अष्टावक्रगीता

प्रकरण ९ वे

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

जगाबद्दल उदासीन वृत्ती धारण करून स्वतःचे ज्ञान करून घेणे म्हणजेच मोक्ष.

कृताकृते च द्वन्द्वानि कदा शान्तानि कस्य वा ।
एव ज्ञात्वेह निर्वेदाद्‌भव त्यागपरोऽव्रती ॥ १ ॥


अनुवाद - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र पुढे निवेदन करतात की - "केलेले कर्म किंवा न केलेले कर्म (इच्छा) आणि द्वंद्व कधी कुणी शांत करू शकला आहे कां ? हे ओळखून या संसारात (जगात) उदासीन वृत्ती धारण करून, सर्व इच्छांचा त्याग करून अ-व्रती (अनाग्रही) हो !"


विवेचन - आठव्या प्रकरणात बंधन आणि मोक्ष यांची सविस्तर चर्चा केल्यानंतर या प्रकरणात मुनीश्रेष्ठ अष्टवक्र बंधनातून मुक्त होऊन शांती प्राप्त करण्यासाठी करावयाच्या उपायांची माहिती देत आहेत. जगाच्या व्यवहारात आपली आवड-निवड गुंतली की दुःखाला सुरवात होते. म्हणून जगाबद्दल उपेक्षा वृत्ती ठेवावी. त्याचे प्रती उदासिन होऊन आपल्या स्वतःचे आत्मज्ञान प्राप्त करणे 'आत्मा' म्हणून जगणे ह्याच मागनि शांती प्राप्त करता येईल, अन्यथा नाही. न केलेले कर्म म्हणजे ज्या कर्माची इच्छा आहे पण केले नाही असे कर्म. पण अशी इच्छा करणे हेच एक कर्म आहे. म्हणून केलेले कर्म व न केलेले कर्म या दोघांच्या मुळाशी वासना आहे. ज्या क्रिया अहंकाराने केल्या त्याचे फळ तर भोगावेच लागेल. त्यातून सुटण्याचा मार्ग नाही. कर्मभोग भोगल्याशिवाय ते टळत नाहीत. पण ज्या कर्याची केवळ इच्छा केली त्या इच्छेतही वासना अंतर्निहीत असल्याने तिचाही कर्मभोग भोगावा लागतो. म्हणून कुणा दुसर्‍याचे कधी वाईट चिंतू नये. मनुष्य केवळ कर्मांमुळेच अशान्त होतो असे नसून विचारांनी, इच्छांनी, वासनांनी जास्त अशांत आहे. कर्मापेक्षा ह्या इच्छांकडे जास्त लक्ष द्यायला हवे कारण सर्व कर्माच्या मुळाशी या इच्छाच असतात. विचारांचे तरंग मनात उमटले की मनाला अशुद्धता येण्यास सुरवात होते. तेच पाप होय. त्याचेच बंधन होते व त्याचा भोग भोगल्याशिवाय शांत होत नाही. केवळ वाईट वर्तन केल्यानेच पाप होत नाही, तर पापी कृत्याचा विचार केल्यानेसुद्धा कर्मभोग सुरू होतो. अपराधांप्रमाणेच अपराधांचा विचार सुद्धा माणसाला पापी बनवतो. ह्यामुळेच सुखदुःखाचे द्वंद्वाला सुरवात होते. सारे जग द्वंद्वात्मक भावनांनी भरलेले आहे कारण त्या पलीकडच्या शाश्वत अशा अद्वैताची व जगाची जणू ओळखच नाही. सुख-दुःख, लाभ-हानि, प्रेम-घृणा, हिंसा-अहिंसा, ग्रहण-त्याग, राग-विराग, जीवन-मृत्यू ह्या द्वंद्वामुळेच माणसाचे मन भरून गेले आहे. ही सारी द्वंद्वे म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातल्या एका बाजूचा स्वीकार करून दुसर्‍या बाजूचा त्याग करता येत नाही. दोन्हींचा लाभ होईल किंवा दोन्हीतून मुक्ति होईल. केवळ एकच गोष्ट कुणाला मिळणार नाही. ज्याला जीवन मिळाले त्याला मृत्यूसुद्धा मिळणारच. ज्याने अपराध केला त्याला पाप मिळणारच. म्हणून अष्टवक्र महाराज सांगतात की केलेल्या व न केलेल्या कर्माची फळे भोगल्याशिवाय त्यांच्या परिणामातून सुटका होत नसते. त्यांना कुणीही आपोआप शान्त करू शकत नाही. म्हणून त्या कर्माचा व इच्छांचा त्याग करणे व कोणताही आग्रह न ठेवणे, अ-व्रती होणे हाच शांति प्राप्त करण्याचा उपाय आहे. इच्छा ठेवून, संकल्प करून, शपथा खाऊन, व्रते करण्याचा निश्चय करून, मनुष्य अधिकाधिक अशांत होतो, बेचैन होतो. जे कर्म केले आहे त्यामुळे तर मन अशांतीच्या भोवर्‍यात सापडतेच पण जे कर्म केलेले नाही व जे करण्याची इच्छा आहे, ज्याचा संकल्प केला आहे, त्यामुळे सुद्धा मनात अशांती निर्माण होते. ह्या दोन्ही प्रकारच्या अशांतीतून मुक्ति मिळविण्याचा रस्ता म्हणजे जगाप्रती उदासीन होऊन आत्मज्ञानात रमणे होय.
कस्यापि तात धन्यस्य लोकचेष्टावलोकनात् ।
जीवितेच्छा बुभुक्षा च बुभुत्सोपशमं गताः ॥ २ ॥


