श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
सप्तमोऽध्यायः


मन्वन्तरवर्णनम् -

जनमेजय उवाच
मन्वन्तराणि सर्वाणि विस्तरेण तपोधन ॥
तेषां सृष्टिं विसृष्टिं च वैशम्पायन कीर्तय ॥ १
यावन्तो मनवश्चैव यावन्तं कालमेव च ॥
मन्वन्तरं तथा ब्रह्मञ्छ्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ २
वैशंपायन ऊवाच
न शक्यो विस्तरस्तात वक्तुं वर्षशतैरपि ।
मन्वन्तराणां कौरव्य संक्षेपं त्वेव मे शृणु ॥ ३ ॥
स्वायम्भुवो मनुस्तात मनुः स्वारोचिषस्तथा ।
उत्तमस्तामसश्चैव रैवतश्चाक्षुषस्तथा ॥ ४ ॥
वैवस्वतस्य कौरव्य सांप्रतो मनुरुच्यते ।
सावर्णिश्च मनुस्तात भौत्यो रौच्यस्तथैव च ॥ ५ ॥
तथैव मेरुसावर्णाश्चत्वारो मनवः स्मृताः ।
अतीता वर्तमानाश्च तथैवानागताश्च ये ॥ ६ ॥
कीर्तिता मनवस्तात मयैते तु यथाश्रुतम् ।
ऋषींस्तेषां प्रवक्ष्यामि पुत्रान्देवगणांस्तथा ॥ ७ ॥
मरीचिरत्रिर्भगवानङ्गिराः पुलहः क्रतुः ।
पुलस्त्यश्च वसिष्ठश्च सप्तैते ब्रह्मणः सुताः ॥ ८ ॥
उत्तरस्यां दिशि तथा राजन् सप्तर्षयोऽपरे ।
देवाश्च शान्तरजसस्तथा प्रकृतयः परे ।
यामा नाम तथा देवा आसन् स्वायंभुवेऽन्तरे ॥ ९ ॥
आग्नीध्रश्चाग्निबाहुश्च मेधा मेधातिथिर्वसुः ।
ज्योतिष्मान् द्युतिमान् हव्यः सवनः पुत्र एव च ॥ १० ॥
मनोः स्वायंभुवस्यैते दश पुत्रा महौजसः ।
एतत्ते प्रथमं राजन् मन्वन्तरमुदाहृतम् ॥ ११ ॥
और्वो वसिष्ठपुत्रश्च स्तम्बः काश्यप एव च ।
प्राणो बृहस्पतिश्चैव दत्तो निश्च्यवनस्तथा ॥ १२ ॥
एते महर्षयस्तात वायुप्रोक्ता महाव्रताः ।
देवाश्च तुषिता नाम स्मृताः स्वारोचिषेऽन्तरे ॥ १३ ॥
हविर्ध्रः सुकृतिर्ज्योतिरापोमूर्तिरयस्मयः ।
प्रतिथश्च नभस्यश्च नभ ऊर्जस्तथैव च ॥ १४ ॥
स्वारोचिषस्य पुत्रास्ते मनोस्तात महात्मनः ।
कीर्तिताः पृथिवीपाल महावीर्यपराक्रमाः ॥ १५ ॥
द्वितीयमेतत् कथितं तव मन्वन्तरं मया ।
इदं तृतीयं वक्ष्यामि तन्निबोध नराधिप ॥ १६ ॥
वसिष्ठपुत्राः सप्तासन् वासिष्ठा इति विश्रुताः ।
हिरण्यगर्भस्य सुता ऊर्ज्जा नाम सुतेजसः ॥ १७ ॥
ऋषयोऽत्र मया प्रोक्ताः कीर्त्यमानान् निबोध मे ।
औत्तमेयान् महाराज दश पुत्रान् मनोरमान् ॥ १८ ॥
इष ऊर्जस्तनूजश्च मधुर्माधव एव च ।
शुचिः शुक्रः सहश्चैव नभस्यो नभ एव च ॥ १९ ॥
भानवस्तत्र देवाश्च मन्वन्तरमुदाहृतम् ।
मन्वन्तरं चतुर्थं ते कथयिष्यामि तच्छृणु ॥ २० ॥
काव्यः पृथुस्तथैवाग्निर्जन्युर्धाता च भारत ।
कपीवानकपीवांश्च तत्र सप्तर्षयोऽपरे ॥ २१ ॥
पुराणे कथितास्तात पुत्राः पौत्राश्च भारत ।
सत्या देवगणाश्चैव तामसस्यान्तरे मनोः ॥ २२ ॥
पुत्रांश्चैव प्रवक्ष्यामि तामसस्य मनोर्नृप ।
द्युतिस्तपस्यः सुतपास्तपोमूलस्तपोधनः ॥ २३ ॥
