॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ सप्तमोऽध्यायः - अध्याय सातवा ॥

श्रीराम उवाच -
भगवन्यन्मया पृष्टं तत्तथैव स्थितं विभो ।
अत्रोत्तरं मया लब्धं त्वत्तो नैव महेश्वर ॥ १ ॥
हे भगवन्, मीं जो प्रश्न केला तो तसाच राहिला. त्याचें आपणाकडून मला उत्तर मिळाले नाहीं. १.

परिच्छिन्नपरीमाणे देहे भगवतस्तव ।
उत्पत्तिः पञ्चभूतानां स्थितिर्वा विलयः कथम् ॥ २ ॥
हे महेश्वर, ज्याची इयत्ता करतां येते त्या तुझ्या देहीं सर्वभूतांची उत्पत्ति, स्थिति आणि नाश होतात हे कसे ? २.

स्वस्वाधिकारसंबद्धाः कथं नाम स्थिताः सुराः ।
ते सर्वे कथं देव भुवनानि चतुर्दश ॥ ३ ॥
तसेच आपापल्या अधिकाराचे पालन करणारे देव, तुझ्या देहांत कसे राहिले व ते सर्व देव आणि चतुर्दश भुवनें हीं मीच आहे, असे जे सांगतोस ते कसें ? ३.

त्वत्तः श्रुत्वापि देवात्र संशयो मे महानभूत् ।
अप्रत्यायितचित्तस्य संशयं छेत्तुमर्हसि ॥ ४ ॥
तुझ्यापासून ह्याचे उत्तर ऐकलें, परंतु चित्ताला विश्वास न आलेल्या माझा संशय जात नाही. तेव्हां हा संशय निरसन करावयास तूंच समर्थ आहेस. ४.

श्रीभगवानुवाच -
वटबीजेऽतिसूक्ष्मेऽपि महावटतरुर्यथा ।
सर्वदास्तेऽन्यथा वृक्षः कुत आयाति तद्वद ॥ ५ ॥
तद्वन्मम तनौ राम भूतानामागतिर्लयः ।
महासैन्धवपिण्डोऽपि जले क्षिप्तो विलीयते ॥ ६ ॥
न दृश्यते पुनः पाकात्कुत आयाति पूर्ववत् ।
प्रातःप्रातर्यथाऽऽलोको जायते सूर्यमण्डलात् ॥ ७ ॥
एवं मत्तो जगत्सर्वं जायतेऽस्ति विलीयते ।
मय्येव सकलं राम तद्वज्जानीहि सुव्रत ॥ ८ ॥
शंकर म्हणाले, हे रामा, जसा अतिसूक्ष्म वटवृक्षाच्या बीजांत मोठा वटवृक्ष सर्वदा असतो. नाही तर तो येतो कोठून ? सांग. तद्वत् माझ्या ह्या सूक्ष्म देहांत सर्व भूतांची उत्पत्ति व नाश होतात. जसा मोठा मिठाचा खडा पाण्यात टाकला असतां तत्काळ विरून जातो, दिसत नाही व त्या उदकाचा पाक केल्याने पुनः पूर्ववत् उत्पन्न होतो. अथवा दररोज प्रातःकाली सूर्यमंडलापासून जसा प्रकाश उत्पन्न होतो, त्याप्रमाणे हे सर्व जगत् माझ्यापासून उत्पन्न होते, माझ्या ठिकाणी राहते व माझ्याच ठायीं लय पावते. तात्पर्य हे सर्व व्यापार माझ्याच ठिकाणी होतात असे जाण. ५-८.

श्रीराम उवाच -
कथितेऽपि महाभाग दिग्जडस्य यथा दिशि ।
निवर्तते भ्रमो नैव तद्वन्मम करोमि किम् ॥ ९ ॥
राम म्हणाला हे महाभागा, दिग्भ्रम झालेल्या मनुष्याला समजावून सांगितले असतांही त्याचा दिग्भ्रम जसा नाहीसा होत नाही, तसे मला हें काय होतें ? ९.

