॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥

॥ देविगीता ॥

॥ अथ तृतीयोऽध्यायः - अध्याय तिसरा ॥

श्रीदेव्युवाच -
क्व यूयं मन्दभाग्या वै क्वेदं रूपं महाद्‌भुतम् ।
तथापि भक्तवात्सल्यादीदृशं दर्शितं मया ॥ १ ॥
श्रीदेवी म्हणाली - हे देवहो, तुम्ही अभागी कोठे व हे अत्यंत अद्भुत रूप कोठे ? तथापि भक्तांच्या प्रेमामुळे मी हे असलें रूप तुम्हांस दाखविले. १.

न वेदाध्ययनैर्योगैर्न दानैस्तपसेज्यया ।
रूपं द्रष्टुमिदं शक्यं केवलं मत्कृपां विना ॥ २ ॥
केवल माझ्या कृपेवांचून वेदांच्या अध्ययनाने, योगाभ्यासाने, दानाने, तपाने किंवा यज्ञ केल्यानेंही हैं रूप दृष्टीस पडणे शक्य नाहीं. २.

प्रकृतं शृणु राजेन्द्र परमात्मात्र जीवताम् ।
उपाधियोगात्सम्प्राप्तः कर्तृत्वादिकमप्युत ॥ ३ ॥
हे राजेंद्रा, पूर्वी चाललेल्या ब्रह्मोपदेशाचा पुनः आरंभ करतों; तो ऐक. या सृष्टीमध्यें उपाधीच्या संसर्गामुळे परमात्माच जीवभावाप्रत प्राप्त झाला आहे. तसेच त्याच्या ठिकाणी कर्तृत्वादिकही उपाधीमुळेच प्राप्त झाले आहेत. ३.

क्रियाः करोति विविधा धर्माधर्मैकहेतवः ।
नानायोनीस्ततः प्राप्य सुखदुःखैश्च युज्यते ॥ ४ ॥
हा धर्म व अधर्म यांना कारण होणार्‍या नानाप्रकारच्या क्रिया करतो. आणि त्यामुळे नानायोनींची प्राप्ति झाली असतां सुखदु:खांनी युक्त होतो. ४

पुनस्तत्संस्कृतिवशान्नानाकर्मरतः सदा ।
नानादेहान्समाप्नोति सुखदुःखैश्च युज्यते ॥ ५ ॥
पुनरपि त्या सुखदुःखाच्या संस्कारांच्या योगानें सर्वदा नानाप्रकारच्या कर्मामध्ये आसक्त होतो. त्यामुळे त्याला अनेक देह प्राप्त होतात वे पुनः तो सुखदुःखांचे भोग भोगतो. ५.

घटीयन्त्रवदेतस्य न विरामः कदापि हि ।
अज्ञानमेव मूलं स्यात्ततः कामः क्रियास्ततः ॥ ६ ॥
घटीयंत्राप्रमाणे या परंपरेची कधीच समाप्ति होत नाहीं. या सर्वांचे मूळ अज्ञान होय, त्यापासून काम व कामापासून क्रिया उत्पन्न होते.६.

तस्मादज्ञाननाशाय यतेत नियतं नरः ।
एतद्धि जन्मसाफल्यं यदज्ञानस्य नाशनम् ॥ ७ ॥
यास्तव, पुरुषाने अज्ञानाच्या नाशाकरितां नियमाने प्रयत्न करावा. अज्ञानाचा नाश करणें हेच जन्माचें साफल्य होय. ७.

पुरुषार्थसमाप्तिश्च जीवन्मुक्तिदशाऽपि च ।
अज्ञाननाशने शक्ता विद्यैव तु पटीयसी ॥ ८ ॥
त्यापासूनच पुरुषार्थाची प्राप्ति व जीवन्मुक्तावस्था हीं प्राप्त होतात. या अज्ञानाचा नाश करण्यास एक विद्याच समर्थ आहे. ८.

