PREVIOUS
NEXT

ऋग्वेद - मण्डल ४ - सूक्त १ ते १०

मण्डल ४ सूक्त १ ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - जगती


त्वां ह्यग्ने॒ सद॒मित्स॑म॒न्यवो॑ दे॒वासो॑ दे॒वम॑र॒तिं न्ये॑रि॒र इति॒ क्रत्वा॑ न्येरि॒रे ।
अम॑र्त्यं यजत॒ मर्त्ये॒ष्वा दे॒वमादे॑वं जनत॒ प्रचे॑तसं॒ विश्व॒मादे॑वं जनत॒ प्रचे॑तसम् ॥ १ ॥

त्वां हि अग्ने सदं इत् सऽमन्यवः देवासः देवं अरतिं निऽएरिरे इति क्रत्वा निऽएरिरे ।
अमर्त्यं यजत मर्त्येषु आ देवं आऽदेवं जनत प्रऽचेतसं विश्वं आऽदेवं जनत प्रऽचेतसं ॥ १ ॥

हे अग्निदेवा, सर्व देव एक विचारानें प्रेरित होऊन तूं जो जगत्प्रभु देव त्या तुलाच निरंतर भजत असतात आणि म्हणूनच आपल्या भक्तिभावानें त्यांनी तुला ह्या मृत्युलोकीं पाठवून दिलें आहे. तर हे भक्तजनहो, मृत्युलोकांत राहूनसुद्धां अमर असणार्‍या ह्या भगवंताचे तुम्ही यथासांग अर्चन करा. ह्या देवप्रिय व ज्ञानिश्रेष्ठ अग्नीला प्रकट करा. तो विश्वव्यापक भगवत्स्वरूप, सर्वज्ञ अग्नि आविर्भूत होईल असे करा. ॥ १ ॥


स भ्रात॑रं॒ वरु॑णमग्न॒ आ व॑वृत्स्व दे॒वाँ अच्छा॑ सुम॒ती य॒ज्ञव॑नसं॒ ज्येष्ठं॑ य॒ज्ञव॑नसम् ।
ऋ॒तावा॑नमादि॒त्यं च॑र्षणी॒धृतं॒ राजा॑नं चर्षणी॒धृत॑म् ॥ २ ॥

स भ्रातरं वरुणं अग्ने आ ववृत्स्व देवान् अच्छ सुमती यज्ञऽवनसं ज्येष्ठं यज्ञऽवनसं ।
ऋतऽवानं आदित्यं चर्षणीऽधृतं राजानं चर्षणीऽधृतं ॥ २ ॥

तर हे अग्नि, जो देवांचा जणूं वडील भाऊच अशा त्या यज्ञप्रिय भगवान वरुणाला तूं आपल्या सौजन्यानें देवाकडे वळवून इकडे घेऊन ये. तो आपल्या आगमनानें यज्ञास शोभा आणतो. तो सद्धर्मरक्षक, चराचरपालक, विश्वाचा राजा आणि सकल मानवांचा अधिपति आहे. तर अशा त्या आदित्य वरुणाला आमच्याकडे आण. ॥ २ ॥


सखे॒ सखा॑यम॒भ्या व॑वृत्स्वा॒शुं न च॒क्रं रथ्ये॑व॒ रंह्या॒स्मभ्यं॑ दस्म॒ रंह्या॑ ।
अग्ने॑ मृळी॒कं वरु॑णे॒ सचा॑ विदो म॒रुत्सु॑ वि॒श्वभा॑नुषु ।
तो॒काय॑ तु॒जे शु॑शुचान॒ शं कृ॑ध्य॒स्मभ्यं॑ दस्म॒ शं कृ॑धि ॥ ३ ॥

सखे सखायं अभि आ ववृत्स्व आशुं न चक्रं रथ्याऽइव रंह्या अस्मभ्यं दस्म रंह्या ।
अग्ने मृळीकं वरुणे सचा विदः मरुत्ऽसु विश्वऽभानुषु ।
तोकाय तुजे शुशुचान शं कृधि अस्मभ्यं दस्म शं कृधि ॥ ३ ॥

हे भक्तसख्या अग्नि, भक्त कैवारी जो भगवान वरुण त्याला इकडे आण. भरधांव दौडणारे घोडे जसें एखाद्या वेगवान रथाला हां हां म्हणतां घेऊन येतात त्याप्रमाणें हे अद्‍भुत कर्मकारी देवा, त्या भगवंताला आमच्याकडे त्वरित घेऊन ये. हे अग्नि भगवान, वरुणाच्या आणि त्या सर्वतोपरी तेजःपुंज अशा मरुतांच्या हृदयांत आमच्या विषयीं एकदमच दया उत्पन्न कर. हे देदीप्यमान देवा, परोपकारार्थ आमच्या पुत्रपौत्रांचे कल्याण कर. हे अद्‍भुत पराक्रमी अग्नि, आमचेंही मंगल कर. ॥ ३ ॥


त्वं नो॑ अग्ने॒ वरु॑णस्य वि॒द्वान्दे॒वस्य॒ हेळोऽव यासिसीष्ठाः ।
यजि॑ष्ठो॒ वह्नि॑तमः॒ शोशु॑चानो॒ विश्वा॒ द्वेषां॑सि॒ प्र मु॑मुग्ध्य॒स्मत् ॥ ४ ॥

त्वं नः अग्ने वरुणस्य विद्वान् देवस्य हेळः अव यासिसीष्ठाः ।
यजिष्ठः वह्नितमः शोशुचानः विश्वा द्वेषांसि प्र मुमुग्धि अस्मत् ॥ ४ ॥

हे अग्नि, तूं सर्वज्ञ आहेस, तेव्हां भगवान वरुणाचा आम्हांवर कांही कोप असेल तर तो शांत कर. परमपूज्य देवांस उत्कृष्ट रीतीनें हविर्भाग पोंचविणारा तूंच, आणि दिव्यतेजानें तळपणारा असाही तूंच. तर जे कोणी आमचा द्वेश करील असतील त्यांना आमच्यापासून दूर करून पार नाहींसे कर. ॥ ४ ॥


स त्वं नो॑ अग्नेऽव॒मो भ॑वो॒ती नेदि॑ष्ठो अ॒स्या उ॒षसो॒ व्युष्टौ ।
अव॑ यक्ष्व नो॒ वरु॑णं॒ ररा॑णो वी॒हि मृ॑ळी॒कं सु॒हवो॑ न एधि ॥ ५ ॥

स त्वं नः अग्ने अवमः भव ऊती नेदिष्ठः अस्या उषसः विऽउष्टौ ।
अव यक्ष्व नः वरुणं रराणः वीहि मृळीकं सुऽहवः नः एधि ॥ ५ ॥

तरी हे अग्नि, आमचें संरक्षण करण्याकरितां आमच्या जवळच रहा. ही आमच्या उषःकालची प्रभा उजळली आहे, तर आमच्या अगदींच सन्निध (म्हणजे हृदयांत) प्रकट हो. तूं संतोषित होऊन आम्हांकरितां भगवान वरुणाला यज्ञद्वारा प्रसन्न कर. आमच्या विषयीं तुला करुणा येऊं दे आणि तूं आमच्याकरितां हांक मारतांच धावून येणारा आहेस असें प्रत्ययास आण. ॥ ५ ॥


अ॒स्य श्रेष्ठा॑ सु॒भग॑स्य सं॒दृग्दे॒वस्य॑ चि॒त्रत॑मा॒ मर्त्ये॑षु ।
शुचि॑ घृ॒तं न त॒प्तमघ्न्या॑या स्पा॒र्हा दे॒वस्य॑ मं॒हने॑व धे॒नोः ॥ ६ ॥

अस्य श्रेष्ठा सुऽभगस्य संऽदृग् देवस्य चित्रऽतमा मर्त्येषु ।
शुचि घृतं न तप्तं अघ्न्यायाः स्पार्हा देवस्य मंहनाऽइव धेनोः ॥ ६ ॥

हा महाभाग भगवान जो अग्नि, त्याचे अलभ्य दर्शन ह्या मृत्युलोकांत सर्वांस घडावें हीच अगोदर मोठी अद्‍भुत गोष्ट आहे. दिव्य गोमातेचें तप्त घृत जसें शुद्ध, किंवा धेनूची दुग्धरूप देणगी जशी पवित्र तसा ह्या भगवंताचा वरप्रसादही स्पृहणीयच होय. ॥ ६ ॥


त्रिर॑स्य॒ ता प॑र॒मा स॑न्ति स॒त्या स्पा॒र्हा दे॒वस्य॒ जनि॑मान्य॒ग्नेः ।
अ॒न॒न्ते अ॒न्तः परि॑वीत॒ आगा॒च्छुचिः॑ शु॒क्रो अ॒र्यो रोरु॑चानः ॥ ७ ॥

त्रिः अस्य ता परमा संति सत्या स्पार्हा देवस्य जनिमानि अग्नेः ।
अनंते अंतरिति परिऽवीतः अगात् शुचिः शुक्रः अर्यः रोरुचानः ॥ ७ ॥

ह्या भगवान अग्नीची जी श्रेष्ठतम, सत्य आणि स्पृहणीय स्वरूपें आहेत ती तीन आहेत व म्हणूनच अमर्याद अशा अंतरिक्षांत हा पवित्र शुभ्रतेजक भगवान अग्नि आपल्या दिव्य कांतीनें तळपत अवतीर्ण झाला आहे. ॥ ७ ॥


स दू॒तो विश्वेद॒भि व॑ष्टि॒ सद्मा॒ होता॒ हिर॑ण्यरथो॒ रंसु॑जिह्वः ।
रो॒हिद॑श्वो वपु॒ष्यो वि॒भावा॒ सदा॑ र॒ण्वः पि॑तु॒मती॑व सं॒सत् ॥ ८ ॥

स दूतः विश्वा इत् अभि वष्टि सद्म होता हिरण्यऽरथः रंऽसुजिह्वः ।
रोहित्ऽअश्वः वपुष्यः विभाऽवा सदा रण्वः पितुमतीऽइव संऽसत् ॥ ८ ॥

देवांचा प्रतिनिधी जो अग्नि त्याचें प्रेम सर्वच यज्ञमंदिरांवर असतें तो यज्ञाचा आचार्य अविनाशी अशा सुवर्णरथांत आरूढ होतो. त्याची ज्वालारूप जिव्हा फारच मनोहर असून त्याच्या रथाचे अश्व रक्तवर्णाचे आहेत आणि तो स्वतः दर्शनीय व उज्वलकांतीमान आहे. अमृताची रेलचेल आहे अशी देवसभा ज्याप्रमाणें आनंदांत तल्लीन असते त्याप्रमाणें अग्नि हा नेहमींच आनंदमग्न असतो. ॥ ८ ॥


स चे॑तय॒न्मनु॑षो य॒ज्ञब॑न्धुः॒ प्र तं म॒ह्या र॑श॒नया॑ नयन्ति ।
स क्षे॑त्यस्य॒ दुर्या॑सु॒ साध॑न्दे॒वो मर्त॑स्य सधनि॒त्वमा॑प ॥ ९ ॥

स चेतयत् मनुषः यज्ञऽबन्धुः प्र तं मह्या रशनया नयंति ।
स क्षेति अस्य दुर्यासु साधन् देवः मर्तस्य सधनिऽत्वं आप ॥ ९ ॥

ह्या यज्ञप्रिय देवानें मनुष्यांच्या ठिकाणीं चैतन्य जागृत केलें. तथापि भक्तजन लांबच लांब अशा यज्ञरूप रशनेनें त्याचें आकलन करूं शकतात व तोही भक्तांचे मनोरथ साध्य करून देऊन यज्ञमंदिरांत वास्तव्य करतो. आणि अशा रीतीनें ईश्वर आणि मर्त्यमानव ह्यांचा अगदीं निकट संभंध जुळून आलेला आहे. ॥ ९ ॥


स तू नो॑ अ॒ग्निर्न॑यतु प्रजा॒नन्नच्छा॒ रत्नं॑प दे॒वभ॑क्तं॒ यद् अ॑स्य ।
धि॒या यद्‌विश्वे॑ अ॒मृता॒ अकृ॑ण्व॒न्द्यौष्पि॒ता ज॑नि॒ता स॒त्यमु॑क्षन् ॥ १० ॥

सः तू नः अग्निः नयतु प्रऽजानन् अच्छ रत्नंि देवऽभक्तं यत् अस्य ।
धिया यत् विश्वे अमृताः अकृण्वन् द्यौः पिता जनिता सत्यं उक्षन् ॥ १० ॥

ज्या ऐश्वर्याचा सर्व देव उपभोग घेत असतात त्या आपल्या ऐश्वर्यरत्नाकडे अग्नि आम्हांस घेऊन जावो. अमरविभूतींनीसुद्धां ध्यान योगानेंच तें प्राप्त करून घेतलेलें आहे आणि जगत्‌स्रष्टा व जगत्‌पिता जो द्यु (रूपी ईश्वर) त्याच्या कृपामृतानें ते सत्यैश्वर्य आर्द्र झालेलें आहे. ॥ १० ॥


स जा॑यत प्रथ॒मः प॒स्त्यासु म॒हो बु॒ध्ने रज॑सो अ॒स्य योनौ॑ ।
अ॒पाद॑शी॒र्षा गु॒हमा॑नो॒ अन्ता॒योयु॑वानो वृष॒भस्य॑ नी॒ळे ॥ ११ ॥

सः जायत प्रथमः पस्त्यासु महः बुध्ने रजसः अस्य योनौ ।
अपात् अशीर्षा गुहमानः अंता आऽयोयुवानः वृषभस्य नीळे ॥ ११ ॥

अग्नि प्रथमतः आपल्या भक्तगणांमध्यें ह्या विशाल रजोलोकाच्या मूलप्रदेशीं आपल्या आद्यस्थानीं (वेदीवर) अवतीर्ण झाला, परंतु त्या वेळेस त्यानें आपलें शरीर असें संकलित केलें कीं त्याचें चरण आणि मस्तक - हे दोन्ही भाग कोठें आहेत हेंच कळेंनासें झाले व तो, मनोरथवर्षक वीरश्रेष्ठ जो इंद्र, त्याच्या निवासस्थानामध्येंही जाऊन सर्वत्र पसरला. ॥ ११ ॥


प्र शर्ध॑ आर्त प्रथ॒मं वि॑प॒न्यँ ऋ॒तस्य॒ योना॑ वृष॒भस्य॑ नी॒ळे ।
स्पा॒र्हो युवा॑ वपु॒ष्यो वि॒भावा॑ स॒प्त प्रि॒यासो॑ऽजनयन्त॒ वृष्णे॑ ॥ १२ ॥

प्र शर्धः आर्त प्रथमं विपन्या ऋतस्य योना वृषभस्य नीळे ।
स्पार्हः युवा वपुष्यः विभाऽवा सप्त प्रियासः अजनयंत वृष्णे ॥ १२ ॥

त्याचा ज्वालारूप सेनासमूह, स्तुतींच्या योगानें, सनातन धर्माच्या आद्यस्थानापासून त्या वीरधुरीण इंद्राच्या निवासस्थानापर्यंत जाऊन भिडला, त्या वेळेस तो यौवनाढ्य अग्नि अत्यंत स्पृहणीय, भव्य, व उज्ज्वल दिसूं लागला. त्याप्रमाणें प्रिय अशा सप्तहोत्यांनी अग्नीला वीर्यशाली यजमानाकरितां प्रकट केलें. ॥ १२ ॥


अ॒स्माक॒मत्र॑ पि॒तरो॑ मनु॒ष्या अ॒भि प्र से॑दुर्‌ऋ॒तमा॑शुषा॒णाः ।
अश्म॑व्रजाः सु॒दुघा॑ व॒व्रे अ॒न्तरुदु॒स्रा आ॑जन्नु॒षसो॑ हुवा॒नाः ॥ १३ ॥

अस्माकं अत्र पितरः मनुष्याः अभि प्र सेदुः ऋतं आशुषाणाः ।
अश्मऽव्रजाः सुऽदुघाः वव्रे अंतः उत् उस्रा आजन् उषसः हुवानाः ॥ १३ ॥

ह्याच ठिकाणीं आमच्या पूर्वजांनी सनातमधर्माचें आचरण करून भगवंताला प्रसन्न केलें , आणि विपुल प्रकाश दुग्ध देणार्‍या ज्या तेजोरूप धेनु एका खोल गुहेंत पाषाणमय आवारांत दडवून ठेवल्या होत्या त्या धेनूंना उषःकाल होतांच, भगवंताचा धांवा करून बाहेर आणले. ॥ १३ ॥


ते म॑र्मृजत ददृ॒वांसो॒ अद्रिं॒ तदे॑षाम॒न्ये अ॒भितो॒ वि वो॑चन् ।
प॒श्वय॑न्त्रासो अ॒भि का॒रम॑र्चन्वि॒दन्त॒ ज्योति॑श्चकृ॒पन्त॑ धी॒भिः ॥ १४ ॥

ते मर्मृजत ददृऽवांसः अद्रिं तत् एषां अन्ये अभितः वि वोचन् ।
पश्वऽयंत्रासः अभि कारं अर्चन् विदंत ज्योतिः चकृपंत धीभिः ॥ १४ ॥

मोठा कठीण पर्वत फोडून दुभंग केल्यामुळें त्यांनी भगवंताचा अधिकच गौरव केला, व त्यांच्या ह्या महत्कृत्याची वाखाणणी इतर मंडळींनी परस्परच सर्वत्र केली. पर्वत फोडणारे आपले पशुयंत्र घेऊन जेव्हां ते पुढें सरसावले तेव्हां त्यांनी उच्चस्वरानें देवाची स्तुति केली, त्यावरोबर त्यांना दिव्यप्रकाशाचा लाभ झाला आणि आपल्या ध्यानभक्तीच्या योगानें ते ईश्वराच्या कृपेस पात्र झाले. ॥ १४ ॥


