श्रीहरिवंशपुराण हरिवंश पर्व सप्तदशोऽध्यायः
पितृकल्पः - १
भीष्म उवाच
ततोऽहं तस्य वचनान्मार्कण्डेयं समाहितः ।
प्रश्नं तमेवान्वपृच्छं यन्मे पृष्ठः पुरा पिता ॥ १ ॥
स मामुवच धर्मात्मा मार्कण्डेयो महातपाः ।
भीष्म वक्ष्यामि कर्त्स्न्येन शृणुष्व प्रयतोऽनघ ॥ २ ॥
अहं पितृप्रसादाद् वै दीर्घायुष्ट्वमवाप्तवान् ।
पितृभक्त्यैव लब्धं च प्राग्लोके परमं यशः ॥ ३ ॥
सोऽहं युगस्य पर्यन्ते बहुवर्षसहस्रिके ।
अधिरुह्य गिरिं मेरुं तपोऽतप्यं सुदुश्चरम् ॥ ४ ॥
ततः कदाचित् पश्यामि दिवं प्रज्वाल्य तेजसा ।
विमानं महदायान्तमुत्तरेण गिरेस्तदा ॥ ५ ॥
तस्मिन् विमाने पर्यङ्के ज्वलितादित्यसन्निभम् ।
अपश्यं तत्र चैवाहं शयानं दीप्ततेजसम् ॥ ६ ॥
अङ्गुष्ठमात्रं पुरुषमग्नावग्निमिवाहितम् ।
सोऽहं तस्मै नमस्कृत्य प्रणम्य शिरसा विभुम् ॥ ७ ॥
सन्निविष्टं विमानस्थं पाद्यार्घ्याभ्यामपूजयम् ।
अपृच्छं चैव दुर्धर्षं विद्याम त्वां कथं विभो ॥ ८ ॥
तपोवीर्यात् समुत्पन्नं नारायणगुणात्मकम् ।
दैवतं ह्यसि देवानमिति मे वर्तते मतिः ॥ ९ ॥
स मामुवाच धर्मात्मा स्मयमान इवानघ ।
न ते तपः सुचरितं येन मां नावबुद्ध्यसे ॥ १० ॥
क्षणेनैव प्रमाणं सः बिभ्रदन्यदनुत्तमम् ।
रूपेण न मया कश्चिद् दृष्टपूर्वः पुमान् क्वचित् ॥ ११ ॥
सनत्कुमार उवाच
विद्धि मां ब्रह्मणः पुत्रं मानसं पूर्वजं विभोः ।
तपोवीर्यसमुत्पन्नं नारायणगुणात्मकम् ॥ १२ ॥
सनत्कुमार इति यः श्रुतो देवेषु वै पुरा ।
सोऽस्मि भार्गव भद्रं ते कं कामं करवाणि ते ॥ १३ ॥
ये त्वन्ये ब्रह्मणः पुत्राः यवीयांसस्तु ते मम ।
भ्रातरः सप्त दुर्धर्षास्तेषां वंशाः प्रतिष्ठिताः ॥ १४ ॥
क्रतुर्वसिष्ठः पुलहः पुलस्त्योऽत्रिस्तथाङ्गिराः ।
मरीचिस्तु तथा धीमान् देवगन्धर्वसेविताः ।
त्रीँल्लोकान् धारयन्तीमान् देवगन्धर्वपूजिताः ॥ १५ ॥
वयं तु यतिधर्माणः संयोज्यात्मानमात्मनि ।
प्रजा धर्मं च कामं च व्यपहाय महामुने ॥ १६ ॥
यथोत्पन्नस्तथैवाहं कुमार इति विद्धि माम् ।
तस्मात् सनत्कुमारेति नामैतन्मे प्रतिष्ठितम् ॥ १७ ॥
मद्भक्त्या ते तपश्चीर्णं मम दर्शनकाङ्क्षया ।
एष दृष्टोऽस्मि भवता कं कामं करवाणि ते ॥ १८ ॥
इत्युक्तवन्तं तमहं प्रत्यवोचं सनातनम् ।
अनुज्ञातो भगवता प्रीयमाणेन भारत ॥ १९ ॥
ततोऽहमेनमर्थं वै तमपृच्छं सनातनम् ।
पृष्टः पितॄणां सर्गं च फलं श्राद्धस्य चानघ ॥ २० ॥
चिच्छेद संशयं भीष्म स तु देवेश्वरो मम ।
स मामुवाच धर्मात्मा कथान्ते बहुवार्षिके ।
