविष्य दोहोंचाहि निकाल लावतो. वर्तमान नसणे म्हणजे अस्तित्वच नसणे, ज्याला अस्तित्व नाही त्याला भूतकाळ कुठला आणि भविष्यकाळ तरी कसा असणार ? तो कालपुरुषाच्या कृपेला पारखा, कर्मफलापासून वंचित राहतो आणि शाश्वत ज्ञान फलापासूनहि वंचित राहतो. कारण नित्यानित्यविवेकाचा विनियोग तो जाणत नाही. समर्थांनी ठीकच म्हटलें आहे:

जो चंचलासि भजेल । तो सहजचि चळेल
जो निश्चळा भजेल तो निश्चळ चि ॥

तसेंच याविषयी पुढील सुभाषितहि प्रसिद्धच आहे.

यो ध्रुवाणि परित्यज्य अधुवं परिषेवते ।
धुवाणि तस्य नश्यन्ति अध्रुवं नष्टमेव च ॥

५७. कृष्ण
कृष्ण म्हणजे कर्षणशील. परमात्मा सन्तिर्वामिरूपाने या विश्वाला आपल्याकडे खेचून राहिला आहे. केन्द्रभूत अंशी परिधिगत अंशांना आपल्या धारणाशक्तीनें, आपल्या आकर्षणबळाने खेचून धरीत असतो. परमात्मा "भुवनस्य नाभिः" आहे. त्याच्यांत " अरा इव रथनाभौ " हे सारे विश्व आहित आहे.

कृष्ण म्हणजे कर्षणशील कृषीवल. तोहि शेत कसून अन्न पिकवतो आणि "शितें तिथे भुते' या न्यायाने सान्या जगाला आपल्याकडे पोषक रश्मींनी खेंचीत असतो.

जो शेत कसतो तो फिक्कट राहत नाही, त्याची चामडी रापून निघते. म्हणून तो कृष्ण म्हणजे काळा coloured, tanned.

५८. लोहिताक्ष
लोहित म्हणजे रक्त, लाल. लोहिताक्ष म्हणजे रक्त-नेत्र. रक्त ही जीवनाची खूण आहे. जीवन ओसरू लागले, म्हातारपण आलें, रोगाने ग्रासलें म्हणणे शरीरातील रक्त कमी होते आणि शरीर फिक्कट, निस्तेज होऊन त्याला मृतकळा येते. शरीरांतील ही रक्ती नखांवरून आणि डोळयांवरून चटकन पारखली जाते. डोळा दुरूनच दिसतो. त्याच्या तेजावरून माणसाचें तेज, त्याचे तारुण्य, त्याचे आरोग्य, त्याचे बुद्धिमत्त्व चटकन डोळ्यांत भरते. म्हणून नेत्र हा सर्वेन्द्रियांत नेता बनला आहे.

नेत्र पदाचा मुळी नेतृत्वशाली असा धात्वर्थच आहे. अक्षिन्शब्द निराळ्या धाततूपासून आलेला आहे. अक्ष आणि अक्षिन् दोन्ही शब्द एकाच अक्ष्धातूपासून आलेले आहेत. अक्ष म्हणजे आस जसा आपल्या आवणांत फिरत असतो तसा डोळाहि आपल्या कोंदणांत सारखा डोलत असतो. म्हणूनच त्याला अक्षिन् म्हणजे भरभरा फिरणारा, डोलणारा म्हटले आहे.

ज्याचे अक्षि म्हणजे डोळे लाल आहेत तो लोहिताक्ष मुसमुसणाऱ्या तारुण्याचा पुतळा होय. ज्याला जरा आणि मृत्यु शिवत नाही, त्याहून अधिक तरुण कोण ? आणि त्याच्या डोळ्यांहून अधिक तेजस्वी सुंदर डोळा दुसऱ्या कोणाचा असणार ? म्हणून परमात्मा हा लोहिताक्ष म्हटला आहे, तारुण्य हा आयुष्याचा सर्वोत्तम काळ होय. बाल्य आणि वार्धक्य दोन्ही काळांत जीवनाचे शिखर दूरच राहते. बाल्य आरोह आहे तर वार्धक्य अवरोह आहे. तारुण्य शिखर आहे आणि त्याचे प्रतीक आहे लोहित, " पांढरे डोळे होणे म्हणजे मृतच होणे होय ".

लोहित म्हणजे रक्त वर्ण, आरोग्य आणि सौंदर्य यांचे प्रतीक आहे. त्यामुळे वैदिक ऋषि प्रार्थना करीत पुत्रो मे श्यामो लोहिताक्षो जायेत. इथेहि कृष्ण लोहिताक्ष ही दोन नामें जोडूनच आली आहेत. भारतीयांच्या मतें आरक्त नेत्र श्यामल तनू ही मधुराकृति होय. पुरोप म्हणजे सुरूप म्हटलेल्या लोकांच्याहि मते श्यामलताच आरोग्याचे व सौंदर्याचे चिन्ह होय. म्हणून युरोपीय लोक ऊन खाऊन आपला वर्ण रापवून घेण्यासाठी धडपडत असतात.

५९. प्रतर्दन
प्रतर्दन म्हणजे संहार करणारा, जादुगार आपली जादूची पोतडी उघडून अद्भुत खेळ करुन दाखवितो आणि शेवटीं तो सर्व खेळ आटोपून परत आपल्या पोतडीत सर्व साहित्य गोळा करतो. या गोळा करण्यालाच संहार म्हणतात. संहार म्हणजे हिंसा नव्हे. विश्वरूप पटाची ते घडी करून ठेवणे आहे. घडी उलगडणे, उलगडून ठेवणे आणि परत ती घालणे या त्रिविध क्रियेला ईश्वराची लीला म्हणावयाचे. तीत ईश्वर कुठेहि आपले स्वातंत्र्य गमवीत नाही. विकाराधीन होऊन तो कोठल्याहि कर्मात प्रवृत्त होत नाही.

कौषीतकि उपनिषदांत इंद्रप्रतर्दन-संवाद आला आहे. त्यांत परमात्मा इंद्र, भक्त प्रतर्दनाला वरदान देतो. भक्त म्हणतो, तूंच माझ्यासाठी वर वर, देव म्हणतो बर ज्याचा त्याने वरायचा असतो, दुसऱ्याने नव्हे. त्यावर भक्त म्हणतो, आम्हां जीवांना तुझ्या मते जे सर्वांत हितकर असेल ते दे. आणि मग देव हार खाऊन भक्तांसाठी स्वतःच वर वरतो. "मां विजानीहि । एतदेव अहं मनुष्याय हिततमं मन्ये । " असें इंद्र म्हणतो आणि प्रतर्दन तोष पावतो, देव- प्रतर्दनाबरोबर भक्त-प्रतर्दनाची ही कहाणी मला आठवते. भक्ताच्या स्मरणाशिवाय देवाचे स्मरण पूर्ण होत नाही. म्हणून हे स्मरण. भक्त-प्रतर्दनाने आपल्या अहंतेचा संहार केला आहे. ह्या आख्यायिकेंत त्यामुळे देवभक्तांचे अद्वैत झालें आहे. देवहि प्रतर्दन आणि भक्तहि प्रतर्दन.

६०. प्रभूत
प्रभूत म्हणजे विपुल, बीज हे एकटें एक असते. ते जेव्हां रुजून शाखापल्लवांनी आणि फुलांफळांनी विस्तार पावतें तेव्हा ते प्रभूत होते, विपुल होतें. ईश्वरहि त्याप्रमाणे या विश्वाच्या रूपाने प्रभूत झाला आहे. बीज जर प्रभव आणि प्ररोह पावलें नाही, तर तें प्रभूत होत नाही. जे प्रभूत नाहीं अल्प आहे, त्यांत सुख नाही. "नाल्पे सुखमस्ति" "एकाकी न रमते" इत्यादि उपनिषद्-वचनांत हाच आशय व्यक्त झाला आहे. जे दिसते आहे ते नाशवंत आहे. म्हणून या विश्वाचें मूळ कारण विश्वाहून भिन्न कल्पिलें जाते आणि ते ब्रह्म या शब्दाने निर्देशिले आहे. तें जे ह्या विश्वाचे बीज तें स्वस्थ न राहता विश्वाकार का पावले ? याची मीमांसा अनेकांनी अनेक प्रकारे केली आहे. त्यांतील एक पक्ष हा " एकाकी न रमते" चा आहे आणि एकाकी ब्रह्म एकाकी रमूं न शकल्यामुळेच त्याने हा विश्वाकार धारण केला आहे. आणि अशा प्रकारे ते अभूत ब्रह्म प्रभूत झालें आहे.

