श्रीधरस्वामीकृत

पांडवप्रताप


अध्याय चवथा


भारत हे देशाचे नाव पडले


श्रीगणेशाय नमः
महाराज कण्व ऋषि । आशीर्वाद देत कन्येसी ।
तुज पुत्र होईल लावण्यराशी । जो वंशासी कुलभूषण ॥ १ ॥
शकुंतला जाहली गर्भिणी । गर्भ वाढे त्वरेंकरुनी ।
जैसा शुक्लपक्षीं रोहिणी । रमण कला वाढे तयाची ॥ २ ॥
पूर्ण भरतां नवमास । पुत्र जाहला डोळस ।
जैसा उदेला बालचंडांश । तैसा प्रकाश तयाचा ॥ ३ ॥
कन्यापुत्र देखोनि अभिनव । जातकर्मादि करुनि कण्व ।
भरत ऐसें नांव । ठेविलें त्या ऋषिनें ॥ ४ ॥
आजानुबाहु अति सरल । आकर्ण नेत्र विशाल भाल ।
कीं सौंदर्यसमुद्र सकल । आटोनि तेथें गोठला ॥ ५ ॥
बत्तीस लक्षणीं डोळस । सामुद्रिकचिह्नें विशेष ।
कण्व ऋषि सांगे आत्मजेस । भविष्यार्थ तयाचा ॥ ६ ॥
सागरांत पृथ्वी समस्त । हा एक होईल नृपनाथ ।
याचे नावें भारत- । वंशज पुढें म्हणविती ॥ ७ ॥
सहा वर्षे जाहलियावरी । पारधी खेळे वनांतरी ।
व्याघ्र सिंह कुंजर हरी । धरुनि आणी जिवंतची ॥ ८ ॥
ठेवी महावृक्षांसी बांधून । मग तयांवरी करी आरोहण ।
पिटीतसे रानोरान । तटस्थ ब्राह्मण पाहती ॥ ९ ॥
दुसरें नामाभिधान । ब्राह्मण ठेविती सर्वदमन ।
धनुष्यकोटीनें ओढून । गंगा आणी मुरडोनियां ॥ १० ॥
पर्वत बळें लोटूनियां । समान भूमी करी हिंडावया ।
जे मनुष्यास नव्हे चर्या । दैविक कर्मे करीतसे ॥ ११ ॥
मनांत विचारी कण्व ऋषी । हा भेटवावा पितयासी ।
युवराज्य देववावें यासी । दिग्विजय करील हा ॥ १२ ॥
भेटतील पितापुत्र । आत्मजा पाहील भ्रतार ।
इतुकेन उत्तीर्ण समग्र । आम्ही जाहलों निश्चयें ॥ १३ ॥
वनिता सुंदर तरुण । पितृगृहीं वसतां अनुदिन ।
लोकनिंदेचे वाग्बाण । हृदयीं पूर्ण खोंचती ॥ १४ ॥
बहुकाल माहेरीं राहत । विहित धर्में जरी वर्तत ।
तरी लोक कुश्चित बहुत । काजळ लाविती मुखातें ॥ १५ ॥
स्त्रियांसी मुक्तता पाहीं । विचरतां कदा दोष नाहीं ।
संग्राममंडलीं यागगेहीं । विवाहीं यात्रा सर्व तीर्थीं ॥ १६ ॥
पिता श्वशुर पति असता जवळी । चिताभूमीं उत्साहमेळीं ।
मांगल्यकर्में जीं शास्त्रीं वर्णिलीं । दोष नाहीं विचरतां ॥ १७ ॥
स्त्री पुरुष एकचित्त । गृहस्थाश्रमीं वर्तत ।
दोघांसही दया बहुत । सदा चित्त धर्मावरी ॥ १८ ॥
जे स्त्री धर्मानुकूल । तेचि पतिव्रता निर्मल ।
ते गृहीं राहे घननील । लक्ष्मीसहित सर्वदा ॥ १९ ॥
भ्रताराचें भाग्य देखिती । लटकीच प्रीति वरिवरी दाविती ।
ज्या ओढाळा अत्यंत प्रेम करिती । भ्रतारासी वंचावया ॥ २० ॥
एक तोंडाळ अत्यंत । एक सदा मलिन बहुत ।
पति देखता क्षोभे मनांत । तिचा त्याग अवश्य कीजे ॥ २१ ॥
