श्रीहरिवंशपुराण
विष्णुपर्व
विंशोऽध्यायः


हल्लीसकक्रीडनम्

वैशंपायन उवाच
गते शक्रे ततः कृष्णः पूज्यमानो व्रजालयैः ।
गोवर्धनधरः श्रीमान् विवेश व्रजमेव ह ॥ १ ॥
तस्य वृद्धाभिनन्दन्ति ज्ञातयश्च सहोषिताः ।
धन्याः स्मोऽनुगृहीताः स्मस्त्वद्वृत्तेन नयेन च ॥ २ ॥
गावो वर्षभयात् तीर्णा वयं तीर्णा महाभयात् ।
तव प्रसादाद्‌ गोविन्द देवतुल्यपराक्रम ॥ ३ ॥
अमानुषाणि कर्माणि तव पश्याम गोपते ।
धारणेनास्य शैलस्य विद्मस्त्वां कृष्ण दैवतम् ॥ ४ ॥
कस्त्वं भवसि रुद्राणां मरुतां च महाबलः ।
वसूनां वा किमर्थं च वसुदेवः पिता तव ॥ ५ ॥
बलं च बाल्ये क्रीडा च जन्म चास्मासु गर्हितम् ।
कृष्ण दिव्या च ते चेष्टा शङ्‌‌‍कितानि मनांसि नः ॥ ६ ॥
किमर्थं गोपवेषेण रमसेऽस्मासु गर्हितम् ।
लोकपालोपमश्चैव गास्त्वं किं परिरक्षसि ॥ ७ ॥
देवो वा दानवो वा त्वं यक्षो गन्धर्व एव वा ।
अस्माकं बान्धवो जातो योऽसि सोऽसि नमोऽस्तु ते ॥ ८ ॥
केनचिद् यदि कार्येण वससीह यदृच्छया ।
वयं तवानुगाः सर्वे भवन्तं शरणं गताः ॥ ९ ॥
वैशंपायन उवाच
गोपानां वचनं श्रुत्वा कृष्णः पद्मदलेक्षणः ।
प्रत्युवाच स्मितं कृत्वा ज्ञातीन् सर्वान् समागतान् ॥ १० ॥
मन्यन्ते मां यथा सर्वे भवन्तो भीमविक्रमम् ।
तथाहं नावमन्तव्यः स्वजातीयोऽस्मि बान्धवः ॥ ११ ॥
यदि त्ववश्यं श्रोतव्यं कालः सम्प्रतिपाल्यताम् ।
ततो भवन्तः श्रोष्यन्ति मां च द्रक्ष्यन्ति तत्त्वतः ॥ १२ ॥
यद्ययं भवतां श्लाघ्यो बान्धवो देवसप्रभः ।
परिज्ञानेन किं कार्यं यद्येषोऽनुग्रहो मम ॥ १३ ॥
एवमुक्तास्तु ते गोपा वसुदेवसुतेन वै ।
बद्धमौना दिशः सर्वे भेजिरे पिहिताननाः ॥ १४ ॥
कृष्णस्तु यौवनं दृष्ट्‍वा निशि चन्द्रमसो वनम् ।
शारदीं च निशां रम्यां मनश्चक्रे रतिं प्रति ॥ १५ ॥
स करीषाङ्‌‌‍गरागासु व्रजरथ्यासु वीर्यवान् ।
वृषाणां जातदर्पाणां युद्धानि समयोजयत् ॥ १६ ॥
गोपालांश्च बलोदग्रान् योधयामास वीर्यवान् ।
वने स वीरो गाश्चैव जग्राह ग्राहवद् विभुः ॥ १७ ॥
युवतीर्गोपकन्याश्च रात्रौ संकाल्य कालवित् ।