तपोरतिरकल्माषस्तन्वी धन्वी परंतपः ।
तामसस्य मनोरेते दश पुत्रा महाबलाः ॥ २४ ॥
वायुप्रोक्ता महाराज पञ्चमं तदनन्तरम् ।
वेदबाहुर्यदुध्रश्च मुनिर्वेदशिरास्तथा ॥ २५ ॥
हिरण्यरोमा पर्जन्य ऊर्ध्वबाहुश्च सोमजः ।
सत्यनेत्रस्तथाऽऽत्रेय एते सप्तर्षयोऽपरे ॥ २६ ॥
देवाश्च भूतरजसस्तथा प्रकृतयोऽपरे ।
पारिप्लवश्च रैभ्यश्च मनोरन्तरमुच्यते ॥ २७ ॥
अथ पुत्रानिमांस्तस्य निबोध गदतो मम ।
धृतिमानव्ययो युक्तस्तत्त्वदर्शी निरुत्सुकः ॥ २८ ॥
अरण्यश्च प्रकाशश्च निर्मोहः सत्यवाक् कविः ।
रैवतस्य मनोः पुत्राः पञ्चमं चैतदन्तरम् ॥ २९ ॥
षष्ठं ते संप्रवक्ष्यामि तन्निबोध नराधिप ।
भृगुर्नभो विवस्वांश्च सुधामा विरजास्तथा ॥ ३० ॥
अतिनामा सहिष्णुश्च सप्तैते वै महर्षयः ।
चाक्षुषस्यान्तरे तात मनोर्देवानिमाञ्छृणु ॥ ३१ ॥
आद्याः प्रभूता ऋभवः पृथग्भावा दिवौकसः ।
लेखाश्च नाम राजेन्द्र पञ्च देवगणाः स्मृताः ।
ऋषेरङ्गिरसः पुत्राः महात्मानो महौजसः ॥ ३२ ॥
नाड्वलेया महाराज दश पुत्राश्च विश्रुताः ।
ऊरुप्रभृतयो राजन्षष्ठं मन्वन्तरं स्मृतम् ॥ ३३ ॥
अत्रिर्वसिष्ठो भगवान् कश्यपश्च महानृषिः ।
गौतमोऽथ भरद्वाजो विश्वामित्रस्तथैव च ॥ ३४ ॥
तथैव पुत्रो भगवानृचीकस्य महात्मनः ।
सप्तमो जमदग्निश्च ऋषयः सांप्रतं दिवि ॥ ३५ ॥
साध्या रुद्राश्च विश्वे च मरुतो वसवस्तथा ।
आदित्याश्चाश्विनौ चैव देवौ वैवस्वतौ स्मृतौ ॥ ३६ ॥
मनोर्वैवस्वतस्यैते वर्तन्ते सांप्रतेऽन्तरे ।
ईक्ष्वाकुप्रमुखाश्चैव दश पुत्रा महात्मनः ॥ ३७ ॥
एतेषां कीर्तितानां तु महर्षीणां महौजसाम् ।
राजपुत्राश्च पौत्राश्च दिक्षु सर्वासु भारत ॥ ३८ ॥
मन्वन्तरेषु सर्वेषु प्राग्दिशः सप्तसप्तकाः ।
स्थिता लोकव्यवस्थार्थं लोकसंरक्षणाय च ॥ ३९ ॥
मन्वन्तरे व्यतिक्रान्ते चत्वारः सप्तका गणाः ।
कृत्वा कर्म दिवं यान्ति ब्रह्मलोकमनामयम् ॥ ४० ॥
ततोऽन्ये तपसा युक्ताः स्थानमापूरयन्त्युत ।
अतीता वर्तमानाश्च क्रमेणैतेन भारत ॥ ४१ ॥
एतान्युक्तानि कौरव्य सप्तातीतानि भारत ।
मन्वन्तराणि षट् चापि निबोधानागतानि मे ॥ ४२ ॥
सावर्णा मनवस्तात पञ्च तांश्च निबोध मे ।
एको वैवस्वतस्तेषां चत्वारस्तु प्रजापतेः ॥ ४३ ॥
परमेष्ठिसुतास्तात मेरुसावर्णतां गताः ।
दक्षस्यैते हि दौहित्राः प्रियायास्तनया नृप ।
महान्तस्तपसा युक्ता मेरुपृष्ठे महौजसः ॥ ४४ ॥
रुचेः प्रजापतेः पुत्रो रौच्यो नाम मनुः स्मृतः ।
भूत्यां चोत्पादितो देव्यां भौत्यो नाम रुचेः सुतः ॥ ४५ ॥
अनागताश्च सप्तैते स्मृता दिवि महर्षयः ।
मनोरन्तरमासाद्य सावर्णस्य ह ताञ्छृणु ॥ ४६ ॥
रामो व्यासस्तथाऽऽत्रेयो दीप्तिमानिति विश्रुतः ।
भारद्वाजस्तथा द्रौणीरश्वत्थामा महाद्युतिः ॥ ४७ ॥