अखंड जी क्रोधमुखी । दुर्भगा कुश्चळा नष्टा दुःखी ।
गृही सर्व असोनि दैन्य भाकी । तिचा त्याग अवश्य कीजे ॥ २२ ॥
करी भ्रताराची निंदा । जी परगृहीं असे सदा ।
जिचे बोलण्यासी नाहीं मर्यादा । तिचा त्याग अवश्य कीजे ॥ २३ ॥
जारजारिणींची संगति धरी । मना आवडे तेथें निद्रा करी ।
एकली मार्गी चाले दुराचारी । तिचा त्याग अवश्य कीजे ॥ २४ ॥
तुक तोडोनि बोलत । मार्ग सांडोनि चालत ।
करुं नये तेंच करीत । तिचा त्याग अवश्य कीजे ॥ २५ ॥
चीरें आणि अलंकार । घेऊनि सदा करी श्रृगांर ।
उदकीं रुप पाहे वारंवार । तिचा त्याग अवश्य कीजे ॥ २६ ॥
भलत्याशीं करे एकांत गोष्टी । जार न्याहाळी सदा दृष्टीं ।
सुख मानी पति होतां कष्टी । तिचा त्याग अवश्य कीजे ॥ २७ ॥
सदा उघडे पयोधर । सवेंचि हांसे झांकूनि पदर ।
निर्‍या सरसावी वारंवार । तिचा त्याग अवश्य कीजे ॥ २८ ॥
स्त्री केवळ अविद्येचा पसारा । महाकृत्या अविचारा ।
केवळ असत्याचा थारा । भय न धरिती पापाचें ॥ २९ ॥
स्त्री अनर्थाचें गृह सबळ । कीं ते महाकलहाचें मूळ ।
कीं विषवल्लीच केवळ । स्त्रीरुपें विस्तारली ॥ ३० ॥
कीं ते कामाची विशाल दरी । कीं पाप समुद्राची लहरी ।
कीं क्रोधव्याघ्राची जाळी खरी । कीं भाजन असत्याचें ॥ ३१ ॥
कीं ते दुःखवृक्षाचें श्रेष्ठ फळ । कीं ते मदाचा पर्वत सबळ ।
कीं ते मत्सरवन केवळ । कीं भ्रांतिमूर्तीच अवतरली ॥ ३२ ॥
कीं दंभ मूर्तिमंत प्रकटला । कीं अहंकारें स्त्रीगड बांधिला ।
सकल मूर्खत्व त्या स्थला । मिरास करुन राहिलें ॥ ३३ ॥
कीं मूर्तिमंत भवव्याधी । कीं षडूर्मींची भरली नदी ।
कीं सकल विकारांची मांदी । यात्रेस आली त्या ठायां ॥ ३४ ॥
कोणें निर्मिली हे स्त्रीकुर्‍हाडी । सबल पुण्यवृक्ष तोडी ।
अविश्वासाची बेडी । जीवाचे पायीं ठोकली ॥ ३५ ॥
हे मोक्षद्वारार्गला सत्य । दर्शनें पुरुषाचें चोरी चित्त ।
स्पर्शबलें वीर्य हरित । असुरी प्रत्यक्ष कामिनी ॥ ३६ ॥
कौटिल्यदंभसंयुक्त । क्षमाशुचित्वविवर्जित ।
महामंत्राचें सामर्थ्य । क्षणें हरित न कळतां ॥ ३७ ॥
गौडी माध्वी पैष्टी तिन्ही । याचि मदिरा प्रकट जनीं ।
चौथें मद्य ते कामिनी । दुर्गंधि नाहाणी पापाची ॥ ३८ ॥
स्त्रीस्वरुपाची धरुन दिवी । महा नरकाची वाट दावी ।
सज्ञान्यासही भुलवी । वनीं हिंडवी विषयांचे ॥ ३९ ॥
हे काळें दूती पाठविली देखा । चाळवून नेतसे नर नरका ।
दुरावले मोक्षसुखा । अधःपतनीं पडियेले ॥ ४० ॥
आतां असो हा अनुवाद । जरी कृपा करील गोविंद ।
तरीच तुटेल भवबधं । हृदयी बोध ठसावे ॥ ४१ ॥
