॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ षोडशोऽध्यायः - अध्याय सोळावा ॥

श्रीराम उवाच -
भगवन्मोक्षमार्गो यस्त्वया सम्यगुदाहृतः ।
तत्राधिकारिणं ब्रूहि तत्र मे संशयो महान् ॥ १ ॥
राम म्हणाला, हे भगवन् तूं जो हा मोक्षमार्ग उत्तम वर्णिलास ह्याविषयीं अधिकारी कोण हे सांग. याविषयी मला मोठा संशय आहे. १.

श्रीभगवानुवाच -
ब्रह्मक्षत्रविशः शूद्राः स्त्रियश्चात्राधिकारिणः ।
ब्रह्मचारी गृहस्थो वा।आनुपनीतोऽथवा द्विजः ॥ २ ॥
वनस्थो वाऽवनस्थो वा यतिः पाशुपतव्रती ।
बहुनात्र किमुक्तेन यस्य भक्तिः शिवार्चने ॥ ३ ॥
स एवात्राधिकारी स्यान्नान्यचित्तः कथंचन ।
जडोऽन्धो बधिरो मूको निःशौचः कर्मवर्जितः ॥ ४ ॥
अज्ञोपहासकाभक्ता भूतिरुद्राक्षधारिणः ।
लिंगिनो यश्च वा द्वेष्टि ते नैवात्राधिकारिणः ॥ ५ ॥
शंकर म्हणाले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्रिया, ब्रह्मचारी, गृहस्थ, अनुपनीत, अथवा उपनीत, द्विज, वानप्रस्थ, विधुर संन्यासी, पाशुपतव्रत करणारा, हे सर्व ह्याविषयी अधिकारी आहेत. फार काय सांगू ? शिवार्चनाविषयीं ज्याला भक्ति असेल तोच ह्याविषयी अधिकारी आणि ज्याचे चित्त अन्यत्र आसक्त असेल तो अधिकारी नाहीं. तसेंच मूर्ख, आंधळे, बहिरे, मुके, शौचाचारहीन, (स्नानसंध्यादि) विहित कर्में न करणारे, अज्ञजनांचा उपहास करणारे, भक्तिहीन, आणि विभूति व रुद्राक्ष धारण करणार्‍या पाशुपतव्रत्याचा द्वेष करणारे, हे सर्व अनधिकारी होत. २-५.

यो मां गुरुं पाशुपतं व्रतं द्वेष्टि धराधिप ।
विष्णुं वा न स मुच्येत जन्मकोटिशतैरपि ॥ ६ ॥
गुरुरूप जो मी त्या माझा, पाशुपतव्रताचा व विष्णूचा जो द्वेष करतो, तो कोटि जन्मांनीही मुक्त होणार नाहीं. ६.

अनेककर्मसक्तोऽपि शिवज्ञानविवर्जितः ।
शिवभक्तिविहीनश्च संसारान्नैव मुच्यते ॥ ७ ॥
अनेक यज्ञ यागादि कर्मे करणारा असला तथापि ज्याला शिवरूपाचे ज्ञान नाहीं, व जो शिवभक्तिहीन, तो संसारांतून कधीच मुक्त होत नाहीं. ७.

आसक्ताः फलरागेण ये त्ववैदिककर्मणि ।
दृष्टमात्रफलास्ते तु न मुक्तावधिकारिणः ॥ ८ ॥
जे केवळ फलाच्या लोभाने वेदबाह्य कर्माचें ठिकाणी आसक्त झालेले असतात, ते केवळ दृष्टमात्रफल म्हणून, मोक्षाविषयीं अधिकारी नाहींत. ८.

अविमुक्ते द्वारकायां श्रीशैले पुण्डरीकके ।
देहान्ते तारकं ब्रह्म लभते मदनुग्रहात् ॥ ९ ॥
तशी कांहीं क्षेत्रेंही मोक्षदायक आहेत. काशी, द्वारका, श्रीशैलपर्वत, व्याघ्रपूर ह्या क्षेत्रीं देहान्त झाल्यास माझ्या प्रसादानें संसाराचे तारक असे ब्रह्म पावतो. ९.