गौतमस्यात्मजश्चैव शरद्वान् गौतमः कृपः ।
कौशिको गालवश्चैव रुरुः काश्यप एव च ॥ ४८ ॥
एते सप्त महात्मानो भविष्या मुनिसत्तमाः ।
ब्रह्मणः सदृशाश्चैते धन्याः सप्तर्षयः स्मृताः ॥ ४९ ॥
अभिजात्याथ तपसा मन्त्रव्याकरणैस्तथा ।
ब्रह्मलोकप्रतिष्ठास्तु स्मृताः सप्तर्षयोऽमलाः ॥ ५० ॥
भूतभव्यभवज्ज्ञानं बुद्ध्वा चैव तु यैः स्वयम् ।
तपसा वै प्रसिद्धा ये सङ्गताः प्रविचिन्तकाः ॥ ५१ ॥
मन्त्रव्याकरणाद्यैश्च ऐश्वर्यात् सर्वशश्च ये ।
एतान् भार्यान् द्विजो ज्ञात्वा नैष्ठिकानि च नाम च ॥ ५२ ॥
सप्तैते सप्तभिश्चैव गुणैः सप्तर्षयः स्मृताः ।
दीर्घायुषो मन्त्रकृत ईश्वरा दीर्घचक्षुषः ॥ ५३ ॥
बुद्ध्या प्रत्यक्षधर्माणो गोत्रप्रावर्तकास्तथा ।
कृतादिषु युगाख्येषु सर्वेष्वेव पुनः पुनः ॥ ५४ ॥
प्रावर्तयन्ति ते वर्णानाश्रमांश्चैव सर्वशः ।
सप्तर्षयो महाभागाःसत्यधर्मपरायणाः ॥ ५५ ॥
तेषांचैवान्वयोत्पन्नाः जायन्तीह पुनः पुनः ।
मन्त्रब्राह्मणकर्तारो धर्मे प्रशिथिले तथा ॥ ५६ ॥
यस्माच्च वरदाः सप्त परेभ्यश एव याचिताः ।
तस्मान्न कालो न वयः प्रमाणमृषिभावने ॥ ५७ ॥
एष सप्तर्षिकोद्देशो व्याख्यातस्ते मया नृप ।
सावर्णस्य मनोः पुत्रान् भविष्याञ्छृणु सत्तम ॥ ५८ ॥
वरीयांश्चावरीयांश्च संमतो धृतिमान् वसुः ।
चरिष्णुरप्यधृष्णुश्च वाजः सुमतिरेव च ।
सावर्णस्य मनोः पुत्राः भविष्या दश भारत ॥ ५९ ॥
प्रथमे मेरुसावर्णः प्रवक्ष्यामि मुनीञ्छृणु ।
मेधातिथिस्तु पौलस्त्यो वसुः काश्यप एव च ॥ ६० ॥
ज्योतिष्मान् भार्गवश्चैव द्युतिमानङ्गिरास्तथा ।
सावनश्चैव वासिष्ठ आत्रेयो हव्यवाहनः ॥ ६१ ॥
पौलहः सप्त इत्येते मुनयो रोहितेऽन्तरे ।
देवतानां गणास्तत्र त्रय एव नराधिप ॥ ६२ ॥
दक्षपुत्रस्य पुत्रास्ते रोहितस्य प्रजापतेः ।
मनोः पुत्रो धृष्टकेतुः पञ्चहोत्रो निराकृतिः ॥ ६३ ॥
पृथुःश्रवा भूरिधामा ऋचीकोऽष्टहतो गयः ।
प्रथमस्य तु सावर्णेर्नव पुत्रा महौजसः ॥ ६४ ॥
दशमे त्वथ पर्याये द्वितीयस्यान्तरे मनोः
हविष्मान् पौलहश्चैव सुकृतिश्चैव भार्गवः ॥ ६५ ॥
अपोमूर्तिस्तथाऽऽत्रेयो वासिष्ठश्चाष्टमः स्मृतः ।
पौलस्त्यः प्रमितिश्चैव नभोगश्चैव काश्यपः ।
अङ्गिरा नभसः सत्यः सप्तैते परमर्षयः ॥ ६६ ॥
देवतानां गणौ द्वौ तौ ऋषिमन्त्राश्च ये स्मृताः ।
मनोः सुतोत्तमौजाश्च निकुषञ्जश्च वीर्यवान् ॥ ६७ ॥
शतानीको निरामित्रो वृषसेनो जयद्रथः ।
भूरिद्युम्नः सुवर्चाश्च दश त्वेते मनोः सुताः ॥ ६८ ॥
एकादशेऽथ पर्याये तॄतीयस्यान्तरे मनोः ।
तस्य सप्त ऋषींश्चापि कीर्त्यमानान्निबोध मे ॥ ६९ ॥
हविष्मान्काश्यपश्चापि हविष्मान् यश्च भार्गवः ।
तरुणश्च तथाऽऽत्रेयो वासिष्ठस्त्वनघस्तथा ॥ ७० ॥
