श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय एकोणतिसावा
इंद्रलोकाहून अर्जुनाचे आगमन
श्रीगणेशाय नम:
वनपर्व विशाल गहन ॥ बोलिला सत्यवतीहृदयरत्न ॥
ज्याचिये मतीशीं मेदिनीवसन ॥ उपमा देतां तुळेना ॥ १ ॥
हरीचे गुण हें चिदाकाश ॥ त्याचा अंत पहावया विशेष ॥
मराळ होऊन वेदव्यास ॥ भेदीत गेला निजबळें ॥ २ ॥
तोही श्रमला बहुत ॥ नेणेच गुणगगनाचा अंत ॥
तरी मानवशलभां प्रांत ॥ कैसा पावेल सांग पां ॥ ३ ॥
वरुणालयाचें जल अमूप ॥ टिटवा करूं शके केविं माप ॥
उर्वीवजन होय सुखरूप ॥ ऐसें करपाळें नसेचि ॥ ४ ॥
उचलावया गगनस्वयंभ ॥ ऐसा कोठून योजावा स्तंभ ॥
केवढें आहे सूर्यबिंब ॥ तो मशक केविं पाहोन ये ॥ ५ ॥
श्रीमद्भीमातटविहारा ॥ ब्रह्मानंदा रुक्मिणीवरा ॥
या भारताचिया परपारा ॥ माझेनें कदा न जाववे ॥ ६ ॥
मी तुझें नाम जपेन अद्भुत ॥ माझेनें न वर्णवे भारत ॥
किती लिहूं न लागे अंत ॥ म्हणोनि ग्रंथ राहविला ॥ ७ ॥
सोडूनि दिधलें लेखन ॥ पांडुरंगनगरीं स्वेच्छेन ॥
तेथें केलें सुखें शयन ॥ तो नवल पूर्ण जाहलें ॥ ८ ॥
स्वयें येऊनि पंढरीनाथ ॥ जवळी बैसोनि थापटित ॥
श्रीधरा सखया ऊठ त्वरित ॥ लिहीं भारत पुढें तूं ॥ ९ ॥
आपुले हातें लेखनी करून ॥ मषीपात्र पुढें आणून ॥
पुस्तक ठेविलें सोडून ॥ करीं धरून उठवी ॥ १० ॥
वदन कुरवाळून हातें ॥ हनुवटी धरिली पंढरीनाथें ॥
हातीं देऊनि लेखनीतें ॥ म्हणे पुरतें करीं भारत हें ॥ ११ ॥
म्हणे तूं जे जे बोलसी बोल ॥ तेथें रस मी पुरवीन सबल ॥
हा ग्रंथ हृदयीं धरितील सकळ ॥ भक्त संत पंडित जे ॥ १२ ॥
तो दक्षिणद्वारकानगरविहार्री ॥ सच्चिदानंदतनु सूत्रधारी ॥
ऐसें लाघव दावून झडकरी ॥ विटेवरी उभा ठेला ॥ १३ ॥
मी सावध होऊनि पाहें ॥ तो लेखनी नीट करून स्वयें ॥
मषीपात्र ग्रंथ ठेविला आहे ॥ सोडोनि श्रीविठ्ठलें ॥ १४ ॥
पाठिराखा रुक्मिणीवरा ॥ ब्रह्मानंदें जाणोनि श्रीधर ॥
करूनियां जयजयकार ॥ पुढें ग्रंथ चालविला ॥ १५ ॥
अष्टाविंशयि अध्याय सुरस ॥ तेथें बहु सांगितला इतिहास ॥
वैशंपायन जनमेजयास ॥ निरोपीत अत्यादरें ॥ १६ ॥
काननपर्व हें विशेष ॥ गोड गहन परम सुरस ॥
जेथें स्वामी वेदव्यास ॥ तीर्थें अपार बोलिला ॥ १७ ॥
कोणे तीर्थीं कैसें माहात्म्य ॥ तेथींचा महिमा अत्युत्तम ॥
त्या कथा सांगतां परम ॥ ग्रंथ वाढेल अपार ॥ १८ ॥
शुक्तिका सांडूनि घेईचे मुक्त ॥ तैशी तीर्थनामें सांगतों यथार्थ ॥
श्रीधर कर जोडूनि विनवित ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥ १९ ॥
तीर्थमाला करितां श्रवण ॥ होय महापापक्षालन ॥
नित्य करितां पठन श्रवण ॥ अपार महिमा नेणवे ॥ २० ॥
काशीविश्वेश्वर निर्मळ ॥ त्र्यंबक उज्जनी महाकाळ ॥
ओंकारममलेश्वर जाश्वनीळा ॥ बदरिकेदार घृष्णेश्वर पैं ॥ २१ ॥
नागनाथ वैजनाथ थोर ॥ मल्लिकार्जुन भीमाशंकर ॥
सोमनाथ आणि रामेश्वर ॥ ज्योतिर्लिंगें द्वादश ही ॥ २२ ॥
अयोध्या मथुरा हरिद्वार ॥ काशी कांची अवंतीनगर ॥
द्वारावती गोमतीतीर ॥ सप्तपुर्या अनुक्रमें ॥ २३ ॥
तीर्थराज मुख्य त्रिवेणी ॥ पंचप्रयाग पुण्यखाणी ॥
ब्रह्मप्रयाग कर्णप्रयाग अघहरणी ॥ गुप्तप्रयाग समर्थ तो ॥ २४ ॥
देवप्रयाग शिवप्रयाग पापहरणा ॥ नैमिषारण्य धर्मारण्य ॥
पंचकारण्य ब्रह्मारण्य वेदारण्य ॥ बदरिकाश्रम पावन तो ॥ २५ ॥
यमुना सरस्वती भागीरथी ॥ गौतमी गोमती कृष्णा भीमरथी ॥
तापी नर्मदा भोगावती ॥ प्रवरा पुण्यवती मंदाकिनी ॥ २६ ॥
आनंदवर्धिनी पयोष्णी ॥ पिनाकी तुंगा कल्पषनाशिनी ॥
कृतमाला कावेरी पयस्विनी ॥ सुवर्णमुखरी शिशुमालिनी ॥ २७ ॥
कपिला ताम्रपर्णी शरावती ॥ तुंगभद्रा आणि सोमवती ॥
सावित्री रेवा ककुद्मती ॥ वेगवती मलापहारिणीं ॥ २८ ॥