अनुवाद - या पृथ्वीवरील समस्त क्रिया व्यवहार, उत्पत्ति व विनाश पहिल्यावर कोणत्या भाग्यवंताची जगण्याची इच्छा, उपभोगाची वासना व ज्ञानाची इच्छा शांत झाली आहे.


विवेचन - आत्मा सर्व दोषांतून मुक्त आहे, तो केवळ चैतन्यमय व केवळ ज्ञानमय आहे, उत्पत्ति व विनाश विरहित आहे. आत्म्याची उत्पत्ती होत नाही व विनाशही होत नाही. परंतु हे जग व या जगातील सर्व वस्तू व व्यवहार यांची उत्पत्ती होते व विनाशसुद्धा होतो. कारण ते शाश्वत नसून अनित्य आहे, सदोष आहे, अशांत व अज्ञानमय आहे. परम आनंद स्वरूप असणार्‍या आत्म्याच्या अज्ञानामुळेच प्रापंचिक माणसांची जगण्याची इच्छा, उपभोग घेण्याची इच्छा कधी शांत होत नाही. ह्या जगात 'अजून' आणि 'अजून' सुख प्राप्ती करण्याची त्याची इच्छा कायम रहाते. जास्तीत जास्त सुख मिळविण्यासाठीच तो सारखा धडपडत असतो. परंतु ज्या ज्ञानी-पुरुषाने आत्म-तत्वाचा अद्‌भूत रस प्राशन केला आहे त्याला हे प्रापंचिक उपभोग, वासना फार काय जगण्याची इच्छा हे सारे निरर्थक वाटते. म्हणून तो ह्या जगाबद्दल मोहमाया बाळगत नाही व उदासीन वृत्ती स्वीकारतो. त्याला या अशाश्वत, अनित्य जगाप्रति मनात वैराग्य उद्‌भवते. कारण परम आनन्यदायी असे शाश्वत व नित्य टिकणारे निर्दोष सुख त्यास प्राप्त झाले असते. म्हणून तो या पृस्वौतलावरील क्षणिक टिकणार्‍या सुखाची इच्छा करत नाही. अष्टवक्र मुनी सांगतात की आत्मज्ञानाच्या अभावामुळे अज्ञानामुळेच प्रापचिक व्यक्ति या तात्पुरत्या सुखाची, जगण्याची उपभोगाची वासना बाळ्यातात व त्यामुळेच त्यांना कधीही ज्ञान-प्राप्ती होत नाही. हजारो व्यक्तिमधे क्वचितच असा एखादाच भाग्यवंत असतो की ज्याला आत्मज्ञान प्राप्त होते आणि त्याच्या सर्व वासना शांत होतात. इतरांच्या वासना त्यांना छळत राहतात. ज्याच्या वासना शांत झाल्या त्याला वैराग्य प्राप्ती होते. केवळ घर सोडल्याने व लंगोटी लावल्याने वैराग्य प्राप्त होत नाही. अशा उपायांनी वैराग्य मिळाले असते तर भुकेले-नागडे फिरणारे सारे भिकारी सुद्धा वैराग्य मिळवू शकले असते व ज्ञानी झाले असते. आत्मज्ञान होणे, सर्वाप्रती समभाव निर्माण होणे हेच वैराग्यप्राप्तीचे साधन आहे व आत्मज्ञानी माणूसच खरा जीवनमुक्त आहे.
अनित्यं सर्वमेवेदं तापत्रितयदूषितम् ।
असारं निन्दितं हेयमिति निश्चित्य शाम्यति ॥ ३ ॥