अङ्गिराश्चोदधिष्ण्यश्च पौलस्त्यो निश्चरस्तथा ।
पुलहश्चाग्नितेजाश्च भाव्याः सप्त महर्षयः ॥ ७१ ॥
ब्रह्मणस्तु सुता देवा गणास्तेषां त्रयः स्मृताः ।
संवर्तकः सुशर्मा च देवानीकः पुरूद्वहः ॥ ७२ ॥
क्षेमधन्वा दृढायुश्च आदर्शः पण्डको मनुः ।
सावर्णस्य तु पुत्रा वै तृतीयस्य नव स्मृताः ॥ ७३ ॥
चतुर्थस्य तु सावर्णेर्ऋषीन्सप्त निबोध मे ।
द्युतिर्वसिष्ठपुत्रश्च आत्रेयः सुतपास्तथा ॥ ७४ ॥
अङ्गिरास्तपसो मूर्तिस्तपस्वी काश्यपस्तथा ।
तपोऽशनश्च पौलस्त्यः पौलहश्च तपो रविः ॥ ७५ ॥
भार्गवः सप्तमस्तेषां विज्ञेयस्तु तपोधृतिः ।
पञ्च देवगणाः प्रोक्ता मानसा ब्रह्मणश्च ते ॥ ७६ ॥
देववायुरदूरश्च देवश्रेष्ठो विदूरथः ।
मित्रवान् मित्रदेवश्च मित्रसेनश्च मित्रकृत् ।
मित्रबाहुः सुवर्चाश्च द्वादशस्य मनोः सुताः ॥ ७७ ॥
त्रयोदशे च पर्याये भाव्ये मन्वन्तरे मनोः ।
अङ्गिराश्चैव धृतिमान्पौलस्त्यो हव्यपस्तु यः ॥ ७८ ॥
पौलहस्तत्त्वदर्शी च भार्गवश्च निरुत्सुकः ।
निष्प्रकंपस्तथाऽऽत्रेयो निर्मोहः काश्यपस्तथा ॥ ७९ ॥
सुतपाश्चैव वासिष्ठः सप्तैते तु महर्षयः ।
त्रय एव गणाः प्रोक्ता देवतानां स्वयंभुवा ॥ ८० ॥
त्रयोदशस्य पुत्रास्ते विज्ञेयास्तु रुचेः सुताः ।
चित्रसेनो विचित्रश्च नयो धर्मभृतो धृतः ॥ ८१ ॥
सुनेत्रः क्षत्रवृद्धिश्च सुतपा निर्भयो दृढः ।
रौच्यस्यैते मनोः पुत्राः अन्तरे तु त्रयोदशे ॥ ८२ ॥
चतुर्दशेऽथ पर्याये भौत्यस्यैवान्तरे मनोः ।
भार्गवो ह्यतिबाहुश्च शुचिराङ्गिरसस्तथा ॥ ८३ ॥
युक्तश्चैव तथाऽऽत्रेयः शुक्रो वासिष्ठ एव च ।
अजितः पौलहश्चैव अन्त्याः सप्तर्षयश्च ते ॥ ८४ ॥
एतेषां कल्य उत्थाय कीर्तनात्सुखमेधते ।
यशश्चाप्नोति सुमहदायुष्मांश्च भवेन्नरः ॥ ८५ ॥
अतीतानागतानां वै महर्षीणां सदा नरः ।
देवतानां गणाः प्रोक्ताः पञ्च वै भरतर्षभ ॥ ८६ ॥
तरङ्गभीरुर्वप्रश्च तरस्वानुग्र एव च ।
अभिमानी प्रवीणश्च जिष्णुः संक्रन्दनस्तथा ॥ ८७ ॥
तेजस्वी सबलश्चैव भौत्यस्यैते मनोः सुताः ।
भौत्यस्यैवाधिकारे तु पूर्णं कल्पस्तु पूर्यते ॥ ८८ ॥
इत्येते नामतोऽतीताः मनवः कीर्तिता मया ।
तैरियं पॄथिवी तात समुद्रान्ता सपत्तना ॥ ८९ ॥
पूर्णं युगसहस्रं तु परिपाल्या नराधिप ।
प्रजाभिश्चैव तपसा संहारस्तेषु नित्यशः ॥ ९० ॥
इतिश्रिमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वानि
मन्वन्तरवर्णनं सप्तमोऽध्यायः


मनुवर्णन -

जनमेजय म्हणतो - हे तपोधना वैशंपायना, मला आपण सर्वच मन्वंतरे, त्यांतील सृष्टीची उत्पत्ति व लय, सर्व मनूंची नांवें व प्रत्येक मनूची कालमर्यादा, ही सर्व यथातथ्य ऐकवावी, अशी माझी फार इच्छा आहे; करितां एवढीं आपण सविस्तर सांगा.

