श्रीहरिवंशपुराण
हरिवंश पर्व
तृतीयोऽध्यायः


मरुतोत्पत्तिकथनम् -

जनमेजय उवाच
देवानां दानवानां च गन्धर्वोरगरक्षसाम् ।
उत्पत्तिं विस्तरेणेमां वैशम्पायन कीर्तय ॥ १ ॥
वैशम्पायन उवाच
प्रजाः सृजेति व्यादिष्टः पूर्वं दक्षः स्वयम्भुवा ।
यथा ससर्ज भूतानि तथा शृणु महीपते ॥ २ ॥
मानसान्येव भूतानि पूर्वमेवासृजत् प्रभुः ।
ऋषीन् देवान् सगन्धर्वानसुरानथ राक्षसान् ।
यक्षभूतपिशाचांश्च वयःपशुसरीसॄपान् ॥ ३ ॥
यदास्य तास्तु मानस्यो न व्यवर्धन्त वै प्रजाः ।
अपध्याता भगवता महादेवेन धीमता ॥ ४ ॥
ततः संचिन्त्य तु पुनः प्रजाहेतोः प्रजापतिः ।
स मैथुनेन धर्मेण सिसृक्षुर्विविधाः प्रजाः ॥ ५ ॥
असिक्नीमावहत् पत्नीं वीरणस्य प्रजापतेः ।
सुतां सुतपसा युक्तां महतीं लोकधारिणीम् ॥ ६ ॥
अथ पुत्रसहस्राणि वीरण्यां पञ्च वीर्यवान् ।
असिक्न्यां जनयामास दक्ष एव प्रजापतिः ॥ ७ ॥
तांस्तु दृष्ट्वा महाभागान् संविवर्धयिषून् प्रजाः ।
देवर्षिः प्रियसंवादो नारदः प्राब्रवीदिदम् ।
नाशाय वचनं तेषां शापायैवात्मनस्तथा ॥ ८ ॥
यं कश्यपः सुतवरं परमेष्ठी व्यजीजनत् ।
दक्षस्य वै दुहितरि दक्षशापभयान्मुनिः ॥ ९॥
पूर्वं स हि समुत्पन्नो नारदः परमेष्ठिना ।
असिक्न्यामथ वीरण्यां भूयो देवर्षिसत्तमः ।
तं भूयो जनयामास पितेव मुनिपुंगवम् ॥ १० ॥
तेन दक्षस्य पुत्रा वै हर्यश्वा इति विश्रुताः ।
निर्मथ्य नाशिताः सर्वे विधिना च न संशयः ॥ ११ ॥
तस्योद्यतस्तदा दक्षो नाशायामितविक्रमः ।
महर्षीन् पुरतः कृत्वा याचितः परमेष्ठिना ॥ १२ ॥
ततोऽभिसन्धिं चक्रुस्ते दक्षस्तु परमेष्ठिना ।
कन्यायां नारदो मह्यं तव पुत्रो भवेदिति ॥ १३ ॥
ततो दक्षस्तु तां प्रादात् कन्यां वै परमेष्ठिने ।
स तस्यां नारदो जज्ञे दक्षशापभयादृषिः ॥ १४ ॥
जनमेजय उवाच
कथं विनाशिताः पुत्रा नारदेन महर्षिणा ।
प्रजापतेर्द्विजश्रेष्ठ श्रोतुमिच्छामि तत्त्वतः ॥ १५ ॥
वैशम्पायन उवाच
दक्षस्य पुत्रा हर्यश्वा विवर्धयिषवः प्रजाः ।
समागता महावीर्या नारदस्तानुवाच ह ॥ १६ ॥
बालिशा बत यूयं वै नास्या जानीत वै भुवः ।
प्रमाणं स्रष्टुकामाः स्थ प्रजाः प्राचेतसात्मजाः ।
अन्तरूर्ध्वमधश्चैव कथं स्रक्ष्यथ वै प्रजाः ॥ १७ ॥
ते तु तद्वचनं श्रुत्वा प्रयाताः सर्वतोदिशम् ।
प्रमाणं द्रष्टुकामास्ते गताः प्राचेतसात्मजाः ॥ १८ ॥
वायोरनशनं प्राप्य गतास्ते वै पराभवम् ।
अद्यापि न निवर्तन्ते समुद्रेभ्य इवापगाः ॥ १९ ॥
हर्यश्वेष्वथ नष्टेषु दक्षः प्राचेतसः पुनः ।
वैरिण्यामेव पुत्राणां सहस्रमसृजत् प्रभुः ॥ २० ॥
विवर्धयिषवस्ते तु शबलाश्वाः प्रजास्तदा ।
पूर्वोक्तं वचनं तात नारदेनैव नोदिताः ॥ २१ ॥
अन्योन्यमूचुस्ते सर्वे सम्यगाह महामुनिः ।
भ्रातॄणां पदवीं ज्ञातुं गन्तव्यं नात्र संशयः ॥ २२ ॥
ज्ञात्वा प्रमाणं पृथ्व्याश्च सुखं स्रक्ष्यामहे प्रजाः ।
एकाग्राः स्वस्थमनसा यथावदनुपूर्वशः ॥ २३ ॥
तेऽपि तेनैव मार्गेण प्रयाताः सर्वतोदिशम् ।
अद्यापि न निवर्तन्ते समुद्रेभ्य इवापगाः ॥ २४ ॥
नष्टेशु शबलाश्वेषु दक्ष क्रुद्धोऽवदद् वचः ।
नारदं नाशमेहीति गर्भवासं वसेति च ॥ २५ ॥
तदा प्रभृति वै भ्राता भ्रातुरन्वेषणं नृप ।
प्रयातो नश्यति क्षिप्रं तन्न कार्यं विपश्चिता ॥ २६ ॥
तांश्चापि नष्टान् विज्ञाय पुत्रान् दक्षः प्रजापतिः ।
षष्टिं भूयोऽसृजत् कन्या वीरण्यामिति नः श्रुतम् ॥ २७ ॥
तास्तदा प्रतिजग्राह भार्यार्थे कश्यपः प्रभुः ।
सोमो धर्मश्च कौरव्य तथैवान्ये महर्षयः ॥ २८ ॥
ददौ स दश धर्माय कश्यपाय त्रयोदश ।
सप्तविंशतिं सोमाय चतस्रोऽरिष्टनेमिने ॥ २९ ॥
द्वे चैव भृगुपुत्राय द्वे चैवाङ्गिरसे तथा । ॥
द्वे कृशाश्वाय विदुषे तासां नामानि मे शृणु ॥ ३० ॥
अरुन्धती वसुर्यामी लम्बा भानुर्मरुत्वती ।
संकल्पा च मुहूर्ता च साध्या विश्वा च भारत ।
धर्मपत्न्यो दश त्वेतास्तास्वपत्यानि मे श्रृणु ॥ ३१ ॥
विश्वेदेवाश्च विश्वायाः साध्यान् साध्या व्यजायत ।
मरुत्वत्यां मरुत्वन्तो वसोस्तु वसवस्तथा ॥ ३२ ॥
भानोस्तु भानवस्तात मुहूर्ताया मुहूर्तजाः ॥ ३३ ॥
लम्बायाश्चैव घोषोऽथ नागवीथी च यामिजा ।
पृथिवीविषयं सर्वमरुन्धत्यां व्यजायत ॥ ३४ ॥
संकल्पायास्तु सर्वात्मा जज्ञे संकल्प एव हि ।
नागवीथ्याश्च यामिन्या वृषलम्बा व्यजायत ॥ ३५ ॥
या राजन् सोमपत्न्यस्तु दक्षः प्राचेतसो ददौ ।
सर्वा नक्षत्रनाम्न्यस्ता ज्योतिषे परिकीर्तिताः ॥ ३६ ॥
ये त्वन्ये ख्यातिमन्तो वै देवा ज्योतिःपुरोगमाः ।
वसवोऽष्टौ समाख्यातास्तेषां वक्ष्यामि विस्तरम् ॥ ३७ ॥
आपो ध्रुवश्च सोमश्च धरश्चैवानिलानलौ ।
प्रत्यूषश्च प्रभासश्च वसवो नामभिः स्मृताः ॥ ३८ ॥
आपस्य पुत्रो वैतण्ड्यः श्रमः श्रान्तो मुनिस्तथा ।
ध्रुवस्य पुत्रो भगवान् कालो लोकप्रकालनः ॥ ३९ ॥
सोमस्य भगवान् वर्चा वर्चस्वी येन जायते ।
धरस्य पुत्रो द्रविणो हुतहव्यवहस्तथा ।
मनोहरायाः शिशिरः प्राणोऽथ रमणस्तथा ॥ ४० ॥
अनिलस्य शिवा भार्या यस्याः पुत्रो मनोजवः ।
अविज्ञातगतिश्चैव द्वौ पुत्रावनिलस्य तु ॥ ४१ ॥
अग्निपुत्रः कुमारस्तु शरस्तम्बे श्रियान्वितः ।
तस्य शाखो विशाखश्च नैगमेयश्च पृष्ठजाः ॥ ४२ ॥
अपत्यं कृत्तिकानां तु कार्तिकेय इति स्मृतः ।
स्कन्दः सनत्कुमारश्च सृष्टः पादेन तेजसः ॥ ४३ ॥
प्रत्यूषस्य विदुः पुत्रमृटिं नाम्ना च देवलम् ।
द्वौ पुत्रौ देवलस्यापि क्षमावन्तौ तपस्विनौ ॥ ४४ ॥
