॥ श्रीहंसराज स्वामी कृत ॥

॥ लघुवाक्यवृत्ति ॥


श्लोक क्र. ५ वा

॥ श्रीरामसमर्थ ॥

श्लोक : जागरेपि धियस्तू्णीं भाव: शुद्धेन भास्यते ॥ ५ ॥ (पूर्वार्ध)
अर्थ: जागत अवस्थेतही बुद्धीची मूलभूत अविकारी वृत्ती शुद्ध चैतन्याकडून (कूटस्थाकडून) प्रकाशित होते. । । ५ । । (पूर्वार्ध)

जागति कालींही उगें असतां । गुणादि विकार किंचित नसता ।
आत्मस्वरूप सामान्यता । शुद्धभावें भासे ॥ ३८ ॥
जागृतीच्या काळातही उगीच स्वस्थ बसले असता, गुणादी काहीही विकार नसता आत्मस्वरूप शुद्ध चैतन्याकडून (कूटस्थाकडून) प्रकाशित होते. (९३८)

परी गुणाचे विकार समजावे । जे किमपि जेथें नसावे ।
तरीच उगेपणाचें रूप फावे । उदासवृत्ति नामे ॥ ३९ ॥
परंतु प्रथम गुणांचे विकार समजून घेतले पाहिजेत. ते मनात अजिबात नसले पाहिजेत. तसे असेल तरच उदासवृत्ती या नावाने ओळखले जाणारे उगेपणाचे स्वरूप समजून येईल. (९३९)

सत्व रज तम तिन्ही गुण । यांचें अंतःकरर्णी आरोहण ।
होतां भाव होतीं भिन्न भिन्न । येकल्या वृत्तीली ॥ ४० ॥
सत्त्व, रज आणि तम हे ते तीन गुण होत. यांनी अंतःकरणाचा ताबा घेतला की एकाच वृत्तीचे भिन्न भिन्न भाव होतात. (९४०)

परी येळे येतां दोन जाती । तिहीची येकत्र नसे वस्ती ।
जेवी दोन खालीं येक वरती । कांटे सराटियाचे ॥ ४१ ॥
परंतु एका गुणाचे प्राबल्य होताच बाकीचे दोन गुण नाहीसे होतात. तिन्ही गुण एकाच (सामान्य) ठिकाणी एकत्र वसती कधीच करत नाहीत. सराव्याचे काटे पाहिले तर त्यांची रचना दोन काटे खाली असतात आणि एक काटा वरती जातो. तशीच स्थिती गुणांची असते. (९४१)

तेवीं सत्वगुण उद्धवता । रजतमा तळवटी खालूता ।
रजचि जेव्हां उद्या येतां । तम सत्वा उठो नेदी ॥ ४२ ॥
सत्त्वगुणाचा उदय झालेला असतो त्यावेळी रज आणि तम हे गुण तळाशी असतात. आणि जेव्हा रजोगुण उदय पावतो त्यावेळी तो तम आणि सत्त्वांना वर उतू देत नाही. (९४२)

तम जेव्हां येतां उदया । उद्भवू नेदी या उभयां ।
ऐसे गुणाचे स्वभाव वृत्तीचिया । ठायीं असती ॥ ४३ ॥
जेव्हा तमोगुणाचा उदय होतो तेव्हा रजोगुण आणि सत्त्वगुण या गुणांना डोके वर काढू देत नाही. या गुणांचे स्वभावधर्म वृत्तींमध्ये उतरतात. (९४३)

तया तिहींचे स्वभाव तीन । भिन्न भिन्न तिही लक्षण ।
घोर मूळ शांत विचक्षण । विवंचून पाहती ॥ ४४ ॥
त्या तीन गुणांचे भिन्न भिन्न स्वभाव तीन प्रकारचे असतात. त्यांची लक्षणे भिन्न भिन्न प्रकारची असतात. घोर वृत्ती, मूढ वृत्ती आणि शांतवृत्ती. विचक्षण त्यांचे विवेचन करतात. (९४४)

घोर ह्मणजे रजाची वृत्ति । मूळ तेचि तभाची गति ।
सत्वगुणाची असे शांति । परी विकाररूपें ॥ ४५ ॥
घोरवृत्ती ही रजोगुणाची वृत्ती होय. मूढवृत्ती ही तमोगुणाची वृत्ती होय. सत्त्वगुणाची शांतवृत्ती असते. पण त्या विकारक्षम असतात. (९४५)

त्यांत घोरवृत्तीचे विकार । बोलिजताति सविस्तर ।
येणेचि जन्ममरण वेरझार । जीवाची न चुके ॥ ४६ ॥
त्यापैकी घोरवृत्तीचे विकार आता सविस्तर सांगू या गुणामुळेच जीवाचे जन्ममरण असे हेलपाटे चुकत नाहीत. (९४६)

अमुक पदार्थ मज असावा । अप्रात तो प्रास व्हावा ।
दृष्ट श्रुत तो य साधावा । या इच्छा नावी काम ॥ ४७ ॥
अमुक पदार्थ माझ्याकडे असायला पाहिजे. अमुक वस्तू मला मिळालेली नाही, ती मिळावी; अमुक पदार्थ पाहिला की तो हवासा वाटला की तो प्रयत्नपूर्वक मिळवावा; किंवा एखादी वस्तू ऐकली की ती मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत. या इच्छेला काम म्हणतात. (९४७)

त्यासी प्रतिबंध जेणे केला । मग तो असो थोर धाकुला ।
परी तो वैरी वधीन पहिला । या नांव क्रोध ॥ ४८ ॥
त्या इच्छेला जो कोणी विरोध करील त्याचा, तो थोर असो की लहान, मी त्या वैऱ्याचा अगोदर वधच करीन. या भावनेला क्रोध म्हणतात. (९४८)

प्रारडधे प्रास जे जे विषय । यांचा कधींही न व्हावा क्षय ।
अति आवडीने करी संचय । या नांव लोभ ॥ ४९ ॥
प्रारब्धाने जे जे विषय उपभोगण्यासाठी मिळाले आहेत यांचा कधीही क्षय होऊ नये, म्हणून त्यांचा अतिशय हव्यास धरून संग्रह करणे याला लोभ म्हणतात. (९४९)

ऐसे हे काम क्रोध लोभ तिन्ही । जीवासी व्याघचि अविद्यारानीं ।
ब घोळसून जन्ममरणीं । कल्पांत बंधनीं घालिती ॥ ५० ॥
असे हे काम, क्रोध आणि लोभ हे जीवासाठी अज्ञानरूपी अरण्यातील वाघच होत. ते जीवाला जन्ममरणाच्या संसारात घोळसून शेवटी कल्पान्तापर्यंत बंधनात घालतात. (९५०)

कांहीं न सुचावे तो मोहो । बहु संशय तो संदेहो ।
वचनें न मानी तो दुराग्रही । निग्रह ही घोरवृत्ती ॥ ५१ ॥
काहीच कल्पना न सुचणे याला मोह (मूढता) म्हणतात. खूप संशयी स्वभाव असणे याला संदेह म्हणतात. थोरांचा सल्ला न मानणे याला दुराग्रह म्हणतात. आणि आपला हट्ट न सोडणे याला निग्रह म्हणतात. ही सर्व घोरवृत्तीची लक्षणे होत. (९५१)

दंभ तोचि जर्नी दाखवावा । आपुला चांगुलपणा मद जाणावा ।
मत्सर द्वेष साभिमान ध्यावा । हेही घोर वृत्ति ॥ ५२ ॥
दंभ म्हणजे वरवरचे सौजन्य दाखवून लोकांची दिशाभूल करणे, आपला चांगुलपणा (सुस्थिती, वैभव) यांचा गर्व बाळगणे हा मद होय. मत्सर करणे, द्वेष बाळगणे, अभिमान वाटणे, ही देखील घोरवृत्तीचीच लक्षणे होत. (९५२)

स्वजनाचा कळवळा ते प्रीति । क्रीडा विहार विषयासक्ति ।
नटनाट्यादि आवडती । हेही वृत्ति घोर ॥ ५३ ॥
स्वजनांबद्दल कळवळा असणे ही प्रीती; क्रीडा, विहार यांची आवड ही विषयासक्ती; नट, त्यांची नाटके यांची आवड असणे, ही सर्व घोर वृत्तीच होय. (९५३)

कामना असूया तिरस्कार । फलाविषयीं बहु आदर ।
प्रपंचाविषयीं बहु सादर । हेही घोर वृत्ति ॥ ५४ ॥
कामना, द्वेषभावना, तिरस्कार, फलाभिलाषा, प्रपंचाबद्दलचा आदर, हीही घोरवृत्तीच होय. (९५४)