वैशंपायन म्हणतात - बाबारे, तूं म्हणतोस खरें, परंतु सर्वही मन्वंतरांचे सविस्तर म्हणजे पुरापूर वर्णन सांगणें तर शेंकडों वर्षांनी देखील सांगून पुरें होणार नाहीं; याकरितां तूं तें मजपासून संक्षेपानेच ऐकण्यास तयार हो. पहिला मनु स्वायंभु; दुसरा स्वारोचिष, तिसरा उत्तम, चवथा तामस, पांचवा रैवत, सहावा चाक्षुष. हे सहा होऊन गेलेले मनु होत. हे कौरवेश्वरा, सांप्रत जो मनु चालू आहे, याला वैवस्वत अशी संज्ञा आहे. याचे पुढें येणारा तो सावर्णि मनु, त्याच्यापुढील भौत्य, त्याचे पुढील रौच्य व यापुढील चारी मनूंना मेरूसावर्णी असे सामान्य नांव आहे. हे राजा, मीं ज्याप्रमाणें ऐकलीं होतीं त्याप्रमाणे तुला ही एकंदर चौदाही मनूंचीं नांवें सांगितली. म्हणजे यांत गेलेले सहा, येणारे सात व सांप्रतचा एक हे सर्व आले. आतां मी या सातही मनूंतील ऋषि, देवगण व मनूंची संतति हीं सर्व तुला सांगतों. मरीचि, भगवान् अत्रि, अंगिरस, पुलह क्रतु, पुलस्त्य, व वसिष्ठ हे सातही ब्रह्मदेवाचे मानस पुत्र होते. हे राजा, यांशिवाय उत्तरेच्या दिशेला दुसरेही सात ऋषि होते. तसेच सत्वगुणी याम संज्ञक देव व त्यांचे उपजीवी दुसरे देव हे स्वायंभुवांत होते आणि आग्निध, अग्निबाहु, मेधा, मेधातिथि, वसु, ज्योतिष्मान्, द्युतिमान्, हव्य, सवन व पुत्र असे हे मनूचे महातेजस्वी दहा पुत्र होते. हे राजा, याप्रमाणें तुला थोडक्यांत प्रथम मन्वंतरांचे वर्णन सांगितलें. आतां वसिष्ठाचा पुत्र और्व, स्तंव, काश्यप, प्राण, बृहस्पति, दत्त व निश्चवन, असे हे सात महाव्रत सप्तर्षि स्वारोचिष मन्वंतरांत होते, असें वायूचें म्हणणें आहे. तुषित नांवाचे या मनूंत देव होते. हविर्ध्र, सुकृति, ज्योति, आपमूर्ति, अयस्मय, प्रथित, नभस्य, नभ व उर्ज हे महापराक्रमी व वीर्यवान् असे स्वारोचिष मनूचे पुत्र होते म्हणून सांगितले आहे. याप्रमाणें मीं तुला दुसरें मन्वंतर सांगितलें. आतां मी तिसर्‍याचे वर्णन करतों तें ऐक. वासिष्ठ या संज्ञेनें प्रसिद्ध असलेले वसिष्ठाचे सात पुत्र हे उत्तम मन्वंतरांतील सप्तर्षि होत. आतां हे सात पूर्वींचे कोण म्हणशील तर पूर्वकल्पीं ऊर्ज नांवाचे अत्यंत तेजस्वी जे हिरण्यगर्भाचे पुत्र तेच या जन्मीं वसिष्ठाचे झाले. याप्रमाणें तुला या मन्वंतरांतले सप्तर्षि सांगितले. आतां उत्तम मनूचे दशपुत्र सांगतो त्यांचीं नांवें - ईष, ऊर्ज, तनूज, मधु, माधव, शुचि, शुक्र, सह, नभस्य व नभ, हे दहा. आतां या मन्वंतरांतील देव मानवसंज्ञक होते. याप्रमाणें तिसरे मन्वंतर सांगितलें. आतां चवथें मन्वंतर सांगतों, तें ऐक. काव्य, पृथु, अग्नि, जन्यु, धात, कपीवान् व अकपीवान्, हे सात चवथ्या म्हणजे तामस मन्वंतरांतील सप्तर्षि. आतां या मनूचे पुत्रपौत्र पुराणांत सांगितले आहेत, त्यांपैकीं त्याच्या पुत्रांची नांवें तेवढीं तुला सांगतों. तीं हीं - द्युति, तपस्य, सुतपा, तपोमूल, तपोधन, तपोरति, अकल्माष, तन्वी, धन्वी व परंतप; हीं सर्व नांवें अशी वायूंनी सांगितलीं आहेत, तीं मीं तुला सांगितलीं. या मनूंतील देवगण सत्यसंज्ञक होते. आतां पांचवें मन्वंतर