यस्य हस्तौ च पादौ च मनश्चैव सुसंयतम् ।
विद्या तपश्च कीर्तिश्च स तीर्थफलमश्नुते ॥ १० ॥
विप्रस्यानुपनीतस्य विधिरेवमुदाहृतः ।
नाभिव्याहारयेद्ब्रह्म स्वधानिनयनादृते ॥ ११ ॥
ज्याचे हात, पाय व मन हीं इंद्रियें नियमित मार्गानेच वागणारी आहेत. तसेच विद्या, तप आणि कीर्ति ह्यांपासून ज्याला गर्व झाला नाही त्यालाही द्वारकादि क्षेत्रीं देहान्त झाल्याने प्राप्त होणारे फल प्राप्त होते. जो ब्राह्मण अनुपनीत आहे त्याचा याप्रमाणे अधिकार सांगितला. त्याने श्राद्धप्रसंगाखेरीज वेदमंत्रांचा उच्चार करू नये. १०-११.

स शूद्रेण समस्तावद्यावद्वेदान्न जायते ।
नामसंकीर्तने ध्याने सर्व एवाधिकारिणः ॥ १२ ॥
त्याला उपनयनाने प्राप्त होणारे दुसरें 'सावित्र' जन्म जोंपर्यंत प्राप्त झाले नाहीं तोंपर्यंत तो शूद्रसमान आहे. नामसंकीर्तन आणि ध्यान हीं करण्याविषयी सर्वच अधिकारी आहेत. १२.

संसारान्मुच्यते जन्तुः शिवतादात्म्यभावनात् ।
तथा दानं तपो वेदाध्ययनं चान्यकर्म वा ।
सहस्रांशं तु नार्हन्ति सर्वदा ध्यानकर्मणः ॥ १३ ॥
मी शिवरूप आहे-असें जर प्राणी शिवाचे ध्यान करील तर संसारापासून मुक्त होईल. कारण, दान, तप, वेदाध्ययन किंवा इतर कोणतीही कर्में ह्यांना, ह्या ध्यानयोगाच्या सहस्रांशाचीही योग्यता नाहीं. १३.

जातिमाश्रममङ्गानि देशं कालमथापि वा ।
आसनादीनि कर्माणि ध्यानं नापेक्षते क्वचित् ॥ १४ ॥
जाति, आश्रम, अंगें, देश, काल किंवा आसनादि साधने यांची ध्यानयोगाला अपेक्षा नाहीं. १४.

गच्छंस्तिष्ठन् जपन्वापि शयानो वान्यकर्मणि ।
पातकेनापि वा युक्तो ध्यानादेव विमुच्यते ॥ १५ ॥
तर चालतांना, बोलतांना, उभा राहून, निजून, किंवा दुसरें कांहीं काम करीत असतां अथवा मोठा पापी असूनही जर तो ध्यान योग करील तर खचित मुक्त होईल, १५.

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ १६ ॥
या योगाविषयी आरंभ केलेल्या कर्मांचा नाश होत नाहीं; याला संकट येत नाही. या धर्माचे थोडे जरी अनुष्ठान झाले तरी ते मोठ्या भयापासून रक्षण करते. १६.

आश्चर्ये वा भये शोके क्षुते वा मम नाम यः ।
व्याजेनापि स्मरेद्यस्तु स याति परमां गतिम् ॥ १७ ॥
आश्चर्य, भय अथवा शोक प्राप्त झाला असतां अथवा शिंक आली असतां कोणत्या तरी मिषानें का होईना, जो माझे नाम स्मरेल तो परम गति पावेल. १७.

महापापैरपि स्पृष्टो देहान्ते यस्तु मां स्मरेत् ।
पञ्चाक्षरीं वोच्चरति स मुक्तो नात्र संशयः ॥ १८ ॥
महापातकांनी युक्त असूनही जो मरणकालीं माझें स्मरण करून 'नमः शिवाय' ह्या पंचाक्षर मंत्राचा उच्चार करतो तो मुक्त होतो, ह्यांत संशय नाहीं. १८.

विश्वं शिवमयं यस्तु पश्यत्यात्मानमात्मना ।
तस्य क्षेत्रेषु तीर्थेषु किं कार्यं वान्यकर्मसु ॥ १९ ॥
जो आपल्या शुद्ध अंतःकरणाने, आत्मस्वरूपीं हे सर्व विश्व शिवरूप आहे असे पहातो, त्याला क्षेत्रवास, तीर्थसेवन किंवा इतर पुण्यकर्में करण्याची काय जरूर आहे ? १९.