भय लज्जा निंदा प्रयत्न । शोक साक्षेप कृतध्न ।
आर्जव मैत्री बहुभाषण । हेही घोरवृत्ति ॥ ५५ ॥
भय, लज्जा. निंदा, प्रयत्न, शोक, प्रयत्नांवरील श्रद्धा म्हणजे साक्षेप, इतरांचे उपकार विसरणे म्हणजे कृतघ्नता, अजीजी करणे म्हणजे आर्जव, मित्रांचे प्रेम, खूप बोलणे, ही देखील घोरवृत्तीच होय. (९५५)

ऐसें कोठवरी बोलावे । प्रपंचाचे लक्षण बरवे ।
दान कर्म धर्म ही आघवे । रजोगुणी घोरवृत्ति ॥ ५६ ॥
असे किती सांगावे ? ही सर्व प्रपंचाची लक्षणे आहेत. त्यात दान, कर्म, धर्म अशी काही चांगली लक्षणेही आलीच ! ही सर्व घोरवृत्ती रजोगुणीच आहे. (९५६)

आतां तमोगुण तो निरर्थक । प्रपंच ना परमार्थ ना लौकिक ।
वृधामात्र आयुष्याचा घातक । मूढवृत्ति ॥ ५७ ॥
' आता तमोगुण आहे, तो निरर्थक आहे. त्याची मूढवृत्ती आहे. त्यामध्ये ना प्रपंच, ना परमार्थ, ना लौकिक. तमोगुण व्यर्थ असून तो आयुष्याचा घात करणारा आहे. (९५७)

सदो आळस असावा । असावधता प्रमाद जाणावा ।
किंवा काळ निद्रेत जावा । हे मूढवृत्ति ॥ ५८ ॥
नेहमी आळसात राहावे, बेसावधपणाचा प्रमाद करत जावा किंवा निद्रेतच काळ घालावा, ही मूढवृत्ती होय. (९५८)

सत्वगुणाची शांतवृत्ति । क्षमा तितिक्षा दया शांति ।
विरक्ति श्रद्धादि संपत्ति । दाम दम प्रकार ॥ ५९ ॥
सत्त्वगुणाची शांतवृत्ती असून क्षमा, तितिक्षा (कष्ट सहन करण्याची वृत्ती), दया, शांती, विरक्ती, श्रद्धा ही त्याची संपत्ती आहे. शम, दम इ. षट्‌क संपत्ती; (९५९)

श्रवण मनन सारासार । मुमुशता परमार्थ उद्‌गार ।
त्यागचि करी सर्व संवसार । हेचि शांतवृत्ति ॥ ६० ॥
श्रवण, मनन, सारासार (सदसद्विवेकवृत्ती), मुमुघता, परमार्थविषयक उद्‌गार, सर्व संसाराचा त्याग करण्याची तयारी, ही शांतवृत्ती होय. (९६०)

सदा सत्संग आवडे । सच्छास्त्राचें अति कोडे ।
सर्वभूतीं आस्थता जोडे । हेचि शांतवृत्ति ॥ ६१ ॥
या सत्त्वगुणाच्या व्यक्तींना सदा सत्संगाची आवड असते. सच्छास्त्राचे अति कौतुक असते, सर्व प्राणिमात्रांमध्ये एकच आत्मतत्त्व ते पाहात असतात. हीच शांतवृत्ती होय. (९६१)

ऐसें हें चिन्ह शांतवृत्तीचें । हेलावे उठती सत्वगुणाचे ।
परी ते दानी उत्पन्न सुखाचे । नाश पावतां दुःख ॥ ६२ ॥
अशी ही शांतवृत्तीची चिन्हे होत. हिच्यामुळे सत्त्वगुणाच्या लहरी उठतात. पण त्या लहरीमुळे उत्पन्न होणाऱ्या सुखाची प्राप्ती होते (जे उत्पन्न होते ते नष्टही होते, या न्यायाने) ते सुख नाश पावताच दु: खही होते. (९६२)

तयासी केवळ सुख न ह्मणावें । सुख दुःख वृत्तीनें शीण पावे ।
तस्मात हे विकार जाणावे । सत्ववृत्तीचे ॥ ६३ ॥
त्याला केवलसुख (निर्भेळ सुख) म्हणता येणार नाही. या सुखदुःखात्मक वृत्तीने मुमुक्षूस शीणच होतो. म्हणून त्यांना सत्त्वगुणाच्या वृत्तीचे विकार मानावे. (९६३)

हे वृत्ति रज तमा निर्दाळी । पाडी परमार्थाचिये सुकाळीं ।
उद्धवतां मात्र होय वेगळी । निमतां मेळवी सुखा ॥ ६४ ॥
ही वृत्ती रजोगुण आणि तमोगुण यांचा नाश करते आणि परमार्थाच्या सुकाळामध्ये नेऊन सोडते. ही वृत्ती उठताक्षणीच ती जीवाला वेगळे करते, पण ती विलीन होताच सुखाशी गाठ घालून देते. (९६४)

तस्मात् उद्‌भवतां होतसे विकार । यास्तव केवळ सुख नोव्हे निर्विकार ।
एव घोर फ शांत प्रकार । तीन त्रिगुणांचे ॥ ६५ ॥
म्हणून ती उद्‌भवत्यामुळे तिच्यात विकार निर्माण होतो. म्हणून तिच्या केवळ निर्विकार सुखाची प्राप्ती होत नाही. अशा प्रकारचे घोर, मूढ आणि शांत असे हे अनुक्रमे रज, तम आणि सत्त्व या तीन गुणांच्या वृत्तीचे प्रकार होत. (९६५)

जोवरी उद्‌गार त्रिगुणांचे । घोर मूळ कीं शांतवृत्तीचे ।
हे दायक असती सुखदुःखाचे । तो काल कैचे आल्पसुख ॥ ६६ ॥
जोपर्यंत हे त्रिगुणांचे उद्‌गार (आविष्कार) आहेत, जोपर्यंत हे घोर, मूढशांत या वृत्तीचे प्रकार आहेत, तोपर्यंत ते सुखदु खे देणारे असतात. ते असेपर्यंत आत्मसुख कसे मिळणार ? (९६६)

या तिही वेगळी उदास वृत्ति । उगीच समान वृत्तीची स्थिति ।
त्रिगुणांचीही नव्हेचि उत्पत्ति । सहजपणे ग्त्तडधता ॥ ६७ ॥
या तिहींपेक्षा उदासवृत्ती वेगळी आहे. उदासवृत्ती म्हणजे वृत्तीची समान स्थिती, ती जोपर्यंत असेल तोपर्यंत त्रिगुणांची उत्पत्तीच होत नाही. या वृत्तीमध्ये केवळ सहज अशी स्तब्धता असते. (९६७)

इंद्रियविषयांचे विस्मरण । विवेकादिकांहीं नातळे मन ।
आळसादि नसता सावधान । हे उदासवृत्ति ॥ ६८ ॥
या उदासवृत्तीमध्ये इंद्रियादिकांचे तर विस्मरणच होते, विवेक इ. सत्त्वगुणी गोष्टीही मनापर्यंत पोचत नाहीत (मनात उठत नाहीत) आणि आळस इ. प्रमाद नसलेली ही वृत्ती नेहमी सावधान असते. (या प्रमादांपासून ती सावधान असते) (९६८)

स्तब्धता परी जड नव्हे । सावध परी न हेलाचे ।
उगेपणही न स्मरावे । हे उदासवृत्ति ॥ ६९ ॥
या वृत्तीमध्ये स्तब्धता असली तरी ती जड नाही. ती सावध असली तरी चंचल (तिच्यात हेलावे नसतात) नसते, तिच्यात उगेपणाचेही स्मरण होत नसते, अशी ही उदासवृत्ती असते. (९६९)

ऐसिया सामान्य वृत्तीमार्जी । निजाल्पसुख प्रगटे सहजी ।
ते काळी अनुभवावया तुजी । वृत्ति नसे ॥ ७० ॥
अशा या सामान्य वृत्तीमध्ये निजात्मसुख सहजपणे प्रकट होते. त्या काळात त्या सुखाचा अनुभव घ्यायला दुसरी वृत्तीच नसते. (९७०)

सुखाकार वृत्ति गोचर । अनुभवीतसे तदाकार ।
तेथें हेचि सुख ऐसा उद्‌गार । तरी तया सुखा मुके ॥ ७१ ॥
सुखाकार झालेली ही वृत्ती तिच्यासमोर आलेल्या (गोचर) पदार्थाशी तदाकार होऊन सुख अनुभवते. पण ते करताना हे सुख आहे अशी तिची भावना होताच ती त्या सुखाला मुकते. (९७१)