सांगतों. या मन्वंतराचें नांव रैंवत मन्वंतर. यांतील सप्तर्षींचीं नांवें; - वेदबाहु, यदुध्र, वेदशिरा, हिरण्यरोमा, पर्जन्य, सोमपुत्र, ऊर्ध्वबांहु व अत्रिपुत्र सत्यनेत्र हे सात सप्तर्षि झाले. भूतरजस् नांवाचे या मनूंतील मुख्य देव होते; व याच जातीचे रैभ्य व पारिप्लव संज्ञेचे विशेष देवतागण होते. आतां मी तुला त्यांच्या मुलांचीं नांवे सांगतों तीं ऐक; धृतिमान्, अव्यय, युक्त, तत्त्वदर्शी, निरुत्सुक, अरण्य, प्रकाश, निर्मोह, सत्यवाक् व कवी; हे दहा. याप्रमाणें हें पांचवें मन्वंतर सरलें. आतां सहावें सांगतों तें ऐक. भृगु, नभ, विवस्वान्, सुधामा, विरजा, अतिनामा व सहिष्णु, हे सहाव्या म्हणजे चाक्षुष मन्वं- तरांतील सप्तर्षि झाले. आतां या मन्वंतरांतील देवगण सांगतो. आद्य, प्रभूत, ऋभु, पृथग्भाव व लेख, हे पांच देवगण होते. हे पांचही महातेजस्वी महात्मे देवगण अंगिरस ऋषीचे पुत्र होत. हे राजा, या मनूचे ऊरुप्रभृति दहा पुत्र होते व ते नला नामक स्त्रीपासून झाले असल्यामुळें त्यां सर्वांस नाडवलेय अशी सामान्य संज्ञा होती. याप्रमाणें ही सहाव्या मन्वंतराची व्यवस्था झाली. आतां सातवा म्हणजे चालू मनु ऐक. या मनूचें नांव वैवस्वत, अत्रि, भगवान् - वसिष्ठ, महर्षि कश्यप, गौतम, भरद्वाज, विश्वामित्र व ऋचीक महर्षींचा पुत्र भगवान् जमदग्नि. हे सात चालू मन्वंतरांतील सप्तर्षि होत. साध्य, रुद्र, विश्वेदेव, मरुत, वसु, आदित्य व अश्विन्नौदेव असे हे वैवस्वत मनूंतील देवगण होत, व इक्ष्वांकुप्रमुख मनूचे दश पुत्र होते. हे राजा, या मन्वंतरांतील वर जे महातेजस्वी महर्षि सांगितले यांचे हजारों तेजस्वी पुत्र- पौत्र या भूमंडलावर दाही दिशांना व्यापून आहेत. यांशिवाय वर जीं मन्वंतरें सांगितलीं त्यांपैकीं प्रत्येक मन्वंतरांत लोकांची व्यवस्था लावण्याकरितां व लोकांचे संरक्षण करण्याकरितां पूर्वी सांगितलेले जे सात सप्तक म्हणजे एकूणपन्नास मरुद्गण ते विद्यमान असतात; व या सात सप्तकांपैकीं चार सप्तकें म्हणजे अठठावीस मरुद्गण प्रतिमन्वंतराच्या अखेरीस आपल्या सत्कर्मबलानें मुक्त होऊन शाश्वत ब्रह्मपदाला जातात. ते वर गेले म्हणजे जे दुसरे कोणी तपाच्या परिपाकानें त्या योग्यतेला आलेले असतात, ते त्यांचे जागीं नेमले जाऊन एकूणपन्नास ही ठरीव संख्या पुरी केली जाते. याचप्रमाणें मागें गेलेल्या व सांप्रतच्या मनूंतही मरुद्गणांची पूर्तता होत असते. हे कौरवेश्वर, याप्रमाणें गेलेलीं हीं सात मन्वंतरे तुला सांगितलीं. आतां पुढें येणारीं तींही सर्व तुला सांगतों. येणार्‍यांपैकी पांच मनूंना सावर्ण अशीं सामान्य संज्ञा आहे. या पांचांपैकीं एक सूर्यपुत्र व दुसरे परमेष्ठी प्रजापतीचे पुत्र. हे चौघे दक्षप्रजापतीचे नातू म्हणजे प्रिया नामक मुलीचे मुलगे. हे मोठे तेजस्वी असून मोठें तप करीत मेरुपृष्ठावर राहिले असल्यामुळें या चौघांस मेरुसावर्णीं असें नांव पडलें आहे. रुचि प्रजापतीचा पुत्र रौच्य हा एक मनु व भूतिनामक दिव्य स्त्रीचे ठिकाणीं झालेला रुचीचा पुत्र भौत्य तो एक. याप्रमाणें हे पुढें येणारे सात हे सर्वही मनु