दुष्ट स्त्रीशीं करणें संसार । अज्ञान गुरु मूर्ख पुत्र ।
दरिद्री यजमान कृपण मित्र । सुख अणुमात्र नसे तेथें ॥ ४२ ॥
धनी निर्बल शत्रु थोर । वक्ता तामसी श्रोता पामर ।
अंध सांगाती पंथ दुर्धर । सुख अणुमात्र नसे तेथें ॥ ४३ ॥
खोटें नाणें मोडकें शस्त्र । अशुद्ध पुस्तक अशुचि पात्र ।
पढलेलें समयीं नाठवे शास्त्र । तरी यश न ये कल्पांती ॥ ४४ ॥
राजा कोपी अविचारी प्रधान । भांडारी तस्कर मोडकें सदन ।
शिष्य अभाविक गुरु मलिन । दुःखा न्यून काय तेथें ॥ ४५ ॥
पैशुन्यवादियाचा विश्वास । पोहूं नेणे त्याची धरणें कांस ।
रोगिष्ठ वैद्याचे औषधास । नये यश कल्पांतीं ॥ ४६ ॥
असो हा पाल्हाळ बहुत । लोकचर्या सांगितली किंचित ।
माझी कन्या गुणवतं । लक्ष्मीभवानीसारखी ॥ ४७ ॥
परी शिखा केश आणि दंत । हे स्वस्थानींच शोभिवंत ।
म्हणोनि दुहिता पुत्रसवेत । कुंजरपुरा पाठवावी ॥ ४८ ॥
वृद्ध जुनाट तपोनिधी । बहुश्रुत सत्यवादी ।
सवें ऋषींची मांदी । कण्वऋषि देतसे ॥ ४९ ॥
शकुंतला आणि भरत । हस्तिनापुरा आलीं त्वरित ।
सभे बैसला नृपनाथ । राजे बहुत घनवटले ॥ ५० ॥
अकस्मात झळके सौदामिनी । तैसी रायापुढें कुमार घेऊनी ।
उभी ठाकली येऊनी । पाहती नयनीं सभाजन ॥ ५१ ॥
जयजयकार करुनि ऋषी । आशीर्वाद देती रायासी ।
रायें नमूनि तयांसी । सन्मानें सभेसी बैसविलें ॥ ५२ ॥
परम सुंदर बाल अद्‍भुत । तयाप्रति शकुंतला बोलत ।
नमस्कार करीं त्वरित । पितयालागीं सुपुत्रा ॥ ५३ ॥
भरत लागे तत्काल चरणीं । ती म्हणे राजेंद्रा सद्‌गुणखाणी ।
पुत्रासी मांडीवरी घेऊनी । अवघ्राणीं मस्तकीं ॥ ५४ ॥
वाट पाहिली बहुत दिवस । परी निष्ठुर समर्थांचें मानस ।
आतां गृहस्वामी आला गृहास । जैसा चंडांशु प्रतापी ॥ ५५ ॥
कण्वाश्रमीं येऊन । सुमुहूर्तीं लाविलें गांधर्वलग्न ।
वचन भाष प्रमाण । दिधलें कीं मजलागीं ॥ ५६ ॥
ऐसें शकुंतला बोलत । रायें ओळखिलीं स्त्रीसुत ।
परि नेणेतपण घेत । क्रोधयुक्त बोलतसे ॥ ५७ ॥
जार चोर कपटी धूर्त । हिंसक पातकी नीच बहुत ।
करोनि नाहीं म्हणती लोकांत । तैसा नृपनाथहि जाहला ॥ ५८ ॥
म्हणे तूं कैंची कोण । आलीस कैंचा पुत्र घेऊन ।
कैंचें लग्न संभाषण । कोणें प्रमाण कोठें दिलें ॥ ५९ ॥
माझ्या सुहृदांस ठाउकें नाहीं । लग्न लागलें कोणे ठायीं ।
देव ब्राम्हण वन्हि पाहीं । साक्षी नाहीं सर्वथा ॥ ६० ॥
मजसमान वय ठाण । अल्पकाळेंच हा कोठून ।
कैचां झाला नंदन । अप्रमाण सर्वही ॥ ६१ ॥
मज अणुमात्र ठाउके नाहीं । आलीस तैशी मागुती जाईं ।
निर्लज्जे माघारां होईं । सोंग काय आणिलें ॥ ६२ ॥