तेथें सुखरूप होऊनि असावें । आठवू जातां भिन्न पडावे ।
परी तें सामान्यवृत्ती अनुभवे । मौनेंचि अंतरीं ॥ ७२ ॥
गोचर पदार्थाच्या ठिकाणी सुखरूप होऊन ती असते. त्या सुखाचा आठव होताच ती भिन्न पडते. ती सामान्य वृत्ती अंतःकरणात मौनानेच (सुखोद्‌गार न काढता) अनुभव घेते. (९७२)

पुढें वृत्ति उद्‌भवतां करी मनन । लणे काय होतों सुखसंपन्न ।
तया सुखांतून हेलावून । वृत्ति उमटे ॥ ७३ ॥
त्यानंतर वृत्तीचा जेव्हा उद्धव होईल त्यावेळी तो साधक मनन करू लागतो. त्यावेळी तो म्हणतो, ' अहो, मी सुखाने किती समृद्ध होतो ! ' त्या सुखाने हेलावल्यामुळे वृत्ती उमटते. (९७३)

जीवनावरून वायु जातां । किंचित- दूर धांवे शीतळता ।
तेवीं उगेपणापासून निघता । वृत्ति सुखाकार निघे ॥ ७४ ॥
पाण्यावरून वाऱ्याची झुळूक गेली असता त्या पाण्याची शीतलता किंचित दूर पसरते. त्याप्रमाणे उगेपणात वृत्ती निघाली म्हणजे ती वृत्ती सुखाकार होऊन निघते. (९७४)

अन्यपदार्था वृत्ति धरी । तेव्हां तें सुख हरपे निर्धारी ।
वायु जेवी जातां बहु तुरी । शीतळता लोये ॥ ७५ ॥
त्यानंतर ती वृत्ती अन्य पदार्थाचे जेव्हा ग्रहण करते तेव्हा ते सुख निश्चितपणे हरवून जाते. वायू आणखी दूर गेला की, त्याची शीतलता लोप पावते, तसेच इथे होते. (९७५)

जरी तैशीच वृत्ति हेलावून । पुन्हा त्या सुखी होय लीन ।
न अवलंबी पदार्थ आन । तरी तें सुख न लोपे ॥ ७६ ॥
जर ती वृत्ती हेलावून पुन्हा त्या सुखातच लीन झाली आणि दुसऱ्या पदार्थाचा तिने अवलंब केला नाही, तर ते सुख लोप पावत नाही. (९७६)

जरी वायु जळीच समे । तरी शीतळता ते न गमे ।
तेवीं वारंवार अनुक्रमें । वृत्ति उठे विरे सुखी ॥ ७७ ॥
जर वायू पाण्यावरच फिरत राहिला तर त्याची शीतलता दूर जात नाही, त्याप्रमाणे वृत्ती वारंवार उठते आणि सुखात विरून जाते. (९७७)

तरी सुख तें न वोहटे । तदाकारत्वे स्वये भेटे ।
वृत्ति हेलातून पुन्हा आटे । तया सुखामाजी ॥ ७८ ॥
तरी सुख कमी होत नाही. ते वृत्तीशी तदाकार होऊन परत येते आणि भेटते. वृत्ती हेलावते आणि पुन्हा त्या सुखात आटून जाते. (९७८)

परी हा अभ्यास पाहिजे केला । तरीच साधका जाय अनुभवला ।
तो अभ्यास पुढे असे बोलिला । तेणें रीती कळे ॥ ७९ ॥
पण त्याचा अभ्यास मात्र केला पाहिजे. तरच त्याचा साधकास अनुभव येईल. तो अभ्यास पुढे सांगण्यात येईल. (९७९)

असो जागतीमाजीही बुद्धिवृत्तीचा । उगेपणा होय जेव्हां साचा ।
तत्काळीं स्वाल्पसुखाचा । अनुभव होय ॥ ८० ॥
हे असो. पण जागृतीमध्ये देखील वृत्ती निर्विषय निर्हेतुक उगेपणाने उठते तेव्हा स्वात्मसुखाचा तत्काळ अनुभव येतो. (९८०)

जरी वृत्ति होय गुणाकार । तरी त्या सुखाचा पडे विसर ।
सुखदु ःखे शिणे विकार । धरी अन्याचा ॥ ८१ ॥
पण जर वृत्तीने गुणाचे रूप घेतले तर मात्र त्या सुखाचा विसर पडतो. मग ती सुखदुःखांच्यामुळे कटते; आणि दुसरा विकार तिला प्राप्त होतो. (९८१)

रविदत्ता तूं ऐसें आणली । कीं सुख होतसे शांतवृत्तीसी ।
परी नाश होय जेव्हां तयेसी । ह्मणोनि विकारी ॥ ८२ ॥
रविदत्ता, तू असे म्हणशील की, 'हे जे सुख होते ते शांतवृत्तीला होते. पण ती शांतवृत्ती लोप पावते म्हणून ती विकारी ठरते. (९८२)

तैशीच उदासवृत्ति हे स्वयमेव । तेथें स्वसुखाचा अनुभव ।
इचाही नाश होय सदैव । तरी त्या यार्ते अंतर कोणतें ॥ ८३ ॥
त्याचप्रमाणे ही उदासवृत्ती स्वसुखाचा अनुभव घेते. पण हिचा देखील सदैव नाश होत असतो, मग या दोन्ही वृत्तींमध्ये काय फरक आहे ? (९८३)

उगेपणा जे उदासवृत्ति । आणि सत्वगुणाची शांतवृत्ति ।
उद्‌भव सुखाचा दोहींप्रती । आणि नाशही सारिखा ॥ ८४ ॥
उगेपणाची उदासवृत्ती आणि सत्त्वगुणाची शांतवृत्ती या दोहींमध्ये सुखाची उत्पत्ती सारखीच असते; आणि दोहींचा नाशही सारखाच असतो. (९८४)

तस्मात् तिशी इशी कोण अंतर । कल्पिसी ऐसा येक निर्धार ।
तरी पाहे पुरते महदंतर । तया ययासी ॥ ८५ ॥
म्हणून या दोहोंमध्ये कोणता भेद आहे ? - अशी रविदत्ता तू कल्पना करतोस तर त्या दोहोंमध्ये खूपच मोठे अंतर (भेद) आहे, हे लक्षात घे. (९८५)

सत्वगुणाची जे शांतवृत्ति । विकारसुखे सुखी होती ।
अथवा विवेकें जरी सुखानुभूति । घेऊन मी सुखी भावी ॥ ८६ ॥
सत्त्वगुणाची शांतवृत्ती विकार पावणाऱ्या सुखाने सुखी होत असते; अथवा विचारपूर्वक सुखाचा अनुभव घेऊन मी सुखी आहे, अशी कल्पना करते. (९८६)

तें सुख मीं घेतलें । मींच सुखरूप ऐसें भाविले ।
परी तें सुख नव्हे जें संचलें । अनुभाव्यरूप ॥ ८७ ॥
ते सुख मी घेतले, त्यामुळे मीच सुखरूप आहे असे ती मानते. परंतु तिचे हे जे सुख आहे ते, सर्वत्र अनुभाव्य म्हणून जे व्यापून राहिलेले असते ते सुख नव्हे. (९८७)

मानिलें तें क्षणभरी राहे । पुन्हा दुःखरूपता लाहे ।
तस्मात् शांतवृत्तींत सुख आहे । ह्मणे कवणू ॥ ८८ ॥
ज्याची आपण कल्पना करतो ते सुख क्षणभर टिकते. पुन्हा त्याला दुःखरूप प्राप्त होतेच. त्यामुळे शांतवृत्तीत सुख आहे, असे कोण बरे म्हणेल ? (९८८)

तैशी नव्हे उदासवृत्ति । उगेपणें त्या सुखा आतीती ।
मिळोन जाय सहजगति । वेगळी न निघे ॥ ८९ ॥
उदासवृत्ती तशी नाही. ती उगेपणाने त्या सुखामध्ये सहजरीत्या मिसळून जाते. त्यानंतर ती त्यापासून वेगळी पडत नाही. (त्यामुळे तिच्यामध्ये आणि सुखामध्ये द्वैत राहत नाही.) (९८९)