एकाकी जीवनाच्या कंटाळयांतून मुक्त होण्यासाठी जीवाची सर्व धडपड चालली आहे. त्यांतूनच कुटुंब, समाज आणि राष्ट्र व राष्ट्रसंघ निर्माण झाले आहेत. कार्यात प्रकट होणारे गुण कारणांत शोधावे लागतात. कारण " जें कार्य तें धरिल की गुण कारणाचे." त्याप्रमाणे शोध केला असतां ब्रह्मांतच या प्रवृत्तीचें मूळ आढळून येते. आनंद हा ब्रह्माचा स्वभावच आहे. त्यासाठीच ते प्रभूत झाले आहे. आत्माविष्कार करून तें रमत आहे.

६१. त्रिककुब्धाम
त्रि-ककुब्-धाम म्हणजे तीन दिशांना आधारभूत असलेला, दिशा चार, आठ, वा दहा प्रसिद्ध आहेत. पण तीन दिशा कोणत्या ? अधर, ऊर्ध्व आणि मध्य या तीन दिशांना वा स्थानांनाच तीन दिशा म्हणतां येईल. अथवा लांबी, रुंदी आणि उंची ही जी तीन परिमाणे त्याच तीन दिशा म्हणाव्या, परमात्मा म्हणजे मूल वस्तु. त्यांत सर्व परिमाणे आहेत. त्या परिमाणांत वस्तु नाही. म्हणून परमात्मा हा त्रिककुब्धाम म्हणावयाचा. धर्मीच्या ठायीं धर्म असतात, धर्मात धर्मी नसतो. धर्म धर्मिपरतंत्र आहेत. धर्मी स्वतंत्र आहे.

"त्रि-कुकद्-धाम" अथवा "त्रिककुभ्"व 'धाम". असे हि पाठभेद होतात. पण त्रिककुद्धाम हाच पाठ बरा.

६२. पवित्र
पवित्र म्हणजे पावन करणारें. दोष, पाप आणि अज्ञान दूर करणारे तत्त्व. सर्व दोष आणि सर्व पापें यांचे मूळ अज्ञान मानिले आहे. अज्ञान म्हणजे वस्तुस्वरूपाचे तत्त्वत: अनाकलन. समोर पडलेली वस्तु साप नसून दोरी आहे. असें नि:संशय ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मनुष्य भयभीत होऊन वेड्यासारखा वागू लागतो. तो पळत सुटतो, घाबरतो आणि घाबरवतो अथवा काठी घेऊन त्या दोरीलाच धोपटीत बसतो. तसें करतांना इतरांनाहि आणि स्वत:लाहि तो अपाय करून घेत असतो. हे सर्व अज्ञानजन्य कर्म आहे. यथार्थ ज्ञानाबरोबर हा साराच खटाटोप गळून पडतो आणि मनुष्य स्वस्थ राहतो.न-भितां न गांगरतां में काय कर्तव्य असेल तें तो स्वस्थपणे, स्वाधीनपणे करून मोकळा होतो. म्हणून म्हटले आहे "न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते " दोषांतून आणि पापांतून मुक्त करणारे ज्ञानासारखे दुसरे काही 'नाहींच आणि परमात्म्याच्या ठायीच लेशमात्रहि दोष नसल्यामुळे आणि सर्व सद्गुण असल्यामुळे तो परमात्माच तें ज्ञान आहे. म्हणून तोच एकमेव पवित्र म्हणावयाचा. जगांतील कोणत्याहि वस्तूच्या ठायीं वा व्यक्तीच्या ठायीं परमेश्वरी केवल पवित्रत्व कल्पिता येत नाही. अर्थात् व्यक्तिमात्र सदोष आहे. निर्दोष केवळ एक परमात्माच आहे, आणि म्हणून तोच पवित्र.

६३. पर मंगल
जो पवित्र तोच मंगल. ज्याच्या ठिकाणी लेशमात्रहि अमंगल नाही, मल, दोष, अज्ञान नाही, तोच परम मंगल म्हणावयाचा, पवित्र आणि मंगल हे दोन शब्द जोडीने आले आहेत. ते दोन्ही समानार्थकच असतील तर दोन हवेच कशाला ? दोन शब्द ज्या अर्थी वापरले आहेत त्या अर्थी त्यांत कांहीं वेगळे आणि विशिष्ट सांगावयाचे आहे हे उघड आहे. पवित्र शब्दाने परमात्मा हा सर्व दोषरहित आहे असें सुचविलें तर मंगल शब्दानें तो सर्व शुभ गुणांनी युक्त आहे असें सूचवायचे आहे. एक निषेधक लक्षण आहे. दुसरें विधायक आहे.

परमेश्वराचे सारे काही मंगल आहे. त्याचे नाम मंगल आहे. त्याचे रूप मंगल आहे. त्याचे गुण मंगल आहेत. त्याचे कर्म मंगल आहे. त्याचें ध्यान मंगल आहे. त्याचे कीर्तन मंगल आहे. त्याची सेवा मंगल आहे. सारांश कोणत्याहि विधेनें परमेश्वराशी आपला संबंध जोडणें मंगल आहे. त्रिविधा म्हणा किंवा नवविधा म्हणा, परमेश्वराची भक्ति मंगल आहे. परमेश्वराची विभक्ति म्हणजे परमेश्वराचे विस्मरण हेच अमंगल आहे. किंबहुना अमंगलाचे मूळ आहे. तुलसीदासांनी म्हटले आहे:

बहु रोग वियोगन्हि लोग हये ।
भवदंप्रिनिरादर के फल थे ।
अति दीन मलीन दुःखी नितही ।
जिनके पदपंकज प्रीति नहीं ।

सुखांत सुखकर्ता म्हणून आणि दु:खांत दुःखहर्ता म्हणून परमेश्वराचे स्मरण करावें. सुख-दु:खांचा हाच लाभ. हाच विनियोग. हीच भक्ति, हेच ज्ञान, हेच धर्मकर्म.

ईशानः प्राणद: प्राणो ज्येष्ठः श्रेष्ठः प्रजापतिः
हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ॥८॥
<

६४. ईशान
ईश्, ईश आणि ईशान हे तीन शब्द एकाच धातूपासून आलेले आहेत. तिन्ही ईश्वरवाचकच आहेत. ईश शब्द विपुल आढळतो. ईश् आणि ईशान हे शब्द त्या मानानें तुरळक आहेत. ईश् हा हलन्त शब्द ईश्वर शब्दांत आणि संस्कृतांत स्वतंत्रपणे तर ईशान शब्द ईशान्य शब्दांत आणि संस्कृतांत. स्वतंत्रपणे येतो. ईशान म्हणजे ईशनशील. चराचरांचा अन्तर्यामी म्हणून ईश्वराची सत्ता सर्वत्र आणि सर्वदा गाजते आहे. त्याच्या सत्तेने सर्वांना अस्तित्व आहे, जीवन आहे आणि त्याने जे वस्तुमात्राला गुणधर्म दिले आहेत त्यांच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत. अशा दुहेरी प्रकारे त्याची सत्ता या जगांत चालली आहे. ती ओळखून जे वागतात ते भक्त होत, ज्ञानी होत. "प्रकृतीसारिखें चालावें । परी अंतरी शाश्वत ओळखावें । " या वचनांत समर्थानी हें रहस्य,भक्तीचें आणि ज्ञानाचे सांगितले आहे. ईश्वर जे ईशन करतो तें. तो पशुपालाप्रमाणे वा राजाप्रमाणे हातीं दण्ड घेऊन करीत नाही. तो तें जगदंतर्यामिरूप आपल्या मायेने करीत असतो. सर्व जीव आणि जगत् ईश्वरी मायेच्या अधीन आहे. ईश्वर त्या मायेचा स्वामी आहे. सर्व विश्व ईश्वरपरतंत्र आहे, एक ईश्वर च स्वतंत्र आहे. म्हणून तोच एक ईशान, इतर सारे ईशित.

६५. प्राणद
प्राणनाशिवाय कोणी प्राणी जगू शकत नाही. वृक्षा वनस्पति हि नाही. मृत् पाषाण हि प्राणजीवी आहेत, असें म्हणता येईल. जिथे म्हणून चयापचय आहे, तिथे प्राणक्रिया आहे, आणि चयापचय सृष्टीचा धर्म आहे. असा एकहि सृष्ट पदार्थ नाहीं की जो चयापचयांतून मुक्त आहे. म्हणून हे सर्व चराचर पदार्थ प्राणी आहेत असें म्हटले पाहिजे. या सर्वांना ही प्राणशक्ति कोण देतो ? जो ही शक्ति देतो तो एक परमेश्वरच प्राणद आहे. प्राणापान करण्याची क्षमता नसेल, तर जगांत सारा प्राण भरलेला असून हि त्याचा कांही एक उपभोग घेता यावयाचा नाही. प्राणशक्तिशून्य निष्प्राण होईल, निर्जीव मढे होईल.

