|
ॐ श्रीपरमात्मने नमः
श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा
प्रास्ताविक
प्रास्ताविक श्लोक
वैशम्पायन उवाच : श्रुत्वा धर्मान् अशेषेण पावनानि च सर्वशः । युधिष्ठिरः शान्तनवं पुनरेवाभ्यभाषत ॥ १ ॥ अर्थ : वैशम्पायन म्हणाला - सर्व धर्म आणि आत्मशुद्धिकारक सर्व यज्ञदानादि श्रवण करून झाल्यावर युधिष्ठिर शंतनुपुत्र भीष्माकडे पुनरपि येऊन म्हणाला : टिप्पणी १. धर्म : वर्ण-धर्म, आश्रम-धर्म, राजधर्म, गृहस्थधर्म आणि यतिधर्म इत्यादि समाजांतील सामान्य आणि विशिष्ट व्यक्तींची विविध कर्तव्यें. २. पावनें : वर्णाश्रमधर्म हे स्वभावनियत असून त्यांनाच स्वधर्म म्हटले जाते. ही शरीरयात्रेसाठी केली जाणारी सामान्य कर्मे होत. या आपआपल्या वर्णधर्मांहून व आश्रमधर्मांहून वेगळी आणि आत्मशुद्धीच्या विशिष्ट हेतूने आचरिली जाणारी जी स्वाध्याय-यज्ञदान-तपोरूप कर्में तीं औपासनिक कर्में होत. यांनाच पावनें म्हणजे पुण्यकर्में, म्हटले आहे : 'यज्ञो दानं तपश्चैव पावनानि मनीषिणाम्' ही विशिष्ट कर्में कोणी शरीरयात्रेसाठी आचरीत नाहीं, जो शुद्धिकाम असेल तोच ती आचरतो. पूज्य विनोबांनी यांनाच (सामान्य) कर्म आणि विकर्म अशा संज्ञा दिल्या आहेत. ३. अशेषेण, सर्वश: 'अशेषेण' म्हणजे झाडून सर्व, नि:शेष सर्व. आणि सर्वशः म्हणजे सांगोपांग, समग्र धर्म सांगतांना कोणाचा कोणता हि लहान-मोठा धर्म सांगायचा उरला नाही. तो साद्यन्त समग्र सांगितला. ४. पुनरेव : एकदां संपूर्ण ऐकून झाल्यावर युधिष्ठिर पुनरपि भीष्मांकडे येतो. कांहीं तरी अनुक्त अवशिष्ट राहिले आहे, तें ऐकण्याच्या हेतूनें तो पुनरपि परिप्रश्न करतो. इथें प्रश्न असा उठतो की, स्वधर्म नि औपासनिक कर्म सांगून झाल्यानंतर खरोखर सांगायचे काय शिल्लक उरतें ? प्रश्नाला वाव कुठे राहतो ? ग्रन्थकाराला काय विवक्षित आहे ? व्यासांना इथें भक्तितत्त्व प्रतिपादावयाचे आहे. भक्तीचा जिव्हाळा ही वेगळीच किमया आहे. स्वधर्म हे एक कर्म आहे. यज्ञ-दान-तपें हि विशिष्ट खरी पण कर्मेंच आहेत. त्या दोहोंहून हि भक्ति हे तत्त्व वेगळेंच आहे. तें कर्म नाही. तें विकर्म नाहीं. तें अकर्म आहे. आणि म्हणून तें वरील दोहोंत बसत नाही. तो अंतरतर हृदयधर्म आहे. सर्व पावनांत भक्ति परमपावन आहे. रिठे व पाणी यांनी कपडे धुतले जातात. चित्त धुण्याच्या कामी इतर पावनें ही रिठ्यासारखी आहेत, तर भक्ति ही पाण्यासारखी आहे. नुसत्या पाण्यानें हि कपडे धुतले जातील, पण पाण्यावांचून नुसत्या रिठ्यांनी वा सोडा-साबणानें कपडे साफ होणें नाहीं. तसें भक्तीवांचून चित्तशुद्धि नाही. भक्तीसोबत इतर पावनें असली तर 'अधिकस्याधिकं फलम्' म्हणावयाचे. असें जें तें परम पावन भक्तितत्त्व त्याचे प्रतिपादन करण्यासाठी, त्यावर विशेष भर देण्यासाठी, परम भागवत भीष्माच्या मुखाने व्यासांनी विष्णुसहस्रनाम सांगितलें आहे. भीष्माची परम भागवतांत जी गणना झालेली आहे त्याचे कारण हि हे विष्णुसहस्रनाम आहे असे म्हणता येईल. महाभारतानंतर व्यासांनी भागवत लिहिलें त्यांत हि भक्तीचे तत्त्व प्रतिपादणें हाच हेतु आहे. भागवत म्हणजे भगवत्स्तुति-रत्नाकरच. ठिकठिकाणी त्यांत प्रसंग साधून स्तव केलेला आहे. खरोखर त्यासाठींच, भगवद्यशोगानासाठींच, भागवंताची रचना झाली आहे. व्यासांच्या जीवनांत आणि कृतींत त्याची उणीव राहून गेली होती. त्यामुळें सर्व धर्मकर्म करूनहि त्यांना पूर्ण प्रसन्नता नव्हती. पण ती कशामुळे हे त्यांच्या लक्षात येत नव्हते. देवर्षि नारदाने ते त्यांच्या ध्यानांत आणून दिलें : भवतानुदितप्रायं यशो भगवतोऽमलम् । येनैवासौ न तुष्येत मन्ये तद्दर्शनं खिलम् ॥ नारद म्हणतात, हे महर्षि व्यासा, तुम्हीं वेद-विभाग केले. त्यांचा अर्थ सामान्य जनांना कळावा म्हणून महाभारताची रचना केली. असे सर्व कांहीं तुम्हीं केलें, सांगितलें, परंतु भगवंताचें निर्मल यश तुम्ही अद्याप फारसे गाइलेलें नाही. त्याचे स्तवन, नामसंकीर्तन अद्याप तुम्ही यथेच्छ केलेले नाही. तुम्हांला इतकें सारें करूनहि जी असंपन्नता, अप्रसन्नता वाटत आहे, त्याचे कारण हे आहे, असे मला वाटते. तें जें अनुक्त, तें ऐकिण्यासाठी धर्मराज पुनरपि भीष्माकडे आले आहेत, आणि भीष्मांनी त्यांना तें नामसहस्राच्या रूपाने सांगितले आहे. आणि हाच, भक्तीचा, सर्वश्रेष्ठ धर्म होय, असे प्रतिपादिले आहे. म्हणजे (१) . वर्णाश्रमधर्मरूप बाह्य स्वधर्म, (२) स्वाध्याय, यज्ञदानतपोरूप आन्तरिक औपासनिक धर्म आणि (३) जिव्हाळ्याचें भगवन्नामस्मरण हा अन्तरतर धर्म मिळून धर्म-दर्शन पूर्ण होते. यांत उघडच उत्तरोत्तर धर्म सूक्ष्म आणि श्रेष्ठ आहे. म्हणूनच परम भागवत भीष्माचार्यांनी आपलें निःसंदिग्ध मत दिले आहे : एष मे सर्व-धर्माणां धर्मोऽधिकतमो मतः । यद् भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैर् अर्चेत् नरः सदा ॥ भारतीय जीवन-दर्शनाचे हें मथित आहे आणि हे कुरुवृद्ध पितामह भीष्मांनी काढलेलें आहे. भारताच्या एकापेक्षा एक वरचढ लोकोत्तर विभूतींत भीष्मांचें स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांचे जन्म-कर्म दिव्य आहे. ते आदर्श योगी, ज्ञानी, भक्त होते. ते राज्यश्री आणि स्त्री यांचा परित्याग करूनहि अरण्यवासी मुनि झाले नाहींत, पण कमलपत्रवत् जगाच्या भर व्यवहारांत वागत राहिले. म्हणून ते आदर्श कर्मयोगी होते. जीवनाची सर्व शास्त्रे नि शस्त्रे यांत ते समान प्रवीण होते. म्हणून ते आदर्श ज्ञानी होते. मुत्सद्दी आणि लढवय्या मिळून पूर्ण शहाणा बनतो. तसे ते आदर्श पूर्ण शहाणे म्हणजे ज्ञानी होते. आणि या विश्वाचे नियमन करणारी जी अचिंत्य सत्ता त्या परमात्म्याचे ते निःसीम भक्त होते. म्हणून ते परम भागवत होत, परम भक्त होत. ते नैष्ठिक ब्रह्मचारी असल्यामुळे परम मातृभक्त होते आणि म्हणून ते पित्याच्या वराने इच्छामरणीहि होते. शरपंजरी राहून त्यांनी कालोपासना केली आणि योग्य काली उत्तरायणांत योग्याप्रमाणे प्रयाण-कालीन साधना करून परमात्म-स्मरण करीत देह ठेवला. अशा केवळ धर्ममय पुरुषाहून धर्माचे रहस्य अधिकारवाणीनें सांगणारा दुसरा कोण बरें अधिकारी पुरुष असूं शकेल ? म्हणून भगवान् कृष्णानें जिज्ञासु धर्मराजाला भीष्मांकडेच पाठविलें आणि त्या अस्तास जायला निघालेल्या ज्ञान-सूर्याकडून सर्व धर्मज्ञान संपादविलें. स्वतः सर्वज्ञ असूनहि धर्मोपदेशाचा अधिकार भीष्मांचाच मानिला. कृष्णाचा हा खोटा विनय नसून तो वयोज्येष्ठत्व, तपोनित्यत्व आणि ज्ञानश्रेष्ठत्व यांचा योग्य गौरव आहे. जणूं राजसूय यज्ञांत अग्रपूजेचा मान देऊन केलेल्या आपल्या गौरवाची कृष्णाने केलेली ही परतफेडच होय. युधिष्ठिर उवाच : किं एकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणम् । स्तुवन्तः कं कमर्चन्त: प्राप्नुयुर्मानवाः शुभम् ॥ २ ॥ को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः । किं जपन् मुच्यते जन्तुर् जन्म-संसार-बन्धनात् ॥ ३ ॥ अर्थ : युधिष्ठिर म्हणाला - २. या लोकांत एकमात्र (आराध्य) दैवत कोणतें आहे ? तसेंच एकमात्र (ध्येयभूत) परायण कोणतें बरें आहे ? कोणाची बरें स्तुति आणि अर्चना केली असतां मानव कल्याण पावतात ? ३. तुमच्या मतें सर्व धर्मांत परम धर्म कोणता आहे ? आणि कशाचा बरें जप केला असतां जीव भवबंधनांतून सुटतो ? टिप्पणी १. लोक : लोक म्हणजे इहलोक, हा मर्त्य लोक. लोक अनेक आहेत, पण इथें मानवांच्या दृष्टीने प्रश्न असल्यामुळे मर्त्यलोकांतहि आत्मज्ञानक्षम मनुष्ययोनि असा त्याचा विशेष अर्थ समजावयाचा आहे. २. दैवत : दैवत म्हणजे आराध्य देव. काया, वाचा, मनें ज्याची आराधना करता येते असा सगुण साकार देव. ३. परायण : परायण म्हणजे परम गति, परमपद. तें पद की जिथे गेले असतां पुनः संसरण होत नाही. तें निर्गुण निराकार ब्रह्म दैवत आणि परायण या दोन पदांनी सगुण निर्गुण दोन्ही रूपांचा उल्लेख केलेला असला तरी ती दोन्ही तत्त्वतः अभिन्न परस्परांगभूत आहेत. पहा गीता : अवजानन्ति मां मूढा मानुषीं तनुमाथितम् । परं भावं अजानन्तो मम भूतमहेश्वरम् ॥ ९-११ अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मां अबुद्धयः । परं भावं अजानन्तो ममाव्ययमनुत्तमम् ॥ ७-२४ नाणें नामरूपात्मक म्हणून तुच्छ लेखतां कामा नये. कारण तें (निर्गुण निराकार) सोनेंच आहे. सोन्याचे नाणे पाडलें म्हणून (निर्गुण-निराकारत्व रूप) सोनेपण नाहीसें होत नाही. सोनें तें सोनेंच आहे. नामरूपात्मक नाणेपणाने त्याचे काही बिघडत नाही. ४. शुभ : शुभ गति, स्वर्गादि पुण्यलोक, यथाकाल अन्ती मोक्षहि. मोक्षाचा उल्लेख 'मुच्यन्ते' पदानें केला आहे. ५. स्तुवन्तः अर्चन्तः जपन् : स्तुति, अर्चा, जप हे मुख्यतः वाक्-काय-मनो-धर्म होत. प्राण-देह-मनोधर्म म्हटले तरी चालेल. कारण वाणी ही प्राणक्रियाच आहे. ६. धर्म : धर्म म्हणजे आचार-धर्म. काय, वाक्, मन हे तीन कर्म-पथ आहेत. त्यांच्या द्वाराच सर्व कर्में होतात. म्हणून अर्चा, स्तुति, जप या पदांनी त्यांचा उल्लेख केला आहे. ७. जपन् मुच्यते : जप हाच परम धर्म आहे. त्यानें सर्व कर्मांचे मूळ मन भगवन्मय होते आणि तेंच मोचक होय. मन भगवन्मय झालें तर वाणी आणि करणीहि आपोआप तन्मय होईल असा अभिप्राय. प्रश्नांतच उत्तर सुचविलें आहे. पुढे प्रश्नानुरोधानें तसें स्पष्ट उत्तर दिले आहेच 'किं जपन् मुच्यते' हें असें कूट आहे. तो प्रश्न आहे उत्तरगर्भ. आणि उत्तर आहे प्रश्नगर्भ. किम् हे एक भगवन्नाम आहे. पहा-श्लोक ७८ एको नैक: सव: कः किम् ॥ ८. जन्तु : जन्तु म्हणजे जननशील जीव. आब्रह्मस्तम्बपर्यंतचा सगळा जीववर्ग. ९. इथे या दोन श्लोकांत युधिष्ठिराने अनेक प्रश्न विचारल्यासारखे दिसत असले तरी सामग्र्याने तो एकच प्रश्न आहे. सर्वोत्तम धर्म कोणता ? याची स्वभावतःच दोन अंगें होतात. उपास्य आणि उपासना. म्हणून तो विभागून विचारला आहे की एकमेव उपास्य दैवत कोणतें आणि त्याचा एकमेव उपासना-विधि कोणता ? पुढे उत्तर दिले आहे-पुरुषोत्तम आणि त्याचा नामसहस्ररूप स्तव. याचाच विस्तार भीष्माच्या उत्तरांत झाला आहे. भीष्म उवाच : जगत्प्रभुं देवदेवं अनन्तं पुरुषोत्तमम् । स्तुवन् नाम-सहस्रेण पुरुषः सततोत्थितः ॥ ४ ॥ तमेव चार्चयन् नित्यं भक्त्या पुरुषमव्ययम् । ध्यायंस् स्तुवन् नमस्यंश् च यजमानस् तमेव च ॥ ५ ॥ अनादिनिधनं विष्णुं सर्वलोक-महेश्वरम् । लोकाध्यक्षं स्तुवन् नित्यं सर्वदुःखातिगो भवेत् ॥ ६ ॥ ब्रह्मण्यं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्ति-वर्धनम् । लोकनाथं महद्भूतं सर्वभूतभवोद्भवम् ॥ ७ ॥ अर्थ : भीष्म म्हणाले : ४. सर्वलोकैकनाथ आणि देवाधिदेव तो जो सर्वतोनन्तरूप पुरुषोत्तम त्याचें पुरुषानें नामसहस्राच्या द्वारा नित्य उठून स्तवन करावें. ५. (ह्या प्रातःस्मरणानंतर स्नानादि आटोपल्यावर) त्या सनातन पुरुषाची भक्तिभावानें (षोडशोपचारें) पूजा करावी. तींत आधीं मनाने त्याचे ध्यान करावें, वाणीने त्याचे स्तवन करावे आणि शेवटी देहाने त्याला साष्टांग दण्डवत् प्रणिपात करावा. (हा झाला नित्य विधि. पर्वादिकांच्या निमित्ताने प्रसंगी) त्याचा यज्ञ करावा. महोत्सव करावा. ६, ७. भगवान् विष्णु हा सनातन पुरुष आहे. तो या चतुर्दश लोकांचा स्वामी आहे. त्यांचे निरीक्षण व पालनहि तोच करतो आहे. त्यांतील सर्व जीवांची उत्पत्ति त्याच्यापासूनच झालेली आहे. तो वेद नि वेदोपासक यांचा भक्त आहे, सर्व धर्माचा ज्ञाता आहे. तो लोकांना सद्बुद्धि, सदुक्ति आणि सदाचार यांची प्रेरणा देऊन त्यांची कीर्ति वाढवितो. खरोखर तो विश्वात्मा आहे. त्याचे नित्य स्तवन करणारा सर्व दुःखांतून मुक्त होतो. टिप्पणी : १. श्लोक ४ ते ७ हें एक कुलक आहे; चार श्लोकांचे मिळून एकच वाक्य. यांत षोडशनाममाला आली आहे. शेवटचा श्लोक तर केवल नाममयच आहे आणि तो विधेयानंतरहि जोडून दिला आहे. वेदांतील षोडशर्च पुरुषसूक्त प्रसिद्ध आहे. या सहस्राचेंहि मूळ तेंच सूक्त आहे. तिथून षोडश संख्येला आगळे महत्त्व आलेले आहे. त्याला अनुसरून षोडशोपचार, षोडशसंस्कार इत्यादि षोडशसंख्यक धर्मांची कल्पना केली गेलेली दिसते. षोडश नाममालाहि त्यापैकीच. अशी षोडशनाममाला रामरक्षेतहि आलेली. आहे. षोडशनाममाला-स्त्रोत्रें अन्यहि आहेत. इथे आलेली जणूं सहस्राची बीजभूत षोडश नाममाला अशी: (१) जगत्प्रभु, (२) देवदेव, (३) अनंत, (४) पुरुषोत्तम, (५) पुरुष, (६) अव्यय, (७) अनादिनिधन, (८) विष्णु, (९) सर्वलोकमहेश्वर, (१०) लोकाध्यक्ष, (११) ब्रह्मण्य, (१२) सर्वधर्मज्ञ, (१३) कीर्तिवर्धन, (१४) लोकनाथ, (१५) महद्भूत आणि (१६) सर्वभूतभवोद्भव. ही नाममाला बुद्ध्या षोडशसंख्यक कल्पिलेली नाही. तिचे संख्यान सहज आहे. सहजता झऱ्याप्रमाणे उदार असते, तिथे मोजमाप नसते. इथेंहि नाही. लाखोलींत संख्या महत्त्वाची नाहीं, दीर्घकाल नि नैरन्तर्य महत्त्वाची आहेत. तद्युक्त लक्ष म्हणजे ध्यान महत्त्वाचें आहे. तें भक्तांचे सहजच असते आणि म्हणून भगवंताचें नाम निघाले की त्यांच्या वाणीला पूर येतो. इथेंहि तो तसा आलेला आहे. लाखोली, 'लक्षावलि' शब्द श्लिष्ट आहे. (१)ध्यान-धारा, (२) लक्षसंख्यात्मक