॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ गणेशगीता ॥

॥ अथ पञ्चमोऽध्यायः - अध्याय पाचवा - योगावृत्तिप्रशंसनः ॥

श्रीगजानन उवाच -
श्रौतस्मार्तानि कर्माणि फलं नेच्छन्समाचरेत् ।
शस्तः स योगी राजेन्द्र अक्रियाद्योगमाश्रितात् ॥ १ ॥
श्रीगजानन म्हणाला, फलाची इच्छा न धरितां मनुष्याने श्रौत व स्मार्त कर्में आचरण करावी. हे राजेंद्रा, योगाचा आश्रय केलेल्या पण कर्मरहित असलेल्या योग्यापेक्षां तो योगी फलांची इच्छा न धरितां कर्म करणारा प्रशंसनीय होय. १.

योगप्राप्त्यै महाबाहो हेतुः कर्मैव मे मतम् ।
सिद्धियोगस्य संसिद्ध्यै हेतू शमदमौ मतौ ॥ २ ॥
हे महाबाहो, योगप्राप्तीला कारण कर्मच आहे असे माझे मत आहे. सिद्धियोगाची सिद्धि होण्याला कारण शम आणि दम आहेत असे मानलें आहे. २.

इन्द्रियार्थांश्च संकल्प्य कुर्वन्स्वस्य रिपुर्भवेत् ।
एताननिच्छन्यः कुर्वन्सिद्धिं योगी स सिद्ध्यति ॥ ३ ॥
इंद्रियांच्या अर्थांचा संकल्प करून कर्म करणारा स्वतःचा शत्रु होतो. ( पण ) त्यांची [= इंद्रियार्थांची] इच्छा न करतां जो कर्म [ सिद्धिं ] करतो तो योगी सिद्धि पावतो. ३.

सुहृत्वे च रिपुत्वे च उद्धारे चैव बन्धने ।
आत्मनैवात्मनो ह्यात्मा नात्मा भवति कश्चन ॥ ४ ॥
मित्रत्व, शत्रुत्व, उद्धार अथवा बंधन हीं होण्याला जो तो स्वतःच कारण असतो, दुसरा कोणी नसतो. ४.

मानेऽपमाने दुःखे च सुखेऽसुहृदि साधुषु ।
मित्रेऽमित्रेऽप्युदासीने द्वेष्ये लोष्ठे च काञ्चने ॥ ५ ॥
समो जितात्मा विज्ञानी ज्ञानीन्द्रियजयावहः ।
अभ्यसेत्सततं योगं यदा युक्ततमो हि सः ॥ ६ ॥
मान, अपमान, दुःख, सुख, असाधु, साधु, मित्र, शत्रु, उदासीन, द्वेषाला योग्य मनुष्य, मातीचें ढेंकूळ, सुवर्ण यांचे ठिकाणी समान बुद्धी झालेला, अंतःकरण जिंकलेला, अनुभवयुक्त ज्ञान असलेला, ज्ञानी, इंद्रिये जिंकलेला असा मनुष्य जेव्हां सतत योगाचा अभ्यास करील तेव्हां तो श्रेष्ठ योगी होतो. ५-६.

तप्तः श्रान्तो व्याकुलो वा क्षुधितो व्यग्रचित्तकः ।
कालेऽतिशीतेऽत्युष्णे वानिलाग्न्यम्बुसमाकुले ॥ ७ ॥
सध्वनावतिजीर्णे गोःस्थाने साग्नौ जलान्तिके ।
कूपकूले श्मशाने च नद्यां भित्तौ च मर्मरे ॥ ८ ॥
चैत्ये सवल्मिके देशे पिशाचादिसमावृते ।
नाभ्यसेद्योगविद्योगं योगध्यानपरायणः ॥ ९ ॥
ताप पावलेला, श्रान्त, व्याकुळ, क्षुधित अथवा चित्त व्यग्र असतांना, अतिशय शीत अथवा अतिशय उष्ण समयीं, वायु-अग्नि अथवा जल यांनी अत्यंत युक्त ठिकाणी, ध्वनियुक्त ठिकाणीं, अति जीर्ण झालेल्या गोठ्यामध्यें, अग्नीने युक्त स्थलीं, उदक सन्निध आहे अशा ठिकाणीं, विहींरीच्या काठावर, श्मशानामध्ये, पिशाच इत्यादिकांनीं व्याप्त प्रदेशीं योग्याने योगध्यानपरायण होऊन योगाचा अभ्यास करू नये. ७-९.