बृहस्पतेस्तु भगिनी वरस्त्री ब्रह्मचारिणी ।
योगसिद्धा जगत् कृत्स्नमसक्ता विचचार ह ॥ ४५ ॥
प्रभासस्य च सा भार्या वसूनामष्टमस्य च ।
विश्वकर्मा महाभागस्तस्यां जज्ञे प्रजापतिः ॥ ४६ ॥
कर्ता शिल्पसहस्राणां त्रिदशानां च वार्धकिः ।
भूषणानां च सर्वेषां कर्ता शिल्पवतां वरः ॥ ४७ ॥
यः सर्वासां विमानानि देवतानां चकार ह ।
मानुष्याश्चोपजीवन्ति यस्य शिल्पं महात्मनः ॥ ४८ ॥
सुरभी कश्यपाद् रुद्रानेकादश विनिर्ममे ।
महादेवप्रसादेन तपसा भाविता सती ॥ ४९ ॥
अजैकपादहिर्बुध्न्यस्त्वष्टा रुद्राश्च भारत ।
त्वष्टुश्चैवात्मजः श्रीमान् विश्वरूपो महायशाः ॥ ५० ॥
हरश्च बहुरूपश्च त्र्यम्बकश्चापराजितः ।
वृषाकपिश्च शम्भुश्च कपर्दी रेवतस्तथा ॥ ५१ ॥
मृगव्याधश्च सर्पश्च कपाली च विशाम्पते ।
एकादशैते कथिता रुद्रास्त्रिभुवनेश्वराः ॥ ५२ ॥
शतं त्वेवं समाख्यातं रुद्राणाममितौजसाम् ।
पुराणे भरतश्रेष्ठ यैर्व्याप्ताः सचराचराः ॥ ५३ ॥
लोका भरतशार्दूल कश्यपस्य निबोध मे ।
अदितिर्दितिर्दनुश्चैव अरिष्टा सुरसा खशा ॥ ५४ ॥
सुरभिर्विनता चैव ताम्रा क्रोधवशा इरा ।
कद्रुर्मुनिश्च राजेन्द्र तास्वपत्यानि मे शृणु ॥ ५५ ॥
पूर्वमन्वन्तरे श्रेष्ठा द्वादशासन् सुरोत्तमाः ।
तुषिता नाम तेऽन्योन्यमूचुर्वैवस्वतेऽन्तरे ॥ ५६ ॥
उपस्थितेऽतियशसि चाक्षुषस्यान्तरे मनोः ।
हितार्थं सर्वसत्त्वानां समागम्य परस्परम् ॥ ५७ ॥
आगच्छत द्रुतं देवा अदितिं सम्प्रविश्य वै ।
मन्वन्तरे प्रसूयामस्तन्नः श्रेयो भविष्यति ॥ ५८ ॥
वैशम्पायन उवाच
एवमुक्त्वा तु ते सर्वं चाक्षुषस्यान्तरे मनोः ।
मारीचात् कश्यपाज्जातास्तेऽदित्या दक्षकन्यया ॥ ५९ ॥
तत्र विष्णुश्च शक्रश्च जज्ञाते पुनरेव हि ।
अर्यमा चैव धाता च त्वष्टा पूषा च भारत ॥ ६० ॥
विवस्वान् सविता चैव मित्रो वरुण एव च ।
अंशो भगश्चातितेजा आदित्या द्वादश स्मृताः ॥ ६१ ॥
चाक्षुषस्यान्तरे पूर्वमासन् ये तुषिताः सुराः ।
वैवस्वतेऽन्तरे ते वै आदित्या द्वादश स्मृताः ॥ ६२ ॥
सप्तविंशतिर्याः प्रोक्ताः सोमपत्न्योऽथ सुव्रताः ।
तासामपत्यान्यभवन् दीप्तान्यमिततेजसां ॥ ६३ ॥
अरिष्टनेमिपत्नीनामपत्यानीह षोडश ।
बहुपुत्रस्य विदुषश्चतस्रो विद्युतः स्मृताः ॥ ६४ ॥
प्रत्यङ्गिरसजाः श्रेष्ठा ऋचो ब्रह्मर्षिसत्कृताः ।
कृशाश्वस्य तु राजर्षेर्देवप्रहरणानि च ॥ ६५ ॥
एते युगसहस्रान्ते जायन्ते पुनरेव ह ।
सर्वदेवगणास्तात त्रयस्त्रिंशत् तु कामजाः ॥ ६६ ॥
तेषामपि च राजेन्द्र निरोधोत्पत्तिरुच्यते ॥ ६७ ॥
यथा सूर्यस्य गगने उदयास्तमने इह ।
एवं देवनिकायास्ते सम्भवन्ति युगे युगे ॥ ६८ ॥
दित्याः पुत्रद्वयं जज्ञे कश्यपादिति नः श्रुतम् ।
हिरण्यकशिपुश्चैव हिरण्याक्षश्च वीर्यवान् ॥ ६९ ॥
सिंहिका चाभवत्कन्या विप्रचित्तेः परिग्रहः ।
सैंहिकेया इति ख्यातास्तस्याः पुत्रा महाबलाः ।
गणैश्च सह राजेन्द्र दशसाहस्रमुच्यते ॥ ७० ॥
तेषां पुत्राश्च पौत्राश्च शतशोऽथ सहस्रशः ।
असंख्याता महाबाहो हिरण्यकशिपोः शृणु ॥ ७१ ॥
हिरण्यकशिपोः पुत्राश्चत्वारः प्रथितौजसः ।
अनुह्रादश्च ह्रादश्च प्रह्रादश्चैव वीर्यवान् ॥ ७२ ॥
संह्रादश्च चतुर्थोऽभूद्ध्रादपुत्रो ह्रदस्तथा ।
संह्रादपुत्रः सुन्दश्च निसुन्दस्तावुभौ स्मृतौ ॥ ७३ ॥
अनुह्रादसुतौ ह्यायुः शिबिकालस्तथैव ह ।
विरोचनश्च प्राह्रादिर्बलिर्जज्ञे विरोचनात् ॥ ७४ ॥
बलेः पुत्रशतं त्वासीद् बाणज्येष्ठं नराधिप ।
धृतराष्ट्रश्च सूर्यश्च चन्द्रमाश्चेन्द्रतापनः ॥ ७५ ॥
कुम्भनाभो गर्दभाक्षः कुक्षिरित्येवमादयः ।
बाणस्तेषामतिबलो ज्येष्ठः पशुपतेः प्रियः ॥ ७६ ॥
पुराकल्पे तु बाणेन प्रसाद्योमापतिं प्रभुम् ।
पार्श्वतो विहरिष्यामि इत्येवं याचितो वरः ॥ ७७ ॥
बाणस्य चेन्द्रदमनो लोहित्यामुदपद्यत ।
गणास्तथासुरा राजञ्छतसाहस्रसम्मिताः ॥ ७८ ॥
हिरण्याक्षसुताः पञ्च विद्वांसः सुमहाबलाः ।
झर्झरः शकुनिश्चैव भूतसंतापनस्तथा ।
महानाभश्च विक्रान्तः कालनाभस्तथैव च ॥ ७९ ॥
अभवन् दनुपुत्राश्च शतं तीव्रपराक्रमाः ॥
तपस्विनो महावीर्याः प्राधान्येन निबोध तान् ॥ ८० ॥
द्विमूर्धा शकुनिश्चैव तथा शङ्कुशिरा विभुः ।
शङ्कुकर्णो विराधश्च गवेष्ठी दुन्धुभिस्तथा ॥
अयोमुखः शम्बरश्च कपिलो वामनस्तथा । ८१ ॥
मरीचिर्मघवांश्चैव इरा शङ्कुशिरा वृकः ।
विक्षोभणश्च केतुश्च केतुवीर्यशतह्रदौ ॥ ८२ ॥
इन्द्रजित् सत्यजिच्चैव वज्रनाभस्तथैव च ।
महानाभश्च विक्रान्तः कालनाभस्तथैव च ॥ ८३ ॥
एकचक्रो महाबाहुस्तारकश्च महाबलः ।
वैश्वानरः पुलोमा च विद्रावणमहासुरौ ॥ ८४ ॥
स्वर्भानुर्वृषपर्वा च तुहुण्डश्च महासुरः ।
सूक्ष्मश्चैवातिचन्द्रश्च ऊर्णनाभो महगिरिः ॥ ८५ ॥
असिलोमा च केशी च शठश्च बलको मदः ।
तथा गगनमूर्धा च कुम्भनाभो महासुरः ॥ ८६ ॥
प्रमदो मयश्च कुपथो हयग्रीवश्च वीर्यवान् ।
वैसृपः सविरूपाक्षः सुपथोऽथ हराहरौ ॥ ८७ ॥
हिरण्यकशिपुश्चैव शतमायुश्च शम्बरः ।
शरभः शलभश्चैव विप्रचित्तिश्च वीर्यवान् ॥ ८८ ॥
एते सर्वे दनोः पुत्राः कश्यपादभिजज्ञिरे ।
विप्रचित्तिप्रधानास्ते दानवाः सुमहाबलाः ॥ ८९ ॥
एतेषां यदपत्यं तु तन्न शक्यं नराधिप ।
प्रसंख्यातुं महीपाल पुत्रपौत्राद्यनन्तकम् ॥ ९० ॥
स्वर्भानोस्तु प्रभा कन्या पुलोम्नश्च सुतात्रयम् ।
उपदानवी हयशिराः शर्मिष्ठा वार्षपर्वणी ॥ ९१ ॥
पुलोमा कालिका चैव वैश्वानरसुते उभे ।
बह्वपत्ये महावीर्ये मारीचेस्तु परिग्रहः ॥ ९२ ॥
