श्रीधरस्वामीकृत
पांडवप्रताप
अध्याय पहिला
धौम्य ऋषींच्या शिष्यांची गुरुभक्ती
ॐ नमो जी दिगंबरा । ब्रह्मानंदा निर्विकारा ।
पुराणपुरुषा परात्परा । जगदुद्धारा जगत्पते ॥ १ ॥
श्रीमद्भीमातटविहारा । कमलोद्भवजनका अतिउदारा ।
अनादिसिद्धा सत्पथसारा । रुक्मिणीवरा पांडुरंगा ॥ २ ॥
तूंचि जाहलासी सिद्धी विनायक । मंगलारंभी मंगलकारक ।
करणार तूं वरदायक । सकलविद्याप्रद तूंचि पैं ॥ ३ ॥
अरुणोदयसंध्याराग । आरक्त रत्नांचे मेळविले रंग ।
कीं ग्रीष्मऋतुबालार्क सुरंग । तैसें अंग सतेज पैं ॥ ४ ॥
सिंदूरचर्चित मंदगिरी । रम्य दोंदील त्रिभुवन उदरीं ।
हेरबां तव ध्यान अंतरी । ऋषिसुरनरीं सेविजे ॥ ५ ॥
निजमस्तकींचा दिव्य सुगंध । तेथें विद्वज्जन जाहले मिलिदं ।
लीलाविग्रही सच्चिदानंद । आनंदकांद मंगलमूर्ति ॥ ६ ॥
उगवले दोन्हीं वासरमणी । तैसीं मकराकार कुंडलें श्रवणीं ।
नक्षत्रपुंज ओंविले गुणीं । मुक्तामाला तेवीं दिसती ॥ ७ ॥
नक्षत्रीं वेष्टिला रोहिणीकांत । तैसें पदक हृदयीं विराजित ।
सौदामिनीवेषें झळकत । शुभ्र वस्त्र गणपतीचें ॥ ८ ॥
सिद्धि बुद्धि जवळी तिष्ठत । कीं कनकाचल मूर्तिमंत ।
सुरासुर ऋषि समस्त । चरणांबुज सेविती ॥ ९ ॥
दंतदिनकर झळकत । देखतां अज्ञानतम पळत ।
तो विनायक वरद हस्त । उचलोन देत नाभीकारातें ॥ १० ॥
म्हणे मी आहें पाठीशीं । पांडवप्रतापग्रंथराशी ।
वद साहित्यदृष्टांतेंशीं । नवरसीं सुरस जो ॥ ११ ॥
वंदूं कमलोद्भवकुमारी । जे वर्षे शब्दसंभारी ।
जे ज्ञानगंगा स्वानंदलहरी । ब्रह्मानंदसागरींची ॥ १२ ॥
जे सदा विलसे कविजिव्हाग्रीं । जे त्रिभुवनलावण्यसुंदरी ।
साहित्यकल्हारभ्रमरी । जे सुरासुरीं वंदिजे ॥ १३ ॥
जे पदरचनेची सहस्त्रवदना । कीं नवरसीं भरली यमुना ।
गुप्त राहोनि हालवी रसना । शब्द वर्षे सरस्वती ॥ १४ ॥
सकलविद्यांचे मूळपीठ । जे चातुर्यसौभाग्यवरिष्ठ ।
प्रमेयरत्नखाणी सुभट । स्वामीण कविकुशलांची ॥ १५ ॥
विधि विष्णु उमापति । हे तुझे उपासक सरस्वति ।
व्यास वाल्मीकादि ऋषिपंक्ति । तुज स्तविती सर्वदा ॥ १६ ॥
निगमकामधेनूचे कांसेस । अर्थदुग्ध भरले सुरस ।
तें हें भारत भरितनवरस । पंचम वेद बोलती ॥ १७ ॥
त्यांतून काढून नवनीता । कविबालका देत माता ।
ते भारती वंदिली तत्वतां । ग्रंथारंभीं प्रीतीनें ॥ १८ ॥
ते वाग्वादिनी ब्रह्मपुत्री । जे रसना नाचवी निजसूत्रीं ।
जे शब्दब्रह्माची धात्री । ठाणें जिव्हाग्रीं घालित ॥ १९ ॥
मी सर्वांचे जिव्हाग्रीं वसें । शुभाशुभ फळें बोलवीतसें ।
सद्भक्तांस शब्दविलासें । मीच वर्षें सरस्वती ॥ २० ॥
श्रीधर म्हणे त्रिभुवनजननि । ब्रह्मानंदपददायिनि ।
भारतरचना एथूनि । सुरस वदवीं माउलिये ॥ २१ ॥
देशिकराज ब्रह्मानंद । लीलाविग्रही स्वानंदकंद ।
त्याचें चरणारविंद सुगंध । तेथें मिलिंद होईन मी ॥ २२ ॥
उत्तरे विज्ञानगोदावरी । अनुभवकृष्णा दक्षिणपारीं ।
मध्यें भीमरथी सुंदरी । ब्रह्मानंदे वाहतसे ॥ २३ ॥
भागीरथी कीं भीमरथी । ज्या त्रिभुवनीं विख्यात मिरवती ।
यालागीं पुंडलीकवरद प्रीतीं । अक्षय वस्ती करी तेथें ॥ २४ ॥
जे कां दक्षिणद्वारावती । पंढरीची त्रिभुवनीं कीर्ती ।
जेथें विराजे पांडुरंगमूर्ती । भीमरथीतीरीं सर्वदा ॥ २५ ॥
त्या पांडुरंगक्षेत्रीं निश्चित । ब्रह्मानंदयति समाधिस्थ ।
जो वेदांतज्ञानी अद्भुत । महिमा त्याचा न वर्णवे ॥ २६ ॥
वंदूं कुलदैवत निश्चयेंसीं । जो महाराज प्रेमपुरविलासी ।
मणिमल्लमर्दन कैलासवासी । स्वानंदराशि जगदात्मा ॥ २७ ॥
वैराग्यतुरंगीं बैसला । बोधखाडां हातीं धरिला ।
अर्धांगी विलसे ज्ञानकळा । म्हाळसादेवी चिच्छक्ति ॥ २८ ॥
तडिदंबर परम तेजाळ । कीं उगवलें मार्तंडमंडळ ।
मणिमल्लादि कुटिल खळ । दळासहित मर्दिले ॥ २९ ॥
शातकुंभप्रभेसमान । उधळे भावहरिद्राचुर्ण ।
ग्रंथारंभीं मणिमल्लमर्दन । प्रेमभावें वंदिला ॥ ३० ॥
जे करवीरपुरविलासिनी । आदिमाया त्रिजगज्जननी ।
तिचा अनुग्रहबोधतरणी । हृदयाकाशीं उगवला ॥ ३१ ॥
जे लावण्यामृताची सरिता । मनोरथ पुरवी कल्पलता ।
शक्रनंदन विधि सविता । जिचें करिती आराधन ॥ ३२ ॥
भेदकोल्हासुरसंहारके । निजज्ञानामृतदायिके ।
श्रीधरतान्हें कौतुकें । ओसंगा घेई आपुल्या ॥ ३३ ॥