प्राणद पद सहस्रांत चारदां आले आहे. ते त्याचे चौपट महत्त्व सांगते. प्राण शब्द (१) सत्ता (२) शाक्ति (३) अन्न आणि (४) जीवन अशा चतुर्विध अर्थानि आलेला आहे. पूर्वपूर्व उत्तरोत्तराचे कारण आहे. उत्तरोत्तर पूर्वपूर्वाचे कार्य आहे.

६६. प्राण
प्राण म्हणजे काय ? प्राण म्हणजे जीवनसूत्र. त्याच्या इशार्याने जीवाचें सारें जीवन चालतें. तो सर्व क्रियांचे कारण आहे. सर्व क्रिया अन आहेत, हा प्राण प्र + अन आहे. जनन, मरण, अशन, पान, स्थान, उत्थाग, पतन, गमन, आगमन इत्यादि सर्व अन होत, क्रिया होत. प्राण त्या सर्वाचे कारण आहे. म्हणून तो प्राण. " को वा अन्यात्, कः प्राण्यात् यद् एष आकाश आनन्दो न स्यात् " (तै. २.७) या वचनांत उपनिषदांनीं अन् आणि प्र+ अन् हे दोन धातु वापरले आहेत. त्यांत अन म्हणजे सर्व व्यापार आणि प्राण म्हणजे तदाधारभूत त्याचे कारण असें जीवन होय. परमेश्वरच सर्वाधार आहे. सर्व क्रियांचें अधिष्ठान आहे, चालक आहे म्हणून तो प्राण न्हटला आहे. "प्राण: प्रजानां उदयत्येष सूर्यः" (मै. ६.८) "या वचनांत प्राण शब्द चालक या अर्थी आला आहे. इथे हि तोच भाव आहे."

प्राण पद तीनदा आलें आहे. (१) चालकत्व, (२) पोषकत्व आणि (३) नियामकत्व त्याने सूचित होते.

६७. ज्येष्ठ
ज्येष्ठ म्हणजे वयाने वडील. परमेश्वर हा सृष्टीचा पिताच नव्हे, त्या पित्याचा हि पिता आहे. सृष्टीचे जे प्रजापति आहेत त्यांचा हि तो पिता आहे. सृष्टीचें मुळ कारण तीन गुण होत. त्या गुणांची जननी प्रकृति होय आणि तिचा स्वामी तो पुरुष होय, आणि परमेश्वर या सृष्टीच्या मातापित्यांचा प्रकति-पुरुषांचा हि पिता आहे. म्हणून त्याला ज्येष्ठ ठीकच म्हटले आहे. तोच एक ज्येष्ठ असून बाकीचे सारे कनिष्ठ आहेत. हे जग म्हणजे तत्-सृष्ट-सृष्ट-सृष्ट आहे. ग्रामीण भाषेत तें त्याच्या लेकाच्या लेकाचा लेक आहे. यावरून त्याचे ज्येष्ठत्व सहज समजणारे आहे.

६८. श्रेष्ठ
श्रेठ म्हणजे गुणाने वरिष्ठ, योग्यतेने वरचढ, -सर्वोत्तम, जगामध्ये काही न्यून, कांहीं अधिक, आणि काही समान असे तीन प्रकार संभवतात. परमेश्वराच्या बाबतींत जग आणि जगांतील सारे हे न्यून म्हणजे कमी या कोटीतच पडणार, मग त्याच्या बरोबरीचे कुठून असणार ? अधिकाची तर गोष्टच नको ! गीतेने जे म्हटले आहे : 'न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यः' ते याच मुळे. परमेश्वराचे वैभव अचिंत्य आहे. जीव आणि जगत्यांचा त्याच्यापुढे काय पाड ? परमेश्वराशी दुसऱ्या कशाचीच आणि यत्किचितहि तुलना होऊंच शकत नाही. "कशी तुळितसां तुम्ही प्रकट मेरुशी मोहरी|-" असे म्हणणे हि गौणच ! मेरु आणि मोहरी यांतील लघु-गुरुत्व अतुलनीय असले तरी परमाणु आणि पृथ्वी यांच्यांत एकच मृत्-तत्त्व विद्यमान आहे. मात्रेचाच काय तो फरक आहे. परंतु ज्यांच्या कोटीच भिन्न आहेत त्यांची तुलना कशी होणार ?

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ हे शब्द जोडीने आले आहेत. एक वयोवृद्धत्ववाचक आणि दुसरा ज्ञानवृद्धत्ववाचक आहे. परमेश्वर सर्वादि आणि ज्ञान-स्वरूप असल्यामुळे तोच एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ या पदवीस पात्र ठरतो.

६९. प्रजापति
प्रजापति म्हणजे सर्व प्रजांचा, सुर, नर, तिर्यक् आदि भूत-सृष्टीचा स्वामी, शास्ता. परमेश्वर भूतमात्राच्या ठायीं वात्सल्य ठेवून या विश्वाचे पालन आणि पोषण करीत असतो. विश्वांत "जसे कर्म तसें फळ" असा न्याय लावून तो विश्वाचे शासन करीत आहे. यांतच त्याचे प्रजापतित्व म्हणजे प्रजापालन सामावले आहे. तसें तो जर न करील, तर त्याच्यावर वैषम्य आणि नैर्घृण्य इत्यादि आरोप येतील. ईश्वराच्या या सर्वभूत-साम्य आणि सर्वभूत-वात्सल्य इत्यादि गुणांचे अनुकरण करून राजे लोक या भूतलावर राज्य करू शकतात. राजेच काय प्रत्येक जणच असें राज्य करूं शकतो. कुटुंबांत, समाजांत, राष्ट्रांत आणि राष्ट्रसंघांत याच गुणांच्या बळावर राज्य चालू शकते. राज्य म्हणजे स्वैर हिंसा नव्हे. राज्य म्हणजे प्रजावत्सलता होय. तेंच प्राजापत्य वा प्रजापतित्व. जगांत असें जें प्रजापतित्व दिसून येते तें सारे त्या परमेश्वराचे आहे. यावेगळे में कांहीं राज्य नावाने चालतें तें राज्य नसून त्याज्य आहे. आणि प्रत्येक जण त्याचा त्याग करायला धडपडत असतो.

आपल्याकडे राम हा आदर्थ राजा म्हणून प्रसिद्ध आहे. कारण तो परम प्रजावत्सल होता, प्रजाप्रियचिकीर्षु होता. मायबापाप्रमाणे स्वसुखनिरभिलाष होऊन त्याने हे प्रजावात्सल्य केले. आपल्यालाच एकटयाला राजपद का असें त्याला वाटे. रघुकुलांत सर्व चांगले आहे पण ही वडील भावालाच राज्य देण्याची रीत कांहीं बरी नाही, अशी त्याची तक्रार होती. रामाचे राज्य नसून प्राज्य होते. म्हणूनच तो एक राजा झाला.

७०. हिरण्यगर्भ
"हिरण्यगर्भः समवर्तताग्रे, भूतस्य जातः पतिरेक आसीत्' अशी श्रुति आहे. तद्नुसार हिरण्यगर्भ म्हणजे सृष्टीच्या आरंभी उत्पन्न झालेला तिचा स्रष्टा ब्रह्मदेव होय.

त्याचबरोबर पुढील पद में भूगर्भ ते हि त्याच्या जोडीने वाचल्यास सूर्य आणि पृथ्वी यांचा निर्माता असा अर्थ प्रतीत होतो. सूर्यच सुवर्ण होय आणि भू ही अवर्ण होय. आणि ही दोन्ही एकाच परमेश्वराने निर्मिलीं आहेत. त्याचेच ते गर्भ होत. सूर्य आणि पृथ्वी ही या सर्व प्रजेची मातापितरे आहेत. सूर्य रेतोधा आहे, पृथ्वी धारिणी आहे. सूर्याचा वर्ण तेजाचा म्हणून सुवर्ण आहे. आणि पृथ्वीचा वर्ण मातीचा म्हणून निस्तेज, काळपट आहे. आम्ही सारी प्रजा पृथ्वीने धारण केलेलों आणि वाढवलेलो असलो तरी आम्ही भूमिपुत्र नाहीं, मृज्जात नाही, आम्ही देवपुत्र आहों तेजोजात आहोत आणि म्हणून

"तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि । " (वरणीय तें सवित्याचें तेज देवाचें ध्यातसूं । )

