श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
एकोनविंशोऽध्यायः


पितृकल्पः - ३

मार्कण्डेय उवाच
आसन्पूर्वयुगे तात भरद्वाजात्मजा द्विजाः ।
योगधर्ममनुप्राप्य भ्रष्टा दुश्चरितेन वै ॥ १ ॥
अपभ्रंशमनुप्राप्ता योगधर्मापचारिणः ।
महतः सरसः पारे मानसस्य विसंज्ञिताः ॥ २ ॥
तमेवार्थमनुध्यायन्तो नष्टमप्स्विव मोहिताः ।
अप्राप्य योगं ते सर्वे संयुक्ताः कालधर्मणा ॥ ३ ॥
ततस्ते योगविभ्रष्टा देवेषु सुचिरोषिताः ।
जाताः कौषिकदायादाः कुरुक्षेत्रे नरर्षभाः ॥ ४ ॥
हिंसया विहरिष्यन्तो धर्मं पितृकृतेन वै ।
ततस्ते पुनराजातिं भ्रष्टाः प्राप्स्यन्ति कुत्सिताम् ॥ ५ ॥
तेषां पितृप्रसादेन पूर्वजातिकृतेन वै ।
स्मृतिरुत्पत्स्यते प्राप्य तां तां जातिं जुगुप्सिताम् ॥ ६ ॥
ते धर्मचारिणो नित्यं भविष्यन्ति समाहिताः ।
ब्राह्मण्यं प्रतिलप्स्यन्ति ततो भूयः स्वकर्मणा ॥ ७ ॥
ततश्च योगं प्राप्स्यन्ति पूर्वजातिकृतं पुनः ।
भूयः सिद्धिमनुप्राप्ताः स्थानं प्राप्स्यन्ति शाश्वतम् ॥ ८ ॥
एवं धर्मे च ते बुद्धिर्भविष्यति पुनः पुनः ।
योगधर्मे च नितरां प्राप्स्यसे बुद्धिमुत्तमाम् ॥ ९ ॥
योगो हि दुर्लभो नित्यमल्पप्रज्ञैः कदाचन ।
लब्ध्वापि नाशयन्त्येनं व्यसनैः कटुतामिताः ।
अधर्मेष्वेव वर्तन्ते प्रार्दयन्ते गुरूनपि ॥ १० ॥
याचन्ते न त्वयाच्यानि रक्षन्ति शरणागतान् ।
नावजानन्ति कृपणान् माद्यन्ते न धनोष्मणा ॥ ११ ॥
युक्ताहारविहाराश्च युक्तचेष्टाः स्वकर्मसु ।
ध्यानाध्ययनयुक्ताश्च न नष्टानुगवेषिणः ॥ १२ ॥
नोपभोगरता नित्यं न मांसमधुभक्षणाः ।
न च कामपरा नित्यं न विप्रासेविनस्तथा ॥ १३ ॥
नानार्यसंकथासक्ता नालस्योपहतास्तथा ।
नात्यन्तमानसंसक्ता गोष्ठीषु निरतास्तथा ॥ १४ ॥
प्राप्नुवन्ति नरा योगं योगो वै दुर्लभो भुवि ।
प्रशान्ताश्च जितक्रोधा मानाहङ्कारवर्जिताः ॥ १५ ॥
कल्याणभाजनं ये तु ते भवन्ति यतव्रताः ।
एवंविधास्तु ते तात ब्राह्मणा ह्यभवंस्तदा ॥ १६ ॥
स्मरन्ति ह्यात्मनो दोषं प्रमादकृतमेव तु ।
ध्यानाध्ययनयुक्ताश्च शान्ते वर्त्मनि संस्थिताः ॥ १७ ॥
योगधर्माद्धि धर्मज्ञ न धर्मोऽस्ति विशेषवान् ।
वरिष्ठः सर्वधर्माणां तमेवाचर भार्गव ॥ १८ ॥
कालस्य परिणामेन लघ्वाहारो जितेन्द्रियः ।
तत्परः प्रयतः श्राद्धी योगधर्ममवाप्स्यसि ॥ १९ ॥
इत्युक्त्वा भगवान् देवस्तत्रैवान्तरधीयत ।
अष्टादशैव वर्षाणि त्वेकाहमिव मेऽभवत् ॥ २० ॥
उपासतस्तं देवेशं वर्षाण्यष्टादशैव मे ।
प्रसादात् तस्य देवस्य न ग्लानिरभवत् तदा ॥ २१ ॥
न क्षुत्पिपासे कालं वा जानामि स्म तदानघ ।
पश्चाच्छिष्यसकाशात् तु कालः संविदितो मया ॥ २२ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
पितृकल्पे एकोनविंशोऽध्यायः