पाजूनियां प्रेमपान्हा । बोलवीं पांडवप्रतापरचना ।
ते आदिमाया विष्णुललना । ब्रह्मानंदे वंदिली ॥ ३४ ॥
वंदूं तो दक्षिणकेदार । रत्नाचलविलासी प्रतापशूर ।
करीत दैत्यांचा संहार । दक्षिण्दिशे पातला ॥ ३५ ॥
जो भक्तांस सौम्य शीतल । दैत्यांस भासे प्रलयकाल ।
ऋषि सुर नर सकल । पदकमल वंदिती सदा ॥ ३६ ॥
अन्नसत्रकथा भारती । नवरसान्नें स्वाद देती ।
श्रवणभोजना संतपंक्ती । परमप्रीतीं बैसली ॥ ३७ ॥
मूळभारतकर्ता वेदव्यास । लेखक जाहला जेथें गणेश ।
तेथें म्यां ग्रंथ केला हा सोस । व्यर्थ कासया घेइजे ॥ ३८ ॥
व्यास वाल्मीक कवि श्रेष्ठ । कवि गुरु गौतम वसिष्ठ ।
पूर्वीचे कवि संत वरिष्ठ । महिमा अद्भुत तयांचा ॥ ३९ ॥
कलियुगीं जाहले जे संत । वर्तमानींचे आतां समस्त ।
पुढें होणार जे निश्चित । दीर्घ दंडवत समस्तांतें ॥ ४० ॥
श्रोते बोलती कुशल । सांडोनि आतां सर्व पाल्हाळ ।
बोलें भारत रसाळ । आदिपर्वापासोनि ॥ ४१ ॥
आधींच भारतग्रंथ थोर । तो तूं बोलसी सविस्तर ।
तरी ग्रंथ होईल जैसा समुद्र । श्रोते चतुर विटती ॥ ४२ ॥
बोलसी ध्वनित गुह्यार्थ । तरी अबलांस न कळे यथार्थ ।
तरी थोडक्यांत रस अद्भुत । कथा समस्त आवरीं ॥ ४३ ॥
ब्रह्मानंदपुत्र श्रीधर । सकल कविसंतांचा किंकर ।
साष्टांग घालूनि नमस्कार । म्हणे सादर परिसा आतां ॥ ४४ ॥
उग्रश्रवा लोमहर्षणी । शौनकादिक अपार मुनी ।
सूतास पुसती नैमिषारण्यीं । भारत निरोपीं आम्हांतें ॥ ४५ ॥
जो वैकुंठनारायण । तोच अवतरला कृष्णद्वैपायन ।
तेणें शब्दब्रह्म मथून । भारतसार काढिलें ॥ ४६ ॥
साठ लक्ष महाभारत । देवलोकीं अर्ध दिधलें यथार्थ ।
पंचदश लक्ष गोड बहुत । पितृलोकीं ठेविलें ॥ ४७ ॥
पावणेचवदा लक्ष सुरस । गंधर्वलोकीं ठेवी वेदव्यास ।
सवालक्ष मनुष्यांस । मृत्युलोकीं ठेविलें ॥ ४८ ॥
मनुष्यांचे अन्नगत प्राण । अल्पायुषी बहुत विघ्न ।
कृपाळु सत्यवतीनंदन । तेणें सुरस काढिलें ॥ ४९ ॥
तें जनमेजयें करिता प्रश्न । व्यासशिष्य वैशंपायन ।
तेणें सांगता संपूर्ण । मग प्रगटलें जगतीवरी ॥ ५० ॥
हरिवंशासमवेत । अवघे सवालक्ष भारत ।
बृहदश्वा हे कथा अद्भुत । स्वर्गी सांगे निर्जरां ॥ ५१ ॥
असित ऋषि विख्यात । तो पितृलोकीं हे कथा वर्णित ।
यक्ष राक्षस विद्याधर समस्त । शुकमुखें श्रवण करिती ॥ ५२ ॥
मनुष्यलोकीं सर्वज्ञ । जनमेजया सांगे वैशंपायन ।
त्यामाजी आख्यानें पावन । गीता सनत्सुजातादि ॥ ५३ ॥
स्वयें बोलिला सत्यवतीसुत । भारतीं शब्दकूटगणित ।
आठ सहस्त्र आठ शत । संख्या नेमस्त म्यां केली ॥ ५४ ॥
त्यांत मी मानितों यथार्थ । शुक जाणे तेथींचा अर्थ ।
संजय चतुर बहुत । जाणतो किंवा नेणतो पैं ॥ ५५ ॥
अर्थ मनास आणित । हेरबं चपलत्वें लिहित ।
म्हणोनि कूटें अद्भुत । व्यास घालित ठायीं ठायीं ॥ ५६ ॥
असो कथा ऐका विचित्र । कुरुक्षेत्रीं दीर्घसत्र ।
जनमेजय आचरितां पवित्र । सिद्धी न पावे सर्वथा ॥ ५७ ॥
श्रुतसेन उग्रसेन भीमसेन । हे जनमेजयाचे बधुं तिघे जण ।
सकल पारिपत्य त्यांआधीन । रायें केलें सत्रींचें ॥ ५८ ॥
तिहीं देवशुनीचा सुत । सारमेय दूर होता क्रीडत ।
अन्याय नसतां किंचित । दंडप्रहारें ताडिला ॥ ५९ ॥
तो रोदन करीत मातेस सांगे । येरी राजसभे पातली वेगें ।
म्हणे अनीतिवेश्येसंगें । दवडिली नीतिधर्मपत्नी ॥ ६० ॥
राव विचारी बंधूंस । तों अन्याय लगटला अंगास ।
बोलावया वाग्देवीस । शब्द सहसा फुटेना ॥ ६१ ॥
शुनी बोले शापवचन । सिद्धी न पावे तुझा यज्ञ ।
राजा होऊन उद्विग्न । मृगयेप्रति चालिला ॥ ६२ ॥
श्रुतश्रव्याचा सुत । सोमश्रवा ज्ञानी अद्भुत ।
त्याचे हातें नृपनाथ । आरंभीत सत्रातें ॥ ६३ ॥
धौम्यऋषि परमपावन । त्याचे शिष्य तिघे जण ।
वेद अरुणी उपमन्य । आज्ञापिती गुरु त्यांतें ॥ ६४ ॥
पांचाळखंडा जाऊनी ॥ केदार आणीं बांधूनी ॥
ऐसें ऐकोन अरुणी ॥ पाणी नेत वाफियांते ॥ ६५ ॥
वाटेस फुटता केदार । न मिळे मृत्तिका पाषाण अणुमात्र ।
आडवे घालून आपुले शरीर । बहुत दिवस निजला ॥ ६६ ॥
काय जाहलें शिष्यवत्सासी । म्हणोनि धौम्य पाहूं आला त्यासी ।
सद्गदित हौन मानसीं । हृदयीं धरिला सप्रेम ॥ ६७ ॥
म्हणे तूं धन्य गुरुदास । ऐश्वर्य सर्व पावें निर्दोष ।