सर्वेण सर्वदा कार्यं भूतिरुद्राक्षधारणम् ।
युक्तेनाथाप्ययुक्तेन शिवभक्तिमभीप्सता ॥ २० ॥
ज्याला शिवभक्तीची अपेक्षा आहे- मग तो योगी असो अथवा नसो - त्या प्रत्येकानें नित्य विभूति आणि रुद्राक्ष यांचे धारण करावे, २०.

नर्यभस्मसमायुक्तो रुद्राक्षान्यस्तु धारयेत् ।
महापापैरपि स्पृष्टो मुच्यते नात्र संशयः ॥ २१ ॥
अग्निहोत्राचे भस्म आणि रुद्राक्ष जो धारण करतो तों, महापातकी असेल तथापि मुक्त होतो, यांत संशय नाहीं. २१.

अन्यानि शैवकर्माणि करोतु न करोतु वा ।
शिवनाम जपेद्यस्तु सर्वदा मुच्यते तु सः ॥ २२ ॥
शिवाच्या आराधनाचीं अन्य कर्मे करो अथवा न करो, जो केवळ सर्वदा शिवनामाचा जप करतो तो मुक्त होतो. २२.

अन्तकाले तु रुद्राक्षान्विभूतिं धारयेत्तु यः ।
महापापोपपापोघैरपि स्पृष्टो नराधमः ॥ २३ ॥
सर्वथा नोपसर्पन्ति तं जनं यमकिंकराः ॥ २४ ॥
मरणकालीं रुद्राक्ष आणि विभूति जो धारण करतो तो, कोट्यवधि महापातकांनी युक्त असा नराधम असला तरी त्याच्याजवळ यमदूत कधीच येत नाहींत. २३-२४.

बिल्वमूलमृदा यस्तु शरीरमुपलिम्पति ।
अन्तकालेऽन्तकजनैः स दूरीक्तियते नरः ॥ २५ ॥
जो बिल्ववृक्षाच्या मूळांतील मृत्तिकेचा अंतकाळीं आपल्या शरीराला लेप करतो त्याला भिऊन यमदूत पळतात. २५.

श्रीराम उवाच -
भगवन्पूजितः कुत्र कुत्र वा त्वं प्रसीदसि ।
तद्ब्रूहि मम जिज्ञासा वर्तते महती विभो ॥ २६ ॥
राम म्हणाला, हे भगवन् ! कोणत्या कोणत्या मूर्तीचे ठायीं पूजा केली असतां तूं प्रसन्न होतोस हे मला सांग; हे विभो ह्याविषयी मला मोठी जिज्ञासा उत्पन्न झाली आहे. २६.

श्रीभगवानुवाच -
मृदा वा गोमयेनापि भस्मना चन्दनेन वा ।
सिकताभिर्दारुणा वा पाषाणेनापि निर्मिता ॥ २७ ॥
लोहेन वाथ रङ्गेण कांस्यखर्परपित्तलैः ।
ताम्ररौप्यसुवर्णैर्वा रत्नैर्नानाविधैरपि ॥ २८ ॥
अथवा पारदेनैव कर्पूरेणाथवा कृता ।
प्रतिमा शिवलिङ्गं वा द्रव्यैरेतैः कृतं तु यत् ॥ २९ ॥
तत्र मां पूजयेत्तेषु फलं कोटिगुणोत्तरम् ॥ ३० ॥
शंकर म्हणाले, मृत्तिका, गोमय, भस्म, चंदन, वाळु, काष्ठ, पाषाण, लोखंड, (केशरादि) रंग, कांस्य, खापरसूत, पितळ, तांबे, रुपें, सुवर्ण, कोणत्या तरी प्रकारचे रत्न, पारा किंवा कापूर ह्यांपैकी कोणत्या तरी द्रव्यानें शिवमूर्ति किंवा शिवलिंग करून, त्या ठिकाणी माझी पूजा करावी म्हणजे त्यापासून कोटिगुणित फल होते. २७-३०.

मृद्दारुकांस्यलोहैश्च पाषाणेनापि निर्मिता ।
गृहिणा प्रतिमा कार्या शिवं शश्वदभीप्सता ।
आयुः श्रियं कुलं धर्मं पुत्रानाप्नोति तैः क्रमात् ॥ ३१ ॥
जो गृहस्थाश्रमी असेल त्याने मृत्तिका, काष्ठ, कांस्य, लोह किंवा पाषाण ह्यांचीच प्रतिमा करावी, त्यापासूनच त्याला नित्य कल्याण प्राप्त होते. मृत्तिकेच्या प्रतिमेपासून आयुष्य, काष्ठाच्या प्रतिमेपासून संपत्ति, कांस्यप्रतिमेपासून कुलवृद्धि, लोहप्रतिमेनें धर्मबुद्धि, पाषाणप्रतिमेपासून पुत्रप्राप्ति, अशी अनुक्रमानें फलें प्राप्त होतात. ३१.

