अष्टावक्रगीता

प्रकरण ६ वे

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

आत्मा आकाशाप्रमाणे असून त्याचे ग्रहण किंवा त्याग संभवत नाही.

आकाशवदनन्तोऽहं घटवत्प्राकृतं जगत् ।
इति ज्ञानं तथैतस्य न त्यागो न ग्रहो लयः ॥ १ ॥


अनुवाद - मी आकाशाप्रमाणे अंतहीन आहे. हे जग मातीच्या घड्याप्रमाणे नाश पावणारे आहे, याप्रमाणे ज्ञान झाल्यावर त्याचे ग्रहण करणे किंवा त्याग दोन्ही नाही.


विवेचन - ह्या प्रकरणाचे आधी आपण पाहिले की महाज्ञानी गुरू अष्टवक्र महाराज हे पाहून संतुष्ट होतात की राजा जनकाने खरोखरीच आत्मज्ञान प्राप्त केले आहे. तदनंतरच ते मुक्ति मिळविण्याचे सुत्र राजा जनकास समजावून सांगतात. त्याचवेळी ते अप्रत्यक्षपणे राजा जनकाला मोक्ष-प्राप्तीची इच्छा आहे काय याचीही परीक्षा घेत असतात. कारण जर इच्छा अजूनही शिल्लक असेल तर अद्याप मोक्ष प्राप्त झालेला नाही. ज्या अवस्थेत काहीही प्राप्त करण्याची इच्छा नाही, काहीही त्याग करण्याची इच्छा नाही, राग नाही किंवा विराग नाही, आसक्ति नाही किंवा विरक्ति नाही एवढेच काय पण विश्व ही नाही व मुक्ति ही नाही अशा चित्ताच्या शून्य अवस्थेलाच मोक्ष किंवा मुक्ति म्हणतात. अशा अवस्थेला पोहचलेली व्यक्ति म्हणजे केवळ शुद्ध चैतन्य होय. समाधी-अवस्थेत जेव्हा मनुष्य शून्यावस्थेत पोहोचतो तेंव्हाच त्याला ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याचा बोध होतो, त्या अवस्थेतील साधक केवळ व्यक्ति न रहाता तो स्वतःच समष्टीशी एकरूप होतो. पूर्ण सत्ताशाली व अंतीमतः एकच अस्तित्व असणार्‍या ब्रह्माला साधक जाणतो व ते जाणल्याने तो स्वतःच ब्रह्म होतो, त्या सत्याची जाणीव झाल्याने तो स्वतःच सत्य होतो. ह्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी त्या आधी अनेक क्रिया वा कर्म करावे लागते परंतु ही अवस्था येताच त्या सर्व क्रियांचा त्याग करावा लागतो अन्यथा त्या क्रियाच त्याचे बंधन होतात. नदी पार करण्यासाठी नावेचा उपयोग केला तरी किनारा आल्यावर नाव सोडून द्यावी लागते. किनारा आल्यावरही नावेला न सोडणे हा मूर्खपणाच होईल. या अवस्थेला पोहोचल्यावर शास्त्र, कर्म-विधी, कर्म-कांड, ध्यान, धारणा, समाधि वगैरे सर्व बाबींचा त्याग करावा लागतो, कारण त्यांची उपयोगीता तेंव्हा संपुष्टात आलेली असते. ज्ञान-प्राप्तीसाठी त्यांचा उपयोग होता, आता ते सर्व निरर्थक होऊन जाते. पूजा, मंदिर, उपासना सर्व काही व्यर्थ होते. जीवनात त्याचा उपयोग आहे. मोक्षमार्गात त्याचा काही उपयोग नाही. जागृत अवस्था यावी यासाठी सुख-दुःख वगैरे सर्व द्वंद्वांचा त्याग करून शांतीचा अनुभव घेऊन जागृत व्हायचे असते. अष्टवक्र महाराज जनकाला मुक्तावस्थेची माहिती देण्यासाठी जो उपदेश करतात त्याचा प्रतिसाद म्हणून राजा जनक त्यास उत्तर देतो की - 'मी शरीर नसून आत्मा आहे. ज्याप्रमाणे आकाश हे अन्तहीन आहे - असीम आहे, त्याची कोणतीच मर्यादा नाही त्याचप्रमाणे आत्म-रूप झालेल्या पुरुषाची स्थिती असून तो सुद्धा अ-सीम होऊन जातो. हे विश्व आत्म्याचेच रूप आहे व ते मातीच्या घड्याप्रमाणे आहे. जेंव्हा ही सारी सृष्टी एकच आत्मतत्त्व आहे तेंव्हा कशाचा त्याग, स्विकार, विलय कशात व कुणाचा असा प्रश्न निर्माण होतो. त्याग, स्विकार, लय ह्या सारख्या गोष्टी तेंव्हाच शक्य असतात जेंव्हा एकाचा त्याग किंवा लय दुसर्‍यात होतो. अन्यथा ह्या क्रिया होणे संभवत नाही. मी हे सत्य जाणले आहे की आत्मा एकच आहे व तोच शाश्वत सत्य आहे ( सर्वं खल्विदं ब्रह्मं, नेह नानास्ति किंचन, सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म') तर मग कशाचा कशात विलय होणे शक्य आहे, त्याग तरी कसा होणार किंवा स्वीकार तरी कसा होणार ?