ते ग॑व्य॒ता मन॑सा दृ॒ध्रमु॒ब्धं गा ये॑मा॒नं परि॒ षन्त॒मद्रि॑म् ।
दृ॒ळ्हं नरो॒ वच॑सा॒ दैव्ये॑न व्र॒जं गोम॑न्तमु॒शिजो॒ वि व॑व्रुः ॥ १५ ॥

ते गव्यता मनसा दृध्रं उब्धं गाः येमानं परि संतं अद्रिं ।
दृळ्हं नरः वचसा दैव्येन व्रजं गोऽमंतं उशिजः वि वव्रुरिति वव्रुः ॥ १५ ॥

धेनु मुक्त करण्याकरितां त्यांचे मन उत्कंठीत झाले होते, पण तो धेनूंचा समूह जेथे दडवून ठेवला होता तो पर्वत होता अत्यंत बिकट, मजबूत आणि चोहोंकडून बंदोबस्ताचा, व त्यांत त्या धेनूंना कोंडून ठेवलें होते. तथापि तो अभेद्य पर्वत आपल्या दैवी वाणीनेंच भंगून टाकून त्या उत्सुक वीरांनी तो गोसमूह मोकळा केला. ॥ १५ ॥


ते म॑न्वत प्रथ॒मं नाम॑ धे॒नोस्त्रिः स॒प्त मा॒तुः प॑र॒माणि॑ विन्दन् ।
तज्जा॑न॒तीर॒भ्यनूषत॒ व्रा आ॒विर्भु॑वदरु॒णीर्य॒शसा॒ गोः ॥ १६ ॥

ते मन्वत प्रथमं नाम धेनोः त्रिः सप्त मातुः परमाणि विन्दन् ।
तत् जानतीः अभि अनूषत व्राः आविः भुवत् अरुणीः यशसा गोः ॥ १६ ॥

त्यांनी प्रकाशरूप धेनूच्या अगदीं पहिल्या नांवाचें स्मरण केलें आणि क्रमाक्रमानें उषामातेच्या पवित्र अशा एकवीस नांवांचाही उच्चार करून हांक मारली. ती हांक ओळखून त्या धेनूंनी हंबारून ऋषीचें अभिनंदन केलें इतक्यांत ती अनुरागवती उषादेवी आपल्या यशतेजानें मंडित होऊन उदय पावली. ॥ १६ ॥


नेश॒त्तमो॒ दुधि॑तं॒ रोच॑त॒ द्यौरुद्दे॒व्या उ॒षसो॑ भा॒नुर॑र्त ।
आ सूर्यो॑ बृह॒तस्ति॑ष्ठ॒दज्राँ॑ ऋ॒जु मर्ते॑षु वृजि॒ना च॒ पश्य॑न् ॥ १७ ॥

नेशत् तमः दुधितं रोचत द्यौः उत् देव्याः उषसः भानुः अर्त ।
आ सूर्यः बृहतःस् तिष्ठत् अज्रान् ऋजु मर्तेषु वृजिना च पश्यन् ॥ १७ ॥

झालें, एवढा निबिड काळोख, पण त्याचा मागमूससुद्धां उरला नाहीं. आकाश उजळलें, प्रभातकाळची लकाकी क्षितिजावर चमकूं लागली, आणि नंतर भगवान सूर्यही मर्त्यलोकांतील बरींवाईट कर्में अवलोकन करीत करीत मोठमोठ्या उंच मैदानांवर प्रकाशूं लागला. ॥ १७ ॥


आदित्प॒श्चा बु॑बुधा॒ना व्यख्य॒न्नादिद्रत्नं॑े धारयन्त॒ द्युभ॑क्तम् ।
विश्वे॒ विश्वा॑सु॒ दुर्या॑सु दे॒वा मित्र॑ धि॒ये व॑रुण स॒त्यम॑स्तु ॥ १८ ॥

आत् इत् पश्चा बुबुधानाः व्य् अख्यन् आत् इत् रत्नंं धारयंत द्युऽभक्तं ।
विश्वे विश्वासु दुर्यासु देवाः मित्र धिये वरुण सत्यं अस्तु ॥ १८ ॥

तेव्हां ऋषी स्थितीवर इकडे तिकडें पाहूं लागले तों त्यांच्या दृष्टीस दिव्यरत्‍न पडले, व द्युलोकांतच उपभोगावयांस सांपडणारे रत्‍न त्यांनी धारण केलें. असे करतांच सर्व देवता भक्तांच्या घोरघर प्राप्त झाल्या. तर हे जगन्मित्रा वरुणा, आमच्या ध्याननिष्ठ यजमानास ह्या गोष्टीचा प्रत्यय खरोखरच येवो. ॥ १८ ॥


अच्छा॑ वोचेय शुशुचा॒नम॒ग्निं होता॑रं वि॒श्वभ॑रसं॒ यजि॑ष्ठम् ।
शुच्यूधो॑ अतृण॒न्न गवा॒मन्धो॒ न पू॒तं परि॑षिक्तमं॒शोः ॥ १९ ॥

अच्छ वोचेय शुशुचानं अग्निं होतारं विश्वऽभरसं यजिष्ठं ।
शुचि ऊधः अतृणत् न गवां अन्धः न पूतं परिऽसिक्तं अंशोः ॥ १९ ॥

यज्ञाचा होता, विश्वाचा पोषक आणि अत्यंत पूज्य अशा परमदेदीप्यमान अग्नीचें यशोवर्णन मी मोठ्या प्रेमानें करीन. देवा, तुला दुग्ध अर्पण करण्याकरितां यज्ञधेनूच्या पवित्र कांसेचे ह्या भक्तानें दोहन केले नाही किंवा सोमवल्लीचा शुद्ध रसही पिळून समर्पण केला नाही, ह्याची त्याला क्षमा कर. ॥ १९ ॥


विश्वे॑षा॒मदि॑तिर्य॒ज्ञिया॑नां॒ विश्वे॑षा॒मति॑थि॒र्मानु॑षाणाम् ।
अ॒ग्निर्दे॒वाना॒मव॑ आवृणा॒नः सु॑मृळी॒को भ॑वतु जा॒तवे॑दाः ॥ २० ॥

विश्वेषां अदितिः यज्ञियानां विश्वेषां अतिथिः मानुषाणां ।
अग्निः देवानां अवः आऽवृणानः सुऽमृळीकः भवतु जातऽवेदाः ॥ २० ॥

सर्व यज्ञार्ह विभूतींचा मोक्षदाता, मानवांचा क्षेमदाता, अतिथी, आणि सर्व देवांचे संरक्षण करण्याचा ज्यानें निरंतर पतकरच घेतला आहे असा हा सर्वज्ञ अग्नि आम्हांवर आपल्या कृपेची पाखर करो. ॥ २० ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त २ ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


यो मर्त्ये॑ष्व॒मृत॑ ऋ॒तावा॑ दे॒वो दे॒वेष्व॑र॒तिर्नि॒धायि॑ ।
होता॒ यजि॑ष्ठो म॒ह्ना शु॒चध्यै॑ ह॒व्यैर॒ग्निर्मनु॑ष ईर॒यध्यै॑ ॥ १ ॥

यः मर्त्येषु अमृत ऋतऽवा देवः देवेषु अरतिः निऽधायि ।
होता यजिष्ठः मह्ना शुचध्यै हव्यैः अग्निः मनुषः ईरयध्यै ॥ १ ॥

सद्धर्मरक्षक म्हणून मनुष्यलोकांत आणि देवांचा प्रभु म्हणून देवलोकांत ज्या अमर भगवंताची प्रतिष्ठा आहे तो हा अग्नि आमचा परमपूज्य यज्ञाचार्य, आतां आपल्या तेजानें सुखप्रकाशित होवो आणि हविर्भागाचा स्वीकार करून त्याच्यायोगानें आम्हां मानवांची सन्मार्गाकडे प्रवृत्ति करो. ॥ १ ॥


इ॒ह त्वं सू॑नो सहसो नो अ॒द्य जा॒तो जा॒ताँ उ॒भयाँ॑ अ॒न्तर॑ग्ने ।
दू॒त ई॑यसे युयुजा॒न ऋ॑ष्व ऋजुमु॒ष्कान्वृष॑णः शु॒क्रांश्च॑ ॥ २ ॥

इह त्वं सूनो इति सहसः नः अद्य जातः जातान् उभयान् अंतः अग्ने ।
दूतः ईयसे युयुजानः ऋष्व ऋजुऽमुष्कान् वृषणः शुक्रान् च ॥ २ ॥

सामर्थ्यापासून आविर्भूत होणार्‍या हे अग्निदेवा, आज ह्या ठिकाणीं प्रकट होऊन मर्त्य आणि दिव्य अशा दोन्हीं लोकांमध्यें तूं उभयतांचाही मध्यस्थ म्हणून संचार करीत आहेस. हे उदारचरिता, तूं आपल्या रथास जे अश्व जोडून फिरतोस तेही मोठे रंगेल, वीर्यशाली आणि शुभ्रतेजस्क असेच आहेत. ॥ २ ॥


अत्या॑ वृध॒स्नू रोहि॑ता घृ॒तस्नू॑ ऋ॒तस्य॑ मन्ये॒ मन॑सा॒ जवि॑ष्ठा ।
अ॒न्तरी॑यसे अरु॒षा यु॑जा॒नो यु॒ष्मांश्च॑ दे॒वान्विश॒ आ च॒ मर्ता॑न् ॥ ३ ॥

अत्या वृधस्नू इति वृधऽस्नू रोहिता घृतस्नू इति घृतऽस्नू ऋतस्य मन्ये मनसा जविष्ठा ।
अंतः ईयसे अरुषा युजानः युष्मान् च देवान् विशः आ च मर्तान् ॥ ३ ॥

तुझ्या सत्यधर्मरूप रथाचे घोडे मोठे तडफदार आहेत, त्यांचा रंग लाल असून भक्तांवर समृद्धीचे आणि घृताचे ओघ ते सोडीत असतात. मला वाटतें त्यांचा वेग मनापेक्षांसुद्धां जास्त आहे. तर अशा प्रकारच्या आरक्तवर्ण अश्वांना रथास जोडून हे भगवंता, तूं त्या देवांमध्यें, आणि आम्हां मानवांमध्यें सर्वत्र संचार करीत असतोस. ॥ ३ ॥


अ॒र्य॒मणं॒ वरु॑णं मि॒त्रमे॑षा॒मिन्द्रा॒विष्णू॑ म॒रुतो॑ अ॒श्विनो॒त ।
स्वश्वो॑ अग्ने सु॒रथः॑ सु॒राधा॒ एदु॑ वह सुह॒विषे॒ जना॑य ॥ ४ ॥

अर्यमणं वरुणं मित्रं एषां इंद्राविष्णू इति मरुतः अश्विनः उत ।
सुऽअश्वः अग्ने सुऽरथः सुऽराधा आ इत् ऊं इति वह सुऽहविषे जनाय ॥ ४ ॥

अग्निदेवा, तुझे अश्व अत्युत्तम, रथही उत्कृष्ट, आणि तुझें कृपाधनही विपुल आहे. तर एक अशी गोष्ट कर ती ही कीं, अर्यमा, वरुण, मित्र, इंद्र, विष्णु आणि तसेच मरुत व अश्विदेव ह्या सर्वांना आमच्या हविर्दानतत्पर यजमानाकडे सत्वर घेऊन ये. ॥ ४ ॥


गोमाँ॑ अ॒ग्नेऽ॑विमाँ अ॒श्वी य॒ज्ञो नृ॒वत्स॑खा॒ सद॒मिद॑प्रमृ॒ष्यः ।
इळा॑वाँ ए॒षो अ॑सुर प्र॒जावा॑न्दी॒र्घो र॒यिः पृ॑थुबु॒ध्नः स॒भावा॑न् ॥ ५ ॥

गोऽमान् अग्ने अविऽमान् अश्वी यज्ञः नृवत्ऽसखा सदं इत् अप्रऽमृष्यः ।
इळाऽवान् एषः असुर प्रजाऽवान् दीर्घः रयिः पृथुऽबुध्नः सभाऽवान् ॥ ५ ॥

हे अग्नि, हा आमचा यज्ञ सदैव ज्ञानरूप धेनु देणारा, सौजन्यरूप मेंढे देणारा, बुद्धिरूप अश्व देणारा, वीर पुरुषांशी मित्रत्व जोडून देणारा, आणि अपराजित असा असो. हे परमात्मन्, हा यज्ञ आम्हांस भूमिदायक व प्रजादायक असा होऊन दीर्घकाल टिकणारे, दृढमूल आणि लोकसभायुक्त असें ऐश्वर्यही तो आम्हांस देवो. ॥ ५ ॥


यस्त॑ इ॒ध्मं ज॒भर॑त्सिष्विदा॒नो मू॒र्धानं॑ वा त॒तप॑ते त्वा॒या ।
भुव॒स्तस्य॒ स्वत॑वाँः पा॒युर॑ग्ने॒ विश्व॑स्मात्सीमघाय॒त उ॑रुष्य ॥ ६ ॥

यः ते इध्मं जभरत् सिस्विदानः मूर्धानं वा ततपते त्वाऽया ।
भुवः तस्य स्वऽतवान् पायुः अग्ने विश्वस्मात् सीं अघऽयतः उरुष्य ॥ ६ ॥

जो कोणी भाविक मनुष्य तुझ्या यज्ञाकरितां समिधा आणण्याच्या श्रमानें घामाघून होत असेल, किंवा तुझ्या चिंतनानें आपलें मस्तकही तापवून घेत असेल अशा भक्ताचा, हे भगवंता अग्ने, तूं पाठिराखा हो. तूं स्वतः सामर्थ्यवान आहेस, तेव्हां सर्व दुरात्म्यांच्या तावडींतून त्यांची मुक्तता कर. ॥ ६ ॥


यस्ते॒ भरा॒दन्नि॑यते चि॒दन्नं॑ नि॒शिष॑न्म॒न्द्रमति॑थिमु॒दीर॑त् ।
आ दे॑व॒युरि॒नध॑ते दुरो॒णे तस्मि॑न्र॒यिर्ध्रु॒वो अ॑स्तु॒ दास्वा॑न् ॥ ७ ॥

यः ते भरात् अन्नियते चित् अन्नं निऽशिषन् मंद्रं अतिथिं उत्ऽईरत् ।
आ देवऽयुः इनधते दुरोणे तस्मिन् रयिः ध्रुवः अस्तु दास्वान् ॥ ७ ॥

तुजपाशी अन्नसंपत्ति विपुल असतांही तुला जो भक्त हविर्भाग अर्पण करील, हर्षवर्धक सोमरस अर्पण करील, तूं अत्यंत थोर अतिथी अशा भावनेनें तुझें स्तवन करील, आणि जो भगवद्‍भक्त आपल्या यज्ञशालेंत तुला प्रज्वलीत करील, त्या भक्ताला अढळ असें जें वैभव आहे तें प्राप्त होवो व त्या वैभवाला औदार्याची जोड मिळो. ॥ ७ ॥


यस्त्वा॑ दो॒षा य उ॒षसि॑ प्र॒शंसा॑त्प्रि॒यं वा॑ त्वा कृ॒णव॑ते ह॒विष्मा॑न् ।
अश्वो॒ न स्वे दम॒ आ हे॒म्यावा॒न्तमंह॑सः पीपरो दा॒श्वांस॑म् ॥ ८ ॥

यः त्वा दोषा यः उषसि प्रऽशंसात् प्रियं वा त्वा कृणवते हविष्मान् ।
अश्वः न स्वे दम आ हेम्याऽवान् तं अंहसः पीपरः दाश्वांसं ॥ ८ ॥

जो भक्त सायंकाळी आणि प्रातःकाळीं तुझें स्तवन करील आणि हवि हातांत घेऊन तुला प्रिय वाटतें तेंच करील आणि पाठीवर सोन्याचा साज चढवून अश्वशालेंत जय्यत तयार ठेवलेल्या घोड्याप्रमाणें जो तुझ्या सेवेस तत्पर असेल त्याच दानरत भक्ताला पातकाच्या पलीकडे पार ने. ॥ ८ ॥


यस्तुभ्य॑मग्ने अ॒मृता॑य॒ दाश॒द्दुव॒स्त्वे कृ॒णव॑ते य॒तस्रु॑क् ।
न स रा॒या श॑शमा॒नो वि यो॑ष॒न्नैन॒मंहः॒ परि॑ वरदघा॒योः ॥ ९ ॥

यः तुभ्यं अग्ने अमृताय दाशत् दुवः त्वे इति कृणवते यतऽस्रुक् ।
न सः राया शशमानः वि योषत् न एनं अंहः परि वरत् अघऽयोः ॥ ९ ॥

हे अग्निदेवा, जो भक्त तुज अमर देवाला यज्ञभाग अर्पण करतो आणि स्रुचा पुढें करून तुझी उपासना करतो, तो स्तवनतत्पर भक्त दिव्य ऐश्वर्यापासून कधींही वियुक्त होणार नाही आणी दुर्जनांच्या पीडेची बाधाही पण त्याला कधीं होणार नाहीं. ॥ ९ ॥


यस्य॒ त्वम॑ग्ने अध्व॒रं जुजो॑षो दे॒वो मर्त॑स्य॒ सुधि॑तं॒ ररा॑णः ।
प्री॒तेद॑स॒द्धोत्रा॒ सा य॑वि॒ष्ठासा॑म॒ यस्य॑ विध॒तो वृ॒धासः॑ ॥ १० ॥

