अष्टावक्रगीता

प्रकरण १३

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

आत्म-बोध झाल्यानेच कर्म बंधनातून मुक्ति मिळते.

अकिंचनभवं स्वास्थ्यं कौपीनत्वेऽपि दुर्लभम् ।
त्यागादाने विहायास्मादहमासे यथासुखम् ॥ १ ॥


अनुवाद - 'काहीही अस्तित्वात नाही' असा दृढभाव निर्माण झाल्यामुळे चित्ताची जी स्थिरता निर्माण होते ती भगवी वस्त्रे धारण करणार्‍या संन्याशाला सुद्धा दुर्लभ आहे. म्हणून त्याग व ग्रहण या दोघांना सोडून मी सुखपूर्वक स्थिर आहे.


विवेचन - राजा जनक आत्मरूपात स्थिर आहे. शरीर, मन, अहंकार या सर्वांहून आपण भिन्न असल्याची अनुभूती त्यास होत आहे. या जगातली सर्व कर्मे, भावना, विचार, त्याग, ग्रहण (स्वीकार) चांगले, वाईट, हे सर्व शरीर, मन व अहंकारामुळे जाणवते. आत्मा यापेक्षा वेगळा व या सर्वांचा केवळ साक्षी आहे. त्याचा ह्या स्वीकाराशी, नकाराशी, चांगल्याशी, वाईटाशी काही संबंध नाही. ही सर्व कार्ये प्रकृतीमुळे होतात. राजा जनक आत्मज्ञानाच्या एवढ्या परम उंचींला पोहचला आहे की आता त्याच्यासाठी जग, जगातील कर्मे, त्याग, स्वीकार या सारख्या गोष्टी निरर्थक झाल्या आहेत कारण आत्म्याचा या सर्वांशी काहीच संबंध नाही. या भावाच्या दृढतेमुळे त्यांचे चित्त परम स्थिर स्थितीत शांत स्वरूप झाले आहे. समुद्राच्या लाटा ज्याप्रमाणे शांत होतात त्याप्रमाणे राजा जनकाच्या चित्तातील सर्व इच्छा, तक्रारी, शंका, पर्याय सारे काही शांत झाले आहे. आता चित्तात कोणतेही तरंग निर्माण होत नाहीत किंवा कोणत्याही लाटा निर्माण होत नाही. चित कमालीचे शांत होणे हीच आत्मज्ञान झाल्याची कसोटीयुक्त खूण आहे. ज्या चितात अजून इच्छा निर्माण होतात, खळबळ माजते, मनात शंका निर्माण होतात, त्याचे चित्त अद्याप शांत झाले नाही हे स्पष्ट होते. जगापासून दूर पळणार्‍या आणि भगवी वस्त्रे घालणार्‍या संन्याशाला सुद्धा सर्व इच्छा व शंका यापासून मुक्त झालेल्या चित्ताची स्थिरता अतिदुर्लभ आहे. सर्व जबाबदार्‍या व गृहस्थ धर्मातल्या नात्यांचा त्याग केला व भगवे कपडे घातले म्हणजे चित्ताची चंचलता नाहीशी होते असे मुळीच नाही. अशा माणसाला आत्मज्ञानी म्हणता येणार नाही. बाह्य अवडंबर म्हणजे आत्मज्ञान नव्हे. राख लावण्याने व जंगलात भटकल्याने आत्मज्ञान होत नसते. एखाद्या गोष्टीचा त्याग किंवा स्वीकार हे सुद्धा बाह्य अवडंबर आहे. त्यामुळे चित्त शांत होत नाही. राजा जनक म्हणतो की माझ्या चित्ताची चंचलता पूर्णतया शांत झाल्याने आता मी सुखपूर्वक शांत स्थितीत आहे. स्वीकार वा त्याग सुद्धा चित्ताच्या चंचलतेमुळे होतात.




कुत्रापि खेदः कायस्य जिव्हा कुत्रापि खिद्यते ।
मनः कुत्रापि तत्त्यक्त्वा पुरुषार्थ स्थितः सुखम् ॥ २ ॥


अनुवाद - कुठे शरीराच्या व्याधीमुळे दुःख आहे, तर कुठे वाचेमुळे दुःख आहे, कुठे मन दुःखी आहे. ह्यामुळे या तिघांचा त्याग करून मी आत्मानंदाच्या पुरूषार्थात सुखपूर्वक स्थिर आहे.