श्रीभगवानुवाच -
मयि सर्वं यथा राम जगदेतच्चराचरम् ।
वर्तते तद्दर्शयामि न द्रष्टुं क्षमते भवान् ॥ १० ॥
भगवान् म्हणाले, हें सर्व चराचरात्मक जगत् माझ्या स्वरूपीं कसें राहते ते तुला दाखवतों. परंतु ते तू पहाण्यास समर्थ नाहींस. १०.

दिव्यं चक्षुः प्रदास्यामि तुभ्यं दशरथात्मज ।
तेन पश्य भयं त्यक्त्वा मत्तेजोमण्डलं ध्रुवम् ॥ ११ ॥
हे दशरथात्मजा, तुला दिव्यदृष्टि देतों, तिनें भय सोडून माझे शाश्वत तेजोमंडल पहा. ११.

न चर्मचक्षुषा द्रष्टुं शक्यते मामकं महः ।
नरेण वा सुरेणापि तन्ममानुग्रहं विना ॥ १२ ॥
मनुष्य, अथवा देवसुद्धां माझ्या अनुग्रहावांचून चर्मचक्षूंनी माझे तेज पहावयास समर्थ नाहींत. १२.

सूत उवाच -
इत्युक्त्वा प्रददौ तस्मै दिव्यं चक्षुर्महेश्वरः ।
अथादर्शयदेतस्मै वक्त्रं पातालसंनिभम् ॥ १३ ॥
सूत म्हणाला, असे बोलून शंकराने त्याला दिव्यदृष्टि दिली आणि आपले पातालासारखें विस्तीर्ण मुख त्याला दाखवले. १३.

विद्युत्कोटिप्रभं दीप्तमतिभीमं भयावहम् ।
तद्दृष्ट्वैव भयाद्रामो जानुभ्यामवनिं गतः ॥ १४ ॥
प्रणम्य दण्डवद्भूमौ तुष्टाव च पुनः पुनः ।
अथोत्थाय महावीरो यावदेव प्रपश्यति ॥ १५ ॥
वक्त्रं पुरभिदस्तत्र अन्तर्ब्रह्माण्डकोटयः ।
चटका इव लक्ष्यन्ते ज्वालामालासमाकुलाः ॥ १६ ॥
कोटिविद्युल्लतांसारखे दैदीप्यमान, अतिशय भीषण, भयंकर असें ते मुख पहातांच भयाने रामचंद्र भूमीवर गुडघे टेकून साष्टांग नमस्कार करून पुनः पुनः स्तुति करता झाला आणि उभा राहून जों पहातो तों त्या त्रिपुरारीच्या मुखांत, दावाग्नीनें होरपळलेल्या चिमण्यांप्रमाणे कोट्यवधि ब्रह्मांडे प्रलयाग्नीच्या ज्वालेनें व्याप्त झालेली दिसू लागली. १४-१६.