न कर्म तज्जं नोपास्तिर्विरोधाभावतो गिरे ।
प्रत्युताशाऽज्ञाननाशे कर्मणा नैव भाव्यताम् ॥ ९ ॥
हे पर्वता, अविद्येपासून उत्पन्न झालेले कर्म व उपासना हीं, त्यांचा तिच्याशीं विरोध नसल्यामुळे, तिचा नाश करण्यास समर्थ नाहींत. सारांश, कर्माच्या योगाने अज्ञानाचा नाश होईल अशी आशाही करू नये. ९.

अनर्थदानि कर्माणि पुनः पुनरुशन्ति हि ।
ततो रागस्ततो दोषस्ततोऽनर्थो महान्भवेत् ॥ १० ॥
अनर्थांत पाडणारी हीं कर्में पुनः पुनः प्राण्याला सक्त करतात (त्याच्यापुढे येऊन उभी राहतात), नंतर त्यांविषयीं त्याला प्रीति वाटते. कर्मांच्या प्रीतीपासून दोष उद्भवतो व शेवटीं मोठा अनर्थ ओढवतो. १०.

तस्मात्सर्वप्रयत्नेन ज्ञानं संपादयेन्नरः ।
कुर्वन्नेवेह कर्माणीत्यतः कर्माप्यवश्यकम् ॥ ११ ॥
तस्मात्, पुरुषानें दीर्घ अथवा कायिक, वाचिक व मानसिक प्रयत्नाने ज्ञान संपादन करावे. 'कुर्वन्नेवेह कर्माणि' म्ह० या लोकीं कर्म करीतच जिवंत राहण्याची इच्छा करावी, अशी श्रुति असल्यामुळे कर्म व 'ज्ञानादेव ही कैवल्यं' म्ह० ज्ञानानेच कैवल्यप्राप्ति होते, अशी श्रुति असल्यामुळे ज्ञानही अवश्य आहे; तस्मात्, ज्ञान व कर्म यांच्या समुच्चयाने अज्ञानाचा नाश होतो; ११,

ज्ञानादेव हि कैवल्यमतः स्यात्तत्समुच्चयः ।
सहायतां व्रजेत्कर्म ज्ञानस्य हितकारि च ॥ १२ ॥
कारण, कर्म हे ज्ञानाचे साहाय्यकारि व हितकारि आहे, १२,

इति केचिद्वदन्त्यत्र तद्विरोधान्न संभवेत् ।
ज्ञानाधृद्‍ग्रन्थिभेदः स्याधृद्‍ग्रन्थौ कर्मसंभवः ॥ १३ ॥
असे कोणी समुच्चयवादी याविषय म्हणतात, पण ज्ञान व कर्म यांचा विरोध असल्यामुळे ते संभवनीय नाहीं. कारण, ज्ञानानें हृदयग्रंथीचा भेद होतो व हृदयग्रंथि असली तरच कर्में संभवतात. १३.

यौगपद्यं न संभाव्यं विरोधात्तु ततस्तयोः ।
तमःप्रकाशयोर्यद्‌वद्‌यौगपद्यं न संभवि ॥ १४ ॥
यास्तव, या उभयतांच्या स्वरूपांत विरोध असल्यामुळे तम व प्रकाश यांचे एका कालीं रहाणे जसे संभवत नाहीं, त्याप्रमाणे यांचेंही एका काली एकाच ठिकाणीं रहाणे संभवनीय नाहीं. १४.

तस्मात्सर्वाणि कर्माणि वैदिकानि महामते ।
चित्तशुद्ध्यन्तमेव स्युस्तानि कुर्यात्प्रयत्नतः ॥ १५ ॥
हे महाबुद्धिमाना, सर्व वैदिक कर्में चित्तशुद्धीपर्यंतच उपयुक्त आहेत. यास्तव, तोपर्यंत त्यांचे दीर्घ प्रयत्नाने अनुष्ठान करावे. १५.

शमो दमस्तितिक्षा च वैराग्यं सत्त्वसंभवः ।
तावत्पर्यन्तमेव स्युः कर्माणि न ततः परम् ॥ १६ ॥
शम (अंत:करणाचा निग्रह), दम (श्रोत्रादि बाह्य इंद्रियांचा निग्रह), तितिक्षा (शीतोष्णादि सहिष्णुत्व), वैराग्य (ऐहिक व पारलौकिक विषयांविषयी निस्पृहता) व सत्त्वसंभव (अत:करणस्थ सत्त्वगुणांची शुद्धि ) यांची सिद्धि होईपर्यंतच कर्में करावीत, त्यानंतर करू नये. १६.

