श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
षट्त्रिंशोऽध्यायः


क्रोष्टुवंशवर्णनम्

वैशम्पायन उवाच
क्रोष्टोरेवाभवत् पुत्रो वृजिनीवान् महायशाः ।
वृजिनीवत्सुतश्चापि स्वाहिः स्वाहाकृतं वरः ॥ १ ॥
स्वाहिपुत्रोऽभवद् राजा रुषद्गुर्वदतां वरः ।
महाक्रतुभिरीजे यो विविधैर्भूरिदक्षिणैः ॥ २ ॥
सुतप्रसूतिमन्विच्छन् रुषद्गुः सोऽग्र्यमात्मजम् ।
जज्ञे चित्ररथस्तस्य पुत्रः कर्मभिरन्वितः ॥ ३ ॥
आसीच्चैत्ररथिर्वीरो यज्वा विपुलदक्षिणः ।
शशबिन्दुः परं वृत्तं राजर्षीणामनुष्ठितः ॥ ४ ॥
पृथुश्रवाः पृथुयशा राजासीऽऽच्छशबिन्दुजः ।
शंसन्ति च पुराणज्ञाः पार्थश्रवसमुत्तरम् ॥ ५ ॥
अनन्तरं सुयज्ञस्तु सुयज्ञतनयोऽभवत् ।
उशतो यज्ञमखिलं स्वधर्ममुशतां वरः ॥ ६ ॥
शिनेयुरभवत् सूनुरुशतः शत्रुतापनः ।
मरुत्तस्तस्य तनयो राजर्षिरभवन्नृप ॥ ७ ॥
मरुत्तोऽलभत ज्येष्ठं सुतं कम्बलबर्हिषम् ।
चचार विपुलं धर्मममर्षात् प्रेत्यभागपि ॥ ८ ॥
सुतप्रसूतिमिच्छन्वै सुतं कम्बलबर्हिषः ।
बभूव रुक्मकवचः शतप्रसवतः सुतः ॥ ९ ॥
निहत्य रुक्मकवचः शतं कवचिनां रणे ।
धन्विनां निशितैर्बाणैरवाप श्रियमुत्तमाम् ॥ १० ॥
जज्ञेऽथ रुक्मकवचात् पराजित् परवीरहा ।
जज्ञिरे पञ्च पुत्रास्तु महावीर्याः पराजितः ॥ ११ ॥
रुक्मेषुः पृथुरुक्मश्च ज्यामघः पलितो हरिः ।
पालितं च हरिं चैव विदेहेभ्यः पिता ददौ ॥ १२ ॥
रुक्मेषुरभवद् राजा पृथुरुक्मस्य संश्रितः ।
ताभ्यां प्रव्राजितो राज्याज्ज्यामघोऽवसदाश्रमे ॥ १३ ॥
प्रशान्तः स वनस्थस्तु ब्राह्मणैश्चावबोधितः ।
जिगाय रथमास्थाय देशमन्यं ध्वजी रथी ॥ १४ ॥
नर्मदाकूलमेकाकी नगरीं मृत्तिकावतीम् ।
ऋक्षवन्तं गिरिं जित्वा शुक्तिमत्यामुवास सः ॥ १५ ॥
ज्यामघस्याभवद् भार्या शैब्या बलवती सती ।
अपुत्रोऽपि च राजा स नान्यां भार्यामविन्दत ॥ १६ ॥
