॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ द्वादशोऽध्यायः - अध्याय बारावा ॥

श्रीराम उवाच -
भगवन्देवदेवेश नमस्तेऽस्तु महेश्वर ।
उपासनविधिं ब्रूहि देशं कालं च तस्य तु ॥ १ ॥
अङ्गानि नियमांश्चैव मयि तेऽनुग्रहो यदि ॥
ईश्वर उवाच -
शृणु राम प्रवक्ष्यामि देशं कालमुपासने ॥ २ ॥
सर्वाकारोऽहमेवैकः सच्चिदानन्दविग्रहः ।
मदंशेन परिच्छिन्ना देहाः सर्वदिवौकसाम् ॥ ३ ॥
राम म्हणाला, हे भगवन्, देवदेवा, हे महेश्वरा, तुला नमस्कार असो, उपासनेचा विधि, स्थान, काल, अंगे आणि नियम हीं सर्व मजवर अनुग्रह करून मला सांग. शंकर म्हणाले, हे रामा, उपासनेचे स्थान व काल मी सांगतों, ऐक. सच्चिदानंदस्वरूपी व सर्वाकार असा मी एकच आहे. सर्व देवांचे देह माझ्या अंशानें मर्यादित आहेत. १-३.

ये त्वन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः ।
तेऽपि मामेव राजेन्द्र यजन्त्यविधिपूर्वकम् ॥ ४ ॥
म्हणून जे भक्त अन्य देवतांना भक्तिपूर्वक भजतात, ते अविधिपूर्वक का होईना पण मलाच भजतात. ४.

यस्मात्सर्वमिदं विश्वं मत्तो न व्यतिरिच्यते ।
सर्वक्रियाणां भोक्ताहं सर्वस्याहं फलप्रदः ॥ ५ ॥
ज्याअर्थी हे सर्व विश्व माझ्याहून भिन्न नाहीं, तस्मात् सर्व कर्मांचा भोक्ता मीच व फलदाताही मीच आहे. ५.

येनाकारेण ये मर्त्या मामेवैकमुपासते ।
तेनाकारेण तेभ्योऽहं प्रसन्नो वाञ्छितं ददे ॥ ६ ॥
जे मनुष्य ज्या रूपाने माझी उपासना करतात त्यांना त्या रूपाने प्रसन्न होऊन मी वांछित फल देतों. ६.

विधिनाऽविधिना वापि भक्त्या ये मामुपासते ।
तेभ्यः फलं प्रयच्छामि प्रसन्नोऽहं न संशयः ॥ ७ ॥
विधीनें [सर्वांतर्यामी ईश्वर एकच आहे अशा बुद्धीनें] अथवा अविधीनें [=आपल्याला इष्ट जी देवता तोच काय तो ईश्वर अशा बुद्धीने,] परंतु भक्तिपूर्वक, जे मला भजतात त्यांना मी प्रसन्न होऊन अभीष्ट फल देतों यांत संशय नाहीं. ७.

अपि चेत्सुदुराचारो भजते मामनन्यभाक् ।
साधुरेव स मन्तव्यः सम्यग्व्यवसितो हि सः ॥ ८ ॥
कितीही दुराचारी असो, परंतु, जर अनन्यभावाने मला भजेल तर त्याची बुद्धि, माझ्याठायी चांगली निश्चय पावली म्हणून, तो मोठा पुण्यवानच आहे असे समजावें. ८.

स्वजीवत्वेन यो वेत्ति मामेवैकमनन्यधीः ।
तं न स्पृशन्ति पापानि ब्रह्महत्यादिकान्यपि ॥ ९ ॥
जो एकनिष्ठबुद्धि होऊन आपल्या जीवात्म्याशी मला एकरूप पाहील त्याला ब्रह्महत्यादि महापातकेंही स्पर्श करीत नाहींत. ९.

उपासाविधयस्तत्र चत्वारः परिकीर्तिताः ।
सम्पदारोपसंवर्गाध्यासा इति मनीषिभिः ॥ १० ॥
उपासनाविधीचे प्रकार संपत्, आरोप, संवर्ग आणि अभ्यास असे चार ज्ञात्यांनीं सांगितले आहेत. १०.