मेरुमन्दरविन्ध्याद्या गिरयः सप्तसागराः ।
दृश्यन्ते चन्द्रसूर्याद्याः पञ्च भूतानि ते सुराः ॥ १७ ॥
अरण्यानि महानागा भुवनानि चतुर्दश ।
प्रतिब्रह्माण्डमेवं तद्दृष्ट्वा दशरथात्मजः ॥ १८ ॥
सुरासुराणां संग्रामस्तत्र पूर्वापरानपि ।
विष्णोर्दशावतारांश्च तत्तत्कर्माण्यपि द्विजाः ॥ १९ ॥
पराभवांश्च देवानां पुरदाहं महेशितुः ।
उत्पद्यमानानुत्पन्नान्सर्वानपि विनश्यतः ॥ २० ॥
दृष्ट्वा रामो भयाविष्टः प्रणनाम पुनः पुनः ।
उत्पन्नतत्त्वज्ञानोऽपि बभूव रघुनन्दनः ॥ २१ ॥
मेरु, मंदर, विंध्य इत्यादि पर्वत, सप्तसागर, चंद्र सूर्यादि ग्रह. पंचमहाभूतें, सर्व देव, अरण्यें, मोठेमोठे भुजंग, चतुर्दश भुवनें इत्यादि सर्व प्रत्येक ब्रह्मांडांत असलेले, तसेच देवदैत्यांचे पूर्वी झालेले व पुढे होणारे संग्राम, विष्णूचे दशावतार, त्या त्या अवतारांतील कृत्यें, देवांचे पराजय, शंकरानें त्रिपुराचा केलेला संहार, तसेच उत्पन्न झालेले व होणारे सर्व जीव त्यांतच लय पावत आहेत असें पाहून रामचंद्राला, जरी तत्त्वज्ञान झालें होतें तथापि तो अतिशय भयचकित होऊन वारंवार प्रणाम करू लागला, १७-२१

अथोपनिषदां सारैरर्थैस्तुष्टाव शंकरम् ॥ २२ ॥
आणि उपनिषदांचे सार अशा अर्थांच्या श्लोकांनी शंकराची स्तुति करू लागला. २२.

श्रीराम उवाच -
देव प्रपन्नार्तिहर प्रसीद
    प्रसीद विश्वेश्वर विश्ववन्द्य ।
प्रसीद गङ्गाधर चन्द्रमौले
    मां त्राहि संसारभयादनाथम् ॥ २३ ॥
राम म्हणाला, हे शरणागतदुःखनाशका, हे विश्वेश्वरा, विश्ववंद्या, हे गंगाधरा, हे चंद्रशेखरा, मला प्रसन्न हो आणि संसारभयापासून या अनाथाचे रक्षण कर. २३.

त्वत्तो हि जातं जगदेतदीश
    त्वय्येव भूतानि वसन्ति नित्यम् ।
त्वय्येव शंभो विलयं प्रयान्ति
    भूमौ यथा वृक्षलतादयोऽपि ॥ २४ ॥
हे शंभो, जसें भूमीवर वृक्षलतादि तसें हें जगत् तुझ्यापासून उत्पन्न झालें, नित्य तुझ्याच ठायीं भूतें रहातात आणि तुझ्याठायींच लय पावतात. २४.

ब्रह्मेन्द्र रुद्राश्च मरुद्गणाश्च
    गन्धर्वयक्षाऽसुरसिद्धसङ्घाः ।
गङ्गादि नद्यो वरुणालयाश्च
    वसन्ति शूलिंस्तव वक्त्रयंत्रे ॥ २५ ॥
ब्रह्मदेव, इंद्र, एकादश रुद्र, मरुद्‌गण, गंधर्व, यक्ष, असुर, सिद्ध, गंगादि नद्या, समुद्र हे सर्व तुझ्या मुखांत रहातात. २५.

त्वन्मायया कल्पितमिन्दुमौले
    त्वय्येव दृश्यत्वमुपैति विश्वम् ।
भ्रान्त्या जनः पश्यति सर्वमेत-
    च्छुक्तौ यथा रौप्यमहिं च रज्जौ ॥ २६ ॥
हे भालचंद्रा, तुझ्या मायेने कल्पिलेलें हें विश्व तुझ्याच स्वरूपीं प्रतीतीला येते. शुक्तिकेवर जशी रुप्याची भ्रांति किंवा रज्जूवर सर्पभ्रांति, तशी ही भ्रांति आहे असे जन समजतात. ( वस्तुतः ही भ्रांति तशी नाही. कारण ज्याची भ्रांति होते तो पदार्थ दुसर्‍या कोठे तरी असतो. पण हें जगत् तुझ्या रूपावांचून अन्यत्र कोठेच नाहीं; असे असून लोक ह्याला 'शुक्तिकारजतवत्' भ्रम मानतात हाही मायेचा खेळ आहे). २६.