पितृकल्पवर्णन -

मार्कंडेय सांगतात - हे भीष्मा, सनत्कुमारांनी मला सांगितलें की, पूर्वयुगी भरद्वाज वंशातले कांहीं ब्राह्मण होते. हे योगाभ्यास करीत असतां मध्येंच दुराचरण करूं लागल्यामुळें योगापासून भ्रष्ट झाले. त्या भ्रष्ट स्थितीत ते मानस नांवाचे जे विशाल सरोवर त्याचे पैलतीरी वेडे होऊन पडले, आणि एखाद्याची वस्तु पाण्यांत पडली असतां तो जसा धुंडत बसतो, त्याप्रमाणें दुराचरणानें गमविलेल्या योगसिद्धीची त्यांना हळहळ लागून मुढाप्रमाणें ते तसे हळहळतच राहिले व अखेरीस योगसिद्धि प्राप्त झाल्यावांचूनच कालाने त्यांना गाठिलें. नंतर, ते योगभ्रष्ट ब्राह्मण मरणोत्तर दीर्घकालपर्यंत देवलोकांत राहून पुढें कुरुक्षेत्रांत कौशिक कुलांत उत्पन्न होतील. तेथें ते नरश्रेष्ठ पितरांच्या उद्देशाने धर्मकार्यार्थ म्हणून पश्वादिकांची हिंसा करीत फिरतील. नंतर त्या भ्रष्टांना पुन्हा नीच योनीत जन्म येईल; मात्र त्यांनीं पूर्वजन्मीं पितरांचे आराधन करून मिळविलेल्या प्रसादबलानें ते नीच योनींत असतांही त्यांची पूर्वस्मृति कायम राहील, व तीमुळे त्यांची बुद्धि ताळ्यावर येऊन त्यांची धर्माकडे प्रवृत्ति होत जाईल. नंतर स्वकर्माच्या सामर्थ्यानें पुनरपि ब्राह्मणजन्म प्राप्त होईल. त्या ब्राह्मणजन्मांत त्यांनीं प्रथम जन्मांत अर्धवट सोडलेला जो योगाभ्यास तो त्यांना पुन्हा साध्य होईल, व त्या अभ्यासबलाने ते शाश्वत पदाला पावतील.

हे मार्कंडेया, या गोष्टीवरून तुझ्या ध्यानांत येईल कीं, सद्धर्माचरण हें कधींही नाश पावत नाहीं. मध्ये कितीही अडथळे आले तथापि ते पुनरपि कर्त्यांचे बुद्धीला सन्मार्गाकडे ओढीत नेतात. याकरिता तुझी मति वारंवार धर्माकडे लागूं दे. विशेषत: योगाचरणाकडे मति लागली असतां ती दिवसेंदिवस फारच उत्तम होत जाईल. पण, बाबा, योग कांहीं वाटेवर पडला नाहीं. अल्पबुद्धीच्या लोकांना हा कधींच प्राप्त होत नाहीं. कदाचित मोठ्या कष्टानें प्राप्त झालाच तरी हे मूर्ख लोक मृगयादि नाना क्रूर व्यसनांच्या नादी लागून प्राप्त झालेल्याची नासाडी करितात व स्वतः सदा अधर्मानेच राहातात आणि आपल्या गुरूंचाही द्रोह करितात; अशांच्या हातीं योग लागत नाहीं, तर तो कोणाच्या हातीं लागतो तें ऐक.