धारा असा दुहेरी अर्थ घ्यावयाचा. सहस्रावलींत ही खुबी नाही किंवा दशसहस्रावलीतहि नाही. २. पुरुष : पुरुष म्हणजे स्त्री वा पुरुष कोणीहि व्यक्ति; जीव. जीव म्हटल्यानंतर योनीचाहि प्रश्न उरत नाही. गजेन्द्रासारखे पशु नि जटायूसारखे पक्षीहि, तिर्यक् योनीतील जीवहि, भगवत्स्मरण करूं शकतात. ३. सततोत्थित : नित्य उठून आणि निरंतर अतंद्रित राहून प्रात:स्मरणांत कधीं अंतर पडूं देऊ नये. "आसुप्तेर् आमृते: कालं नयेद् वेदान्तचिन्तया' असा भाव. ४. ध्यायन् स्तुवन् नमस्यन् : ध्यान हे मानसिक, स्तवन वाचसिक आणि नमन कायिक कर्म होय. सारांश, सर्वात्मना भगवदुपासना करावी. ५. यजमान : ध्यान, स्तुति, नमस्कार हा नित्याचा विधि झाला. यजन हे पर्वविशेषीं करावयाचे. तो नैमित्तिक विधि होय. दोहोंच्या योगें तत्परता साधावयाची. ६. सर्वदुःखातिग : दुःखें आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक अशीं वर्गीकृत केलेली आहेत. यांच्या बाहेर दुःख नाही. ही सगळी दुःखें भगवदुपासनेने नाहीशी होतात. खरोखर होतात का ? आणि कशीं होतात ? कान्होपात्रा बन्धनांतून मुक्त झाली. दामाजीचे अर्थसंकट दूर झालें. कृष्णदयार्णवाचें कोड गेलें इत्यादि दाखले पुराणांत आणि संत-चरित्रांत आढळतात. हा सर्व भगवद्भक्तीचा परिणाम का ? होय आणि नाहीं. होय, असें : भगवद्भक्तीनें सर्वत्र समभाव येतो. तेव्हां सुख-दुःख, मानापमान, जीवनमरण, स्वर्ग-नरक सर्व समान होऊन जातात. आणि अशा प्रकारे सर्व दुःखांतून मुक्ति होते. जो भगवन्मय म्हणजे आत्मरूप झाला, ज्याला अनात्म देहाचा विसर पडला, त्याला देहानुगत दुःखाचे काय होय ? तो त्यांतून पार मुक्तच आहे. म्हणून म्हणावयाचें भगवद्भक्तीने जीव सर्वदुःखातिग होतो. नाहीं, असें : भगवद्-भक्ति कांहीं जादू नाहीं की तिने हवें तें होईल. तशी कल्पना ही एक मूढ श्रद्धा आहे. पाय मोडला तर शल्य-चिकित्सकाकडून शस्त्रक्रियादि करवून घेतल्यानेच तो ठीक होईल, रामनाम घेतल्यानें ठीक होणार नाही. कान्होपात्रा बन्धनांतून मुक्त झाली. कारण ती देहांतूनच मुक्त झाली. तसा भक्त जेव्हां अज्ञानजनित देहादियोगांतूनच मुक्त होतो तेव्हांच तो सर्व दुःखांतून मुक्त होतो. एरव्ही त्याला सर्व दुःखें इतरांप्रमाणेच भोगावी लागतात. तीं तो इतरांप्रमाणे देहासक्त होऊन रडत, कण्हत, कुथत, शापत सहन करणार नाही, तर वस्तु-तत्त्व जाणून अनासक्त बुद्धीनें तटस्थपणें डॉक्टर जसा दुसऱ्याचा उपचार करतो त्याप्रमाणे शक्यतेनुसार योग्य तो उपाय करून मोकळा होईल. त्यांत एखादे वेळेस त्याला यश मिळेल, पुष्कळदां मिळणार नाही. परंतु त्यामुळे तो दुःखी-कष्टी होणार नाही. आत्मवान् होऊन स्व-स्थ राहील. सर्वदुःखातिग होईल तो हा असा. एरव्हीं त्याला देहयोगाबरोबर येणारी सर्व दुःखें सहनच करावी लागतात. सहन करूनच सुटावयाचे आहे. एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः । यद् भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैर् अर्चेत् नरः सदा ॥ ८ ॥ अर्थ : हा मी सर्वधर्मात उत्तम धर्म मानतों की माणसाने नित्य भक्तिभावानें परमात्म्याची स्तवनाच्या द्वारें उपासना करावी. टिप्पणी १. धर्म : धर्म म्हणजे परमात्म-प्रीत्यर्थ आचारावयाचा विधि. ज्या योगे आत्मप्रसाद लाभतो तोच धर्म होय. ज्या विधीच्या आचरणानें परिणामी आत्मप्रसाद म्हणजे स्वरूपोपलब्धि होत नाहीं तो व्यर्थ श्रमच होय. २. सर्व धर्मांत उत्तम धर्म स्तवन वा नामस्मरणच कां ? कारण त्यांत यज्ञीय हिंसा नाही. दुसऱ्या कोणा होत्रादि सहायकांची अपेक्षा नाही. कसलें आज्यादि द्रव्य लागत नाही. अमुक तीर्थीं वा क्षेत्रींच करावें अथवा अमुक पर्व-तिथि-मुहूर्तावरच करावें असा देशकालाचा निर्बंध नाही. त्यांत हठयोगाचे शारीरिक कष्ट नाहींत. वेदान्ताचा सूक्ष्म वाक्य-विचार नाहीं. ते बौद्धिक विश्लेषण-क्लेश नाहींत. तिथे पाहिजे केवळ भाव आणि भक्ति, श्रद्धा आणि प्रेम. नामस्मरण हें असें अत्यंत स्वाधीन नि सोपें आणि त्याचबरोबर परम पुरुषार्थक्षम म्हणून परम समर्थ साधन होय. म्हणूनच गीतेनें म्हटले आहे - "यज्ञानां जपयज्ञोऽस्मि'. मनूनेंहि म्हटले आहे : जप्येनैव तु संसिध्येत् ब्राह्मणो नात्र संशयः । कुर्याद् अन्यत् न वा कुर्यात् मैत्रो ब्राह्मण उच्यते ॥ विष्णुपुराणांत आले आहे : ध्यायन् कृते, यजन् यज्ञैस् त्रेतायां, द्वापरेऽर्चयन् । यद् आप्नोति तदाप्नोति कलौ संकीर्त्य केशवम् ॥ सारांश, नामजप हा सर्वोत्तम धर्म आहे. आणि तो युगधर्महि आहे. सर्व साधुसंतांनीं नाम-स्मरणावर विशेष भर दिला आहे तो याच साठी. सर्वधर्मज्ञ भीष्माचार्यांचे हे सुनिश्चित मत आहे. परमं यो महत् तेजः परमं यो महत् तपः । परमं यो महद् ब्रह्म परमं यः परायणम् ॥ ९ ॥ पवित्राणां पवित्रं यो मङ्गलानां च मङ्गलम् । दैवतं देवतानां च भूतानां यो ऽव्ययः पिता ॥ १० ॥ यतः सर्वाणि भूतानि भवन्त्यादियुगागमे । यस्मिंश् च प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये ॥ ११ ॥ तस्य लोक-प्रधानस्य जगन्नाथस्य भूपते । विष्णोर् नाम-सहस्रं मे शृणु पापभयापहम् ॥ १२ ॥ अर्थ : ९. तो भगवान् विष्णु परम तेज, परम तप, परम ब्रह्म आणि परम पद आहे. १०. तो पवित्रांत पवित्र आणि मंगलांत मंगल आहे. तो देवांचा देव नि सर्वभूतांचा सनातन पिता आहे. ११. कल्पारंभी त्याच्याच पासून हीं सगळीं भूतें उत्पन्न होतात. आणि कल्पांन्ती त्यांत ती विलीन होतात. १२. आता मी तुला हे पृथिवीपते युधिष्ठिरा ! त्या सृष्टिकर्त्या सृष्टिनियन्त्या नि सृष्टिपालक भगवान् विष्णूच्या नामांचे सहस्र सांगतों, तें पाप आणि भय यांपासून सोडविणारें तूं मजपासून ऐक. टिप्पणी १. परम तेज : अग्नि, चन्द्र, सूर्य इत्यादि सर्व तेजें पर-प्रकाशित आहेत. स्वसंवेदनरूप आत्मप्रकाशन करण्याचे सामर्थ्य त्यांच्यांत नाही. तें सामर्थ्य केवळ चैतन्याचे आहे. तें चैतन्य स्वतःला जाणतें म्हणून इतरांनाहि जाणूं शकतें. जे स्वतःला जाणत नाहीं तें इतरांनाहि वस्तुतः प्रकाशित करीत नाहीं, जाणत नाही. म्हणून म्हटले आहे "न तत्र सूर्यो भाति न चन्द्रतारकम्'' त्याला प्रकाशित करण्याचे, त्याला जाणण्याचे सामर्थ्य न चन्द्र-तारकांना आहे न सूर्याला. त्याच्याच चित्प्रकाशाने चन्द्र-सूर्यादि तेजें प्रकाशित झाली आहेत, ज्ञात झाली आहेत. म्हणून तो परमात्मा म्हणावयाचा परम तेज, परंज्योति. २. परम तप : तपाने सर्व मळ जळून जातो आणि निखळ स्वरूप प्रकाशमान होतें. परम प्राप्तीचे परम साधन तप होय. ज्ञेय-स्वरूप परमात्मा निःशेषजाड्यापह ज्ञानस्वरूप तपानेंच आकळतो, उपलब्ध होतो. म्हणून तो परमात्मा म्हटला आहे परम तप. ३. परम ब्रह्म : ब्रह्म म्हणजे बृहत्. देश काल निमित्तादि कुठल्याहि सीमेंत बद्ध होत नाही म्हणून तो परमात्मा परम ब्रह्म होय. ४. परायण : पर अयन म्हणजे अन्तिम धाम. "यद् गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम ॥ " जिथून पुनरावर्तन नाही, त्याला म्हणावयाचें परायण. गीतेत म्हटलेंच आहे - आब्रह्मभुवनाल् लोकाः पुनरावर्तिनो ऽर्जुन । मां उपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥ ५. पवित्राणां पवित्रम् : पवित्र म्हणजे शुद्धि करणारें द्रव्य. भस्म, तीर्थ, दीप, धूप आणि कसलीहि अडगळ नसलेले मोकळे-मठ-मंदिर ही भूमि-जल-तेजोवाय्वाकाशादि द्रव्ये पवित्र म्हणजे शुद्धिकारक आहेत. पण ती सर्व बाह्य शुद्धि करणारी आहेत. अन्तःकरणाची शुद्धि त्यांच्यायोगे होत नाही. ती आत्मज्ञानानेंच होते. म्हणून ज्ञानस्वरूप तो परमात्माच पवित्रांत पवित्र होय. ६. मंगलानां मंगलम् : पवित्र हे मल-दोष-हरण करतें तर मंगल हे श्री-गुण-सुखाधान करतें. हरिद्रा-कुंकुम, दूर्वादल, तुलसी-मंजरी, पुष्प-फल इत्यादि मंगलें होत, शुभं म्हणजे शोभाकर द्रव्यें होत, गुणभूत होत, सुखावह होत. पण ती सगळी बाह्य नि बाह्याचे अलंकरण करणारी आहेत. परंतु आपलें अंतराचे अलंकरण तर आत्मज्ञानच आहे, सर्व गुण, सर्व सुख त्यांतच आहे. म्हणून तो ज्ञानस्वरूप परमात्माच परम मंगल होय. ५. देवतानां दैवतम् : देवता आराधकाचे अभिलषित पुरवितात, म्हणून त्या देवता म्हटल्या जातात. देवता विशिष्टगुणाभिमानिनी असल्यामुळे त्या तेवढेच फळ देतात. विद्यादेवता विद्याच देईल, तर लक्ष्मीदेवता लक्ष्मीच देईल. परंतु परमात्मा हा अभिमानरहित असल्यामुळे तो सर्वदानसमर्थ आहे आणि सर्वोत्तमदान-समर्थ आहे आणि अक्षय्यदानसमर्थ आहे. म्हणून तो देवतांचेंहि दैवत वा देवांचाहि देव म्हणावयाचा. ८. अव्ययः पिता : जगांतील पिते जन्म देतात, पण ते आपल्या संतानांच्या जन्माला पुरत नाहीत. त्यांना मधेच सोडून देऊन चालते होतात, मृत्यु पावतात. परंतु परमात्मा हा तसा धोका देणारा पिता नाही. तो अविनाशी पिता आहे. सर्व भूतें उपजतात आणि निमतात, परंतु तो परमात्मा अव्यय आहे. तो भूताप्रमाणें उपजतहि नाही आणि निमतहि नाही. तो सनातन आहे. म्हणून तो म्हणावयाचा अव्यय पिता. ९. लोक-प्रधान : लोकानां प्रधानः लोक-प्रधानः, लोकाः प्रहिता भवन्ति अस्मात् इति लोक-प्रधानः । सर्वलोक या परमात्म्यापासून उदित होतात म्हणून तो म्हणावयाचा लोकप्रधान. सूर्यापासून सर्व किरण निघतात म्हणून तो किरण-प्रधान होय. तसे हे चतुर्दश लोक, हे सारे विश्व, परमात्म्यापासून निघतें म्हणून तो म्हणावयाचा लोकप्रधान, सृष्टिकर्ता. १०. जगन्नाथ : जगन्-नियन्ता, जगाचे नियमन करणारा, शेवटी जगाचा उपसंहार करणारा. सूर्य दिनारंभी किरणांना पसरतो आणि दिनान्तीं ते सर्व खेचून घेतो. त्याप्रमाणे परमात्मा ही सृष्टि करतो आणि ती परत आपल्या ठाईं गिळून घेतो. मागील ११ व्या श्लोकाचाच लोक-प्रधान व जगन्नाथ या दोन पदांनी केलेला हा अनुवाद होय. ११. भूपते : युधिष्ठिराला भारतीय युद्ध जिंकून असपत्न साम्राज्य-लक्ष्मी लाभलेली आहे. म्हणून मुद्दाम त्याला भूपति म्हणून