घटप्रभा हरिदिनी मालिनी ॥ गंडकी शरयू वैतरणी ॥
सोमनंदा शिवनंदा तापहारिणी ॥ शोणभद्र नदेश्वर पैं ॥ २९ ॥
वरुणा अरुणा प्राची पुरंदरी ॥ वेत्रवती ससतुरंगा कर्णकुमारी ॥
स्वामिकार्तिकी पंचघृता पृथ्वीवरी ॥ विख्यात प्रवाह जयांचे ॥ ३० ॥
जटाकलिका श्रमहारिणी ॥ महेंद्रकाली त्रिशूली मंत्रवर्धिनी ॥
नीरा सुरनदी शंखोद्धारिणी ॥ जयंती आणि अहिर्णवी ॥ ३१ ॥
नाटका आणि अलकनंदा ॥ फल्गु सर्वांतका त्रिपदा ॥
शांता बाणनदी सुखदा ॥ मणिकर्णिका नद्या सर्व ॥ ३२ ॥
शेषाद्रि आणि ब्रह्माद्रि ॥ मूळपीठ पर्वत सह्याद्रि ॥
विंध्याद्रि आणि हिमाद्रि ॥ मानससरोवरीं स्नानदान ॥ ३३ ॥
अरुणाचल आनंदवर्धन ॥ कमलालय चिदंबर पूर्ण ॥
अगस्त्याश्रम पावन ॥ श्रीरंगपट्टण शोभिवंत ॥ ३४ ॥
जनार्दन कन्याकुमारी ॥ शिवकांची विष्णुकांची सुंदरी ॥
मत्स्यतीर्थ पक्षितीर्थ उर्वीवरी ॥ शंखोद्धार वेदोद्धार पैं ॥ ३५ ॥
हिरण्यनदी संध्यावट ॥ ब्रह्मावर्त धर्मस्तंभ सुभटा ॥
ब्रह्मयोनि पृथोदक वरिष्ठ ॥ कुरुक्षेत्र बिंदुतीर्थ पै ॥ ३६ ॥
धर्मालय कलापग्राम ॥ गंगासागर सिंधुसंगम ॥
कौडिण्यपुर अंबिका परम ॥ प्रेमपुर मार्तंड ॥ ३७ ॥
बाळा कल्होळ कल्हेश्वरी ॥ विराटस्वरूपिणी रक्तांबरी ॥
भ्रमरांबा ज्वालामुखी सुंदरी ॥ पीतांबरी महाशक्ति ॥ ३८ ॥
जोगळादेवी भैरवी ॥ करवीरवासिनी शांभवी ॥
सप्तश्रृंगी महादेवी रौद्रवी ॥ हिंगुळजा आणि कमळजा ॥ ३९ ॥
नागदेव आणि मोरेश्वर ॥ गुप्तकेदार वटेश्वर ॥
चक्रपाणी कुंदभुलेश्वरा ॥ त्रिकूटाचल सुंदर पैं ॥ ४० ॥
हरिहरेश्वर नरसिंहपुरा ॥ अक्षय्यवट त्रिकूटाचल पवित्र ॥
मूळमाधव विज्ञानेश्वरा ॥ जुनाट नागेंद्र गौतमेश्वरा ॥ ४१ ॥
सप्तयोजन कोटेश्वर ॥ दक्षिणप्रयाग माधवेश्वरा ॥
सिद्धवट धूतपाप सिद्धेश्वर ॥ पूर्वसागर तीर्थराज ॥ ४२ ॥
वैराट पुष्कराज महाबळेश्वर ॥ धूळखेटकशंकर नारायण थोर ॥
मल्लहर सर्वेश्वर पांचालेश्वरा ॥ सत्यनाथ पर्णालया ॥ ४३ ॥
सिंधुपुर महामुरडेश्वर ॥ आदित्रिमल्ल त्रिसप्तकोटेश्वर ॥
करपात्र ब्रह्मकपालेश्वर ॥ भीमचंडी पुण्यालया ॥ ४४ ॥
शिवक्रांती विष्णुक्रांती ॥ गोरक्षमठ आश्रम काळहस्ती ॥
वेदपुर गया अरुणावती ॥ उडपी शेषशाई सर्वेश ॥ ४५ ॥
त्रिपत्ति अहोबळ स्वामितीर्थ ॥ सुब्रह्मण्य किष्किंधा मातंगपर्वत ॥
हंपीविरूपाक्ष मूर्तिमंत ॥ पंपासरोवर निर्मळ तें ॥ ४६ ॥
चित्रकूट रुक्मकूट लोण्हार ॥ अंबुज अयोध्या महंकाऊर ॥
कालचंद्रिका अर्धोदय पवित्र ॥ गोकर्ण कृष्णसागर पैं ॥ ४७ ॥
हरिहरतीर्थ जंबुकेश्वर ॥ अनंतशायी विमलेश्वरा ॥
मंथरा विकर्ण प्रभाकर ॥ विश्रांतिवन तपोवन ॥ ४८ ॥
कुंभकोण वृंदारण्य मंजरथ ॥ मातुलिंग धूलिखेटक त्रिविक्रमतीर्थ ॥
मुद्गलमांधाता ओढ्याजगत्राथ ॥ पंढरीक्षेत्र चंद्रभागा ॥ ४९ ॥
त्रिकोण आणि कर्ममूळ ॥ नागर गौररंगजळ ॥
असिपुरी नेपाळ आदित्रिमळ ॥ मंथनकाळेश्वर कुशतर्पण ॥ ५० ॥
मीनाक्षी कामाक्षी मातुलिंग थोर ॥ सिता असिता चिदंबरेश्वरा ॥
ब्रह्मकटाह हरिद्वार ॥ आदित्य वैश्वानर महातीर्थ ॥ ५१ ॥
ब्रह्मानंदें म्हणे श्रीधर ॥ इतकीं तीर्थ करूनि युधिष्ठिर ॥
गंधमादनपर्वतीं पंडुकुमार ॥ द्रौपदीसहित राहिला ॥ ५२ ॥
इतुकिया तीर्थांचीं माहात्म्ये विशेष ॥ धर्मास ऋषि सांगे लोमश ॥
त्यांतील तीर्थ सुरस ॥ ब्रह्मानंदे वर्णिली ॥ ५३ ॥
अमरावतीस असतां अर्जुन ॥ सकळ विद्या आकळिल्यां पूर्ण ॥
तो समुद्रामाजी दोघे जण ॥ निवातकवच दैत्य वसती ॥ ५४ ॥
ते माजले बहुत असुर ॥ समरीं पराभविला सुरेश्वरा ॥
देवीं युद्ध केलें अपार ॥ परि ते सहसाही नाटोपती ॥ ५५ ॥
चिंताक्रांत पुरंदर ॥ देखोन बोले पंडुकुमार ॥
आता मज द्या सत्वर ॥ निवातकवच वधावया ॥ ५६ ॥
