श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय एकतिसावा


कौरव सापळ्यात सापडले


श्रीगणेशाय नम: ॥
जनमेजय बोले सुखसंपन्ना ॥ वैशंपायना परम सज्ञाना ॥
भारतकथारस श्रवणा ॥ सुरस लागे तुझे मुखें ॥ १ ॥
करूनि तीर्थयात्रा समग्र ॥ द्वैतवना आले पंडुकुमार ॥
यावरी खल धार्तराष्ट्र ॥ काय करिते जाहले ॥ २ ॥
मग बोले वैशंपायन ॥ एकत्र होऊन दुर्जन ॥
दुर्योधन दुःशासन शकुनि कर्ण ॥ विचार करिती एकांतीं ॥ ३ ॥
आलीं द्वादश वर्षें भरत ॥ तेराव्यांत पांडव होती गुप्त ॥
पुढें युद्ध होईल प्राप्त ॥ अति अनर्थ दिसतो पैं ॥ ४ ॥
स्वर्गीहूनि विद्या अद्‌भुत ॥ शिकोनि आला अभिमन्युतात ॥
समरांगणीं कृतांत ॥ युद्ध करूं न शकेचि ॥ ५ ॥
प्रसन्न करून व्योमकेश ॥ अस्त्रविद्या शिकला निःशेष ॥
तैशीच वासवें निर्दोष ॥ विद्या तयासी समर्पिली ॥ ६ ॥
लोकपाल प्रसन्न सर्व ॥ विद्या दिधली अपूर्व ॥
निःशेष पुशिला ठाव ॥ निवातकवच दैत्यांचा ॥ ७ ॥
शकुनि म्हणे वनांत ॥ ते जों निजसुरे आहेत ॥
रात्रीं जाऊनि अकस्मात ॥ करावा घात पांचांचा ॥ ८ ॥
दंदशूक जों निद्रित जाण ॥ मुख ठेंचावें घालून पाषाण ॥
विषवल्ली जों आहे लहान ॥ तों उपटून टाकावी ॥ ९ ॥
गोधनें पाहावया नयनीं ॥ घोषयात्रेचें मिष करूनी ॥
गोष्टी न फुटतां द्वैतवनीं ॥ रजनीमाजी वधावे ॥ १० ॥
आणि आपुली वैभवसंपत्ती ॥ चतुरंग दळ न माय जगतीं ॥
हें दाखवावे पांडवांप्रती ॥ पाहोन होती अधोवदन ॥ ११ ॥
दरिद्री वनांत पांडव ॥ वैभव त्यांस दावूं सर्व ॥
आमुची श्री देखोन गर्व ॥ हरेल त्यांचा निश्चयें ॥ १२ ॥
उदय पावतां वासरमणी ॥ उडुगणें लपती गगनीं ॥
दृष्टीं देखतां महामणी ॥ मग गारांसी कोण पुसे ॥ १३ ॥
मृगेंद्र आला ऐकोन ॥ वारण सोडिती तत्काल प्राण ॥
तैसे पांडव आम्हां देखोन ॥ निस्तेज होती तत्त्वतां ॥ १४ ॥
फावलें तरी टाकावे वधून ॥ नाहीं तरी वैभवबळ दाखवून ॥
यावें सवेंचि परतोन ॥ राष्ट्र आपुलें विलोकित ॥ १५ ॥
ऐसें बोलतां शकुनी ॥ दुर्योधन आनंदला मनीं ॥
श्वान जैसें वांति देखोनी ॥ परम आवेशें धांवत ॥ १६ ॥
शिंदीवन देखतां बहुत ॥ मद्यपी जैसा आनंदत ॥
कीं जारास अवचित प्राप्त ॥ मल्याळदेश जाहला ॥ १७ ॥
मनांत ऐशी उपसे हौस ॥ कीं शंख करावा बहुवस ॥
तों आला फाल्गुनमास ॥ गगनीं हर्ष न समाये ॥ १८ ॥
ऐसें शकुनीचे वचन ॥ ऐकोन तोवे दुर्योधन ॥
मग अंधाप्रति येऊन ॥ पुसता जाहला तेधवां ॥ १९ ॥
म्हणे घोषयात्रा करून ॥ आपुलें राष्ट्र पाहोन ॥
मृगया करीत द्वैतवन ॥ येऊं पाहोनि तैसेचि ॥ २० ॥
वृद्ध म्हणे पांच पांडव ॥ द्वैतकाननींचे कंठीरव ॥
तुम्ही इभ तेथें सर्व ॥ आपुलें वैभव दावूं जातां ॥ २१ ॥
जागे न करावे निद्रित व्याघ्र ॥ चेतवू नये महाविखार ॥
तरी तुम्ही जाऊन सत्वर ॥ घोषयात्रा करूनि येइंजे ॥ २२ ॥
देवव्रत भारद्वाज शारद्वत ॥ विदुर आणि शारद्वतीसुत ॥
यांसी कळों नेदितां मात ॥ सेनेसहित निघाले ॥ २३ ॥
विदुरास समजलें ते क्षणीं ॥ दुर्जन चालिले सेना घेऊनी ॥
परी तों गजबजला नाहीं मनीं ॥ म्हणे यांचेनें काय होतें ॥ २४ ॥
रुक्मिणीनयनाब्जविकासमित्र ॥ पाठीसी असतां पांडवमित्र ॥
काय करिती दुर्जन अमित्र ॥ दुःखास पात्र होतील ॥ २५ ॥
जो निजजनहृदयारविंदमिलिंद ॥ जगदंकुरमूलकंद ॥
तों पाठीसी असतां ब्रह्मानंद ॥ पांडवां अधीन सर्वदा ॥ २६ ॥
असो इकडे कौरवभारा ॥ घोषप्रदेशीं होऊन स्थिर ॥
धारोष्णपय पवित्र ॥ प्राशन करिती यथेच्छ ॥ २७ ॥
एक तृप्त होती दधि सेवून ॥ एक करिती मद्यपान ॥
एकमेकांस आग्रह करून ॥ पाजून मत्त जाहले ॥ २८ ॥
तुच्छ म्हणती सुधारस ॥ त्याहून मद्यपान विशेष ॥
नाना फळें भाजून सुरस ॥ बहु विलास दाविती ॥ २९ ॥
यावरी ते दुष्ट सकळी ॥ आले द्वैतारण्याजवळी ॥
ज्यावनीं केळी नारळी ॥ कर्पूरकदली डोलती ॥ ३० ॥
कृष्णागर मलयागर चंदन ॥ सुवासें भरलेंसे गगन ॥
जैसे सज्जनांचे गुण ॥ न सांगतां प्रकटती ॥ ३१ ॥
