॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ गणेशगीता ॥

॥ अष्टमोऽध्यायः - अध्याय आठवा - विश्वरूपदर्शन ॥

वरेण्य उवाच -
भगवन्नारदो मह्यं तव नाना विभूतयः ।
उक्तवांस्ता अहं वेद न सर्वाः सोऽपि वेत्ति ताः ॥ १ ॥
वरेण्य म्हणाला, हे भगवन्, नारदांनी मला तुझ्या नानाप्रकारच्या विभूति सांगितल्या तेवढ्या मला माहीत आहेत. तुझ्या त्या सर्व विभूति नारदांना देखील माहीत नाहींत. १.

त्वमेव तत्त्वतः सर्वा वेत्सि ता द्विरदानन ।
निजं रूपमिदानीं मे व्यापकं चारु दर्शय ॥ २ ॥
हे गजानना, त्या सर्व तत्त्वतः तुलाच माहीत आहेत. आता मला आपलें सुंदर व्यापक रूप दाखव. २.

श्रीगजानन उवाच -
एकस्मिन्मयि पश्य त्वं विश्वमेतच्चराचरम् ।
नानाश्चर्याणि दिव्यानि पुराऽदृष्टानि केनचित् ॥ ३ ॥
श्रीगजानन म्हणाला, एकट्या माझ्यामध्ये तूं हें चराचर विश्व अवलोकन कर. पूर्वी कोणी न पाहिलेली नानाप्रकारची दिव्य आश्चर्ये अवलोकन कर. ३.

ज्ञानचक्षुरहं तेऽद्य सृजामि स्वप्रभावतः ।
चर्मचक्षुः कथं पश्येन्मां विभुं ह्यजमव्ययम् ॥ ४ ॥
माझ्या प्रभावाने आज मी तुला ज्ञानचक्षु देतों. सर्वव्यापी, जन्मरहित व नाशरहित अशा मला चर्मचक्षु कसा पाहूं शकेल ? ४.

क उवाच -
ततो राजा वरेण्यः स दिव्यचक्षुरवैक्षत ।
ईशितुः परमं रूपं गजास्यस्य महाद्‌भुतम् ॥ ५ ॥
ब्रह्मदेव म्हणाला, नंतर दिव्य चक्षु प्राप्त झालेल्या त्या वरेण्य राजाने परमेश्वर गजाननाचे अत्यंत अद्भुत असे श्रेष्ठ रूप पाहिले. ५.

असंख्यवक्त्रं ललितमसंख्यांघ्रिकरं महत् ।
अनुलिप्तं सुगन्धेन दिव्यभूषाम्बरस्रजम् ॥ ६ ॥
असंख्यनयनं कोटिसूर्यरश्मिधृतायुधम् ।
तद्वर्ष्मणि त्रयो लोका दृष्टास्तेन पृथग्विधाः ॥ ७ ॥
असंख्य मुखांनी युक्त, सुंदर, असंख्य पाय व हात असलेलें, प्रचंड, सुगंधानें लिप्त, दिव्य अलंकार-वस्त्रे व माला धारण केलेले, असंख्य नेत्र असलेलें, कोटि सूर्याप्रमाणे तेज [रश्मि] असलेले, आयुधे धारण केलेलें असे ते रूप होते. त्याच्या शरीरामध्ये त्याने नानाप्रकारची त्रिभुवने पाहिली. ६-७.

दृष्ट्‍वैश्वरं परं रूपं प्रणम्य स नृपोऽब्रवीत् ।
वरेण्य उवाच -
वीक्षेऽहं तव देहेऽस्मिन्देवानृषिगणान्पितॄन् ॥ ८ ॥
पातालानां समुद्राणां द्वीपानां चैव भूभृताम् ।
महर्षीणां सप्तकं च नानार्थैः संकुलं विभो ॥ ९ ॥
ईश्वराचे तें श्रेष्ठ रूप पाहून तो राजा नमस्कार करून म्हणाला तुझ्या या देहामध्ये देव, ऋषिगण व पितर मी पहात आहे. पातालें, समुद्र, द्वीपें, राजे, महर्षि यांची सप्तकें पहात आहे. हे विभो, नानाप्रकारच्या पदार्थांनी भरलेले तुझें रूप आहे. ८-९.