तस्यासीद् विजयो युद्धे तत्र कन्यामवाप सः ।
भार्यामुवाच संत्रस्तः स्नुषेति स नरेश्वरः ॥ १७ ॥
एतच्छ्रुत्वाब्रवीद् देवी कस्य चेयं स्नुषेति वै ।
अब्रवीत् तदुपश्रुत्य ज्यामघो राजसत्तमः ॥ १८ ॥
यस्ते जनिष्यते पुत्रः तस्य भार्योपदानवी ।
उग्रेण तपसा तस्याः कन्यायाः स व्यजायत ।
पुत्रं विदर्भं सुभगा शैब्या परिणता सती ॥ १९ ॥
राजपुत्र्यां तु विद्वांसौ स्नुषायां क्रथकौशिकौ ।
पश्चाद्विदर्भोऽजनयच्छूरौ रणविशारदौ ॥ २० ॥
लोमपादं त्रितीयं तु पुत्रं परमधार्मिकम् ।
लोमपादात्मजो बभ्रुराह्वतिस्तस्य चात्मजः ॥ २१ ॥
आह्वतेः कौशिकश्चैव विद्वान्परमधार्मिकः ।
चेदिः पुत्रः कौशिकस्य तस्माच्चैद्या नृपाः स्मृताः ॥ २२ ॥
भीमो विदर्भस्य सुतः कुन्तिस्तस्यात्मजोऽभवत् ।
कुन्तेर्धृष्टसुतो जज्ञे रणधृष्टः प्रतापवान् ।
धृष्टस्य जज्ञिरे शूरास्त्रयः परमधार्मिकाः ॥ २३ ॥
आवन्तश्च दशार्हश्च बली विषहरश्च यः ।
दशार्हस्य सुतो व्योमा व्योम्नो जीमूत उच्यते ॥ २४ ॥
जीमूतपुत्रो बृहतिस्तस्य भीमरथः सुतः ।
अथ भीमरथस्यासीत् पुत्रो नवरथस्तथा ॥ २५ ॥
तस्य चासीद् दशरथाः शकुनिस्तस्य चात्मजः ।
तस्मात्करम्भः कारम्भिर्देवरातोऽभवन्नृपः ॥ २६ ॥
देवक्षत्रोऽभवत् तस्य दैवक्षत्रिर्महायशाः ।
देवगर्भसमो जज्ञे देवक्षत्रस्य नन्दनः ॥ २७ ॥
मधूनां वंशकृद् राजा मधुर्मधुरवागपि ।
मधोर्जज्ञेऽथ वैदर्भ्यां पुत्रो मरुवसास्तथा ॥ २८ ॥
आसीन्मरुवसः पुत्रः पुरुद्वान् पुरुषोत्तमः ।
मधुर्जज्ञेऽथ वैदर्भ्यां भद्रवत्यां कुरूद्वहः ॥ २९ ॥
ऐक्ष्वाकी चाभवद् भार्या सत्त्वांस्तस्यामजायत ।
सत्त्वान् सर्वगुणोपेतः सात्त्वतां कीर्तिवर्धनः ॥ ३० ॥
इमां विसृष्टिं विज्ञाय ज्यामघस्य महात्मनः ।
युज्यते परया कीर्त्या प्रजावांश्च भवेन्नरः ॥ ३१ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे
हरिवंशपर्वणि षट्त्रिंशोऽध्यायः


