श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
द्विपञ्चाशत्तमोऽध्यायः


विष्णुं प्रति पृथिव्या वाक्यम्

वैशंपायन उवाच
बाढमित्येव सह तैर्दुर्दिनाम्भोदनिःस्वनः ।
प्रतस्थे दुर्दिनाकारः सदुर्दिन इवाचलः ॥ १ ॥
समुक्तामणिविद्योतं सचन्द्राम्भोदवर्चसम् ।
सजटामण्डलं कृत्स्नं स बिभ्रच्छ्रीधरो हरिः ॥ २ ॥
स चास्योरसि विस्तीर्णे रोमाञ्चोद्‌गतराजिमान् ।
स्रीवत्सो राजते श्रीमांस्तनद्वयमुखाञ्चितः ॥ ३ ॥
पीते वसानो वसने लोकानां गुरुरव्ययः ।
हरिः सोऽभवदालक्ष्यः स संध्याभ्र इवाचलः ॥ ४ ॥
तं व्रजन्तं सुपर्णेन पद्मयोनिगतानुगम् ।
अनुजग्मुः सुराः सर्वे तद्‌गतासक्तचक्षुषः ॥ ५ ॥
नातिदीर्घेण कालेन संप्राप्ता रत्नपर्वतम् ।
ददृशुर्देवतास्तत्र तां सभां कामरूपिणीम् ॥ ६ ॥
मेरोः शिखरविन्यस्तां संयुक्तां सूर्यवर्चसा ।
काञ्चनस्तम्भरचितां वज्रसन्धानतोरणाम् ॥ ७ ॥
मनोनिर्माणचित्राढ्यां विमानशतमालिनीम् ।
रत्नजालान्तरवतीं कामगां रत्नभूषिताम् ॥ ८ ॥
कॢप्तरत्नसमाकीर्णां सर्वर्तुकुसुमोत्कटाम् ।
देवमायाधरां दिव्यां विहितां विश्वकर्मणा ॥ ९ ॥
तां हृष्टमनसः सर्वे यथास्थानं यथाविधि ।
यथानिदेशं त्रिदशा विविशुस्ते सभां शुभाम् ॥ १० ॥
ते निषेदुर्यतोक्तेषु विमानेष्वासनेषु च ।
भद्रासनेषु पीठेषु कुथास्वास्तरणेषु च ॥ ११ ॥
ततः प्रभञ्जनो वायुर्ब्रह्मणा सधु चोदितः ।
मा शब्दमिति सर्वत्र प्रचक्रामाथ तां सभाम् ॥ १२ ॥
निःशब्दस्तिमिते तस्मिन्समाजे त्रिदिवौकसां ।
बभाषे धरणी वाक्यं खेदात् करुणभाषिनी ॥ १३ ॥
धरण्युवाच
त्वया धार्या त्वहं देव त्वया वै धार्यते जगत् ।
त्वं धारयसि भूतानि भुवनानि बिभर्षि च ॥ १४ ॥
यत्त्वया धार्यते किञ्चित्तेजसा च बलेन च ।
ततस्तव प्रसादेन मया यत्नाच्च धार्यते । १५ ॥
त्वया धृतं धारयामि नाधृतं धारयाम्यहम् ।
न हि तद् विद्यते भूतं यत्त्वया नानुधार्यते ॥ १६ ॥
त्वमेव कुरुषे देव नारायण युगे युगे ।
मम भारावतरणं जगतो हितकांयया ॥ १७ ॥
तवैव तेजसा क्रान्तां रसातलतलं गताम् ।
त्रायस्व मां सुरश्रेष्ठ त्वामेव शरणं गताम् ॥ १८ ॥
दानवैः पीड्यमानाहं राक्षसैश्च दुरात्मभिः ।
त्वामेव शरणं नित्यमुपायास्ये सनातनम् ॥ १९ ॥
तावन्मेऽस्ति भयं भूयो यावन्न त्वां ककुद्मिनम् ।
शरणं यामि मनसा शतशो ह्युपलक्षये ॥ २० ॥