यस्य त्वं अग्ने अध्वरं जुजोषः देवः मर्तस्य सुऽधितं रराणः ।
प्रीता इत् असत् होत्रा सा यविष्ठ असाम यस्य विधतः वृधासः ॥ १० ॥

हे अग्नि, ज्या मानवाचा सुव्यवस्थित यागाचा तूं उल्लसित अंतःकरणानें स्वीकार करतोस त्या भक्ताची यज्ञसेवा तुला तर प्रिय वाटेलच, परंतु हे तारुण्यमूर्ते देवा, अशा उपासनानिष्ठ भक्ताच्या उत्कर्षास आम्हीही हातभार लावूं असे कर. ॥ १० ॥


चित्ति॒मचि॑त्तिं चिनव॒द्वि वि॒द्वान्पृ॒ष्ठेव॑ वी॒ता वृ॑जि॒ना च॒ मर्ता॑न् ।
रा॒ये च॑ नः स्वप॒त्याय॑ देव॒ दितिं॑ च॒ रास्वादि॑तिमुरुष्य ॥ ११ ॥

चित्तिं अचित्तिं चिनवत् वि विद्वान् पृष्ठाऽइव वीता वृजिना च मर्तान् ।
राये च नः सुऽअपत्याय देव दितिं च रास्व अदितिं उरुष्य ॥ ११ ॥

तो सर्वज्ञ आहे तेव्हां विचार कोणता आणि अविचार कोणता ह्याची निवड तोच करूं शकेल, आणि ज्याप्रमाणे पृष्ठ (म्हणजे सामगायनाचे भेद) ओळखावे त्याप्रमाणे सरळ मार्ग कोणते , वक्र मार्ग कोणते व कोण मनुष्य कसा आहे हे त्यालाच समजेल. हे भगवंता, आम्हांस वैभव प्राप्त होऊन आम्ही आत्मवशच रहावें म्हणून आमच्या ठिकाणी औदार्यशीलता ठेव आणि मोक्षाचा मार्ग खुला कर. ॥ ११ ॥


क॒विं श॑शासुः क॒वयोऽ॑दब्धा निधा॒रय॑न्तो॒ दुर्या॑स्वा॒योः ।
अत॒स्त्वं दृश्याँ॑ अग्न ए॒तान्प॒ड्भिः प॑श्ये॒रद्भु॑यताँ अ॒र्य एवैः॑ ॥ १२ ॥

कविं शशासुः कवयः अदब्धाः निऽधारयंतः दुर्यासु आयोः ।
अतः त्वं दृश्यान् अग्ने एतान् पट्‌भिः पश्येः अद्भुितान् अर्यः एवैः ॥ १२ ॥

ज्यांना कसलाही अपाय होऊं शकत नाही त्या ज्ञानी जनांनी भक्ताच्या यज्ञमंदिरांत वेदीवर तुज सर्वज्ञ देवाची स्थापना करून तुझें गुणकीर्तन केलें. हे अग्नि, तूं जगत्‌प्रभु आहेस, म्हणून तेथूनही आपल्या तेजोरूप चंचल नेत्रांनी ह्या सर्व दृश्य आणि अदृश्य प्राण्यांना तूं पाहूं शकतोस. ॥ १२ ॥


त्वम् अ॑ग्ने वा॒घते॑ सु॒प्रणी॑तिः सु॒तसो॑माय विध॒ते य॑विष्ठ ।
रत्नं॑व भर शशमा॒नाय॑ घृष्वे पृ॒थु श्च॒न्द्रमव॑से चर्षणि॒प्राः ॥ १३ ॥

त्वं अग्ने वाघते सुऽप्रनीतिः सुतऽसोमाय विधते यविष्ठ ।
रत्नंत भर शशमानाय घृष्वे पृथु चंद्रं अवसे चर्षणिऽप्राः ॥ १३ ॥

तारुण्यमूर्ते अग्निदेवा, सोमरस सिद्ध करून तुझी उपासना करणार्‍या सेवकाला तू सन्मार्गदर्शक आहेस, तर हे दीप्तिमंता, तुझें यशोवर्णन करणार्‍या भक्तास अमोल आणि आल्हाददायक दिव्य रत्‍न अर्पण कर, कारण सकल जनांचा रक्षणकर्ता तूंच आहेस. ॥ १३ ॥


अधा॑ ह॒ यद्व॒यम॑ग्ने त्वा॒या प॒ड्भिर्हस्ते॑भिश्चकृ॒मा त॒नूभिः॑ ।
रथं॒ न क्रन्तो॒ अप॑सा भु॒रिजो॑र्‌ऋ॒तं ये॑मुः सु॒ध्य आशुषा॒णाः ॥ १४ ॥

अध ह यत् वयं अग्ने त्वाऽया पट्ऽभिः हस्तेभिः चकृम तनूभिः ।
रथं न क्रंतः अपसा भुरिजोः ऋतं येमुः सुऽध्य आशुषाणाः ॥ १४ ॥

हे अग्नि, तुला शरण आलेल्या भक्तजनांनी आपल्या बाहुबलाच्या कर्तबगारीनें कर्तृत्वशाली लोक ज्याप्रमाणें रथाला व्यवस्थित दिशेला लावतात त्याप्रमाणें, दुसरेही सत्पुरुष ध्यानासक्त मनानें तुझ्या सेवेचीच लालसा ठेवून केवळ सद्धर्मालाच धरून राहिलेले आहेत. ॥ १४ ॥


अधा॑ मा॒तुरु॒षसः॑ स॒प्त विप्रा॒ जाये॑महि प्रथ॒मा वे॒धसो॒ नॄन् ।
दि॒वस्पु॒त्रा अ~ण्गि॑रसो भवे॒माद्रिं॑ रुजेम ध॒निनं॑ शु॒चन्तः॑ ॥ १५ ॥

अधा मातुः उषसः सप्त विप्राः जायेमहि प्रथमाः वेधसः नॄन् ।
दिवः पुत्राः अङ्गि्रसः भवेम अद्रिं रुजेम धनिनं शुचंतः ॥ १५ ॥

तर आता माता उषा हिच्या उदरीं आम्हीं सप्तऋषि व शूर वीरांचे आद्यजनक म्हणून जन्मास यावे. आम्ही जे अंगिरसाचे वंशज त्यांनी द्युचे पुत्र म्हणून प्रसिद्ध व्हावें आणि तेजानें प्रखर होऊन, आमचे धन छपवून ठेवणार्‍या पर्वतास छिन्नभिन्न करून टाकावे, हीच आमची मनिषा आहे. ॥ १५ ॥


अधा॒ यथा॑ नः पि॒तरः॒ परा॑सः प्र॒त्नापसो॑ अग्न ऋ॒तमा॑शुषा॒णाः ।
शुचीद॑य॒न्दीधि॑तिमुक्थ॒शासः॒ क्षामा॑ भि॒न्दन्तो॑ अरु॒णीरप॑ व्रन् ॥ १६ ॥

अधा यथा नः पितरः परासः प्रत्नाेसः अग्ने ऋतं आशुषाणाः ।
शुचि इत् अयन् दीधितिं उक्थऽशसः क्षामा भिंदंतः अरुणीः अप व्रन् ॥ १६ ॥

तसेच हे अग्नि, आमचे पुरातन श्रेष्ठ पितर (अंगिरस) हे ज्याप्रमाणे सनातन धर्माचें भक्तीनें आचरण करून निष्कलंक पद पावले व ध्यानतेजांत निमग्न झाले त्याचप्रमाणे, त्यांनी सामगायन करून अवर्षणाचा गिरिदुर्ग फोडून टाकला व उषःकालीन अरुणवर्ण प्रवाहांचा लोट मुक्त केला. ॥ १६ ॥


सु॒कर्मा॑णः सु॒रुचो॑ देव॒यन्तोऽ॑यो॒ न दे॒वा जनि॑मा॒ धम॑न्तः ।
शु॒चन्तो॑ अ॒ग्निं व॑वृ॒धन्त॒ इन्द्र॑मू॒र्वं गव्यं॑ परि॒षद॑न्तो अग्मन् ॥ १७ ॥

सुऽकर्माणः सुऽरुचः देवऽयंतः अयः न देवाः जनिमा धमंतः ।
शुचंतः अग्निं ववृधंतः इंद्रं ऊर्वं गव्यं परिऽसदंतः अग्मन् ॥ १७ ॥

सत्कर्मरत, तेजःपुंज व भगवत्सेवातत्पर अशा अंगिरसांनी लोखंड भट्टींत घालून जाळावे त्याप्रमाणें आपले सर्व जन्म आटवून टाकून ते देवरूप झाले. त्यांनी अग्नीला प्रज्वलित केलें, भगवान इंद्राचा महिमा वृद्धिंगत केला आणि त्या तेजोरूप प्रचंड गो समूहाला वेढून टाकून हस्तगत करून घेतले. ॥ १७ ॥


आ यू॒थेव॑ क्षु॒मति॑ प॒श्वो अ॑ख्यद्दे॒वानां॒ यज्जनि॒मान्त्यु॑ग्र ।
मर्ता॑नां चिद् उ॒र्वशी॑रकृप्रन्वृ॒धे चि॑द॒र्य उप॑रस्या॒योः ॥ १८ ॥

आ यूथाऽइव क्षुऽमति पश्वः अख्यत् देवानां यत् जनिम् अंति उग्र ।
मर्तानां चित् उर्वशीः अकृप्रन् वृधे चित् अर्यः उपरस्य आयोः ॥ १८ ॥

हे उग्ररूप अग्निदेवा, पशूंचा कळप कुरणात चरत असतांना त्याच्याकडे गोपाल स्वस्थ अवलोकन करीत असतो, त्याप्रमाणे देवांचा प्रतापी जीवनक्रम ईश्वर अगदीं जवळ राहून शांतपणें पहात असतो. त्या देवतांची प्रबळ झालेली उत्कंठा आम्हां मनुष्यांकरितां आणि त्यांतल्या त्यांत तिला अगदीं जवळ वाटत असणारा जो महाथोर भक्त त्याचे उन्नतिकरितां तिळतिळ तुटत असते. ॥ १८ ॥


अक॑र्म ते॒ स्वप॑सो अभूम ऋ॒तम॑वस्रन्नु॒षसो॑ विभा॒तीः ।
अनू॑नम॒ग्निं पु॑रु॒धा सु॑श्च॒न्द्रं दे॒वस्य॒ मर्मृ॑जत॒श्चारु॒ चक्षुः॑ ॥ १९ ॥

अकर्म ते सुऽअपसः अभूम ऋतं अवस्रन् उषसः विभातीः ।
अनूनं अग्निं पुरुधा सुऽचंद्रं देवस्य मर्मृजतः चारु चक्षुः ॥ १९ ॥

हे अग्नि आम्ही तुझी सेवा केली आणि कृतकृत्य झालों. प्रकाशवती उषेने हें सत्यरूप आकाश प्रकाशित केले आहे. आणि ईश्वराचा सुंदर नेत्रच असा जो परिपूर्ण व मनोहर कांतिमान अग्नि त्याला आम्ही अनेक प्रकारांनी अलंकृत केलें आहे. ॥ १९ ॥


ए॒ता ते॑ अग्न उ॒चथा॑नि वे॒धोऽ॑वोचाम क॒वये॒ ता जु॑षस्व ।
उच्छो॑चस्व कृणु॒हि वस्य॑सो नो म॒हो रा॒यः पु॑रुवार॒ प्र य॑न्धि ॥ २० ॥

एता ते अग्ने उचथानि वेधः अवोचाम कवये ता जुषस्व ।
उत् शोचस्व कृणुहि वस्यसः नः महः रायः पुरुऽवार प्र यंधि ॥ २० ॥

हे अग्निदेवा, हे विधात्या, हीं तुझीं स्तोत्रें तूं जो महाज्ञानी त्या तुझ्या प्रित्यर्त्य आम्ही गायिली आहेत, तर तीं तूं मान्य करून घे. तूं आतां प्रदीप्त हो, आम्हांस ऐश्वर्योन्मुख कर, आणि हे सर्वजनप्रिय देवा, श्रेष्ठ जे वैभव आहे तें आम्हांस अर्पण कर. ॥ २० ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ३ ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


आ वो॒ राजा॑नमध्व॒रस्य॑ रु॒द्रं होता॑रं सत्य॒यजं॒ रोद॑स्योः ।
अ॒ग्निं पु॒रा त॑नयि॒त्नो्र॒चित्ता॒द्धिर॑ण्यरूप॒मव॑से कृणुध्वम् ॥ १ ॥

आ वः राजानं अध्वरस्य रुद्रं होतारं सत्यऽयजं रोदस्योः ।
अग्निं पुरा तनयित्नोःु अचित्तात् हिरण्यऽरूपं अवसे कृणुध्वं ॥ १ ॥

यज्ञकर्माचा अधिपति आणि सत्यमार्गानुसार यजन करणारा त्रिभुवनाचा आचार्य असा जो रुद्रस्वरूप सुवर्णमय अर्थात अविनाशी अग्नि, त्याला तुम्ही आपल्यावर एखादें सकल्पित संकट कोसळण्यापूर्वींच आपल्या कल्याणार्थ प्रज्वलित करा. ॥ १ ॥


अ॒यं योनि॑श्चकृ॒मा यं व॒यं ते॑ जा॒येव॒ पत्य॑ उश॒ती सु॒वासाः॑ ।
अ॒र्वा॒ची॒नः परि॑वीतो॒ नि षी॑दे॒मा उ॑ ते स्वपाक प्रती॒चीः ॥ २ ॥

अयं योनिः चकृम यं वयं ते जायाऽइव पत्ये उशती सुऽवासाः ।
अर्वाचीनः परिऽवीतः नि सीद इमाः ऊं इति ते सुऽअपाक प्रतीचीः ॥ २ ॥

भगवंता अग्नि, पहा ही सुंदर वेदी आम्ही तुझ्याकरितां सिद्ध केली आहे. पतीकरितां उत्सुक झालेली स्त्री वस्त्राभरणांनी नटून त्याची वाट पहात असते, त्याप्रमाणे ही वेदीही तुझ्याकरितां उत्कंठित होऊन तुझी मार्गप्रतीक्षा करीत आहे. तर तूं आपल्या दैवी परिवारासह ह्या वेदीवर आरोहण कर. हे पुण्यश्रेष्ठा, ह्या घृतस्रुचा तुज्याचकडे वळत आहेत. ॥ २ ॥


आ॒शृ॒ण्व॒ते अदृ॑पिताय॒ मन्म॑ नृ॒चक्ष॑से सुमृळी॒काय॑ वेधः ।
दे॒वाय॑ श॒स्तिम॒मृता॑य शंस॒ ग्रावे॑व॒ सोता॑ मधु॒षुद्यमी॒ळे ॥ ३ ॥

आऽशृण्वते अदृपिताय मन्म नृऽचक्षसे सुऽमृळीकाय वेधः ।
देवाय शस्तिं अमृताय शंस ग्रावाऽइव सोता मधुऽसुत् यं ईळे ॥ ३ ॥

प्रतिभासंपन्न विप्रा, भक्ताची प्रार्थना जो कनवाळूपणानें ऐकून घेतो, अहंकाराचा लवलेशही ज्याच्या ठिकाणी नाही, मनुष्यमात्रावर एकसारखी ज्याची नजर असून जो दयेचा सागर आहे, त्या ह्या अमर अग्नीचें तूं आतां यशोगायन कर. सोमवल्लीचा रस पिळणारा हा निर्जीव पाषाणसुद्धां मधुर रस गाळत असतांना आपल्या आवाजानें ह्या अग्नीचें स्तवनच करीत असतो. ॥ ३ ॥


त्वं चि॑न्नः॒ शम्या॑ अग्ने अ॒स्या ऋ॒तस्य॑ बोध्यृतचित्स्वा॒धीः ।
क॒दा त॑ उ॒क्था स॑ध॒माद्या॑नि क॒दा भ॑वन्ति स॒ख्या गृ॒हे ते॑ ॥ ४ ॥

त्वं चित् नः शम्यै अग्ने अस्याः ऋतस्य बोधि ऋतऽचित् सुऽआधीः ।
कदा ते उक्था सधऽमाद्यानि कदा भवंति सख्या गृहे ते ॥ ४ ॥

हे अग्नि, हे सत्यधर्मज्ञा, आमचा सत्यप्रयत्‍न आणि हें धर्मानुष्ठान आतां तरी तूं लक्षांत घे, कारण तूं स्वाधीनचित्त आहेस. जेथें सोमप्राशनानें आनंदीआनंद होत असतो अशा यज्ञसमारंभांत गावयाचीं स्तोत्रें आमच्याकडून कधीं म्हटलीं जातील आणि तुझा निकट सहवास आमच्या घरीं केव्हां होईल असें आम्हांस झालें आहे. ॥ ४ ॥


क॒था ह॒ तद्वरु॑णाय॒ त्वम॑ग्ने क॒था दि॒वे ग॑र्हसे॒ कन् न॒ आगः॑ ।
क॒था मि॒त्राय॑ मी॒ळ्हुषे॑ पृथि॒व्यै ब्रवः॒ कद॑र्य॒म्णे कद्भ गा॑य ॥ ५ ॥

कथा ह तत् वरुणाय त्वं अग्ने कथा दिवे गर्हसे कत् न आगः ।
कथा मित्राय मीळ्हुषे पृथिव्यै ब्रवः कत् अर्यम्णे कत् भगाय ॥ ५ ॥