तेजोभिरापूर्य जगत्समस्तं
    प्रकाशमानः कुरुषे प्रकाशम् ।
विना प्रकाशं तव देवदेव
    न दृश्यते विश्वमिदं क्षणेन ॥ २७ ॥
तेजस्वी तूं आपल्या तेजाने सर्व जगत् व्यापून प्रकाशित करतोस. हे देवदेवा ! तुझ्या प्रकाशावांचून हे सर्व जगत् क्षणमात्रही दिसणार नाही. २७.

अल्पाश्रयो नैव बृहन्तमर्थं
    धत्तेऽणुरेको न हि विन्ध्यशैलम् ।
त्वद्वक्त्रमात्रे जगदेतदस्ति
    त्वन्माययैवेति विनिश्चिनोमि ॥ २८ ॥
जो पदार्थ स्वतः लहान आहे तो मोठ्या पदार्थाचें धारण करावयास समर्थ नाहीं. एक परमाणु विंध्यपर्वताचें धारण करावयास समर्थ नाहीं तसें तुझ्या मुखांत जें हें जगत् दिसत आहे हे तुझ्या मायेनेंच, असा माझा निश्चय आहे. २८.

रज्जौ भुजङ्गो भयदो यथैव
    न जायते नास्ति न चैति नाशम् ।
त्वन्मायया केवलमात्ररूपं
    तथैव विश्वं त्वयि नीलकण्ठ ॥ २९ ॥
रज्जूचे ठिकाणी कल्पिलेला सर्प उत्पन्न होत नाहीं, रहात नाहीं, नाश पावत नाही, तरी देखील भयप्रद वाटतो, त्याप्रमाणे केवळ तुझ्या मायेनेंच ज्याला अस्तित्व प्राप्त झाले आहे, असे हे जगत् मिथ्या असून भ्रांति उत्पन्न करते. २९.

विचार्यमाणे तव यच्छरीर-
    माधारभावं जगतामुपैति ।
तदप्ययश्यं मदविद्ययैव
    पूर्णश्चिदानदमयो यतस्त्वम् ॥ ३० ॥
जें तुझें शरीर जगताला आधारभूत दिसत आहे तेंही विचारदृष्टीने पाहू लागले असतां माझ्या अज्ञानानेंच कल्पिलेलें आहे, कारण तूं सच्चिदानंदरूप असून परिपूर्ण आहेस. ३०.

पूजेष्टपूर्तादिवरक्रियाणां
    भोक्तुः फलं यच्छसि विश्वमेव ।
मृषैतदेवं वचनं पुरारे
    त्वत्तोऽस्ति भिन्नं न च किञ्चिदेव ॥ ३१ ॥
पूजा, इष्टापूर्त इत्यादि कर्मांचे फल, तूं कर्त्याला देतोस हें ठीकच आहे. परंतु जेव्हां तुझ्यापासून भिन्न असे कांहीं नाहीं असे स्पष्ट दिसू लागतें तेव्हां कर्मकांडप्रतिपादक सर्व वाक्ये खोटी वाटूं लागतात. ३१.

अज्ञानमूढा मुनयो वदन्ति
    पूजोपचारादिबहिःक्रियाभिः ।
तोषं गिरीशो भजतीति मिथ्या
    कुतस्त्वमूर्तस्य तु भोगलिप्सा ॥ ३२ ॥
अज्ञानानें मूढ, असे पुरुष पूजा, यज्ञ इत्यादि बाह्य कर्मांनी शंकर संतुष्ट होतो, असे प्रतिपादन करतात; परंतु हे मिथ्या आहे. कारण अमूर्त अशा तुला विषयभोगेच्छा कोठून असणार ? ३२.