७१. भू-गर्भ
भू-गर्भ म्हणजे भूमि हा ज्याचा गर्भ आहे, ज्याचें अपत्य आहे, तो परमात्मा. ही सारी जीवनिकाय भूमि, सर्व जीवांचे आश्रयस्थान असलेली भूमि, परमेश्वराने निर्माण केलेली आहे. तिच्या अंकावर सर्व जीव जन्मले, वाढले आणि तिचेच विसावले आहेत. अशी ही पृथ्वी जनकजननी-जननी आहे. "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी " असें भगवान रामचंद्रांनी जननी आणि जन्मभूमि यांचे गौरव गाइलें आहे. या भूमातेच्या बाबतीत वस्तुत: ते दोन्ही गौरव-विषय एकच झाले आहेत. ही भूमाताच आम्हां सर्व जीवांची जननी आहे आणि जन्मभूमि हि आहे. ज्या तेजाचे आम्ही पुत्र आहों तें चिद्घन परमात्मतत्त्व अव्यक्त आणि म्हणून दूरचे आहे. पण जिने आम्हाला जन्म दिला, जिच्या अंगावर आम्ही वाढलों, बागडलों आणि जिथे विसांवलों, ती ही भूमाता आम्हांला प्रत्यक्ष आहे. तत्त्वंतः तिचे स्थान जरी डावें असलं तरी व्यवहारांत ते उजव्याहून उजवें आहे. म्हणूनच ती "स्वर्गादपि गरीयसी" म्हटली आहे. म्हणूनच "सहसं तु पितृन् माता गौरवेणातिरिच्यते' असें मनूने म्हटले आहे. म्हणूनच भगवान् कृष्णाने इंद्रमख बंद करून गोवर्धन पूजा लावून दिली आहे.

७२. माधव
मा म्हणजे लक्ष्मी, लोकमाता, तिपा गो धव म्हणजे पति तो माधव, माधव शब्दाने जगाची माता-पितरें एकदम स्मरली आहेत. माधव शब्दांत 'मा चे महत्त्व विशेष आहे. मा-ख्यात धव तो माधव होय.

माधव म्हणजे मधुकोश, तो परमात्मा सर्व माधुर्याचा निधि आहे. मधमाश्या जशा फुलाफुलांतून मध गोळा करायला धडपडत असतात, तशा सर्व प्रजा त्याच्याच शोधासाठी, त्याचा लवलेश आस्वादण्यासाठी धडपडत आहेत.

परमात्मा सर्वमधुर आहे. त्याचे नाम मधुर, त्याचे रूप मधुर, त्याचे गुण मधुर, त्याचे कर्म मधुर. तो मधुराधिपतिच आहे. आणि म्हणून " मधुराधिपतेरखिलं मधुरम् " आहे. मधुर म्हणजे इन्द्रियप्रियच नव्हे तर इन्द्रियद्वारा हृदयप्रिय. म्हणजेच सत्यं शिवं सुंदरम्. नुसता रूपसुंदर सुचिर प्रिय होत नाही. नुसता गुण-सुंदर हि सुप्रिय होत नाही. तसेच जो रूपगुणसुंदर आहे तो चित्रभूत असल्यास त्या आभासाने शांति, पुष्टि, तुष्टि व्हायची नाही. म्हणून एकसमयावच्छेदेंकरुन सत्यं शिवं सुंदरम् तेच संपूर्ण सुंदर होय आणि त्यानेच संतृप्ति होते. परमात्माच असा संपूर्ण आहे. म्हणून संत गातात-"रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी|| तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥

७३. मधुसूदन
मधु-सूदन म्हणजे मधुनामक दैत्याला ठार करणारा. देवाची ही सहस्रावधि नामें "गौणानि' आणि "विख्यातानि' अशी आहेत. मधु-सूदन हे नाम हि तसेंच असले पाहिजे. परंतु हा मधु कोण ? मधु - कैटभांपैकी ? कर्णमिधाचा मुलगा म्हणून त्याचा उल्लेख आहे, पण तेवड्यावरून त्याचा पराक्रम काही कळत नाही. कोणतातरी एक राक्षस देवशत्रु होता एवढेंच समजावयाचे. पण हें नाम गौण म्हणजे गुणवाचक घेतलें म्हणजे त्याचा पराक्रम कळतो, राक्षस हे कामरूप म्हणजे हवें तसें रूप घेणारे आहेत. खरे म्हणजे काम हेच त्यांचे रूप आहे. जीवाला भूल पाडून त्याचा फडशा पाडण्यासाठी तो काम नाना मोहक रूमें घेऊन येतो. परंतु जागृत अंतरात्मा त्याला ओळखून काढतो आणि त्या त्या रूपांत त्याचा निकाल लावतो. हेच मधुसूदनत्व होय. भगवान् नुसता मधुसूदन नाहीं, तो मधु-कैटभारि म्हणून हि प्रसिद्ध आहे. हा कैटभ कोण ? कामाचा सखा क्रोध, भगवान् कामाबरोबर त्याची छाया जो क्रोध, त्याचा हि निकाल लावत असतो. असा हा जो मधुसूदन तोच कैटभारि होय.

ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमः क्रमः ।
अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् ॥९॥
<

७४. ईश्वर
ईश्वर म्हणजे विश्वनियंता. या संपूर्ण विश्वाचे शासन करणारा सर्वशक्तिमान्. कर्तुं, अकर्तुं, अन्यथा कर्तुं सामर्थ्य असलेला असा तो आहे. असें सामर्थ्य दुसरीकडे कुठेच पाहायला मिळत नाही. सर्व जीव हे अनीश्वर आहेत. त्यांच्या ठिकाणी ईश्वराचे सामर्थ्य कुठून असणार ? ते सर्वतोपरी असमर्थ आहेत. म्हणून त्यांचा अधिकार कोवळ ईश्वराची अनन्यभावानें भक्ति करणे एवढाच आहे: जगाची रचना करता येणे ही गोष्ट तरी जीवाला अशक्यच आहे. तो अव्यापारेषु व्यापारच होईल, अशा त-हेचा अव्यापारेषु व्यापार विश्वामित्राने करून पाहिला म्हणतात. अर्थात् तो त्याला जमला नाहींच ! परंतु यांत जीवाचे काही बिघडत नाही. न कां करता येईना विश्वरचना, पण स्व-रचना त्याला कां करतां येऊं नये ? आपले 'मनोविकार, आपले देहधर्म त्याला का आवरतां येऊ नयेत ? तिथे हि बिचारा हार खातो आणि तेंच खरोखर दु:खाचे कारण आहे. त्यासाठी हि त्याला ईश्वरालाच शरण जावे लागते. ईश्वराच्या कृपेनेच तो त्यांत फावतो. ईश्वराचे असें सामर्थ्य ज्याच्या लक्षांत आलें तो त्याला कां न भजेल ?

७५. विक्रमी
जो विक्रम करतो तो विक्रमी. जगद्रचना हा परमेश्वराचा विक्रमच होय. कांहीं हि दुसरें उपादान नसतांना आणि दुसरी काही उपकरणे नसतांना त्याने ही विश्वरचना कशी केली ? अशा त-हेच्या अडचणीला दुसरा कोण अनीश्वर तोंड देऊ शकेल ? विश्वरचना करून त्यांत त्याने धर्माची स्थापना केली आहे. धर्मविरोधीत्तत्त्वांचे आणि सत्वांचे त्याने शमन केले आहे. हा हि पराक्रम अद्भुत आहे. त्याच्या सत्तेच्या विरुद्ध कोणी कितीहि प्रबल प्रतिद्वंदी उभा राहिला, तरी त्याला त्याने लीलया नेस्तनाबूद केलें आहे. आणि अशा प्रकारे सज्जनांचें परित्राण साधले आहे. सत्याचाच अखेर विजय होतो हे त्याने वारंवार शाबित केले आहे. हा त्याचा पराक्रम अनादि कालापासून आजतागायत चालतच आला आहे. सत्वाअरुद्ध उठलेल्या असताची हार ठरलेलीच आहे. आणि हा पराक्रम परमेश्वर काहीएक न करतांच करीत असतो. असा अनायास विजय दुसरा कोणी जीव मिळवूच शकत नाही. मग तो केवढाहि का पराक्रमी असेना. असे असल्यामुळे परमेश्वरासारखा विक्रान्त परमेश्वरच होय. रामदासांनी म्हटले आहे "केल्याने होत आहे रे' पण हा समर्याचा (रामदासांचा) समर्थ असा समर्थ आहे की त्याच्या बाबतींत न केल्यानेच होत आहे !