अगिदेवा, भगवान वरुणाजवळ किंवा द्यूजवळ आमची निर्भर्त्सना तूं तरी कशासाठी करशील ? आम्ही असें कोणतें पातक केलें आहे ? इच्छित लाभांचा वर्षाव करणारा मित्रदेव, त्याचप्रमाणें पृथिवी, अर्यमा, किंवा भग ह्यांच्याजवळ तरी तूं आमच्याविषयीं वाईट काय म्हणून सांगशील ? ॥ ५ ॥


कद्धिष्ण्या॑सु वृधसा॒नो अ॑ग्ने॒ कद्वाता॑य॒ प्रत॑वसे शुभं॒ये ।
परि॑ज्मने॒ नास॑त्याय॒ क्षे ब्रवः॒ कद् अ॑ग्ने रु॒द्राय॑ नृ॒घ्ने ॥ ६ ॥

कत् धिष्ण्यासु वृधसानः अग्ने कत् वाताय प्रऽतवसे शुभंऽये ।
परिऽज्मने नासत्याय क्षे ब्रवः कत् अग्ने रुद्राय नृऽघ्ने ॥ ६ ॥

हे अग्नि आजूबाजूंच्या लहान लहान वेदींवर आम्ही भक्तांनी अर्पण केलेल्या आहुतींनी तूं वृद्धिंगत होत असतोस, तर महाबलवान परंतु जगत्‌कल्याणकारी वायुदेवाला तूं काय सांगशील ? अंतराळीं परिभ्रमण करणार्‍या नासत्याला किंवा भूमीला अथवा हे अग्ने, दुर्जननाशक रुद्राला तरी काय सांगशील ? ॥ ६ ॥


क॒था म॒हे पु॑ष्टिम्भ॒राय॑ पू॒ष्णे कद्‌रु॒द्राय॒ सुम॑खाय हवि॒र्दे ।
कद्विष्ण॑व उरुगा॒याय॒ रेतो॒ ब्रवः॒ कद॑ग्ने॒ शर॑वे बृह॒त्यै ॥ ७ ॥

कथा महे पुष्टिंऽभराय पूष्णे कत् रुद्राय सुऽमखाय हविःऽदे ।
कत् विष्णव उरुऽगायाय रेतः ब्रवः कत् अग्ने शरवे बृहत्यै ॥ ७ ॥

जगाचे पोषण करणारा पूषा किंवा देवतांस हविर्भाग नेऊन देणारा परमवंद्य रुद्र ह्यांच्याजवळ तरी आम्ही निंद्य आहों असें कसें बोलशील. जगताचें आक्रमण करणारा विष्णु त्याला अथवा हे अग्नि, त्या विद्युत्‌प्रेरक महाशक्तीला तरी तूं काय सांगशील बरें ? ॥ ७ ॥


क॒था शर्धा॑य म॒रुता॑मृ॒ताय॑ क॒था सू॒रे बृ॑ह॒ते पृ॒च्छ्यमा॑नः ।
प्रति॑ ब्र॒वोऽ॑दितये तु॒राय॒ साधा॑ दि॒वो जा॑तवेदश्चिकि॒त्वान् ॥ ८ ॥

कथा शर्धाय मरुतां ऋताय कथा सूरे बृहते पृच्छ्यमानः ।
प्रति ब्रवः अदितये तुराय साध दिवः जातऽवेदः चिकित्वान् ॥ ८ ॥

मरुतांचा जो न्यायशील सेनासमूल आहे, त्याच्याजवळ, किंवा परमथोर अशा सूर्यरूप देवानें आमच्याविषयीं प्रश्न केला तर त्याच्याजवळ कसें काय सांगशील ? भक्तसहायार्थ त्वरेनें धांवणारा जो अखंडित शक्ति ईश्वर त्याच्याजवळ काय बोलशील ? जातवेदा अग्नी, तूं सर्वज्ञच आहेस तर द्युलोकनिवासी जो ईश्वर त्याची अनुकूलता आम्हांस करून दे. ॥ ८ ॥


ऋ॒तेन॑ ऋ॒तं निय॑तमीळ॒ आ गोरा॒मा सचा॒ मधु॑मत्प॒क्वम॑ग्ने ।
कृ॒ष्णा स॒ती रुश॑ता धा॒सिनै॒षा जाम॑र्येण॒ पय॑सा पीपाय ॥ ९ ॥

ऋतेन ऋतं निऽयतं ईळ आ गोः आमा सचा मधुऽमत् पक्वं अग्ने ।
कृष्णा सती रुशता धासिना एषा जामर्येण पयसा पीपाय ॥ ९ ॥

जें सत्य शाश्वत आहे त्याची महती मी सत्याचरणानेंच वृद्धिंगत करतो. ही यज्ञधेनु जरी लहान कोंवळी दिसली तरी तिचें दुग्ध फारच स्वादिष्ट आणि परिपक्व असतें आणि तिचा रंग जरी काळा असला तरी शुभ्र, तकतकीत आणि पौष्टिक अशा दुग्धानें तिची कांस तुडुंब भरून गेलेली असतें ॥ ९ ॥


ऋ॒तेन॒ हि ष्मा॑ वृष॒भश्चि॑द॒क्तः पुमाँ॑ अ॒ग्निः पय॑सा पृ॒ष्ठ्येन ।
अस्प॑न्दमानो अचरद्वयो॒धा वृषा॑ शु॒क्रं दु॑दुहे॒ पृश्नि॒रूधः॑ ॥ १० ॥

ऋतेन हि ष्मा वृषभः चित् अक्तः पुमान् अग्निः पयसा पृष्ठ्येन ।
अस्पंदमानः अचरत् वयःऽधाः वृषा शुक्रं दुदुहे पृश्निः ऊधः ॥ १० ॥

वीरपुंगव आणि पौरुषशाली अग्नीचा पृष्ठभागसुद्धां सत्यधर्मरूप दुग्धरसानेंच ओथंबलेला असतो. तारुण्याचा जोम उत्पन्न करणारा तो वीरधुरीण अग्नि केव्हांही न डगमतांच सर्वत्र संचार करतो. पण अशा वेळेस चित्रविचित्र वर्णाची मेघरूप धेनु आपल्या कांसेंतून शुभ्र तेजस्वी दुधाचा पान्हा सोडते. ॥ १० ॥


ऋ॒तेनाद्रिं॒ व्यसन्भि॒दन्तः॒ सम~ण्गि॑रसो नवन्त॒ गोभिः॑ ।
शु॒नं नरः॒ परि॑ षदन्नु॒षास॑म् आ॒विः स्वरभवज्जा॒ते अ॒ग्नौ ॥ ११ ॥

ऋतेनाद्रिं वि असन् भिदंतः सं अङ्‌गिरसः नवंत गोभिः ।
शुनं नरः परि सदन् उषसं आविः स्वः अभवत् जाते अग्नौ ॥ ११ ॥

सत्यधर्माच्या प्रभावानेंच अंगिरसांनी पर्वत फोडून छिन्नभिन्न करून टाकला आणि प्रकाशरूप धेनु हस्तगत करून त्यांच्यासह भगवंताचें स्तवन केले. ’उषा’ हें जें जगताचे हितसाधन तेंही त्या विरांनी स्वाधीन करून घेतलें, परंतु वेदीवर अग्नि आविर्भूत होऊन त्याची उपासना झाल्यावर मग सूर्य दृग्गोचर झाला. ॥ ११ ॥


ऋ॒तेन॑ दे॒वीर॒मृता॒ अमृ॑क्ता॒ अर्णो॑भि॒रापो॒ मधु॑मद्भििरग्ने ।
वा॒जी न सर्गे॑षु प्रस्तुभा॒नः प्र सद॒मित्स्रवि॑तवे दधन्युः ॥ १२ ॥

ऋतेन देवीः अमृता अमृक्ताः अर्णःऽभिः आपः मधुमत्ऽभिः अग्ने ।
वाजी न सर्गेषु प्रऽस्तुभानः प्र सदं इत् स्रवितवे दधन्युः ॥ १२ ॥

हे अग्नि, सत्यधर्माच्या योगानेंच आपोदेवी ह्या अमर व निष्कलंक राहून मधुर उदकाच्या कल्लोळांनी उचंबळत असतात आणि हल्ला चढविण्यास प्रोत्साहन मिळालेल्या शूर योद्ध्याप्रमाणें महासागराला मिळण्याकरितां सपाट्यानें धांवत जातात. ॥ १२ ॥


मा कस्य॑ य॒क्षं सद॒मिद्धु॒रो गा॒ मा वे॒शस्य॑ प्रमिन॒तो मापेः ।
मा भ्रातु॑रग्ने॒ अनृ॑जोर्‌ऋ॒णं वे॒र्मा सख्यु॒र्दक्षं॑ रि॒पोर्भु॑जेम ॥ १३ ॥

मा कस्य यक्षं सदं इत् हुरः गाः मा वेशस्य प्रऽमिनतः मा आपेः ।
मा भ्रातुः अग्ने अनृजोः ऋणं वेः मा सख्युः दक्षं रिपोः भुजेम ॥ १३ ॥

कोणत्याही कपटी अधमाच्या, किंवा कोणत्याही दांभिक शेजार्‍याच्या अथवा आप्त म्हणवून आमचा घात करणार्‍या दुष्टाच्या यज्ञाला तूं कधीही जाऊ नकोस. हे अग्नि, आमच्या बंधूच्या कुटीलपणाचा वचपा तूं आमच्यावर काढूं नकोस. मित्राच्याच काय पण शत्रूच्या सुद्धां प्रामाणिकपणामुळेंच आमची उपजीविका चालली असें होऊं देऊं नको. ॥ १३ ॥


रक्षा॑ णो अग्ने॒ तव॒ रक्ष॑णेभी रारक्षा॒णः सु॑मख प्रीणा॒नः ।
प्रति॑ ष्फुर॒ वि रु॑ज वी॒ड्वंहो॑ ज॒हि रक्षो॒ महि॑ चिद्वावृधा॒नम् ॥ १४ ॥

रक्ष णः अग्ने तव रक्षणेभिः ररक्षाणः सुऽमख प्रीणानः ।
प्रति स्फुर वि रुज वीळु अंहः जहि रक्षः महि चित् ववृधानं ॥ १४ ॥

हे अग्नि, हे परमवंद्य देवा, तूं प्रसन्न होऊन आमचें रक्षण पूर्वापार करीत आला आहेस तसेंच पुढेंही तूं आपल्या संरक्षक सामर्थ्यांनी आमचें रक्षण कर. तूं धगधगीत हो आणि आम्हांला पक्केपणीं खिळून राहिलेल्या पापाचे तुकडेतुकडे उडव, आणि उत्तरोत्तर बळावत जाणार्‍या राक्षसांचा नायनाट कर. ॥ १४ ॥


ए॒भिर्भ॑व सु॒मना॑ अग्ने अ॒र्कैरि॒मान्स्पृ॑श॒ मन्म॑भिः शूर॒ वाजा॑न् ।
उ॒त ब्रह्मा॑ण्यङ्गिरो जुषस्व॒ सं ते॑ श॒स्तिर्दे॒ववा॑ता जरेत ॥ १५ ॥

एभिः भव सुऽमनाः अग्ने अर्कैः इमान् स्पृश मन्मऽभिः शूर वाजान् ।
उत ब्रह्माणि अङ्‌गिरः जुषस्व सं ते शस्तिः देवऽवाता जरेत ॥ १५ ॥

हे अग्नि, आम्ही उच्चस्वरांत म्हटलेल्या ह्या स्तवनांच्या योगानें तूं हृष्टचित्त हो. हे वीरा, आमच्या मननीय स्तोत्रांनी तूं प्रसन्न होऊन आमच्या बलवर्धक हविर्भागांना स्पर्श कर. हे अंगिरा, ह्या स्तुति-प्रार्थना मान्य करून घे. देवांना प्रिय अशी ही तुझी प्रशंसा आतां तुझ्याच गुणांचा अनुवाद करो. ॥ १५ ॥


ए॒ता विश्वा॑ वि॒दुषे॒ तुभ्यं॑ वेधो नी॒थान्य॑ग्ने नि॒ण्या वचां॑सि ।
नि॒वच॑ना क॒वये॒ काव्या॒न्यशं॑सिषं म॒तिभि॒र्विप्र॑ उ॒क्थैः ॥ १६ ॥

एता विश्वा विदुषे तुभ्यं वेधः नीथानि अग्ने निण्या वचांसि ।
निऽवचना कवये काव्यानि अशंसिषं मतिऽभिः विप्रः उक्थैः ॥ १६ ॥

विधात्या अग्निदेवा, हे तुझे एकंदर अगम्यमार्ग, गूढवचनें, तुझें गुणकिर्तन आणि त्याचप्रमाणें ह्या तुझ्या काव्यमय स्तुति, मीं - प्रेमळ भक्तानें - सर्वज्ञ जो तूं त्या तुझ्या प्रित्यर्थ अंतःकरणपूर्वक सामगायनांसह गायिल्या आहेत त्यांचा स्वीकार कर. ॥ १६ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ४ ( रक्षोह अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


कृ॒णु॒ष्व पाजः॒ प्रसि॑तिं॒ न पृ॒थ्वीं या॒हि राजे॒वाम॑वाँ॒ इभे॑न ।
तृ॒ष्वीमनु॒ प्रसि॑तिं द्रूणा॒नोऽ॑स्तासि॒ विध्य॑ र॒क्षस॒स्तपि॑ष्ठैः ॥ १ ॥

कृणुष्व पाजः प्रऽसितिं न पृथ्वीं याहि राजाऽइव अमऽवान् इभेन ।
तृष्वीं अनु प्रऽसितिं द्रूणानः अस्ता असि विध्य रक्षसः तपिष्ठैः ॥ १ ॥

प्रचंड अस्त्रजाल सोडल्याप्रमाणे तूं आपल्या तेजाचा पुंज जिकडे तिकडे पसरून दे आणि हत्तीवर आरूढ हो‍उन फिरणार्‍या नृपतीप्रमाणे मोठ्या थाटाने संचार कर. भक्तांवर निकरानें हल्ला करणार्‍या उन्मत्त राक्षस सेनेचा पाठलाग करून तिचा धुव्वा उडविणारा तूंच आहेस. त्याअर्थी, हे अग्नि, आपल्या जवळील ज्वालांनी राक्षसांचा संहार कर. ॥ १ ॥


तव॑ भ्र॒मास॑ आशु॒या प॑त॒न्त्यनु॑ स्पृश धृष॒ता शोशु॑चानः ।
तपूं॑ष्यग्ने जु॒ह्वा पतं॒गानसं॑दितो॒ वि सृ॑ज॒ विष्व॑गु॒ल्काः ॥ २ ॥

तव भ्रमासः आशुऽया पतंति अनु स्पृश धृषता शोशुचानः ।
तपूंषि अग्ने जुह्वा पतंगान् असंऽदितः वि सृज विष्वक् उल्काः ॥ २ ॥

मोठ्या जोराने गरगर फिरणारी तुझी ज्वालारूप अस्त्रें अतिशय वेगानें जाऊन शत्रूंवर पडतात; तर तूं आपलें प्रखर तेज प्रकट करून भर वेगानें चाल करून शत्रूंशी गांठ घाल. हे अग्नि, तूं अनिवार्य आहेस, तेव्हां आपल्या ज्वालेने, आग, ठिणग्या आणि रखरखित निखारे जिकडे तिकडे उडवून दे. ॥ २ ॥


प्रति॒ स्पशो॒ वि सृ॑ज॒ तूर्णि॑तमो॒ भवा॑ पा॒युर्वि॒शो अ॒स्या अद॑ब्धः ।
यो नो॑ दू॒रे अ॒घशं॑सो॒ यो अन्त्यग्ने॒ माकि॑ष्टे॒ व्यथि॒रा द॑धर्षीत् ॥ ३ ॥

प्रति स्पशः वि सृज तूर्णिऽतमः भव पायुः विशः अस्या अदब्धः ।
यः नः दूरे अघऽशंसः यः अंति अग्ने माकिः ते व्यथिः आ दधर्षीत् ॥ ३ ॥

तूं आपला रश्मिसमूह चोहोंकडे पसरून दे. तुझा वेग अत्यंत तीव्र आहे आणि तूं अपराजित आहेस, तर हे देवा, तुझे प्रजानन म्हणविणार्‍या आम्हां भक्तजनांचा, जननिंदा करणार्‍या अधमापासून - मग तो आमच्यापासून दूर असो किंवा जवळ असो - तूं बचाव कर, आणि सर्वांची पांचावर धारण बसविणारी तुझ्या क्रोधाची बाधा आम्हांस होऊं देऊं नकोस. ॥ ३ ॥


उद॑ग्ने तिष्ठ॒ प्रत्या त॑नुष्व॒ न्य१मित्राँ॑ ओषतात्तिग्महेते ।
यो नो॒ अरा॑तिं समिधान च॒क्रे नी॒चा तं ध़॑य् अत॒सं न शुष्क॑म् ॥ ४ ॥

उत् अग्ने तिष्ठ प्रति आ तनुष्व नि अमित्रान् ओषतात् तिग्मऽहेते ।
यः नः अरातिं संऽइधान चक्रे नीचा तं ध़इ अतसं न शुष्कं ॥ ४ ॥

हे अग्ने, आतां उठून उभा रहा, आणि आपले विक्राळ स्वरूप शत्रूंच्या समोर प्रसृत कर. हे तीक्ष्णास्त्रा, हे दीप्तिमान देवा, शत्रूंना होरपळून टाक आणि ज्याने म्हणून आमच्याशी हाडवैर धरलेले असेल त्याला, एखादी खळखळीत वाळलेली सनकाडी जाळून टाकावी त्याप्रमाणे, जाळून टाक. ॥ ४ ॥