मी सुखी आहे हा उद्गार । नाहींच नेघे आणुमात्र ।
परी मी असें तत्सुखाकार । हेंही नाहीं ॥ ९० ॥
तिथे 'मी सुखी आहे' असा उद्‌गार नाही, किंवा 'त्या सुखाचा मी अनुभव घेत आहे' अशा प्रकारचे द्वैतही नाही. (९९०)

क्षणभरी तरी स्थिर राहे । परी त्या सुखी ऐक्यता लाहे ।
उठोन जरी हेलावे पाहे । तरी विकार न घेतां मिळे ॥ ९१ ॥
ती क्षणभर राहते. पण लगेच त्या सुखात ती एकरूप होते. ती उत्पन्न झाली आणि तिच्यात जरी हेलावे निर्माण झाले तरी विकार न पावता ती त्या सुखात मिळून जाते. (९९१)

उठताही अन्य सुखाचा विकार । नेघे ह्मणोनि निर्विकार ।
पुन्हा होतां तत्तदाकार । ऐक्यत्वा मिळे ॥ ९२ ॥
ती उत्पन्न झाली तरी तिच्याहून भिन्न असणाऱ्या सुखाचा ती स्वीकार करत नाही, म्हणून ती निर्विकार असते. ती पुन्हा तदाकार होताच पुन्हा एकरूप होऊन जाते. (९९२)

मागुती ह्मणसी कीं विकार पावतां । तें सुखा न जाय तत्वता ।
परी पाहे अंतरीं पुरता । तें न नासे वृत्ति नासे ॥ ९३ ॥
तू म्हणशील की, नंतर ती विकार पावत्यावर परत त्या स्वात्मसुखात जात नाही का ? तर यावर अंतःकरणात विचार कर आणि तुझ्या लक्षात येईल की, ते सुख नष्ट होत नाही तर वृत्ती नाश पावते. (९९३)

पहिलें सुख अखंड भरले । वृत्ति सुखदुःखी तरी संचलें ।
मात्र वृत्तीसीच सुखदुःख जाले । वेगळी पडली ह्यणोनी ॥ ९४ ॥
पहिले स्वात्मसुख अखंड घनदाट गच्च भरलेले आहे, वृत्ती सुखदुःखात सापडली तरी ते निश्चलपणे अखंडपणे व्यापून असतेच; पण वृत्तीस मात्र सुखदुःख होते कारण त्या स्वात्मसुखापासून ती भिन्न राहाते. (९९४)

जेव्हां वृत्तीनें विकार सांडिला । तिही गुणांचा अभाव जाला ।
सहजगति उगेपणा उरला । तेव्हां मिळे त्या सुखी ॥ ९५ ॥
जेव्हा वृत्ती विकाराचा त्याग करते, त्याचवेळी तिच्या ठिकाणी गुणांचा अभाव होतो. त्यामुळे साहजिकच तिच्या ठिकाणी उगेपणा राहतो. तेव्हाच ती त्या निजसुखात मिळून जाते. (९९५)

क्षणभरी सुखी समरसली । तदाकारत्वा अनुभूति बोलिली ।
पुन्हा तेथोनि विकार पावली । तें सुख त्यागोनी ॥ ९६ ॥
ती क्षणभर सुखात समरसते त्यामुळे ती तदाकार होते. त्यानंतर ती पुन्हा त्या सुखाचा त्याग करून तेधून विकार पावते. (९९६)

म्हणोनि सुख वृत्तीचे हरपले । परी निजसुख नाहीं उणे झालें ।
तें नासे तरी विकार जातां भेटले । वृत्तीली सुख केवीं ॥ ९७ ॥
त्यामुळे वृत्तीचे सुख हरपते पण तिच्या निजसुखात मात्र काही उणीव निर्माण होत नाही. ते नष्ट झाले असते तर वृत्तीचे विकार जाताच वृत्तीला निजसुख कसे प्राप्त झाले असते ? (९९७)

तस्मात् तें सुख असे निबिड । जें सुप्तीमाजीं निरोपिले वाड ।
तेथेंच जागतीमाजी होतसे पवाड । उदासवृत्तीचा ॥ ९८ ॥
त्यामुळे ते सुख घनदाट (गाढ) आहे. सुघुसीमध्ये जसे ते गाढ असते, तसेच ते जागृतीतील उदासवृत्तीतही प्राप्त होते. (९९८)

तैसें शांतवृत्तींत कोठे । वाउगी सुखचि ह्मणून उठे ।
परी तें सुख नव्हे मानिलें गोमटे । तेंही आटे सुखदु ॥ ९९ ॥
त्याचप्रमाणे शांतवृत्तीतही ही उदासवृत्ती कधी उगीच सुख म्हणून उठते. पण ते सुख फार छान आहे असे मानता कामा नये, नाहीतर ती उदासवृत्ती या लौकिक सुखदुःखांच्या जाळ्यात अडकत्याबरोबर ते निजसुख आटून जाते. (९९९)

तस्मात् तिन्हीही वृत्ति त्यागून । बुद्धिवृत्तीचें उगेपण ।
त्या उदासवृत्तीच्या भावे कडून । जागरीं सुख भेटे ॥ १००० ॥
म्हणून तिन्ही वृत्तींचा त्याग करून बुद्धिवृत्ती निर्विषय उगेपणा स्वीकारते तेव्हा त्या उदासवृत्तीमुळे जागृतीमध्येही निजसुख भेटते. (१०००)

हें जागर सुप्तींचे मध्यस्थान । गाढ झोप ना नव्हे जागरण ।
ते समयी वासनेसी आविर्भवणें । निजाल्पसुख ॥ १ ॥
ही उदासवृत्ती जागृती आणि सुषुप्ती यांचे मध्यस्थान आहे. या अवस्थेत गाढ झोप नसते तसेच जागेपणही नसते. तेथे वासनेला निजात्मसुख प्राप्त होते. (१००१)

त्यासी म्हणावें वासनानंद । गाढ सुमीत ब्रह्मानंद ।
हे उभय सांगितले विशद । दोही ठाई ॥ २ ॥
त्याला वासनानंद म्हणतात. गाढ झोपेत ब्रह्मानंद असतो. अशा तऱ्हेने वासनानंद आणि ब्रह्मानंद आणि त्यांच्या जागा स्पष्ट केल्या. (१००२)

जागे असताही उगेपणाचा । भाव जो कां असे साचा ।
तोचि ठाव मध्य स्थानाचा । उभयां भेद नाहीं ॥ ३ ॥
जागेपणी जो उगेपणा असतो तोच जागृती आणि सुषुप्ती यांच्या मध्यस्थानी असतो. त्यामुळे या दोन्हींमध्ये काही फरक नाही. (१००३)

आरंभी झोपेचे जागर नसता । सुख आविर्भवे तत्त्वत ।
पुढें गाढ झोप जेव्हा लागता । केवळ ब्रह्मानंद उरे ॥ ४ ॥
जागृतीचा शेवट आणि झोपेचा आरंभकाळ यावेळी निजसुख प्रकट होते. हा वासनानंद होय. नंतर पुढे गाढ झोप लागल्यावर केवळ ब्रह्मानंद उरतो. (१००४)

ह्यणोनि वासनेचा परिणाम । तो ब्रह्मानंदचि परम ।
तैसा कोठे म्हणसी आराम । जागरी उगेपणा ॥ ५ ॥
ए वासनानंदाचा परिणाम म्हणजे श्रेष्ठ ब्रह्मानंदच होय. त्या प्रकारचा आनंद इतर कोणत्या ठिकाणी मिळतो. तर तो जागृतीमध्ये जो उगेपणा येतो त्यावेळी तो मिळू शकतो. (१००५)

तरी अभ्यासें उदासवृत्ति । चिरकाळ राहे स्थिरत्व गति ।
तरी लीन जें सुख सुझी । तेंचि होय येथें ॥ ६ ॥
पण ती उदासवृत्ती अभ्यासाने दीर्घकाळ स्थिर राहिली तर झोपेत वृत्तिलय झाल्यामुळे जे सुख मिळते तेच या दीर्घकाळ स्थिर राहिलेल्या उदासवृत्तीत प्राप्त होते. (१००६)

तस्मात् परिणाम उदासवृत्तीचा । ब्रह्मानंदचि असे साचा ।
येथें भेदभाव कल्पनेचा । सहसा न करावा ॥ ७ ॥
त्यामुळे उदासवृत्तीचा परिणाम ब्रह्मानंद हाच आहे. या दोहोंमध्ये कल्पनेच्या बाबतीत भेदभाव करू नये. (१००७)