विवेचन - शारीरिक, मानसिक वाचेच्या दुःखामुळे मनुष्य सदैव पिडीत आहे. शरीर अनेक व्याधींचे माहेरघर आहे. शरीर हे अनेक प्रकारच्या रोगांचे कष्टांचे व म्हणून दुःखाचे कारण आहे. शरीर आहे तोपर्यंत सुख होणे शक्यच नाही. शारीरिक कष्ट, रोग, थकवा, अपंग होणे, भरण पोषणाकरितां शारीरिक श्रम करावे लागणे या सर्वांमुळे शरीर दुःखी होते. मुके होणे, विचार न करता मनातील भाव प्रकट करणे, अपशब्द बोलणे, कटू भाषण कणे, खोटे बोलणे, अमर्याद अहंकारी वचन बोलणे, अनावश्यक व निरर्थक बोलणे किंवा जरूरी असूनही न बोलणे ही सर्व वाचेतून निर्माण होणारी दुःखे आहेत. वाणीच्या या प्रकारच्या दोषांमुळे बुद्धिवान पुरूषावरसुद्धा अनेक संकटे कोसळतात. मुक्याचे आयुष्य तर दुःखमयच असते. हे सर्व वाणीचे दोष आहेत. मनाच्या दुःखाचे तर असंख्य प्रकार आस्ते. अभाव, अपमान, चिन्ता, आशा, अपेक्षा, महत्त्वाकांक्षा, हीन भावना, काहीतरी मिळविण्याची चिन्ता, काहीतरी गमावण्याची चिन्ता, रक्षणाची चिन्ता, संकल्प, इच्छा या सर्वांमुळे मन नेहमी दुःखी रहाते. जगात स्वस्थ व शांत मनाचा माणूस सापडणे जणू अशक्य झाले आहे. राजा जनक म्हणतात की मी या तीन्ही प्रकारच्या दुःखांचा त्याग केला आहे कारण हे तीन्ही म्हणजे आत्मा नव्हे, हे मी जाणल्यामुळे आत्मानंदात मी सुखपूर्वक स्थिर आहे. आत्मरूपात स्थिर झालेला योगी केवळ आत्मानंदाचा अनुभव घेतो. शरीर वाणी व मन ह्यांच्या दुःखांमुळे तो विचलित होत नाही. आत्मज्ञान प्राप्त करणे हा सर्वात मोठा पुरूषार्थ आहे व त्यामुळेच पुरूष-तत्वाची (आत्माची) प्राप्ती होऊ शकते.




कृतं किमपी नैव स्यादिति संचिन्त्य तत्वतः ।
यदा यत्कर्तुमायाति तत्कृत्वाऽऽसे यथासुखम् ॥ ३ ॥


अनुवाद - कोणतेही क्यं आक्याने केलेले नसते असा क्तिार करून जे र्क्य करावे लागते ते कम (त्यातून मुक्त राहून) सुखर्श्क स्थिर आहे.