जे लोक न मागण्याजोग्या ज्या वस्तु आहेत त्या कधींही मागत नाहींत; शरण आलेल्यांचे रक्षण करितात; दुर्बलांची अवहेलना करीत नाहीत; पैशाच्या उबेमुळें उन्मत्त होत नाहींत; ज्यांचे आहारविहार व स्वकर्तव्यासंबंधी सर्व व्यापार हिशोबी व नेमस्त असतात; जे सदा ध्यान व अध्ययन यात निरत असतात; नायनाट झालेल्या वस्तूसाठी सोधण्या घालीत बसत नाहींत; केव्हांही विषयोपभोगात गढून पडत नाहींत; मद्यमांस भक्षण करीत नाहींत; स्त्रीशी विलास करण्यांत आला तो दिवस घालवीत नाहींत; ब्राह्मणसेवेविषयीं अदक्ष असत नाहींत; हलकट गोष्टींत मन घालीत नाहींत; आळसाने ज्यांना गिळले नाहीं; मान-सन्मानाची ज्यांना विशेष चाड नाहीं; व जे आत्मप्रशंसेंत फारसे पडत नाहींत; जे वृत्तीने अति शांत; ज्यांनीं क्रोध जिंकला आहे; ज्यांना बढाई व मीपणा यांचा विटाळही नाहीं; व जे सदा पुण्यमय विचाराने भरलेले असतात, अशांनाच योग प्राप्त होतो. योग ही चीज मृत्युलोकांत फार दुर्मिळ आहे. भाग्यवान असतील तेच व्रताचरण करितात. पूर्वकाळचे ब्राह्मण असे असत. प्रसंगीं त्यांचे हातून चुकीने दोष घडलाच तर त्याची पुरी आठवण ठेवून ते आपला रस्ता सुधारीत व ध्यान आणि अध्ययन यांत गर्क राहून शांतीचे मार्गाला लागत.

हे धर्मज्ञा मार्कंडेया, योगधर्माहून अधिक महत्वाचा असा दुसरा कोणताही धर्म नाहीं. हा धर्म सर्वही धर्मात वरिष्ठ आहे. यासाठीं, हे भृगुकुलोत्पन्ना, त्याचीच कांस धर. तूं जर अल्पाहार करणारा, जितेंद्रिय, तत्पर, पवित्र व श्रद्धावान होशील तर तुला आस्ते आस्ते कालगतीनें योगसिद्धि प्राप्त होईल.

असें बोलून भगवान् सनत्कुमार जागचे जागी अदृश्य झाले. ते गेल्यापासून मी त्यांची उपासना करण्यांत एकसारखा अठरा वर्षेपर्यंत निमग्न होतों; परंतु ती अठरा वर्षें मला केवळ एका दिवसासारखी वाटली; किंवा मला कालाचे कसें तें भानच उरले नाहीं. मी जेव्हां शुद्धीवर आलों, तेव्हां शिष्याजवळ पूसतपास केली, त्यावरून मला अठरा वर्षे लोटली असें कळले. हे भीष्मा, त्या देवाच्या कृपेचा प्रभाव केवढा म्हणून सांगू ? त्या अठरा वर्षांत मला तहान लागली नाहीं; भूक लागली नाहीं; किंवा अन्नपाणी नाही म्हणून मी यत्किंचितही कोमेजलों किंवा थकलो नाही.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
पितृकल्पे एकोनविंशोऽध्यायः ॥ १९ ॥
अध्याय एकोणिसावा समाप्त

GO TOP