ऊ॒र्ध्वो भ॑व॒ प्रति॑ वि॒ध्याध्य॒स्मदा॒विष्कृ॑णुष्व॒ दैव्या॑न्यग्ने ।
अव॑ स्थि॒रा त॑नुहि यातु॒जूनां॑ जा॒मिमजा॑मिं॒ प्र मृ॑णीहि॒ शत्रू॑न् ॥ ५ ॥

ऊर्ध्वः भव प्रति विध्य अधि अस्मत् आविः कृणुष्व दैव्यानि अग्ने ।
अव स्थिरा तनुहि यातुऽजूनां जामिं अजामिं प्र मृणीहि शत्रून् ॥ ५ ॥

आतां सज्ज हो. आमच्यापासून शत्रूंना पार नाहींसे करून टाक आणि आपल्या दिव्य सामर्थ्यांचे प्रदर्शन कर. जादूगार राक्षसांची धनुष्यें कितीही मजवूत असली तरी ती ढिली पाड आणि आमच्यासमोर जे जे म्हणून शत्रू उभे राहतील - मग ते आमचे कोणी संबंधी असोत वा नसोत, त्या सर्वांचा संहार कर. ॥ ५ ॥


स ते॑ जानाति सुम॒तिं य॑विष्ठ॒ य ईव॑ते॒ ब्रह्म॑णे गा॒तुमैर॑त् ।
विश्वा॑न्यस्मै सु॒दिना॑नि रा॒यो द्यु॒म्नान्य॒र्यो वि दुरो॑ अ॒भि द्यौ॑त् ॥ ६ ॥

सः ते जानाति सुऽमतिं यविष्ठ यः ईवते ब्रह्मणे गातुं ऐरत् ।
विश्वानि अस्मै सुऽदिनानि रायः द्युम्नानि अर्यः वि दुरः अभि द्यौत् ॥ ६ ॥

जो भक्त अशा प्रकारच्या प्रगल्भ प्रार्थनेला आपल्या हृदयांत मार्ग करून देतो, अशा सद्‍भक्तालाच हे तारुण्यमूर्ते देवा, तुझ्या खर्‍या खर्‍या वात्सल्याचा अनुभव येतो. तूं जगत्‌प्रभु आहेस, तेव्हां त्या तुझ्या भक्ताच्या आयुष्याचे एकंदर दिवस मंगलमय करून त्याच्या निवासमंदिराचीं द्वारें सद्‍भाग्याच्या उज्ज्वलतेनें तूं सुप्रकाशित करावींस (हे यथायोग्यच आहे). ॥ ६ ॥


सेद॑ग्ने अस्तु सु॒भगः॑ सु॒दानु॒र्यस्त्वा॒ नित्ये॑न ह॒विषा॒ य उ॒क्थैः ।
पिप्री॑षति॒ स्व आयु॑षि दुरो॒णे विश्वेद॑स्मै सु॒दिना॒ सास॑दि॒ष्टिः ॥ ७ ॥

सः इत् अग्ने अस्तु सुऽभगः सुऽदानुः यः त्वा नित्येन हविषा यः उक्थैः ।
पिप्रीषति स्वे आयुषि दुरोणे विश्वा इत् अस्मै सुऽदिना सा असत् इष्टिः ॥ ७ ॥

आपल्या अखंड भक्तियुक्त हवीनें अथवा स्तोत्रांनी, तुझ्या मंदिरांत उपासना करून तुला प्रस्न्न करावें अशी जो भक्त आपल्या सर्व आयुष्यभर इच्छा बाळगतो, हे अग्नि, तोच सद्‍भक्त भाग्यशाली व तोच औदार्यशील होवो. त्याचे सर्वच दिवस सुखांत जाऊन त्याचा मनोरथ सफल होवो. ॥ ७ ॥


अर्चा॑मि ते सुम॒तिं घोष्य॒र्वाक्सं ते॑ वा॒वाता॑ जरतामि॒यं गीः ।
स्वश्वा॑स्त्वा सु॒रथा॑ मर्जयेमा॒स्मे क्ष॒त्राणि॑ धारये॒रनु॒ द्यून् ॥ ८ ॥

अर्चामि ते सुऽमतिं घोषि अर्वाक् सं ते ववाता जरतां इयं गीः ।
सुऽअश्वाः त्वा सुऽरथाः मर्जयेम अस्मे इति क्षत्राणि धारयेः अनु द्यून् ॥ ८ ॥

तुझ्या सौजन्याचीच महती मी मोठ्याने घोष करून गात आहे, तर आतां ही तुझी स्तुति तुझेंच यशोगायन करो. हे देवा, आम्ही तीक्ष्णबुद्धिरूप अश्वांनी संपन्न असे महारथी होऊन तुझी सेवा करावी असें कर आणि आमची सामर्थ्यसत्ता निरंतर कायम ठेव. ॥ ८ ॥


इ॒ह त्वा॒ भूर्या च॑रे॒दुप॒ त्मन्दोषा॑वस्तर्दीदि॒वांस॒मनु॒ द्यून् ।
क्रीळ॑न्तस्त्वा सु॒मन॑सः सपेमा॒भि द्यु॒म्ना त॑स्थि॒वांसो॒ जना॑नाम् ॥ ९ ॥

इह त्वा भूरि आ चरेत् उप त्मन् दोषाऽवस्तः दीदिऽवांसं अनु द्यून् ।
क्रीळंतः त्वा सुऽमनसः सपेम अभि द्युम्ना तस्थिऽवांसः जनानां ॥ ९ ॥

या यज्ञमंदिरात रात्रंदिवस प्रज्वलित राहणार्‍या तुज भगवंताची मोठ्या भक्तानें प्रत्यही आपण होऊन सर्वभावानें उपासना करावी हेंच उचित. तेव्हां मोठ्या उत्साहानें व शुद्धांतःकरणानें तुझें अर्चन आम्हांस करूं दे आणि जगामध्ये लोकांना जें जें वैभव मिळते त्याच्याही पलीकडे जाऊन दिव्य ऐश्वर्याचा उपभोग आम्हांस घेऊं दे. ॥ ९ ॥


यस्त्वा॒ स्वश्वः॑ सुहिर॒ण्यो अ॑ग्न उप॒याति॒ वसु॑मता॒ रथे॑न ।
तस्य॑ त्रा॒ता भ॑वसि॒ तस्य॒ सखा॒ यस्त॑ आति॒थ्यमा॑नु॒षग्जुजो॑षत् ॥ १० ॥

यः त्वा सुऽअश्वः सुऽहिरण्यः अग्ने उपऽयाति वसुऽमता रथेन ।
तस्य त्राता भवसि तस्य सखा यः ते आतिथ्यं आनुषक् जुजोषत् ॥ १० ॥

ज्याचा बुद्धिरूप अश्व मोठा तडफदार व जो भक्तिरूप सुवर्णभूषणानें सुशोभित आहे असा जो कोणी भक्त बहुमोल प्रेम संपत्तीनें खच्चून भरलेल्या आपल्या मनोरथानिशीं तुला शरण येतो त्याचा तूं संरक्षण करणारा होतोस, आणि तुझा यथायोग्य आदरसत्कार करण्यांतच ज्याला आनंद वाटतो त्याचा तूं हितकारी मित्र होतोस. ॥ १० ॥


म॒हो रु॑जामि ब॒न्धुता॒ वचो॑भि॒स्तन्मा॑ पि॒तुर्गोत॑मा॒दन्वि॑याय ।
त्वं नो॑ अ॒स्य वच॑सश्चिकिद्धि॒ होत॑र् यविष्ठ सुक्रतो॒ दमू॑नाः ॥ ११ ॥

महः रुजामि बंधुता वचःऽभिः तत् मा पितुः गोतमात् अनु इयाय ।
त्वं नः अस्य वचसः चिकिद्धि होतः यविष्ठ सुक्रतो इति सुऽक्रतो दमूनाः ॥ ११ ॥

तुझ्या बंधुप्रेमाच्या आणि स्तुतींच्या जोरावर मी मोठमोठ्यांचाही मोड करून टाकतों. हें तुझें मजविषयींचे प्रेम माझा पिता जो गोतम त्याच्यामुळेंच माझ्या ठिकाणी जडलेले आहे. तर हे तारुण्याढ्य यज्ञनायका, हे महानुभाव देवा, तूं स्वाधीनचित्त आहेस, तर ह्या माझ्या विनवणीकडे तुझे पूर्ण लक्ष असूं दे. ॥ ११ ॥


अस्व॑प्नजस्त॒रण॑यः सु॒शेवा॒ अत॑न्द्रासोऽवृ॒का अश्र॑मिष्ठाः ।
ते पा॒यवः॑ स॒ध्र्य~न्चो नि॒षद्याग्ने॒ तव॑ नः पान्त्वमूर ॥ १२ ॥

अस्वप्नऽजः तरणयः सुऽशेवाः अतंद्रासः अवृकाः अश्रमिष्ठाः ।
ते पायवः सध्र्यंचः निऽसद्य अग्ने तव नः पांतु अमूर ॥ १२ ॥

जे कधींही झोप घेत नाहीत, जे नेहमी पुढेंच सरसावत असतात, जे अत्यंत सुखवर्धक, आलस्यविमुख व परोपकारी असून ज्यांना कर्तव्याचे कधींही श्रम वाटत नाहींत, असे जे तुझे आज्ञांकित सेवक आहेत ते एकत्र होऊन, हे अजड देवा, आमचे संरक्षण करोत. ॥ १२ ॥


ये पा॒यवो॑ मामते॒यं ते॑ अग्ने॒ पश्य॑न्तो अ॒न्धं दु॑रि॒तादर॑क्षन् ।
र॒रक्ष॒ तान्सु॒कृतो॑ वि॒श्ववे॑दा॒ दिप्स॑न्त॒ इद्रि॒पवो॒ नाह॑ देभुः ॥ १३ ॥

ये पायवः मामतेयं ते अग्ने पश्यंतः अंधं दुःऽइतात् अरक्षन् ।
ररक्ष तान् सुऽकृतः विश्वऽवेदाः दिप्संत इत् रिपवः न अह देभुः ॥ १३ ॥

तुझे जे भक्तरक्षक सेवक आहेत त्यांनी ममतेच्या अंध झालेल्या पुत्राला पाहतांच त्याचें क्लेशापासून रक्षण झाले. ह्याप्रमाणे त्या महाशक्तिमान सर्वज्ञ भगवंतानें त्या भक्तांचे अशा रीतीनें संरक्षण केलें की नुकसान करण्याचें मनांत असतांही शत्रु त्यांचे कांहीएक वांकडे करूं शकले नाहीत. ॥ १३ ॥


त्वया॑ व॒यं स॑ध॒न्य१स्त्वोता॒स्तव॒ प्रणी॑त्यश्याम॒ वाजा॑न् ।
उ॒भा शंसा॑ सूदय सत्यतातेऽनुष्ठु॒या कृ॑णुह्यह्रयाण ॥ १४ ॥

त्वया वयं सऽधन्यः त्वाऽऊताः तव प्रऽनीती अश्याम वाजान् ।
उभा शंसा सूदय सत्यऽताते अनुष्ठुया कृणुहि अह्रयाण ॥ १४ ॥

तुझ्या कृपेने खरोखर आम्ही धन्य झालों आहोत आतां तुझ्या कृपाछत्राखालीं राहून आम्ही तुझ्या अनुशासनानें सत्त्व सामर्थ्यांची जोड मिळवूं असें घडो. हे सत्यप्रतिज्ञ भगवंता, आमच्या दोन्ही आकांक्षा शांत कर. निःस्पृह देवा हें आतांच्या आतांच करून टाक. ॥ १४ ॥


अ॒या ते॑ अग्ने स॒मिधा॑ विधेम॒ प्रति॒ स्तोमं॑ श॒स्यमा॑नं गृभाय ।
दहा॒शसो॑ र॒क्षसः॑ पा॒ह्य१स्मान्द्रु॒हो नि॒दो मि॑त्रमहो अव॒द्यात् ॥ १५ ॥

अया ते अग्ने संऽइधा विधेम प्रति स्तोमं शस्यमानं गृभाय ।
दह अशसः रक्षसः पाहि अस्मान् द्रुहः निदः मित्रऽमहः अवद्यात् ॥ १५ ॥

हे अग्नि, ही समिधा तुला अर्पण करून तुझी उपास्ना आम्ही करीत आहों, तेव्हां आतां आम्ही जे स्तोत्र म्हटलें आहे त्याचा तूं स्वीकार कर. हे मित्राप्रमाणे सुखकर कांतिमान देवा, सज्जनद्वेष्टे, देवनिंदक आणि भलभलत्या कंड्या पिकविणार्‍या नीचांपासून आमचा बचाव कर. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५ ( वैश्वानर अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


वै॒श्वा॒न॒राय॑ मी॒ळ्हुषे॑ स॒जोषाः॑ क॒था दा॑शेमा॒ग्नये॑ बृ॒हद्भाः ।
अनू॑नेन बृह॒ता व॒क्षथे॒नोप॑ स्तभायदुप॒मिन्न रोधः॑ ॥ १ ॥

वैश्वानराय मीळ्हुषे सजोषाः कथा दाशेम अग्नये बृहत् भाः ।
अनूनेन बृहता वक्षथेन उप स्तभायत् उपऽमित् न रोधः ॥ १ ॥

सकल जनांचे हितच करणारा आणि मनोरथवर्षक जो अग्निदेव त्याला आम्ही प्रेमानें एकत्र होऊन हवि अर्पण करावयाचा तो कशा तऱ्हेनें करावा बरें ? ह्या अग्नीची प्रभा काही अपूर्व आहे. घराचें आढें ज्याप्रमाणें खांबाच्या आधारावर उचलून धरलेले अस तें त्याचप्रमाणे आकाश मंडळाला त्यानें आपल्या संपूर्ण आणि अलोट सामर्थ्याच्या जोरावर सांवरून धरलेले आहे. ॥ १ ॥


मा नि॑न्दत॒ य इ॒मां मह्यं॑ रा॒तिं दे॒वो द॒दौ मर्त्या॑य स्व॒धावा॑न् ।
पाका॑य॒ गृत्सो॑ अ॒मृतो॒ विचे॑ता वैश्वान॒रो नृत॑मो य॒ह्वो अ॒ग्निः ॥ २ ॥

मा निंदत यः इमां मह्यं रातिं देवः ददौ मर्त्याय स्वधाऽवान् ।
पाकाय गृत्सः अमृतः विऽचेता वैश्वानरः नृऽतमः यह्वः अग्निः ॥ २ ॥

मी दीन मर्त्य असूनही ज्या देवानें आपला प्रसाद म्हणून मला ऐश्वर्य दिलें तो हा अग्निदेव सत्ताधीश, मोठा विचक्षण, अजरामर, सर्वज्ञ, भक्तजनप्रिय वीरश्रेष्ठ आणि महाबलवान आहे. त्याला तुम्ही केव्हांही दोष लावूं नका. ॥ २ ॥


साम॑ द्वि॒बर्हा॒ महि॑ ति॒ग्मभृ॑ष्टिः स॒हस्र॑रेता वृष॒भस्तुवि॑ष्मान् ।
प॒दं न गोरप॑गूळ्हं विवि॒द्वान॒ग्निर्मह्यं॒ प्रेदु॑ वोचन्मनी॒षाम् ॥ ३ ॥

साम द्विऽबर्हाः महि तिग्मऽभृष्टिः सहस्रऽरेताः वृषभः तुविष्मान् ।
पदं न गोः अपऽगूळ्हं विविद्वान् अग्निः मह्यं प्र इत् ऊं इति वोचत् मनीषां ॥ ३ ॥

जो दोन्ही लोकांत वरिष्ठ आणि ज्याचीं शस्त्रास्त्रें अत्यंत जाज्वल्य आहेत, तो अनंतवीर्य असून शूरांचा अग्रणी आणि मोठा झुंझार आहे. ज्ञानधेनूंचे गूढ निवासस्थान जसें तो जाणतो तसेंच उत्कृष्ट प्रतीचें ’साम’ गायनही त्याला माहीत आहे. अशा अग्नीनें आपल्या अगदीं अंतःकरणांतील गोष्ट मला सांगितली. ॥ ३ ॥


प्र ताँ अ॒ग्निर्ब॑भसत्ति॒ग्मज॑म्भ॒स्तपि॑ष्ठेन शो॒चिषा॒ यः सु॒राधाः॑ ।
प्र ये मि॒नन्ति॒ वरु॑णस्य॒ धाम॑ प्रि॒या मि॒त्रस्य॒ चेत॑तो ध्रु॒वाणि॑ ॥ ४ ॥

प्र तान् अग्निः बभसत् तिग्मऽजंभः तपिष्ठेन शोचिषा यः सुऽराधाः ।
प्र ये मिनंति वरुणस्य धाम प्रिया मित्रस्य चेततः ध्रुवाणि ॥ ४ ॥

अग्नि हा मोठा कृपाळू खरा परंतु त्याच्या ज्वालारूप दाढा फार प्रखर आहेत, तेव्हां अर्थातच लोकमित्र आणि चित्स्वरूप जो भगवान वरुण त्यानें सज्जनांस प्रिय वाटणारे जे अढळ नीतिनियम घालून दिलेले आहेत ते नियम जेजे दुष्ट मोडतात त्यांना तो आपल्या रखरखीत आहाळानें भस्म करून टाकतो. ॥ ४ ॥


अ॒भ्रा॒तरो॒ न योष॑णो॒ व्यन्तः॑ पति॒रिपो॒ न जन॑यो दु॒रेवाः॑ ।
पा॒पासः॒ सन्तो॑ अनृ॒ता अ॑स॒त्या इ॒दम् प॒दम॑जनता गभी॒रम् ॥ ५ ॥