ऐसें ऐकतां पाकशासन ॥ हृदयीं धरिला प्रेमें अर्जुन ॥
सबीज मंत्र शस्त्रे देऊन ॥ धर्मानुज धाडिला ॥ ५७ ॥
इंद्रस्यंदनारूढ पंडुनंदन ॥ मातलि सारथि कुशल पूर्ण ॥
मनोगतीं रथ चालवून ॥ मेदिनीवसनतीरा आले ॥ ५८ ॥
लंकेऐसें त्यांचें नगर ॥ बळें पराक्रमें अति थोर ॥
त्रिभुवनपीडक असुर ॥ शचीवर धाक वाहे ॥ ५९ ॥
देवदत्त कुंतीकुमार ॥ वाजवितां दणाणिलें नगर ॥
भयें गडबडला सागर ॥ निवातकवच हडबडिले ॥ ६० ॥
निवातकवच घेऊन वाहिनी ॥ बाहेर आले तये क्षणीं ॥
तो अर्जुने व्यापिलें बाणीं ॥ गगनीं वासरमणि दिसेना ॥ ६१ ॥
जैसे रावण कुंभकर्ण ॥ रामें मारिले पराक्रमेंकरून ॥
तैसा सप्तदिवस अर्जुन ॥ युद्ध निर्वाण करिता जाहला ॥ ६२ ॥
वृक्ष शिळा पर्वत ॥ पार्थावरी टाकिती अपरिमित ॥
परि सुघड धनुर्धर सुभद्राकांत ॥ आपणावर पडों नेदी ॥ ६३ ॥
नाना प्रकारचीं अस्त्रे ॥ संख्येरहित वर्षती शस्त्रे ॥
विमानीं बैसोनि दशशतनेत्रे ॥ पाहिलें युद्ध तयांचें ॥ ६४ ॥
युद्ध करितां अद्भुत ॥ निवातकवच होती गुप्त ॥
नाना मायावी रूपें धरित ॥ तरी पार्थ नाटोपे ॥ ६५ ॥
शेवटीं ब्रह्मास्त्र घालून ॥ पार्थ एकाच शरेंकरून ॥
दोघांची शिरें छेदून ॥ इंद्रापाशीं पाठविलीं ॥ ६६ ॥
जाहला एकचि जयजयकार ॥ आनंदाश्रु टाकी सहस्रनेत्र ॥
निजहस्तें पुष्यसंभार ॥ पार्थमस्तकी ओपित ॥ ६७ ॥
वाजती दुंदुभी एके घाई ॥ नाद न माय भुवनत्रयीं ॥
पार्थ शत्रुनगरीं ते समयीं ॥ ठाणें बसविलें देवांचें ॥ ६८ ॥
विजयी होऊन अर्जुन ॥ येत अमरावतीस परतोन ॥
देवभारांशीं सहस्रनयन ॥ सामोरा येऊन आलिंगी ॥ ६९ ॥
दिव्य वस्त्रादि भूषणीं ॥ आत्मज गौरविला ते क्षणीं ॥
यावरी शक्राची आज्ञा घेऊनी ॥ पार्थ खालीं उतरला ॥ ७० ॥
बैसोनियां दिव्यरथीं ॥ पुढें धुरे मातलि सारथी ॥
गंथमादनपर्वतीं ॥ अकस्मात उतरला ॥ ७१ ॥
मूर्तिमंत सूर्यचि उतरला ॥ तैसा विजय धर्में देखिला ॥
चौघे बंधु ते वेळां ॥ पुढें धांवती भेटावया ॥ ७२ ॥
पांच संवत्सरर्पंत ॥ अंतरला होता वीर पार्थ ॥
धर्में देखतां अकस्मात ॥ आनंदाश्रू लोटले ॥ ७३ ॥
कनकदंड पडे धरणीवरी ॥ तैसा पार्थ धर्मास नमस्कारी ॥
दोन्ही भुजा पसरोनि झडकरी ॥ युधिष्ठिर आलिंगी ॥ ७४ ॥
रामें हृदयीं धरिला भरत ॥ कां संजीवनी साधिल्या यथार्थ ॥
कचास आलिंगी अमरनाथ ॥ तेविं पार्थ युधिष्ठिरें ॥ ७५ ॥
रेवतीरमण रुक्मिणीजीवनप ॥ धरिजे हृदयीं प्रीतीकरून ॥
तैसा वृकोदरें अर्जुन ॥ हृदयीं दृढ आलिंगिला ॥ ७६ ॥
षडास्य आणि गजास्य ॥ हृदयीं धरी व्योमकेश ॥
तैसा नकुलसहदेवांस ॥ सुभद्राकांत भेटला ॥ ७७ ॥
धौम्यचरणांवरी माथा ॥ ठेवी तेव्हां अभिमन्युपिता ॥
लोमशादिऋषिसमस्तां ॥ अनुक्रमें वंदिलें ॥ ७८ ॥
सुहास्यवदनी पद्मलोचनी ॥ जे कृष्णा श्रीरंगभगिनी ॥
ते अर्जुनाचे चरणीं ॥ मस्तक ठेवी आदरें ॥ ७९ ॥
रथासहित मातलि पूजिला ॥ शक्रापाशीं पाठविला ॥
मग स्वर्गींच्या कथा सकला ॥ पार्थ सांगे सविस्तर ॥ ८० ॥
उत्तम वस्त्रें अलंकार ॥ अमूल्य वस्तुंचे संभार ॥
इंद्रे दिधले सकल उपचार ॥ ते धर्मापुढें समर्पी ॥ ८१ ॥
तो सकल देवांसहित ॥ विमानीं बैसोनि अमरनाथ ॥
गंधमादन पर्वत ॥ लक्षूनि खालीं उतरला ॥ ८२ ॥
सामोरे धांवून पांडव ॥ सप्रेम वंदिला वासव ॥
पांचांस भेदून गौरव ॥ इंद्रे बहुत दिधला पैं ॥ ८३ ॥
पांडवी तेव्हां सप्रेम रीतीं ॥ आदरें पूजिला अमरपतीं ॥
कर जोडून पुढें तिष्ठती ॥ तंव बोले पाकशासन ॥ ८४ ॥
अल्पकालेंकरून ॥ शत्रु जातील संहारून ॥
द्विरदपुरीचें छत्र सिंहासन ॥ प्राप्त होईल तुम्हांसी ॥ ८५ ॥
ऐसें सांगोन सहस्रनेत्रं ॥ स्वपदास गेला सत्वर ॥
इकडे पांचालीसह पंडुकुमारा ॥ द्वैतवनाप्रतिं जाती ॥ ८६ ॥
मार्गी जातां पंडुनंदन ॥ वृषपर्व्याचें देखिलें वन ॥