येथेंही तूं शंका करिसी । कीं जैसा परिणाम उदासवृत्तीसी ।
तैसाचि भाव शांतवृत्तीसी । कां न ह्मणावा ॥ ८ ॥
येथे तू शंका करशील की, जसा उदासवृत्तीचा परिणाम म्हणजे ब्रह्मानंद तसा शांतवृत्तीचाही परिणाम ब्रह्मानंद असे का म्हणू नये ? (१००८)

शांतवृत्तीचा ब्रह्मानंद । परिणाम नव्हे पीर विशद ।
उदासवृत्ति होऊन पुढे शुद्ध । मुख्य निजसुख उरे ॥ ९ ॥
शांतवृत्तीचा परिणाम ब्रह्मानंद होऊ शकत नाही. पण शांत वृत्तीचा परिणाम उदासवृत्तीमध्ये झाल्यावर तिचा परिणाम निजसुखप्राप्ती हाच असतो. (१००९)

तरी हे परंपरेने सुखातें पावे । यासी नाही ह्मणे कोण बरवे ।
परी मुख्य ब्रह्मानंद तो नव्हे । परिणाम शांतवृत्तीचा ॥ १० ॥
पण हे सुख परंपरेने प्राप्त होते. ते कोणीही नाकारत नाही. पण शांतवृत्तीचा थेट परिणाम ब्रह्मानंद नसतो. (१०१०)

ऐसाचि परंपराद्वारा । घोरवृत्तीसी होय थारा ।
मा शांतवृत्तीसी तो खरा । विवेक असे ॥ ११ ॥
अशाच परंपरेने घोरवृत्तीचाही ब्रह्मानंद परिणाम होऊ शकतो. मग शांतवृत्तीचा तो परिणाम होईल यात काय संशय' पण शांतवृत्तीमध्ये खरा विवेक असत्यामुळे त्यातून ब्रह्मानंद निष्पन्न होणे जास्त स्वाभाविक आहे. (१०११)

काम हे घोरवृत्ती रजाची । जे इच्छा होणें अप्रात विषयाची ।
तो जरी विषय प्राप्त होतांची । सुखाच उफाळे ॥ १२ ॥
कामना ही रजोगुणाची घोरवृत्ती आहे. तिच्यामुळे अप्राप्त विषयाची इच्छा उत्पन्न होते. तो विषय ग्रास झाला की सुखच उफाळून येते. (१०१२)

काय हो केव्हडा लाभ जाला । न होणे तेचि प्रास मजला ।
ऐसा उद्‌गार जो वृत्तीनें घेतला । आरंभी हर्षाचा ॥ १३ ॥
काय हो, मला केवढा लाभ झाला जो शक्य नव्हता तोच लाभ मला मिळाला. असा त्या वृत्तीचा आरंभीचा हर्षोद्वार असतो. (१०१३)

तोचि हर्ष उद्‌गारतत्त्वता । जिरे हळूहळू चिरकाल होतां ।
विषय असे परी उगेपणा आतौता । परीणाम पावे ॥ १४ ॥
नंतर हळूहळू बराच काळ लोटत्यानंतर तोच हर्षोद्वार हळूहळू जिरून जातो. त्यानंतर तो प्राप्तविषय असूनही अंतःकरणामध्ये उगेपणा (उदासीनता) निर्माण होतो. (१०१४)

उद्‌गार नसताही वासनेसी । सुखाकारता अनायासी ।
विषयानंद ह्मणार्वे त्यासी । वासनानंद नव्हे ॥ १५ ॥
या अवस्थेत दुसरी वासना निर्माण झाली नसताना अनायासे सुखाकारता प्राप्त होते. त्याला विषयानंद म्हणतात. पण तो वासनानंद नव्हे. (१०१५)

एव सुसिकाळींचा ब्रह्मानंद । उदासवृत्तींत वासनानंद ।
तिसरा जाणिजे विषयानंद । हे तीनच सर्व जगी ॥ १६ ॥
अशा प्रकारे सुषुप्तीच्या काळातील ब्रह्मानंद, उदासवृत्तीतील वासनानंद आणि तिसरा विषयानंद असे तीन प्रकारचे आनंद या जगात असतात. (१०१६)

चौथा आनंद तिही लोकीं । जालाचि नाहीं नानात्व अनेकीं ।
येथे आशंका करिसी निकी । कीं असती सुखे बहु ॥ १७ ॥
या आनंदाखेरीज चौथा आनंद या जगात झालाच नाही. एकापेक्षा अधिक (अनेक) असत्यामुळे या तिहीच्या बाबतीत नाना शब्द वापरण्यात येतो. येथे तू आशंका करशील की सुखे तर खूप आहेत. ती आशंका बरोबर आहे. (१०१७)

अद्वैतानंद आत्मानंद । निजानंद परमानंद ।
सहजानंद विद्यानंद । ऐसे प्रकार बहु ॥ १८ ॥
तसे आनंदही पुष्कळ सांगता येतील. अद्वैतानंद, आत्मानंद, निजानंद, परमानंद, सहजानंद, विद्यानंद, असे त्यांचे पुष्कळ प्रकार आहेत. (१०१८)

परी अद्वैत आत्या निजानंद । परमानंदादि नामभेद ।
तस्मात एकचि ब्रह्मानंद । जो सुसिकालाचा ॥ १९ ॥
पण अद्वैत, आत्मा, निजानंद, परमानंद इ. मध्ये केवळ नामांची (नावांची) भिन्नता आहे. त्या सगळ्यांमधून एकाच ब्रह्मानंदाचा बोध होतो. तो सुधुमीच्या वेळी असतो. (१०१९)

सहजानंद तोचि विशद । जया बोलिजे वासनानंद ।
जो उदासवृत्तीचा स्वाद । जागतीमाजी ॥ २० ॥
सहजानंद म्हणजेच ज्याला वासनानंद असे म्हणतात तोच आहे हे स्पष्ट आहे. जागृतीमध्ये उदासवृत्तीचा आनंद घेणे हेच वासनानंदाचे लक्षण आहे. (१०२०)

विद्यानंद राज्यानंद । आदिकरून विरंचिपद ।
तो एकचि जाणिजे विषयानंद । बहु नामभेद जरी ॥ २१ ॥
विद्यानंद, राज्यानंद इ. पासून ते ब्रह्मदेवाच्या पदाची प्राप्ती होणे इ. हे सर्व जरी नावांनी भिन्न असले तरी ते एकाच विषयानंदात येतात, हे जाणून घ्यावे. (१०२१)

शांतवृत्तीचा जो विवेक । तो विद्यानंदचि कौतुक ।
तयासीच विषयानंद येक । नाम बोलिजे ॥ २२ ॥
शांत वृत्तीमध्ये जो विवेक केला जातो तो खरे पाहता विद्यानंदच आहे. विषयानंद हे त्याचेच एक नाव म्हटले पाहिजे. (१०२२)

जरी विवेकें ब्रह्मसुख ग्रहण । परी वृत्ति घेतसे विषय म्हणोन ।
तस्मात् होय तो विषयानंद पूर्ण । निःसंशर्ये ॥ २३ ॥
विवेकाच्या साहाय्याने ब्रह्मसुखाचे ग्रहण केले जाते, पण त्यामुळे वृत्ती एक विषय म्हणून त्याचे ग्रहण करत असत्यामुळे तो निःसंशयपणे पूर्ण विषयानंदच आहे. (१०२३)

तस्मात् ब्रह्मानंद आणि वासना । तिजा विषयानंद जाणा ।
या तिही वेगळा चौथा असेना । आनंद जगी ॥ २४ ॥
म्हणून ब्रह्मानंद, वासनानंद आणि तिसरा विषयानंद या तिन्हीखेरीज चौथा आनंद या जगात असत नाही. (१०२४)

या तिन्हीही आनंदांसी । दृष्टांत देऊं सावध मानसी ।
श्रोत्रिय बालानंद तिजयासी । राज्यानंद नाम ॥ २५ ॥
या तीन प्रकारच्या आनंदांचे तीन दृष्टान्तांच्या साहाय्याने स्पष्टीकरण करता येते. ते सावध मनाने पहा. ते दृष्टान्त म्हणजे अनुक्रमे श्रोत्रियानंद, बालानंद आणि तिसरा राज्यानंद हे होत. (१०२५)

श्रोत्रियाचे सुख ऐसें । सुप्तींत ब्रह्मानंद विलसे ।
वासनानंद तो बाल जैसे । स्तनंधय सान ॥ २६ ॥
झोपेत जो ब्रह्मानंद असतो तो श्रोत्रियाच्या (विद्वान ब्रह्मवेत्त्याच्या सुखाप्रमाणे असतो. वासनानंद म्हणजे तो स्तनंधय (स्तनाचे दूध पिणाऱ्या लहान) बालकाच्या सुखाप्रमाणे असतो. (१०२६)