प्रज्ञा आणि ज्ञान विशेष । हो वढातें तुझे ठायीं ॥ ६८ ॥
आतां दुसरा शिष्य उपमन्य । तो करिता जाहला गोरक्षण ।
धर्मारण्यांत नेऊन । गोशुश्रूषा बहुत करी ॥ ६९ ॥
जाहले दिवस बहुत । धौम्य उपमन्या पुसत ।
बालका शरीररक्षणार्थ । काय उपाय करितोसी ॥ ७० ॥
येरु म्हणे भिक्षान्नें असें जिवंत । गुरु म्हणे तें निषिद्ध यथार्थ ।
सद्गुरुस अर्ध द्यावें सत्य । अन्न तरीच पावन तें ॥ ७१ ॥
येरु म्हणे आज्ञा प्रमाण । मग अर्धभिक्षा देत आणून ।
पक्ष मास लोटतां पूर्ण । गुरु पुढती आज्ञापी ॥ ७२ ॥
म्हणे वत्सा अवंचकपणे । भिक्षा अवघी आम्हांस देणें ।
उपमन्य अवश्य म्हणे । आज्ञेप्रमाणें वर्ततों ॥ ७३ ॥
दुसर्यानें भिक्षा करित । गुरुनें तेंही वर्जिलें समस्त ।
जनांस पीडिशी बहुत । द्विवार भिक्षा न मागें तूं ॥ ७४ ॥
अवश्य म्हणोनि तो कुमार । वनी धेनु चारी निराहार ।
बहु पीडितां क्षुधावैश्वानर । सेवी गोक्षीर द्रोणभरी ॥ ७५ ॥
गुरु म्हणे उच्छिष्ट केलें । यज्ञासी नाहीं कदा घेतलें ।
मग तेंही शिष्यें वर्जिलें । क्लेश तिरस्कार न मानितां ॥ ७६ ॥
मग वत्सें दुग्ध पितां विशेष । मुखांतून गळूं लागला फेंस ।
तो पान करितां कायेस । दीप्ति चढे पुढती ॥ ७७ ॥
गुरु तयासी पुसत । येरु वर्तलें तें सांगत ।
आचार्य म्हणे पातक बहुत । पान न करीं सहसाही ॥ ७८ ॥
आवश्य म्हणे उपमन्य । मग अर्कीचा चीक काढून ।
पान करितां द्रोण भरुन । गेले नयन विषें तया ॥ ७९ ॥
धेनु आणितां गृहालागून । कूपांत पडला उपमन्य ।
गुरु म्हणे परम सहिष्ण । बाल काय जाहला ॥ ८० ॥
गुरु परम सद्गद होऊनी । बाहत हिंडे घोर काननीं ।
वत्सा उपमन्या येऊनी । मज भेटें रे स्नेहाळा ॥ ८१ ॥
तंव तो कूपांतून तांतडीं । सद्गुरुनामें हांक फोडी ।
स्वामी मज एथूनि काढीं । अति अवघडीं पडियेलों ॥ ८२ ॥
तेथें गुरु आला ते अवसरीं । म्हणे वत्सा तूं भय न धरीं ।
अश्विनौदेवांचें स्तवन करीं । कृपा तुजवरी करतील ते ॥ ८३ ॥
स्तवनासरसे दोघे येती । अपूप आणून दिधला हातीं ।
येरु म्हणे मी न भक्षीं कल्पांतीं । सद्गुरुप्रति न देतां ॥ ८४ ॥
देखोनि निकट गुरुदास । अश्विनौदेव पावले हर्ष ।
दिव्य दृष्टि देऊनि त्यास । कूपाबाहेर काढिलें ॥ ८५ ॥
प्रसन्न होऊन ते क्षणीं । वर देती आनंदोनी ।
वेदशास्त्रसंपन्न होऊनी । अनुभवज्ञानी निपुण हो ॥ ८६ ॥
ऋद्धि सिद्धि तुझे घरीं । वोळंघती अहोरात्रीं ।
तुझे दर्शनें या धरित्रीं । उद्धरतील जीव बहु ॥ ८७ ॥
शेवटीं स्वच्छंदें होईल मरण । पावसी हरिपद निर्वाण ।
ऐसें बोलोनि दोघे जण । अंतर्धान पावले ॥ ८८ ॥
यावरी तो उपमन्य । जाऊनि धरी सद्गुरुचे चरण ।
तेणेंही तैसेच वर देऊन । आश्रमा आपुल्या धाडिला ॥ ८९ ॥
यावरी तृतीय शिष्य वेद सत्य । तेणें गुरुसेवा केली बहुत ।
जाणोन गुरुचे मनोरथ । पुरवी अर्थ सर्वही ॥ ९० ॥
गुरुस प्रिय तेंचि आचरत । न सांगतां मनींचें जाणत ।
केलें लोकीं न मिरवत । झिजवी शरीर सेवेसी ॥ ९१ ॥
आलियाही मरण । न सांडी मर्यादा जाण ।
अर्पियेलें तनुमनधन । वरकड तेथें कायसें ॥ ९२ ॥
अग्रापासूनि मूलपर्यंत । इक्षुदंड गोड बहुत ।
तैसा भजनीं उल्हासत । दिवसेंदिवस आगळा ॥ ९३ ॥
गुरुहून ईश्वर भिन्न । ऐसें कल्पिना गेलिया प्राण ।
गुरुसेवा परमानुष्ठान । मंत्र पूर्ण गुरुनाम ॥ ९४ ॥
सेवा देखोनि धौम्य ऋषी । परम संतोषला मानसीं ।
आलिंगोनियां तयासी । मस्तकीं हस्त ठेविला ॥ ९५ ॥
सर्वज्ञ आणि अगर्वता । रुपवती आणि पतिव्रता ।
सभाग्य आणि उदारता । हें तों दुर्लभ त्रिभुवनीं ॥ ९६ ॥
सभाग्य पुत्र आणि पितृभक्त । शास्त्रज्ञ आणि वैराग्ययुक्त ।
ब्रह्मज्ञानी आणि निरपेक्षचित्त । हें तों दुर्लभ त्रिभुवनीं ॥ ९७ ॥
गुरु पंडित आणि उदास । शिष्य प्रज्ञावंत भावविशेष ।
हिरा आणि तोचि परीस । हें तों दुर्लभ त्रिभुवनी ॥ ९८ ॥
असो संतोषोनि गुरुनाथ । वेदशिष्यास आज्ञा देत ।
म्हणे वत्सा आश्रमा त्वरित । जाऊनि नांदें यथाविधि ॥ ९९ ॥
संतति संपत्ति दिव्यज्ञान । हें हो प्राप्त तुजलागून ।
यावरी तो आज्ञा घेऊन । निजाश्रमीं राहिला ॥ १०० ॥
तेणें करुन तीन शिष्य । पाळी पुत्राहुन विशेष ।