तेथें प्रवेशला भीमसेन ॥ करी गर्जन अट्टहास्यें ॥ ८७ ॥
भीमाची गर्जना ऐकोन ॥ भयें वनचरांचे गेले प्राण ॥
तो महाअजगरें धावोन ॥ भीमसेन धरियेला ॥ ८८ ॥
नवनागसहस्रबळी पूर्ण ॥ तो अजगरें केला क्षीण ॥
सर्वांगास वेढे घालून ॥ वृकोदर आकळिला ॥ ८९ ॥
कां न येच अजूनि भीम ॥ मग पाहों पातला धर्म ॥
तो अजगरे वेष्टिला परम ॥ बलक्षीण जाहला ॥ ९० ॥
धर्म म्हणे हे अजगरा ॥ तुज देतों बहुत आहारा ॥
सोडीं माझिया वृकोदरा ॥ यावरी अजगर काय बोले ॥ ९१ ॥
या भीमास मी भक्षीन ॥ तुजलाही सवेंचि गिळीन ॥
धर्म म्हणे तूं कोण ॥ पूर्व स्मरोन सांग पां ॥ ९२ ॥
अहि म्हणे मी राव नहुष ॥ पुण्यक्रिया केली विशेष ॥
याग केले निर्दोष ॥ मिति दानां नसेचि ॥ ९३ ॥
धरोनियां सहस्त्र ब्राह्मण ॥ त्यांचे स्कंधीं शिबिका देऊन ॥
मी तीमाजी बैसोन ॥ अमरावतीये चालिलों ॥ ९४ ॥
अन्याय देखोनि अमूप ॥ कुंभोद्भवें दिला शाप ॥
या सर्पयोनीं पापरूप ॥ बहुकाळ राहिलों ॥ ९५ ॥
तरी मी पुसतों जे प्रश्न ॥ ते सांगें आधीं मजलागून ॥
मग सोडीन भीमसेन ॥ सत्य जाण धर्मराया ॥ ९६ ॥
शूद्र वैश्य क्षत्रिय ब्राह्मण ॥ सांग यांचें काय लक्षण ॥
अजातशत्रु धर्म पूर्ण ॥ विप्रमहिमा वर्णित ॥ ९७ ॥
शम दम शौच तप जाण ॥ संतोष क्षमा आर्जव पूर्ण ॥
भगवद्भक्ति दया सत्य संपूर्ण ॥ दश लक्षणें ब्राह्मणांचीं ॥ ९८ ॥
तेज बळ धृति शौर्य ॥ तितिक्षा प्रजापालन औदार्य ॥
स्थिरबुद्धि ब्राह्मणभक्ति ऐश्वर्य ॥ दश लक्षणें क्षत्रियांची ॥ ९९ ॥
आस्तिक्यबुद्धि विप्रसेवन ॥ ब्रह्मनिष्ठा अदंभभजन ॥
निर्मत्सर हे पांच गुण ॥ वैश्याचे अंगीं जाण पां ॥ १०० ॥
गायीद्विजांचें पालन ॥ भगवद्भक्ति भूमिसेवन ॥
पांचवें लक्षण दान ॥ शूद्रचिन्हें जाण ही ॥ १०१ ॥
जैसा मुकुटावर हिरा पूर्ण ॥ तैसा श्रेष्ठ ब्राह्मण जाण ॥
ज्याचें पद रुक्मिणीरमण ॥ हृदयीं मिरवी तत्त्वतां ॥ १०२ ॥
दशावतारांची घरटी ॥ गोब्राह्मणपालनासाठीं ॥
स्वयें घेत जगजेठी ॥ धन्य सृष्टीं ब्राह्मण ॥ १०३ ॥
तीने सप्तकें मही ॥ निर्वीर केली सर्वही ॥
विप्रांस दिधली पाहीं ॥ भार्गवरामे जाण पां ॥ १०४ ॥
ब्राह्मण रंकाचा करिती इंद्र ॥ ब्राम्हणें प्राशिला समुद्र ॥
कोपोनि क्षयरोगी केला चंद्र ॥ सहस्त्रभगें शचीवरा ॥ १०५ ॥
ब्राह्मणशाप दारुण ॥ जाहले शिवाचें लिंगपतन ॥
सागरीं स्वर्गसंपत्ति संपूर्ण ॥ ब्राह्मणशापें पडियेली ॥ १०६ ॥
म्हणून सर्वभावेकरून ॥ प्रसन्न करावे ब्राह्मण ॥
ऐसें अजगरें ऐकोन ॥ भीमसेन सोडिला ॥ १०७ ॥
दिव्यदेह पावोनि विशेष ॥ विमानीं बैसोनि गेला नहुष ॥
मग द्वेतवनाप्रति निःशेष ॥ पांडव आले पूर्वस्थळीं ॥ १०८ ॥
जो ब्रह्मांडनायक परमात्मा ॥ संगे घेऊन सत्यभागा ॥
जाणोन पांडवांच्या प्रेमा ॥ भेटला तेव्हां येऊन ॥ १०९ ॥
पंडुकुमार पांचही जण ॥ दृढ धरिती कृष्णचरण ॥
ब्रह्मानंदे उचंबळून ॥ द्रौपदी वंदी जगदीश्वरा ॥ ११० ॥
धर्मराज म्हणे यादवेंद्रा ॥ सुखी कीं अभिमन्यु सुभद्रा ॥
आनकदुंदुभि देवकी गुणसमुद्रा ॥ बलभद्र सुखी असे कीं ॥ १११ ॥
मग म्हणे मीनध्वजतात ॥ सुखरूप आहेत समस्त ॥
परी तुमचा समस्तांस हेत ॥ निशिदिवस लागला ॥ ११२ ॥
धर्म म्हणे अरविंद नेत्रा ॥ अभिनवजलधरकोमलगात्रा ॥
तारकारिजनकप्राणमित्रा ॥ जगदीशा जनार्दना ॥ ११३ ॥
ऐशियावरी जगज्जीवन ॥ द्वारके गेला आज्ञा घेऊन ॥
त्यावरी मार्कंडेय येऊन ॥ पांडवांस भेटला ॥ ११४ ॥
पांडवीं तयास नमूनी ॥ परमादरें पूजिला मुनी ॥
मार्कंडेय म्हणे धर्मा येथूनी ॥ कलियुग जवळी असे पै ॥ ११५ ॥
तुम्हांसारखे धर्मपरायण ॥ कलियुगीं न होती सज्जन ॥
धृतराष्ट्राऐसे दुर्जन ॥ बहुसाल जन्मतील ॥ ११६ ॥
कलि प्रवर्तेल दारुण ॥ एकरूपी होतील चार्ही वर्ण ॥