बिल्ववृक्षे तत्फले वा यो मां पूजयते नरः ।
परां श्रियमिह प्राप्य मम लोके महीयते ॥ ३२ ॥
बिल्ववृक्षाचे ठायीं अथवा त्याच्या फलाचे ठायीं जो माझी पूजा करतो तो इहलोकीं अतुल संपत्ति भोगून, देहांती माझ्या लोकीं प्राप्त होतो. ३२.

बिल्ववृक्षं समाश्रित्य यो मन्त्रान्विधिना जपेत् ।
एकेन दिवसेनैव तत्पुरश्चरणं भवेत् ॥ ३३ ॥
बिल्ववृक्षाच्या सन्निध बसून जो कोणत्याही मंत्राचा विधिपूर्वक जप करील त्याला एक दिवस जप केल्यानेंच, पुरश्चरण केल्याचे फल प्राप्त होईल, ३३.

यस्तु बिल्ववने नित्यं कुटीं कृत्वा वसेन्नरः ।
सर्वे मन्त्राः प्रसिद्ध्यन्ति जपमात्रेण केवलम् ॥ ३४ ॥
जो बेलबागेंत पर्णकुटिका करून नित्य वास करील त्याचे सर्व मंत्र, एकवार जप केल्याने सिद्ध होतात. ३४.

पर्वताग्रे नदीतीरे बिल्वमूले शिवालये ।
अग्निहोत्रे केशवस्य संनिधौ वा जपेत्तु यः ॥ ३५ ॥
नैवास्य विघ्नं कुर्वन्ति दानवा यक्षराक्षसः ।
तं न स्पृशन्ति पापानि शिवसायुज्यमृच्छति ॥ ३६ ॥
पर्वताच्या माथ्यावर, नदीच्या तीरावर, बिल्ववृक्षाच्या मूलप्रदेशी, शिवमंदिरांत, अग्निहोत्र्याच्या होमशाळेंत अथवा विष्णूच्या सन्निध, जो कोणत्याही मंत्राचा जप करील त्याला दानव, यक्ष, राक्षस हे विघ्न करीत नाहींत. त्याला पापे स्पर्शही करीत नाहीत, तो शिवसायुज्य पावतो. ३५-३६.

स्थण्डिले वा जले वह्नौ वायावाकाश एव वा ।
गिरौ स्वात्मनि वा यो मां पूजयेत्प्रयतो नरः ॥ ३७ ॥
स कृत्स्नं फलमाप्नोति लवमात्रेण राघव ।
आत्मपूजासमा नास्ति पूजा रघुकुलोद्‌भव ॥ ३८ ॥
पृथिवी, उदक, अग्नि, वायु, आकाश, पर्वत किंवा आत्मा ह्या स्थानी जो भक्तिपूर्वक माझी पूजा करील तो हे राघवा, लवमात्र आराधनानेच संपूर्ण फळ पावेल. हे रामा ! आत्मपूजेसारखी दुसरी पूजाच नाही. ३७-३८.

मत्सायुज्यमवाप्नोति चण्डालोऽप्यात्मपूजया ।
सर्वान्कामानवाप्नोति मनुष्यः कम्बलासने ॥ ३९ ॥
चांडाल देखील आत्मपूजेच्या योगाने माझे सायुज्य पावतो. ( आतां आसनाचे फल सांगतों-) कंबलासनावर बसून पूजन करील तर सर्व मनोरथ पूर्ण होतील. ३९.

कृष्णाजिने भवेन्मुक्तिर्मोक्षश्रीर्व्याघ्रचर्मणि ।
कुशासने भवेज्ज्ञानमारोग्यं पत्रनिर्मिते ॥ ४० ॥
कृष्णाजिनाच्या आसनानें मुक्ति प्राप्त होते. व्याघ्रचर्मासनाने मोक्ष मिळतो. दर्भासनानें ज्ञान प्राप्त होते, पल्लवांनी केलेल्या आसनाने आरोग्य प्राप्त होते. ४०.