अनुवाद - हे सर्व अ-नित्य आहे. तीन्ही स्वरूपाच्या तापांनी म्हणजेज त्रितापांनी दोषयुक्त आहे. सत्वहीन आहे, निंदा करण्यास योग्य आहे, हलके व वाईट आहे, असे उमजल्यानंतरच शांती प्राप्त होते.


विवेचन - अष्टवक्र मुनी ज्ञानसंपन्न आहेत. आत्मानंदाच्या परम सुखाची प्राप्ती केलेल्यांना नित्य व निर्दोष तत्वाचा लाभ झाल्यामुळे या जगातली सुखे क्षणभंगुर व अनित्य वाटतात. सूरदासाने लिहिले आहे की -

" जिन रसना अंबुज फल चाख्यो । क्यों करील फल खावे ? ॥ "

ज्याने मधुरतम फळाचा स्वाद घेतला तो कडू फळे कशाला खाईल ? ह्या जगातील सुख, भोग सर्व अनित्य आहेत, फक्त काही काळ टिकून भंग पावणारे आहेत, हे केवळ चार दिवसाचे चांदणे आहे. हे सुख विनाशी आहे, ते नष्ट होणारच. शिवाय आध्यात्मिक, अधिदैविक आणि आधिभौतिक अशा तीन प्रकारच्या तापांनी दूषित झाले आहे. त्यात सत्य किंवा सार असे काहीच नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणे व मृत्यूमुखी पडणे. पुन्हा पुन्हा तीच कर्मे करून त्यांचा भोग भोगणे, यश-अपयश, नफा-तोटा, सुख-दुःख, पीडा, क्लेश ह्यांचा प्रत्येक जन्मात हिशोब ठेवणे. तेच बालपण, तारूण्य व म्हातारपण, स्त्री, मुले व नातेवाईक ह्यांचे चांगले वाईट अनुभव घेत रहाणे, ह्यात सार काय आहे ? त्यामुळे जे सारहीन आहे, असार आहे ते केवळ निंदा करण्यायोग्यच नाही काय ? ते प्रशंसा करण्यायोग्य नाही. ते खालच्या प्रतीचे आहे, त्याचा काही उपयोग नाही. ज्या व्यक्तिचा असा निश्चय होतो, तोच आत्मज्ञान प्राप्त करू शकतो व शांतीचा लाभसुद्धा त्यालाच होतो. जो संसाराचा, जगाच्या, विषयसुखात रमतो, जो त्यांच्या भोगाने आनंदीत होतो त्याला हे जग सारयुक्त असल्याचा भ्रम मात्र होतो. ज्याला भौतिक सुखामुळे उन्नति झाल्यासारखे वाटते, तो आत्मज्ञानाच्या सुखापासून वंचीत होतो. अशा माणसाला सर्व काही मिळून सुद्धा शांती प्राप्त होत नाही. तो अशांत व अतृप्त आणि त्रस्त राहतो. शांती प्राप्त करण्याचा उपाय फक्त आत्मज्ञान प्राप्त करणे हाच आहे.
कोऽसौ कालो वयः किं यत्र द्वन्द्वानि नो नृणाम् ।
तान्युपेक्ष्य यथा प्राप्तवर्त्ती सिद्धिमवाप्नुयात् ॥ ४ ॥


अनुवाद - असा कोणता काळ आहे किंवा कोणती अवस्था आहे की जेंव्हा मनुष्याला सुख-दुःखाच्या द्वंद्वाचा अनुभव येत नाही ? म्हणून अशा क्षणिक द्वंद्वाबद्दल मनात उदासिन होऊन, जे काही प्राप्त झाले आहे, त्यात संतोष व समाधान मानणारा माणूसच सिद्धि प्राप्त करू शकतो.