राज्यानंद तो विषयानंद । हे तो येकचि नसे भेद ।
आतां हेचि वेगळाले विशद । करूनि दाऊं ॥ २७ ॥
राज्यानंद हाच विषयानंद होय. यातील दृष्टान्त आणि दार्ष्टान्तिक एकसारखेच आहेत. त्यात काही फरक नाही. आता या तिन्ही प्रकारच्या आनंदांचे स्वरूप वेगवेगळे स्पष्ट करून सांगतो. (१०२७)

श्रोत्रिय ह्मणावें ज्ञानियासी । ज्ञान तें ब्रह्माला येकरर्सी ।
कोणतेही अवस्थेंत यासी । सुखाचा लोप नाहीं ॥ २८ ॥
जो ज्ञानसंपन्न असतो त्यास श्रोत्रिय म्हणतात. ज्ञान म्हणजे ब्रह्मैक्याचा अनुभव. कोणत्याही अवस्थेत या सुखाचा लोप होत नाही. (१०२८)

जें सुख सुमीचे वर्णिले । जें कां त्रिपुटीरहित संचले ।
तेंचि निजांगे होऊन धाले । पुन्हा वोहटे ना ॥ २९ ॥
जे सुख झोपेत मिळते म्हणून सांगितले, जे त्रिपुटीरहित (अनुभविता, अनुभाव्य, अनुभव अशा तीन घटकांना त्रिपुटी म्हणतात) असून सर्वत्र भरलेले आहे, ज्या सुखाशी एकरूप होऊन कधीही कमी होणार नाही अशी तृप्ती मिळते असे सुख होय. (१०२९)

एव श्रोत्रियसुख ब्रह्मानंदासी । कीं उपमिला आनंद श्रोत्रियासी ।
हा दृष्टांत दार्ष्टांत येकरसीं । परी देणे कळावया ॥ ३० ॥
अशा प्रकारे श्रोत्रियाच्या सुखाची ब्रह्मानंदाला उपमा दिली काय किंवा ब्रह्मानंदाची श्रोत्रियाच्या सुखाला उपमा दिली काय दोन्ही सारखेच. दोन्ही दृष्टान्त आणि दार्ष्टान्तिक एकरूपच आहेत. केवळ त्याचे स्वरूप कळावे म्हणून हा दृष्टान्त द्यावा लागला. (१०३०)

आता बाल स्तन पिऊनी । तुझ होऊन मृदु आस्तरणीं ।
निजावेले जे सुखे बायनी । तें सहजे हंसे ॥ ३१ ॥
एक अतिशय लहान बालक आईच्या स्तनाचे दूध पिऊन तूस होऊन मऊ अंथरुणावर निजविले तर ते जसे त्या झोपेत सहज असते; (१०३१)

विधिनिषेध ना हर्ष शोक । क्षुधा तृषा ना वृतपत्यक ।
सहजी सहजत्वे कौतुक । हांसे स्वानंद ॥ ३२ ॥
त्याला कुठल्याही प्रकारचा विधिनिषेध नसतो, हर्षशोक नसतो, भूक-तहान या प्रकारच्या वृत्तींचा प्रभाव त्याच्यावर नसतो. त्यावेळी ते सहजपणे स्वतःच्या आनंदात निमग्न होऊन कौतुकाने हसते; (१०३२)

जो तूष्णीं भाव जागतीचा । तोचि सहज हर्ष बालाचा ।
दृष्टांत दिधला परी साचा । येकरूप असे ॥ ३३ ॥
जागृतीमध्ये जो आनंदयुक्त निर्हेतुक मौनाचा अनुभव येतो तोच या बालकाचा सहज हर्ष होय. हा बालकाच्या आनंदाचा दृष्टान्त दिला खरा परंतु वस्तुत: बालानंद आणि जागृतीतला वासनानंद हे एकरूपच आहेत. (१०३३)

महाराजा चक्रवर्ती । निर्वेर राज्य सर्व जगती ।
अव्याहताज्ञ तो सुखमूर्ति । तिथे स्वानंर्दे ॥ ३४ ॥
चक्रवर्ती महाराजाचे सर्व जगावर निर्वैर अधिराज्य असते. त्याच्या आज्ञा कधी मोडल्या जात नाहीत. तो सुखाची मूर्तिमंत आकृती असतो. तो आपल्या आनंदात राहत असतो. (१०३४)

अमुक करणें उरले नाहीं । पावावयाचें पावलें तेंही ।
तोचि विषयानंद पाही । जो राज्यानंद ॥ ३५ ॥
त्याला कोणतीही गोष्ट करायची राहिलेली नसते. जे प्राप्त करायचे असते ते त्याने प्राप्त केलेले असते. त्याचा हा आनंद विषयानंद होय. राज्याचा आनंद हा विषयानंदच असतो. (१०३५)

एव तिन्ही आनंदा तीन उपमिले । या तीहीतून दोन जाती नासले ।
ब्रह्मानंदी परिणाम पावले । वासना आणि विषय ॥ ३६ ॥
अशा प्रकारे ब्रह्मानंद, वासनानंद आणि विषयानंद या तीन प्रकारच्या आनंदांना श्रोत्रियानंद, बालानंद आणि राज्यानंद या तीन आनंदांची उपमा दिली; या तीन आनंदांमधील वासनानंद आणि विषयानंद हे दोन आनंद नष्ट होणारे आहेत. वासनानंद आणि विषयानंद हे दोन्ही ब्रह्मानंदातच विलीन होतात. (१०३६)

चक्रवर्तीचे सुख तें पाहतां । नाश पावे परें पीडितां ।
अथवा देवादिकांचे सुख इच्छिता । तुच्छ करी स्वसुख ॥ ३७ ॥
चक्रवर्तीचे सुख शत्रूंनी त्रास दिल्यानंतर अथवा त्याने देवादिकांच्या सुखाची अभिलाषा धरली तर नष्ट होते, त्याला ते स्वतःचे सुख तुच्छ वाटू लागते. (१०३७)

बालही दिवसेंदिवस वाढे । मने सुखदुःखी पवाडे ।
तेव्हां तें सहज सुख विघडे । वासनानंदरूप ॥ ३८ ॥
बालकही दिवसेंदिवस वाढत जाते आणि त्याला मनाने सुखदुःखे भोगावी लागतात. तेव्हा वासनानंदाच्या स्वरूपातील त्याचे ते सहजसुख बिघडते. (१०३८)

तैसें श्रोत्रियाचे सुख नसे । जें येकदा अभिन्न बाणलें जैसे ।
तें कालत्रर्यीही न नासे । भलतेही व्यापारी ॥ ३९ ॥
श्रोत्रियाचे सुख या प्रकारचे नसते. ते एकदा का अभिन्नपणाने अंगी बाणले की ते कोणत्याही व्यापारात (उद्योगात) कालत्रयीही नष्ट होत नाही. (१०३९)

धनाढ्य किंवा निष्कांचन । येकटा किंवा बहु स्वजन ।
धाला किंवा उपोषण । परी तो आनंदरूप ॥ ४० ॥
असे सुख भोगणारा धनाढ्य असो की निष्कांचन, एकटा असो की आप्तस्वकीयांनी वेढलेला असो, तूस झालेला असो की भुकेला, तरी तो आनंदरूपच असतो. (१०४०)

वस्त्रालंकारी कीं उघडा । मंचकीं किंवा पडे उकरडां ।
पट्टनीं किंवा वनी धडफुडा परी- ॥ ४१ ॥
त्याने वस्त्रालंकार परिधान केलेले असोत की, तो उघडा असो; मंचकावर पहुडलेला असो की उकिरड्यावर पडलेला असो, शहरात असो की खरोखर अरण्यात असो; तरी तो आनंदरूपच असतो. (१०४१)

भलता आश्रम भलता वर्ण । भलता धर्म भलते आचरण ।
जागती स्वप्नी कीं सुधुझी पूर्ण प. ० ॥ ४२ ॥
तो कोणत्याही आश्रमातील असो (ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ अथवा संन्यास). कोणत्याही वर्णाचा (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र) कोणत्याही धर्माचा (कबीर, साईबाबा), कोणत्याची आचारमार्गाचा असो; जागृती अवस्थेत असो वा गाढ झोपेत, तो आनंदरूप असतो. (१०४२)

