अष्टावक्रगीता

प्रकरण ५ वे

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

शरीराच्या अभिमानाचा त्याग केल्यानेच मोक्ष प्राप्त होतो.

न ते संगोऽस्ति केनापि कि शुद्धस्त्यक्तु मिच्छसि ।
संघातविलयं कुर्वन्नेवमेव लयं व्रज ॥ १ ॥


अनुवाद - राजा जनकाला मोक्ष प्राप्तीबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी अष्टवक्र महाराज सांगतात की, 'तू दुसर्‍या कुणाशी संबंधित नसून शुद्ध आहेस, मग तू त्याग कशाचा करण्याची इच्छा बाळगतोस ? ह्याप्रमाणे देहाचा अभिमान त्यागून मोक्ष प्राप्ती करून घे.'


विवेचन - राजा जनकाने दिलेली उत्तरे ऐकून अष्टवक्र महाराजांना फार समाधान वाटले की राजा जनकाला खरोखरीच आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. कारण त्याच्या मनोवृत्ती व वर्तन खरोखरीच आत्मज्ञानी व्यक्तिप्रमाणेच आहेत. ह्या प्रकरणात अष्टवक्र गुरूदेव मोक्ष प्राप्तीबद्दल राजा जनकाला उपदेश करीत आहेत. अष्टवक्र महाराज सांगतात की, तू फक्त आत्मा आहेस हे तू जाणले आहेस, तू शुद्ध आहेस, एकटा आहेस, तुझे कोणी साथी-सोबती नाहीत मग तू कुणाचा त्याग करणार ? त्याग त्याच गोष्टीचा करता येतो जी तू स्वतःची मानशील. जे तुझे नाहीच त्याचा त्याग तू कसा काय करणार ? हे सर्व ज्यास तू आपले समजतोस ते सर्व केवळ देहाभिमानामुळे होय. देहाच्या अभिमानामुळेच जगात आपल्याला वेगवेगळी शरीरे (माणसे) दिसतात. मनुष्यात जो परस्परसंबंध आहे तो सुद्धा देहाभिमानावर आधारलेला आहे आणि या देहाभिमानामुळेच आत्मा एक नसून अनेक असल्याचा भ्रम निर्माण होतो. जेवढी शरीरे आहेत, तेवढे आत्मे असल्याचा भास होतो व तोच सत्य वाटतो. हे माझे, हे दुसर्‍याचे, हे परक्याचे असा भेद जाणवतो तो सुद्धा देहाभिमानामुळे. ह्याच देहाभिमानामुळे लोक वस्तूंचे दान करतात कारण त्या वस्तू त्यांच्या आहेत, त्यांच्या देहाच्या मालकीच्या आहेत असे ते मानतात. मोह, माया, लोभ, स्वार्थ हे सर्व दुर्गुण देहाभिमानातून निर्माण झालेले आहेत. धन, वैभव, संपत्ती, घरे, पत्नी, पुत्र, नातेवाईक यांचा त्याग केल्याने काहीही साध्य होणार नाही. सर्वात मोठे बंधन व अडथळा देहाभिमानाचा आहे व त्याचा त्याग केल्यानेच मोक्ष प्राप्त होतो. देहाभिमान हेच अज्ञान आहे. दिवा पेटवल्यावर अंधाराचा त्याग करावा लागत नाही कारण अंधार अशी कोणतीच गोष्ट अस्तित्वात नाही. तिचा भ्रम असतो व दिवा पेटवल्यावर तो भ्रम आपोआप दूर होतो. त्यासाठी अंधाराचा त्याग करण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही. ह्या देहाभिमानामुळेच तुला भ्रम होतो की हे 'माझे' आहे; म्हणून तू त्याचा त्याग करण्याची गोष्ट करतो. ज्ञान काय आहे ह्याचा बोध ज्ञानाच्याच प्रकाशात होतो. ह्या देहाभिमानाचा समूळ नाश होणे हाच मोक्ष आहे. म्हणून तू सुद्धा हा देहाभिमान सोडून देऊन मोक्ष-प्राप्ती करून घे.
उदेती भवतो विश्वं वारिधेरिव बुद्‌बुदः ।
इति ज्ञात्वैकमात्मानमेवमेव लयं व्रज ॥ २ ॥


अनुवाद - तुझ्यातून हे सारे विश्व त्याचप्रमाणे निर्माण होते, ज्याप्रमाणे समुद्रातून बुडबुडा निर्माण व्हावा. त्याप्रमाणे जग व आत्मा हे एकच असल्याचे जाणून मोक्ष प्राप्त करून घे.