रमे त्वयाऽहं विप्रर्षे शृणु सर्वं यथातथम् ॥ २१ ॥
देवानसृजत ब्रह्मा मां यक्ष्यन्तीति भार्गव ।
तमुत्सृज्य तथात्मानमयजंस्ते फलार्थिनः ॥ २२ ॥
ते शप्ता ब्रह्मणा मूढा नष्टसंज्ञा दिवौकसः ।
न स्म किञ्चिद्विजानन्ति ततो लोकोऽप्यमुह्यत ॥ २३ ॥
ते भूयः प्रणताः शप्ताः प्रायाचन्त पितामहम् ।
अनुग्रहाय लोकानां ततस्तानब्रवीदिदम् ॥ २४ ॥
प्रायश्चित्तं चरध्वं वै व्यभिचारो हि वः कृतः ।
पुत्रांश्च परिपृच्छध्वं ततो ज्ञानमवाप्स्यथ ॥ २५ ॥
प्रायश्चित्तक्रियार्थं ते पुत्रान्पप्रच्छुरार्तवत् ।
तेभ्यस्ते प्रयतात्मानः शशंसुस्तनयास्तदा ॥ २६ ॥
प्रायश्चित्तानि धर्मज्ञा वाङ्मनःकर्मजानि वै ।
शंसन्ति कुशला नित्यं चक्षुर्भ्यामपि नित्यशः ॥ २७ ॥
प्रायश्चित्तार्थतत्त्वज्ञा लब्धसंज्ञा दिवौकसः ।
गम्यन्तां पुत्रकाश्चेति पुत्रैरुक्ताश्च ते तदा ॥ २८ ॥
अभिशप्तास्तु ते देवाः पुत्रवाक्येन निन्दिताः ।
पितामहमुपागच्छन् संशयच्छेदनाय वै ॥ २९ ॥
ततस्तानब्रवीद् देवो यूयं वै ब्रह्मवादिनः ।
तस्माद् यदुक्तं युष्माकं तत् तथा न तदन्यथा ॥ ३० ॥
यूयं शरीरकर्तारस्तेषां देवा भविष्यथ ।
ते तु ज्ञानप्रदातारः पितरो वो न संशयः ॥ ३१ ॥
अन्योन्यं पितरो यूयं ते चैवेति न संशयः ।
देवाश्च पितरश्चैव तद्बुध्यध्वं दिवौकसः ॥ ३२ ॥
ततस्ते पुनरागम्य पुत्रानूचुर्दिवौकसः ।
ब्रह्मणा च्छिन्नसंदेहाः प्रीतिमन्तः परस्परम् ॥ ३३ ॥
यूयं वै पितरोऽस्माकं यैर्वयं प्रतिबोधिताः ।
धर्मज्ञाः कश्च वः कामः को वरो वः प्रदीयताम् । ३४ ॥
यदुक्तं चैव युष्माभिस्तत्तथा न तदन्यथा ।
उक्ताश्च यस्माद् युष्माभिः पुत्रका इति वै वयम् ।
तस्माद् भवन्तः पितरो भविष्यन्ति न संशयः ॥ ३५ ॥
योऽनिष्ट्वा तु पितॄञ्छ्राद्धैः क्रियाः काश्चित्करिष्यति ।
राक्षसा दानवा नागाः फलं प्राप्स्यन्ति तस्य तत् ॥ ३६ ॥
श्राद्धैराप्यायिताश्चैव पितरः सोममव्ययम् ।
आप्याय्यमाना युष्माभिर्वर्धयिष्यति नित्यदा ॥ ३७ ॥
श्राद्धैराप्यायितः सोमो लोकानाप्याययिष्यति ।
समुद्रपर्वतवनं जङ्गमाजङ्गमैर्वृतम् ॥ ३८ ॥
श्राद्धानि पुष्टिकामाश्च ये करिष्यन्ति मानवाः ।
तेभ्यः पुष्टिं प्रजाश्चैव दास्यन्ति पितरः सदा ॥ ३९ ॥
श्राद्धे ये च प्रदास्यन्ति त्रीन्पिण्डान् नामगोत्रतः ।
सर्वत्र वर्तमानांस्तान् पितरः सपितामहान् ।
भावयिष्यन्ति सततं श्राद्धदानेन तर्पिताः ॥ ४० ॥
एवमाज्ञापितं पूर्वं ब्रह्मणा परमेष्ठिना ।
इति तद्वचनं सत्यं भवत्वद्य दिवौकसः ।