पाषाणे दुःखमाप्नोति काष्ठे नानाविधान् गदान् ।
वस्त्रेण श्रियमाप्नोति भूमौ मन्त्रो न सिद्ध्यति ।
प्राङ्मुखोदङ्मुखो वापि जपं पूजां समाचरेत् ॥ ४१ ॥
पाषाणाच्या आसनाने दुःख प्राप्त होतें, काष्ठासनानें अनेक प्रकारचे रोग प्राप्त होतात. वस्त्रावर बसल्याने संपत्ति प्राप्त होते, आणि केवळ भूमीवरच बसून जप केला तर मंत्रसिद्ध होत नाहीं. ४१.

अक्षमालाविधिं वक्ष्ये शृणुष्वावहितो नृप ॥ ४२ ॥
उत्तरेकडे तोंड करून किंवा पूर्वेकडे तोंड करून बसून जप, पूजा इत्यादि कृत्यें करावीं. हे नृपा, आतां जपमालेचा विधि सांगतो ऐक. ४२.

साम्राज्यं स्फाटिके स्यात्तु पुत्रजीवे परां श्रियम् ।
आत्मज्ञानं कुशग्रन्थौ रुद्राक्षः सर्वकामदः ॥ ४३ ॥
स्फटिकमालेनें साम्राज्य प्राप्त होते. पुत्रजीव नामक मण्याने अतिशय संपत्ति प्राप्त होते. दर्भग्रंथींची माला केली तर तीपासून आत्मज्ञान प्राप्त होते. रुद्राक्षांनी सर्व मनोरथ सिद्ध होतात. ४३.

प्रवालैश्च कृता माला सर्वलोकवशप्रदा ।
मोक्षप्रदा च माला स्यादामलक्याः फलैः कृता ॥ ४४ ॥
प्रवालमालेनें सर्व लोक वश होतात. आवळ्याच्या माळेने मोक्ष प्राप्त होतो. ४४.

मुक्ताफलैः कृता माला सर्वविद्याप्रदायिनी ।
माणिक्यरचिता माला त्रैलोकस्य वशंकरी ॥ ४५ ॥
मुक्ताफलांची माला सर्व विद्या देते. माणिकांची माला त्रैलोक्याला वश करते. ४५.

नीलैर्मरकतैर्वापि कृता शत्रुभयप्रदा ।
सुवर्णरचिता माला दद्याद्वै महतीं श्रियम् ॥ ४६ ॥
नील किंवा मरकत मण्याची माला केली तर तिच्यापासून शत्रु भितात. सुवर्णाच्या मण्याची माला केली तर तीपासून मोठी संपत्ति प्राप्त होते. ४६.

तथा रौप्यमयी माला कन्यां यच्छति कामिताम् ।
उक्तानां सर्वकामानां दायिनी पारदैः कृता ॥ ४७ ॥
तशीच रुप्याच्या मण्याची माला केली तर तिच्या योगानें ज्या कन्येची आपण इच्छा करावी ती कन्या आपणाला भार्या प्राप्त होते आणि पार्‍याचे मणी करून त्यांची माला केली तर तीपासून वर सांगितलेले सर्व मनोरथ प्राप्त होतात. ४७.

अष्टोत्तरशता माला तत्र स्यादुत्तमोत्तमा ।
शतसंख्योत्तमा माला पञ्चाशन्मध्यमा मता ॥ ४८ ॥
चतुः पञ्चशती यद्वा अधमा सप्तविंशतिः ।
अधमा पञ्चविंशत्या यदि स्याच्छतनिर्मिता ॥ ४९ ॥
पञ्चाशदक्षराण्यत्रानुलोमप्रतिलोमतः ।
इत्येवं स्थापयेत्स्पष्टं न कस्मैचित्प्रदर्शयेत् ॥ ५० ॥
वर्णैर्विन्यस्तया यस्तु क्रियते मालया जपः ।
एकवारेण तस्यैव पुरश्चर्या कृता भवेत् ॥ ५१ ॥
मालेचे मणि अष्टोत्तरशत असावे हें फारच उत्तम, शंभर मणि असणे हे उत्तम, पन्नास मध्यम किंवा चौपन्नही मध्यमच, सत्तावीस अधम आणि पंचवीस तर अति अधम. आता शंभर मण्यांची माला असेल तर ' अ ' पासून ' ळ ' पर्यंत पन्नास अक्षरे एकवेळ अनुक्रमाने आणि एक वेळ उलट मोजून 'ळ ' ह्यास मेरु कल्पून मालेच्या शंभर मण्यांवर ह्या वर्णाचा न्यास करून माला तयार करावी व कोणाला दाखवू नये. अशा वर्णविन्यास केलेल्या मालेने एकवार जप केल्यानेच पुरश्चरण केल्यासारखे होते. ४८-५१.