तयोः पुत्रसहस्राणि षष्टिं दानवनन्दनान् ॥
चतुर्दशशतानन्यान् हिरण्यपुरवासिनः ॥ ९३ ॥
मारीचिर्जनयामास महता तपसान्वितः ।
पौलोमाः कालकेयाश्च दानवास्ते महाबलाः ॥ ९४ ॥
अवध्या देवतानां च हिरण्यपुरवासिनः ।
कृताः पितामहेनाजौ निहताः सव्यसाचिना ॥ ९५ ॥
प्रभाया नहुशः पुत्रः सृञ्जयश्च शचीसुतः ।
पूरुं जज्ञेऽथ शर्मिष्ठा दुष्यन्तमुपदानवी ॥ ९६ ॥
ततोऽपरे महावीर्या दानवास्त्वतिदारुणाः ।
सिंहिकायामथोत्पन्ना विप्रचित्तेः सुतास्तदा ॥ ९७ ॥
दैत्यदानवसंयोगाज्जातास्तीव्रपराक्रमाः ।
सैंहिकेया इति ख्यातास्त्रयोदश महाबलाः ॥ ९८ ॥
व्यंशः शल्यश्च बलिनौ नभश्चैव महाबलः ।
वातापिर्नमुचिश्चैव इल्वलः खसृमस्तथा ॥ ९९ ॥
अञ्जिको नरकश्चैव कालनाभस्तथैव च ।
शुकः पोतरणश्चैव वज्रनाभश्च वीर्यवान् ॥ १०० ॥
राहुर्ज्येष्ठस्तु तेषां वै सूर्यचन्द्रविमर्दनः ।
मूकश्चैव तुहुण्डश्च ह्रादपुत्रौ बभूवतुः ॥ १०१ ॥
मारीचः सुन्दपुत्रश्च ताडकायां व्यजायत ।
शिवमाणस्तथा चैव सुरकल्पश्च वीर्यवाण् ॥ १०२ ॥
एते वै दानवाः श्रेष्ठा दनुवंशविवर्धनाः ।
तेषां पुत्राश्च पौत्राश्च शतशोऽथ सहस्रशः ॥ १०३ ॥
संह्रादस्य तु दैत्यस्य निवातकवचाः कुले ।
समुत्पन्नाः सुतपसा महान्तो भावितात्मनः ॥ १०४ ॥
तिस्रः कोट्यः सुतास्तेषां मणिमत्यां निवासिनाम् ॥
तेऽप्यवध्यास्तु देवानामर्जुनेन निपातिताः ॥ १०५ ॥
षट् सुताः सुमहासत्त्वास्ताम्रायाः परिकीर्तिताः ॥
काकी श्येनी च भासी च सुग्रीवी शुचि गृध्रिका ॥ १०६ ॥
काकी काकानजनयदुलूकी प्रत्युलूककान् ।
श्येनी श्येनांस्तथा भासी भासान् गृध्रांश्च गृध्र्यपि ॥ १०७ ॥
शुचिरौदकान् पक्षिगणान् सुग्रीवी तु परंतप ।
अश्वानुष्ट्रान् गर्दभांश्च ताम्रावंशः प्रकीर्तितः ॥ १०८ ॥
विनतायास्तु पुत्रौ द्वावरुणो गरुडस्तथा ।
सुपर्णः पततां श्रेष्ठो दारुणः स्वेन कर्मणा ॥ १०९ ॥
सुरसायाः सहस्रं तु सर्पाणाममितौजसाम् ।
अनेकशिरसां तात खेचराणां महात्मनाम् ॥ ११० ॥
काद्रवेयाश्च बलिनः सहस्रममितौजसः ।
सुपर्णवशगा नागा जज्ञिरेऽनेकमस्तकाः ॥ १११ ॥
तेषां प्रधानाः सततं शेषवासुकितक्षकाः ।
ऐरावतो महापद्मः कम्बलाश्वतरावुभौ ॥ ११२ ॥
एलापत्रस्तथा शङ्खः कर्कोटकधनंजयौ ।
महानीलमहाकर्णौ धृतराष्ट्रबलाहकौ ॥ ११३ ॥
कुहरः पुष्पदंष्ट्रश्च दुर्मुखः सुमुखस्तथा ।
शङ्खश्च शङ्खपालश्च कपिलो वामनस्तथा ॥ ११४ ॥
नहुषः शङ्खरोमा च मणिरित्येवमादयः ।
तेषां पुत्राश्च पौत्राश्च गरुडेन निपातिताः ॥ ११५ ॥
चतुर्दशसहस्राणि क्रूराणां पवनाशिनाम् ।
गणं क्रोधवशं विद्धि तस्य सर्वे च दंष्ट्रिणः ॥ ११६ ॥
स्थलजाः पक्षिणोऽब्जाश्च धरायाः प्रसवाः स्मृताः ।
गास्तु वै जनयामास सुरभिर्महिषांस्तथा ॥ ११७ ॥
इरा वृक्षलता वल्लीस्तृणजातीश्च सर्वशः ।
खशा तु यक्षरक्षांसि मुनीनप्सरसस्तथा ॥ ११८ ॥
अरिष्टा तु महासत्त्वान् गन्धर्वानमितौजसः ।
एते कश्यपदायादाः कीर्तिताः स्थाणुजङ्गमाः । ११९ ॥
तेषां पुत्राश्च पौत्राश्च शतशोऽथ सहस्रशः ।
एष मन्वन्तरे तात सर्गः स्वारोचिषे स्मृतः ॥ १२० ॥
वैवस्वते तु महति वारुणे वितते क्रतौ ।
जुह्वानस्य ब्रह्मणो वै प्रजासर्ग इहोच्यते ॥ १२१ ॥
पूर्वं यत्र तु ब्रह्मर्षीनुत्पन्नान्सप्त मानसान् ।
पुत्रत्वे कल्पयामास स्वयमेव पितामहः ॥ १२२ ॥
ततो विरोधे देवानां दानवानां च भारत ।
दितिर्विनष्टपुत्रा वै तोषयामास कश्यपम् ॥ १२३ ॥
तां कश्यपः प्रसन्नात्मा सम्यगाराधितस्तया ।
वरेण च्छन्दयामास सा च वव्रे वरं ततः ॥ १२४ ॥
पुत्रमिन्द्रवधार्थाय समर्थममितौजसम् ।
स च तस्यै वरं प्रादात् प्रार्थितं सुमहातपाः ॥ १२५ ॥
दत्त्वा च वरमव्यग्रो मारीचस्तामभाषत ।
भविष्यति सुतस्तेऽयं यद्येवं धारयिष्यसि ॥ १२६ ॥
इन्द्रं सुतो निहन्ता ते गर्भं वै शरदां शतम् ।
यदि धारयसे शौचं तत्परा व्रतमास्थिता ॥ १२७ ॥
तथेत्यभिहितो भर्ता तया देव्या महातपाः ।
धारयामास गर्भं तु शुचिः सा वसुधाधिप ॥ १२८ ॥
ततोऽभ्युपागमद् दित्यां गर्भमाधाय कश्यपः ।
रोचयन् वै गणश्रेष्ठं देवानाममितौजसम् ॥ १२९ ॥
तेजः संभृत्य दुर्धर्षमवध्यममरैरपि ।
जगाम पर्वतायैव तपसे संशितव्रतः ॥ १३०॥
तस्याश्चैवान्तरप्रेप्सुरभवत् पाकशासनः ।
ऊने वर्षशते चास्या ददर्शान्तरमच्युतः ॥ १३१ ॥
अकृत्वा पादयोः शौचं दितिः शयनमाविशत् ।
निद्रां च कारयामास तस्याः कुक्षिं प्रविश्य सः ॥ १३२ ॥
वज्रपाणिस्ततो गर्भं सप्तधा तं न्यकृन्तत ।
स पाठ्यमानो वज्रेण गर्भस्तु प्ररुरोद ह ॥ १३३ ॥
मा रोदीरिति तं शक्रः पुनः पुनरथाब्रवीत् ।
सोऽभवत् सप्तधा गर्भस्तमिन्द्रो रुषितः पुनः ॥ १३४ ॥
एकैकं सप्तधा चक्रे वज्रेणैवारिकर्शनः ।
मरुतो नाम देवास्ते बभूवुर्भरतर्भ ॥ १३५ ॥
यथैवोक्तं मघवता तथैव मरुतोऽभवन् ।
देवा एकोनपञ्चाशत् सहाया वज्रपाणिनः ॥ १३६ ॥
तेषामेवं प्रवृद्धानां भूतानां जनमेजय । ॥
रोचयन् वै गणश्रेष्ठं देवानाममितौजसाम् ॥ १३७ ॥
निकायेषु निकायेषु हरिः प्रादात् प्रजापतीन् ।
क्रमशस्तानि राज्यानि पृथुपूर्वाणि भारत ॥ १३८ ॥
स हरिः पुरुषो वीरः कृष्णो जिष्णुः प्रजापतिः ।
पर्जन्यस्तपनोऽव्यक्तस्तस्य सर्वमिदं जगत् ॥ १३९ ॥
भूतसर्गमिमं सम्यग्जानतो भरतर्षभ ।
मरुतां च शुभे जन्म शृण्वतः पठ्तोऽपि वा ॥
नावृत्तिभयमस्तीह परलोकभयं कुतः ॥ १४० ॥
इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि ॥
मरुदुत्पत्तिकथने तृतीयोऽध्यायः