अल्पस्य चाधिकत्वेन गुणयोगाद्विचिन्तनम् ।
अनन्तं वै मन इति सम्पद्विधिरुदीरितः ॥ ११ ॥
मनाच्या वृत्ति अनंत आहेत म्हणून, अल्पवस्तूचे ठायीं अनंत गुणांची संभावना करून अनंतत्वानें चिंतन करणे हा संपत् विधि होय. ११.

विधावारोप्य योपासा सारोपः परिकीर्तितः ।
यद्वदोङ्कारमुद्गीथमुपासीतेत्युदाहृतः ॥ १२ ॥
एकदेशावर [ विधि ] सर्व उपास्यवस्तूंचा आरोप करून जी उपासना करणें, जशी ॐकाराची उद्गीथसामरूपानें उपासना करणे हा आरोप विधि होय. १२.

आरोपो बुद्धिपूर्वेण य उपासाविधिश्च सः ।
योषित्यग्निमतिर्यत्तदध्यासः स उदाहृतः ॥ १३ ॥
बुद्धिपूर्वक म्ह० कोणत्या एका वस्तूच्या ठिकाणी विवक्षित धर्माचा आरोप करून त्याची उपासना करणे - जसा स्त्रीवर अग्नीचा आरोप ( ? )हा अध्यास होय. १३.

क्रियायोगेन चोपासाविधिः संवर्ग उच्यते ।
संवर्तवायुः प्रलये भूतान्येकोऽवसीदति ॥ १४ ॥
कर्मयोगानें जी उपासना, तो संवर्गविधि होय. [ संवर्ग-एकत्र करणे वश करणे ] जसा संवर्तनामक वायु प्रलयकालीं सर्व भूतांना एकत्र करतो ( अथवा नाश करतो ). १४.

उपसंगम्य बुद्ध्या यदासनं देवतात्मना ।
तदुपासनमन्तः स्यात्तद्बहिः सम्पदादयः ॥ १५ ॥
गुरूपासून प्राप्त झालेल्या ज्ञानाने, देवता आणि आपण ह्यांत अभेद मानणें ही अंतरंग उपासना होय. संपदादिक उपासना या बहिरंग आहेत. १५.

ज्ञानान्तरानन्तरितसजातिज्ञानसंहतेः ।
सम्पन्नदेवतात्मत्वमुपासनमुदीरितम् ॥ १६ ॥
उपास्य देवतेचे ध्यान करीत असतां इतर विषयांचे योगाने त्याला विघ्न न येतां ज्याचें ध्यान सतत राहूं लागेल व देवता आणि आपण यांत अभेद दिसू लागेल तोपर्यंत उपासना करावी असे सांगितले आहे. १६.

सम्पदादिषु बाह्येषु दृढबुद्धिरुपासनम् ।
कर्मकाले तदङ्गेषु दृष्टिमात्रमुपासनम् ।
उपासनमिति प्रोक्तं तदङ्गानि ब्रुवे शृणु ॥ १७ ॥
संपदादिक जे चार बाह्य उपासनेचे प्रकार त्यांत बुद्धीचे दृढत्व हाच उपासनेचा परमावधि आहे. सगुणमूर्तीची उपासना असेल तर, पूजादि कर्मकाली मूर्तीच्या अंगाचे ठायीं अक्षयदृष्टि ठेवणे, हेंच उपासन होय असे म्हटले आहे. आतां उपासनेचीं अंगें सांगतों तीं ऐक. १७.

तीर्थक्षेत्रादिगमनं श्रद्धां तत्र परित्यजेत् ।
स्वचित्तैकाग्रता यत्र तत्रासीत सुखं द्विजः ॥ १८ ॥
आतां उपासनेला योग्य असा देश सांगतों; तीर्थक्षेत्रादिकांचे ठायीं केलेलेंच उपासन श्रेष्ठ अशी श्रद्धा टाकून द्यावी. आपल्या अंतःकरणाची ज्या ठिकाणी एकाग्रता होईल त्या जागी स्वस्थ बसून उपासना करावी. १८.