म्हणजे सावर्णीपासून पुढील सर्व मोठे तपस्वी असून त्यांचा काल येईपर्यंत ते स्वर्गांतच असतात. आतां यापुढील मनूंत होणार्‍या सप्तर्षींची नांवें ऐक. राम, व्यास, अत्रिपुत्र-दीप्तिमान्, भरद्वाजकुलोत्पन्न द्रोणाचा पुत्र महातेजस्वी अश्वत्थामा, गौतमकुलोत्पन्न शरद्वानाचा पुत्र कृप, कुशिक-कुलोत्पन्न गालव व कश्यप- कुलोत्पन्न रुरु, हे सात मुनिश्रेष्ठ येत्या मनूंतील सप्तर्षि होत. हे सप्तर्षि केवळ ब्रह्मदेवाच्या तोडीचेच आहेत. सत्कुलोत्पत्ति, तपोबल, मंत्रशास्त्र, व्याकरणशास्त्र, इत्यादिकांतील प्राविण्य या गोष्टींनीं ब्रह्मलोकांतही त्यांची प्रतिष्ठा आहे. हे फार निष्कलंक असून त्रिकालज्ञानी आहेत. यांची तपाविषयीं तर फारच ख्याती आहे. कारण सदा ते तपोनिरत असतात व ते मोठे मननशील आहेत. शिवाय मंत्रव्याकरण व अणिमादियोगसिद्धीच्या बलानें त्यांना सर्व कांहीं दिसतें. हें सर्वांत पहिले व धर्माचीं रहस्यें यांनीं प्रत्यक्ष अंगीं अनुभविली आहेत; शिवाय आपआपल्या नांवाच्या गोत्राचे ते प्रवर्तक किंवा मूळपुरुष होत. आतां हे जे एकंदर सप्तर्षि सांगितले हे कृतादि चतुर्युगांमध्ये पुनःपुनः उत्पन्न होऊन सत्यधर्माचें स्वतः अतिआस्थेनें आचरण करून लोकांना वर्ण व आश्रम यांच्या वेळोवेळीं मर्यादा घालून देतात, व कालगतीनें जेव्हां जेव्हां धर्माला शैथिल्य येतें तेव्हां तेव्हां यांचेच वंशांत उत्पन्न झालेले संहिता ब्राह्मणादि वेदभागाचे द्रष्टे व कर्ते ऋषि पुनःपुनः धर्माचें कार्य उज्जीवित करतात. या निरनिराळ्या सप्तर्षींत कधीं कधीं पहिल्यापेक्षां मागील ऋषि वरादि देण्याविषयीं अधिक समर्थ आढळून येतात, त्या अर्थीं या ऋषींची योग्यता ठरविण्यांत काल किंवा वय याचा विचार कर- ण्यांत मुळींच अर्थ नाहीं; ते सर्वत्र सारखे, हाच याचा उलगडा.

हे राजा, याप्रमाणें सप्तर्षींचा विषय स्पष्ट करून सांगितला. आतां भावी सावर्णीमनूचे पुत्र तुला सांगतों ते ऐक. वरीयान्, अवरीयान्, संमत, धृतिमान्, वसु, चरिष्णु, अपि, अधृष्णु, वाज व सुमति हे दहा. आतां मेरुसावर्णीतील पहिल्याचे सप्तर्षि सांगतों ते ऐक. पौलस्त्य- कुलोत्पन्न मेधातिथि, काश्यपकुलोत्पन्न वसु, भृगुकुलोत्पन्न जोतिष्मान्, अंगिरसकुलोत्पन्न द्युतिमान्, वसिष्ठकुलोत्पन्न सवन, अत्रिकुलोत्पन्न हव्यवाहन व पौलह, हे सात रोहितमन्वंतरांतील ऋषि. हे राजा, या मनूमध्यें तीनच देवगण होते या रोहितसावर्णी मनूचे म्हणजे दक्षपुत्राच्या पुत्राचे नऊ मुलगे होते. ते धृष्टकेतु, पंचहोत्र, निराकृति, पृथु, श्रवा, भूरिद्युम्न, ऋचीक, बृहत, गय, हे नऊ. दहाव्या पर्यायामधील दुसर्‍य़ा मनूंतील सप्तर्षि ऐक. पुलहाचा पुत्र हविष्मान्, भृगुपुत्र सुकृति, वसिष्ठपुत्र अष्टम, पुलस्त्यपुत्र प्रामति, कश्यपपुत्र नभोग, अंगिरसकुलोत्पन्न नभस, हे सात. अर्चिर्मार्ग किंवा उत्तरमार्ग व धूममार्ग किंवा दक्षिणमार्ग यांचे रक्षणकर्ते असे मंत्रप्रतिपाद्य दोन देवतागण आहेत म्हणून मागें सांगितलें; ते गण या कालचे देव होत. मनुसुत, उत्तमौजा, निकुषंज, वीर्यवान्, शतानीक, निरामित्र, वृषसेन, जयद्रथ, भूरिद्युम्न