अभ्रातरः न योषणः व्यंतः पतिऽरिपः न जनयः दुःऽएवाः ।
पापासः संतः अनृताः असत्याः इदं पदं अजनत गभीरं ॥ ५ ॥

पाठींपोटी कांहीच नसलेल्या स्वैरवर्तनी तरुण स्त्रियांप्रमाणे जे स्वेच्छाचारी असतात, किंवा आपल्या पतीलाच फसविणार्‍या स्त्रियांप्रमाणे जे दुराचरणी असतात, अशाच पातकी, धर्मलंड आणि खोडसाळ नीच दुष्टांनी अथांग खोल असा जो नरकलोक तो आपल्या स्वतःकरितां उत्पन्न केला आहे. ॥ ५ ॥


इ॒दं मे॑ अग्ने॒ किय॑ते पाव॒कामि॑नते गु॒रुं भा॒रं न मन्म॑ ।
बृ॒हद्द॑धाथ धृष॒ता ग॑भी॒रं य॒ह्वं पृ॒ष्ठं प्रय॑सा स॒प्तधा॑तु ॥ ६ ॥

इदं मे अग्ने कियते पावक अमिनते गुरुं भारं न मन्म ।
बृहत् दधाथ धृषता गभीरं यह्वं पृष्ठं प्रयसा सप्तऽधातु ॥ ६ ॥

मी किती क्षुल्लक मनुष्य, पण देवाची आज्ञा न मोडणारा असल्यामुळे, हे पापनाशक अग्नि, तेवढ्यासाठी एकदम हें स्तोत्रगायन तूं मला प्रेमानें शिकविलेंस. परंतु ते मला एक भारी ओझ्याप्रमाणेंच वाटते, कारण तें ’बृहत्’ आणि ’पृष्ठ’ नांवाचे साम स्तोत्र मोठें गंभीर, जोरदार व सप्तस्वरात्मक आहे. ॥ ६ ॥


तमिन्न्वे३॑व स॑म॒ना स॑मा॒नम॒भि क्रत्वा॑ पुन॒ती धी॒तिर॑श्याः ।
स॒सस्य॒ चर्म॒न्नधि॒ चारु॒ पृश्ने॒रग्रे॑ रु॒प आरु॑पितं॒ जबा॑रु ॥ ७ ॥

तं इत् नु एव समना समानं अभि क्रत्वा पुनती धीतिः अश्याः ।
ससस्य चर्मन् अधि चारु पृश्नेः अग्रे रुपः आरुपितं जबारु ॥ ७ ॥

म्हणून चित्त शुद्ध करणारी ही आमची ध्यानप्रणवता, एकात्मतेनें सर्वांनाच समान असणारा जो अग्नि त्याला त्याच्याच कर्तृत्वाच्या योगाने जाऊन मिळो. पहा तें त्याचें सुंदर पण तल्लख स्वरूप पृथ्वीवरील तृणधान्यांनी बनलेल्या आच्छादानाच्या वर चित्रविचित्र वेदीच्या अग्रभागी दृगोचर होत आहे. ॥ ७ ॥


प्र॒वाच्यं॒ वच॑सः॒ किं मे॑ अ॒स्य गुहा॑ हि॒तमुप॑ नि॒णिग्व॑दन्ति ।
यदु॒स्रिया॑णा॒मप॒ वारि॑व॒ व्रन्पाति॑ प्रि॒यं रु॒पो अग्रं॑ प॒दं वेः ॥ ८ ॥

प्रऽवाच्यं वचसः किं मे अस्य गुहा हितं उप निणिक् वदंति ।
यत् उस्रियाणां अप वाःऽइव व्रन् पाति प्रियं रुपः अग्रं पदं वेरिति वेः ॥ ८ ॥

आतां ह्या माझ्या गोष्टीविषयी मी फार कशाला बोलूं ? इतकेंच सांगतो कीं प्रकाशरूप धेनूंचे जें दुग्ध म्हणून म्हणतात तें फारच गुप्त आहे. परंतु झर्‍यांतील पाणी जसें मोकळे करावें त्याप्रमाणे भक्तांनी तें दुग्धभांडार खुलें केले आहे. पृथ्वीच्या उच्चर शिखरांचे आणि दिव्य पक्ष्याच्या त्या स्थानाचें रक्षण हा अग्निच करीत असतो. ॥ ८ ॥


इ॒दमु॒ त्यन्महि॑ म॒हामनी॑कं॒ यदु॒स्रिया॒ सच॑त पू॒र्व्यं गौः ।
ऋ॒तस्य॑ प॒दे अधि॒ दीद्या॑नं॒ गुहा॑ रघु॒ष्यद्र॑घु॒यद्वि॑वेद ॥ ९ ॥

इदं ऊं इति त्यत् महि महां अनीकं यत् उस्रिया सचत पूर्व्यं गौः ।
ऋतस्य पदे अधि दीद्यानं गुहा रघुऽस्यत् रघुऽयत् विवेद ॥ ९ ॥

हेंच ते श्रेष्ठ विभूतींचे तेजोमय उदात्त स्वरूप. हें पुरातन आहे आणि स्वर्गीय प्रकाशरूप धेनूही त्याच्या जवळच असते. चिरंतन अशा आकाशगोलकांत तें तळपत असून फार शीघ्रसंचारी आहे. त्याची तीव्र गति फार गुप्त असते, तथापि तिचें ज्ञान त्या स्वर्गलोकींच्या धेनूस आहे. ॥ ९ ॥


अध॑ द्युता॒नः पि॒त्रोः सचा॒साम॑नुत॒ गुह्यं॒ चारु॒ पृश्नेः॑ ।
मा॒तुष्प॒दे प॑र॒मे अन्ति॒ षद्गोर्वृष्णः॑ शो॒चिषः॒ प्रय॑तस्य जि॒ह्वा ॥ १० ॥

अध द्युतानः पित्रोः सचाः आसा अमनुत गुह्यं चारु पृश्नेः ।
मातुः पदे परमे अंति सत् गोः वृष्णः शोचिषः प्रऽयतस्य जिह्वा ॥ १० ॥

मनुष्यांचे आईबाप जे द्यावापृथिवी त्यांच्या संन्निध व त्यांच्या समक्ष देदीप्यमान अग्नीनें पृश्निमातेचें जें अत्यंत गूढ स्वरूप त्याचें चिंतन केलें, त्या वेळेस अत्युच्च अशा स्वर्गलोकांत, त्या दिव्य गोमातेजवळील दुग्धाचा, त्या वीरश्रेष्ठ आत्मसंयमी दीप्तिमान अग्नीच्या जिव्हेनें तात्काळ आस्वाद घेतला. ॥ १० ॥


ऋ॒तं वो॑चे॒ नम॑सा पृ॒च्छ्यमा॑न॒स्तवा॒शसा॑ जातवेदो॒ यदी॒दम् ।
त्वम॒स्य क्ष॑यसि॒ यद्ध॒ विश्वं॑ दि॒वि यदु॒ द्रवि॑णं॒ यत्पृ॑थि॒व्याम् ॥ ११ ॥

ऋतं वोचे नमसा पृच्छ्यमानः तव आऽशसा जातऽवेदः यदि इदं ।
त्वं अस्य क्षयसि यत् ह विश्वं दिवि यत् ऊं इति द्रविणं यत् पृथिव्यां ॥ ११ ॥

मला विचारलेंस तेव्हां तुला नमस्कार करून तुझ्या आशीर्वादानेंच समजलेले सनातन सत्य मी आतां बोलतों, तें हेंच की, हे जातवेदा, जें जें काय आहे तें तुझ्या कृपेनेंच प्राप्त होतें व जें जें कांही सामर्थ्यधन ह्या पृथ्वीवर किंवा आकाशांत आहे त्या सर्व धनाचा मालक तूंच आहेस. ॥ ११ ॥


किं नो॑ अ॒स्य द्रवि॑णं॒ कद्ध॒ रत्नं॒॒ वि नो॑ वोचो जातवेदश्चिकि॒त्वान् ।
गुहाध्व॑नः पर॒मं यन्नो॑ अ॒स्य रेकु॑ प॒दं न नि॑दा॒ना अग॑न्म ॥ १२ ॥

किं नः अस्य द्रविणं कत् ह रत्नंु वि नः वोचः जातऽवेदः चिकित्वान् ।
गुहा अध्वनः परमं यत् नः अस्य रेकु पदं न निदाना अगन्म ॥ १२ ॥

त्याच्यापैकीं आमचे म्हणता येईल असें कोणतें धन आहे ? आमचे असे कोणते रत्‍न आहे ? तें जातवेदा, तूंच सांग, तूं सर्वज्ञच आहेस. ह्या आमच्या मार्गांचे जें अत्युच्च ध्येय तें तर गूढ आहेच, परंतु आम्हीं एकाद्या पोंकळ गोष्टीच्या भरीस पडलों असा आमचा रिकामा उपहास होऊं देऊं नको. ॥ १२ ॥


का म॒र्यादा॑ व॒युना॒ कद्ध॑ वा॒मम् अच्छा॑ गमेम र॒घवो॒ न वाज॑म् ।
क॒दा नो॑ दे॒वीर॒मृत॑स्य॒ पत्नीः॒ं सूरो॒ वर्णे॑न ततनन्नु॒षासः॑ ॥ १३ ॥

का मर्यादा वयुना कत् ह वामं अच्छ गमेम रघवः न वाजं ।
कदा नः देवीः अमृतस्य पत्नीःः सूरः वर्णेन ततनन् उषसः ॥ १३ ॥

तुझ्या त्या परम पदाची सीमा कोणती ? सदाचार कोणता ? आणि अत्यंत सुंदर अशी वाट कोणती ? तें आम्हांस सांग म्हणजे वेगानें चाल करणारे स्वार जसे रणमैदानाकडे धांव घेतात त्याप्रमाणें आम्हींही सत्त्वसामर्थ्याकडे धांवतच जाऊ. कारण, खुद्द अमरत्वावरच ज्याचे स्वामित्व आहे अशा उषादेवी सूर्यासारख्या उज्ज्वल कांतीनें ’अलंकृत’ होऊन आपला प्रकाश जिकडेतिकडे पसरून देतील असे आम्हांस झालें आहे. ॥ १३ ॥


अ॒नि॒रेण॒ वच॑सा फ॒ल्ग्वेन प्र॒तीत्ये॑न कृ॒धुना॑तृ॒पासः॑ ।
अधा॒ ते अ॑ग्ने॒ किमि॒हा व॑दन्त्यनायु॒धास॒ आस॑ता सचन्ताम् ॥ १४ ॥

अनिरेण वचसा फल्ग्वेन प्रतीत्येन कृधुना अतृपासः ।
अध ते अग्ने किं इह वदंति अनायुधासः असता सचंतां ॥ १४ ॥

ज्याच्यांत कांहीच तथ्य नाही, जें वाह्यात, फाजील, किंवा अगदींच त्रोटक असतें अशा स्तोत्रानें मनोरथ कधींही पूर्ण होत नाहींत. हे अग्नि असे लोक तुझ्या जवळ येऊन म्हणणार तरी काय ? ह्यांच्याजवळ यज्ञ सामग्री जर नाही तर त्यांच्या हातीं शेवटीं कांहीच आलें नाहीं असें खास होणार. ॥ १४ ॥


अ॒स्य श्रि॒ये स॑मिधा॒नस्य॒ वृष्णो॒ वसो॒रनी॑कं॒ दम॒ आ रु॑रोच ।
रुश॒द्वसा॑नः सु॒दृशी॑करूपः क्षि॒तिर्न रा॒या पु॑रु॒वारो॑ अद्यौत् ॥ १५ ॥

अस्य श्रिये संऽइधानस्य वृष्णः वसोः अनीकं दमे आ रुरोच ।
रुशत् वसानः सुदृशीकऽरूपः क्षितिः न राया पुरुऽवारः अद्यौत् ॥ १५ ॥

वीर्यशाली आणि दिव्य निधि असा अग्नि प्रज्वलित झाला. त्याचे स्वरूप, आम्हांस वैभव प्राप्त व्हावे म्हणून, आमच्या यज्ञशाळेंत प्रकाशमान झालें आणि तेजानें लकाकणारीं वस्त्रें परिधान करून हा अत्यंत दर्शनीय व सर्वजनप्रिय अग्नि ’क्षिति’ प्रमाणें आपल्या दिव्य ऐश्वर्यकांतीनें झळकूं लागला. ॥ १५ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ६ ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


ऊ॒र्ध्व ऊ॒ षु णो॑ अध्वरस्य होत॒रग्ने॒ तिष्ठ॑ दे॒वता॑ता॒ यजी॑यान् ।
त्वं हि विश्व॑म॒भ्यसि॒ मन्म॒ प्र वे॒धस॑श्चित्तिरसि मनी॒षाम् ॥ १ ॥

ऊर्ध्व ऊं इति सु णः अध्वरस्य होतः अग्ने तिष्ठ देवऽताता यजीयान् ।
त्वं हि विश्वं अभि असि मन्म प्र वेधसः चित् तिरसि मनीषां ॥ १ ॥

हे याग संपादक अग्निदेवा, तूं यज्ञकर्मांत निष्णात आहेस तर आमच्या ह्या यजनप्रसंगी तूं आमच्या सहाय्यार्थ सज्ज होऊन उभा रहा. कारण यच्चावत् ध्यानस्तोत्रांनाच केवळ तूं व्यापून टाकतोस असें नाही, तर प्रतिभाशाली कवीच्या कल्पनेंत सुद्धां अंतर्बाह्य तूंच भरून राहिला आहेस. ॥ १ ॥


अमू॑रो॒ होता॒ न्यसादि वि॒क्ष्व१ग्निर्म॒न्द्रो वि॒दथे॑षु॒ प्रचे॑ताः ।
ऊ॒र्ध्वं भा॒नुं स॑वि॒तेवा॑श्रे॒न्मेते॑व धू॒मं स्त॑भाय॒दुप॒ द्याम् ॥ २ ॥

अमूरः होता नि असादि विक्षु अग्निः मंद्रः विदथेषु प्रऽचेताः ।
ऊर्ध्वं भानुं सविताऽइव अश्रेन् मेताऽइव धूमं स्तभायत् उप द्यां ॥ २ ॥

हा यज्ञ-होता सामान्य नव्हे, अमूर्त, अजड आहे. हा आनंदरूप आणि यज्ञसभापंडीत अग्नि आपल्या भक्तमंडळांत विराजमान झाला आहे. सूर्याप्रमाणें त्याचेही किरण वर आकाशांत कोंदाटून राहिले असून शिल्पकाराप्रमाणें आकाशमंडळाला धूमरूप स्तंभाचा धिरा त्यानेंच लावून दिलेले आहे. ॥ २ ॥


य॒ता सु॑जू॒र्णी रा॒तिनी॑ घृ॒ताची॑ प्रदक्षि॒णिद्दे॒वता॑तिमुरा॒णः ।
उदु॒ स्वरु॑र्नव॒जा नाक्रः प॒श्वो अ॑नक्ति॒ सुधि॑तः सु॒मेकः॑ ॥ ३ ॥

यता सुऽजूर्णी रातिनी घृताची प्रऽदक्षिणित् देवऽतातिं उराणः ।
उत् ऊं इति स्वरुः नवऽजा नाक्रः पश्वः अनक्ति सुऽधितः सुऽमेकः ॥ ३ ॥

अभीष्ट प्राप्त करून देणारी, घृतपूर्ण व त्यामुळें उज्ज्वल दिसणारी ही स्रुचा पहा आहुति देण्याकरितां ऋत्विजांनी पुढें केली, तेव्हां भगवद् उपासनेचा पुरस्कर्ता जो अग्नि त्याची ज्वाला ही उजवीकडे भक्तांसन्मुख वळली. हा नवा तयार केलेला व व्यवस्थित बसविलेला डौलदार स्वरु (लांकडाचा ठोकळा) सुद्धां नुकत्याच जन्म पावलेल्या उग्र श्वापदाप्रमाणें दिसतो. परंतु त्याच्यामुळें जवळ बांधलेल्या मेध्य पशुला शोभाच आली आहे. ॥ ३ ॥


स्ती॒र्णे ब॒र्हिषि॑ समिधा॒ने अ॒ग्ना ऊ॒र्ध्वो अ॑ध्व॒र्युर्जु॑जुषा॒णो अ॑स्थात् ।
पर्य॒ग्निः प॑शु॒पा न होता॑ त्रिवि॒ष्ट्येति प्र॒दिव॑ उरा॒णः ॥ ४ ॥

स्तीर्णे बर्हिषि संऽइधाने अग्ना ऊर्ध्वः अध्वर्युः जुजुषाणः अस्थात् ।
परि अग्निः पशुऽपा न होता त्रिऽविष्टि एति प्रऽदिव उराणः ॥ ४ ॥

कुशासन पसरल्यावर अग्नि प्रज्वलित झाला असतां अध्वर्यु देवास प्रसन्न करून घेण्याच्या उद्देशानें सिद्ध झाला. तेव्हां एखादा गोपाळ जसा पशूंच्या भोंवती राखण करण्याकरितां फिरतो त्याप्रमाणें यज्ञाचा पुरातन पुरस्कर्ता हा यज्ञ-होता अग्नि मेध्य पशूच्या सभोंवती त्रिवार फिरत आहे. ॥ ४ ॥


परि॒ त्मना॑ मि॒तद्रु॑रेति॒ होता॒ग्निर्म॒न्द्रो मधु॑वचा ऋ॒तावा॑ ।
द्रव॑न्त्यस्य वा॒जिनो॒ न शोका॒ भय॑न्ते॒ विश्वा॒ भुव॑ना॒ यदभ्रा॑ट् ॥ ५ ॥

