![]() |
॥ लघुवाक्यवृत्ति ॥ श्लोक क्र. ११ वा ॥ श्रीरामसमर्थ ॥ श्लोकः नष्टे पूर्वविकल्पे तु यावदन्यस्य नोदयः । निर्विकल्पकचैतन्यं स्पष्टं तावद्विभासते ॥ ११ ॥ श्लोकार्थ : आधीचा एक विकल्प संपल्यावर जोपर्यंत दुसरा उत्पन्न होत नाही तोपर्यंत विकल्परहित असे चैतन्य जाणवते. ॥११॥ पूर्व संकल्प निमाला असतां । जों काळ दुजा उदयासी न येतां । निर्विकल्प चैतन्य तत्वता । तो काळ स्पष्ट कळे ॥ ४० ॥ पूर्व संकल्प निमाल्यानंतर जोपर्यंत दसरा संकल्प उदयास येत नाही, तोपर्यंतच्या मधल्या काळात निर्विकल्प चैतन्यरूप परमात्मा स्पष्टपणे कळतो. (२९४०) अगा रविदत्ता आह्मीं तुजला । अभ्यास ध्वनितार्थ सांगितला । त्या अभ्यासें आद्यंत विकल्पाला । दृश्यापरी देखसी ॥ ४१ ॥ अरे रविदत्ता, आम्ही आतापर्यंत जो अभ्यास संक्षेपाने सांगितला त्या अभ्यासाने तू विकल्पाला एखाद्या दृश्याप्रमाणे पाह शकशील. (२९४१) उठतां किंवा जाऊन निमतां । तया पाहसी टळटळीता । मग आपेआप संधि तत्वतां । अनुभवा येती ॥ ४२ ॥ विकल्प उत्पन्न होत असता किंवा प्रत्यक्ष किंवा कल्पित पदार्थापर्यंत जाऊन लय पावताना तू त्या विकल्पाला टळटळीतत पाह शकतोस. तेव्हा त्यानंतर तुला विकल्पांचे संधी आपोआपच अनुभवास येतील. (२९४२) पाहणियाचा तो अभ्यास । पहिलाच असे संकल्पास । तोचि निरखितां बहुवस । सूक्ष्म दृष्टीने ॥ ४३ ॥ संकल्प पाहण्याचा अभ्यास अगोदर सांगितलाच आहे. तोच सूक्ष्म दृष्टीने पुष्कळ वेळा करावा. (२९४३) येक संकल्प उठोनि मावळे । दुजा जोवरी न उफाळे । तो संधी सामान्यत्वें कळे । पाहतां साधकां ॥ ४४ ॥ एक संकल्प उठून मावळल्यानंतर दसरा उत्पन्न होण्यापूर्वी तो संधी पाहिल्यास सामान्यत्वाने साधकांना कळतो. (२९४४) संकल्प उठोनि निमे जोवरी । प्रतिबिंबित जीवही असे तोंवरी । विकल्प अवघा निमाला जरी । तरी जीवाचा अभाव ॥ ४५ ॥ संकल्प उठून निमेपर्यंत प्रतिबिंबरूपाने असलेल्या जीवाचे अस्तित्व असते. विकल्प जर संपूर्णपणे लोपला तर जीवाचा अभावच असतो. (२९४५) नुसधी सामान्य वृत्ति जे उठे । तेथें सामान्यत्वें चिद्रूप दाटे । तोचि प्रकाश वोळखावा नेटें । सामान्य दृष्टीनें ॥ ४६ ॥ त्यावेळी केवळ सामान्यवृत्ती उठत असते. त्याठिकाणी चिद्रूप सामान्यत्वाने व्यापून असते. तोच प्रकाश सामान्य दृष्टीने प्रयत्नपूर्वक ओळखावा. (२९४६) हे इतुकेंही निरूपण प्रांजळ । विस्तारेंसी होईल सकळ । मुमुक्षं सावधान निवळ । क्षण येक असावें ॥ ४७ ॥ हे सर्व निरूपण विस्ताराने पुढे सोप्या शब्दात केले जाणार आहे. मुमुक्षू साधकाने क्षणभर इकडे लक्ष द्यावे. (२९४७) या सामान्य विशेषाचा निवाडा । येथे होईल प्रांजळ रोकडा । एतद्विषयीं दृष्टांत पडिपाडा । असे तो बोलिजे ॥ ४८ ॥ या सामान्य प्रकाशाच्या द्वारे सर्व विशेष ज्ञानाचा निवाडा होईल. या संदर्भात समतुल्य (पडिपाडा) असा दृष्टान्त आहे. तो आता सांगतो. (२९४८) आकाशी प्रत्यक्ष दिनकर । सर्व प्रकाशीं सान थोर । त्यांत आरिसे ठेविले अपार । त्या प्रकाशामाजीं ॥ ४९ ॥ आकाशामध्ये प्रत्यक्ष सूर्य तळपत असतो. तो सर्व लहानमोठ्या वस्तूंना प्रकाशित करत असतो. त्याच्या प्रकाशात अनेक आरसे ठेवलेले आहेत. (२९४९) तया आरसियांमाजीं निकीं । प्रतिबिंबे पडलीं जितुकीं । वेगळाली भिंतीवरी तितुकीं । तेणें अल्प अल्प प्रकाशिलें ॥ ५० ॥ त्या आरशांमध्ये सूर्याची जेवढी प्रतिबिंबे पडली आहेत तेवढी प्रतिबिंबे भिंतीवरही कवडश्याच्या रूपाने पडली आहेत. त्या कवडशांनी भिंतीवरचा थोडा थोडा भाग प्रकाशित केला आहे. (२९५०) आत्मा ब्रह्म जो अविनाशी । स्फुरणादि देहान्त प्रकाशी । सूर्य जैसा सहजें आकाशी । भासवी आरसे भिंत्यादि ॥ ५१ ॥ आकाशातला सूर्य ज्याप्रमाणे आपल्या सहज प्रकाशाने आरसे, भिंत यांना प्रकाशित करतो, त्याप्रमाणे अविनाशी असा ब्रह्मात्मा स्फुरणापासून ते देहापर्यंत सर्वांना स्वतःच्या चित्प्रकाशाने प्रकाशित करत असतो. (२९५१) बुद्धींत प्रतिबिंबित जो जीव । विकल्परूपी भासवी सर्व । जैसा दर्पण प्रकाशी विशेषत्व । झळझळ अल्प ॥ ५२ ॥ ज्याप्रमाणे सूर्याच्या सामान्य प्रकाशापेक्षा आरशाचा प्रकाश विशेष (वेगळा असा) असतो. त्याची झळझळ मर्यादित असते. त्याप्रमाणे बुद्धीत प्रतिबिंब रूपाने असणारा जो जीव तो विकल्परूपाने सर्व पदार्थांना प्रकाशित करतो. (२९५२) बहुत विकल्प उठती । विषयही भिन्न भिन्न दिसती । जैसे भिंतीवरी अल्प अल्प झळकती । स्थळी स्थळी बहु ॥ ५३ ॥ आरशातील कवडसे भिंतीवर अनेक ठिकाणी दिसतात पण त्यांचा प्रकाश थोडाच असतो, त्याप्रमाणे विकल्पही पुष्कळ असतात, त्यांच्यामुळे अनेक विषय दिसतात. (२९५३) विकल्पं अमुकसें स्फुरवित । तेव्हां मुख्य प्रकाश लोपला वाटत । जैशी झळझळ जये स्थळी उमटत । तितुकें तेज आच्छादी ॥ ५४ ॥ ज्याप्रमाणे कवडशांची झळझळ ज्या ज्या ठिकाणी उमटते त्या त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाचे मूळचे क्षेत्र झाकून टाकते, त्याप्रमाणे विकल्पांमुळे एखादा विषय स्फुरविला (प्रकाशित केला) की त्या ठिकाणचा चिद्रूपाचा मुख्य प्रकाश लोपल्यासारखा वाटतो. (२९५४) जरी ब्रह्मात्मयाचा प्रकाश । आच्छादिला वाटे सावकाश । तरी सर्व भासकत्व अविनाश । तो लोपेना सहसा ॥ ५५ ॥ जरी ब्रह्मात्म्याचा (चिद्रूपाचा) प्रकाश लोपल्यासारखा वाटला तरी वाटू दे. पण सर्व पदार्थांना प्रकाशित करणारा तो अविनाशी ब्रह्मात्मा कधीही लोप पावत नसतो. (२९५५) जरी झळझळीनें सामान्य भिंतीचा । प्रकाश लोपविला वाटे साचा । परी सहज प्रकाश जो सूर्याचा । तो लोपला न जाय ॥ ५६ ॥ जरी कवडशाच्या झळझळीने भिंतीवरील सामान्य प्रकाश लोपविल्यासारखा वाटला तरी भिंतीवरचा तो सामान्य प्रकाश सूर्याचा सहज प्रकाश आहे तो कधीही लोपणार नाही. (२९५६) अंगण वोसरी माजघर । अंतर्बाह्य प्रकाशी दिनकर । तैसा स्फुरणादि विषयान्त समग्र । सहज प्रकाशी आत्मा ॥ ५७ ॥ सूर्य अंगण, वोसरी, माजघर या सर्वांना अंतर्बाह्य प्रकाशित करतो. त्याप्रमाणे स्फुरणापासून ते शरीरापर्यंत सर्व तत्त्वांना आत्म्याचा सहज प्रकाश प्रकाशित करतो. (२९५७) भिंतीवरी एकदेशी झळकत । तेवीं जीव किंचित विषय स्फुरवित । आरसा काढितां झळझळ मावळत । बुद्धि नसतां जीव मरे ॥ ५८ ॥ भिंतीवर कवडशाच्या रूपाने मर्यादित जागेत थोडा प्रकाश झळकतो. त्याप्रमाणे जीव काही विषयांना स्फुरवितो (प्रकाश देतो) पण आरसा काढून घेतल्याबरोबर कवडशाची झळझळ नष्ट होते. त्याप्रमाणे बद्धी नसेल तर जीवही नष्ट होईल. (२९५८) सूर्यप्रकाश तो सर्वदां आहे । तैसा तिहीं काली सामान्य राहे । सूर्यासी आरसा आश्रय नव्हे । सामान्या बुद्धि तेवीं ॥ ५९ ॥ सूर्यप्रकाश मात्र सर्वकाळ असतो. त्याप्रमाणे सामान्य प्रकाश तिन्ही काळात (भूत, भविष्य, वर्तमान या काळात) राहतो. सूर्याला आरशाचा आश्रय घ्यावा लागत नाही. त्याप्रमाणे सामान्य बुद्धीला कुणाचा आधार लागत नाही. (२९५९) झळझळीसी अपेक्षा आरशाची । जीवासी सापेक्षता बुद्धीची । नासे स्थिति जीव झळझळीची । बुद्धि आरसियाविण ॥ ६० ॥ कवडशाच्या झळझळीला मात्र आरशाची अपेक्षा असते. त्याप्रमाणे जीवाला बुद्धीची अपेक्षा असते. पण बुद्धिरूप आरशावाचून जीवरूपी झळझळीची स्थिती नष्ट होत असते. (२९६०) बुद्धींतचि प्रतिबिंब पडिलें । येविशीं कोणी आक्षेपिलें । की देहादिकही भूतांचे जाहले । बुद्धिही भौतिक ॥ ६ ॥ आता बुद्धीत प्रतिबिंब पडले. या संदर्भात कोणाचा आक्षेप असू शकतो की देहादिक हे पंचभूतांपासून झालेले आहेत. मग देहामध्ये असणारी बुद्धीही भौतिक नाही असे कसे म्हणता? (२९६१) तरी देहादिकांत प्रतिबिंब नसे । बुद्धीमाजी कां पडतसे । येविशीं उत्तर ऐका कैसें । दृष्टांतासहित ॥ ६२ ॥ देहादिकात सामान्यांचे प्रतिबिंब पडत नाही मग ते बुद्धीतच का पडते? यावर दृष्टान्ताच्या साहाय्याने उत्तर देतो, ते ऐका. (२९६२) मृत्तिका ही पृथ्वीच साकार । कांच ही मृत्तिकेचा विकार । परी आरसियांत प्रतिबिंबे दिनकर । मृत्तिकेंत बिंबेना ॥ ६३ ॥ माती म्हणजे मूर्त स्वरूपातील पृथ्वीच आहे ना? काचदेखील मृतिकेचाच एक विकार आहे की नाही? परंतु सूर्याचे प्रतिबिंब आरशात पडते, ते मातीत का पडत नाही? (२९६३) येथे कारण स्वच्छास्वच्छता । स्वच्छ आरसिया होय बिंबता । अस्वच्छ मृत्तिका असतां । प्रतिबिंब न पडे ॥ ६४ ॥ याचे कारण स्वच्छास्वच्छतेचे आहे. आरसा स्वच्छ असतो म्हणून त्यात सूर्याचे प्रतिबिंब पडते पण माती अस्वच्छ असल्यामुळे तिच्यात प्रतिबिंब पडत नाही. (२९६४) तैसे देहबुद्धि दोनी भौतिक । परी बुद्धि स्वच्छ असे निश्चयात्मक । तिजमाजी प्रतिबिंबे प्रकाशक । आरसियापरी ॥ ६५ ॥ त्याप्रमाणे देह आणि बुद्धी दोघेही भौतिक आहेत. हे खरे, पण बुद्धी निश्चयात्मक असल्यामुळे स्वच्छ असते. तेव्हा तिच्यामध्ये चिद्रूपाचा प्रकाश आरशात पडणाऱ्या सूर्याच्या प्रतिबिंबाप्रमाणे प्रतिबिंबित होतो. (२९६५) देह मृत्तिके ऐसा जड । यास्तव प्रतिबिंब पडे ना वाड । असो बुद्धीविण जीवासी अवघड । रूपासी येणे ॥ ६६ ॥ देह मृत्तिकेप्रमाणेच जड आहे. त्यामुळे त्यात स्पष्ट प्रतिबिंब पडत नाही. असो, तर हे निश्चित की, बुद्धीवाचून जीवाला रूप धारण करणे कठीण आहे. (२९६६) तस्मात् जीवत्व झळझळ उठत । बुद्धि आरसियास्तव भासत । तेणेंचि विषयाची स्फुरविली भिंत । विशेषत्वें वरी ॥ ६७ ॥ म्हणून जीवाची जी काही झळझळ निर्माण होते, ती बुद्धिरूपी आरशामुळे भासत असते. त्या जीवानेच आपल्या विशेष प्रकाशाने विषयरूपी भिंत प्रकाशित केलेली असते. (२९६७) येथेही कोणी कल्पना करी । की बुद्धीच सामान्य प्रकाशानुकारी । विषयातें प्रकाश कां न करी । जीवाचें काज कासया ॥ ६८ ॥ येथे कोणी कल्पना करील की, बुद्धीच सामान्य प्रकाशाला साहाय्य करते. मग तीच विषयांना का बरे प्रकाशित करत नाही? येथे जीवाचे काम काय? (२९६८) तरी अवधारावें निश्चित । बुद्धि अभावींही ब्रह्म सदोदित । बुद्धि असतांही निश्चित । परी विशेषे स्फुरवीना ॥ ६९ ॥ तर हे लक्षात घे की, ब्रह्म हे बुद्धी नसतानाही सदैव प्रकाशित आहे. बुद्धी असतानाही ते असतेच. पण ते विशेष रूपाने असणाऱ्या विषयांना प्रकाशित करत नाही. (२९६९) जेवीं आदित्य आरसिया अभावीं । अंतर्बाह्य भिंती प्रकाशवी । परी झळझळ वरती जे दावावी । हे कृति दर्पणस्थाची ॥ ७० ॥ ज्याप्रमाणे सूर्य आरसा नसताना देखील भिंतींना अंतर्बाह्य प्रकाशित करतो. पण त्या भिंतीवरील कवडशांची झळझळ दाखवण्याचे काम आरशात पडणाऱ्या प्रतिबिंबाचेच असते. (२९७०) आरसा नसतां ते नासून जाय । बुद्धिअभावी जीवाचा लय । आत्मा आदित्य तो प्रकाशमय । बुद्धि आरसाही नसतां ॥ ७१ ॥ आरसा नसेल, तर ती कवडशाची झळझळ नष्ट होते. त्याप्रमाणे बुद्धी नसेल तर जीवाचाही नाश होतो. आत्मारूपी आदित्य हा बुद्धिरूप आरसा नसतानाही प्रकाशमान असतो. (२९७१) मुख्य कारण की दर्पणस्थाविण । झळझळ करी ना सहस्त्रकिरण । तैसा जीवत्वाचे भासावांचून । आत्मा स्फुरविना ॥ ७२ ॥ मुख्य कारण हे की, दर्पणातील प्रतिबिंबावाचून सूर्य (सहसकिरण) भिंतीवरील कवडशांची झळझळ निर्माण करत नाही. त्याप्रमाणे भासरूप जीवावाचून आत्मा विषयांना प्रकाशित करत नाही. (२९७२) स्फुरवोनियां नाश पावे । तें कार्य जीवाचेचि समजावें । सामान्य प्रकाशासी न संभवे । विकारत्व बुद्धीचें । ७३ ॥ विषयांना प्रकाशित करून जीवत्व नष्ट होऊ शकते. हे जीवाचेच काम आहे. (जीवाचे ते लक्षणच आहे.) सामान्य प्रकाशाला विकारी बुद्धीचे काम करता येत नाही. (२९७३) तस्मात् आत्मा बुद्धीसी चेष्टवीना । बुद्धीसी तो केवळ जडपणा । तरी स्फुरवी पदार्थ नाना । जीवत्वावांचोनी ॥ ७४ ॥ म्हणून आत्मा बुद्धीलाही चेष्टा (कार्य) करायला लावत नाही. बुद्धी तर स्वतः जडच असते. तरी ती जीवाच्या साहाय्यावाचून अनेक पदार्थ (विषय) स्फुरविते. (२९७४) आरसा जेवीं प्रतिबिंबाविण । भिंतीवरी न करी झळपण । तैंसा विषय स्फुरवावया विशेष ज्ञान । पाहिजे जीवाचें ॥ ७५ ॥ ज्याप्रमाणे नुसता आरसा त्यात सूर्याचे प्रतिबिंब नसेल तर भिंतीवर कवडशाची झळझळ निर्माण करू शकणार नाही. त्याप्रमाणे विषय प्रकाशित होण्यासाठी (स्फुरविण्यासाठी) जीवाचे विशेष ज्ञान आवश्यकच आहे. (२९७५) बुद्धि जरी नसावी ह्मणसी । तरी उमटणे कोठे प्रतिभासासी । जीवनेंविण प्रतिबिंबासी । दिसणें नाहीं ॥ ७६ ॥ बुद्धीची काय आवश्यकता? ती नसली तर काय हरकत आहे? असे म्हणत असशील तर प्रतिबिंबस्वरूप आभासी जीव कोठे प्रकट होईल? पाण्यावाचून प्रतिबिंब दिसणारच नाही. (२९७६) तस्मात् बुद्धीस्तव जीवासी रूप । जीवाकरितां बुद्धीसी संकल्प । दोनी मिळोनि विषयाचे माप । पदरी घेती ॥ ७७ ॥ म्हणून बुद्धीमुळे जीवाला अस्तित्व आहे. जीवामुळे बुद्धीला विषयांचे संकल्प स्फुरतात. अशा त-हेने बुद्धी आणि जीव दोघे मिळून विषयांच्या निर्मितीची जबाबदारी घेतात. (त्या कार्यातील आपापला वाटा उचलतात) (२९७७) या बुद्धि वृत्ति आणि जीवासी । सामान्यत्वें अधिष्टान उभयांसी । तें येक चिद्रूप अविनशी । मुख्य बिंब जें जीवाचे ॥ ७८ ॥ ही बुद्धिवृत्ती आणि जीव यांचे समान अधिष्ठान म्हणजे अविनाशी चिद्रूप हेच होय. चिद्रूप हेच जीवाचे मुख्य बिंब होय. (२९७८) अगा रविदत्ता ही रूपें तिनी । येकांती निवडावीं बैसोनी । सूक्ष्म दृष्टीचे अभ्यासेंकडोनी । हळुहळू कळों येती ॥ ७९ ॥ अरे रविदत्ता, चिद्रूप, बुद्धी आणि जीव ही तीन रूपे एकांतात बसून वेगवेगळी समजून घ्यावीत (निवडावीत). सूक्ष्म दृष्टीने अभ्यास केल्यास ती हळूहळू कळू लागतात. (२९७९) तरी साधकं बैसावें निवांत । विकल्पाचे रूप अवलोकित । चिरकाळ अभ्यासें टळटळीत । स्पष्ट कळती तिनी ॥ ८० ॥ तेव्हा साधकाने निवांत बसून विकल्पाच्या स्वरूपाचे अवलोकन करावे. अभ्यास बराच काळ केल्यानंतर ही तिन्ही तत्त्वे टळटळीतपणे अगदी स्पष्ट कळू लागतात. (२९८०) आधीं जडरूमें बुद्धीवृत्ति कैशी । जीव कैसा प्रकाशी तीसी । हेंचि पहावें विशेषत्वेंसी । पुढें सामान्य कळेल ॥ ८१ ॥ आधी जड असलेली बुद्धिवृत्ती कशी आहे. जीव तिला विशेषत्वाने कसे प्रकाशित करतो. हे जीवाचे विशेषत्वाने प्रकाशणे प्रथम पहावे. मग नंतर सामान्य कळेल. (२९८१) बुद्धिवृत्तीचा चंचळपणा । जाऊन आदळे विषयीं नाना । परी तियेसी जाणवेना । अमुक म्हणोनी ॥ ८२ ॥ बुद्धिवृत्तीच्या चंचलपणामुळे ती निरनिराळ्या विषयांवर जाऊन आदळते. पण तिला हा अमुक पदार्थ आहे हे कळत नाही. (२९८२) जीव हा विशेष ज्ञानें प्रकाशी । अमुकसें स्फुरवी पदार्थांसी । परी कल्पना नसे तयासी । ज्ञानाज्ञानरूप ॥ ८३ ॥ त्यावेळी जीव हा आपल्या विशेष ज्ञानाने तिला व विषयांना प्रकाशित करतो. हा अमुक पदार्थ आहे. असे तिला तो प्रकाशित करून सांगतो. पण त्याला ज्ञान, अज्ञान अशी कल्पना नसते. (२९८३) बुद्धिवृत्तीने कल्पना करावी । जीवाने अमुकसी स्फुरवावी । ऐशी हे विकल्पाची गोवी । पहावी उकलोनी ॥ ८४ ॥ बुद्धिवृत्तीने कल्पना करावी. जीवाने तो पदार्थ अमुक आहे म्हणून कल्पना द्यावी. अशी ही विकल्पांची गुंतागुंत नीट उकलून पाहावी. (२९८४) आरंभी निर्विकल्प जे वृत्ति । सामान्यत्वे झेपावती । पुढे तयेचे प्रकार होती । द्विधा प्रकारें ॥ ८५ ॥ आरंभी वृत्ती निर्विकल्प असते. ती सामान्यत्वानेच पदार्थावर झेपावते. नंतर तिचे दोन प्रकार होतात. (२९८५) पहिली नेत्रद्वारे पदार्थ पाहतां । जीवें प्रकाशिलाही असतां । हे काय की संशयात्मकता । हा मनाचा विकल्प ॥ ८६ ॥ प्रथम नेत्रद्वारे, पदार्थ पाहिल्यावर जीवाने त्यावर प्रकाश टाकला असताही 'हे काय आहे' म्हणून जो संशय उत्पन्न होतो, तीच मनाची संशयात्मकता होय. (२९८६) मनासी प्रकाशता नसे । जीवासी संशय नुमसे । दोनी मिळोनि पदार्थ भासे । संशयात्मक ही ॥ ८७ ॥ मनाला प्रकाशकता नाही. जीवाला संशय येत नाही. ती दोघे एकत्र आल्यानंतर पदार्थ संशयात्मक वाटला तरी प्रकाशित होतो. (२९८७) जैसा आरसियाचा स्वच्छपणा । आणि दर्पणीचा भासकपणा । दोनी मिळूनी झळझळपणा । उमटे भिंतीवरी ॥ ८८ ॥ ज्याप्रमाणे आरशाचा स्वच्छपणा, त्यात पडलेल्या प्रतिबिंबाचे आभासरूप दोन्ही एकत्र आल्यानंतरच भिंतीवर कवडशाची झळझळ उमटते. (२९८८) तैसें मन आणि जीव मिळूनी । संशय करिती पदार्थ देखोनी । पुढें मन बुद्धि निश्चया आणी । अमुक हे सत्य ॥ ८९ ॥ त्याप्रमाणे मन आणि बुद्धी मिळाल्यानंतर ती दोघे पदार्थ पाहतात आणि मग तो काय असावा याबद्दल संशय करतात. त्यानंतर मन आणि बुद्धी निश्चय करतात की हा अमुक पदार्थ आहे. (२९८९) तया बुद्धीसीही जडत्व असे । कल्पना मात्र वाउगी करीतसे । परी तो विषय न प्रकाशे । जीवावांचूनी ॥ ९० ॥ ती बुद्धी जड आहे. पण उगीचच व्यर्थ कल्पना करते. पण जीवाच्या मदतीवाचून तिला विषय कळत नाही. (२९९०) जीवाच्या प्रकाशें बुद्धीसी ज्ञान । पदार्थ कळे अमुक ह्मणून । हा घटचि निश्चय करी पूर्ण । तेव्हां संशय मावळें ॥ ९१ ॥ जीवाच्या प्रकाशाने बुद्धीला ज्ञान होते. पदार्थ कोणता आहे हे कळते, हा घटच आहे असा निश्चय ती करू शकते. त्यामुळेच संशय नाहीसा होतो. (२९९१) एवं मन बुद्धि मिळून एक वृत्ती । जीवचि प्रकाशी तिजप्रती । याचि नांवे विकल्प ह्मणती । जो मागें स्पष्ट केला ॥ ९२ ॥ अशा प्रकारे मन, बुद्धी मिळून एक वृत्ती असते तिला जीवच प्रकाशित करतो. त्यालाच विकल्प असे म्हणतात. त्याचे स्पष्टीकरण मागेच केले आहे. (२९९२) ययापरी वृत्ति आणि जीव । दोहींचे वेगळाले स्वभाव । निवडावे साधकें स्वयमेव । बैसोनि अभ्यासें ॥ ९३ ॥ याप्रमाणे वृत्ती आणि जीव या दोहोंचे स्वभाव वेगळे वेगळे आहेत. साधकाने स्वतःच (स्वप्रयत्नाने) त्यांची भिन्न स्वरूपे ओळखून पहावीत. त्यासाठी बैठक मारून अभ्यास करण्याची गरज आहे. (२९९३) बुद्धि आणि जीवाचें रूप । अल्पज्ञ आणि जड संकल्प । हे कळू येती भिन्न भिन्न स्वरूप । अभ्यासबळें ॥ ९४ ॥ अभ्यासाच्या योगाने बुद्धी आणि जीवाचे पृथक स्वरूप समजते, जीव अल्पज्ञ आहे तर संकल्प जड आहे, असे त्यांचे भिन्न स्वभाव कळून येतात. (२९९४) दोहींची रूपें स्पष्ट कळतां । पुढें मध्यसंधीसी अवलोकितां । स्पष्ट सामान्य चिद्रूपता । अनुभवा येतसे ॥ ९५ ॥ दोन्हींची रूपे स्पष्ट कळल्यानंतर आणि त्यानंतर मध्यसंधी पहाण्याचा सराव केला म्हणजे मध्यसंधीतील सामान्य चिद्रूप अनुभवास येते. (२९९५) जैसा बहु आरसियांच्या बहुत । भिन्न भिन्न झळझळी उमटत । तितुकाची सूर्यप्रकाश आच्छादित । केलासे विशेषे ॥ ९६ ॥ ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशात ठेवलेले आरसे पुष्कळ असतील तर त्यांचे भिंतीवर कवडसे पुष्कळ उमटतील. त्या प्रमाणात तेवढा सूर्याचा सामान्य प्रकाश या विशेष प्रकाशाने आच्छादित केलेला असतो. (२९९६) तैसे अमुकसे विषय स्फुरतां । तितुकीच आच्छादिली सामान्यता । मागे पुढे संधी टळटळितां । चिद्रूपता स्पष्ट ॥ ९७ ॥ त्याप्रमाणे विशिष्ट संख्येने विषय स्फुरले तर तेवढ्याच प्रमाणात सामान्य ज्ञान आच्छादित झालेले कळते. त्या विशेष ज्ञानाच्या आगेमागे संधी आणि त्यांमधील चिद्रप टळटळीतपणे स्पष्ट दिसतात. (२९९७) आरशाच्या भिन्न भिन्न ज्या झळझळी । त्याच्या मध्यसंधीचिया स्थळीं । जो प्रकाश देखिजे नेत्रकमळीं । तो तरी मुख्य सूर्याचा ॥ ९८ ॥ आरशाच्या कवडशांच्या ज्या झळझळी भिन्न भिन्न अशा उमटतात त्यांच्या मध्यसंधीमध्ये जो प्रकाश डोळ्यांना दिसतो तो मुख्य सूर्याचा प्रकाश असतो. (२९९८) तैसा एक विकल्प उठोनि निमाला । दुजा मागून नाही उठिला । त्या संधींत सामान्य संचला । चिद्रूप प्रकाश ॥ ९९ ॥ त्याचप्रमाणे एक विकल्प उठला आणि विरून गेला आणि जोपर्यंत दुसरा विकल्प उठला नाही हा मध्य संधीचा काळ होय. त्या मध्यसंधीमध्ये चिद्रप सामान्य प्रकाश व्यापलेला असतो. (२९९९) अथवा येकाही संकल्पी पाहतां । अमुक स्फुरलें तें मात्र त्यागितां । पुढें ज्ञातता मागें अज्ञातता । प्रकाशिली सामान्ये ॥ ३००० ॥ अथवा एकाच संकल्पाचे निरीक्षण करीत असता हे अमुक आहे असे स्फुरण होते. त्याचा त्याग केला तर त्याच्या पुढे ज्ञाततेचे (पदार्थाच्या ओळखीचे) क्षेत्र असते तर त्याच्यामागे अज्ञाततेचे (पदार्थाच्या अनोळखीचे क्षेत्र असते. या दोहोंच्या संधीला सामान्य ज्ञानाने प्रकाशित केलेले असते. (३०००) ऐसें जें सामान्य चिद्घन । स्पष्ट कीजे जीव विकल्पाहून । आणि जागृति स्वप्नींचे अभ्यासेंकडून । ज्ञानाज्ञानाहीपासूनी ॥ १ ॥ असे जे चिद्घन सामान्य ज्ञान आहे ते जीवंकृत विशेष विकल्पांपासून स्पष्टपणे वेगळे करावे, जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्थांचे अभ्यास करून ज्ञान आणि अज्ञान यांच्यापासूनही ते वेगळे करावे. (३००१) आधीं बैसतां उघडूनि नेत्र । घटपटादि पाहतां पदार्थमात्र । स्पष्टचि कीजे सामान्य चिन्मात्र । विशेष विकल्पानी ॥ २ ॥ आधी डोळे उघडून बसावे, मग घट्ट, पट इ. सगळे पदार्थ निरखून पाहावेत आणि विशेष विकल्पांपासून सामान्य चिद्रूपाचे स्वरूप स्पष्ट समजून घ्यावे. (३००२) विषय पाहतां नेत्र उघडूनी । संधी जाणाव्या जागृत स्थानीं । पुढें अज्ञातता दोनी । कळती प्रकाशित कैशा ॥ ३ ॥ याप्रमाणे डोळे उघडे ठेवून जागृत अवस्थेतील संधींचे अवलोकन करावे, त्यानंतर ज्ञातता आणि अज्ञातता या स्थिती कशा प्रकाशित होतात हे ओळखावे. (३००३) घट दृष्टी पहात असतां । तो सांडून पाहूं जाय पटावरुता । अथवा अन्याहून अन्य विषईं जातां । मध्य संधी कळती ॥ ४ ॥ घट डोळ्यांना दिसत असता, ते पाहणे सोडन पटावर दृष्टी फिरवताना, अथवा एका विषयावरून दुसऱ्या विषयावर लक्ष केंद्रित करताना, मध्य संधी कळतात. (३००४) घटाचे पाहुणे सांडिले । पट पहावयासी चालिलें । पटापर्यंत नाहीं गेलें । तोंवरी संधीचे रूप ॥ ५ ॥ घटाकडे पाहणे सोडले आणि पटावर लक्ष नेले, पण ते पटापर्यंत पोहोचण्यापूर्वीच्या अवस्थेत संधीचे रूप पाहावयास मिळते. (३००५) जैशिया झळझळी भिन्न भिन्न । बहुत दिसती त्या त्यागून । गध्य संधी ज्या सूर्य प्रकाशमान । पहाव्या दृष्टीं ॥ ६ ॥ ज्याप्रमाणे भिंतीवर भिन्न भिन्न झळझळी दिसतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सूर्याने प्रकाशित केलेले मध्य संधी दृष्टीने पहावेत. (३००६) तैसेचि विषयाहूनी दुजिया । विषयांप्रती जातां आपसया । संधि दिसताती मध्य ठायां । अवलोकाव्या ते समई ॥ ७ ॥ त्याप्रमाणे एका विषयावरून दुसऱ्या विषयावर जाताना दोन विषयांमधील अंतरामध्ये जे संधी दिसतात त्यांचे त्या काळात अवलोकन करावे. (३००७) धट पाहतां पाहतां सोडावा । पट तरी दृष्टीसी न पहावा । तितुकी अवधि जी ये अनुभवा । तो वोळखावा संधि ॥ ८ ॥ घटाचे अवलोकन करत असतानाच तो सोडून द्यावा, आणि अजून पट दृष्टीस पडला नाही अशा मधल्या काळात जो अनुभवास येतो तोच संधी समजावा. (३००८) तया मात्र संधी माझारी । कल्पू नये हाचि की संधी अंतरीं । जरी कल्पितां तये अवसरी । विकल्पचि जाहला ॥ ९ ॥ तो संधी अनुभवताना 'हाच तो संधी' असा विचार मनात आणू नये. जर त्या काळात तशी कल्पना केली तर तो विकल्प झाला असे म्हणावे लागते. (३००९) तरी साधकें तितुका अवसर । जो कां उभय विषयांचा मध्यसार । न कल्पितां जो काही भाव स्थिर । तो सहज अवलोकावावा ॥ १० ॥ म्हणून साधकाने दोन विषयांच्या मध्ये जेवढा अवकाश मिळेल तेवढा वेळ काहीही कल्पना न करत आपला भाव स्थिर ठेवून तो संधिकाल सहज अवलोकन करावा. (३०१०) मग तो पुढे आठवावा । की अमुकसा संधि आला अनुभवा । कांही विकल्पाचा नसतां गोवा । उगें स्थिरत्व होते ॥ ११ ॥ मग ती वेळ गेल्यानंतर त्या गेलेल्या काळाचे स्मरण करावे की मी अमुक वेळ संधीचा अनुभव घेतला. त्या काळात कोणताही विकल्प उठला नाही. सर्व काही स्थिर होते. (३०११) त्या समईंचे जें उगेपण । तया समई नसतां आठवण । पुढे कळे अनुमानेकडून । की स्थिरत्व होते अमुक काळ ॥ १२ ॥ त्या वेळी जो उगेपणा अनुभवला त्यावेळी कसलीच आठवण नव्हती. पण समाधीतून बाहेर आल्यावर अनुमानाने कळून येते की, ते स्थिरत्व अमुक काळ होते. (३०१२) अमुक काळ जें स्थिरत्व जाहलें । तें विकल्पउत्थानीं आतां कळलें । तस्मात् तया समयासी अनुभविलें । तत्क्षणीं सामान्यें ॥ १३ ॥ त्या विशिष्ट काळी जे स्थिरत्व झाले होते ते पुढे विकल्प निर्माण झाल्यानंतर आता कळले. पण त्या स्थैर्याच्या काळी सामान्याचाच अनुभव घेतलेला होता. (३०१३) तेथें अनुभविलें जरी नाहीं । तरी आठवा न ये तें कांही । अनुभविल्या विषयाविण कांही । बोलतांचि न ये ॥ १४ ॥ समाधीमध्ये काहीच अनुभवले नसेल तर त्याचे नंतर उत्थानकाळी स्मरण झालेच नसते. अनुभवलेल्या विषयावाचून दुसरे काही बोलताच येत नाही. (जे अनुभवलेले असते तेवढेच बोलता येते.) (३०१४) जैसा सहज दृष्टी पदार्थ देखिला । पुरता अमुक ह्मणून नाही कळला । पुढे जरी येखादियें पुसिला । तेव्हा म्हणे पाहिलासा वाटे ॥ १५ ॥ ज्याप्रमाणे एखादा पदार्थ दृष्टीला सहज पडला, परंतु पुरता पाहिलेला नसल्यामुळे अमुक म्हणून त्याची ओळख पटलेली नसेल, अशावेळी एखाद्याने त्याबद्दल त्याला विचारले तर तो म्हणतो की, मी तो पाहिल्यासारखा वाटतो. (३०१५) तस्मात् तो पाहिला असे । विकल्प जरी तेथें नसे । परी पाहिला म्हणून सांगतसे । अनुभविला विषय ॥ १६ ॥ तेव्हा तो पदार्थ पाहिलेला आहे, त्याबद्दल कोणताही विकल्प निर्माण झालेला नव्हता. त्यामुळे आपण अनुभविलेला तो विषय तो, 'मी तो पाहिला' म्हणून सांगतो. (३०१६) तैसाचि मध्य संधीचा समय । जो कां सामान्यत्वाचा प्रत्यय । तो अनुभविला होता निश्चय । म्हणोनि आतां आठवी ॥ १७ ॥ त्याप्रमाणे मध्यसंधीच्या वेळी त्याला जो सामान्यत्वाचा प्रत्यय आला होता, तो त्याने निश्चितपणे अनुभविला होता म्हणूनच त्याला तो आता आठवतो आहे. (३०१७) ऐसा स्थिरत्वाचा जो अनुभव । तो चिद्रूप प्रकाशिला स्वयमेव । जेथे विकल्परूप हा जीव । विशेषत्वें नसे ॥ १८ ॥ असा हा स्थिरत्वाचा जो अनुभव होता तो म्हणजे चिद्रूपाचा स्वयंप्रकाशित सामान्यत्वाचा अनुभव होता. तेथे विकल्परूपी हा जीव विशेषत्वाने निर्माण झालेला नव्हता. (३०१८) जीव नसतां प्रकाश असे । तो प्रकाशिला सामान्य प्रकाशें । येथे संशय किमपि नसे । अगा हे रविदत्ता ॥ १९ ॥ जीव नसताना सुद्धा जो प्रकाश होता तो सामान्य प्रकाश होय. याबद्दल, हे रविदत्ता, काहीही संशय बाळगण्याचे कारण नाही. (३०१९) कोणी कल्पना ऐशी करी । कीं तो प्रकाश जीवाचा निर्धारी । तरी ते अल्पमति अविचारी । अभ्यास दृष्टि त्यां कैंची ॥ २० ॥ जर एखाद्याने कल्पना केली की, तो प्रकाश निश्चितपणे जीवाचाच होता, तर तो अल्पबुद्धीचा अविचारी गृहस्थ मानावा. त्याला अभ्यासाची दृष्टी कशी येईल? (३०२०) झळझळी सांडूनि जो मध्यभाग । तो सूर्ये प्रकाशिला सांग । तेथें दर्पणस्थाचा लाग । प्रकाशावया नसे ॥ २१ ॥ कवडशांची झळझळ वगळून जो मधला भाग उरतो तो संपूर्णपणे सूर्याने स्वतःच्या प्रकाशाने प्रकाशित केलेला असतो. तेथे दर्पणस्थाने प्रकाशित करण्याची गरज नसते. (३०२१) दर्पणस्थे झळझळचि प्रकाशावी । तैसे विकल्पातें जीव प्रकाशवी । मध्यस्थळी प्रकाशी रवि । तेवि मध्यसंधि आत्मा ॥ २२ ॥ दर्पणस्थ प्रतिबिंबाने फक्त कवडसाच प्रकाशित केलेला असतो. त्याप्रमाणे जीव फक्त विकल्पांनाच प्रकाशित करतो. त्या विकल्पांच्या मधील भाग सूर्य प्रकाशित करतो. त्याप्रमाणे आत्मा मध्यसंधींना प्रकाशित करत असतो. (३०२२) मधील भिंत दर्पणींचा । सूर्य प्रकाशीना साचा । तेवीं संधी जो उभय विषयांचा । जीव हा प्रकाशीना ॥ २३ ॥ मधल्या जागेतील भिंतीला आरशातील सूर्य प्रकाशित करू शकत नाही. त्याप्रमाणे दोन विषयांच्या सांध्यामधील भाग, जीवाला प्रकाशित करता येत नाही. (३०२३) तस्मात् तो कूटस्थ आत्मा । सामान्य प्रकाशक जो चिदात्मा । संधीमाजी स्पष्ट महात्मा । साधक पाहे अनुभवें ॥ २४ ॥ त्यामुळे साधक स्वतःच्या अनुभवाने, दोन विकल्पांच्या संधीमधील भाग सामान्य ज्ञानाने प्रकाशित करणाऱ्या चिद्रूप कूटस्थ आत्म्याला स्पष्टपणे पाह शकतो. (३०२४) विकल्प मात्र जितुका स्फुरे । तितुकाचि विशेषे जीव आविष्करे । झळझळ पडली तेथे भासमात्रे । विशेष दिसे ॥ २५ ॥ मात्र जो विकल्प जेवढा जाणवतो तेवढाच हा जीव प्रकाशित करतो. भिंतीवर पडलेली कवडशाची झळझळ तेवढीच भासरूप जीवाला विशेषत्वाने प्रकाशित करता येते.(३०२५) असो जीवत्व जितुकें स्फुरलें । तितुकेंचि सामान्य आच्छादिलें । जैसें झळझळीने मात्र झांकिले । तितुकेंचि स्थळ ॥ २६ ॥ जीवाकडून जेवढा भाग प्रकाशित होतो तेवढाच भाग सामान्याला झाकून टाकतो. कवडशाच्या झळझळीने व्यापलेला भागच फक्त सूर्याचा सामान्य प्रकाश झाकून टाकतो. (३०२६) येर विकल्पाचे मागें पुढें । सामान्यचि दाटलें गाढें । जेवीं झळझळीमध्ये पाहतां जोडे । रवीचा प्रकाश ॥ २७ ॥ त्या विकल्पाच्या मागेपुढे सामान्यच दाटीने भरलेले असते. कवडशाच्या झळझळींमधील जागेत पाहिल्यावर सूर्याच्या सामान्य प्रकाशाचा लाभ होतो त्याप्रमाणे दोन विकल्पांच्या मध्ये पाहिल्यावर सामान्याचा लाभ होतो. (३०२७) एवं ऐशिया संधीमाजीं । अभ्यासें अवलोकावें सहजीं । जेथें विकल्पवृत्ति नसे दुजी । तेंचि सामान्य चिद्रूप ॥ २८ ॥ अशा प्रकारे संधीमध्ये पहाण्याचा अभ्यास करावा. त्या ठिकाणी दुसरी कोणतीही विकल्परूप वृत्ती नसते. तेच सामान्य चिद्रप होय. (३०२८) ऐसा हा चिरकाळ अभ्यास । केला पाहिजे मध्य संधीस । उभय विषयांचा टाकूनि भास । सामान्यत्वें राहावें ॥ २९ ॥ असा हा मध्य संधीचा अभ्यास दीर्घकाळ केला पाहिजे. दोन्ही विषयांचा भासणारा भाग टाळून केवळ सामान्य प्रकाशाला धरून राहावे. (३०२९) हा चिरकाळ अभ्यास करितां । संधि स्पष्ट होती टळटळिता । मग भलते वेळे अवलोकितां । जेथें तेथें भासती ॥ ३० ॥ हा अभ्यास चिरकाळ केल्यावर संधी टळटळीत स्पष्ट होतात. मग सरावाने कोणत्याही वेळी पाहिलेतरी असे संधी जेथेतेथे सापडतील. (३०३०) संधीचा जो प्रकाशक । तो सामान्य चिदात्मा येक । प्रतीति येतसे निश्चयात्मक । तस्मात् अभ्यास कीजे ॥ ३१ ॥ संधींना प्रकाशित करणारा एकच सामान्य चिदात्मा अशा अभ्यासाने निश्चितपणे अनुभवास येऊ लागतो. म्हणून अभ्यास करावा. (३०३१) आतां ज्ञातता अज्ञातता कैशी । प्रकाशीतसे आत्मा अविनाशी । तेंचि स्पष्ट कीजताहे मानसीं । सावधान असावें ॥ ३२ ॥ आता हाच अविनाशी आत्मा ज्ञातता आणि अज्ञातता यांना कसे प्रकाशित करतो, तेच मी स्पष्ट करतो. श्रोत्यांनी सावधान असावे. (३०३२) बैसतांही नेत्र उघडोनी । नूतन पदार्थ जो तया स्थानीं । तो येकायेकी देखिला नयनीं । तेव्हांचा जो वृत्तिभाव ॥ ३३ ॥ डोळे उघडे ठेवून बसले असताही जो नवीन पदार्थ त्या ठिकाणी होता, तो डोळ्यांनी अचानक एकाएकी पाहिला असता तेव्हाचा जो वृत्तिभाव होतो; (३०३३) अंतरांतून निर्विकल्पवृत्ति । आरंभी उफाळून पदार्थावरूती । सहजत्वें तदाकारता पावती । तेथून येथवरी पसरे ॥ ३४ ॥ त्या वेळी अंतःकरणापासून प्रथम निर्विकल्पवृत्ती उफाळून पदार्थावर जाऊन सहजपणे तदाकार होते आणि मूळ उगमापासून पदार्थापर्यंत येथून तेथवर पसरते; (३०३४) जो पदार्थ तरी नाहीं कळला । अथवा संशयही नाहीं स्फुरला । ऐशिया तया न कळणियाला । अज्ञातता ह्मणावी ॥ ३५ ॥ तो पदार्थ अजून कळला नाही, आणि त्याबद्दल अजून संशयही स्फुरला नाही, अशा त्या न कळण्याला अज्ञातता म्हणावे. (३०३५) पुढे मन संकल्प उठतां । हे काय असे न कळे पुरता । तो संशय वाटतसे चित्ता । अमुक निश्चय नव्हे ॥ ३६ ॥ पुढे मनाचा संकल्प उठतो, पण अजून हे काय आहे, कसे आहे, हे पुरते कळत नाही, तो संशय चिताला जाणवतो, पण अमुक पदार्थ म्हणून निश्चय झालेला नसतो. (३०३६) मग निरखून जेव्हां पाहे । सान मुख स्थूल उदर लाहे । तेव्हां म्हणे हा घट आहे । हा निश्चय बुद्धीचा ॥ ३७ ॥ मग जेव्हा निरखून पाहिले जाते, तेव्हा स्थूल उदर (इथे घेर) आहे. गळ्यापाशी लहान तोंड आहे असे दिसते, तेव्हा तो म्हणतो की हा घट आहे, असा त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो. (३०३७) एवं मनाचा जो कां संशय । आणि बुद्धीचा निश्चय । ऐसे जे हे भाव उभय । तें भासकत्व जीवाचें ॥ ३८ ॥ अशाप्रकारे मनाला वाटणारा संशय, बुद्धीचा झालेला निश्चय असे जे दोन भाव निर्माण होतात त्यावरून जीवाचे भासकत्व (प्रकाशित करण्याचा गुणधर्म) कळून येते. (त्यामुळे जीवाचे अस्तित्व लक्षात येते.) (३०३८) तया पुढे पाहणे घटाचें । ज्ञान तरी होऊन साचें । जें स्थिरत्व सामान्य वृत्ती । तया ज्ञातता बोलिजे ॥ ३९ ॥ त्यानंतर पुढे पाहिले असता घटाचे खरे ज्ञान होऊन बुद्धी सामान्यत्वाने स्थिर होते. त्या अवस्थेला ज्ञातता असे म्हणतात. (३०३९) घट निश्चय कळं आला । संशय तो निःशेष मावळला । तत्क्षणींच जीवही निमाला । घटबुद्धि प्रकाशोनी ॥ ४० ॥ हा घट आहे. असा निश्चय झाला, त्याबद्दलचा संशय पूर्णपणे मावळला. त्याक्षणीच बुद्धीला घटाचे ज्ञान करून देऊन जीवही लोपतो. (३०४०) हे विशेषत्वे तिनी मावळती । उगें कळणे मात्र उरे वृत्ति । तेचि ज्ञातता पहावी पुरती । सामान्य घटाकारता ॥ ४१ ॥ अशा त-हेने मन, बुद्धी आणि जीव ही विशेषज्ञान प्रकाशित करणारी तत्त्वे मावळतात. मग उगीच कळले अशी केवळ वृत्ती उरते. त्यायोगाने घटाकार झालेली केवळ सामान्य वृत्ती होते.तीच ज्ञातता होय. तिचे पूर्ण अवलोकन करावे. (३०४१) पूर्वी संशयात्मक हे मन । जोवरी जाहलें नाहीं उत्पन्न । तेंचि न कळणे अज्ञान । सामान्य प्रकाशिले ॥ ४२ ॥ प्रथम जोपर्यंत संशयात्मक मनाची उत्पत्ती झाली नव्हती. त्या न कळण्याला अज्ञान म्हणतात. ते अज्ञान सामान्य प्रकाशाने प्रकाशित झालेले असते. (३०४२) पुढें ज्ञान होऊन बुद्धीसी । नाश होय विशेषासी । नुसधे कळणें जें सामान्य वृत्तीसी । तयाही प्रकाशी चिद्रूप ॥ ४३ ॥ पुढे बुद्धीला ज्ञान होते. नंतर तिचे ते विशेष ज्ञानही नष्ट होते. आणि सामान्य वृत्तीचे नुसते कळणे उरते. त्या सामान्य ज्ञानालाही चिद्रूपच प्रकाशित करत असते. (३०४३) एवं पहिली ते अज्ञातता । पुढे उरे ते जाण ज्ञातता । हे दोनी प्रकाशिलें तत्त्वतां । सामान्य चिद्रूपें ॥ ४४ ॥ प्रथम अनुभवाला येते की अज्ञातता नंतर शिल्लक राहाते ती ज्ञातता. या दोन्ही अवस्थांना सामान्य चिद्रूपच प्रकाशित करते. (३०४४) मध्ये जीवाचें रूप तरी । किती असे पहावें अंतरी । खद्योत जैसा चमकून ते अवसरीं । तत्क्षणी झांकोळे ॥ ४५ ॥ या दोहोंच्या मध्ये जीवाचे अस्तित्व असते. ते किती काळ असते हे मनामध्ये पहावे. काजवा जसा क्षणभर चमकतो आणि लगेच मावळतो. (३०४५) मनाचा मात्र संशय उठतां । अथवा बुद्धीसी अमुक हा निश्चय होतां । तितुकियासीच होय स्फुरविता । विशेषत्वें जीव ॥ ४६ ॥ त्याप्रमाणे मनाचा संशय निर्माण झाल्यानंतर आणि त्यानंतर बुद्धीचा हा अमुक पदार्थ आहे' असा निश्चय झाल्यानंतर, जीव या दोन्ही वृत्तींना विशेषत्वाने प्रकाशित करतो. (३०४६) तितुकें मात्र स्फुरवोनि द्यावें । तत्क्षणीच स्वतां मावळावें । पुढे उरे तें स्वयें प्रकाशावें । सामान्य चिद्रूपें ॥ ४७ ॥ जीव या दोन्ही वृत्तींना प्रकाशित होऊ देतो आणि तत्क्षणीच स्वतः मावळतो. पुढे जे उरते ते स्वतःच सामान्य चिद्रूप प्रकाशित करते. (३०४७) तस्मात् येथेही रविदत्ता । अभ्यासावें सादर तत्त्वतां । आधी नूतन पदार्थ पाहतां । अज्ञातता अनुभवावी ॥ ४८ ॥ तेव्हा येथेही हे रविदत्ता, अभ्यास केला पाहिजे. प्रथम नवीन पदार्थ पाहताच अज्ञाततेचा अनुभव घ्यावा. (३०४८) अथवा संशय निश्चय पदार्थाचा । होऊन जातां भाव कळण्याचा । उरे तो प्रकाश सामान्याचा । तोचि स्थिर करावा ॥ ४९ ॥ किंवा त्या पदार्थाबद्दलचा संशय आणि नंतरचा निश्चय या दोन्ही विकल्पांचा लोप झाल्यानंतर केवळ कळलेपणाचा जो भाव उरतो तो सामान्याचाच प्रकाश होय. तो अधिक स्थिर करावा. (३०४९) तोचि येक पदार्थ पहावा । दुसरा सत्वर नावलोकावा । येकाकारत्वें सहज स्वयमेवा । घ्यावा अनुभव ॥ ५० ॥ तो एकच पदार्थ पहावा त्यानंतर लगेच दुसरा पहाण्याचा प्रयत्न करू नये. त्याशी एकाकार होऊन त्या स्थितीचा सहजत्वाने स्वतःच अनुभव घ्यावा. (३०५०) दुसरा जरी पदार्थ पाहिला । तरी तोही पाहिजे स्थिर केला । विकल्पाआदि अंती ज्ञानाज्ञानाला । क्षणक्षणां वाढवावें ॥ ५१ ॥ दुसरा पदार्थ जरी पाहिला, तरी तोही स्थिर केला पाहिजे. विकल्पाच्या आरंभी आणि शेवटी अज्ञातता आणि ज्ञातता दर क्षणाला वाढवण्याचा अभ्यास करावा. (३०५१) विकल्प असे तो क्षण क्षण । अभ्यासबळे करावा क्षीण । ज्ञातता अज्ञातता वर्धमान । दिवसें दिवस व्हावी ॥ ५२ ॥ जो विकल्प असेल तो अभ्यासाच्या साहाय्याने क्षणाक्षणाला क्षीण करीत जावे. त्यायोगाने दिवसेंदिवस ज्ञातता आणि अज्ञातता या समाधींच्या कालावधीत वाढ व्हावी. (३०५२) ऐसाचि संधि उभय विषयांचा । वाढवीत जावा अभ्यासें साचा । मधील सामान्य प्रकाशाचा । अनुभव घ्यावा ॥ ५३ ॥ अशाच प्रकारे दोन विषयांचा/ विकल्पांचा संधी पहाण्याचा कालही अभ्यासानेच वाढवीत जावा. त्या योगाने संधिकाळातील सामान्य प्रकाशाचा अनुभव घ्यावा. (३०५३) ऐसा हा बहिर्विषय व्यापारी । संधि साधावा येकांतामाझारी । अथवा देहयात्रा होतां सारी । क्षणाक्षणां पहावा ॥ ५४ ॥ अशा प्रकारे बहिर्विषय व्यापारात (जागृतीच्या अवस्थेत) एकांतात बसून संधी साधण्याचा अभ्यास करावा. किंवा देहाच्या सर्व क्रिया चालू असताही क्षणाक्षणाला हा संधी पाहण्याचा अभ्यास करावा.(३०५४) वृत्तीसी अभ्यासचि पडावा । व्यापारी संधींचा अनुभव घ्यावा । अधिकचि आवडी उपजे भावा । समाधिसुखाची ॥ ५५ ॥ वृत्तीला या अभ्यासाचा सराव झाला पाहिजे. व्यापारात संधींचा अनुभव घ्यावा. त्यामुळे समाधिसुखाची जीवाला अधिकच आवड निर्माण होते. (३०५५) आतां नेत्र झांकून जे अंतरीं । विकल्प उठताती नानापरी । येथेही उभय विकल्पांमाझारीं । संधि साधाव्या ॥ ५६ ॥ आता डोळे मिटून बसले असता अंतःकरणामध्ये जे नानाप्रकारचे विकल्प उत्पन्न होतात, त्याही ठिकाणी दोन विकल्पांच्या मधले संधी साधावेत. (३०५६) आणि ज्ञातता अज्ञातता । प्रकाशित सामान्ये तत्त्वतां । तेही साधावे समस्ता । अभ्यासबळें ॥ ५७ ॥ आणि अभ्यासाच्या साहाय्यानेच ज्ञातता आणि अज्ञातता या ज्या दोन अवस्था सामान्य प्रकाशानेच प्रकाशित होतात त्याही साधाव्यात. (३०५७) नेत्र झांकून उगेपणीं । दृष्टी घालावी मूळ स्फुरणीं । संकल्पाचिये जन्म स्थानीं । सहज अवलोकावें ॥ ५८ ॥ नेत्र बंद करून उगेपणामध्ये आपली दृष्टी मूळ स्फुरणावर केंद्रित करावी. आणि संकल्पाच्या जन्मस्थानावर सहज लक्ष द्यावे. (३०५८) सहजीं जो कां विकल्प उठे । विषयध्यासें आठवी गोमटें । तें अवलोकावें अंतरीं नेटें । अंतर दृष्टीनें ॥ ५९ ॥ सहजपणे जो विकल्प उठतो, तो विषयध्यासाने चांगल्या चांगल्या पदार्थाचे स्मरण करतो. त्याऐवजी दृष्टी अंतर्मुख करून अंतरंगात नेटाने अवलोकन करून पहावे. (३०५९) घटपटादि नाना प्रकार । विषय भासती जैसे साचार । तेथें शब्दस्पर्शादिकांचे अनुकार । होती प्रत्यक्षापरी ॥ ६० ॥ या अंतर्दृष्टीला घटपटादी विविध पदार्थ प्रत्यक्ष पाहात असल्यासारखे दिसायला लागतात. तेथेही शब्द, स्पर्श इ. विषयांचे प्रत्यक्षातल्यासारखे अनुकरण होत असते. (३०६०) ते ते जैसे जैसे सहजें । येक येक उमटतील जे जे । अवलोकावे आपुले तेजें । भासत असती ॥ ६१ ॥ ते ते विषय जसजसे उमटत जातील तसतसे पाहत जावेत. ते विषय स्वतःच्या तेजाने भासमान होत असतात. (३०६१) विकल्प उठोनि विषय कल्पी । अमुक म्हणोनि आरोपी । ते बुद्धि वोळखावी साक्षेपी । स्थापी सुंदर खोटें ॥ ६२ ॥ विकल्प उठून विषयाची कल्पना करतो. तो अमुक विषय आहे म्हणून त्यावर आरोप करतो. तीच बुद्धी होय. तीच या सुंदर परंतु खोट्या विषयांची स्थापना करत असते. ती ओळखावी. (३०६२) ऐशिया बुद्धीसी स्फुरविता । अमुक अल्प प्रकाशें होय दाविता । जो जीव बिंबला बुद्धिआंतोता । प्रतिबिंब जेवीं दर्पणीं ॥ ६३ ॥ अशा त्या बुद्धीचे स्फुरण करून आपल्या अल्प प्रकाशाने तिला विषय दाखवणारा जीव त्या बुद्धीमध्येच आरशातल्या प्रतिबिंबासारखा रहात असतो. (३०६३) तो जीव विकल्प होतां उमटे । विकल्प नासतां तत्क्षणीं आटे । मागुती दुजियामाजीं उठे । विकल्पासह ॥ ६४ ॥ तो जीव विकल्पाबरोबरच उमटतो आणि विकल्प नष्ट होताच आटतो (नाहीसा होतो). त्यानंतर दुसरा विकल्प उत्पन्न होताच त्याच्यामध्ये त्याच्याबरोबरच उमटतो. (३०६४) चिद्रूप सामान्य जो प्रकाश । आदि मध्य अवसानी अविनाश । मध्ये उठोनि जो पावे नाश । तो जीव अनात्मा ॥ ६५ ॥ दोन विकल्पांच्या मध्ये दिसणारे सामान्य प्रकाश देणारे चिद्रप सर्व विकल्पांच्या आद्यस्थानी मध्यस्थानी आणि अंत्यस्थानी सर्वत्र व्यापून अविनाशी असते. आणि मधेच उठून जो नाश पावतो तो अनात्मा जीव होय. (३०६५) परी विशेषत्वे जीव उठतां । सामान्यासी होय आच्छादिता । म्हणोनी सामान्य प्रकाश ऐता । असतां न कळे साधका ॥ ६६ ॥ पण जीव विशेषत्वाने उत्पन्न होतो. त्यामुळे तो सामान्य प्रकाशाला झाकून टाकतो. म्हणून सामान्य प्रकाश सर्वत्र सातत्याने उपलब्ध असला तरी साधकाच्या तो लक्षात येत नाही. (३०६६) यास्तव साधकें ऐसें करावें । संधीचे पाहणे अभ्यासावें । उभय विकल्पी अवलोकावें । संधींत सामान्य ॥ ६७ ॥ यासाठी साधकाने असे करावे. संधी पाहण्याचा अभ्यास चालू ठेवावा. दोन्ही विकल्पांच्या संधीत सामान्य प्रकाशाचे अवलोकन करावे. (३०६७) येक विकल्प उठोनि मावळे । दुजा जोवरी न उफाळे । तोचि संधि अनुभवितां कळे । विकल्प उठतां मग ॥ ६८ ॥ एक विकल्प उठतो आणि मावळतो. तो मावळल्यानंतर दुसरा उत्पन्न होण्यापूर्वी असणारा जो संधि, त्याचा अनुभव घेतल्यानंतर आणि पुढील विकल्प उठल्यानंतर मग तो साधकाला कळतो. (३०६८) विकल्प नसतां उगेपणा । जाहला होता तो ये अनुमाना । तस्मात् तेथें होता कळलेपणा । तेणें आतां आठविलें ॥ ६९ ॥ विकल्प नसण्याच्या काळात जो उगेपणा वाटला होता त्याचे अनुमान करता येते. त्यामुळे तेथे जो कळतेपणा होता त्याच्यामुळे त्या अनुभवाचे आता स्मरण होत असते. (३०६९) तोचि सामान्य प्रकाश निर्विकल्प । संधीमाजी दाटला अमूप । तो अनुभवावा साधकें साक्षेप । सामान्य होऊनी ॥ ७० ॥ तोच निर्विकल्प असा सामान्य प्रकाश होय. तो संधीमध्ये दाटपणे व्यापून असतो. तो साधकाने तद्रूप होऊन पूर्वक अनुभवावा. (३०७०) तोचि अभ्यास कैसा कैसा । साधकें अभ्यासावा जैसा । तोचि बोलिजेत आहे अल्पसा । तेणें रीती कीजे ॥ ७१ ॥ तोच अभ्यास साधकाने कसा कसा करावा तेच थोडेफार सांगतो. त्या पद्धतीने करावा. (३०७१) अगा रविदत्ता ग्रामेंपट्टणे । भूमीवरील अपार स्थानें । पाहिली किंवा ऐकून जाणे । जागृतीमाजीं ॥ ७२ ॥ रविदत्ता, माणूस जागृतीमध्ये गावे, शहरे, तसेच पृथ्वीवरील अनेक स्थाने पहात असतो किंवा त्यांच्याबद्दल त्याने ऐकलेले असते. (३०७२) जे जे विषय सान थोरे । वनें उपवनें ग्रामें पुरें । ते ते कल्पून उभवी सारे । ध्यास मात्र बुद्धि ॥ ७३ ॥ जे जे लहान थोर विषय, वने, उपवने, गावे, शहरे इ. माणसाने पाहिलेली अथवा ऐकलेली असतात त्यांचा त्यांचा ध्यास घेऊन माणसाची बुद्धी कल्पनेने त्या सर्वांची पुन्हा उभारणी करते. (३०७३) हे काय असेही ह्मणून । संशय करीतसे मन । निश्चय स्थापी अमुक हे आपण । तेचि बुद्धि ॥ ७४ ॥ हे काय असेल बरे!' असे म्हणून त्याचे मन संशयही करते. मग तीच बुद्धी हा अमुक पदार्थ आहे, असा निश्चयही करते. (३०७४) इतुकियाही विकल्पासी । जीवचि स्फुरवी आपैसि । या विकल्पा आदिअंती येकरसी । सामान्य चित्प्रकाश ॥ ७५ ॥ या सर्व विषयांना जीवच प्रकाशित करतो. या विकल्पांच्या आरंभी, मध्यभागी आणि अन्त्यभागी सर्वत्र सामान्य चित्प्रकाशच एकमेव व्यापून असतो. (३०७५) एवं आदि अंती सामान्य एका । मध्ये किंचित् विशेषात्मक । तया विकल्पामाजीं अनेक । विषयाध्यास उठती ॥ ७६ ॥ अशा प्रकारे आदिस्थानी आणि अंती एकच सामान्य असते. मध्यभागी मात्र थोडेसे विशेष विकल्प असतात. त्या विकल्पांमध्ये सुद्धा अनेक विषयांचे ध्यास उठत असतात. (३०७६) उगेंचि निवांतही असतां । ग्राम दिसू लागे अवचिता । तो ग्राम जरी निरखू जातां । उपवन दिसे ॥ ७७ ॥ उगीच निवांत बसले असताही अचानकपणे डोळ्यासमोर एखादे गाव दिसू लागते. तो गाव बारकाईने पाह लागलो की त्याच्या जागी एक उपवन (बाग) दिसू लागते. (३०७७) तें उपवनही जाऊनी । नदी की पर्वत दिसे नयनीं । अथवा सेना बाजार दिसोनी । हारपोनि जाती ॥ ७८ ॥ नंतर ते उपवनही नाहीसे होते आणि त्या जागी एक नदी किंवा पर्वत दृष्टीस पडतो किंवा सेना बाजार दिसतो आणि लगेच नाहीसा होतो. (३०७८) ग्राम दिसत होतें तें राहिलें । उपनन जोवरी नाहीं देखिलें । तेंचि मध्य संधीसी वोळखिलें । पाहिजे तत्क्षणी ॥ ७९ ॥ अगोदर गाव दिसत होते ते नाहीसे झाले. त्यानंतर उपवन दिसण्याच्या पूर्वीची मध्यम संधीची अवस्था होती. तो मध्यसंधी लगेच ओळखला पाहिजे. (३०७९) अथवा उपवनही सांडोनियां । वस्तुजात नये प्रत्यया । तोंवरी संधीमाजी तितुकिया । सामान्य वोळखावें ॥ ८० ॥ किंवा उपवन नाहीसे झाल्यावर जोवर इतर वस्तू दृष्टीस पडत नाही तोपर्यंत तेवढ्या संधीमध्ये सामान्य ओळखावे. (३०८०) पदार्थ अमुकसा भासे । तो कल्पिला बुद्धिमानसें । तया जीव हा स्फुरवीतसे अमुक ह्मणोनी ॥ ८१ ॥ एखादा पदार्थ अमक्यासारखा वाटतो. त्याची कल्पना मन आणि बुद्धी करत असतात. त्याला हा अमुक पदार्थ आहे म्हणन प्रकाशित करण्याचे काम जीवच करतो. (३०८१) तितुका विकल्पमात्र त्यागूनी । दुजा जोवरी नव्हे भासकपणीं । तोवरी तया संधीलागोनी । चित्प्रभा प्रकाशी ॥ ८२ ॥ त्या सगळ्या विकल्पाचा त्याग करून दुसरा विकल्प जोवर भासत नाही तोपर्यंत त्या संधिकालाला चित्प्रभाच प्रकाशित करत असते. (३०८२) ते संधिमात्र साधकं पहावी । त्यांतील सामान्यता अनुभवावी । मध्ये दिसे जरी विकल्प गोंवीं । तरी ते आपणचि लोपे ॥ ८३ ॥ साधकाने तो संधी तेवढा पहावा त्यातील सामान्यतेचा अनुभव घ्यावा. तो घेत असताना मधेच जर विकल्पाचा अडथळा निर्माण झाला तर तो आपोआपच लोप पावतो. (३०८३) भासविषय सहजचि उठती । ते आपणचि भासून हारपती । मागे पुढे जें सहजगति । सामान्यचि असे ॥ ८४ ॥ भासविषय आपले आपणच निर्माण होतात आणि आपणच भासमान होऊन लगेच लोप पावतात. त्यांच्या मागेपुढे सहजच सामान्यच असते (३०८४) स्फुरे तयासी उत्पन्न होणें । अल्पसें दिसून लय पावणे । या आदिअंती सहजपणे । सामान्य ऐतें ॥ ८५ ॥ जे स्फुरते (उद्भवते) ते उत्पन्न होते आणि अल्पकाळ दिसून लय पावतेच. तेव्हा त्याच्या आरंभी आणि अंती सहजच स्वयंसिद्ध सामान्यच असते. (३०८५) ऐतें असून मिथ्याभासानें । उठले क्षणीं आच्छादणे । भास निमतां प्रतीति बाणे । सहज सामान्याची ॥ ८६ ॥ ते आयते (स्वयंसिद्ध) असूनही मिथ्याभासाने उत्पन्न होतेक्षणीच झाकले जाते. तो भास निमताक्षणीच सहजच स्वाभाविकपणे सामान्याची प्रतीती येते. (३०८६) तस्मात् तें सामान्यचि अनुभवावें । भासतां विषय मिथ्या पहावें । पुढे ते मावळतां स्वभावें । सामान्यचि उरे ॥ ८७ ॥ म्हणून त्या सामान्याचाच अनुभव घ्यावा. विषय जर भासलेच तर ते मिथ्यात्वाने पहावेत. नंतर ते स्वाभाविकपणे मावळतातच. त्यानंतर साहजिकच सामान्यच उरते. (३०८७) हा येक प्रकार स्वप्नस्थानीं । संधीचा असे भासकपणीं । यानि प्रकार दुजा तो बोलूं वचनीं । विकल्पसंधीचा ॥ ८८ ॥ स्वप्नाच्या अवस्थेमध्ये संधी भासमान होत असताना अनुभवण्याचा हा एक प्रकार झाला. याहन दुसरा एक विकल्पसंधीचा प्रकार आहे तो आता सांगतो. (३०८८) उगेंचि नेत्र झांकून बैसतां । भासविषयही न दिसतां । कल्पना मननात्मक तत्त्वतां । उठती निमती ॥ ८९ ॥ उगीच डोळे झाकून बसले असता आणि भासविषयही दिसत नसताना मननाच्या स्वरूपात कल्पना उठत असतात आणि नाहीशा होत असतात. (३०८९) उगेंचि मागें जें कांही जाहलें । अथवा अमुक बोलिलें कीं ऐकिलें । तयाचें मनन करूं लागलें । मध्यमा वाचेनें ॥ ९० ॥ मागे जे काही घडले, अथवा कोणी अमुक अमुक बोलले किंवा काही ऐकले त्याचेच मध्यमा वाचेने मनन होऊ लागते. (३०९०) अथवा पुढे अमुक करीन । अमुकासी अमुक बोलेन । ऐसें जें होत असे मनन । विकल्परूपें ॥ ९१ ॥ अथवा पुढे अमुक करीन. अमक्याशी अमुक अमुक बोलेन अशा विकल्परूपाने मनन चालू असते. (३०९१) तें मनन सतत येकरूप । वाटे परी तें अल्प अल्प । येक उठून जातसे संकल्प । मागून दुजा उठे ॥ १२ ॥ ते मनन सातत्याने एकरूप वाटत असते, पण ते तुकड्या तुकड्यांनी होत असते. एक संकल्प निर्माण होतो आणि लगेच मावळतो. त्यानंतर पुन्हा दुसरा संकल्प उठतो. (३०९२) उठतांचि निमतसे तत्क्षणीं । तेव्हांचि दुजा उठे मागोनी । तें उठणें निमणे अंतर नयनीं । विलोकावें साधकें ॥ ९३ ॥ तो उठला तरी लगेच मावळतो. लागलीच दुसरा संकल्प मागून उठतोच. साधकाने ते संकल्पाचे उठणे आणि मावळणे आपल्या अंतर्दृष्टीने पहावे. (३०९३) अति त्वरा या विकल्पाची । न कळे कदां पाहतां आहाची । तरी तयाहून सूक्ष्मदृष्टीची । धारणा धरावी ॥ ९४ ॥ हे विकल्प एवढे वेगाने येत असतात की सहज वरवर पाहिल्याने हे त्यांचे येणे जाणे कळतही नाही. तेव्हा अधिक सूक्ष्मदृष्टीची धारणा करावी. म्हणजे ते अधिक सूक्ष्म दृष्टीने पहावेत. (३०९४) बहु चिरकाल पाहतां पाहतां । संधी कळो येती आंतोता । तथापि नयेचि अनुभवितां । तरी निरोधावा संकल्प ॥ ९५ ॥ पुष्कळ काळ अनेक वेळा पाहिल्याने आतल्या आतच हे संधी कळू लागतात. तरीसुद्धा जर त्यांचा अनुभवच येत नसेल तर मग संकल्पाचे निरोधन करावे. (आतल्या आत थोपवून ठेवावेत.) (३०९५) तो विकल्प जरी रोधिला । तरी उठेल ध्यासे पाहिला । तो जरी मावळून गेला । तरी आणीक उठे ॥ ९६ ॥ तो संकल्प थोपवून ठेवला तरी ध्यासामुळे पाहिला असता उठेल. तो जरी मावळून गेला तरी पुन्हा नंतर उठेलच. (३०९६) हा स्वभावचि विकल्पाचा । उठतां न राहे कदां साचा । परी रोधामुळे वेग हा तयाचा । मंद मंद चाले ॥ ९७ ॥ विकल्पाचा हा स्वभावच असतो. तो उठल्याशिवाय कधी राहणारच नाही. तरीपण आपण तो थोपवून धरल्याने त्याच्या येण्याजाण्याची क्रिया मंदगतीने चालते. (३०९७) ते समयीं विकल्पाची संधी । अंतर दृष्टीसी कळू ये आधीं । परी तितुकी जे का अवधि । लक्षिली पाहिजे ॥ ९८ ॥ त्यावेळी विकल्पांचे संधी अंतर्दृष्टीला प्रथम कळून येतात. परंतु तेवढा काळपर्यंत ते पाहिले पाहिजेत. (३०९८) येक विकल्प उठोनि जातां । जोवरी दुजा नुद्भवता । तया संधीचिया आंतौता । सामान्य चिद्रप ॥ ९९ ॥ एक विकल्प मावळल्यानंतर जोपर्यंत दुसरा उत्पन्न झाला नाही त्या मधल्या संधीच्या काळात सामान्य चिद्रूपच असते. (३०९९) विकल्प उठतां जीव उमसे । विकल्प निमतां त्यासवें नासे । तरी संधीमाजी जो जाणत असे । तो जीवाहूनी वेगळा ॥ ३१०० ॥ विकल्प उठल्याबरोबर जीव उत्पन्न होतो. आणि विकल्प निमाल्याबरोबर जीवही त्याच्याबरोबर नाहीसा होतो पण संधीमध्ये जो जाणतो तो जीवाहून वेगळा असतो. (३१००) जयाचें प्रतिबिंब हे उमटलें । त्या आत्म्याने संधीत प्रकाशिलें । तेथें जीवाचे सामर्थ्य न चले । विकल्प अभाव जाणावया ॥ १ ॥ ज्याचे प्रतिबिंब म्हणून जीव उमटतो तो आत्माच संधीमध्ये प्रकाशित करत असतो. विकल्पाचा अभाव जाणण्याचे सामर्थ्य जीवामध्ये नाही. (जीव विकल्पाशिवाय जगू शकत नाही.) (३१०१) अरे जन्मलें नाहीं तेक्षणीं । टकटका पाहे कैसें नयनीं । तैसें जीवत्व नसेचि मध्यस्थानीं । तरी संधि केवीं प्रकाशी ॥ २ ॥ ज्याचा अजून जन्मच झाला नाही ते बालक डोळ्यांनी टकटका कसे पाह शकेल? त्याप्रमाणे मध्यसंधीला विकल्प नसल्यामुळे जीव नसतोच. मग मध्यसंधीचे जीव प्रकाशन करतो या बोलण्यात काय अर्थ आहे? (३१०२) तस्मात् आत्मा ब्रह्म पूर्णपणा । त्रिकाळाबाधित जो देखणा । तोचि संधिसी प्रकाश माना । करी सामान्य प्रकाशें ॥ ३ ॥ त्यामुळे जो पूर्ण आहे, त्रिकालाबाधित आहे, जो स्वयंप्रकाशी आहे. सर्वांचा प्रकाशक आहे. (देखणा), जो प्रत्यक्ष ब्रह्मच आहे, तो आत्माच संधीला आपल्या सामान्य प्रकाशाने प्रकाशित करत असतो. (३१०३) यास्तव संधीमाजी जो साक्षेपें । त्यागून विकल्पाची रूपें । अवलोकितां आत्मा चिद्रूपें । स्पष्ट कळू येतसे ॥ ४ ॥ म्हणूनच विकल्पांचा त्याग करून संधीमध्ये प्रयत्नपूर्वक पाहिल्यास आत्मा चिद्रूपाने स्पष्टपणे कळून येत असतो. (३१०४) परी विकल्प जो कां उठिला । तों वरिचेवरी पाहिजे त्यागिला । मागून दुजा नाहीं जो उठिला । तोवरी मध्ये पहावें ॥ ५ ॥ परंतु त्यासाठी उत्पन्न झालेल्या विकल्पाचा वरच्यावर त्याग केला पाहिजे. आणि दुसरा विकल्प उठला नाही तोवर दोन विकल्पांच्या संधीत त्या आत्म्यास पाहिले पाहिजे. (३१०५) संकल्पाचे बुडी दृष्टि । जो कां बैसोनि घाली मिठी । तरीच विकल्प हा त्वरें नुठी । तेव्हा संधि प्रकाशती ॥ ६ ॥ जर साधक संकल्पाच्या तळाशी मिठी घालून बसेल तरच विकल्प लगोलग उठणार नाही. आणि तेव्हाच मग संधी सामान्य प्रकाशाने उजळतील. (३१०६) ऐसा अभ्यास चिरकाळ करावा । क्षीण होता विकल्पाचा यावा । संधि प्रकाशलिया स्वानुभवा । सामान्य येतसे ॥ ७ ॥ असा अभ्यास चिरकाळ करावा. विकल्पाचा जोर (यावा) कमी झाल्यावर संधी कळून येतात आणि त्याच वेळी सामान्य प्रकाशाचा आपल्याला अनुभव येतो. (३१०७) एवं संधीमाजील चित्प्रकाश । अभ्यासें आणावा प्रत्ययास । तेणें बळे दिवसेंदिवश । प्रतीति बाणे ॥ ८ ॥ अशा प्रकारचा संधीमधील चित्प्रकाश अभ्यासाने आपल्या अनुभवास आणावा. त्यायोगाने दिवसेंदिवस हा अनुभव दृढ होत जातो. (३१०८) आतां ज्ञातता अज्ञातता । स्वप्नप्रस्थानींच्या कैशा तत्त्वतां । त्या प्रकाशिल्या केवीं अनंता । चिद्रूपें तें बोलिजे ॥ ९ ॥ आता स्वप्नस्थानीच्या ज्ञातता आणि अज्ञातता अनंत अशा चिद्रूपाने कशा प्रकाशित केल्या जातात, ते सांगतो. (३१०९) परी जागृतस्थानी ज्या निरोपिल्या । प्रति विषयी मार्गे पुढे दाटल्या । त्याहून विलक्षण कळल्या । पाहिजे येथींच्या ॥ १० ॥ पण जागतिस्थानी प्रत्येक विषयाच्या मागेपुढे त्या लागन असतात तशा त्या स्वप्नस्थानी नसतात. जागृतिस्थानातील ज्ञातता अज्ञातता या स्वप्नस्थानीच्या ज्ञातता अज्ञातता यांच्यापेक्षा भिन्न असतात हे कळले पाहिजे. (३११०) येथील विलक्षण का ह्मणसी । तरी जागरी प्रत्यक्षता विषयासी । तेथें उद्भव नसतां विकल्पासी । सामान्य वृत्ति पसरे ॥ ११ ॥ स्वप्नावस्थेत त्या भिन्न कशा असे म्हणशील तर त्याचे उत्तर असे की, जागृतीत विषय प्रत्यक्ष असतात. तेथे कोणताही विकल्प नसेल तेव्हा सामान्य वृत्तीचा विस्तार असतो. (३१११) तैसें स्वप्नस्थानीं नव्हे । विकल्प उठती जरी स्वभावें । तरीच विषयध्यासें दिसावें । ना तरी अभाव ॥ १२ ॥ तसे स्वप्नात नसते. स्वप्नात विकल्प स्वाभाविकपणे उठत असतील तरच ध्यासाने विषय भासवतात. जर विकल्प नसतील तर भासविषय दिसणार नाहीत. (३११२) मननरूपही विकल्पां आंत । ज्ञातता अज्ञातता ज्या असत । तेथें विकल्पची असे उमटत । ह्मणोनि सामान्यता नसे ॥ १३ ॥ आता मननरूपी विकल्पामध्ये ज्ञातता आणि अज्ञातता जेथे असायला पाहिजेत तेथे विकल्पच असतात. त्यावाचून मननात्मक पदार्थच उमटत नाहीत. म्हणून तेथे सामान्यतेला वावच नाही. (३११३) तस्मात् स्वप्नस्थानींच्या भिन्न । ज्ञातता अज्ञातता विलक्षण । त्याचि केवीं ऐकें सावधान । अभ्यासावया बोलूं ॥ १४ ॥ म्हणून स्वप्नस्थानीच्या ज्ञातता आणि अज्ञातता या जागतिस्थानच्या ज्ञातता अज्ञातता यांच्यापेक्षा वेगळ्या असतात. त्या कशा ते सांगतो. तू सावधान होऊन ऐक. त्यांचा अभ्यास कसा करायचा ते सांगतो. (३११४) जागृतीमाजील येखादा । अप्राप्त विषय जो सदा । जयाची प्रयत्नेही कदां । प्राप्ति नव्हे ॥ १५ ॥ जागृतीमधला आपल्याला प्राप्त न झालेला एखादा विषय असेल, तो कितीही प्रयत्न केले तरी प्राप्त होण्यासारखा नसेल; (३११५) तयाचा आठव मनन काळीं । जाहलिया चित्त उगें तळमळीं । तेव्हां दुश्चितपणा होय समूळीं । प्रयत्न न चलतां ॥ १६ ॥ मननकाळात त्याची आठवण झाली तर चित्तात उगीचच तळमळ वाढते, तेव्हा प्रयत्नांचा उपयोग होत नसल्यामुळे चित्तास दुश्चित्तता (भान हरवलेपणा) येते. (३११६) तया दुश्चितपणेकडून । मोडून जाय होणे जे आठवण । अनायासे विकल्पाचें भान । मावळून जाय ॥ १७ ॥ त्या दुश्चित्ततेमुळे जी आठवण होत असते ती नाहीशी होते. त्यामुळे अनायासेच विकल्पाचे भान मावळून जाते. (३११७) विकल्पची किमपी न होतां । उगीच नेणिवेनें होय स्तब्धता । तेचि जाणावी अज्ञातता विकल्पाभावीं ॥ १८ ॥ कोणताही विकल्प उत्पन्न न होता उगीच आलेल्या नेणिवेमळे सत्रता येते. विकल्प नसल्यामुळे तीच सामान्यता आहे हे ओळखावे. (३११८) ऐशियाही अज्ञाततेसी । सामान्य आत्माचि प्रकाशी । जीव उद्भवेना तया समयासी । विकल्प मोडतां ॥ १९ ॥ ही जी अज्ञातता आहे तिला सामान्य आत्माच प्रकाशित करत असतो. या अवस्थेत विकल्प मोडलेले असल्यामुळे जीवाची उत्पत्ती होत नसते. (३११९) कवणेही प्रकारेंकडून । सहजत्वे यावें दुश्चितपण । ते समयीं विकल्प जाय मोडून । नंतर सामान्यचि उरे ॥ २० ॥ कोणत्याही प्रकाराने अगदी सहजपणे अशी दुश्चित्तता यावी त्यावेळी विकल्प मोडून जातात, म्हणजे केवळ सामान्यच उरते. (३१२०) एवं अज्ञातता सामान्ये प्रकाशिली । हे साधका पाहिजे कळली । अज्ञातता चित्प्रकाशें व्यापिली । ते कळावया बोलूं ॥ २१ ॥ अशा प्रकाराने स्वप्नातील अज्ञातता सामान्याने प्रकाशित केली, हे साधकाला कळले पाहिजे. आता स्वप्नावस्थेतील ज्ञातता चित्प्रकाशाने कशी व्यापिली जाते, ते कळण्यासाठी सांगतो.(३१२१) जागरी अप्राप्त विषयाचा । परमार्थरूप की प्रपंचाचा । लाभ जो जाहला असेल साचा । तोचि मननीं आठवावा ॥ २२ ॥ जागृत अवस्थेत परमार्थातील अथवा प्रपंचातील एखाद्या विषयाचा जो लाभ झाला असेल तोच मननामध्ये आठवावा. (३१२२) तो आठवतांचि धन्यत्व वाटते । तेणें आनंदे चित्त सुखावतें । पहिले वृत्यात्मक जें असतें । तें वितुळते तत्क्षणीं ॥ २३ ॥ तो आठवल्याबरोबर धन्यता वाटते. त्या योगाने आनंद होऊन चित्त सुखावते. सुरुवातीला सुखाची वृत्ती असते पण ती लगेच मावळते. (३१२३) पुढे सुखाकारताचि उरे । विकल्पाचे स्फुरणचि मुरे । उगें सुखचि सुखपणे थारे । सहजगती ॥ २४ ॥ त्यानंतर केवळ सुखाकारताच उरते. विकल्पाचे स्फुरणही विरून जाते (मुरे-जिरे). केवळ सुखच सुखपणाने सहजरीत्या स्थिरावते. (३१२४) ऐसा जो हा उगेपणा । विषयानंदें तृप्त वासना । हेचि ज्ञाततेची लक्षणा । कळावी साधका ॥ २५ ॥ असा जो उगेपणा येतो तो म्हणजेच विषयानंदाने तृप्त झालेल्या वासनेमुळे आलेली स्थिती होय. हेच ज्ञाततेचे लक्षण होय. ती ज्ञातता साधकाला कळली पाहिजे. (३१२५) हाचि रविदत्ता विषयानंद । प्रसंगानुसार जाहला विशद । पुढे अनुक्रमें वासनानंद । आणि ब्रह्मानंद कळेल ॥ २६ ॥ रविदत्ता, यालाच विषयानंद म्हणतात. प्रसंगानुरोधाने तो स्पष्ट झाला. यानंतर पुढे वासनानंद आणि ब्रह्मानंद हे दोन्हीही कळतील. (३१२६) प्रस्तुत येथील जे ज्ञातता । विकल्पावीण जे स्तब्धता । जेथे जीवाची नसे वार्ता । ते प्रकाशिली सामान्यें ॥ २७ ॥ प्रस्तुत प्रसंगी विकल्प नसलेल्या अवस्थेमध्ये येणाऱ्या स्तब्धतेमुळे येणारी जी ज्ञातता, जिच्यामध्ये जीवाचे अस्तित्व नसते, ती चिद्रूपाच्या सामान्य प्रकाशाने प्रकाशित असते हे सांगायचे आहे. (३१२७) अज्ञातता आत्मा प्रकाशी । मा केवीं प्रकाशीना ज्ञाततेसी । तस्मात् जेथें अभाव विकल्पासी । तेथें सामान्य स्पष्ट ॥ २८ ॥ अज्ञातता ही आत्म्याने प्रकाशित केलेली असते, मग तो ज्ञाततेला का प्रकाशित करणार नाही? म्हणून जेथे विकल्प नसतील तेथे सामान्य स्पष्टच असते. (३१२८) परी साधके विकल्प स्थिर करावा । मग स्वप्रकाश येतसे स्वानुभवा । विकल्पाचा असतां गोवा । असून स्पष्ट नव्हे सामान्य ॥ २९ ॥ पण साधकाने प्रथम विकल्प स्थिर करावा, मग स्वप्रकाश (आत्म्याचा प्रकाश) अनुभवाला येईलच. पण जर विकल्पांचा गुंता उलगडलेला नसेल तर सामान्य असूनही स्पष्ट होणार नाही. (३१२९) ह्मणोनि संधीचिये समयीं । अथवा अज्ञाततेचे ठायीं । किंवा ज्ञाततेचिये नवाई । घेइजे स्वानुभव ॥ ३० ॥ म्हणून विकल्पांच्या संधीमध्ये, अथवा अज्ञाततेच्या अनुभवात, किंवा ज्ञाततेच्या नावीन्यात स्वानुभव घ्यावा. (३१३०) एवं कवण्याही प्रकारें । अभ्यासें विकल्प जरी सरे । तरीच सामान्य आविष्कारे । निजात्म प्रकाश ॥ ३१ ॥ अशात-हेने कोणत्याही प्रकाराने असो, केलेल्या अभ्यासाने जेव्हा विकल्प नष्ट होतात तेव्हाच स्वात्मरूपाचा सामान्य प्रकाश प्रकट होतो. (३१३१) तंव रविदत्त करीतसे विनंति । जी जी येक विरोध वाटे मजप्रती । पूर्वश्लोकीं ऐकिली उक्ति । की विकल्प तिन्ही स्थळी असे ॥ ३२ ॥ तेव्हा रविदत्ताने विनंती केली की, महाराज, मला येथे एक विरोध जाणवतो आहे. पूर्वीच्या श्लोकात असे म्हटले आहे की, विकल्प जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन्ही अवस्थात असतो. (३१३२) (पहा ओ. क्र. ३८३० ते ३८३९) जागृति स्वप्नीं विकल्प दिसे । आणि सुषुप्तीमाजीही स्फूर्तित्वे असे । प्रस्तुत निरूपण की नासे । जागर स्वप्नीं ॥ ३३ ॥ जागृती आणि स्वप्न या अवस्थांमध्ये विकल्प दिसतात आणि सुषुप्तीमध्येही ते स्फूर्तिरूपाने असतात. परंतु आता तुम्ही सांगत आहात की जागृती आणि स्वप्नामध्ये विकल्प नष्ट होतात. (३१३३) संधि किंवा ज्ञातता अज्ञातता । विकल्प हा मावळे त्या आंतोता । नुसधी सामान्य स्फूर्ति उरे तत्त्वतां । तेथें चिदात्मा प्रकाशे ॥ ३४ ॥ संधी किंवा ज्ञातता आणि अज्ञातता या अवस्थांमध्ये विकल्प मावळतो आणि केवळ सामान्य स्फूर्ती उरते तेथे चिद्रूप प्रकाशत असते. (३१३४) तेचि स्फूर्ति सुषुप्तींत असे । तेचि विकल्परूप बोलिलीसे । इचा अभाव तो अभ्यासें नसे । तरी सामान्य प्रकाशे केवीं ॥ ३५ ॥ तीच स्फूर्ती सुषुप्तीत असते. पण ती तेथे विकल्परूप असते असे म्हटले आहे. अभ्यासाने तिचा अभाव (नाश) होत नाही. मग सामान्य कसे प्रकाशित होईल? (३१३५) आणि सुषुप्तींत प्राज्ञ अभिमान । हेंचि की जीवत्वाचे लक्षण । तो जीव सहविकल्प आपण । असतां सामान्य प्रगटेना ॥ ३६ ॥ आणि सुषुप्तीत प्राज्ञ अभिमान असतो. पण हेच जीवत्वाचे लक्षण आहे. त्याचाच अर्थ तेथे विकल्पही असणारच. कारण जेथे जीव तेथे विकल्प असतातच. मग झोपेमध्ये सामान्य प्रकटणे अशक्यच होय. (३१३६) सुषुप्तींपर्यंत विकल्प व्यापला । तरी जागर स्वप्नीं केवीं जाय निमाला । हेंचि कैसे कळावें मजला । ह्मणून चरण धरी ॥ ३७ ॥ थेट सुषुप्तीपर्यंत विकल्प व्यापून असतात. असे असताना जागृती आणि स्वप्नामध्ये ते कसे नष्ट होतील? हेच कसे ते मला कळावेसे वाटते असे म्हणून रविदत्ताने स्वामींचे पाय धरले. (३१३७) तंव स्वामी ह्मणती ऐक बापा । पुरतें विचारून पाहों विकल्पा । सुषुप्तिकालीं असे ऐशिया जल्पा । अन्य प्रयोजन असे ॥ ३८ ॥ तेव्हा आचार्य स्वामी म्हणाले, “अरे रविदत्ता ऐक. आम्ही पूर्ण विचार करून सुषुप्तीत विकल्प असतो, असे सांगितले. त्यामागे एक कारण आहे. (३१३८) बुद्धीसहित सुषुप्तीआंत । विकल्पाचा होय घात । जीवही त्यासवें लय पावत । विशेषत्वें ॥ ३९ ॥ झोपेमध्ये बुद्धिसहित विकल्पाचा नाश होतो. त्यामुळे विशेषरूपाने असणारा जीवही त्याबरोबरच नष्ट होतो. (३१३९) नुसधी अंतःकरणाची स्फूर्ति । उठे निमे सुषुप्ति आंतौती । तयेसी न कळे स्वयंज्योति । ह्मणोनि भ्रांति कल्पिली ॥ ४० ॥ झोपेमध्ये फक्त अंतःकरणाची स्फूर्ती निर्माण होते आणि मावळते. तिला स्वयंप्रकाशी ब्रह्मात्मा कळत नाही, म्हणून जीवाच्या ठिकाणी भ्रांतीची कल्पना केली. (३१४०) जीव जो जागरी स्वप्नाआंत । देहभाव घेऊनियां बैसत । ते भ्रांति न फिटतां लय पावत । सुषुप्तिकाळीं ॥ ४१ ॥ जागृतीमध्ये आणि स्वप्नामध्ये जीव देहभाव घेऊन बसतो. झोपेत त्याची भ्रांती न फिटताच तो लय पावतो. (३१४१) उत्थान होतांचि मी देह ह्मणोनी । पुढे प्रवर्ते व्यापारालागूनी । यास्तव कल्पिला सुषुप्तिस्थानीं । कीं असे गुप्त ॥ ४२ ॥ झोपेमधून उठताच 'मी देह आहे' असे म्हणून व्यापाराला प्रवृत्त होतो. म्हणून अशी कल्पना केली की झोपेत जीव गुप्त असतो. (३१४२) नेणपणाचाचि अभिमान । तयासीच नांव हे प्राज्ञ । परी तेथें मीपणाचें स्फुरण । आणि आठवही नाहीं ॥ ४३ ॥ नेणतेपणाचा (अज्ञानाचा) अभिमान म्हणजेच प्राज्ञ अभिमान होय. पण तेथे मीपणाचे स्फुरणही नाही आणि स्मरणही नाही. (३१४३) तरी तेथे जीव हा कैसा । कोणते रूपें असे सहसा । पुढें उद्भवे यास्तव आहेसा । केला परी तेथें नाहीं ॥ ४४ ॥ मग तेथे जीव कसा असेल? त्याचे रूप तरी कसे असेल? तो जागृतीमध्ये पुन्हा उत्पन्न होतो म्हणून तो तेथे आहे अशी कल्पना केली, पण तो झोपेत नसतोच. (३१४४) काही दुजें वृत्तीसी दिसेना । ह्मण अज्ञान हे केली कल्पना । सर्वांचा अभावचि तेथें देखणा । कोण कोणा होय ॥ ४५ ॥ वृत्तीला दुसरे काही दिसत नाही म्हणून तेथे अज्ञान आहे अशी कल्पना केली. झोपेमध्ये सर्वच गोष्टींचा अभावच असतो. मग कोण कुणाला पहाणार? (३१४५) एक ब्रह्म आत्माचि परिपूर्ण । अस्ति भाति प्रियत्वे आपण । असे तो देखे प्रकाशघन । तया अज्ञानासी ॥ ४६ ॥ एक ब्रह्मात्मा अस्ति भाति प्रिय या लक्षणांनी परिपूर्ण असून तो संपूर्णपणे प्रकाशित असून तोच त्या अज्ञानाचाही जाणता आहे. (३१४६) तो स्फूर्तिचे अज्ञाना जाणे । आपुलिये सर्वज्ञपणे । तयासी कवणिया जडें जाणणे । जरी असतां बुद्ध्यादि ॥ ४७ ॥ तो आपण स्वतः सर्वज्ञ असल्यामुळे स्फूर्तीच्या अज्ञानाला जाणतो. त्याला कोणते जड तत्त्व जाणू शकेल? बुद्धी आदिकरून तत्त्वे असली तरी ती सर्व जड तत्त्वे आहेत. ती त्याला जाणू शकत नाहीत. (३१४७) जागृतींत विशेषासहित बुद्धि । असतां जाणेना आत्मया कधीं । मा सुषुप्तिकाळी मावळतां शुद्धि । घेईल केवीं आत्मयाची ॥ ४८ ॥ जागृतीत विशेष जीवासहित बुद्धी असूनसुद्धा ती आत्म्याला कधी जाणू शकत नाही. मग झोपेत तीच मावळली असताना ती आत्म्याचा शोध कसा घेऊ शकेल? (ती आत्म्यास कशी जाणेल?) (३१४८) जैशी सूर्याचे प्रकाशी । दिवटी लावितां उजळीना सूर्यासि । मा विझून गूल उरतां तयासी । भानु प्रकाशवे केवीं ॥ ४९ ॥ सूर्याच्या प्रकाशात दिवटी लावली तर सूर्याला प्रकाशू शकत नाही. मग विझल्यानंतर नसती काजळी उरली असताना तिला सर्याला प्रकाशित करणे कसे जमेल (३१४९) तैशी हे बुद्धि जागृतीमाजीं । आत्मया जाणेना सहजीं । तरी नुसधी वृत्ति आत्मत्वीं सतेजी । सुप्तींत केवीं जाणों शके ॥ ५० ॥ त्याप्रमाणे ही बुद्धी जीवासह असूनसुद्धा जागृतीमध्ये आत्म्याला सहजपणे जाणू शकत नाही, तर झोपेमध्ये केवळ एकटीच असलेली वृत्ती आत्म्याला कशी जाणू शकेल? (३१५०) गूल अथवा मशालीसी । अथवा आणीक नाना पदार्थांसी । सूर्य जैसा सहजत्वें प्रकाशी । निजप्रकाशें ॥ ५१ ॥ काजळी अथवा पेटती मशाल, अथवा इतर अनेक पदार्थ यांना सूर्य स्वप्रकाशाने सहज प्रकाशित करू शकतो. (३१५१) तैसें अंतःकरणाचें स्फुरण । आणि विशेषे बुद्ध्यादि मन । अथवा जीवादि विषयांचे दर्शन । आत्मा प्रकाशी निजतेजें ॥ ५२ ॥ त्याप्रमाणे अंतःकरणाचे स्फुरण, विशेषेकरून बुद्धी आणि मन किंवा जीव इ. विषय इ.ना आत्मा एकटाच स्वतःच्या तेजाने प्रकाशित करतो. (३१५२) येर हे असतां न जाणती । तरी जाणावें कवणे सुप्ती । म्हणून कल्पिली अज्ञानभ्रांति । परी नेणिवेसी जाणे आत्मा ॥ ५३ ॥ ये-हवी अंतःकरण, मन, बुद्धी, जीव, विषय इ. ही तत्वे जागृती स्वप्न या अवस्थांमध्ये असताही जड असल्यामुळे जाणू शकत नाहीत. मग झोपेच्या अवस्थेत यातील कोणते तत्त्व जाणू शकेल? कोणालाच जाणता येणार नाही. म्हणून त्यांच्या ठिकाणी अज्ञान आणि भ्रम आहेत अशी कल्पना करावी लागली. पण आत्मा मात्र नेणिवेलाही जाणत असतो. (३१५३) आत्मा नेणीव जाणत असतां । वाउगा कल्पी मी नेणता । तोचि प्राज्ञ अभिमानी तत्त्वतां । जीवही कल्पिला ॥ ५४ ॥ आत्मा नेणिवेला जाणत असतो पण उगीचच मला काही कळत नाही अशी खोटी कल्पना करत असतो. तोच प्राज्ञ अभिमानी जीव अशी कल्पना केली. (३१५४) परी सुप्तीत जीव ना अज्ञान । अमुक रूपाचें नसे जाण । मात्र देहउपाधीस्तव असे स्फुरण । तेही स्पष्ट नसे ॥ ५५ ॥ पण झोपेत जीवही नाही आणि अज्ञानही नाही. आणि त्यांना विशिष्ट रूपाचे ज्ञानही नाही. मात्र देहाच्या उपाधीमुळे स्फुरण असते पण तेही स्पष्ट नसते. (३१५५) जैसें देहाचें मढें पडे । प्राण वाउगा जडत्वें वावडे । तैसें अंतःकरणही असे जडें । उठे निमे प्राणासवें ॥ ५६ ॥ जसे झोपेत देहाचे प्रेत होऊन पडते आणि प्राणही जडत्वाने उगाच वावडत (फिरत) असतो. त्याचप्रमाणे अंतःकरणही जडच आहे. तेही प्राणाबरोबर उत्पन्न होते आणि लोप पावते. (३१५६) बुद्धि आणि जीवाचा अभाव । तरी कवणे आहेसा कल्पावा सुसमुदाव । तस्मात् देह प्राणस्फूर्तीचाही भाव । आहे तैसा नाही ॥ ५७ ॥ झोपेत बुद्धी आणि जीवाचा अभाव असतो. ही मुख्यतः तत्त्वेच नसल्यामुळे सगळी बत्तीस तत्त्वे झोपेत असतात अशी कल्पना कोणी आणि कशी करायची? त्यामुळे देह आणि प्राण व स्फूर्ती ही असूनही नसल्यासारखीच असतात. (३१५७) तस्मात् रविदत्ता विकल्पाचा । सुप्तींत अभाव असे साचा । अज्ञानादि आहे म्हणणे वाचा । हा प्रकार भिन्न ॥ ५८ ॥ म्हणून रविदत्ता, झोपेत विकल्पाचा अभाव आहे, असे म्हटले. आता झोपेत अज्ञानादी आहेत असे म्हणणे हा वेगळा प्रकार आहे. (३१५८) जागृतींत नसतां आत्मज्ञान । अन्यथा घेतला देहाभिमान । सुप्तींत विकल्प जातांही मोडून । अज्ञान न फिटे ॥ ५९ ॥ जागृतीत आत्मज्ञान नसल्यामुळे खोटा देहाभिमान घेतला. झोपेत सर्व विकल्प नष्ट झाले असताही अज्ञान काही फिटत नाही. (३१५९) जागरी येतांचि मी हा काळ । कांही जाणिलें नसतां अळुमाळ । ऐसें नेणपणे अभिमाने बळें । आरोपि उठलिया । ॥ ६० ॥ कारण त्यानंतर जागृतीत येताच 'मी एवढा काळ थोडेसुद्धा जाणू शकलो नाही' अशा प्रकारचा नेणतेपणाच्या अभिमानाचा आरोप स्वतःवर बळेच लादून घेतो. (३१६०) अरे हे जागृतींतचि कल्पिलें होतें । की मी हे जाणतसें समस्ते । तेणें तादात्म्ये सुषुप्ती आंतौतें । मी नेणता कल्पी ॥ ६१ ॥ याचे कारण जागृतीत असतानाच 'मला हे सगळे कळते' अशी त्याने कल्पना करून घेतलेली असते. त्या अभिमानाशी तादात्म्य पावल्यामुळे झोपेत मला काही कळले नाही' अशी कल्पना तो करून घेतो. (३१६१) परी विचारें पाहतां जागृतींत । जीवही परप्रकाशें वर्तत । स्वतां प्रकाशावया समर्थ । आभासा रूप कैंचें ? ॥ ६२ ॥ पण विचार करून पाहिले असता जागृतीत जीव देखील परप्रकाशानेच रहात असतो. जर तो स्वतः प्रकाशित करण्यास समर्थ असता तर त्याला आभासरूप कसे प्राप्त झाले असते? (तो स्वतःच दुसऱ्याचे आभासरूप प्रतिबिंब म्हणून कसा वावरला असता?) (३१६२) सर्व आत्मप्रकाशाचे बळ । मागे पुढे दाटलें सकळ । मध्ये बुद्धिस्थ जीवाची झळझळ । अल्पशी दर्पणस्थापरी ॥ ६३ ॥ वास्तविक पाहता हे सर्व आत्मप्रकाशाचे सामर्थ्य आहे. ते मागेपुढे सर्वत्र दाटून राहिले आहे. मधेच बुद्धीत प्रतिबिंबरूपाने राहणाऱ्या जीवाची, आरशातील प्रतिबिंबाच्या कवडशाच्या झळझळीसारखी किंचितशी झळझळ जाणवते इतकेच. (३१६३) इतुकेने म्हणे मी जाणिले । आत्मप्रकाशासी विसरले । तेणेचि विकल्प जरी मावळून गेले । परी कल्पीतसे सुप्ति ॥ ६४ ॥ तेवढ्या झळझळीच्या जोरावर 'मला सगळे कळले', असे म्हणून आत्मप्रकाशाला विसरला. त्यामुळे झोपेत जरी विकल्प मावळले तरी त्यांची तो कल्पना करतो. (३१६४) तस्मात् जो कोणी साधक खरा । जागरी पाहे विचारद्वारा । की आद्यंत सामान्य आत्मा सारा । निजप्रकाशें प्रकाशी ॥ ६५ ॥ म्हणून जो कोणी खरा साधक असेल तो जागृतीतच विचारांच्या साहाय्याने पाहतो की सर्वत्र आदिअंती सामान्य आत्माच स्वप्रकाशाने प्रकाशित करत असतो. (३१६५) मध्ये जीवाचे रूप केतुलें । तेंही सामान्यास्तव उमटलें । तें नाहींच ऐसें बोधा आलें । जया साधकासी ॥ ६६ ॥ मध्ये जीव भासतो खरा, पण त्याचे रूप केवढे असते? आणि जे आहे असे भासते तेही त्या सामान्य प्रकाशामुळेच उमटलेले असते. खरे तर ते नाहीच असे ज्या साधकाला कळते (ज्ञान होते); (३१६६) यथार्थ सामान्य ज्ञान होतां । अज्ञानासह मरे अहंता । तयासी झोंपही जरी लागतां । नेणीव ना अभिमान ॥ ६७ ॥ असे सामान्याचे यथार्थ ज्ञान होताच त्याचा अहंकार अज्ञानाबरोबरच नाहीसा होतो. त्या साधकाला झोप जरी लागली तरी त्याला ना अज्ञान असते ना अभिमान असतो. (३१६७) आत्माचि येक परिपूर्ण । अद्वैतरूप सच्चिद्घन । कैंचा देह प्राण अंतःकरण । अविद्या आणि जीव ॥ ६८ ॥ त्याच्या दृष्टीने केवळ एक आत्माच असतो. तो परिपूर्ण, अद्वय, सच्चिद्घन असा असतो. त्याच्या पुढे देह कोठला. प्राण कोठले, अंतःकरण, अविद्या आणि जीव हे तरी कोठले? ही सर्व तत्त्वे त्याच्या दृष्टीने नाहीतच. (३१६८) जागरी असतांचि हे नाहीं होती । जैशी मृगजळाची भरती । सुप्तींत तो अभावचि निश्चितीं । तरी आहे कल्पी कवण ॥ ६९ ॥ जागृतीच्या अवस्थेत असतानाच हे सर्व मृगजळाच्या भरतीप्रमाणे त्याच्या दृष्टीने सत्य नव्हतेच. झोपेत सुषुप्तीच्या अवस्थेत या सर्वांचा निश्चितपणे अभावच असतो. तेथे ती तत्त्वे आहेत अशी कल्पना तरी कोण करील? (३१६९) मृगजळ जया ठाईं पडिलें । तेथें तृणही नाहीं भिजलें । ना नाहीं तेथें कोरडे जाहलें । बोलावें नलगे ॥ ७० ॥ मृगजळ ज्या ठिकाणी पडले तेथील गवतसुद्धा भिजले नाही. मग ते कोरडे झाले, असे बोलण्याची आवश्यकताच नाही. (३१७०) तैसें जागरों की स्वप्नाआंत । प्रिकल्प असतां मिथ्याभूत । तरी आहेसा सुप्तींत संकेत । कवगणा करी ॥ ७१ ॥ त्याप्रमाणे जागृतीत असो की स्वप्नामध्ये विकल्प हे मिथ्या असतील तर सुषुप्तीत ते सत्य आहेत असे कोण म्हणेल? (३१७१) तस्मात् रविदत्ता सुषुप्तीमाजीं । अथवा उगेपणी सहजीं । विकल्पता नसे दुजी । पहावी विचारें ॥ ७२ ॥ तेव्हा रविदत्ता. झोपेमध्ये अथवा सहज येणाऱ्या उगेपणामध्ये एक ब्रह्मात्मतत्त्व सर्वत्र व्यापून राहिले असताना विकल्पांचे द्वैत नसतेच (विकल्परूपाने दुसरा पदार्थ नसतोच) हे विचार करून पहावे. (३१७२) मध्ये जितुका विकल्प उठत । तितुक्यामध्ये सामान्य आच्छादित । तितुकें टाकितां जें सदोदित । मागे पुढे चिद्रूप ॥ ७३ ॥ सर्व बाजूंनी ब्रह्मात्मत्वच व्यापलेले असताना, मध्येच जेवढ्या भागात विकल्प उठतो तेवढ्या भागात सामान्य आच्छादित होते. तेवढा भाग सोडला तर मागेपुढे सर्वत्र चिद्रूपच असते. (३१७३) अथवा स्फूर्ति नुसधी असतां । तयासी कल्पिली विकल्परूपता । तरी तेथे जीवेंविण ऐता । सामान्य प्रकाश ॥ ७४ ॥ किंवा केवळ नुसती स्फूर्तीच उठली असताना तिलाच विकल्परूप अशी कल्पना केली तरी तिथे जीवाची उत्पत्ती झालेली नसल्याने ती सामान्य प्रकाशानेच प्रकाशित झालेली असते. (३१७४) विशेषे बुद्धि जेव्हां उठे । तेव्हां जीवत्वही त्यांत उमटे । तया विकल्पामाजीं गोमटें । आच्छादे सामान्य ॥ ७५ ॥ पण तिच्यात विशेष बुद्धी जेव्हा उमटते तेव्हाच तिथे जीवत्वही प्रकट होते. मग त्या विकल्पांनी मात्र सामान्य झाकले जाते. (३१७५) जैशी दर्पणाची झळझळ । पडिली असे जितुकें स्थळ । तितुकें स्थळींचे सामान्य केवळ । विशेषत्वें आच्छादी ॥ ७६ ॥ आरशातील प्रतिबिंबाची झळझळ भिंतीच्या जेवढ्या भागावर पडलेली असते तेवढ्या भागापुरता सामान्य प्रकाश त्या झळझळीच्या विशेष प्रकाशाने आच्छादिला जातो, तसाच हा प्रकार आहे. (३१७६) येर भिंती जे प्रकाशिली । ते गगन सूर्याची प्रभा पडिली । तैसी विकल्पाविरहित सामान्यता संचली । ते आत्मप्रकाशें प्रकाशित ॥ ७७ ॥ या झळझळीव्यतिरिक्त बाकीची जी प्रकाशित झालेली भिंत असते, ती आकाशातील खऱ्या सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झालेली असते. त्याप्रमाणे विकल्परहित स्थितीमध्ये सामान्यताच व्यापून राहिलेली असते. ती आत्मप्रकाशानेच प्रकाशित झालेली असते. (३१७७) जरी स्फूर्ति ते उठतसे । अंतरांतून विषयांत आदळतसे । परी बुद्धि विशेषत्व जरी नसे । तरी केवीं उमसे जीवित्व ॥ ७८ ॥ स्फूर्ती जरी उत्पन्न झाली आणि आतल्या आत विषयात जाऊन आदळली तरी तिच्यात विशेष बुद्धी नसल्यामुळे तेथे जीवत्व कसे उमटेल? (३१७८) ह्मणोनि निर्विकल्प जे वृत्ति । सामान्य विकल्पा आदि अंती । उगेपणी किंवा सुषुप्ति । ते प्रकाशी आत्मतेजें ॥ ७९ ॥ म्हणून निर्विकल्प वृत्तीसुद्धा सामान्यत्वानेच आदी आणि अंती व्यापिलेली असते. उगेपणा किंवा सुषुप्तीही सामान्य तेजानेच म्हणजेच आत्मतेजानेच प्रकाशित असते. (३१७९) येथेही जरी शंका मानिसी । की वृत्ति तेथें उभवणे जीवासी । दर्पण तेथे प्रतिबिंबासी । दिसणे असे ॥ ८० ॥ येथे जर तुला शंका वाटली की जेथे वृत्ती असते तेथे जीवत्व उमटायला पाहिजे. जेथे आरसा आहे तेथे प्रतिबिंब उमटणारच. (३१८०) जरी बुद्धि विशेषे उद्भवेना । परी वृत्ति आरसा तो असे जाणा । तरी जीवत्व प्रतिबिंब उमटेना । कैसें तरी अवधारीं ॥ ८१ ॥ जर बुद्धी विशेषत्वाने उत्पन्न झाली नाही तर वृत्ती हा तेथे आरसा आहे असे मानले तर तिथे जीवरूप प्रतिबिंब उमटत नाही. कसे ते ऐक. (३१८१) दर्पणी प्रतिबिंब तों पडिले । परी उष्णामाजी उष्णीं (उष्णचि ?) मिळालें । छायेमाजीं जैसें दिसलें । तैसें वेगळे दिसेना ॥ ८२ ॥ आरशात सूर्याचे प्रतिबिंब पडले हे खरे आहे. पण ते प्रतिबिंब म्हणजे उन्हातच उन्हे मिसळून गेले तर ते कसे दिसेल? सावलीत ते टळटळीतपणे जसे दिसते तसे ते दिसणार नाही. ते वेगळेपणाने ओळखता येणार नाही. (३१८२) ऐशियापरी वृत्तीआंत । सामान्य जीव प्रतिबिंबित । परी विशेषाविण टळटळित । सामान्य प्रकाशे ॥ ८३ ॥ त्याप्रमाणे वृत्तीमध्ये सामान्य जीवाचे प्रतिबिंब जरी उमटले तरी विशेष बुद्धीच्या अभावी ते सामान्य प्रकाशानेच प्रकाशित होणार. त्यातच ते मिसळून जाणार. (३१८३) तेव्हां जीवाचें जें स्फुरवणें । सामान्यांत जाय मिसळून । जैसें विशेषीं दिसे जे भिन्नपण । तैसें आदि अंती नसे ॥ ८४ ॥ तेव्हा जीव जे स्फुरवितो ते सामान्यात मिसळून जाते. विशेष स्फुरणामध्ये जसे भिन्नपण स्पष्ट दिसते, तसे स्फुरणाच्या आद्यस्थानी आणि अन्त्यस्थानी ते भिन्नपणे दिसत नाही. (३१८४) जरी जीवत्व वृत्तीस्तव असे । परी सामान्यामाजी लोपतसे । नुसधा चित्प्रकाश येतसे । प्रत्यया विकल्पाभावीं ॥ ८५ ॥ जरी वृत्तीमध्ये जीवत्व असले तरी ते सामान्यामध्ये लोप पावते. तेथे विकल्प नसल्यामुळे फक्त चित्प्रकाशाचाच अनुभव येतो. (३१८५) ब्रह्मात्मत्व जाणावयालागीं । वृत्तीसी अपेक्षा असे अंगी । हे पुढे बोलिजेल प्रसंगी । परी जीवाची अपेक्षा नको ॥ ८६ ॥ ब्रह्मात्मत्व जाणावयाचे असेल तर वृत्तीची अपेक्षा असते. परंतु जीवाची अपेक्षा नाही. हे पुढे प्रसंगानुसार सांगितले जाईलच. (३१८६) ह्मणोनि संधि साधवयाचा । अभ्यास बोलिला हा साचा । कीं विकल्पाभावी जीवत्वाचा । अभाव होतसे ॥ ८७ ॥ म्हणूनच संधी साधावयाचा हा अभ्यास येथे सांगितला. कारण विकल्प नसल्यामुळे तेथे जीवत्वाचाही अभाव असतो. (३१८७) मध्य संधीसी सामान्य प्रकाश । प्रत्यया येतसे अविनाश । प्रसंगें ज्ञातता अज्ञातता विशेष । नसतां त्याही स्पष्ट केल्या ॥ ८८ ॥ मध्य संधीमध्ये अविनाशी सामान्य प्रकाशाचा अनुभव येतो. तसेच प्रसंगाच्या ओघात विशेष नसताना ज्या अज्ञातता आणि ज्ञातता अनुभवास येतात त्याही स्पष्ट केल्या. (३१८८) जागरी किंवा स्वप्नस्थानीं । नेत्र झांकिता किंवा उघडोनी । अभ्यासी जो साधक अनुदिनीं । बोलिल्या रीती संधि ॥ ८९ ॥ जागृतीमध्ये अथवा स्वप्नात डोळे मिटन किंवा उघडे ठेवून जो साधक सांगितलेल्या पद्धतीने रात्रंदिवस संधींचा अभ्यास करील (त्याला पुढीलप्रमाणे फलप्राप्ती होईल.) (३१८९) प्रत्यक्ष विषयाहून विषयांतर । जातां मध्यसंधींत निरंतर । अथवा विकल्पामागे पुढे प्रकार । ज्ञातता अज्ञाततेचा ॥ ९० ॥ प्रत्यक्ष दिसणाऱ्या एका विषयाहन दसऱ्या विषयावर जाताना मध्यसंधीचे अवलोकन करावे, अथवा विकल्पाच्या आगेमागे अज्ञातता आणि ज्ञाततेचा अनुभव घ्यावा. (३१९०) ऐशियामाजी आत्मप्रकाश । कळू येतसे अविनाश । आणि अंतरींचे विकल्प जे अशेष । त्यांहीमध्ये सामान्य ॥ ९१ ॥ या दोन्ही प्रकारांत अविनाशी अशा आत्मप्रकाशाचे ज्ञान होते. मनातील सर्व विकल्प जसजसे क्षीण होत जातील, तसतसा सामान्याचा टळटळीत (अगदी स्पष्ट) असा अनुभव घ्यावा. (३१९१) तेथेही ज्ञातता अज्ञातता । निरोपिल्या त्या साधाव्या तत्त्वतां । अभ्यासबळे सामान्या टळटळितां । घेईजे स्वानुभवें ॥ ९२ ॥ तेथेही ज्ञातता आणि अज्ञातता सांगितल्याप्रमाणे साध्य कराव्यात. अभ्यासाच्या साहाय्याने सामान्य प्रकाशाचा स्पष्ट अनुभव घ्यावा. (३१९२) ऐशिया अभ्यासें ह्मणसी । कोणती प्राप्ति साधकासी । तरी क्षीणता होतां विकल्पासी । आत्मप्रकाशी समरसे ॥ ९३ ॥ अशा अभ्यासाने साधकाला कोणती प्राप्ती होते. असे विचारशील तर सांगतो. विकल्प जसजसे क्षीण होत जातील तसतसे आत्मप्रकाशाशी समरस होता येईल. (३१९३) जैसा जैसा विकल्प क्षीण । तैसा तैसा सामान्य प्रकाशमान । जों जो सामान्य दुणावे आपण । तो तो विकल्प मोडे ॥ ९४ ॥ जसजसे विकल्प क्षीण होत जातील तसतसे सामान्य प्रकाशमान होत जाईल. जसजसा सामान्य प्रकाश दुप्पट होत जाईल (वाढत जाईल) तसतसे विकल्प कमी होत जातील. (३१९४) ऐसा चिरकाळ अभ्यास होता । जो मागें उगेपणा बोलिला तत्त्वतां । तो समाधियोग बाणे अवचिता । विकल्प जातां निपटूनी ॥ ९५ ॥ असा अभ्यास जेव्हा बराच काळपर्यंत होत राहील तेव्हा सर्व विकल्प पूर्णपणे लोपल्यानंतर मागे जी उगेपणारूप समाधी सांगितली ती एकदम अंगी बाणेल.(३१९५) विकल्पाचे उठणे राहावें । नुसधे वृत्तीचे स्फुरण उरावें । हेंचि समाधींचे लक्षण जाणावें । राजयोगियासी ॥ ९६ ॥ विकल्प उठण्याचे थांबावे, फक्त वृत्तीचे स्फुरण उरावे. राजयोगाचा अभ्यास करणाराने हेच समाधीचे लक्षण जाणून घ्यावे. (३१९६) परी विकल्प सर्व मोडून जावा । उगेपणा चिरकाळ व्हावा । तरीच पाविजे ब्रह्मानुभावा । अखंडैकरसीं ॥ ९७ ॥ परंतु विकल्प पूर्णपणे नाहीसे व्हावेत, उगेपणाची अवस्था चिरकाळ टिकावी, तेव्हाच अखंडैकरस असा ब्रह्मानुभव प्राप्त होईल. (३१९७) ऐसें ऐकोनियां रविदत्त । नमस्कारोनि आदरें विनवीत । जी जी विकल्प तो अनिर्वा अत्यंत । क्षीण होय कैसा ॥ ९८ ॥ हे ऐकून रविदत्ताने आदरपर्वक नमस्कार करून विनंती केली. "महाराज, विकल्प तर अतिशय अनिवार्य आहेत. ते क्षीण कसे होतील? (३१९८) बळे धरितां अधिकचि उठे । रोधितां भलते प्रकारें उमटे । पाणी जैसें न बांधवे मोटे । तैसें वाटे दुष्कर ॥ ९९ ॥ बळजबरी करून पकडून ठेवावेत तर ते अधिक जोमाने उठतात, त्यांना थोपवून धरायला जावे तर भलत्याच प्रकाराने ते उमटतात. पाणी ज्याप्रमाणे मोटेत बांधता येत नाही, तसे हे विकल्प नष्ट करणे कठीण काम आहे. (३१९९) कोणीकडून कव घालावी । कवणे स्थळी स्थिर करावी । वायूची झुळुक केवीं आवरावी । तेवींच हा विकल्प ॥ ३२०० ॥ त्यांना कोणत्या बाजूने विळखा (कव) घालावा? कोणत्या बाजूने त्यांना थोपवून धरावे? वाऱ्याची झुळूक कशी आवरून धरावी? तसे हे विकल्प आहेत. (३२००) तरी हा विकल्प कैसा निरसे । कैसा उगेपणा होतसे । की जेणें पाविजे अखंडैकरसें । स्वानुभवासी ॥ १ ॥ तर विकल्पांचे निरसन कसे करावे? उगेपणा कसा प्राप्त होईल? आणि त्यायोगे अखंडैकरस असा स्वानुभव कसा प्राप्त होईल? (३२०१) सुषुप्तींत आपैसा होय । विकल्प अवघाचि मावळून जाय । परी तो स्वानुभवाचे उपेगा नये । तस्मात् स्थिरत्व व्हावें जागरी ॥ २ ॥ सुषप्तीत विकल्प सर्वच्या सर्व आपोआपच मावळून जातात. परंतु त्याचा स्वानुभवाला काही उपयोग नाही. त्यासाठी ते जागृतीत असायला हवेत व स्थिर व्हायला हवेत. (३२०२) ऐशी कृपा करावी स्वामी । निःशेष द्वैताच नुरे ऊर्मी । जेणें अखंडैक निज धामीं । समरस होय ॥ ३ ॥ स्वामी महाराज, माझ्यावर अशी कृपा करावी की, द्वैताची ऊर्मी अजिबात उठता कामा नये. त्यायोगाने मला अखंड अशा निजस्वरूपात समरस होता येईल. (३२०३) ऐसें प्राधून चरण धरी । वारंवार प्रदक्षणा करी । ऐसें पाहूनियां ते अवसरीं । स्वामी बोलती सकृ ॥ ४ ॥ अशी प्रार्थना करून त्याने गुरुवर्यांचे पाय धरले. वारंवार प्रदक्षिणा घातल्या. स्वामींनी हे पाहिल्यानंतर कपावंत होऊन ते त्याला म्हणाले. (३२०४) ह्मणती सखया अवधारावें । अभ्यासा कांही दुष्कर नव्हे । परी हळूहळू संपदावें । आणि निरसावें बाधक ॥ ५ ॥ अरे रविदत्ता लक्ष देऊन ऐक. अभ्यासाला काही कठीण नाही. पण जे प्राप्त करून घ्यायचे ते हळूहळू प्राप्त करून घ्यावे. प्रथम बाधक अडचणींचे निरसन करावे. (३२०५) तेचि कैशी ये श्लोकीं । अभ्यासाची स्थिति निकी । साधिली पाहिजे साधकीं । तेचि अवधारी ॥ ६ ॥ पुढील श्लोकात अभ्यासाची योग्य रीत सांगितली आहे. ती साधकाने साध्य करून घ्यावी तेच आता ऐक. (३२०६) |