खर्जूर कदंब रातांजन ॥ अंजीर औदुंबर सीताफळ जाण ॥
आम्रवृक्ष भेदिती गगन ॥ सूर्यकिरण माजी न पडे ॥ ३२ ॥
जेथें वसे सदा धर्म ॥ धर्म तेथें सुख परम ॥
सुख तेथें आराम ॥ सहज होय सकलांतें ॥ ३३ ॥
आराम तेथें वसती संत ॥ संत तेथें आनंद बहुत ॥
आनंद तेथें भगवंत ॥ सदा रक्षित उभा असे ॥ ३४ ॥
घाला घालूं चालले रजनींत ॥ हें जाणोन निर्जरनाथ ॥
गंधर्वपतीस प्रेरित ॥ कुंतीसुत रक्षावया ॥ ३५ ॥
मदें धांवत कौरवभारा ॥ तों वाटे रमणीक सरोवर ॥
गंधर्वराज सहपरिवार ॥ चित्रसेन क्रीडे तेथें ॥ ३६ ॥
दूत धांवत उन्मत्त ॥ गंधर्वास तंव बोलत ॥
कोण तस्कर तुम्ही येथ ॥ सोडा पंथ सत्वर ॥ ३७ ॥
दुर्योधन गजबज ऐकोन ॥ दूतांस देई पुढें पाठवून ॥
म्हणे मार्गावर आहे कोण ॥ त्यांसी ताडन करून काढा ॥ ३८ ॥
दूत धांविन्नले उन्मत्त ॥ गंधर्वांसी तवकें बोलत ॥
कोण रे तस्कर तुम्ही येथ ॥ सोडा पंथ रायातें ॥ ३९ ॥
गंधर्व पुसती राव कोण ॥ म्हणती पृथ्वीपती दुर्योधन ॥
लवकर उठावे इथून ॥ घेऊन प्राण पळा वेगें ॥ ४० ॥
गंधर्वी ऐसें ऐकोन ॥ दूतांस केलें बहु ताडन ॥
जैशीं बिडालकें धरून ॥ महाकुंजरें मर्दिलीं ॥ ४१ ॥
दूत म्हणोनि सोडिले जीवंत ॥ माघारे आले धांवत ॥
अहीचे कवेंतून अकस्मात ॥ मूषक जैसे पळाले ॥ ४२ ॥
दोहीं हस्ते शंख करित ॥ सुयोधना सांगती वृत्तांत ॥
पर्वततुल्य अद्‌भुत ॥ गंधर्व पुढें बैसले ॥ ४३ ॥
आम्हीं प्रताप वर्णितां तुझा ॥ त्यांहीं केली आमुची पूजा ॥
ऐसें ऐकतां अंधतनुजा ॥ क्रोध अद्‌भुत नाटोपे ॥ ४४ ॥
निजभारेंशीं ते अवसरीं ॥ दुर्योधन धांवे गंधर्वावरी ॥
जैसे वृषभ सिंहाचे दरी- ॥ माजी जाऊनि चवताळले ॥ ४५ ॥
गंधर्वांसहित चित्रसेन ॥ सरसावला युद्धालागून ॥
बाणवृष्टि करून ॥ कौरवसैन्य खिळियेले ॥ ४६ ॥
चित्रसेनपंचाननापुढें ॥ कर्ण सुयोधन जंबुक बापुडे ॥
मोहनास्त्र घालून वेडे ॥ केले सर्व एकदांचि ॥ ४७ ॥
रथ तुरंग चाप तूणीर ॥ क्षणांत कर्णाचे केले चूर ॥
सुयोधनाचा स्यंदन सत्वर ॥ तिलप्राय केला हो ॥ ४८ ॥
एकएका कौरवाप्रती ॥ दश दश गंधर्व धरिती ॥
सुयोधना धरूनि बहुतीं ॥ हस्त माघारे बांधिले ॥ ४९ ॥
कर्ण पळे सत्वर ॥ घेतलें घोर कांतार ॥
मागें पुढें पाहे भयातुर ॥ चरणीं धांवों लागला ॥ ५० ॥
यजमान परम संकटीं पडे ॥ देखोन आश्रित पळती चहूंकडे ॥
तैसे दुर्योधनाचे वीर गाढे ॥ पळून गेले अष्टदिशां ॥ ५१ ॥
कित्येकीं शस्त्रें सांडून ॥ आडमार्गे घेतलें रान ॥
नाना सोंगे घेऊन ॥ पळते जाहले तेधवा ॥ ५२ ॥
द्वैतारण्यांत धांवोन ॥ गेले कित्येक सेवक प्रधान ॥
धर्मराजास वर्तमान ॥ सांगती रडोन ते वेळां ॥ ५३ ॥
म्हणती भीमार्जुना शस्त्रें ध्यावीं ॥ तुमचे बंधू नेले गंधर्वी ॥
ऐकोन हास्य केलें सर्वी ॥ द्रौपदीधौम्यांसमवेत ॥ ५४ ॥
वृकोदर बोले स्पष्ट ॥ जेथें वसे कौटिल्य कपट ॥
तेथें ईश्वर करील तळपट ॥ अन्यायवाट देखतां ॥ ५५ ॥
आमुचा करावयावध ॥ येत होते होऊनि सिद्ध ॥
सिंधुजाहृदयारविंदमिलिंद ॥ तेणें विपरीत केलें हें ॥ ५६ ॥
वैशंपायन गर्जोन बोलत ॥ कृष्णभक्तांचें जे विरुद्ध करित ॥
त्यांस गति हेच प्राप्त ॥ होय निश्चयें जाणिजे ॥ ५७ ॥
साधुसंत गोब्राह्मण ॥ यांचा घात चिंतितां दुर्जन ॥
विघ्नसमुदाय दारुण ॥ तयांवरी रिचवती ॥ ५८ ॥
श्रोतयांस म्हणे श्रीधर ॥ सर्वांस विनवितों जोडूनि कर ॥
भगवद्भक्तांशीं अणूमात्र ॥ द्वेष सहसा करूं नका ॥ ५९ ॥
अजातशत्रु युधिष्ठिर ॥ सकळ जीवांचें माहेर ॥
शत्रुंचाही हितकर ॥ जो उदार सर्वस्वें ॥ ६० ॥
शांतिवैरागरींचा हिरा प्रत्यक्ष ॥ वैराग्यवनींचा कल्पवृक्ष ॥
सर्वदा कमलपत्राक्ष ॥ अंतर्बाह्य रक्षी तया ॥ ६१ ॥
जो विवेकरत्‍नांचा किरीट ॥ ज्ञानमंदाकिनीचा लोट ॥
जो स्वप्नींही नेणे कपट ॥ तों धर्मराज धर्मात्मा ॥ ६२ ॥
क्षमावनींचें निधान ॥ कीं सदयतेचें उद्यान ॥
लक्षूनियां भीमार्जुन ॥ आज्ञा जाण करीतसे ॥ ६३ ॥
आम्ही पांच ते एकशत ॥ मिळोन बंधू समस्त ॥
