॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ शिवगीता ॥

॥ अथ तृतीयोऽध्यायः - अध्याय तिसरा ॥

अगस्त्य उवाच -
न गृह्णाति वचः पथ्यं कामक्रोधादिपीडितः ।
हितं न रोचते तस्य मुमूर्षोरिव भेषजम् ॥ १ ॥
अगस्त्य म्हणाला, कामक्रोधादिकांनी पीडित झालेला मनुष्य हितकारक भाषण ऐकत नाही. मरणोन्मुख झालेल्यास औषध आवडत नाही तसे त्याला कल्याण आवडत नाहीं. १.

मध्येसमुद्रं या नीता सीता दैत्येन मायिना ।
आयास्यति नरश्रेष्ठ सा कथं तव संनिधिम् ॥ २ ॥
हे नरश्रेष्ठा, जी सीता मायावी दैत्याने समुद्रांत नेली ती तुझ्याजवळ कशी येईल ? २.

बध्यन्ते देवताः सर्वा द्वारि मर्कटयूथवत् ।
किं च चामरधारिण्यो यस्य संति सुराङ्गनाः ॥ ३ ॥
भुङ्क्ते त्रिलोकीमखिलां यः शंभुवरदर्पितः ।
निष्कण्टकं तस्य जयः कथं तव भविष्यति ॥ ४ ॥
ज्याच्या द्वारीं माकडांच्या कळपासारखे सर्व देव बांधून ठेवले आहेत, देवस्त्रिया ज्याच्या चामर धारण करणार्‍या दासी आहेत, जो शंकराच्या वराने गर्वित होऊन संपूर्ण त्रैलोक्याचे निष्कंटक राज्य भोगीत आहे, त्यापासून तुला जय कसा प्राप्त होईल ? ३-४.

इन्द्रजिन्नाम पुत्रो यस्तस्यास्तीशवरोद्धतः ।
तस्याग्रे संगरे देवा बहुवारं पलायिताः ॥ ५ ॥
शिवाच्या वराने गर्वित झालेला त्याचा इंद्रजित् नांवाचा पुत्र आहे. त्याच्याबरोबर युद्धामध्ये देव पुष्कळ वेळा पळाले आहेत. ५.

कुम्भकर्णाह्वयो भ्राता यस्यास्ति सुरसूदनः ।
अन्यो दिव्यास्त्रसंयुक्तश्चिरजीवी बिभीषणः ॥ ६ ॥
देवांचा नाश करावयास समर्थ असा कुंभकर्ण नांवाचा त्याचा बंधु आहे आणि तसाच दिव्यास्त्रें जाणणारा व चिरंजीवी असा बिभीषण नांवाचा दुसरा बंधु आहे. ६.

दुर्गं यस्यास्ति लंकाख्यं दुर्जेयं देवदानवैः ।
चतुरङ्गबलं यस्य वर्तते कोटिसंख्यया ॥ ७ ॥
एकाकिना त्वया जेयः स कथं नृपनन्दन ।
आकांक्षते करे धर्तुं बालश्चन्द्रमसं यथा ।
तथा त्वं काममोहेन जयं तस्याभिवाञ्छसि ॥ ८ ॥
देवदैत्यांना जिंकता येणार नाही असा ज्याचा लंका नांवाचा किल्ला आहे, ज्याचें चतुरंग सैन्य कोटिसंख्येने मोजण्यासारखे आहे, त्या रावणाला, हे राजपुत्रा, तू एकटा कसा जिंकणार ? जसा बालक चंद्र हातीं धरावयास इच्छितो तसा तू कामाने मोहित होऊन रावणापासून जय मिळवावयाची आशा करतोस. ७-८.

श्रीराम उवाच -
क्षत्रियोऽहं मुनिश्रेष्ठ भार्या मे रक्षसा हृता ।
यदि तं न निहन्म्याशु जीवने मेऽस्ति किं फलम् ॥ ९ ॥
राम म्हणाला, हे मुनिश्रेष्ठा, मी क्षत्रिय आहे आणि माझी भार्या राक्षसाने चोरून नेली आहे. असे असतां जर मी त्याला लवकर मारणार नाहीं तर माझ्या जगण्याचे काय फळ ? ९.