विवेचन - सृष्टीमध्ये सुख-दुःख, लाभ-हानी, संघर्ष-शांती, जीवन-मरण, पुरुष-प्रकृती, जड-चेतन याप्रमाणे अनेक दंद्वे अनुभवास येतात. ह्या द्वंदानी स्पर्शही केला नाही असा कोणताच कालखंड नसतो. कारण सर्व काळात, सर्व अवस्थात ही द्वंदे मनुष्य अनुभवत असतो. अष्टवक्र मुनी म्हणतात ही संपूर्ण सृष्टी या द्वंद्वानी भरलेली आहे. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ या सर्व कालांत ह्या द्वंद्वाचा संचार व प्रभाव आहे. ते कधीच कोणत्याच अवस्थेत शांत होत नाहीत, ते सदैव असतातच. एकाच नाण्याच्या दोन बाजूंप्रमाणे असणारे सुख-दुःख, लाभ-तोटा, ही द्वंदे कधीच सुटी किंवा स्वतंत्र होत नाहीत. ती दोन्ही एकत्र मिळतात किंवा दोन्हीही मिळणार नाही. एकाचे अस्तित्व कायम ठेवून फक्त दुसर्‍याचा विनाश करायचा म्हटला तरी ते शक्य होत नसते. अर्थातच वास्तविकदृट्या ही द्वंद्वे सृष्टीत अस्तित्वात नसून मनुष्याच्या वासना, तृष्णा, स्वार्थ या वृत्तींमुळे ही द्वंद्वे बुद्धि व अहंकार निर्माण करतात. कारण सृष्टीमध्ये भेदाभेद करून हे चांगले, ते वाईट असा फरक करण्याचे काम बुद्धि करते. दृष्टीत भेद नसून वासनामय बुद्धि भेद व पर्यायाने द्वंद निर्माण करते. वाईट ठरवलेल्याचा नाश करून मनुष्य चांगले जे ठरविले आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करतो व त्यातूनच संघर्षाचा जन्म होतो. तेथूनच अशांती, लोभ, मोह यांना जन्म मिळतो. रोगी आहेत म्हणून डॉक्टर आहेत. चोर-डाकू आहेत म्हणून वकील व न्यायाधीश आहेत, पापी आहेत म्हणून संत-महात्मे यांना महत्त्व आहे. मृत्यू आहे म्हणून जीवनाची किंमत कळते. नैतिक मनुष्य ह्या दोघांत फरक करून आयुष्य जगतो. वाईटाला दूर करून चांगल्याला प्रस्थापित करू पाहतो. परंतु चांगले व वाईट हे दोन्ही संयुक्त आहेत. त्यातल्या केवळ एकालाच नाहीसे करता येत नसते. म्हणून अध्यात्मशास्त्र व वृत्तीचे मार्गदर्शन हेच आहे की दोघांचाही स्वीकार 'ईश्वरीय' म्हणून करावा. कारण मनुष्याच्या बुद्धिमुळे तो भेद दिसतो पण प्रत्यक्षात तसा भेद अस्तित्वात नाही. मनाशिवाय कोणताच भेद वा फरक निर्माण होत नाही. मनावर विजय मिळविला, अहंकार-बुद्धिला हस्तक्षेप करण्यापासून रोखले तर सर्व भेद नाहीसा होऊन सृष्टीचा, संपूर्ण जगाचा एकच एक असा एकत्वाचा बोध होईल. हेच ज्ञान आहे. जोपर्यंत भेद दिसतो, जाणवतो तोपर्यंत अज्ञान आहे.