अहमादौ पुराणस्य संक्षिप्ता पद्मयोनिना ।
मावरुन्धां कृतौ पूर्वं मृन्मयौ द्वौ महासुरौ ॥ २१ ॥
कर्णस्रोतोद्‌भवौ तौ हि विष्णोरस्य महात्मनः ।
महार्णवे प्रस्वपतः काष्ठकुड्यसमौ स्थितौ ॥ २२ ॥
तौ विवेश स्वयं वायुर्ब्रह्मणा साधु चोदितः ।
दिवं प्रच्छादयन्तौ तु ववृधाते महासुरौ ॥ २३ ॥
वायुप्राणौ तु तौ गृह्य ब्रह्मा पर्यमृशच्छनैः ।
एकं मृदुतरं मेने कठिनं वेद चापरम् ॥ २४ ॥
नामनी तु तयोश्चक्रे स विभुः सलिलोद्‌भवः ।
मृदुस्त्वयं मधुर्नाम कठिनः कैटभोऽभवत् ॥ २५ ॥
तौ दैत्यौ कृतनामानौ चेरतुर्बलदर्पितौ ।
सर्वमेकार्णवं लोकं योद्धुकामौ सुदुर्जयौ ॥ २६ ॥
तावागतौ समालोक्य ब्रह्मा लोकपितामहः ।
एकार्णवाम्बुनिचये तत्रैवान्तरधीयत ॥ २७ ॥
स पद्मे पद्मनाभस्य नाभिमध्यात् समुत्थिते ।
रोचयामास वसतिं गुह्यां ब्रह्मा चतुर्मुखः ॥ २८ ॥
तावुभौ जलगर्भस्थौ नारायणपितामहौ ।
बहून्वर्षगणानप्सु शयानौ न चकम्पतुः ॥ २९ ॥
अथ दीर्घस्य कालस्य तावुभौ मधुकैटभौ ।
आजग्मतुस्तमुद्देशं यत्र ब्रह्मा व्यवस्थितः ॥ ३० ॥
दृष्ट्वा तावसुरौ घोरौ महाकायौ दुरासदौ ।
ब्रह्मणा ताडितो विष्णुः पद्मनालेन वै तदा ।
उत्पपाताथ शयनात्पद्मनाभो महाद्युतिः ॥ ३१ ॥
तद्युद्धमभवद् घोरं तयोस्तस्य च वै तदा ।
एकार्णवे तदा लोके त्रैलोक्ये जलतां गते ॥ ३२ ॥
तदाभूत्तुमुलं युद्धं वर्षसंख्या सहस्रशः ।
न च तावसुरौ युद्धे तदा श्रममवापतुः ॥ ३३ ॥
अथातो दीर्घकालस्य तौ दैत्यौ युद्धदुर्मदौ ।
ऊचतुः प्रीतमनसौ देवं नारायणं हरिम् ॥ ३४ ॥
प्रीतौ स्वस्तव युद्धेन श्लाघ्यस्त्वं मृत्युरावयोः ।
आवां जहि न यत्रोर्वी सलिलेन परिप्लुता ॥ ३५ ॥
हतौ च तव पुत्रत्वं प्राप्नुयावः सुरोत्तम ।
यो ह्यावां युधि निर्जेता तस्यावां विहितौ सुतौ ॥ ३६ ॥
स तु गृह्य मृधे दोर्भ्यां दैत्यौ तावभ्यपीडयत् ।
जग्मतुर्निधनं चापि तावुभौ मधुकैटभौ ॥ ३७ ॥
तौ हतौ चाप्लुतौ तोये वपुर्भ्यामेकतां गतौ ।
मेदो मुमुचतुर्दैत्यौ मथ्यमानौ जलोर्मिभिः ॥ ३८ ॥
मेदसा तज्जलं व्याप्तं ताभ्यामन्तर्दधे ततः ।
नारायणश्च भगवानसृजत् स पुनः प्रजाः ॥ ३९ ॥
दैत्ययोर्मेधसाच्छन्ना मेदिनीति ततः स्मृता ।
प्रभावात्पद्मनाभस्य शाश्वती जगती कृता ॥ ४० ॥
वराहेण पुरा भूत्वा मार्कण्डेयस्य पश्यतः ।