तदन्ते चैव संन्यस्य संश्रयेद्गुरुमात्मवान् ।
श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठं च भक्त्या निर्व्याजया पुनः ॥ १७ ॥
ह्या शमादिकांचा सिद्धि झाली असतां ज्याचें अंतःकरण स्वाधीन आहे, अशा पुरुषाने संन्यास करून श्रोत्रिय व ब्रह्मनिष्ठ अशा गुरूचा निष्कपटभक्तीनें आश्रय करावा, १७.

वेदान्तश्रवणं कुर्यान्नित्यमेवमतन्द्रितः ।
तत्त्वमस्यादिवाक्यस्य नित्यमर्थं विचारयेत् ॥ १८ ॥
आणि आलस्यादि दोष टाकून सर्वदा वेदान्तश्रवण करावें. 'तत्त्वमसि' म्हणजे ते तू आहेस या वाक्याच्या अर्थाचा सर्वदा विचार करावा, १८,

तत्त्वमस्यादिवाक्यं तु जीवब्रह्मैक्यबोधकम् ।
ऐक्ये ज्ञाते निर्भयस्तु मद्‌रूपो हि प्रजायते ॥ १९ ॥
कारण, तत्वमसि इत्यादि वाक्यें जीव व ब्रह्म यांच्या ऐक्याचे ज्ञान करून देणारी आहेत व यांच्या ऐक्याचा बोध झाला असतां प्राणी निर्भय होऊन माझ्या रूपाला येऊन पोचतो. १९.

पदार्थावगतिः पूर्वं वाक्यार्थावगतिस्ततः ।
तत्पदस्य च वाच्यार्थो गिरेऽहं परिकीर्तितः ॥ २० ॥
पदांच्या अर्थाचे ज्ञान झाल्यानंतर वाक्याच्या अर्थाचे ज्ञान होत असतें असा अनुभव आहे. यास्तव, मी तत्त्वमसि या वाक्यांतील पदांचा अर्थ सांगते. हे पर्वता, त्वंपदाचा वाच्यार्थ मी आहे असे पंडित सांगतात. २०.

त्वंपदस्य च वाच्यार्थो जीव एव न संशयः ।
उभयोरैक्यमसिना पदेन प्रोच्यते बुधैः ॥ २१ ॥
त्यामुळे त्वंपदाचा वाच्यार्थ जीवच होय यांत संशय नाहीं. आणि ज्ञानी या उभयतांचे ऐक्य असि पदाने सांगतात. २१.

वाच्यार्थयोर्विरुद्धत्वादैक्यं नैव घटेत ह ।
लक्षणाऽतः प्रकर्तव्या तत्त्वमोः श्रुतिसंस्थयोः ॥ २२ ॥
तत् व त्वं यांच्या वाक्यार्थाचे ठिकाणीं विरुद्धत्व असल्यामुळे त्यांचे ऐक्य होतच नाही. यास्तव, श्रुतीमध्ये असलेल्या तत् व त्वं या पदांची लक्षणा करावी. २२.

चिन्मात्रं तु तयोर्लक्ष्यं तयोरैक्यस्य संभवः ।
तयोरैक्यं तथा ज्ञात्वा स्वाभेदेनाद्वयो भवेत् ॥ २३ ॥
चिन्मात्रस्वरूप में उभयतांचेंही लक्ष्य आहे. त्यामुळे ऐक्याचा संभव आहे. सारांश, ह्याप्रमाणे या उभयतांचे ऐक्य जाणून आत्म्याशी अभिन्न व अद्वय व्हावे. २३.

देवदत्तः स एवायमितिवल्लक्षणा स्मृता ।
स्थूलादिदेहरहितो ब्रह्मसंपद्यते नरः ॥ २४ ॥
'तोच हा देवदत्त' या वाक्यांतील लक्षणेप्रमाणेंही जहदजहद् अथवा भाग लक्षणा आहे, असे सांगितले आहे. सारांश, या अनुभवद्वारा स्थूलादि देहांहून व्यतिरिक्त झालेला पुरुष ब्रह्म होतो. २४.