विवेचन - मनुष्याची कर्मे दोन प्रकारची असतात. काही कर्में तर निसर्गतः व शरीराच्या स्वभावामुळे होतात. ती करावी लागत नाही व ती करण्यासाठी परिश्रमही करावे लागत नाही. उदाहरणार्थ श्वास घेणे, अन्न पचवणे, हृदयाचे स्पंदन होणे, रक्ताचे शरीरात संचरण होणे, ही शरीराची कामे आपोआप होत असतात. झोपेतसुद्धा ही कामे होत रहातात. काही कर्मे मनुष्य कर्तव्य समजून करतो, काही कर्मे मान-सन्मान व पद-प्रतिष्ठा प्राप्त करण्याच्या हेतूने करतो. काही कर्मे भोगासाठी, वासनेसाठी, काही शरीर पोषणासाठी करतो. काही कर्मांचा हेतू सुख-शांती व आनंदप्राप्ती असतो. आपल्या विकासासाठी, उन्नतीसाठी तर मनुष्य अनेक कामे करतो. काही वेळा दुसर्‍याच्या भलाईसाठी करतो. काही कामांच्या मुळाशी राग, द्वेष व ईर्ष्या सुद्धा असते. या प्रमाणे कर्माचे जाळे फार विस्तृत आहे पण यातले एकही कर्म आत्माकृत म्हणजे आत्म्याने केलेले नसते, कारण आत्मा अ-कर्ता आहे. त्याचा कर्माशी संबंध नाही किंवा कर्म फळांशीही संबंध नाही. ह्या सर्व कर्मांचा संबंध शरीर, मन व अहंकार यांच्यापर्यंतच मर्यादित आहे. अहंकाराने केलेले प्रत्येक कर्म त्याचे कर्मफळ देतेच. स्वतःकडे कर्तेपण घेऊन केलेले कर्म, उद्देश्य मनात बाळगून केलेले कर्म व फळाच्या आसक्तिने केलेले कर्म हे बंधनकारक ठरते. मोक्ष, मुक्ति, स्वर्गप्राप्ती व शक्तिलाभासाठी जे कार्य केले जाते ते सुद्धा कर्म आहे व त्याचेही कर्म-फल कर्त्याला मिळतेच. जिथे मनुष्य कर्ता आहे, तिथे 'मी' -पणा आहे तिथे प्रत्येक कार्य हे कर्मफल देणारे कर्मच आहे व ते त्या कर्माच्या कर्त्याला म्हणजे 'मी'पणा ठेवणार्‍या माणसाला भोगावे लागते. आत्मज्ञानीसुद्धा कर्म करतात कारण खाणेपिणे व जीव-रक्षणासाठी त्यांनाही काही कर्मे करावी लागतात. एवढेच नाही तर अज्ञानी माणूस जी कर्मे करतो ती सर्व कर्मे आत्मज्ञानी माणसाला सुद्धा करावी लागतात. आत्मज्ञानी पुरूष संन्यासी होऊन भगवे कपडे घालत नाहीत किंवा जंगलात पळून जात नाही कृष्णाप्रमाणे युद्ध करूनसुद्धा ते त्या कर्मांनी लिप्त होत नाहीत. पण संन्यासी भगवे कपडे घातल्यावर सुद्धा कर्मात अडकतो. जर या सर्व कर्मांच्या मागे अहंकार असेल तर मी कर्मे बंधनस्वरूप होतात अन्यथा नाही. ज्ञानी मनुष्य अहंकाराचा त्याग करून स्वाभाविकपणे कर्म करतात. त्यांना कर्मे करण्याचाही आग्रह नसतो व तीं त्यागण्याचाही आग्रह नसतो कारण आत्मरूपात स्थिर झाल्यावर त्यांना या तत्वाचा बोध होतो की कोणतीही कर्मे आत्मा करत नाही, सर्व कर्मे प्रकृतीजन्य आहेत व मी प्रकृतीपासून वेगळा व चैतन्यरूप आहे. यामुळे राजा जनक सांगतो की असा बोध झाल्यामुळेच जे कर्म करावे लागते ते अनाग्रहीपणाने करून मोकळा होतो. कर्म करण्याची व त्यांचा त्याग करण्याची अशी कोणतीही वासना शिल्लक नाही म्हणूनच मी सुखपूर्वक स्थिर आहे.




कर्मनैष्कर्म्यनिर्बंधभावा देहस्थ योगिनः ।
संयोगायोगविरहादहमासे यथासुखम् ॥ ४ ॥


अनुवाद - कर्माच्या व निष्कर्माच्या संयुक्त बंधनात अडकलेल्या शरीराबद्दल योगी ममत्वभाव बाळगतात, पण मी ह्या देहाच्या व कर्माच्या संयोग-वियोगापासून मुक्त होऊन स्थिर आहे.