त्यांस गंधर्व धरून नेत ॥ पहावें विपरित कैसें हें ॥ ६४ ॥
त्यांस आम्हां राज्यसंबंध ॥ म्हणोन पडलें विरुद्ध ॥
आणिके करितां त्यांसीं बंध ॥ आम्हीं अवश्य धांवावें ॥ ६५ ॥
तरी तुम्ही लौकर धांवा ॥ शत्रु उपकार करोनि रक्षावा ॥
यशध्वज उभारावा ॥ कौरवांसी सोडवूनी ॥ ६६ ॥
मग बोले फाल्गुन ॥ आम्हांस तों आज्ञा प्रमाण ॥
सिद्ध करोनि चार्‍ही स्यंदन ॥ चौघे जण निघाले ॥ ६७ ॥
भीमार्जुन नकुल सहदेव ॥ समीरापरी घेती धांव ॥
तों गंधर्वी कौरव ॥ बांधोनि नेले अंतरिक्षीं ॥ ६८ ॥
वृषभ बांधिले दांवणीं ॥ कीं ते तस्कर धरिले वनीं ॥
तैसा दीनमुख दुर्योधन नयनीं ॥ मागें पुढें विलोकी ॥ ६९ ॥
कृतांताचे मनीं बैसे दचक ॥ तैशी भीमें फोडिली हांक ॥
तों नाद ऐकतां देख ॥ गंधर्वचक्र कंपित जाहलें ॥ ७० ॥
म्हणती काय आले काळ ॥ कीं उतरले लोकपाळ ॥
तों अमर्याद शरजाळ ॥ भीमार्जुन सोडिती ॥ ७१ ॥
पांडव आले देखोन ॥ खालतें पाहती अंधनंदन ॥
परम निर्दय दुर्जन ॥ म्लानवदन जाहले ॥ ७२ ॥
गंधर्व बोलती परतोन ॥ कां करितां युद्धकंदन ॥
पार्थ म्हणे बंधू धरून ॥ काय कारण न्यावया ॥ ७३ ॥
तुम्ही गंधर्व तस्कर ॥ शरजाळें करूं जर्जर ॥
साह्य आलिया निर्जरा ॥ करूं संहार सर्वांचा ॥ ७४ ॥
चौघे पांडव सोडिती बाण ॥ गंधर्व खिळिले संपूर्ण ॥
जैसे मयूर पिच्छे पसरून ॥ काननामाजी विचरती ॥ ७५ ॥
शर वर्षें चित्रसेन ॥ परी ते न गणिती पंडुनंदन ॥
जैसे अबलांचे बोल रसहीन ॥ विद्वज्जन न मानिती ॥ ७६ ॥
गारा पडती एकसरें ॥ तैशीं पडती गंधर्वशिरे ॥
मग पृथेचे तृतीयपुत्रें ॥ संहारास्त्र सोडिलें ॥ ७७ ॥
मग चित्रसेन पुढें होऊन ॥ म्हणे पार्था तूं माझा मित्र प्राण ॥
तरी हें अस्त्र आवरून ॥ घेई मागुती तुझें तूं ॥ ७८ ॥
ऐसें वचन ऐकून मागुतें ॥ अस्त्र आवरिले वीर पार्थें ॥
मग भेटले चित्रसेनातें ॥ चौघे बंधू तेधवां ॥ ७९ ॥
चित्रसेन म्हणे अंधकुमार ॥ महाकपटी दुराचार ॥
यांचा कां पेशी कैवार ॥ शिक्षा साचार योग्य यांसी ॥ ८० ॥
त्रिदशेश्वरें आज्ञा करून ॥ आणविलें यांस धरून ॥
हे तुम्हांस वधावयालागून ॥ येत होते रजनींत ॥ ८१ ॥
हे घातकी तस्कर दुर्जन ॥ यांचीं खंडावीं नासिके कर चरण ॥
अथवा शिरंच छेदून ॥ आतांच टाकीन तवाज्ञें ॥ ८२ ॥
पार्थ म्हणे धर्माज्ञा ॥ अलोट आम्हांस सर्वज्ञा ॥
मग पांडव आणि गंधर्वसेना ॥ धर्मापाशीं पातली ॥ ८३ ॥
कौरव बांधले आकर्षून ॥ उभे केले पुढें नेऊन ॥
श्रीकृद्याभगिनी येऊन ॥ पाहती जाहली कौतुकें ॥ ८४ ॥
हांसोनि पांचाळी बोले ॥ बरेच गंधर्वी कौरव पूजिले ॥
दुर्योधन दुःशासन ते वेळे ॥ अधोवदन पाहती ॥ ८५ ॥
धर्म म्हणे सोडा सत्वर ॥ बंधू कष्टी जाहले समग्र ॥
तें कौतुक ऋषीश्वर ॥ भोंवताले विलोकिती ॥ ८६ ॥
गंधर्वी दिधले सोडून ॥ धर्मरायाची आला घेऊन ॥
स्वर्गी गेला चित्रसेन ॥ निजविमानीं बैसोनियां ॥ ८७ ॥
पांडवकरें गंधर्व ॥ पडले होते ते सर्व ॥
उठविता जाहला वासव ॥ सुधावृष्टि करोनियां ॥ ८८ ॥
इकडे दुर्योधनास म्हणे धर्म ॥ हें कां तुज आठवलें कर्म ॥
तस्करविद्येनें श्रम ॥ पावलासी फार तूं ॥ ८९ ॥
तूं जन्मोनि कुरुवंशीं ॥ निंद्य कर्म आचरलासी ॥
नकुलसहदेवां द्रौपदीसीं ॥ हास्य नावरे तेधवां ॥ ९० ॥
पार्थ म्हणे समरीं येऊन ॥ युद्ध करावें होतें निर्वाण ॥
नीच कर्म आचरोन ॥ डाग लाविला कुलासी ॥ ९१ ॥
भीम दुःशासनास म्हणत ॥ जय पावलां तुम्ही समस्त ॥
आतां वाद्यें वाजवित ॥ गजपुरांत मिरवावे ॥ ९२ ॥
दुर्योधन म्हणे धर्मराया ॥ आज्ञा देईं गुणालया ॥
युधिष्ठिर आलिंगूनियां ॥ समाधान करी तेधवां ॥ ९३ ॥
म्हणे मनांत खेद न करीं ॥ काळही आला तुजवरी ॥
तरी तुझे बंधू निर्धारीं ॥ पाठिराखे आम्ही असों ॥ ९४ ॥
बंधूसह दुर्योधन ॥ चालिला धर्मास पुसोन ॥
अपमानें अधोवदन ॥ चरणचालीं जातसे ॥ ९५ ॥
मनांत भावी दुर्योधन ॥ शत्रूंनीं सोडविलें धांवोन ॥
आतां काय व्यर्थ वांचून ॥ द्यावा प्राण विष घेउनी ॥ ९६ ॥