गुरुगृहीं आपण भोगिले क्लेश । म्हणूनि सेवा न सांगे त्यां ॥ १०१ ॥
तेणें उत्तंकनामा शिष्य जाण । गृहीं ठेवूनियां रक्षण ।
जनमेजयाचे सत्रीं जाऊन । ऋत्विज जाहला वेद तो ॥ १०२ ॥
मागें भार्या तरुण रुपवती । कामानलें आहाळली चित्तीं ।
प्रार्थिती जाहली उत्तंकाप्रती । मजप्रति भोगीं तूं ॥ १०३ ॥
मी गुरुतुल्य गुरुगृहिणी । वचन एवढें माझें मानीं ।
येरें ऐकतां निजकर्णी । बोटें घालून बुजवित ॥ १०४ ॥
हरिस्मरण करुन देख । म्हणे तूं माता मी बालक ।
मनी भावोनि परम दुःख । परता गेला उठोनियां ॥ १०५ ॥
भुजंगावरी न घालवे हात । उडी न टाकवे अग्नींत ।
तैसी परम सती भावित । तरी तो नारायण नर नव्हे ॥ १०६ ॥
रुपवती सभाग्य उदार तरुण । एकांती प्रार्थी स्वयें येऊन ।
ज्याचें विकार न पावे मन । तरी तो नारायण नर नव्हे ॥ १०८ ॥
निंदक निंदिती रात्रंदिन । संतापे न पोळे ज्याचें मन ।
हरिरुप देखे सर्वजन । तरी तो नारायण नर नव्हे ॥ १०९ ॥
मनोजय वासनाक्षय । सर्वज्ञ दयाळ सदा सदय ।
रावरंक समान पाहे । तरी तो नारायण नर नव्हे ॥ ११० ॥
वेद आश्रमा आला परतोन । ज्ञानदृष्टया कळलें वर्तमान ।
म्हणे हा ईश्वर केवळ पूर्ण । इंद्रयजित निश्चयें ॥ १११ ॥
गुरुकृपा आणि शास्त्रीं दृष्टी । ब्रह्मवेत्ता सत्कर्मराहटी ।
तरी सकळ तीर्थें भेटी । येती त्याचिया जाणिजे ॥ ११२ ॥
वेदें उत्तंक धरिला हृदयीं । म्हणे सर्व सुख पावसीं गृहीं ।
आतां स्वस्थलाप्रति जाईं । तंव तो काय बोलत ॥ ११३ ॥
म्हणे कांहीं गुरुदक्षिणा । मज मागावी सर्वज्ञा ।
स्त्रियेस पुसे तो ऋषिराणा । माग कांहीं इच्छित ॥ ११४ ॥
म्हणे यूपभूपालाची गृहिणी । दिव्य कुंडलें तिचे कर्णीं ।
तीं आणून दे चौथे दिनीं । मांगल्यकर्मी ल्यावया ॥ ११५ ॥
तीं कुंडलें रविसमद्युती । इच्छिले वेळे अमृत स्त्रवती ।
येरु चालिला त्वरितगती । तों मार्गीं वृषभ देखिला ॥ ११६ ॥
त्यावरी एक पुरुष देखिला । तेणें गोमय दिधलें ते वेळां ।
म्हणे हें सेवीं बाळा । येरें तत्काळ भक्षिलें ॥ ११७ ॥
मूत्र लाविलें वदनीं । तयासी वंदन करुनी ।
गुरुपासका कृत्रिमकरणी । कोणाचीही चालेना ॥ ११८ ॥
पुढें चालिला वेगेंकरुन । लंघिलें परम घोर विपिन ।
पावोनि यूपराजसदन । तंव कोठें काहीं दिसेना ॥ ११९ ॥
बाहेर आला परतोन । निकेतनीं न दिसे गृहिणी पूर्ण ।
म्हणे उच्छिष्ट असेल वदन । मुखप्रक्षालन करी वेगें ॥ १२० ॥
मग शुद्ध होऊन पुढती । प्रवेशला निकेतनाप्रती ।
तों देखिली जैशी पार्वती । सर्वलक्षणीं मंडित ॥ १२१ ॥
केलें बहुत स्तवन । सांगितलें सकल वर्तमान ।
म्हणे गुरुगृहिणीनें पूर्ण । तुझीं कुंडलें मागितलीं ॥ १२२ ॥
भूपालआज्ञेवरुन । द्विज तोषविला कुंडलें देऊन ।
म्हणे कुंडलें अमूल्य पूर्ण । तक्षकें हीं मागितलीं ॥ १२३ ॥
परी मीं दिधलीं नाहींत । तीं तुजलागीं जाहलीं प्राप्त ।
तरी मार्गीं सांभाळीं बहुत । तक्षक नेईल एखादा ॥ १२४ ॥
यूपराज म्हणे तूं धन्य । आज पितृयज्ञ जाईं संपादून ।
उत्तंक आज्ञेवरुन । राहिला होता ते दिवशीं ॥ १२५ ॥
तों मुक्तकेश होऊन । वाढिले हो दिव्यान्न ।
परी क्षणभरी लागला पूर्ण । पर्युषितपण सहज आलें ॥ १२६ ॥
आंत केश पडिला गळून । ऋषी म्हणे न जेवीं मी पूर्ण ।
रायें कोपोन शापिला ब्राह्मण । तव संतति न वाढो ॥ १२७ ॥
राजा विचारुन पाहात । तों केश देखिला अन्नांत ।
अधोवदनें विलोकित । प्रत्युत्तर नेदी कांहीं ॥ १२८ ॥
मग संतोषविला ब्राह्मण । तत्काल केलें शापमोचन ।
येरु म्हणे गुरुभक्तासी पूर्ण । शापबंधन बाधीना ॥ १२९ ॥
मग अभय मगून घेतलें निःशंक । पुढती करुन शुद्ध पाक ।
पिंडपितृयज्ञ करुन देख । मागुती उत्तंक बोळविला ॥ १३० ॥
तो गुरुभक्त निर्दोष । परनारी मानी जैसें विष ।
दुसर्याचे गुणदोष । दृष्टीं न पडती जयाचे ॥ १३१ ॥
आज्ञा घेऊनि उत्तंक ऋषी । जाता जहाला पवनवेगेंशीं ।
चिंता वाटे मानसीं । मागें पुढें पाहत ॥ १३२ ॥
तों तक्षक पाठीशीं धांवत । उत्तंक जाहला तृषाक्रांत ।
वापीचे तीरीं ठेवित । दिव्य कुंडलें तेधवां ॥ १३३ ॥
उदक प्राशितां उत्तंकें । कुंडलें नेलीं तक्षकें ।
येरु पाठीं धांवे तवकें । तंव तो भूमींत प्रवेशला ॥ १३४ ॥
काष्ठदंडें तो खणित । वरुन विलोकी विबुधनाथ ।