क्रोष्टुवंशवर्णन -

वैशंपायन सांगतात - क्रोष्टूच्याच वंशाची आणखी एक बाजू तुला सांगतो. या क्रोष्टूलाच वृजिनीवान नामक एक महायशस्वी पुत्र झाला. या पुत्रालाही पुढें पुत्र झाला, त्याचें नांव स्वाहि. हा स्वाहाकार करणारांत श्रेष्ठ होता. या स्वाहीला रुषद्गु नांवाचा मोठा वक्ता पुत्र झाला. आपल्याला सुतप्राप्ति व्हावी या इच्छेनें या रुषद्गूनें, ज्यांत ब्राह्मणांस विपुल दक्षणा दिली गेली असे अनेक यज्ञ केले. त्या योगानें त्याला चित्ररथ नांवाचा सर्वोत्कृष्ट पुत्र झाला. हा मोठा कर्मठ होता. याला पुढें शशबिंदु नांवाचा मोठा वीर व विपुल दक्षिणा वांटणारा असा उदार पुत्र झाला. याचें आचरण राजकुलांत येऊन जे महात्मे ऋषिसंज्ञा पावले त्यांत अग्रगण्य होतें. या शशबिंदूला पुढें मोठा लौकिकवान असा पृथुश्रवा नामक पुत्र झाला. पुराणज्ञ ऋषि याचेंच दुसरें नांव अंतर होतें असेंही म्हणतात. या अंतराला पुढें सुयज्ञ नामक पुत्र झाला. या सुयज्ञाला पुढें उषत नामक पुत्र झाला. हा यज्ञरूपी जो स्वधर्म त्यावर प्रेम करणारांत श्रेष्ठ होता. या उषताला शिनेयु नांवाचा शत्रूंना पीडा देणारा पुत्र झाला. हे राजा, या शिनेयूला मरुत्त नांवाचा ऋषितुल्य पुत्र झाला. या मरुत्तानें (पुत्र होईना तेव्हां) रागानें, धर्माचें फल मुख्यतः मरणोत्तर मिळावयाचें असतांही त्याच्या अंशतः तरी फलप्राप्तीच्या लोभानें, रगड धर्म केला; त्यामुळें त्याला कंबलबर्हिष नांवाचा पुत्र झाला. या कंबलबर्हिषाला पुत्र व्हावा अशी इच्छा झाली असतां शतप्रसूति नांवाचा पुत्र झाला. याला पुढें रुक्मकवच. या रुक्मकवचानें कवच व धनुष्य धारण करणारें शेंकडों धनुर्धर आपल्या तीव्र बाणांनी युद्धांत मारून अलोट संपत्ति मिळविली. या रुक्मकवचापासून परवीरांचें निर्दलन करणारा असा पराजित नांवाचा पुत्र झाला. या पराजिताला पांच मोठे पुत्र झाले. त्यांचीं नांवें - रुक्मेषु, पृथुरुक्म, ज्यामघ, पालित व हरि. यांपैकीं पालित व हरि हे दोघे पुत्र विदेहाधिपतीच्या साह्यार्थ पराजितानें दिले. बाकींच्यापैकीं रुक्मेषु हा राजा झाला. दुसरा जो पृथुरुक्म तो रुक्मेषूच्याच तंत्रानें असे. या दोघां भावांनी मिळून तिसरा भाऊ जो ज्यामघ त्याला राज्यांतून हाकलून लाविलें. तेव्हां तो अरण्यांत आश्रम करून तेथें शांत चित्तानें राहिला.