संबोधिलें आहे. १२. पापभयापहम् : पाप म्हणजे दुष्कृत. भय म्हणजे दुर्गति. अज्ञानामुळे दुष्कृति होते आणि तिचें फळ दुर्गति होते. अज्ञाननिरसनामुळे ती दोन्ही दूर होतात. म्हणून नामसहस्र हे ज्ञानसहस्रच होय. अर्थातच तें पापभयापह आहे. इथें युधिष्ठिराला स्वजन-वधाच्या पापाचें आणि नरकादि अशुभ गतीचें भय वाटत होते. त्याचाहि संकेत पापभय हीं पदें करीत आहेत. अर्थात् तें पाप व भय दूर करणारे हे सहस्रनाम आहे. युधिष्ठिराच्या पापाची निष्कृति व भयाचे निवारण या नामसहस्राच्या श्रवणाने होईल म्हणून भीष्म त्याला तें ऐक म्हणून सांगत आहेत. यानि नामानि गौणानि विख्यातानि महात्मनः । ऋषिभिः परिगीतानि तानि वक्ष्यामि भूतये ॥ १३ ॥ अर्थ - त्या महान् आत्म्याची जी गुणवाचक आणि म्हणून अत्यंत प्रसिद्ध अशी नामें आहेत ती वैदिक ऋषींनी परोपरीने गाइलेली मी सर्वांच्या कल्याणासाठी सांगत आहे. टिप्पणी १. महात्मन : महात्मा म्हणजे निर्गुण अचिन्त्य परमात्मा. तो तर केवळ अनिर्वचनीयच आहे. त्याला ना जन्म, ना कर्म, ना गुण. त्याला ना नाम ना रूप. २. गौणानि : परंतु अशाहि परमात्म्याला प्रकृतीच्या गुणयोगामुळे जन्म कर्म गुण संभवतात, नामरूप संभवते. तेव्हांच मग त्याचा जन्म, त्याचे नाम, त्याचे रूप, त्याचे कर्म, त्याचे गुण इत्यादि षष्ठीसंबंध संभवतो. अर्थात् गौण नामें म्हणजे प्रकृतीच्या गुणांच्या अनुषंगानें कल्पिलेली नामें. सगुणाचीं नामें. गुण पदानें प्रकृतीचे सत्त्व-रज-तमादि मूलगुण आणि तदन्तर्गत कल्याण-गुण असे दोन्हीहि घ्यावयाचे. ३. विख्यातानि : विख्यात म्हणजे सृष्टिरूपाने व्यक्त झालेली. ही सृष्टि आम्ही पाहतच आहों. अर्थात् तिचा कर्ताहि कोणी असलाच पाहिजे. त्यामुळे स्रष्टा हे त्याचे नाम विख्यातच होय. अशीच इतरहि नामें. म्हणून त्याचे सर्वांत विख्यात नाम विश्व आहे. म्हणून आधी घेतले आहे तें. त्याहून अधिक विख्यात दुसरें काय बरें आहे ? ४. ऋषिभिः परिगीतानि : हीं नामें मी नवीन कल्पिलेलीं नाहीत, ती पूर्व ऋषींनीच वेदमंत्रांतून गाइलेली आहेत, असें भीष्म सांगत आहेत. अनादि परमात्म्याची नामें हि अनादिच असणार. ती आज नवीन कल्पिण्याची गरज नाही. नवीन कल्पिणे शक्यहि नाही. अर्थ जुनाच आहे तर शब्द नवीन कुठून येणार ? नवा वाटणाराहि शब्द तो अर्थाश्रितच असल्यामुळे वस्तुतः जुनाच होय. मंत्रद्रष्ट्या ऋषींनी गाइलेली ही नामें सर्वची सर्व वेदांतून आढळतीलच असें नाही. परंतु वेदवाणी ही शब्दमय, शब्द अक्षरमय, अक्षरें वर्णमय आणि वर्ण ध्वनिग्मय असल्यामुळे ध्वनिरूप वेदांत ती सर्व निश्चितच आहेत असें म्हणता येते. या अक्षर-ध्वनीचे प्रतीक ॐ होय. तोच एकाक्षर ब्रह्म म्हणजे वेद. त्यांत सर्व भूतभविष्यवर्तमान मंत्र आहेत, सर्व नामें आहेत. ५. भूतये : भूति म्हणजे भलें, सुखसमृद्धि. कोणाचें भलें ? कोणाची सुखसमृद्धि ? निरुपपद प्रयोगावरून सर्व भूतांचे भलें. सर्वभूतांची सुखसमृद्धि. अध्याहृत सर्व पदानें आगत अनागत सर्व भूतें घ्यायची, पूर्वीं होऊन गेलेली, आतां वर्तमान असलेली आणि पुढे व्हावयाची. आणि भलें म्हणजे कोणतें भलें ? जो जे वांछील तें भलें. "जो जे वांछील तो तें लाहो प्राणिजात'. ही भगवन्-नामें सर्वांच्या सर्वविध सुख- समृद्धीसाठी आहेत. |