परि त्मना मितऽद्रुः एति होता अग्निः मंद्रः मधुऽवचाः ऋतऽवा ।
द्रवंति अस्य वाजिनः न शोकाः भयंते विश्वा भुवना यत् अभ्राट् ॥ ५ ॥

आनंदमय, मधुरवाक् (प्रेरक) आणि सनातनपालक असा हा यज्ञार्ह अग्नि आपण होऊनच एकेल पाऊल मोठ्या संथपणानें टाकीत मेध्यपशूच्या भोंवताली फिरत आहे. शूर योद्धे समरांगणाकडे धांवून जातात त्याप्रमाणे त्याचें ज्वालारूप देदीप्यमान किरण अशा वेळेस इकडेतिकडे सैरावैरा पसरतात. परंतु अशा रीतीनें जेव्हां तो एकदम भडकतो त्या वेळेस तर सर्व जगाची अगदीं गाळण उडून जाते. ॥ ५ ॥


भ॒द्रा ते॑ अग्ने स्वनीक सं॒दृग्घो॒रस्य॑ स॒तो विषु॑णस्य॒ चारुः॑ ।
न यत्ते॑ शो॒चिस्तम॑सा॒ वर॑न्त॒ न ध्व॒स्मान॑स्त॒न्वी३॑रेप॒ आ धुः॑ ॥ ६ ॥

भद्रा ते अग्ने सुऽअनीक संदृक् घोरस्य सतः विषुणस्य चारुः ।
न यत् ते शोचिः तमसा वरंत न ध्वस्मानः तन्वी रेपः आ धुरिति धुः ॥ ६ ॥

शोभनस्वरूप अग्निदेवा, तूं व्यवस्थापक आणि भयंकर खरा पण, तुझी कांति खरोखर सुंदर आणि मंगलप्रद होय. पहा कीं कसले जबरदस्त घातकी दुष्ट होऊन गेले परंतु, त्यांच्यानें तुझ्या प्रकाशाला अंधकाराखालीं दडपून टाकतां आलें नाहीं, किंवा तुझ्या निष्कलंक शरीराला त्यांनी यत्‍किंचितही डाग लावला नाही. ॥ ६ ॥


न यस्य॒ सातु॒र्जनि॑तो॒रवा॑रि॒ न मा॒तरा॑पि॒तरा॒ नू चि॑दि॒ष्टौ ।
अधा॑ मि॒त्रो न सुधि॑तः पाव॒कोऽ॒ग्निर्दी॑दाय॒ मानु॑षीषु वि॒क्षु ॥ ७ ॥

न यस्य सातुः जनितोः अवारि न मातरापितरा नू चित् इष्टौ ।
अधा मित्रः न सुऽधितः पावकः अग्निः दीदाय मानुषीषु विक्षु ॥ ७ ॥

ज्या ह्या जगदुत्पादकाच्या औदार्याला कोणाकडूनही अडथळा होऊं शकत नाहीं व ज्याच्या इच्छेला जगाचे आईबाप द्यावापृथिवी हे सुद्धां विरोध करूं शकत नाहींत असा हा पापनाशन अग्नि वेदीवर सुस्थित होऊन जिवलग मित्राप्रमाणे ह्या मानवलोकी सुप्रकाशित झाला आहे. ॥ ७ ॥


द्विर्यं प~न्च॒ जीज॑नन्सं॒वसा॑नाः॒ स्वसा॑रो अ॒ग्निं मानु॑षीषु वि॒क्षु ।
उ॒ष॒र्बुध॑मथ॒र्यो३॑ न दन्तं॑ शु॒क्रं स्वासं॑ पर॒शुं न ति॒ग्मम् ॥ ८ ॥

द्विः यं पञ्च जीजनन् संऽवसानाः स्वसारः अग्निं मानुषीषु विक्षु ।
उषःऽबुधं अथर्यः न दंतं शुक्रं सुऽआसं परशुं न तिग्मं ॥ ८ ॥

पांचाच्या दुप्पट म्हणजे दहा, एकत्र वास करणार्‍या बहिणी (ज्या हस्तांगुली) त्यांनी अग्नीला ह्या मानवलोकांत प्रकट केले. तो अग्नि असा आहे की तो देवांना प्रातःकालींच जागृत करतो. तो विद्युल्लतेच्या दंताप्रमाणे तेजस्वी व सुंदर आणि पाजळलेल्या फरशूप्रमाणे तीव्र आहे. ॥ ८ ॥


तव॒ त्ये अ॑ग्ने ह॒रितो॑ घृत॒स्ना रोहि॑तास ऋ॒ज्व~न्चः॒ स्व~न्चः॑ ।
अ॒रु॒षासो॒ वृष॑ण ऋजुमु॒ष्का आ दे॒वता॑तिमह्वन्त द॒स्माः ॥ ९ ॥

तव त्ये अग्ने हरितः घृतऽस्नाः रोहितासः ऋजुऽअंचः सुऽअंचः ।
अरुषासः वृषणः ऋजुऽमुष्काः आ देवऽतातिं अह्वंत दस्माः ॥ ९ ॥

अग्नि, ते जे तुझ्या रथाचे घृतस्रावी, नीट सरळ धांवणारे, अगदी सुयंत्र, तेजस्वी, रंगेल, अद्‍भुत पराक्रमी व सणसणीत वीर्यवान अश्व आहेत त्यांनाही आम्ही ह्या देवोपासनेच्या प्रसंगी पाचारण केलें आहे. ॥ ९ ॥


ये ह॒ त्ये ते॒ सह॑माना अ॒यास॑स्त्वे॒षासो॑ अग्ने अ॒र्चय॒श्चर॑न्ति ।
श्ये॒नासो॒ न दु॑वस॒नासो॒ अर्थं॑ तुविष्व॒णसो॒ मारु॑तं॒ न शर्धः॑ ॥ १० ॥

ये ह त्ये ते सहमानाः अयासः त्वेषासः अग्ने अर्चयः चरंति ।
श्येनासः न दुवसनासः अर्थं तुविऽस्वनसः मारुतं न शर्धः ॥ १० ॥

तसेंच हे अगिदेवा, जे सर्वांसच रगडून टाकतात व कधींही न थकतां चोहोंकडे पसरतात असे तुझ्या ज्वालांचे लोळ आपल्या उद्दिष्ट पदार्थाकडे श्येन पक्षाप्रमाणे वेगाने जात असतां मरुतांच्या सैन्याप्रमाणें मोठी गंभीर गर्जना करतात. ॥ १० ॥


अका॑रि॒ ब्रह्म॑ समिधान॒ तुभ्यं॒ शंसा॑त्यु॒क्थं यज॑ते॒ व्यू धाः ।
होता॑रम॒ग्निं मनु॑षो॒ नि षे॑दुर्नम॒स्यन्त॑ उ॒शिजः॒ शंस॑म् आ॒योः ॥ ११ ॥

अकारि ब्रह्म संऽइधान तुभ्यं शंसाति उक्थं यजते वि ऊं इति धाः ।
होतारं अग्निं मनुषः नि सेदुः नमस्यंतः उशिजः शंसं आयोः ॥ ११ ॥

प्रज्वलित अग्निदेवा, हें प्रार्थनास्तोत्र तुझ्या प्रित्यर्थ म्हटलेले आहे. आतां उद्गाता तुझ्यापुढें सामगायन करील तर तुझी उपासना करणार्‍या यजमानाला कृपाप्रसाद दे. ह्याप्रमाणे भक्तांना परमस्तुत्य यज्ञहोता जो अग्नि त्याला प्रार्थना व प्रणिपात करून उत्कंठित भाविक जनांनी त्याची वेदीवर स्थापना केली. ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ७ ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


अ॒यम् इ॒ह प्र॑थ॒मो धा॑यि धा॒तृभि॒र्होता॒ यजि॑ष्ठो अध्व॒रेष्वीड्यः॑ । यमप्न॑वानो॒ भृग॑वो विरुरु॒चुर्वने॑षु चि॒त्रं वि॒भ्वं वि॒शेवि॑शे ॥ १ ॥

अयं इह प्रथमः धायि धातृऽभिः होता यजिष्ठः अध्वरेषु ईड्यः ।
यं अप्नवानः भृगवः विऽरुरुचुः वनेषु चित्रं विऽभ्वं विशेऽविशे ॥ १ ॥

अगदी प्रथमचा अत्यंत पूजनीय आणि यागांमध्ये ज्याची महती गातात असा यज्ञ-होता जो अग्नि त्याची स्थापना ऋत्विजांनी ही येथें केलीच आहे. अरण्यांत विचित्र रूपें धारण करणारा आणि घरोघर व्यापून राहणारा अशा ह्या अग्नीला अप्नवान आणि भृगु ह्यांनी कांही विषेश विधीनें प्रदीप्त केलें होतें. ॥ १ ॥


अग्ने॑ क॒दा त॑ आनु॒षग्भुव॑द्दे॒वस्य॒ चेत॑नम् ।
अधा॒ हि त्वा॑ जगृभ्रि॒रे मर्ता॑सो वि॒क्ष्वीड्य॑म् ॥ २ ॥

अग्ने कदा त आनुषक् भुवत् देवस्य चेतनं ।
अध हि त्वा जगृभ्रिरे मर्तासः विक्षु ईड्यं ॥ २ ॥

अग्निदेवा, तुज देवाचें चिद्‍बोधक तेज आमच्या पुढें एकसारखें सतत केव्हां प्रकट होईल ? कारण स्तवनयोग्य जो तूं त्या तुझीच कांस आम्ही मर्त्य मानवांनी ह्या लोकीं धरलेली आहे. ॥ २ ॥


ऋ॒तावा॑नं॒ विचे॑तसं॒ पश्य॑न्तो॒ द्यामि॑व॒ स्तृभिः॑ ।
विश्वे॑षाम् अध्व॒राणां॑ हस्क॒र्तारं॒ दमे॑दमे ॥ ३ ॥

ऋतऽवानं विऽचेतसं पश्यंतः द्यांऽइव स्तृऽभिः ।
विश्वेषां अध्वराणां हस्कर्तारं दमेऽदमे ॥ ३ ॥

तूं सद्धर्मप्रतिपालक, महाप्रज्ञ, आणि घरोघर होणार्‍या आमच्या सर्व यज्ञयागांना तारकामंडित आकाशाप्रमाणे उज्ज्वल करून त्यांचा पुरस्कार करणारा तूंच आहेस असें पाहून आम्हीं तुझाच आश्रय केला आहे. ॥ ३ ॥


आ॒शुं दू॒तं वि॒वस्व॑तो॒ विश्वा॒ यश्च॑र्ष॒णीर॒भि ।
आ ज॑भ्रुः के॒तुमा॒यवो॒ भृग॑वाणं वि॒शेवि॑शे ॥ ४ ॥

आशुं दूतं विवस्वतः विश्वा यः चर्षणीः अभि ।
आ जभ्रुः केतुं आयवः भृगवाणं विशेऽविशे ॥ ४ ॥

विवस्वानाचा वेगवान दूत असें आपणांस म्हणवितोस परंतु तूं सर्व मानवजातीचा अधिपति आहेस. भृगूच्या प्रमाणे सर्वांच्या गृही प्रकट होणारा असा जो तूं यज्ञाचा देदीप्यमान ध्वज त्या तुला भाविक जनांनी घरोघर मिरवीत नेले. ॥ ४ ॥


तमीं॒ होता॑रमानु॒षक्चि॑कि॒त्वांसं॒ नि षे॑दिरे ।
र॒ण्वम् पा॑व॒कशो॑चिषं॒ यजि॑ष्ठं स॒प्त धाम॑भिः ॥ ५ ॥

तं ईं होतारं आनुषक् चिकित्वांसं नि सेदिरे ।
रण्वं पावकऽशोचिषं यजिष्ठं सप्त धामऽभिः ॥ ५ ॥

जो मर्मज्ञ व आनंदरूप आहे, ज्याचें तेजसुद्धां पातकांचा नाश करतें आणि जो आपल्या सातही विभूतींच्या योगानें परमपूज्य झाला आहे अशा त्या यज्ञहोत्याला भक्तांनी आपल्या घरोघरीं ठेवून घेतलें आहे. ॥ ५ ॥


तं शश्व॑तीषु मा॒तृषु॒ वन॒ आ वी॒तं अश्रि॑तम् ।
चि॒त्रं सन्तं॒ गुहा॑ हि॒तं सु॒वेदं॑ कूचिद॒र्थिन॑म् ॥ ६ ॥

तं शश्वतीषु मातृषु वने आ वीतं अश्रितं ।
चित्रं संतं गुहा हितं सुऽवेदं कूचित्ऽअर्थिनं ॥ ६ ॥

उदके आणि काष्ठे यांमध्ये निवास करणारा, प्रखरतेज, आश्चर्यकारक आणि ज्ञानवान अग्नि हवि प्राप्त्यर्थ भक्तांच्या घरोघर जातो. ॥ ६ ॥


स॒सस्य॒ यद्वियु॑ता॒ सस्मि॒न्नूध॑न्नृ॒तस्य॒ धाम॑न्र॒णय॑न्त दे॒वाः ।
म॒हाँ अ॒ग्निर्नम॑सा रा॒तह॑व्यो॒ वेर॑ध्व॒राय॒ सद॒मिदृ॒तावा॑ ॥ ७ ॥

ससस्य यत् विऽयुता सस्मिन् ऊधन् ऋतस्य धामन् रणयंत देवाः ।
महान् अग्निः नमसा रातऽहव्यः वेः अध्वराय सदं इत् ऋतऽवा ॥ ७ ॥

प्रातःकाळीं धान्याच्या तुषाचें आच्छादन दूर केलें असतांना ह्या पृथिवीच्याच वक्षस्थलावर सद्धर्माच्या तेजोमय स्थानावर देवांचा यज्ञद्वारा संतोष झाला आहे, कारण हा सद्धर्मप्रिय आणि परमथोर जो अग्नि त्यालाच नमनपूर्वक अर्पण केलेला हविर्भाग गृहण करून सदैव आमच्या यागसमारंभास येण्यामध्यें त्याला प्रेम वाटतें. ॥ ७ ॥


वेर॑ध्व॒रस्य॑ दू॒त्यानि वि॒द्वानु॒भे अ॒न्ता रोद॑सी संचिकि॒त्वान् ।
दू॒त ई॑यसे प्र॒दिव॑ उरा॒णो वि॒दुष्ट॑रो दि॒व आ॒रोध॑नानि ॥ ८ ॥

वेः अध्वरस्य दूत्यानि विद्वान् उभे इति अंतरिति रोदसी इति संऽचिकित्वान् ।
दूतः ईयसे प्रऽदिव उराणः विदुःऽतरः दिव आऽरोधनानि ॥ ८ ॥

तूं सर्व जाणणारा आहेस. द्यावापृथिवी हे दोन्ही लोक आणि अंतराळ ह्या सर्वांवर तुझे बारीक लक्ष आहे असे असतांना ह्या यागसमारंभप्रसंगी तूं आमच्या प्रतिनिधीत्वाचा मोठ्या प्रेमानें अंगिकार करतोस. तूं पुरातन कालापासूनच आमचा पुरस्कर्ता आहेस. द्युलोकांतील उत्कृष्ट प्रदेशही तुला उत्तम तऱ्हेनें अवगत आहेत असें असूनसुद्धां तूं आमचा प्रतिनिधि होऊन संचार करीत असतोस. (हेंच नवल.). ॥ ८ ॥


कृ॒ष्णं त॒ एम॒ रुश॑तः पु॒रो भाश्च॑रि॒ष्ण्व१र्चिर्वपु॑षा॒मिदेक॑म् ।
यदप्र॑वीता॒ दध॑ते ह॒ गर्भं॑ स॒द्यश्चि॑जा॒तो भव॒सीदु॑ दू॒तः ॥ ९ ॥

कृष्णं ते एम रुशतः पुरः भाः चरिष्णु अर्चिः वपुषां इत् एकं ।
यत् अऽप्रवीता दधते ह गर्भं सद्यः चिज् जातः भवसि इत् ऊं इति दूतः ॥ ९ ॥

तुझा मार्ग कृष्णवर्ण खरा परंतु तुझी आरक्त प्रभा फांकली म्हणजे पुढें मागें सर्वत्र प्रकाशच होतो. सर्व मनोहर पदार्थांमध्यें दर्शनीय वस्तु अशी एकच आणि ती वस्तु म्हणजे तुझी चंचल ज्वाला हीच होय. पहा अरणि ही अविद्ध कुमारी असून तुला गर्भरूपानें धारण करते आणी प्रकट होतांक्षणीच तूं आमचा प्रतिनिधि होतोस. ॥ ९ ॥


स॒द्यो जा॒तस्य॒ ददृ॑शान॒मोजो॒ यद॑स्य॒ वातो॑ अनु॒वाति॑ शो॒चिः ।
वृ॒णक्ति॑ ति॒ग्माम॑त॒सेषु॑ जि॒ह्वां स्थि॒रा चि॒दन्ना॑ दयते॒ वि जम्भैः॑ ॥ १० ॥

सद्यः जातस्य ददृशानं ओजः यत् यस्य वातः अनुऽवाति शोचिः ।
वृणक्ति तिग्मां अतसेषु जिह्वां स्थिरा चित् अन्ना दयते वि जम्भैः ॥ १० ॥

अग्निच्या दीप्तिस अनुसरून वायु वाहत असतो तेव्हां अग्नि हा नुकताच प्रकट झाला असतांही त्याची तेजस्विता डोळ्यांना झगझगीत दिसते आणि शुष्क काष्ठांकडे जेव्हां तो आपली जाज्वल्य जिव्हा फिरवितो तेव्हां त्याचे खाद्य पदार्थ कितीही कठीण असोत त्यांना तो आपल्या दाढेखाली चुरडून टाकतो. ॥ १० ॥