भुवोऽन्तरिक्षस्वर्गांश्च मनुष्योरगराक्षसान् ।
ब्रह्माविष्णुमहेशेन्द्रान्देवान्जन्तूननेकधा ॥ १० ॥
पृथिवी, अंतरिक्ष, स्वर्ग, मनुष्य, नाग, राक्षस, ब्रह्मदेव, विष्णु, महेश, इंद्र, नानाप्रकारचे देव व प्राणी तुझ्या शरीरामध्ये मी पहात आहे. १०.

अनाद्यनन्तं लोकादिमनन्तभुजशीर्षकम् ।
प्रदीप्तानलसंकाशमप्रमेयं पुरातनम् ॥ ११ ॥
किरीटकुण्डलधरं दुर्निरीक्ष्यं मुदावहम् ।
एतादृशं च वीक्षे त्वां विशालवक्षसं प्रभुम् ॥ १२ ॥
आदिरहित, अन्तरहित, स्वर्ग, मृत्यु इत्यादि लोकांचा उत्पन्नकर्ता, अनन्त बाहु व शिरे असलेला, प्रदीप्त अग्नीप्रमाणे असलेला, अप्रमेय, पुरातन, किरीट व कुंडलें धारण करणारा, ज्याच्याकडे पहाणे कठिण आहे असा, आनन्दकारक, विशाल वक्षःस्थल असलेला, प्रभु अशा तुला मी पहात आहे. ११-१२.

सुरविद्याधरैर्यक्षैः किन्नरैर्मुनिमानुषैः ।
नृत्यद्‌भिरप्सरोभिश्च गन्धर्वैर्गानतत्परैः ॥ १३ ॥
वसुरुद्रादित्यगणैः सिद्धैः साध्यैर्मुदा युतैः ।
सेव्यमानं महाभक्त्या वीक्ष्यमाणं सुविस्मितैः ॥ १४ ॥
वेत्तारमक्षरं वेद्यं धर्मगोप्तारमीश्वरम् ।
पातालानि दिशः स्वर्गान्भुवं व्याप्याऽखिलं स्थितम् ॥ १५ ॥
भीता लोकास्तथा चाहमेवं त्वां वीक्ष्य रूपिणम् ।
नानादंष्ट्राकरालं च नानाविद्याविशारदम् ॥ १६ ॥
प्रलयानलदीप्तास्यं जटिलं च नभःस्पृशम् ।
दृष्ट्‍वा गणेश ते रूपमहं भ्रान्त इवाभवम् ॥ १७ ॥
आनंदाने जमलेल्या देव, विद्याधर, यक्ष, किन्नर, मुनि, मनुष्य, नाचत असलेल्या अप्सरा, गायनामध्ये तत्पर असलेले गंधर्व, वसु-रुद्र-आदित्य यांचे समुदाय, सिद्ध, साध्य इत्यादिकांनी अत्यंत भक्तीने ज्याची सेवा चालविली आहे व अत्यंत विस्मयाने ज्याचे अवलोकन चालविलें आहे असा, ज्ञानी, नाशरहित, जाणण्याला योग्य, धर्माचे रक्षण करणारा, जगावर सत्ता चालविणारा ईश्वर, पाताळे-दिशा-स्वर्ग आणि संपूर्ण पृथिवी व्यापून राहिलेला, अशा प्रकारचे रूप धारण करणार्‍या तुला पाहून लोक व त्याप्रमाणे मी भय पावलो आहों. हे गणेशा, अनेक दंष्ट्रांच्या योगानें भीषण, नानाप्रकारच्या विद्यांमध्ये प्रवीण, प्रळयकाळच्या अग्नीप्रमाणे मुख प्रदीप्त असलेलें, जटायुक्त, गगनाला स्पर्श करणारे असे तुझे रूप पाहून मी भ्रमिष्टासारखा झालो आहे. १३-१७.