एव ब्रह्मानंद तो ऐसा । मायादि तृणांत उमटो ठसा ।
उद्धवो राहो कीं पावो नाशा । परी तें जैसे तैसें ॥ ४३ ॥
असा हा ब्रह्मानंद मायेपासून तो गवतापर्यंत त्याचा कुठेही ठसा उमटो; तो उत्पन्न होवो वा नाश पावो. पण तो सर्वत्र सर्वदा एकसारखाच असतो. (१०४३)

आतां वासना विषयानंद दोनी । जे नासती परोक्ष म्हणोनी ।
तेही विचारे पावती मिळणीं । अभ्यासें ब्रह्मानंदा ॥ ४४ ॥
आता वासनानंद आणि विषयानंद हे परोक्ष असत्यामुळे (अन्य गोष्टींची अपेक्षा करणारे, अन्यसापेक्ष) नष्ट होतात. ते देखील विवेकाचा अवलंब केल्यास अभ्यासाने ब्रह्मानंदास प्राप्त होतात. (१०४४)

विवेकवैराग्याचेनि बळे । विषय तितुका सर्व निवळे ।
विवेचनें जरी मीपण गळे । तेव्हां भोग्य भोक्ता आटे ॥ ४५ ॥
विवेक आणि वैराग्याच्या जोरावर सर्व विषय निवळून जातात. चिंतनाने मीपण जर गळून पडले तर भोक्ता आणि भोग्य हे द्वैतच नाहीसे होते. (१०४५)

देहाचे सुखदुःख समान । हर्षखेदे भंगे ना मन ।
मग सहजत्वे वृत्ति उदासीन । मिळे वासनानंदीं ॥ ४६ ॥
त्या मुमुसूला देहाचे सुख आणि दुःख सारखेच वाटते; हर्ष वा खेद यांनी त्याचे मन दुभंगत नाही; त्यामुळे सहजपणेच त्याची वृत्ती उदासीन होऊन वासनानंदात विलीन होते. (१०४६)

गुणाचे विकार मावळती । सुखरूप राहे सहजगती ।
या रीती विषयानंदाची समासि । उदासवृत्तीमाजीं ॥ ४७ ॥
गुणांचे विकार मावळतात आणि तो सहजावस्थेत सुखरूप होऊन राहतो. अशा रीतीने विषयानंदाची परिणती उदास वृत्तीमध्ये होते. (१०४७)

तैशीच उदासवृत्ति ही स्वभावें । जे सुखाकारें हेलाचे ।
तेही अभ्यासे ऐक्य पावे । ब्रह्मानंदी ॥ ४८ ॥
याच पद्धतीने उदासवृत्तीही सुखाकार हेलाव्यांनी युक्त असते; तीही अभ्यासाने स्थिर होऊन ब्रह्मानंदाशी एकरूप होते. (१०४८)

तो अभ्यास आणि विवेचन । कैसे ते पुढें निरूपण ।
तेणें रीती करावें अभ्यसन । मदप्रज्ञे मुमुक्षे ॥ ४९ ॥
तो अभ्यास आणि त्यासंबंधीचे चिंतन कसे करावे याचे निरूपण पुढे होणार आहेच. त्या पद्धतीने मंदप्रज्ञ मुमुक्षूने अभ्यास करावा. (१०४९)

येथें सहजगती उगेपण होतां । तें सुख उमटे जागती आतौता ।
सांगितलें अशा रविदत्ता । सहज असे ह्यणोनी ॥ ५० ॥
या ठिकाणी सहज रीतीने उगेपण प्राप्त झाले असता जागृतीमध्ये जे सुख प्राप्त होते, ते केवळ सहज आहे म्हणून, हे रविदत्ता, सांगितले आहे. (१०५०)

हेही असो तृष्णी स्थिति । सुख असेंचि असे सहजगती ।
परी व्यापारामार्जीही सामान्याप्रती । लोप नाहीं ॥ ५१ ॥
ही तृष्णी स्थिती होय. तिच्यामध्ये सुख सहज (विनाप्रयत्न) प्रास होते, परंतु तेच सुख व्यापार चालू असताही प्राप्त होते. ब्रह्मभावातील सामान्यत्व व्यापारातही लोपत नाही. (१०५१)

तेंचि कैसे व्यापाराआत । या सर्वत्रां सामान्य भासवीत ।
आणि जागरी तिन्ही अवस्था उमटत । तेंही स्टनितार्थे बोलू ॥ ५२ ॥
व्यापार चालू असताही सर्व पदार्थमात्रांस सामान्य प्रकाश कसा प्रकाशित करतो, तसेच जागृतीतही तिन्ही अवस्था कशा उद्भवतात, तेही संक्षेपाने आता सांगतो. (१०५२)


श्लोक : धीव्यापारासतद्धास्थाझिंदाभासेन संयुता: ॥ ५ ॥ (उत्तरार्ध)

अर्थ : त्याचप्रमाणे चिदाभास जीवाशी संयुक्त होताच बुद्धीचे होणारे व्यापारदेखील त्याच शुद्ध चैतन्याने प्रकाशित होतात. । । ५ । । (उत्तरार्ध)

बुद्धीचे व्यापार अनारिसे । चिदाभासासहित विलसे ।
हें चिडूपें भासविल्या भासे । धर्म कीं धर्मी ॥ ५३ ॥
(वृत्तिरहित शुद्ध बुद्धी जशी चैतन्याच्या सामान्य प्रकाशाने प्रकाशित होते त्याचप्रमाणे जीवचैतन्याच्या विशेष प्रकाशाने युक्त होताच त्या वृत्तियुक्त बुद्धीचे जे व्यापार होतात, ते देखील त्याच सामान्य प्रकाशाने प्रकाशित होतात.) बुद्धीचे व्यापार वेगवेगळे आहेत. ते चिदाभासाशी (बुद्धीचा संयोग झाल्यानंतर सुरू होतात). ते व्यापार चिद्‌रूपाच्या प्रकाशानेच प्रकाशित होत असतात. मग केवळ स्फुरणरूप धर्मी असोत की चलनरूप धर्म असोत. (१०५३)

जें निर्विकारी चळण । वाद जाले न होऊन ।
जें मागा बोलिलें ज्ञानाज्ञान । विद्या अविद्याल्पक ॥ ५४ ॥
निर्विकार ब्रह्माच्या ठिकाणी जे उत्पन्न होऊन न झाल्यासारखे भासमान खोटे चलन उत्पन्न होते, ज्याचे मागे ज्ञान आणि अज्ञान, विद्या- अविद्या या शब्दांत वर्णन केले आहे; (१०५४)

तेचि अंतःकरणाची स्फूर्ति । जीवप्रतिबिंबासह वृत्ति ।
उमटली सगुणा अव्याकृति । हेतु या जगा ॥ ५५ ॥
तीच अंतःकरणाची स्फूर्ती. जीव प्रतिबिंबासह वृत्ती किंवा वृत्तियुक्त बुद्धी होय. ती सगुण असून अव्याकृत असते. तीच या जगाचे कारण होय. (१०५५)

तिचेच विभाग जाहले दोन । येक बुद्धि येक मन ।
तया दोन वृत्तीचे निर्गमन । पांचा द्वारा ॥ ५६ ॥
तिचेच दोन विभाग झाले. बुद्धी आणि मन हे ते दोन विभाग होत. या दोन वृत्ती पाच (ज्ञानेंद्रियाच्या) मार्गांनी बाहेर पडतात. (१०५६)

हेचि पांच ज्ञानेंद्रिय । येणे ग्रहण कीजे पंचविषय ।
परी मन बुद्धींत होती उभय । कळणे आणि चळणें ॥ ५७ ॥
हीच पाच ज्ञानेंद्रिये होत. यांच्या मार्गांनी पाच विषयांचे ग्रहण केले जाते. पण मन आणि बुद्धी यामध्ये फक्त दोनच व्यापार होतात. कळणे आणि चलन होणे हे ते दोन व्यापार होत. (१०५७)

त्यांतून कळणे ज्ञानेंद्रियद्वारा । निघोनि भोगी पंचतन्मात्रा ।
चळण तेचि राहिले अंतरा । ते पंचप्राण ॥ ५८ ॥
त्यात कळणे ज्ञानेंद्रियांच्या मार्गांनी निघून पंचविषय तन्मात्रांस भोगते. चळणे शरीराच्या अंतर्भागात राहते. तेच पंचप्राण होत. (१०५८)

तेणें स्कूलाची क्रिया होणें । तेचि पांच कर्मेंद्रियाभिधाने ।
एव दशधा व्यापार उद्भव । येका बुद्धीचे ॥ ५९ ॥
त्यांच्यामुळेच स्थूल देहाची क्रिया होते. म्हणून त्या क्रिया करणाऱ्या इंद्रियांस पाच कर्मेन्द्रिये म्हणतात. अशा प्रकारे एका बुद्धीचे दहा प्रकारचे व्यापार होतात. (१०५९)