जरी गंधर्व नेते बांधोन ॥ आमुची शिरें टाकिते छेदून ॥
तरी बरें होतें जाण ॥ त्याहून अपमान हा वाटे ॥ ९७ ॥
मी तप करीन दारुण ॥ पांडवांचा घ्यावया प्राण ॥
अथवा देशांतर सेवीन ॥ काय वदन दावू लोकां ॥ ९८ ॥
दुर्जनास करितां उपकार ॥ तों तत्काल मानी अपकारा ॥
पयःपान विखार ॥ आपुला गुण टाकीना ॥ ९९ ॥
षोडशोपचारे पूजिला कृशान ॥ तरी पोळाया न करी अनमान ॥
दुर्जनाचें हित करितां पूर्ण ॥ पडे परतोन दुरात्मा ॥ १०० ॥
असो मार्गी मिळाला परिवार ॥ भेटे येऊनि सूर्यपुत्र ॥
समाधान करिती सर्वत्र ॥ दुर्योधनाचे तेधवां ॥ १०१ ॥
लाभ मृत्यू आणि भय ॥ काळेकरून होत जाय ॥
त्याचा खेद मानून काय ॥ धैर्य पुढती धरावें ॥ १०२ ॥
काया आहे जंव जीवंत ॥ तंव न सोडावा पुरुषार्थ ॥
उद्यां जिंकू पंडुसुत ॥ एकछत्री राज्य करूं ॥ १०३ ॥
मग बोले दुर्योधन ॥ विदुर भीष्म द्रौणी द्रोण ॥
यांस काय दावूं वदन ॥ सेवीन कानन यावरी ॥ १०४ ॥
परम कांतार घोरांदर ॥ लक्षोनि एक सरोवर ॥
ते दिवशीं राहिले धार्तराष्ट्र ॥ भोजन शयन नाठवे ॥ १०५ ॥
दुर्योधन चिंताग्रस्त ॥ भूमीवरी शयन करित ॥
दुःखनिद्रा अति लोटत ॥ तंव अद्‌भुत वर्तलें ॥ १०६ ॥
पाताळीं जे दैत्य समस्त ॥ दुर्योधनाचा जाणोनि वृत्तांत ॥
कृत्या एक अकस्मात ॥ त्यांणीं तेथें पाठविली ॥ १०७ ॥
तिणें येऊनि ते वेळां ॥ दुर्योधन नेला पाताळा ॥
भेटला दैत्यां सकळां ॥ सांगे वर्तला वृत्तांत ॥ १०८ ॥
दुर्योधनाचे समाधान ॥ करिती सर्व दैत्य मिळोन ॥
अंधपुत्रं करी रोदन ॥ म्हणे मी न जाईं गजपुरा ॥ १०९ ॥
भीष्म द्रोण शारद्वत ॥ यांचें पांडवांकडे चित्त ॥
आम्हां गंधर्वी नेलें हे मात ॥ तयांलागीं समजेल ॥ ११० ॥
पांडवीं सोडविलें पाहें ॥ हें दुःख त्रिभुुवनीं न माये ॥
युद्धीचे सर्व नृपवर्य ॥ हांसतील मज देखतां ॥ १११ ॥
दैत्य म्हणती ऐक वचन ॥ शारद्वत भीष्म द्रोण ॥
यांचे अंगीं संचरोन ॥ पांडवसेना संहारूं ॥ ११२ ॥
ऐसें करून समाधान ॥ पूर्वस्थळा घालविला नेऊन ॥
दुर्योधन जागा होऊन ॥ सांगे स्वप्न कर्णातें ॥ ११३ ॥
मग कर्ण म्हणे युद्धांत ॥ तुज जय होईल अत्यंत ॥
मग वाहनीं बैसोनि समस्त ॥ गजपुराप्रति पावले ॥ ११४ ॥
सकल वाद्यें राहवून ॥ ग्रामांत प्रवेशे अधोवदन ॥
भीष्म विदुर आणि द्रोण ॥ वर्तमान कळलें त्यांस हें ॥ ११५ ॥
पांडवां रक्षक वैकुंठनाथ ॥ त्यांस कोण करील विपरीत ॥
ब्रह्मानंदें पंडुसुत ॥ द्वैतारण्यीं विचरती ॥ ११६ ॥
इकडे कर्णे दिग्विजय करून ॥ द्रव्य आणिलें मेळवून ॥
सकल राजे बोलावून ॥ महायज्ञ आरंभिला ॥ ११७ ॥
मनीं योजिली कुटिल युक्ती ॥ बोलावूं पाठविलें पांडवांप्रती ॥
द्यूत खेळून मागुती ॥ वनवासा पाठवावे ॥ ११८ ॥
कीं त्रयोदश वर्षें भरल्याविण ॥ केविं ग्रामांत बैसला येऊन ॥
हा गोष्टीचें दूषण लावून ॥ पुन्हा वनवास योजावा ॥ ११९ ॥
पांडवांप्रति गेले दूत ॥ म्हणती यागास चला समस्त ॥
धर्मराज हांसोनि बोलत ॥ आम्ही तेथें न येऊं कदा ॥ १२० ॥
त्रयोदश वर्षें होतां पूर्ण ॥ येऊं बोलाविल्याविण ॥
असो समास जाहला यज्ञ ॥ दुर्जनांचा गजपुरीं ॥ १२१ ॥
इकडे द्वैतारण्यांत ॥ मृगयेसी गेले पंडुसुत ॥
द्रौपदी एकली आश्रमांत ॥ तों कौतुक एक वर्तलें ॥ १२२ ॥
सेनेसह जयद्रथ ॥ शाल्वदेशीं लग्ना जात ॥
वाटे चालतां अकस्मात ॥ पांचाळी दृष्टीं देखिली ॥ १२३ ॥
जी स्वरूपाची पूर्णसीमा ॥ जी अपर्णेची अपरप्रतिमा ॥
वृत्रारि शर्व अंबुजजन्मा ॥ ऐशी निर्मूं न शकती ॥ १२४ ॥
कमलमृगमीनखंजन ॥ कुरवंडी करावी नेत्रांवरून ॥
अष्टनायिकांचें सौंदर्य पूर्ण ॥ चरणांगुष्ठीं न तुळेचि ॥ १२५ ॥
आकर्ण नेत्र निर्मल मुखाब्ज ॥ देखोन लज्जित द्विजराज ॥
मृगेंद्र देखोन जिचा माज ॥ मुख न दावी मनुष्यां ॥ १२६ ॥
परम सुकुमार घनश्यामवर्णी ॥ ओतिली इंद्रनीळ गाळुनी ॥
दंततेजें जिंकिल्या हिरेखाणी ॥ बोलतां मेदिनीं प्रकाश पडे ॥ १२७ ॥
सर्वलक्षणसंयुक्त ॥ म्हणोन पृथ्वीचा नृपनाथ ॥