व सुवर्चा असे हे दहा या मनूंतील मनु- पुत्र. आतां अकराव्या पर्यायांतील तिसर्‍या मनूचे सप्तर्षि मी सांगतों, ते मजपासून समजून घे. कश्यपकुलोत्पन्न हविष्मान्, भृगु- कुलोत्पन्न हविष्मान्, अत्रिकुलोत्पन्न तरुण, वसिष्ठपुत्र अनघ, अंगिरसकुलोत्पन्न उदधिष्णा, पुलस्तीपुत्र निश्वर व पुलहपुत्र अग्नितेज; हे सात. या मनूंतील देवांचे तीन गण होते, व तिन्हीही गणांतील देव हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते. संवर्तक, सुशर्मा, देवानीक, पुरूद्वह, क्षेमधन्वा, दृढायु, आदर्श पण्डक व मनु याप्रमाणें हे नऊजण तृतीयसावर्णीचे पुत्र; यापुढें चवथ्या सावर्णीचे सप्तर्षि ऐक. वसिष्ठपुत्र द्युति, अत्रि-पुत्र सुतपा, अंगिरसपुत्र तपोमूर्ति, कश्यपपुत्र तपस्वी, पुलस्तीपुत्र तपोशन, पुलहपुत्र तपोरवि व भृगुपुत्र तपोधृति; हे सात. या मनूंत पांच देवगण होतील व ते सर्वही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असतील. देववायु, अदूर, देवश्रेष्ठ, विदूरथ, मित्रवान्, मित्रदेव, मित्रसेन, मित्रकृत्, मित्रबाहु आणि सुवर्चा, हे बाराव्या मनूंतील मनुपुत्र होतील. यानंतर येणार्‍या तेराव्या पर्यायांतील मनूचे सप्तर्षि ऐक. अंगिरापुत्र धृतिमान्, पुलस्तिपुत्र हव्यप, पुलहपुत्र तत्वदर्शी, भृगुपुत्र निरुत्सुक, अत्रिपुत्र निष्प्रकंप, कश्यपपुत्र निर्मोह व वसिष्ठपुत्र सुतपा; हे सात. या मनूंत देवतांचे तीनच गण होतील, असें ब्रह्मदेवानें सांगून ठेविलें आहे. या तेराव्या मनूंतील जे मनुपुत्र होतील ते रुचीचे पुत्र असें समजावें. यांची नावें:-चित्रसेन, विचित्र, नय, धर्मभृत, धृत, सुनेत्र, क्षत्रवृद्धि, सुतपा, निर्भय व दृढ; हे तेराव्या अथवा रौच्य मन्वंतरांतील मनुपुत्र. आतां चौदाव्या पर्यायांतील म्हणजे भौत्यमन्वंतरांतील सप्तर्षि. एक भृगुपुत्र अतिबाहु, अंगिरसपुत्र शुचि, अत्रिपुत्र युक्त, वसिष्ठपुत्र शुक्र, पुलहपुत्र अजित, कश्यपपुत्र अग्नीध्र व पुलस्त्यपुत्र भार्गव; हे अखेरचे सप्तर्षी समजावे.

जो कोणी प्रभातकाळीं उठून या सप्तर्षींचें, होऊन गेलेल्या व पुढें येणार्‍या नाम- संकीर्तन करील त्याला सुख, यश व दीर्घायुष्य हीं प्राप्त होतील.

असो; जनमेजया, या शेवटल्या मनूंत देवतांचे गण पांच होतील; व तरंगभीरु, वप्र, तरस्वान्, उग्र, अभिमानी, प्रवीण, जिष्णु, संक्रंदन व सबल; हे भौत्य मनूंतील मनु-पुत्र. या भौत्यमनूचा म्हणजे चौदाव्या मनूचा अंमल संपला म्हणजे त्याबरोबरच कल्पाचाही शेवट होतो. याप्रमाणे होऊन गेलेले व पुढें येणारे सर्व मनु मीं सांगितले.

हे राजा, या चौदा मनूंनी आपल्या पुत्र- पौत्रांसह मिळून ही अनेक ग्रामनगरांनी भरलेली व समृद्धापर्यंत पसरलेली अफाट पृथ्वी हिचें पुरापूर सहस्त्र युगेंपर्यंत आपल्या तपोबलानें परिपालन करावें, व आपआपला काल पुरा झाला कीं, आपण लयास जावें, अशी परमेश्वराची कायमची योजना आहे.


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
मन्वन्तरवर्णनं सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
अध्याय सातवा समाप्त

GO TOP