अतस्ते तत्त्वबोधेन न मे किंचित्प्रयोजनम् ।
कामक्रोधादयः सर्वे दहन्त्येते तनुं मम ॥ १० ॥
म्हणून तुझ्या या तत्त्वज्ञानाचा मला कांहीं उपयोग नाहीं. कामक्रोधादिक हे सर्व माझ्या देहाला जाळीत आहेत. १०.

अहंकारोऽपि मे नित्यं जीवनं हन्तुमुद्यतः ।
हृतायां निजकान्तायां शत्रुणाऽवमतस्य वा ॥ ११ ॥
यस्य तत्त्वबुभुत्सा स्यात्स लोके पुरुषाधमः ।
तस्मात्तस्य वधोपायं लङ्घयित्वाम्बुधिं रणे ॥ १२ ॥
तसाच अहंकार देखील माझा प्राण घेण्याला नित्य तयार आहे. भार्या चोरून नेली असतां अथवा शत्रूंनी अपमान केला असतां ज्याला तत्त्वज्ञानाची इच्छा होते तो या लोकीं नराधम समजावा. तस्मात् समुद्राचे उल्लंघन करून रावणाला कसा मारतां येईल याचा उपाय मला सांग. हे मुनिश्रेष्ठा, तुझ्याशिवाय मला दुसरा गुरु नाहीं. ११-१२.

अगस्त्य उवाच -
एवं चेच्छरणं याहि पार्वतीपतिमव्ययम् ।
स चेत्प्रसन्नो भगवान्वाञ्छितार्थं प्रदास्यति ॥ १३ ॥
अगस्त्य म्हणाला, असे आहे तर तूं पार्वतीपतीला शरण जा. तो भगवान् प्रसन्न झाला तर वांछितार्थ देईल. १३.

देवैरजेयः शक्राद्यैर्हरिणा ब्रह्मणापि वा ।
स ते वध्यः कथं वा स्याच्छंकरानुग्रहं विना ॥ १४ ॥
इंद्रादिदेवांना, विष्णूला व ब्रह्मदेवालाही जो अवध्य तो शंकराच्या अनुग्रहावांचून तुला कसा मारतां येईल ? १४.

अतस्त्वां दीक्षयिष्यामि विरजामार्गमाश्रितः ।
तेन मार्गेन मर्त्यत्वं हित्वा तेजोमयो भव ॥ १५ ॥
तेव्हा तुला आतां विरजामार्गाचा आश्रय केलेला मी त्या मार्गाची दीक्षा देतों. त्या योगानें तूं मर्त्यत्व जिंकून तेजोमय हो. १५.

येन हत्वा रणे शत्रून्सर्वान्कामानवाप्स्यसि ।
भुक्त्वा भूमण्डले चान्ते शिवसायुज्यमाप्स्यसि ॥ १६ ॥
त्याचे योगाने रणामध्ये शत्रूला मारून सर्व मनोरथांची सिद्धि पावशील आणि भूमंडलाचे राज्य करून अंती शिवसायुज्य पावशील. १६.

सूत उवाच -
अथ प्रणम्य रामस्तं दण्डवन्मुनिसत्तमम् ।
उवाच दुःखनिर्मुक्तः प्रहृष्टेनान्तरात्मना ॥ १७ ॥
सूत म्हणाला, नंतर राम त्या मुनिश्रेष्ठाला साष्टांग प्रणिपात करून दुःख सोडून हर्षयुक्त अंतःकरणाने बोलला. १७.