सव्यपार्ष्णिं गुदे स्थाप्य दक्षिणं च ध्वजोपरि ।
योनिमुद्राबन्ध एष भवेदासनमुत्तमम् ॥ ५२ ॥
डाव्या पायाची खोट गुदस्थानावर ठेवून उजव्या पायाची खोंट लिंगावर ठेवावी आणि आसन घालावे. ह्या आसनाला 'योनिबंध' असें म्हणतात. हे सर्वांत उत्तम आसन होय. ५२.

योनिमुद्रासने स्थित्वा प्रजपेद्यः समाहितः ।
यं कंचिदपि वा मन्त्रं तस्य स्युः सर्वसिद्धयः ॥ ५३ ॥
ह्या योनिमुद्रासनावर बसून, एकाग्र चित्तानें कोणत्याही मंत्राचा जप केला असतां सर्व सिद्धि प्राप्त होतात. ५३.

छिन्ना रुद्धाः स्तम्भिताश्च मिलिता मूर्छितास्तथा ।
सुप्ता मत्ता हीनवीर्या दग्धास्त्रस्तारिपक्षगाः ॥ ५४ ॥
बाला यौवनमत्तश्च वृद्धा मन्त्राश्च ये मताः ।
योनिमुद्रासने स्थित्वा मन्त्रानेवंविधान् जपेत् ॥ ५५ ॥
छिन्न, रुद्ध, स्तंभित, मिलित, मूर्छित, सुप्त, मत्त, हीनवीर्य, दग्ध, त्रस्त, शत्रुपक्षग, बाल, यौवन, मत्त, वृद्ध इत्यादि कोणत्याही प्रकारानें मंत्र दूषित झाले असतां, योनिमुद्रासनावर बसून त्याचा जप करावा. ५४-५५.

तत्र सिद्ध्यन्ति ते मन्त्रा नान्यस्य तु कथंचन ।
ब्राह्मं मुहूर्तमारभ्यामध्याह्नं प्रजपेन्मनुम् ॥ ५६ ॥
म्हणजे ते सर्व मंत्र सिद्ध होतात. नाहीं तर व्यर्थ होतात. मंत्राचा जप करणें तो ब्रह्ममुहूर्तापासून [उषःकालापासून ] मध्यान्हापर्यंतच करावा. ५६.

अत ऊर्ध्वं कृते जाप्ये विनाशाय भवेद्ध्रुवम् ।
पुरश्चर्याविधावेवं सर्वकाम्यफलेष्वपि ॥ ५७ ॥
मध्यान्हापुढे जप केल्याने नाश होतो. पुरश्चरण किंवा कोणताही सकाम जप ह्यांविषयी हा विधि आहे. ५७.

नित्ये नैमित्तिके वापि तपश्चर्यासु वा पुनः ।
सर्वदैव जपः कार्यो न दोषस्तत्र कश्चन ॥ ५८ ॥
नित्य, नैमित्तिक आणि तपश्चर्या ह्यांना हा नियम लागू नाही. त्या कर्मासंबंधींचा जप सर्वकाल करावा. त्याला कांहीं दोष नाहीं. ५८.

यस्तु रुद्रं जपेन्नित्यं ध्यायमानो ममाकृतिम् ।
षडक्षरं वा प्रणवं निष्कामो विजितेन्द्रियः ॥ ५९ ॥
तथाथर्वशिरोमन्त्रं कैवल्यं वा रघूत्तम ।
स तेनैव च देहेन शिवः संजायते स्वयम् ॥ ६० ॥
हे रघूत्तमा, जो इंद्रिये जिंकून माझ्या मूर्तीचें ध्यान करून निष्काम बुद्धीनें रुद्रजप करील अथवा ॐ नमः शिवाय या षडक्षरमंत्राचा जप करील तसेच अथर्वशीर्ष किंवा कैवल्योपनिषद् ह्यांचा जप करील, तो त्याच देहाने शिवसायुज्य पावेल. ५९-६०.