होऊनियां कृपावंत । वज्र प्रेरी तत्काल पैं ॥ १३५ ॥
धरा फोडून सवेग । करुन दाविला मोकळा मार्ग ।
उत्तंक प्रवेशला मनीं राग । न सांवरे तयातें ॥ १३६ ॥
नागभुवन देखे अद्भुत । पद्मिणी नारी विराजित ।
ब्राह्मण तक्षका धुंडित । निर्भय निःशंक एकला ॥ १३७ ॥
तों देखिला धाता विधाता । श्वेतकृष्णदोरा कांतितां ।
द्वादशधारचक्र पाहतां । द्वादशपुत्र षट्कुमार ॥ १३८ ॥
तंव एक देखिला महापुरुष । तो म्हणे स्तवीं इंद्रास ।
तेणे स्तवितां अमरेश । तोंश्वेताश्व देखिला ॥ १३९ ॥
पुरुष म्हणे उत्तंका । या तुरगाचें अपान फुंकीं कां ।
येरें तैसेंचि केलें देखा । तों अपूर्व वर्तलें ॥ १४० ॥
अश्वाचे मुखीं कर्णीं नयनीं । ज्वाळा प्रकटती ते क्षणीं ।
धूर भरला पातालभुवनीं । तडफडती पादोदर ॥ १४१ ॥
तक्षक भयभीत ते क्षणीं । कुंडलें उत्तंका देऊनी ।
मज अकस्मात सांपडली वनीं । तुझीं म्हणून नेणें मी ॥ १४२ ॥
पुरुष म्हणे उत्तंकालागूनी । पळें वेगें अश्वावरी बैसोनीं ।
येरें तो पुरुष वंदूनी । ओळंघे तुरंगीं त्वरेनें ॥ १४३ ॥
चतुर्थ दिवशीं तो द्विजन्मा । पावला वेगें वेदाश्रमा ।
कुंडलें देऊनि रामा । सद्गुरुची तोषविली ॥ १४४ ॥
वेदें हृदयीं धरिला उत्तंक । म्हणे मार्गी काय देखिलें कौतुक ।
येरु म्हणे स्वामी तूं रक्षक । नानापरी सांबाळिलें ॥ १४५ ॥
परी भेटले ते कोण । सांगावें तें कृपा करुन ।
गुरु म्हणे वृषभारुढ पुरुष जाण । ऐरावतारुढ इंद्र तो ॥ १४६ ॥
गोमय भक्षिलें विशेष । तोचि जाण सुधारस ।
तरी सर्पभुवनाहूनि निर्दोष । विषरहित आलासी ॥ १४७ ॥
क्षपणक तो कलि सत्य । तुज व्यसनीं पाडूं पाहत ।
परी पुण्यशील तूं गुरुभक्त । तुज स्पर्श न करवे ॥ १४८ ॥
धाता विधाता देखिले ते क्षणीं । कृष्ण श्वेत दोरे दोनी ।
ते दिवसरात्र्यंश गणीं । देखिले नयनीं तुवां कीं ॥ १४९ ॥
द्वादशधार देखिलें चक्र । ते द्वादश मेघ चढले अपार ।
देखिले जे षट्कुमार । षडऋतु तेच पैं ॥ १५० ॥
पातालीं पुरुष तो मेघ जाण । अश्व तो ओळखें द्विमूर्द्धान ।
तेणें तुझी साह्यता करुन । एथवरी आणिलें ॥ १५१ ॥
मग उत्तंकासी धरुन हृदयीं । म्हणे स्वाश्रमा प्रति जाई ।
तूं सर्वदा हो विजयी । बहुत सुख भोगीं कां ॥ १५२ ॥
आश्रमा आला उत्तंक । परी तक्षकें भोगविलें दुःख ।
तें आठवून देख । तळमळित विप्र तो ॥ १५३ ॥
मग जाऊन कुरुक्षेत्रा । भेटला जनमेजय नरेंद्रा ।
म्हणे सर्पसत्र करुन पवित्रा । पितृसूड घेईं कां ॥ १५४ ॥
अरे परीक्षितीचा प्राण । घेतला तक्षकें न लगतां क्षण ।
ऐसें जनमेजया क्षोभवून । सर्पसत्र मांडिलें ॥ १५५ ॥
यावरी च्यवनभार्गवाचा पुत्र । प्रतीतिनामें परम पवित्र ।
रुरुनामा ऋषीश्वर । त्याचे पोटीं जन्मला ॥ १५६ ॥
त्याची प्रिया प्रवीण पद्मिणी । रुपवती चातुर्यखाणी ।
ते आश्रमीं असतां कामिनी । सर्पदंश जाहला ॥ १५७ ॥
तिचें आलिंगून कुणप । रुरु करी दीर्घ विलाप ।
तिचे आठवून गुण स्वरुप । वदन पिटी आक्रोशें ॥ १५८ ॥
म्हणे मित्रपुत्रा कृपावंता । उठवीं एवढी लावण्यसरिता ।
म्यां जोडिलें असेल त्या सुकृता । पालटें इचे देईन ॥ १५९ ॥
साधु संत देव ब्राह्मण । माता पिता गुरु जाण ।
यांचें केलें असेल भजन । तरी प्राण परतो इयेचा ॥ १६० ॥
अयाचित दुर्बळ ब्राह्मण । पीडिला बहुत ऋणेंकरुन ।
त्याचें केलें असेल ऋणमोचन । तरी प्राण परतो इयेचा ॥ १६१ ॥
दीन परदेशी रोगिष्ठ केवळ । त्याचा केला असेल सांभाळ ।
मिथ्या अबिशाप बोलतां खळ । जरी उठोन गेलों असें ॥ १६२ ॥
अनाथप्रेताग्निसंस्कार । तरुण दरिद्रियाचें लग्न साचार ।
साह्य केलें असेल निर्धार । तरी प्राण परतो इयेचा ॥ १६३ ॥
रुरु स्त्रीचें प्रेत घेऊनी । रुदन करी घोर वनीं ।
तों देवदूत गगनीं । विमानीं बैसोन ऐकती ॥ १६४ ॥
तिहीं विमानगति खुंटवून । पाहते जाहले एक क्षण ।
करुणाशब्द ऐकोन । हृदय त्यांचें कळवळलें ॥ १६५ ॥
परोपकार परम पुण्य । सत्तासामर्थ्य वेंचून ।
मित्र आपुला मित्रनंदन । प्रार्थून प्राण आणिला ॥ १६६ ॥
सावध जाहली पद्मिणी । रुरुचा हर्ष न माये गगनीं ।
देवदूतांचे चरण धरुनी । स्तवन करी क्षणाक्षणां ॥ १६७ ॥
बहुत ग्रंथ कासया श्रवण । सारासारविचार पूर्ण ।