श्रीराम उवाच -
कृतार्थोऽहं मुने जातो वाञ्छितार्थो ममागतः ।
पीताम्बुधिः प्रसन्नस्त्वं यदि मे किमु दुर्लभम् ।
अतस्त्वं विरजां दीक्षां ब्रूहि मे मुनिसत्तम ॥ १८ ॥
अगस्त्य उवाच -
शुक्लपक्षे चतुर्दश्यामष्टम्यां वा विशेषतः ।
एकादश्यां सोमवारे आर्द्रायां वा समारभेत् ॥ १९ ॥
राम म्हणाला, मी कृतार्थ झालो, माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले, समुद्र प्राशन करणारा तू मला प्रसन्न झालास तर मला आतां दुर्लभ असे काय आहे ? हे मुनिश्रेष्ठा, तेव्हा आतां विरजा दीक्षा मला दे. अगस्त्य म्हणाला, शुक्लपक्षांत अष्टमी, एकादशी किंवा चतुर्दशी ह्या तिथींस अथवा सोमवारी अथवा आर्द्रा नक्षत्र असेल त्या दिवशी ह्या कृत्यास आरंभ करावा. १८-१९.

यं वायुमाहुर्यं रुद्रं यमग्निं परमेश्वरम् ।
परात्परतरं चाहुः परात्परतरं शिवम् ॥ २० ॥
ब्रह्मणो जनकं विष्णोर्वह्नेर्वायोः सदाशिवम् ।
ध्यात्वाग्निनाऽवसथ्याग्निं विशोध्य च पृथक्पृथक् ॥ २१ ॥
पञ्चभूतानि संयम्य ध्यात्वा गुणविधिक्रमात् ।
मात्राः पञ्च चतस्रश्च त्रिमात्रादिस्ततः परम् ॥ २२ ॥
एकमात्रममात्रं हि द्वादशान्तं व्यवस्थितम् ।
स्थित्यां स्थाप्यामृतो भूत्वा व्रतं पाशुपतं चरेत् ॥ २३ ॥
ज्याला वायु, रुद्र, अग्नि, परमेश्वर, श्रेष्ठाहून अत्यंत श्रेष्ठ, असे म्हणतात, जो श्रेष्ठाहून अत्यंत श्रेष्ठ शिव, जो ब्रह्मदेव, विष्णु, अग्नि, वायु, यांचा जनक आहे, अशा सदाशिवाचें ध्यान करून अग्निबीजानें गृह्याग्नीचें ध्यान करून, देहोत्पत्तीला कारणभूत जी पंचमहाभूतें तीं वायुबीजानें पृथक् पृथक् आहेत अशी भावना करून, ती पंचमहाभूतें गुणांच्या क्रमानें ध्यान केलेल्या गृह्याग्नीनें दग्ध झाली अशी भावना करावी. गंधादि पांच विषय [ मात्राः ], पृथिवी, उदक, तेज, वायु, आकाश, अकरावी माया आणि बारावा परमात्मा या क्रमाने सर्वांचा परमात्म्याचे ठिकाणी लय करून मी मोक्षरूपी आहे अशी भावना करून पाशुपत व्रताला आरंभ करावा. २०-२३.

इदं व्रतं पाशुपतं करिष्यामि समासतः ।
प्रातरेवं तु संकल्प्य निधायाग्निं स्वशाखया ॥ २४ ॥
हे पाशुपत व्रत मी करीन असा प्रातःकालींच संक्षेपाने संकल्प करून आपल्या शाखेच्या विधीनें अग्निस्थापन करावे. २४.

उपोषितः शुचिः स्नातः शुक्लाम्बरधरः स्वयम् ।
शुक्लयज्ञोपवीतश्च शुक्लमाल्यानुलेपनः ॥ २५ ॥
उपोषण, बाह्य आणि आभ्यंतर शुद्धि करावी, स्नान करून शुभ्रवस्त्रें धारण करून शुभ्र यज्ञोपवीत, पांढर्‍या फुलांच्या माळा व श्वेतचंदन धारण करावी. २५.

जुहुयाद्विरजामन्त्रैः प्राणापानादिभिस्ततः ।
अनुवाकान्तमेकाग्रः समिदाज्यचरून्पृथक् ॥ २६ ॥
एकाग्र होऊन "प्राणापानव्यानोदानसमाना में शुद्ध्यंताम् । ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासँ स्वाहा", इत्यादि विरजामंत्रांनीं अनुवाक संपेपर्यंत समिधा, आज्य आणि चरु ह्यांचे हवन करावे. २६.