मरुतांची उत्पत्ति -

जनमेजय विचारतो - हे वैशंपायना, देव, दानव, गंधर्व, सर्प, राक्षस, इत्यादिकांची उत्पत्ति विशेष विस्तारानें सांगा.

वैशंपायन सांगतात -हे राजा, पूर्वी ब्रह्मदेवानें दक्ष प्रजापतीला 'तूं आतां प्रजा निर्माण कर' अशी आज्ञा दिली असतां त्यानें कसकशी सृष्टि निर्माण केलीं, ती ऐक. त्या समर्थ दक्षाने ऋषि, देव, गंधर्व, असुर, राक्षस, यक्ष, भूत, पिशाच्च, पक्षी, पशु व सर्पादि हे सर्व मनापासूनच उत्पन्न केले; परंतु दक्षाचें व शंकराचें वांकडें असल्यामुळें त्यानें ही प्रजा वाढू नये असा संकल्प केल्यानें ही मानससृष्टि पुढें प्रजावृद्धि करूं शकेना; तेव्हां आतां प्रजावृद्धि कशी करावी अशा मोठ्या विवंचनेंत दक्ष पडला असतां मैथुन धर्मानें सृष्टि वाढविण्याची तोड त्याला सुचली. मग त्यानें वीरण प्रजापतीची कन्या असिक्नी नांवाची होती, तिला आपली पत्‍नी केली. ही असिक्नी विपुल प्रजा धारण करण्याविषयीं समर्थ अर्थात् अत्यंत सशक्त व मोठी तपस्विनी होती. दक्ष प्रजापतिही मोठा वीर्यवान् असल्यामुळें त्यानें स्वतःच असिक्नीचे ठिकाणीं पांच हजार पुत्र निर्माण केले. पुढें हे पांच सहस्र पुत्र दक्षाप्रमाणेंच प्रत्येकजण झपाट्यानें प्रजावृद्धि करणार असें पाहून बातमी देण्यांत कुशल देवर्षि नारद हा त्यांचा नाश करण्याकरितां व स्वतःला शापप्राप्ति करून घेण्यासाठींच कीं काय, त्यांना पुढीलप्रमाणें बोलला.