विवेचन - जिथे जिथे शरीराबद्दल ममत्व आहे तिथे तिथे अहंकारसुद्धा असतो व जिथे अहंकार आहे तीथे कर्तासुद्धा असतो. कर्ता असलेले प्रत्येक कर्म हे बंधनकारक होते. निष्कर्म असणे म्हणजे कर्माला कर्ता (मी) नसणे. कर्म-त्याग म्हणजे निष्कर्म स्थिती नव्हे. कर्म विरहीत जगणे म्हणजेही निष्कर्म नव्हे. निष्क्रियता म्हणजेसुद्धा निष्कर्म नव्हे. प्रेत व आळशी माणसे काही निष्कर्म नसतात. ज्या कर्मात 'मी'पणा नाही, फळाशी आसक्ति नाही तेच कर्म निष्कर्म आहे. संन्याशी व भिकारी यांनासुद्धा कर्म करावे लागते. कर्म-त्याग करणे, कर्म न करणे म्हणजे ईश्वराच्या कामात व्यत्यय निर्माण करणे, ईश्वरीय योजनेत बाधा निर्माण करणे आहे. कर्मे करावी पण ती ईश्वरीय समजून करावी. कर्तेपणातून, 'मी' करतो या भावनेतून मुक्त होऊन कर्मे करावी. स्वतःला केवळ निमित्त समजावे. मी पणाची जाणीव होणे हेच पहिले पाप आहे. सर्व घडते, होते, ते सर्व ईश्वरामुळे. त्याच्यात नियमांमुळे सारे घडत आहे. कर्म करायला नकार देणे म्हणजे ईश्वराच्या कामाला नकार देणे आहे. निष्कर्म हे अपेक्षारहित कर्म असते. काहीतरी मोबदला मिळावा म्हणून, मोक्ष किंवा मुक्ति मिळावी म्हणून कर्माचे कर्तेपण सोडणे हे निष्काम कृत्य नव्हे. कारण त्याला मोक्षाची लालसा आहे. ही तर सौदेबाजी आहे, त्याग नव्हे. वासनापूर्तीसाठी केलेले भजन पूजन, पाठ, ध्यान, तप, सुद्धा निष्काम कर्म नव्हे. हे सकाम कर्मच दुःखांचे कारण असते. पाच रूपयाचे नारळ देऊन, हनुमान चालिसाच्या पोथीचे वाचन करून, आपल्या खाजगी लाभाच्या मागण्यांची यादीच देवासमोर ठेवणे ही काही साधना नाही व पुण्यसुद्धा नाही. काहीही मागणे मग ते मागणे मोक्षाचे का असेना मागणे, हे जगाबद्दल आसक्तिचे लक्षण आहे व न मागणे हीच साधना आहे. कर्मापासून पळ काढणे हेसुद्धा कर्मच आहे. त्याच्यातही कर्ता भाव आहे. गीतेत सांगितले आहे की 'या जगात काही तरी लाभ व्हावा, कर्म सिद्धि व्हावी म्हणून लोक ईश्वराची पूजा करतात. शरीराकरिता आवश्यक तेवढे कर्म स्वाभाविकपणे करणारा कर्म करूनसुद्धा कर्माच्या बंधनातून मुक्त रहातो. आग्रहाने व हट्टाने केलेले कर्म हे बंधनकारक कर्म आहे. स्वीकार व त्याग या दोघांतही आग्रह आहे म्हणून ते दोन्हीही बंधनकारक कर्म आहे. अपेक्षा हेच दुःखाचे असंतोषाचे कारण आहे. कर्मत्याग करण्याचा उपदेश करणार्‍यांनी जगाला विकृत केले आहे. जीवन व कर्म पर्यायवाची म्हणजेच समानार्थी आहेत. एक दोन्ही राहतील किंवा दोन्ही नष्ट होतील. योगी पुरूषाची तपःश्चर्या साधना शरीरापासून सुरवात होते ती साधनेच्या शिडीची पहिली पायरी आहे. एक एक शिडी पार करत तो पुढे वाटचाल करतो. पण तरीही तो शरीराची आसक्ति बाळगून असल्याने मोहात सापडतो. ह्या आसक्तिमुळेच तो कर्म व निष्कर्म या दोघांत श्रद्धा ठेवतो. कारण शरीराबद्दल जो आसक्ति ठेवेल त्याने कोणतेही कर्म केले किंवा तप केले तरी ते कर्म बंधनकारक कर्म सिद्ध होईल. म्हणून कर्मे व निष्कर्म या दोघात श्रद्धा ठेवणारा मनुष्य त्या दोघांच्याही बंधनात सापडतो. या सुखाच्या संयोगाशी वा वियोगाशी देह जोडलेला असला तरी यांपासून वेगळ्या असणार्‍या चैतन्य आत्म्याशी एकरूप होऊन राजा जनक स्थिर झाला आहे. आता कर्म, निष्कर्म हे राजाला बंधनरूप उरलेले नाही, कारण राजा जनकाला कशाचीही अपेक्षा नाही व कशाचाही आग्रह नाही.