कोणी कोणाचा विटाळ न मानून ॥ यथासुखें वर्तती ॥ ११७ ॥
विप्र वेदमंत्र त्यजून ॥ करितील शूद्रांचे आचरण ॥
स्त्रिया पुरुषास छळून ॥ जारकर्मी रत होती ॥ ११८ ॥
बुडेल वेदशास्त्रपुराण ॥ नाना कुतर्क उठतील पूर्ण ॥
टाकून शिवविष्णुपूजन ॥ कुमार्गा जन आचरती ॥ ११९ ॥
ब्राह्मणकर्म गायत्रीजप ॥ शूद्र आचरतील पापरूप ॥
स्वधर्म सांडोनि विप्र अमूप ॥ शूद्रकर्में आचरती ॥ १२० ॥
गायी म्हशी न दुभती ॥ अवि अजा लोक पाळिती ॥
मद्यमांसरत जन होती ॥ मत्स्य भक्षिती मुख्य वर्ण ॥ १२१ ॥
देव नवसा न पावती ॥ पाषाणप्रतिमा केवळ उरती ॥
तेथें कोणी न भजती ॥ यवन टाकिती फोडूनि ॥ १२२ ॥
मातापितरांची निंदा ॥ पुत्र करितील बहु आपदा ॥
शिष्य न धरिती गुरुमर्यादा ॥ आता कदा न पाळिती ॥ १२३ ॥
देवनिंदा करिती अपार ॥ तेणें येईल दरिद्र ॥
विधवांचीं धने समग्र ॥ नेतील नृप हिरोनि ॥ १२४ ॥
विप्र घेतील दुष्टदान ॥ राजे होतील कोशहीन ॥
पापद्रव्य मेळवून ॥ धर्मवाटा पाडिती ॥ १२५ ॥
क्षात्रधर्म सोडून ॥ समर सांडून घेतील रान ॥
कन्या उगाच उचलून ॥ नेती एकएकांच्या ॥ १२६ ॥
शाखाभेदक गोत्रे सकळ ॥ बुडोन होती म्लेंच्छ केवळ ॥
चार्ही वर्णांत होईल एकमेळ ॥ वाढेल केवळ कुमार्ग पैं ॥ १२७ ॥
आगम राहील एकीकडे ॥ भ्रष्ट होतील रोकडे ॥
वृद्धांच्या बुद्धी चोहींकडे ॥ बालवत् होतील पैं ॥ १२८ ॥
स्वेच्छाचारें स्त्रिया पुरुष ॥ दाता नाहींच निःशेष ॥
विप्र विकिती नानारस ॥ ध्यान स्त्रियांचें परपुरुषीं ॥ १२९ ॥
लोपेल वैराग्य भक्ति ज्ञान ॥ वाढेल कापट्य जारण मारण ॥
नाना उपाय करून ॥ द्रव्य हरिती परस्परें ॥ १३० ॥
टाकिती उद्यानें मोडून ॥ तीर्थयात्रा जाती लोपोन ॥
शूद्र विप्रांचा करितील अपमान ॥ द्रव्य हरूनि नेतील ॥ १३१ ॥
विप्र गिरिकंदरे सेविती ॥ तस्कर चहूंकडे प्रकटती ॥
शूद्र गुरुत्व भोगिती ॥ शिष्य होती विप्र त्यांचे ॥ १३२ ॥
शूद्रमुखें पुराण ॥ ऐकों लागतील ब्राह्मण ॥
होतील हिंसापरायण ॥ क्षेत्रमहिमा लोपेल ॥ १३३ ॥
बीजे सकळ जाती जळोन ॥ मंत्रीं सत्व न राहे संपूर्ण ॥
आपणा आवडे तोच जाण ॥ मान्य करितील आचार ॥ १३४ ॥
गुरुत्व जाईल बुडोन ॥ अकालीं वर्षेल घन ॥
करितील मातापितागुरूहनन ॥ विष घालोनि परस्परें ॥ १३५ ॥
सूर्य तपेल फार ॥ वायूचा उत्कर्ष अपार ॥
अनावृष्टि अतिवृष्टि क्षोभेल वैश्वानर ॥ गंगा ग्राम बुडविती ॥ १३६ ॥
पौर्णिमा कुहू सांडून ॥ आडतिथीस लागेल ग्रहण ॥
पुत्राश्रय संपादून ॥ स्त्रिया मारिती भ्रतारा ॥ १३७ ॥
कोणी कोणाचा स्नेह न धरी ॥ द्रव्यलोभी जन अहोरात्रीं ॥
प्राणांत जाहलिया निर्धारीं ॥ ठेवणें आपुलें न सांगती ॥ १३८ ॥
संत ब्राह्मण राव दाता ॥ कलियुगीं विरळा चारी वस्ता ॥
पुत्र सेवक बंधु शिष्य तत्त्वतां ॥ श्री नाहीं कलियुगीं ॥ १३९ ॥
अधर्मरत सर्व जन ॥ द्रव्यालागीं वेंचिती प्राण ॥
असत्यक्रिया करून ॥ भाषनेम मोडिती ॥ १४० ॥
परधन परदारा ॥ यालागीं अनर्थ होतील राजेंद्रा ॥
ज्याचें ऋण घ्यावें त्या सत्वरा ॥ विष घालून मारिती ॥ १४१ ॥
माता आणि पितर ॥ यांस पुत्र घालिती बाहेर ॥
बालविधवा करोनि भ्रतार ॥ करिती संसार अन्यदेशीं ॥ १४२ ॥
वेदविक्रय करितील ब्राह्मण ॥ कन्यागोरसविक्रय करतील पूर्ण ॥
वृक्ष निष्फल धेनु न दुभती जाण ॥ समयीं घन वर्षेना ॥ १४३ ॥
माता पिता आणि सुत ॥ द्रव्यसंबंधें यांत अनर्थ ॥
माता करितील पुत्रघात ॥ मागें पुढें न पाहती ॥ १४४ ॥
पुत्र मारील पित्यातें ॥ सुत मरेल पितृहस्तें ॥
भ्रताराचे प्राणातें ॥ स्त्री घेईल धनलोभें ॥ १४५ ॥
बंधूंचा घेती प्राण ॥ गुरूशिष्यांत विकल्प पूर्ण ॥
संन्यासी दिगंबर धन ॥ सांचवून ठेविती ॥ १४६ ॥
साधु राजद्वारा धांवती ॥ धनाढ्याप्रति ज्ञान बोधिती ॥