मुखें कीर्तिनगारा वाजवित ॥ सौंदर्यशालिनी म्हणोनी ॥ १२८ ॥
जिचे अंगींचा सुवास ॥ जाय अर्धयोजन विशेष ॥
जयद्रथ देखोनि तीस ॥ मदनज्वरें व्यापला ॥ १२९ ॥
म्हणे ऐशी नवरी टाकून ॥ कासया करूं जावें लग्न ॥
हातीं आलिया दिव्य रत्‍न ॥ काय कारण गारेचें ॥ १३० ॥
हे सकल प्रमदांची ईश्वरी ॥ इची प्रतिमा नसे उर्वींवरी ॥
ऐशी सोडूनियां नवरी ॥ शाल्वदेशा कां जावें ॥ १३१ ॥
तक्र मनीं जों इच्छित ॥ तों हातास आलें अमृत ॥
तेविं आम्हां जाहले येथें ॥ पूर्वदत्तेंकरूनी ॥ १३२ ॥
पांडव एकले वनांत ॥ त्यांसी वधीन एके क्षणांत ॥
मग कोटिकनामें दूत ॥ पांचाळीजवळी धाडिला ॥ १३३ ॥
पांचालकन्या सुरेख ॥ पांच सिंहांची ललना देख ॥
त्या सतीस जयद्रथ जंबुक ॥ सिद्ध जाहला न्यावया ॥ १३४ ॥
कोटिक तेथें येऊन ॥ पांचाळीस पुसे तूं कोण ॥
तुझें रूप देखोन ॥ देवही प्राण ओवाळिती ॥ १३५ ॥
वदनचंद्र निष्कलंक ॥ नरनरेंद्र चकोर होती देख ॥
पाहतां तव मुख सुरेख ॥ दंग पार्थिव जाहला ॥ १३६ ॥
विद्युल्लता झळके ज्यापरी ॥ उभी द्वारीं पांडवनारी ॥
अंचल रुळे उर्वीवरी ॥ प्रकाश दूर झळकतसे ॥ १३७ ॥
द्रौपदी म्हणे मार्गस्थ तूता ॥ मी पंडुस्नुषा पांडववनिता ॥
पांचालरायाची दुहिता ॥ भगिनी मन्मथजनकाची ॥ १३८ ॥
कोण आला आहे राव ॥ सांग वनांत गेले पांडव ॥
ते आतांच येतील सर्व ॥ आतिथ्य तुमचें करितील ॥ १३९ ॥
कोटिकानें येऊन ॥ सांगितलें वर्तमान ॥
मग जयद्रथ खालीं उतरोन ॥ आश्रमद्वारीं पातला ॥ १४० ॥
म्हणे हे लावण्यरत्‍नराशी ॥ चातुर्यसरोवरराजहंसी ॥
जरी तूं मज माळ घालिशी ॥ तरी पावसी सर्व सुखें ॥ १४१ ॥
तुज योग्य भ्रतार ॥ कदा नव्हत पंडुकुमार ॥
वनवास हा परम घोर ॥ येथें फार श्रमलीस तूं ॥ १४२ ॥
मी सिंधुरायाचा सुत ॥ माझें नाम जयद्रथ ॥
तुजकारणें आणिला रथ ॥ आरूढें सत्वर यावरी ॥ १४३ ॥
ऐसें ऐकतां ते गोरटी ॥ भ्रूमंडला घालीत आंठी ॥
म्हणे प्रलयचपला घालून पोटीं ॥ शलभ कैसा वांचेल ॥ १४४ ॥
मशक भावी मानसीं ॥ कीं पर्वत दाबीन दाढेशीं ॥
वृश्चिक खदिरांगारासी ॥ ताडून कैसा वांचेल ॥ १४५ ॥
पांच पांडव प्रलयाग्न ॥ त्यांची ज्वाला मी अति दारुण ॥
तूं पतंग तीतें कवळून ॥ सांग कैसा वांचसी ॥ १४६ ॥
व्याघ्र निजला वनांत ॥ त्याची जिव्हा पुढें लोंबत ॥
ते जंबुक तोडूनि स्वस्थ ॥ काव पावेल गृहातें ॥ १४७ ॥
महाभुजंगाचे दशन देख ॥ पाडून केविं वांचेल मंडूक ॥
तृणालिका विनायक ॥ धरोनि कैसा नेईल ॥ १४८ ॥
इभ मदें गर्जना करी ॥ जंव दृष्टीं न देखे केसरी ॥
प्राण घेऊनि पळें लौकरी ॥ पांडव आतांच येतील ॥ १४९ ॥
रणपंडितांमाजी सतेज ॥ दृष्टीस पडतां तों कपिध्वज ॥
आणि भीमगदा पाहतां निस्तेज ॥ होऊन पडशी मशका ॥ १५० ॥
असो पल्लवीं धरून जयद्रथ ॥ पांचाळीस बळेंच ओढित ॥
तंव ती अंचल अंग झाडित ॥ लोटिला पतित सतीनें ॥ १५१ ॥
जयद्रथ उलथोन पडला ॥ मागुती उठोन धांवला ॥
बळेच उचलोनि राजबाळा ॥ रथावरी घातली ॥ १५२ ॥
पृतनेसहें जयद्रथ ॥ पळत आपुले नगरा जात ॥
जयवाद्यें वाजवित ॥ मनीं भावित आनंदातें ॥ १५३ ॥
हिंसकस्कंधीं बस्त विशेष ॥ मानसीं मानी परम हर्ष ॥
कीं द्विजां पीडितां नहुष ॥ आनंद मानी मानसीं ॥ १५४ ॥
पांडवनामें घेऊनी ॥ हांक मारी श्रीकृष्णभगिनी ॥
कंपित जाहली कुंभिनी ॥ महासती आक्रंदतां ॥ १५५ ॥
पक्षी धांवती गगनीं ॥ हांक देती आक्रोशेंकरूनी ॥
पंडुपुत्र ही धांवा ये क्षणीं ॥ द्रुपदनंदिनी नेली दुष्टें ॥ १५६ ॥
मृगयां करूनि पंडुसुत ॥ आश्रमाकडे त्वरें येत ॥
तों धांवती देखती पुरोहित ॥ धौम्यनामक त्वरेनें ॥ १५७ ॥
आणीकही ऋषी धांवती ॥ पांडवांस वेगें पालविती ॥
मृगेंद्र हो तुमची सत्कीर्ती ॥ जयद्रथजंबुक नेतसे ॥ १५८ ॥
आश्रमीं ठेवून धौम्याप्रती ॥ पवनचे पांचही धांवती ॥
जेविं उरगाचा मार्ग खगपती ॥ काढीत धांवे त्वरेनें ॥ १५९ ॥
कीं इभकलभें वनांतरीं ॥ पाहों धांवती जेविं केसरी ॥
तों सेनेसह पळता झडकरी ॥ पृथाकुमरीं देखिला ॥ १६० ॥