विषाणेनाहमेकेन तोयमध्यात्समुद्धृता ॥ ४१ ॥
हृताहं क्रमतो भूयस्तदा युष्माकमग्रतः ।
बलेः सकाशाद्दैत्यस्य विष्णुना प्रभविष्णुना ॥ ४२ ॥
साम्प्रतं खिद्यमानाहमेनमेव गदाधरम् ।
अनाथा जगतो नाथं शरण्यं शरणं गता ॥ ४३ ॥
अग्निः सुवर्णस्य गुरुर्गवां सूर्यो गुरुः स्मृतः ।
नक्षत्राणां गुरुः सोमो मम नारायणो गुरुः ॥ ४४ ॥
यदहं धारयाम्येका जगत्स्थावरजङ्‌गमम् ।
मया धृतं धारयते सर्वमेतद्‌गदाधरः ॥ ४५ ॥
जामदग्न्येन रामेण भारावतरणेप्सया ।
रोषात् त्रिःसप्तकृत्त्वोहं क्षत्रियैर्विप्रयोजिता ॥ ४६ ॥
साऽस्मि वेद्यां समारोप्य तर्पिता नृपशोणितैः ।
भार्गवेण पितुः श्राद्धे कश्यपाय निवेदिता ॥ ४७ ॥
मांसमेदोस्थिदुर्गन्धा दिग्धा क्षत्रियशोणितैः ।
रजस्वलेव युवतिः कश्यपं समुपस्थिता ॥ ४८ ॥
स मां ब्रह्मर्षिरप्याह किमुर्वि त्वमवाङ्मुखी ।
वीरपत्नीव्रतमिदं धारयन्ती विषीदसि ॥ ४९ ॥
साहं विज्ञापितवती कश्यपं लोकभावनम् ।
पतयो मे हता ब्रह्मन् भार्गवेण महात्मना ॥ ५० ॥
साहं विहीना विक्रान्तैः क्षत्रियैः शस्त्रवृत्तिभिः ।
विधवा शून्यनगरा न धारयितुमुत्सहे ॥ ५१ ॥
तन्मह्यं दीयतां भर्ता भगवंस्त्वत्समो नृपः ।
रक्षेत् सग्रामनगरां यो मां सागरमालिनीम् ॥ ५२ ॥
स श्रुत्वा भगवान् वाक्यं बाढमित्यब्रवीत्प्रभुः ।
ततो मां मानवेन्द्राय मनवे स प्रदत्तवान् ॥ ५३ ॥
सा मनुप्रभवं दिव्यं प्राप्येक्ष्वाकुकुलं नृपम् ।
विपुलेनास्मि कालेन पार्थिवात् पार्थिवं गता ॥ ५४ ॥
एवं दत्तास्मि मनवे मानवेन्द्राय धीमते ।
भुक्ता राजसहस्रैश्च महर्षिकुलसम्मितैः ॥ ५५ ॥
बहवः क्षत्रियाः शूरा मां जित्वा दिवमाश्रिताः ।
ते च कालवशं प्राप्य मय्येव प्रलयं गताः ॥ ५६ ॥
मत्कृते विग्रहा लोके वृत्ता वर्तन्त एव च ।
क्षत्रियाणां बलवतां संग्रामेष्वनिवर्तिनाम् ॥ ५७ ॥
एतद् युष्मत्प्रवृत्तेन दैवेन परिपाल्यते ।
जगद्धितार्थं कुरुत राज्ञां हेतुं रणक्षये ॥ ५८ ॥
यद्यस्ति मयि कारुण्यं भारशैथिल्यकारणात् ।
एकश्चक्रधरः श्रीमानभयं मे प्रयच्छतु ॥ ५९ ॥
यमहं भारसंतप्ता संप्राप्ता शरणार्थिनी ।
भारो यद्यवरोप्तव्यो विष्णुरेष ब्रवीतु माम् ॥ ६० ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
धरणीवाक्ये द्विपञ्चाशत्तमोऽध्यायः


पृथ्वीची विनंति -