किञ्चिद्दलं वा चुलकोदकं वा
    यस्त्वं महेश प्रतिगृह्य दत्से ।
त्रैलोक्यलक्ष्मीमपि यज्जनेभ्यः
    सर्वं त्वविद्याकृतमेव मन्ये ॥ ३३ ॥
केवल बिल्व दल अथवा ओंजळभर पाणी स्वीकारून त्याला त्रैलोक्याचे राज्यही देतोस; हेही मायेनेच कल्पिलेलें आहे असे मला वाटतें. ३३.

व्याप्नोषि सर्वा विदिशो दिशश्च
    त्वं विश्वमेकः पुरुषः पुराणः ।
नष्टेऽपि तस्मिंस्तव नास्ति हानि-
    र्घटे विनष्टे नभसो यथैव ॥ ३४ ॥
एक पुराणपुरुष तूं, दिशा, विदिशा सर्व विश्व व्यापतोस. परंतु घट नष्ट झाला असतां घटाकाशाचा जसा नाश होत नाहीं तसा हे जगत् नष्ट झालें तथापि तुझा नाश होत नाहीं. ३४.

यथैकमाकाशगमर्कबिम्बं
    क्षुद्रेषु पात्रेषु जलान्वितेषु ।
भजत्यनेकप्रतिबिम्बभावं
    तथा त्वमन्तःकरणेषु देव ॥ ३५ ॥
हे देवा, जसे आकाशांत असणारे सूर्यबिंब एकच असून उदकानें पूर्ण अशा अनेक लहान पात्रांत प्रतिबिंबरूपानें अनेकत्व पावतें, तसा तूं एकरूप असून अंतःकरणाच्या अनेकत्वामुळे अनेकत्व पावला आहेस. ३५.

संसर्जने वाऽप्यवने विनाशे
    विश्वस्य किञ्चित्तव नास्ति कार्यम् ।
अनादिभिः प्राणभृतामदृष्टै-
    स्तथापि तत्स्वप्नवदातनोषि ॥ ३६ ॥
विश्वाची उत्पत्ति करणे, रक्षण करणे व नाश करणें ह्यांपासून तुला कांहीं कर्तव्य नाहीं, तथापि प्राण्यांच्या अनादि कर्मांचे योगाने हे सर्व तूं स्वप्नांतल्या कर्मांप्रमाणे करतोस. ३६.

स्थूलस्य सूक्ष्मस्य जडस्य भोगो
    देहस्य शंभो न चिदं विनास्ति ।
अतस्त्वदारोपणमातनोति
    श्रुतिः पुरारे सुखदुःखयोः सदा ॥ ३७ ॥
हे पुरारे, शंभो, स्थूल आणि सूक्ष्म अशा ह्या जडरूप देहद्वयांत आत्मतत्त्वावांचून दुसरा चैतन्यांश नाहीं, म्हणून त्या देहद्वयापासून होणारी जी सुखदुःखें त्यांचा तुझ्या ठिकाणी श्रुति सदा केवल आरोप मात्र करते, वास्तविक नाहीं. ३७.

नमः सच्चिदाम्भोधिहंसाय तुभ्यं
    नमः कालकालाय कालात्मकाय ।
नमस्ते समस्ताघसंहारकर्त्रे
    नमस्ते मृषाचित्तवृत्त्यैकभोक्त्रे ॥ ३८ ॥
सच्चिद्‌रूप समुद्रांतील हंस, नीलकंठ, कालस्वरूप, भक्तजनांच्या संपूर्ण पातकांचा नाश करणारा, मिथ्या चित्तवृत्तींचा मुख्य साक्षी अशा तुला नमस्कार असो. ३८.

सूत उवाच -
एवं प्रणम्य विश्वेशं पुरतः प्राञ्जलिः स्थितः ।
विस्मितः परमेशानं जगाद रघुनन्दनः ॥ ३९ ॥
सूत म्हणाला, ह्याप्रमाणे शंकराला वंदन करून अंजलि जोडून नम्र होऊन राम पुढें उभा राहिला आणि विस्मय पावलेला असा पुनः परमेश्वराप्रत म्हणाला. ३९.