पुत्राश्च पितरश्चैव वयं सर्वे परस्परम् ॥ ४१ ॥
सनत्कुमार उवाच
त एते पितरो देवा देवाश्च पितरस्तथा ।
अन्योन्यं पितरो ह्येते देवाश्च पिरतश्च ह ॥ ४२ ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशे हरिवंशपर्वणि
पितृकल्पे सप्तदशोऽध्यायः
पितृभक्तिवर्णन -
भीष्म सांगतात - नंतर बाबांच्या या आज्ञेवरून मीं पूर्वी खुद्द बाबांना जे प्रश्न विचारले होते, तेच प्रश्न एकाग्रचित्त करून मार्कंडेयांना विचारले; तेव्हां ते महातपस्वी व धर्मात्मा मार्कंडेय मला म्हणाले, "बा, भीष्मा, तूं निष्पापच आहेस, तरीही विशेष शुद्धचित्त ठेवून ऐक म्हणजे तुझ्या शंकांची सविस्तर उत्तरे सांगतो. बाबारे, मी अत्यंत दीर्घायु आहें, पण हें दीर्घायुत्व मला पितरांचे प्रसादानेंच मिळाले आहे व आजपर्यंत माझा जो जगतांत एवढा मोठा लौकिक झाला, त्याचेही मूळ पितृभक्तिच होय. आतां मला पितरांच्या उत्पत्तीचें ज्ञान कोठून झालें तें ऐक. सहस्रावधी वर्षे चालणारा जो युगांतकाल त्या समयीं मी मेरु पर्वतावर राहून अत्यंत दुश्चर असें तप करीत होतो. तप करितां करितां एक दिवस असा चमत्कार झाला कीं, मेरु पर्वताचे उत्तर बाजूनें ज्याच्या तेजाने दाही दिशा उजळून गेल्या आहेत असें एक अत्यंत विस्तीर्ण दिव्य विमान पर्वतावर येऊन उतरले. त्या विमानांत एक पलंग टाकलेला होता व त्या पलंगावर केवळ सूर्याप्रमाणें जाज्वल्य असा एक उग्र तेजाचा पुरुष मीं निजलेला पाहिला. आकाराने हा पुरुष फार मोठा नव्हता, तर केवळ आंगठयाएवढा होता; पण त्याचें तेज इतके गाढ होतें कीं, तो केवळ आगीची ज्योतच दिसे व तसल्या तेजस्वी विमानांत असला पुरुष म्हणजे अग्नीचे ठिकाणींच अग्नि ठेविल्याप्रमाणें दिसत होता. असो; मीं विमानांत बसलेल्या त्या समर्थ पुरूषाला शिरसाष्टांग वंदन करून प्रश्न केला कीं, "हे विभो, आपल्याकडे आमची नजर देखील आपले तेजामुळें धजत नाहीं; तर आपल्या स्वरूपाचे सम्यकज्ञान आम्हांस कसें व्हावें ? माझे अल्पमतीला असें वाटतें कीं, 'आपण तपोबलाने निर्माण झालेले केवळ शुद्धसत्त्वात्मक देवांचेंही दैवत आहां.' हे माझे शब्द ऐकून हसून ते धर्मात्मे म्हणाले, 'बाबारे, तूं निर्मळ आहेस खरा; तथापि ज्या अर्थी माझे स्वरूपाचा सम्यकबोध होत नाहीं, त्या अर्थीं तूं तपश्चर्या चांगले प्रकारे केली नाहीस.' असें बोलून त्यांनीं तत्क्षणीं आपलें रूप बदललें, व असा कांहीं अत्युत्तम पुरुषाचा आकार घेतला कीं, तशा आकाराचा सुंदर पुरुष मीं पूर्वी कधींही पाहिला नव्हता.