७६. धन्वी
धन्ची म्हणजे धनुर्धर, भगवान् विष्णूचे शृंगापासून बनविलेलें शार्ङ्ग धनुष्य प्रसिद्ध आहे. रामाचें कुदंडाचें बनलेले कोदंड प्रसिद्ध आहे. तोहि धन्वीच. विष्णुचाच अवतार तो, जुन्या काळी शस्त्रास्त्रांमध्ये हळूहळू विकास होत गेला आहे. आजहि तो चालूच आहे. प्रथम मनुष्य पशूप्रमाणे नखदंतायुध होता. नरसिंह हां त्याचा प्रतिनिधि आहे. त्यानंतर परशु आला. परंतु परशु हे शस्त्र आहे. त्यापेक्षां धनुर्बाण हें अधिक प्रभावशाली अस्त्र निर्माण झालें. हयांचे प्रतिनिधि परशुराम आणि धनुर्धारी राम होत. जुन्या काळी येथपर्यंतच प्रगति झाली होती. म्हणून धन्वी झणजे धनुर्धारी हा अग्रणी, मोठा समर्थ योद्धा, मोठा रणवीर गणला जाई. आणि म्हणून ते पराक्रमाचे चिह्न देवाला बहाल करण्यांत आले. आतां त्याच्या हाती अणुगोलच द्यावा लागेल. कारण मानवाच्या विकासाची मजल तेथपर्यंत पोहचली आहे. "यदन्न: पुरुषो भवति तदन्नास् तस्य देवताः" या न्यायाप्रमाणे "यच्छस्त्रः पुरुषो भवति तच्छस्त्रास् तस्य देवताः" असे म्हणणे युक्त आहे. महाभारतकाली मानव-संस्कृति धनुर्बाणापर्यंत विकसित झाली होती. म्हणून त्यावेळच्या नामस्मरणांत धन्वी हे नांव येणे स्वाभाविक आहे. एरव्ही, ज्याच्या संकल्पमाने हे जग उदय आणि अस्त पावतें त्याला खरोखर कुठल्या शस्त्राची गरज आहे ? तो नि:शस्त्रच, सशस्त्रास्त्राहून सशस्त्र आहे. त्याला कुठल्याच शस्त्राची गरज नाही. मानवाने आपल्या हौसेसाठी त्याला नाना शस्त्रांनी सजविलें आहे इतकेंच.

७७. मेधावी
मेधा म्हणजे प्रज्ञा. या प्रज्ञेचे अंतर्ज्ञान आणि बहिर्ज्ञान असे दोन मुख्य भाग आहेत. चेतना, अवधान, स्मरण, ग्रहण, धारण, कल्पन इत्यादि बहिर्ज्ञानाचे विविध पैलू आहेत. अशी मेधा ज्याला आहे तो मेधावी होय, निव्वळ बहुग्रंथ धारण करणारा नव्हे. ज्याने हे सर्वाश्चर्यमय विश्व निर्माण केलें त्याच्या मेधावितेचा आणखी पुरावा तो काय पाहिजे ?

मेध आणि मेघा शब्द यांची कुळी एक आहे. मेध म्हणजे यज्ञ करता करता येणारे जें बुद्धिपाटव ते मेधा होय, गांधीदृष्ट नई तालीमचा हा वैदिक आधार होय. कर्माने बुद्धि उत्पन्न होत नाही. पण बुद्धीचे शोधन होऊन तिचे पाटव प्रकट होते. ती निर्मल उज्ज्वल सुंदर होते. अर्थात् मेधा म्हणजे कर्मकुशल शान. ' ईश्वर विक्रमी धन्ची मेधावी ' हा अनुक्रम जणूं ईश्वरत्वाची व्याख्याच सुचवीत आहे. ईश्वरत्व-शान+ साधन-सामर्थ्य.

धन्वी आणि मेघावी ही जोडी "यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः" या श्लोकाचे स्मरण करून देते. सामर्थ्यांची ती दोन अपरिहार्य अंगें होत.

७८, विक्रम
" त्रीणि पदा विचक्रमें " अशी श्रुति आहे. तद्नुसार उत्पत्ति, स्थिति आणि लय या तीन म्हणजे बहुविध पदांनी ज्याने हें विश्व क्रमिलें आहे, आटोपलें आहे, तो परमात्मा विक्रम होय. तोच त्रिविक्रम या नांवानें हि प्रसिद्ध आहे.
अदितिपुत्र वामनच त्रिविक्रम झाला आहे. आदित्य प्रथम बाल रूपाने क्षितिजावर येतो तेव्हां तो वामन म्हणजे ठेंगणा असतो. त्यावेळी त्याच्यापुढे अंधकार-सम्राट् बलि उभा असतो. पुढे तो मध्याही डोक्यावर चढतो आणि वामनाचा त्रिविक्रम बनतो. तो उंच होतो त्यावेळी अंधकारसम्राट् भुई-सपाट डोके नमवतो आणि अक्षरश: त्रिविक्रमाचा चरण शिरोधार्य करून त्यासरशीं पाताळांत जातो. अंधकाररूप सावली हि पददळी येते आणि स्वर्ग-पृथ्वीचे साम्राज्य प्रकाशमय देवांना परत करतो तो. पाताळांत दृष्टिआड झाला म्हणजे हळूहळू आदित्य हि देवकार्य करून अस्तनी खाली येतो आणि शांत होतो. हा त्याचा तिसरा क्रम, तिसरा चरण, महणावयाचा. 'असुरराज अंधकार आणि अदितिपुत्र प्रकाश यांच्यातील हे युद्ध सनातनच आहे. प्रत्यह तें होत आहे.

७९. क्रम
विक्रम म्हणजे विशिष्ट तीन पदे क्रमणारा. पण क्रग म्हणजे कोणती हि विशिष्ट पदें नव्हे तर सर्व सामान्य क्रमण करणारा, गाडीत बसलेला मनुष्य बसलेला असला तरी तो सारखा क्रमण करीत असतो, स्थलांतर करीत असतो. तें स्थलांतर गाडीच्या योगें होत असते. तसें सर्व सृष्टीचे क्रमण कालक्रमाने सतत होत आहे. तुम्ही बसा की निजा तुमचे क्रमण प्रतिक्षणी होत आहे. मागच्या क्षणाचे तुम्ही या क्षणाला नाही आणि या क्षणाचे पुढच्या क्षणाला नाही. हा अविरत क्रम कालरूप परमात्म-शक्तीने चालला आहे. सृष्टीची उत्पत्ति स्थिति आणि लय हा हि क्रमच आहे. सृष्ट पदार्थाचे जनन, मरण आणि पुनर्जनन हा हि क्रमच आहे. जीवांचा बंध-मोक्ष हि तोच. असा हा परमात्मा क्रमाक्रमाने सर्वांना सर्व अवस्थांस पोचवून कालक्रमण करीत आहे म्हणून तो क्रम.

८०. अनुत्तम
उद् वयं तमसः परि ज्योति: पश्यन्त उत्तरम् । देवं देवत्रा सूर्यम् अगन्म ज्योतिर् उत्तमम् ॥

या मंत्रांत उत् उत्तर आणि उत्तम ही पदें आली आहेत. त्यांत उत्तम पद श्लिष्ट आहे. उत्तम म्हणजे सर्वोच्च तसें सर्वश्रेष्ठ हि. सूर्योदयाच्या वेळी नैश तमाच्या माथ्यावर पाय देऊन वर आलेल्या बालसूर्याचे निरीक्षण करीत, त्यानंतर उत्तरोत्तर चढत जाणांच्या त्याच्या बिंबाचे अनुदर्शन करीत, मध्याह्रीं तळपणाऱ्या सर्व देवांचा देव असणाऱ्या त्या सहस्ररश्मि सूर्याला आपण जाऊन पोंचूया असें या मंत्रांत संकल्पिलें आहे. हा आधिभौतिक अर्थ झाला. त्याचा आधिदैविक आणि आध्यात्मिक अर्थ अनुक्रमें घ्यावयाचा आहे. ते अर्थ हि मंत्रांतील उत्उत्तर आणि उत्तम पर्दानी सुचविलेच आहेत. पण इथे तर परमात्म्याला अनुत्तम म्हटले आहे ! तो वेगळा नाही. जो उत्तम तोच अनुत्तम. उत्तम खालून वर पाहतांना, अनुत्तम वरून खाली पाहतांना. अनुत्तम म्हणजे ज्याहून उत्तम, वरचढ कोणी नाही तो. अर्थात् तोच उत्तम होय, परमेश्वराहून ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ कोण आहे. ? म्हणून तो अनुत्तम म्हटला आहे. वस्तुतः अनुत्तर असा शब्द हवा. पण त्या शब्दाचा वेगळा अर्थ होईल असे वाटून की काय अनुत्तम म्हटले. वस्तुत: सर्व जीव अनुत्तम आहेत. परमेश्वर उत्तम आहे, अनुत्तर आहे. जो उत्तम तो अनुत्तम कसा होणार ? म्हणून अनुत्तम म्हणजे अनुत्तर समजावयाचे.