स्मृतिलोपश्च मूकत्वं बाधिर्यं मन्दता ज्वरः ।
जडता जायते सद्यो दोषाज्ञानाद्धि योगिनः ॥ १० ॥
वर सांगितलेले दोष माहीत नसतील व त्यामुळे दोषयुक्त योगाभ्यास करील तर योग्याला तत्काळ स्मृतिलोप, मूकत्व, बधिरता, मन्दता, ताप आणि जडता हीं उत्पन्न होतात. १०.

एते दोषाः परित्याज्या योगाभ्यसनशालिना ।
अनादरे हि चैतेषां स्मृतिलोपादयो ध्रुवम् ॥ ११ ॥
योगाभ्यासशाली मनुष्याने या दोषांचा त्याग करावा. यांकडे लक्ष न दिल्यास स्मृतिलोपादि फल खात्रीने प्राप्त होते. ११.

नातिभुञ्जन्सदा योगी नाभुञ्जन्नातिनिद्रितः ।
नातिजाग्रत्सिद्धिमेति भूप योगं सदाभ्यसन् ॥ १२ ॥
हे भूपा, कधीहि अतिशय न खाणारा, अगदी कमी न खाणारा, अति निद्रा न घेणारा, अति जागरण न करणारा व नेहमी योगाभ्यास करणारा योगी सिद्धि पावतो. १२.

संकल्पजांस्त्यजेत्कामान्नियताहारजागरः ।
नियम्य खगणं बुद्ध्या विरमेत शनैः शनैः ॥ १३ ॥
संकल्पापासून उत्पन्न होणार्‍या इच्छांचा त्याग करावा. आहार, जागरण इत्यादिकांचे नियमन करून व बुद्धीचे योगानें इंद्रियसमुदायांचे नियमन करून हळू हळू ( विषयांपासून ) विराम पावावा. १३.

ततस्ततः कृषेदेतद्यत्र यत्रानुगच्छति ।
धृत्यात्मवशगं कुर्याच्चित्तं चञ्चलमादृतः ॥ १४ ॥
नंतर हे चंचल चित्त जेथें जेथें जात असेल तेथून तेथून ओढून योगाचे ठिकाणीं आदरयुक्त मनुष्यानें धैर्यानें ते आपल्या ताब्यांत राहील असे करावें. १४.

एवं कुर्वन्सदा योगी परां निर्वृतिमृच्छति ।
विश्वस्मिन्निजमात्मानं विश्वं च स्वात्मनीक्षते ॥ १५ ॥
सर्वदा याप्रमाणे करणारा योगी अत्यंत श्रेष्ठ असे सुख पावतो. विश्वामध्ये आपला आत्मा व आपल्या आत्म्यामध्यें विश्व आहे असे तो पहातो. १५.

योगेन यो मामुपैति तमुपैम्यहमादरात् ।
मोचयामि न मुञ्चामि तमहं मां स न त्यजेत् ॥ १६ ॥
योगानें जो माझ्याजवळ येतो त्याच्याजवळ मी आदरानें जातो. मी त्याला मुक्त करतो. त्याचा त्याग करीत नाहीं. तसाच तोहि मला टाकीत नाहीं. १६.

सुखे सुखेतरे द्वेषे क्षुधि तोषे समस्तृषि ।
आत्मसाम्येन भूतानि सर्वगं मां च वेत्ति यः ॥ १७ ॥
जीवन्मुक्तः स योगीन्द्रः केवलं मयि संगतः ।
ब्रह्मादीनां च देवानां स वन्द्यः स्याज्जगत्रये ॥ १८ ॥
सुख, दुःख, द्वेष, क्षुधा, तोष, तृषा, यांचे ठिकाणीं जो समान असतो, जो प्राणिमात्राला व सर्वव्यापी मला स्वतःच्या समान जाणतो, तो योगींद्र जीवन्मुक्त होय. केवल माझे ठिकाणीं त्याचा समागम झालेला असतो. त्रैलोक्यामध्ये ब्रह्मादि देवांना तो वंद्य होतो. १७-१८.

वरेण्य उवाच -
द्विविधोऽपि हि योगोऽयमसंभाव्यो हि मे मतः ।
यतोऽन्तःकरणं दुष्टं चञ्चलं दुर्ग्रहं विभो ॥ १९ ॥
वरेण्य म्हणाला, हे विभो सर्वव्यापी ईश्वरा, ज्याअर्थीं अंतःकरण दुष्ट, चंचल व नियमन करण्यास कठिण [दुर्ग्रहं ] आहे त्याअर्थीं हा दोन्ही प्रकारचा योग आचरण करण्यास असंभाव्य आहे असे माझे मत आहे. १९.