पञ्चीकृतमहाभूतसंभूतः स्थूलदेहकः ।
भोगालयो जराव्याधिसंयुतः सर्वकर्मणाम् ॥ २५ ॥
हा क्षुद्र देह पंचीकृत महाभूतांपासून झालेला आहे. हा भोगाचें आश्रयस्थान असून, जरा, व्याधि व सर्व कर्में यांनी युक्त आहे. २५.

मिथ्याभूतोऽयमाभाति स्फुटं मायामयत्वतः ।
सोऽयं स्थूल उपाधिः स्यादात्मनो मे नगेश्वर ॥ २६ ॥
मायामय असल्यामुळे हा मिथ्याभूत (विनाशी, क्षणिक ) आहे असे स्पष्ट दिसते. हे नगेश्वरा, तो मज आत्म्याचा स्थूल उपाधि आहे. २६.

ज्ञानकर्मेन्द्रिययुतं प्राणपञ्चकसंयुतम् ।
मनोबुद्धियुतं चैतत्सूक्ष्मं तत्कवयो विदुः ॥ २७ ॥
ज्ञानेंद्रियें, कर्मेंद्रियें व प्राणपंचक यांनी युक्त व मन आणि बुद्ध यांनी युक्त असे हे सूक्ष्म शरीर आहे, असे सूक्ष्मदर्शी म्हणातात. २७.

अपञ्चीकृतभूतोत्थं सूक्ष्मदेहोऽयमात्मनः ।
द्वितीयोऽयमुपाधिः स्यात्सुखादेरवबोधकः ॥ २८ ॥
हा आत्म्याचा सूक्ष्म देह अपंचीकृत भूतांपासून उत्पन्न झालेला आहे. हा सुखादिकांना जाणणारा सूक्ष्म देह आत्म्याची दुसरी उपाधि आहे. २८.

अनाद्यनिर्वाच्यमिदमज्ञानं तु तृतीयकः ।
देहोऽयमात्मनो भाति कारणात्मा नगेश्वर ॥ २९ ॥
अनादि व अनिर्वाच्य असे जे हें अज्ञान तोच, हे पर्वतश्रेष्ठा, आत्म्याचा कारणरूप तिसरा देह होय असे भासते. २९.

उपाधिविलये जाते केवलात्माऽवशिष्यते ।
देहत्रये पञ्चकोशा अन्तस्थाः सन्ति सर्वदा ॥ ३० ॥
पण उपाधींचा नाश झाला असतां केवल आत्माच अवशिष्ट राहतो. असो. या तीन देहांमध्ये सर्वदा अंतःस्थ (आंत गुप्त होऊन राहिलेले अथवा अंतर्भूत होणारे) पांच कोश आहेत. ३०.

पञ्चकोशपरित्यागे ब्रह्मपुच्छं हि लभ्यते ।
नेति नेतीत्यादिवाक्यैर्मम रूपं यदुच्यते ॥ ३१ ॥
या पंचकोशांचा परित्याग केला असतां, श्रुति 'नेति' 'नेति' इत्यादि वाक्यांनी ज्या माझ्या स्वरूपाचे वर्णन करते, तें सर्वाधार ब्रह्मच प्राप्त होते. ३१

न जायते म्रियते वा कदाचि-
     न्नायं भूत्वा न बभूव कश्चित् ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो
     न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ ३२ ॥
हे स्वरूप कधीं उत्पन्न होत नाही. तसेच हा आत्मा होऊन पुनः नाहींसा होणार आहे असेही नाहीं. कारण, हा अज [न जन्मणारा] त्यामुळेच नित्य [निर्विकार], शाश्वत [ त्रिकालाबाधित ] व पुराण आहे आणि शरीर नष्ट झाले असतांही हा नष्ट होत नाहीं. ३२.