कम्बले मृदुतल्पे वा व्याघ्रचर्मणि वास्थितः ।
विविक्तदेशे नियतः समग्रीवशिरस्तनुः ॥ १९ ॥
अत्याश्रमस्थः सकलानीन्द्रियाणि निरुध्य च ।
भक्त्याथ स्वगुरुं नत्वा योगं विद्वान्प्रयोजयेत् ॥ २० ॥
कंबल, मृदु असे कार्पासवस्त्राचे आसन अथवा व्याघ्रचर्म ह्यांच्यावर बसून एकान्त प्रदेशीं इंद्रिये जिंकून मान व सर्व शरीर सरळ करून विधिपूर्वक भस्म धारण करून, सकल इंद्रियांचा निरोध करून, भक्तीनें गुरूला वंदन करून योगाचा अभ्यास करावा. १९-२०.

यस्त्वविज्ञानवान्भवत्ययुक्तमनसा सदा ।
तस्येन्द्रियाण्यवश्यानि दुष्टाश्वाइव सारथेः ॥ २१ ॥
जो अंतःकरण योगयुक्त असल्यामुळें, विवेकशून्य आहे त्याला इंद्रियें वश होत नाहींत. सारथ्याला वाईट अश्व वश होत नाहींत तद्वत्. २१.

विज्ञानी यस्तु भवति युक्तेन मनसा सदा ।
तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथेः ॥ २२ ॥
जो सदा योगयुक्त मनानें विज्ञानयुक्त असतो त्याला सर्व इंद्रियें वश होतात. चांगले अश्व सारथ्याला तद्वत्. २२.

यस्त्वविज्ञानवान् भवत्यमनस्कः सदाऽशुचिः ।
न स तत्पदमाप्नोति संसारमधिगच्छति ॥ २३ ॥
जो विवेकशून्य, अजितचित्त व सर्वदा शौचरहित असतो त्याला ते पद प्राप्त होत नाही, तर तो निरंतर संसारांतच राहतो. २३.

विज्ञानी यस्तु भवति समनस्कः सदा शुचिः ।
स तत्पदमवाप्नोति यस्माद्‌भूयो न जायते ॥ २४ ॥
आतां जो विवेकी स्थिरचित्त, बाह्याभ्यंतर शौचसंपन्न असतो तो जेथें गेलें असतां प्राणी पुनः जन्म पावत नाही ते पद पावतो. २४.

विज्ञानसारथिर्यस्तु मनः प्रग्रह एव च ।
सोऽध्वनः पारमाप्नोति ममैव परमं पदम् ॥ २५ ॥
विज्ञान हाच ज्याचा सारथि, मन हाच ज्याचा लगाम, असा जो पुरुष तोच संसारमार्गाचें परतीर असे माझें परमपद [ मोक्ष ] पावतो, २५.

हृत्पुण्डरीकं विरजं विशुद्धं विशदं तथा ।
विशोकं च विचिन्त्यात्र ध्यायेन्मां परमेश्वरम् ॥ २६ ॥
ते हृदयकमल कामादिदोषरहित [विरजं ], शमादिगुणसंपन्न [ विशुद्ध ], निर्मल व शोकरहित असे करून हृदयकमलांत माझे ध्यान करावे. २६.