श्रीराम उवाच -
उपसंहर विश्वात्मन्विश्वरूपमिदं तव ।
प्रतीतं जगदैकात्म्यं शंभो भवदनुग्रहात् ॥ ४० ॥
राम म्हणाला, हे विश्वात्म्या ! ह्या आपल्या विश्वरूपाचा उपसंहार कर. शंभो, तुझ्या अनुग्रहानें सर्व जगत् एकत्र तुझ्या स्वरूपींच आहे ह्याचा आज मला प्रत्यय आला. ४०.

श्रीभगवानुवाच -
पश्य राम महाबाहो मत्तो नान्योऽस्ति कश्चन ॥ ४१ ॥
शिव म्हणाले, हे रामा ! पहा माझ्याहून भिन्न असे दुसरे कांहींच नाहीं. ४१.

सूत उवाच -
उत्युक्त्वैवोपसंजह्रे स्वदेहे देवतादिकान् ।
मीलिताक्षः पुनर्हर्षाद्यावद्रामः प्रपश्यति ॥ ४२ ॥
तावदेव गिरेः शृङ्गे व्याघ्रचर्मोपरि स्थितम् ।
ददर्श पञ्चवदनं नीलकण्ठं त्रिलोचनम् ॥ ४३ ॥
व्याघ्रचर्माम्बरधरं भूतिभूषितविग्रहम् ।
फणिकङ्कणभूषाढ्यं नागयज्ञोपवीतिनम् ॥ ४४ ॥
व्याघ्रचर्मोत्तरीयं च विद्युत्पिङ्गजटाधरम् ।
एकाकिनं चन्द्रमौलिं वरेण्यमभयप्रदम् ॥ ४५ ॥
चतुर्भुजं खण्डपरशुं मृगहस्तं जगत्पतिम् ।
अथाज्ञया पुरस्तस्य प्रणम्योपविवेश सः ॥ ४६ ॥
सूत म्हणाला, असे बोलून शंकरांनी देवतादिकांचा आपल्या देहांत उपसंहार केला. पुनः हर्षानें नेत्र उघडून राम पाहूं लागला तो कैलासपर्वताच्या शिखरावर व्याघ्रचर्मासनावर बसलेला पंचवदन, नीलकंठ, त्रिनेत्र, व्याघ्रचर्म परिधान केलेला, देहाला विभूतीचा लेप केलेला, सर्परूप कंकणांनी ज्याचे हस्त शोभत आहेत असा, नागयज्ञोपवीत धारण करणारा, व्याघ्रचर्म प्रावरण करणारा, विद्युल्लतेसारख्या पिंगटवर्णाच्या जटा धारण करणारा, एकटा, ज्यानें मस्तकी चंद्र धारण केला आहे, अत्यंत श्रेष्ठ, भक्तांस अभय देणारा, चतुर्भुज, शत्रुनाशक परशु ज्यानें धारण केला आहे, हातांत मृग धारण केलेला, सर्व जगताचा स्वामी रामाने पाहिला. नंतर नमस्कार करून त्याच्या आज्ञेनें राम त्याच्या पुढे बसला. ४२-४६.

अथाह रामं देवेशो यद्यत्प्रष्टुमभीच्छसि ।
तत्सर्वं पृच्छ राम त्वं मत्तो नान्योऽस्ति ते गुरुः ॥ ४७ ॥
नंतर शंकर म्हणाले, रामा, जें जें तुला विचारावयाची इच्छा असेल ते सर्व विचार, माझ्यावांचून तुला दुसरा गुरु नाहीं. ४७.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
विश्वरूपदर्शनं नाम सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥
॥ इति सप्तमोऽध्यायः ॥ ७ ॥

GO TOP