वैशंपायन सांगतात : - ब्रह्मदेवानें याप्रमाणें विनंति करितांच तो साभ्र पर्वताप्रमाणें विशाल देहाचा, मेघाप्रमाणें श्याम कान्तीचा आणि मेघाप्रमाणेंच दणदणीत ज्याचा स्वर आहे असा परमात्मा श्रीहरि "बरे आहे चला" असें म्हणून उठला. हे राजा, त्या भगवंताने मुक्तामणींच्या प्रभेनें उद्दीप्त झाल्यामुळें ज्याला चंद्र- युक्त मेघमंडळाची शोभा आली होती, असें अखंड जटामंडळ मस्तकी धारण केलें होतें. त्या लक्ष्मीपतीच्या विशाल वक्षःस्थलावर रोमांच उभे असून आपल्या कान्तीनें उभयस्तनांची अग्रे व्यापून टाकणारे असें श्रीवत्सचिन्ह शोभत होतें. नेसू व अंगावर पीत वस्त्रे असल्याने तो सर्व लोकांचा शाश्वत गुरु संध्याकालचें सतेज मेघपटल अंगावर धारण करणाऱ्या पर्वताप्रमाणे मनोवेधक दिसत होता. असा तो श्यामसुंदर गरुडावर बसून ब्रह्मदेवासह चालला असतां त्याचे रूपाकडे डोळे गुंतून सर्व देवमंडळी मागोमाग चालू लागली व अल्पकालांतच ते सर्वही मेरुपर्वतावर जाऊन पोचले. तेथे सोन्याचे खांब व हिऱ्यांची बहिर्द्वारें जिला आहेत अशी सूर्याप्रमाणें चमकणारी व वाटेल तो आकार धारण करणारी दिव्य सभा त्याचे दृष्टीस पडली. या सभेंत शेंकडों विमानें ठेविलीं असून तिच्या भिंतींवरून मनास वाटेल तशी सुंदर सुंदर चित्रे काढिलीं होती. मध्ये मध्ये रत्नांचे पडदे सोडिले असून ठिकठिकाणीं मोठ्या युक्तींने रत्ने बसवृन नक्षीकाम केले होतें. तेथें सर्व ऋतूंत उत्पन्न होणाऱ्या फुलांची केवळ लूट होती. तिला रत्नांच्या जाळ्या बसविल्या होत्या. असली ही दैवीमाया-रूपी सभा विश्वकर्म्यानें निर्माण केली असून वाटेल त्या स्थळी संचार करूं शकत होती. अशी ती सभा पाहून सर्वही देवांना फार आनंद झाला आणि ते सर्वजण रीतीप्रमाणें आपआपल्या मर्यादेने त्या सुंदर सभास्थानी आपआपल्या जागीं जाऊन बसले. त्यांना बसवाण्यासाठीं तेथील व्यवस्थापकानें ज्या बैठका दाखविल्या त्यांत कांहीं विमाने, कांहीं आसने, कांहीं भद्रासनें, कांहीं पीठे, कांहीं चटया व कांहीं गालिचे अशा अनेक जाती होत्या. नंतर ब्रह्मदेवानें प्रभंजन नामक वायुला खडी आज्ञा केल्यामुळें त्यानें सर्व सभासदांना "बोलू नका" अशी सक्त ताकीद देताच सर्व सभा नि:शब्द झाली. मग त्या शांत देवसभेपुढे दु्:खाने केविलवाणा स्वर काढून धरणी बोलूं लागली.