म्हणून मुनीश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की या द्वंद्वाची, चांगल्या वाईटाची, सुख-दुःखाची उपेक्षा करावी, त्यांचे प्रती उदासिन व्हावे व जे प्राप्त झाले आहे त्यातच समाधान मानणे हाच आत्मसिद्धीचा उपाय आहे. असे समाधान मनाणाराच आत्मज्ञान प्राप्त करू शकतो. सृष्टीमध्ये भेदाभेद करणारा त्यामुळे द्वंदात सापडतो व ज्ञानापासून दूर जातो. त्यास ज्ञानप्राप्ती होत नाही. गौतमबुद्धाने सुद्धा 'उपेक्षा' असा शब्द वापरला आहे. तंत्रमार्गात सांगितले आहे की सर्व काही ईश्वरीय म्हणजे ईश्वराने निर्माण केलेले आहे असे मानून समाधानपूर्वक स्वीकार करावा. भक्ताची वृत्ती अशी हवी की, चांगले-वाईट, सुख-दुःख सर्वकाही त्या परमात्मास्वरूप ईश्वराचे आहे, जे द्यायचे ते तोच देत असल्याने ती त्याची जणू आज्ञा आहे असे समजून त्याचा स्वीकार करावा. भाषा अनेक असतात पण त्या सर्व एकाच घटनेचा अर्थ सांगतात. त्याप्रमाणे अर्थ एकच आहे की सर्व द्वंदाचा स्वीकार करणे हाच मुक्तिचा मार्ग आहे.
नानामतं महर्षीणां साधूनां योगिनां तथा ।
दृष्ट्वा निर्वेदमापन्नः को न शाम्यति मानवः ॥ ५ ॥


अनुवाद - महर्षि, साप योगी या सर्वांची वेगवेगळी विविध मते मतांतरे आहेत. हे पाहून त्या सर्वांविषयी उपेक्षावृत्ती धारण करणार्‍या कोणाला शांती मिळणार नाही ? ( उदासिन झालेल्या सर्वांना शांती मिळेल.)


विवेचन - जगात सर्व बाबींबद्दल विविध मते मतांतरे आहेत. वेगवेगळे सिद्धान्त आहेत, वेगवेगळ्या समजूती आहेत. अनेक प्रकारच्या पद्धती, अनेक प्रकारच्या साधना उपासना करण्याच्या रिती आहेत. पण त्यांच्यापैकी एकातही सत्याचा अंश नाही. सत्य तर एकच आहे. त्यामुळे या सर्व विद्वानांची व इतरांची मते वेगवेगळी कशी काय असू शकतात ? बुद्धि व तर्काने काहीही सिद्ध करता येत नाही. तत्वज्ञानाच्या अभ्यासाने सुद्धा काहीच हाती लागत नाही व या प्रश्नाचे उत्तरही मिळत नाही. जर हे सर्व सत्य असते तर त्यांच्यात एवढी मतभिन्नता असूच शकत नाही. हे सर्व सिद्धांतवादी, तर्कवादी, सारेच्या सारे केवळ बुद्धिभ्रम पैदा करणारे आहेत. म्हणून या बुद्धिभ्रमापासून वाचण्यासाठी या बुद्धिवाद्यांपासून दूर राहीले पाहिजे. ज्याला मोक्ष हवा आहे, या सिद्धान्तांपासून व विविध मतांपासून दूर राहिले पाहिजे. मुनीश्रेष्ठ अष्टवक्र महाराजांनी मागच्या सूत्रात विविध द्वंद्वांची उपेक्षा करण्यास सागितले. या सुत्रात ते मते-मतांतरे व विविध वाद, वेगवेगळ्या विचारप्रणाली यांची उपेक्षा करण्याचा महत्त्वपूर्ण उपदेश करत आहेत. सत्य एक असतांना ह्या महर्षि, स्वामी, साधू व योगी लोकांची मते मात्र अनेक असल्याने केवळ उपेक्षा केल्यानेच त्यांच्यापासून बचाव होऊन शांती प्राप्त होईल. शाश्वत सत्य ही अनुभवण्याची बाब आहे, ती शास्त्रात विज्ञानात नाही किंवा कोणत्याही सिद्धान्तात नाही. बुद्धि ही भ्रम निर्माण करणारी असल्याने बुद्धिप्रामाण्यात शंकेखोरपणा व म्हणून त्रासीकपणा असतो. त्यात शांती नाही. शास्त्रात किंवा विज्ञानात किंवा बुद्धित नसणारे सत्य आपल्या स्वतःचे आत आहे व ते आत्मज्ञान प्राप्त करणे म्हणजे मोक्ष आहे. त्यामुळेच शांती प्राप्त होईल. वेगवेगळ्या विचारप्रणाली वाद, सिद्धान्त, मते मतांतरे, मतभिन्नता या आधारावर जन्माला आलेले गट, संप्रदाय व संघटना ह्या तर आध्यात्म क्षेत्रात केवळ विषाप्रमाणे आहेत. हे संप्रदाय घाण्याच्या बैलाप्रमाणे केवळ आपल्याच गटाच्या चाकोरीत गोलगोल फिरत राहतात. ते कोणतेही ध्येय गाठू शकत नाही. ज्ञानी या सर्व चाकोरींच्या बंधनांना तोडून आत्म्याचा अनुभव घेतो व म्हणून त्यास शांती प्राह होते.
कृत्वा मूर्तिपरिज्ञानं चैतन्यस्य न किं गुरुः ।
निर्वेदसमतायुक्त्वा यस्तारयति संसृते ॥ ६ ॥