अर्थानर्थौ न मे स्थित्वा गत्वा वा शयनेन वा ।
तिष्ठन् गच्छन् स्वपंस्तस्मादहमासे यथासुखम् ॥ ५ ॥


अनुवाद - थांबणे, चालणे वा झोपणे यात माझ्यासाठी काही अर्थ नाही (उद्देश नाही) व अनर्थ पण नाही. त्यामुळे ह्या सर्व क्रिया - थांबणे, जाणे, झोपणे करतांनासुद्धा मी सुखपूर्वक स्थिर आहे.


विवेचन - अहंकार मनुष्याला जन्मतःच प्राप्त झाला आहे. प्रापंचिक माणूस अहंकारी असला तर आश्चर्य नाही कारण प्रपंचाचा सारा खेळ अहंकाराचाच खेळ आहे. परंतु तो ज्ञान-प्राप्तीला बाधक आहे. पण प्रापंचिक माणसापेक्षाही धार्मिक क्षेत्रातील व्यक्तिचा अहंकार जास्त असतो. अहंकार नेहमी दुसर्‍याचे लक्ष स्वतःकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतो. आपले जेवण, कपडे, घर, दागीने, मोटारी ह्या सर्व बाबी आपण आपल्या गरजेच्या पूर्तीसाठी न करता जणू अहंकाराच्या परिपूर्तीसाठी करतो. सारे काही दुसर्‍याला दाखविण्यासाठी करतो. छोट्या व हीन व्यक्तिचा अहंकार सर्वात जास्त असतो. जसा जसा अहंकार वाढत जातो तशीतशी व्यक्तिची श्रेष्ठता कमी कमी होत जाते. मनुष्यसुद्धा प्रकृतीचे एक अंग आहे. प्रकृतीचे, निसर्गाचे बाकीचे सर्व भाग निरुद्देश जगतात, आपापल्या स्वभावानुसार जगतात. पण निसर्गाचाच एक भाग असूनसुद्धा मनुष्याने मात्र आपल्या जीवनाचा उद्देश निश्चित केला आहे. त्याने आपल्या कामाचा उद्देश निश्चित केला आहे. फार काय खाणे, पिणे, झोपणे, थांबणे, चालणे, बसणे ह्या सर्वांचा उद्देश त्याने निश्चित केला आहे. पण सृष्टीची निर्मिती काही कुठल्या उद्दिष्टाने झालेली नाही. एकच चैतन्यमयी उर्जा स्वाभाविकपणे आपल्या गुण कर्मानुसार विविध रूपात व्यक्त होत पसरत गेली. पण तो तिचा स्वभाव आहे, उद्देश नाही. उद्देश ठरविणे हे तर मनुष्याचे काम आहे. उद्देशपूर्ण जीवन जगण्याने मनुष्याच्या अहंकाराची तृप्ती होते. पण उद्देश निश्चित करण्यानेच संघर्षालाही सुरवात होते. जिंकण्यासाठीच खेळ खेळायचा असेल तर संघर्ष होणे अटळ आहे. ती तर जणू अनिवार्य बाब होईल. पैसे मिळवायचे असतील तर शोषण, लबाडी, बेईमानी व भ्रष्टाचार आवश्यकच आहे. अभ्यास न करता परीक्षा पास व्हायचे असेल तर चलाखीने गैरप्रकार करावे लागणारच. जे कार्य स्वभावपूर्वक, सहजपणे व नैसर्गिक वृत्तीने होते त्यातून अहंकार निर्माण होत नाही. पण संतसुद्धा अहंकारामुळे स्वतःच्या मिरवणूका व शोभायात्रा काढवून घेतात. नग्न फिरतात, भगवे किंवा पांढरे झगे घालतात, उपवासाचे हिशोब ठेऊन कोणी किती उपवास केले याचे वर्णन करतात. याप्रमाणे धार्मिक क्षेत्रातल्या व्यक्तिंचासुद्धा हा अहंकारच वेगवेगळ्या रूपाने प्रकट होतो. जनक राजा म्हणतो की, "मी आत्मज्ञानात विलीन झालो. तो माझा स्वभावच आहे. आता मी आपल्या स्वभावातच आहे व स्वभावानुसार जगतो आहे. लाभासाठी नाही किंवा हानिसाठी नाही. अर्थासाठी नाही व अनर्थासाठी नाही. तशी दृष्टीच उरली नाही. आता चालण्याचा, झोपण्याचा, फिरण्याचा, थांबण्याचा माझ्यासाठी काही अर्थ नाही व अनर्थसुद्धा नाही. ही सर्व कर्मे स्वभावानुसार होत आहेत. त्यात काही लाभ ज्ञानीचा हेतू नाही किंवा देखावा करण्याचा उद्देश नाही. माझ्या स्वाभाविकपणात मी सुखपूर्वक स्थिर आहे."