अर्धश्लोकीं व्यास सांगे संपूर्ण । निगमागमगुह्य जें ॥ १६८ ॥
श्लोकार्थ - परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ॥
परोपकार हेंच पुण्य अमूप । परपीडा हेंच महत्पाप ।
आपुले यत्नें पुण्यरुप । क्लेश हरती परांचे ॥ १६९ ॥
आपणासमान विश्व पाहत । पराच्या मोदें अति संतोषत ।
परक्लेशें व्याकुलचित्त । परोपकारी पुरुष तो ॥ १७० ॥
संकटीं पडतां प्राणी । पाठीस घाली कृपा करुनी ।
केलें सुकृत न वदे वदनीं । परोपकारी पुरुष तो ॥ १७१ ॥
धिक संपदा धिक ज्ञान । धिक विद्या धिक अभिमान ।
परोपकार केलियाविण । संपत्ति विधवा निंद्य ती ॥ १७२ ॥
परोपकाराविण नर । पशुवत संसारीं साचार ।
जे लेइले ते श्रृंगार । प्रेतास व्यर्थ जेवीं केला ॥ १७३ ॥
तो यानारुढ हिंडत । जैसें दहनार्थ चालविलें प्रेत ।
पुढें वाद्यें वाजवीत । तेवीं तो व्यर्थ संसारीं ॥ १७४ ॥
रुरु म्हणे धन्य धन्य । देवदूत तुम्ही पावन ।
तुमचे चरणावरुन । देह सांडणे हो माझा ॥ १७५ ॥
असो देवदूत गेले तेथूनी । आश्रमा आला प्रिया घेऊनी ।
परी सर्पाचा अपराध आठवूनी । तळमळित रात्रंदिवस ॥ १७६ ॥
रुरुनें सांडून आनुष्ठान । हस्ती लोहदंड सबळ घेऊन ।
सर्प मारी शोधून । वारुळें बिळें सर्वही ॥ १७७ ॥
करितां सर्पसंहार । देखिला दुंदुभिनामा अजगर ।
वरी करितां दंडप्रहार । तंव तो काय बोलिला ॥ १७८ ॥
मी पूर्वी होतों विप्र । खगनामा मुनीश्वर ।
म्यां करुन वस्त्राचा विखार । साधुसंता भेडसाविलें ॥ १७९ ॥
भयभीत ब्राह्मण । पळाले जप ध्यान सोडून ।
हांसले सकळ विषयी जन । तेणें शापून मज सर्प केलें ॥ १८० ॥
कोपिष्ठ तपस्वी साधुराव । बलिष्ठ प्रतिष्ठित महानुभाव ।
यांसी विनोद करितां अपाव । कदा काळीं चुकेना ॥ १८१ ॥
तरी रुरु अवधारीं । सर्वथा तूं मज न मारीं ।
जनमेजयाचे सत्रीं । संहार सर्पा होईल ॥ १८२ ॥
रुरुचे दर्शनें साचार । उद्धरला तो अजगर ।
दिव्यदेह पावून सत्वर । स्वर्गाप्रति पावला ॥ १८३ ॥
मातृशापेंकरुन देख । यागीं जळतील दंदशूक ।
सूतांस म्हणे शौनक । कथा सांगे सुरस ती ॥ १८४ ॥
दक्षाच्या कन्या तत्त्वतां । कश्यपस्त्रिया कद्रू विनता ।
लावण्यखाणी पतिव्रता । परी मत्सर दोघींमध्ये ॥ १८५ ॥
सेवेनें तोषविला भ्रतार । देत कश्यप दिव्य वर ।
कद्रूस म्हणे तुज पुत्र । सहस्त्र एक होतील ॥ १८६ ॥
परम बलिष्ठ दोघे जण । विनते तुज होतील नंदन ।
दोघींस देऊन रेतदान । कश्यप गेला अनुष्ठाना ॥ १८७ ॥
यथाकाळें कद्रू वेल्हाळी । सहस्त्र अंडीं प्रसवली ।
दिव्य तेजोमय आगळीं । विनता अंडीं दोन प्रसवे ॥ १८८ ॥
होतां पंचशत संवत्सर । सहस्त्र अंडीं उलोन सत्वर ।
जन्मले घोर विखार । भयंकर धुंधुकारती ॥ १८९ ॥
शेष वासुकी तक्षक अही । कर्कोटक ऐरावत धनंजय पाहीं ।
मणिव्यालपत्रादि सर्वही । पुत्र ऐसे प्रसवली ॥ १९० ॥
कद्रू देखोनि पुत्रवती । विनता तळमळी परम चित्तीं ।
दिवस न भरतां स्वहस्तीं । अंडें एक फोडिलें ॥ १९१ ॥
तों चरणाकडे अर्धशरीर । निपजलें नाहीं साचार ।
रुधिरमांसमय ताम्र । लवथवीत न धरवे ॥ १९२ ॥
तो महाराज अरुण । मातेस बोलिला शापवचन ।
दिवस न होतां संपूर्ण । अंडें फोडिलें त्वरेनें ॥ १९३ ॥
जिचे द्वेषें फोडिलेंअंदें पाहीं । तिचेच घरीं दासी होईं ।
सहस्त्र हायनें कदाही । तुज सुटका नव्हेचि ॥ १९४ ॥
वचन ऐकें निर्धारीं । दुसरें अंडें जतन करीं ।
सहस्त्र वर्षांउपरी । आपेंआप उलेल ॥ १९५ ॥
त्यांत जन्मेल सुपर्ण । सोडवील दासीपणापासून ।
करील त्रैलोक्य पावन । विष्णुवाहन होईल तो ॥ १९६ ॥
ऐसा जन्मला अरुण । आरक्तवर्ण देदीप्यमान ।
सूर्यरथीं सारथी होऊन । अद्यापि अचल बैसला ॥ १९७ ॥
मग दुसरें अंडें निगूढ स्थळीं । ठेवीत विनता वेल्हाळी ।
यावरी कद्रू एके काळीं । कापटय धरुन बोलत ॥ १९८ ॥
उच्चैःश्रवा नयनीं । पाहूं चला दोघीजणी ।
मग सूर्याजवळ येऊनी । विलोकित्या जाहल्या ॥ १९९ ॥
अतिश्वेत तेजाळ । उदधि मंथून नवनीतगोळ ।
शशांक बंधु तो निर्मळ । वेग प्रबळ तयाचा ॥ २०० ॥
त्या अश्वोत्तमाची प्रतिमा । निर्मूं न शके कमलजन्मा ।
ज्याचिया वेगाची सीमा । मनासही आकळेना ॥ २०१ ॥
शौनक म्हणे सूता निर्धारीं । उच्चैःश्रवा कैसा जन्मला समुद्रीं ।