तृ॒षु यदन्ना॑ तृ॒षुणा॑ व॒वक्ष॑ तृ॒षुं दू॒तं कृ॑णुते य॒ह्वो अ॒ग्निः ।
वात॑स्य मे॒ळिं स॑चते नि॒जूर्व॑न्ना॒शुं न वा॑जयते हि॒न्वे अर्वा॑ ॥ ११ ॥

तृषु यत् अन्ना तृषुणा ववक्ष तृषुं दूतं कृणुते यह्वः अग्निः ।
वातस्य मेळिं सचते निऽजूर्वन् आशुं न वाजयते हिन्वे अर्वा ॥ ११ ॥

आपल्या आवेशी जिव्हेनें खाद्यपदार्थ मोठ्या आवेशानें त्यानें देवलोकीं वाहून नेले म्हणजे हा महाबलवान अग्नि स्वतःच आमचा एक खासा उत्साही प्रतिनिधि बनतो; आणि त्याचें ज्वलनकर्म जोरानें चालू होऊन त्याचा फाडफाड आवाज वार्‍याच्या सोसाट्याशीं मिळून जातो तेव्हां एखाद्या तीव्रवेग अश्वाला उत्तेजन द्यावें त्याप्रमाणे तो प्रोत्साहन देतो व अश्वारूढ योद्ध्याप्रमाणें त्याला स्वतःलाही स्फुरण चढतें ॥ ११ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ८ ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


दू॒तं वो॑ वि॒श्ववे॑दसं हव्य॒वाह॒मम॑र्त्यम् । यजि॑ष्ठम् ऋञ्जसे गि॒रा ॥ १ ॥

दूतं वः विश्वऽवेदसं हव्यऽवाहं अमर्त्यं । यजिष्ठं ऋंजसे गिरा ॥ १ ॥

अखिलज्ञानसंपन्न, हविर्भाग पोंचविणारा, अमर आणि परमपूज्य असा जो भक्तांचा प्रतिनिधि अग्नि, त्याला तुमच्याकरितां मी स्तवनांनी आळवीत आहे. ॥ १ ॥


स हि वेदा॒ वसु॑धितिं म॒हाँ आ॒रोध॑नं दि॒वः । स दे॒वाँ एह व॑क्षति ॥ २ ॥

सः हि वेद वसुऽधितिं महान् आऽरोधनं दिवः । स देवान् आ इह वक्षति ॥ २ ॥

तो अत्यंत थोर आहे. उत्कृष्ट संपत्तीचे भाण्डार व स्वर्गांतील उत्तमोत्तम प्रदेश हे त्यालाच माहित आहेत. देवांना येथें तोंच घेऊन येतो. ॥ २ ॥


स वे॑द दे॒व आ॒नमं॑ दे॒वाँ ऋ॑ताय॒ते दमे॑ । दाति॑ प्रि॒याणि॑ चि॒द्वसु॑ ॥ ३ ॥

सः वेद देव आऽनमं देवान् ऋतऽयते दमे । दाति प्रियाणि चित् वसु ॥ ३ ॥

यज्ञशाळेंत सद्धर्मरत भक्तांकडे देवांचे मन बळवून त्यांना कसें घेऊन यावे हें त्या भगवंताला विदित आहे. सर्वोत्कृष्ट आणि प्रिय अभीष्ट धन भक्तांना तोच देतो. ॥ ३ ॥


स होता॒ सेदु॑ दू॒त्यं चिकि॒त्वाँ अ॒न्तर् ई॑यते । वि॒द्वाँ आ॒रोध॑नं दि॒वः ॥ ४ ॥

सः होता सः इत् ऊं इति दूत्यं चिकित्वान् अंतः ईयते । विद्वान् आऽरोधनं दिवः ॥ ४ ॥

तोच आमचा होता होय. आमचे प्रतिनिधित्व कसें करावें लागतें हे उत्तम तऱ्हेने जाणून तो देवांमध्ये वागत असतो. द्युलोकांत अत्युच्च प्रदेश आहेत तेही त्यालाच माहीत आहेत. ॥ ४ ॥


ते स्या॑म॒ ये अ॒ग्नये॑ ददा॒शुर्ह॒व्यदा॑तिभिः । य ईं॒ पुष्य॑न्त इन्ध॒ते ॥ ५ ॥

ते स्याम ये अग्नये ददाशुः हव्यदातिऽभिः । य ईं पुष्यंत इंधते ॥ ५ ॥

हवि अर्पण करून जे अग्नीची उपासना करतात, आणि भक्तीचा परिपोष करून त्याला प्रज्वलित करतात अशा प्रकारचे उत्तम भक्त आम्ही व्हावें असें कर. ॥ ५ ॥


ते रा॒या ते सु॒वीर्यैः॑ सस॒वांसो॒ वि शृ॑ण्विरे । ये अ॒ग्ना द॑धि॒रे दुवः॑ ॥ ६ ॥

ते राया ते सुऽवीर्यैः ससऽवांसः वि शृण्विरे । ये अग्ना दधिरे दुवः ॥ ६ ॥

ज्यांनी ज्यांनी अग्निची उपासना केली ते ते ऐश्वर्याने आणि शौर्यपराक्रमांनी मंडित होऊन यशस्वी झाले. ॥ ६ ॥


अ॒स्मे रायो॑ दि॒वेदि॑वे॒ सं च॑रन्तु पुरु॒स्पृहः॑ । अ॒स्मे वाजा॑स ईरताम् ॥ ७ ॥

अस्मे इति रायः दिवेऽदिवे सं चरंतु पुरुऽस्पृहः । अस्मे इति वाजासः ईरतां ॥ ७ ॥

जे सर्वांनाच हवेंसे वाटते, तें दिव्य ऐश्वर्य रोजच्यारोज आमच्याकडे चालत येवो, आणि सत्वसामर्थ्याचा आवेश आमच्यामध्यें प्रादर्भूत होवो. ॥ ७ ॥


स विप्र॑श्चर्षणी॒नां शव॑सा॒ मानु॑षाणाम् । अति॑ क्षि॒प्रेव॑ विध्यति ॥ ८ ॥

सः विप्रः चर्षणीनां शवसा मानुषाणां । अति क्षिप्राऽइव विध्यति ॥ ८ ॥

तोच ज्ञानवान विप्र अग्नि, मानवजातीवर फेंकलेल्या अस्त्रांना धनुष्यबाणानें तोडून टाकल्याप्रमाणे आपल्या उत्कृष्ट बलानें छिन्नभिन्न करून टाकतो. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ९ ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - त्रिष्टुप्


अग्ने॑ मृ॒ळ म॒हाँ अ॑सि॒ य ई॒मा दे॑व॒युं जन॑म् । इ॒येथ॑ ब॒र्हिरा॒सद॑म् ॥ १ ॥

अग्ने मृळ महान् असि यः ईं आ देवऽयुं जनं । इयेथ बर्हिः आऽसदं ॥ १ ॥

अग्निदेवा, कुशासनावर आरोहण करण्याकरितं तूं ह्या दीन भगवद्‍भक्ताकडे आला आहेस तेव्हां तुला किती म्हणून थोर म्हणावे, तर आतां सर्वांवर कृपा कर. ॥ १ ॥


स मानु॑षीषु दू॒ळभो॑ वि॒क्षु प्रा॒वीरम॑र्त्यः । दू॒तो विश्वे॑षां भुवत् ॥ २ ॥

सः मानुषीषु दूःऽदभः विक्षु प्रऽवीः अमर्त्यः । दूतः विश्वेषां भुवत् ॥ २ ॥

यच्चावत् मानवजातींत अप्रतिहत, तथापि सर्वांचा काळजीनें सांभाळ करणारा असा अमरदेव तोच आहे, तर सर्वांचा प्रतिनिधि तोच होवो. ॥ २ ॥


स सद्म॒ परि॑ णीयते॒ होता॑ म॒न्द्रो दिवि॑ष्टिषु । उ॒त पोता॒ नि षी॑दति ॥ ३ ॥

सः सद्म परि नीयते होता मंद्रः दिविष्टिषु । उत पोता नि सीदति ॥ ३ ॥

प्रातःकाळच्या इष्टीच्या वेळेस स्थंडिलाभोंवती त्यालाच फिरवितात. तोच आनंदमय अग्नि, होता आणि पोता होऊन आसनावर विराजमान होतो. ॥ ३ ॥


उ॒त ग्ना अ॒ग्निर॑ध्व॒र उ॒तो गृ॒हप॑ति॒र्दमे॑ । उ॒त ब्र॒ह्मा नि षी॑दति ॥ ४ ॥

उत ग्नाः अग्निः अध्वरे उतो इति गृहऽपतिः दमे । उत ब्रह्मा नि सीदति ॥ ४ ॥

तसेंच, आमच्या यागसमारंभांत देवपत्‍न्यांना घेऊन येऊन अग्नि हा यज्ञमंदिरांत यजमान आणि ब्रह्मा होऊन स्थानापन्न झाला आहे. ॥ ४ ॥


वेषि॒ ह्यध्वरीय॒तामु॑पव॒क्ता जना॑नाम् । ह॒व्या च॒ मानु॑षाणाम् ॥ ५ ॥

वेषि हि अध्वरिऽयतां उपऽवक्ता जनानां । हव्या च मानुषाणां ॥ ५ ॥

तूं सर्व लोकांचा व्यवस्थापक आहेस, तथापि यागकर्मोत्सुक अशा सर्व भक्तजनांचे हविर्भाग तुला हवेहवेसे वाटतात. ॥ ५ ॥


वेषीद्व॑स्य दू॒त्य१ं यस्य॒ जुजो॑षो अध्व॒रम् । ह॒व्यं मर्त॑स्य॒ वोळ्ह॑वे ॥ ६ ॥

वेषि इत् ऊं इति अस्य दूत्यं यस्य जुजोषः अध्वरं । हव्यं मर्तस्य वोळ्हवे ॥ ६ ॥

दीन भक्तांच्या यज्ञयागांत तुला प्रेम वाटतें, म्हणून त्यांचेच हविर्भाग देवांकडे पोहोंचविण्याकरितां तूं त्यांचे प्रतिनिधित्व मोठ्या आवडीनें पत्करतोस. ॥ ६ ॥


अ॒स्माकं॑ जोष्यध्व॒रम॒स्माकं॑ य॒ज्ञम॑ङ्गिरः । अ॒स्माकं॑ शृणुधी॒ हव॑म् ॥ ७ ॥

अस्माकं जोषि अध्वरं अस्माकं यज्ञं अंगिरः । अस्माकं शृणुधी हवं ॥ ७ ॥

तर आमचा यज्ञ आणि आमचा हा याग हे दोन्हीही तूं प्रेमानें सेवन कर, आणि हे अंगिरा (अग्ने) आमचा धांवा ऐक. ॥ ७ ॥


परि॑ ते दू॒ळभो॒ रथो॑ऽ॒स्माँ अ॑श्नोतु वि॒श्वतः॑ । येन॒ रक्ष॑सि दा॒शुषः॑ ॥ ८ ॥

परि ते दूःऽदभः रथः अस्मान् अश्नोतु विश्वतः । येन रक्षसि दाशुषः ॥ ८ ॥

ज्या रथावर आरूढ होऊन तूं भक्तांचे संरक्षण करतोस तोच तुझा अप्रतिहत रथ आमच्या सर्व आजूबाजूंस सज्ज राहून आमचा सांभाळ करो. ॥ ८ ॥


ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त १० ( अग्नि सूक्त )

ऋषी - वामदेवः : देवता - अग्नि : छंद - गायत्री


अग्ने॒ तम॒द्याश्वं॒ न स्तोमैः॒ क्रतुं॒ न भ॒द्रं हृ॑दि॒स्पृश॑म् । ऋ॒ध्यामा॑ त॒ ओहैः॑ ॥ १ ॥

अग्ने तं अद्य अश्वं न स्तोमैः क्रतुं न भद्रं हृदिऽस्पृशं । ऋध्याम त ओहैः ॥ १ ॥

हे अग्नि, तुझ्या अश्वाप्रमाणे सर्वगामी, तुझ्या दैवी कर्तृत्वाप्रमाणेंच शुभदायक असा जो हृदयास चटका लावून सोडणारा तुझा सहवास त्याचेंच आज आमच्याकडून स्तोत्रें आणि ध्यनयोग यांच्या योगानें गौरव होवो. ॥ १ ॥


अधा॒ ह्यग्ने॒ क्रतो॑र्भ॒द्रस्य॒ दक्ष॑स्य सा॒धोः । र॒थीर्‌ऋ॒तस्य॑ बृह॒तो ब॒भूथ॑ ॥ २ ॥

अध हि अग्ने क्रतोः भद्रस्य दक्षस्य साधोः । रथीः ऋतस्य बृहतः बभूथ ॥ २ ॥

कारण हे अग्नि, दैवी कर्तृत्वाचा, मंगलप्रद व श्रेयस्कर अशा चातुर्यबलाचा, आणि ह्या उदात्त सद्धर्माचा नायक खरोखर तूंच झाला आहेस. ॥ २ ॥


ए॒भिर्नो॑ अ॒र्कैर्भवा॑ नो अ॒र्वाङ् स्व१र्ण ज्योतिः॑ । अग्ने॒ विश्वे॑भिः सु॒मना॒ अनी॑कैः ॥ ३ ॥

एभिः नः अर्कैः भव नः अर्वाङ्‍ स्वः ण ज्योतिः । अग्ने विश्वेभिः सुऽमना अनीकैः ॥ ३ ॥

अग्निदेवा, आमच्या ’अर्क’ स्तोत्रांनी प्रसन्न होऊन, स्वर्गीय तेजोनिधि जो सूर्य त्याच्या प्रमाणें आपल्या सर्व परिवारासह प्रमुदित मनानें आमच्याकडे वळ. ॥ ३ ॥


आ॒भिष्टे॑ अ॒द्य गी॒र्भिर्गृ॒णन्तोऽ॑ग्ने॒ दाशे॑म । प्र ते॑ दि॒वो न स्त॑नयन्ति॒ शुष्माः॑ ॥ ४ ॥

आभिः टे अद्य गीःऽभिः गृणंतः अग्ने दाशेम । प्र ते दिवः न स्तनयंति शुष्माः ॥ ४ ॥

अग्निदेवा, अशा प्रकारच्या स्तुतिस्तवनांनी तुझें गुणगायन करून आम्हाला आज तुझी उपासना करूं दे. पहा तुझ्या ह्या ज्वालांचे विक्राळ झोत आकाशांतील मेघांप्रमाणें गर्जना करीत आहेत. ॥ ४ ॥


तव॒ स्वादि॒ष्ठाग्ने॒ संदृ॑ष्टिरि॒दा चि॒दह्न॑ इ॒दा चि॑द॒क्तोः । श्रि॒ये रु॒क्मो न रो॑चत उपा॒के ॥ ५ ॥

तव स्वादिष्ठा अग्ने संऽदृष्टिः इदा चित् अह्नः इदा चित् अक्तोः । श्रिये रुक्मः न रोचते उपाके ॥ ५ ॥

हे अग्नि, तुझे दीप्तिमान व अत्यंत मधुर कृपाकटाक्ष, दिवस काय आणि रात्री काय, नेहमींच आमच्या आंगावर एखाद्या रत्‍नजडित अलंकाराप्रमाणें शोभून आम्हांस वैभव आणतात. ॥ ५ ॥


घृ॒तं न पू॒तं त॒नूर॑रे॒पाः शुचि॒ हिर॑ण्यम् । तत्ते॑ रु॒क्मो न रो॑चत स्वधावः ॥ ६ ॥

घृतं न पूतं तनूः अरेपाः शुचि हिरण्यं । तत् ते रुक्मः न रोचत स्वधाऽवः ॥ ६ ॥

हे स्वतंत्रा, तुझी निष्कलंक मूर्ति, स्वच्छ पवित्र घृताप्रमाणे अथवा सुवर्णाप्रमाणे किंवा रत्‍नखचित अलंकाराप्रमाणें चमकत असते. ॥ ६ ॥


कृ॒तं चि॒द्धि ष्मा॒ सने॑मि॒ द्वेषोऽ॑ग्न इ॒नोषि॒ मर्ता॑त् । इ॒त्था यज॑मानादृतावः ॥ ७ ॥

कृतं चित् धि स्म सनेमि द्वेषः अग्ने इनोषि मर्तात् । इत्था यजमानात् ऋतऽवः ॥ ७ ॥

सद्धर्मप्रिय अग्निदेवा, जें जें कांही द्वेषमूलक पातक तुझ्या भक्ताकडून घडलेले असेल, तें झाडून सर्व त्याच्यापासून तूं खरोखरच पार नाहीसें करून टाकतोस. ॥ ७ ॥


शि॒वा नः॑ स॒ख्या सन्तु॑ भ्रा॒त्राग्ने॑ दे॒वेषु॑ यु॒ष्मे । सा नो॒ नाभिः॒ सद॑ने॒ सस्मि॒न्नूध॑न् ॥ ८ ॥

शिवा नः सख्या संतु भ्रात्रा अग्ने देवेषु युष्मे । सा नः नाभिः सदने सस्मिन् ऊधन् ॥ ८ ॥

हे अग्नि, तुझ्या दिव्य विभूतिंशी जडलेले आमचे मित्रत्व आणि बंधुत्व आम्हांस मंगलप्रद होवो. ह्या धरित्रीच्या वक्षःस्थलावर, ह्या यज्ञगृही आतां आम्हाला तेवढाच आधार आहे. ॥ ८ ॥


ॐ तत् सत्


GO TOP