आतां हा नारद म्हटला म्हणजे दक्षाच्या शापभयास्तव मुनिश्रेष्ठ कश्यपानें दक्षाच्या असिक्नी नामक पत्‍नीची धाकटी बहिण जी वीरणी तिचे ठायीं पुन्हा उत्पन्न केलेला पुत्र होय. पुन्हा म्हणण्याचें कारण प्रथम नारद हा ब्रह्मदेवानें आपला मानसपुत्र म्हणून उत्पन्न केला होता. असो; या नारदानें हर्यश्व नांवाने प्रख्यात असलेले दक्षाचे सर्व पुत्र सशास्त्र युक्तीनें फसवून संसारांतून उठवून लाविले. ही गोष्ट नारदानेंच खास केली अशी बातमी जेव्हां अतुल पराक्रमी दक्षाला समजली, तेव्हां तो नारदाचा नाश करण्याविषयीं उद्युक्त झाला. हें कानीं येतांच परमेष्ठी म्हणजे ब्रह्मदेव हा बडी बडी ऋषिमंडळी मध्यस्थीकरितां बरोबर घेऊन दक्षाकडे आला; व त्यांचे मध्यस्थीनें दक्षाचा व ब्रह्मदेवाचा गोडीगुलाबीनें करार ठरला. तो असा कीं, दक्षानें आपली कन्या ब्रह्मदेवास द्यावी व ब्रह्मदेवानें तिचे ठायीं पुन्हा नारद उत्पन्न करावा. मग या कराराप्रमाणें दक्षानें आपली एक कन्या ब्रह्मदेवाला दिली व ब्रह्मदेवानेंही दक्षाच्या शापभयास्तव पुन्हा तिचे ठिकाणीं नारद उत्पन्न केला.

जनमेजय विचारतो- हे वैशंपायना, नारदानें दक्षप्रजापतीचे पुत्र संसारांतून फुकट घालविले म्हणून जें आपण वर सांगितलें, ते कसकशा रीतीनें तें मला सविस्तर सांगा.

वैशंपायन उत्तर करतात- दक्षाचे महा- पराक्रमी पुत्र प्रजेची विशेष वृद्धि करण्याच्या नादांत आहेत अशांत त्यांची व नारदाची सहज गांठ पडली.

तेव्हां नारद त्यांना म्हणाला: - मला तुम्हीं फार मूर्ख दिसतां; कारण, तुम्हीं प्रजा वाढविण्याचें मनांत आणिलें खरें, परंतु ज्या या पृथ्वीवर राहून तुमच्या प्रजेला उदर-भरण करावयाचे ती पृथ्वी किती विस्तृत आहे, खालीं वर चोहोंबाजूंनी तिचा परिघ केवढा आहे, म्हणजे प्रजा फाजील झाली असतां तिचे धारणपोषणाला ही पृथ्वी समर्थ होईल कीं नाही, याचा अंदाज काढण्यापूर्वीच तुम्ही प्रजावृद्धि करूं पाहातां. नारदाचें हें बोलणें त्या दक्षपुत्रांना खरें वाटलें व त्याचे सूचनेचा अंगीकार करून पृथ्वीचें प्रमाण शोधण्याकरितां ते निरनिराळ्या दिशांकडे चालते झाले. ते आपल्या कामास इतक्या उत्कंठेनें लागले की, त्यांनीं अन्नपाणीही टाकलें. पुढें वायुभक्षणही सोडिलें; व अखेरीस समुद्र शोधू गेलेल्या नदीप्रमाणें ते गेले ते परत आलेच नाहीत.

पुत्रांची याप्रमाणें वाट झालेली पाहून दक्ष प्रजापतीनें आपल्या पहिल्या वीरणीसंज्ञक स्त्रीचे ठिकाणीं पुनरपि एक हजार मुलगे उत्पन्न केले. या सर्वांना शबलाश्व असें म्हणत. यांनाही नारदानें त्यांच्या वडील बंधूंप्रमाणेंच कानमंत्र सांगून संसारांतून उठवून लाविलें. नारदानें ज्या वेळीं त्यांना उपदेश केला त्या वेळेस त्यांनाही ती गोष्ट रुचून ते परस्परांत म्हणाले, '' नारदाचें म्हणणें वाजवी आहे. पृथ्वीचें प्रमाण किती आहे व आपल्या वडील बंधूंची वार्ता काय झाली याचा आपण अगोदर शोध लावून येऊं, आणि मग खुशाल संतती वाढवीत बसूं. '' असा संकेत झाल्यावर तेही स्वस्थ मनानें व एकच मुद्दा डोळ्यांपुढे ठेवून क्रमाक्रमाने त्यांचे पूर्वज बंधु ज्या मार्गानें दाही दिशा फांकले होते त्याचप्रमाणें शोधार्थ गेले, व समुद्रास मिळालेल्या नदीप्रमाणें पुन्हा परतले नाहींत. याप्रमाणें दुसर्‍याही पोरांची नारदानें वाट लावलेली पाहून दक्षानें संतापून नारदाला शाप दिला कीं, तुझा नाश होईल व तूं गर्भवासाच्या दुःखांत पडशील. (या शापबलामुळेंच नारदाला पुन्हा जन्म घ्यावे लागले, असें दिसतें)

हे राजा, याप्रमाणें बंधूंच्या शोधार्थ गेलेले शबलाश्व परत आले नाहीत त्या दिवसापासून कोणीही बंधू आपल्या हरवलेल्या बंधूच्या शोधार्थ गेला असतां बहुधा तत्काळ मरतो व याकरितां शहाण्यानें असली गोष्ट करूं नये.

हे दुसर्‍या वेळीं उत्पन्न केलेले पुत्रही नायनाट झाले असें पाहातांच, आमचे असें ऐकिवांत आहे कीं, त्या दक्ष प्रजापतीनें पुनरपि आपल्या वीरणी स्त्रीचे ठिकाणींच साठ कन्या निर्माण केल्या; व हे कुरुश्रेष्ठा, या साठही मुली कश्यप, सोम, धर्म व दुसरेही कांहीं महर्षि यांनी वरल्या. त्यांची गणती येणेंप्रमाणें: दक्षानें त्यांतील तुहा धर्मऋषीला दिल्या; तेरा कश्यपाला दिल्या; सत्तावीस सोमाला; चार अरिष्टनेमीला; दोन भृगुपुत्राला; दोन अंगिरसाला; व दोन जो विद्वान् कृशाश्व त्याला. आतां या मुलींचीं नांवें मीं तुला सांगतों तीं ऐक. अरुंधती, वसु, यामी, लंबा, भामु, मरुत्वती, संकल्पा, मुहूर्ता, साध्या व विश्वा. याप्रमाणें या दहाजणी धर्मऋषींच्या पत्‍नी झाल्या. आतां या दहाजणींची संतति ऐक.

विश्वेपासून विश्वेदेव झाले; साध्येपासून साध्य झाले; मरुत्वतीपासून मरुत्वंत झाले; वसूपासून वसू झाले; भानूपासून भानू झाले; मुहूर्तेपासून मुहूर्त झाले; घोष नांवाची जी मंत्राभिमानिनी देवता ती लंबेपासून झाली. नागवीथी नामक जी स्वर्गमार्गाभिमानिनी देवता ती यामीपासून झाली. अरुंधतीपासून पृथ्वीविषयक पशु, औषधि वगैरे झालीं. संकल्पेपासून सर्वांच्या मानसांत रहाणारा जो संकल्प तो झाला. यामीची कन्या जी नागवीथी तिजपासून वृषलंबा झाली. हे राजा, प्राचेतस् दक्षानें सोमाला ज्या नक्षत्र- संज्ञक सत्तावीस मुली दिल्या, त्यांची विशिष्ट नांवें (अश्विनी, भरणी, वगैरे) ज्योतिषशास्त्रांत प्रसिद्धच आहेत. आतां विशेष कीर्तिमान् व दीप्तिमान् जे आठ वसु म्हणून म्हटले आहेत त्यांचे मीच थोडेंसें विस्ताराने वर्णन सांगतो.

आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष व प्रभास अशीं त्या आठांची नांवें आहेत. यांपैकीं आपाला वैतंड्य, श्रम, शांत व मुनि; ध्रुवाचा पुत्र लोकध्वंसन करणारा भगवान् काल; सोमाचा पुत्र भगवान् वर्च्चा ( यापासून मनुष्य वर्चस्वी होतात), यज्ञांतील हुतद्रव्य वाहून नेणारा जो द्रविण तो धराचा पुत्र. धरालाच मनोहरा म्हणून दुसरी स्त्री होती. तिजपासून शिशिर, प्राण व रमण झाले. अनिल वसूची भार्या शिवा नामक होती. तिजपासून मनोजव व अविज्ञातगती असे दोन पुत्र अनिलाला झाले. अग्निवसूचा पुत्र कुमार, हा मोठा तेजस्वी असून शर नामक तृणाच्या झुडुपांत जन्मास आला. त्याच्या पाठीवर शाख, विशाख व नैगमेय असे भाऊ झाले. एकूण हे चार अग्नीचे म्हणजे अनलवसूचे पुत्र. यांपैकीं या कुमारालाच कार्तिकेय असेंही नांव आहे. कारण हा सहा कृत्तिकांपासून ( एकेकीनें एक मुख व दोन हात याप्रमाणें देऊन) झाला होता. यालाच स्कंद किंवा सनत्कुमार म्हणतात. हा अग्नीनें आपल्या तेजाच्या चतुर्थांशापासून उत्पन्न केला. प्रत्यूषाला देवल नामक ऋषि झाला, अशी प्रख्याति आहे. या देवलालाही मोठीं क्षमाशील व मोठीं तपस्वी अशीं दोन अपत्यें होतीं. एक पुत्र व एक कन्या. योग-सिद्धा नामक एक अत्यंत सुंदर व बहुतकाळ ब्रह्मचर्य वृत्तीनें राहाणारी बृहस्पतीची बहिण होती. ही विरक्त वृत्तीनें पृथ्वीपर्यटन करीत असतां वसूंतला आठवा जो प्रभास त्याची स्त्री झाली, व तिचे ठिकाणीं प्रभासानें विश्वकर्मा नांवाचा महाभाग्यवान् पुत्र उत्पन्न केला. हा विश्वकर्मा हजारो जातींच्या शिल्पांचा व भूषणांचा निर्माण- कर्ता असून संपूर्ण शिल्पवेत्त्यांत वरिष्ठ होय. देवांचा कारागीर हाच, त्या सर्वांचीं विमानें त्यानेंच बनविलीं व या थोर कल्पक पुरुषानें निर्माण केलेल्या शिल्पशास्त्रावर अद्यापि अनेक मनुष्य पोट भरीत आहेत. आतां कश्यपाला दक्षानें ज्या तेरा मुली दिल्या त्यांपैकीं सुरभी नांवाची जी कन्या होती, ती तपाचरणानें अत्यंत शुद्ध झाली असून शिवाय शंकराची तिजवर पूर्ण कृपा असल्यामुळें तिचे ठिकाणीं कश्यपापासून एकादश रुद्र निर्माण झाले. त्यांचीं नांवें:-अजैकपात्, अहिर्वुध्न्य, पिनाकी, हर, बहुरूप, त्र्यंबक, अपराजित, वृषाकपी, शंभु, कपर्दी व रैवत. असे हे तिन्ही भुवनांवर सत्ता चालविणारे एकादश रुद्र सांगितले आहेत.

यांशिवाय मृगव्याध, सर्प, कपाली, इत्यादि इत्यादि मिळून शेकडों, हजारों रुद्र, जे चराचर सृष्टीला व्यापून राहिले आहेत, असे पुराणांत सांगितले आहेत.

हे भरतश्रेष्ठा, आतां कश्यपाच्या तेराही स्त्रियांची नांवें ऐक. अदिति, दिति, दनु, अरिष्टा, सुरसा, खशा, सुरभि, विनता, ताम्रा, क्रोधवशा, इरा, कद्रु व मुनि. आतां यांचीं अपत्यें ऐक. मागील मन्वंतरांत तुषित नांवाचे कोणी बारा देव होते. ते अत्यंत यशस्वी असें जें चाक्षुष मन्वंतर तें संपावयाचे सुमारास प्राणिमात्रांची हितबुद्धि मनांत धरून सर्व- जण एकत्र मिळून परस्परांस म्हणाले, "चला, आपण विलंब न करितां अदितीचे गर्भांत शिरू व पुढील मन्वंतरांत जन्मास येऊं. यांतच आपलें कल्याण आहे."

वैशंपायन सांगतात - याप्रमाणें चाक्षुष मन्वंतराचे अखेरीस संकेत करून ते बाराहीजण वैवस्वत मनु प्राप्त होतांच दक्षकन्या जी अदिति तिचे ठिकाणीं मरीचिपुत्र कश्यप याचे वीर्यानें द्वादशादित्य संज्ञेनें जन्मास आले. यांचीं नांवें:- विष्णु, इंद्र, अर्यमा, धाता, त्वष्टा, पूषा, विवस्वान्, सविता, मित्र, वरुण, अंशु व अतितेजस्वी भग असे हे बारा. पूर्वीं चाक्षुष मन्वंतरांत जे बारा तुषितसंज्ञक देव सांगितले तेच हे द्वादशादित्य हें वर सांगितलेंच आहे. आतां सोमाच्या ज्या पतिपरायण सत्तावीस तेजस्वी स्त्रिया सांगितल्या त्यांना त्यांच्याप्रमाणेंच अत्यंत तेजस्वी अनेक अपत्यें झालीं. अरिष्टनेमीच्या स्त्रियांना सोळा मुलें झालीं. बहुपुत्राला विद्युत्, अशनि, मेघ व इंद्रधनु अशीं चार अपत्यें झाली. आपलें मूळचे अंगिरस कूळ सोडून अन्यत्र गेलेला जो शौनक त्यापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्म ऋषींलाही मान्य ज्या ऋचा त्या आणि कुशाश्व नामक राजर्षि यांच्या संयोगापासून देवांचीं आयुधें निर्माण झालीं.

बा जनमेजया, वर सांगितलेले हे सर्व देवगण सहस्त्रयुगांचे अंतीं पुनरपि याचप्रमाणें जन्मास येतात. यांपैकीं फक्त तेहतीस देव मात्र आपखुषीनें जन्मास येतात. एवंच, या देव म्हणविणारांना देखील उत्पत्ति व लय हीं आहेतच. ज्याप्रमाणें इहलोकीं सूर्य नित्य उगवतो व मावळतो, त्याचप्रमाणें हे देवतांचे समुदाय युगायुगांचे आरंभीं उत्पन्न होतात व अंतीं लयास जातात.

आम्हीं असें ऐकितों कीं, हिरण्यकशिपु व हिरण्याक्ष असे दोन बलाढ्य पुत्र कश्यपापासून दितीला झाले. यांशिवाय तिला सिंहिका नांवाची कन्या होती व ती विप्रचितीला दिली होती. हिला सैंहिकेय नांवाचे महाबलिष्ठ पुत्र झाले, त्यांच्या अनुयायांसह त्यांची गणना केली असतां दहा हजार होती, असें सांगण्यांत येतें. या सैंहिकेयांचे पुत्रपौत्र यांची गणती करूं गेल्यास ती शेंकडोंनी, हजारोंनीं किंबहुना असंख्यांतांनींच करावी लागेल. हिरण्यकश्यपूला महान् तेजस्वी चार पुत्र होते, त्यांची नांवें: अनुर्‍हाद, र्‍हाद, प्रर्‍हाद (जगत्- प्रसिद्ध तोच) व चवथा पुत्र संर्‍हाद. यांपैकीं र्‍हादाला र्‍हद नामक पुत्र होता; संर्‍हादाला सुंद व निसुंद असे दोघे होते; अनुर्‍हादाचे आयु, शिबी व काल असे तीन; प्रर्‍हादाला विरोचन नामक एकच पुत्र होता. विरोचनाला सर्व प्रख्यात बलि झाला. या बलीला, हे राजा, शंभर पुत्र होते. त्यांचीं नावें:- धृतराष्ट्र, सूर्य, चंद्रमा, इंद्रतापन, कुंभनाभ, गर्दभाक्ष, कुक्षि, वगैरे, वगैरे. या सर्वांत जो वडील होता त्याचें नांव बाण. हा अत्यंत बलिष्ठ असून शंकराचा प्रिय भक्त होता. कारण, पूर्वकल्पांत या बाणानें उमापति जो शंकर त्याची कृपा संपादून असा वर मागून घेतला होता कीं, मी सदा आपल्या शंकराच्या पाठीशीं असावें.