गर्जना करीत भीमार्जुन ॥ उभा रे तस्करा दावीं वदन ॥
तुझें नासिक आणि कान ॥ करचरण छेदितों ॥ १६१ ॥
जयद्रथ सेनेसमवेत ॥ उभा राहे तेव्हां त्वरित ॥
भीम गदा घेऊन धांवत ॥ जैसा कृतांत महाप्रलयीं ॥ १६२ ॥
गजरथांचा संहार ॥ करी तेव्हां वृकोदर ॥
धर्मार्जुन सोडिती शर ॥ प्रलयचपलेसारिखे ॥ १६३ ॥
सहदेव आणि नकुळ ॥ संहारिती पायदळ ॥
बाण भेदती जैसे व्याळ ॥ वल्मीकांतरीं प्रवेशती ॥ १६४ ॥
जयद्रथ सोडित बाण ॥ वृष्टि करी जेविं पर्जंन्य ॥
परी ते न मानिती पंडुनंदन ॥ शिरें तोडून पाडिती ॥ १६५ ॥
धर्में अर्धचंद्रबाण लवलाहीं ॥ भेदिला जयद्रथाचे हदयीं ॥
रथातळीं ते समयी ॥ नकुल उतरोनि धांवला ॥ १६६ ॥
वारणचक्रांत मृगनायक ॥ एकला चौताळे निःशंक ॥
तैशी असिलता खेटक ॥ नकुल धांवे घेऊनि ॥ १६७ ॥
शस्त्रें पाडिजे कदलीस्तंभ ॥ तैसे नकुळे पाडिले इभ ॥
तुरंगस्यंदनांचे कदंब ॥ संहारिले प्रतापें ॥ १६८ ॥
चपळा तळपे अंबरीं ॥ तेविं फिरत सैन्यसागरी ॥
नकुलघटोद्भवें ते अवसरीं ॥ सेनासिंधु प्राशिला ॥ १६९ ॥
संकट जाणोनि जयद्रथ ॥ द्रौपदीस सांडूनियां पळत ॥
पांचाली म्हणे धरा त्वरित ॥ तस्कर दुष्ट सोडूं नका ॥ १७० ॥
मग पवनवेगेंकरून ॥ धांवले तेव्हां भीमार्जुन ॥
महाशार्दूल धरी हरिण ॥ तेवि आसडून पाडिला ॥ १७१ ॥
यथेच्छ मारूनि लत्ताप्रहार ॥ बांधोनि आकर्षिले मागें कर ॥
क्षुरमुख काढूनि शर ॥ पांच पाट काढिले ॥ १७२ ॥
दुर्योधनभगिनी दुःशीला देख ॥ यास दिधली हा होय शालक ॥
अर्धखांडमिशी निःशंक ॥ भादरून चालविला ॥ १७३ ॥
धर्में दौपदीपुढें त्वरित ॥ उभा केला जयद्रथ ॥
मग बोले सुभद्राकांत ॥ यास वधावें जरी आतां ॥ १७४ ॥
तरी दुखवेल गांधारी ॥ मग त्यास पुसती ते अवसरीं ॥
घेऊनि द्रुपदराजकुमारी ॥ कां तूं पळत होतासी ॥ १७५ ॥
मग म्हणती तयास ॥ म्हणे तूं पांडवांचा दास ॥
धर्म आणि द्रौपदीस ॥ नमूनि जाई दुर्जना ॥ १७६ ॥
जयद्रथास म्हणे धर्म ॥ ऐसें न करीं कदा कर्म ॥
तों दीनवदनपरम ॥ धर्मरायास विनवित ॥ १७७ ॥
सत्य सांगतों राया धर्मा ॥ अन्याय माझा करीं क्षमा ॥
सोडिला तों पापात्मा ॥ अधोवदन जातसे ॥ १७८ ॥
म्हणे जनां केवि दाखवू वदन ॥ मग गंगाद्वाराप्रति जाऊन ॥
करोनि तपानुष्ठान ॥ प्रसन्न केला व्योमकेश ॥ १७९ ॥
त्याप्रति बोले त्रिनेत्र ॥ माग तूं इच्छित वर ॥
तों म्हणे पांडवांशीं विजय निर्धार ॥ मजलागीं देई पां ॥ १८० ॥
मग बोले अपर्णानाथ ॥ समीप नसतां सुभद्राकांत ॥
जय तुजला तेव्हां प्राप्त ॥ क्षणैक होईल जाण पां ॥ १८१ ॥
ऐसा घेऊनि वरार्थ ॥ नगरास गेला जयद्रथ ॥
बहु मनीं संतोषत ॥ पंडुसुत जिंकीन मी ॥ १८२ ॥
असो ऐसा करितां वनवास ॥ द्वादश वर्षें भरलीं पांडवांस ॥
द्रौपदीसहित आश्रमास ॥ विचार करिती जाउनी ॥ १८३ ॥
इकडे स्वप्नीं येऊन कर्णास ॥ सांगता जाहला चंडांश ॥
कुंडलें मागेल अमरेश ॥ त्यास सर्वथा देऊं नको ॥ १८४ ॥
देतांच कर्णभूषण ॥ आयुष्य तुझें होईल क्षीण ॥
मग बोले उदार कर्ण ॥ नेदीं माझेनें न म्हणवे ॥ १८५ ॥
मग बोले गभस्ती ॥ त्याकडे एक मागें शक्ती ॥
असो कर्ण महामती ॥ अनुष्ठाना बैसला ॥ १८६ ॥
जपतां सूर्योपस्थान ॥ शक्र आला विप्रवेष धरून ॥
म्हणे महाराज तूं उदार कर्ण ॥ देई कुंडलें श्रवणींचीं ॥ १८७ ॥
कर्ण म्हणे तूं शचीरमण ॥ पूर्वी गेलास कवच घेऊन ॥
आतां देतों कर्णभूषण ॥ परी तूं प्रसन्न मज होई ॥ १८८ ॥
अवश्य म्हणे विबुधपती ॥ कर्ण मज देई महाशक्ती ॥
कुंडलें काढून निश्चितीं ॥ निर्जरेश्वर्र पूजिला ॥ १८९ ॥
महाप्रलयींची मुख्य चपला ॥ तैशी शक्रें शक्ति दिधली ते वेळां ॥
न्यासमंत्र प्रेरणकला ॥ कृपेनें सर्व सांगत ॥ १९० ॥
म्हणे हे निर्वाणसांगातिणी ॥ महाशत्रुवरी प्रेरीं समरांगणीं ॥
ऐसें सांगोन ते क्षणीं ॥ शचीरमण गुप्त जाहला ॥ १९१ ॥
कवचकुंडलें देऊन ॥ तोषविला पाकशासन ॥
कर्णाचे उदारत्व देखून ॥ सुर सुमनें वर्षती ॥ १९२ ॥