स्वपतो नास्ति मे हानिः सिद्धिर्यत्नवतो न वा ।
नाशोल्लासौ विहायास्मादहमासे यथासुखम् ॥ ६ ॥


अनुवाद - झोपल्यामुळे माझे काही नुकसान नाही किंवा प्रयत्न केल्याने मला कोणतीही सिद्धि प्राप्त होणार नाही असेही नाही. त्यामुळे नुकसान व लाभ ह्या दोघांना सोडून मी सुखपूर्वक स्थिर आहे.


विवेचन - राजा जनक म्हणतो की माझी सारी कर्मे आता स्वभावानुसार होत आहेत. ती आपोआप होत आहेत. निसर्गाच्या विरूद्ध कोणतेही कर्म मी करत नाही व होत नाही. आता मला झोपल्यामुळे काही नुकसान होत नाही. झोप लागणे हा स्वभाव आहे म्हणून मी झोपून जातो. स्वभावाच्या विरुद्ध मी जागत नाही. झोपल्याने माझे नुकसान होईल असा मी विचार करत नाही. काम बिघडेल, काम होणार नाही, नुकसान होईल, हानि होईल असे विचार करत नाही किंवा प्रयत्न केल्याने मला कोणती सिद्धीही मिळणार नाही. लाभ-ज्ञानी, नफा-तोटा व त्यासाठी उद्देश निश्चित करणे हेच सार्‍या अशान्तिचे मूळ कारण आहे. ज्ञानी त्याच्या पलीकडे निघून जातो व परम शांती प्राप्त करतो. या उलट प्रापंचिक व्यक्ति त्यातच अडकून नेहमी दुःखी, त्रासलेली व चिंताग्रस्त राहते.




सुखादिरूपानियमं भावेष्वालोक्य भूरिशः ।
शुभाशुभे विहायास्मादहमासे यथासुखम् ॥ ७ ॥


अनुवाद - अनेक प्रकारच्या स्थितीमधे सुख वगैरेंची अनित्यता वारंवार पाहून आणि शुभ व अशुभ दोन्हीही सोडून मी सुखाने स्थिर आहे.


विवेचन - अज्ञानी माणसाला सारे जग दुःखमय भासते. त्याला जगात सर्वत्र दुःखच दुःख दिसते. सुख त्याला दिसतच नाही. कारण दुःखे अधिक मोठी करून पाहण्याची व सुखे छोटी समजण्याची त्याला सवयच लागली आहे. त्याच्या दृष्टीमुळे त्याला जे दुःख दिसते त्याबद्दल तो समाजाला किंवा ईश्वराला दोष देतो. दुःखे कमी व्हावी, सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून तो अनेक प्रकारची चांगली वाईट कामे करतो. दुसर्‍याला दुःख देऊनही स्वतःसाठी सुख मिळविण्याचे तो प्रयत्न करतो. परंतु राजा जनक म्हणतो की मी अनेक जन्मांत व अनेक प्रकारच्या परिस्थितीत अनुभव घेतला आहे की दुःखे जशी कायमची रहात नाहीत तशीच सुखेसुद्धा कायमची रहात नाहीत. ती दोन्हीही अनित्य आहेत. सुखेसुद्धा नष्ट होणारी आहेत. शाश्वत असे सुख या ऐहिक जगात नसतेच. हा सृष्टीचा नियम आहे. मला आत्मानंदाची प्राप्ती झाली कारण मी या शुभ वा अशुभ, सुखाच्या इच्छेने केलेल्या, चांगल्या किंवा वाईट कर्मांच्या पलिकडे केवळ आपल्या स्वभावात नैसर्गिकरित्या सहजपणे स्थिर आहे. अज्ञानी या द्वंदाच्या व द्वैताच्या संघर्षात सापडून नेहमी दुःखी व मानसिक ताणतणावाखाली जगतो. याउलट त्या दोघांतून मुक्त होऊन ज्ञानी आत्मानंदी विलिन होऊन सुखाने जगतो. हीच मोक्षाची किंवा निर्वाणाची अवस्था होय.




GO TOP