ककैशोरकं मानयन् वै सह ताभिर्मुमोद ह ॥ १८ ॥
तास्तस्य वदनं कान्तं कान्ता गोपस्त्रियो निशि ।
पिबन्ति नयनाक्षेपैर्गां गतं शशिनं यथा ॥ १९ ॥
हरितालार्द्रपीतेन सकौशेयेन वाससा ।
वसानो भद्रवसनं कृष्णः कान्ततरोऽभवत् ॥ २० ॥
स बद्धाङ्‌‌‍गदनिर्व्यूहश्चित्रया वनमालया ।
शोभमनो हि गोविन्दः शोभयामास तद् व्रजम् ॥ २१ ॥
नाम दामोदरेत्येवं गोपकन्यास्तदाब्रुवन् ।
विचित्रं चरितं घोषे दृष्ट्‍वा तत् तस्य भास्वतः ॥ २२ ॥
तास्तं पयोधरोत्तुङ्‌‌‍गैरुरोभिः समपीडयन् ।
भ्रामिताक्षैश्च वदनैर्निरीक्षन्ते वराङ्‌‌‍गनाः ॥ २३ ॥
ता वार्यमाणाः पतिभिर्मातृभिर्भ्रातृभिस्तथा ।
कृष्णं गोपाङ्‌‌‍गना रात्रौ मृगयन्ते रतिप्रियाः ॥ २४ ॥
तास्तु पङ्‌‌‍क्तीकृताः सर्वा रमयन्ति मनोरमम् ।
गायन्त्यः कृष्णचरितं द्वन्द्वशो गोपकन्यकाः ॥ २५ ॥
कृष्णलीलानुकारिण्यः कृष्णप्रणिहितेक्षणाः ।
कृष्णस्य गतिगामिन्यस्तरुण्यस्ता वराङ्‌‌‍गनाः ॥ २६ ॥
वनेषु तालहस्ताग्रैः कूजयन्त्यस्तथापराः ।
चेरुर्वै चरितं तस्य कृष्णस्य व्रजयोषितः ॥ २७ ॥
तास्तस्य नृत्यं गीतं च विलासस्मितवीक्षितम् ।
मुदिताश्चानुकुर्वन्त्यः क्रीडन्ति व्रजयोषितः॥ २८ ॥
भावनिस्पन्दमधुरं गायन्त्यस्ता वराङ्‌‌‍गनाः ।
व्रजं गताः सुखं चेरुर्दामोदरपरायणाः ॥ २९ ॥
करीषपांसुदिग्धाङ्‌‌‍ग्यस्ताः कृष्णामनुवव्रिरे ।
रमयन्त्यो यथा नागं संप्रमत्तं करेणवः ॥ ३० ॥
तमन्या भावविकचैर्नेत्रैः प्रहसिताननाः ।
पिबन्त्यतृप्तवनिताः कृष्णं कृष्णमृगेक्षणाः ॥ ३१ ॥
मुखमस्याब्जसंकाशं तृषिता गोपकन्यकाः ।
रत्यन्तरगता रात्रौ पिबन्ति रसलालसाः ॥ ३२ ॥
हा हेति कुर्वतस्तस्य प्रहृष्टास्ता वराङ्‌‌‍गनाः ।
जगृहुर्निस्सृतां वाणीं नाम्ना दामोदरेरिताम् ॥ ३३ ॥
तासां ग्रथितसीमंता रतिं नीत्वाऽऽकुलीकृताः ।
चारु विस्रंसिरे केशाः कुचाग्रे गोपयोषिताम् ॥ ३४ ॥
एवं स कृष्णो गोपीनां चक्रवालैरलंकृतः ।
शारदीषु सचन्द्रासु निशासु मुमुदे सुखी ॥ ३५ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
विष्णुपर्वणि हल्लीसकक्रीडने विंशोऽध्यायः ॥ २० ॥