अचिन्त्यरूपमव्यक्तमनन्तममृतं शिवम् ।
आदिमध्यान्तरहितं प्रशान्तं ब्रह्म कारणम् ॥ २७ ॥
एकं विभुं चिदानन्दमरूपमजमद्‌भुतम् ।
शुद्धस्फटिकसंकाशमुमादेहार्धधारिणम् ॥ २८ ॥
व्याघ्रचर्माम्बरधरं नीलकण्ठं त्रिलोचनम् ।
जटाधरं चन्द्रमौलिं नागयज्ञोपवीतिनम् ॥ २९ ॥
व्याघ्रचर्मोत्तरीयं च वरेण्यमभयप्रदम् ।
पराभ्यामूर्ध्वहस्ताभ्यां बिभ्राणं परशुं मृगम् ॥ ३० ॥
कोटिमध्याह्नसूर्याभं चन्द्रकोटिसुशीतलम् ।
चन्द्रसूर्याग्निनयनं स्मेरवक्त्रसरोरुहम् ॥ ३१ ॥
भूतिभूषितसर्वाङ्गं सर्वाभरणभूषितम् ।
एवमात्मारणिं कृत्वा प्रणवं चोत्तरारणिम् ।
ध्याननिर्मथनाभ्यासात्साक्षात्पश्यति मां जनः ॥ ३२ ॥
अचिंत्यरूप, इयत्तारहित, अंतरहित नाशरहित, कल्याणस्वरूप, ज्याला आदि, मध्य, अंत नाहीं, प्रशांत, बाह्य सर्वांचे कारण, एक, सर्वव्यापक, चिदानंदस्वरूप, रूपरहित, जन्मरहित, आश्चर्ययुक्त, शुद्ध स्फटिकाप्रमाणे ज्याची शरीरकांति, शरीराचे अर्धभागीं उमेला धारण करणारा, व्याघ्रचर्म परिधान केलेला, नीलकंठ, त्रिनेत्र, जटा धारण करणारा, चंद्रशेखर, नागयज्ञोपवीतवान्, व्याघ्रचर्म प्रावरण केलेला, सर्वश्रेष्ठ, भक्ताला अभय देणारा, पाठिमागील वरच्या दोन हातांनी परशु आणि मृग ही आयुधें धारण करणारा, मध्याह्नकालच्या कोटि सूर्यांप्रमाणे प्रभासंपन्न, कोटि चंद्रांप्रमाणे शीतल, चंद्र-सूर्य-अग्नि हे ज्याचे नेत्र आहेत, मुखकमल हास्ययुक्त असलेला, ज्याचे सर्वांग विभूतीने शोभत आहे, सर्व अलंकारांनी भूषित, असा जो मी महेश्वर त्या मला, जीवात्मा हा अधरारणि [ अरणि=काष्ठ], ॐकार हा उत्तरारणि आणि ध्यान हें मंथन असा ध्यानाचा अभ्यास केल्याने मनुष्य साक्षात् पहातो. २७-३२.

वेदवाक्यैरलभ्योऽहं न शास्त्रैर्नापि चेतसा ।
ध्यानेन वृणुते यो मां सर्वदाहं वृणोमि तम् ॥ ३३ ॥
मी वेदवाक्यांनी, शास्त्रांनी किंवा अंत:करणानें प्राप्य नाही. तर ध्यानाने जो मला भजेल त्याला मी कधी सोडीत नाहीं. ३३.

नाविरतो दुश्चरितान्नाशान्तो नासमाहितः ।
नाशान्तमानसो वापि प्रज्ञानेन लभेत माम् ॥ ३४ ॥
जो पापाविषयी पराङ्मुख झाला नाहीं, ज्याची तृष्णा शांत झाली नाही, ज्याचे अंतःकरण समाधान पावलें नाहीं, ज्याचे मन चंचल आहे अशा मनुष्याला केवल शास्त्राध्ययनाने मी प्राप्त होत नाहीं. ३४.

जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादिप्रपञ्चो यः प्रकाशते ।
तद्‌ब्रह्माहमिति ज्ञात्वा सर्वबन्धैः प्रमुच्यते ॥ ३५ ॥
जागृति, स्वप्न आणि सुषुप्ति ह्या तिन्हीं अवस्थेतील प्रपंच, ज्या ब्रह्मस्वरूपावर प्रकाशमान आहे ते ब्रह्म मी आहे, असे जाणल्याने मनुष्य सर्व बंधांपासून मुक्त होतो. ३५.