८१. दुराधर्ष
दुराधर्ष म्हणजे अधृष्य. ज्याच्याशी सलगी करतां येत नाही असा. परमात्मा अव्यक्त-स्वरूप आहे. त्यामुळे त्याच्याशी कोणी धृष्टता करूच शकत नाही. परक्याचा मुळी तिथे लागच नाही. तो केवळ स्वसंवेद्य आहे. त्यामुळे तो दुराधर्ष आहे.

आईशी परिचयच नव्हे सलगी असते. त्यामुळे तिचा अनादर पडतो. बापाशी परिचय असला तरी सलगी होत नाही. त्याच्याशी सर्व व्यवहार जरा दुरुन आणि जपूनच होतात. त्याचा अनादर होत नाही. व्यक्तीशी सलगी केल्याबद्दल आणि त्यातून अनादर घडल्याबद्दल अर्जुनाला क्षमा मागावी लागली आहे. शंकराचार्यांच्या पुढील कवनांत सविनय समर्पण आहे, पण सलगी नाहीं, धृष्टता नाही. अविनय नाही.

सत्यपि भेदापगमे नाथ तवाहं न मामकीनस्त्वम् ।
सामुद्रो हि तरङ्गः क्वचन समुद्रो न तारङ्गः ॥ (षट्पदी)

परमेश्वराच्या जवळ सगळेच जाऊ शकतात-पापी आणि पुण्यशील, सज्जन आणि दुर्जन, पण त्याच्याशी सलगी आणि धृष्टता कोणीच करू शकत नाही. अंधकार सूर्याशी सलगी आणि धृष्टता काय करणार ? पण किरण हि करू शकत नाही. तो हि सविनय समर्पणच करू शकतो.

८२. कृतज्ञ कृत म्हणजे आकृत, व्यक्त. तें जो जाणतो तो कृतज्ञ. परमेश्वर जो सर्वान्तर्यामी तो चराचर प्रत्येक घटनेला, प्रत्येक व्यक्तीला, जाणतो; कारण त्याच्याच अध्यक्षतेखाली सर्व घडत असते. गीतेने म्हटलेंच आहे

"मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम्" -गीता ९ - १०

तसेच आणखी म्हटले आहे

"वेदाहं समतीतानि वर्तमानानि चार्जुन । भविष्याणि च भूतानि मां तु वेद न कश्चन ॥ " गीता ७ - २६

परमेश्वर, कृत-ज्ञ आहे, पण कोणतेहि कृत, म्हणजे चराचर भूत, त्याला जाणत नाही. कारण तो स्वत:च विज्ञाता आहे. तो ज्ञेय होऊ शकत नाही, जड होऊ शकत नाही. "विज्ञातारं अरे केन विजानीयात्" असे श्रुति कंठरवाने सांगत आहे.

लौकिक अर्थाने हि तो कृतज्ञ म्हणजे उपकृतज्ञ आहेच; भक्ताने केलेलें अल्पहि बहु मानणारा आहेच. द्रौपदीचे पत्र, गजेन्द्राचे पुष्प, शबरीचे फल, रंतिदेवाचें तोय ग्रहण करून तो धाला आहे आणि उत्तम गति देता झाला आहे.

सर्वांतर्यामी असल्यामुळे परमात्मा जीवाचे केलेलें सर्व पुण्यापुण्य जाणत असतो. त्याहि अर्थानि तो कृत-ज्ञ म्हणजे वृत्त-ज्ञ आहे.

८३. कृति
आ-मूलचूल सर्व वृक्षाकार जसें बीजच होय, तसा हा विश्वाकार हि परमात्म-स्वरूपच आहे. जी जी कृति ती ती सारी कर्त्याची आकृति होय, व्यक्ति होय, संकल्प क्रिया कर्म हा सर्व कर्त्याचाच विस्तार होय. आणि कर्ता ज्या अर्थी एक परमात्माच आहे त्या अर्थी सर्व कृति हि त्याची आहे. कृतिमात्र त्याचे रूप आहे, म्हणून तो कृति. 'सिद्धीचे साधन कृति आहे. परमात्म्याचा संकल्प हि कतिच आहे. ज्ञान्याचा वाक्य-विचार, योग्याचा चित्त-निरोध, भक्ताची नवविध भक्ति ही सर्व कर्मेंच होत. कर्मयोग्याचे स्वधर्माचरण तर उघडच कर्म आहे. सारांश, साधनमात्र कर्ममय आहे, कृतिरूप आहे. परंतु ह्या कृतीचाच जे निषेध व निरोध करतात ते निवृत्तिग्रस्त नैकृतिक होत. नैकृतिक म्हणजे घातकी, आत्मघातकी. गीतेने अशांनाच अयज्ञ म्हटले आहे आणि अशा यशहीन जनांना हा लोक हि फळत नाही, मग तो परलोक कुठला ? असा निरुत्तर करणारा प्रश्न केला आहे. " नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम "-गी. ४-३१. कृतीचा अनादर म्हणजे परमेश्वराचाच अनादर होय. कृतिख्य परमेश्वराला आपली सुकृति समर्पून जीव सिद्धि मिळवतो. "स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानव:"-गीता १८ - ४६

८४. आत्मवान्
आत्मवान् म्हणजे आत्ममहिम्यानें संपन्न. जीव हा आत्मरूपच आहे. पण अज्ञानानें तो आपल्याला भलतेच काहीतरी समजून बसला आहे. त्यामुळे दीन झाला आहे. मेंढ्यांच्या कळपांत सापडलेल्या सिंहशावकाप्रमाणे तो सिंहगर्जना विसरून में करीत आहे. जेव्हां पिता सिंह त्याचा कान धरून त्याला सांगतो की लेका तूं मेंढरूं नाहीस, सिंह आहेस ! माझ्यासारखा सिंह आहेस ! पहा ! आणि असें म्हणून सिंहगर्जना करतो आणि त्याला हि करायला लावतो, त्यावेळी शाबकाचें निजरूपाविषयीचे अज्ञान दूर होऊन त्याला आत्मप्रतीति येते. असा आत्मप्रत्ययसंपन्न जो झाला तो आत्मवान् होय. असा प्रत्यय जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत जीवाचे दैन्य हि सरत नाहीं, जीव आणि शिव यांमधील फरक एवढाच, शिव हा सदैव आत्मवान् आहे, आत्मप्रत्ययसंपन्न आहे तर जीव मिथ्याभिमानाने स्वमहिम्यापासून चुत झालेला आहे. ज्याक्षणी त्याचा मिथ्याभिमान गळेल, त्याक्षणी तो आत्मवान् होईल. होईल म्हणजे पूर्वी नसलेला नव्याने होईल असे नव्हे, तर असलेलाच जणू होईल. "तो आत्मभूत होईल, आत्मीभूत होणार नाही. तो ब्रह्मभूत होईल, ब्रह्मीभूत होणार नाही. " अभूततद्भावे च्विः: " त्याला लागणार नाही. दारु भस्मीभूत होते. कारण दारु म्हणजे लाकूड आधीं आहे, त्याहून भस्मावस्थेत भिन्न झाले आहे. जें नव्हते ते झाले आहे. तसे इथे नाही. जे आहे तेंच आहे. पण नव्याने उपलब्ध झाले आहे, प्रतीत झालें आहे इतकेंच. आत्मा सर्वच आहेत, पण आत्मवान् एक परमात्माच आहे. जो निरंतर आत्म-प्रत्यय-संपन्न आहे, तो निरंतर "स्वे महिमि" प्रतिष्ठित आहे.