सूत म्हणे अवधारीं । चरित्र त्याचें किंचित ॥ २०२ ॥
इंद्रास गुरुअवज्ञेचा दोष । वरी दुर्वासाचा शाप विशेष ।
तेणें स्वर्गसंपत्ति निःशेष । समुद्रांत पडियेली ॥ २०३ ॥
सर्व त्रिदश दिशाहीन । पद्मोद्भवा गेले शरण ।
मग ब्रह्मयासमवेत मिळोन । वैकुंठास पातले ॥ २०४ ॥
बहुत करितां स्तवन । तोषला पद्माक्षीरमण ।
म्हणे दैत्यांस साह्य करुन । समुद्रमंथन करा तुम्ही ॥ २०५ ॥
अन्योक्तीच्या प्रसंगेंसीं । धाकटे काम सांगा दैत्यांसी ।
त्यावरी ते गर्वराशी । अवलंबतील थोर कार्य ॥ २०६ ॥
तेथें मी तुमची पाठी । सर्वस्वें रक्षीन जगजेठी ।
ऐसी ऐकतां गोष्टी । त्रिदशेश्वर चालिला ॥ २०७ ॥
आत्मकार्य साधावया पूर्ण । बलीच्या गृहास येई सहस्त्रनयन ।
विरोचनसुतें सन्मान । बहुत केला ते समयीं ॥ २०८ ॥
इंद्र म्हणे क्षीराब्धि मंथून । रत्नें काढावीं संपूर्ण ।
तुमचा आमचा समान । विभाग करुं साच हें ॥ २०९ ॥
अवश्य म्हणे प्रह्लादपौत्र । देव दानव जाहले एकत्र ।
विधि म्हणे रवी अवक्र । मंदराचळ पाहिजे ॥ २१० ॥
सहस्त्र योजनें भूमीमाझारीं । एकादशसहस्त्र योजनेंवरी ।
बहु प्रयत्न केला सुरासुरीं । परी कोणासी उपटेना ॥ २११ ॥
मग शेषाहातीं मुरारी । पर्वत काढवी झडकरी ।
तडाडिली तेणें धरित्री । गजबजलें त्रिभुवन ॥ २१२ ॥
शेषें उचलून मंदरगिरी । ठेविला क्षीराब्धिचे तीरीं ।
बिरडी तेव्हां निर्धारीं । वासुकीची केली हो ॥ २१३ ॥
कमलावराचे संकेतें । इंद्र म्हणे दानवांतें ।
तुम्ही धरणें पुच्छातें । मुख प्रतापें धरितों आम्ही ॥ २१४ ॥
दैत्य बोलती सत्राणें । अधमांग धरावें बलहीनें ।
शचीवर अवश्य म्हणे । मुख तुम्हींच धरा आतां ॥ २१५ ॥
असो दैत्यीं मुख दृढ धरिलें । देवीं पुच्छ आकळिलें ।
विषबाधेवेगळें । तमालनीळें त्यांस केलें ॥ २१६ ॥
समुद्रीं घालितां मंदरगिरी । बुडत चालला निर्धारीं ।
मग तो वैकुंठविहारी । कमठ तळीं जाहला ॥ २१७ ॥
गर्जना करिती सुरासुर । घुमों लागला क्षीरसागर ।
मंथन मांडिलें अनिवार । तडतडी शरीर वासुकीचें ॥ २१८ ॥
हेलावले सप्त पाताळ । घुमीघुमी विरिंचिगोळ ।
जळचर वनचर सकळ । गतप्राण पैं होती ॥ २१९ ॥
देव दैत्य श्रमले अपार । आंगीं लोटती घर्मपूर ।
तों मांडला प्रलय थोर । विष दुर्धर प्रगटलें ॥ २२० ॥
वासुकीच्या मुखामधून । कालकूट उसळलें दारुण ।
दैत्याचें समूह संपूर्ण । दग्ध करीत चालिलें ॥ २२१ ॥
विषाग्नि पेटला दारुण । अहाळूं लागलें त्रिभुवन ।
देव दैत्य शिवस्तवन । करिते जाहले तेधवां ॥ २२२ ॥
कृपें धांवला कैलासनायक । पसरोनियां विशाळ मुख ।
विष प्राशिलें सकळिक । कंठिच देख धरियेलें ॥ २२३ ॥
विषानल जाहला शीतळ । घुसळण मांडिले सबळ ।
चतुर्दश रत्नें तत्काळ । निघतीं जाहलीं तेधवां ॥ २२४ ॥
कमला कौस्तुभ शार्ङ्ग शंख । देऊनि पूजिला वैकुंठनायक ।
वसिष्ठास कामधेनु देख । उच्चैःश्रवा भास्करातें ॥ २२५ ॥
चंद्र स्वेच्छें विचरे गगनीं । सुरा देती दैत्यांलागुनी ।
ऐरावत पारिजातक रंभा रमणी । सहस्त्राक्ष आवरी ॥ २२६ ॥
विष पूर्वींच निघालें । तेंही चतुर्दशांत गणिलें ।
अमृतकुभं घेऊन ते वेळे । धन्वंतरी निघाला ॥ २२७ ॥
अमृतकुंभ देखतां दृष्टीं । धांवल्या दैत्यांच्या कोटी ।
सकळीं घालूनियां मिठी । सुधारसघट नेला ॥ २२८ ॥
म्हणती देवीं ठकविलें पूर्ण । अवघीं रत्नें नेलीं हिरुन ।
आतां सुधाकुंभ गेलिया प्राण । सर्वथा नेदूं देवांसी ॥ २२९ ॥
देव युद्धासी उठावले । परि अमृत दानवांकरी गेलें ।
इंद्रें वक्षःस्थल पिटिलें । म्हणे नासलें काज सर्व ॥ २३० ॥
धांव धांव श्रीकरधरा । वैकुंठवासी करुणाकरा ।
कैवारिया मुरहरा । पावें सत्वर ये वेळे ॥ २३१ ॥
मग तो परम पुरुष कैवल्यदानी । प्रगटला मोहिनीरुप धरुनी ।
जिच्या स्वरुपावरुनी । ब्रह्मांडचि वोवाळिजे ॥ २३२ ॥
आदिमाया प्रणवरुपिणी । तेही लागे इचे चरणीं ।
अनंत शक्तींची स्वामिणी । वेदपुराणीं वंद्य जे ॥ २३३ ॥
ब्रह्मा विष्णु शिव तीन्ही । गर्भी पाळी बाळें तान्हीं ।
दंततेज झळकतां क्षणीं । महामणी पाषाण होती ॥ २३४ ॥
कोटयानकोटी मीनकेतन । सांडणें होत नखावरुन ।
आंगींचा सुवास संपूर्ण । ब्रह्मांड भेदून वर जाई ॥ २३५ ॥
सहज बोलतां क्षितीं । वाटे रत्नराशी विखुरती ।