महोदधिरिवाहं स प्रपञ्चो वीचिसन्निभः ।
इति ज्ञानं तथैतस्य न त्यागो न ग्रहो लयः ॥ २ ॥


अनुवाद - मी समुद्राप्रमाणे असून विश्व त्यात निर्माण होणार्‍या तरंगांप्रमाणे आहे, हे ज्ञान आहे. त्यामुळे न कशाचा त्याग आहे न कशाचा विलय किंवा स्वीकार आहे.


विवेचन - जनक राजा दुसरे उदाहरण देत सांगतो की, मी आत्मरूप झाल्याने एखाद्या समुद्राप्रमाणे असून हे विश्व माझ्यातच निर्माण होणार्‍या तरंगाप्रमाणे आहे, असे ज्ञान मी प्राप्त केले आहे. सर्व काही एकच असल्याने कशातही भिन्नता असल्याचा भ्रम नष्ट झाला असून आता कशाचाच त्याग, स्विकार किंवा विलय संभवत नाही. या आधीच्या सुत्रात आकाश व घड्याचे उदाहरण दिले होते त्यात किंचित भिन्नता असल्याचा भास होऊ शकतो. आता समुद्र व त्यात उठणार्‍या तरंगांचे वा लाटांचे उदाहरण दिले आहे. ह्या उदाहरणाद्वारे अद्वैत स्थिती स्पष्ट केली आहे की आत्मा एकच असून त्याची निर्मिती होत नाही, त्याचा जन्म होत नाही, त्याचा नाशही होत नाही. त्यामुळे त्याचा स्विकार वा त्याग करता येत नाही.




अहं स शुक्ति संकाशो रूप्यवद्विश्वकल्पना ।
इति ज्ञानं तथैतस्य न त्यागो न ग्रहो लयः ॥ ३ ॥


अनुवाद - मी शिंपल्याप्रमाणे आहे व विश्वाची कल्पना शिंपल्यात भासणार्‍या चांदीप्रमाणे आहे असे ज्ञान मला झाले असल्याने त्याचा त्याग किंवा स्वीकार करणे शक्य नाही.


विवेचन - वरच्या सुत्रात समुद्र व लाटांच्या उदाहरणात किंचित वेगळेपणा असल्याचा भास होऊ शकतो म्हणून राजा जनक अधिक स्पष्टतेसाठी तिसर्‍या उदाहरणाचा उपयोग करतो. कारण लाटांचा विलय समुद्रात होणे शक्य असते. परंतु मी (आत्मा) शिंपल्याप्रमाणे सत्य असून या विश्वाची कल्पना त्यावर केवळ कल्पनेने भासमान होणार्‍या चांदीच्या भ्रमाप्रमाणे आहे. जे अस्तित्वात नाही व केवळ भ्रम आहे त्याचा कशाचा स्वीकार व कशाचा त्याग होणार ? हेच राजा जनकाने प्राप्त केलेले ज्ञान आहे.




अहं या सर्वभूतेषु सर्वभूतान्यथो मयि ।
इति ज्ञानं तथैतस्य न त्यागो न ग्रहो लयः ॥ ४ ॥


अनुवाद - मी सर्व जीवांमधे असून हे सर्व जीव माझ्यामधे आहेत असे मला ज्ञान प्राप्त झाले असल्याने त्याचा त्याग नाही किंवा स्वीकार नाही वा विलय नाही.


विवेचन - वरील तीन सुत्रात तीन उदाहरणे देऊनही मुद्दा पूर्णपणे स्पष्ट होऊ शकला नाही कारण प्रत्येक उदाहरणात थोडा थोडा अन्य भास होण्याची शक्यता आहे. यास्तव राजा जनक ह्या शेवटच्या चौथ्या उदाहरणाने हे स्पष्ट करतो की, मी आत्मरूप असल्यामुळे सर्व साकार पदार्थात, जीवात असून ते सर्व माझ्यात आहेत. आत्मा आणि सृष्टीची अशी अभिन्न स्थिती आहे. हे सर्व साकार, जीवपदार्थ शारीरिक रूपात वेगवेगळे प्रतीत होत असले तरी ते सर्व माझेच रूप आहेत. रूप आणि अरूप, सूक्ष्म व स्थूल, निराकार व साकार ह्यांच्यात तत्वतः काहीच फरक नसतो. वाफ हे पाणी असते व पाणी हे वाफ असते. केवळ आकार भेदामुळे मुळ तत्वात भिन्नता येत नाही. आत्मा व सृष्टीचेही असेच आहे. त्यामुळे त्यात त्याग, स्वीकार वा विलय शक्य नाही.

ह्या अदैताचे स्पष्टीकरण अजून अनेक उदाहरणे देऊन करता येते. उदाहरणार्थ सूत आणि वस्त्र, माळ व तिच्यातले मणी, आकाश व त्यांचा निळा रंग वगैरे ह्या सर्व उदाहरणातून आत्मा व ब्रह्म ह्यांचे एकत्वच स्पष्ट होते.




GO TOP