सनत्कुमार (हा पुरुष म्हणजेच सनत्कुमार) म्हणाले, "बाबारे, सर्वशक्तिमान जो ब्रह्मदेव त्याचा मी फार जुनाट मानसपुत्र आहें. तूं तर्क केलास त्याप्रमाणें मीही तपोबलानेंच निर्माण झालो असून शुद्धसत्वात्मक आहे. हे भार्गवा, पूर्वींपासून देवमंडळांत सनत्कुमार म्हणून ज्याचे नांव कानी येत असतें तोच मी आहे. वत्सा, तुझें कल्याण असो. तुझी कोणती इच्छा मीं पूर्ण करावी हें सांग."
ब्रह्मदेवाचे जे दुसरे सात दुर्धर्षपुत्र आहेत ते सर्व माझे धाकटे भाऊ. त्यांचे वंश सृष्टींत चालू आहेत. त्यांची नावे क्रतु, वसिष्ठ, पुलह, पुलस्त्य, अत्रि, अंगिरा व मरीची. या सर्वांचे देवगंधर्वही पूजनसेवन करितात, व हे सातजण आपले तपोबलानें त्रैलोक्याचें रक्षण करितात. मी या भानगडीत पडत नाहीं. मीं प्रजोत्पादन व ऐहिक इच्छा यांना फाटा देऊन यतिधर्म स्वीकारिला आहे; व चित्ताचा आत्मरूपाचे ठिकाणी लय करून सर्वदा स्वरूपीं रममाण असतो. मी उत्पन्न झालो तेव्हां शरीरानें व मनानें जसा बाल किंवा कुमाररूप होतों तसाच इतकी युगे लोटली तरी अजून आहें. व या कारणानें मला सनत म्हणजे निरंतर कुमार म्हणजे बालरूप, या अर्थाने सनत्कुमार हेंच नांव पडलें आहे. माझें दर्शन व्हावे या इच्छेने तूं भक्तिपूर्वक माझें आराधन केलेंस, त्या योगानें हा मी तुझ्या दृष्टीस पडलो आहें. 'तुझा कोणता हेतु मी पूर्ण करूं तें सांग.' हे भीष्मा, याप्रमाणे सनत्कुमारांनी मला आज्ञा केली असतां, पितरांची उत्पत्ति व श्राद्धाचें फल, यासंबंधी तूं जे आज मला प्रश्न केलेस तेच मीं प्रसन्न झालेल्या त्या भगवंताला केले, व त्या दिव्य पुरुषाने माझे संशय दूर केले. त्याचा माझा संवाद बहुत वर्षें झाल्यानंतर सनत्कुमार मला म्हणाले कीं, हे विप्रर्षे, तुझ्या प्रश्नाने मी फार संतुष्ट झालो आहें, तेव्हां या पितरांच्या संबंधी मूळपासूनची कच्ची हकीकत मी तुला सांगतो ऐक. हे आपलें (ब्रह्मदेवाचें) आराधन करितील या संकल्पाने ब्रह्मदेवाने देव निर्माण केले. परंतु ब्रह्मदेवाला एका बाजूला सोडून ते लोभी देव आपल्यालाच फल मिळावे, या उद्देशाने यजन करूं लागले. तें पाहून ब्रह्मदेवानें त्यांस शाप दिला. त्यामुळें त्या सर्व देवांची अक्कल नाहीशी होऊन ते केवळ मूर्ख बनले. त्यांना जेव्हां कांहीं कळेना कीं वळेना, तेव्हां त्यांचें अनुकरण करणारे लोकही मूढ झाले. शेवटीं शापाचे तडाक्यांत सांपडलेले ते सर्व देव पितामहाला