मज लाविशी अपयश । निर्दोषिया ठेविशी दोष ।
डाग लावावया नांवास । आलीस कैंची पापरुपे ॥ ६३ ॥
मी तुझी भार्या म्हणोन । गळीं पडसी येऊन ।
ऋषि सोयरे स्वजन । हांसतील मज आतां ॥ ६४ ॥
ऐसें बोलतां मेदिनीनाथ । शकुंतला जाहली संतप्त ।
जैशी प्रलयज्वाला अद्‍भुत । ग्रासूं धांवे गगनातें ॥ ६५ ॥
कंठ जाहला सद्‌गदित । नयनीं वाहती आश्रुपात ।
म्हणे धन्य तूं नृपनाथ । न्यायें सत्य बोलसी ॥ ६६ ॥
जो सर्वांतर्वासी सर्वसाक्षी । तोचि आत्माराम आहे साक्षी ।
जो पापपुण्यकर्मे परीक्षी । सदा रक्षी सद्‍भक्तां ॥ ६७ ॥
वन्हीस न कळतां दीप लागला । जीवन न घालितां वृक्ष वाढला ।
ठाउकें नाहीं मनाला । पाप ऐसें नसेचि ॥ ६८ ॥
अंतरी जाणोन यथार्थ । अन्यथा बळें प्रतिपादित ।
न करावें तें हटेंचि करित । तरी अनर्थ जवळी आला ॥ ६९ ॥
पुण्यजोडी तुझी समस्त । साक्ष करुन हृदयस्थ ।
पंचभूतें साक्षी सत्य । अंतर्बाह्य व्यापिलीं ॥ ७० ॥
तुझें मन माझे साक्षीसी । माझें मन तुझें परीक्षेसी ।
जाणोनियां नेणता होसी । पाहें मानसीं भूभुजा ॥ ७१ ॥
मी एक जाणता सर्वज्ञ । हृदयी धडके हा अभिमान ।
सहस्त्रमूर्खाहून मूर्ख पूर्ण । कर्में करीत त्यातुल्य ॥ ७२ ॥
पाप करुन नानापरी । म्हणे मी पुण्यवतं बाहेरी ।
देवताचक्र साक्षी अंतरीं । तत्त्वरुप पाहतसे ॥ ७३ ॥
कर्में घडती सत्यासत्य । तीं चित्रगुप्त लिही समस्त ।
साक्षी असे जगन्नाथ । जय सत्य त्यापाशीं ॥ ७४ ॥
लटकें बोलती पुरुष गोड । पुरविती आपुलीच चाड ।
बोल दाविती लटके गाढ । आत्मकार्यापुरतेचि ॥ ७५ ॥
पापाचें भय जे धरिती । ते इहपरत्रीं जयवतं होती ।
असत्य अनाचारें वर्तती । कुंभीपाकीं पडती ते ॥ ७६ ॥
कामधेनु चिंतामणी । घरा आलीं पुण्येंकरुनी ।
त्यांस माघारें घाली लोटूनी । तरे तो अभागी सहजचि ॥ ७७ ॥
कुंभिनीपाला ऐकें यथार्थ । माथां घेऊनि असत्यपर्वत ।
कैसा चढसील परत्रपंथ । अन्यायें येथें वर्तोनि ॥ ७८ ॥
जाया सुंदर पतिव्रता । पुत्र सभाग्य भाविक ज्ञाता ।
गुरु सर्वज्ञ दयाळ तत्त्वतां । पूर्वपुण्यें पाविजे ॥ ७९ ॥
शिष्य प्रज्ञावंत सप्रेम उदार । वक्ता क्षमावतं सुरस फार ।
पढला तें समयीं आठवे शास्त्र । हें पूर्वपुण्यें पाविजे ॥ ८० ॥
कविता रसिक आणि साहित्य परम । श्रोता प्रज्ञावतं आणि सप्रेम ।
सुपंथ आणि सुसमागम । पूर्वपुण्यें पाविजे ॥ ८१ ॥
काया अरोगी सुंदर । यजमान सभाग्य उदार ।
मित्र विश्वासू आणि पवित्र । पूर्वपुण्यें पाविजे ॥ ८२ ॥
नृप सत्यपर आणि न्यायवंत । अमात्य चतुर आणि पंडित ।
साधु विरक्त आणि भक्त । पूर्वपुण्यें पाविजे ॥ ८३ ॥