धरणी म्हणाली : - "हे देवाधिदेवा श्रीविष्णो, ज्या अर्थी तूंच हे निखिल जगत्‌, हीं सर्व भूतें व सर्वही भुवनें धारण करितोस, त्या अर्थी, माझेही तूंच धारण केलें पाहिजे, हा न्याय आहे. आतां मला लोकांत धरणी म्हणजे धारण करणारी असें म्हणतात; तथापि, त्यांतील खरा प्रकार असा आहे कीं, ज्या कांही वस्तु तू आपल्या तेजानें व व बलानें धारण करितोस अशाच वस्तु मग तुझ्या प्रसादानें मी मोठ्या यत्नाने ( बाह्यसृष्टीला ) धारण करितें. हे विष्णो , तुझा ज्याला आधार आहे त्याचेंच धारण मी करिते. इतरांचें करीत नाहीं. बाकी तुझा ज्याला आधार नाहीं अशी सृष्ट वस्तुच नाहीं. हे नारायणा, हे देवा, युगायुगाचे ठायी लोककल्याणाच्या हेतूनें तूंच माझे भारहरण करीत असतोस. बरें, प्रस्तुत मी भाराखाली चिरडली जाऊन अगदीं सप्तपाताळ खचत चाललें आहे; याला तरी कारण तुझेंच तेज आहे; आणि या संकटांत आश्रयार्थ मी तुजकडेच आलें आहें. याकरितां हे सुरश्रेष्ठा, माझें रक्षण तूंच कर. बाबारे, जेव्हां जेव्हां मला दानव किंवा दुष्टात्मे राक्षस गांजितात त्या वेळी सनातनरूप जो तू त्या तुजकडेसच मी आश्रयार्थ येत असतें, असा माझा नेहमींचा परिपाठ आहे. शेकडो वेळचा माझा अस अनुभव आहे कीं, सर्व बलिष्ठात शिरोभूत असा जो तूं त्याला जोपर्यत मी मनाने शरण आलें नाहीं तोपर्यंतच मला भयाची बाधा होत असते. मजवरील कृषि, वाणिज्य व्यवहार, इत्यादि सुरू होण्याचे पूर्वी कमलयोनी ब्रह्मदेवाने मला बांधून टाकन माझा विस्तार कांहींसा कमी करून त्यापासून मातीचे दोन मोठे असुर बनविले. पुढें महात्मा श्रीविष्णू क्षीरसमुद्रांत' निद्रिस्त असतां त्याच्या कर्णमलांतून हेच दोघे राक्षस बाहेर आले. आणि काष्ठाच्या भिंतीसारखे निश्चेष्ट उभे राहिले. इतक्यांत ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून प्राणवायू त्यांच्यांत शिरला. तेव्हां ते महा असुर इतके वाढले कीं, त्यांनीं आकाश आच्छादून टाकिलें. ज्यांना प्राणवायू प्राप्त झाला आहे अशा त्या असुरांच्या जवळ जाऊन ब्रह्मदेवानें त्यांना आपल्या हाताने हळूच चेपून पाहिले. तेव्हां त्यांपैकी एकजण त्याला मृदु लागला व दुसरा कठीण लागला. मग त्या जलजोद्भवानें त्या दोघांना नांवे दिली. तीं अशीं कीं, जो मृदु होता त्याला त्यानें मधु असें नांव दिलें; आणि जो कठीण होता त्याला कैटभ असें नांव दिलें. याप्रमाणें ब्रह्मदेवाने नावे ठेविल्यावर ते उभय दैत्य फारच बलगर्वित होऊन व आपणास अजिंक्य समजून त्या सर्वत्र एकच जलमय झालेल्या प्रदेशांत सापडेल त्याशीं युद्ध करावें या इच्छेने इतस्ततः भटकूं लागले. भटकत भटकता ते ब्रह्मदेवाकडे वळले. त्यांना येताना पाहून लोकपितामह ब्रह्मदेवाने त्या जलांतच बुडी दिली; आणि पद्मनाभ जो श्रीविष्णू त्यांचे नाभी मधून उत्पन्न झालेल्या कमलामध्यें आपण आतां सुरक्षितपणें वसती करावी असें वाटून तो चतुर्मुख तेथें लपून बसला. मग श्रीविष्णु व ब्रह्मा हे दोघेही पाण्याच्या पोटांत अनेक वर्षेंपर्यंत निर्भयपणें पडून होते. इकडे हे मधू व कैटभ जलांत भ्रमत होतेच. ते भ्रमतां भ्रमतां कितीतरी वर्षांनीं ब्रह्मदेव जेथे सुरक्षितपणे दडून बसला होता त्या ठिकाणी प्राप्त झाले. ब्रह्मदेवानें ते प्रचंड व अजिंक्य असे घोर असुर पुढें आलेले पाहून हळूच कमळाचे देठाने फटकारून विष्णूला जागे केलें. फटकाऱ्यासरशीं तो महातेजस्वी पद्मनाभ तट्‌कन् उठून शय्येवर बसला. त्या वेळीं सर्व त्रैलोक्य जलमय होऊन सर्वभर एकच समुद्र वाढला होता, अशा स्थळी श्रीविष्णूचें त्या उभय असुरांशी घनघोर युद्ध झालें; व तुंबल युद्ध सहस्त्रावधि वर्षें चालत राहिलें. तरीही ते दोघे असुर युद्धांत थकतना, व त्यांची मस्ती विष्णूच्यानेंही जिरेना. त्या मुळें तें युद्ध आणखीही तसेंच चालू राहिले.