हें जाणोन वर्तमान ॥ हर्षें निर्भर पंडुनंदन ॥
कौरव परम दीनवदन ॥ म्हणती कर्णें काय केलें ॥ १९३ ॥
इकडे पांडवाश्रमासी ॥ धांवत आला एक ऋषी ॥
म्हणे अरणीपात्रें ठेविलीं वृक्षीं ॥ तों मृग एक पातला ॥ १९४ ॥
अरणीपात्रें श्रृंगी गोंवून ॥ घेऊन गेला जैसा पवन ॥
ऐकतां पांच पंडुनंदन ॥ चाप घेऊन धांवले ॥ १९५ ॥
आटोपिती जंव मृग ॥ तंव तों जातसे सवेग ॥
बहुत करितां लाग ॥ नाकळे समीप देखतां ॥ १९६ ॥
सवेंच मृग जाहला गुप्त ॥ वटवृक्षाखालीं पांडव बैसत ॥
होऊनियां चिंताक्रांत ॥ म्हणती काय करावें ॥ १९७ ॥
नकुलास म्हणे युधिष्ठिर ॥ न्यग्रोधावरी चढे सत्वर ॥
तृषाक्रांत जाहलों नीर ॥ पाहें चहूंकडे विलोकूनी ॥ १९८ ॥
कोणें पंथें गेला मृग ॥ हेंही पाहें सवेग ॥
मग तों माद्रीहदयारविंदभृंग ॥ वरी चढोन सांगत ॥ १९९ ॥
म्हणे या दिशेस उद्यान ॥ सरोवरीं उदक गहन ॥
तेथेंच गुप्त असे हरिण ॥ तों शोधून आणावा ॥ २०० ॥
खालीं उतरून तत्काल ॥ त्वरेनें जाय वीर नकुल ॥
पात्र नसे भरावया जल ॥ तूणीर घेऊन धांवला ॥ २०१ ॥
तेथें बैसला होता एक पुरुष ॥ तों गुप्तरूपें म्हणे नकुलास ॥
माझे प्रश्न सांगसी निर्दोष ॥ तरीच सलिल पिशी हें ॥ २०२ ॥
न सांगतां प्राशिल्या जीवन ॥ तत्काल पावशी तूं मरण ॥
नकुल म्हणे माझे प्राण ॥ उदकाविण जाताती ॥ २०३ ॥
धर्मराज तृषाक्रांत ॥ उदकालागीं वाट पाहत ॥
तुझे प्रश्न सांगावया येथ ॥ मी रिकामा नसें कीं ॥ २०४ ॥
जीवन प्राशितां माद्रीसुत ॥ तत्काल पडला प्रेतवत ॥
उशीर लागला म्हणोनि त्वरित ॥ सहदेव तेथें पातला ॥ २०५ ॥
नकुलाऐसेंच होऊन ॥ तोही पावला तैं मरण ॥
मग गेला अर्जुन ॥ त्याचीही जाहली तेच गति ॥ २०६ ॥
मग पातला भीमसेन ॥ त्यासही तेणें पुशिले प्रश्न ॥
बळें सेवितां जीवन ॥ तोही जाहला प्रेतवत ॥ २०७ ॥
मग धर्मराज आला तेथ ॥ तों चौघे बंधू झाले मृत ॥
यक्ष धर्मास म्हणत ॥ सांग त्वरित प्रश्न माझे ॥ २०८ ॥
सांगसी जरी माझे प्रश्न ॥ तरी बंधू उठतील चौघे जण ॥
अरणीपात्रें गेलों घेऊन ॥ तों मीच जाण मृगवेषें ॥ २०९ ॥
धर्म म्हणे महापुरुषा ॥ बोल तुझा प्रश्न कैसा ॥
येरू म्हणे सूर्य आकाशा ॥ चढे कैसा सांग पां ॥ २१० ॥
कैसा पावतो अस्त ॥ कोठें राहतो आदित्य ॥
यावरी प्रत्युत्तर देत ॥ धर्मपुत्र धर्मात्मा ॥ २११ ॥
म्हणे ब्राह्मण देती अर्ध्यदान ॥ सोडिती ब्रह्मास्त्र मंत्रून ॥
त्या पुण्यें दैत्य वधून ॥ रवि चढे ऊर्ध्वपंथें ॥ २१२ ॥
धर्मकर्म करितां बहुत ॥ सूर्य सुखें पावे अस्त ॥
सत्यामाजी तों राहत ॥ न माने असत्य आदित्या ॥ २१३ ॥
श्रोत्रिय तों सांग कवण ॥ धर्म देत प्रतिवचन ॥
वेदाध्ययन अग्निसेवन ॥ सुशील परम श्रोत्रिय तों ॥ २१४ ॥
बुद्धिमंत सांग कोण ॥ जो करील विप्रसेवन ॥
देवत्व ब्राह्मणास जाण ॥ कोण्या अर्थें सांग पां ॥ २१५ ॥
तप आणि सत्य ॥ ब्राह्मणास येणें देवत्व ॥
संत ते कोण त्वरित ॥ मज सांगें सर्वज्ञा ॥ २१६ ॥
तत्त्व जाणते निश्चित ॥ ते जाण ज्ञाते महंत ॥
पाप तें कोण अद्‌भुत ॥ परपीडा परनिंदा ॥ २१७ ॥
पुण्य तें काय साचार ॥ तरी करावा परोपकार ॥
सांग कोणता अनाचार ॥ सत्कर्मत्याग जाणिजे ॥ २१८ ॥
कोण पावतो सांग मोद ॥ अनृणी अप्रवासी पावे आनंद ॥
आश्चर्य कोण सांग विशद ॥ मजलागीं धर्मात्म्या ॥ २१९ ॥
एक मृत्यु पावतां देख ॥ उरले ते मानिती सुख ॥
आश्चर्य हें निःशंक ॥ मज वाटतें जाण पां ॥ २२० ॥
आतां सांगें पंथ कोण ॥ ज्या वाटेनें जाती संतजन ॥
वार्ता काय ती संपूर्ण ॥ सांग मजला युधिष्ठिरा ॥ २२१ ॥
सकल भूतांसी काळ पचवित ॥ हेचि वार्ता मुख्य येथ ॥
गुरू कोण सांग निश्चित ॥ सर्वज्ञ दयाळ उदार जो ॥ २२२ ॥
शिष्य कोण सांग साचार ॥ भाविक प्रज्ञावंत उदार ॥
विष तें कोण सांग सत्वर ॥ गुरूची अवज्ञा करणें जी ॥ २२३ ॥
काय करावें सत्वर ॥ छेदावा संसारार्णव दुस्तर ॥
मोक्षतरूचें बीज काय साचार ॥ शुद्धज्ञान क्रियेसह ॥ २२४ ॥