बोलणें सत्य आणि सुरस । विद्या आणि विनय विशेष ।
बल आणि क्षमा बहुवस । पूर्वपुण्यें पाविजे ॥ ८४ ॥
तुझा पुत्र तुझाचि अवतार । यशस्वी परम बलसागर ।
बालभावें क्रीडतां साचार । प्रताप अद्‍भुत करी बहु ॥ ८५ ॥
तुझें वीर्य सबल सत्य । त्यावरी कण्व ऋषीचें गुरुत्व ।
प्रताप पहा अद्‍भुत । पृथ्वी क्षणांत जिंकील हा ॥ ८६ ॥
वडिलांची मर्यादा भय धरुन । उगाचि असे धरुन मौन ।
जैसा याज्ञिकांचे कुंडीं कृशान । आच्छादूनि राहिला ॥ ८७ ॥
हे सभा आणि राजे समस्त । मशकप्राय यासी दिसत ।
जैसा सूर्यापुढें खद्योत । कीं वासुकीपुढें मशक पैं ॥ ८८ ॥
निजपादघातेंकरुन । जेणें पर्वत केले चूर्ण ।
सिंह व्याघ्र जीतचि धरुन । जेणें बैसोनि फिरविले ॥ ८९ ॥
धनुष्यकोटीनें ओढूनी । ऋष्याश्रमा नद्या आणी ।
गोकुळीं जैसा चक्रपाणी । बालपणीं करी ख्याती ॥ ९० ॥
हा होईल पृथ्वीपती । धरीं आपुला पुत्र हातीं ।
मी जात्यें काश्यपारण्याप्रती । सांगेन ख्याती पितयातें ॥ ९१ ॥
पिता कण्व प्रळयाग्न । ब्रह्मांड टाकील जाळून ।
मी जाहलें ज्याचे वीर्यापासून । चतुरानन दुसरा तो ॥ ९२ ॥
जेणें प्रतिसृष्टि केली निर्माण । मेनिका स्वर्गींचे दिव्यरत्‍न ।
तिचे ठायीं करितां वीर्यदान । हें शरीर जाण ओतलें ॥ ९३ ॥
भरत जन्मतां कुशीं । देववाणी जाहली आकाशीं ।
पृथ्वीपती तेजोराशी । शतमख करील हा ॥ ९४ ॥
हा षड्गुणैश्वर्यसंपन्न । याचे नावे वंशासी भूषण ।
याचेनि भारत हें पूर्ण । अभिधान गाजेल पैं ॥ ९५ ॥
ब्राह्मणकन्या असूनि पूर्ण । मीं तुज दिधलें देहदान ।
जाहलास सत्वर उत्तीर्ण । जातें येथून मी आतां ॥ ९६ ॥
ऐसे शकुंतलेचे बोल उत्तम । दुष्यंतास लागती तीव्र परम ।
म्हणे हे स्त्री होऊनि अधम । बहुभाषिणी अनिवार ॥ ९७ ॥
भ्रष्ट ब्राह्मण पेटला अग्न । मातला गज क्षोभला सर्प जाण ।
निर्लज्ज स्त्रीचें भाषण । चतुरानना आवरेना ॥ ९८ ॥
स्वर्वेश्या मेनका जाण । तिचे पोटीं जाहली हे निर्माण ।
जीस भोगिती बहुत जन । संख्या नसे मोजितां ॥ ९९ ॥
दर्पण बांधिला नगरद्वारीं । पाहती सर्व कोण निवारी ।
गंगातीरींचे शिळेवरी । आवडे तेणें धुईजे ॥ १०० ॥
सहाण देऊळीं रोविलीसे । खोड आणून भलताचि घासे ।
काग धांवती जैसे । नाळीकपशु देखोनि ॥ १०१ ॥
देउळीं बांधला ढोल । येतां जातां बडविती सकळ ।
कीं धर्मशाळेचें उखळ । मोकळें सर्वां कांडावया ॥ १०२ ॥
मेनकेची वर्तणूक । ऐसीच जाणती सर्व लोक ।
तिचीच हे कन्या देख । महा निःशंक निर्लज्ज पैं ॥ १०३ ॥
यालागीं उभयकुलपवित्र । स्त्री करावी ऐसें बोलती चतुर ।
पिता इचा विश्वामित्र । तो क्षत्रिय होय जातीचा ॥ १०४ ॥