मग एकंदरींत फारच फार काळ लोटला, तेव्हां ते असुर आपण होऊनच प्रसन्न मनानें देव नारायणाला म्हणाले कीं, हे हरे, शाबास. तूझ्या युद्धकौशल्याने मी फारच खुष झालो आहे. आणि म्हणूनच तुझ्या हातून आम्हांला मृत्यु येणे फार श्र्लाव्य वाटतें. याकरितां तूं आम्हांला मार. मात्र जेथे धरणी पाण्यांत बुडाली नाहीं अशा स्थलीं आमचा वध झाला पाहिजे. हे देवश्रेष्ठा, आम्हांला तू मारिलेंस म्हणजे आम्ही पुढला जन्म तुझेच पोटीं घेणार आहों. कारण, आमच्यासारख्यांना जो युद्धामध्ये हार आणणारा अशाचे ( आज्ञाधारक) पुत्र व्हावें हें सर्वथा उचित आहे. विष्णूने त्याचें म्हणणें स्वीकारून त्या उभय्‌ दैत्यांना जलापासून अधांतरी वरचेवर आपल्या हातांत उचलून घेऊन तेथेंच चुरडून टाकिले आणि पाण्यांत फेकून दिलें. मरून पाण्यांत पडताच त्या मधुकैटभांचे दोन पृथक्‌ देह होते ते एकरूप झाले; आणि अशा स्थितींत जेव्हां समुद्राच्या लाटांच्या थडका त्यांचे अंगांवर बसू लागल्या तेव्हां त्यांचे अंगचा सर्व मेद झडून सर्व समुद्रभर झाला. तेव्हां ते दैत्य तेथेंच गडप झाले. मग त्या निष्पाप भगवान्‌ नारायणानें पुन: सृष्टि उत्पन्न केली. त्या दैत्याच्या मेदानें समुद्रतळीं ही पृथ्वी आच्छादली गेल्यामुळे हिला ( मला ) मेदिनी असें नांव त्या दिवसापासून प्राप्त झाले. सारांश, या पद्मनाभाच्याच प्रभावानें त्या समयी या जगतीला ( मला ) चिरस्थायित्व आलें. याप्रमाणें पुन: मी जलांत बुडले असतां, हे भगवंता, आपण वराहरूप धारण करून मार्कंडेय ऋर्षीच्या देखत मला आपल्या दाढेवर घेऊन वर काढिलें. हे देवहो, यानंतर पुनरपीही बलिदैत्याचे वेळीं याच समर्थ श्रीविष्णूनें तीन पाउलें टाकण्याच्या मिषानें तुम्हा सर्वासमक्षच मला बलीच्या जाचातून सोडविलें.