वारंवार नमन करून लोकानुग्रहार्थ विनवूं लागले. तेव्हां ब्रह्मदेव त्यांना म्हणाला, 'तुम्ही माझी पूजा न करितां आपलीच पूजा चालविली हा तुम्हांकडून मोठा व्यभिचार झाला आहे; याकरिता तुम्हाला प्रायश्चित्त केलें पाहिजे. तें प्रायश्चित्त इतकेंच की, तुम्ही आपल्या पुत्रांची प्रार्थना करा म्हणजे ते तुम्हाला अक्कल शिकवितील आणि तुम्ही शुद्धीवर याल. ब्रह्मदेवानें जेव्हां याप्रमाणे त्यांना निक्षून सांगितलें तेव्हां त्या लघुत्वामुळें ते अंतर्यामीं व्यथित झाले; परंतु निरुपायामुळे ते ब्रह्मदेवाचे आज्ञेप्रमाणें कृतदोषाचे प्रायश्चित्तार्थ म्हणून, दीन होऊन, आपले पुत्रांस उपाय पुसते झाले. त्या वेळीं पुत्रांनी चित्तनिरोध करून ध्यानपूर्वक अंतर्यामी शोध केला व त्यांना सांगितलें कीं, "बापहो, प्रायश्चित्तें एकच प्रकारची नाहींत. धर्मरहस्यात जे निपुण आहेत, ते काया, वाचा आणि मन या तीनही साधनांनी नित्य प्रायश्चित्ते केली पाहिजेत, असें सांगतात; व स्वतःही ते याप्रमाणेंच नित्य करीत आले आहेत." याप्रमाणे पुत्रांनी कानउघाडणी करून प्रायश्चितांचे महत्व व रहस्य सांगतांच त्या देवमंडळीची अक्कल ताळ्यावर आली. त्या वेळीं त्यांचे पुत्रांनी त्यांना "बरें आहे; तुमचे काम झालें, त्या अर्थी 'पुत्रहो' तुम्ही आलेत तसे परत जा" असा निरोप दिला. तेव्हां आपले पोरगे उलट आपणासच 'पुत्रहो' म्हणून (एखाद्या उन्मत्ताप्रमाणें) बोलले, हा प्रकार काय ? हा आपला अपमानच नव्हे काय ? ह्याचा उलगडा करून घ्यावा, अशा बुद्धीने ते पुनः ब्रह्मदेवाकडे आले. त्यांचें गार्हाणे ऐकून ब्रह्मदेवाने उत्तर केलें, 'तुमचे पोरगे तुम्हाला पुत्रहो म्हणाले तें हिशोबीच म्हणाले. हें तुम्ही आपणांस ब्रह्मवादी म्हणजे श्रुतिज्ञ म्हणवीत असून तुम्हाला कसें कळत नाहीं ?." "यस्तानि विजानात्सपितु: पिता सत" अशी एक श्रुति आहे, ती तुम्हाला माहीत आहे ना ? तिचा अर्थ काय बरें ? ज्ञानी पुत्र हा आपल्या पित्याचाही पिता आहे. तुम्ही त्यांना शरीर दिलें या कारणानें तुम्ही त्यांचे पिते व ते तुमचे पुत्र हा न्याय जसा खरा आहे, तसाच, त्यांनीं तुम्हांला ज्ञान दिलें यामुळे ते तुमचे बाप व तुम्ही त्यांचे पुत्र, हाही न्याय तसाच खरा आहे. सारांश, तुम्ही एकमेकांचे बाप व एकमेकांचे पुत्रही आहांच आणि म्हणून तुमचे पोरांनी तुम्हाला "पुत्र हो" म्हणून म्हणण्यांत अन्याय किंवा अपमान कोठेंच नाही."