ब्रह्महत्या केल्या बहुत । मारिले वसिष्ठाचे शत सुत ।
तपोबळें हटें बहुत । ब्राह्मणत्व मिरविलें ॥ १०५ ॥
नट जाहला परमहंस । मैंदे धरिला साधुवेष ।
तैसा कौशिक निःशेष । क्षत्रिय ब्राह्मण कळेना ॥ १०६ ॥
नागविला तस्करीं । तो उदिमाची हांव धरी ।
तैसा विश्वामित्र गेला निर्धारीं । तपोधन सांचवावया ॥ १०७ ॥
गर्भ टाकूनि हिमाचळीं । मेनका गेली शक्राजवळी ।
शकुंतीं हे पाळिली । नांव पावली शकुंतला ॥ १०८ ॥
तूं कोणाची मी कोण । गळां पडतेस दाटून ।
यावरी शकुंतला बोले वचन । परम क्षोभोनि तेधवां ॥ १०९ ॥
पराचे दोष बिदुंप्रमाण । दाविसी सिंधुएवढे करुन ।
आपला दोष पर्वताहून । सबळ पूर्ण आठवेना ॥ ११० ॥
विश्वामित्र केवळ मित्र । निर्दोष जैसा त्रिनेत्र ।
ज्याचें स्मरण करितां पवित्र । दोषमात्र उरेना ॥ १११ ॥
देवपंक्तींत मेनका मान्य । जीस मानिती शिव विधि नारायण ।
चौदा लोंकी जिचें गमन । तिजसमान मीहि असें ॥ ११२ ॥
याचि देहेंकरुन । येईन वैकुंठ पाहोन ।
चतुर्दशलोकभवन । धांडोळीन क्षणार्धे ॥ ११३ ॥
तूं भूचर मानव विचक्षण । नेणसी माझें सामर्थ्य पूर्ण ।
तिन्ही देव साक्षीस आणीन । तरीच कन्या कौशिकाची ॥ ११४ ॥
जो प्रतिसृष्टीचा धाता । तूं निंदिसी त्या विश्वामीत्रा ।
मेनका मान्य सहस्त्रनेत्रा । नीलगात्रा महेशा ॥ ११५ ॥
मागें बोलावें न्यून । समरीं पळावें उठोन ।
हें नीचाचें लक्षण । विचक्षण न मानिती ॥ ११६ ॥
निर्नासिक आरसा न पाहे । तोंवरीच रुपाभिमान वाहे ।
म्हणे माझे रुपास तुलना नये । रतिवर शोधितां ॥ ११७ ॥
मुक्ताफ्ळ सेवी राजहंस । क्षत उकरी वायस ।
दोषियांचे दृष्टीस निर्दोष । कोणी जगीं दिसेना ॥ ११८ ॥
तरी आतां कपट सांडूनी । पुत्र बैसवीं निजासनीं ।
महापुण्येंकरुनी । पुत्र ऐसा जन्मला ॥ ११९ ॥
शतकुप निर्जलवनीं । खणितां पुण्य उदकदानीं ।
शतकूपांसमान मानीं । एक वापिका निर्धारे ॥ १२० ॥
शत वापिकांचें पुण्य । एक करितां महायज्ञ ।
शतयज्ञांचें सुकृत पूर्ण । एक सुपुत्र जन्मतां ॥ १२१ ॥
शतपुत्रांचें पुण्य संपूर्ण । घडे बोलतां सत्य वचन ।
सकल तीर्थांचें अवगाहन । सत्य वचने घडे हो ॥ १२२ ॥
ऐसें बोलतां शकुंतला । अश्रुधारा चालिल्या डोळा ।
कीं त्या भूलिंगास निर्मळा । गळत्या लाविल्या अधःपंथी ॥ १२३ ॥
अधर थरथरां स्फुरत । कंठ जाहला सद्‌गदित ।
म्हणे हे शिव वैकुंठनाथ । सांभाळीं सत्य सत्यपते ॥ १२४ ॥
तों अकस्मात आकाशवाणी । देव बोलती ते क्षणीं ।
ऐकती समस्त श्रवणीं । ब्राह्मण राजे मंत्रीही ॥ १२५ ॥
वर्षती कुसुमसंभार । आकाशवाणी गर्जे थोर ।