आत्मन्यग्निं समारोप्य याते अग्नेति मंत्रतः ।
भस्मादायाग्निरित्याद्यैर्विमृज्याङ्गानि संस्पृशेत् ॥ २७ ॥
"याते अग्ने याज्ञयातनूः" ह्या मंत्राने अग्नीचा आपल्या ठिकाणी समारोप करून भस्म घेऊन "अग्निरिति भस्म" इत्यादि मंत्रांनी अभिमंत्रण करून अंगांचे ठायीं लावावे. २७.

भस्मच्छन्नो भवेद्विद्वान्महापातकसंभवैः ।
पापैर्विमुच्यते सत्यं मुच्यते च न संशयः ॥ २८ ॥
ज्ञात्याने भस्माच्छादित व्हावे. महापातकांपासून उत्पन्न होणार्‍या पापकर्मापासून तो मुक्त होतो. खरोखर मुक्त होतो ह्यांत संशय नाहीं. २८.

वीर्यमग्नेर्यतो भस्म वीर्यवान्भस्मसंयुतः ।
भस्मस्नानरतो विप्रो भस्मशायी जितेन्द्रियः ॥ २९ ॥
सर्वपापविनिर्मुक्तः शिवसायुज्यमाप्नुयात् ।
एवं कुरु महाभाग शिवनामसहस्रकम् ॥ ३० ॥
इदं तु सम्प्रदास्यामि तेन सर्वार्थमाप्स्यसि ।
सूत उवाच -
इत्युक्त्वा प्रददौ तस्मै शिवनामसहस्रकम् ॥ ३१ ॥
वेदसाराभिधं नित्यं शिवप्रत्यक्षकारकम् ।
उक्तं च तेन राम त्वं जप नित्यं दिवानिशम् ॥ ३२ ॥
भस्म हें अग्नीचे वीर्य आहे. म्हणून भस्मधारण करणारा वीर्यवान् होतो. जो नित्य भस्मस्नान करतो व इंद्रिये जिंकून भस्मांत शयन करतो, तो सर्वपापमुक्त होऊन शिवसायुज्य पावतो. हे महाभागा, हे तूं कर आणि हे शिवसहस्रनाम मी तुला देतों त्याने तुला सर्व मिळेल. सूत म्हणाला, असे बोलून अगस्त्याने वेदांचे सार व नित्य शिवरूप करणार्‍या शिवसहस्रनामाचा उपदेश केला; आणि सांगितले की, हे रामा, ह्याचा नित्य अहोरात्र जप कर. २९-३२.

ततः प्रसन्नो भगवान्महापाशुपतास्त्रकम् ।
तुभ्यं दास्यति तेन त्वं शत्रून्हत्वाऽऽप्स्यसि प्रियाम् ॥ ३३ ॥
म्हणजे भगवान् शंकर तुला प्रसन्न होऊन पाशुपतास्त्र देईल. त्याने तू शत्रूला जिंकून भार्या मिळविशील. ३३.

तस्यैवास्त्रस्य माहात्म्यात्समुद्रं शोषयिष्यसि ।
संहारकाले जगतामस्त्रं तत्पार्वतीपतेः ॥ ३४ ॥
त्याचे अस्त्राच्या सामर्थ्याने तू समुद्रशोषण करशील. शिव जेव्हां जगाचा संहार करतो त्यावेळचे ते अस्त्र आहे. ३४.

तदलाभे दानवानां जयस्तव सुदुर्लभः ।
तस्माल्लब्धं तदेवास्त्रं शरणं याहि शंकरम् ॥ ३५ ॥
ते प्राप्त न होईल तर राक्षसांपासून जय प्राप्त होणें कठिण आहे. म्हणून ते प्राप्त होण्यासाठी शंकराला शरण जा. ३५.

इति श्रीपद्मपुराणे उपरिभागे शिवगीतासूपनिषत्सु
ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे शिवराघवसंवादे
विरजादीक्षानिरूपणं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
इति तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥





GO TOP