विवेचन - अष्टवक्र गुरू मोक्ष प्राप्तीचा उपाय सांगतांना राजा जनकाला उद्देशून म्हणतात की समुद्रातून ज्याप्रमाणे बुडबुडा निर्माण होतो त्याचप्रमाणे तुझ्यातून म्हणजेच आत्म्यातून ह्या विश्वाची निर्मिती होते. कारण विश्व व तुझा आत्मा एकच आहेत. सर्व सृष्टी एकच आहे. ह्याप्रकारे एकत्वाचा बोध प्राप्त झाल्याने तुला मोक्ष प्राप्ती होऊ शकेल. भागवतात सुद्धा सांगितले आहे की - हे बंधन व मोक्ष हे मनाचेच गुणधर्म व अवस्था आहेत. मन वासनाविरहित व शांत झाल्यानंतर बन्धन किंवा मोक्ष ह्यांचे नावसुद्धा रहात नाही. आत्म्यामध्येच मन विसर्जित केल्याने सार्‍या जगाला मोक्ष प्राप्ती होऊ शकते. अष्टावक्र महाराज सांगतात की जोपर्यंत आत्म्याचे एकत्वाचा बोध होत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्त होत नसतो.
प्रत्यक्षमप्यवस्तुत्वाद्विश्वं नास्त्यमले त्वयि ।
रज्जुसर्प इव व्यक्तमेवेमेव लय व्रज ॥ ३ ॥


अनुवाद - दोरीच्या ऐवजी सापाचा भास व्हावा त्याप्रमाणे अज्ञानी माणसाला दृश्यमान होणारे जग जणू प्रत्यक्षच अस्तित्वात असते पण अर्थातच तुझ्यासारखा शुद्ध आत्मज्ञानी व्यक्तिसाठी हे जग अस्तित्वात नाहीच. तुझ्यासाठी आत्मा हेच एक सत्य असल्याचे जाणून मोक्ष प्राप्त करून घे.


विवेचन - अज्ञानी माणसाला हे स्थूल जगत दृश्यमान झाल्याने ते जणू प्रत्यक्षातच अस्तित्वात असल्याप्रमाणे भासते, कारण त्याला आत्म-तत्त्वाचा परिचयच नसतो. आत्म-तत्वाचा बोध फक्त ज्ञानी माणसालाच होत असतो. यामुळे अष्टवक्र महाराज म्हणतात की दोरीच्या ऐवजी साप दिसावा या शभ्रमामुळेच आत्म्याच्या ऐवजी जग दिसण्याचा भ्रम अज्ञानी माणसाला होत असला तरी आत्म-ज्ञानी व्यक्तिसाठी शुद्ध चैतन्यस्वरूप आत्मा हाच जग आहे व तेच सत्य आहे. तुझ्यासाठी आत्मा हेच एकमेव सत्य आहे. हे ओळखून मोक्ष प्राप्त करून घे. आत्मतत्त्वावर दृढ निष्टा ठेवणे हाच मोक्ष प्राप्तीचा उपाय आहे.
समदुःखसुखपूर्ण आशानैराश्ययो समः ।
समजीवितमृत्यूः सन्नेवमेव लयं व्रज ॥ ४ ॥


अनुवाद - दुःख आणि सुख ज्याच्यासाठी समान आहेत, जो पूर्ण आहे व शांत असल्याने सुखी आहे, ज्याच्यासाठी आशा व निराशा सारख्याच आहेत, असा समचित्त होऊन तू मोक्ष प्राप्त करून घे.


विवेचन - अष्टवक्र महाराज सांगतात की, आत्मा पूर्ण आहे व तू शरीर नसून आत्मा असल्यामुळे पूर्ण आहे हे ज्ञान तुला आता झालेले दिसते. सुख-दुःख हे मनाचे गुणधर्म आहेत, आशा-निराशा हे चित्ताचे गुणधर्म आहेत आणि जन्म व मृत्यू हे शरीराचे गुणधर्म आहेत. पण ह्या तीन्ही बाबीपेक्षा तू वेगळा आहेस व केवळ चैतन्यरूपी आत्मा असल्याने केवळ साक्षीदार आहेस. ह्या तीन्ही गुणधर्माचा व आत्म्याचा काहीही संबंध नाही. तू आत्म-ज्ञान प्राप्त केले असल्याने तुझ्यासाठी आत्मा व सृष्टी एकच बाब आहे. तसेच या आधी सांगितलेले सर्व गुणधर्मही समान आहेत. ह्यामुळे तुझ्यासारख्या आत्मज्ञानी व्यक्तिला न सुख होते न दुःख होते. याप्रमाणे स्थितप्रज्ञ होऊन तू मोक्ष प्राप्त करून घे.

अष्टवक्र महाराजांनी मोक्ष प्राप्तीसाठी या प्रकरणात चार सूत्रे सांगितली आहेत. देहाभिमानाचा त्याग, आत्म्याचे अद्वैतपण जाणणे, जग सत्य असल्याचा भ्रमाचा त्याग आणि सर्व द्वंद्व व द्वैत भावना विसर्जित करून समत्वपूर्ण बुद्धि होणे या चार धारणा आत्म-ज्ञानी माणसास मुक्त करतात.
GO TOP