सुरेशः शरणं शर्म विश्वरेताः प्रजाभवः ।
अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः ॥१०॥


८५. सुरेश
सुर म्हणजे देव. प्रकाशाचे प्रतिनिधि. जिथे जिथे प्रकाश आहे, तिथे तिथे सुरतत्त्व आहे. काजव्यांत प्रकाश आहे, तारकेंत प्रकाश आहे, चंद्रांत प्रकाश आहे आणि सूर्यातहि प्रकाश आहे. प्रकाशकत्वामुळे हे सारेच देव आहेत. परंतु हे सर्व देव अंशभूत आहेत. अंशी परमात्मा आहे. त्याच्याच प्रकाशाने हे सर्व प्रकाशत आहेत. त्यामुळे परमात्मा हा सर्व सुरांचा ईश म्हटला आहे. गीतेत म्हटलेच आहे:-

यद् आदित्यगतं तेजो जगद् भासयतेऽखिलम् ।
यच् चन्द्रमसि यच चाग्नौ तत् तेजो विद्धि मामकम् ॥ गीता १५-१२

हा आधिभौतिक प्रकाश झाला, त्याच्या अनुग्रहकारी अधिदेवता सूक्ष्मतर आहेत आणि त्यांचे आध्यात्मिक स्वरूप परमात्म्याच्या ठाई केन्द्रित झाले आहे. भौतिक प्रकाश बाहय वस्तु प्रकाशित करतो आणि तो जड आहे. परंतु त्याचा उद्गम विभिन्न देवतांपासुन असून त्या चेतन आहेत आणि त्या सर्व चेतन-विशेषांचे जे निर्विशेष चेतन तें चिद्घन अध्यात्म होय आणि तोच सुरेश. तोच देवाधिदेव भगवान् विष्णु, जो अंतर्बाहय - सर्वच प्रकाशित करतो. गीतेत म्हटलेच आहे

यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः ।
क्षेत्र क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥ गीता १३ - १३

कृत्स्न म्हणजे नखशिखांत आणि अंतर्बाहय,

८६. शरण
शरण म्हणजे थारा, निवारा, जीव दिवसभर धडपड करतो आणि रात्रीं थाऱ्यास, निवाऱ्यास येतो. तिथे त्याच्या देह-मन: प्राणांस विसांवा मिळतो. तो निर्भय आणि निश्चित होऊन तियें सुखाने पहुडतो. सर्व जीवांचे असें जें परम विश्वामधाम आहे, जिथे पोंचून त्याचे जन्मोजन्मीचे सारे अपमान, दु:ख आणि दैन्य नाहीसे होते आणि तो परमानन्दाचा धनी होतो ते म्हणजे परमात्मा होय, इतर शरणे ही अशी नाहींत. म्हणून केवळ एक तोच परमात्मा, शरण म्हणावयाचा, इतर जी कोणती शरणे आहेत ती सारी अनित्य आणि म्हणून दुःखरूप आहेत. त्यामुळेच स्वर्गाचे सुखहि सुळावरचीच पोळी होते. तिने कोणाच्या तोंडाला पाणी सुटेल ? एखादी वस्तु नित्य आहे म्हणूनच ती सुखावह होईल, असे हि नाही. संसार शाश्वत झाल्यास काय तो सुखावह होईल ? उलट तो अशाश्वत आहे, हा त्याचा मोठाच उपकार होय. जे नित्य हि आहे, सुखरूप हि आहे, ते जर परके असलें तर मनुष्याला त्याच्यासाठी कष्ट सायास पडतील. परंतु ते जर आत्म-अभिन्न असेल तर अयललब्ध होईल आणि तेच खरें शरण होय. सर्वांतर्यामी परमात्मा हा तसा आहे. म्हणून तो शरण.

बुद्ध मेला, संघ गेला, धर्म परागंदा झाला त्याला शरण जाणार कसे ? बुद्ध ज्याला शरण गेला तो सर्वांतर्यामीच सर्वशरण्य होय.

८७. शर्म
कृ कर्मन्, धृ धर्मन्, वृ वर्मन् तसा शृ शर्मन् शब्द साधला आहे. कर्म म्हणजे काम, धर्म म्हणजे यज्ञ, वर्म म्हणजे चिलखत, तसें शर्म म्हणजे कल्याण, सुखकर गोष्ट. जें जें सुखावह तें तें भगवद्रुप आहे. आणि सुखावह काय आहे ? जे में दुःखरूप आहे त्याचा त्याग. शर्म शब्द हाच त्याग, हाच दुःख-वियोग सूचित करतो. असा दु:खवियोगाचा उद्योग करता. करतां शेवटीं जें निष्पन्न होतें तें आत्मरूपच शर्म होय. तदितर सारे अनात्म, अनित्य, दु:ख होय. पण हे जीवाच्या लक्षांत एकाएकी येत नाही. तो सुखाचे प्रयोग करीत राहतो. त्या प्रयोगांतूनच त्याला सुख म्हणून कवटाळलेल्या देह-गेह-स्नेहाचा दु:ख म्हणून त्याग करीत करीत अखेर स्वरूपाशी येऊन थांबावें लागते आणि तिथेच त्याला शर्म लाभते.

८८. विश्वरेता
परमेश्वर विश्वरेता आणि विश्वयोनि दोन्ही हि म्हटला आहे. या विश्वाचे निमित्तकारण आणि उपादान कारण तोच आहे, विश्वाचा पिता आणि माता तोच आहे. विश्वरेता, शब्दाने त्याचे बीजप्रदत्व वर्णिलें आहे. विश्वयोनि शब्दाने त्याचे विश्वमातृत्व निरुपिलें आहे. मूल आई-बाप दोहोंचें हि असते. परंतु तें नांव पित्याचेंच लावतें. कारण त्याच्याच बीजाचे तें असते, त्याचेच तें औरस असते. तसें विश्व हे परमेश्वराचें औरस आहे, प्रकृति त्याची माता भलें असो. गीतेत म्हटलेंच आहे

मम योनिर्महद् ब्रह्म तस्मिन् गर्भ दधाम्यहम् ।
संभवः सर्व-भूतानां ततो भवति भारत ॥ गीता १४- ३

अर्थात् परमेश्वर धाता आहे आणि प्रकृति धारिणी आहे. हे चराचर सारें विश्व त्याचे संतान आहे. तथापि त्या संतानाने आपण मृतजात नसून अमृतजात आहों, "अमृतस्य पुत्रः" आहों हे विसरता कामा नये. त्याने हे सदैवच स्मरले पाहिजे -सकाळीच नव्हे- की "
तद् ब्रह्म निष्कलमहं न च भूत-संघ:" शंकराचार्य : प्रात:स्मरण.

- ८९. प्रजाभव
प्रजाभव म्हणजे या नानाविध जीवसृष्टीचा उदय. स्वेदज, अंडज, जरायुज आगि उद्भिज्ज अशा चार जीव-खाणी मानिल्या आहेत. या चतुर्विध प्रजा अथवा मानवांतील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रादि चतुर्विध प्रजा. सार्‍या परमेश्वरापासून उत्पन्न झालेल्या आहेत. त्या परम पुरुषापासून प्रकट झाल्या आहेत. म्हणून परमेश्वर प्रजाभव म्हटला आहे. कित्येक शब्द नित्य-बहवचनी असतात. जसे सिकता, अक्षता इत्यादि. प्रजा शब्दहि तसाच नित्य-बहुवचनी आहे. कारण, एका कणाने वाळू होत नाही. अक्षता म्हटल्या की त्या बहुच असावयाच्या. एक दाणा कधीं अक्षत म्हटला जात नाही. त्याच प्रमाणे ही जीवसृष्टीहि एका खाणीची वा वर्णाची असत नाही. ती नानाविध आणि असंख्य अशीच सदैव दिसून येते. म्हणून प्रजा शब्द हा नित्य बहुवचनी आहे. परमेश्वर अशा या बहुविध प्रजांचा उद्भव आहे.

सर्व प्रजांचा परमेश्वरच एक पिता असल्यामुळे, कोणीहि दुसर्‍याहून आपण श्रेष्ठ आहों, असें म्हणतां कामा नये. कारण सर्वांचे मूळ एकच आहे. सर्व शेवटी त्याच्यांतच विलीन व्हावयाचे आहेत. म्हणून त्याहि दृष्टीने सर्व निर्विशेषच होत. मध्यंतरी नाना रूप-गुण-कर्माची जी उपाधि, जीवा-जीवांत भेद करते, ती मृगजळाप्रमाणे निर्मूल पण सान्त अशी मध्येच, भासत असते. तिने आपण भ्रांत होता कामा नये आणि" सर्वभूत-हिते रती " पासून च्युत होतां कामा नये. मशक आणि महर्षि समदृष्टीने पाहिले पाहिजेत.

समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् ।
न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥ गीता. १३- २८

बन्धुत्व केवळ मानवांतच मर्यादित राहूं नये तें जीवमात्रापर्यंत भिडवले पाहिजे. किंबहुना जीवाजीव विचार ओलांडून गेले पाहिजे.

९०. अह:
अहः म्हणजे दिवस. अहोरात्र मिळून होणारा कालखंड, संवत्सररूप कालचक्राचा एक दांता. कालाश्वाला आमच्या जीवनाचा रथ जुंपला आहे. आणि तो अविराम निरंतर धावत चालला आहे. जे त्यांत अप्रमाद आणि ध्यान यांच्या योगें आरुढ होतात त्यांची सुखयात्रा होते. ते अहन् (अहरचेच एक रूप) म्हणजे अन्-आत्महन् होत. जे प्रमादी ते रथाबरोबर फरफटले जातात, रथचरणतळी तुडवले जातात, ते आत्महन् होत. ह्याच अहोरात्रिरूप शुक्लकृष्ण गति होत. " शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते । एकया यात्यनावृत्तिं अन्ययाऽऽवर्तते पुन: ॥ " गीता ८-२६ . "नित्य नवा दीस जागृतीचा" असें झालें पाहिजे. असें जे जाणतात ते अहोरात्र-वेत्ते कालोपासक होत.कालात्म्या परमेश्वराचें कृपावलोकन त्यांनाच लाभते.