या बाणाला लोहिता नामक स्त्रीपासून इंद्रदमन नांवाचा पुत्र झाला. हा इतका पराक्रमी झाला कीं, शेंकडों नव्हे लाखों असुर त्याचे अनुयायी बनले. हिरण्याक्षाला मोठे विद्वान् व बलाढ्य असे पांच पुत्र होते; त्यांची नावे:- झर्झर, शकुनि, भूतसंतापन, महानाभ व कालनाभ. दनूला अत्यंत तीव्र पराक्रमी असे शंभर पुत्र झाले. हे सर्व तपस्वी व महाबलाढ्य होते; यांचीं नांवें यांच्या महत्वाच्या मानानें यथाक्रम सांगतों, तीं अशीं- द्विमूर्धा, शकुनि, शंकुशिर, विभु, शंकुकर्ण, विराध, गवेष्ठी, दुंदुभी, अयोमुख, शंबर, कपिल, वामन, मरीचि, मधवा, इरा, शंकुशिरा, वृक,विक्षोभण, केतु, केतुवीर्य, शतर्‍हाद, इंद्रजित्, सत्यजित्, वज्रनाभ, महानाभ, विक्रांत, कालनाभ, एकचक्र, महाबाहु, तारक, महाबल, वैश्वानर, पुलोमा, विद्रावण, महासुर, स्वर्भानु, वृषपर्वा, तुहुंड, सूक्ष्म, निचंद्र, ऊर्णनाभ, महागिरी, असिलोमा, केशी, शठ, बलक, मद, गगनमूर्धा, बलाढ्य कुंभनाभ, प्रमद, मय, कुंपथ, हयग्रीव, वैसृप, विरूपाक्ष, सुपथ, हर, अहर, हिरण्यकशिपु, शतमाय, शंबर, शरभ, शलभ, व वीर्यवान् विप्रचित्ति, इत्यादि, इत्यादि. हे सर्वहीजण कश्यपापासून दनु नामक स्त्रीला झाले. म्हणून यांस दानव म्हणतात. या सर्वांत विप्रचित्ति हा वरिष्ठ होता, बाकी सर्वच बलाढ्य होते. हे नरश्रेष्ठा, या शंभर बंधूंना झालेलीं मुलें व त्या मुलांची मुले यांची गणना करण्याची सोयच नाहीं. तीं केवळ असंख्य होतीं असें समज. स्वर्भानुला प्रभा नांवाची मुलगी होती. पुलोमाला तीन मुली होत्या. हयशिराला उपदानवी व वृषपर्व्याला शर्मिंष्ठा नामक कन्या होती.

वैश्वानराला पुलोमा व कालिका अशा दोन मुली होत्या. या फार बळकट असून यांना मुलेंही फार झालीं. या दोघी मरीचिपुत्र जो मारीचि याला दिल्या होत्या. हा मारीचि मोठा तपस्वी असल्यामुळें त्यानें या स्त्रियांपासून साठ हजार पुत्र निर्माण केले. यांशिवाय त्यानें दुसरे चवदाशें पुत्र निर्माण केले होते. यातील कांहींना पौलोम (पुलोमेचे पुत्र) व बाकीच्यांना कालकेय ( कालिकेचे पुत्र) अशी संज्ञा होती. हे सर्वच मोठे बलाढ्य असून त्यांनीं हिरण्यपुरांत वस्ती केली होती. शिवाय, "देवतांपासून तुम्हांला मरण नाहीं", असा ब्रह्मदेवांनी त्यांना वर दिला होता. अखेरीस सव्यसाचीनें (अर्जुनाने) यांस युद्धांत मारिलें. प्रभेला नहुष नांवाचा पुत्र झाला. पुलोमेच्या मुलींतील शचि जी तिला सृंजय नामक पुत्र झाला. शर्मिष्ठेला पुरु व उपदानवीला दुष्यंत झाला. नंतर पूर्वी सांगितलेली विप्रचित्ती दानवाची स्त्री जी सिंहिका तिला सैंहिकेय नांवाचे तेरा मुलगे झाले, म्हणून पूर्वी सांगितलेंच आहे. आई दैत्य व बाप दानव अशा मिलाफापासून हे तेरा बंधु झाले असल्यानें हे मोठे बलाढ्य, तीव्र पराक्रमी व अतिदारुण असे निपजले. यांचीं नांवें -- व्यंश, शल्य, नभ, वातापि, नमुचि, इल्वल, खसृम, अजिंक, नरक, कालनाभ, शुक, पोतरण व बलाढ्य वज्रनाभ. चंद्रसूर्यांला चिरडून टाकणारा जो सिंहिकापुत्र राहू तो या सर्वांचा वडील बंधु. र्‍हादाला मूक व तुहुंड असे दोन पुत्र झाले. सुंदाला ताटकेच्या ठिकाणीं मारीच व केवळ देवतुल्य पराक्रमी असा शिवमाण नांवाचा दुसरा एक पुत्र झाला. हे राजा, दनूचा वंश वाढविणारे जे मुख्य मुख्य ते हे:- यांचे पुढें पुत्रपौत्र शेंकडों हजारोंच झाले. निवातकवच नांवाचे जे मोठे तपस्वी व आत्म- ज्ञानी दैत्य निर्माण झाले ते सर्व संर्‍हादाचे झाले. हे निवातकवच मणीमती नगरींत रहात असत. हे देवांनाही अजिंक्य असत. परंतु अर्जुनानें या सर्वांचा फडशा पाडला. यांना तीन कोट संतति झाली होती. ताम्रा नामक जी कश्यप स्त्री होती तिला मोठ्या सशक्त अशा सहा मुली झाल्या. त्यांचीं नांवें :- काकी, श्येनी, भासी, सुग्रीवी, शुचि व गृध्रिका. यांपैकीं काकीपासून काक ( कावळे) झाले; उलू- कीपासून उलूक ( दिवाभीत); श्येनीपासून श्येन ( ससाणे); भासीपासून भास (कोंबडे); गृध्रीपासून गृध्र (गिधाड); शुचीपासून पाण्यांतील पक्षी ( पाणपांखरें) व सुग्रीवीपासून घोडे, उंट, गाढवें; याप्रमाणें ताम्रेचा वंश सांगितला आहे.