भक्ति वैराग्य ज्ञान शांती ॥ यांस न देती ठाव कोणी ॥ १४७ ॥
चोरी हिंसा अनृत दंभ भेद ॥ काम क्रोध वैर मद ॥
अविश्वास कपटवाद ॥ वर्धमान होती पैं ॥ १४८ ॥
कलियुग घोर बहुत ॥ सर्वधर्मविवर्जित ॥
पापाचे होतील पर्वत ॥ पुण्य सर्षपप्रमाण ॥ १४९ ॥
सरिता तीर्थे जाती आटून ॥ न दिसे भागीरथीचें जीवन ॥
शिश्नोदरपरायण ॥ लोक होतील सर्वही ॥ १५० ॥
करितील स्त्रियांची भक्ती ॥ हेमकिंकर सर्व होती ॥
सर्व ब्रह्म वाचे वदती ॥ समस्त टाकिती सत्कर्में ॥ १५१ ॥
परस्त्रियेप्रति मानस आसक्त ॥ वादप्रतिवादा सदा उदित ॥
नास्तिक्य पशुबुद्धि समस्त ॥ विद्या किंचित मद बहु ॥ १५२ ॥
गुरूचा करिती अपमान ॥ रात्रंदिवस पाहती न्यून ॥
म्हणती याचा नाहीं बरा गूण ॥ जाती शरण आणिका ॥ १५३ ॥
गुरु त्यागितां निश्चयेशीं ॥ पापी होती अल्पायुषी ॥
दरिद्री होऊन नरकासी ॥ जाती अंतीं नेमेंशीं ॥ १५४ ॥
शूद्राचें इच्छी मन ॥ कीं करावें शालिग्रामपूजन ॥
करिती गायत्रीपुरश्चरण ॥ अल्पायुषी नरक पुढें ॥ १५५ ॥
स्वधर्मकर्म निंदिती ॥ द्विजस्त्रियांचे पुनर्विवाह होती ॥
महापापी स्नुषा निश्चिती ॥ घालिती विष वृद्धांतें ॥ १५६ ॥
जारकर्मी स्त्रियारत ॥ लेखिती भ्रतारास भृत्यवत ॥
धर्म बुडेल समस्त ॥ शौर्यभ्रष्ट क्षत्रिय होती ॥ १५७ ॥
अग्निहोत्रें होतील विच्छिन्न ॥ गुरूभक्ति जाईल उडोन ॥
शतमूर्ख गुरुत्व धरून ॥ भ्रष्टमार्ग आचरती ॥ १५८ ॥
आठ दहा वर्षांत ॥ स्त्रिया होतील प्रसूत ॥
एका पुरुषा बहुत ॥ स्त्रिया धांवती जारिणी ॥ १५९ ॥
क्षीरावरी नवनीत ॥ मथितां न निघे किंचित ॥
वृद्धपण षोडशवर्षांत ॥ होईल प्राप्त पुरुषातें ॥ १६० ॥
पुरुषांचें भष्टेल पुरषत्व ॥ स्त्रियांस काम अद्भुत ॥
यवनाचा उत्कर्ष बहुत ॥ कलीमाजी राज्य त्यांचें ॥ १६१ ॥
होतां पांचसहस्त्र संवत्सर ॥ भौमदैवतें जातील समग्र ॥
दहासहस्त्र वर्षें हरिहर ॥ पृथ्वीवरी न वागती ॥ १६२ ॥
येथें तरतील कोण ॥ ऐकें धर्मा त्यांचें लक्षण ॥
परधन परदारा टाकून ॥ हरिस्मरणीं रत जे कां ॥ १६३ ॥
क्वचित उरतील भक्त ॥ तेच तरतील कलियुगांत ॥
ब्राह्मण्य द्रविडदेशांत ॥ उरेल किंचित् शेवटीं ॥ १६४ ॥
कावेरी आणि ताप्रपर्णी ॥ कृष्णामाला पयस्विनी ॥
या नद्यांचे उदकस्थानीं ॥ ब्राह्मण्य कांहीं उरेल ॥ १६५ ॥
चंद्र सूर्य बृहस्पती ॥ एके राशीस जैं येती ॥
तैं पुण्यक्रिया मागुती ॥ लोक आचरती पूर्ववत ॥ १६६ ॥
मार्कंडेय म्हणे धर्मा ॥ पूर्वी जैसा शिबिराज धर्मात्मा ॥
युधिष्ठिरा तेविं तुझा महिमा ॥ एकवदनें न वर्णवे ॥ १६७ ॥
धर्म म्हणे महाऋषी ॥ सांग शिबिराजाची कथा कैशी ॥
मार्कंडेय म्हणे परियेसीं ॥ सादर चित्तकरूनियां ॥ १६८ ॥
सूर्यवंशी चक्रवर्ती ॥ शिबिराज उर्वीपति ॥
पुण्यपरायण यशकीर्ति ॥ ज्याची ब्रह्मांडांत न माये ॥ १६९ ॥
तो अयोध्येचा नायक ॥ विधिपूर्वक करितां शतमख ॥
अपार ऋषि मिळाले देख ॥ नामें सांगतां न सरती ॥ १७० ॥
नव्व्याण्णव याग संपूर्ण ॥ शिबीनें केलें कृष्णार्पण ॥
शेवटींचा क्रतु जाण ॥ आरंभिला आनंदें ॥ १७१ ॥
तो नारद आला अकस्मात ॥ देखोनि परम आश्चर्य करित ॥
म्हणे धन्य शिबिराय अद्भुत ॥ महिमा याचा न वर्णवे ॥ १७२ ॥
मग इंद्रापाशीं जाऊन ॥ नारद सांगे वर्तमान ॥
म्हणे धन्य शिबिराज सजन ॥ शतमख जाण करितसे ॥ १७३ ॥
शेवटींचा याग आरंभिला ॥ ऐकतो शचीवर दचकला ॥
सांगातें द्विमूर्धा घेतला ॥ येता जाहला अयोध्ये ॥ १७४ ॥
अग्नि होऊन कपोत ॥ राजसदनांत जाय पळत ॥
श्येनपक्षी अमरनाथ ॥ होऊन धांवे त्यापाठीं ॥ १७५ ॥
लक्षानुलक्ष महाऋषी ॥ बैसले असतां यागासी ॥
तो कपोत येऊन रायापाशीं ॥ रक्षीं रक्षीं म्हणतसे ॥ १७६ ॥
कपोत भयभीत होऊन ॥ मांडीवर बैसला दीनवदन ॥