कोण शुचिष्यंत बोल विशद ॥ अंतर्बाह्य मानसीं शुद्ध ॥
पंडित कोण निर्द्वंद्व ॥ सद्विवेक ज्यापाशीं ॥ २२५ ॥
कोण जन्मला निश्चित ॥ परोपकारीं जो सदा रत ॥
तस्कर कोण बोल त्वरित ॥ पंच विषय निर्धारे ॥ २२६ ॥
मद्याहूनि काय मोहक ॥ धर्म म्हणे स्नेह देख ॥
अंध कोण निःशेष ॥ विषयास्था सुटेना ज्या ॥ २२७ ॥
शूर कोण सांग येथ ॥ स्वीलोचनबाणे नव्हे व्यथित ॥
गहन काय बोल सत्य ॥ स्त्रीचरित्र जाण पां ॥ २२८ ॥
दरिद्री तों सांग केवळ ॥ ज्याची न जाय हळहळ ॥
लघुत्वाचे काय मूळ ॥ पराशा ज्यासी सुटेना ॥ २२९ ॥
निद्रित कोण सांग दृढ ॥ मतिमंद अत्यंत मूढ ॥
नरक तों कोण गूढ ॥ कुटुंबकाबाड न सुटे जया ॥ २३० ॥
सुख तें कोण सांग ॥ तरी सर्वसंगपरित्याग ॥
बधिर कोण नाहीं ज्या विराग ॥ हित नायके जो शिकवितां ॥ २३१ ॥
नलिनीपत्रावरीँ उदक ॥ तैसें सांग काय क्षणिक ॥
आयुष्य धन यौवन देख ॥ नसे भरंवसा सर्वथा ॥ २३२ ॥
कोणा वश सर्व प्राणी ॥ जो नम्र सत्यभाषणी ॥
भूषण काय ल्यावें कर्णीं ॥ हरिकथाश्रवणनिरूपण ॥ २३३ ॥
करावा कोठें सांग वास ॥ संतनिकट कीं काशीस ॥
चार गोष्टी असती सुरस ॥ कोणत्या सांग शेवटीं ॥ २३४ ॥
मधुर बोलून करिजे दान ॥ गर्वरहित निःसीम ज्ञान ॥
क्षमायुक्त शूरत्व पूर्ण ॥ भाग्य आणि उदारत्व ॥ २३५ ॥
या चार गोष्टी दुर्लभ तत्त्वतां ॥ यक्ष म्हणे पंडुसुता ॥
कोणता बंधू तत्त्वतां ॥ उठवू सांग प्रथम मी ॥ २३६ ॥
धर्म म्हणे तूं दयाळ ॥ आधीं उठवीं माझा नकुल ॥
यक्ष म्हणे तूं पुण्यशील ॥ सत्य होशी धर्मात्मा ॥ २३७ ॥
मग एकदांच चौघे जण ॥ बंधू बैसविले उठवून ॥
मग धर्म बोले कर जोडून ॥ तूं कोण दर्शन मज देई ॥ २३८ ॥
मग म्हणे मी तुझा पिता ॥ यमधर्म आहें तत्त्वतां ॥
तुझें सत्त्व पहावया आतां ॥ मृगवेषें मी आलों ॥ २३९ ॥
मग यम देत दर्शन ॥ पांचही जण वंदिती चरण ॥
अरणीपात्रें आणून ॥ प्रीतीकरोनि दिधलीं ॥ २४० ॥
तुम्ही करितां अज्ञातवास ॥ कोणी नोळखतील तुम्हांस ॥
क्रमावें विराटनगरीं वर्ष ॥ पुढें राज्यास पावाल ॥ २४१ ॥
ऐसें सांगोन सूर्यनंदन ॥ तत्काळ पावला अंतर्धान ॥
पांडव आश्रमासी येउन ॥ देती द्विजा अरणीपात्रें ॥ २४२ ॥
याउपरी पंडुसुत ॥ ऋषींप्रति आज्ञा पुसत ॥
अज्ञातवास त्वरित ॥ यावरी प्राप्त जाहला ॥ २४३ ॥
येथून एक वर्षपर्यंत ॥ व्हावें लागेल आम्हां गुप्त ॥
कंठ धर्माचा दाटत ॥ वियोग न साहवे विप्रांचा ॥ २४४ ॥
ऋषी सप्रेम होऊन ॥ धर्मास देती आशीर्वचन ॥
लौकरी प्राप्त हो राज्यासन ॥ शत्रु समस्त निवटोनियां ॥ २४५ ॥
समस्तांची आज्ञा घेऊन ॥ ते भूमिका सांडून ॥
एक कोश पुढें जाऊन ॥ पांडव जाण उतरले ॥ २४६ ॥
तेथें बैसोनि विचार ॥ करितील आतां पंडुकुमार ॥
तें ब्रह्मानंदे श्रीरुक्मिणीवर ॥ श्रीधरमुखें वदवील ॥ २४७ ॥
अरण्यपर्व संपलें येथ ॥ पुढें विराटपर्व गोड बहुत ॥
तें श्रवण करितां समस्त ॥ पापतापदहन होय ॥ २४८ ॥
ज्यांचा ऐकतो वनवास ॥ आपणा सुख होय विशेष ॥
संकट निरसे निःशेष ॥ त्यांची करुणा ऐकतां ॥ २४९ ॥
या पर्वाचे अध्याय संस्कृत ॥ संख्या बोलिला सत्यवतीसुत ॥
दोनशे अध्याय सुरस बहुत ॥ एकोणसत्तर वरी बरवे ॥ २५० ॥
एकादश सहस्त्र चौसष्टी ॥ इतके श्लोकांची मूळगांठीं ॥
सारांश कथा गोष्टी ॥ पांडुरंगे वदविली ॥ २५१ ॥
नव अध्यायांत संपूर्ण ॥ वनपर्व जाहले निरूपण ॥
तेविसाव्या अध्यायापासून ॥ एकतीसपर्यंत जाणिजे ॥ २५२ ॥
येथून चार अध्याय अपूर्व ॥ पुढें परिसा विराटपर्व ॥
महासंकट हरेल सर्व ॥ श्रवण पठन करितांचि ॥ २५३ ॥
ब्रह्मानंदा रुक्मिणीवरा ॥ श्रीधरहृदयकल्हारभ्रमरा ॥
तव वरदें जगदुद्धारा ॥ ग्रंथ पुढें चालो कां ॥ २५४ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ अरण्यपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकतिसाव्यांत कथियेला ॥ २५५ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि एकत्रिंशत्तमोऽध्याय ॥ ३१ ॥
अध्याय एकतिसावा समाप्त


GO TOP