अह या नामाचीं अनेक रूपे आढळतात. अह, अहन् अहस्, अहो, अहः, अह्न प्रातिपदिक या दृष्टीने अहर्‌ पेक्षा कदाचित् अहन् च योग्य म्हणावें लागेल, पूर्वाह्न, मध्याह्न, सायाह्न, अह्नाय इत्यादि शब्दांत अहन् चे च दुसरें अकारान्त रूप अह्न बहुप्रचलित दिसते. द्वादशाह, पुण्याह इत्यादि शब्दांत न गळाला आहे.

" नायं हन्ति न हन्यते " गीता २- १९ हे लक्षण लक्षून हि अहन् हे नाम परमात्म्याला सुयोग्यच म्हटले पाहिजे. अर्थात् धातु विचाराने हि अहन् हे रूप चिन्त्य आहे.

हन् धातूचे अकरण रूप मानायचे नसल्यास अह् (५प.) धातू पासून अह अहन् अन शब्द आले असें म्हणता येईल. अह्नोति, व्याप्नोति इति अहः वा अहन् .

९१. संवत्सर
संवत्सर म्हणजे ऋतुचक. सर्व ऋतूंचें एक आवर्तन. तें समवत् सरतें. जिथून निघतें तिथे बरोबर त्याच वेळी येऊन पोंचते. म्हणून ते संवत्सर म्हणावयाचे. वत्सर, संवत्सर, परिवत्सर ही सर्व वर्षाची नावें होत. जें १२ मासांत (३६५ दिवसांत) पूर्ण होते तें संवत्सर, जे त्याहून कमी मासांत (दिवसांत पूर्ण होतें तें वत्सर आणि जें त्याहून अधिक मासांत पूर्ण होतें तें परिवत्सर होय. ३० दिवसांचा सामान्य मास आणि १२ मासांचें वर्ष, ह्या सामान्य वा सर्वमान्य गणिताने ३६० दिवसांचें वर्ष होतें.. म्हणूनच आपले वर्तुळ वा वृत्त ३६० अंशांचें कल्पिलें गेलें.ह्या वत्सरवृत्ताचा एक अंश म्हणजे दिवस आणि अशा दिवसरूप सर्व अंशांचे मिळून बनलें तें संवत्सररूप वृत्त. हे कालसंयंत्रांतील एक चाक होय. कल्प, युग, संवत्सर, मास, पक्ष, दिन आणि घटिका, पळें, विपळे इत्यादि त्या संयंत्रातील लहान-मोठी चाके होत. या सर्वाचे. अव्यक्त चेतन प्रेरक तें कालतत्त्व होय. सूर्यात्मा संवत्सर हा त्याचा प्रतिनिधि होय. जे दिनचर्या, ऋतुचर्या इत्यादि कालोपासना करीत नाहींत ते कालवश होऊन विनाश पावतात. जे कालानुसरण करतात ते काल-कृपेस पात्र होऊन जीवनांत सुखलाभ करून घेतात. हे सर्व संवत्सरफल होय.

९२. व्याल व्याल म्हणजे सर्प, व्याल म्हणजे हत्ती. इथे व्याल म्हणजे सर्प असा अर्थ संनिकर्षाने प्रतीत होतो. "अहः संवत्सरो व्यालः" या चरणांत सर्व शब्द काल-वाचक दिसतात. म्हणून व्याल म्हणजे काळ-सर्प असा अर्थ निष्पन्न होतो. या सर्पाचे नांव शेष वा अनन्त हा सर्प सृष्टीचा वास करुन शेष राहतो म्हणून शेष. सर्वांचा अंत झाला तरी हा शेष राहतो, म्हणून अनन्त. परमात्म्याची ही कालशक्ति त्या शक्तिमंताला आपल्या अंगावर धारण करते. नव्हे, शक्तिमंत हा आपल्या शक्तीवर पहुडला असतो. जो सर्वाधार त्याला दुसरा आधार कोणता ? तो "स्वे महिम्नि" प्रतिष्ठित असतो. पण या काल-शक्तीला सर्प का म्हणावयाचे ? कारण सापाप्रमाणे तो अलक्षित सरपटत येऊन ग्रासत असतो, तो सापाप्रमाणे अनिमेष, अतंद्रित असतो. तो साप्रमाणे कात टाकून सदैव नवा, ताजातवाना राहतो. साप्रमाणे तो अमृतपायी, अमर आहे. या आणि अशा अनेक सर्प-गुणांमुळे काल हा व्याल म्हटला आहे. काल-व्याल म्हणजे परमेश्वराची संहारशक्ति होय, शक्तीहून शक्तिमंत वेगळा आणि उत्तम असून प्रत्यक्षात दोन्ही एकरूपच होत." वि विशेषेण विविधम्, आ निश्चयेन, अलति भूषयति इति व्यालः". सर्प हा विशेष करून शोभिवंत दिसतो म्हणून हि तो व्याल म्हटला आहे. मृत्यु हा पुष्कळदा अतिशय आकर्षक रूपाने जीवांना आपल्याकडे खेंचीत असतो.

संत नानकांचे वचन आहे : " काल व्याल जो पो डोले मुख पसारे मीत| रे मन राम सों कर प्रीत ॥ " काळ-सर्प जबडा पसरून अरे तुला गिळायला टपून बसला आहे. तेव्हा हे मना, तूं रामाची भक्ति कर.

९३. प्रत्यय
परमात्मा हा प्रत्यय म्हणजे प्रतीतिस्वरूप आहे. ज्ञान जें ज्ञेयज्ञातृविभागाने होतें तें बाह्य असते. परंतु प्रत्यय हा अभेदाने होतो. त्यांत ज्ञेय आणि ज्ञाता अभिन्नच असतात. म्हणून परमात्मा हा प्रत्ययस्वरूप होय, ज्ञप्तिमात्र होय.

बाह्य ज्ञान हि वस्तुतः प्रत्यय-स्वरूपच असते. रूप नेत्राच्या वाटें दर्शनेंद्रियाप्रति येते आणि नेत्रवंताला रूपाचे ज्ञान होते म्हणजे त्याचा प्रत्यय होतो. विषयाचा विषयी 'प्रति' हा जो 'अय' तोच प्रत्यय होय आणि त्यालाच ज्ञान म्हणून म्हणतात.

अशा प्रकारे बाहय ज्ञान आणि आत्मज्ञान यांच्या ज्ञानक्रियेत फरक नाही. फरक फक्त ज्ञान-विषयांत आहे. ही जी विषयनिरपेक्ष ज्ञप्ति, केवल ज्ञप्ति, तोच वस्तुतः प्रत्यय होय आणि तोच केवल-स्वरूप परमात्मा होय. म्हणूनच त्याला प्रत्यय म्हणावयाचे.

९४. सर्वदर्शन
सर्वदर्शन म्हणजे सर्वसाक्षी, परमात्मा हा का सर्वाची हेरगिरी करणारा आहे ? नाही. तो हेरगिरी करीत नाही, पण कोणती हि गोष्ट त्याच्या नजरेतून, त्याच्या जाणिवेतून, सुटूंच शकत नाही. कारण तो सर्वांचा अंतर्यामी आहे. मी आपल्यालाच कळू न देता कांहीं करणे शक्य नाही. मी जागृतींतील सर्व व्यापार जाणिवेनेंच करीत असतो. स्वप्नांचाहि मीच द्रष्टा होतो. सुषुप्तीचे सुख हि मीच अनुभवतों आणि म्हणतों, काय छान गाढ झोप लागली होती ! सारांश, मी म्हणवणारा अंतर्यामी तिन्ही अवस्थांचा साक्षी आहे. म्हणूनच तो सर्व-दर्शन म्हटला आहे. हरिश्चंद्राने हे सर्व-साक्षित्व ओळखून आपण स्वप्नांत प्रतिश्रुत केलेलें दान प्रत्यक्षांत, जागृतींत निर्वाहिलें. तो स्वप्नांत हि खोटे बोलत नाहीं असें हरिश्चंद्रासारख्याविषयी आपण विधान करीत असतो. ज्याला सर्वांतर्यामी परमेश्वराचे सर्व-साक्षित्व पटलें तो मला कोणी पाहत नाही म्हणून पाप कसे करील ? तो पापाचा विचार हि मनांत आणू शकणार नाही, कारण, परमात्मा सारे पाहत आहे काय क्रिया, काय संकल्प !

॥ हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् हरिः ॐ तत्सत् ॥

GO TOP