तो ससाणा धांवोन ॥ सभारंगणी बैसला ॥ १७७ ॥
कपोत म्हणे रायासी ॥ शरणागता घाली पाठीशीं ॥
नृपश्रेष्ठा पुण्यराशी ॥ सर्व जाणसी शास्त्रार्थ ॥ १७८ ॥
ससाणा बोले सत्वर ॥ राया माझा देई आहार ॥
ज्याचें त्यास द्यावया विचार ॥ कासया करिसी सांग पां ॥ १७९ ॥
माझा ग्रास घेशी जरी ठेवून ॥ तरी निष्फल सर्व तुझा यज्ञ ॥
मी प्राणत्याग करीन ॥ आतांचि एथें नृपवर्या ॥ १८० ॥
राजयाचे पोटांत ॥ भयेंकरून कपोत दडत ॥
म्हणे मी पाठीं रिघालों सत्य ॥ नुपेक्षीं तूं स्नेहाळा ॥ १८१ ॥
चारं सहा अष्टादश बोलत ॥ नुपेक्षावे शरणागत ॥
तरी आपुलें सुकृत ॥ रक्षीं त्वरित पृथ्वीशा ॥ १८२ ॥
ससाणा म्हणे तीन दिवस ॥ पडले निर्वाण उपवास ॥
वनीं कष्टलों बहुवस ॥ देई ग्रास माझा तूं ॥ १८३ ॥
बैसले तुझे सभेत पंडित ॥ त्यांस पुसे हा शास्त्रार्थ ॥
ज्याचें त्यास देतां निश्चित ॥ यश अद्भुत जोडेल ॥ १८४ ॥
पाहोन रायाचें वदन ॥ कपोत रडे स्फुदस्फुंदोन ॥
बाळे माझी तान्हीं दीन ॥ अशक्य जाण स्त्री माझी ॥ १८५ ॥
अवचित सांपडलों या व्यसनांत ॥ रक्षी माझा होतो कुटुंबघात ॥
बैसले ऋषिसभे संत ॥ त्यांस वृत्तांत पुसे हा ॥ १८६ ॥
ससाणा म्हणे नृपवर्या ॥ घरीं गर्भीण माझी जाया ॥
तुज कैशी नुपजे माया ॥ पडेल काया आतां हे ॥ १८७ ॥
रायासी थोर संकट पडलें ॥ मग सुबुद्धिप्रधान सुपुत्र बोले ॥
म्हणे जया पाठीशीं घातलें ॥ तयासी देऊं नये तूं ॥ १८८ ॥
ससाणा दवडावा येथून ॥ जीवघातकी परम दुर्जन ॥
ऐसें ऐकतां श्येन ॥ क्रोधानळें खवळला ॥ १८९ ॥
म्हणे सुबुद्धि आणि धर्म ॥ कासया ठेविलें तुझें नाम ॥
नामासारिखी उत्तम ॥ करणी नाहीं तुजपाशी ॥ १९० ॥
जंबुक दृष्टीं देखतां पळे ॥ त्यास केसरी नाम ठेविलें ॥
दोन्ही नेत्रांस वडस वाढले ॥ कमलनयन नाम तया ॥ १९१ ॥
कोरात्र मागतां न मिळे अन्न ॥ नाम ठेविलें शचीरमण ॥
क्षीरसिंधूचा जातां प्राण ॥ तक्र कोणी नेदीच ॥ १९२ ॥
नाम जयांचें उदारकर्ण ॥ अडकां वेचितां जाय प्राण ॥
बृहस्पति नाम जयालागून ॥ धड वचन बोलतो नये ॥ १९३ ॥
निर्नासिका नाम मदन सत्य ॥ परद्वारिया नाम हनुमंत ॥
ज्याचें नाम भास्कर विख्यात ॥ तो अंधारी पडियेला ॥ १९४ ॥
अजारक्षकां नाम पंडित ॥ काष्ठवाहका नाम नृपनाथ ॥
कीं दरिद्रियास नाम प्राप्त ॥ कुबेर ऐसें जाहलें ॥ १९५ ॥
जैसे अजागलस्तन ॥ कीं मुखमंडन बधिरकर्ण ॥
कीं जन्मांधाचे विशाल नयन ॥ तैसेंच जाण नाम तुझें ॥ १९६ ॥
रासभास सिंहासन ॥ श्वानास अग्रपूजा जाण ॥
दिव्यांबर परिधान ॥ उष्ट्रास काय व्यर्थचि ॥ १९७ ॥
कनकवृक्ष धोत्र्यास म्हणती ॥ चर्मकगृहींचा लोहहस्ती ॥
पक्षा नाम भारद्वाज म्हणती ॥ तैसेंच नाम तुमचें पै ॥ १९८ ॥
ऐसें ससाणा बोलोन ॥ तेथें पडे मूर्च्छा येऊन ॥
चंद्री लागली प्राण ॥ सांडू पाहे तेधवां ॥ १९९ ॥
राव धांवोन जवळ येत ॥ उदक शिंपून सावध करित ॥
आहार देतों घे घे म्हणत ॥ किंचित उघडी नेत्र तेव्हां ॥ २०० ॥
चंचू पसरी मिचकावी नेत्र ॥ म्हणे कपोत मुखीं घालीं सत्वर ॥
राव म्हणे ससाण्या विचार ॥ एक आतां परिस तूं ॥ २०१ ॥
कपोताचे भारंभार ॥ मांस घेई करीं आहार ॥
येरू म्हणे नरमांस सत्वर ॥ देई मज आणोनि ॥ २०२ ॥
चोरहेरांचें घेशी विकत ॥ तें मी नेघे निश्चित ॥
तो सत्यवती येऊन बोलत ॥ राजपत्नी तेधवां ॥ २०३ ॥
माझें मांस देते पाहीं ॥ येरू म्हणे न धडे सहसाही ॥
शिबिराज म्हणे माझें घेई ॥ मान्य करीं पक्षिया ॥ २०४ ॥
अवश्य ससाणा म्हणता ॥ राये तुळा आणविली तेथ ॥
एके भागीं कपोत ॥ बैसवून शस्त्र घेतलें ॥ २०५ ॥
ससाणा म्हणे तये क्षणीं ॥ येथें हाहाकार करितां कोणी ॥
कीं अश्रुपात ढाळितां नयनीं ॥ जाईन उठोनि राजेंद्रा ॥ २०६ ॥