त्रिषु धामसु यद्‌भोग्यं भोक्ता भोगश्च यद्‌भवेत् ।
तज्ज्योतिर्लक्षणः साक्षी चिन्मात्रोऽहं सदाशिवः ॥ ३६ ॥
तिन्ही अवस्थेंत जे भोग्य पदार्थ, जो भोक्ता व त्यांचा जो भोग होतो, या त्रितयाचा प्रकाश रूप, साक्षिरूप असा मीच सदाशिव आहे. ३६.

एको देवः सर्वभूतेषु गूढः
    सर्वव्यापी सर्वभूतान्तरात्मा ।
सर्वाध्यक्षः सर्वभूताधिवासः
    साक्षी चेता केवलो निर्गुणश्च ॥ ३७
एकच देव सर्वभूतीं गूढरूपानें आहे, सर्वव्यापक, सर्व भूतांचा अंतरात्मा, सर्वेश्वर, सर्वांचा आधारभूत, सर्वसाक्षी, चित्तचालक, निर्लेप व निर्गुण असा आहे. ३७.

एको वशी सर्वभूतान्तरात्मा-
    प्येकं बीजं नित्यदा यः करोति ।
तं मां नित्यं येऽनुपश्यन्ति धीरा-
    स्तेषां शान्तिः शाश्वती नेतरेषाम् ॥ ३८ ॥
स्वाधीन, सर्वभूतांतरात्मा, एक देव, तथापि तोच सदा मायारूप प्रपंचबीज प्रकट करतो. अशा मला जे धीर पुरुष नेहमीं पूर्णपणे जाणतात त्यांनाच शाश्वत शांति [ कैवल्यमुक्ति ] प्राप्त होते. इतरांना नाहीं. ३८.

अग्निर्यथैको भुवनं प्रविष्टो
    रूपं रूपं प्रतिरूपो बभूव ।
एकस्तथा सर्वभूतान्तरात्मा
    न लिप्यते लोकदुःखेन बाह्यः ॥ ३९ ॥
जसा अग्नि, ( काष्ठलोहादि दाह्य ) पदार्थात प्रविष्ट झाला असता त्या त्या पदार्थांचे आकार पावतो, तसा आत्मा हा एक असून सर्वांतर्यामी असल्यामुळे उपाधिवशात् भिन्नरूप प्रतीतीला येतो. तथापि हा प्रपंचाहून भिन्न असल्यामुळे सर्व लोकांच्या दु:खाने दुःखित होत नाहीं. ३९.

वेदेह यो मां पुरुषं महान्त-
    मादित्यवर्णं तमसः परस्तात् ।
स एव विद्वानमृतोऽत्र भूया-
    न्नान्यस्तु पन्था अयनाय विद्यते ॥ ४० ॥
या संसारांत महान् , स्वप्रकाश व मायातीत अशा मला परम पुरुष असें जो जाणील तोच मृत्युरहित होईल, मुक्त होईल. या आत्मज्ञानावांचून मोक्षप्राप्तीला दुसरा मार्ग नाहीं. ४०.

हिरण्यगर्भं विदधामि पूर्वं
    वेदांश्च तस्मै प्रहिणोमि योऽहम् ।
तं देवमीड्यं पुरुषं पुराणं
    निश्चित्य मां मृत्युमुखात्प्रमुच्यते ॥ ४१ ॥
प्रथम सृष्टीच्या आरंभीं ब्रह्मदेवाला उत्पन्न करून मी त्याला वेदांचा उपदेश करतों; असा जो स्तुत्य व पुराणपुरुष मी त्या मला आत्मरूपाने निश्चित केल्यानें मनुष्य मृत्यूच्या मुखांतून मुक्त होतो. ४१.

एवं शान्त्यादियुक्तः सन् वेत्ति मां तत्त्वतस्तु यः ।
निर्मुक्तदुःखसंतानः सोऽन्ते मय्येव लीयते ॥ ४२ ॥
ह्याप्रमाणे शांत्यादि गुणांनी युक्त होत्साता तत्त्वतः जो मला जाणतो तो सर्व दुःखपरंपरेपासून मुक्त होऊन अंती माझ्या स्वरूपींच लय पावतो. ४२.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
उपासनाज्ञानफलं नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
॥ इति द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥

GO TOP