हन्ता चेन्मन्यते हन्तुं हतश्चेन्मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ ३३ ॥
(देहाचे ठिकाण आत्मदृष्टि ठेवणारा ) हन्ता [हननक्रियेचा कर्ता] जर या आत्म्याला [दुसर्‍या देहाभिमान्याला] मारीन असे म्हणेल व तो दुसरा मी मेलों असे समजेल तर ते दोघेही आत्म्याविषयीं अज्ञ आहेत. कारण, हा मरत नाही व याला कोणी मारीत नाहीं. ३३.

अणोरणीयान्महतो महीया-
     नात्माऽस्य जन्तोर्निहितो गुहायाम् ।
तमक्रतुः पश्यति वीतशोको
     धातुप्रसादान्महिमानमस्य ॥ ३४ ॥
हा आत्मा सूक्ष्माहूनही सूक्ष्म व मोठ्याहूनही मोठा आहे व तो प्राण्याच्या हृदयामध्ये आत्मरूपानें स्थित आहे. निःस्पृह पुरुष सर्व इंद्रियें प्रसन्न झाल्यामुळे त्याचा महिमा पाहतो व त्यामुळे शोकरहित होतो. ३४.

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।
बुद्धिं तु सारथिं विद्धि मनः प्रग्रहमेव च ॥ ३५ ॥
इन्द्रियाणि हयानाहुर्विषयांस्तेषु गोचरान् ।
आत्मेन्द्रियमनोयुक्तं भोक्तेत्याहुर्मनीषिणः ॥ ३६ ॥
आत्मा हा रथी, शरीर हाच रथ, बुद्धि हा सारथि, मन हाच लगाम, इंद्रियें हेच घोडे व विषय हेंच मार्ग आहेत असे जाण. सारांश शरीर,इंद्रिये व मन यांनी युक्त असलेल्या आत्म्याला विवेकी भोक्ता असे म्हणतात. ३५-३६.

यस्त्वविद्वान्भवति चामनस्कः सदाऽशुचिः ।
स तु तत्पदमवाप्नोति संसारं चाधिगच्छति ॥ ३७ ॥
जो अविवेकी असतो, ज्याचे मन स्वाधीन नसते, व जो सर्वदा अपवित्र असतो, त्याला ते स्थान प्राप्त होत नाही, तर तो संसारांत पडतो. ३७.

यस्तु विज्ञानवान्भवति समनस्कः सदा शुचिः ।
स तु तत्पदमाप्नोति यस्माद्‌भूयो न जायते ॥ ३८ ॥
पण जो विवेकी असतो, त्याचे मन स्वाधीन असते व जो सर्वदा पवित्र असतो, त्याला ज्यापासून भ्रष्ट होऊन पुनः उत्पन्न व्हावे लागत नाहीं असे स्थान प्राप्त होते. ३८.

विज्ञानसारथिर्यस्तु मनः प्रग्रहवान्नरः ।
सोऽध्वनः पारमाप्नोति मदीयं यत्परं पदम् ॥ ३९ ॥
ज्याची विवेकबुद्धि हाच सारथि आहे व मन हा लगाम आहे, तो या संसाररूपी मार्गाच्या पार जातो.. तेच माझें परम पद आहे. ३९.

इत्थं श्रुत्या च मत्या च निश्चित्यात्मानमात्मना ।
भावयेन्मामात्मरूपां निदिध्यासनतोऽपि च ॥ ४० ॥
याप्रमाणे श्रवण, मनन यांच्या योगाने आत्म्याचा निश्चय करून अंतःकरणांत आत्मरूप अशा माझे एकाग्र चित्तवृत्तीने चिंतन करावे. ४०.

योगवृत्तेः पुरा स्वामिन्भावयेदक्षरत्रयम् ।
देवीप्रणवसंज्ञस्य ध्यानार्थं मन्त्रवाच्ययोः ॥ ४१ ॥
श्रवण, मनन निदिध्यासन यांच्या योगाने चित्ताला समाधीची योग्यता प्राप्त झाली असतां समाधीपूर्वी मंत्रवाच्य जे समष्टि व व्यष्टि त्यांचे ध्यान करण्याकरितां, स्वशरीरांत मायाबीजमंत्राच्या तीन अक्षरांची भावना करावी. ४१.