रे रे दुष्यंत राजेंद्र । ऐकें सादर होऊनी ॥ १२६ ॥
शकुंतला महासती । अपमानितां जाण भूपती ।
क्षोभोनियां हे जगती । दग्ध करील क्षणार्धे ॥ १२७ ॥
अर्धांगीं बैसवीं महासती । भरत पुत्र धरीं हातीं ।
विकार मानिसी जरी चित्तीं । हरिहरांची आण तुजला ॥ १२८ ॥
ऐसें ऐकतां उत्तर । जाहला एकचि जयजयकार ।
मग बोले दुष्यंत नृपवर । ऐका समस्त सभाजन हो ॥ १२९ ॥
हे स्त्री माझीच सत्य । पुत्र ओळखिला म्यां भरत ।
परि लोक मानिती असत्य । यालागीं कृत्रिम बोलिलों ॥ १३० ॥
प्रथम अंगीकार करितां जाण । लोक ठेविती मज दूषण ।
आतां ईश्वर साक्षी प्रमाण । अंगीकारलीं माझीं मीं ॥ १३१ ॥
राव झाला सद्‌गदित । धांवोनि कडिये घेत सुत ।
वारंवार मुख चुंबित । आनंद न मावे त्रिभुवनीं ॥ १३२ ॥
कोणाची दृष्टी लागेल जाण । म्हणोनि उतरी निंबलोण ।
उत्तम वस्तु ओंवाळून । याचकांप्रति दीधल्या ॥ १३३ ॥
फोडून भांडारें अपार । विप्रांस म्हणे राजेंद्र ।
आवडे तितुकीं साचार । द्रव्यरत्‍नें नेइजे ॥ १३४ ॥
शिरीं करुनि अवघ्राण । दिधलें युवराज्य संपूर्ण ।
सकल राजे उभे राहून । भरतालागीं वंदिती ॥ १३५ ॥
मग प्रियेसी हातीं धरुन । गेला अंतःपुरीं घेऊन ।
प्रीतीं देऊनि अलिंगन । समाधान करी तिचें ॥ १३६ ॥
सत्यप्रगटावयाकारणें । प्रिये बोलिलों निष्ठुर वचनें ।
तुंवा विषाद न धरावा मनें । माझी आण तुज असे ॥ १३७ ॥
वस्त्रें आभरणें देऊनी । गौरविली आपुली राणी ।
सकल संपदा दावूनी । केली स्वामिणी राज्याची ॥ १३८ ॥
बोलिल्या बोलाहून आधिक । शकुंतलेस दिधलें सुख ।
पट्टराणी हे प्रमुख । जैसी भवानी शिवाची ॥ १३९ ॥
दुष्यंतरायाचे उपरी । भरत पृथ्वीचें राज्य करी ।
या ब्रह्मांडमंडपाभीतरीं । ऐसा दुसरा नसेचि ॥ १४० ॥
पंचाशतकोटि योजन । पृथ्वी हिमाद्रिश्रृंगापासून ।
सकल राजयांवरी शासन । एकछत्री राज्य केलें ॥ १४१ ॥
शतक्रतु करुन संपूर्ण । सुखी केले सर्व ब्राह्मण ।
सहस्त्रपद्में देऊन धन । कण्व ऋषि पूजिला ॥ १४२ ॥
तपियां शिरोमणि विश्वामित्र । त्यास दिधला संपत्तिसागर ।
त्याचें वंशीं तुम्ही नृपवर । भारतवीर म्हणवितां ॥ १४३ ॥
संपलें आख्यान शाकुंतल । यावरी आख्यान रसाळ ।
ब्रह्मानंद अभंग निर्मल । श्रीधरवरद सुखदाता ॥ १४४ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । चतुर्थाध्यायीं कथियेला ॥ १४५ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्वटीका श्रीधरकृत ।
शकुंतलाख्यान भरत - । राज्य्भिषेचन कथियेलें ॥ १४६ ॥
इति श्रीधरकृत पांडवप्रतापादिपर्वणि चतुर्थोध्यायः ॥ ४ ॥
अध्याय चौथा समाप्त



GO TOP