रासक्रीडा -

वैशंपायन सांगतात : - इंद्र स्वस्थानी गेल्यानंतर व्रजवासी लोकांना पूज्य झालेला गोवर्धनोद्धारक सुंदर कृष्ण व्रजामध्ये परत आला. तेव्हां व्रजांत राहणारे त्याच्या जातीचे लोक व विशेषतः वृद्ध लोक अभिनंदनपूर्वक त्याला म्हणूं लागले, " देवा, धन्य आहो आम्ही कीं, ज्या आम्हांला तुझ्यासारख्या जगद्‍गुरुच्या शिकवणीचा ( बोधामृताचा ) व अद्भुत करणीचा लाभ झाला आहे. केवळ तुझ्या कृपाप्रसादाने पावसाच्या अरिष्टापासून गाईंचे व आमचे रक्षण झालें. खरोखर, देवासारखा तू पराक्रमी आहेस. गोपते, तुझीं एक एक अद्भुत कृत्ये आम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत. हा गोवर्धन पर्वत तूं उचलून धरलास तेव्हांपासून तर आम्ही तुला प्रत्यक्ष देवच समजतो आहो. हे महासमर्थ देवा, तूं रुद्र, मरुद्गण किंवा वसू यांच्यापैकी कोणी आहेस काय ? वसुदेवाच्या पोटीं तू कां जन्म घेतला आहेस ? जरी तुझें जन्म आम्हां पामर लोकांत' झालें आहे, तरी तुझी बाळलीला, तुझें सामर्थ्य व तुझी अलौकिक कृति पाहून आमच्या अंतःकरणाला शंका उत्पन्न होत आहे. गुराख्याच्या वेषाने तू आमच्या बरोबर गौणप्रकारचे खेळ खेळतोस याचा अर्थ काय ? तुझा पराक्रम लोकपालासारखा असतांना येथें गाई राखीत बसण्यांत तुला काय हेतु आहे ? तू देव, दानव, यक्ष किंवा गंधर्व यांच्यापैकी कोण आहेस ? तूं कोणीही अस; परंतु ज्याअर्थी तू आमचा बांधव झाला आहेस, त्यापक्षीं तुला आमचा नमस्कार असो. कोणत्याही विशिष्ट कार्याकरितां तूं येथें यदृच्छेने रहात असलास तरी आम्ही तुझे अनुयायी तुला शरण आहो."

वैशंपायन पुढें सांगतात : - कमललोचन कृष्णाने गोपाळांचे वरील भाषण ऐकून घेतल्यानंतर किंचित् स्मित करून, भोंवतीं गोळा झालेल्या आपल्या ज्ञातिबंधुंना उद्देशून पुढीलप्रमाणें प्रत्युत्तर केलें. "गोपहो, तुम्ही मला मोठा पराक्रमी समजत आहां, परंतु तशी तुमची कल्पना होऊं देऊं नका. मी आपला तुमच्या जातीचा एक साधा मनुष्य आह. जर तुम्हांला मी कोण, काय, वगैरे समजून घ्यावयाचेच असेल तर कांहीं वेळ धीर धरा, ह्मणजे तुम्हाला खरें स्वरूप कळून येईल. किंबहुना माझे स्वरूप तुमचे दृष्टीस देखील पडेल. मी तुम्हांला देवासारखा पराक्रमी व स्तुत्य वाटतो आहें यापेक्षां अधिक कळून तुम्हाला काय करावयाचें आहे ? जर मजवर तुमचा लोभ असेल तर आणखी मजविषयीं चौकशी करूं नका."

वसुदेवाच्या मुलाचे भाषण कानी पडताच, तोंडे झाकून सर्व व्रजवासी लोक मुकाट्याने आपआपल्या वाटेने निघून गेले.