याप्रमाणे ब्रह्मदेवानें समजूत घालताच ते स्वर्गवासी देव आपले पुत्रांकडे परत जाऊन त्यांस मोठ्या प्रेमाने म्हणाले, "बापहो, ब्रह्मदेवाने आमची समजूत घातली; तीवरून तुम्ही आमचे ज्ञानदाते अतएव एका अर्थीं आमचे बापच आहां. हा न्याय आम्हांस पटला व आमचा सर्व राग जाऊन, हे धर्मज्ञहो, आम्ही प्रसन्न झालो आहो, तर तुमची काय इच्छा आहे, आम्ही तुम्हांस कोणता वर द्यावा ते सांगा. तुम्ही आम्हाला जें 'पुत्रहो' म्हणून संबोधिले तें यथार्थ आहे. त्यांत कांहीं चूक नाहीं. आतां तुम्ही ज्या अर्थी आम्हांला 'पुत्र' म्हणून म्हटलें आहे त्या अर्थीं आम्ही आतां तुम्हास "पितर" ही कायमची संज्ञा देतो. नाग, दानव, राक्षस, इत्यादिकांपैकी कोणीही श्राद्धकाली आपल्या गत पितरांच्या उद्देशाने ज्या ज्या क्रिया करील, त्या त्या फलद्रूप होतील. त्या अशा कीं, श्राद्धीय अन्नादिकानें तुम्ही प्रथम संतुष्ट झाला म्हणजे तुमचे द्वाराने श्राद्धकर्त्याचे पितर तृप्ति पावतील व त्या पितरांचे द्वारे पितरांची शाश्वत देवता जी सोम (चंद्र) त्याला पुष्टि येईल. याप्रकारे श्राद्धक्रियांनीं सोम पुष्ट झाला म्हणजे तो स्थावरजंगम वस्तूंनीं व्यापलेलें हे समुद्रारण्यपर्वतमय जें जगत त्याला (आपल्या किरणांनी) पुष्टि देईल. आपणास पुष्टि प्राप्त व्हावी, या उद्देशानें जे कोणी गृहस्थ पितृश्राद्धें करितील त्यांस पितर (तुम्ही) सदैव संतति व पुष्टि देतील. त्याचप्रमाणे जो कोणी आपल्या स्वतःचे पितरांच्या नामगोत्राचा स्पष्ट उच्चार करून श्राद्धकाली तीन पिंड देईल, त्याचे पितर आपल्या कर्मगतीमुळें कोणत्याही योनीत व कोणत्याही स्थळी असले तरी तुम्ही त्या श्राद्धकर्त्याने केलेल्या दानाने प्रसन्न होऊन त्याचे तीन पूर्वजांस संतुष्ट कराल." ही कामगिरी तुम्ही करावी, अशी परमेष्टी ब्रह्मदेवाने पूर्वीच आज्ञा दिली होती, ती आज तुम्हांस कळविली आहे. तर हे देव हो, ती तुम्ही खरी करावी, व आपण इतउत्तर परस्परांचे बापही आहो व लेकही आहो, असें मानून प्रेमाने चालू.
सनत्कुमार म्हणतात - आतां ते देवच पितर कसे व पितरच देव कसे आणि परस्पर तेच पितर कसे, पितर आणि देवही कसे, हें कोडे उलगडलें ना ?
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि पितृकल्पे सप्तदशोऽध्यायः ॥ १७ ॥
अध्याय सतरावा समाप्त
GO TOP
|