देवा मनुष्यनागाद्याः खलास्त्वदुदरेशयाः ।
नानायोनिभुजश्चान्ते त्वय्येव प्रविशन्ति च ॥ १८ ॥
अब्धेरुत्पद्यमानास्ते यथाजीमूतबिन्दवः ।
त्वमिन्द्रोऽग्निर्यमश्चैव निर्ऋतिर्वरुणो मरुत् ॥ १९ ॥
गुह्यकेशस्तथेशानः सोमः सूर्योऽखिलं जगत् ।
नमामि त्वामतः स्वामिन्प्रसादं कुरु मेऽधुना ॥ २० ॥
देव, मनुष्य, नाग इत्यादि, दुष्ट, सर्व तुझ्या उदरामध्ये रहातात, नानाप्रकारच्या योनि पावतात व अखेरीस तुझ्यामध्येंच प्रवेश करतात. ज्याप्रमाणे सागरापासून उत्पन्न होणारे मेघाचे बिंदु पुन्हां सागरांत प्रवेश करतात तद्वत्. इंद्र, अग्नि, यम, निर्ऋति, वरुण, वायु, गुह्यकांचा स्वामी ( कुबेर ), शंकर, चंद्र, सूर्य, सर्व जग तू आहेस. म्हणून हे स्वामिन्, मी तुला प्रणाम करतो. आता माझ्यावर कृपा कर. १८-२०.

दर्शयस्व निजं रूपं सौम्यं यत्पूर्वमीक्षितम् ।
को वेद लीलास्ते भूमन् क्रियमाणा निजेच्छया ॥ २१ ॥
अनुग्रहान्मया दृष्टमैश्वरं रूपमीदृशम् ।
ज्ञानचक्षुर्यतो दत्तं प्रसन्नेन त्वया मम ॥ २२ ॥
जे पूर्वी पहात होतो ते आपले सौम्य रूप दाखव. हे विभो (अथवा बहुरूपधारिन्), स्वतःच्या इच्छेनुसार करीत असलेल्या तुझ्या लीला कोण जाणू शकेल ? ज्या अर्थीं तूं प्रसन्न होऊन मला ज्ञानचक्षु दिलेस त्या अर्थीं तुझ्या अनुग्रहाने मी हे ईश्वरी रूप पाहिले. २१-२२.

श्रीगजानन उवाच -
नेदं रूपं महाबाहो मम पश्यन्त्ययोगिनः ।
सनकाद्या नारदाद्याः पश्यन्ति मदनुग्रहात् ॥ २३ ॥
श्रीगजानन म्हणाला, हे महाबाहो, जे योगी नसतात त्यांना हे माझे रूप दिसत नाहीं. सनक व नारद आदिकरून माझ्या अनुग्रहामुळे हे रूप पहातात. २३.

चतुर्वेदार्थतत्त्वज्ञाः सर्वशास्त्रविशारदाः ।
यज्ञदानतपोनिष्ठा न मे रूपं विदन्ति ते ॥ २४ ॥
चार वेदांचे तत्त्व जाणणारे, सर्व शास्त्रांमध्ये प्रवीण असलेले, यज्ञ-दान व तप यांचे ठिकाणी रत असलेले देखील हें माझे रूप जाणत नाहींत. २४.

शक्योऽहं वीक्षितुं ज्ञातुं प्रवेष्टुं भक्तिभावतः ।
त्यज भीतिं च मोहं च पश्य मां सौम्यरूपिणम् ॥ २५ ॥
भक्तियुक्त भावनेच्या योगाने पहाणे, जाणणे व मजमध्यें लीन होणे शक्य आहे. भीति व मोह टाक आणि सौम्यरूपधारी मला पहा. २५.

मद्‌भक्तो मत्परः सर्वसंगहीनो मदर्थकृत् ।
निष्क्रोधः सर्वभूतेषु समो मामेति भूभुज ॥ २६ ॥
हे भूपा, मत्पर, सर्वसंगरहित, माझ्याकरितां सर्व कर्मे करणारा, क्रोधरहित, सर्व भूतांचे ठिकाणी समान असा माझा भक्त मजप्रत येतो. २६.

इति श्रीमद्‌गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे
श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे गजाननवरेण्यसंवादे
विश्वरूपदर्शनो नामाष्टमोऽध्यायः ॥
विश्वरूपदर्शन नामक आठवा अध्याय समाप्त ॥ ८ ॥





GO TOP