असा हा आजपर्यंतचा इतिहास आहे, व यामुळेंच मी माझ्या सांप्रतच्या कष्टमय स्थितीत अनाथ झाल्याने या जगताच्या नाथाला, अशरण झाल्यानें या शरणागताचें पालन कर्त्याला, शरण आलें आहें. अग्नि हा सुवर्णाचा हितकर्ता, सूर्य हा गोधनांचा, सोम हा नक्षत्रांचा आणि त्याचप्रमाणें हा नारायण माझा हितकर्ता आहे. मी या स्थावरजंगम विश्वाला धारण करितें; परंतु, ( त्यांतील रहस्य असें आहे कीं,) मी जेवढें कांहीं धारण करितें तेवढ्या सर्वांला आतून या नारायणाचा टेंका आहे. ( वामनावतारानंतर पुन: ) परशुरामाचे कालींही मी क्षत्रियांचे भारानें गांजून गेलें होतें, तेव्हां जामदग्न्य रामानें माझा भार हलका करण्याच्या हेतूने रोषाच्या तडाक्यांत एकवीस वेळां मजवरील क्षत्रिय दूर केले, आणि त्या परशुरामानें आपल्या पित्याच्या श्राद्धसमयीं माझे पृष्ठावर रणस्तंभ उभारून तेथें क्षत्रिय राजांच्या रक्तानें माझें संतर्पण केलें आणि नंतर मला कश्यपाच्या हवाली केलें. मी ज्या वेळीं कश्यपापाशीं गेलें त्या वेळीं नुकतीच क्षत्रियांच्या मांस, भेद, अस्थि व रक्त यांनी मी भरून गेली असल्यामुळें एखाद्या रजस्वला स्त्रीप्रमाणे माझे देहाला दुर्गध येत होता. अशा स्थितीत मी अर्थातच लज्जेनें खालीं मान घालून कश्यपासन्निध उभी राहिले. तेव्हां त्या महर्षीने मला विचारिलें कीं, "हे पृथ्वि, तू अशी खालीं तोंड करून उभी कां? व रणांत जिचा भर्ता नुकताच मारला गेला आहे अशा एखाद्या वीरपत्नीप्रमाणें खिन्न कां दिसतेस?" यावर मी लोककल्याणकर्त्या कश्यपांस विनंति केली कीं, हे ब्रह्मन्‌, महात्म्या परशुरामानें माझे सर्वही पति मारिले व यामुळें शस्त्रांवर जीविका करणारे सर्वही पराक्रमी क्षत्रिय मजवरून नाहीसे झाल्यानें मी केवळ विधवा झालें आहें, व मजवरील नगरें ओस पडली आहेत. अशा स्थितींत मला जगावेंसें वाटत नाहीं. याकरितां, हे भगवंता, आपणासारखा कोणी समर्थ राजा मला पति करून द्या म्हणजे सागराने वेढिलेली जी मी त्या माझे मजवरील ग्रामनगरांसह तो रक्षण करील. अशी माझी विनंति ऐकतांच " फार बरें आहें " असें म्हणून त्या भगवान्‌ कश्यपानें मला मानवेंद्र जो मनु त्याचे स्वाधीन केलें. नंतर त्या मनुपासून देवतुल्य असा इक्ष्वाकूचा वंश माझा पालनकर्ता झाला; व तेव्हांपासून बहुत कालपर्यंत एका पृथ्वीपती पासून दुसऱ्याकडे अशी मी जात आलें. सारांश, मी त्या बुद्धिमान् मनूच्या अर्पण झाल्यापासून महर्षितुल्य कुलांत अशा सहस्त्रावधि राजांनी मला भोगिली. किती तरी शूर क्षत्रिय मला आपलीशी करून शेवटीं स्वर्गासं गेले. कित्येक कालाच्या तडाक्यांत सापडून माझेच ठिकाणीं नष्ट झाले. युद्धांत कधीही माघार न खाणाऱ्या क्षत्रियांचे मत्प्राप्त्यर्थ आजपर्यंत कितीदां तरी झगडे झाले आणि अजूनही चालू आहेतच. हे. भगवंता, या सर्व घडामोडी आपण घालून दिलेल्या दैवरूपी नियमाचाच परिपाक आहेत; व राजांनीं युद्ध करून त्यांत वध पावावे ही योजना तरी जगद्धितार्थ आपणच केलेली आहे. असो; मी भारावून गेलें आहें. यासाठीं माझा भार हलका करावा अशी जर मजविषयीं आपणास दया येत असेल तर, हे श्रीमंता, हे चक्रधरा, आपणच मला अभय दिलें पाहिजे. ( कारण, या कामी अन्य कोणीही समर्थ नाहीं. ) हे देवहो, मी भाराने गाजले असतां आश्रयार्थ ज्या विष्णूकडे आलें, त्याचे मनांत जर माझा भार दूर करण्याचें असेल तर त्यानेंच रोखठोक मला काय तें सांगावे."


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
विष्णुं प्रति पृथिव्या वाक्यं नाम द्विपञ्चाशत्तमोऽध्यायः ॥ ५२ ॥
अध्याय बावन्नावा समाप्त

GO TOP