अनुवाद - चैतन्याच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान करून देत आणि उपेक्षा, समता व युक्ति यांचा अवलंब करून या भवसागरातून आपल्याला तारून नेतो तो काय आपला गुरू नाही ? ( तोच आपला गुरू आहे.)


विवेचन - अष्टवक्र गीतेच्या प्रारंभी उपदेश करतांना मुनिश्रेष्ठ गुरूदेव अष्टवक्र महाराजांनी शिष्याच्या पात्रतेबद्दल आग्रहपूर्वक प्रतिपादन करतांना सांगितले आहे की शिष्याची पात्रता हीच मुख्य असून गुरू मुख्य नाही. गुरूच्या केवळ उपस्थितीमुळे ज्ञानप्राप्तीची घटना घडून येते. गुरू काहीच करत नाही, तो ज्ञान देऊ शकत नाही किंवा मुक्ति देऊ शकत नाही, पण गुरूच्या अनुपस्थितीत ही ज्ञान-प्राप्ती झाली तर शिष्याला ती पेलवत नाही. ही स्थिती पेलण्याची ताकद गुरूमधेच असते. वस्तुतः खरा गुरू तर आत स्थित असलेला आत्मा आहे, दुसरा कुणी नाही. त्या आतल्या मुख्य गुरूला प्रकट करण्यासाठी बाहेरच्या गुरूचे सहाय्य मात्र मिळते. म्हणून हा बाहेरचा गुरू केवळ निमित्त मात्र असतो व आत्मज्ञान होण्यापूर्वी त्याची आवश्यकता असते. नंतर स्वतःच्या आतला गुरू प्रकट झाल्यावर ह्या बाहेरच्या गुरूचा सुद्धा त्याग करावा. आत्मज्ञान प्राप्ती झाल्यावर तर शिष्य स्वतःच गुरू होतो. त्यामुळे ज्याप्रमाणे अन्य क्रिया-कर्म, पद्धती, शास्त्र, धर्म, जाती, संप्रदाय या सर्वांचा त्याग करायचा असतो, एवढेच काय पण मूर्ती-पूजा, कर्मकान्ड, साकार-सगुण उपासना यापद्धतीं या व ईश्वराचा सुद्धा त्याग केला पाहिजे, अन्यथा या सर्व गोष्टी बंधन होऊन बसतात. शंकराचार्य ह्याचमुळे ईश्वराला सुद्धा माया समजून त्याचा त्याग करण्याचा उपदेश करत असत. स्वामी रामकृष्ण परमहंसांनी ह्याच कारणांनी कालीमातेचा सुद्धा त्याग केला होता. बुद्धाने आत्म्याचाच त्याग करण्याचा उपदेश दिला. ह्याप्रमाणे स्वतःला गुरूपद लाभल्यावर, बाहेरच्या गुरूचा त्याग करावा अन्यथा जो गुरू शिष्याला मुक्तिसाठी मदत करतो तोच गुरू पुढे शिष्याचे बंधन होऊन बसतो. आत्मा हाच आमचा खरा गुरू आहे. म्हणून जागृत बुद्धिचे लोकांचा सल्ला आहे की आपला प्रकाश तुम्ही स्वतःच व्हा. दुसर्‍याच्या दिव्याने आपल्याला रस्ता दिसणार नाही. अष्टवक्र मुनींचे सांगणे आहे की कोणत्याही पद्धतीने मग ती पद्धत उपेक्षेची असो किंवा समभावाची; ह्या प्रापंचिक सुख-दुःखांप्रति उपेक्षा करून किंवा त्यांना समभावाने मानून किंवा अन्य युक्तिने पण ह्या सर्व द्वंदांना दूर सारून ज्याने आपले चैतन्यस्वरूप जाणून घेतले, तो स्वतःच स्वतःचा उद्धार करतो व तो एक सिद्ध ज्ञानी गुरू होतो. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे की, "सुखदुःखे समे कृत्वा, लाभालाभौ जयाजयौ" ( सुख व दुःख, लाभ-ज्ञानी, जय-पराजय ह्या सर्वांना समान दृष्टीने पाहणे आवश्यक आहे तर स्थितप्रज्ञ होता येते.) ह्यापैकी कोणताही एक उपाय करून जो चैतन्यस्वरूप आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घेतो तो ज्ञानी पुरूष स्वतःच अधिकारी पुरूष व गुरू होतो. मग त्याला दुसर्‍या गुरूची गरज नसते. किनार्‍यावर पोहोचल्यानंतर नाव सोडून द्यावी लागते. अर्थात ही अवस्था येण्याच्या आधी मात्र गुरूची जरूर आवश्यकता असते. आणि हा गुरुसुद्धा आत्मज्ञानी असण्याची गरज आहे. जो आत्मज्ञानी आहे तोच गुरू योग्य मार्गदर्शन करू शकतो. अज्ञानी माणूस शिक्षक होऊ शकतो परंतु गुरू होऊ शकत नाही. अंतिम गुरू आत्मा आहे हेच या सुत्रातून अष्टवक्र मुनीना सांगावयाचे आहे.
पश्य भूतविकारांस्त्वं भूतमात्रान् यथार्थतः ।
तत्क्षणाद्‌बंधनिर्मुक्तः स्वरूपस्थो भविष्यसि ॥ ७ ॥