विनतेला अरुण व गरुड असे दोन पुत्र आरूण झाले. यांपैकीं गरुड हा सर्व पक्ष्यांत श्रेष्ठ असून त्याच्या पराक्रमाचा सर्वांना मोठा वचक आहे. सुरसेला अत्यंत तेजस्वी व अनेक मस्तकांचे असे भुईवर सरपटणारे व आकाशांत भ्रमणारे सहस्त्र पुत्र झाले. तसेच अपरिमित तेजानें युक्त, मोठे बलवान्, अनेक मस्तकें धारण करणारे व गरुडाच्या ताब्यांत राहाणारे असे नागजातींचे सहस्र पुत्र कद्रूला झाले. यांतील प्रमुख प्रमुखांची नांवें - शेष, वासुकि, तक्षक, ऐरावत, महापद्म, कंबल, अश्वतर, एलापत्र, शंख, कर्कोटक, धनंजय, महानील, महाकर्ण, धृतराष्ट्र, बलाहक, कुहर, पुष्पदंष्ट्र, दुर्मुख, सुमुख, शंख, शंखपाद, कपिल, वामन, नहुष, शंखरोमा, मणि, इत्यादि इत्यादि. यांच्या पुत्रपौत्रांपैकीं क्रूर असे चौदा हजार नाग सर्पांवर उपजीविका करणार्‍या गरुडानें लोळवून खाऊन फस्त केले, व यामुळें सर्व तीक्ष्ण दंतांनीं युक्त असे हे नाग गरुडावर जळफळत असतात. दंतयुक्त स्थलचर व पाण्यांतील पक्षी ही धरेची संतति समजावी. सुरभीनें गाई व म्हशी निर्माण केल्या. इरा नामक स्त्रीनें वृक्ष, वेली, लता व तृणाच्या सर्व जाती यांस जन्म दिला. खशेच्या पोटीं राक्षस, यक्ष, मुनि व अप्सरा जन्मलीं. अरिष्टेनें मोठे बलवान् व अमित तेजस्वी अशा गंधर्वांस जन्म दिला. याप्रमाणें कश्यपाच्या वीर्यांशानें झालेली सर्व स्थावरजंगम सृष्टि तुला सांगितली. हिजपासून पुढें जी पुत्रपौत्रादि संतति झाली ती असंख्यच.

हे जनमेजया, येथवर जी ही मीं तुला सर्व सृष्टि सांगितली सर्व स्वारोचिष मन्वंतरांतील होय. आतां वैवस्वतांतील सांगतों. या वैवस्वत मनूच्या आरंभी वरुणानें दीर्घकालपर्यंत यज्ञ केला. त्यांत ब्रह्मदेवाला आर्त्विज्य दिलें होतें, त्या समयीं ब्रह्मदेवानें हवन केलें. त्या वेळेपुढची ब्रह्मदेवाची सृष्टि मी आतां तुला सांगतों. आरंभीं ब्रह्मदेवानें आपल्या मनापासून सात ब्रह्मऋषि निर्माण केले व तेच आपले पुत्र असे मानिले. हे जनमेनया, देव- दानवांचा संगर होऊन सर्व दानव मारले गेले. त्यावेळीं कश्यपाची स्त्री दिति ही अपत्यहीन झाल्यामुळें पुन्हा आपला पति कश्यप याची तिनें आराधना चालविली. नंतर तिच्या सेवेनें कश्यप अतिशय संतुष्ट होऊन “तुला वाटेल तो वर मागून घे” म्हणून मोठ्या गोडीनें व लाडानें तिला म्हणाला. पतीची प्रसन्नता पाहून तिनेंही वर मागितला. तो असा कीं, इंद्राचा वध करण्यास सर्वथा समर्थ असा अत्यंत तेजस्वी पुत्र मला द्यावा. कश्यप ऋषि महातपस्वी असल्यामुळें असलाही वर देणें त्यांस अवघड न वाटतां, ते स्वस्थ मनानें तिला म्हणाले, “हे प्रिये, तूं मागते आहेस तसला म्हणजे इंद्राला मारणारा पुत्र तुला खचित होईल. परंतु या कामीं तुला दोन गोष्टी पाळाव्या लागतील. त्या अशा- ‘एक तर तुला हा गर्भ शंभर वर्षेंपर्यंत पोटांत बाळगावा लागेल व दुसरी गोष्ट हा सारा वेळ तुला अनन्यवृत्तीनें व अत्यंत पवित्रतेनें व्रतस्थ राहावे लागेल.” भर्त्याच्या या शब्दांस तिनें तत्काल रुकार दिला; व हे राजा, त्या पवित्र स्त्रीला त्या महातपस्वी कश्यपानें तिचे इच्छेनुरूप गर्भ दिला. गर्भ स्थापन करण्याचे वेळीं कश्यपांनीं ज्याच्या तेजाला मिति नाहीं व जो सर्व गणांत वरिष्ठ व देवांनाही अमर अशा पुरुषाचें एकाग्रतेने चिंतन करून त्याचें दुर्निवार्य असें तेज आपल्या वीर्यांत आणून तें तेज दितीचे गर्भांत स्थापन केले. गर्भस्थापना होतांच तो कर्मठ ऋषि तपश्चर्येसाठी पर्वतावर निघून गेला. इकडे पाकशत्रु जो इंद्र तो दिति भग्नव्रत केव्हा होते हें पाहाण्यासाठीं डोळ्यांत तेल घालून टपणीस बसला. बहुत वर्षे त्याला कोठेंच व्रतभंग दिसेना.

परंतु शंभरावे वर्ष भरण्याच्या कांहींसे अगोदर त्याला तिच्या आचरणांत एक छिद्र सांपडलें. तें असें की, एक रात्रीं ती हातपाय न धुता तशीच आंथरुणावर जाऊन निजली. एवढी फट सांपडतांच इंद्र तत्काल तिच्या कुशींत ( तिच्या पोटांत) शिरला व तिला त्यानें अत्यंत गाढ अशी झोंप आणिली. मग ती निद्रेचे भरांत बेशुद्ध असतां इंद्रानें आपल्या वज्रानें तिच्या एका गर्भाचे सात तुकडे केले. इंद्र जेव्हां त्या गर्भाचे तुकडे करूं लागला तेव्हां तो गर्भ रडूं-ओरडूं लागला. त्या वेळीं इंद्र त्या गर्भाला गप बस, रडूं नको, म्हणून पुन: पुन: दरडावून सांगूं लागला, तों तों तो गर्भ अधिकच केकाटूं लागला. त्या वेळीं इंद्राने संतापून आपल्या वज्रानें त्या पहिल्या सात खांडांपैकी पुन: प्रत्येक गर्भाचीं सात सात खांडे म्हणजे एकूण मूळच्या एक गर्भाचे एकूणपन्नास गर्भ केले. पुढें हे एकूण- पन्नास गर्भ मरुत या नांवानें प्रसिद्ध झाले. इंद्रानें त्यांस गर्भांत "मा रुद" म्हणजे रडूं नको, रडूं नको, असें म्हटलें होतें म्हणून यांस मरुत हें नांव पडलें, व हे सर्व इंद्राचे शत्रु न होतां उलट त्याचे साहाय्यकर्ते झाले.

सारांश, एकाचे एकूणपन्नास या श्रेणीनें जेव्हां प्रजा वाढत चालली, त्या वेळीं परमात्मा जो हरि यानें इंद्राला खूष करण्यासाठीं, लोकसंख्येचे पृथक् पृथक् विशिष्ट समूह करून एकेका समूहाला एकेक प्रजापालक म्हणजे राजा नेमून देऊन सर्वांची वेगळीं वेगळीं राज्ये स्थापन केलीं. या राजांत पृथु हा पहिला राजा होता. असो; याप्रमाणें प्रजेची व्यवस्था लावणारा जो हा हरि तोच परमपुरुष होय.

हे राजा, यालाच वीर, कृष्ण, विष्णु, प्रजापति, पर्जन्य, सूर्य असेंही म्हणतात. किंबहुना हें साकार जगत् त्याचेंच किंवा तोच आहे. हे भरतश्रेष्ठा, ही वर सांगितलेली प्राण्यांची उत्पत्ति व विशेषत: मरुत देवांचें शुभ जन्म हें जो श्रवण किंवा पठण करील अथवा यांचें सम्यक् ज्ञान करून घेईल त्याला पुनर्जन्माची देखील भीति नाहीं, मग परलोकाची कोठून असणार ?


इति श्रीमहाभारते खिलेषु हरिवंशपर्वणि
मरुतोत्पत्तिकथने तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
अध्याय तिसरा समाप्त

GO TOP