श्रीगजानन उवाच -
यो निग्रहं दुर्ग्रहस्य मनसः संप्रकल्पयेत् ।
घटीयन्त्रसमादस्मान्मुक्तः संसृतिचक्रकात् ॥ २० ॥
श्रीगजानन म्हणाला, नियमन करण्यास कठिण अशा मनाचें जो नियमन करतो तोच घटिकायंत्रासारख्या [ म्ह० कधी न संपणार्‍या ] संसारचक्रापासून मुक्त होतो. २०.

विषयैः क्रकचैरेतत्संसृष्टं चक्रकं दृढम् ।
जनश्छेत्तुं न शक्नोति कर्मकीलः सुसंवृतम् ॥ २१ ॥
विषयरूपी आरांनी तयार केलेलें व कर्मरूपी खिळ्यांनी घट्ट बसविलेलें हे दृढ चक्र छेदण्यास मनुष्य समर्थ नाहीं. २१.

अतिदुःखं च वैराग्यं भोगाद्वैतृष्ण्यमेव च ।
गुरुप्रसादः सत्सङ्‌ग उपायास्तज्जये अमी ॥ २२ ॥
अति दुःख, वैराग्य, भोगामुळे निरिच्छता, गुरुप्रसाद आणि सत्संग हे त्याला जिंकण्याला उपाय आहेत. २२.

अभ्यासाद्वा वशीकुर्यान्मनो योगस्य सिद्धये ।
वरेण्य दुर्लभो योगो विनास्य मनसो जयात् ॥ २३ ॥
अथवा अभ्यासाने योगाच्या सिद्धीकरितां मन जिंकावे. वरेण्या, या मनाच्या जयावांचून योग दुर्लभ आहे. २३.

वरेण्य उवाच -
योगभ्रष्टस्य को लोकः का गतिः किं फलं भवेत् ।
विभो सर्वज्ञ मे छिन्धि संशयं बुद्धिचक्रभृत् ॥ २४ ॥
वरेण्य म्हणाला, हे सर्वज्ञा, सर्वव्यापका, ज्ञानचक्रधारका, योगभ्रष्ट मनुष्याला कोणता लोक मिळतो ? कोणती गति मिळते ? कोणते फल मिळते ? याविषयींचा माझा संशय छेद. २४.

श्रीगजानन उवाच -
दिव्यदेहधरो योगाद्‌भ्रष्टः स्वर्भोगमुत्तमम् ।
भुक्त्वा योगिकुले जन्म लभेच्छुद्धिमतां कुले ॥ २५ ॥
श्रीगजानन म्हणाला, योगापासून भ्रष्ट झालेला मनुष्य दिव्यदेहधारी होत्साता उत्तम स्वर्गभोग भोगून योग्यांच्या अथवा शुद्धाचरणी कुळामध्ये जन्म पावतो. २५.

पुनर्योगी भवत्येष संस्कारात्पूर्वकर्मजात् ।
न हि पुण्यकृतां कश्चिन्नरकं प्रतिपद्यते ॥ २६ ॥
पूर्वकर्मापासून उत्पन्न होणार्‍या संस्कारामुळे तो पुन्हां योगी होतो. पुण्यकर्मी मनुष्यांपैकी कोणीहि नरकाला जात नाहीं. २६.

ज्ञाननिष्ठात्तपोनिष्ठात्कर्मनिष्ठान्नराधिप ।
श्रेष्ठो योगी श्रेष्ठतमो भक्तिमान्मयि तेषु यः ॥ २७ ॥
हे नराधिपा, ज्ञाननिष्ठ, तपोनिष्ठ व कर्मनिष्ठ यांपेक्षां योग श्रेष्ठ आहे; आणि योग्यांमध्ये माझ्या ठिकाणीं जो भक्तिमान् तो सर्वांत श्रेष्ठ, २७.

इति श्रीमद्‌गणेशगीतासूपनिषदर्थगर्भासु योगामृतार्थशास्त्रे
श्रीगणेशपुराणे उत्तरखण्डे गजाननवरेण्यसंवादे योगावृत्तिप्रशंसनो नाम पञ्चमोऽध्यायः ॥
योगावृत्तिप्रशंसा नामक पाचवा अध्याय समाप्त ॥ ५ ॥

GO TOP