जीवही ज्ञानाचा आभास । ज्ञानाऐसा जो प्रतिभास ।
विषयापर्यंत सहवास । असे निर्गमाचा ॥ ६० ॥
जीव देखील ज्ञानाचा प्रतिभासच आहे. तो ज्ञानासारखाच आभास आहे. त्याचाही विषयापर्यंत वावर आहे. त्याचाही ज्ञानाबरोबरच विषयांपर्यंत बाहेर जाण्याचा प्रवास चालूच असतो. (१०६०)

असो ऐसे येका वृत्तीचे । जीवासहित विकार साचे ।
सत्रा प्रकार व्यापार भेदाचे । जितुके होती ॥ ६१ ॥
असो. एका वृत्तीचे जीवासह विकार होऊन सतरा प्रकार व्यापारभेदाने होतात. (१०६१)

तितुके धर्म धर्मीसहित । जो आपुले भासा भासवीत ।
जीव हा आपणासम प्रतिबिंबित । त्यातेंही प्रकाश करी ॥ ६२ ॥
त्या सतरा प्रकारांना त्यांचे स्फुरण आणि चळण या धर्मी आणि धर्म गांसह जो आपल्या प्रकाशाने प्रकाशित करतो, आपल्यासारखाच प्रतिबिंब दिसणारा जो जीव त्यालाही प्रकाशित करतो, तोच शुद्ध चैतन्यस्वरूप आत्मा होय. (१०६२)

स्कृर्ति आणि स्मृतीचे चळण । हेचि धर्म आणि धर्मी दोन ।
संकल्पासहित उद्भवले मन । त्यातेंही प्रकाश करी ॥ ६३ ॥
स्फूर्ती आणि स्फूर्तीचे चळण हेच धर्मी आणि धर्म होत. मन हे संकल्पासहित उत्पन्न झाले. या सर्वांना आत्माच प्रकाशित करतो. (१०६३)

बुद्धि आणि बुद्धिनिश्चया । पंचप्राण प्राणांच्या क्रिया ।
वचनादि सह कर्मेंद्रिया । त्यातेंही प्रकाश करी ॥ ६४ ॥
बुद्धी आणि बुद्धीचा निश्चय, पंचप्राण आणि त्यांच्या क्रिया, कर्मेन्हिये आणि वचन इ. त्यांच्या क्रिया, या सर्वांनाच आत्मा प्रकाशित करतो. (१०६४)

श्रोत्र ऐकणे त्वचा स्पर्शणें । लक्ष देखणे जिव्हा रस घेणे ।
घाण आणि सुगंध घेणे । त्यातेंही प्रकाश करी ॥ ६५ ॥
कान आणि ऐकणे, त्वचा आणि स्पर्श जाणणे, डोळा आणि पाहणे, जिव्हा आणि रस घेणे, नाक आणि सुगंध घेणे. या सर्वांना आत्माच प्रकाशित करतो. (१०६५)

एव धर्म धर्मीसहित । सत्रा प्रकार हे उमटत ।
जीवही त्यांत प्रतिबिंबत । त्यातेंही प्रकाश करी ॥ ६६ ॥
अशा प्रकारे हे सतरा प्रकार, त्यांचे धर्म आणि धर्मी, त्यांमध्ये जीवही प्रतिबिंबित होतो. त्या सर्वांनाही आत्माच प्रकाशित करतो. (१०६६)

हे असो देहविषय । जडत्वेहि जो समुदाय ।
सन्निध दूर व्यष्टिसमष्टिमय । त्यातेंही प्रकाश करी ॥ ६७ ॥
हे असू द्या. देह आणि त्याचे विषय, हा जो जड पदार्थांचा समुदाय आहे, जे पदार्थ जवळ आहेत. जे दूर आहेत, जे व्यष्टिरूप आहेत, जे समष्टिरूप आहेत; त्या सर्वांना आत्माच प्रकाशित करतो. (१०६७)

अंतःकरणवृत्ति वाचूच्या चळणें । पंचज्ञानेंद्रियद्वारा विषय घेणे ।
पंचक्रियेसहित जे जागति ह्मणणें ।त्यातेंही प्रकाश करी ॥ ६८ ॥
वायूच्या चलनामुळे निर्माण होणारी अंत: करणवृत्ती, पंच ज्ञानेंद्रियाच्या साहाय्याने विषयांचे ग्रहण करणे, पच कर्मेद्रियानी कर्मे करणे. या सर्वांना मिळून जागृती असे म्हणतात, तिलाही आत्माच प्रकाशित करतो. (१०६८)

प्रत्यक्ष स्थूलविषय त्यागून । अंतरी वृत्तीचे सध्यास मनन ।
तया कल्पनेसी नांव स्वप्न । त्यातेंही प्रकाश करी ॥ ६९ ॥
प्रत्यक्ष स्थलविषय वर्ज्य करून आणि अंतःकरणात वृत्तींच्या साहाय्याने ध्यासयुक्त मनन करणे, या कल्पनाप्रकाराला स्वप्न असे म्हणतात आत्मा त्यालाही प्रकाशित करतो. (१०६९)

काहीही व्यापार न व्हावे । उर्गेचि स्तब्धपणे असावें ।
सुपुसि बोलिजे याचि नांवे । त्यातेंही प्रकाश करी ॥ ७० ॥
काहीही व्यापार न करता उगेपणाने स्तब्ध राहाणे, याला सुषुप्ती म्हणतात. तिलाही आत्माच प्रकाशित करतो. (१०७०)

उगाचि प्रकाश मात्र करावा । त्याचा विकार न ध्यावा ।
अथवा हें प्रकाशिलें व्या सर्वा । हा हेतुही नसे ॥ ७१ ॥
उगीच प्रकाश करावा, त्याचा (उष्णता, डोळे दिपवणे) विकार घेऊ नये किंवा हे मी प्रकाशित केले आहे, असा हेतूही नसावा. (१०७१)

हेंचि स्वप्रकाश चिडूप । तें सविकल्पना निर्विकल्प ।
जें जे महान अथवा अल्प । प्रकाशवावें ॥ ७२ ॥
हेच स्वयंप्रकाशी ब्रह्माचे चिदूप होय. ते सविकल्प नाही. तसेच निर्विकल्पही नाही; जे काही लहानथोर भेटेल त्याला प्रकाशित करावे हे त्याचे लक्षणच आहे. (१०७२)

दबाधा व्यापार ते जागति । नुसती कल्पना ते स्वप्नस्थिति ।
उगेपणा नेणीव ते सुसि । एव जागरीं तिन्ही अवस्था ॥ ७३ ॥
दहा प्रकारचे व्यापार जेथे चालतात ती जागृतीची अवस्था होय, केवळ त्या व्यापारांची कल्पना ही स्वप्नस्थिती होय आणि उगेपणा आणि अज्ञान ही सुपुसी होय. जागृतीच्या अवस्थेत या तिन्ही अवस्थांचा अनुभव येतो. (१०७३)

ऐसिया कोणत्याही व्यापारा । जीवासहित या आभासमात्रा ।
प्रकाश करीतसे निर्धारा येकले ज्ञान सामान्य ॥ ७४ ॥
वरीलपैकी कोणत्याही व्यापाराला, मग तो जीवासहित असो वा केवळ कल्पनारूप असो (आभासरूप), निश्चितपणे जे प्रकाशित करते, ते एकमेव सामान्य ज्ञानच होय. (१०७४)

येथे आवाका करिसी ऐशी । किंचित्यभा प्रकाशी सर्वाशी ।
तरी जीवे कीजे कोण कार्यासी । वृत्तींत प्रतिबिंबोनी ॥ ७५ ॥
येथे तू शंका काढशील की, थोडासासुद्धा प्रकाश सर्वांना प्रकाशित करतो तर मग वृत्तीत प्रतिबिंबित होऊन जीवाने कोणते कार्य करावे ? (१०७५)

तरी ऐके दृष्टांतयुक्त । बोलिजे जीवाचे जें कुत ।
आणि पराचे प्रकाश वर्तत । तेंही स्पष्ट कळे ॥ ७६ ॥
तर ऐक. जीव काय कार्य करतो, ते दृष्टान्ताच्या साहाय्याने सांगतो. त्याचबरोबर जीव हा दुसऱ्याच्या प्रकाशात वावरतो, हेही स्पष्ट होईल. (१०७६)

GO TOP