सत्याचा सागर सत्वधीर ॥ राये करीं घेतलें शस्त्र ॥
निजमांस छेदूनि सत्वर ॥ तुळेमाजी घालितसे ॥ २०७ ॥
रायाचें सत्य पाहता ॥ हळूहळू कपोत जड होत ॥
तीन टांकं उणें येत ॥ मागुता ओपी चक्रवर्ती ॥ २०८ ॥
विमानीं दाटलें अंबर ॥ करिती आश्चर्य सुरवर ॥
मृत्युलोकीं नारी नर ॥ अत्यद्भुत पाहती ॥ २०९ ॥
वरचेवर मांस घाली नुपनायक ॥ मागुती उणें होय तीन टांक ॥
सरले मांस सकळिक ॥ अस्थि जाहल्या उघड्या ॥ २१० ॥
अस्थि प्राण आणि शिरा ॥ उरलीं तेव्हां साचार ॥
माथा डोलविती ऋषिश्वर ॥ सव्यतर्जनी उचलोनि ॥ २११ ॥
तें देखोनि नारदमुनि ॥ गेला वैकुंठास धांवोनी ॥
दीनदयाळा अजूनि ॥ सत्व किती पाहसी ॥ २१२ ॥
सर्वांगाचें काढोनि मांस ॥ शिबिरायें दिलें निःशेष ॥
ऐसें ऐकतां सर्वेश ॥ न सांवरत उठिला ॥ २१३ ॥
लगबग जाहली बहुत ॥ कौस्तुभमाळा न सांवरत ॥
पीतांबर भूमीस रुळत ॥ सुमनें सांडत त्वरें जातां ॥ २१४ ॥
सद्गद होऊनि जगजेठी ॥ रायाचे गळां घातली मिठी ॥
दिव्य शरीर जाहले दृष्टीं ॥ लोक सर्व पाहती ॥ २१५ ॥
जाहला एकचि जयजयकार ॥ सुर वर्षती सुमनसंभार ॥
अयोध्येसह उपवर ॥ दिव्यविमानीं बैसविला ॥ २१६ ॥
चतुर्भुज नृपास करून ॥ निजपदीं स्थापिला नेऊन ॥
धर्माप्रति कथा गहन ॥ मार्कंडेय मुनि सांगे हे ॥ २१७ ॥
मुनि म्हणे धर्मराया ॥ शिबीऐशी तुझी चर्या ॥
ऐशी कथा सांगोनियां ॥ ऋषि पावले अंतर्धान ॥ २१८ ॥
किरीटीस म्हणे युधिष्ठिर ॥ तूं शक्रपुरीं होतासी पांच संवत्सर ॥
ईश्वर आणि निर्जरेंद्र ॥ विद्या शिकलास त्यांपाशीं ॥ २१९ ॥
चौदा विद्या चौसष्टि कला ॥ अनुच्छिष्ट मंत्रास्त्रमाला ॥
ज्यांचा प्रताप आगळा ॥ या त्रिभुवनामाझारी ॥ २२० ॥
तरी तीं क्षणभरी सोडोनियां ॥ प्रताप मज दावीं बा धनंजया ॥
येरू म्हणे महाप्रलया ॥ भावितील कीं जन सर्व ॥ २२१ ॥
अस्त्रे सोडितां कुंभिनी ॥ सनग गजबजेल ये क्षणीं ॥
तरी शतांशेकरूनि ॥ दावीन क्षणैक पहावें ॥ २२२ ॥
नाना अस्त्रांचें प्रेरण ॥ करिता जाहला सुभद्रारमण ॥
विध्यंड डळमळिलें तेणेकरून ॥ अद्भुत तेज प्रकटलें ॥ २२३ ॥
हेलावले सप्तपाताळ ॥ गडबडले देव सकळ ॥
वारणपुरींत हलकल्लोळ ॥ कौरव थरथरां कांपती ॥ २२४ ॥
शारद्वत द्रोण स्वर्धुनीसुत ॥ म्हणत काय मांडिला अंत ॥
द्रोण ज्ञानें विचारित ॥ पार्थ विद्या दावितो ॥ २२५ ॥
इकडे धर्म म्हणे पार्था ॥ प्राणसखया गुणभरिता ॥
आपलीं अस्त्रे आवरीं आतां ॥ महाप्रलय वर्तला ॥ २२६ ॥
जैसा सर्प गारुड्या आधीन ॥ पेटारां घालिती मागुतेन ॥
तैसा अस्त्रें आवरी कृष्ण ॥ चमत्कार दावोनियां ॥ २२७ ॥
ऋषि आश्चर्य करिती संपूर्ण ॥ धन्य महावीर अर्जुन ॥
अस्त्रप्रेरण आकर्षण ॥ रणपंडित सर्व जाणे ॥ २२८ ॥
धर्मरायास नमून ॥ स्वस्थ बैसला सुभद्रारमण ॥
पुढें कथा संपूर्ण ॥ सुधारसाहून गोड असे ॥ २२९ ॥
बोले लोमशऋषीश्वर ॥ युधिष्ठिरा कथा ऐकें सुंदर ॥
पूर्वी राजा हरिश्चंद्र ॥ सत्यशील तुजऐसा ॥ २३० ॥
धर्म चरणीं लागूनी ॥ म्हणे ते कथा सांगा लोमशमुनी ॥
जे ऐकतां श्रवणीं ॥ पाप ताप न उरेचि ॥ २३१ ॥
जनमेजयास म्हणे वैशंपायन ॥ लोमशें कथा कथिली संपूर्ण ॥
तुम्ही होऊन सावधान ॥ एकचित्तें ऐका पां ॥ २३२ ॥
पांडवप्रताप ग्रंथ गहन ॥ वनपर्व हें सुरस पूर्ण ॥
बोलिला सत्यवतीनंदन ॥ वैशंपायन निजमुखें ॥ २३३ ॥
तेच कथा रसाळ फार ॥ ब्रह्मानंदें वर्णील श्रीधर ॥
श्रवण करोत पंडित चतुर ॥ सर्व कार्य टाकूनियां ॥ २३४ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ वनपर्व व्यासभारत ॥
त्यांतील सारांश यथार्थ ॥ एकोणतिसाव्यांत कथियेला ॥ २३५ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापे वनपर्वणि एकोनत्रिंशोऽध्याय: ॥ २९ ॥
अध्याय एकोणतिसावा समाप्त
GO TOP
|