परंतु, तेथें असतां वनवासी ब्राह्मणांनीं बोलून बोलून त्याची राज्यतृष्णा जागृत केली. तेव्हां त्यानें एकटयानें रथावर ध्वजा चढवून एका दूर देशावर स्वारी करून तो जिंकिला. हा जिंकिलेला देश नर्मदेच्या तीरीं असून त्यामध्यें मृत्तिकावती नामक नगरी होती. ती काबीज केल्यावर त्यानें ऋक्षवान नामक पर्वत आपल्या सत्तेखालीं आणून तेथें शुक्तिमती नामक एका नगरींत वसति धरिली. या ज्यामघाला श्यैब्या नामक स्त्री भार्या मिळाली होती. ही अत्यंत पतिनिष्ठ असून मोठी शिरजोर होती; यामुळें हिला जरी पुत्र नव्हता, तरी पुत्रार्थ दुसरी स्त्री करण्याचें धारिष्ट (तिच्या भयास्तव) राजाला होईना. अशा स्थितींत तो एका दूर प्रांतीं लढाईवर गेला. त्या लढाईत त्याचे हातीं एक मुलगी लागली, ती घेऊन तो घरीं आला. तिला पाहातांच ही कोण, ही कोण, असें पुसपुसून शैब्येनें त्याचें डोकें उठविलें. तेव्हां (ही आपल्याला ही स्त्री जिरूं देणार नाहीं अशी भीति पडून) राजानें उत्तर केलें, "ही तुझी सून." ते ऐकून राणी म्हणाली, "नवलच. माझी सून म्हणजे कोणाच्या गळ्यांत बांधावयाची ?" तो प्रश्न ऐकून राजा ज्यामघ म्हणाला, "कोणाच्या म्हणजे तुला पोर होईल त्याच्या." (हा त्यांचा संवाद झाल्यावर असा चमत्कार घडला कीं) राजानें आणलेल्या त्या उपदानवी नामक कन्येच्या उग्र तपोबलानें (तिची भावी सासू) श्यैब्या ही म्हातारी झाली होती तरीही तिला तितक्यापुरती ज्वानी येऊन तिला विदर्भ नांवाचा पुत्र झाला. या विदर्भानें पुढें त्याच्या बापानें सून म्हणून आगाऊच आणून ठेविलेली जी राजकन्या उपदानवी तिचे ठायीं मोठे विद्वान् व रणशूर असे क्रथ व कौशिक या नांवांचे दोन पुत्र उत्पन्न केले. त्यांशिवाय लोमपाद नांवाचा एक तिसराही पुत्र त्याला झाला. या लोमपादाला बभ्रु नामक पुत्र झाला. या बभ्रूचा पुत्र आह्वति नामक झाला. याला मोठा विद्वान् व धार्मिक कौशिक नामक पुत्र झाला. या कौशिकाला चेदि नामक पुत्र झाला. चैद्य नांवानें जे सुप्रसिद्ध राजे झाले, त्यांना चैद्य नांव पडण्याला हा चेदीच कारण.

वर जो ज्यामघाचा पुत्र विदर्भ म्हणून सांगितला, त्याला भीम नामक पुत्र झाला. भीमाला पुढें कुंति हा पुत्र झाला. कुंतीला मोठा प्रतापी व रणशूर असा धृष्ट नांवाचा पुत्र झाला. या धृष्टाला पुढें शूर व धार्मिक असे तीन पुत्र झाले. त्यांचीं नांवें - आवंत, दशार्ह व बलाढय विषहर. या दशार्हाला व्योम झाला. व्योमाला जीमूत. जीमूताला बृहति. बृहतीला भीमरथ. भीमरथाचा नवरथ. नवरथाचा दशरथ. दशरथाचा शकुनि. शकुनीचा करंभ. करंभाचा देवरात. देवराताचा देवक्षत्र. देवक्षत्राच्या पोटीं मोठा यशस्वी, तेजानें देवपुत्रांसमान, पुढील मधुनामक राजांचा मूळ पुरुष, वाणीचा गोड व बापाला आनंद देणारा असा मधुनामक पुत्र झाला. या मधूला विदर्भकन्येचे ठिकाणीं मरुवसा हा पुत्र झाला. या मरुवसानें पुरुद्वान नांवाचा पुत्र उत्पन्न केला. हा मोठा उत्तम होता. या पुरुद्वानानें आपल्या भद्रवती नामक स्त्रीचे ठायीं जो पुत्र उत्पन्न केला त्याचेंही नांव मधुच होतें. याशिवाय पुरुद्वानाला ऐक्ष्वाकी नांवाची दुसरी एक स्त्री होती, तिचे ठायीं सत्त्वान नामक पुत्र झाला. हा सत्त्वान सर्वगुणी असून पुढें सात्वत नांवाचे जे राजे झाले त्यांतील मुख्य होता.

येथवर सांगितलेली ही ज्यामघ राजाची संतति जो कोणी समजून घेईल, त्याला अत्यंत कीर्ति मिळून पुत्रप्राप्तिही होईल.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
क्रोष्टुवंशवर्णनम् नाम षट्त्रिंशोऽध्यायः ॥ ३६ ॥
अध्याय छत्तिसावा समाप्त

GO TOP