पदमुद्रा जेथें उमटती कमळें उगवती दिव्य तेथें । २३६ ॥
त्या सुवासास वेधून वसंत । भोंवता गडबडां लोळत ।
असो कैवल्यकनकलतिका अद्भुत । वैकुंठींहून उतरली ॥ २३७ ॥
नयनकटाक्षबाण । सोडी असुराकडे पाहून ।
दैत्य ओंवाळूं पाहती प्राण । वचनावरुन तियेच्या ॥ २३८ ॥
देवीं दैत्यीं युद्ध सांडिलें । पहावया भोंवतीं मिळाले ।
समस्तांचे मनोमृग पाडिले । नयनकटाक्षबाणेंचि ॥ २३९ ॥
बळे म्हणे इजवरुन । कमळा सांडवी ओंवाळून ।
जरी हे मज वरील संपूर्ण । तरी रत्नलाभ पावलों ॥ २४० ॥
या ब्रह्माडंमंडपांत देख । ऐसें स्वरुप न होय आणिक ।
तों ते चित्कळा हास्यमुख । करुन बोले बळीसी ॥ २४१ ॥
कोण कार्य काय स्वार्थ । कलह आरंभिला येथ ।
बळीनें अवघा वृत्तांत । तियेप्रति सांगितला ॥ २४२ ॥
ठकवून नेलीं अवघीं रत्नें । आतां भांडती अमृताकारणें ।
आमुचा व्यवहार तुवां निवडणें । वचनाधीन तुझ्या आम्ही ॥ २४३ ॥
मोहिनी म्हणे ते नष्ट सर्व । महा ठक मी जाणें देव ।
जरी माझे वचनीं धराल भाव । तरी अमृत वाढीन मी ॥ २४४ ॥
बळी म्हणे न्याय करीं । आमुचा बहु अभिमान धरीं ।
ऐसें बोलोन मोहिनीचे करीं । अमृतकुंभ दिधला ॥ २४५ ॥
विचित्र शाळा निर्मिल्या तेथ । सर्वां हातीं स्नानें करवित ।
दैत्यपंक्ती समस्त । उच्चस्थळीं बैसविल्या ॥ २४६ ॥
देव खालीं बैसविले । यावरी मोहिनी काय बोले ।
प्रथम कोणा वाढूं वहिलें । निरोप मजला सांगावा ॥ २४७ ॥
तों दैत्य बोलती विहित । आधी देवांस वाढीं अमृत ।
पाठीं आम्ही समस्त । प्राशन करु साच हें ॥ २४८ ॥
सिंहिकासुत राहु कुटिळ । दैत्यांमाजी धूर्त खळ ।
म्हणे दैत्य भुलले सकळ । मोहिनीरुपें विष्णु हा ॥ २४९ ॥
म्हणे बोलतां नये येथ। मनांत गुप्त ठेविली मात ।
देवांचा वेष धरुन धूर्त । सुरपंक्तीस बैसला ॥ २५० ॥
चंद्रार्कांमध्ये जाऊन । राहु बैसला कपट धरुन ।
तों यथानुक्रमेंकरुन । अमृत वाढी मोहिनी ॥ २५१ ॥
राहूचिया करांत । मोहिनी घाली अमृत ।
येरु मागें पुढें पाहत । म्हणे त्वरित हें घ्यावें ॥ २५२ ॥
श्रेष्ठीं घेतलें नसतां अकस्मात । राहु प्राशित अमृत ।
तें चंद्रार्कीं लक्षून त्वरित । मोहिनीस खुणाविलें ॥ २५३ ॥
दैत्य जाणोनि मोहिनी देख । काढून वामकर्णींचें ताटंक ।
राहूचें शिर एकाएक । गगनपंथें उडविलें ॥ २५४ ॥
शिर गर्जना करी निराळी । म्हणे दैत्य हो ठकलेत सकळी ।
मोहिनीरुपें वनमाळी । अमृत नेदी दैत्यांतें ॥ २५५ ॥
एकचि जाहला हाहाकार । अमृतकुंभ सत्वर ।
पळविता जाहला पुरंदर । हातोहात तेधवां ॥ २५६ ॥
मोहिनी जाहली गुप्त । संग्राम मांडला अद्भुत ।
देव म्हणती दैत्य रे दैत्य । साह्य समर्थ श्रीवल्लभ ॥ २५७ ॥
सवेंच नरनारायणरुप धरुन । पुन्हां प्रगटला भगवान ।
दैत्य अपार संहारुन । विजयी देव जाहले ॥ २५८ ॥
केलें अमृतहरण । दुःख हृदयीं आठवून ।
पुन्हां दैत्य करिती भांडण । म्हणती वांचून काय आतां ॥ २५९ ॥
अकाल प्रलय देखोनि ते वेळां । विधीनें नारद पाठविला ।
तो देवांस म्हणे आगळा । अभिमान सांडा व्यर्थ हा ॥ २६० ॥
सर्व वस्तू नेल्या ठकवून । पुनः त्यांसींच करितां भांडण ।
नारदवचनेंकरुन । देव सर्व माघारले ॥ २६१ ॥
मग बळीस म्हणे नारदमुनी । तुज काळ साह्य नाहीं ये क्षणीं ।
आतां विश्वजित यज्ञ करुनी । इंद्रपद घेई मग ॥ २६२ ॥
यथार्थ मानून दैत्य । स्वस्थला परतले समस्त ।
ग्रहणीं राहु केतु झोंबत । चंद्रसूर्यांस तैंपासूनी ॥ २६३ ॥
मग शतमख करी बळी । वामनरुपें वनमाळी ।
प्रगटोन घातला पाताळीं । अचळ राज्य दिधलें त्या ॥ २६४ ॥
सूत सांगतां हें कथन । तोषले शौनकादि मुनिजन ।
सुधारसाहून गहन । गोड कथा ऐकिली ॥ २६५ ॥
ब्रह्मानंदें जोडून कर । भक्तपंडितां विनवी श्रीधर ।
पुढें कथा सुरस फार । अत्यादरें परिसिजे ॥ २६६ ॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्व व्यासभारत ।
त्यांतील सारांश यथार्थ । प्रथमाध्यायीं कथियेला ॥ २६७ ॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ । आदिपर्वटीका श्रीधरकृत ।
मंगलाचरण उत्तंककथाभावार्थ । समुद्रमथन संपविलें ॥ २६८ ॥
इति श्रीधरकृतपांडवप्रतापादिपर्वणि प्रथमोध्यायः ॥ १ ॥
॥ अध्याय पहिला समाप्त ॥
GO TOP
|