हकारः स्थूलदेहः स्याद्‍रकारः सूक्ष्मदेहकः ।
ईकारः काराणात्माऽसौ ह्रीङ्‌कारोऽहं तुरीयकम् ॥ ४२ ॥
हकार हा स्थूलदेह, रकार हा सूक्ष्मदेह व ईकार हाच कारणदेह असून र्‍हींकार म्हणजेच मी तुरीय आहे असे समजावे. ४२,

एवं समष्टिदेहेऽपि ज्ञात्वा बीजत्रयं क्रमात् ।
समष्टिव्यष्ट्योरेकत्वं भावयेन्मतिमान्नरः ॥ ४३ ॥
ह्याप्रमाणें समष्टि देहामध्येंही क्रमानें तीन अक्षरांची भावना करून मतिमान् पुरुषाने व्यष्टि व समष्टि यांचे एकत्व निश्चित करावे. ४३.

समाधिकालात्पूर्वं तु भावयित्वैवमादृतः ।
ततो ध्यायेन्निलीनाक्षो देवीं मां जगदीश्वरीम् ॥ ४४ ॥
सारांश, समाधिकालाच्या पूर्वी ह्याप्रमाणे आदरपूर्वक भावना करून, तदनंतर नेत्र मिटून मज जगदीश्वरी देवीचे ध्यान करावे. ४४.

प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ।
निवृत्तविषयाकाङ्‌क्षो वीतदोषो विमत्सरः ॥ ४५ ॥
नासिका व अंतर्भाग यांमध्ये राहून व्यवहार करणारे जे प्राण व अपान वायु त्यांना सम [= प्राणायामाच्या योगानें हृदयामध्ये स्थिर ] करून विषयांविषयींची आकांक्षा सोडावी, दोषांचा त्याग करावा, कोणाचा मत्सर करू नये. ४५.

भक्त्या निर्व्याजया युक्तो गुहायां निःस्वने स्थले ।
हकारं विश्वमात्मानं रकारे प्रविलापयेत् ॥ ४६ ॥
निष्कपटभक्तीने युक्त होऊन जेथे कोणाचा शब्द ऐकू येणार नाहीं अशा गुहेमध्ये बसावे. नंतर जो विश्वात्मा हकार त्याला रकारामध्ये लीन करावें. ४६.

रकारं तैजसं देवमीकारे प्रविलापयेत् ।
ईकारं प्राज्ञयात्मानं ह्रीङ्‌कारे प्रविलापयेत् ॥ ४७ ॥
वाच्यवाचकताहीनं द्वैतभावविवर्जितम् ।
अखण्डं सच्चिदानन्दं भावयेत्तच्छिखान्तरे ॥ ४८ ॥
तैजसनामक प्रकाशरूप रकाराला ईकारांत लीन करावें. प्राज्ञसंज्ञक जो ईकाररूप आत्मा त्याला र्‍हींकारामध्ये लीन करावे; व ह्याच्या शेवटीं वाच्यवाचकताहीन, द्वैतभावशून्य, खंडरहित व सच्चिदानंद अशा स्वरूपाचें चिंतन करीत रहावे. ४७-४८,

इति ध्यानेन मां राजन्साक्षात्कृत्य नरोत्तमः ।
मद्‌रूप एव भवति द्वयोरप्येकता यतः ॥ ४९ ॥
हे राजा, अशा ध्यानाने धन्य पुरुषाला माझा साक्षात्कार झाला असतां (दोघांचेंही ऐक्य असल्यामुळें) तो मद्‌रूपच होतो. ४९.

योगयुक्त्याऽनया द्रष्टा मामात्मानं परात्परम् ।
अज्ञानस्य सकार्यस्य तत्क्षणे नाशको भवेत् ॥ ५० ॥
ह्या योगरूपी युक्तीनें मज परात्पर आत्म्याचा साक्षात्कार झाला असतां तो कार्यासहवर्तमान अज्ञानाचा तत्काल नाशक होतो. ५०.

॥ इति श्रीदेवीभागवते देवीगीतायां तृतीयोऽध्यायः ॥
॥ तिसरा अध्याय समाप्त ॥ ३ ॥GO TOP