अनुवाद - जेव्हा तू भौतिक विकारांना ( देह, इंद्रिये वगैर) तू केवळ भौतिक स्वरूपातच ओळखशील, त्याच क्षणी तू बंधनातून मुक्त होऊन आपल्या आत्मस्वरूपात लीन होशील.


विवेचन - मनुष्याचे खरे स्वरूप चैतन्यरूपी आत्मा आहे. हे भौतिक जग व देह हा त्याचा केवळ एक विकार आहे, एक प्रकारे विकृत स्वरूप आहे. मनुष्याची जशी विचारशक्ति असेल, जशी दृष्टी असेल तशीच त्याची सृष्टी असते. ज्ञानाचा अभाव असल्याने ही भौतिक सृष्टी सत्य वाटते व आकर्षकही वाटते कारण आपल्या वासना इच्छा, आपले हितसंबंध ह्या सृष्टीशी जोडलेले आहेत. त्यामुळे तिचे सत्य स्वरूप - आत्मरूप आपल्याला मिळू शकत नाही. प्रत्येक गोष्टीकडे आपण तिचा काय उपयोग आहे ह्या नजरेने पहातो. जो आपल्या उपयोगी आहे, आपल्या इच्छा व वासना पुर्‍या करायला उपयोगी पडतो तो आपल्याला श्रेष्ठ वाटतो व दुसरे निरर्थक वाटतात. ह्या दृष्टीमुळे आपल्याला आपली धर्मपत्नी, आपले घर, आपले शेत हे सर्व आपले हितसंबंध जपणारे असल्यामुळे व त्यांच्याशी आपल्या इच्छापूर्तीच्या अपेक्षा जोडलेल्या असल्यामुळे जेवढे चांगले वाटतात तेवढे दुसरे वाटत नाहींत. हे त्यांच्यावर केलेले चांगुलपणाचे आरोपण आपले मनच त्यांच्यावर करते अन्यथा त्यांच्यात व दुसर्‍यात वास्तवात काहीच फरक नसतो. अष्टवक्र मुनी म्हणतात की ह्या विश्वात हे सर्व देह, इंद्रिय, भूते (जीव), सृष्टी सारे काही त्या चैतन्य आत्म्याचे विकार आहेत. तू त्यांना चैतन्य न समजता, सत्य न समजता केवळ भौतिक व क्षणिक स्वरूपातच ओळखणे म्हणजेच तू बंधनमुक्त होऊन आत्मस्वरूपात विलिन होणे आहे. वासनेमुळे ही सृष्टी भौतिक न वाटता चैतन्यमय वाटते हा भ्रम ओळखला पाहिजे. बंधन मुक्ति साठी दृष्टी परिवर्तन होण्याची गरज आहे. वस्तूंना त्यांच्या त्यांच्या मूळ स्वरूपात ओळखणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे.
वासना एव संसार इति सर्वा विमुञ्च ताः ।
तत्त्यागो वासनात्यागात् स्थितीरद्य यथा तथा ॥ ८ ॥