शरदृतूंतील एका सुंदरशा चांदण्या रात्रीं सृष्टीची मनोहर शोभा अवलोकन करून कृष्णाचे मनांत खेळण्याची इच्छा उत्पन्न झाली. तेव्हां त्या पराक्रमी बालकाने वाळलेले गवत व शेण यांनी भरून गेलेल्या व्रजांतील रस्त्यांमध्यें बलाच्या गर्वाने चढून गेलेल्या वृषभांच्या झुंजा लावल्या. तसेंच सुदृढ गोपाळांकडून कुस्त्या करविल्या. त्या अरण्यांत कृष्णवीर गाई व बैल यांना एखाद्या सुसरीप्रमाणे बळकट पकडी. उपनयनापूर्वी वाटेल तसें वागले तरी शास्‍त्राची परवानगी आहे, म्हणून तरुण गोपकन्या जमवून तो समयज्ञ कृष्ण त्यांचे बरोबर आनंदाने खेळू लागला. रात्रीच्या प्रहरी कृष्णाचे मनोहर मुख पाहून हा चंद्रच पृथ्वीवर आला आहे असें त्यांना वाटेल; .व त्याच्या वदनचंद्राकडे आपले नेत्रकटाक्ष एकसारखे फेकून आकाशस्थ चंद्रासारखे तें त्याचें सौंदर्य नेत्रांनी पीत. ओल्या हरताळीप्रमाणे पिवळे व सुंदर रेशमी वस्‍त्र त्यानें परिधान केलें असल्यामुळें त्याचें सौंदर्य अधिकच खुलत होतें. त्यानें हातांत बाहुभूषणें घातली असून गळ्यांत रंगीबेरंगी वनपुष्पांची माळ घातली होती, त्यामुळें व्रजाला भूषणीभूत झालेला तो कृष्ण गोपकन्यांसह क्रीडत असतां मोठी मौज दिसत होती. घोपांतील त्या तेजस्वी कृष्णाची अद्भुत लीला पाहून गोपकन्यांनी त्याला दामोदर असें नांव ठेविले होतें. त्याच नांवानें त्या त्याला हांका मारू लागल्या. त्या सुंदर स्‍त्रिया आपल्या चंचल नेत्रयुक्त वदनांनी त्याच्याकडे पहात पहात त्याला आपल्या उत्तुंग वक्षःस्थलाशी धरून दृढ आलिंगन देऊ लागल्या. त्या गोपस्‍त्रियांचे पति, बंधू व माता ही त्यांना प्रतिबंध करीत, तरी त्या कृष्णाशी रममाण होण्यास उत्सुक झालेल्या असल्यामुळें रात्रीं कृष्णाला शोधून काढीत व त्याचे भोंवतीं जोडीजोडीने कधीं मंडलाकार आणि कधीं सरळ उभे राहून, त्याच्या मनोरम चरित्राचीं गाणी म्हणत व आपली करमणूक करून घेत. कृष्णावर अचल दृष्टी ठेवून कृष्ण ज्या लीला करी, त्या त्या लीला, त्या तरुण गोपस्‍त्रियाही करीत. तो जसे पाऊन टाकील तसें त्या टाकीत. दुसऱ्या कांहीं गोपपत्‍न्या हातांनी ताल धरून कृष्णाचे चरित्र स्वतः करून दाखवीत होत्या. तसेंच, कृष्णाचे नृत्य, गीत, विलास, स्मित व वीक्षित इत्यादिकांचें अनुकरण करीत त्या व्रजयोषिता यथेच्छ क्रीडा करीत होत्या. कृष्णावरील प्रेमातिशय प्रकट करणारी मधुर गाणी ह्मणून दामोदरपरायण झालेल्या गोपी व्रजामध्ये कृष्णाबरोबर सुखाने रममाण होत. धूळीने भरलेल्या हत्तीणी एखाद्या मत्त हत्तीला वेढून त्याचेसह जशा रममाण होतात, त्याप्रमाणें गोमयाच्या कणांनी युक्त असलेल्या शरीराच्या गोपललना कृष्णाला मध्ये घेऊन त्याचे बरोबर क्रीडा करीत. कित्येक हरिणाक्षी, गोपांगनांनी स्मितहास्य करून प्रेमसूचक प्रफुल्ल नेत्रांनी कृष्णाकडे सारखी टक लाविली होती. तरी त्यांचे नेत्रांची तृप्ति ह्यणून होईना. कृष्णाच्या कमलमुखाचे दर्शन घेण्यास आतुर झालेल्या गोपांगना रात्रीच्या प्रहरी आपली हौस मनमुराद पुरवून घेत. दामोदराच्या तोंडावाटे निघालेले हाकांचे शब्द श्रवण करून गोपींना अत्यंत आनंद होई. भांग काढून नीट घातलेल्या व्रजांगनांच्या वेणीचे केस खेळतांना विखरून त्यांच्या स्तनयुग्मांवर येत. परंतु तशा स्थितीतही त्या फार सुंदर दिसत.

याप्रकारेंकरून गोपी मंडळानी परिवेष्टिलेल्या कृष्णानें शरदृतूंतील चांदण्या रात्रीं मोठ्या सुखाने व आनंदाने त्यांचे बरोबर खेळ खेळून आपलें मनोरंजन केलें.


इति श्रीमहाभारते खिलेषु विष्णुपर्वणि
हल्लीसकक्रीडनं नाम विंशोऽध्यायः ॥ २० ॥
अध्याय विसावा समाप्त

GO TOP