अधीते शिवगीतां यो नित्यमेतां जितेन्द्रियः ।
शृणुयाद्वा स मुक्तः स्यात्संसारान्नात्र संशयः ॥ ६१ ॥
जो जितेंद्रिय होत्साता ह्या शिवगीतेचे नित्य अध्ययन करील, अथवा जो श्रवण करील, तो, संसारापासून मुक्त होईल, ह्यांत संशय नाहीं. ६१.

सूत उवाच -
एवमुक्त्वा महादेवस्तत्रैवान्तरधीयत ।
रामः कृतार्थमात्मानममन्यत तथैव सः ॥ ६२ ॥
सूत म्हणाला, भगवान् शंकर ह्याप्रमाणे रामाला शिवगीतेचा उपदेश करून त्याच ठिकाणीं अंतर्धान पावले. रामचंद्रही आपणाला कृतकृत्य मानिता झाला. ६२.

एवं मया समासेन शिवगीता समीरिता ।
एतां यः प्रजपेन्नित्यं शृणुयाद्वा समाहितः ॥ ६३ ॥
एकाग्रचित्तोयो मर्त्यस्तस्य मुक्तिः करे स्थिता ।
अतः शृणुध्वं मुनयो नित्यमेतां स्माहिताः ॥ ६४ ॥
ह्याप्रमाणें ही शिवगीता मीं संक्षेपाने तुम्हांला वर्णन केली. हिचा नित्य एकाग्रचित्तानें जो पाठ करील अथवा श्रवण करील त्याला मुक्ति म्हणजे केवळ हातावर आहे. म्हणून हे ऋषिहो ! तुम्ही नित्य एकाग्र चित्तानें हिचे श्रवण करा. ६३-६४.

अनायासेन वो मुक्तिर्भविता नात्र संशयः ।
कायक्लेशो मनःक्षोभो धनहानिर्न चात्मनः ॥ ६५ ॥
पीडास्ति श्रवणादेव यस्मात्कैवल्यमाप्नुयात् ।
शिवगीतामतो नित्यं शृणुध्वमृषिसत्तमाः ॥ ६६ ॥
हिच्या श्रवणमात्राने अनायासाने मुक्ति प्राप्त होते ह्यांत शंका नाहीं. ह्यांत शरीरक्लेश नाही, मानसिक क्लेश नाहीं, धनव्ययही नाहीं, स्वतःला कोणतीच पीडा नाहीं. केवळ श्रवणानेंच कैवल्यमुक्ति प्राप्त होते; म्हणून हे ऋषीश्वरहो ! तुम्ही नित्य शिवगीता श्रवण करा. ६५-६६.

ऋषय ऊचुः -
अद्यप्रभृति नः सूत त्वमाचार्यः पिता गुरुः ।
अविद्यायाः परं पारं यस्मात्तारयितासि नः ॥ ६७ ॥
हे ऐकून शौनकादिक ऋषि म्हणाले, हे सूता ! आजपासून तूं आमचा आचार्य, तूंच पिता, तूंच गुरु. कारण मायेच्या परतीराला आज तूं आह्मांला पोचविलेंस. ६७.

उत्पादकब्रह्मदात्रोर्गरीयान् ब्रह्मदः पिता ।
तस्मात्सूतात्मज त्वत्तः सत्यं नान्योऽस्ति नो गुरुः ॥ ६८ ॥
आपल्याला जन्म देणारा आणि ब्रह्मज्ञान देणारा या दोघां पित्यांमध्ये ब्रह्मज्ञान देणार्‍या पित्याची योग्यता विशेष. तस्मात् हे सूता, तुझ्याहून आम्हांला दुसरा कोणीच श्रेष्ठ गुरु नाहीं. ६८.

व्यास उवाच -
इत्युक्त्वा प्रययुः सर्वे सायंसंध्यामुपासितुम् ।
स्तुवन्तः सूतपुत्रं ते संतुष्टा गोमतीतटम् ॥ ६९ ॥
व्यास म्हणाले, असे बोलून ते सर्व ऋषि संतुष्ट होत्साते सूताची स्तुति करीत सायंसंध्योपासनाकरितां गौतमी नदीवर गेले. ६९.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
गीताधिकारिनिरूपणं नाम षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
॥ इति श्रीमच्छिवगीता समाप्ता ॥
॥ इति षोडशोऽध्यायः ॥ १६ ॥
॥ इति श्रीमच्छिवगीता समाप्ता ॥

GO TOP