अनुवाद - वासनामुळेच ह्या भ्रामक विश्वाचे अस्तित्व आहे म्हणून ह्या सर्व वासनांचा त्याग कर. वासना त्याग हाच संसाराचा त्याग आहे. त्यानंतर तू पाहिजे तिथे राहू शकतो.


विवेचन - मुनीश्रेष्ठ अष्टवक्र हेच सत्य अधिक ठळकपणे स्पष्ट करण्यासाठी सांगतात की हे सारे विश्व भौतिक असून आपल्या वासनांमुळे आपल्याला त्याचे अस्तित्व सत्य वाटते. अन्यथा ते सारहीन व असत्य आहे. वासना आहेत म्हणून जग सत्य असल्याचा भ्रम आहे. जग जर जसे आहे तसेच राहील परंतु तुझे दृष्टीपरिवर्तन झाले तर तू ह्या बंधनातून मुक्त होशील. वासनांचा त्याग केला तर संसाराचा त्याग केल्यासारखेच आहे. वासनेमुळे हे विश्व तुझे बंधन झाले आहे. ह्या जगाने तुला बांधलेले नाही तर आपल्या वासनेमुळे तू स्वतःच ह्या बंधनात अडकला आहेस. आपल्या वासनांची परिपूर्ती करण्यासाठी व अनेक अपेक्षांच्या परिपूर्तीसाठी तू स्वतःच पत्नी, मुले, घर, संसार, समाज, कुटुंब या सर्वांच्या पाशात अडकला आहेस. ज्या क्षणी तू सर्व वासनांच्या पाशातून स्वतःला सोडवशील वासनांचा त्याग करशील त्या क्षणी तुझी ह्या सर्व बंधनातून सुटका होईल. मुक्ति मिळविण्यासाठी तुला कुठेही जावे लागणार नाही. त्यासाठी घर सोडून जंगलात जावे लागणार नाही. पत्नी, मुले, घर, वैभव, समाज, कुटुंब काहीही सोडावे लागणार नाही. वासना सुटल्यावर तू पाहिजे तिथे राहू शकतोस. वासना शिल्लक असतांना तू हिमालयाच्या गुहेत जाऊन राहिलास तरी हे जग तिथेसुद्धा तुला बंधनात ठेवेल. तिथेसुद्धा मुक्ति मिळणार नाही. मुनीश्रेष्ठ अष्टवक्र सर्व प्रकारच्या लोक-वासना, शास्त्र-वासना आणि शारीरिक-वासनांचा त्याग करण्यास सांगत आहेत. शारीरिक वासना व शास्त्र-वासनांचा त्याग केल्याने आत्म-ज्ञान होते पण शेवटी ईश्वराचा सुद्धा व मोक्षाच्या इच्छेचा सुद्धा त्याग केल्यानेच मुक्ति प्राप्त होते. शुद्ध वासना व अहंकार यांचेतून मुक्त होणे हीच परममुक्ति आहे, तोच मोक्ष आहे.
GO TOP